Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

इंद्रधनुष्यसाठी ‘अॅप’ विकसित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १४वा ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सव ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. महोत्सवासाठी चार रंगमंच सजले असून, विद्यार्थी कलावंताच्या सोयीसाठी ‘मोबाइल अॅप’ही विकसित करण्यात आला आहे. निवासव्यवस्था, रंगमंचस्थळी भेट देत, महोत्सवाच्या तयारीचा कुलगुरूंनी गुरुवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.
महोत्सवासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. मोबाइल अॅप, वेबसाइटवर नोंदणीसह विविध ३१ समित्या तयार करून जबाबदारी विभागण्यात आली आहे. २० विद्यापीठातील ८०० विद्यार्थी कलावंत सहभागी होणार असून, शुक्रवारपासून संघांचे आगमन होणार आहे. विविध २४ कलाप्रकारांमध्ये कलावंत आपली कला सादर करणार आहेत. चार व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, त्याची प्रशासनाकडून गुरुवारी पाहणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष प्रा. गजानन सानप, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. सुहास मोराळे यांची उपस्थिती होती.

कुलगुरू ‘नॅक’साठी दौऱ्यावर
महोत्सवादरम्यान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे ‘नॅक’साठी बाहेर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते संपेपर्यंत कुलगुरू महोत्सवात उपस्थित राहणार नाहीत. ‘नॅक’च्या समितीवर असल्याने समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

आठ वर्षांनंतर विद्यापीठाला यजमानपदाची संधी मिळाली आहे. आपली तयारी उत्तम झाली असून, महोत्सवासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे आपले पहिले विद्यापीठ ठरणार आहे.
- डॉ. बी. ए. चोपडे,कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

महोत्सवातील कार्यक्रम
शनिवार
- लोकवाद्य वृंद (स्टेज १, सायंकाळी ७)
- प्रश्नमंजुषा लेखी’ (स्टेज ३, सायंकाळी ७)

रविवार
- स्टेज १.. - मूक अभिनय (सकाळी ९)
- प्रहसन (सकाळी ११)
- लोक, आदिवासी नृत्य (दुपारी ३.३०)
- एकांकिका (रात्री ८)
- स्टेज २... सुगम गायन पाश्चात्य (सकाळी १०)
- शास्त्रीय तालवाद्य (दुपारी २.३०)
- स्टेज ३.. वादविवाद (सकाळी १०)
- प्रश्नमंजुषा तोंडी (दुपारी २.३०)
- स्टेज ४.. ऑन द स्पॉट पेंट‌िंग(सकाळी १०)
- कोलाज (दुपारी २)
- व्यंगचित्रकला ( सायंकाळी ५)

सोमवार
- स्टेज १.... शास्त्रीय नृत्य(सकाळी १०)
- समूह गायन पाश्चात्य (दुपारी ३)
- एकांकिका (सायंकाळी ७.३०)
- स्टेज २... शास्त्रीय सुरवाद्य (दुपारी २)
- शास्त्रीय गायन (सायंकाळी ६)
- स्टेज ३... वक्तृत्त्व (सकाळी १०)
- स्टेज ४... पोस्टर (सकाळी १०)
- मृदमूर्तीकला (दुपारी २)

मंगळवार
- स्टेज १...समूह गायन भारतीय (सकाळी ९)
- एकांकिका (दुपारी २)
- स्टेज २.. मिमिक्री (सकाळी १०)
- सुगम गायन भारतीय (सायंकाळी ५)
- स्टेज ४.. रांगोळी (सकाळी ११)
- स्पॉट फोटोग्राफी (दुपारी २)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज गळती रोखणे, हेच मोठे आव्हान

$
0
0



औरंगाबादः पश्चिम महाराष्ट्रात १० टक्के ग्राहकांकडून वीज बिल वसुली करावी लागते, तर ९० टक्के ग्राहक स्वतः बिल भरतात. मराठवाडा व खान्देशात नेमकी उलट परिस्थिती आहे. ९० टक्के वीज ग्राहकांकडे बिल वसुलीसाठी तगादा लावावा लागतो. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष पायाभूत सुविधा विकासाऐवजी वसुलीकडे लागलेले असते. या परिस्थितीचे आव्हान स्वीकारून व्यवस्था सुधारणेसाठी नेटाने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती महावितरणचे प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश गणेशकर यांनी दिली. त्यांच्याशी साधलेला संवाद.

- औरंगाबाद विभागात पायाभूत सुविधा विकासासाठी काय नियोजन आहे ?
- जीटीएलच्या काळात औरंगाबाद शहरातील वीज व्यवस्था सुधारण्याचे काम झाले नसल्याचे सत्य स्वीकारावे लागेल. पायाभूत सुविधांचा विकासासाठी औरंगाबाद परिमंडळात एकात्मिक उर्जा विकास योजना आणि दीनदयाल ग्रामज्योती योजनेतून शासनाने निधी मंजूर केला आहे. या निधीतून औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि जालना विभागातील कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल. औरंगाबाद शहरात सात सबस्टेशन वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याशिवाय कन्नड उपकेंद्राचे विभाजन करून वैजापूर आणि सिल्लोड येथे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

- वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे, ते कमी होणार नाही का ?
- औरंगाबाद परिमंडळात १७ टक्के वीज गळती असून त्याचे शहरातील प्रमाण ३३ टक्के आहे. वीज चोरी हे गळतीचे प्रमुख कारण आहे. आकडे टाकून व मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली जाते. ही चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. गेल्या दोन महिन्यात दोन हजारांपेक्षा जास्त वीज चोरी पकडून कारवाई करण्यात आली. याशिवाय २४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तिच्या वसुलीसाठी अभय योजना जाहीर केली. वापरलेल्या विजेचे संपूर्ण बिल देण्याची मानसिकता ग्राहकांनी अंगिकारावी. वीज चोरी थांबविण्यासाठी ‘टेम्परप्रुफ’ मीटर बसविण्यात येणार आहेत.

- वीज बिलाबाबत ग्राहकांच्या खूप तक्रारी आहेत ?
- वीज बिलाबद्दलच्या ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली होती. शिवाय आता मोबाइल अॅपवरून वीज बिलासाठी मीटरचे फोटो मागवण्यात येतात. ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक महावितरणाकडे बिलावर लिहून द्यावा. या क्रमांकावर थकबाकी, बिलाची माहिती देण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात सप्टेंबरमध्ये वीज बिलासाठी १ लाख ८३ हजार ग्राहकांच्या मीटरचे वाचन अॅपद्वारे करण्यात येत आहे.

- प्रादेशिक व्यवस्थापक पदाचा पदभार तुमच्याकडे आहे. तुमच्या समोर कोणती आव्हाने आहेत ?
- औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे ११ जिल्ह्यांचा कार्यभार आहे. मराठवाडा आणि खान्देश हा विभाग मुळात कृषी क्षेत्र आहे. या विभागात ३३ लाख घरगुती आणि १२ लाख कृषीपंप ग्राहक आहेत. उच्चदाब ग्राहक फक्त २४०७ आहेत. त्यामुळे गळती कमी करणे, वीज चोरी रोखणे, १०० टक्के वसुली हे उद्दिष्ट आहे.

- थकबाकीदारांची सध्याची काय परि‌स्थिती आहे?
- औरंगाबाद जालना शहरात एकूण २५८ कोटी २५ लाखांची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे. मार्च २०१६पर्यंत कायमस्वरुपी वीज खंडित केलेल्या ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यानुसार १ नोव्हेंबर २०१६ पासून बिलांवरील व्याज, दंड व विलंब आकार माफ केला जाणार आहे. ही योजना ३० एप्रिल २०१७ पर्यंत सुरू राहील. या योजनेत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी पूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के व्याज, दंड आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. मूळ रक्कमेत ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी थकबाकी भरल्यानंतर १०० टक्के विलंब आकार माफ व व्याजात ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर तपासणीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागातील शैक्षणिक वर्षातील गोंधळ व कारभाराची सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’ने केली आहे. संघटनेने कुलगुरूंची भेट घेत निवेदन दिले. उत्तरपत्रिका तपासणीत अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
पदवी, पदव्युत्तर उत्तरपत्रिका तपासणीबाबत अनेकदा विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीतही दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेत याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फेरतपासणीत अनेक विद्यार्थ्यांचे गुण वाढले. त्यावरून उत्तरपत्रिका तपासणीत दुर्लक्ष झाल्याचे समोर येते. त्यासाठी परीक्षा विभाग जबाबदार असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका फेरतपासणीत १० ते १४ गुण वाढले. त्याउलट काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह उभारले आहे. या कारभारास परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके, उपकुलसचिव विष्णु कराळे, पी. एस. पडूळ, एस. एस. मुंजेवार आदी अधिकारी परीक्षा विभागातील कारभाराला जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. काही कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सागर साळुंके, निलेश आंबेवाडीकर, सूरज निकम, आवेस पटेल यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीने गुरुवारी क्रांतिचौकात निदर्शने केली.
दिल्ली पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर ही कारवाई केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. औरंगाबाद जिल्हा व शहर काँग्रेसने गुरुवारी दुपारी क्रांतीचौकात केलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष, माजी आमदार नामदेव पवार, माजी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, पवन डोंगरे, अथर शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारांकडून माजी सैनिकांचा अपमान केला जात असल्याचाही आरोप या आंदोलनातून करण्यात आला.
शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा; तसेच उर्वरित माजी सैनिकांना लवकरात लवकर ओआरओपी योजना लागू करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : फायदेशीर शेतीचा आदर्श मार्ग

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com
Tweet : tusharbMT
हलक्या स्वरूपाची जमीन आणि पाणी टंचाई या समस्यांवर मात करून फळबागांचे योग्य व्यवस्थापन करण्यात शिंदेवडगाव येथील विजय विश्वनाथ भुतेकर यशस्वी ठरले. नवनवीन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे भुतेकर यांची शेती इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे. अठरा एकर जमिनीचे मालक असलेले भुतेकर रासायनिक खताचा वापर टाळून मोसंबीच्या प्रतिझाडास १३० किलोपर्यंत उत्पादन घेतात. नियोजनबद्ध पद्धत व कमी खर्चात मोसंबीचे विक्रमी उत्पादन निघू शकते हे त्यांनी सिद्ध केले. २००२ मध्ये कॉलेज शिक्षण संपल्यानंतर भुतेकर गावी शेतीत रमले. शेतीची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर हलक्या जमिनीत भरघोस उत्पादन काढण्याचे आव्हान होते. पारंपरिक पीक पद्धतीतून फारसा फायदा नव्हता. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यावर त्यांनी भर दिला. ताग आणि ढेंच्या पेरला. तसेच शेणखत व सेंद्रिय खताचा वापर करून जमीन सुपीक झाली. जालना जिल्हा ‘मोसंबीचे आगार’ असून, पाणी उपलब्ध असल्यास शेतकरी मोसंबीची लागवड करतात. २००४ यावर्षी भुतेकर यांनी सहा एकर क्षेत्रात ‘न्यूसेलर’ वाणाचे जंबेरी खुंटावरील कलमे लावली. मोसंबीसाठी १८ बाय १८ फूट अंतरावर दोन बाय दोन फुटाचे खड्डे खोदले. खड्ड्यात कसदार माती, शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट टाकले. त्यापूर्वी थोडे थायमेट टाकले. चांगला पाऊस पडल्यानंतर जुलै महिन्यात मोसंबीच्या कलमाची लागवड केली. ठिबक संच बसवून पाणी दिले. गरजेनुसार खताच्या मात्रा दिल्या. मोसंबीच्या कलमास गेल्या पाच वर्षांपासून रासायनिक खत दिले नाही. जमीन मध्यम ते हलक्या स्वरूपाची व पाण्याचा निचरा होणारी असल्याने झाडाची वाढ जोमदार झाली. पाच वर्षापर्यंत झाडे पारंपरिक पद्धतीने जगवल्यानंतर सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. सेंद्रिय खते वापरल्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. शिवाय मर रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही. सेंद्रिय आच्छादन फायदेशीर ठरले. साधारण तीन इंच जाडीचे आच्छादन झाडाच्या खोडाभोवती टाकले. शेतातील काडीकचरा, पाचट व भूस यांचा वापर केला. आच्छादन चांगले भिजल्यामुळे झाडाला जास्त पाण्याची गरज भासली नाही. आच्छादन कुजल्यानंतर उत्सर्जित कार्बनवायू बनलेले खत व भुसभुशीत झालेली जमीन पिकासाठी उपयोगी ठरली. सेंद्रिय पदार्थांच्या आच्छादनामुळे गांडूळ निर्मिती झाली. लेंडी खत व गांडूळ खताचा चांगला वापर झाल्यामुळे झाडांची सुयोग्य वाढ झाली. योग्यवेळी झाडाची छाटणी करून वाळलेल्या फांद्या व अनावश्यक भाग काढून झाड मोकळे ठेवले. सर्व झाडात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिली. झाडे तजेलदार राहिल्यामुळे उत्पादन वाढण्यासाठी त्याची मदत झाली. फळगळ होऊन मोसंबीचे ४० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते. भुतेकर यांनी विविध उपाययोजना करून फळगळ दोन ते पाच टक्क्यांवर आणली. मोसंबीच्या झाडांची वाढ एकसारखी असून झाडे निरोगी आहेत. यावर्षी सततच्या पावसामुळे काही प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव जाणवला म्हणून बुरशीनाशकाची एक फवारणी केली. नऊ एकर क्षेत्रावर तूर अधिक सोयाबीन आंतरपीक घेतले. सोयाबीनचा उतारा एकरी १५ क्विंटल आला. तूर पीक चांगले असून, भरघोस उत्पादन अपेक्षित आहे. शेतीच्या व्यवस्थापनासाठी वार्षिक खर्च तीन लाख रुपये येतो. खर्च जाता २५ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. शेतीचे योग्य व्यवस्थापन करून विजय भुतेकर यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ‘प्रत्येक पिकाचे काटेकोर व्यवस्थापन केल्यास प्रतिकूल परिस्थितीतही शेती यशस्वी करता येते’ असे भुतेकर यांनी सांगितले.

पाणी व्यवस्थापन
भुतेकर यांच्या शेतात एक विहीर असून, शेताच्या बांधालगत एक नाला वाहतो. नाल्याला भरपूर पाणी वाहत असल्यामुळे दीड किलोमीटरच्या अंतरात साखळी पद्धतीने सिमेंटचे तीन बंधारे बांधले. त्यामुळे विहिरीचे पाणी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपयोग करता आला. सतत चार वर्षे दुष्काळामुळे पाणी कमी पडले. म्हणून एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे भुतेकर यांनी बांधले. मोसंबीचे पीक ठिबक सिंचनावर असून पाणी टंचाई भासत नाही.

आंतरपीक व मत्स्यपालन
शेततळ्यात पुरेसे पाणी असल्यामुळे भुतेकर यांनी मागील वर्षी जून महिन्यात ‘सुपर्णस’ व ‘कटला’ जातीचे प्रत्येकी पाच हजार मत्स्यबीज सोडले. शेततळ्यातील पाणी उपसले नसल्यामुळे माशाचे वजन दोन किलोपर्यंत झाले. धान्याची चुरी करून माशांसाठी घरीच खाद्य तयार करतात. तसेच दहा किलो भात, पाच किलो युरीया, ३० ते ४० किलो शेण आठवड्यातून दोन वेळेस नियमित टाकतात. शेततळ्याच्या संरक्षणासाठी कुंपणावर तीन वर्षे दोडके, गिलके, कारले असा वेलवर्गीय भाजीपाला घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मोसंबी लागवडीत पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा. नवीन तंत्रज्ञान कठीण काळात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल,’ असे प्रतिपादन बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी केले. शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम घेण्यात आला. पैठण रोड परिसरातील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात गुरुवारी दुपारी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर प्रा. विजय जाधव, डॉ. नितीन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना डॉ. पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘शेतकऱ्यांच्या मोसंबीला आतापर्यंत ५० हजार रुपये प्रतिटन दर मिळाला, पण उत्पादन वाढीसाठी भरपूर वाव आहे. मराठवाड्यातील शेतकरी दहा टनापर्यंत उत्पादन घेत असला तरी ब्राझिल देशात सरासरी २५ टन उत्पादन निघते. या तुलनेत आपली उत्पादन क्षमता कमी आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज आहे. जमिनीची तपासणी करून मोसंबीची लागवड करावी. शासन मान्यताप्राप्त रोपवाटिकेतील रोपांची किंवा रंगपूर खुंटावर स्वतः रोपे तयार करून लागवड करावी. नवीन बागेची लागवड करताना दोन ओळीतील अंतर २० फूट व झाडातील अंतर हलक्या जमिनीसाठी १० फूट व भारी जमिनीसाठी १२ फूट ठेवावे. तसेच एक मीटर रुंद व दोन फूट उंच गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने लागवड करावी. मोसंबीत सुरुवातीच्या काळात मूग, उडीद, सोयाबीन किंवा हरभरा यासारख्या पिकांचे आंतरपीक घेणे फायद्याचे ठरते. परंतु कापूस, ऊस, तूर, गहू, ज्वारी, मका अशी पिके कटाक्षाने टाळावी. झाडांना दुष्काळी परिस्थितीत प्लास्टिक मल्चिंगच्या ऐवजी सेंद्रिय मल्चिंग नेहमी फायदेशीर ठरते. त्यामुळे २५ ते ३० टक्के पाणी बचत होते,’ असे डॉ. पाटील म्हणाले. दरम्यान, जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. डी. देशमुख यांनी केले. या उपक्रमासाठी डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. संतोष केंदार, रामेश्वर ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.

पाण्याचे नियोजन
‘आंबेबहाराच्या नियोजनासाठी एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने पाणी कमी करीत चार-पाच दिवसानंतर पाणी देणे बंद करून ताण द्यावा. एकदम पाणी देणे बंद करून किंवा पावसाच्या पाण्यावर ताण देऊ नये. जास्तीत जास्त २१ दिवसांनी जवळपास २५ टक्के पानगळ झाल्यावर २० डिसेंबरपर्यंत पाणी तोडणे आवश्यक आहे,’ असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बुकिंगचा दगा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी संपताच इच्छित स्थळी जाण्यासाठी चाकरमानी, विद्यार्थी आणि बच्चेकंपनीची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. ऐन मोक्याच्या प्रसंगी ऑनलाइन तिकीट बुकिंगने दगा दिल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. शिवनेरी, विनावाहक निमआराम बसच्या तिकीट खरेदीसाठी प्रवाशांच्या लांबलचक रांगा होत्या. पुण्याला जाण्याऱ्या विनावाहक बसचे तिकीट घेण्यासाठी मध्यवर्ती बस स्‍थानकाच्या फलाट क्रमांक क्रमांक दोनपासून ते थेट फलाट क्रमांक सहापर्यंत रांग लागली होती. ही गर्दी कमी करण्यासाठी जादा निमआराम गाड्या सोडल्याची माहिती मध्यवर्ती बस स्थानकाचे व्यवस्थापक संदीप धनाड यांनी दिली.
दिवाळीच्या निमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. यामुळे एसटी विभागाने जास्तीत जास्त गाड्यांची तिकीट बुकिंग ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेक प्रवासी ऑनलाइन तिकीट काढत आहेत. मात्र, गुरुवारी दुपारनंतर अनेक प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग करता आले नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागला.

फलाट बदलताच प्रवासी वाढले
औरंगाबाद - नाशिक मार्गावर फलाट क्रमांक १५ वरून विनावाहक बससेवा सुरू आहे. मात्र, या सेवेची प्रवाशांना माहिती नव्हती. त्यामुळे अनेक प्रवासी फलाट क्रमांक ३ वर थांबत होते. दुपारी एक वाजता नाशिक येथे जाणारी विनावाहक बस फलाट क्रमांक १५ वर एक तास उभी होती. या गाडीत फक्त नऊ प्रवासी बसले होते. प्रवासी नसल्यामुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी ही बस फलाट क्रमांक ३ वर उभी केली. त्यात पाच मिनिटांत ४० प्रवासी बसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताईंची दिवाळी गरीब मुलांसोबत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ताई फाउंडेशनने यावर्षीची दिवाळी गरीब मुलांसोबत रेल्वे स्टेशन परिसरात साजरी केली. या मुलांना रविवारी नवे कपडे, फराळाचे वाटप करण्यात आले.
स्टेशन परिसरात गरीब मुलांसोबत आवाज न होणारे फाटके वाजवून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. तेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता. त्यांच्या या समाधानातच आम्हाला आनंद मिळाला, अशी भावना यावेळी ताई फाउंडेशनच्या अध्यक्ष जान्हवी शेगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी श्वेता बागुल, कृतिका शेगावकर, प्रज्ञा शेगावकर, धनश्री शेगावकर, प्रतीक्षा होरशील आणि पोलिस कॉन्स्टेबल युगंधरा केंद्रे यांची उपस्थिती होती. ताई फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी कामे केली जातात. विशेषतः विद्यार्थिनी-महिलांना मदत करणे, विविध प्रश्नी सामाजिक जनजागृती, समाजातील अन्याय-अत्याचाराविरोधात लढा उभारण्याचे काम आजवर केले आहे. फाउंडेशनमध्ये सर्व सदस्य या विद्यार्थिनी आहेत. शाळा, कॉलेजसह त्यांनी समाजकार्यात उडी घेतली आहे. हे काम असेच पुढे सुरू ठेऊ, असा निर्धार यावेळी जान्हवी शेगावकर यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेएनपीटीच्या ड्राय पोर्टचे काम कासवगतीने

$
0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
उद्योग क्षेत्रातील आयात निर्यातीला चालना मिळावी, यासाठी मोठा गाजावाजा करून जालन्याजवळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) ड्राय पोर्टचे भूमिपूजन गेल्या २५ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. वर्षभरात या जागेवर एक इंचही काम झालेले नाही. या प्रोजेक्टसाठी धडपड करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाल्याने आता जेएनपीटीच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औरंगाबाद व जालना परिसरातील उद्योगांना आयात निर्यातीला मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या मदतीने जालना परिसरात ड्राय पोर्टची घोषणा केली. जागा संपादनासाठी वर्षभराचा वेळ गेला. कशीबशी जागा संपादित झाल्यानंतर २५ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ड्रायपोर्टचे काम लवकरात लवकर सुरू करून उद्योगांना चालना देण्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. वर्ष उलटून गेले तरी या ठिकाणी इंचभरही काम झाले नाही. नाही म्हणायला संपादित केलेल्या ४०० एकर जमिनीभोवती संरक्षण भिंत बांधण्याची निविदा काढण्यात आली आहे. एकाच टप्प्यात सर्व भिंत बांधण्यात येणार असून त्यासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कंपन्या औरंगाबाद व जालन्यातील आहेत. या व्यतिरिक्त अंतर्गत विकास तसेच दळणवळणासाठी रेल्वे उड्डाणपूल उभारावयाचा आहे. त्याच्या निविदा काढण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे.
मुळात भूमिपूजन झाल्यानंतर काम सुरू होणे अपेक्षित होते, पण राज्य व केंद्रीय पातळीवरून अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी आशिषकुमार बोस नावाचे अधिकारी गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी दूर झाल्या होत्या. मात्र, त्यांची नुकतीच मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बदली झाल्यामुळे पुन्हा एकदा हालचाली मंदावण्याची भीती व्यक्त होत आहे.

ड्राय पोर्टच्या संचालक मंडळाची बैठक औरंगाबादेत येत्या पंधरा दिवसांत बोलाविण्याची सूचना मी संबंधितांना केली आहे. या बैठकीत कामाचा आढावा घेण्यास मदत मिळेल. - राम भोगले, संचालक, जेएनपीटी ड्राय पोर्ट

ड्रायपोर्टचा प्रवास
- २५ डिसेंबर १५ रोजी भूमिपूजन
- ४०० एकर ड्रायपोर्टसाठी जागा
- ८० कोटी भूसंपादनासाठी अपेक्षित रक्कम
- १५० एकर जागा प्लॉट पाडून उद्योगांना विकणार
- कस्टम आणि नॉन कस्टम झोनसाठी स्वतंत्र जागा
- कॉमन सुविधा केंद्र उभारणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची दिवाळी सुरूच

$
0
0

अधिकाऱ्यांची दिवाळी सुरूच
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी संपून तीन दिवस उलटून गेले तरी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा दिवाळी मूड मात्र अद्याप कायम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी शुक्रवारी जनता दरबार घेतला. यावेळी काही निवडक विभागप्रमुखच उपस्थित होते. काही अधिकारी बुधवारी रुजू झाले. पण कामाच्या बाबतीत मात्र अद्याप वेग घेतलेला नाही. त्यामुळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दिवाळी मंगळवारी संपली. बुधवारपासून अनेक कार्यालये पूर्ववत सुरू झाली. गेल्या आठवड्यात दिवाळी मूडमुळे सरकारी कार्यालयांना जवळपास अघोषित सुटी होती. बुधवारी जिल्हा परिषदेत काही पदाधिकारी सदस्य नेहमीच्या वेळी उपस्थित झाले. पण अनेक अधिकारी जागेवर नसल्याचा त्यांना अनुभव आला. शुक्रवारीही अशीच परिस्थिती होती. अर्दड यांनी दुपारच्या सत्रात जनता दरबार बोलाविली होता. त्यासाठी पाच विभागप्रमुख उपस्थित होते. काही जण मुख्यालयाबाहेर दौऱ्यावर होते. शिक्षण व आरोग्य सभापती विनोद तांबे यांच्या दालनात अजिंठ्याची काही मंडळी वर्षभरापासून रखडलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी आली होती. तांबेंनी आरोग्य विभागात फोन लावला पण अधिकारी जागेवर उपस्थित नव्हते. त्यावर तांबे म्हणाले,‘‘ अधिकाऱ्यांची अजून दिवाळीच सुरू आहे. आम्ही दुसऱ्या दिवशीपासून कार्यालयात वेळेवर हजर झालो. अजूनही अनेक विभागप्रमुख जागेवरच दिसत नाहीत. अशाने कामे कशी होणार ? किरकोळ कामांसाठी फालोअप घ्यावा लागतो. अधिकाऱ्यांनी वेळेवर कामे केली तर आमचा ताण आपोआप कमी होईल.’’
काऊंटडाऊन सुरू
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेर आचारसंहिता लागू शकते. या शक्यतेने अधिकाधिक कामे मंजूर करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. किती दिवस राहिले याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅट्रॉसिटी’ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
मराठा क्रांती मोर्चामध्ये समाजाने दाखविलेल्या शिस्तीचे आम्ही कौतुक आणि मागण्यांचे समर्थन केले, मात्र अॅट्रॉसिटी रद्द करण्यापासून आता सुधारणा करण्याची मागणी होत अाहे. त्या उलट या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
प्रा. कवाडे म्हणाले की, अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी, मागासवर्गीयांचा शैक्षणिक, औद्योगिक विकासाला चालना आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा, या आमच्या मागण्यां आहेत. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी, ही आमची मागणी आहे, मात्र मराठा क्रांती मोर्चातून अॅट्रॉसिटी रद्द अथवा त्यात सुधारणेची होत असलेली मागणी चुकीची आहे. मराठा समाजाला या कायद्याची भीती का, हे न उलगडणारे कोडे आहे. राज्यात एकीकडे मराठा क्रांती मोर्चे निघत असताना वेगवेगळ्या भागांत अॅट्रॉसिटीचे ५६ गुन्हे दाखल झाले. मोर्चे सुरू असतानादेखील दलित आणि मागासवर्गीयांवर सातत्याने अत्याचार सुरूच अाहेत.
आरक्षणामुळे मागासवर्गीयांनाच मोठ्या प्रमाणात फायदा होतो, असा अपप्रचार सध्या सुरू आहे. हा अत्यंत चुकीचा संदेश आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सरकारी नोकरीत असलेले जातीनिहाय प्रमाणाची श्वेतपत्रिका जाहीर करायला हवी, अशी मागणीही कवाडे यांनी केली.

मराठा आरक्षणाला पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून, तामिळनाडूमध्ये आरक्षणाची टक्‍केवारी ६८ टक्‍क्‍यांपर्यंत पोचलेली आहे. त्याचा अभ्यास करून राज्यातही हा पॅटर्न राबविता येईल का, याची चाचपणी करावी, असेही कवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंखचे नाट्य शिबिर उत्साहात

$
0
0

पंखचे नाट्य शिबिर उत्साहात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंख नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीने तीन दिवस बालनाट्य संस्कार व व्यक्तीमत्व उत्साहात पार पडले. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ‘पंख’तर्फे २, ३ व ४ नोव्हेंबर रोजी हे शिबिर श्रेयनगर येथील पंख अकादमीत घेण्यात आले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नाटकाची ओळख, नाट्य अभिनय, शब्दांच्या उच्चारानुसार त्यांचे बदलणारे अर्थ, भावमुद्रा, विविध रंगांचे अर्थ, त्यांचा नाटकाच्या प्रसंगांशी असलेला संबंध, नाटकातून व्यक्तीमत्व कसे घडते आदी विविध बाबींची माहिती देण्यात आली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या ५० विद्यार्थ्यांनी या नाट्य संस्कार शिबिरात सहभाग घेतला.
तीन दिवस चाललेले हे नाट्य शिबिर मोफत होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिराची वेळ होती. या शिबिरात प्रेषित रुद्रवार, पद्मनाभ पाठक, समशेर पठाण, कृतार्थ शेवगावकर, गिरीधर पांडे, करण जांगडे, अबोली देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रदीप मुळे, उमेश जहागिरदार यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या पाच शिक्षकांची सिंगापूर दौऱ्यासाठी निवड

$
0
0

झेडपीच्या पाच शिक्षकांची सिंगापूर दौऱ्यासाठी निवड
राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेतील पाच शिक्षकांची निवड झाली आहे. त्यात ईश्वर पवार, सदानंद माडेवार, गणेश शेळके, विनायक वाघ व सचिन गुंजाळ यांचा समावेश आहे.
आशिया खंडात सिंगापूर अग्रेसर असून तेथील शाळा, शिक्षणतज्ज्ञ यांच्या भेटी, कार्यशाळा तसेच चर्चासत्राचे आयोजन सिंगापूर सरकारने केले असून राज्यातील शाळा त्या दर्जाच्या व्हाव्यात या साठी शिक्षकांचा अभ्यास दौरा करण्याचा उद्देश सरकारने बाळगला आहे.
हे सर्व शिक्षक स्वखर्चाने सिंगापूरला जात आहेत. जवळी (ता. कन्नड) शाळेचे शिक्षक ईश्वर पवार यांनी दीड लाख रुपये लोकसहभाग मिळवून शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम तयार केली आहे. सदानंद माडेवार यांनीही व्हर्च्युअल क्लासरूम व डिजिटल क्लासरुमचे जाळे जिल्ह्यात पसविण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे. शिक्षकांच्या या यशाचे सर्व संघटना, शिक्षकांकडून कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी सुपरस्पेशालिटीचे काम वेगात

$
0
0

घाटी सुपरस्पेशालिटीचे काम वेगात
काम पूर्ण होण्यास फेब्रुवारी २०१८ उजाडणार; तज्ज्ञ, तंत्रज्ञांसह कर्मचाऱ्यांच्या पदांची चाचपणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटी परिसरातील बहुप्रतिक्षित २६० खाटांचे सुपरस्पशालिटी हॉस्पिटलच्या कामाने उशिरा का असेना वेग घेतला असून, तळमजल्यावरील अर्ध्याअधिक स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तरीही रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी २०१८ चे वर्ष उजाडणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कार्डिओलॉजी, न्युरॉलॉजी, निओनॅटॉलॉजी या सुपरस्पेशालिटीच्या वैद्यकीय सुविधांसह इतरही अद्ययावत सोयी-सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी लागणारे वेगवेगळे तज्ज्ञ, तंत्रज्ञ, परिचारक-परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची चाचपणी सुरू करण्यात झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘सर्जिकल बिल्डिंग’लगत हे १५० कोटींचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार आहे. वेगवेगळ्या अडचणींवर मात करीत या रुग्णालयाचे काम एकदाचे मे २०१६ मध्ये सुरू झाले. शासकीय नियमानुसार १८ महिन्यांत या इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र मुळात मे-१६ मध्ये काम सुरू झाल्यामुळे आता कुठल्याही खंडाशिवाय व वेगात काम सुरू राहिले तर जानेवारी-फेब्रुवारी २०१८ पर्यंत काम हॉस्पिटलचे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शिफ्टिंगचे अर्धे काम पूर्ण झाले आहे, तर निम्मे काम अजूनही बाकी आहे. अजूनही जलवाहिनीचे तसेच ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या शिफ्टिंगचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर काम पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकते. सध्या तळमजल्याच्या अर्ध्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे, तर अर्धे काम बाकी आहे. त्याचवेळी पहिल्या मजल्याच्या कॉलमचे कामही सुरू झाले आहे.

या हॉस्पिटलमध्ये युरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्युरॉलॉजी, कार्डिओलॉजी, निओनॅटॉलॉजी, बर्न्स-प्लास्टिक सर्जरी आदी सुपरस्पेशालिटी विभाग सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत घाटीमध्ये यातील निम्म्यापेक्षा जास्त विभागाच्या सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे निदान या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तरी या सुविधा मिळतील, अशी आशा आणि अपेक्षा केली जात आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तब्बल १५० कोटींचा निधी मिळणार आहे. अर्थातच, १२० कोटींचा सर्वांधिक वाटा हा केंद्राचा, तर ३० कोटींचा वाटा राज्य सरकारचा असणार आहे. महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारमार्फतच या हॉस्पिटलचे संपूर्ण बांधकाम होणार असून, सर्व प्रकारची उपकरणेही केंद्राकडूनच उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचवेळी सुपरस्पेशालिस्ट तज्ज्ञांसह वेगवेगळे तंत्रज्ञ, परिचारक-परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या पदांची निर्मिती, नियुक्ती ही राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या प्रभावी व कार्यक्षम अंमलबजावणीशिवाय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्णक्षमतेने रुग्णसेवेत येणार नसल्याचे स्पष्ट आहे.

सुपरस्पेशालिस्ट उपलब्ध होणार का?

एकीकडे घाटीमध्ये मूत्रमार्ग व मूत्रपिंडासंदर्भातील वेगवेगळे उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रिया-प्रत्यारोपणाच्या व्यापक उद्देशाने उभ्या राहिलेल्या तीन मजली ‘नेफ्रॉलॉजी बिल्डिंग’चे उद्घाटन होऊन अडीच वर्षे लोटली आहेत; परंतु अजूनही या विभागातील पदांची निर्मिती झालेली नाही. म्हणूनच यातील बहुतांश उपचार-शस्त्रक्रिया घाटमध्ये होत नाहीत. तसेच ‘सीव्हीटीएस’मध्ये पूर्णवेळ हृदयरोगतज्ज्ञ, तंत्रज्ञ नसल्याने अँजिओप्लास्टी, बायपास व इतर हृदयशस्त्रक्रिया अत्यल्प प्रमाणात होतात. पूर्णवेळ मेंदूविकारतज्ज्ञ व मेंदू शल्यचिकित्सक नसल्याने मेंदूचे उपचार-शस्त्रक्रियाही घाटीमध्ये होत नाही. हेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात घाटीच्या अखत्यारित येणाऱ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तरी सुपरस्पेशालिस्ट मिळणार का, त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार का, का कुठल्याही उपचारांशिवाय आणखी एक टोलेजंग इमारत घाटी परिसरात उभी राहणार, हा खरा प्रश्न आहे.


सुपरस्पेशालिटी हॉस्टिपलचे काम वेगाने सुरू असून, नेमके किती सुपरस्पेशालिस्ट, तंत्रज्ञ, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी लागणार, याची चाचपणी व आढावा घेण्यात येत आहे. लवकरच त्याचा प्रस्तावही पाठवण्यात येईल व नियोजित वेळेत हॉस्पिचल सुरू होईल, अशी आशा आहे.

– डॉ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

ग्राफिक्स चौकट

असे असेल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

………………………….

रुग्णालयाच्या एकूण खाटा……….२६०

रुग्णालयाचा बिल्टअप एरिया………२० हजार स्क्वेअर मिटर

रुग्णालयातील एकूण मजले……….०६

केंद्राकडून मिळणारा निधी………..१२० कोटी रुपये

राज्य सरकारकडून मिळणारा निधी…..३० कोटी रुपये

असे असतील विभाग.…..युरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, कार्डिओलॉजी, न्युरॉलॉजी, निओनॅटॉलॉजी,




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉईस नंबरसाठी प्रतीक्षा कायम

$
0
0

चॉईस नंबरसाठी प्रतीक्षा कायम
नवीन सॉफ्टवेअरचा गोंधळ सुटेना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
नवीन गाडी विकत घेतल्यावर तिच्यासाठी नंबरही आपल्या चॉइसचाच मिळावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी आवश्यक ते शुल्कही भरण्याची तयारी असते, नव्हे अनेकांनी ते भरलेही आहे, पण तरीही त्यांच्या नशिबी पंधरा-वीस दिवसांची प्रतीक्षाच आहे. आरटीओ कार्यालयातील नवीन सॉफ्टवेअरचा घोळ येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना काही मिटविता येत नाही. त्याचा त्रास मात्र ग्राहकांना सोसावा लागत आहे.
दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात मोठ्या संख्येने चारचाकी-दुचाकी नागरिकांनी आपल्या घरी नेल्या. वाहनाला आपल्या पसंतीचा क्रमांक मिळावा म्हणून १३३ ग्राहकांनी आरटीओ कार्यालयात रितसर शुल्कही भरले आहे. चॉइस नंबरचे सुमारे साडेचार लाख रुपये आरटीओ कार्यालयात जमा झाले आहे. तथापि, अद्याप त्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा नंबर काही मिळालेला नाही. दसऱ्याला गाड्या घेतलेले ग्राहक वाट पाहून आणि आरटीओ कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. तर दिवाळीला ज्यांनी चारचाकी-दुचाकी आपल्या घरी नेली त्यांचीही चॉइस नंबरच्या बाबतीत तीच गत होण्याची चिन्हे आहेत.
ज्या सिरीजमधून या ग्राहकांनी नंबर चॉइस केला होता तीच सिरीज आरटीओने बंद करून टाकली आहे. ‘वाहन चार’ हे नवीन सॉफ्टवेअर या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. जुन्या सॉफ्टवेअरमधील माहिती या सॉफ्टवेअरमध्ये टाकण्याची घाई आणि चॉइस नंबर देण्याची गडबड या दोन्ही बाबी एकाचवेळी आल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे. त्यात जुन्या सॉफ्टवेअरमधील जुनी वाहन सिरीज बंद करण्याचा निर्णय आरटीओ प्रशासनाने अचानक घेतला. त्यामुळे पैसे भरूनही ग्राहकांच्या नशिबी वाट पहाणं आलं आहे. या सगळ्या प्रकाराने ग्राहकांचा संयम सुटू लागला असून या कार्यालयात आल्यावर संतप्त भावना ते व्यक्त करीत आहेत.
पसंतीच्या क्रमांकासाठी शुल्क
आरटीओ कार्यालयात नवीन सिरीज आल्यावर त्यातून आपल्या पसंतीचे वाहन क्रमांक मिळविण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरू असतात. आरटीओ कार्यालयाने १ ते ९९९९ या क्रमांकातील ४६७ आकर्षक क्रमांक पसंतीचे क्रमांक म्हणून जाहीर केले आहे. त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते. वाहन क्रमांक एकसाठी चारचाकी सिरीजमध्ये तीन लाख रुपये तर दुचाकीच्या सिरीजसाठी ५० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.
०००९,००९९,०७८६,०९९९,९९९९ या क्रमांकासाठी चारचाकीला दीड लाख रुपये तर दुचाकीला २० हजार रुपये भरावे लागत आहेत. याशिवाय अन्य आकर्षक क्रमांकांसाठी चारचाकीला ५० हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागत आहे.

पसंतीच्या क्रमांकबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. आरटीओ विभागाकडून मिळालेली पावती ही ३० दिवसांसाठी वैध असते. या काळात आम्ही संबंधीत ग्राहकांचा प्रश्न मार्गी लावणार आहोत.
किरण मोरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैभवशाली नाट्य परंपरेचे सोयगाव

$
0
0

वैभवशाली नाट्य परंपरेचे सोयगाव

Tushar.bodkhe@timesgroup.com

tusharbMT

औरंगाबाद - प्राचीन वारसा लाभलेल्या अजिंठा परिसरातील सोयगावची संगीत नाटक परंपरा आठ दशकं यशोशिखरावर होती. ग्रीक धर्तीचे नाट्यगृह उभारणी, दोन महिने नाट्य महोत्सव, संगीत नाटकातील प्रयोगाशीलता आणि प्रथितयश कलाकारांची जडणघडण अशी या परंपरेची ठळक वैशिष्ट्ये. या वैभवशाली नाट्य परंपरेवर पुरेसे संशोधन करून जुन्या वास्तूंचे जतन करण्याची गरज आहे.

सोयगाव येथील जमीनदार रामजी पाटील सच्चे रंगकर्मी म्हणून नावारूपास आले होते. १८८५ यावर्षी त्यांनी नाट्य चळवळ सुरू केली. काही काळ सोंगे काढून करमणूक केली. पुढील काळात पौराणिक नाटकांकडे वळले. नाटकाला नेटके रूप देण्यासाठी कलावंतांना एकत्र आणून वैभवशाली नाट्य परंपरा सुरू झाली. रामजी यांच्या केश‍वराव व हरिभाऊ या मुलांनीही नाट्यकलेचा वारसा सांभाळला. सोयगावसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या दुर्लक्षित गावात समृद्ध परंपरा उभी करण्यात केशवराव ऊर्फ लोटूभाऊ पाटील यांचे विशेष योगदान होते. गावात दर्जेदार नाटक सादर करण्याचा त्यांना ध्यास होता. लोटूभाऊंनी बाहेरच्या नाटक मंडळात कामे केली. ‘देशबंधू संगीत मंडळी’त ‘सवतासुभा’, ‘पंताची सून’, ‘संशयकल्लोळ’, ‘पुण्यप्रभाव’ नाटकातील भूमिका गाजल्या. १९०९ नंतर त्यांनी पुरुष पात्रांच्या भूमिका करण्यास सुरुवात केली. ‘भक्त पुंडलिक’, ‘सत्यविजय’, ‘कुसुमचंपा’, ‘दामाजी’, ‘मानापमान’ या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नाट्यवेड जपण्यासाठी भाऊंनी आर्थिक झळ सोसली. हौशी कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्यासाठी विशेष काम केले. दर्जेदार नाटकांच्या निर्मितीसाठी १९०५ मध्ये ‘श्रीराम प्रासादिक संगीत नाटक मंडळी’ या संस्थेची स्थापना केली होती. दिमाखदार नाट्य सादरीकरण ही ‘श्रीराम मंडळी’ची खासियत ठरली. उंची पोशाख, मशाली-बत्त्या, खरे दागिने व आकर्षक पडद्यांनी लोटूभाऊंची नाटके गाजली. संगीतात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. नाटकाच्या तालमीसाठी जागा नसल्याने लोटूभाऊंनी तालीमखाना बांधला. स्त्री आणि पुरूष कलाकारांसाठी तालीमखान्यात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी दोन तिकीट खिडक्या आहेत. सोयगावात अजूनही तालीमखाना उभा आहे. लोटूभाऊ यांनी नाट्यपरंपरेला संस्थेचे स्वरूप देऊन नवीन बदल घडवला. रामनवमीला दोन-दोन महिने चालणारा नाट्य महोत्सव राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. सोयगावची किर्ती वृद्धिंगत करणारे हरहुन्नरी कलावंत व आश्रयदाते लोटूभाऊ १९६४ मध्ये काळाच्या पडद्याआड गेले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात विशेष स्थान असलेली दीर्घ परंपरा संपली. ही परंपरा नारायणराव काळे यांनी १९७६ पर्यंत सांभाळली. सोयगावला उभ्या असलेल्या वास्तू अजूनही इतिहासाची साक्ष देतात. श्रीराम संगीत मंडळीत यशवंत काळे, लक्ष्मीबाई शहापूरकर, पंढरी पाटील, देवचंद अहिरे, सोपानमामा बोर्डे, सीताराम गुरव, जनार्दन चौधरी, माधवराव पाटील, पंढरी गाजरे, दामू लोहार, बंडूशेट सोनार, विठ्ठल जोशी, अप्पा चौधरी अशा शेकडो कलाकारांनी योगदान दिले. महाराष्ट्रातील नानासाहेब फाटक, जयराम शिलेदार, नटवर्य चापेकर, दामूअण्णा मालवणकर या नामांकीत कलाकारांनी सोयगावला सादरीकरण केले.
नाट्यगृहाचा इतिहास
‘श्रीराम संगीत मंडळी’चे व्यवस्थापक के. टी. देसाई तात्पुरते नाट्यगृह उभारीत असत. पण, हे काम जिकिरीचे असल्यामुळे कायमस्वरूपी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा उपस्थित झाला. १८८० मध्ये रामाच्या मूर्तीचा गाभारा बांधला होता. गाभाऱ्यासमोरील जागेवर ग्रीक धर्तीच्या नाट्यगृहाचे काम सुरू झाले. शेंदूर्णी येथून सोयगावला बैलगाड्यातून लोखंडी खांब आणले गेले. नाट्यगृहाची लांबी ८० फूट असून रंगमंचासमोर वाद्यवृंदासाठी दोन फूट खोल जागा आहे. एकावेळी ५०० प्रेक्षकांची आसनव्यवस्था व प्रेक्षकांना नाटकातील संवाद स्पष्ट ऐकू येतील अशी नाट्यगृहाची रचना आहे. या नाट्यगृहाला पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, रणजित देसाई, निळू फुले, नरहर कुरुंदकर, माधवी देसाई, वसंत बापट अशा अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.
शिलेदारांचे लग्न
अभिनेते जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव यांनी ‘संगीत सौभद्र’, ‘भावबंधन’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शारदा’ या नाटकात काम केले. दरवर्षी सोयगावला रामनवमीला दोघे येत असत. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या जयराम-प्रमिला यांचे लग्न लोटूभाऊंनी लावून दिले. १९४६ मध्ये दोघांचे कुटुंबिय व कलावंतांच्या उपस्थितीत लग्न लागले. प्रमिला जाधव पुढील काळात संगीत रंगभूमीवर जयमाला शिलेदार म्हणून नावारूपास आल्या अशी आठवण कवीवर्य ना. धों. महानोर यांनी सांगितली.
सोयगावची नाट्य परंपरा १८८५ मध्ये सुरू झाली आणि १९०५ मध्ये ग्रीक पद्धतीचे नाट्यगृह उभारण्यात आले. त्या काळातील लोकप्रिय कलाकार सोयगावला नाटक करण्यासाठी उत्सुक असत. भजन, कीर्तन ऐकून समृद्ध झालेल्या लोकांच्या रक्तातच संगीत नाटक होते. लोटूभाऊंनी शेकडो कलाकारांना आर्थिक मदत करून संसार उभे केले. पण, एकाही कलाकाराने हा इतिहास लिहिला नाही. महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासात सोयगावची परंपरा काहीशी दुर्लक्षित राहिली.
- पद्मश्री ना. धों. महानोर, साहित्यिक
देश स्वतंत्र होण्यापूर्वी १९३७ मध्ये लक्ष्मीबाई शहापूरकर यांनी सोयगावला नाटकात काम केले होते. त्या पहिल्या मराठी स्त्री कलावंत आहेत. १९४५ मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनात सोयगावच्या ‘माझी जमीन’ या नाटकाचा प्रयोग झाला होता. या विलक्षण नाट्य इतिहासाची फारशी नोंद आढळत नाही.
- डॉ. बाळासाहेब दहीफळे, नाट्य अभ्यासक
लोटूभाऊंनी उभारलेले नाट्यगृह आणि तालीमखाना अस्तित्वात आहे. काही अभ्यासक आवर्जून हा इतिहास जाणून घेण्यासाठी येतात. पण, शंभर वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वस्तू आणि नाट्य परंपरेवर आणखी प्रकाश टाकण्याची गरज आहे.
- रविराज काळे, लोटूभाऊ यांचे नातू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएसआरडीसी कार्यालयाचे गुपचूप स्थलांतर

$
0
0

एमएसआरडीसी कार्यालयाचे गुपचूप स्थलांतर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पायाभूत सुविधा पुरविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमआरडीसी) कार्यालयाचे गेल्या महिन्यात स्थलांतर करण्यात आले. नवीन कार्यालयाचा पत्ता विचारण्यासाठी जुन्या ठिकाणी कुणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत शहरात पाच उड्डाणपुलांसह काही रस्ते बनविण्यासाठी एमएसआरडीसीला तत्कालीन राज्य सरकारने नेमले होते. पुढील १० ते १५ वर्षे ही कामे चालणार असल्याने एमआरआरडीसीने कार्यालय थाटले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालय इमारतीत तळमजल्यावर हे कार्यालय सुरू होते. रस्ते बांधणीशी संबंधित विभाग असल्याने एकाच छताखाली ही कार्यालये आहेत. जून महिन्यात सिडकोतील वसंतराव नाईक चौक आणि महावीर चौक उड्डाणपुलांचे काम संपले. एमएसआरडीसीकडे असलेली बहुतांश कामे संपली. त्यामुळे हे कार्यालय बंद होणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. कारण लातूर जिल्ह्यातील काही कामे वगळता मराठवाड्यात या कार्यालयाचे एकही काम सध्या सुरू नाही. मात्र, ऑक्टोबर महिन्यात हे कार्यालय चिकलठाणा एमआयडीसीमधील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या मागच्या बाजूला सरकारी जागेत स्थलांतरित करण्यात आले. याबाबत कुठलीही माहिती जाहीररित्या देण्यात आली नाही. त्यामुळे जुनी कामे घेऊन येणारी मंडळी पूर्वीच्या कार्यालयाजवळ गेल्यानंतर तिथे सगळी सामसूम दिसते. काही दिवस माहिती देण्यासाठी कर्मचारी हजर होता, पण गेल्या दहा दिवसांपासून तिथे कुणीच नाही. कार्यालय स्थलांतरित झाल्याचा माहिती फलकही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. एवढ्या महत्वाच्या खात्याच्या विभागीय कार्यालयाचे स्थलांतर गुपचूप का केले, हे मात्र अनुत्तरित आहे.

यासंदर्भात कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ‘दिल्लीमध्ये बैठकीत आहे,’ असे त्यांनी सांगितले. उपअभियंता उदय भरडे यांनी मोबाइल उचलला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूक भावनांचे विराट वादळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दलितांवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी दलित, ओबीसी बांधवांनी बहुजन क्रांती मूकमोर्चाच्या माध्यमातून विराट ऐक्याचे दर्शन घडविले. मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्यावे, बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी आदी मागण्यांही यावेळी करण्यात आल्या. दलित, ओबीसी, मुस्लिम, बहुजन समाजाच्या विराट मूकमोर्चाचे वादळ रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये शहरासह जिल्ह्यातील नागरिक प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. शांतता, शिस्त आणि संयमाचे दर्शनही या मोर्चाने घडविले.
आमखास मैदानावर मोर्चा धडकल्यानंतर तरुणींनी बहुजन समाजाच्या व्यथा मांडून निवेदनाचे वाचन केले. अत्यंत शांत आणि शिस्तीत काढण्यात आलेल्या या मूकमोर्चामध्ये महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता. क्रांतिचौकातून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी शहरासह जिल्ह्यातून सकाळी नऊपासून गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. क्रांतिचौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमधून महिला, तरुण, जेष्ठ नागरिकांच्या हातात झेंडे, फलक होते. डोक्यावर बहुजन क्रांती मोर्चाची टोप्या होत्या. सरकारी कर्मचारी, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, विविध संस्था, पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांनीही मोर्चात सहभाग घेतला. क्रांतिचौकातून शिस्तीत सुरू झालेल्या मोर्चात सुरुवातीला बौद्ध भिक्खू होते. त्यानंतर महिला, मुली व त्यानंतर पुरुष असा क्रम होता. मोर्चा सुरू होण्यापूर्वी संयोजक, स्वयंसेवक सर्वांना मोर्चात शांतता व शिस्तीत सहभागी होण्याचे आवाहन करत होते.
‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे’, ‘एससी, एसटी, ओबीसी भारत के मूल निवासी’, ‘अॅट्रॉसिटी कायदा कडक करा’, ‘ओबीसी आरक्षणात घुसखोरी नको’, ‘नाशिकमधील बौद्ध वस्त्यांवर झालेल्या हल्ला करणाऱ्या गुंडांवर कारवाई करा’, ‘मुस्लिम समाजाला आरक्षण द्या’, ‘बलात्काऱ्यांना फाशी द्या’ आदी मागण्यांचे फलक मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात होते.

व्यासपीठावर भिक्खू
दुपारी १२ वाजता क्रांतिचौकातून सुरू झालेला मोर्चा जसजसा पुढे जात होता, तसे विविध ठिकाणांहून आलेले नागरिक मोर्चात सहभागी झाले. मोर्चा नूतन कॉलनी, पैठणगेट, बाराभाई ताजिया, औरंगपुरा, महात्मा फुले चौक, मील कॉर्नर, भडकलगेटमार्गे दुपारी दोनच्या सुमारास आमखास मैदानावर पोचला. मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर केवळ भिक्खू व निवेदन वाचन करणाऱ्या तरुणी होत्या.

प्रमुख मागण्या
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
- अॅट्रॉसिटीचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सहा महिन्यांच्या आत निकाल द्यावा.
- बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, ही प्रकरणेही विशेष न्यायालयात चालवून सहा महिन्यांच्या आत निकाली काढवीत.
- ओबीसी समाजाच्या आरक्षण कोट्यातून इतर कोणत्याही समाजास आरक्षण देऊ नये. घटनेत विशेष तरतूद करून इतर समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे.
- सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी.
- धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करावी.
- भटक्या विमुक्तांसाठी रेणके आयोग त्वरित लागू करावा.
- ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसींची लोकसंख्या जाहीर करण्यात यावी.
- दलित, ओबीसी आणि आदीवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करुन महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी.
- राज्यातील सर्व साखर कारखाने राज्य शासनाने चालवावीत.

बहुजन मूकमोर्चाच्या शिस्तीचीच चर्चा
- मोर्चाची वेळ सकाळी ११ची होती, मात्र सकाळी नऊपासूनच क्रांतिचौकत मोर्चेकऱ्यांची गर्दी झाली.
- क्रांतिचौकात शिवरायांना अभिवादन करून दुपारी १२ वाजता मोर्चा सुरू.
- मोर्चा सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने आले होते.
- निळे झेंडे, टोप्या, मफलर, फलकांसह आंदोलक मोर्चात.
- पाच वर्षांचा चिमुकला ते ९० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांचा सहभाग.
- मोर्चाच्या मार्गावर विविध संघटनांकडून पाणी, नाश्त्याची सोय.
- शासकीय दूध डेअरी, नूतन कॉलनी, अजबनगरात पार्किंग व्यवस्था. कोटला कॉलनी, काल्डा कॉर्नर भागातही वाहनांची सोय.
- महिला मोर्चेकरी व लहान मुलांनी मोर्चाची सुरुवात केली.
- मोर्चात तरुणांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
- मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा.
- मोर्चासाठी बहुतांश मार्ग बंद करण्यात आले.
- सकाळी अकरानंतर वाहतूक मार्गात बदल.
- मोर्चात शिस्त बाळगा, शांतता पाळण्याचे संयोजकांकडून आवाहन.
- सेल्फी काढण्यासाठी युवकांसह ज्येष्ठांचीही आघाडी.
- शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मार्गावर पाणीवाटप.
- मोर्चानंतर स्वयंसेवकांनीच फलक, कागद, केरकचरा साफ केला.
- गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी वारंवार सूचना दिल्या.
- चहा टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या दुकानांवर सकाळपासून गर्दी.
- ओबीसी संघटनांचाही मोर्चामध्ये सहभाग.
- नऊ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मराठा मोर्चाशी बहुजन क्रांती मूकमोर्चाची तुलना करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत दिवाळीत फटाक्यांचा आवाज वाढला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळसणात मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्याच्या काही भागांतील ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी झाली असून, राज्यातील इतर शहरांमध्ये मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ते वाढले आहे, मात्र औरंगाबाद शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण वाढले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या तीन दिवसांतील प्रदूषणाची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. त्यात ही वस्तुस्थिती उजेडात आली आहे.
प्रमुख शहरांमधील अनेक कुटुंबांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढत्या ध्वनी व वायू प्रदूषणामुळे फटाक्यांना फाटा देण्याचा प्रघात रूढ होत चालला आहे. काही शहरांमधून पर्यावरणप्रेमींकडूनही जनजागरण केले जात आहे. शिवाय, महागाईचा परिणाम फटाक्यांच्या खरेदीवर जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कल्याण आणि कोल्हापूर या शहरांच्या वेगवेगळ्या भागात, ३०, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला दिवसा व रात्री झालेले ध्वनिप्रदूषण मंडळाने नोंदविले. त्यानुसार दक्षिण मुंबईतील ध्वनिप्रदूषण गेल्यावर्षच्या तुलनेत सुमारे दहा डेसिबल्सने घटल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावर्षी मुंबईत दिवाळीच्याच काळात दिवसा ८० ते ९०पर्यंत वाढलेले प्रदूषण यंदा ७० ते ७५पर्यंत होते. उपनगरांतील ‘आवाजा’तही लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले. मात्र, सहार, विलेपार्ले, कुर्ला बस डेपो, नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९, नेरूळ सेक्टर ११ या भागांतील प्रदूषणात किंचित वाढ झाली. ठाण्यात भाऊबीजेला आवाजाचे प्रमाण वाढले. इतर दोन दिवस त्यात लक्षणीय घट झाली.
पुण्यातील लक्ष्मीरोडवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक, ९३.३ डेसिबल्सएवढे ध्वनिप्रदूषण नोंदविले गेले. प्रदूषणाचा हा महाराष्ट्रातील उच्चांक आहे. गतवर्षी हे प्रमाण ८०.५, तर २०१४मध्ये ७४.२ डेसिबल्स होते. त्याखालोखाल कर्वेरोड कोरेगाव पार्क (९१.३) आणि कोथरूड (८७.१) परिसरात प्रदूषण झाले. कोरेगाव पार्क, शनिवारवाडा या भागात किंचित कमी प्रदूषण झाल्याची नोंद झाली. पिंपरी चिंचवडच्या डिलक्स चौक, चाफेकर चौक परिसरात प्रदूषण काही प्रमाणात वाढले. नागपुरात यंदा प्रदूषणाच्या पातळीत काही अंशी घट दिसून आली. सिव्हिल लाइन्स, धरमपेठ, इतवारी, सिव्हिल हॉस्पिटल, शंकरनगर, सदर भागात प्रदूषण घटले, तर अजनी चौक, देशपांडे लेआऊट, कळमना या भागात वाढले. कोल्हापुरातील ताराराणी, भवानी मंडप, बिंदू चौक भागात प्रदूषण वाढले, तर राजारामपुरी, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी चौक, खासबाग मैदान या भागात घटले. नाशिकमध्ये यंदाच्या दिवाळीत गेल्यावर्षीच्या तुलनेत चार ते सात डेसिबल्सने प्रदूषणाची पातळी घटली. सीबीएस, पंचवटी, दहीपूल, सिडको, बिटको पॉइंट या भागांत प्रदूषण घटल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात आहे.
गुलमंडीवर सर्वाधिक प्रदूषण : औरंगाबाद शहरातील गुलमंडीवर यंदाही दिवसा आणि रात्री सर्वा​धिक ध्वनिप्रदूषण झाले. त्याखालोखाल क्रांतिचौक, उस्मानपुरा आणि सिडकोत फटाक्यांचा आवाज वाढला. अर्थात, हे प्रमाण २०१४च्या दिवाळीच्या तुलनेत कमीच आहे.

औरंगाबादेतील ध्वनिप्रदूषण
भाग..........२०१५...............२०१६
............दिवसा...रात्री....दिवसा...रात्री
गुलमंडी...७६.४....६५.५....७९.८...७४.५
सिटी चौक.७१.४..६४.८....७३.८....६४
क्रांतिचौक..७२.....६५.१....७७.८....७१.७
सिडको......७२.८...५८.१....७२.४...५९.९
उस्मानपुरा..७४.५..६१.४....७५......६१.९
(३० ऑक्टोबर २०१६ आणि ११ नोव्हेंबर २०१५ रोजी,
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेतलेल्या नोंदी, प्रदूषण डेसिबल्समध्ये, सिडकोतील नोंदी निवासी भागातील)

काय असावे प्रमाण?
व्यावसायिक भाग : ६५ डेसिबल्स
निवासी परिसर : ५५ डेसिबल्स
सायलेन्स झोन : ५० डेसिबल्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात निळी लाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अॅट्राॅसिटीच्या समर्थनार्थ शुक्रवारी बहुजन क्रांती मूक मोर्चात दलित बांधव लाखोंच्या संख्येने निळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. क्रांतिचौकातून निघालेली ही निळी लाट शांततेत आमखास मैदानावर धडकली. शांतता, शिस्त राखत मोर्चेकऱ्यांनी आपल्या संयमाचे दर्शन घडवले.
मोर्चाची वेळ सकाळी अकराची असली, तरी नऊपासून क्रांतिचौकात नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी बारापर्यंत लाखो नागरिक क्रांतिचौकात जमा झाले होते. मोर्चात सर्वात पुढे भंतेजी, नंतर महिला व पुरूष असे नियोजन करण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने मोर्चेकरांना शिस्त राखण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. जमा झालेल्या मोर्चेकऱ्याच्या हातात निळे ध्वज होते. अवघ्या रस्त्यावर निळी लाट ‌अवतरल्याचा भास होत होता. दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. ‌मोर्चेकरी शिस्तीत आमखास मैदानाकडे गेले. जालना रोड, अदालत रोड; तसेच उस्मानपुरा भागाकडून मोर्चेकऱ्यांचे हजारोच्या संख्येने लोंढे मोर्चात सहभागी होत होते. विराट जनसंख्येने निघालेला हा मोर्चा बघण्यासाठी नागरिकांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला होता. क्रांतिचौक, नूतन कॉलनी, पैठणगेट, बाराभाई ताजिया, मीलकॉर्नर, भडकल गेटमार्गे आमखास मैदानावर मोर्चा पोहचला. मैदान पूर्ण भरल्यानंतरही अनेक नागरिक मैदानावर येतच होते.
वाहतुकीची कोंडी : मोर्चा संपल्यानंतर शांततेत मोर्चेकरी मैदानाबाहेर पडले, मात्र टाउन हॉलकडून येणारी वाहने पोलिसांकडून थांबवण्यात आली नाहीत. त्यामुळे मैदानाबाहेर काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. या कोंडीतून मोर्चेकऱ्यांना वाट लावावी काढत होती. दरम्यान, मोर्चा संपल्यानंतर पायी आलेल्या नागरिकांना जाण्यासाठी वाहने मिळाली नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागली. औरंगपुरा बसस्टॉवर सायंकाळपर्यंत हजारो नागरिक बसची वाट पाहत उभे होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
या मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, राहूल श्रीरामे यांच्यासह सात सहायक पोलिस आयुक्त, ३० पोलिस निरीक्षक व १३०० पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, गुन्हे शाखा, विशेष शाखेची पथके बंदोबस्तात सहभागी झाली होती. सीसीटीव्ही कॅमेरे व २० कॅमेऱ्यांमधून मोर्चाचे शुटिंग करण्यात आले. आमखास मैदानावर पोलिसांनी वज्र व वरूण वाहन, अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहिका आदी तैनात करण्यात आले होते.


वॉकीटॉकीचा वापर
मोर्चामध्ये असलेल्या स्वंयसेवकाकडे वॉकीटॉकी देण्यात आले होते. एकूण शंभर वॉकीटॉकीचा वापर यावेळी करण्यात आला. वॉकीटॉकीद्वारे समन्वय साधून सूचना करण्यात येत होत्या. प्रामुख्यांने हरवलेली लहान मुले शोधण्यासाठी वॉकीटॉकीचा चांगलाच वापर झाला.

वाहतूक पोलिसांची मुजोरी
मोर्चाला बारा वाजता सुरुवात होणार होती. क्रांतिचौकात वाहतूक सुरळीत सुरू होती, मात्र उस्मानपुरा चौकातून क्रांतिचौककडे जाणारा मार्ग वाहतूक शाखेने दहालाच बंद केला होता. या ठिकाणी दोन कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली होती. यापैकी एकाने अनेक वाहनधारकांशी वाद घातला. या रोडवर असलेल्या कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने येथील कर्मचारी व दुकानदारांची वाहने अडवून धरली.


बहुजन मूक मोर्चात सहभागी संघटना
- वाल्म‌िकी सेना व समाज
- समता सैनिक दल
- एमआयएम
- बहुजन समाज पार्टी
- भीमशक्ती संघटना
- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे विविध गट
- महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समिती
- संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृह
- भोईसमाज सेवा संघ
- महाराष्ट्र वर्कर काँग्रेस
- मुप्टा शिक्षण संघटना
- कास्ट्राइब संघटना
- होली स्प‌िरिट सोसायटी
- आदिवासी विकास मंच
- महाराष्ट्र सेना

या मान्यवरांचा सहभाग
बहुजन क्रांती मूकमोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, मान्यवर सहभागी झाले होते. आमदार जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हांडोरे, नगरसेवक राजू शिंदे, गंगाधर गाडे, आनंद शिंदे, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, साहित्यिक डॉ. ऋाषिकेश कांबळे, आनंद कस्तुरे, जालिंधर शेंडगे, नगरसेवक गंगाधर ढगे, मधुकर चांदणे, रमेशभाई खंडागळे, संजय जगताप, अरुण बोर्डे, रमेश गायकवाड, दौलत खरात, किशोर थोरात, अजमल खान, मिलिंद शेळके, बन्सीधर गांगवे, विजय वाहुळ यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images