Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नगरसेवकांनीच केला कायद्याचा भंग

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठणच्या १२ नगरसेवकांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्याचा ठपका जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी ठेवला आहे. यात्रा मैदानाच्या आरक्षित जागेवर बांधकाम करता येते की नाही, हे न तपासताच ठराव केल्याचे पांडेय यांच्या निर्णयात म्हटले आहे.
पालिकेने १३ एप्रिल २०१५ रोजीविशेष सभा घेऊन यात्रा मैदानावर व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव घेतला होता. संत एकनाथ समाधीजवळील ११ एकर ३ गुंठे असलेल्या यात्रा मैदानावर व्यापारी संकुल प्रस्तावित केले. पैठण शहराच्या मंजूर विकास आराखड्यात ही जागा यात्रा मैदानासाठी आरक्षित आहे, तरीही संकुलाचे बांधकाम सुरू झाले. या बांधकामाविरुद्ध रमेश लिंबोरे व सतीश आहेर यांनी खंडपीठात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांनी त्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी आदेश देऊनही बांधकाम थांबले नाही. ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करताच नगर पालिकेने बांधकाम केले असल्याने ते त्वरित पाडावे व योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत केली होती. कोर्टाने याचिका निकाली काढताना तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना दिला होता.
प्रशासकीय मान्यतेची वाट न पाहता परस्पर बांधकाम करून टाकले. या बांधकामास तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन होत नसल्याबाबतची खात्री करणे आवश्यक होते, असे पांडेय यांनी निर्णयात म्हटले आहे.
पैठणच्या प्रभारी मुख्याधिकारी यांनीही कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी कायदेशीर बाबींची तपासणी करणे आवश्यक होते. गाळ्यांचे वाटप व भाडेही निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेत नगरपालिका कायद्याचा भंग करण्यात आला. तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी संजय पवार यांनी कायदेशीर बाबींची तपासणी न करताच कार्यारंभ आदेश दिला. त्यामुळे पवार हे बेकायदेशीर बांधकामास जबाबदार असल्याचा ठपका पांडेय यांनी दिलेल्या निर्णयात ठेवला आहे.

पालिकेचे आर्थिक नुकसान
जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागविला होता. व्यापारी संकुल बांधकामाची चौकशी पैठणचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने केली. व्यापारी संकुल बांधण्याच्या प्रक्रियेत पालिका व नगररचना कायदा, विकास योजनेचा भंग झाल्याचे समितीने म्हटले होते. ई-निविदा कार्यपद्धतीत अनियमितता झाली आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपकाही समितीने ठेवला होता. नगरपालिकेचा १३ एप्रिल २०१५ रोजीचा ठराव विखंडित करण्याची प्रक्रिया सुरू असून नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याचा प्रस्ताव मिळाला होता. त्यावर जिल्हाधिकारी पांडेय यांनी नगराध्यक्षासह १४ नगरसेवकांना नोटीस बजावून सुनावणी घेतली होती. समितीच्या निर्णयावर पांडेय यांनी शिक्कामोर्तब केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परळी, अंबाजोगाईत भाजप-सेनेची युती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी परळी, अंबाजोगाईत भाजप-सेनेची युती झाली आहे. तर बीडसह चार ठिकाणी भाजप-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार आहे.
बीड जिल्हा भाजपचे वर्चस्व असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. भाजपचे पाच आमदार जिल्ह्यातून निवडून आले आहेत. त्यासोबतच गेवराई, माजलगाव या नगरपालिका भाजपच्या ताब्यात होत्या. त्यामुळे जिल्ह्यात भाजप हा थोरला तर शिवसेना धाकट्या भावाच्या भूमिकेत आहे. स्थानिक संस्था निवडणुकीत भाजप-सेनेने युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, बीड जिल्ह्यातील सहा पैकी केवळ दोन नगरपालिकेत या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप स्थानिक नेत्यांचे मनोमिलन होऊ शकले.
जिल्ह्यातील लक्षवेधी असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी नगरपालिकेत भाजप-सेनेची युती झाली आहे. युतीचा प्रचारही सुरू झाला आहे. अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीत सेनेने भाजपसाठी एक पाऊल मागे घेत शुक्रवारी अध्यक्षपदाचा उमेदवार असलेल्या अनुपमा शिवाजी कुलकर्णी यांना अर्ज मागे घेत युती केली. मात्र, उर्वरित बीड, गेवराई, धारूर, माजलगाव या ठिकाणी युती होऊ शकली नाही. याठिकाणी आता शिवसेना भाजप वेगवेगळे मतदारांच्या पुढे जाणार आहेत.
या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, ‘जिल्ह्यातील सहा नगरपालिकेत शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी पालकमंत्री भाजप नेत्या पंकजा पालवे आग्रही होत्या. बीडमध्ये रिपाइं आमच्यासोबत आहे. मात्र, शिवसेना आम्हाला २२ पेक्षा अधिक जागा द्यायला तयार नव्हती. त्यात आमच्या काही कार्यकर्त्यांचे वॉर्डावर शिवसेना हक्क सांगत होती. धारूर येथील आमचा उमेदवार तगडा असल्याने त्याला पाठिंबा द्यावी अशी आमची भूमिका होती. मात्र शिवसेना तयार नसल्याने चार ठिकाणी युती होऊ शकली नाही.
शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल जगताप म्हणाले, ‘ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती. कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका होती. त्यातही गेवराई नगरपालिकेत तीन जागा द्यायला भाजप तयार झाली. मात्र, शेवटच्या क्षणी घोळ घातला. बीडमध्ये पन्नास पैकी शिवसेना २८ भाजप २२ असा फॉर्म्युला ठरला. यात थोडा बदल करून फिफ्टी-फिफ्टी जागा दोघांनी घ्याव्यात असे ठरवले. मात्र, भाजप नेत्यांचा निरोप आला की कार्यकर्ते युतीला तयार नाहीत. त्यामुळे आमचा नाईलाज झाला. अखेर बीडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवावी लागत आहे.’
बीडमध्ये चार नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न झाल्याने या पारंपरिक युतीतल्या मतविभागणीचा फायदा कुणाला होतो हे सत्तावीस तारखेनंतर स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात युतीचा उमेदवारच नाही

$
0
0



म. टा .प्रतिनिधी, जालना
नाट्यमय घडामोडीनंतर जालना पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही शुक्रवारी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे आक्रमक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामध्ये राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिवसेना-भाजपचा अधिकृत उमेदवारच उरला नाही.
नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला द्यावी यावर भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक मोठ-मोठी खलबते केली. भाजपने जालन्यात नगराध्यक्षपदाचा दावा केला गेला. सुशीला भास्कर दानवे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याचवेळी शिवसेनेच्यावतीने शोभा भास्कर अंबेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या पक्षाचा बी फॉर्म देखील दाखल केला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अनेकदा बैठका झाल्या. पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अनेक जाहीर कार्यक्रमात हे सगळे नेते एकत्र सहभागी झाले. पालिका ताब्यात घेऊन शहराच्या विकासासाठी काय योजना आहेत, याची जाहीर चर्चा केली. या सर्व परिस्थितीत मोठे वातावरण निर्माण झाले होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना जालना शहरातून १५ हजार मतांची आघाडी होती. तर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अरविंद चव्हाण यांनाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता. यावरूनच नगराध्यक्ष भाजपचा असा दावा केला जात होता. शिवसेनेच्यावतीने स्थानिक पातळीवर आमदार आणि मंत्रिपद तसेच १२ वर्षे पालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना शिवसेना नगराध्यक्षपद सोडण्यास तयार नव्हती.
दरम्यान, नगरसेवकपदासाठी सेना-भाजपची युती झाली आणि प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे केले. या पार्श्वभूमीवर शहरातील भाजप आणि सेनेच्या समर्थनाच्या सुरुवातीला असलेल्या या वातावरणात गेल्या आठवड्यात अचानकपणे बदल झाला. एका रात्रीत नगराध्यक्षपदावरून भाजप-सेनेच्या नेत्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू झाले. नगराध्यक्षपदासाठी सेना व भाजप दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आणि कार्यकर्ते चर्चा करू लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने संगीता कैलास गोरंट्याल यांचा प्रचार सुरू झाला. मात्र, सेना-भाजपपैकी एक उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू राहिली. यातच, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शुक्रवारी घाईघाई घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष शकुंतला कदम यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपचा एकही पदाधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हता. भाजपच्या उमेदवाराने या आधीच अर्ज माघारी घेतलेला आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षाचा अधिकृत उमेदवारच रिंगणात उरलेला नाही.
‘नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या अपक्ष शकुंतला कदम यांना भाजप-सेनेच्या युतीचा पाठिंबा आम्ही दिला आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील अनेक नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे अधिकृत चिन्ह न वापरता निवडणूक लढवावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे अंबेकर यांनी सांगितले. कदम यांना हाऊसिंग फायनान्स संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, जालना पालिकेत सभापती, पतसंस्था चेअरमन या सर्व पदावर त्यांनी यशस्वी काम केले आहे, असेही अंबेकर म्हणाले.

भ्रष्टाचाराविरोधात काम करू
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे शकुंतला कदम यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपने दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना धन्यवाद दिले. पालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात काम करू, असे त्या म्हणाल्या. शकुंतला कदम या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून, अंकुशराव टोपे यांच्या अतिशय विश्वासू कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

शकुंतला कदम यांना पाठिंबा जाहीर करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा सूचना दिलेली नाही. शेवटच्या क्षणी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. जालन्याचे नगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला आले होते. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यावी अथवा पाठिंबा द्यावा, हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे.
- सिद्धीविनायक मुळे,
शहराध्यक्ष भाजप, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणचे १२ नगरसेवक अपात्र

$
0
0

व्यापारी संकुलाचे बांधकाम भोवले
म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
पैठण नगर पालिकेच्या यात्रा मैदानावर व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय नगरसेवकांना महागात पडला आहे. पालिकेच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी दिले आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना अपात्र करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्याचबरोबर पैठणचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी व तहसीलदार संजय पवार हे बांधकामास जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अवैध बांधकामाविरुद्ध रमेश लिंबोरे व सतीश आहेर यांनी खंडपीठात धाव घेतली होती. यात्रा मैदानावरील बांधकामामुळे नाथषष्ठीच्या नियोजनास बाधा येऊ शकते. त्यामुळे बांधकाम पाडून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका मुख्याधिकाऱ्यांनी ठेवला होता. सदस्यांना अपात्र का ठरवू नये, यासाठीचा निर्णय जिल्हाधिकारी यांना घ्यावा लागणार होता. तीन महिन्यात कायदेशीर कारवाईची हमी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली होती. त्यानुसार पांडेय यांनी १२ नगरसेवक अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला. कायद्याच्या विरोधात निर्णय घेतल्याने १२ नगसेवकांवर कठोर कारवाई होण्याची ही मराठवाड्यातील पहिलीच वेळ आहे, असे याचिकाकर्त्याचे वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितले.

हे नगरसेवक ठरले अपात्र
मंगल दिलीप पवार, अजीम अहमद कट्यारे, आप्पासाहेब गायकवाड, जीतसिंह करकोटक, शेख अब्बास शेख कासम, इनामोद्दीन अन्सारी, सुवर्णा रासने, राखी परदेशी, शेख तस्लीम बेगम अब्दुल करीम, शहनाज टेकडी, सुभाष त्र्यंबकदास पटेल, सोमनाथ भारतवाले.

यांचा निर्णय शासन घेणार
जिल्हाधिकाऱ्यांवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे, उपनगराध्यक्ष रेखा कुलकर्णी यांच्यासंदर्भातील निर्णय सरकार घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारावर फौजदारी करा

$
0
0

औरंगाबाद : सिडको एन ५ अविष्कार कॉलनीच्या रस्त्यावरील धोकादायक स्पीडब्रेकर तयार करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नगरसेवकांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यानंतर अधिकारी व कंत्राटदाराची चूक असल्यास गुन्हा दाखल करा, असे आदेश सभापती मोहन मेघावाले यांनी दिले.
सिडको एन ५ अविष्कार कॉलनी चौकातून बजरंग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीडब्रेकर तयार करण्यात आला आहे. स्पीडब्रेकरची उंची जास्त ठेवण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यामुळे या स्पीडब्रेकरवर वाहन आदळून अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. विजय तांबारे, योगेश गुंजाळ या दोघांचा मृत्यू गेल्या दोन दिवसांत याच स्पीडब्रेकरमुळे झाला. त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी त्या स्पीडब्रेकरचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘स्पीडब्रेकरची पाहणी करा. चुकीच्या पद्धतीने स्पीडब्रेकर तयार करणाऱ्या कंत्राटदारावर कलम ३०२नुसार गुन्हा दाखल करा.’
कार्यकारी अभिंयता सिकंदर अली म्हणाले,‘आपण स्पीडब्रेकरची संयुक्त पाहणी करू. नियमानुसार तो स्पीडब्रेकर तयार करण्यात आला नसेल तर काढून टाकू.’ त्याला कुलकर्णी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी आक्षेप घेतला व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

चूक असल्यास गुन्हा
सभापती मेघावाले म्हणाले, ‘स्पीडब्रेकरची संयुक्त पाहणी केली जाईल. स्पीडब्रेकर तयार करण्यात अधिकारी, कंत्राटदाराची चूक असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्क मातीवर डांबरीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकोर्टाच्या शेजारी, सिडको एन ३ वसाहतीसाठीच्या सर्व्हिस रोडवर निकृष्ट पद्धतीने करण्यात येत असलेले डांबरीकरणाचे काम परिसरातील नागरिकांनी थांबवले. कंत्राटदाराचे कर्मचारी नागरिकांच्या विरोधाला जुमानत नव्हते. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) संस्थेच्या प्रतिनिधींना घटनास्थळी बोलाविण्यात आले. तेथे संतापलेल्या नागरिकांनी या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली.
सिडको बसस्थानकाच्या चौकात रस्ते विकास महामंडळाने उड्डाणपूल उभारला आहे. पुलाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराकडेच दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्याची जबाबदारी सोपविली आहे. उड्डाणपुलाच्या कंत्राटातच ही अट घातल्याचे सांगितले जाते. कंत्राटातील नोंदीनुसार संबंधित कंत्राटदाराने गुरुवारी सायंकाळी हायकोर्ट ते दीपाली हॉटेल या सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले. अंधारात करण्यात येत असलेले काम नागरिकांनी बंद पाडले. शुक्रवारी पुन्हा कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी डांबरीकरणाचे काम सुरू केले. मातीने माखलेला रस्ता स्वच्छ न करता, खड्डे मोकळे न करता चक्क मातीवरूनच डांबरीकरण केले जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा ते काम बंद पाडले. कंत्राटदारांचे कर्मचारी, ‘काम बंद करतो,’ असे सांगून निघून गेली. आता हे कर्मचारी येणार नाहीत, असे समजून नागरिकही निघून गेले, पण थोड्याच वेळात पुन्हा हे कर्मचारी आले आणि त्यांनी डांबरीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे नागरिक पुन्हा जमा झाले. त्यांनी फोन करून नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांना बोलाविले. दरम्यानच्या काळात या प्रकाराची माहिती उपमहापौर प्रमोद राठोड यांना कळाली. ते देखील सर्व्हिस रोडवर आले.
कामाच्या देखरेखीसाठी ‘पीएमसी’ नियुक्त केली आहे का, अशी विचारणा राठोड यांनी एमएसआरडीसीच्या उपअभियंत्यांकडे केली. पीएमसी नियुक्त करण्यात आल्याचे उपअभियंत्यांनी राठोड यांना सांगितले. पीएमसीच्या प्रतिनिधीला बोलवा, अशी मागणी त्यानंतर उपअभियंत्याकडे करण्यात आली. उपअभियंत्याने पीएमसीच्या प्रतिनिधीला बोलावले. प्रतिनिधीही तेथे आले. कामाच्या दर्जावरून त्याची व नागरिकांची हुज्जत झाली. पीएमसीच्या प्रतिनिधीनेही कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करीत डांबरीकरणाचे करण्यात येत असलेले काम योग्यच आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ‘पीएमसी’च्या प्रतिनिधीला मारहाण केली. या प्रकारानंतर डांबरीकरणाचे काम बंद करण्यात आले.

अधिकाऱ्यांकडून कामाचे समर्थन
कामाची देखरेख करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कोण आहेत, असा प्रश्न राठोड यांनी केला, पण तेथे कोणीही अधिकारी हजर नव्हते. त्यांनी रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता खैरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व रस्त्याच्या कामावर कुणीच अधिकारी नाही, असे त्यांच्या लक्षात आणून दिले. उपअभियंता साइटवर येतील, असे खैरे यांनी राठोड यांना सांगितले. थोड्या वेळाने उपअभियंता साइटवर आले. त्यांनी केल्या जाणाऱ्या कामाचे समर्थन केले. त्यामुळे राठोड, अदवंत यांच्यासह सर्वच नागरिक संतापले.

उड्डाणपुलाच्या कामाचे कंत्राटदाराचे बिल रस्ते विकास महामंडळाकडे थकले आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या कंत्राटात सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाचा देखील उल्लेख आहे. हे डांबरीकरण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कंत्राटदाराचे बिल निघणार नाही. बिल काढण्यासाठी सर्व संबंधितांनी मिळून थातूरमातूर डांबरीकरण करण्याचा घाट घातला होता. ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. निकृष्ट काम करण्याचा डाव नागरिकांनी हाणून पाडला. सर्व्हिस रोडचे डांबरीकरण चांगल्या दर्जाचेच व्हावे, असा आमचा आग्रह आहे. सर्व्हिस रोड चांगले असल्यास जालना रोडवर ताण पडणार नाही.
- प्रमोद राठोड, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट कॉलेजमध्ये आंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सुविधा पुरवाव्यात; तसेच कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करून कायमस्वरुपी तज्ज्ञ शिक्षकाची नियुक्ती करावी आदी मागण्यांसाठी शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली वर्गावर बहिष्कार टाकला असून, हे आंदोलन १८ ऑक्टोबरपासून सुरू असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पूर्णवेळ तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करावी, ग्रंथालय व संगणककक्ष पूर्णवेळ उपलब्ध करून देण्यात यावे, महाविद्यालयाला सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, कायम स्वरुपी प्रोजेक्टर उपलब्ध करून द्यावे, पिण्याचे पाणी, डार्क रुमची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोनल सुरू आहे.
विद्यार्थ्यांनी २४ ऑक्टोबर रोजी कला संचालक राजीव मिश्रा यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यासमोर महाविद्यालयातील अडणींचा पाढा वाचला. कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. संचालक मिश्रा यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयाला भेट देण्याचेही आश्वासन त्यावेळी दिले होते, मात्र त्याबद्दल काहीही कळवण्यात आले नाही. जोपर्यंत राजीव मिश्रा स्वतः शासकीय कला महाविद्यालयाल भेट देऊन शैक्षणिक मागण्या पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अभाविपचे स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्षिसाच्या आमिषाने ५१ हजारांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद ः नापतोल या ऑनलाइन कंपनीतर्फे सफारी कार बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून तरुणाला ५१ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. चिकलठाणा भागात सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण निवृत्ती शिंगारे (वय ३२, रा. लायन्स क्लब कॉलनी, चिकलठाणा विमानतळासमोर) या तरुणाला सोमवारी अनोळखी मोबाइलधारकाचा कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तींनी राहुल रोशन व राजेंद्रसिंग अशी नावे सांगितली. नापतोल कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला कंपनीच्या वतीने सफारी कार बक्षिस लागल्याचे सांगण्यात आले. यासाठी तुम्हाला प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी तीन टप्प्यांत पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले.
त्यावर विश्वास ठेवून शिंगारे यांनी समोरील आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर ५१ हजार पाचशे रुपये भरले. यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांकावर कॉल केला असता हा मोबाइल सातत्याने बंद आढळला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी ‌‌शिंगारे यांनी पोलिस ठाण गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून राहुल रोशन व राजेंद्रसिंग यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक परोपकारी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरण कार्यालयाला सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थानिक संस्था कराची (एलबीटी) २१ कोटी रुपयांची रक्कम थकल्यामुळे महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला सील ठोकले. सील ठोकल्याची कारवाई चुकीची आहे हे लक्षात आल्यावर सील उघडण्याची नामुष्की पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली.
महापालिका आणि महावितरण यांच्यात वसुलीवरून वाद सुरू आहे. महावितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडित केला जातो, तर महापालिकेतर्फे महावितरणच्या मालमत्तांना व्यावसायिक कर लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातच पालिकेच्या एलबीटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता दिनेशचंद्र अग्रवाल यांच्या कार्यालयाला एलबीटीच्या थकित रक्कमेबद्दल सील ठोकले. एलबीटीच्या रक्कमेचा वाद हायकोर्टात सुरू आहे. हायकोर्टाचा निकाल जो लागेल त्यानुसार कारवाई करा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. हायकोर्टात वाद सुरू असल्याचे लक्षात आल्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सील उघडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांचे भवितव्य सिडको ठरविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको भागातील सुमारे ८५ धार्मिक स्थळे सिडको प्रशासनाच्या विक्री करावयाच्या प्लॉटवर नागरिकांनी बांधली आहेत, त्यामुळे ही धार्मिक स्थळे पाडायची किंवा कसे याचा निर्णय सिडको प्रशासनाच्या प्लॉट संबंधीच्या धोरणावरच ठरणार आहे.
महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘सिडकोतील धार्मिक स्थळांसंदर्भात मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. सिडको प्रशासनाने विक्री करावयाच्या प्लॉटसवर (सेलेबल प्लॉट) ८५ धार्मिक स्थळे आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. ही धार्मिक स्थळे पाडण्यासंदर्भात सिडको प्रशासन काय धोरण ठरवते, ते महत्त्वाचे आहे.’ दरम्यान, महापालिका क्षेत्रात्रील ११०५ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. अ, ब, क या गटांत धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. दहा धार्मिक स्थळांना आपण भेट दिली, असे बकोरिया म्हणाले. जी धार्मिक स्थळे रस्त्याच्या मधोमध आहेत व त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे, ती धार्मिक स्थळे पाडावी लागतील, असे त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग
महापालिकेकडे विविध विभागात काम करण्यासाठी मनुष्यबळ फारच कमी आहे. त्यामुळे आउटसोर्सिंगवर सुमारे ३५० कर्मचारी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. हे कर्मचारी घेण्यासाठी एक एजन्सी निश्चित केली जाणार आहे. त्या एजन्सीच्या माध्यमातून गरजेनुसार कर्मचारी घेतले जाणार आहेत. अभियंत्यांपासून तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे, असे बकोरिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : खुसखुशीत वडापाव

$
0
0



वडापाव हा सर्वसामान्यांच्या आवडीचा पदार्थ. पाव कापून त्यावर लावलेली चटणी आणि त्यात मसालेदार वडा, असा हा पदार्थ अनेक ठिकाणी मिळतो. प्रत्येक उपाहारगृहातील वडा पावची चव वेगळी. प्रत्येक ठिकाणी आपले वेगळेपण जपलेले. असाच गेल्या २२ वर्षांपासून वेगळेपणा, चव जपलेला वडापाव मिळतो पहाडसिंगपुऱ्यातील विजय फतेलष्कर यांच्या जयलक्ष्मी वडापाव सेंटरमध्ये.

Shripad.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @kulshripadMT
बेगमपुरा, पहाडसिंगपुरा भागात डीकेएमएम कॉलेज, शासकीय विज्ञान संस्था आहे. या परिसरात विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. तेथे १९९४मध्ये विजय फतेलष्कर यांनी वडापाव सेंटर सुरू केले. शहरात अन्य ठिकाणी मिळणाऱ्या वडापावपेक्षा वेगळ्या पद्धतीचा वडापाव त्यांनी सुरुवातीपासून उपलब्ध करून दिला. पाव गोल आकाराचा आणि मोठा आहे. वड्यामध्ये कोणत्याही स्वरुपाचा मसाला वापरला जात नाही. सोबत चिंचेची चटणी, तळलेल्या मिरच्या आणि कांदे. हा वडापाव विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांच्या पसंतीला उतरला आहे.
वडापावसाठी ताज्या भाज्या आणि चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जाते. रोज सकाळी सात वाजता सेंटर सुरू होते. सकाळी बटाटे उकडून त्यांची भाजी केली जाते. त्यात जिरे, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, मीठ आदी टाकले जाते. या भाजीत कोणताही मसाला वापरला जात नाही. त्याचबरोबर आलं, लसूणही वापरण्यात येत नाही. भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे प्रमाण ठरलेले आहे. त्यामुळे वड्यांची चव गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. हे वडे गोल आकाराच्या मोठ्या पावासोबत सर्व्ह केले जातात. वडापावसोबत चिंच-गुळाची चटणी, तळलेल्या मिरच्या, कांदाही दिला जातो.
कांद्याचा भाव कितीही वाढला तरी वडापावसोबत कांदा देणे कधीही टाळले नाही. चिंच-गुळाची चटणीही विशिष्ट पद्धतीने केली जाते. चिंच उकडून घेतली जाते. त्यानंतर ती कोळून त्यात गुळ, मिरची टाकली जाते, असे विजय फतेलष्कर यांनी सांगितले.
वडापावशिवाय पोहे, उपमा आणि शाबुदाणा खिचडीसाठी जयलक्ष्मी वडापाव सेंटर प्रसिद्ध आहे. सकाळच्या टप्प्यात पोहे आणि उपमा उपलब्ध असतो. पोहे करण्यासाठी कांदे, बटाटे, मिरची, जिरे, मोहरी यांचा वापर करण्यात येतो. उपम्यात कांद्याऐवजी टोमॅटो वापरले जातात, असे त्यांनी सांगितले.
साबुदाणा खिचडी रोज उपलब्ध असते. उपवास करणारे नागरिक येथे आवर्जून येतात. शनिवारी हनुमान टेकडीवर आणि गुरुवारी निपट निरंजन येथे अनेक भाविक येतात. ते साबुदाणा खिचडी खाण्यासाठी आवर्जून येतात. त्याचबरोबर परिसरातील नागरिकही येथून वडापाव, पोहे, उपमा घरी नेतात.
अनेक माजी विद्यार्थी औरंगाबादेत आल्यावर येथे वाडापाव खाण्यासाठी आवर्जून येतात. असा वडापाव कोठे मिळत नसल्याचे फतेलष्कर यांना सांगतात. मसाले, आलं, लसूण न वापरताही चव कशी येते, यावर ते म्हणतात,‘आता हात बसला आहे. चव हाताला असते. कितीही महागडे मसाले वापरले तरी करणाऱ्याच्या पद्धतीवर चव अवलंबून असते. आज शिल्लक राहिलेली भाजी दुसऱ्या दिवशी वापरली जात नाही. त्यामुळेही वडापावची चव कायम आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळा पैसा रोखण्यासाठी दानपेट्या सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील मंदिरांच्या दानपेट्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी सील केल्या आहेत. त्यात तुळजाभवानी मंदिर, अंबाबाई, औंढा नागनाथ, वैद्यनाथ, माहूर, राजूरचा गणपती, वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर या मंदिरांचा समावेश असल्याचे समजते.

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा मंदिराच्या दानपेटीत टाकण्याची शक्यता असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दानपेट्या सील केल्या असल्याचे सूत्राने सांगितले. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे ते या दानपेट्यांमध्ये पैसा टाकू शकतात. त्यामुळेच मंदिराच्या दानपेट्या सील केल्या आहेत. अनेक मंदिराच्या विश्वस्तांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारणाचा निर्णय घेतला आहे. सरकारची कारवाई होऊ नये यासाठी काळा पैसा मंदिराच्या दानपेट्यात येऊ शकतो.

हा पैसा मंदिरात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत या दानपेट्या सील राहाणार आहेत. पावती फाडूनच रोख स्वरुपात भाविकांकडून देणग्या घ्याव्यात, असे निर्देशही धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बरकत’की मिठास वही; फिरभी सुनी-सुनी सी !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पाचसो-हजार की नोटा बंद करके सरकारने बहुत अच्छा काम किया. पर पिछले दो दिन से छुट्टे की वजह से धंदा बीस पर्सेंट कम हुआ है. ‘बरकत’ की मिठास वही है, फिरभी सुनी-सुनीसी लगती है...’ नूतन कॉलनीतल्या सुप्रसिद्ध ‘बरकत’ या चहा दुकानाचे चालक साजेद कुरैशी यांनी आपली व्यथा ‘मटा’कडे व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात पाचशे-हजाराच्या नोटा बंद करून जोरदार षटकार खेचला खरा, पण चाकरमानी आणि सामान्यांची परवड सुरू झाली आहे. सकाळी नऊपासून पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी सर्व काम सोडून एटीएम, बॅँकांमध्ये रांगा लावाव्या लागत आहेत. याची झळही सामान्यांना बसत आहे. याबाबत ‘बरकत’चे कुरैशी म्हणाले, ‘गेल्या दोन दिवसांपासून चहा पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या वीस ते पंचवीस टक्क्यांनी घटली आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. दुपारी ऑफिस सुटले, मधली सुटी असेल की सकाळी ऑफिसला जाताना हमखास येणाऱ्या ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. दुपारच्या वेळी तर चहाचा गाडा रिकामा असतो. काळा पैसा बाहेर येईल. हा निर्णय चांगलाही आहे. मात्र, त्यापूर्वी बॅँकांनीही चांगली व्यवस्था करायला हवी होती. आम्ही बॅँकोत गेलो तर तिथले कर्मचारी नीट बोलत नाहीत. अहो पैसे बदलून घेण्याचे फॉर्मही देत नाहीत. सरळ तुमचे जिथे खाते आहे तिथे जा, असासल्ला देतात. पेपरमध्ये छापूनही आले, की कुठल्याही शाखेत तुम्हाला पैसे बदलून मिळतील.मात्र, हे होताना दिसत नाही. आम्ही रांगेत उभे राहायला तयार आहोत, पण पुढच्या व्यक्तीने सहकार्य तरी करायला हवे. याचा मनस्ताप लोकांना होतो आहे. ज्यांचे पोट हतावर अशांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.’

अनेकजण पाचशे, हजारांची नोट घेऊन येतात. हक्काने चिल्लर मागतात. त्यांना नको म्हणताना खूप जड जाते. पुढचा समजतो पैसे असूनही हा मुद्दाम आपली अडवणूक करतो आहे. आमच्याकडे ग्राहकच आले नाही, तर सुटे पैसे येणार कुठून? हे ग्राकांना सांगणे अवघड जाते. त्यामुळे अनेकजण चहा न पिताच जातात. - साजेद कुरैशी, बरकत हॉटेल

मेडिकलवर वादावादी
‘काळ्या पैशाविरोधात उचलेल्या पावलाने आमची कोंडी केली आहे. अनेक जण हजार, दोन हजारांचे औषध घेतात. बिल देताना हजार, पाचशेच्या नोटा काढतात. बरेच जण अगोदरच हजार, पाचशे दाखवतात. या नोटा चलणार नाही असे सांगितल्यास दुसऱ्या मेडिकलकडे वळतात. दिवसभरात चार-पाच जणांसोबत वादावादी हमखास होते. निर्णय चांगला आहे. मात्र, त्या प्रमाणात चलन उपलब्ध करून द्यावे. एटीएम सुरू नाहीत. बॅँकात गैरसोय सुरू आहे. विशेषतः सरकारी बॅँकांमध्ये कमालीचा उर्मटपणा अनुभवावा लागतो. यात सुधारणा झाली पाहिजे,’ असे मत औरंगपुऱ्यात श्री मेडिकलचे पी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवघेणा स्पीडब्रेकर तोडला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन ५ आविष्कार कॉलनीच्या रस्त्यावरील धोकादायक स्पीडब्रेकर तयार करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालणारे अधिकारी स्पीडब्रेकर तोडण्यासाठी आलेच नाहीत, शेवटी नगरसेवकानेच नागरिकांच्या मदतीने तो स्पीडब्रेकर तोडून टाकला. त्या स्पीडब्रेकरने दोन दिवसात दोन जणांचा बळी घेतला होता.

आविष्कार कॉलनीच्या चौकातून बजरंग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवाळीच्या काळात पॅचवर्कचे काम करण्यात आले. हे काम करताना रस्त्यावरचा स्पीडब्रेकर उंच करण्यात आला. या रस्त्यावर सुरुवातीपासून एक स्पीडब्रेकर आहे, पण त्याची उंची जेमतेम होती. त्या स्पीडब्रेकरमुळे अपघात होत नव्हते, वाहनांची गती मात्र कमी करावी लागत होती. पॅचवर्कच्या कामादरम्यान उंच करण्यात आलेल्या स्पीडब्रेकरमुळे रात्रीच्या वेळी रोज त्या रस्त्यावर अपघात होऊ लागले. विजय तंबारे आणि योगेश गुंजाळ या दोघांचा मृत्यू स्पीडब्रेकरवर दुचाकी आदळल्यामुळे रात्रीच्या वेळीच झाला. दोन दिवसात या दोघांनी जीव गमावला आणि त्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. स्पीडब्रेकरची उंची वाढवणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी केली. अन्यही नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दिला. सभापती मोहन मेघावाले यांनी त्या स्पीडब्रेकरची संयुक्त पाहणी करण्याचे आश्वासन दिले आणि दोषी अधिकारी- कंत्राटदारावर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले.

स्थायी समितीची बैठक झाल्यावर संयुक्त पाहणीचे आश्वासन हवेत विरले. ते धोकादायक स्पीडब्रेकर पाहण्यासाठी सभापती आलेच नाहीत, अधिकारीही फिरकले नाहीत. सायंकाळपर्यंत नागरिकांनी व नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी सभापती व अधिकाऱ्यांची वाट पाहिली. कुणीच येत नाही असे लक्षात आल्यावर कुलकर्णी यांच्या पुढाकाराने नागरिकांनी हातात कुदळ - फावडे घेऊन संपूर्ण स्पीडब्रेकर तोडून टाकला. गणपती आणि दिवाळीच्या काळात संपूर्ण शहरातील पॅचवर्कचे काम कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्या नेतृत्वाखाली झाले. आविष्कार कॉलनीच्या रस्त्यावरही याच काळात पॅचवर्क आणि स्पीडब्रेकर तयार करण्याचे काम झाले, या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी वॉर्ड कार्यालयातील अभियंते निकम व जाधव यांची होती, जीएनआय या कंपनीने पॅचवर्कचे व स्पीडब्रेकर तयार करण्याचे काम केले. या सर्वांची आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी चौकशी करावी, दोन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी ‘मटा’ शी बोलताना केली.

जबाबदारी अभियंत्यांचीच
पायाभूत सुविधांचे अभ्यासक मिलिंद बेंबळकर यांनी सांगितले की, ‘सदोष स्पीडब्रेकरची जबाबदारी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांची आहे. तेच कामाचे टेंडर तयार करतात आणि वर्क ऑर्डर देतात. त्यानंतर कनिष्ठ अभियंता हे काम वर्क ऑर्डरप्रमाणे झाले आहे की नाही, याची तपासणी करून मेजरमेंट बुकमध्ये बिलाची नोंदणी करतात. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराला कामाचे पैसे दिले जातात. बजरंग चौकाजवळ दोन दुचाकीचालकांचा जीव घेणारे स्पीडब्रेकर कंत्राटदाराने कसेही बांधलेले असले तरी त्याची मुख्य जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची आहे. इंडियन रोड कॉँग्रेसने स्पीडब्रेकरचे प्रमाण दिले आहे. त्याची उंची केवळ ०.१० इंच आणि रुंदी ३.७ मीटर असावी, असे म्हटले आहे. मात्र, या कामात इंडियन रोड कॉँग्रेसचे निकष पाळले गेलेले दिसत नाहीत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डागडुजीची साडेतीन वर्षांनी जाग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेतून क्रांतिचौक येथे उभारलेल्या उड्डाणपुलाच्या डागडुजीला साडेतीन वर्षांनंतर सुरुवात केली आहे. दोष निवारण कालावधी सुरू असल्याने याच्या दुरुस्तीचा भुर्दंड सरकारला बसणार नसला तरी रस्ता खिळखिळा होईपर्यंत कंत्राटदाराने दुरुस्ती का केली नाही, महामंडळाला गेली दोन वर्षे पुलाची दूरवस्था कशी दिसली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या क्रांतिचौकात साडेतीन वर्षांपूर्वी राजदीप कन्स्ट्रक्शन्स यांनी उड्डाणपूल उभारला. सरकारच्या नियमानुसार डागडुजी व दुरुस्तीसाठी दोष निवारण कालावधी ठरविण्यात आलेला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनीही पुलाची आठवण कंत्राटदार कंपनीला करून दिली नाही. कंत्राटदाराने लक्ष न दिल्यामुळे पुलावरील रस्त्याच्या काही लोखंडी पट्ट्याही उखडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना पुलावरील खड्ड्यांमधून वाट काढावी लागत होती.

एमएसआरडीसीने या खड्ड्यांची दोन वर्षांनी दखल घेऊन संबंधित कंत्राटदारास दोषनिवारण कालावधी नियमानुसार डांबरीकरण व डागडुजी करावी, असे आदेश दिले. दुरुस्ती केली गेली नाही तर दुसऱ्या कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून त्याचा खर्च वसूल करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यामुळे शनिवारपासून या पुलाची डागडुजी सुरू करण्यात आली. उत्तरेकडील बाजूच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरणाचा एक थर टाकण्यात आल्या. दक्षिणेकडील रस्त्यावरही असेच डांबरीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन बसने कात टाकली

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अखेर शनिवारी शहरात पर्यटन बस सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी १५ प्रवाशांनी बसचा अनुभव घेत पर्यटन केले.
शहर पर्यटन बसचा मार्ग पाणचक्की, औरंगाबाद लेणी, बीबी -का-मकबरा, सोनेरी महल, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, प्रोझोन मॉल, शहानूरमियाँ दर्गा, खंडोबा मंदिर व सिद्धार्थ उद्यान असा आहे. या बसचे भाडे प्रत्येकी १२५ रुपये ठेवण्यात आले असून, प्रायोगिक तत्त्वावर ही बससेवा शुक्रवार, शनिवार व रविवार अशी सुरू राहणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही बस दररोजही सुरू ठेवली जाईल. पर्यटन बस सेवेचा फायदा पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र कुमार पाटील यांनी केले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावर या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रवासी व नागरिक उपस्थित होते. विभागीय वाहन अधिकारी रायलवार, कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड, सहाय्यक वाहतूक अधिकारी विजय बोरसे, वाहन निरीक्षक संतोष नजन यांची प्रमुख उपस्थिती होती. बसचालक शाकेर पठाण यांनी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या बसमध्ये म्युझिक सिस्टीमव्दारे शहरातील प्रमुख ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी पंधरा प्रवाशांनी पर्यटनाचा आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद, पुणे, हिंगोली, मुंबईची आगेकूच

$
0
0

औरंगाबाद, पुणे, हिंगोली, मुंबईची आगेकूच
राज्य कुमार गट कबड्डी स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नड येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली या संघांनी शनिवारी विजय मिळवून आगेकूच कायम ठेवली.
मुलांच्या गटात हिंगोली, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद या संघांनी विजय नोंदवले. सिंधुदुर्ग-जळगाव आणि औरंगाबाद-लातूर या लढतींमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळामुळे रंगत आली. मुलींच्या गटात रत्नागिरी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, सोलापूर या संघांनी चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.
तीन संघांना प्रवेश नाही
बीड, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन-दोन संघ स्पर्धेत खेळण्याकरिता कन्नडला दाखल झाले होते. राज्य कबड्डी संघटनेशी संलग्न असलेल्या जिल्हा कबड्डी संघटनांच्या संघांनाच स्पर्धा संयोजकांनी सहभागी होण्यास परवानगी दिली. त्यामुळे संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काही काळ वाद घातला. यासंदर्भात राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर म्हणाले, ‘बीड, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यांतील दोन-दोन संघ आले होते. संलग्न संघटनेच्याच संघांना खेळण्याची मुभा देण्यात आली. मात्र, तिन्ही संघांतील खेळाडूंची राहण्याची व भोजनाची व्यवस्था संयोजकांनी केली होती. खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली. गोंधळ घालणाऱ्यांना परिस्थितीची नीट कल्पना देण्यात आली. त्यानंतर हा प्रश्न निकाली निघाला.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाङ्मयीन क्षेत्रात सामसूम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘प्रत्येक भाषेचे वाङ्मयीन जग चैतन्याने भारलेले असते. दुर्दैवाने, मराठीत अशी परिस्थिती नाही. पुस्तकांची दखलसुद्धा घेतली जात नाही. महत्त्वाची मराठी नियतकालिके बंद पडली असून वाङ्मयीन चळवळ थंडावली आहे. मराठी वाङ्मयीन क्षेत्रात सामसूम पसरली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी शनिवारी केले. ते ‘आशय’ त्रैमासिकाचे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात प्रकाशन केल्यानंतर बोलत होते.
अमेरिकेतील ‘अनुभव प्रतिष्ठान’ने मराठी साहित्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी ‘आशय’ त्रैमासिक सुरू केले आहे. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, ‘मसाप’चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, कवयित्री प्रभा गणोरकर, डॉ. मोहन कुलकर्णी, कवी खलील मोमीन व संपादक-कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘आशय’चे प्रकाशन केल्यानंतर डॉ. रसाळ म्हणाले, ‘एकेकाळी प्रभावी वाङ्मयीन कामगिरी करणारी मराठी नियतकालिके होती, पण गेल्या तीस वर्षात मासिके हळूहळू बंद पडली. चांगल्या दर्जाच्या साप्ताहिकांची परंपरा संपली. सध्या साप्ताहिकांचा साहित्य आणि संस्कृतीशी किती संबंध आहे असा प्रश्न पडतो. पूर्वी मासिकात चित्रपट, राजकारण, साहित्य, संस्कृती या विषयांवर वाद झडायचे. पुस्तकांची स्फोटक परीक्षणे येत असत. आता वर्तमानपत्रसुद्धा पुस्तकांची दखल घेत नाहीत. काही वर्षांपूर्वी हजार प्रतींच्या मराठी पुस्तकाची आवृत्ती संपण्यास चार-पाच वर्षे लागायचे. ही परिस्थिती अजूनही कायम आहे. साक्षरता वाढली, पण वाचक वाढले नाहीत. आपण शिक्षित असंस्कृत समाज निर्माण केला. कारण भाषेतून माणूस संस्कृती आत्मसात करीत असतो. तरुणांना वाचन करायला फुरसत नाही. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘छंद’, ‘नवे युग’ अशी उत्तम मासिके बंद पडल्यानंतर दर्जेदार मासिकांची गरज आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले.
यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कविसंमेलन रंगले
‘आशय’चे प्रकाशन झाल्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. कवी वसंत आबाजी डहाके, खलील मोमीन, डॉ. मोहन कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या. सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या डहाके यांच्या कविता विशेष दाद घेऊन गेल्या. मोमीन आणि कुलकर्णी यांच्या तरल कवितांनी कविसंमेलनाची रंगत वाढवली. संमेलनाचे निवेदन संजीवनी तडेगावकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरला दुहेरी मुकुटाची संधी

$
0
0

कोल्हापूरला दुहेरी मुकुटाची संधी
पुणे, क्रीडा प्रबोधिनी अंतिम फेरीत
राज्य शालेय हॉकी स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शालेय हॉकी स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे, कोल्हापूर आणि मुलींच्या गटात कोल्हापूर आणि क्रीडा प्रबोधिनी या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.
विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य लढतीत कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा ४-० असा पराभव केला. पूनम माने व कृष्णा माने यांनी प्रत्येकी दोन गोल केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने नागपूर विभागाचा ७-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. मनिश्री शेडगे, गौरी मुकणे, उत्कर्षा काळे, कीर्ती ढेपे यांनी गोल नोंदवले.
मुलांच्या गटात पुणे विभागाने मुंबई विभागाचा टायब्रेकमध्ये ५-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये २-२ अशी बरोबरी झाली होती. मुंबईच्या रोहन पिल्ले व हर्ष मोरे यांनी, तर पुण्याच्या संकेत भाले, अजय गायके यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूर विभागाने यजमान औरंगाबाद संघावर ५-० अशी एकतर्फी मात केली. कोल्हापूरच्या अभय रोडे, हर्षल पडसे, सचिन पुजारी यांनी गोल नोंदवले.
दोन्ही गटातील अंतिम सामने रविवारी सकाळी नऊ वाजता खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल. पंच म्हणून रणजित भारद्वाज, अकबर खान, अजमत शेख, इम्रान शेख, जाहेद शेख, अमान शेख, झाकीर यारखान, राहुल लिंगायत, समीर शेख, नीतेश परदेशी, धीरज चव्हाण, आकाश मिस्कीन यांनी काम पाहिले. तांत्रिकी समितीची जबाबदारी अजिज सय्यद, युसूफ शेख व श्यामसुंदर भालेराव यांनी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककलावंतांना कला जोपासताना शिक्षण हवे!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजाश्रय आणि लोकाश्रय संपल्यानंतर वासुदेव, गोंधळी समाजाची परवड झाली. कलावंतांनी कलेची जरूर जपणूक करावी, पण जागतिक पातळीवर आपले स्थान ओळखावे. सद्यस्थितीत शिकून प्रगती करण्याची गरज आहे, असे मत मान्यवरांनी जोशी, गोंधळी, वासुदेव संघाच्या मेळाव्यात मांडले.
महाराष्ट्र जोशी, गोंधळी, वासुदेव संघाने संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी दुपारी समाज मेळावा व लोककला महोत्सव घेतला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र गोंधळी समाजाचे अध्यक्ष तात्याराव शिंदे, ढोलकीपटू पांडुरंग घोटकर, राजेंद्र वनारसे, अंबादास काळे, मदनराव कदम, शेषराव धुमाळ, केशवराव मोहरकर, बालाजी डोईजड, डॉ. श्याम सोनवणे, प्रकाश हांडे, विलास सोनवणे, कांताबाई वाघटकर, प्रभावती गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कलेची जोपासना करीत असलेल्या तीन समाजाच्या समस्यांवर मान्यवरांनी भाष्य केले. यावेळी पांडुरंग घोटकर म्हणाले, ‘लोककला महोत्सवानिमित्त आपण एकत्र आलो. समाज एकजीव नसल्यास प्रगती घडणार नाही. वयोवृद्ध कलाकारांसाठी सरकारदरबारी मागणी करण्यापूर्वी स्वतःच्या घरातून सुरुवात करा. दररोज एक रुपया बचत केली, तर मुलांचे शिक्षण आणि वयोवृद्ध कलाकारांना आजारपणात मदत होऊ शकेल. विश्वासू लोकांनी निधी गोळा करून पुढाकार घ्यावा’. तर अंबादास काळे यांनी शिक्षणाची गरज व्यक्त केली. ‘उपजिवीकेचे साधन म्हणून लोककला जतन करीत आहोत, पण नवीन पिढीला शिक्षणाची गरज आहे. शिकून संघर्ष केल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाहीत. आपली शक्ती ओळखून संघटन करा,’ असे काळे म्हणाले.
‘वासुदेव, जोशी, गोंधळी समाजाचा वेगळा लढा नसावा. सर्वजण एकाच छताखाली आल्यास मागण्यांचा योग्य पाठपुरावा करता येईल. कर्मचारी संघटन आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत’ असे बालाजी डोईजड म्हणाले. ‘काळानुसार पिंगळा, नंदीवाले, डवरी, गोसावी, अस्वलवाले, बहुरूपी असे लोककलावंत लुप्त झाले. मागील अनेक वर्षांत सकाळी वासुदेव कुणाच्या घरी आल्याचे आठवत नाही. भटकंती करून हा समाज गुजराण करीत आहे. सर्वांना एकत्र आणून शिक्षणातून प्रगती करण्याची गरज आहे,’ असे तात्याराव शिंदे म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images