Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनेक मदरसे केवळ कागदोपत्रीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुस्लिम मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान घेऊन मदरसे उभारण्यात आले, मात्र अनेकांनी मदरसे केवळ कागदोपत्री दाखवून स्वतःच्या तुंबड्या भरल्याचा प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे.
मदरशांबाबत जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शिवाय मदरशांचे सर्वेक्षण, तपासणी करण्याचे शासनाचेही आदेश असल्याने बुधवारी (७ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने जिल्ह्याभरातील नोंदणीकृत २४६ मदरशांची झाडाझडती घेतली. यामध्ये काही मदरसे नियमानुसार सुरू असल्याचे आढळले, मात्र अनेक ठिकाणी मदरसे कागदोपत्रीच असल्याचे समोर आले आहे. पथकाला काही मदरसे सापडलेच नाही, तर अनेक मदरशांमध्ये कोणत्याही सोईसुविधाच उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. मदरशांमध्ये विद्यार्थी संख्याही कागदोपत्रीच असल्याचे आढळल्यामुळे अनुदान लाटण्याचा प्रकारही पथकाच्या निदर्शनास आला.
तपासणी करण्यात आलेल्या मदरशांमध्ये नव्याने दाखल केलेल्या प्रस्तावांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रत्येक मदरशाला इमारत बांधकाम, दुरुस्ती, पुस्तके खरेदी, कम्प्युटर इतर खर्च मिळून चार लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील २४६ मदरशांपैकी १९० औरंगाबाद तालुक्यात आहेत. यातील अनेक मदरशांच्या कारभारासंदर्भात जिल्हा प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मदरशांची तपासणी केली. बुधवारी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकुन; तसेच पथकामध्ये तलाठ्यांचाही समावेश होता.

६५ तक्रारी
शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील विविध मदरशांच्या ६५ तक्रारी होत्या. जिल्ह्यात ५ ऑक्टोबर २०११च्या पटपडताळणीनंतर महसूल विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई होती. मदरशांच्या झाडाझडतीमध्ये जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाला दूरच ठेवले होते.

चक्क घरामध्ये मदरसा
जिल्ह्यात नोंद असलेल्या मदरशांच्या पत्त्यावर पथकातील अधिकारी तपासणीसाठी गेले. अनेक ठिकाणी नोंद असलेल्या पत्त्यावर मदरसे आढळेच नाहीत. परिसरातील नागरिकांकडे यासंदर्भात विचारणा केली असता, ‘यहाँ है, वहाँ है,’ असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही नोंदणीकृत मदरसे तर चक्क घरामध्ये सुरू होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मदरसे सापडले नाहीत
एका मदरशाचा पत्ता ‘टिपू सुलतान चौक’ असा देण्यात आला होता. हा चौक पथकाला सापडलाच नाही. अखेर गुगल मॅपचा आधार घेण्यात आला. त्यावरही हा चौक सापडला नाही. अल्तमश कॉलनीमधील एका पत्त्यावर तपासणीसाठी पथक गेले असता, ‘येथील मदरसा दुसऱ्या ठिकाणी चालतो,’ असे तेथील एका व्यक्तीने सांगितले. सिल्क मिल कॉलनी आणि रहेमानिया कॉलनी येथील पत्त्यांवर मदरसे आढळले नाहीत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेसबुक कविसंमेलन उद्या रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाच्या बळावर ‘महाराष्ट्र टाइम्सची’ औरंगाबाद आवृत्ती ९ डिसेंबर रोजी, शुक्रवारी पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या आनंद सोहळ्याचे औचित्य ध्यानात घेत शुक्रवारी ‘मटा’ फेसबुक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत रसिकांना राज्यभरातील मान्यवर कवींच्या कवितांचे रसग्रहण करता येईल. सोबतच आपल्या स्वरचित कविताही ‘मटा कविसंमेलन’ या फेसबुक पेजवर अपलोड करता येतील. नवोदितांच्या दर्जेदार कवितेसाठी खास पारितोषिक ठेवण्यात आले आहे. मान्यवर साहित्यिक स्पर्धेचे परीक्षण करणार असून, पाच कवींची निवड केली जाणार आहे. या कविसंमेलनात तुमचा सहभाग अपेक्षित आहे.

‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’
‘मटा’च्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे धगधगते महापर्व नवगीतांमधून सांगणारा ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य, राष्ट्र उभारणीचे पाहिलेले स्वप्न, खडतर प्रवास, लाखमोलाची घडवलेली माणसं, स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग आणि शून्यातून उभे केलेले हिंदवी स्वराज्य. शिवरायांचे स्वराज्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आहे. शिवरायांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच स्वराज्य निर्मितीचे अविभाज्य अंग असलेल्या व्यक्तींच्या समर्पणावर नवगीतांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाशझोत म्हणजेच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ हा संगीतमय कार्यक्रम आहे. अनिल नलावडे यांच्या लेखणीतून व संगीत दिग्दर्शनातून कार्यक्रम उलगडतो. गीत गायन अनिल नलावडे, दत्तात्रय मेस्त्री, हषिकेश पाटील, अभिषेक पाळंदे, नाजुका वीरकर करणार आहेत. नृत्य गणेश केरकर व सहकाऱ्यांचे असून शस्त्र नैपुण्य ओंकार कंग्राळकर, प्रणय शेलार आणि सहकाऱ्यांचे आहे. ‘मटा’च्या वाचकांसाठी कार्यक्रम खुला आहे.

आजपासून प्रवेशिका उपलब्ध
या संगितमय कार्यक्रमाच्या प्रवेशिका गुरुवारी सकाळी ११पासून वितरित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात या प्रवेशिक मिळतील. प्रवेशिका घेण्यासाठी सोबत कार्यक्रमाच्या बातमीचे कात्रण घेऊन यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरसाट, दानवेंचा खासदारांना ‘दे धक्का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चार महिन्यांपूर्वी एकमेकांवर आरोप करणारे आमदार संजय शिरसाट व जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आता एकत्र आले असून, त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना उपमहापौर, गटनेने, सभागृहनेते यांच्या निवडीत धक्का दिला आहे. संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी उपमहापौरांसह सभागृहनेते व गटनेते यांची नावे बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अंबादास दानवे यांनी शिवसेनेतर्फे गणेश यात्रा काढली. या यात्रेमुळे दुखावलेले आमदार संजय शिरसाट यांनी, दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. दानवे यांच्यावर त्यांनी आरोपांच्या फौरी झाडल्या होत्या. त्यावेळी खासदार चंद्रकांत खैरे दानवे यांच्याबरोबर होते. आता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरसाट, दावने एकत्र आले अाहेत. त्यांनी खैरे यांना एकाकी पाडल्याचे चित्र आहे. उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे गेल्या शनिवारी शिरसाट, दानवे व प्रदीप जैस्वाल यांनी मुंबईत जाऊन विनोद घोसाळकर यांना संभाव्य उमेदवारांची यादी दिली. उपमहापौरपदासाठी स्मिता घोगरे, गजानन मनगटे, राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. सभागृहनेतेपदासाठी नंदकुमार घोडेले व विकास जैन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. घोगरे यांचे नाव आमदार शिरसाट यांच्या सूचनेवरून यादीत घेण्यात आले होते. मनगटे यांच्या नावाची शिफारस अंबादास दानवे यांची होती, तर प्रदीप जैस्वाल यांनी जंजाळ यांच्या नावाची शिफारस केली होती.
उमेदवारांची नावे जाहीर करताना घोसाळकर यांच्याबरोबर दानवे व शिरसाट उपस्थित होते. महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. खासदार खैरे अधिवेशनामुळे दिल्लीला असल्याचे सांगण्यात आले.

उपमहापौरपदासाठी स्मिता घोगरेंना उमेदवारी
घोसाळकर यांनी बुधवारी सकाळी घोगरे यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर केले. त्यामुळे जैस्वाल यांची शिफासर वाया गेल्याचे मानले जाते. सभागृहनेतेपदासाठी गजानन मनगटे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे दानवे यांची सरशी झाल्याचे मानले जात आहे. शिवसेना गटनेतेपदासाठी मकरंद कुलकर्णी यांचे नाव जाहीर करण्यात आले. कुलकर्णी देखील नव्याने तयार झालेल्या शिरसाट, दानवे गटाचे मानले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभरातील वैद्यकीय शिक्षक MCIच्या रडारवर

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

Tweet : @nnirkheeMT

औरंगाबादः देशभरातील शासकीय व खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील वैद्यकीय शिक्षक भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) रडावर आले असून, सर्वच कॉलेजांमधील अधिष्ठातांपासून ते अगदी सहाय्यक प्राध्यापकांपर्यंतच्या सर्वच वैद्यकीय शिक्षकांची बायोमेट्रिक नोंद परिषदेला जोडली जाणार आहे. परिणामी, दांड्या मारणारे वैद्यकीय शिक्षक अडचणीत येणार असून ‘एमसीआय’च्या तपासणीदरम्यान होणाऱ्या उसनवारीसारख्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. देशभरात कुठल्या विषयामध्ये किती प्राध्यापक आहेत, असा सगळा ‘डेटा’ही आपसुकच तयार होणार आहे.

निरीक्षणावेळी एका शहराच्या कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षकांना दुसऱ्या शहरातील कॉलेजांमध्ये पाठवून ‘एमसीआय’ची मान्यता मिळवण्यात शासकीय तसेच खासगी वैद्यकीय कॉलेजांचे संस्थाप्रमुख तरबेज झाले आहेत. रुग्णालयातील ‘बेड ऑक्युपन्सी’ दाखवण्यासाठी ट्रकभरून रुग्ण ‘आयात’ केले जातात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच सर्व वैद्यकीय शिक्षकांच्या बायोमेट्रिक्सची नोंद ‘एमसीआय’शी थेट जोडली जाणार आहे. देशभरातील सर्व वैद्यकीय कॉलेजांमधील अधिष्ठातांसह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांची रोजची व वर्षभरातील नोंद तपासता येणार आहे. परिणामी, कोणता प्राध्यापक कुठे हजर-गैरहजर आहे, एकूण हजेरी, प्राध्यापक किती वाजता कॉलेजमध्ये आला व गेला आदी बाबी उघड होणार आहेत.

भर सह्यांवरच !

वैद्यकीय कॉलेजांमधील प्राध्यापक, कर्मचारी आदी सर्वांसाठी बायोमेट्रिक पद्धत कार्यान्वित झाली आहे. याची नोंद थेट कोषागार कार्यालयात होते. मात्र, अजूनही वेतन काढताना वैद्यकीय शिक्षकांच्या हजेरीची नोंद सह्यांवरूनच ग्राह्य धरली जाते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच एकदम सह्या करून हजेरी दाखवण्याचे ‘उद्योग’ मोठ्या प्रमाणावर होतात. या निर्णयामुळे अशा प्रकारांनाही आळा बसेलच; पण ‘क्लिनिकल’ विषयातील शिक्षकांची व एमर्जन्सी सेवा देणाऱ्या शिक्षकांची यात अडचण होऊ शकते, असाही शिक्षकांचा मतप्रवाह आहे.

‘एमसीआय’च्या नवीन निर्णयानुसार ‘डीन’पासून सर्व वैद्यकीय शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरीची नोंद ‘एमसीआय’ला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देशभरातील सर्व फॅकल्टींचा ‘डेटा’ उपलब्ध होईल. गैरप्रकारांनाही आळा बसू शकेल. शिक्षकांची अपेक्षित हजेरी नसेल, तर कॉलेजची मान्यता रद्द करण्याची किंवा विद्यार्थ्यांच्या जागा कमी करण्याचे अधिकारही ‘एमसीआय’ला आहेत.

– डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता (घाटी) व एमसीआय निरीक्षक

‘एमसीआय’च्या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांतील गैरप्रकार नक्कीच कमी होतील. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारेल.

– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (नांदेड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएम आमदारांचे नागपूरमध्ये आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यावे या मागणीसाठी नागपूर येथे विधानसभेच्या प्रवेशद्वारासमोर एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी गुरुवारी आंदोलन केले.
नागपूर येथे हिवाळी अधिवेनात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि आमदार वारिस पठाण यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारात हातात बॅनर धरून आरक्षणाची मागणी केली. आमदार इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेसने १५ वर्षाच्या कार्यकाळाच्या शेवटी मुस्लिमांना आरक्षण दिले. कोर्टाने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण द्यावे, असा निर्णय दिला आहे. पण, सध्याच्या सरकारने आरक्षण देण्यासाठी कोणतेही पावले उचलेले नाहीत. भाजप सरकारने मराठा आरक्षणाबद्दल कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले, पण मुस्लिम आरक्षणाबाबत काहीच बोलत नाही. भाजप सरकार मूग गिळून गप्प आहे, अशी टीका आमदार जलील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकार शेतकरीविरोधी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
भाजप सरकार हे शेतकरी आणि सामान्याच्या विरोधी सरकार आहे. नोटा बंदीचा लाभा न होता आतापर्यंत बँकेच्या रांगामध्ये ८२ जणांना प्राण गमवावे लागले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सामान्यांसाठी आवाज उठवत आहे. परंतु, शिवसेनेसारख्या पक्षाची मित्र पक्ष म्हणून फरफट होत असल्याची टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी अहमदपूर येथील सभेत केली.
खासदार अशोक चव्हाण यांच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, आणि औसा या ठिकाणी नगर पालिका निवडणुकाच्या प्रचारासाठी सभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार बसवराज पाटील, तुकाराम रेंगे, शिवाजीराव पाटील-कव्हेकर, जिल्हाध्यक्ष अॅड व्यकंट बेद्रे, तालुका अध्यक्ष गणेश कदम व काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदपूर येथे बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, ‘आतापर्यंत तुम्ही दिवंगत नेते शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेसला मतदान केल आहे. काँग्रेसने सतत विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे मी ही २० वर्षानंतर तुम्हाला मते मागण्यासाठी आलो असल्यामुळे काँग्रेसला मतदान करून विजयी करा.’
राज्य सरकार मराठा आणि मुस्लिमांच्या आरक्षणासाठी गंभीर नाही. राज्य सरकार आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचे सांगून सरकारी वकील सुनावणीच्यावेळी हजर राहत नाहीत असा आरोप खासदार चव्हाण यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.



भाजपनेच ‘एमआयएम’ला पोसले
गेल्या काही दिवसांपासून भाजपनेच ‘एमआयएम’सारख्या पक्षाला पोसले आहे. ‘एमआयएम’ला मत म्हणजे भाजपलाच मत असल्याची जोरदार टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत घरांच्या नावाखाली फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
गोरगरीबांना मोफत घरे देणारी योजनेच्या नावाखाली जालना शहरात बोगस नोंदणी केली जात आहे. शहरातील गल्लीबोळातील छोट्या-छोट्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह पंतप्रधान आवास या योजनेची जाहिरात केली जात आहे. एक साधा एक पानाचा अर्ज दोनशे ते पाचशे रूपये घेऊन भरून घेतला जातो आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक केली जात असून या प्रकाराकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.
नोटा बंदी घालण्यात आली आहे आणि आता काळा पैसा बाहेर पडला आहे. त्यातूनच पंतप्रधान मोदी हे सगळे पैसे गोळा करून गोरगरिबांच्या घरात टाकणार आहेत, अशा प्रकारच्या अनेक जोरदार अफवा सध्या शहरात चर्चांचा विषय झाल्या आहेत. नवीन जालन्यातील मंगळवार बाजार भागात तर नागरिकांनी अक्षरशः रांग लाऊन हे सगळे फॉर्म भरून दिले आहेत.
शहरातील गल्लीबोळात सध्याच्या घडीला या योजनेची जबरदस्त चर्चा सुरू असून फार्म भरण्यासाठी सगळीकडे नागरिकांची धावा-धाव होत आहे.
ज्यांना कुणाला कुठे घर नाही अथवा त्यांच्या नावावर घर नाही अशा सर्वांना ही मोफत घरे बांधून मिळणार आहेत असे बोलले जाते आहे. शहरातील विविध भागातील काही दलाल हे सगळे अर्ज गोळा करून प्रत्येकाकडून सरासरी दोनशे ते पाचशे रुपये लुबाडले जात आहे.
दरम्यान, शहरातील राजीव गांधी, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना आणि दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या मासिक मानधन योजनेतील मध्यस्थ दलाल या सर्व बोगसगिरीचे खरे सूत्रधार आहेत. तेच या सर्व ठिकाणी पैसे गोळा करत आहेत. या अर्जावर कोणी कुठे पावती देत नाहीत, असे खुले धंदे जालन्यातील गल्लीबोळात जोरदार पद्धतीने सुरू आहेत.
जालना शहरात ४५ हजारपेक्षा अधिक नागरीक राज्य सरकारच्या राजीव गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना, श्रावणबाळ योजनांचा लाभ घेतात. या सर्व योजना लाभार्थ्यांना पोहोचविण्यासाठी शहरातील विविध भागातील गल्लीबोळात आणि झोपडपट्टीत मध्यस्थ दलाल आहेत. लाभार्थ्यांच्या व्यक्तीगत बँकेच्या खात्यात रक्कम जमा होत असतानाच या दलालांना तहसील कार्यालयातून माहिती मिळते. जवळपास सर्वच लाभार्थ्यांची बँक खाते पुस्तके याच मध्यस्थ दलालांच्या कस्टडीत आहेत ते संबंधितांकडून बँकेच्या विड्रालवर सह्या, अंगठे घेतात आणि संबंधित बँकेतून पाचशे रुपये महिन्यानुसार मानधन उचलून त्यातील दोनशे रुपये महिना दराने मानधन कापून उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्यांना देतात. या योजनेच्या लाभार्थ्यांनी या दलालांच्या विरोधात तक्रार केली तर त्याच्या विरोधात तहसील कार्यालयात पुरावे देऊन त्याचेच नाव दारिद्रय़ रेषेखालील यादीतून वगळण्याची धमकी दिली जाते, त्यांच्या सोबत काही बॅँकेचे कर्मचारी देखील सहभागी आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून मोफत घरे बांधून देण्याचे अमिष दाखवून लुबाडणूक करणाऱ्या दलालांची हीच साखळी जालन्यात काम करत आहे.


फसविणाऱ्यांवर कारवाई करा
जिल्हा प्रशासनाने या सर्व बोगसगिरीचे खऱ्या सूत्रधारांना तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल केले पाहिजेत. अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सामान्य माणसाला फसवण्याचा हा गोरखधंदा आणखीनच जोरदार पद्धतीने संपूर्ण ग्रामीण भागात झपाट्याने पसरत जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्याचे धगधगते महापर्व सांगणारा ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा संगीतमय रविवारी (११ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रुक्मिणी सभागृहात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. युद्धकलेचे प्रात्यक्षिक थेट रंगमंचावर दाखवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.
अनिल नलावडे यांच्या लेखणीतून व संगीत दिग्दर्शनातून कार्यक्रम उलगडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य, राष्ट्र उभारणीचे पाहिलेले स्वप्न, खडतर प्रवास, लाखमोलाची घडवलेली माणसं, स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग आणि शून्यातून उभे केलेले हिंदवी स्वराज्य. शिवरायांचे स्वराज्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आला आहे. शिवरायांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच स्वराज्य निर्मितीचे अविभाज्य अंग असलेल्या व्यक्तींच्या समर्पणावर नवगीतांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाशझोत म्हणजेच ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा कार्यक्रम आहे. शिवरायांच्या आयुष्याचा वेध घेणारी व सहकाऱ्यांचे कर्तृत्व सांगणारी ४२ नवगीते रचली आहेत. या गीतांना काही ठिकाणी पारंपरिक नृत्याचीही जोड देण्यात आली आहे. काही समरगीतावर शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येते. शिवरायांनी स्वत्व जागृत केलेल्या मराठ्यांच्या विजय मालिकांचे गीत रसिकांना अनुभवता येणार आहे; तसेच बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, प्रतापराव गुजर, कोंढाजी फर्जंद, रामाजी पांगेरा, शिवा काशीद, सूर्यराव काकडे, बहिर्जी नाईक, फिरंगोजी नरसाळा, तानाजी मालुसरे या वीरांचे स्मरण करणारी वीरगीतेसुद्धा आहेत. ऑडियो-व्हिज्युअल तंत्राचा वापर आणि लढाईच्या प्रसंगाद्वारे शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव रंगमंचावर सादर केले जाणार आहे.
गीत गायन अनिल नलावडे, दत्तात्रय मेस्त्री, ह्रषिकेश पाटील, अभिषेक पाळंदे, नाजुका वीरकर करणार आहेत. नृत्य गणेश केरकर व सहकाऱ्यांचे असून शस्त्र नैपुण्य ओंकार कंग्राळकर, प्रणय शेलार आणि सहकाऱ्यांचे आहे. ‘मटा’च्या वाचकांसाठी कार्यक्रम खुला आहे.

प्रवेशिका उपलब्ध
‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या संगीतमय कार्यक्रमाच्या प्रवेशिका वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ‘मटा’च्या कार्यालयात (महाराष्ट्र टाइम्स, साई स्वेअर, उस्मानपुरा सर्कल, स्टेशन रोड) प्रवेशिका उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादेत आल्या नोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीमुळे महिनाभर त्रासलेल्या औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) शहरासाठी मुबलक रोकड उपलब्ध झाली आहे. ‌शहरातील मुख्य करन्सी चेस्ट सांभाळत असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियात ही रोकड आली असून, या नोटांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आरबीआयकडून पाठविण्यात आलेल्या नोटा दोन हजार, शंभर, पन्नास रुपयांच्या आहेत.
औरंगाबाद शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ हैदाराबादच्या सुमारे २५०हून अधिक शाखांना निदान आठवड्याभर ही रोकड पुरेल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या १६ नोव्हेंबर, १७ नोव्हेंबर रोजी शहरात रोकड उपलब्ध झाली होती. त्या वेळी दोन कंटेनरमधून सुमारे ४०० ते ५०० कोटींची रोकड आली होती. या नंतर २८ नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेकडे सुमारे ३५०० कोटींची मागणी स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आयडीबीआय, एचडीएफसी आणि इतर खासगी बँकांनी एकत्र‌ितपणे केली होती. एवढी मोठी रोकड तर अद्यापही आलेली नसली, तरी सध्या प्राप्त झालेल्या चलनामुळे परिस्थिती निवळेल, असे बँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र बँके, स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनीही रोकड उपब्धत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज (गुरुवारी) व उद्या (शुक्रवारी) रोकड वितरणाचे नियोजन त्या-त्या शाखांमध्ये केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एटीएमवर कॅश उपलब्ध होणार
सध्या शहरातील ७००पैकी सुमारे ४५० एटीएम रोकड टंचाईमुळे बंद आहेत. त्यात स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांच्या एटीएमचा समावेश आहे. इतर खासगी बँकांच्या काही एटीएमवर रोकड उपलब्ध होती. आता महाबँक, एसबीएच आणि एसबीआयच्या एटीएमवरही नोटा उपलब्ध होतील.

दृष्टिक्षेपात बँका
एटीएमची संख्या ः ७००
राष्ट्रीयकृत बँका ः २२
शाखा ः २५०
खासगी बँका ः १२
खासगी बँकांच्या शाखा ः १५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबदला नको, माणुसकी हवी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुटुंबातील कर्ता भर तारुण्यात गेल्यानंतरही त्याच्या बहुतांश अवयांचे दान करून एकाचवेळी अनेकांना जीवनदान देण्याचे धीरोधात्त कार्य करणाऱ्या कुटुंबीयांचा गौरव ‘मटा’ औरंगाबाद आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी ‘मटा’च्या शहर कार्यालयात करण्यात आला. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांच्या हस्ते कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांना नोकरी तसेच निःशुल्क शिक्षण, आरोग्यसेवा मिळाव्यात अशी अपेक्षाही डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या निमित्त दात्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या व्यथाही मांडल्या.
१५ जानेवारी २०१६ रोजी मराठवाड्यातील पहिले अवयवदान औरंगाबाद शहरात यशस्वी झाले आणि त्यानंतर अवघ्या साडेदहा महिन्यांत मराठवाड्यात ९ ‘ब्रेन डेड’ व्यक्तींकडून हृदय, यकृत, मूत्रपिंड, कॉर्नियासारखे सुमारे ५० अवयवांचे दान करण्यात आले. यामुळेच महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना जीवनदान, दृष्टीदान मिळाले. एवढ्या कमी कालावधीत व तुलनेने मोठ्या प्रमाणात अवयवदान झाल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना ठरली आहे. त्याचवेळी अवयवदान सुरू होण्यापूर्वीपासूनच अवयवदानासाठी आवश्यक असलेली ‘झेडटीसीसी’ समिती स्थापन करण्यातील शासकीय दिरंगाईचा पाठपुरावा करून ही समिती स्थापन होईपर्यंत आणि अवयवदानाला चळवळीचे स्वरूप देण्यापर्यंतचा संपूर्ण पाठपुरावा ‘मटा’ने वेळोवेळी केला. या पार्श्वभूमीवर या चळवळीची दखल म्हणून ‘मटा’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त दात्यांचा कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. या वेळी दात्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेण्यापासून ते प्रत्यक्ष अवयवदान व अवयवदानानंतर भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्याही आग्रहाने मांडल्या. या कार्यक्रमाला ‘मटा’चे निवासी संपादक धनंजय लांबे, वरिष्ठ सहसंपादक प्रमोद माने व ‘मटा’ची टीम उपस्थित होती.

या दात्यांचा कार्याला ‘मटा’चा सलाम…
‘मटा’च्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये, पहिल्यांदा अवयवदान केलेल्या राम मगर (२४, रा. देऊळगाव मळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) या तरुणाची आई मंदाताई सुधाकर मगर, दात्याचे मामा बद्रिनारायण यशवंत गाडगे व दात्याचा भाऊ श्याम सुधाकर मगर, दुसऱ्यावेळी अवयवदान केलेल्या सुनील बुधवत (३९, रा. सावखेड तेजन, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) यांची पत्नी अनिता बुधवत, उज्जव व स्नेहल ही मुले, तिसऱ्या वेळी अवयवदान केलेल्या राभाऊ रंगनाथ उबाळे (२८, रा. पांगरी गोसावी वाई. ता. मंठा, जि. जालना) यांच्या पत्नी मंगल उबाळे, ऋतुराज व रुपाली ही मुले, चौथ्या वेळी अवयवदान केलेल्या गणेश शंकर घोडके (२७, रा. वैजापूर. जि. औरंगाबाद) यांचे भाऊ नंदकुमार घोडके, पाचव्या वेळी अवयवदान केलेल्या मंदाबाई किसन गडवे (५५, रा. डोंगरगाव महादेव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांचा मुलगा प्रदीप गडवे, सातव्या वेळी नांदेड येथे अवयवदान केलेले सुधीर प्रल्हाद रावळकर (३२, रा. दीपनगर, ता. मुखेड, जि. नांदेड) यांच्या भगिनी चंदा रावळकर, तर नवव्या वेळी अवयवदान केलेल्या अर्चना सतीशकुमार श्रावक (४१, रा. सराफानगर, अग्रसेन भवन, औरंगाबाद) यांचे वडील भरतकुमार कासलीवाल, काका पप्पू कासलीवाल, भाऊ निशांत, परेश, अभिजित, वहिनी योगिता व मुलगी माही यांचा ‘मटा’च्या वतीने गौरव करण्यात आला.

आम्ही माणुसकीलाही पारखे…
भावाच्या अपघातानंतर जेव्हा तो ‘ब्रेन डेड’ झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा तो इतरांमध्ये जिवंत राहावा या उदात्त हेतुने दुसऱ्या क्षणी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्याच्या पत्नीचे मन वळवल्यानंतर तिनेही तत्काळ होकार दिला. माझा भाऊ अकाली गेला; पण त्याच्या अवयवांच्या रूपाने तो अजूनही जिवंत असल्याचे नक्कीच समाधान वाटते. त्याच्या हृदय, यकृत, मूत्रपिंडांचे ज्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण झाले, ते रुग्ण आज उत्तम स्थितीत आहेत. ज्या रुग्णांना नेत्रदान मिळाले, तेदेखील आज पाहू शकत आहेत आणि हे जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिले तेव्हा तर अवयवदानाचा निर्णय किती योग्य होता, याची खात्रीच पटते. भाऊ अकाली गेला व त्याने अनेकांना जीवनदान दिले. मात्र, आज त्याचे कुटुंब उघडे पडले आहे. त्याची पत्नी एमए, एमएड असूनही तिला नोकरी मिळत नाही. आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. भावाला लहान मुलगी आहे आणि तिच्या भविष्याचे काय, हा फार मोठा गंभीर प्रश्न असूनही शासन-प्रशासनाला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वारंवार भेटूनही तिला कंत्राटी नोकरीदेखील मिळत नसल्याची दुर्दैवी स्थिती आहे. अपघाताचा पंचनामादेखील पोलिसांनी व्यवस्थित केला नसून, या बाबत प्रश्न विचारला तर चक्क उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकाचालकानेही ५०० रुपये घेतले. हा कुठला न्याय? एकीकडे शहीद जवानाचा संपूर्ण सन्मान केला जातो, त्याच्या कुटुंबियांची काळजी घेतली जाते; परंतु अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबियांना साधी माणुसकीदेखील मिळत नाही. निदान दात्यांच्या चिमुकल्यांचा, त्यांच्या निराधार व आर्थिकृष्ट्या कमकुवत पत्नींचा तरी शासन-प्रशासनाने विचार केला पाहिजे. – चंदा रावळकर, दात्याची बहीण

तांदूळ खाऊन जगतोय…
आमचे मालक गेल्यानंतर आमच्यावर आभाळ कोसळले आहे. मालक गेल्यानंतर आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला खरा; पण आज आमच्याकडे कुणीही पाहायला तयार नाही. आम्हाला शेती नाही, नोकरी नाही. केवळ तांदूळ खाऊन जगण्याची वेळ आली आहे. दोन लहान मुले आहेत. त्यांना कसे जगवायचे, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. सरकारने आमचा विचार केला पाहिजे. – मंगल उबाळे, दात्याची पत्नी

हात पसरणार नाही, पण मावेजा तर द्या..
माझ्या मुलाला म्हणजेच रामला नुकतीच नोकरी लागली होती व याच धावपळीत त्याला अपघात झाला. तो वाचावा-जगावा म्हणून अख्खी शेती विकण्यासाठी मी तयार होते. त्याच्यासाठी अगदी भीक मागण्यासाठीही मी तयार होते; पण तो गेल्याचे लक्षात येताच आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला. माझा भाचा किडनीविकाराने तडफडलेला मी बघितला आहे. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व आम्हाला होतेच. त्यामुळे एका क्षणात अवयवदानाचा निर्णय घेतला व आज माझा राम अनेकांच्या रूपाने जिवंत असल्याचे नक्कीच समाधान आहे. राम व त्याचा भाऊ श्याम ही दोन्ही मुले लहान असतानाच पती गेले. तेव्हापासून वेगवेगळा संघर्ष करीतच पुढे आले आहे. याच संघर्षातून दोन्ही मुलांना शिकवले. मात्र, कधीही कुणापुढे हात पसरला नाही. आता एवढेच वाटते की, निदान शासन-प्रशासनाने आमच्या हक्काचा मोबदला तरी द्यावा. अनेक वर्षांपूर्वी सरकारने आमच्या शेतातील जमिनीचे भूसंपादन केले; परंतु अद्याप जमिनीचा मोबदला दिलेला नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेकांना भेटले, पण काहीही उपयोग होत नाही. हा हक्काचा मोबादला मिळाला, तर निदान श्यामचे आयुष्य मार्गी लागू शकेल. एवढे सरकार करणार का…? - मंदाबाई मगर, दात्याची आई

पुण्यकामाचे मिळाले समाधान…
डॉ. सुधीर कुलकर्णी व इतरांमुळेच आम्हाला आमच्या बहिणीचे अवयवदान करता आले. खरे म्हणजे अवयवदानामुळेच पुण्यकामाचे समाधान मिळाले. इतरांनीही अवयवदानासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी पुरेशी जनजागृती आवश्यक आहे. – निशांत कासलीवाल, दात्याचा भाऊ

निःशुल्क शिक्षण-आरोग्यसेवा मिळावी
‘मटा’ने केलेल्या पाठपुराव्यामुळेच अवयवदानाला गती मिळाली आणि आज अवयवदाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. अवयवदानासाठी कुटुंबीय पुढे येत आहेत. अवयवदान करणाऱ्या व्यक्तींबद्दल सद्भावना व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य आहे; परंतु अवयवदानाबद्दल मोबादला कोणत्या स्वरुपात द्यावा, याबद्दल सर्वमान्य तोडगा निघणे जरुरी आहे. अवयवदानावर नियंत्रण करणाऱ्या ‘नोटो’ या देशातील राष्ट्रीय संघटनेने दात्यांच्या नातेवाईकांना अवयव लागणार असेल, तर त्याला पाच गुण वाढवून दिले जातात. मात्र, अवयवदानाची किंमत कोणत्याही स्वरुपात करणे शक्य नाही. एकदा त्याची किंमत पैशात ठरवली की अवयवदानाचा बाजार होणे थांबवणे शक्य नाही. समाजातील वाईट प्रव़ृत्ती त्याचा फायदा घेतील. वैद्यकीय पेशा बदनाम होत आहे. त्यात रुग्णालयांनी अवयव विकले, असे आरोप होणे शक्य आहे. त्यामुळे जिवंतपणी अवयव विकणे जितके अनैतिक आहे, तेवढेच मृत्युनंतर अवयवांची किंमत ठरवून दात्याच्या नातेवाईकांना देणे अयोग्य आहे. तरीदेखील दात्यांच्या कुटुंबियांकडे सहानुभूतीने पाहणे व त्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळेच दात्यांची पत्नी किंवा पतीला नोकरीमध्ये प्राधान्य देणे, मुलांना मोफत शिक्षण देणे, बस-रेल्वे प्रवास भाड्यात सूट देणे, वैद्यकीय सेवेमध्ये प्राधान्य व बिलामध्ये सूट देणे शक्य आहे आणि याचा ठोसपणे विचार होणे गरजेचे वाटते. – डॉ. सुधीर कुलकर्णी, झेडटीसीसी अध्यक्ष

सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे
संबंधित रुग्ण ब्रेन डेड झाल्यानंतर अवयवदानासाठी कुटुंबियांचे मन वळवणे, त्यांना अवयवदानासाठी तयार करणे, हे खरोखर कठीण काम आहे. मात्र, तरीदेखील अवयवदानासाठी हे सर्व कुटुंबिय पुढे आले आहे, हे आवर्जुन नमूद करावे लागेल. समाजातील सर्व घटकांनी अवयवदानासाठी पुढे आल्याशिवाय अवयवदान वाढणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. – मनोज गाडेकर, ट्रान्स्प्लाट कोऑर्डिनेटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक शेतीचा पुरस्कर्ता

$
0
0



makarand.kulkarni@timesgroup.com
शेतीमध्ये काहीतरी वेगळे करून दाखवयाचे या जिद्दीने कृषी पदविका पूर्ण करून बारावी विज्ञानचे शिक्षण पूर्ण केले. पारंपरिक शेतीत बदल करत ठिबकसिंचन, शेततळ्यासारखे प्रयोग राबवून शिवाजी घावटे यांनी शेतीत नंदनवन फुलवले आहे. डाळिंबापाठोपाठ द्राक्षाची बाग लावून त्यांनी परिसरात एक आदर्श घालून दिला आहे.
औरंगाबाद - जालना रस्त्यावर करमाडजवळचे सटाणा. मोसंबी उत्पादकांचे गाव म्हणून जिल्ह्यात ओळख. या गावातील शिवाजी तुकाराम घावटे यांनी गेल्या पाच वर्षांत शेतीचा कायापालट केला आहे. वडील पारंपरिक शेती करत. शिवाजी यांनी २००३ मध्ये कृषी पदविका पूर्ण केली. त्यानंतर बारावी सायन्स. बंधू साईनाथ कृषी सेवा केंद्र चालवितात. शिवाजी यांनी पूर्णवेळ शेतीकडे लक्ष देणे सुरू केले. दहा एकर शेतीत दोन विहिरी. गहू, ज्वारी, मका, तूर ही पीके घावटेंच्या शेतात घेतली जात. घावटे यांच्या वडिलांनी १९९२ मध्ये मोसंबीची बाग लावली होती, पण २०१२ च्या दुष्काळाने या गावातील मोसंबीच्या अनेक बागा उद्धवस्त झाल्या होत्या. त्यात घावटेंचीही बाग काढावी लागली. २०११ मध्ये शिवाजी यांनी डाळिंबाची लागवड केली. भगवा जातीची ७०० झाडे लावली. दुष्काळात ही झाडे टँकरने पाणी देऊन जगवली. २०१३ मध्ये पहिला बहार जोमदार आला. २०१४ मध्ये त्यांनी आणखी ४५० डाळिंबाची झाडे लावली. दोन्ही बागांमधून २०१५ जोरदार उत्पन्न मिळाले. यंदा त्यात मोठी भर पडली आहे. हे सर्व डाळिंबाच्या आंबेबहारातून मिळाले. साडेचार एकरात डाळिंबाची बाग लावली. उर्वरित क्षेत्रात पारंपरिक पीके घेणे सुरू होते. तीनवर्षांपूर्वी त्यांनी विचार केला की यापेक्षा काहीतरी आणखी वेगळे करावे. मित्रमंडळींचा एक ग्रुप करून त्यांनी सांगली, नाशिक परिसरात जाऊन द्राक्षाच्या बागा पाहिल्या. आपल्या भागातही द्राक्षलागवड केली तर फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करून शिवाजी घावटे यांनी द्राक्षलागवड केली. अडीच एकरात सोनाटा आणि माणिकचमन द्राक्षाची बाग लावली. पाण्याचे योग्य नियोजन करताना ठिबकसिंचनचा पुरेपूर वापर केला. पाणी कमी पडू नये, यासाठी दोन बोअरवेल घेतल्या होत्या. २०१२ मध्ये एक आणि २०१५ मध्ये एक असे दोन शेततळेही त्यांनी करून घेतले. परिणामी बागांसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. थेट पाणी देण्याऐवजी त्याचे मोसमानुसार नियोजन केले, तर निश्चितपणे पाणी कमी लागते. फक्त त्याचा योग्य अभ्यास असणे आवश्यक आहे, असे शिवाजी घावटे सांगतात. विशेष फेब्रुवारी ते जून या काळात पाण्याचे वेळापत्रक राखले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. डाळिंब, द्राक्षांव्यतिरिक्त तूर, ज्वारी, बाजरी ही पिके शिवाजी घेतात. एकूणच नियोजन आणि नाविन्यपूर्ण शेती करताना भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेणेही तितकेच महत्वाचे आहे. शिवाजी घावटे यांनी नियोजन करून शेतीचे फुलविलेले नंदनवन शेतकऱ्यांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांढरे सोने विकले मातीमोल

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या निर्णयाची सर्वाधिक झळ शेतकऱ्यांना बसली आहे. चलन तुटवड्याचे कारण सांगून काही व्यापारी शेतीमाल खरेदीत शेतकऱ्यांची सर्रास लूट करीत आहेत. कापूस, मका, सोयबीन विक्रीत नवीन नोटा, चेक आणि जुन्या नोटा असे वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. प्रतिक्विंटल पाचशे ते आठशे रुपये नुकसान सहन करून शेतकरी कापूस विक्री करीत आहेत. जिल्हाभरात कापूस खरेदीत अनागोंदी सुरू आहे.
‘पांढरे सोने’ अशी ओळख असलेला कापूस शेतकरी मातीमोल दराने विकत आहेत. शासकीय कापूस खरेदी केंद्राचा अभाव आणि चलन तुटवडा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत आहे. उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील आठवडी बाजारात गुरुवारी (८ डिसेंबर) कापसाचे दर कोसळले. नोटा नसल्यामुळे चेक देण्याचा पर्याय व्यापाऱ्यांनी काढला आहे. शेतकऱ्याने चेक घेतल्यास कापसाला प्रतिक्विंटल ४८०० रुपये दर आणि रोख पैसे हवे असल्यास ४२०० रुपये दर आहे. पण, पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांनी द्विधा मनस्थितीत बेभाव कापूस विकला. ग्रामीण भागात बँका आणि एटीएमची संख्या कमी आहे. सध्या बँकेत पैसे नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तातडीची गरज भागवण्यासाठी शेतकरी रोख पैसे घेऊन कमी दरात कापूस विकत आहेत. चलन तुटवड्याचे कारण सांगून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. जिल्ह्यात एक महिन्यापासून कापूस खरेदीत गैरप्रकार सुरू आहे. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मका खरेदीतही व्यापाऱ्यांनी हाच फंडा वापरला आहे. चेक घेतल्यास १४०० रुपये आणि रोख रक्कम घेतल्यास ११०० रूपये दर आहे. प्रत्येक तालुक्यात कापसाचे वेगवेगळे दर असून नोटाबंदीच्या संकटात शेतकरी भरडले आहेत. गल्ले बोरगाव (ता. खुल्ताबाद) येथील व्यापाऱ्यांनीही भाव पाडून कापूस खरेदी सुरू केली आहे. जुन्या नोटा घेतल्यास ४८०० रुपये आणि नवीन नोटा हव्या असल्यास ४००० रुपये दर आहे. या अडचणीमुळे शेतकरी बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत.

शासकीय केंद्र बंद
जिल्ह्यात ११ ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय प्रत्यक्षात आला नाही. शासकीय खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकरी नाइलाजाने व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत आहेत. जिल्ह्याचा आढावा घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. कापसाच्या पैशासाठी पंधरा दिवस वाट पहा असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

सोयगावमध्ये कापसाला चेक घेतल्यास ४८०० रुपये भाव मिळतो. तर, रोख पैसे हवे असल्यास फक्त चार हजार रुपये भाव आहे. आठशे रुपयांचा तोटा सहन करून शेतकरी कापूस विकत आहेत. हा प्रकार तातडीने थांबवून व्यवहार सुरळीत करा. - बापू मानकर, शेतकरी, सोयगाव

कोणत्याही शासकीय निर्णयाप्रमाणे नोटबंदीच्या निर्णयात शेतकरी भरडला गेला आहे. सरकार काही गोष्टी करू इच्छित असले तरी नियोजन फसले आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात ठराव घेणार आहे. - गुणवंत पाटील हंगरगेकर, अध्यक्ष, शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानदारांची साथ; ग्राहकांची पाठ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
झेरॉक्सच्या दुकानापासून ते छोट्या चहाच्या टपरीवर अनेक व्यावसायिकांनी नोटबंदीच्या तडाख्याने रोख व्यवहाराला फाटा देत ‘कॅशलेस’चा अंगीकार केला. मात्र, त्यांच्याकडे येणारा ग्राहकच या नव्या तंत्रज्ञानाशी परिचत नाही. त्यामुळे अनेक दुकानदारांनी कॅशेलस व्यवहार बंद केले आहेत. परिणामी चलन कोंडी कायम आहे.
बायजीपुरा भागात अली झेरॉक्स सेंटरवर ग्राहकांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. येथे मोबाइल रिचार्जही केले जाते. याशिवाय रहिमा मशिदीच्या बाजूला असलेल्या एका चहा दुकानादारासह, दूध डेअरीच्या मालकाने दूध विक्री ‘कॅशलेस’ सुरू केली. बायजीपूरा भागात एका खासगी कंपनीने दिलेल्या म‌ाहितीनुसार १२२ दुकानादारांनी त्यांच्या दुकानावर कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, या भागात
राहणारे नागरिक हे निम्न मध्यमवर्गीय आहेत. यातील अनेक दुकानदारांकडे येणारे ग्राहकही रोखीत व्यवहार करणारे. यामुळे आठवड्यातून एक किंवा दोनच ग्राहक कॅशलेस सुविधेचा उपयोग करत होते. या सुविधाचा उपयोग ग्राहकांकडूनच कमी प्रमाणात होत असल्याने अनेक दुकानादारांनी ‘कॅशलेस’ व्यवहार बंद केले. त्यामुळे या सुविधेचा दुकानदारांना म्हणावा तसा उपयोग झालाच नाही.

काय आहे अडचण?
बायजीपुरा भागात राहणारे अनेक जण निम्न मध्यमवर्गीय आहेत. यातील अनेकांचे बॅँकेत खाते नाही. ज्या नागरिकांचे बँकेत खाते आहे, त्यांचे व्यवहार ऑनलाइन नाहीत. नेटबँकिग नसल्याने या सुविधेचा उपयोग करणारेही कमीच आहेत. यामुळे या भागात ‘कॅशलेस’चा व्यवहार कमी आहे.

आम्ही कॅशलेस व्यवहार सुरू केला होता. मात्र, आठवड्यातून दोन किंवा तीन ग्राहक येत होते. यामुळे ही सुविधा बंद करण्याशिवाय माझ्याकडे अन्य पर्याय नव्हता. - हसन बसरावी, झेरॉकस सेंटर

पंधरा दिवसांपूर्वी ‘कॅशलेस’ व्यवहार सुरू केला. मात्र, आतापर्यंत कोणीही कॅशलेसबाबत विचारणा केली नाही. या सुविधेचा वापर या भागात अत्यंत कमी आहे. - सैय्यद कलीम, चहा दुकानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६ हजार स्वाइप मशीनची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चलन टंचाईने कंबरडे मोडलेल्या व्यापाऱ्यांनी व्यवहारात एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला असून तब्बल ६ हजार स्वाइप मशीनची मागणी बॅँकांकडे केली आहे. येत्या काही दिवसांत या मशीन बसविण्यात येतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. चलन तुटवड्यावरचा रामबाण उपाय म्हणून व्यापारी स्वाइप मशीनकडे वळले आहेत.
गेल्या आठवड्यापासून कार्ड पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. आधीच बँकांच्या रांगेत उभे राहून कंटाळलेल्या ग्राहकांनी आता ‘कॅशलेस पेमेंट’चा मध्यममार्ग स्वीकारला असून ग्राहकांच्या तुलनेत व्यावसायिकांकडे ही सुविधा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे चलनाचा तुटवडा आणि ग्राहकांचा ‘कार्ड पेमेंट’कडे वाढता कल लक्ष्यात घेता किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनीही कार्ड पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

विचारणा वाढली
व्यापाऱ्यांनी सध्या एसबीआय तसेच स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेकडे पीओएस मशीनची मागणी केली आहे. आठवडाभरापासून ही मागणी वाढली आहे. यात आगामी काळात आणखी वाढ होणार आहे. एसबीआयमध्ये गेल्या आठवडाभरात शहरातून २९० मशीनची मागणी करण्यात आली, असे व्यवस्थापकांनी सांगितले. ज्यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी मात्र ही सुविधा म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी प्रतिक्रिया दिली. कार्ड असतानाही त्याचा वापर न करता रोख व्यवहार केले जात होते. मात्र, नोटबंदीनंतर कार्डधारकांनी पुन्हा कॅशलेस पेमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

एक करार
स्वाइप अर्थात पॉइंट टू सेल्स (पीओएस) च्यामागणीसाठी व्यापाऱ्याचे संबंधित बँकेत करंट अकाउंट असणे गरजेचे आहे. मशीनची मागणी नोंदवण्यासाठी बँकेकडून एक अर्ज भरून द्यावा लागतो. यामध्ये ६०० रुपये भरून एक करार करावा लागतो. शाखेकडून मुख्य कार्यालयाकडे अर्ज सादर केला जातो आणि आठ दिवसांनंतर मशीन मिळते.

हळुहळु स्वाईप मशीनचा वापर वाढणार आहे. यात काही शंका नाही. सध्या व्यापारी व ग्राहक यांच्याकडून ही मागणी वाढली आहे. - अजय शहा, अध्यक्ष व्यापारी महासंघ

मी आयुर्वेद औषधां‍चे दुकान चालवतो. मीही अर्ज केला असून पुढील १५-२० दिवसांत स्वाइप मशीन बसवली जाईल असे मला बँकेकडून सांगण्यात आले आहे. - गणेश दौड, महालक्ष्मी आयुर्वेद, चेतनानगर

मी एचडीएफसी आणि आयसीआयसीयकडे स्वाईप मशीनबद्दल अर्ज केला आहे. लवकरच मशीन उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे. - संदीप पाटील, संदीप प्रोव्हीजन, ईटखेडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०० गावे ३१ डिसेंबरपर्यंत कॅशलेस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीला एक महिना पूर्ण झाला. सर्वसामान्य नागरिकांना कॅशलेस व्यवहार करता यावा यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनानेही एक पाऊल पुढे टाकले असून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०० गावे कॅशलेस करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या कॉन्फरन्सिंगसाठी जिल्हाप्रशासनासोबतच जिल्हा परिषद, महापालिका, बँकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय म्हणाल्या, ‘जिल्ह्यातील शंभर गावे कॅशलेस करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील व्यवहार कॅशलेस करण्याचा प्रयत्न राहणार असून त्यानंतर खासगी क्षेत्रातील व्यवहाराकडे लक्ष देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यात बँकांचे किती जाळे पसरले आहे, कर्मचारीसंख्या किती आहे, इलेक्ट्रॉनिक व कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आणखी काय करण्याची गरज आहे या संदर्भात लवकरच तयारी करण्यात येणार आहे. स्मार्टफोन हाच केवळ कॅशलेस होण्याचा पर्याय नसून इतरही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या सर्व पर्यायांचा येत्या काळामध्ये प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. यामुळे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०० गावे कॅशलेस होतील, असा विश्वास डॉ. निधी पांडेय यांनी बोलून दाखवला.

प्रशिक्षणाचे आयोजन
नोटबंदीच्या निर्णयानंतर रोख व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागरिकांनी ‘कॅशलेस’ व्यवहार करावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यापद्धतीच्या व्यवहारासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, अशा शासनाच्या सूचना होत्या. यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार, उपजिल्हाधि‌कारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना बँकेतर्फे ‘कॅशलेस’ व्यवहाराचे प्रशिक्षण नुकतेच दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेसबुक कविसंमेलन आज रंगणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रेमावर ‘महाराष्ट्र टाइम्सची’ औरंगाबाद आवृत्ती ९ डिसेंबर रोजी, शुक्रवारी पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या आनंद सोहळ्याचे औचित्य ध्यानात घेत शुक्रवारी ‘मटा’ तर्फे फेसबुक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत रसिकांना राज्यभरातील मान्यवर कवींच्या कवितांचे रसग्रहण करता येईल. सोबतच आपल्या स्वरचित कविता ‘मटा कविसंमेलन’ या फेसबुक पेजवर अपलोड करता येतील. नवोदितांच्या दर्जेदार कवितेसाठी खास पारितोषिक ठेवण्यात आले आहे. मान्यवर साहित्यिक स्पर्धेचे परीक्षण करणार असून, पाच कवींची निवड केली जाईल. विजेत्यांना राजहंस प्रकाशनतर्फे पुस्तके भेट दिली जाणार आहेत, असे श्याम देशपांडे यांनी कळविले आहे. चला तर मग करा ही लिंक क्लिक https://www.facebook.com/मटा कविसंमेलन-217802095326586/ आणि व्हा सहभागी या अनोख्या काव्यसोहळ्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजवीरांचा आज ‘मटा’मध्ये गौरव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विविध सामाजिक उपक्रमातून समाजातील गोर‌गरिबांना आधार देणाऱ्या शहरातील विविध संस्थेच्या प्रतिनिधींचा गौरव शुक्रवारी दुपारी १२ वाजता ‘मटा’ कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ औरंगाबाद आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपचारासाठी आलेले अनेक गोरगरीब घाटीत थांबलेले असतात. त्यांना जमील बेग मशिदीच्या माध्यमातून अन्नदान करतात. लालूभाई व त्यांच्या ग्रुप सदस्यांनीही
शहरात अन्नदानाची मोठी मोहीम सुरू केली आहे. रोटी आणि कपडा बँक ही वेगळी संकल्पना राबवून गरीब आणि गरजूंना युसूफ मुकाती मदत करतात. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या उक्तीप्रमाणे समाजात अन्नाबाबत जनजागृती करण्याचे काम अनंत मोताळे काका यांच्याकडून अवरित सुरू आहे. व्यसन मुक्तीचे धडे देणारे संजय झट्टू आणि पोलिस खात्यातील बाळासाहेब राठोड, शहरात स्वच्छतेबाबत विशेष उपक्रम राबविणाऱ्या नताशा झरीन या समाजवीरांचा उद्या ‘मटा’ कार्यालयात गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुडबाय’संदेश देऊन तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
परतूर येथे मावशीला भेटण्यासाठी गेलेल्या १९ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी चार वाजता कायगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात सापडला. गणेश संतोष जोशी (वय १९, रा. नाथनगर, रांजणगाव शेणपुंजी), असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने मानलेल्या मामाला आत्महत्या करत असल्याचा फोन केला होता, तर व्हॉटस्‍ाअॅप ग्रुपवर ‘गुडबाय’ असे स्टेट्स् टाकले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश जोशी हा सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला परतूर येथे मावशीला भेटून येतो, असे आई-वडीलांना सांगून घराबाहेर पडला होता. तो परतूर येथे पोचला की नाही याची माहिती घेतली असता तो तेथे गेला नसल्याचे नातेवाइकांना समजले होते. नातेवाइकांना त्याचा मोबाइल बंद आढळला होता. दरम्यान, गणेश जोशी याने मानलेल्या मामाला फोन करून मी जीवनाला कंटालो असून आत्महत्या करत असल्याचे सांगून मोबाइल बंद केला होता. तर व्हॉटस्‍ाअॅप ग्रुपवर ‘गुड बाय’ असे स्टेट्स् टाकले होते. त्यामुळे भयभीत झालेल्या नातेवाईकांनी तत्काळ कायगाव येथील नदीवर जाऊन तपासणी केली, पण त्यांना तेथे सुगावा न लागल्याने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी कायगाव टोका येथील गोदावरी नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांना आढळून आले. त्यांनी ही माहिती गंगापूर पोलिसांना दिली. गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन बोराटे, हेडकॉन्टेबल के. एस. मंचारे, डी. के. थोरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन त्यासा गंगापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. हा बेपत्ता तरूण गणेश जोशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला हुडहुडी

$
0
0

औरंगाबाद : ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा,’ असे म्हणायची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. डिसेंबर महिन्यात सातत्याने तापमानात घसरण होत असून, ९ डिसेंबर हा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला. शुक्रवारी शहराचे तापमान १०.८ अंश सेल्सियसपर्यंत घसरले.
गेल्या दोन दिवसांपासून अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्यामुळे शहराला हुडहुडी भरली आहे. शहरात यापूर्वी ६ डिसेंबर रोजी मोसमातील सर्वात कमी १२ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले होत. थंडीचा हा कडाका या महिन्यात कायम राहणार असून, येत्या आठवड्यात तापमान १० अंश सेल्सियसपेक्षाही कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात झाली. यंदा पाऊस जास्त झाल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. दिवसा ऊन आणि सूर्य मावळल्यानंतर थंडी वाढत असल्याची स्थिती शहरामध्ये आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान १०.८ अंश सेल्सियसपर्यंत घसरले. कमाल तापमान ३० अंश सेल्सियस होते. थंडीमुळे दिवसभर स्वेटर घालून फिरणाऱ्यांची संख्याही अधिक होती. अनेकांनी रात्री चौकाचौकांत शेकोटीचा आनंद घेतला.

येत्या आठवड्यातील किमान तापमान
१० डिसेंबर : ९.०
११ डिसेंबर : १०.०
१२ डिसेंबर : ११.०
१३ डिसेंबर : १२.०
१४ डिसेंबर : १२.०
१५ डिसेंबर : १२.०
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये, स्त्रोत ः भारतीय हवामानशास्त्र विभाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदी व कुटुंबीयांची हर्सूलमध्ये गळाभेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बंदिवानाचे आयुष्य कंठत असताना ‌कुटुंबापासून, मुलांपासून ताटातूट होते. एकटेपणाची खायला उठतो. पण, हर्सूल कारागृहातील कैद्यांसाठी शुक्रवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. ‘गळाभेट’ कार्यक्रमांतर्गत ७० कैद्यांनी मुलांची भेट घेतली. त्यांना मायेने जवळ घेताना बाप व लेकरांच्या डोळयातून अश्रूचे बांध फुटले.
राज्यशासनाने गेल्या महिन्यात अध्यादेश काढून दर सहा महिन्यांनी कैदी व मुलांची भेट घडवून आणावे, असा आदेश दिला आहे. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या अध्यक्षतेखाली हा ‘गळाभेट’ उपक्रम शुक्रवारी हर्सूल कारागृहात राबवण्यात आला. या उपक्रमात ७० बंदिवानांची त्यांच्या कुटुंबासोबत भेट घडवून देण्यात आली. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

ओठांवर हसू डोळ्यात अश्रू
आपल्या हातून झालेल्या गुन्ह्याची शिक्षा कुटुंबाला देखील भोगावी लागते. कुटुंबापासून दूर कारागृहात राहताना एकटेपणा खायला उठतो. हीच परिस्थिती घरी पत्नी, आई, मुलांची असते. या उपक्रमात तीन ते नऊ वर्षांपासून दूर असलेल्या चिमुकल्यांची कैद्यांनी भेट घेतली. जन्मदात्यांना पाहताना मुलांचे भान हरवले होते. त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर बाप-लेकरांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. कोणाला पत्नी, तर कोणाला आई हाताने घास भरवत होती. एका मुलीने तिने स्वतः काढलेले चित्र वडिलांना दाखवण्यासाठी आणले होते. आपल्या मुलांना खाऊ घालताना बंदिवानासोबतच मुलांना देखील समाधान वाटत होते.

माणुसकीचे दर्शन
कारागृहातील एका कैद्यांच्या मुलांचा वाढदिवस शुक्रवारी व दुसऱ्याच्या मुलीचा वाढदिवस शनिवारी होता. तो आज साजरा करता येईल का, अशी विचारणा कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी केवळ होकार दिलाच पण, दोन केक देखील मागवले. यावेळी केक कापताना चिमुकल्यांना हुंदके आवरता आले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images