Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रोकड आली तरी नोटाकुटी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात गुरुवारी आलेली रोकड काही बँकांना वाटप करण्यात आली असली तरी नागरिकांची ‘नोटाकुटी’ संपलेली नाही. बँका व एटीएमसमोर शुक्रवारी रांगा कायम होत्या. बँकांमध्येही सातत्याने नोटा व धनादेश वटण्याविषयी विचारणा करण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी सुमारे २०० कोटीपेक्षा जास्त रक्कम आल्याचे बोलले जात होते. ही रक्कम संबंधित बँकांना गुरुवारीच वितरण करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. यापुढील तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम एटीएमवर जाणवणार आहे. सलग सुट्या आल्याने शुक्रवारी दिवसभर बँकांमध्ये गर्दी होती. मिळालेली रोकड बहुतांश ठिकाणी संपल्याचे बँक अधिकारी आणि रोकपालांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद या तीन बँकांच्या चलन भांडारातून विविध शाखा व एटीएमला रोकड वितरण करण्यात आली. शहरात या तीन बँकांच्या १८० शाखा आहेत. रोकड पुरवल्यानुसार वितरणही होत असल्याचे स्टेट बँक ऑफ हैदराबादचे रवी धामणगावकर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

एसबीएचमध्ये माझे खाते आहे. एटीएमवर फक्त २ हजार रुपयांची एकच नोट मिळत आहे. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्न येतो. सुटे पैसे कोठून आणायचे ही समस्या आहे.
- अब्दुल अजीज, लक्ष्मणचावडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅशलेसकडे जाताना औरंगाबादकर खुश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वत्र कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहत असताना औरंगाबादकर सुद्धा त्यात मागे नाहीत. रिक्षाचालक, भाजीविक्रेत, हातगाडीवर कपडे विकणारे यापासून किराणा दुकानदार आणि डॉक्टरांपर्यंत विविध ठिकाणी कॅशलेस सुविधेसाठी विविध कंपन्यांचे अॅप्स डाउनलोड करून घेण्यात आले आहेत.
शहरात लहान-मोठ्या सुमारे २००पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी पेटीएम डाउनलोड करून घेतले आहे. याशिवाय फ्रीचार्ज, वॉलेट, ई-वॉलेट, खासगी व राष्ट्रीयकृत बँकां‍चे ई-वॉलेट, इ-बडी सेवांचा नागरिक स्वीकार करत आहेत. दुकानदार व ग्राहक दोघांकडे या वॉलेट डाऊनलोडिंगची संख्या वाढली आहे. यामुळे खरेदी-विक्री सहजरित्या होत आहे. ई-वॉलेट वापरताना इंटरनेट, डेटा कनेक्शन, स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे.

मी पेटीएम डाउनलोड केले आहे. एटीएमवरील रांग, बँकेतील गर्दी यामुळे अनेकांकडे सुटे पैसे नाहीत. त्यांच्याकडून विचारणा होत असल्याने पेटीएम डाउनलोड केले. या पद्धतीने व्यवहारास सुशिक्षित नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- महंमद हारूण, रिक्षाचालक

अनेक जण माझ्याकडे येतात. रूग्णांची फी देताना जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा आधी द्यायचे, पण नंतर काही जण धनादेश व स्वाइप मशीनबद्दल विचारू लागल्याने मी पेटीएम डाउनलोड करून घेतले आहे. त्याव्दारे व्यवहार होत असल्याने माझीही सोय झाली आहे.
वैद्य अतुल मुरूगकर, चेतनानगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बँकांचे इतर व्यवहार सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटा बदलणे, पैसे काढणे, धनादेश स्वीकारणे यासारख्या दैनंदिन कामांचे खासगी बॅँकांनी योग्य नियोजन केल्याचे शुक्रवारी दिसून आले. याशिवाय त्यांच्या एटीएमवरसुद्धा नियोजन होत होते. एचडीएफसी, आयडीबीआय, आयसीआयसीआय या खासगी बॅँकांच्या एटीएमवर सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांचा भरणा झाल्याचा दावा, या बँक अधिकाऱ्यांनी केला.
निरालाबाजार, आकाशवाणी, काल्डा कॉर्नर, सावरकर चौक, दशमेशनगर, नूतन कॉलनी, पैठणगेट, सिडको एन-३, ४, ५ आणि ७ सह बसस्टँड, समर्थनगर आणि हडको पसिरातील खासगी बँकांचे एटीएम बहुतांश ठिकाणी सुरू होते. ज्या खासगी बँकांनी शहरवासियांना दिलासा दिला त्यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँकेचा समोवश आहे. या सर्व बँकांचे एटीएम दुपारी २ ते ३ पर्यंत सुरू होते. खातेदारांसह अनेकांनी या एटीएम सेंटरवर जाऊन पैशांची निकड भागवली. अनेक खातेदारांनी या बँकांमध्ये अगदी थोडा वेळ रांगेत उभे राहावे लागले, असे सांगितले. या सर्व बँकांच्या एटीएम सेंटरवर पैसा उपलब्ध होता. ऑनलाइन आणि ऑफलाइन एटीएम सेंटर असूनही नागरिकांना यात दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातोश्रीच्या दारी उद्या नगरसेवकांची वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तींच्या घोषणेवरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. नाराजीची भावना पक्षप्रमुखांच्या कानी घालून पक्ष संघटनेतील अर्थकारणाला वाचा फोडण्याची तयारी काही नगरसेवकांनी केली आहे. त्यासाठी १५ ते १८ नगरसेवक शनिवारी मुंबईकडे जाण्याच्या तयारीत आहेत.
महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. युतीत झालेल्या करारानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे आले आहे. शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांची उपमहापौरपदासाठी पक्षाने निवड केल्याचे जाहीर केले. त्याच बरोबर सभागृहनेतेपदी गजानन मनगटे, गटनेतेपदासाठी मकरंद कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. शिवसेनेतर्फे तिन्ही पदांवर नवख्यांना संधी देण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना आहे. ‘अर्थपूर्ण’ चर्चेनंतर या पदांवर वर्णी लावण्यात आल्याची चर्चा सर्व नगरसेवक करत आहेत. उपमहापौरपद, सभागृहनेता व गटनेत्याचे नाव जाहीर करण्यासाठी घोसाळकर मुंबईहून गाडीने औरंगाबादला आले; त्यांनी विमानाची त्यांनी वाट पाहिली नाही, असे शिवसेनेच्या गोटात बोलले जात आहे. इतक्या तातडीने औरंगाबादेत येऊन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यामागचे नेमके कारण काय आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यासाठी शिवसेनेचे १५ ते १८ नगरसेवक गट शनिवारी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते रविवारी ठाकरे यांना भेटून अर्थपूर्ण घडामोडींची माहिती देणार आहेत. पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना डावलून अपक्षाला उमेदवारी देण्याची घटना योग्य नाही, सभागृहनेता व गटनेतेपदावर नवख्यांना संधी दिल्यामुळे त्यांच्या आदेशाने काम कसे करायचे असा प्रश्नही शिवसेनेच्या एकूणच नगरसेवकांसमोर निर्माण झाला आहे. या प्रश्नाला हे सर्व नगरसेवक ठाकरेंसमोर वाचा फोडणार आहेत. शिवसेनेत जाहीर झालेला निर्णय रद्द होत नाही याची जाणीव बंडाच्या पवित्र्यात असलेल्या नगरसेवकांना आहे. निर्णय रद्द होणार नसला तरी निर्णय घेताना घडलेल्या घटना पक्षप्रमुखांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न हे नगरसेवक करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन गट स्थापन करण्याच्या हालचाली
नगरसेवकपदाची पहिलीच वेळ असलेल्याला संपर्कनेत्यांनी पालिकेतील गटनेता केल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी १५ ते १८ नगरसेवकांनी नवीन गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका निवडणूक झाल्यावर विविध पक्षाच्या नगरसेवकांचा गट स्थापन करून विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जाते. नोंदवलेला गटनेता पाच वर्षांसाठी असतो, त्यात बदल करण्याची तरतूद नाही. तरीही शिवसेनेच्या संपर्कनेत्यांनी गटनेताच बदलला आहे. या निर्णयाला शह देण्यासाठी नवीन गट स्थापन करून त्याची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर; उपमहापौर निवडणूक; २२ अर्ज वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौर, उपमहापौरपद उमेदवारी अर्ज वितरित करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी महापौरपदासाठी १२ व उपमहापौरपदासाठी १० उमेदवारी अर्जांचे वितरण झाले. उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन कैसर खान यांनी २ उमेदवारी अर्ज नेले. भाजप पुरस्कृत अपक्ष आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांनी ४ उमेदवारी अर्ज ताब्यात घेतले. अपक्ष नगरसेविका किर्ती शिंदे यांनी २, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी २, काँग्रेसचे नगरसेवक अय्युब खान यांनी २ अर्ज सचिव कार्यालयातून नेले. उपमहापौरपदासाठी परवीन कैसरखान यांनी २, शिवसेनेच्या उमेदवार अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांनी २, अपक्ष नगरसेविका किर्ती शिंदे यांनी २, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी २ तर काँग्रेसचे अय्युब खान यांनी २ अर्ज ताब्यात घेतले. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शनिवार हा शेवटचा दिवस असून सायंकाळी पावणेसहापर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५ वाळूपट्ट्यांच्या लिलावास मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा पर्यावरण समितीच्या मंजुरीनंतर अखेर जिल्ह्यातील ४५ वाळूपट्ट्याच्या लिलावाला मुहूर्त लागला आहे. येत्या २९ डिसेंबरपर्यंत वाळूपट्ट्याच्या ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ४३ आणि संयुक्त २ अशा ४५ वाळूपट्ट्याचे लिलाव तीन महिन्यांपासून रखडले होते. अखेर जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत त्यांना मंजुरी मिळाली. यानंतर गौणखणिज विभागाकडून ऑनलाइन लिलावाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांची किंमत २० कोटी, तर संयुक्त वाळूपट्ट्यांची किंमत १३ कोटी ७४ लाख रुपये आहे. लिलाव करण्यात येणारे वाळूपट्टे पुढीलप्रमाणेः कन्नड तालुका- बोरसर खूर्द, बोरसर बुद्रुक, शेवता, कानडगाव, खापरखेडा, नादरपूर, जवखेडा खूर्द, अमदाबाद. पैठण तालुका- पाटेगाव, नायगाव, वडवाळी, वाघाडी, मायगाव व नवगाव. फुलंब्री तालुका- शेवता खूर्द, पिंपळगाव वेलान, वडोद खूर्द, कविटखेडा, भालगाव, शेलगाव, वेनेगाव खूर्द व बुद्रूक. गंगापूर तालुका- शिरसगाव, दिनवाडा, मालुंजा खूर्द, भालगाव. वैजापूर तालुका- लासूरगाव, मनूर, लखानी, झोलेगाव, पूरनगाव, वांजरगाव, डेगपिंपळगाव, बाभूळगाव गंगा. सिल्लोड तालुका- धानोरा, भवन, दीडगाव, कोटनांद्रा, सावखेडा खूर्द व बुद्रूक, बोरगाव बाजार, मोढा खुर्द, केऱ्हाळा व आन्वी. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील हिरडपूरी आणि सुरळेगाव, टाकळी अंबड आणि गुळज या दोन संयुक्त वाळूपट्ट्यांचा लिलाव होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडाळा हाणामारी; ३७ जणांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
खंडाळा येथे गुरुवारी दोन गटात रिक्षात प्रवासी बसवण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
खंडाळा येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रिक्षात प्रवासी बसवण्याच्या कारणावरून दोन समाजात झालेली तुफान हाणामारी व दगडफेकीच्या घटनेत महिलांसह १३ जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी शेख जमीर शेख कडू यांनी फिर्याद दिल्यानंतर मंगेश जगताप, आकाश गिरिजानाथ बागुल, बाबासाहेब बागुल, सुधीर शामराव बागुल, मिलिंद बागुल, पोपट बागुल, सतीश त्रिभुवन, उमेश जगताप, भिवसेन शिवाजी बागुल, विक्रम बागुल, रणजीत शिंदे, राहुल बागुल, राजु भीमराव बागुल, राजु भगवान बागुल, अमोल बागुल, विशाल बागुल व कैलास प्रकाश बागुल यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजू बागुल यांच्या फिर्यादीवरून कामरान जमीर शेख, अल्ताफ हबीब शेख, इरफान रज्जाक शेख, मुश्ताक पठाण, तारेक शेख, मोबीन शेख, बाबा रिक्षावाला, राजू फिटर, अजहर शेख, माजीद अजगर शेख, सलीम शहा, वसीम अब्बास शेख, बाबा मुश्ताक शेख, जमील शहा, सोनू शेख, शेख मज्जू शेख अकील, अमजद मोईनोद्दिन शेख व सिराज कुरेशी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी हर्ष पोद्दार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआय वयोमर्यादा; विधीमंडळात प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा वयोमर्यादेचा प्रश्न शुक्रवारी विधीमंडळात गाजला. विरोधीपक्ष नेते व आमदारांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित करत या विषयावर चर्चा घडवून आणली. चर्चेनंतर सरकारने वयोमर्यादेत वाढ करण्याच्या सूचना आयोगाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. ही ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उजेडात आणली आहे.
सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय शासनाने एप्रिलमध्ये घेतला, परंतु नुकत्याच आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपद पूर्व परीक्षेसाठी जुनी वयोमर्यादा ठेवण्यात आली. त्यामुळे राज्यशासनाचा निर्णय आयोगाला लागू होत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत वयोमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. हा प्रश्न शुक्रवारी विधीमंडळात गाजला. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित यांनी हा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील, विद्यार्थी पाच-पाच वर्षापासून परीक्षांची पूर्व तयारी करतात. आधीच नोकरभरती बंद असल्याने बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. आयोगाच्या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हे लक्षात घेत शासनाने तत्काळ वयोमर्यादेत वाढ करण्याचे पाऊल उचलावे, अशी मागणी केली. आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत निवेदन दिले.

सकारात्मक आश्वासन
विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, चांगला निर्णय घेऊ, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात उत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. चर्चेनंतर सरकारने आयोगाला वयोमर्यादेत बदल करण्याच्या सूचना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२९ घरांतील घुसखोर सिडकोने हाकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रक्कम न भरता सिडकोच्या शिवाजीनगर (११वी योजना) येथील २९ घरांत ११ वर्षांपासून कब्जा केलेल्या २९ घुसखोरांवर सिडकोने शुक्रवारी कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात ही घरे रिकामी करून सिडकोने ताबा घेतला. या कुटुंबांनी ११ वर्षांपासून घरांचा बेकायदा ताबा घेतला होता.
सिडकोने शहरातील १२६२. ५० हेक्टर क्षेत्रात १४ गृहनिर्माण योजनाव्दारे २१,०९० घरे बांधली आहेत. त्यापैकी शिवाजीनगर येथील ११व्या योजनेत अनेक घरे बांधण्यात आली. या घरांच्या सोडतीनंतर एन १४ येथील ई, डी सेक्टर मधील सुमारे २९ घरे खरेदीची प्रक्रिया संबंधितांनी निर्धारित वेळेत पूर्ण केली नाही. हा वाद काही महिने चालल्याने ही घरे विक्रीविना पडून होती. एकीकडे हा गोंधळ सुरू असतानाच २००५-०६ या वर्षी खरेदी व्यवहार न करताच २९ घरांवर कब्जा करण्यात आला. तेव्हापासून ही॓ मंडळी घरांमध्ये राहत होते. सिडकोने त्यांना २००५-०६मध्ये बाजारभावानुसार रक्कम भरण्याचे निर्देश दिले. वारंवार संधी देऊनही ते रक्कम न भरता येथे राहत होते. त्यापैकी काही जणांनी कोर्टात धावही घेतली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. २००६मध्ये हायकोर्टाने सिडकोला कोणतीही मालमत्ता निविदा न काढता विकता येणार नाही, असे निर्देश दिले.
मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने प्रशासक विद्या मुंडे, पंजाबराव चव्हाण, जी. आर. साटोटे, पी. एस. चवरे, अतिक्रमण विरोधी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही घरे ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारापासून कारवाई सुरू केली. यावेळी काही जणांती विरोध केल्याने तणावाचे वातावरण होते. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली; घर सोडल्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात येताच काही लोकांनी स्वतःहून घरातील साहित्य काढण्यास सुरुवात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही घरासमोर झालेले अनाधिकृत बांधकामे सिडकोने पाडली. ही कारवाई संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

आता पैसे घ्या !
दरम्यान, संसार उघड्यावर पडल्यानंतर या नागरिकांना आता पैसे भरण्याचे सूचले आहे. आम्ही कोठे राहणार, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. पैसे घ्या पण, घरे द्या, अशी मागणी लावून धरली. याप्रकरणी कोर्टात दाद मागू, असे काही नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक, अधिकाऱ्यांनी वर्धापनदिनाकडे पाठ

$
0
0

औरंगाबादः महापौर, उपमहापौरांनी दिलेला राजीनामा, अधिवेशनात विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आयुक्त नागपूरला गेलेले या वातावरणात महापालिकेचा ३४ वा वर्धापनदिन यंदा निरुत्साहातच साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्पर्धांकडे नगरसेवक, अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
दरवर्षी वर्धापनदिनाची तयारी आठ ते दहा दिवसांपासून केली जाते. यंदा मात्र अशी कोणतीच तयारी नव्हती. पालिकेच्या प्रशासनाने दोन दिवस अगोदर प्रेसनोट काढून तीन स्पर्धा आणि एक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारी आरोग्य तपासणी शिबिर झाले. शुक्रवारी क्रिकेट स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, नगरसेवक नंदकुमार घोडेले, कैलास गायकवाड, किर्ती शिंदे यांच्यासह उपायुक्त अय्युब खान, रवींद्र निकम सहभागी झाले. अन्य नगरसेवक व अधिकारी आलेच नाहीत. संगीत खुर्ची व रागोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी नगरसेविकांची संख्या कमीच होती. विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज या दोघी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनंत अमुची ध्येयासक्ती...

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ध्येयवेड्या माणसांसाठी यशोशिखर गाठणे कठीण नसते. ध्येय निश्चित असल्यामुळे वाटचाल वेगात सुरू असते. अथक परिश्रमाच्या बळावर यशस्वी व्यक्ती समाजासमोर आदर्श निर्माण करतात. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, आदर्श शिक्षिका सरला कामे, एव्हरेस्टवीर शेख रफिक व अपंगांसाठी आयुष्य पणाला लावणारे शिवाजी गाडे यांचा प्रवास असाच ध्येयवादी आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त एका जिद्दीचा प्रवास उलगडला.
वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी ‘मटा’ कार्यालयात सत्कार करण्यात आला. साहित्य, क्रीडा, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले बाबा भांड, रफिक शेख, शिवाजी गाडे आणि सरला कामे यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. या प्रवासाची वर्षभरातील वाटचाल मान्यवरांनी सांगितली. दर्जेदार साहित्यकृतींचे लेखक व प्रकाशक अशी बाबा भांड यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणारे भांड आता राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. मराठी साहित्य संस्कृतीला दिशा देण्याचे आणि नवीन प्रकल्प अंमलात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय सयाजीराव गायकवाड संशोधन केंद्राचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या सयाजीरावांच्या कार्याचा आढावा घेणारे महत्त्वाचे खंड प्रकाशित करण्याचे भांड यांचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या सरला कामे यावर्षी राज्य सरकारच्या ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या. शाळा गळतीचे प्रमाण रोखणे, मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे अशा कामात त्या अग्रेसर आहेत. तिसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारा रफिक शेख तरुणांचा आयडॉल ठरला आहे. आर्थिक आणि मानसिक संघर्षाचा सामना करीत रफिक एव्हरेस्टवीर झाला. पोलिस दलात कार्यरत रफिकचे उत्तुंग यश अनेकांसाठी प्रेरक ठरले आहे. गड-किल्ले चढण्याची आवड असूनही केवळ अपंग असल्यामुळे सहलीत प्रवेश मिळत नसल्याची खंत शिवाजी गाडे यांच्या मनात होती. पोलिओग्रस्त गाडे जिद्दीने ९७ किल्ले चढले. विशेष म्हणजे हा आनंद इतर अपंग बांधवांना मिळवून देण्यासाठी त्यांनी मोहिमा आखल्या आहेत. दरवर्षी ३१ डिसेंबरला कळसूबाई शिखर चढण्याचा विक्रम त्यांनी केला. अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गाडे काम करीत आहेत. यावर्षी तीन पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या गाडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या क्षेत्रात सतत कार्यरत राहिल्यास यश मिळतेच याचा आदर्श वस्तुपाठ मान्यवरांनी घातला. प्रतिकूल परिस्थितीत अंगी चिकाटी असल्यास यश कठीण नसल्याचा संदेश त्यांनी दिला.

६७ नवीन प्रकल्प सुरू
राज्य साहित्य संस्कृतीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली नाही. सहा महिन्यानंतर माझे काम बोलेल असे प्रांजळपणे सांगितले. सहा महिन्यात मंडळाचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने भरीव काम केले. मंडळाने ६७ नवीन प्रकल्प सुरू केले असून २२ मोठे प्रकल्प आहेत. साहित्य संस्कृती मंडळाच्या ५५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढे काम हाती घेण्यात आले. साहित्य, कला, संस्कृती यांचा समग्र आढावा घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ५०० पानी पहिले चरित्र, संत तुकारामांचे पहिले चरित्र लिहिणारे कृष्णराव केळुस्कर महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिले. लोकमान्य टिळक यांच्यापूर्वी गीतेवर केळुस्कर यांनी साडेअकराशे पानांचा ग्रंथ लिहिला. या ‘साहित्य महर्षी’ची महाराष्ट्राला पुन्हा ओळख करून देण्यासाठी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक शिल्पकारांवर मंडळाने पुस्तके प्रकाशित केली. मात्र, जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे काम झाले नाही. या कामाला प्राधान्य दिले आहे. नवलेखक पुस्तक योजना प्रभावीपणे राबवणे, विविध साहित्य संस्थांना अनुदान देणे अशी बरीच कामे आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र साहित्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. औरंगाबाद शहरात साहित्य निर्मितीचे केंद्र असून मार्चपर्यंत मोठे खंड प्रकाशित करणार आहोत. वैयक्तिक लेखन, मंडळाचे काम आणि सयाजीराव समग्र साहित्य निर्मिती प्रकल्प असे व्यापक काम सुरू आहे. - बाबा भांड, अध्यक्ष, राज्य साहित्य संस्कृती मंडळ

बाहुल्यांनी रोखली विद्यार्थी गळती
मागील २० वर्षांच्या कामाची पावती म्हणून मला यावर्षी राज्य शासनाचा ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार’ मिळाला. पारंपरिक शिक्षण पद्धती मुलांसाठी कठीण असल्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे नवीन कामाची मुहूर्तमेढ २००९ मध्ये रोवली. कविता किंवा धडा शिकवताना बोलक्या बाहुल्यांचा खुबीने वापर करते. दररोज दुपारी मुलांना सामान्यज्ञान आणि क्रमिक शिक्षण देण्यासाठी बाहुल्यांचा खूप उपयोग झाला. मुलांशी एकरूप होण्यासाठी फायदा झाला. शेती किंवा इतर कामासाठी खेड्यात मुले दुपारनंतर शाळेत नसतात. शाळा गळती रोखण्यात बोलक्या बाहुल्यांमुळे यश आले. बाहुल्यांद्वारे शिकण्याची मुलांमध्ये आवड निर्माण झाली. शिक्षकांचा मुलांवर प्रभाव पडतो याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे नेहमी विद्यार्थ्यांच्या कलाने शिकवते. याशिवाय स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्यासाठी जनजागृती करीत आहे. आतापर्यंत ५०० पोस्टर तयार करून वाटले आहेत. संदेश प्रभावीपणे पोहचवण्यासाठी सेलिब्रिटींच्या फोटोचा वापर केला. ग्रामीण भागात बाहुल्यांचे प्रयोग करीत असल्यामुळे पाच ग्रामीण बोलीभाषा वापरते. संवादातून माहिती चटकन पोहचते. विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन केल्यामुळे काहीजण नाटिका लिहितात. वृत्तपत्रांच्या कात्रणाचे जम्बो बुक तयार केले आहे. पशू-पक्षी, नद्या, फुले यांची माहिती देण्यासाठी त्याचा उपयोग झाला. अवांतर वाचनातून मुलांची ज्ञानाची भूक वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. - सरला कामे, आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त

ठाम निर्धारावर यश
उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात एव्हरेस्ट चढाई करण्याचे आव्हान होते. ठाम निर्धार व सर्वांच्या पाठबळावर अखेर एव्हरेस्ट सर केले. त्यामुळे यंदाचे वर्ष माझ्यासाठी विशेष आनंदाचे आहे. यापूर्वी दोन वेळेस मोहिमेवर गेलो. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे मोहीम अर्धवट सोडावी लागली. यावर्षी पुन्हा एव्हरेस्ट चढावे की नाही असा प्रश्न होता. यावर्षी नाही तर कधीच नाही असा विचार मनात आला आणि तयारी सुरू केली. शारिरीक आणि आर्थिकदृष्ट्या खचलो होतो. त्यामुळे ध्येय पूर्ण होणार नाही असे वाटले, पण समाजातून अनेकांनी मदत केली. मानसिक बळ कायम ठेवत बेस कॅम्पपर्यंत पोहचलो. तिथून जास्त अॅक्टिव्ह झालो अन् एव्हरेस्ट गाठले. या चढाईत पायाची बोटे बधीर झाली असून कदाचित ती गमवावी लागतील याची जाणीव होती, पण परत आलो असतो तर मोहीम कधीच पूर्ण झाली नसती. त्यामुळे न थांबता एव्हरेस्ट गाठले. ध्येय मनात असेल तर यशाचा टप्पा गाठणे कठीण नाही. - रफिक शेख, एव्हरेस्टवीर (२०१६)

आठ तासांत कळसूबाई सर
पोलिओग्रस्त असल्यामुळे शाळेत असताना मला शिक्षकांनी कधीच सहलीत सहभागी करून घेतले नाही. आम्हाला धडधाकट मुले सांभाळणे कठीण असताना तुला कुठे नेऊ असे उत्तर असायचे. कॉलेजपर्यंत मला सहलीचा आनंद घेता आला नाही. जवळचे मित्रसुद्धा सहलीत सहभागी करून घेत नसत. तर कौटुंबिक सहल ज‍वळच निघायची. विशेषतः सहली गड-किल्ल्यांवर जायच्या. माझ्यात क्षमता असल्यामुळे जिद्द जागी झाली. शिक्षक, मित्र यांच्यामुळे वाढलेला न्यूनगंड काढून टाकला. दर पंधरा दिवसांनी एक किल्ला चढू लागलो. १९९५ ते २००० या काळात संपर्काची फारशी साधने नसताना एकट्याने मोहीम काढली. आतापर्यंत ९७ किल्ले चढलो. आपण किल्ले पाहिले, पण अनेक अपंगांनी पाहिले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी भटकंती मोहीम सुरू केली. फक्त किल्ले न पाहता डोळस भटकंती करा असा सल्ला दुर्ग अभ्यासकांनी दिला. संशोधनात्मक काम करून गड संवर्धनासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. अपंगांसाठी १९ सहली काढल्या. राज्यात कळसूबाई शिखर सर्वात उंच असल्याचे कळल्यानंतर ते चढण्याचा निर्धार केला. या मोहिमेसाठी २४ अपंगांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात तिघे उपस्थित राहिले. आठ तासात कळसूबाई गाठून वाढदिवस साजरा केला. अपंग व्यक्ती कळसूबाई चढून आल्याचा अनेकांना आनंद वाटला. सध्या दरवर्षी ३१ डिसेंबरला कळसूबाई शिखर चढण्याची मोहीम राबवतो. या काळात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून अपंगांच्या विविध प्रश्नांवर काम सुरू केले. तीन वर्षात कडू यांनी शासनाला अपंगांसाठी २४ नवीन अध्यादेश काढायला लावले. जवळपास ४० टक्के अपंग व्यक्तींचे लग्न होत नाही. त्यामुळे पुढाकार घेऊन तीन लग्ने स्वखर्चाने लावून दिली. अपंगांसाठी काम आणि दुर्ग संवर्धन या कामात सातत्य राखल्यामुळे यावर्षी तीन पुरस्कारांचा मानकरी ठरलो. - शिवाजी गाडे, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर साक्षीदारांवर दबाव येणार नाहीः न्या. बोर्डे

$
0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एखाद्या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू झाली की ती शेवटपर्यंत दररोज चालवावी. ही सुनावणी सुरू असताना त्या खटल्याच्या तपास अधिकाऱ्यांनी देखील साक्षपुराव्यासाठी हजर राहिले पाहिजे. ते कायम हजर राहिल्यास साक्षीदारांवर दबाव येणार नाही. मात्र, तसे होत नाही. पोलिस प्रशासनाकडून हवे तसे सहकार्य केले मिळत नाही,’ अशी खंत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ न्या. रवींद्र बोर्डे यांनी व्यक्त शनिवारी व्यक्त केली.
राज्याच्या न्याय व विधी विभागाच्या वतीने सरकारी वकील आणि सहायक लोकअभियोक्ता यांच्यासाठी कार्याशाळेचे मराठवाडा महसूल प्रबोधननीत आयोजन करण्यात आले होते. या कार्याशाळेचे उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे, विधी विभागाचे एस. टी. दिग्रसकर, टी. के. चव्हाण यांची प्रमुख उपस्थित होती. न्या. बोर्डे म्हणाले, ‘वकील हे दोन प्रकारचे. बचाव पक्षाचा वकील त्याच्या पक्षकारास निर्दोष ठरविण्यसाठी प्रयत्नशील असतो, तर सरकारी वकील हे फिर्यादी, पक्षकार किंवा राज्याचा नसतो तो समाजाचा असतो. शहरी भागातील सरकारी वकिलांना इंटरनेट सारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे नवीन कायद्यात काय बदल किंवा सुधारणा काय झाल्यात हे समजते. मात्र, ग्रामीण स्थरावरील वकील मंडळींना खूप त्रास सहन करावा लागतो. त्या वकिलांना कायद्यात झालेल्या सुधारणाची माहिती होण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित कराव्यात,’ असे आवाहन त्यांनी केले. चैतन्य धारुरकर यांनी सूत्रसंचलन केले, तर टी. के. चव्हाण यांनी उपस्थिाताचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी भाजपकडून घडमोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या तीन दिवसांपासून महापौरपदाच्या उमेदवारीबाबत असलेला संभ्रम शनिवारी सकाळी दूर झाला. भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून भगवान घडमोडे यांची उमेदवारी जाहीर झाली. शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी स्मिता घोगरे यांची उमेदवारी दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाली होती. युतीच्या उमेदवारांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसेना-भाजप युतीच्या करारानुसार उर्वरित वर्षभरासाठी भाजपकडे महापौरपद तर, शिवसेनेकडे उपमहापौरपद राहणार आहे. महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमधून जोरदार रस्सीखेच होती. राजू शिंदे, भगवान घडमोडे, माधुरी अदवंत, शिवाजी दांडगे, विजय औताडे यांची नावे चर्चेत होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गटातून इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. त्यात घडमोडे यांनी बाजी मारली. घडमोडे आणि घोगरे यांनी शनिवारी सकाळी अर्ज दाखल केले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपमहापौर प्रमोद राठोड, मोहन मेघावाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुमेह नियंत्रणाने ८५ टक्के रुग्णांना दिलासा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारतात मधुमेही रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मधुमेहाच्या बरोबरीने येणारे विविध आजारही वाढत असून, त्याचे पायांवर होणारे दुष्परिणाम रुग्णाला पाय काढून टाकण्याच्या स्थितीत नेतात. देशात वर्षाला दोन लाख मधुमेही रुग्णांचे पाय गँगरीनमुळे काढून टाकावे लागतात. मधुमेही रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण केली, वेळीच उपचार घेतले तर यातील ८० टक्के पाय वाचविता येऊ शकतात,' असे प्रतिपादन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अरुण बाळ यांनी केले.
औरंगाबाद डायबेटिक संघटना आणि राष्ट्रीय तज्ज्ञ संघटना (पायांचे विकार) यांच्यावतीने आयोजित ‘मधुमेहात पायांचे विकार’ या विषयावरील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार औपचारिक उद्‍घाटन डॉ. बाळ यांच्या हस्ते करण्यात आले. बाळ म्हणाले, ‘मधुमेही रुग्णाच्या पायाला झालेल्या लहानशा जखमेकडे दुर्लक्ष झाले, तर ७२ तासांत त्या जखमेचे रूपांतर गँगरीनमध्ये होऊ शकते आणि पायच काढावा लागतो. अनेक पाहण्यांमध्ये असे दिसून आले आहे, की रुग्णाचा पाय काढून टाकल्यानंतर त्याच्या जीवनशैलीवर खूपच वाईट प्रभाव पडतो. परिणामी अशा रुग्णांनी पायाला इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.’
याप्रसंगी डॉ. झुल्फिकारअली अब्बास, डॉ. क्रिस्टिन व्हॅन हॅकर यांनीही मार्गदर्शन केले. ‘आफ्रिका ही मधुमेहाची राजधानी असून आशिया खंडाचा दुसरा क्रमांक आहे,’ असे टांझानियाहून आलेल्या अब्बास यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात अमेरिकेचे डॉ. किम पॉल यांनी पायावर करण्यात येणाऱ्या विविध शस्त्रक्रिया आणि त्या टाळण्यासाठच्या उपायांवर माहिती दिली. शुक्रवारी सुरू झालेल्या या परिषदेचे औपचारिक उदघाटन शनिवारी करण्यात आले. डॉ. क्रिस्टीन, डॉ. अब्बास, डॉ. किम पॉल, डॉ. अरुण बाळ, डॉ. केसवन, डॉ. संजीव इंदूरकर, डॉ. अमित नघाटे आदी उपस्थित होते. डॉ. इंदूरकर यांनी प्रास्ताविक केले. उत्कृष्ट प्रबंध सादरीकरणाबद्दल एमजीएमचे डॉ. वैभव सिंग आणि डॉ. के. व्ही.कविता याना पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. मयुरा काळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपक भोसले यांनी आभार मानले. परिषदेत देशभरातून चारशेहून अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत. रविवारी परिषदेचा समारोप होणार आहे. परिषदेसाठी अध्यक्ष डॉ. संजीव इंदूरकर, सचिव डॉ. अमित नघाटे, उपाध्यक्ष डॉ. जितेन कुलकर्णी, डॉ. हेमंत फटाले, डॉ. दीपक भोसले, डॉ. अजय रोटे, सहसचिव डॉ. मयुरा काळे यांच्यासह औरंगाबाद डायबेटॉलॉजी असोसिएशनचे सर्व सदस्य पुढाकार घेत आहेत.

टाइप वनची संख्या वाढली
बेल्जिअमच्या डॉ. क्रिस्टिन व्हॅन हॅकर म्हणाल्या, ‘मधुमेहाबाबत जागरुकतेबरोबरच अशा रुग्णांना सामाजिक आरोग्य सुविधा पुरविणेही अत्यावश्यक आहे. मधुमेहींना त्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय आणि जागरूक पाठिंबाही असलाच पाहिजे, तरच हे रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतील. युरोपमध्ये लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठी आहे. अशा मुलांमध्ये टाइप वन मधुमेहाची संख्या खूपच वाढली आहे. हेच लोण जगभर पसरत चालले आहे. याकरिता योग्य आहार, व्यायाम यांची बालपणापासूनच गरज आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
औसा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी माकणी ते औसा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येईल. शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
औसा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा येथे सभा झाल्या. सुधीर मुनगुंटीवार म्हणाले, ‘केंद्र सरकारने घोषीत केलेल्या नोटा बंदीचा भविष्यात फायदा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होणार आहे. औसा शहर मराठवाड्यातील एक चांगले शहर निर्माण करण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण उटगे यांना विजयी केल्यास विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही.’
जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, ‘विकास कामाच्याबाबतीत योजनांची सुरुवात औसापासून केली जाणार आहे. पाणी पुरवठा योजनेचे नारळ पहिल्यांदा औसा येथेच फुटेल. लातूरच्या तुलनेत औसाच्या विकास झाला नाही, मोठ्या झाडाखाली लहान झाडं वाढत नसते, त्याप्रमाणे दोन्ही काँग्रेसने या शहराचा विकास होऊ दिला नाही.’
शहराच्या विकासाच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात ते अर्थमंत्री पाठीशी आहेत. त्यामुळे औसाचा विकास करण्यासाठी विजयी करण्याचे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण उटगे यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, तालुका अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, प्रवीण कस्तुरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन बिल्डरांविरुद्ध गुन्हे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
झालरक्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखांकन करून प्लॉट विक्री करणाऱ्या तीन बिल्डरांविरुद्ध सिडकोने शनिवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यात तीसगाव शिवारात अनधिकृत बांधकाम करणारे शेषराव रखमाजी काळे, प्लॉटिंग करणारे रवींद्र रमेश साळुंके तसेच साई पार्कच्या विकसकाचा समावेश आहे.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन राज्य शासनाने शहरालगतच्या २८ महसुली गावातील १५,१८४ हेक्टर क्षेत्राचा सुनियोजित विकास करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केलेली आहे. या झालरक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे विकासकाम, इमारत बांधकाम, पुनर्विकास, रेखाकंन यासाठी सिडकोची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. मात्र, झालरक्षेत्रात काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे, रेखाकंन करून प्लॉट विक्री होत असल्याचे समोर आले. त्यामुळे अशी बेकायदा बांधकामे, रेखाकंन करून प्लॉट विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश सिडकोचे मुख्यप्रशासक सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
पथकाच्या शोध मोहिमेत तीसगाव शिवारातील गट क्रमांक २५४ मध्ये माऊली लॅण्ड डेव्हलपर्स यांनी चैतन्य या नावाने नामफलक उभारून अनाधिकृत बांधकाम सुरू केल्याचे आढळून आले. या गटाचे मालक शेषराव रखमाजी काळे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरातील गट क्रमांक ३४ मधील दोन एकर क्षेत्रफळात २० बाय ३० आकाराचे अनधिकृत भूखंड पाडून त्यांची विक्री केली जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी रवींद्र रमेश साळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर साई पार्कच्या विकसकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिडको विभागातर्फे सांगण्यात आले.

खात्री करा, फसगत टाळा
सिडकोची पूर्व परवानगी न घेता होणारी विकासकामे अनधिकृत आहेत. अनधिकृत कामांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सिडको अधिसूचित क्षेत्रातील सदनिका, भूखंड खरेदी करण्याआधी ते बांधकाम, रेखांकन अधिकृत आहे की नाही, याची खात्री करून फसगत टाळावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.
---
‘मटा’ भूमिका
---
वचक संपला
---
विकास प्राधिकरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा नियोजनात सहभाग आहे, त्यांच्या परवानगीविना जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही याची कल्पना असूनही काही मंडळी अशी कामे करतात, कारण या संस्थांचा वचक संपुष्टात आला आहे. शहरालगत स्वस्त प्लॉट किंवा घर मिळणार असेल तर सर्वसामान्यांचाही प्रतिसाद मिळतो. एकदा वसाहत उभी राहिली की कोणतीही कारवाई होत नाही, असा सर्वांचा समज होऊन बसला आहे. सिडकोने उचललेल्या कारवाईच्या बडग्यामुळे हा समज दूर होऊन प्रशासनाचा वचक निर्माण होण्यास काही प्रमाणात मदत मिळेल. अर्थात, केवळ गुन्हे नोंदवून कारवाई थांबविली जाऊ नये. नागरिकांनीही अशा प्रकल्पांविषयी जागरुक राहावे, अन्यथा ते अनधिकृत ठरविले गेल्यानंतर काहीही करता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवान घडमोडेंची सरशी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौरपद मिळविण्यासाठी गेल्या आठवड्यापासून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. नवीन विरुद्ध जुने अशा सुप्त लढाईत अखेर भाजपमधील जुन्या कार्यकर्त्याची सरशी झाली. केंद्र व राज्यातील सत्तेनंतर पक्षात आलेल्यांना किती पदे देणार ? निष्ठावंतांना डावलू नका, अशी मागणी करत कोअर कमिटीने श्रेष्ठींना जोरदार विरोध केला आणि महापौरपदासाठी भाजपमधून भगवान घडमोडे यांची सरशी झाली.
शिवसेना - भाजप युतीतील करारानुसार या टर्ममधील अखेरचे एक वर्ष भाजपकडे महापौरपद राहणार आहे. दोन्ही पक्षांतून आदेश येण्यास उशीर झाल्याने दीड महिना उशिराने भाजपला संधी मिळणार आहे. सेनेने दोन दिवसांपूर्वी स्मिता घोगरे यांची उपमहापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली. भाजपमधून भगवान घडमोडे, राजू शिंदे, अॅड. माधुरी अदवंत, विजय औताडे आणि शिवाजी दांडगे यांची नावे चर्चेत होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गटातून नंबर लागण्यासाठी इच्छुकांमधून जोरदार रस्सीखेच सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय गेला तेव्हा ते सुद्धा अवाक झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोअर कमिटीचे मत श्रेष्ठींनी अंतिम मानण्याचे ठरविले होते. भाजपमधील अंतर्गत नियुक्त्या, पदे देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून नाराजी आहे. पक्षात नव्याने आलेल्यांना मोठी पदे देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली होती. सत्ता आल्यानंतर जुन्यांना काही लाभ मिळू देण्याऐवजी नव्याने प्रवेश केलेल्यांवर श्रेष्ठी मर्जी दाखवत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत भाजपमध्ये उत्सुकता होती. जुन्या नगरसेवकांमधून कुणाचीही निवड करा, पण नवीन प्रयोग करू नका, अशी मागणी कोअर कमिटीने नोंदविली. किंबहुना कमिटीने श्रेष्ठींकडे यासंदर्भात ताकीद दिली होती. नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यातील निकाल पाहिल्यानंतर श्रेष्ठींनीही नवीन प्रयोग न करण्याचे ठरविले आणि भगवान घडमोडे यांनी महापौरपदाची उमेदवारी जाहीर झाली.


काँग्रेस, एमआयएमचीही उमेदवारी
-महापौर, उपमहापौर निवडीसाठी १४ डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवारांव्यतिरिक्त शनिवारी काँग्रेस व एमआयएमनेही उमेदवारी दाखल केली.
-काँग्रेस-अय्युब खान (महापौरपदासाठी), अब्दुल मनवीद अब्दुल रशीद (उपमहापौरपदासाठी)
-एमआयएम - खान सायरा बोना आजम (महापौरपदासाठी) खान इर्शाद इब्राहिम (उपमहापौरपदासाठी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी बाजार समितीसाठी आज मतदान

$
0
0

परभणी - येथील बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी (११ डिसेंबर) मतदान होणार आहे. यासाठी १३ मतदान केद्र निर्माण करण्यात आली असून त्या ठिकाणी ३ हजार २८३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
तिरंगी लढत होत असलेल्या परभणी बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. रविवारी १८ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ६४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १० उमेदवार अपक्ष असून इतर ५४ उमेदवारांची तीन पॅनलमध्ये विभागानी झाली आहे. शिवसेना खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील व काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांचे एक पॅनल असून दुसरे पॅनल शिवसेनेचे कल्याणराव रेंगे, राष्ट्रवादीचे विजय जामकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांचे आहे. या दोनही पॅनलला टक्कर देण्यासाठी नवे पर्व गरीब सर्व असा स्लोगन घेवून सर्वसामान्यांचे परिवर्तन पॅनल देखील उभे आहे. खरी लढत पहिल्या दोन पॅनलमध्ये आहे.
दरम्यान, मतदानासाठी परभणीतील मोंढा, झरी, दैठणा, आदी ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. मतमोजणी सोमवारी शहरातील कल्याणमंडपम येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाचा स्नेह माझ्यासाठी शक्ती

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आर्य वैश्य समाजाकडे इतर समाजाला सोबत घेऊन देशाचे स्वप्न रंगविण्याची ताकद आहे. समाजाने दिलेले प्रेम, स्नेह ही एकप्रकारची शक्ती आहे. त्यामुळे या पदापर्यंत पोहंचू शकलो,’ असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते शनिवारी आर्य वैश्य उपवर-उपवधू परिचय मेळाव्यात बोलत होते.
आर्य वैश्य मंडळ औरंगाबाद आणि आर्य वैश्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थतर्फे या दोन दिवशीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्या लॉन्स येथे आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्य सचिव अरुण बोंगीरवार, भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कुंदकुर्ते यांची प्रमुख उपस्थती होती. अध्यक्ष म्हणून आर्य वैश्य मंडळचे अध्यक्ष सूर्यकांत शिरपेवार हे होते. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘आर्य वैश्य समाजाचे राज्याच्या आणि देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. शेवटच्या घटकापर्यंत सक्षमता येणे महत्त्वाचे. त्यासाठी समाजातील प्रत्येकाचे प्रयत्न गरजेचे आहे. समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी जागा शोधा, वसतिगृह उभारणीसाठी सरकार मदत करेल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. अरुण बोंगीरवार यांनी आपल्या भाषणात मेळाव्याची स्थिती मांडली. प्रास्ताविक डॉ. शिरपेवार यांनी केले.

इनकमटॅक्सची मर्यादा पाच लाख करावी
नोटबंदीनंतर व्यापाऱ्यांना येत असलेल्या अडचणी आणि आयकर विभागाची भीती लक्षात घेत इनकम टॅक्सची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करावी, अशी मागणी भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कुंदकुर्ते यांनी आपल्या भाषणात केली. हा मुद्दा पकडत मुनगंटीवार आपल्या भाषणात म्हणाले, ‘कॅशलेस व्यवहार होत असताना, योग्यप्रकारे कर भरणाऱ्या करदात्यांनी घाबरण्याचे कारण नाही. प्रक्रियेत एकदा नियमितपणा आला तर या मर्यादा आपोआप वाढतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरंभ’च्या धैर्याला कौतुकाची साथ

$
0
0


औरंगाबाद : ‘मतिमंद किंवा कोणत्याही विशेष मुलांना दया, सहानुभूतीची गरज नाही. त्यांना समाजाच्या बळाची आवश्यकता आहे. दान दिले आणि आपली जबाबदारी संपली असे दाते त्यांना नको आहेत, तर या मुलांशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे असे प्रयत्न हवे,’ असे आवाहन आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी केले.
गतिमंद व स्वमग्न मुलांसाठी कार्यरत असलेल्या आरंभ ऑटिझम सेंटरचा पाचवा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी एंड्रेस हौझरचे व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीराम प्रमुख पाहुणे होते. बीडच्या शांतीवन प्रकल्पाचे अध्यक्ष दीपक नागरगोजे ए. वन. इंडस्ट्रीज व कस्तुरतन फाउंडेशनचे अध्यक्ष (पुणे) र्कीर्ती ओस्तवाल, मिलिंद कंक, चेतन पाटील, सेंटरच्या संचालिका अंबिका टाकळकर उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन झाल्यावर 'देवा श्री गणेशा...' या गाण्यावर गणेशवंदना सादर झाली. यानंतर श्रीकृष्ण लीलांवरच्या 'दशावतार' या प्रसंगावर आधारित समूहनृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. भक्ती कुलकर्णीने ‘इतनी शक्ती हमे दे अन्नदाता...’ हे गाणे सादर केले. ब्लेझ अॅकॅडमीचे नृत्य प्रशिक्षक चेतन पाटील, आकाश गंगावणे, विवेक बावस्कर, वृषाली पतंगे यांनी मुलांना मदत केली. यानंतर ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी..’ हे गाणे स्पर्शून गेले. नीरज नवनीलच्या ‘गोविंदा आला रे...’ गाण्याने धमाल उडवली.
सर्वच मुलांचा सहभाग असलेल्या फॅशन शोने रंगत आणली. विविध वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. शिक्षिका सुकन्या देशपांडे, स्वाती शहापूरकर यांच्यासह पालकांनी 'छोटी छोटी गय्या रे...' 'खेळ मांडला..' ही गाणी गायली. मैत्री कशी होती व कशी निभावली जाते यावर आधारित नाटकाद्वारे मैत्रीचा संदेश देताना वातावरण भावूक झाले. मंदार देसाई यांनी ढोलकी, अमर लाटकर यांनी तबला व पियानोवर अरविंद कुमार यांनी साथ दिली. आरंभच्या शिक्षिकांनी तयार केलेली संस्थेची पाच वर्षांची सफर दाखवणारी डाँक्युमेंट्री पाहून सर्व भावूक झाले. यावेळी आरंभचे अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वैशाली सुतावण व मिलिंद दामोधरे यांनी सूत्रसंचालन केले. अंबिका टाकळकर यांनी आभार मानले. अंजली कुलकर्णी, ललिता खापरे, ऋतुजा काटकर, विलास शिंगी यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images