Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आत्महत्येची धमकी देत फौजदार बेपत्ता

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सासरवाडीच्या छळाला कंटाळून आत्महत्येची धमकी देणारी नोट लिहून एक पोलिस उपनिरीक्षक शनिवारी सकाळपासून बेपत्ता झाला आहे.
विनोद भालेराव (रा. कैलास नगर) असे बेपत्ता उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते नाशिक पोलिस आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भालेराव यांनी काही मित्रांना व्हाट्स अॅपद्वारे चिठ्ठी पाठवून घर सोडल्याचे सांगितल्याचे समोर येत आहे. भालेरावविरुद्ध पैशांसाठी पत्नीचा छळ करतो, अशी तक्रारही यापूर्वी जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ६ डिसेंबर रोजी विनोद यांच्या पत्नीने जिन्सी पोलिस ठाण्यात हुंडा मागणे, छळ करण्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर विनोद हे १० डिसेंबर रोजी सकाळीच एक चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. विनोद यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांच्यावर झालेले आरोप त्यांनी खोडून काढले आहेत. या प्रकरणी बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२५ कोटींच्या नोटा शहरात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोकड नाही, रोखीचे व्यवहार होत नाहीत, अजून पैसे नाहीत, खूप हाल होत आहे, असा अनुभव असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात शनिवारी रात्री १२५ कोटी रुपयांच्या नोटा आल्या आहेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या रोकड भांडारातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी शहरात १२५ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा १२५ कोटींची रक्कम मिळाली असून ती फक्त शहरवासीयांच्या साठीच असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी आलेली रिझर्व्ह बँकेची रोकड औरंगाबाद जिल्ह्यासाठी होती. आता शनिवारी आलेल्या रोकडचे वितरण करताना विविध बँकाना १० ते २२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद, सेंट्रल बँक, आयडीबीआय, स्टेट बँक इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना ही रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम सोमवारी आणि मंगळवारी बँकांना दिली जाईल. १५ दिवसांपूर्वी आलेल्या रकमेपैकी काही ग्रामीण भागात व मराठवाड्यात पाठवण्यात आली होती. शहरात नोटबंदीनंतर शनिवारी तिसऱ्यांना रोकड प्राप्त झाली आहे. पहिल्यावेळी ४००, दुसऱ्यावेळी १२५ आणि तिसऱ्यावेळी १२५ कोटींची रक्कम मिळाली आहे. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियासह रोकड भांडार असलेल्या तीन बँकांकडून सुमारे ३५०० कोटींची मागणी करण्यात आली आहे.

एटीएममध्ये पैसे भरणार
प्राप्त झालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम बँकांना देण्यात येणार आहे. उर्वरित निम्मी रक्कम ६०० एटीएममधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात २२ राष्ट्रीयकृत आणि १२ खासगी बँकांच्या सुमारे ४०० शाखा व ७०० एटीएम आहेत.

ग्रामीण भागाकडे लक्ष
प्राप्त रकमेमध्ये ५००, २००० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नोटबंदीचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागात होत आहे. त्यामुळे तेथे ५०० आणि २०००च्या नोटांच्या स्वरुपात पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यापूर्वी वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, सोयगाव, पैठण या तालुक्यात नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसै नसलेल्या एटीएमला सिल्लोडमध्ये पुष्पहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
नोटबंदीमुळे पुरेशी रोकड मिळत नसल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे नसलेल्या एटीएम मशीनला पुष्पहार घालून आंदोलन केले. नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता अडचणी सापडली असून सरकार पैसे उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला.
नोटबंदीचा निर्णय होऊन एक महिना उलटल्यानंतरही सर्वसामान्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. बँकेसमोरील नागरिकांच्या रांगा कायम असून मोजक्याच बँकेत मोजकेच पैसे मिळत आहेत. यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिक एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी जात असले तरी पैसे उपलब्ध नाहीत. शहरातील अॅक्सिक बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम सुरू आहेत,इतर बंद आहेत. या बंद एटीएम मशीनला पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली. यावेळी भाकपचे तालुका सचिव कॉ. जिलानी खान पठाण, कॉ. सय्यद अनीस, कॉ. शेख अजीज, कॉ. बाबुराव पठाडे, कॉ. कडुबा जगताप, कॉ. शेख बाबू, कॉ. शेख कय्यूम, कॉ. शेख मुख्तार, कॉ. शेख अमान, कॉ. शेख हमीद, कॉ. बशीर पठाण, कॉ. शेख साजीद, शेख आरेफ, ए. पी. खान, शेख रिजवान, कॉ. शेख सलमान, शेख सोहेल, शेख परवेज आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी करू न दिल्याने पर्यवेक्षकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परीक्षेमध्ये कॉपी करून न दिल्याने एका विद्यार्थ्यांने साथीदारांच्या मदतीने पर्यवेक्षकाला रस्त्यात अडवून मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी हर्सूलजवळ घडला. याप्रकरणी चार संशयित आरोपीविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्सूल परिसरातील औरंगाबाद इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगची परिक्षा सुरू आहे. शनिवारी कुणाल शिरीष चौधरी हा विद्यार्थी परीक्षेत कॉपी करत होता, त्याला पर्यवेक्षक डॉ. सुनील गुलाबराव पिंपळे (वय ४१, रा. सातारा परिसर) यांनी पकडले. त्याच्यावर कारवाई करीत त्याचा मोबाइल काढून घेतला. याचा कुणालला राग आला. पिंपळे हे कॉलेजमधून घरी जाताना त्यांना हर्सूल गावाजवळील मुस्लिम कब्रस्थानाजवळ कुणाल व त्याच्या तीन साथीदारांनी अडवले. त्यांना दुचाकीवरून खाली ओढत ‌शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यापुढे परीक्षा क‌ेंद्रावर दिसला, तर हातपाय तोडून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुणालसहित इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार शेख रब्बानी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय लोकशाहीला सद्यस्थितीत धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अस्थिरता, नोटबंदी, सर्वसामान्यांचे हाल, राष्ट्रवादाच्या आपापल्या परीने मांडण्यात आलेल्या संकल्पना यामुळे निर्माण झालेली सद्यस्थिती भारतीय लोकशाही धोका निर्माण करणारी आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी केले.
अँटी एस्टॅब्लिशमेंट सोशल फोरमतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी ‘देशाच्या उभारणीसाठी खरा राष्ट्रवाद कोणता?’ या विषयावर डॉ. पुनियानी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी विचारमंचावर यावेळी कॉ. भीमराव बनसोड, अॅड. संघमित्र भारसाखळे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुनियानी म्हणाले, सध्या राष्ट्रवादासमोर खूप मोठी आव्हाने आहेत. धर्म, निती, राजनिती, सांस्कृतिक मतभेद यासारख्या विविध संकल्पना त्या-त्या धर्मानुसार मांडण्यात येऊन राष्ट्रवाद त्या-त्या धर्मानुसार मांडण्यात येत आहे. हिंदू, ‌मुस्लिम, ‌शिख, बुद्ध, ख्रिश्चन या धर्माच्या नैतिक मुद्यांना कोणीच हात घालत नाहीत. धर्माच्या नावाखाली खून होतात, पाकिस्तानात ख्रिश्चन, भारतात मुस्लिम आणि बांगला देशात हिंदू मारला जातो, त्याच्या बातम्या येतात. पण, माणूस मरत आहे, हे कोणी सांगत नाही. प्रत्येकजण आपल्यापरीने विचार व्यक्त करत राष्ट्रवादाची मांडणी करत आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता ‘मन की बात’, ‘तन की बात’ या सारख्या कार्यक्रमांतूनही सध्या विचार मांडताना काय सांगितले जाते ते पाहा, असा उपरोध त्यांनी व्यक्त केला. सध्या राजकारण, आणि भावनिकता यातून लोकांच्या भाव‌नेशी खेळले जात असल्याचे सांगितले. त्यांनी भाषणातून अकबर, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यापासून अमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटात दाखवलेल्या इंग्रजांपर्यंत उदाहरणे देत नेहमी कर व सत्ता-संपत्तीसाठी कशी रणनिती आखली गेली याचे विवेचन केले. अध्यक्षीय समारोप कॉ. भीमराव बनसोड यांनी केला, प्रास्ताविक अॅ. संघमित्र भारसाखळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौरपदाची निवडणूक १४ डिसेंबरला होणार आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवारी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. मतदानापर्यंत कुठली गडबड होऊ नये, यासाठी युतीच्या नगरसेवकांना रविवारी सहलीवर पाठविण्यात आले. हे नगरसेवक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी शहरात परततील.
युतीतील करारानुसार उर्वरित एक वर्षासाठी भाजपकडे महापौरपद राहणार आहे. शनिवारी सकाळी भाजपकडून महापौरपदासाठी भगवान घडमोडे आणि शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी स्मिता घोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस आणि एमआयएमनेही आपापली उमेदवारी दाखल केली आहे. मतदानात कुठेही गडबड होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी युतीच्या नगरेसवकांना रविवारी दुपारी लोणावळ्याला सहलीवर पाठविण्यात आले. शिवसेना-भाजपचे काही नगरसेवक मात्र शहरातच थांबून आहेत. भाजपचे २३, सेनेचे २० तर अपक्ष १० नगरसेवक सहलीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी हे नगरसेवक औरंगाबादेत परततील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० हजार भाविक खंडोबाचरणी लीन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्याच्या खंडोबाची मुख्‍य यात्रा संपल्यानंतर आलेल्या पहिल्‍या रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. दर्शन घेण्यासाठी सकाळी १०पासून भाविकांनी रांगा लावल्या, दुपारी १२नंतर मंदिरामागील पश्चिम प्रवेशद्वाराच्याही खाली रांग आली होती. भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. सायंकाळपर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी चंपाषष्टी रविवारनंतर लगेच सोमवारी आल्‍यामुळे मुख्‍य यात्रेच्‍या दिवशी गर्दी नव्हती. तसेच नोटबंदीचा परिणाम यात्रेवर स्पष्टपणे जाणवत होता. परंतु, पहिल्‍या रविवारी मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्यात शहरासह बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांचाही समावेश होता. ‘येळकोट येळकोट जय मल्‍हार’चा जयघोष करीत भाविक मंदिरावर बेल भंडारा व रेवड्यांची उधळण करीत होते. ज्यांचा कंदुरीचा नवस होता त्यांची सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ सोय करण्यात आली होती. अनेकांनी धर्मशाळेच्या गच्चीवर वांग्याचे भरित-भाकरीचा आस्वाद घेतला.
येथे पौंष महिन्यापर्यंत छोटी यात्रा असते. दर रविवारी कमीअधिक प्रमाणात गर्दी असल्याचे संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी सांगितले. गर्दी वाढल्यामुळे दुपारनंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दी न झाल्याने माजीमंत्री नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मुजीबोद्दिन हाफिजोद्दिन यांच्यासह नगरसेवकपदाच्या १७ उमेदवारांच्या प्रचारासाठी खुलताबाद येथे आयोजित केलेली माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सभा फ्लॉप ठरली. शनिवारी झालेल्या या सभेला उमेदवारांसह केवळ ५०-६० लोक उपस्थित होते. त्यामुळे व्यासपीठावर आगमन होताच क्षीरसागर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. पण, प्रयत्न करूनही गर्दी झाली नाही, अखेर दुपारी एक वाजता सभा सुरू करण्यात आली. सभेच्या ठिकाणी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती. त्यानंतरही निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या राहिल्या. सभेला गर्दी होत नसल्याची चिंता खुद्द उमेदवार मुजीबोद्दिन हाफिजोद्दिन यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. फोनाफोनी झाल्यावर काही लोकांना सभेसाठी आणण्यात आले. तरी देखील खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. गर्दीची वाट न पाहता मान्यवरांनी रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणे ठोकली. रिकाम्या खुर्च्या पाहून नाराज झालेल्या माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची महंमद नईम महंमद बक्ष यांनी जाहीर माफी मागितली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास चव्हाण, सुनीता चव्हाण, महेश उबाळे, शंकर अधाने, महंमद नईम महंमद बक्ष, मजीद मणियार, दिनेश सावजी, भगवान कामठे, निसार पठाण आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीच्या कारभारामुळे पैठणचा बट्ट्याबोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘विकास निधी उपलब्ध असतानाही, नियोजनशून्य कारभार करून शिवसेना-भाजप युतीने शहराचा बट्ट्याबोळ केला,’ अशी टीका काँग्रेसचे माजीमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. त्यांच्या हस्ते पैठणमधील काँग्रेसच्या प्रचाराचे शनिवारी उद्‍घाटन करण्यात आले. यानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला माजीमंत्री अनिल पटेल, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार जीतसिंग करकोटक आदी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना सत्तार म्हणाले, गेल्या निवडणुकीत पैठणच्या जनतेने काँग्रेस पक्षाचे दहा नगरसेवक निवडून देत सत्ता दिली होती. मात्र, आमच्या काही गद्दार नगरसेवकांमुळे काँग्रेसचा नगराध्यक्ष होऊ शकला नाही व सत्ता शिवसेनेच्या हाती गेली. माजी मुख्यंमत्री अशोक चव्हाण यांनी मंजूर केलेल्या पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणामुळे शहराच्या विकासासाठी मोठा निधी मिळत आहे. मात्र, शिवसेना नगराध्यक्षांच्या नियोजनशून्य व बोगस कामामुळे शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा आरोप सत्तार यांनी केला.
माजी मंत्री अनिल पटेल यांनी आपल्या भाषणातून आमदार संदीपान भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या कारभारावर टीका केली. बेकायदा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणाऱ्या नगराध्यक्ष व उपनराध्यक्षांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी पटेल यांनी केली. या सभेला मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या सभेत पैठणध्ये घोषणाबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
मराठा आरक्षण मागणीच्या झळा मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत पहिल्यांदाच बसल्या. पैठण येथे रविवारी झालेल्या फडणवीस यांच्या प्रचार सभेत मराठा आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी झाल्याने एकच गोंधळ उडाला. सभा सुरू होण्यापूर्वी मराठा क्रांतिमोर्चाच्या पैठण येथील २२ संयोजनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
नगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी शहरातील शिवाजी चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा आयोजित केली होती. मुख्यमंत्र्यांचे दुपारी बारा वाजता भाषण सुरू झाले. त्यांचे भाषण सुरू असताना मंचासमोर बसलेल्या काही तरुणांनी ‘मराठ्यांना आरक्षण जाहीर करा’, ‘आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पैठण येथे काढण्यात आलेल्या मराठा क्रांतिमोर्चाच्या २२ संयोजकांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते. त्यामुळे अचानक घोषणा सुरू झाल्याने पोलिस हडबडले. पण, पोलसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर गोंधळाचे वातावरण शांत झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरळीत पार पडले.

आज बंदची हाक
मुख्यमत्री फडणवीस यांच्या सभेपूर्वी मराठा क्रांतिमोर्चाचे २२ संयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना सभा संपल्यानंतर लगेच सोडून देण्यात आले. या सदस्यांनी सुटका होताच शिवाजी पुतळा परिसरात भाजप शासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिस कारवाईच्या विरोधात सोमवारी पैठण बंदची हाक देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर कारखाना सुरू करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
‘मंत्रिमंडळ बैठकीत नुसतीच घोषणा न करता खुलताबाद-वेरूळ-म्हैसमाळ सुलीभंजन पर्यटन प्राधिकरणासाठी येत्या अर्थसंकल्पात ४५३ कोटींची तरतूद करण्यात येईल. गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू करू,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
गंगापूर व खुलताबाद नगरपालिका निवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारासाठी त्यांची रविवारी सकाळी ११ वाजता सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर धनायत, गंगापूर येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वंदना प्रदीप पाटील, खुलताबाद येथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार नवनाथ बारगळ यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत शहरीकरण झाले, पण योग्य नियोजन झालेल नाही. २०११च्या जनगणनेनुसार राज्यातील ११ कोटी २० लाख लोकांपैकी साडेपाच कोटी लोक शहरात राहतात. नागरीकरणाचे नियोजन करण्यात आघाडी सरकार अपयशी ठरले. गावे ओस पडली, शहरे बकाल झाली.’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकरणाकडे गांभीर्याने पाहिले आहे. नागरिकरण आव्हान नसून संधी आहे. स्मार्ट सिटी, अमृत, १४वा वित्त आयोग, शहर सुधारणा निधी, स्वच्छ भारत अभियान आदी योजना राबवल्या आहेत, ’ अशी माहिती त्यांनी दिली.

सेवा हमी कायदा
शासकीय कार्यालयात खेट्या घालाव्या लागू नयेत, यासाठी सेवा हमी कायदा लागू केला आहे. विहित कालावधीत सेवा मिळाली नाही, तर या कायद्यानुसार नागरिकांनी तक्रार करताच जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना दंड केला जाणार आहे. त्यानंतरही सेवा मिळत नसेल, तर त्यांना घरी पाठविले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तिजोरीला युतीचे कुलूप
राज्यातील तिजोरीला युतीचे कुलूप असून, गंगापूर व खुलताबाद नगरपालिका भाजप-शिवसेना युतीच्या ताब्यात द्या. निधीची कमतरता पडू देणार नाही, पण गुणवत्तापूर्वक काम झाले पाहिजे ही अट आहे. ‘आपण दोघे भाऊ, मिळून खाऊ,’ असे चालणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार शोधणार गुणी खेळाडू

$
0
0

sudhir.bhalerao@timesgroup.com
Tweet : @SudhirbMT
औरंगाबाद : राष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्याचा उपक्रम केंद्र शासनाच्यावतीने नव्या वर्षात हाती घेण्यात येणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि अॅथलेटिक्स या पाच क्रीडा प्रकारांचा या उपक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. निवडण्यात आलेल्या खेळाडूंना दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाउंडेशन या संस्थेला केंद्र शासनाने गुणवत्ता शोध कार्यक्रमासाठी मान्यता दिली आहे. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि अॅथलेटिक्स या पाच क्रीडा प्रकारांच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून प्रत्येक पातळीवर उत्कृष्ट संघांची निवड करण्यात येणार आहे. त्या संघांची पुढील पातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना दहा लाख रूपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे, अशी माहिती क्रीडा सहसंचालक एन. एम. सोपल यांनी दिली.
जानेवारी महिन्यात पाचही क्रीडा प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी १७ जानेवारी २०१७पर्यंत प्रवेशिका भरणे आवश्यक आहे. www.sspf.in या वेबसाइटवर ऑनलाइन प्रवेशिका भरणे गरजेचे आहे. वेबसाइटवर या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी रविशंकर पंडित यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गुणवंताच्या शोधासाठी प्रवेश शुल्क
क्रिकेट खेळासाठी पाच हजार रुपये, तर फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारांकरिता प्रत्येकी दोन हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय गुणवत्ता शोध उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे, हा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे, असे सोपल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेने दिले जगण्याचे भान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काळाच्या गतीत अभिव्यक्त होण्याची साधने बदलत आहेत. सोशल मीडियाने अभिव्यक्त होण्याची हक्काची जागा उपलब्ध केली. विशेषतः सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबुक कवींचा मित्र बनले. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित फेसबुक ‘मटा कविसंमेलन’ लक्षवेधी ठरले. या कविसंमेलनातील सर्वोत्कृष्ट कवी सुनील उबाळे, रामप्रसाद वाव्हळ आणि रमेश ठोंबरे यांना रविवारी पारितोषिक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी रवी कोरडे, कवी व स्पर्धेचे परीक्षक संदीप जगदाळे आणि ‘राजहंस प्रकाशन’चे श्याम देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोशल मीडिया नवीन पिढीचा मित्र झाला आहे. नियतकालिकात उमटणारे साहित्य आता फेसबुकवर झळकत आहे. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचवणारे फेसबुक माध्यम लोकप्रिय आहे. कवी, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या बुद्धिजिवी वर्गाने सोशल मीडियाचे महत्त्व ओळखले. सद्यस्थितीत नवोदित लेखकाचे साहित्य सर्वप्रथम सोशल मीडियात प्रसिद्ध होते. अभिव्यक्त होण्यासाठी फेसबुक माध्यम सर्वांना विश्वासार्ह वाटते. या माध्यमाची लोकप्रियता लिहिण्यासाठी प्रेरणा देत आहे.
लघुकथा, कविता, लेख, चारोळी, राजकीय विश्लेषण अशा विविध विषयांना तरुणाई गंभीरपणे मांडत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’च्या पाचव्या वर्धापनदिनी फेसबुक कविसंमेलन हा चाकोरीबाह्य उपक्रम घेण्यात आला. ‘मटा कविसंमेलन’ फेसबुक पेजवर शुक्रवारी (९ डिसेंबर) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कविसंमेलन रंगले. राज्यभरातील शेकडो कवी संमेलनात सहभागी झाले आणि आपल्या प्रतिभेची चुणूक त्यांनी दाखवली. सामाजिक भान असलेली कविता प्रामुख्याने कविसंमेलनात दिसली. स्त्री स्वातंत्र्य, नोटबंदी, ऑनलाइन, जातवास्तव, मूकमोर्चे, पाऊस, शेतीची दशा, संस्कृती, राजकीय विडंबन अशा विषयांची कवींनी मांडणी केली. कविता लेखनाची वैविध्यपूर्ण शैली वाचकांना खिळवून ठेवणारी ठरली. जास्तीत जास्त कविता अपलोड करून कवींनी संमेलनाची रंगत वाढवली. त्यामुळे मटा कविसंमेलन पेज दिवसभर वाचकांच्या प्रतिक्रियांनी ओसंडून वाहिले.
वाचकांनी आवडलेल्या कवितांना ‘लाइक’, ‘कॉमेंट’च्या माध्यमातून दाद दिली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून साहित्य दालन समृद्ध करण्याचा उपक्रम वाचकांच्या पसंतीस उतरला. नवोदित कवींचा उत्साह वाढवण्यासाठी मान्यवर कवींनीही कविसंमेलनात सहभाग घेतला. कविता अपलोड करून या उपक्रमाचा उत्साह कायम ठेवला, तर सर्वोत्कृष्ट कवींना ‘राजहंस’ प्रकाशनाच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली.

सर्वोत्कृष्ट कवी
- सुनील उबाळे (नशीब)
- साधना कस्पटे (मला धावायचंय)
- रामप्रसाद वाव्हळ (आत्मघात)
- रमेश ठोंबरे (दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं)
- सागर कांबळे (नादवणाऱ्या घुंगराचं पैंजण)

‘मटा कविसंमेलना’ त एकूण १४० कविता होत्या. काही कवितात साचेबद्ध व आकलनाचा अभाव असला, तरी प्राथमिक पातळीवरील नक्की नाहीत. सर्वोत्कृष्ट कविता अल्पाक्षरी आहेत, मात्र कवीचे राजकीय आकलन चांगले आहे. अस्तित्वशून्य असण्यातील हतबलता काही कवितेत उत्तम मांडली आहे. प्रेमकविता आणि ग्रामीण कविता यांची सर्वाधिक संख्या होती. पण, ग्रामीण कविता केवळ भावनिक प्रतिक्रिया देणारी आहे. शेती उद्ध्वस्त झाली, असे सांगणारी कविता उद्ध्वस्त होण्याची कारणे शोधत नाही. बीटी क्रांतीसुद्धा शेती उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत आहे. या गोष्टी कवीने समजून घेतल्या पाहिजे. सोशल मीडियामुळे कवी म्हणून तुमची ओळख निर्माण करता येईल. पण, कवी म्हणून पुढे जाण्याचा प्रवास निश्चितच वेगळा आहे. नवीन पिढीतील कवींनी याचा विचार केल्यास मराठीत अधिक समृद्ध कविता वाचायला मिळेल. ‘मटा’चा उपक्रम कवींचा उत्साह वाढवणारा आहे.
- संदीप जगदाळे, परीक्षक

‘मटा कविसंमेलना’तील सर्वोत्कृष्ट पाच कविता खूप वेगळ्या आहेत. सुनील उबाळे यांच्या कवितेचे नाते थेट नारायण सुर्वे यांच्या कवितेशी आहे. वैयक्तिक जीवन आणि कवीचा संघर्ष या दोन पातळीवर उबाळे यांची कविता समरस झाली आहे. या कवींचे आशय सांगण्याचे सूत्र समान आहे. जगण्याचे आकलन सांगणारी ही कविता आहे. काव्यात्मक यथार्थता सांगणारी कविता मानवतेचा संदेश देते. ग्रामीण कविता गौरवीकरण करणारी असून व्यावहारिक उत्तरे भावनिक पातळीवर शोधत आहे. या कवितेच्या प्रांतात वेगळे प्रयत्न आवश्यक आहेत. फेसबुक कविसंमेलनात सहभागी होऊन नवोदित कवींनी उत्तम आशयाच्या कविता मांडल्या ही जमेची बाजू आहे.
- रवी कोरडे, कवी

वाड्:मयीन नियतकालिकांची संख्या कमी झाल्यामुळे कवितांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. सोशल मीडिया उपलब्ध असला तरी त्याला मर्यादा आहेत. तसेच कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याची वाचकांची सवय मोडली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने फेसबुक कविसंमेलन घेऊन नवीन व्यासपीठ उपलब्ध केले ही समाधानकारक बाब आहे.
- श्याम देशपांडे, ‘राजहंस’ प्रकाशन

नशीब

ती रोजच वाटत असते पाट्यावर
हिरव्या मिरच्यासोबत...
तिचं नशीब आणि पोरी गुण गातात
मैत्रिणीच्या माय बापाचे
तेव्हा माझी कविता उशाशी ठेवून
मी पाहत असतो;
पत्र्यातून थेट आकाशाकडं
सारं खटलं बाजारागत
ओरडत असतं
माझ्या भवताल ....
चुल पेटती ठेवली
म्हणून काय झालं?
चार खिळे मारू शकत नाही
घराच्या दाराला
याचं दु:ख लपवता आलं नाही आजवर
आजवर मी काहीच देवू शकलो नाही या घराला
या घरानेच काही कविता टाकल्या
माझ्या झोळीत विजेसारख्या...
आणि बघतोय तमाशा
माझा; खटल्याचा आणि कवितेचा...
- सुनील उबाळे (औरंगाबाद)

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
हे शहर सुस्तावलं की,
मला आठवते गावाकडची...
पहिल्या पावसातली लगबग.
शहरातले रस्ते पावसात निर्जन झालेले असतात
अन् गावाकडचे रस्ते
ओसंडून वाहत असतात,
पहिल्या पावसाने सुखावलेल्या उत्साही मनासकट !
शहरातल्या रस्त्यांवर उडत राहतात
नव्या कोऱ्या कडक इस्त्रीला डागाळणारे शिंतोडे
अन् गावच्या चिकनमातीत रुतत जातात
गुडघ्यापर्यंत पाय विनातक्रार.
शहराला कौतुक...
डांबरी रस्ते भिजवणाऱ्या स्वच्छ पावसाचं
अन् गावाला आस
बांध फोडून वाहणाऱ्या मातीमिश्रीत गढूळ पाण्याची.
शहरातल्या नाल्यात
गुदमरतो पाण्याचा जीव
अन् गावच्या नदीत मोकळे होतात
निपचित पडलेले अगणित श्वास
दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
गोठ्लेल्या मनाला फुटू लागतात घुमारे
अन् विद्रोही मन भटकत राहत एकटच माळरानावर...
द्विधेत असलेल्या शरिराशिवाय
निस्संकोच !
- रमेश ठोंबरे (औरंगाबाद)

मला धावायचंय

लाल सूर्यही हल्ली पिवळा दिसू लागलाय..
दुधाळ शुभ्र चंद्रही थोडा डागाळ वाटू लागलाय..
टिपूर चांदणंही विमानाच्या प्रकाशात,
फिकं वाटू लागलंय..
निसर्ग बदलतोय..
पण मी..
मी अजुनही तिथेच आहे..
स्थितप्रज्ञासारखी..स्तब्ध..अचल..
फ्लॅट बदललाय..
कॉटही बदललाय..
खुर्ची आणि कपाटही..
पडदे आणि खिडकीही..
खिडकीतून एकेकाळी संथ वाटणारं शहर,
आज मेट्रोच्या गतीने धावतंय..
पण मी..
मी अजूनही तिथेच आहे..
स्थितप्रज्ञासारखी..स्तब्ध..अचल..
निसर्ग सजीव म्हणून तो बदलतोय..
पण निर्जिव कचऱ्याच्या ढिगांनाही जागा बदलताना पाहिलंय मी..
रस्त्यांना खड्डे पडताना आणि बुजताना पाहिलंय मी..
वर्षानुवर्षे जमा झालेली धूळ..
क्षणात प्रवाहात वाहून जाताना पाहिलीय मी..
पण मी ..
मी अजूनही तिथेच आहे..
स्थितप्रज्ञासारखी..स्तब्ध..अचल..
चाकांचा आधार घेवूनही मी
दोन पायांवर उभी राहू शकत नाही..
मला उठायचंय..
मला चालायचंय..
मला धावायचंय..
रोज स्वप्नात ज्या भितींचा आधार घेवून उठते,
त्या भितींशिवाय उठायचंय..
ज्या कोपऱ्यापर्यंत जावून पडते,
त्या कोपऱ्याच्याही खूप पुढे धावायचंय..
माझ्यासमोर थांबून..मला भेडसावणाऱ्या,
भूतकाळाच्या सावलीला हरवायचंय..
मला धावायचंय...
खूप धावायचंय.
- साधना वालचंद कस्पटे (पुणे)

आत्मघात

हा गडद होत चाललेला अंधार
या आर्त किंचाळ्या
हातात झेंडे
तोंडात जात-धर्म
आणि डोळ्यात विध्वंस घेऊन
माणसं कुठे निघालीत ?
माणसं भुकेली
खंगलेली
दुभंगलेली
तरी उन्मादी माणसं
मीही माणसांच्या कक्षेत...
माझे हात गळून पडावेत
डोळे आंधळे व्हावेत
तोंड बंद पडावे
बहिरेपण यावे
बुद्धी भ्रष्ट व्हावी....
काही लिहावं तर हातांचा थरकाप होतोय
मी कवी आहे
असा आत्मघात करून
घेणार नाही !
- रामप्रसाद वाव्हळ


नादावणाऱ्या घुंगराचं पैंजण

'नादा'वणार्या घुंगराचं पैंजण
फेकून दे
खणखणणारी कांकणे
फोडून टाक
कानांना मोकळे कर
बहिर्या कर्णफुलांपासून
नाकांना आता बस्स झाला
वेदनागंध
गळ्याभोवतीचा सोनेरी फास
तोडून टाक
केस मोकळे सोड,
हलकी हो पूर्ण
जाळून टाक युगायुगाचा
करकचलेला दुबळेपणा
हिप-हॉप करायला लाग,
नवी शक्ती संचारेल सर्वांगात
आता तुला कोणतीही
वेदना रडवू शकणार नाही
कोणतेही बंधन
रोखू शकणार नाही
कोणतीही माया
भूलवू शकणार नाही...
- सागर कांबळे (पुणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजातील दानशूरांनी केलेल्या मदतीची पदोपदी जाणीव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘क्षमता असून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’ने अधार दिला. हेल्पलाइनच्या माध्यमातून शहरातील दानशूरांनी दिलेल्या मदतीमुळे शिक्षणाला मोठा हातभार मिळाला.
नागरिकांची मदत, आमची मेहनत यावर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. समाजाचे हे पाठबळ पदोपदी जबाबदारीची जाणीव
करून देते,’ अशा भावना ‘मटा हेल्पलाइन’मधून मदत मिळालेल्या अन् वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या वाटेवर असलेल्या जितेंद्र सुलक्षणे, पूजा अग्रवाल, चैताली पानकडे, कृष्णा ढवळापुरे, सुभद्रा चिखलोंढे यांनी व्यक्त केल्या. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दहावीत मला ९३ टक्के गुण मिळाले. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने पुढील शिक्षण घेऊ शकेल की नाही, अशी चिंता होती. पुढील शिक्षणाच्या प्रश्नाचे विचार मनात घोळत असताना ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून मदतीचा हात पुढे आला. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दानशूरांनी पुढे येऊन मदत केली. त्यांचे ऋण आम्ही विसरणे शक्य नाही. सध्या मी भगवान फार्मसी कॉलेजला बीफार्मसी अभ्यासक्रमाला तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. फार्मसीतील संशोधनात मला रस असून, सध्या मी ‘जी-पॅट’, ‘आयपर’सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारीही करते आहे. माझ्या क्षेत्रात नवीनवीन संशोधन करत मला माझे ध्येय गाठायचे आहे. ही वाटचाल करत असताना आपल्याला नागरिकांनी केलेल्या मदतीची कायम शिदोरी सोबत असेन.
- सुभद्रा चिखलोंढे

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ते श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र कॉलेजमध्ये मेकॅनिकल विद्याशाखेतील प्रवेश. माझ्या या प्रवासात ‘मटा हेल्पलाइन’चा मोठा आधार आहे. पाचवी ते नववीपर्यंतच जेमतेम शिक्षण. दहावीला अभ्यास केला, चांगले गुण मिळाले, परंतु पुढील शिक्षणाचे काय, असा प्रश्न मनात होता. आमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत. क्षमता असूनही दहावीनंतर शिक्षण त्यांना घेणे जमत नाही. ही दरी हेल्पलाइनमुळे दूर केली. दहावीनंतर पॉलिटेक्निक पूर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. पदवीनंतर मी एक वर्ष नोकरीकरून ‘एमएस’ची तयारी करणार आहे. ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून लोकांचे पाठबळ मिळाले अन् मी हा प्रवास करू शकलो, हीच माझी संपत्ती आहे. चांगले शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कायम पुढे असेल.
- जितेंद्र सुलक्षणे

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण थांबण्याची शक्यता होती. त्याचवेळी ‘मटा हेल्पलाइन’चा आधार मिळाला. नागरिकांनी दिलेले आर्थिक पाठबळ प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे. त्यातून शिक्षणाचा पुढील प्रवास सुरू झाला. पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत शिक्षण घेत आहे. आपल्याला सर्वांनी मदत केली, शिक्षणासाठी बळ दिले, त्यांच्या ऋणातून उतराई होता येणार नाही. त्यांच्या मदतीची जाणीव ठेवत, शिक्षण पूर्ण करणार आहे. सध्या मी अभियांत्रिकीच्या शिक्षणासह ‘गेट’ची तयारी ही करतो आहे. माझ्या क्षेत्रात स्थिरावल्यानंतर आर्थिक परिस्थितीवर मात करत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे असेल.
- कृष्णा ढवळापुरे

दहावीपर्यंत खाजगी शिकवणी न लावता शिक्षण पूर्ण केले. दहावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्याचे निश्चित केले होते. सीईटी स्पर्धात्मक परीक्षासारखी असल्याने शिकवणी आवश्यक, परंतु घरची आर्थिक परिस्थिती फी भरण्यासारखी नाही. शिकवणीचेच शुल्क पाहून टेन्शन आले. आई-बाबाही थोडे तणावात होते की पुढचे शिक्षण कसे होईल. त्याचवेळी बाबांच्या मित्रांनी ‘मटा हेल्पलाइन’बाबत कल्पना दिली. ‘मटा’कडूनही चौकशी, विचारपूस केली गेली अन् त्यानंतर माझी मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी एक प्रकारचे बळ मिळाले. अकरा-बारावीचे शिक्षण सरस्वती भुवन कॉलेजमध्ये पूर्ण केले. इंजिनीअरिंग ‘सीईटीची तयारी सुरू केली. परीक्षेदरम्यान वडिलांचा अपघात झाला, दोन महिने ते दवाखान्यात होते. अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ न देता, सीईटीमध्ये चांगले गुण मिळविले. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजलाच प्रवेश मिळाला. आयटी शाखेत मी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करते आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने ते मागे पडतात. हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांनी भरघोस मदत केली, त्याची जाणीव कायम मनामध्ये असते. माझे ध्येय आयआयटी शिक्षण घेण्याचे होते, परंतु मी कमी पडले, असे कधीकधी वाटते. आता पदवीचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. ज्यांनी मदत केली त्यांना मला थँक म्हणावे वाटते. हेल्पलाइनची एक साखळी तयारी होत आहे. आम्हाला मदत झाली, त्यामुळे आम्ही पुढे जाऊ, पुढे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करू. ही मदतीची साखळी अशीच वाढत जाईल.
- पूजा अग्रवाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांना अपरात्री मारहाण, लूटमार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज एमआयडीसीमधील कामगारांना रात्री-अपरात्री होणारी मारहाण व लूटमार सुरू आहे. ‍विशेष म्हणजे वडगाव कोल्हाटी, रांजणगाव रोड, साजापूर फाटा आदी परिसरातील शॉर्टकट रस्ता वापरणाऱ्या कामगारांना पाळत ठेऊन मारहाण करून लूटण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री एका कामगाराला तीन अनोखळी व्यक्तींनी मराठवाडा ऑटो कॉर्नरजवळ अडवून मारहाण केली.
प्रकाश ऊर्फ दशरथ डेंबरे (वय ३६, रा. सारा वृंदावन फ्लॅट नंबर ५ वडगाव कोल्हाटी) हे रविवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर मोटारसायकलवरून (एम एच २०, सी एल ९८९०) घरी परत जात होते. एनआरबी कंपनीपासून सिडको-वडगाव कोल्हाटी या शॉर्टकट रस्त्याने जात असताना अचानक तिघांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. तीन अनोळखी व्यक्तींनी लाठ्या काठ्याने मारहाण केली, डाव्या पायावर व पोटरीवर मार देऊन ते पळून गेले. या अनोळखी व्यक्तींनी का मारहाण का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या परिसरातून जाणाऱ्यांना सोबत हा प्रकार नेहमीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या कामगारांमध्ये भीती पसरली आहे. वाळूज एमआयडीसीमधून कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना मारहाण व लूटण्याच्या घटना घडत आहेत. वडगाव कोल्हाटी, रांजणगाव रोड, साजापूर फाटा आदी परिसरात त्यांना अडवून पैसे, मोबाइल आदी ऐवज हिसकावून घेतला जात आहे.

किरकोळ रक्कम
कामगारांकडे फार पैसे नसतात. खिशात अगदीच किरकोळ रक्कम असते. पण ती सुद्धा मारहाण करून लूटण्यात येत आहे. एवढ्या कमी पैशाची लूटमार झाल्याची फिर्याद देणे कामगार टाळत आहेत. याचाच लाभ भामटे उठवित असल्याचे कामगारांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुलूस-ए-मुहम्मदी शहरात उत्साहात

$
0
0

म टा प्रतिनिधी, औरंगाबाद
र्इद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहागंज येथील हजरत नि​जामोद्दीन चौकातून सोमवारी ‘जुलूस- ए- मुहम्मदी’ चे आयोजन करण्यात आले होते. नाते रसुलच्या गजरात निघालेल्या या जुलूसमध्ये उंट, घोडे, घोडागाडीचा सहभाग होता. शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी या जुलूसचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले.
शहागंज येथील हजरत निझामोद्दीन दर्गा चौकात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘जुलूस- ए -मुहम्मदी’ची सुरवात झाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कमिटीचे अध्यक्ष डॉ. शेख मुर्तुझा, हिदायत उल्लाह तर्रार, असदउल्लाह तर्रार, काझी शकील, सदर काझी हाजी आरेफोद्दीन मुशीर हसन, मुकर्रम बागवाला, रजा अकादमीचे आसिफ रजा, मुफ्ती मोहम्मद निसार अहेमद पिशोरी, मुफ्ती सरदार सहाब, अॅड. झियाउद्दीन बियाबाणी, अख्तर अली, माजी महापौर रशीदखान मामू, मनमोह​नसिंह ओबेरॉय, सुरजितसिंह खुंगर, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, डॉ. पवन डोंगरे, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
हा जुलूस राजाबाजार, नवाबपुरा, जिन्सी चौक, चंपाचौक, शहाबाजार, चेलीपुरा, मंजूरपुरा, लोटाकांरजा, बुढी लेन महापालिका मुख्यालयासमोरून मुख्य टपाल कार्यालयासमोरील रस्त्याने सिटीचौक, गांधी पुतळा मार्गाने शहागंज येथील हजरत निजामोद्दीन चौकात ध्वजवंदन करून जुलूसचा समारोप झाला.

तीनशेच्या वर युवकांनी केले रक्तदान
‘जमात -ए- इस्लामी’ हिंदच्या यूथविंग वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ३०० हून युवकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी शेख जमीर, आदिल मदनी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

खुलताबादला जाण्यासाठी गर्दी
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहागंज, मध्यवर्ती बसस्थानक तसेच चंपा चौक येथून खुलताबाद येथील जर जरी बक्ष दुल्हा दर्गाह, बावीस ख्वाजा दर्गाह येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बस गाड्यांची ​व्यवस्था करण्यात आली होती. सिडको आगार प्रमुख ए. यू. पठाण,वाहतूक निरीक्षक गायकवाड यांच्यासह विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांची उपस्थिती होती.

सुट्या पैशांचा फटका
एसटीतून औरंगाबाद ते खुलताबाद प्रवासासाठी २३ रुपये तिकिट ठेवण्यात आले. कंडक्टरकडे सुटे नसल्याने प्रवाशांचे भांडण झाले. यामुळे काही बस परत शहागंज येथे आणाव्या लागल्या. प्रवाशांची समजूत काढून या गाड्या पुन्हा खुलताबादकडे रवाना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनेते मुंडे यांना शहरात अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती सोमवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे वाहनफेरी, अभिवादन सभा आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जय भगवान महासंघ
जय भगवान महासंघातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जालना रोडवरील मुंडे यांच्या नियोजित स्मारकस्थळी अभिवादन करण्यात आले व तेथून महासंघाचे संस्थपक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली शहरातून वाहनफेरी काढण्यात आली. विशाल सानप, संतोष जाधव, अरूण गडवे, राहुल निकम, लक्ष्मण थोरात, सिद्धार्थ शिंदे, रोहन हिवराळे, शिवम वानखेडे, कुंदन दुधाने, अक्षय दिलपाक, संतोष सुरडकर, शरद हिवराळे आदी सामील झाले होते. ही फेरी क्रांतिचौक, पैठण गेट, भडकल गेट, किलेअर्क, टीव्ही सेंटर, जकात नाकामार्गे जाऊन सेव्हन हिल उड्डाणपूलनजिकच्या भगवान बाबा मंदिरात सांगता करण्यात आली.

भाजपतर्फे अभिवादन
उस्मानपुरा येथील भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात अभिवादन सभा झाली. सरचिटणीस दिलीप थोरात यांनी लोकनेते मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपाध्यक्ष जालींदर शेंडगे, नंदकिशोर चरखा, स्मिता दंडवते, प्रल्हाद निमगावकर, राजेश पाटील, ताराचंद गायकवाड, रंगनाथ राठोड, मनीषा भन्साली, शालिनी बुंधे, अजय शिंदे, प्रकाश वाणी, सचिन जैन, मृणाली फुलगीरकर, सीमा वाघ, हरीश वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलाचे गेट पडून सुरक्षारक्षक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागीय क्रीडा संकुलाचे मुख्य प्रवेशव्दार पायावर पडल्याने सुरक्षारक्षक जबर जखमी झाला आहे. त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
ही घटना रविवारी (११ डिसेंबर) सकाळी पाच वाजता घडली. एका स्पर्धेच्या निमित्ताने पाच वाजता गेट उघडताना काही व्यक्तींनी घाई केली. त्यात विभागीय क्रीडा संकुलाचे मुख्य गेट सुरक्षारक्षक के. टी. पाटील यांच्या उजव्या पायावर पडले. त्यात त्यांच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली. ईएसआय दवाखान्यात त्यांना शिफ्ट करण्यात येणार असून तेथेच त्यांच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांतील संकुलातील ही तिसरी दुर्घटना आहे. एक बॅडमिंटनपटू व एक अॅथलीट खेळाडू अलीकडेच जखमी झाले होते. त्यात आता सुरक्षारक्षक गंभीर जखमी होण्याची घटना घडली आहे. पाटील हे खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून संकुलात काम करत आहेत. जखमी झालेले सुरक्षारक्षक पाटील यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने उपचाराचा खर्च व मदत मिळावी अशी अपेक्षा के. टी. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड या घटनेबद्दल बोलताना म्हणाले, ‘संकुलाचे गेट पडून पाटील जखमी झाले. ही घटना दुर्देवीच आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमआयए अव्वल, दिल्लीत देणार बक्षीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील विविध संस्थांच्या प्रमाणीकरणासाठी अग्रगण्य असलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या तपासणीत औरंगाबादमधील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) या औद्योगिक संघटनेला गोल्डन हे अव्वल रेटिंग मिळाले आहे. राज्यातून अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी सीएमआयए ही कदाचित दुसरी संघटना आहे. संघटनेचा दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान बहुमान केला जाणार आहे.
एखाद्या कंपनीत, ऑफिसमध्ये कार्यपद्धतीसोबतच कार्यालयाचे सेटअप व अन्य गोष्टी पाहून त्याचे आयएसओ मानांकन दिले जाते. त्या धर्तीवर उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचे ऑडिट, तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था कार्यरत आहे. २०१५ मध्ये या संस्थेने सीएमआयएचे ऑडिट केले होते. ५० पॅरामीटर तपासून सीएमआयएला गोल्डन रेटिंग दिले गेले. सीएमआयएला अव्वल रेटिंग मिळाली. त्याबद्दल दिल्लीत एका कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या भविष्यातील ज्या योजना असतील. त्याच्या अंमलबजावणीसाठी आमची संघटना पात्र ठरणार आहे. त्याचा औद्योगिक विकासाला निश्चितच फायदा होणार आहे.
- गुरप्रीतसिंग बग्गा, अध्यक्ष सीएमआयए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपली मुले संस्थेत वर्धापनदिन साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या श्यामसुंदर कणके गुरुजी यांच्या ‘आपली मुले’ या संस्थेत मटाने पाचवा वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालनपोषण कणके गुरुजी करीत आहेत. आता त्यांच्याकडे ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनी असून त्यांचे शिक्षण आणि संगोपन कणके गुरुजींची ‘आपली मुले’ ही संस्था करते. सतत नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात व त्यामुळे उपासमारीबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण होतो. हे पाहून कणके गुरुजींनी २००४मध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली.
कणके गुरुजी यांनी मराठवाड्यातील भीषण परिस्थितीची माहिती दिली. मराठवाड्यातील निर्माण झालेल्या या आपत्तीमध्ये समाजाने दुष्काळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासन किंवा समाज गेल्या दोन वर्षांचा विचार करते, २००१ पासून शेतकरी मराठवाड्यात आत्महत्या करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे विशेषतः मुला-मुलींचे बेहाल होतात, असे विद्यार्थी त्यांच्या शाळेत आहेत असे त्यांनी सांगितले. मुलामुलींची तक्रार असेल, तर ही मुले कणके गुरुजींकडे येतात. त्यांचे गाऱ्हाणे ते चुटकीसारखी सोडवतात. शाळा व हॉस्टेल जवळजवळ आहे. कणके यांनी स्वतःचे शेत विकून शाळा व हॉस्टेल बांधले आहे.

तीनशे मुलांचा सांभाळ
कणके गुरुजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या मुलांना शाळेत मोफत प्रवेश देतात. शिवाय या मुलांचे राहणे, जेवण, गणवेश, सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य याचा खर्च शाळाच करतेे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील २० महिला संस्थेत केअरटेकरचे काम करतात.यंदा त्यांच्या शाळेत ३०० मुलं-मुलींनी प्रवेश घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images