Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिसांची दादागिरी; एसटी गरीब बिचारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/वाळूज
पोलिसांच्या वाहनाबरोबर अपघात झाल्याची जबर किंमत एसटी महामंडळाला चुकवावी लागत आहे. अपघातानंतर पोलिसांनी एसटीची शिवनेरी बस ताब्यात घेतली. त्यावर कडी करीत अपघातग्रस्त पोलिस व्हॅन दुरुस्त करण्याचे फर्मान सोडले. एसटी महामंडळानेही पोलिसांच्या वाहनाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू केली आहे. दरम्यान, शिवनेरी बस बंद असल्यामुळे एसटीला रोज ३५ हजार रुपयांचा फटका बसत आहे.
पुण्याहून औरंगाबादला येणारी शिवनेरी बस (क्रमांक एमएच २० एस ९४३०) आणि पोलिसांची टू मोबाइल व्हॅन (क्रमांक एमएच २० सीयू ००८४) यांचा ९ डिसेंबर रोजी दहेगाव बंगल्याजवळ (ता. गंगापूर) रात्री दोनच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पोलिस व्हॅन तीन वेळा उलटून पडली. व्हॅनमधील तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी शिवनेरीचे चालक संतोष कोलते यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शिवनेरी बस वाळूज पोलिस ठाण्यात आणली. त्याच दिवशी दुपारी एसटीचे पथक बस ताब्यात घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले, पण ‘तपास बाकी आहे,’ असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले.
काही दिवसानंतर एसटीचे पथक पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळीही बस एसटी महामंडळाकडे सोपविण्यात आली नाही. ‘आमची टू मोबाईल व्हॅन आधी दुरुस्त करून द्या. मगच शिवनेरी बस परत घेऊन जा,’ असे त्यावेळी पोलिसांनी तोंडी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त व्हॅन एसटी कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठविली. या व्हॅनच्या दुरुस्तीचे काम एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत सुरू आहे.
पोलिसांची वाहने दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोटार वाहन विभाग असताना अपघातग्रस्त व्हॅन एसटीकडून दुरुस्त करून घेतली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत एसटी विभागाचे अधिकारीही काहीही सांगण्यास तयार नाहीत, मात्र अपघातग्रस्त व्हॅनच्या दुरुस्तीचे काम एसटीच्या कार्यशाळेत युद्धपातळीवर सुरू आहे.

रोज ३५ हजारांचा फटका
औरंगाबाद मध्यवर्ती आगाराकडे सहा व्होल्व्हो बस आहेत. दोन बस वेरूळ आणि अजिंठा येथे पर्यटकांसाठी पाठविण्यात येतात. उर्वरित चारपैकी एक बस मुंबईला पाठविली जाते. औरंगाबाद-पुणे मार्गावर तीन बस चालविण्यात येतात. एक बस पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे औरंगाबाद-पुणे मार्गावरील चार फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे एसटीला रोज ३५ हजार रुपयांचा फटका बसत आहे. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होत आहे.

अपघातग्रस्त वाहनांची आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी केलेली नाही. यामुळे ही बस पोलिस ठाण्यासमोर उभी करण्यात आली आहे. मोबाइल व्हॅन दुरुस्त करण्याचे काम पुण्याला होते. त्याचा औरंगाबादशी संबंध नाही. आरटीओच्या तपासणीनंतर ही गाडी परत एसटीला परत देण्यात येईल.
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, वाळूज पोलिस स्टेशन, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरू, विद्यार्थ्यांसाठी दररोज वेळ द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दररोज किमान दीड तासाचा वेळ द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गुरुवारी थाळीनाद करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत विद्यापीठ प्रशासन दुजाभाव करते आहे. विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले लंच होम बंद आहे. वसतिगृहात स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही, आरोग्य केंद्रामध्ये पुर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. निवेदन देऊनही प्रशासन कारवाई करत नसल्याने थाळीनाद करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आपल्या दौऱ्यांमुळे चर्चेत राहणारे कुलगुरू यांचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत, प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. थाळीनादनंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनाला प्रदेश सचिव अक्षय पाटील, विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे, शहराध्यक्ष राहुल तायडे, कार्याध्यक्ष मयूर सोनवणे, दीपक बहीर, गणेश फरताडे, विकास ठाले, दीपक काळजाते, स्वप्नील बोराडे, शिवंधर कोरडे, गौतमी सुरवसे, किरण अंभोरे, दीक्षा पवार, परमेश्वर काळे यांची उपस्थिती होती.

संघटनेच्या मागण्या
लंच होम तत्काळ सुरू करावे, पूर्णवेळ कुलसचिव, परीक्षा नियंत्रकांची नेमणूक करावी, वसतिगृह, विभागांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवावे, आरोग्यकेंद्रात तज्ज्ञ डॉक्टर-प्रशिक्षित कर्मचारी, यंत्रसामुग्री उपलब्ध करून २४ तास सुविधा द्यावी, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कुलगुरूंनी रोज दीड तास वेळ द्यावा, नवीन वसतिगृहात विद्यार्थिंनींना तत्काळ प्रवेश द्यावा, मुलांसाठी नवीन वसतिगृह बांधावे, वसतिगृह, ग्रंथालयास कुलगुरूंनी महिन्यातून एकदा भेट द्यावी, विद्यार्थी तक्रार निवादन दिन आयोजित करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रशास्त्र विद्यापीठाला जागा देण्यास नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला संलग्न होण्यासाठी ६० साठपेक्षा अधिक कॉलेजांनी तयारी दाखवली आहे. संलग्नीकरण प्रक्रियेच्या अनुषंघाने कॉलेज तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला जागा देण्यास राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी नकार दिला आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्ट कॉलेजांमध्ये सुसूत्रता यावी या हेतूने हे कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला संलग्न निर्णय घेण्यात आला. संलग्नीकरण बंधनकारक नसल्याने सर्व कॉलेजांनी उत्सुकता दाखविली नाही. २१ नोव्हेंबरपर्यंत ५९ प्रस्ताव आले होते, त्यात आणखी चार प्रस्तावांची भर पडली. संलग्नीकरणाच्या प्रक्रियेला विद्यापीठस्तरावरून सुरुवात झाली आहे. कॉलेजांची तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाचे औरंगाबाद, पुणे, मुंबई व नागपूर या चार शहरात केंद्र व पाच शहरात उपकेंद्र स्थापण्यात येणार आहे. केंद्र व उपकेंद्रासाठी सोलापूर वगळता राज्यातील इतर विद्यापीठांनी कॅम्पसमध्ये जागा देण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता आहे.

ओरंगाबादचे केंद्र नवीन वर्षात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या बहुतांशी अभियांत्रिकी कॉलेजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला संलग्न होण्याचे निश्चित केले आहे. शहरातील बड्या कॉलेजांचाही त्यात समावेश आहे. विद्यापीठाच्या घोषणेनुसार औरंगाबादमध्ये विद्यापीठाचे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र दीड ते दोन महिन्यात कार्यान्वित होईल, असे प्रशासनातील सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.

प्रस्तावांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून संलग्नीकरण समिती स्थापन करणे, कॉलेजांना भेट देत आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबतच विद्यापीठस्तरावर केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया त्यासाठी जागेची पाहणी, तेथील नेमणुका यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. विद्यापीठस्तरावरील प्रक्रिया ऑनलाइन करण्यावर भर असेल. दीड-दोन महिन्यात केंद्राची प्रक्रिया पूर्ण होईल.
डॉ. सुनिल भामरे,
कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

$
0
0

दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना अटक

चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकी चोरणाऱ्या दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सिडको पोलिसांनी आवळल्या. मोहम्मद आमेर उस्मान (वय २१) समीर देवीदास चित्ते (वय १९ रा. जुनाबाजार) अशी संशयिताची नावे आहे. त्याच्याकडून ४ लाख रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सिडको परिसरात दोन तरुण चोरीच्या दुचाकीवरून फिरत आहेत, अशी माहिती सिडको पोलिसांना मिळाली. त्याआधारे सहायक पोलिस आयुक्त डी. एन. मुंढे, पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी. के. पाचोळे, पोलिस कर्मचारी नरसिंग पवार, संतोष मुदीराज, रविदास खैरनार, जगदीश खंडाळकर, मनमोहनमुरली कोलीमी, इरफान खान, सुरेश भिसे, नरेंद्र दीक्षित किशोर गाडे यांनी एमजीएम जवळ सापळा रचला. दुचाकीवरून संशयित आरोपी जवळ येताच पोलिसांनी त्यांना पकडले. मोहम्मद आमेर उस्मान व समीर देवीदास चित्ते अशी संशयिताची नावे आहेत. ते वापरत असलेली दुचाकी काही दिवसांपूर्वी सिडको भागातून चोरली होती, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली. आरोपींच्या ताब्यातून ४ लाख रुपये किंमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडण सोडवणाऱ्या चार्ली पोलिसाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज एमआयडीमधील कोलगेट चौकातील फ्रेंड्स चायनीज हॉटेलसमोर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन चार्ली पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारूख शेख अहमद (वय ३६, रा. पडेगाव, अन्सार कॉलनी) व शेख जमीर शेख अहमद (वय २१, रा. पंढरपूर फुलेनगर) यांच्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच्या सुमाराल वाद सुरू होता. त्यावेळी पोलिसांच्या चार्ली पथकातील गणेश आंबाराव दौड व पोलिस शिपाई अमोल नंदू पैठणे हे जात होते. त्यांनी गर्दी पांगवून दोघांना वाद सोडवण्यास सांगितले. त्यावर तुमचे काही काम नाही, तुम्ही येथून जा, असे सांगून चार्ली पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी दौड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गौतम पंडगाळे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेचे व्यवहार बंद करणे संशयास्पद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नोटबंदीचा निर्णय घेताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवहार बंद करून खासगी बँकाना संपूर्ण व्यवहार करण्याची परवानगी देण्याचा केंद्र शासनाचा निर्णय संशयास्पद व भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पैठण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना पवार म्हणाले, सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे गरिबांचे नसून धनदांडग्यांचे आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाल भाव नाही, महागाई वाढत आहे आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे मागच्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात कुपोषण वाढत असल्याचा आरोप अजित पवार यानी केला.
आम्ही सत्तेत असताना पैठणच्या विकासासाठी प्राधिकरण, ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजना दिल्या. पैठण नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास यापुढेही पैठण शहराच्या विकासासाठी स्वतः लक्ष देणार असल्याचे आश्वासन पवार यांनी या प्रचार सभेत दिले.
माजी मंत्री सुरेश धस, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत घोडके, संजय वाघचौरे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल घोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार यावेळी मंचावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन घोडीचोरांना नागरिकांनी पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
आपल्या गावातील घोडी अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याचे लक्षात येताच घोडीच्या मालकास फोन करून विचारणा केल्यानंतर तिची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावरून तत्काळ पाठलाग करूनन नागरिकांनी दोन चारांना घोडीसह पकडले. ही घटना गुरुवारी तिसगाव परिसरात घडली.
तिसगाव परिसरातील रहिवासी योगेश रोरे याच्याकडे एक घोडी व एक शिंगरू आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे या जनावरांना सकाळी चरण्यासाठी सोडले होते. मोकळ्या मैदानात चरणाऱ्या या घोडीला घेऊन चार जण छावणी बाजाराच्या दिशेने निघाले होते. ही बाब गावातील एका त्या लक्षात आली. त्याने घोडीमालक योगेश रोरे यांना फोन करून घोडी विकली का, अशी विचारणा केली. त्यावर घोडी विकली नसल्याचे उत्तर मिळाल्याने ही चोरी असल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी पाठलाग करून चोरांना तिसगाव शिवारात पकडले. यावेळी दोघे जण पळून गेले. पण नागरिकांनी दोघांना पकडले. त्यांना व एक दुचाकी (एम एच २०, व्ही २३५४) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम मतदार निर्णायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
गेल्या १५ वर्षांपासून सत्तेच्या गणितात दूर फेकल्या गेलेल्या मुस्लिम मतदारांना या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. शहरातील सात प्रभागात मुस्लिम मतदार प्रभावी आहेत.
कन्नड शहराची लोकसंख्या ४० हजार ७५९ असून मतदार संख्या ३१ हजार ४७५ आहे. त्यामध्ये मुस्लिम मतदारांचा वाटा सुमारे १३ हजार आहे. नगरपालिकेत आतापर्यंत ६ ते ८ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. त्याची पुनरावृत्ती यावेळच्या निवडणुकीतही पाहण्यास मिळणार आहे. पण, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे मतदार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. प्रभाग ५, ८, ९, १०, ७मध्ये मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. प्रभाग १० व ११ मध्ये ते प्रभावी आहेत. या सात प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. या प्रभागामध्ये काँग्रेसचे गटनेते अब्दुल जावेद अब्दुल जावेद, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष अब्दुल रफिक अब्दुल गणी, बिल्डर अय्याज शहा, शेख असलम उर्फ खाजा सेठ, माजी नगरसेवक फकिरा रंगरेज, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवकुमार जैस्वाल हे निवडणूक लढवत आहेत. या समाजातील नातीगोती हा उमेदवारी देण्याचा निकष ठराला, सर्वच पक्षांंनी या रणनितीचा अवलंब केला आहे.

विकासाला प्राधान्य
या भागातील राहिवाशांना आतापर्यंत पिण्याचे पाणी व सार्वजनिक स्वछतागृह या प्राथमिक सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. हा भाग जुन्या कन्नड शहरातील असून येथे मुलभूत नागरी समस्या तीव्र आहेत. त्यामुळे यावेळी मुस्लिम मतदार धर्म व भावकीपेक्षा विकासाला प्राधान्य देताना दिसत आहेत. यामुळे नवख्या उमेदवारांची धडधड वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एका वेळी तीन सभा; कार्यकर्त्यांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त गुरुवारी संध्याकाळी विविध पक्षांच्या नेत्यांच्या एकाच वेळी तीन प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे कोणाची सभा ऐकावी यावरून शहरवासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर प्रचार सभेला गर्दी जमवण्यासाठी कर्यकर्त्यांची एकच धांदल उडाली.
नगरपालिका निवडणूक तीन दिवसांवर येवून ठेपल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने उमेदवारांची गर्दी झाली आहे. उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दररोज नेत्यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात येत आहेत. गुरुवारी, संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा खंडोबा चौकात घेण्यात आली. भाजपतर्फे माजी आमदार पाशा पटेल यांची नेहरू चौकात व एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी आमदार इम्तियाज जलील यांची भाजीमार्केट चौकात सभा आयोजित करण्यात आली. या तिन्ही प्रचार सभा एकाच वेळी असल्याने ‘कोणत्या नेत्यांची सभा ऐकावी’ यावरून शहरवासियांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
एखादी निवडणूक असल्याचा आम्हाला राज्य व देशस्तरावरील नेत्यांची भाषणे ऐकायला मिळतात. नगरपालिका निवडणुकीत आम्हाला बऱ्याच नेत्यांची भाषणे ऐकायला मिळाली. मात्र, गुरुवारी एकाच दिवशी व एकाच वेळी तीन नेत्यांच्या सभा आयोजित असल्याने केवळ एकच सभा ऐकायला मिळाली, असे शहरातील व्यापारी जयदीप दुशाल यांनी सांगितले. आपल्या नेत्यांच्या प्रचार सभेमध्ये अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सभेतील गर्दीपेक्षा जास्त गर्दी जमा करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागल्याचे पाहण्यास मिळाले.

या तीन सभा
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा खंडोबा चौकात घेण्यात आली. भाजपतर्फे माजी आमदार पाशा पटेल यांची नेहरू चौकात व एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी आमदार इम्तियाज जलील यांची भाजीमार्केट चौकात सभा आयोजित करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगसगिरीविरुद्ध डिजिटल कॅम्पेन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील अनेक मेडिकल कॉलेजांमध्ये सर्रास होत असलेल्या बनावट वैद्यकीय शिक्षकांच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेतर्फे लवकरच अधिष्ठातांपासून सहाय्यक प्राध्यापकांपर्यंत सर्वांची बायोमेट्रिक नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे कोणता वैद्यकीय शिक्षक एकाचवेळी कुठे-कुठे कार्यरत आहे, हे स्पष्ट होणार आहे. याच धर्तीवर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून डिजिटल कॅम्पेन हाती घेतले जाणार आहे. शिवाय सर्व महाविद्यालयातील शिक्षकांचे पदवी व पदव्युत्तरस्तरावरील कामाचे मूल्यमापन ऑनलाइन करण्यात येणार आहे.
केवळ ‘एमसीआय’च्या तपासणीसाठी बनावट वैद्यकीय शिक्षकांना कशा पद्धतीने लाखोंचे पॅकेज वाटप होते व त्यासाठी देशभर कशा पद्धतीने भरती सल्लागार संस्था कार्यरत झाल्या आहेत, याकडे ‘मटा’ने मंगळवारी (१३ डिसेंबर) लक्ष वेधले. या संदर्भात हाती लागलेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग व ई-मेलद्वारे वैद्यकीय शिक्षणातील बोगसगिरी ‘मटा’ने चव्हाट्यावर आणली. त्याचवेळी अशा पॅकेजचे लाभार्थी औरंगाबाद शहरामध्ये किमान दोन डझन असल्याचे समोर आले आहे. त्याकडे ‘मटा’ने बुधवारच्या अंकात लक्ष वेधले. या गंभीर विषयाकडे ‘मटा’ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे लक्ष वेधले असता, विद्यापीठाकडून कठोर पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील अधिष्ठातापासून ते प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकापर्यंतच्या सर्वांच्या हजेरीची बायोमेट्रिक नोंद ही ‘एमसीआय’शी जोडली जाणार आहे. त्यामुळे कोणता वैद्यकीय शिक्षक कुठे कार्यरत आहे, हे लक्षात येऊन एकाचवेळी अनेक महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्यांवर आळा बसेल. याच ‘एमसीआय’च्या डिजिटल कॅम्पेनच्या धर्तीवर विद्यापीठाकडूनही अनेक पावले उचलली जात आहेत. केवळ शिक्षकांची उपस्थिती उपयोगाची नाही, तर शिक्षकांनी भावी डॉक्टर घडवणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक काय शिकवतात, युजी-पीजी अॅक्टिव्हिटी काय, किती व कसे घेतात, प्रयोगशाळेमध्ये कुठले व किती प्रयोग घेतले जातात आदी सर्व शैक्षणिक उपक्रमांची ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे डिजिटल कॅम्पेन सुरू केले जाणार आहे आणि त्यामुळेच ‘एमसीआय’कडे झालेल्या वेगवेगळ्या अधिकृत शैक्षणिक नोंदीला विद्यापीठामार्फत क्रॉसचेक केले जाऊ शकेल. परिणामी, अधिकाधिक पारदर्शकता येईल व वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक वाढू शकेल. हे डिजिटल कॅम्पेन विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, दंत महाविद्यालयांमध्ये राबवण्याचा प्रयत्न असेल, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

आता थेसिस ऑनलाइन
विद्यापीठाअंतर्गत सर्व विषयांचे थेसिस आता ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. सर्व प्रकारचे शैक्षणिक सबमिशन देखील ऑनलाइन पद्धतीने होत आहे. ते भविष्यात अधिकाधिक प्रमाणात वाढविण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

६३ परीक्षा सेंटरवर सीसीटीव्ही
विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या सुमारे ६३ परीक्षा सेंटरवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कुठल्या सेंटरवर गडबड झाल्याचे लक्षात आले किंवा तसा आरोप झाला, तर तातडीने खात्री करणे शक्य झाले आहे. उर्वरित परीक्षा केंद्रांवरदेखील सीसीटीव्ही बसविण्यात येतील, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द
एकाचवेळी वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘फूल टाईम’ काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय शिक्षकांना भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) अलीकडेच सहा महिने ते एका वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे. या निलंबित कालावधीमध्ये सर्व सहा वैद्यकीय शिक्षकांना कुठल्याही स्वरुपाचा वैद्यकीय व्यवसाय किंवा वैद्यकीय शिक्षक म्हणून काम करता येणार नाही. निलंबित शिक्षकांमध्ये काही शिक्षक हे मराठवाड्यातील असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपाजवळून हायवा ट्रक चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज औद्योगिक क्षेत्रात पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत पार्किंग केलेल्या हायवा ट्रकला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. पंढरपूर येथील पंपावरून हायवा ट्रक चोरीला गेल्याची घटना ताजी असातना शिवराई टोलनाक्या जवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत उभा केलेला ट्रक चोरीला गेला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवराई टोलनाक्याजवळ असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपावर हायवा ट्रक (एम एच १२, ई एफ ३१२३) उभा करून मालक दादाराव राऊत व चालक बाळू काकडे व सुपरवायझर ज्ञानेश्वर निवृत्ती मोरे हे तिघे ४ डिसेंबर रोजी घरी गेले होते. त्यानंतर एक-दोन येऊन ट्रक सुरू करून पुन्हा त्याच ठिकणी उभा करून घरी गेले. त्यांनी ९ डिसेंबर रोजी ट्रक पाहिला, त्यानंतर ११ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ट्रक पाहण्यासाठी आले असता तो दिसला नाह. याप्रकरणी ट्रकमालक दादाराव राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरुद्ध साडेसात लाख रुपयांच्या ट्रकचोरीप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा संशय
वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत थांबवलेले हायवा ट्रक चोरीस जात आहेत. त्यामुळे वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी तत्काळ पेट्रोल पंप चालकांची बैठक बोलविली होती. पण, ट्रक चोरी झालेल्या पंप चालकाने बैठकीला दांडी मारली. यामुळे पोलिसांकडून पेट्रोल पंपावरील कामगारांवर संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या पेट्रोल पंपास महापालिकेची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस आयुक्तालयातील पेट्रोल पंपासाठीच्या ना हरकत प्रमाणपत्राचे (फायर एनओसी) नुतनीकरण केले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिस आयुक्तालयाला नोटीस बजावली आहे, अशी माहिती अग्निशामक दल प्रमुख सय्यद जफर यांनी दिली.
पोलिस आयुक्तालयात पोलिसांच्या वाहनांकरिता पेट्रोल पंप आहे. हा पंप स्थापन करताना पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते. पण, त्यानंतर प्रमाणपत्राचे नुतनीकरण केलेले नाही. पालिकेने पाठवलेल्या नोटीसमध्ये नुतनीकरणाची विचारणा करण्यात आली आहे. पालिका अग्निशामक दलाच्या नियमानुसार सुरक्षा उपाययोजना करावेत, उपाययोजना केली नसल्यास कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगपुरा येथील फटका मार्केटला आग लागल्यानंतर पालिका हद्दीमधील इमारती, पेट्रोल पंप, महत्त्वाच्या आस्थापनांच्या ना हरकत प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये प्रमाणपत्राचे नुतनीकरण केले नसल्याने शहरातील ५२ पेट्रोल पंपांना पालिकेने नुतनीकरणाकरिता नोटीस बजावली आहे. रहिवासी क्षेत्रात झालेली वाढ व सुरक्षा उपाययोजना नसलेले काही पंप बंद करण्याची नोटीस काही पंपाना दिली आहे. कालांतराने पालिका हद्दीत आलेल्या पंपचालकांनीही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.

बसस्थानकातील पंपाकडे डोळेझाक
पोलिस आयुक्त कार्यालयातील पेट्रोल पंपाला नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, बसस्थानकातील एसची महामंडळाच्या पंपाला अद्याप नोटीस दिलेली नाही. एसटी महामंडळाने पेट्रोलपंप सुरू करताना ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते, त्याचे नुतनीकरण केलेले नाही. एसटी महामंडळाच्या पंपाला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची माहिती विभागीय नियंत्रक रा. ना. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळा सरल्यानंतर दूध उत्पादनात वाढ

$
0
0


म. टा. प्र्रतिनिधी, बीड
दुष्काळीस्थितीत मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनात घट झाली होती. मात्र, यावर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये जिल्ह्याचे दूध उत्पादन एक लाख २२ हजार लिटरवर पोचले आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका माणसाबरोबर जनावरांना बसला होता. दुष्काळीस्थितीत चारा आणि पाण्याअभावी अनेक जनावरांच्या दावणी ओस पडल्या होत्या. जिल्ह्यात आठ लाख २२ हजार पशुधन असताना दुष्काळीस्थितीत मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घटले होते. २०११ पासून सलग काही वर्षे दुष्काळी स्थिती होती.सलग काही वर्षे पडलेल्या कमी पावसाने माणसाबरोबर पशुधनावर विपरीत परिणाम झाला. चारा आणि पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना जनावरे दावणीला पाळणे अडचणीचे झाले होते. पावसामुळे चारा कमी झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दोनशेहुन अधिक गुरांच्या छावण्या सुरु केल्या. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात तब्बल अडीच लाखाच्या जवळपास पशुधन या छावण्यातून सांभाळले.या दुष्काळामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम झाला.
जिल्ह्यात दुष्काळी संकट येण्यापूर्वी दोन लाख ५० हजार लिटर दूध उत्पादन होत होते. मात्र, या दूध उत्पादनास दुष्काळाचा फटका बसला. मे २०१६ मध्ये एक लाख दहा हजारवर येऊन ठेपले. मात्र, यावर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. जिल्ह्यात १२५ टक्के म्हणजे ८३५ मिलिमीटर पाऊस झाला. या पडलेल्या पावसामुळे दुधाळ जनावरांना गवत, मका, चारा उपलब्ध झाले. जिल्ह्यात एकूण मोठी चार लाख ६१ हजार मोठी जनावरे आहेत. यामध्ये एक लाख ७९ हजार ७२९ दुधाळ जनावरे आहेत. यामध्ये ४५ हजार ५१५ संकरित गायी, देशी गायी ५४ हजार ४४६ व ६९ हजार ७४८ म्हशी अशा जनावरांचा समावेश आहे.
या दुधाळ जनावरांच्या दुधात वाढ व्हावी यासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आशा संजय दौंड यांनी दिली. यावर्षी आपल्या विभागाने शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करावी म्हणून त्यांना वैरण बियाणे वाटप करण्यात आले. त्यासोबतच संकरीत गवताचे वाटप करण्यात आले. चारा पिकाखालील क्षेत्र वाढाविण्यासाठी योजनेवर भर देण्यात आल्याचे सांगितले.
या सर्व प्रयत्नामुळे जिल्ह्यात दूध उत्पादन वाढते आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये जिल्ह्याचे दूध उत्पादन एक लाख २२ हजार लिटरवर पोचले असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी सुनील तुंबारे यांनी दिली.



उन्हाळ्यापेक्षा सहा महिन्यांत दहा हजार लिटर दूध वाढले आहे. आगामी काळात जिल्ह्यात चारा उपलब्ध असल्याने दूध वाढण्यास मदत होणार आहे.
सुनील तुंबारे, पशुसंवर्धन अधिकारी, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्लास्टिक सर्जरी’ महायज्ञात १६० शस्त्रक्रिया

$
0
0

‘प्लास्टिक सर्जरी’ महायज्ञात १६० शस्त्रक्रिया
नऊ महिन्यांच्या तान्हुल्यापासून ते तरुणांपर्यंतच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मातेचे दूधदेखील पिता न येणाऱ्या व दुभंगलेल्या ओठांसह जन्मलेल्या ९ महिन्यांच्या तान्हुल्यापासून ते अपघातामुळे चेहऱ्यावर पडलेले डाग, भाजल्याच्या खुणा, टाक्यांच्या खुणांमुळे आलेले वैगुण्य प्लास्टिक सर्जरी महायज्ञात दूर झाले आणि सामान्य रुग्ण-नातेवाईकांच्या कृतज्ञतेने डॉक्टर सुखावून गेले. याच महायज्ञात अवघ्या दोन दिवसांत १६० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या, हे विशेष.
‘लायन्स क्लब चिकलठाणा’च्या वतीने तसेच महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर व औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने डॉ. शारदकुमार दीक्षित स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ४१ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात गुरुवारी (१५ डिसेंबर) दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या ८१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ‘एमजीएम’च्या शस्त्रक्रियागृहामध्ये अमेरिकेचे डॉ. राज लाला व डॉ. विजय मोराडिया यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित बसन्नवार, डॉ. उज्ज्वला दहिफळे यांच्यासह ‘एमजीएम’च्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया केल्या. शिबिरात गुरुवारी पडलेली पापणीच्या १२, दुभंगलेल्या ओठांच्या ७, चेहऱ्यावरील व्रणाच्या २४ व इतर ३८ अशा एकंदर ८१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिरात औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, किशोर अग्रवाल, सतीश ठोळे व प्रभाकर बकाल यांनी औषध पुरवठ्याचे नियोजन केले. शिबिरात पहिल्या दोन दिवसांत मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, नांदेड, जिंतूर, परतूर, अकोला, सिल्लोड, वैजापूर, परसोड, कन्नड येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
चिकटलेली बोटे झाली वेगळी
बायजीपुऱ्यातील अडीच वर्षाचा अफरान खान याच्यावर जन्मजात दुभंगलेल्या ओठांवर गुरुवारी शस्त्रक्रिया झाली. तसेच ९ महिन्यांची असताना चुलीत हात गेल्याने बोटे एकमेकांना चिकटून वाकडी झालेल्या जातेगावच्या तेजल दानवे हिच्यावर तीन वर्षानंतर गुरुवारी शस्त्रक्रिया होऊन तिची बोटे सरळ व सुटीही करण्यात आली. राजूरच्या २४ वर्षीय ज्ञानेश्वर गाडेकर याच्या गालावर पेटलेल्या कॅरीबॅगमुळे भाजून चट्टा पडला होता. त्याच्यावरही गुरुवारी शस्त्रक्रिया झाली. परभणीच्या रहीम खानच्या चेहऱ्यावर अपघातामुळे झालेल्या टाक्यांच्या खुणाही शस्त्रक्रियेत नाहीशा झाल्या.
अनेकांनी दिल्या भेटी
शिबिराला गुरुवारी अनेक मान्यवरांनी भेट दिली. त्यात राज्य ग्राहक मंचाचे सदस्य के. बी. गवळी, ‘एमटीडीसी’चे संचालक अण्णासाहेब शिंदे, विक्रीकर उपायुक्त डी. एम मुगळीकर, रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष हेमंत गोरे, भगवान राऊत, प्रमोद गौरकर, सुधाकर दळवी, प्रशांत सारडा, सुनील राऊत, अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका आदींनी भेट दिली. शस्त्रक्रियांसाठी ‘एमजीएम’चे भूलतज्ज्ञ डॉ. एस. जे. कुलकर्णी, डॉ. मंजुषा खंडागळे, डॉ. अंकिता, डॉ. कुंदा धुळे, डॉ. पी. व्ही. भाले, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, डॉ. रेशमी जोशी, डॉ. सुजाता सोमाणी, सिस्टर उमा वाकडमाने, यमुना शेळके, सुभक्ती पटारे, स्मिता चित्ते, सुवर्णा महिंद्रकर, प्रतीक्षा गायकवाड, एम. टी. काझी आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चे काम सहा टप्प्यांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे काम सहा टप्प्यांत पूर्ण करण्याचा आराखडा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. जास्तीत जास्त दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाचा निर्णय काय लागतो, हे लक्षात घेऊन कामाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
महापालिकेने समांतर जलवाहिनीचा ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर करार रद्द केला. तो रद्द केल्याचे पत्र कंपनीला देऊन पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली. करार रद्द केल्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे, परंतु निकाल लागेपर्यंत न थांबता समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याचे नियोजन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी यादरम्यान पाइप लाइन टाकण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरविले आहे. या कामाचे सहा टप्पे तयार करण्यात आले आहेत. जायकवाडी येथे सध्याच्या पंपहाउसजवळ नवीन पंपहाउस उभारणे, तेथे हेडवर्कचे काम करणे आणि रायजिंग वेलची (पाण्याचा स्त्रोत कायम राहण्यासाठी विहीर) निर्मिती करणे या तीन टप्प्यांत जायकवाडी येथे काम केले जाणार आहे. त्यानंतर फारोळा येथे सुमारे दोनशे एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) क्षमतेचा वॉटर ट्रिटमेंट प्लांट उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी पंपहाउस आणि रायजिंग वेल नव्याने तयार केली जाणार आहे. या तीन टप्प्यांचे काम फारोळा येथे केले जाणार आहे.
यादरम्यान पाइप लाइन टाकण्याचे काम देखील सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘टार्गेट ओरिएंटेड’ काम करण्याचे ठरविण्यात आले असून, पाइप लाइनसह सहा टप्प्यांतील कामे दीड वर्षात पूर्ण करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.

शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा
समांतर जलवाहिनीच्या कामासाठी महापालिकेला शासनाकडून सुमारे ३६० कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी खर्च करण्याची परवानगी महापालिकेने शासनाकडे एका प्रस्तावाच्या माध्यमातून मागितली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर व शासनाकडून निधी खर्च करण्याची परवानगी मिळाल्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे, असे सरताजसिंग चहल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएमआयएत कोर्नेल ईहमन यांचे मार्गदर्शन

$
0
0

सीएमआयएत कोर्नेल ईहमन यांचे मार्गदर्शन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्र‌िकल्चर (सीएमआयए), मराठवाडा ऑटो क्लस्टर (एमएसी) यांच्या संयुक्त विद्यामने ‘टेक्नोक्रॅट्स क्लब’ अंतर्गत प्रोफेसर कोर्नेल ईहमन यांचे व्याख्यान झाले.
यावेळी औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या टेक्नोक्रॅट्स क्लबचे हे आठवे सेशन होते. यात प्रेझेंटेशन, व्याख्यान देण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येत असते. प्रोफेसर कोर्नेल ईहमन हे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिर्व्हसिटीतील मॅकोर्मिक स्कूल ऑफ इंजिनिअरींगमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील प्रोफेसर आहेत. त्यांनी ‘मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी संशोधनासह अमेरिका आणि चीनमध्ये होत असलेल्या बदलांविषयी माहिती दिली. यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष गुरूप्रीतसिंग बग्गा, उद्योजक राम भोगले, भरत गंगाखेडकर, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. भरत गंगाखेडकर यांनी प्रास्ताविक केले. रवी मंगलापवार यांनी परिचय करून दिला. राम भोगले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात दारू अड्ड्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी तालुक्यातील बिडकीन, ढोरकीन, धनगाव, दक्षिण जायकवाडी येथील अवैध दारू विक्री अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर भरारी पथकाने बिडकीन, ढोरकीन, धनगाव, दक्षिण जायकवाडी येथे छापे टाकून देशी दारूच्या १८० मिलीच्या १९८ बाटल्या, तीन प्लास्टिक जग, १२ ग्लास हा ऐवज जप्त केला. विजय गोविंद राठोड रा. बिडकीन, बाबासाहेब सखाराम वाघमारे रा. ढोरकीन, अंबादास अण्णा ढोकळे रा. धनागाव व शब्बुद्दिन बाबुभाई शेख रा. दक्षिण जायकवाडी यांना अटक करून गुन्हे नोंदवले. या कारवाईमध्ये प्रभारी निरीक्षक रावसाहेब कोरे, उपनिरीक्षक ए. जी. शिंदे, काॅन्स्टेबल शेख निसार शेख सरदार, विनायक चव्हाण, यू. ए. सय्यद, पैठण पोलिस ठाण्याच्या रिटा सुभाष माने यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध खरेदीचा अहवाल शासनाकडे

$
0
0

औषध खरेदीचा अहवाल शासनाकडे
औषध घोटाळा प्रकरणातील सर्व कागदपत्रे खंडपीठात जमा
म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने औषध खरेदी व पुरवठा यामध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या टाटा ट्रस्ट या संस्थेचा अहवाल राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. कच्चा मसुदा तयार झाला असून तो अंतिम झाल्यावर राज्य मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनाचे जेष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली. महाराष्ट्र राज्य औषधी पुरवठा मंडळ स्थापण्याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी दिली जाईल, अशी हमी त्यांनी घेतली.
२९२ कोटींच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या औषध खरेदी घोटाळ्यासंदर्भात जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टाला पत्र लिहिले. या पत्राचे रुपांतर खंडपीठाने जनहित याचिकेत केले असून देवदत्त पालोदकर यांची न्यायालयाचे मित्र म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी याचिका कोर्टात दाखल केली आहे. शासनाचा प्रत्येक विभाग औषध खरेदी करतो. एकाच कंपनीची औषधी सार्वजनिक आरोग्य विभाग एका दराने तर मेडिकल कॉलेज दुसऱ्या दराने खरेदी करते. दोन विभागात समन्वय नसल्याने कोट्यवधी रुपयांची औषधी वाया जाते. त्यामुळे औषधी खरेदी महामंडळ स्थापन करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. आवश्यक औषधांच्या यादीतील औषधीच खरेदी करावी, महामंडळ केवळ मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली असावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
गुरुवारी राज्य शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आले. केंद्र शासनाचे शपथपत्र सादर करण्यासाठी केंद्राचे वकील संजीव देशपांडे यांनी वेळ मागून घेतला आहे. या याचिकेची सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन बोर्ड खरेदीला वादावादीनंतर मंजूरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या उपकरातून तब्बल ४७ लाख रुपये खर्च करून ग्रीन बोर्ड खरेदी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांमध्ये प्रचंड वादावादी झाल्यावर गुरुवारी मंजूर करण्यात आला. प्रशासन सदस्यांना सहकार्य करीत नाही, असा आरोप या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काही सदस्यांनी केला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पदाधिकारी वेळेत न आल्यामुळे बैठक उशिरा सुरू झाली. बैठकीला अनेक अधिकारी गैरहजर होते. विषयपत्रिकेवर ग्रीन बोर्ड खरेदीचा विषय होता. जिल्हा परिषदेच्या उपकरातून २०१६-१७ च्या मूळ अर्थसंकल्पात ग्रीन बोर्ड खरेदीसाठी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीन बोर्डच्या पुरवठ्यासाठी मुंबई येथील सुपरिटेंडेट कंपनी ऑफ इंडियाची निवड करण्यात आली होती. या कंपनीने पुरविलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते निकषपात्र ठरले नाहीत. त्यामुळे या कंपनीची निवड रद्द करण्यात आली. त्यामुळे अन्य पुरवठादाराकडून ग्रीन बोर्ड खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्याला सदस्यांनी विरोध केला. रामदास पालोदकर, अॅड. मनोहर गवई यांनी ऐनवेळी प्रस्ताव मांडल्याचे कारण पुढे करून विरोध केला. शिक्षण सभापती विनोद तांबे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण सदस्यांनी विरोध कायम ठेवला, त्यामुळे सदस्यांमध्ये वादावादी झाली. अखेर ग्रीन बोर्ड खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
शासनाने नव्याने काढेलल्या अध्यादेशामुळे समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी या विभागतर्फे लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या वस्तूंऐवजी आता लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा करावे लागणार आहेत. लाभार्थींच्या खात्यावर किती पैसे जमा करायचे याबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आल्याचे उत्तम चव्हाण यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी सदस्यांना सांगितले. बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अलका पळसकरांचा ठिय्या
जिल्हा परिषदेचे अधिकारी सन्मानाची वागणूक देत नाहीत. सिंचन विभाग कामांना मंजुरी देत नाही असे म्हणत जिल्हा परिषद सदस्या अलका पळसकर यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांची समजूत काढली. तातडीने कामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर जिल्ह्यात भाजपची सरशी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर पालिका निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले. औसा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने तर अहमदपूरमध्ये बहूजन विकास आघाडीने बाजी मारली. शिवसेनेला मात्र, अवघ्या दोन नगरसेवकांवर समाधान मानवे लागले. या निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला असून काही ठिकाणी तिसऱ्या तर औशात चौथ्या क्रमांकावर राहावे लागत आहे. उदगीर पालिका निवडणुकीत एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत.

उदगीरवर भाजपचा झेंडा
उदगीर पालिका निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक झाली. पहिल्या पाच फेरीपर्यंत एमएमआयच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने आघाडी घेतली होती. त्यामुळे एमआयएमचा पहिला नगराध्यक्ष होणार या चर्चेला ऊत आला होता. मात्र, पाचव्या फेरीपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत सुरू झाली. शेवटी भाजपचे बसवराज बागबंदे यांनी २ हजार १९९ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. या ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिली. उदगीर पालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ पुढील प्रमाणे आहे. भाजप १८, काँग्रेस १४ आणि एमआयएम सहा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला याठिकाणी भोपळाही फोडता आला नाही. यावेळी उदगीर नगर पालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांची दुसरी पिढी मात्र, नगरसेवकांच्या रुपाने निवडूणन आली आहे. माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे अध्यक्षपदासाठी पराभूत झाले असले तरी त्यांचा मुलगा विजय विजयी झाला. माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचे पुतणे विक्रांत भोसले विजयी झाले. भाजपाच्या श्रद्धा शहाजी पाटील या सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. आमदार सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, नागनाथ निडवदे यांच्या समवेत विजयी उमेदवाराची भाजपने विजयी मिरवणूक काढली.

निलंग्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व
निलंगा पालिकेत अरविंद पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली. प्रचाराचे नियोजन, राजकीय खेळी यामुळे भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसच्या दिग्गजांचा सामान्य उमेदवार देऊन पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी श्रीकांत शिंगाडे यांनी दोन हजार १२२ मतांची आघाडी घेत त्यांचे काका तथा काँग्रेस उमेदवार गोविंद शिंगाडे यांचा पराभव केला. निलंगा पालिकेत भाजपचे १७, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला आहे. शिवसेनेला एकही जागा मिळाली नसून याठिकाणी दारुण पराभव सहन करावा लागला आहे. काँग्रसेचे दोन्ही नगरसेवक सुद्धा अवघ्या तीस मतांच्या मताधिक्याने विजयी झाले. सर्वाधिक मते भाजपच्या हरिभाऊ कांबळे यांना मिळाली.
निवडणूक प्रमूख असेलेल अरविंद पाटील म्हणाले, ‘निलंग्याच्या जनतेने पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर विश्वास ठेऊन मतदान केले. याची आम्ही सतत जाणिव ठेवणार असून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून निलंगा एक चांगले शहर तयार करणार आहोत.’

औशामध्ये आमदार पाटलांना धक्का
औसा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या स्थानावर पाठवत आमदार बसवराज पाटील यांना धक्का दिला. राष्ट्रवादी काँगेसने सत्ताच कायम ठेवली नसून उस्मानाबाद जिल्ह्यातील पराभवाचा वचपा ही काढला. या ठिकाणी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख हे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होत असून त्यांनी याच निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन नगरसेवकपदाची ही निवडणूक जिंकली. अफसर शेख यांनी भाजपाच्या किरण उटगे यांचा दोन हजार १६५ मतांनी पराभव केला. किरण उटगे यांना चार हजार ६७२ मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुनील मिटकरी यांनी दोन हजार ८४७ मते घेतली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. इम्रान पटेल यांना दोन हजार ४०३ मते मिळाली. शिवसेना उमेदवार सुरेश भुरे यांना ९८३ मते मिळाली. सेनेला एक हजाराचा आकडा ओलडंता आला नाही. त्यामुळे येथेही भाजप आमच्यामुळे पराभूत झाला असे सांगण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. औसा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप सहा, काँग्रेस दोन असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे उमेदवार संतोष मुक्ता हे अवघ्या चार मतांनी पराभूत झाले.

अहमदपूरमध्ये आघाडीची बाजी
अहमदपूर पालिकेत आमदार विनायकराव पाटील आणि सय्यद साजीद मित्रमंडळाच्या बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे यांनी भाजपच्या रजनी रेड्डी यांचा ३६८ मतांनी पराभव करीत नगराधध्यक्षपद पटकाविले. नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे यांचे पती लक्ष्मीकांत कासनाळे हे नगरसेवकपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संदीप चौधरी यांच्याकडून पराभूत झाले. या पालिकेत सुद्धा काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. अहमदपूर पालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ पुढील प्रमाणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, भाजप सहा, आघाडी चार, शिवसेना दोन, काँग्रेस दोन. याठिकाणी एमआयएमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला अवघे १५० मते मिळाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images