Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवासी जागांवर आरक्षणास भाजपचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचा नवीन विकास आराखड्यात राहत्या घरावर, वस्तीवर टाकण्यात आलेले आरक्षण चुकीचे असून त्याविरोधात भाजपचे सर्व नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमकपणे विरोध करतील, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी दिली आहे.
विकास आराखडा तयार करताना अनेक ठिकाणी राहत्या घरावर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. 'सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, त्यानूसार आरक्षण टाकणे गरजेचे आहे. भाजप सामान्य जनतेच्या पाठिशी ताकदीने उभी असून कोणावर अन्याय होऊ देणार नाही. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले असून त्या विरोधात भाजप नगरसेवक सभागृहात आक्रमकपणे विरोध करणार आहेत,' असे तनवाणी यांनी सांगितले. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने शहर विकास आराखडा मंजूर केला तर, त्या विरोधात जनतेसोबत रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल. शासनस्तरावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चुकीचा आराखडा रोखला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शनिशिंगणापूर चौथराप्रवेश; कोर्टाचा अंतरिम आदेश नाही

$
0
0

औरंगाबाद : शनिशिंगणापूर येथील श्री शन्नेश्वर देवस्थानातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यासासह राज्य व केंद्र शासनास नोटीस बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी दिले आहेत. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यासानेही महिलांना प्रवेश नाकारला आहे. एका तरुणीने चौथऱ्यावर जाऊन पूजा केली होती. त्यानंतर राज्यभर गदारोळ झाला. महिलांना प्रवेश न देणे हा महाराष्ट्र हिंदू कायद्याचा भंग आहे, असे याचिकाकर्ते डॉ. वसुधा पवार यांनी म्हटले आहे. कोर्टाने अंतरिम आदेश दिला नाही. सुप्रीम कोर्टात शबरीमला मंदिरातही महिलांना प्रवेश देण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका प्रलंबित आहे. हाजी अली दर्गा येथेही महिलांना प्रवेश द्यावा यासाठी २०१४ मध्ये याचिका केली आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यातर्फे ए. एन. सबनीस हे काम पाहत आहेत. राज्य शासनातर्फे अमरजित गिरासे तर केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे यांनी नोटीस स्वीकारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी शाळेची वीज बिलासाठी तोडू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐन परीक्षेच्या तोंडावर वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडू नका, असे आदेश खासदार खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. सर्व शिक्षा अभियाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना निधी मिळाला नसल्याने लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत सांगितले.
महावितरण मिल कॉर्नर येथील कार्यालयाच ही बैठक बुधवारी घेण्यात आली. नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी वीज बिलासाठी शाळांचे कनेक्शन कट करण्यात आलेले आहेत याकडे लक्ष वेधले होते. शासकीय पैसा उशिरा का होईना मिळेल, त्यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवू नका, कनेक्शन परत जोडावे, अशी मागणी केली. त्यावर खासदार खैरे यांनी हे आदेश दिले. सातारा, देवळाईसाठी उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी बैठकीत दिली. शहरात १८० कोटी व ग्रामीणमध्ये ९५१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही भरण्यासाठी खासदारांनी आवाहन करावे, असे साकडे महावितरणतर्फे घालण्यात आले.
या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक जे. यु. चामरगोरे यांनी महामार्गाच्या कामाची माहिती दिली. महामार्गातील वीज खांब, डीपी व प्रस्तावित उच्चदाब वाहिन्यांकरिता महामार्ग प्राधिकरण व महावितरणने संयुक्त सर्वेक्षण करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीची वाट बिकट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात देशातून २० शहरांची निवड होणार आहे. त्यात औरंगाबादचे पारडे प्रकल्प अहवाल तसेच अन्य निकषांमध्ये जड आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात लॉबिंगची आवश्यकता भासली तर अडचण येण्याची भीती आहे. दरम्यान शनिवारपर्यंत स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या शहरांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या निकषानुसार औरंगाबाद महापालिकेने स्मार्ट सिटीबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राला सादर केला. या योजनेंतर्गत केंद्राकडून दरवर्षी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. उर्वरित ५० कोटींची रक्कम महापालिका प्रशासनाला द्यावी लागेल. चिकलठाणा परिसरात ग्रीन फिल्ड सिटीचा प्रस्ताव तयार करून सादर केला आहे. औरंगाबादच्या स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे आहेत. केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनी देशातून निवडलेल्या शहरांची नावे जाहीर होण्याची शक्यता होती, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जानेवारी रोजी दिल्लीत केंद्रीय नगरविकास विभागाच्या सचिवांसोबत सर्व राज्यांमधील विभागाच्या सचिवांची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी नावे जाहीर होतील. औरंगाबाद महापालिकेचा प्रस्ताव राज्यातून सादर झालेल्या प्रस्तावामधून दुसऱ्या क्रमांकावर आहे. औरंगाबादची टीआरपी अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. प्रस्तावित दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी), वेरूळ, अजिंठा ही पर्यटनस्थळे असल्याने शहराचे जागतिक पातळीवर महत्त्व आहे. या निकषामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. जनजागृतीच्या निकषामध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर तर औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दत्तक टप्प्यात पसंती नाही
स्मार्ट सिटीचा पुढचा टप्पा दत्तक घेण्याचा आहे. देशभरातून निवडल्या जाणाऱ्या गावांना बाहेरची राष्ट्रे दत्तक घेणार आहेत. त्यादृष्टीने नागपूरला फ्रांस तर पुण्यासाठी युनायटेड किंगडमने पसंती दर्शविली आहे. औरंगाबादसाठी मात्र अद्याप कोणता देश पुढे आलेला नाही. याबाबतचा निकष पहिल्या टप्प्यातील शहरे निवडण्यासाठी लावला गेला तर आपला क्रमांक मागे पडण्याची भीती आहे. याशिवाय राजकीय लॉबिंगच्या बाबतीतही औरंगाबाद शहर मुंबई, पुणे, नागपूरपेक्षा मागे असल्याने आपला नंबर लागणार की हे कळण्यासाठी शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुला भेटून कळले.... काय असते चांदणे....’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'तुला भेटून कळले....काय असते चांदणे....', 'भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही....', अशा एक ना अनेक कविता, गझल आणि रूबाईतून वैभव जोशी, दतप्रसाद रानडे यांनी औरंगाबाद रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. अभ्युदय फाउंडेशन आणि बशर नवाज गझल मंचतर्फे आयोजित 'सोबतीचा करार' या मैफलीने रसिकांवर गारूड केले.
कविता, रूबाई गझलांच्या माध्यमातून नात्यांचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न 'सोबतीचा करार' या कार्यक्रमातून करण्यात आला. हा कार्यक्रम बुधवारी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी येथे पार पडला. कार्यक्रमाचा प्रारंभ वैभव जोशी यांनी 'पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही...' या अंतर्मुख करणाऱ्या कवितावाचनाने केला. मल्टिप्लेक्समध्ये राष्ट्रगीताची सांगता होताच लहान मुलगा विचारतो 'ही अॅड कशाची होती? यात कोणी कुणाला विकले?' तेव्हा त्याला उत्तर मिळते 'नॅशनल एन्थम'. यानंतर दत्तप्रसाद रानडे यांनी अतिशय साधलेल्या स्वरात 'मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही...' हे गीत सादर करून मैफल जिंकली. एकदा जीवनाची ही व्यावहारिकता कळल्यानंतर 'तुला भेटून कळते काय असते चांदणे, कसे कायम कुण्या देहात वसते चांदणे...' हे रुमानी गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. चार ओळींची रुबाई ही कार्यक्रमाची रंगत वाढवत गेली.यानंतर वैभव जोशी यांनी विविध कवितांचे वाचन करत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 'मी एवढेच केले...जगलो मनाप्रमाणे..हसलो मनाप्रमाणे...', 'तुला भेटून कळले काय असते चांदणे....'.. 'यह नही की तेरी याद आती नही..' या कवितांचे तरल व मुलायम आवाजात सादरीकरण करत दत्तप्रसाद रानडे यांनी वाहवा मिळवली. यानंतर 'खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे,' अशी कधी वेदनेची तर, कधी प्रेमाची जाणीव करून देणाऱ्या या गझलांचे सादरीकरण दत्तप्रसाद रानडे यांनी संपूर्ण तयारीनिशी केले. आशिष मु‌जुमदार यांनी या गाण्यांना, कवितांना आणि रुबाईला चाली बांधल्या. शब्दबंबाळ निवेदन नसणे, सिंथेसायझर आणि तबल्यावरची केवळ साथ असणे ही या कार्यक्रमाची विशेषता होती. आयोजन नीलेश राऊत आणि संदीप शिसोदे यांचे होते. यासाठी सुबोध जाधव व मंडळींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज परिसर होणार ‘टकाटक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूज औद्योगिक वसाहतीसोबत लगतच्या नागरी वसाहतीतही स्वच्छता व्हावी, आपला परिसर स्वच्छ व सुंदर असावा यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परिसरातील दहा हजार लोकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या उपक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी अनेकांना मिळाली. मराठवाडा पर्यावरण केअर क्लस्टरच्या पुढाकाराने बजाजनगर येथील मैदानावर मंगळवारी हा कार्यक्रम झाला.
बजाज ऑटो, व्हेंडर असोसिएशन यांच्या मदतीने आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए), मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ), औरंगाबाद इंडस्ट्रिअल सप्लायर्स असोसिएशन (आयसा), वाळूज काँट्रॅक्टरर्स असोसिएशन, ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण यांचा या उपक्रमासाठी सहभाग होता. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षी महास्वच्छता अभियान राबविले होते. त्यानंतर अनेक कंपन्यांनी वैयक्तिक पातळीवर परिसर स्वच्छता मोहीम राबविणे सुरू केले. त्या धर्तीवर नागरिकांनीही आपापल्या निवासी क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविली तर परिसर कचरामुक्त होईल, अशी यामागची संकल्पना होती.
यावेळी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर अनुराग विज यांच्या हस्ते करण्यात आले. 'आपल्या देशाला तीन गोष्टींचा धोका आहे. ते म्हणजे शत्रूराष्ट्र, दहशतवाद आणि अस्वच्छता. पहिल्या दोन शत्रूंचा मुकाबला करण्यास आम्ही सक्षम आहोत. अस्वच्छता दूर करण्यासाठी मात्र नागरिकांनीच पुढाकार घेतला पाहिजे,' असे आवाहन ब्रिगेडिअर विज यांनी केले. त्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी उद्योजक, कामगार, अधिकारी, पंढरपूर परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक असे दहा हजार जण उपस्थित होते. सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव प्रसाद कोकिळ यांनी सूत्रसंचालन केले. आमदार संजय सिरसाट यांची विशेष उपस्थिती होती. बी. एस. खोसे, बालाजी शिंदे, रमण अजगावकर, उमेश दाशरथी, नार्वेकर, निनाद काळे, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता एस. आर. गावडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. शिस्तबद्ध कार्यक्रम उपक्रमात सहभागी होण्यासाठी ७५ बसेस, १५०० मोटारसायकल, ४०० कारमधून नागरिक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर शिस्तीमध्ये नागरिक मैदानावरून निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रबर गर्ल आरतीची भारतीय संघात निवड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
व्हिएतनाम येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई योगासन स्पर्धेसाठी औरंगाबादच्या आरती पालची भारतीय संघात निवड झाली आहे. योगासनात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणारी आरती पहिलीच औरंगाबादकर योगपटू आहे. या क्षेत्रात 'रबर गर्ल' म्हणून तिची ख्याती आहे.
४० व्या राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत आरती पालने २१ ते २५ वयोगटात सहभाग घेत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीने आरतीची भारतीय संघात निवड झाली. आरतीने आतापर्यंत २० राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. जवळपास प्रत्येक स्पर्धेत तिने आपले वर्चस्व राखले आहे. दहापेक्षा अधिकवेळा तिने सुवर्णपदक पटाकाविले आहे. राज्य स्पर्धेत तर तिने २० सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योग स्पर्धेतही आरतीने आपला करिष्मा दाखवत दोन रौप्यपदके जिंकली आहेत. आर्थिक अडचणींमुळे तिला भारतीय संघातून खेळण्याची संधी दोनवेळेस गमवावी लागली आहे, पण यावेळी आशियाई स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करण्याचा मानस आरतीने 'मटा'शी संवाद साधताना व्यक्त केला.
मिस योगिनी
आरती पालने २०१० मध्ये मिस योगिनी ऑफ द वर्ल्ड हा पुरस्कार जिंकला आहे. २००७मध्ये मिस योगिनी ऑफ द इंडिया हा पुरस्काराने तिला सन्मानित केले आहे. २००८मध्ये तिला योगा प्रिन्सेस पुरस्कार प्रदान करण्यात आला. योगा विषयात ती पीएचडी करीत आहे. रिव्हरडेल हायस्कूलमध्ये योग शिक्षिका म्हणून आरती कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शेकापचा आधार

$
0
0


औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाजन्य परिस्थितीचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसतो आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. हीच बाब लक्षात घेत शेतकरी कामगार पक्ष दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीला धाऊन आला आहे. पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या ५०० विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत भोजन देण्यात येणार आहे.
सततच्या दुष्काळात मराठवाडा होरपळतो आहे. याचा परिणाम शिक्षणासारख्या क्षेत्रावरही होतो आहे. विशेषतः विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. विद्यापीठातील बहुतांशी विद्यार्थी हा ग्रामीण भागातील आहे. दुष्काळामुळे घरून येणारे पैसे बंद झाले किंवा ते पुरेसे नाहीत. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत शेतकरी कामगार पक्ष मदतीला धाऊन आला आहे. विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे ५०० विद्यार्थ्यांना भोजनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पक्षातर्फे विद्यार्थ्यांना वर्षभर भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र खानावळीतून डबे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पोहचते केले जाणार आहेत.
पाचशे विद्यार्थ्यांमध्ये २५० ‌विद्यार्थी व २५० विद्यार्थिंनींचा समोवेश आहे. परीक्षेनंतर मे आणि जून महिन्यात दोन महिने हा उपक्रम बंद करण्यात येईल. त्यानंतर पुढे नऊ महिने हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे. याबाबतच्या उपक्रमाची घोषणा गुरुवारी (२८ जानेवारी) होणार आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सूर्यकांत दाणेकरांचा षष्ठब्दीनिमित्त गौरव

$
0
0


औरंगाबाद : कीर्ती प्रकाशनाचे संचालक सूर्यकांत दाणेकर यांच्या षष्ठब्दीपूर्तीनिमित्त त्यांना गौरविण्यात आले. साहित्य, संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते दाणेकर यांचा शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे, श्रीकांत काशीकर, लिंबाजी हिवरकर, डॉ. प्रतिभा धारासूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणात सूर्यकांत दाणेकर यांच्या कार्याचा गौरव केला. बाबा भांड म्हणाले, 'दाणेकर हे सदोदित ग्रंथसहवासात राहणारे सत्शील, सेवाभावी ग्रंथ प्रकाशक आहेत. त्यांनी अत्यंत कष्टाने हा व्यवसाय उभा केला आहे.' 'मराठवाड्यात मराठी आणि हिंदी ग्रंथप्रकाशनाचे महत्त्वाचे कार्य दाणेकर यांनी केले आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी दाणेकरांचा गौरव केला. माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी त्यांच्या दोन इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आठवणी सांगितल्या. दाणेकर यांना बहाल केलेल्या सन्मानपत्राचे वाचन गझलकार शिवाजी नवरे यांनी केले. संयोजन समितीच्या वतीने ज्येष्ठ लेखिका अनुराधा वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला. सत्कारमूर्ती दाणेकर यांनी आपल्या व्यवसायातील खडतर वाटचालीचा आढावा घेतला आणि लेखकांच्या आठवणींना उजाळा ‌दिला. सत्कारापूर्वी रसिकांसाठी गझल आणि शास्त्रीय संगीताची बहारदार मेजवानी देण्यात आली. डॉ. दोस्त मोहमंद खान व गायिका कविता वतनी यांच्या सुश्राव्य गझलांनी सुरुवात झाली. विश्वनाथ दाशरथे व संध्या देशमुख यांनी शास्त्रीय गायन केले. सूत्रसंचालन कवी डी. बी. जगत्पुरिया यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाडाझडती

$
0
0

औरंगाबाद : शासनाच्या विविध योजनांचा सुरू असलेला संथ कारभार, ऑनलाइन सातबाऱ्यात पिछाडी, ढेपाळलेली वार्षिक वसुली व खरीप अनुदान वाटपासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत यंत्रणेची झाडाझडती घेतली.
अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी घेतलेल्या बैठकीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची उपस्थिती होती. बैठकीविषयी बोलतांना अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे म्हणाले की, बैठकीमध्ये वसुली वाढविणे, खरीप अनुदान वाटप करणे, संजय गांधी निराधार योजना अनुदान वाटप, गौणखनिज, आधार सीडिंग तसेच सातबारा ऑनलाइन करण्याच्या कामांना गती देण्याच्या यासाठी तहसीलदारांना सूचना केल्या आहेत. खरीप अनुदान वाटपासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १०७ कोटी रुपयांपैकी किती अनुदान वाटप करण्यात आले याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. अनुदान वाटपात त्रुटी राहू नयेत, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांचा एकमेकांत ताळमेळ नसल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतभेद विसरा, सहकार्य करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. 'मराठवाड्यात भीषण टंचाई असून शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत, अन्नधान्य वाटप करत आहे,' सांगून पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नसून अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले याची नव्या पिढीने जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
ध्वजारोहणानंतर झालेल्या संचलनात पोलिस, भारत बटालियन, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना आदींच्या १८ तुकड्या सहभागी झाल्या. सामाजिक न्याय, शिक्षण, वाहतूक, वनीकरण, आरोग्य विभागाचे चित्ररथ सामील झाले. एमआयटी आणि ज्ञानेश्वर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, सुभाष झांबड, महापौर त्रिंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विषेश पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, ‌जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आलेले पोलिस अधिकारी प्रकाश कुलकर्णी आणि शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला. नक्षलग्रस्त भागात उत्तम कामगिरी बजावणारे १६ पोलिस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक शाखा, सिटीचौक पोलिस ठाणे आणि वाळूज पोलिस ठाणे यांनी आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, नागनाथ कोडे, रामेश्वर थोरात आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कष्टकरी कामगारांचे ध्वजवंदन

$
0
0

औरंगाबाद : मराठवाडा लेबर युनियन आणि इतर कामगार संघटनांनी एकत्रितपणे शहरात दोन ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. जाधववाडी भाजी मंडईत ज्येष्ठ कामगार समिंदराबाई जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कामगार नेते अली खान, सय्यद नाजिम, संजय बांगरे, शेख जमील, इस्माइल शेख, अंकिताबाई बोर्डे, शीलाबाई काकडे, देविदास कीर्तीशाही, प्रा. विजय दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती. हमाल संघटना, भाजी विक्रेते संघटना, मोलकरीण, घरेलू कामगार संघटना, लाल निशाण गट, मराठवाडा लेबर युनियन या संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारळीबागेतील कार्यालयासमोर शेख इस्माइल शेख उमर व पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण सरकटे, कैलास लोखंडे, जगन भुजणे, उत्तम नरवडे, अरविंद बोरकर, बुद्धप्रिय कबीर, भारत शिरसाट, डॉ. सर्फराज, अण्णासाहेब खंदारे, अॅड. विष्णू ढोबळे, अॅड. अंकुश भालेकर, सुभाष लोमटे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगाव शिवारात बिबट्याचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर-येवला रस्त्यावरील नांदगाव शिवारात एका शेतात गावकऱ्यांना मंगळवारी बिबट्याचे दर्शन झाले. पाठलाग करणाऱ्या जमावातील एकावर या बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पंचक्रोशीतील गावकरी घाबरले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले असून सुनील राहणे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे.
वैजापूर शहरापासून चार कि.मी. अंतरावरील नांदगाव शिवारात सकाळी सात वाजता अंबादास गाडे यांच्या वस्तीवर घराजवळून बिबट्या गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर अनिल माळी, किरण मोरे, रामा बर्डे, पांडू गाडे यांनी लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे हा बिबट्या रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजुकडील राहणे यांच्या ज्वारीच्या शेतात गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी एकावर झडप घालून बिबट्याने पलायन केले. गावकऱ्यांनी त्याला हुसकावण्यासाठी फटाके वाजवले, दगडे फेकली. त्यामुळे तो पसार झाला असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एम. कांबळे, वधपरिमंडळ अधिकारी ए. पी. मिसाळ, वनरक्षक नंदकुमार तगरे यांनी भेट दिली व शेतात पिंजरा लावला. कन्नड उपविभागाचे सहायक वनसंरक्षक जे. व्ही. जाधव, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनीही भेट देवून पाहणी केली. रात्री गावकऱ्यांनी बॅटरीशिवाय घराबाहेर पडून नये, असे आवाहन वनविभागने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत एकनाथ’ बंद

$
0
0

म. टा. प्रतींनिधी, पैठण
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या सचिन घायळ शुगर प्रा. लि. यांच्यात निवडणुकीचा खर्च भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे कारखाना गाळप पूर्ण होण्याआधीच बंद पडला आहे. निवडणूक खर्च भरल्याशिवाय साखर व मळी विकू देणार नाही, अशी भूमिका चेअरमन संदीपान भुमरे यांनी यांनी घेतली आहे तर, सचिन घायाळ यांनी संचालक मंडळाकडे ४१ लाख रुपये थकबाकी काढली आहे.
सचिन घायाळ शुगर प्रा. लि. ने १८ वर्षाच्या भागीदारी करारावर कारखाना घेतला आहे. पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर कंपनीने दुसरा गळीत हंगाम सुरू केला. कारखान्याची निवडणूक काही महिन्यावर आल्याने प्रशासनाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सहायक निबंधक कार्यालयाकडून कारखान्याच्या संचालक मंडळाला निवडणुकीचे दहा लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रकमेवरून संचालक मंडळ व कंपनीमध्ये वाद सुरू झाला आहे. संचालक मंडळाने कंपनीला निवडणुकीचे दहा लाख रुपये भरण्यास सांगितल्यानंतर कंपनीने कराराकडे बोट करून नकार दिला आहे. करारात नमुद केलेल्या पैशाशिवाय आम्ही कारखान्याचे ७० लाख रुपये भरले आहेत. कारखान्याच्या स्टोअरमधून उचललेल्या साहित्याचे २२ लाख व व्यवस्थापन खर्चाचे ७ लाख, असे २९ लाख रुपये संचालक मंडळाकडून येणे आहेत. ७० लाखातून २९ लाख वजा केल्यावर आमचेच ४१ लाख रुपये संचालक मंडळाकडे येणे आहेत. त्यामुळे निवडणुकीचे पैसे भरणार नाही, असा पावित्रा कंपनीने घेतला आहे. कराराव्यतिरिक्त कंपनील कारखान्याचे देणे देण्यास सांगितलेले नाही, त्यामुळे २९ लाखातून निवडणुकीचे १० लाख रुपये भरावेत, असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे.

निवडणुकीचे पैसे सचिन घायाळ कंपनी भरणार नाही, असा स्पष्ट उल्लेख संचालक मंडळासोबत झालेल्या करारात आहे. आमचे ४१ लाख रुपये देणे बाकी असताना चेअरमन संदीपान भुमरे काही कामगारांना हाताशी धरून व दादागिरी करून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
-सचिन घायाळ, कंपनी चेअरमन

आम्हाला न सांगता कंपनीने आगाऊपणा करत ७० लाख रुपये भरले. आता आमचे देणे देण्याची वेळ आल्यावर कंपनी हात वर करत आहे. आमचे पैसे दिल्याशिवाय सचिन घायाळ कंपनीला साखर व मोलॅसिस विकू देणार नाही.
-आ. संदीपान भुमरे, चेअरमन, कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून गावाकडे चला, नानाचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात गेलेला तरूण गावात परत येणे गरजेचे आहे. येथे शहरात खिडकीतून दिसते तेवढेच आमचे आभाळ. तेच चित्र देशाचे झाले. सामान्य माणसाच्या साम‌ाजिक जाणीवा नाहीशा झाल्या. नुसते गहिवरून जमणार नाही, तर प्रत्यक्ष कृती हवी. शहरातील 'स्क्वेअर फुटा'च्या कबरीतून शेतकऱ्यांकडे, गावाकडे डोकावून पाहिले तरी, खूप काही करता येईल,' असे परखड मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत मंगळवारी (२६ जानेवारी) एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात घेण्यात आली. ही मुलाखत पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली. यावेळी मकरंद अनासपुरे यांचीही उपस्थिती होती. नाना पाटेकर यांच्या मुलाखती दरम्यान त्यांच्यातील नट, शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहणारा अभ्यासक सतत जाणवत होता. सरकारकडे बोट दाखवण्यापू्र्वी आपल्याच चौकटीत रमलेल्या सामान्य माणसाला आपल्यासारख्याच शेतकऱ्यांच्या वेदना का दिसत नाहीत, असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'पाऊस नाही, दुष्काळ आहे म्हणून आत्महत्या होत नाहीत. माझ्या मागे कुणीच नाही ही भावनाच शेतकऱ्यांचा जीव घेत आहे. 'नाम' कुणाकुणाच्या अपेक्षा पूर्ण करेल हे माहिती नाही. पण पाठीवर हात ठेवून लढ म्हणत 'नाम' शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी आहे,' असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. नटसम्राटचा 'टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन' हे स्वगत शेतकऱ्यांसाठी 'जगाव की मरावं' असाच आहे, हे खुद्द नानांच्या तोंडून ऐकताना सभागृह स्तब्ध झाले होते. विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सरकार नावाची संज्ञा शेतकऱ्यांच्या आयुष्यातून वजा झाल्याचे ठासून सांगितले. शेतकरी सरकारला पाणी व वीज यापेक्षा दुसरे काही मागत नाही. सरकारने त्या उपलब्ध करून दिल्या तरी तो मागे वळून पाहणार नाही. पण सगळे सरकारवरही ढकलून जमणार नाही; आपण वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांसाठी काय करतोय हेही तितकेच महत्वाचे आहे,' असे झणझणित अंजन त्यांनी सरकार व लोक दोघांच्याही डोळ्यात घातले.

'नाम'ने लोकसहभागातून १०० किमी परिसरातील गाळ केवळ १ कोटी २० लाख रुपयात काढून दाखवला. सामान्य माणूस कमी वेळेत कमी खर्चात हे करून दाखवतो, त्यावरून सरकारने बोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 'नाम'ला आतापर्यंत लोकांनी २२ कोटी रुपयांची निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम, प्रताप बोराडे, नामच्या विश्वस्त शुभा महाजन, रेखा शेळके आदी उपस्थित होते. मी देववेडा नाही. कारण देव्हाऱ्यातील मूर्तीपेक्षा माणसातला देव मी शोधतो. तो मला शेतकरी व दात्यांच्या रुपात भेटला. या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे हाच माझा आयुष्यभराचा गणेशोत्सव आहे, असे नानाने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जलसंवर्धनाची सवय लागायलाच हवी. काळाची गरज ओळखून प्रत्येक घराघरात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' व्हायला हवे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

ही मुलाखत ऐकण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. नियोजित वेळ साडेचारची असली तरी, चार वाजताच सभागृह भरले. सभागृहापेक्षा जास्त लोक बाहेर होते. प्रत्येकाला नानाला ऐकायचे व भेटायचे होते. गर्दीमुळे संयोजकांनी प्रोजेक्टर लावून व्यवस्था केली. कडाक्याच्या थंडीत बाहेर बसून अनेकांनी मुलाखत ऐकली.

'मल्हार, करतो का तिच्याशी लग्न?'

'एका कार्यक्रमात शिवणयंत्राचे वाटप करताना २० वर्षाची विधवा समोर आली. तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि ती गर्भवती होती. संपूर्ण आयुष्य असेच काढणे म्हणजे किती मोठे संकट. त्यापेक्षा वाटले मल्हारला माझ्या मुलाला विचारावे वाटले, करतोस का लग्न तिच्याशी?' नानाचे हे वाक्य ऐकून सभागृहातील एका शेतकऱ्याच्या विधवेस रडू कोसळले. ती एक वर्षांच्या मुलाला कवेत घेऊन रडत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोज एक रुपया निराधारांसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पिसादेवी येथील तरुणांनी दररोज एक रुपया जमा करून निराधार व गरजूंना मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या गटाचे नाव 'ऑल टाइप हेल्प' असे आहे. या गटाने ११ निराधारांना एक महिन्याचे किराणा सामान देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला.
औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील संदीप पाटील, आजिनाथ धामणे, सुरेश खिल्लारे, भाऊसाहेब काळे, डॉ. संतोष धामणे, डॉ. जयदीप गोसावी, समाधान पवार, जयेश निकम व प्रभाकर मते या नऊ तरुणांनी एटीएच (ऑल टाइप हेल्प) हा गट स्थापन केला आहे. या तरुणांनी जमा केलेल्या रकमेतून प्रजासत्ताक दिनी पिसादेवी व परिसरातील गरजू, निराधार वृद्धांचा शोध घेतला. वृद्धापकाळाने काम करणे अशक्य असल्याने एकवेळचे अन्नही सहज मिळवता येत नसलेल्या ११ निराधार वृद्धांना एक महिन्याचा किराणा दिला आहे.
हा गट तयार करताना तरुणांनी पक्ष, जात याला थारा न देण्याची अट टाकली आहे. गटाचे सदस्य रोज एक रुपया जमा करतात. प्रत्येक सदस्याने दहा जण जोडायचे व त्यांनी पुन्हा दहाजण जोडायचे, अशी गटाची कार्यपद्धती आहे. प्रत्येकाने आठवड्यातील एक दिवस समाजकार्यात सहभाग द्यायचा, असे ठरवण्यात आल्याचे गटाचे अध्यक्ष संदीप पाटील व उपाध्यक्ष आजिनाथ धामणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा गुंगारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नांदगाव शिवारातील ज्वारीच्या शेतात लपलेल्या बिबट्याने दुसऱ्या दिवशी गुरुवारी गुंगारा दिला. गावकऱ्यांनी बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केल्याने लावलेला पिंजरा आणखी काही दिवस ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
येवला रस्त्यावर नांदगाव शिवारात अंबादास गाढे यांच्या घराजवळ काही गावकऱ्यांनी बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्या पाहिला होता. त्याला हुसकिवण्यासाठी त्यांनी लाठ्याकाठ्या घेवून पाठलाग केला, फटाके वाजवले व बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे बिबट्या राहणे यांच्या ज्वारीच्या शेतात दडून बसल्याचे काही गावकऱ्यांचे ठाम मत आहे. त्या दृष्टीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी राहणे यांच्या ज्वारीच्या शेतात पिक अप व्हॅन घालून संपुर्ण परिसर पिंजून काढला. या शिवारातील पडिक विहिरी, डाळिंबाची बाग व गावकऱ्यांनी बिबट्या पाहिलेल्या ठिकाणी शोध घेतला. परंतु, बिबट्या आढळून आला नाही, अशी माहिती वनक्षक नंदकुमार तगरे यांनी दिली.
या परिसरात कुठलाही मृत प्राणी आढळून न आल्याने बिबट्या भक्षाच्या शोधात पसार झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्याने नांदगाव, चांडगाव, पानव या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर फिरु नये, बॅटरीचा वापर करावा, अशा सूचना वनविभागाने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला ठेंगा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नवी दिल्ली
उद्योगनगरी, पर्यटननगरी, मराठवाड्याचे शैक्षणिक हब अशी ओळख सांगणाऱ्या ऐतिहासिक औरंगाबादचे महत्त्व केंद्र सरकारला मात्र अमान्य आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या २० 'स्मार्ट सिटी'मध्ये औरंगाबादला ठेंगा दाखविण्यात आला. या यादीत पुण्याला स्थान मिळाले, ही समाधानाची बाब असली तरी, औरंगाबादला डावलल्याने मराठवाड्यात संतापाची लाट पसरली आहे.
केंद्राच्या यादीतील पहिल्या तीन शहरांत भुवनेश्वर, पुणे आणि जयपूरचा समावेश आहे. स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये पायाभूत सुविधांसह पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ई-गव्हर्नन्सचा समावेश असेल. या योजनेसाठी देशभरातील राज्यांनी ९७ शहरांची नावे दिली होती. यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून २० शहरांची निवड स्मार्ट सिटी योजनेसाठी करण्यात आली. जनजागृती व लोकप्रियतेच्या निकषांवर औरंगाबाद या यादीत दुसऱ्या स्थानावर होते; तथापि, ऐनवेळी नाव वगळल्याचे सांगितले जाते.'तळापासून ते वरपर्यंत सुधारणा हा स्मार्ट सिटी मोहिमेचा मूळ उद्देश आहे. पण यासाठी सध्यातरी काल मर्यादा घातलेली नाही', असे व्यंकय्या नायडूंनी सांगितले.
स्मार्ट सिटींची यादी
१) भुवनेश्वर २) पुणे ३) जयपूर ४) सुरत ५) कोची ६) अहमदाबाद ७) जबलपूर ८) विशाखापट्टणम ९) सोलापूर १०) धवनगिरी ११) इंदूर १२) नवी दिली १३) कोइम्बतूर १४) काकीनाडा १५) बेळगाव १६) उदयपूर १७) गुवाहाटी १८) चेन्नई १९) लुधियाना २०) भोपाळ
मंत्रालयातील अधिकाऱ्याचा विरोध?
मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचा औरंगाबादचा स्मार्ट सिटीत समावेश करण्याला सुरुवातीपासून विरोध होता, अशी सूत्रांची माहिती आहे. हा विरोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केला अन् पुन्हा एकदा मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली. यापूर्वी खुद्द मुख्यमंत्र्यांनीही औरंगाबादशी असाच भेदभाव केला आहे. औरंगाबादला होणारे आयआयएम मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानेच नागपूरला पळविण्यात आले. त्यानंतर औरंगाबादचे साई केंद्रही नागपूरला पळविले. या पळवापळवीचा फटका पुन्हा एकदा औरंगाबादला बसला आहे. राज्य सरकारच्या दुजाभावाबद्दल मराठवाड्यातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
---
केंद्र सरकारने नव्याने शहर स्मार्ट करण्याऐवजी आता जे शहर अस्तित्वात आहे त्याचा विकास करण्याची गरज आहे. शिवसेना-भाजपने शहराची वाट लावली असल्याचे केंद्राला बहुदा दिसले असावे, म्हणून शहराचा स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश झाला नाही. त्यामुळे नवीन शहर वाढवण्याची काहीही गरज नाही, जे आहे त्याचाच विकास करावा.
- भालचंद्र कानगो, राज्य सचिव, भाकप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्तांचे जमिनीसाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी प्रकल्पाची वसाहत व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीपैकी उपयोगात न आलेली व अतिरिक्त जमीन इतरांना न देता मूळ जमीन मालकाला भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या वसाहतीकरीता पैठण तालुक्यातील कातपूर येथील जमीन शासनाने १९६२ मध्ये संपादित केली आहे. यातील काही जमिनीचा शेतकऱ्यांनी मोबदलाही घेतलेला नाही. वसाहतीची व पुनर्वसनाची कामे पूर्ण झाल्यानंतरही येथे काही गटांमधील जमीन शिल्लक असून त्या जमिनी इतर विभागाला भाडेतत्वावर कराराने दिल्या होत्या. त्यांचे करार आता संपले असून त्यांच्या जमीनीवर अतिक्रमण होत आहे. पुनर्वसन कायद्यानुसार नोकरी, कमांड जमीन, प्लॉट आदी सवलती मिळालेल्या नाहीत. आम्ही भूमिहीन असल्यामुळे या जमिनी भाडेतत्वावर द्याव्यात, अशी मागणी आहे. या मागणीसाठी २६ जानेवारीपासून बाबासाहेब दगडू भरुळे आणि भानुदास दादा डांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी सुभेदार मेजर सुखदेव बन, अविनाश डांगे, रामेश्वर साटोटे, दीपक भुरुळे, लक्ष्मण डांगे, दत्तात्रय रोडी, बालाजी दोरखे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंडांचे वाटप सप्टेंबरपासून

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) शेंद्रा एमआयडीसीतील विविध प्रकारच्या पायाभूत कामांसाठी ७५० कोटी रुपयांच्या वर्कऑर्डर निघाल्या आहेत. लवकरच काम सुरू होणाऱ्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भूखंड वाटप सुरू होणार आहे,' अशी घोषणा राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी केली. ते गुरुवारी राज्य सरकार व 'सीआयआय'तर्फे आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
'इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र-इन्व्हेस्ट इन्टू मराठवाडा' या संकल्पनेवर आधारित परिषदेला एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सुरुवात झाली. या परिषदेत अपूर्व चंद्रा यांनी राज्याच्या विविध औद्योगिक धोरणांसह 'डीएमआयसी'ची माहिती दिली. 'बिडकीन एमआयडीसीसंदर्भात ५ फेब्रुवारी रोजी पर्यावरणीय सुनावणी होणार आहे. मार्चपर्यंत पर्यावरण मंत्रालयाकडून 'ग्रीन सिग्नल' मिळेल आणि मे-जून महिन्यापासून विविध कामांचे कंत्राट काढण्यात येणार आहे. 'डीएमआयसी'मध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असेल. त्याचवेळी मराठवाड्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असले तरी प्रक्रिया उद्योग नसल्याच्या पार्श्वभूमीवर बीड, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये 'टेक्सटाईल पार्क' उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच जिथे कुठे १०० एकर जागा मिळेल, तिथे 'इंडस्ट्रीयल झोन' तयार करण्याचाही प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे लघु उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी एमआयडीसीकडून ७५ कोटी, तर सिडबी बँकेकडून ४० कोटी, असा ११५ कोटींचा निधी लघु उद्योजकांसाठी राखीव ठेवला जाणार आहे,' अशी माहिती चंद्रा यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, 'डीएमआयसी'साठी केंद्राचा ६०० कोटींचा निधी आला, पण म्हणावा तसा विकास अजून तरी झाला नाही. ज्यांनी प्लॉटवर उद्योग उभारले नाहीत, त्यांना नोटिस दिली पाहिजे आणि तरीही उद्योग उभारला नाही तर दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे'.
---
डीएमआयसीतून महाराष्ट्राचे ब्रँडिंग
औरंगाबाद, मराठवाडा व महाराष्ट्राच्या ब्रँडिंगसाठी, 'डीएमआयसी'मध्ये कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी, नवनवीन पार्टनरशिप घडून येण्यासाठी, कल्पनांची देवाण-घेवाण होण्यासाठी ही परिषद घेत असल्याची भूमिका 'सीआयआय'चे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष श्रीराम नारायणन यांनी परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images