Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरसकट नुकसान भरपाई द्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोंडअळी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, गुजराजप्रमाणे कापसाला बोनस द्या, सरकार हमसे डरती है, पोलिस को सामने करती है, अशा घोषणाबाजी देत संतप्त कार्यकर्त्यांनी सुभेदारी विश्रामगृह परिसरातून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मारली. संघटनेचे नेते रवीकांत तुपेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बोंडअळी बाधित कापूस फेकला. माणिक कदम, विजय भंडे, चंद्रशेखर साळुंखे, मारुती वराडे, संतप रोडगे, मुक्ताराम गव्हाणे, चंद्रकांत कटारे, गुलाम अली, वसंत चोरमले, माऊली मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी तुपेकर यांनी केली. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करू, त्याची सुरुवात येत्या सात डिसेंबरला जालन्यातून करु, असा इशारा दिला.

बडा म्होरक्या नांदेडचा
पत्रकारांशी बोलताना तुपेकर म्हणाले, ‘भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित असून, बडे उद्योगपतींना धार्जिणे आहे. कर्नाटकात सोयाबीनला साडेतीन हजार भाव तर महाराष्ट्रात दोन हजार २०० रुपयांच्य आत कसा. सरकार म्हणून जमत नसेल, तर मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. समृद्धी महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचा प्रकार आहे. बनावट रसायने, औषध तयार करणाऱ्या म्होरक्याचे नाव सरकारला सांगितले आहे. सरकारने कारवाई केली नाही तर संघटना नाव उघड करेल. हा बडा म्होरक्या नांदेड परिसरातील आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ बस-ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
बस आणि ट्रकची समोरा-समोर धडक बसून झालेल्या अपघात होऊन तीन जण ठार तर सातजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (१ डिसेंबर) मध्यरात्री औसा-निलंगा राज्य महामार्गावर चालबुर्गा पाटीजवळ घडला. जखमींना लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबर रोजी बस आणि ट्रकचा अपघात होऊन याच परिसरात सात लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजीच असताना दुसरा अपघात घडला.
सोनल अमित भोज (वय २२ रा. दापका वेस, निलंगा), आयशा इस्माईल बागवान (वय ५०, रा. हैदराबाद), बापुसाहेब बिडवे (वय ५० रा. अडसूळ वाडी, ता. कळंब) अशी मृतांची नावे आहेत. लातूर आगाराची बस ( क्रमांक एम एच २०- ३५८७) ही शुक्रवारी रात्री लातूरहून औसा मार्गे हैदराबादला जात होती. ही बस चालबुर्गा पाटीवरून पुढे गेली असता समोरून येणाऱ्या ट्रकने ( क्रमांक ए पी २४- व्ही- ८८३४) जोराची धडक दिली. या धडकेमुळे बसचे समोरील तीन ते चार आसन कापले गेले. त्यामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, किल्लारीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले सह अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अमित रामकृष्ण भोज (वय ४०, रा. दापका वेस, निलंगा), मोहम्मद इस्माईल बागवान (वय ५५ रा. हैदराबाद) सोनू किसन काळे (वय१८ रा. ढोकी, ता. उस्मानाबाद)ओमप्रकाश जगन्नाथ पाटील ( वय ३५ रा. यल्लोरी ता. औसा) सुनील सतीश शिंदे ( वय १० रा. ढोकी ता. उस्मानाबाद), किशोर गोरख डोंगरे ( वय ४० रा. गोपालनगर, ता. उदगीर) अनिस मन्सूर शेख ( वय ३५ रा. बार्शी रोड, लातूर) अशी जखमींची नावे आहेत.

१३ दिवसांत दुसयांदा अपघात
१८ नोव्हेंबर रोजी दुपारी चालबुर्गा पाटीजवळ बस आणि ट्रकचा अपघातात सात जण मरण पावले होते तर ३४ जण जखमी झाले होते. या अपघाताची जखम ताजी असतानाच पुन्हा तीन जणांना प्राण गमवावे लागल्याने हा परिसर आता अपघात प्रवण क्षेत्रामध्ये आला आहे. रात्री उशीरा झालेल्या या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजीएमतर्फे ‘हेरिटेज रन’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमजीएमतर्फे ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त दहा डिसेंबर रोजी ‘हेरिटेज रन’चे आयोजन करण्यात आले आहे. विविध गटात घेण्यात येणाऱ्या या रनमधील विजेत्यांना एकूण एक लाख तीस हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

जागतिक स्मारक व पुरातण संपत्तीच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी एमजीएमतर्फे हेरिटेज रनचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती कर्नल डॉ. प्रदीप कुमार व आशिष गाडेकर यांनी दिली. दहा डिसेंबर रोजी एमजीएम क्रीडा संकुलापासून सकाळी सात वाजता हेरिटेज रनला प्रारंभ होईल. पुरुष व महिला अशा दोन गटात विविध अंतरांची ही स्पर्धा होणार आहे. महिला व पुरुष गटात १४ ते १६ वयोगट (पाच किलोमीटर), १७ ते ३५ वयोगट (१२ किलोमीटर), ३६ ते ४५ वयोगट (तीन किलोमीटर), ५६पेक्षा अधिक वयोगट (दोन किलोमीटर) अशा विविध वयोगटात ही स्पर्धा होणार असल्याचे कर्नल प्रदीप कुमार यांनी सांगितले.

एमजीएम क्रीडा संकुल आझाद चौक, टी. व्ही. सेंटर चौक, सलीम अली सरोवर, जिल्हाधिकारी कार्यालय, रंगीन दरवाजा, नौबत दरवाजा आणि पुन्हा परत नौबत दरवाजा, जिल्हाधिकारी कार्यालय बसस्टॉप, दिल्ली गेट, सलीम अली सरोवर, हिमायत बाग, साठे चौक, टी.व्ही. सेंटर चौकमार्गे एमजीएम क्रीडा संकुल असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना नऊ डिसेंबर रोजी एमजीएम व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दुपारी एक ते पाच या वेळेत नोंदणी व धाव क्रमांक देण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष गाडेकर यांनी दिली. या प्रसंगी आशा देशपांडे यांची उपस्थिती होती.

नाव नोंदणीसाठी...
या स्पर्धेसाठी www.mgmheritagerun.org या वेबसाइटवर ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी मनीष पोलकम, क्रीडा विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कर्नल प्रदीप कुमार व आशिष गाडेकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणी योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई परिसरासाठी स्वतंत्र पाणी योजनेचा प्रस्ताव महापालिका राज्य शासनाच्या नगर विकास खात्याकडे पाठवणार आहे. त्यासाठी शासनाकडून विशेष निधी मिळण्याची शाश्वती प्राप्त झाल्यामुळे आठ दिवसांत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत करण्यात आला. सातारा आणि देवळाई असे दोन वॉर्ड तयार करण्यात आले. दोन्हींची लोकसंख्या सुमारे दहा ते पंधरा हजार आहे. महापालिकेकडे हस्तांतरित करताना या परिसरात सोईसुविधा देण्यासाठी शासनाने महापालिकेला विशेष निधी दिला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्तीची कामे खोळंबली. महापालिकेकडेही या कामांसाठी आर्थिक तरतूद पुरेशी नसल्यामुळे ही कामे केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याची व्यवस्था प्राधान्याने व्हावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. सातारा-देवळाईच्या स्वतंत्र पाणी योजनेसाठी शासनाकडून निधी मिळू शकेल का याची चाचपणी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली, तेव्हा नगर विकास खात्याला योग्य प्रकारे प्रस्ताव पाठवला तर, निधी प्राप्त होऊ शकतो अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
येत्या आठ दिवसात प्रस्ताव तयार केला जाईल आणि तो नगर विकास खात्याला सादर केला जाईल, याशिवाय स्वतंत्र पत्रदेखील शासनाला दिले जाणार आहे. पाणी योजनेसाठी शासनाकडून निधी मिळाल्यास सातारा-देवळाईत जलकुंभ, अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम केले जाणार आहे असे घोडेले म्हणाले. पाण्याचा स्त्रोत मात्र जायकवाडीचाच असल्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याशिवाय या परिसराला पाणी मिळणे शक्य होणार नाही.
-
चौकट
-
पॅकेज स्किममध्ये मिळणार निधी
-
सातारा - देवळाईच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पॅकेज स्किम मधून महापालिकेला निधी मिळण्याची शक्यता आहे. नेमका किती निधी लागेल याचा अभ्यास केला जाणार असून त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर केला जाईल. आगामी काळात समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यास त्याच्या बरोबरीने सातारा - देवळाई परिसरात पाणीपुरवठा योजनेचे काम होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गुणवत्ता ढासळल्यामुळेझेडपीच्या ४० शाळा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुणवत्ता ढासळल्यामुळे विद्यार्थी संख्या घटलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ४० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हा निर्णय राज्यस्तरावर घेतला आहे. राज्यभरातील १३०० शाळा बंद होणार असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. या निर्णयामुळे शिक्षकांत खळबळ उडाली आहे. गुणवत्ता, विद्यार्थी टिकवण्याचे यापुढील काळात झेडपी शिक्षकांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्या चांगल्या गुणवत्तेमुळे पटसंख्या वाढत असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ० ते १० पटसंख्या असलेल्या ४० शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. ज्या शाळा बंद होणार आहेत, तिथे अगदी बोटावर मोजण्याएवढी विद्यार्थी संख्या आहे. जिल्ह्यात कमी झालेल्या शाळांमध्ये वस्तीशाळांची संख्या मोठी आहे. शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदींनुसार प्राथमिक शाळा एक किलोमीटर तर, उच्च प्राथमिक शाळा तीन किलोमीटरमध्ये उपलब्ध करून द्यावयाची आहे. पटसंख्या कमी झाल्याने बंद झालेल्या ४० शाळांमधील ८० शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करावे, असेही प्राथमिक शिक्षक संचालनालयाने आदेशित केले आहे. विद्यार्थ्यांना परिसरातील शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. प्राथमिक शिक्षक संचालनालयाने या शिक्षकांचे ज्या शाळांमध्ये समायोजन करायचे आहे. त्या शाळांची नावेही दिली आहेत. या निर्णयाने झेडपीतील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
.................
चौकट
..............
बंद झालेल्या
तालुकानिहाय शाळा
.........
कन्नड - १०
फुलंब्री - ३
सिल्लोड- २०
गंगापूर - ३
वैजापूर - २
औरंगाबाद -१
पैठण - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महाराजाविरुद्धगुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
एका महाराजाने त्वचेवरील चट्टा बरा करण्याचे औषध देऊन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ - नऊ महिन्यांपूर्वी वेळोवेळी बलात्कार केल्याचे म्हैसमाळ येथे उघड झाले आहे. त्यातून संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. साधूचे नाव पीडितेला माहिती नसल्याने तिने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. पोलिस निरीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ई. जी. पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशरच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
आयशरने मोटार सायकलला धडक दिल्याने दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास जालना-अंबड महामार्गावरील कर्जत फाट्याजवळ घडला.
रमेश एकनाथ कोरडे (वय ४०) व सतीश रमेश कोरडे (वय २०, दोघेही रा. लोणगाव ता. भोकरदन) असे मरण पावलेल्याचे नाव आहे. कोरडे पिता-पुत्र मोटारसायकलने ( क्रमांक एम. एच. २१/४७६०) चिंचखेड येथून गावी जाण्यासाठी शनिवारी पहाटे निघाले होते. दरम्यान, जालन्याहून अंबडकडे येत असलेल्या भरधाव आयशरची (क्रमांक एम एच २१ एक्स १४६८) खड्डे चुकविण्याच्या नादात कोरडे यांच्या मोटारसायकलशी अंबड जालना महामार्गावरील कर्जत फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक देविदास शेळके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अंबड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. सतीश कोरडे हा मेंढ्या सांभाळण्याचे काम करत असून मेंढ्या घेऊन गावोगावी भटकंती करत होता. त्याचा मेंढ्यांचा आखाडा सध्या चिंचखेड शिवारात टाकलेला होता. तो आजारी असल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्याचे वडील चिंचखेडला आल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक मात्र, घटनेनंतर फरार झाला आहे. पुढील तपास बिट जमादार वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ केंद्रात मंत्रिपदाची ऑफर होती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला त्यांच्या जागेवर केंद्रात मंत्रिपदाची ऑफर होती अशा स्वरुपाचे गुपित राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील जाहीर कार्यक्रमात उघड केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. त्यामुळे या त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
बीडमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थितीत होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘तुमचे-माझे आधारवड असलेले गोपीनाथ मुंडे यांचे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर काही दिवसातच अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश शोकसागरात बुडाला होता. त्यांच्या राख सावडण्याच्या दिवशीच मला त्यांच्या जागी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती.’
विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मी असल्याचे वक्तव्य करुन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीचे असल्याचे यापूर्वीपण दाखवून दिले होते. त्यावेळी ही राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानावर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता तर केंद्रात ग्रामविकास मंत्रिपद मिळणार होते, पण मीच ते नाकारले असे विधान करुन पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूनम यांचा पीए मला धमकावतोयः सारंगी महाजन

$
0
0

उस्मानाबादः
भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजनचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, असा दावा त्याच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर, प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांचा पीए गुंडांकरवी आपल्याला ठार मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिलीय.

'पूनम महाजन यांच्या गाडीत बसूनच काही गुंड माझ्याकडे आले आणि उस्मानाबादमध्ये पाय ठेवला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दोन ते तीन वेळा मला धमक्या आल्या, पण पुरावे नसल्यामुळे मी पोलिसात तक्रार केली नाही', असं सारंगी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

उस्मानाबादमधील २९ गुंठे जमिनीच्या मालकीवरून सारंगी आणि महाजन कुटुंबीयांमध्ये वाद सुरू आहे. ही वारसा हक्काची जमीन आपल्याला मिळू नये यासाठी महाजन कुटुंबीय प्रयत्न करत आहेत, असा दावा सारंगी यांनी केला. मी घाबरून ही केस मागे घ्यावी, यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेत. ही माणसं जमिनीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण मला माझ्या मुलांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे आणि ही कायदेशीर लढाई मी लढणारच, असं सारंगी म्हणाल्या.

'प्रवीण यांच्या गोळ्या बंद केल्या होत्या'

तुरुंगात असताना दोन-अडीच वर्षं प्रवीण महाजन यांना मधुमेह आणि रक्तदाबावरच्या गोळ्या दिल्याच गेल्या नाहीत. जेलच्या डॉक्टरांनीही हे मान्य केलंय आणि मी मानवाधिकारातून ही केस जिंकली आहे, असं नमूद करत, आपल्या पतीचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा सारंगी यांनी केला. त्यांच्या गोळ्या जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्या होत्या का, या प्रश्नाचं थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं. केस जिंकल्यानं प्रवीण यांच्यावरील वैद्यकीय खर्चाचे सात लाख रुपये सरकारकडून मिळणार आहेत, पण भाजप सरकारकडून मला अपेक्षा नाहीत, असंही त्यांनी सूचित केलं.

महाजन कुटुंबाने मला किती त्रास दिला यावर एक पुस्तक लिहिणार असल्याचंही सारंगी यांनी सांगितलं.

दरम्यान, सारंगी यांना कुणीही धमकी दिलेली नाही, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्या आरोप करत असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. आता पूनम महाजन या प्रकरणी काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंडअळी’च्या ७५ हजार तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापूस उत्पादक अडचणी सापडले आहेत. जिल्ह्यातील ७२ हजारांवर उत्पादकांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने आतापर्यंत ८८२ ठिकाणी पिकपाहणी केली. दरम्यान, करमाड पोलिस ठाण्यात बियाणे विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने बियाणे विक्रेते धास्तावले असून त्यांनी शनिवारी कृषी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे कापसाचा पेरा वाढला. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली; पण बोंडअळीच्या फटक्याने कापसाचे पीक उद्‍ध्वस्त केले. या सर्व लागवड क्षेत्रावरच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येत असून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवत कृषी विभागाकडून तक्रारी घेतल्या जात आहे.
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ८१८ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे तक्रारी दाखल केल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यात सर्वाधिक तक्रारीत गंगापूर तालुक्यातून (१९ हजार ८८२) उत्पादकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.
चौकट -
आंदोलन, निवेदन
अर्जफाटे न घेता बोंडअळीबाधित कापूस शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केले. तर शिवसेनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाटू’च्या परीक्षा ११पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे (बाटू) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या ऑनलाइन परीक्षा ११ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेज संलग्नित झाल्यानंतर पहिल्यांदाच विद्यापीठ परीक्षा घेत आहे. या परीक्षा सीसीटीव्हीच्या निगरानीत होणार आहेत. विभागातून प्रथम वर्ष इंजिनीअरिंगचे अडीच हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या कॉलेजांनी ‘बाटू’शी संलग्निनीकरण स्वीकारले. शैक्षणिक वर्ष २०१६-१७मध्ये साठ पेक्षा अधिक कॉलेजांनी संलग्निकरण स्वीकारले. यामध्ये ४८ अभियांत्रिकी कॉलेज आहेत. या कॉलेजांची प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा पुढच्या आठवड्यात सुरू होत आहेत. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले. ११ ते २२ डिसेंबर दरम्यान अभियांत्रिकी पदवी तर एमटेकच्या परीक्षा ११ ते २० डिसेंबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाशी संलग्निकरणानंतर प्रथमच परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे कॉलेज, विद्यार्थ्यांमध्ये ही उत्सुकता आहे. ६०+४० पॅर्टननुसार परीक्षा होत आहेत. औरंगाबाद विभागातील दहा कॉलेजांनी ‘बाटू’शी संलग्निकरण स्विकारले आहे. अडीच हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सीसीटीव्हीच्या निगरानीत या परीक्षा होणार आहेत.

ऑनलाइन तपासणी

अभियांत्रिकीच्या परीक्षा सीसीटीव्हीच्या नजरेत होणार आहे. त्यासह परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन केली जाणार आहे. एका वेळी एका प्राध्यापकाला दहा पेपर ऑनलाइन तपासता येणार आहेत. ते तपासल्यानंतर पुढचे पेपर तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. त्यासाठी विभागीय उत्तरपत्रिका तपासणी केंद्र असणार आहे. पात्र, शिक्षकांना तेथे जाऊन उत्तरपत्रिकांची तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी पात्र प्राध्यापकांना लॉगइन आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे. त्यावरून त्याची तपासणी ऑनलाइन गुणदानाच्या नोंदी असणार आहेत.

उपकेंद्र सुरू होईना

पहिल्या सत्राचे परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, औरंगाबादच्या विद्यापीठ उपकेंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी, प्रमाणपत्रांसाठी लोणेरे येथे जावे लागणार आहे. जुलैमध्ये उपकेंद्र सुरू होईल असे सांगण्यात आले होते. आता डिसेंबर अन् पहिल्या सत्राचे वेळापत्रक आले तरी, विद्यापीठ प्रशासनाला उपकेद्र सुरू करता आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर; प्रचारासाठी रथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणा यांच्या वतीने १३ ते १७ डिसेंबर दरम्यान डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित ४२व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या प्रचाराकरिता रथ तयार करण्यात आला आहे. त्याचे क्लबचे ज्येष्ठ सदस्य सुरेश बापना यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्‍घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम लायन्स आय हॉस्पिटल, सिडको एन १ येथे झाला.
रुग्णसेवेचा हा महायज्ञ गेल्या ४१ वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. या वार्षिक शिबिराची रुग्ण मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. प्रारंभी अनेक वर्षे डॉ. शारदकुमार दीक्षित यांनी स्वतः रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य आणि अमेरिकेतील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला आणि डॉ. विनोद मोराडिया यांनी हा महायज्ञ सुरू ठेवला आहे. शिबिराला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो.
या पाचदिवसीय शिबिरामध्ये संपूर्ण मराठवाड्याबरोबरच जळगाव, धुळे, नंदुरबार, विदर्भातील अनेक जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातूनही रुग्ण येत असतात. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना शिबिराची माहिती व्हावी याकरिता विविध पातळ्यांवर प्रचार आणि प्रसाराचे काम क्लबतर्फे केले जाते. शिबिरासंदर्भात संपूर्ण माहिती असलेल्या पोस्टरने सजविलेल्या प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. औरंगाबादच्या चारही दिशांनी दीडशे किलोमीटर अंतरात रथाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.
उद्‍घाटन कार्यक्रमाला लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणाचे अध्यक्ष राजेंद्र लोहिया, प्रकल्प प्रमुख डॉ. मनोहर अग्रवाल, सचिव रवींद्र करवंदे, कोषाध्यक्ष विजय राठी यांच्यासह प्रकाश राठी, राजेश भारुका, राजेश जाधव, सुरेश साकला, जयकुमार थानवी, प्रसिद्धीप्रमुख राजेश लाहुरीकर, अनिल अग्रवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिटर्न उशिराने भरल्याने दाखल फिर्याद स्थगित

$
0
0

रिटर्न उशिराने भरल्याने दाखल फिर्याद स्थगित
म. टा. प्रतिनिधी, आैरंगाबाद
पुणे येथील पाटील कन्स्ट्रक्शन ग्रुपचे संचालक एम. बी. पाटील, ए. बी. पाटील, बी. बी. पाटील, एस. एम. पाटील व एस. एस. देशमुख यांच्याविरूद्ध आैरंगाबादच्या आयकर उपायुक्तांनी उशिराने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केल्याप्रकरणी फौजदारी केली आहे. या प्रकरणास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. डी. नाईक यांनी स्थगिती देऊन याचिका दाखल करून घेतली आहे.
पाटील कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या वतीने आयकर रिटर्न उशिराने दाखल केल्यामुळे नोटीस बाजवण्यात आली होती. नोटीसला समाधानकारक उत्तर देऊन मुदतवाढ मागितली होती. आयकर विभागाने याकडे दुर्लक्ष करीत आपणाविरूद्ध फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. ही नोटीस मिळताच याचिकाकर्त्यांनी आयकर रिटर्न दाखल केले. आयकर विभागाने रिटर्न स्वीकारले व त्यावर विलंब आकारला. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आयकर विभागाने कुठलेही कारण न देता आयकर कायदा १९६१ अंतर्गत फौजदारी तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आैरंगाबाद येथे दाखल केली. यास खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आैरंगाबाद येते प्रलंबित असलेल्या प्रकरणास स्थगिती देऊन प्रकरण दाखल करून घेतले. याचिकाकर्त्याची बाजू सतीश तळेकर यांनी मांडली. त्यांना कुणाल काळे सहाय्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त वीज कर्मचाऱ्यांचे प्रश्न तीव्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याची दखल राज्य शासन घेत नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रलंबित मागण्यांसाठी १२ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शासनाकडे मागण्या मांडण्यात आल्या आहेत. १ एप्रिल १९७४ किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २००५ पूर्वीची पेन्शन योजना १ एप्रिल १९९३ पासून लागू करावी, नोंदणीकृत संघटनेसोबत निवृत्त कर्मचाऱ्यांनाही चर्चेसाठी बोलवावे, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी महावितरणच्या भरतीत दहा टक्के जागा राखीव ठेवाव्यात या मागण्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १२ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कर्मचारी राज्यातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी दिली. या आंदोलनात राज्यातील नऊ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे एक हजाराच्या निवृत्त कर्मचारी आंदोलनात सामील होणार आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम योजना घोषित केली आहे. त्यानुसार दरवर्षी किमान सहा ते १८ हजार रुपयांपर्यंत हप्ता भरावा लागणार आहे. पण, निवृत्त कर्मचारी हा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे दरमहा २३० रुपये आकारून आरोग्य विमा द्यावा, अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथ कारखाना; आमदारांवर आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तालुक्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. आमदार संदीपान भुमरे यानी राजकीय शक्ती पणाला लावून साखर आयुक्तांना घायळ कंपनीच्या बाजुने निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप चेअरमन तुषार शिसोदे यानी केला आहे. आपण असले गलिच्छ राजकारण करत नसल्याचे सांगत आमदार भुमरे यानी शिसोदे यांचे आरोप फेटाळले आहेत.
संत एकनाथ साखर कारखान्यासोबत १८ वर्षांचा भागीदारी करार करणाऱ्या सचिन घायळ कंपनीचा करार रद्द करता येणार नाही व कारखाना घायळ कंपनीच्या ताब्यात द्या, असा आदेश साखर आयुक्तानी दिला आहे. यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या, नाशिक येथील शीला अतुल शुगर टेक ही कंपनी संत एकनाथ कारखाना बेकायदा चालवत आहे. या कंपनीने आतापर्यंत जवळपास ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सचिन घायळ कंपनीने कारखान्याचा ताबा घेतल्यास उसाचे पैसे कोण देणार यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये संभ्रम व घबराट पसरली आहे.
आता कारखान्याचे चेअरमन, भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी आमदार संदीपान भुमरे यांनी साखर आयुक्ताचा निर्णय सचिन घायळ कंपनीच्या बाजुने लागावा यासाठी त्यांची राजकीय शक्तिचा वापर केल्याचा आरोप केल्याने तालुक्याचे राजकारण पेटले आहे. आमदार भुमरे यांनी शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या मदतीने साखर आयुक्तावर दबाव आणल्याने साखर आयुक्तांनी हा निर्णय दबावात दिला आहे. मात्र, कारखाना बंद पडावा यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा गळीत हंगामा पूर्ण करणार असल्याचे तुषार शिसोदे यांनी सांगितले.
दुसरीकडे, आमदार संदीपान भुमरे यांनी तुषार शिसोदे यांचे आरोप फेटाळले आहेत. संत एकनाथ कारखान्याचा मी राजीनामा दिला असून मी चेअरमन असलेला शरद साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे आमदार भुमरे यांनी सांगितले. विद्यमान संचालक मंडळाला साखर आयुक्तांकडे बाजू नीट मांडता आली नाही नसल्याने निर्णय विरोधात गेला. हे अपयश लपवण्यासाठी तुषार शिसोदे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे आमदारांनी सांगितले.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची मदत घेत आमदार संदीपान भुमरे यानी साखर आयुक्तांवर दबाव आणला. त्यामुळे साखर आयुक्ताकडे सुरू असलेल्या प्रकरणातील निर्णय आमच्या विरोधात गेला.
- तुषार शिसोदे, चेअरमन

मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष एवढे मोठे नेते त्यांच्याकडे आहेत. माझ्यासारखा आमदारकडे साखर आयुक्तावर दबाव आणून त्याना एखादा निर्णय घेण्यास भाग पडू शकतो एवढी मोठी राजकीय शक्ती आहे का? शिसोदे यांनी असले गलिच्छ राजकारण करू नये.
-संदीपान भुमरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय प्रतिष्ठा पणाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजकीय पक्षांचा थेट सहभाग असलेल्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी सोमवारी (चार डिसेंबर) मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम पक्षांशी संबंधित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शैक्षणिक वर्तुळातील संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय वजन वापरण्यात आले. स्वतंत्र लढणाऱ्या उमेदवारांनी बेरजेचे गणित अवलंबले आहे. पाच पॅनेल निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतदार कुणाला कौल देतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान आहे. चार जिल्ह्यांतील ५५ मतदान केंद्रावर २९ हजार ५०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या प्रक्रियेसाठी विद्यापीठ प्रशासनाने दोनशे कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणुकीत ५८ उमेदवार असून, पाच पॅनेलमध्ये चुरशीची लढत आहे. शिक्षक अधिसभा आणि विद्या परिषदेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या उत्कर्ष पॅनेलने पदवीधर निवडणुकीत दहापैकी दहा जागा जिंकण्याचा दावा केला आहे. पदवीधर हा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे सर्वाधिक जागा जिंकू असे विद्यापीठ विकास मंचने म्हटले आहे. शिवशाही पॅनेल आणि परिवर्तन पदवीधर आघाडीने संघटनांची मोट बांधली आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुरस्कृत ‘उत्कर्ष पॅनेल’ने निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. ‘अभाविप’ पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच राजकीय पाठबळ मिळवून निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. हक्काचे मतदान घेण्यासाठी शिक्षण संस्था आणि संघटनांचे पाठबळ मिळवण्यासाठी उमेदवारांनी खटाटोप केला. एसएफआय, एनएसयूआय, सम्यक संघटना, एमआयएम यांनीसुद्धा निवडणुकीत मोर्चेबांधणी केली आहे. सर्वाधिक मतदार नोंदणी केल्यामुळे जिंकू, असा दावा बहुतेक उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार कुणाला विजयी करतात याची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, ही निवडणूक पारदर्शी पद्धतीने घेतली गेली नाही. नोंदणीसाठी सर्व कागदपत्रे देऊनही तब्बल पाच हजार मतदारांची यादीत नावे नसल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला. विद्यापीठाने निश्चित केलेल्या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. मतदान आणि निवडणुकी प्रक्रियेवर आक्षेप असताना प्रशासनाने योग्य मार्ग काढत प्रक्रिया पूर्ण केली. मतमोजणी बॅटमिंटन हॉल येथे बुधवारी होणार आहे.

कर्मचारी रवाना
औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील ५६ मतदान केंद्र आणि ८६ बुथवर मतदान होणार आहे. या कामासाठी प्रशिक्षित कर्मचारी रविवारी सकाळी विद्यापीठातून मतदानाचे साहित्य घेऊन रवाना झाले. काही तांत्रिक कारणामुळे प्रशासनाने जालना जिल्ह्यातील चार केंद्र ऐनवेळी बदलले. मतपत्रिका घेऊन कर्मचारी वेळेत पोहचावे म्हणून रविवारी सकाळीच पाठवण्याची खबरदारी प्रशासनाने घेतली. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी नियुक्त राहणार आहेत.

अखेर सुटी जाहीर
मतदान प्रक्रियेसाठी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी सुटी जाहीर केली नव्हती. मात्र, प्राध्यापक आणि पदवीधर मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सुटी देण्याची मागणी भारतीय विद्यार्थी सेनेने केली होती. त्यामुळे अखेर सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सुटी फक्त नोंदणीकृत मतदारांसाठी आहे. शहरात आठ मतदान केंद्रावर मतदान होणार असून विद्यापीठ कॅम्पसमध्ये तीन बूथ आहेत.

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान प्रक्रियेची योग्य अंमलबजवाणी केली आहे. उमेदवारांना ओळखपत्र दिले आहे. कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
- डॉ. साधना पांडे, कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठात ‘ओएसडीं’ची गरज नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय विधी विद्यापीठात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) पदावरून वाद तापला आहे. विधी विद्यापीठाची घडी बसलेली असून, या पदाची गरज नसल्याचे पत्र कुलगुरूंनी शासनाने दिले. दरम्यान, यासंदर्भात शासनाकडून पत्र येऊ द्या, अशी भूमिका घेऊन विशेष कार्य अधिकारी डॉ. एस. जी. गुप्ता यांनी दालन सोडयला तयार नाहीत.

राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी मार्चमध्ये पदभार घेतला. त्यानंतर विधी विद्यापीठाची वाटचाल वेगाने सुरू झाली. विद्यापीठ स्थापनेच्या सुरुवातीला शासनाने डॉ. एस. जी. गुप्ता यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमणूक केली. पुढे विद्यापीठाचे प्रवेश प्रक्रिया, पदभरतीची प्रक्रिया पार पडल्याने विविध पदांवर नेमणुकांच्या प्रक्रियेला वेग आला. कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश पहिल्याच वर्षी विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यात यशस्वी ठरले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान ते समोर आले. त्याचवेळी विधी विद्यापीत वित्त व लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, शिक्षकांच्या नेमणुका झाल्याने विशेष कार्य अधिकारीपदाची गरज नसल्याचे कुलगुरूंनी राज्यशासनाला कळवले आहे; तसेच डॉ. गुप्ता यांनी आपल्या मूळ पदावर काम करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. शासनाने नेमणूक केली. शासनाचे आदेश आल्यानंतर पद सोडू, अशी भूमिका डॉ. गुप्ता यांनी घेतली त्यावरून वाद सुरू झाला. त्यामुळे आपल्या दालनात डॉ. गुप्ता ठाण मांडून आहेत. शासन याबाबत केव्हा निर्णय घेते याची प्रतीक्षा विद्यापीठ प्रशासनाला आहे.

अनेक कामांमध्ये अडथळे
कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी पदभार घेतल्यानंतर सुरुवातीला काही प्रशासकीय कामकाजासाठी ‘ओएसडी’ म्हणून शासनाने नियुक्ती केली. अधिकाऱ्यांची पदभरती झाल्यानंतर आता या पदाची गरज नाही. कामकाजात या पदाचा अडसर ठरत आहे. त्यामुळे कुलगुरूंनी यासंदर्भात शासनाला पत्र पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दिव्यांगांच्या संस्था होणार व्यवसाय प्रशिक्षण केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
राज्यातील सर्व दिव्यांगाच्या संस्थाना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकास खात्याचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केली.
लातूरमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दिव्यांगाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्य केलेल्या कर्तृत्ववान दिव्यांग म्हणून पंडित शांताराम चिगरी, हरिश्चंद्र सुडे यांच्यासह चौघांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धेत यश मिळवलेल्या दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राचे अॅड. जगन्नाथ चिताडे, सरकारी वकील संतोष देशपांडे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांनी केले. यावेळे समाजकल्याण समितीचे सभापती संजय दोरवे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग असा शब्द वापरुन सरकार हे दिव्यांगासाठी सकारात्मक काम करणारे असल्याचे दाखूवन दिले आहे.’
संभाजी निलंगेकर म्हणाले, ‘दिव्यांगासाठीच्या तीन टक्के निधीचा उपयोगासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सनियंत्रण समिती असते. त्या समितीची राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्याची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत दिव्यांगाची माहिती गोळा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन, माहिती गोळा करणे, नेमकी मदत काय करायची आहे याच माहिती गोळा करणे आदि कामाचे मार्चअखेर पर्यंतचा कार्यक्रम निश्चीत करण्यात आला आहे. ज्या संस्थामध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी कार्य केले जात त्या सर्व संस्थाना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात येत असून या केंद्रासाठी शर्ती आणि अटीमध्ये सुद्धा मोठी कपात करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्या दहावर आणण्यात आली असुन त्यांना रोजगार ही अट शिथील करण्यात आली आहे. ज्या संस्थात जे शिकवले जाते तोच अभ्यासक्रम म्हणून त्याला प्रस्ताव आल्यानंतर १५ दिवसांत मान्यता देण्यात येणार आहे.’
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिव्यांगाच्या कल्याणासाठी तीन टक्के निधीची तरतूद ही किमान आहे. कमाल नाही त्यामुळे प्रशासनातील अधिकारी संवेदनशिलतेने दिव्यांगाचे हक्क, अधिकार त्यांच्यापर्यंत पोहंचवण्यासाठी काम करतील असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन सातबारा दुरुस्तीसाठी खेट्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातबारातील प्रचंड चुका, सॉफ्टवेअर, ब्रॉडबँड तसेच वर्कस्टेशनच्या अडचणींची शर्यत पार करत जिल्ह्यात आतापर्यंत १३६६ पैकी केवळ ४२३ गावातील (३० टक्के) सातबाराच्या नोंदणी शंभर टक्के जुळवण्यात आल्या आहेत. धिम्या गतिने होणाऱ्या या कामांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
तलाठ्यांकडून देण्यात आलेल्या सातबारा तसेच इतर दस्तांच्या नोंदी घेण्यात आल्या असल्या तरी या नोंदी ऑनलाइन अपलोड न केल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. म्हैसमाळ येथील अंगरिका सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक गाडेकर यांचे संस्थेच्या सातबारावर नोंद करताना महसूल विभागाकडून नाव चुकले. या चुकलेल्या नावाच्या दुरुस्तीसाठी गाडेकर यांनी संबंधित तलाठ्याकडे संपर्क करून दुरुस्ती करून घेतली. मात्र ऑनलाइन सातबाऱ्यामध्ये अद्याप दुरुस्ती झालेली नाही. या दुरुस्तीसाठी गाडेकर यांनी २०१५पासून खुलताबाद तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात खेट्या मारल्या, लोकशाही दिनातही प्रकरण ठेवण्यात आले, पण त्याचा उपयोग झाला नाही.
डिजिटल इंडिया अंतर्गत शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असून पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने सातबारा ऑनलाइनचे काम अत्यंत संथगतिने सुरू आहे. सातबाऱ्यातील चुका, तलाठ्यांना सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचे नसलेले ज्ञान, दुय्यम निबंधक कार्यालयाकडून आलेल्या दस्तांमध्ये क्षेत्र निरंक असणे, खाते क्रमांक नसणे तसेच ऑनलाइन डेटा अपडेशन आदी बाबींमुळे जिल्ह्यात ऑनलाइन सातबारा नोंदीला खोडा बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७४९ वीजग्राहक लखपती थकबाकीदार

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यात एक लाख रुपये व त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या २७४९ आहे. त्यांच्याकडे एकूण ४९ कोटी रुपये थकबाकी आहे.
महावितरणतर्फे वर्षभरात अनेकवेळा वीज चोरीविरोधी आणि वीज बिल वसुली अभियान राबविण्यात आले. त्यानंतरही औरंगाबाद आणि जालना जिल्हयात एक लाख रुपयांवर वीज बिल थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. यापैकी काही ग्राहकांचे वाद कोर्टात प्रलंबित आहेत. अनेक वेळा कारवाई केल्यानंतरही एक लाखांवरील थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत नाही. यामुळे आगामी काळात अशा ग्राहकांकडून बिल वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांनी लवकरात लवकर भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. सर्वाधिक थकबाकीदारांची संख्या औरंगाबाद शहर विभागात २४७७ एवढी आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद ग्रामीणमध्ये १४८, जालन्यात १२४ थकबाकीदार आहेत. औरंगाबाद शहरात ४६ कोटी ९५ लाख २६ हजार रुपये, औरंगाबाद ग्रामीणमध्ये २७ कोटी सहा लाख ४७ हजार रुपये, व जालन्यात २५ कोटी एक लाख ८ हजारांची थकबाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images