Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दर्जेदार चित्रपटांची चार दिवस पर्वणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगभरातील दर्जेदार चित्रपटांची पर्वणी असलेला पाचवा औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. प्रोझोन आयनॉक्स येथे १८ ते २१ जानेवारी या कालावधीत महोत्सव होईल. महोत्सवाला प्रसिद्ध दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, दिग्दर्शक महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, दिग्दर्शक संदिप सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने पाचवा औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. भारतीय चित्रपट, आशियाई चित्रपट आणि जागतिक चित्रपट अशा तीन विभागात चित्रपट दाखवले जाणार आहेत, अशी माहिती समन्वयक व प्रसिद्ध समीक्षक अशोक राणे यांनी शुक्रवार पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (१८ जानेवारी) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अतनु मुखर्जी दिग्दर्शित ‘रूख’ चित्रपटाने महोत्सव सुरू होईल. भारतीय गटात आसामी, हिंदी, मल्याळम, मराठी, पहाडी आणि बंगाली भाषेतील नऊ नवीन चित्रपट आहेत. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला रोख एक लाख रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायाचित्रण, संकलन, ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार ही वैयक्तिक पारितोषिके आहेत. या चित्रपटाच्या परीक्षण समितीत दिग्दर्शक विकास देसाई, प्रा. एमी कॅटलीन(अमेरिका), समीक्षक सैबल चॅटर्जी, पटकथाकार प्रा. अजित दळवी आणि अभ्यासक सुजाता कानगो यांचा समावेश आहे. आशियाई विभागात सात चित्रपट, जागतिक सिनेमा विभागात पाच, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गटात ‘स्वयंवरम’, ‘अकलेर संधाने’, ‘समर’ आणि ‘कासव’ या चित्रपटांचा समावेश आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘शाहीद’, ‘सिटीलाइट्स’ आणि ‘अलिगढ’ चित्रपट दाखवले जाणार आहेत. अमोल पालेकर यांचा ‘अनाहत’ आणि शशी कपूर यांचा ‘जुनून’ चित्रपटाचा महोत्सवात समावेश आहे. रविवारी (२१ जानेवारी) सायंकाळी सात वाजता समारोप सोहळा होईल. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या हस्ते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे अंकुशराव कदम, नंदकिशोर कागलीवाल, अशोक राणे, नीलेश राऊत, अजित दळवी, सुजाता कानगो, सुनील किर्दक, शिव कदम, उल्हास गवळी, संतोष जोशी, मोहम्मद अर्शद, प्रिया धारूरकर आदी उपस्थित होते.

पोस्टर प्रदर्शन
चित्रपट महोत्सवानिमित्त शशी कपूर यांना आदरांजली वाहणारे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शशी यांच्या चित्रपटांची ५० पोस्टर्स प्रदर्शनात असतील. या प्रदर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने सहाय्य केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या पोस्टरचेही प्रदर्शन आहे. महोत्सवानिमित्त १५ कॉलेजात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आहेत. महोत्सावाच्या नोंदणीसाठी शहरात दहा ठिकाणी सुविधा केंद्र उपलब्ध आहे.

दोन परिसंवाद
महोत्सवात १९ जानेवारीला प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांचा ‘मास्टर’ क्लास होणार आहे. निवडक विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील. तर २० जानेवारीला ‘मराठी चित्रपट व जागतिक व्यासपीठ’ या विषयावर विशेष परिसंवाद होईल. या परिसंवादात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, संदीप सावंत, क्रांती कानडे, सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर व मिलिंद लेले सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुरघोडीच्या राजकारणात शेतकऱ्यांवर अन्याय

$
0
0

लातूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
अरुण समुद्रे, लातूर
मांजरा प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय लातूरहून अंबाजोगाईला हलविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे भाजपातंर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा भाग असला तरी तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा ठरणारा आहे. या प्रकाराचा वरिष्ठ पातळीवरून विचार केला जात नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.
लातूर येथील मांजरा प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय १५ जानेवारीपासून अंबाजोगाई येथून कार्यान्वीत होणार आहे. जलसंपदा विभागाने स्थालंतर करू नये अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केलेली आहे. त्यासोबतच आता लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सुद्धा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना भेटून लेखी निवेदन पाठवून हे कार्यालयाचे स्थलांतर करू नये अशी मागणी केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घ्यायचा आहे. विभागीय आयुक्तालयाच्या कारणाने नांदेडविरुद्ध लातूर असा संघर्ष सुरू असतानाच आता लातूरविरुद्ध बीड असा सामना लावण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.

मांजरा प्रकल्पाच्या एकूण लाभक्षेत्राच्या दहा हजार ७०० पैकी सहा हजार ७०० हेक्टर क्षेत्र लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि लातूर तालुक्यातील आहे. एकूण क्षेत्राच्या ६५ टक्के क्षेत्र हे लातूर जिल्ह्यात आहे. सर्व लाभधारक शेतकरी हे लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी त्यांना लातूरचे कार्यालय हे सोयीचे आहे. रेणापूर ते अंबाजोगाई हे अंतर ३५ किलोमिटर तर लातूर ते अंबाजोगाई हे अंतर ५५ किलोमिटर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या साध्या कामासाठी सुद्धा एकावेळी किमान दोनशे रुपये खर्च करावा लागणार आहे. आणि किमान दहा हजार शेतकऱ्यांची गैरसोय यामुळे होणार आहे. भाजपची शेतकऱ्यांसाठी सिंचनाची घोषणा आणि कृती याच्या विसंगतीच हे उत्तम उदाहरण मानले जात असून मांजरा उपविभागीय कार्यालय लातूरात राहण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलार सिटीचा शिरपेचात तुरा!

$
0
0


dhananjay.kulkarni@timesgroup.com
औरंगाबादः सततचा दुष्काळ, पाण्याचे हाल आणि विजेच्या लपंडावाचे मळभ हटून आता औरंगाबादच्या शिरपेचात यंदा ‘सोलार सिटी’चा तुरा खोवला आहे. शहरातील तब्बल ५०० कंपन्यांनी हे प्लॅँट बसविल्यामुळे हजारो मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे, तर स्मार्ट सिटी खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरकतेकडे वाटचाल करत आहे.

शहरातील औद्योगिक वसाहत, घरे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि वसाहतींमधून सध्या तब्बल १४ ते १५ मेगावॅट वीज निर्मित रोज होत असून, वर्षाकाठी तब्बल सुमारे ३२ ते ३५ कोटींची उलाढाल होत आहे. हा बदल विशेषत: २०१४-२०१५नंतर आला. कंपन्या आणि एनजीओंद्वारे जास्तीतजास्त जनजागृतीही होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरातील तब्बल २५० प्रोजेक्ट ‘मेडा’ने मंजूर केले असून, त्यातून तब्बल १५०० किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. यात काही रुग्णालये आणि सामाजिक संस्थांनी घरगुती वापरासाठी लागणारी वीज घरांवरील सोलार प्लॅँटद्वारे निर्मिती केली जात आहे.
विशेषतः पाच औद्योगिक वसाहतींत सोलार प्लॅँट बसवण्याचा ट्रेंड वाढला आहे. एकूण सहा हजार कंपन्यांपैकी १० टक्के अर्थात ४०० ते ५०० छोट्या मोठ्या कंपन्यांनी सोलार प्लॅँट बसवले आहेत. यात शैक्षणिक संस्थाही मागे नाहीत. मराठावाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये(एमआयटी) १०० किलोवॅटचा प्लँट २०१४मध्ये बसवण्यात आला आहे. यातून ३० टक्के वीज बचत होत आहे. त्यानंतर इतर शैक्षणिक संस्थांमध्ये याची सुरुवात झाली. महात्मा गांधी मिशनसह (एमजीएम) काही इंजिनिअरिंग कॉलेजेमध्ये सोलार प्लँट बसवण्यात आला आहे. यातून सुमारे २०० ते ३०० किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. यातून किमान कॉलेज कॅम्पस पुरती वीजनिर्मिती होत आहे.

रुग्णालये आघाडीवर
शहरातील बजाज, धूत, एमआयटी यासारख्या नामांकित व मोठ्या रुग्णालयामध्येही सोलार प्लँट बसवण्यात आले आहेत. किमान २० ते ३० किलोवॅट वीजनिर्मिती यातून होत आहे. एकूण हॉस्पिटलला लागत असलेल्या वीजेपैकी किमान २० ते ३० टक्के वीजनिर्मिती याद्वारे होत आहे.

शहरात आम्ही २५० हून अधिक प्रोजेक्टमधून १५०० किलो वॅट वीजनिर्म‌िती होईल एवढ्या सोलार वॉटर प्लांटसना मंजुरी दिली आहे. ते यशस्वी लागू झाले आहेत. फक्त घरगुती आणि सामाजिक संस्था, सेवा संस्थांना सोलार प्लॅँटसाठी सबसिडी देत असते. याचाही अनेकांनी उपयोग केला आहे.
- विजयानंद काळे, विभागीय महाव्यवस्थापक, मेडा

सोलारोदय
- २५० संस्थानी बसवले प्लॅँट
- १३० प्लॅँट बसवणारे डिलर
- १५०० किलोवॅट वीजनिर्मिती
- ५०० कंपन्यांनी बसविले प्लॅँट
- १० ते १५ मेगावॅट ‌वीजनिर्मिती
- ३ रुग्णालयांनी बसवले प्लॅँट
- ३०० किलोवॅट वीजनिर्मिती
- २ शैक्षणिक संस्था
- ३०० किलोवॅट वीजनिर्मिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात वर्षभरात २०७ शेतकरी आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात २०१७ मध्ये २०७ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी १५६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारी आणि सामाजिक क्षेत्राचे प्रयत्न सुरू असताना वर्षात दोनशेचा आकडा गाठल्याने हे प्रयत्न तोकडे पडत आहेत की काय हा विचार करायला लावणारा आहे.

लहरी निसर्ग, शेतीमालाला न मिळणारे हमीभाव यामुळे आर्थिक अडचणीत येऊन विदर्भापाठोपाठ मराठवड्यातील बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यातही याचे लोण मोठ्या प्रमाणात पोचलेले आहे. यावर्षी जरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी गेल्या काही वर्षात पावसाने वेळोवेळी हुलकावणी दिली. यावर्षी पीकपाणी चांगले असले तरी पिकले तरी विकले नाही अशी स्थिती निर्माण झाली. सोयाबीन, कापूस, तूर यांना हमीभाव मिळाला नाही. त्यातच कापसावर गुलाबी बोंडअळी रोग आल्याने तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. याचा कापूस उत्पादन घेतले व त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला व आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू लागला आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या २०७ शेतकऱ्यांतील १५६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर २३ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २८ प्रकरणे चौकशीस्तरावर आहेत. आतापर्यंत पात्र शेतकरी कुटुंबाना एक कोटी ५६ लाख सरकारी मदत देण्यात आली आहे.
यात सर्वाधिक ५० शेतकरी आत्महत्या बीड तालुक्यात झाल्या आहेत. त्या पाठोपाठ गेवराई तालुक्यात ३०, अंबाजोगाई तालुक्यात २० व केज तालुक्यात २४, माजलगावमध्ये १५, आष्टी तालुक्यात ९, गेवराई तालुक्यात ९, धारूरमध्ये १३, परळीत ११, वडवणीत १२, पाटोदा १४, शिरूरमध्ये ९ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या २०७ आत्महत्यामधील १०७ शेतकरी आत्महत्या ऑगस्ट ते डिसेंबर या चार महिन्यात झालेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांच्या कलागुणांची परीक्षा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय मारवाडी महिला संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात देहदान, आई-वडिलांचे संगोपन, पर्यावरण सुरक्षा आदी सामाजिक विषयांवर संदेश देत विविध राज्यातील पारंपरिक पोशाखांची निवड करून महिलांनी उपस्थितांना चकित केले.

हॉटेल लेमन ट्री येथे संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीना गुप्ता (पाटणा) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर राष्ट्रीय उपाध्यक्ष शारदा मेहड़िया (नागपूर), राष्ट्रीय सचिव सुषमा अग्रवाल (पाटणा), पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमा पंसारी (संबलपूर) व सवित्री बाफणा (औरंगाबाद), राष्ट्रीय दक्षिणांचल उपाध्यक्ष ललिता मुथा (औरंगाबाद), राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पुष्पा सुराणा (हिंगोली) व रजनीती मोहता (खामगांव), पूर्व प्रांतीय अध्यक्षा कुमकुम अग्रवाल (नागपूर), प्रांतीय अध्यक्षा रेखा राठी, प्रांतीय सचिव सुनंदा लाहोटी, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्ष ललिता करवा उपस्थित होत्या. यावेळी संपूर्ण राज्यातून ३० मारवाडी महिला संघटना आल्या होत्या. या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजक औरंगाबाद अखिल भारतीय मारवाडी संघटना होती. सामाजिक विषयांची 'चुनौती' अर्थात आव्हान या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम तीन सत्रात घेण्यात आला.

पहिल्या सत्रात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. नंतर 'किटी पार्टी' या विषयावर दोन मिनिटे बोलण्याची स्पर्धा घेण्यात आली. एजंल्स पँराडाइज शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून गणेश वंदना व लेझीम नृत्य सादर केले. दुसऱ्या सत्रामध्ये शाखांचे सत्कार झाले. सोबतच बॅनरचे सादरीकरण व स्क्रँप बुक स्पर्धा घेण्यात आली. परीक्षकांच्या कसोटीला उतरण्याचा चंग बांधत राज्यातील प्रत्येक मंडळ या स्पर्धेत उत्साहात सहभागी झाले. शिवाय प्रत्येक संघटनेने देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत तशीच वेशभूषा केली. तर सामाजिक विषयांवर आधारित पोस्टर्सचा आशय सुद्धा वाचनीय होता. औरंगाबाद संघटनेने बंगाली वेशभूषेत येऊन देहदानावर जागृती केली. ‘जगातील सर्वोत्तम स्त्री म्हणजे भारतीय स्त्री’ असे संदेशही ऐकायला मिळाले. प्रत्येकच संघटनेने ही स्पर्धा गाजवली. आपापल्या संघटनेच्या वतीने वर्षभर घेण्यात आलेले कार्यक्रमांची माहिती देणारी स्क्रँप बुक स्पर्धाही अतिशय कलात्मक ठरली. फोटोचा कोलाज, सदस्यांची ओळख, सप्तपदीप्रमाणेच संकल्प केलेले सामाजिक उपक्रम असा देखणा खजिना महिलांनी मोबाइलमध्ये टिपला.

‘द कपूर्स’ने रसिक मंत्रमुग्ध
तिसऱ्या सत्रात सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ‘द कपूर्स’ हा गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच संघटनेच्या 'मैत्रेय' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी औरंगाबाद शाखेच्या माधवी करवा, कोषाध्यक्ष पुष्पा खंडेलवाल, सहसचिव अनुराधा मंत्री, सहकोषाध्यक्ष वनिता नाटाणी, प्रांतीय कोषाध्यक्ष नंदा मुथा, माजी अध्यक्ष कांचन जैस्वाल आदींसह विविध समित्यांनी परिश्रम घेतले. सरोज बगडिया व सरोज पंसारी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसूल केलेला निधी रखडलेल्या ‘त्या’ योजनांसाठी वापरा

$
0
0


Sachin.Waghmare@timesgroup.com
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत निर्माणच्या १५५ पाणीपुरवठा योजना निधीचा अपहार झाल्याने गेल्या नऊ वर्षांपासून रखडल्या होत्या. हा प्रकार ‘मटा’ने उघड केल्यानंतर अपहार झालेला ७० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने वसूल केला होता. वसूल केलेला हा निधी वर्षभरापासून अखर्चित असल्याचे ‘मटा’ने उघड केल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा ७० लाख रुपयांचा निधी त्याच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी वापरण्यात यावा, असे आदेश उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. संजय कोलते यांना शनिवारी दिले. त्यामुळे येत्या काळात या सर्व योजना मार्गी लागणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत निर्माणच्या १५५ पाणीपुरवठा योजनेचा निधी ग्रामसमित्यांनी हडप केल्याने नऊ वर्षांपासून रखडल्या होत्या. हा प्रकार ‘मटा’ने उघड केल्यानंतर लाखो रुपये उचलूनही काम पूर्ण न केलेल्या १७ गावातील ग्राम समितीकडून जिल्हा परिषदेने सुमारे ७० लाख रुपयांचा निधी वसूल केला. हा ७० लाख रुपयांचा निधी वर्षभरापासून तसाच अखर्चित पडला आहे. वसूल केलेला हा निधी प्रशासकीय अनास्थेमुळे धूळखात पडून असल्याने ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना खोळंबल्या असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त ‘मटा’तून प्रसिद्ध होताच त्याची दखल पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी घेतली.

गेल्या अनेक दिवसांपासून अखर्चित असलेल्या निधीचा वापर त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी वापरण्याचे आदेश दिले. त्यासोबतच अपहार झालेल्या एक कोटी दोन लाख रुपयांपैकी ७० लाख रुपयांची वसुली झाली असून उर्वरित ३२ लाख रुपयांचा निधी वसूल करण्यासाठी योग्य ती कारवाई ग्रामसमितीवर करण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी केल्या. त्याशिवाय या रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासत असेल तर जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून निधी घेऊन या योजना मार्गी लावाव्यात, असेही लोणीकर यांनी सांगितले.

काही ग्रामसमिती वसुली विरोधात कोर्टात गेल्याने त्यांची वसुली रखडल्या असल्याचे निर्दशनास आले असून त्याबाबतचा पाठपुरावा करून वसूल झालेला हा सर्व निधी तेथील काम पूर्ण करण्यासाठी वापरावा, अशा सूचना लोणीकर यांनी सीईओ कोलते यांना केल्या.


‘मटा’ चे केले कौतुक
उस्मानाबाद जिल्ह्यातील १५५ पाणीपुरवठा योजनेत झालेला अपहार राज्य सरकारच्या लक्षात आणून देऊन त्याबाबत एप्रिल २०१७ पासून पाठपुरावा केला. या प्रकरणात संबधितांना कारवाईची भीती दाखवून वर्षभरात ७० लाख रुपयांच्या निधीची वसुली त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली. एवढेच नव्हे तर वसूल झालेला हा निधी ‘मटा’च्या पाठपुराव्यामुळे त्यांच कामासाठी खर्च केला जात आहे. त्यामुळे या रखडलेल्या योजनांची कामे पूर्ण होऊन पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागणार नसल्याने पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी ‘मटा’चे कौतुक केले. त्यासोबतच उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचायांनी केलेल्या वसुलीच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले.


रखडलेल्या योजना मार्गी लागणार
उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडे वसूल झालेल्या पैशातून त्या गावातील अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी दिल्याने रखडलेले काम मार्गी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हया योजना मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वॉटर ग्रीडसाठी केंद्राकडे साकडे

$
0
0


सुरेश कुलकर्णी, जालना
पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि उद्योगाला पाणी देण्यासंदर्भात देशातील पहिला महत्वाकांक्षी पाणीपुरवठा करणारी वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात राबविली जात आहे. वॉटर ग्रीडला केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजनेच्या सहयोग मिळावे यासाठी केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत रविवारी नागपूरला विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली येथे याच विषयावर झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पिण्याच्या पाण्यासाठी येणाऱ्या खर्चातील पन्नास टक्के भाग केंद्र सरकार उचलण्यास तयार असल्याचे सांगितले असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत या निविदा उघडून या कामाच्या वर्कऑर्डर संबंधितांना दिल्या जात आहेत.येत्या सहा महिन्यांत हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तो मराठवाडा वॉटर ग्रीड समितीसमोर येईल, असे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेच्या संपूर्ण आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपाध्यक्ष असून उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे हे सदस्य आहेत. साधारणपणे तीस हजार कोटी रुपयांची ही योजना होईल असा प्राथमिक अंदाज आहे.
मराठवाड्यातील लहान-मोठी १२ धरणे आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने जायकवाडी नाथसागर, खडकपूर्णा, लोअर दुधना, येलदरी, इसापूर यांचा समावेश आहे. उजनी धरणातून बंद पाइपलाइनमधून ही सगळी धरणे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. यासाठी बंद पाइपलाइन वापरले जाणार आहेत. ज्यामुळे पाण्याची चोरी आणि गळती होणार नाही. या माध्यमातून मराठवाड्यासाठी एक विशेष वॉटर क्लस्टर निर्माण करण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे, मराठवाड्यात मान्सूनच्या लहरीपणामुळे कोणत्या तरी एखाद्या भागात पाऊस पडला नाही तरी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणीपुरवठा हमखास करण्यासाठी या मोठ्या धरणाच्या जोडणीतून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील जनतेला पिण्याचे पाणी हमखास मिळेल यासाठी या योजनेतंर्गत १८ टीएमसी पाणीसाठा विशेष आरक्षित करण्यात आला आहे. जायकवाडीच्या उर्ध्वभागातून बंद पाइपलाइनमधून जायकवाडी नाथ सागरात पाणी घेतले जाणार आहे. या सगळ्या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीला पाणी देण्यासंदर्भातील योजनेच्या कामासाठी पंतप्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. याच विषयावर या योजनेचे सादरीकरण रविवारी नागपूरला गडकरी यांच्यासमोर केले जात आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्य सरकारच्या वतीने निधी उपलब्ध होण्यासाठी अडचण निर्माण झाली तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून व पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. यासोबत ऑस्ट्रेलिया सरकारच्यावतीने अवघ्या दोन टक्के दराने कर्ज घेण्याच्या योजनेचा विचार राज्य सरकारने केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या संदर्भात विशेष बैठक झाली असल्याचे लोणीकर म्हणाले.


पाणीपुरवठा योजनेचा अभ्यास करणार
डिपीआर तयार करताना मराठवाड्यातील सगळ्या जुन्या पाणीपुरवठा योजना आणि त्यांच्या वर्तमान अवस्थांचा अभ्यास केला जाईल. पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन, जलकुंभ आणि अन्य साधनसमुग्री जिथे त्यांची चांगली अवस्था आहे तिथे उपयोग केला जाणार आहे. ज्यठिकाणी या छोट्या योजना कुचकामी झाल्या असतील त्या नव्याने उभारण्यात येणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.




कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षांत मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संपूर्ण देशातील पहिल्या महत्वाकांक्षी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे.
-बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...सामर्थ्यवान आई व्हा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आज आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, तरीही आम्ही शांत आहोत. समाजाची ही भूमिका चुकीची असून, आता यासाठी आईनेच सामर्थ्यवान व्हायला हवे. कारण प्रत्येक घरात परमेश्वर पोचू शकत नाही, म्हणून तिथे आई असते,’ असे प्रतिपादन अपर्णा रामतीर्थकर यांनी शनिवारी केले.

संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आयोजित संस्काराचे मोती या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ब्राह्मण महिला मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मंचच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी व डॉ. अनघा दिवाण उपस्थित होत्या. यावेळी घर सांभाळून मंचसाठी कार्य करणाऱ्या महिलांना ‘मी स्वामिनी मी रणरागिणी’ पुरस्कार देण्यात आले. युवती व महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमासाठी पुरुषही आर्वजून उपस्थित होते. रामतीर्थकर म्हणाल्या, ‘आम्हाला खेड्यात पौरोहित्य किंवा आई-वडील असणाऱ्या कुटुंबात मुलगी द्यायची नसते. सगळ्यांना शहरी संस्कृती आवडते. पाच मुलांना लहानाचे मोठे करणाऱ्या वडिलांना वृद्धापकाळात एकही मुलगा सांभाळू शकत नाही. आम्हाला मुलांना इंग्रजी शाळेतच पाठवायचे असते. कुटुंबात वाद इतका टोकाचा असतो की सख्ख्या जावा पण सोबत नसतात. हे सगळ अती असून अस्तित्वाची मृत्यघंटा आहे. या प्रक्रियेत आईच महत्त्वाची आहे. आई वेदना, आई संवेदना आणि परमेश्वराचा हुंकार आहे,’ असेही त्या म्हणाल्या. जयश्री चोबे यांनी सूत्रसंचालन केले. संगिता कागबट्टे व सरस्वती पैठणे यांनी परिचय करून दिला. सुषमा पाठक, नंदिनी ओपळकर, राजश्री एरंडे, आरती देशपांडे, वनिता खंडाळकर आदींनी परीश्रम घेतले.

मी रणरागिणी; पुरस्काराने गौरव
कार्यक्रमात ‘मी स्वामिनी मी रणरागिणी’ पुरस्काराने संगिता कागबट्टे, वैशाली काळे, भारती चोबे, रोहिणी भाले, भाग्यश्री बंखाळ, अर्चना काळे, ममता कुलकर्णी, कल्पना नागापूरकर, ज्योती धर्माधिकारी, उज्वला पैठणे, सीमा नांदापूरकर, मीनाक्षी केजकर, रश्मी नगरकर, जयश्री जोशी, मनिषा देशपांडे, वनिता हसेगावकर, अर्चना रोटे, सुषमा पांडे, आरती देशपांडे, जयश्री चोबे, नंदिनी ओपळकर, राजश्री एरंडे व सुचिता देशमुख आदींचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकत्र कुटुंबपद्धती तारणहार!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्त्री घराबाहेर पडून आपले अस्तित्व व स्वावलंबनासाठी मेहनत घेत आहे. आजचा काळ परिवर्तनाचा आहे. या काळातही कुटुंबसंस्थेला बळकटी देण्याचे कर्तव्य तिने पूर्ण करावे. कारण या काळात एकत्रित कुटुंबव्यवस्थाच आपली तारणहार आहे, असे आवाहन माहेश्वरी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष (मुंबई) कल्पना गगरानी यांनी शनिवारी केले. त्या अग्रेसन भवन येथे आयोजित चर्चासत्रात बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अग्रवाल महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा गुप्ता (दिल्ली) यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले. व्यासपीठावर प्रांतीय अध्यक्ष मालती गुप्ता, प्रांतीय सचिव उषा अग्रवाल, राज्य संघटनेच्या कोषाध्यक्ष सुमित्रा भारुका, सूर्यमाला मालाणी, कमलेश अग्रवाल, नंदू पित्ती, विजयकुमार चौधरी, अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, औरंगाबाद महिला संघटनेच्या अध्यक्ष निर्मला अग्रवाल, शांता बगडिया, उमा अग्रवाल, शोभा गोयंका, लीला अग्रवाल, शकुंतला अग्रवाल आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात मालती गुप्ता यांनी कोणताही समाज यशाच्या शिखरावर तेव्हाच पोचतो, जेव्हा पुरुष व महिला बरोबरीने वाटचाल करतील असे सांगितले. आधुनिकता व पारंपरिकतेचा समन्वय साधूनच आपण पुढे जायला हवे. केवळ शिक्षणच नव्हे, तर सुसंस्कृत समाजासाठी आपण आग्रही असायला, हवे असेही त्या म्हणाल्या.

कमलेश अग्रवाल यांनीही हाच धागा पकडून मार्गदर्शन केले. तर महिला सक्षक्तीकरणावर बोलताना कल्पना गगरानी यांनी महिलांना आत्मविश्वासाने पुढे या असे आवाहन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. स्त्री घराबाहेर पडली, स्वावलंबी झाली, पण दुसऱ्या बाजूने कुटुंबव्यवस्था कोलमडली. पाश्चात्य देशात हे चित्र दिसते. कुंटुंब विभक्त झाले. सुदैवाने भारतात कुटुंबानेच अशी परिस्थिती अजून तितक्या प्रमाणात नाही, पण पाश्चात्यांचे अनुकरण करताना आपणही त्या प्रवाहात जायला नको. यासाठी मुलांना सहनशीलता शिकवायला हवी. काम करा, स्वावलंबी व्हा, पण कुटुंबाला वेळ द्या,’ असेही आवाहन त्यांनी केले.

यावेळी अग्रवाल महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सुनीता अग्रवाल, सचिव जयश्री अग्रवाल, सहसचिव सुनीता अग्रवाल, कोषाध्यक्ष गंगा अग्रवाल, सुमित्रा भारूका, प्रीती पित्ती, मनिषा अग्रवाल, सपना अग्रवाल, रजनी बगडिया, मनिषा भारूका, चेतना अग्रवाल आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंडअळी पंचनामे तातडीने पूर्ण करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औरंगाबाद आणि लातूर विभागातील रखडलेले बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा,’ अशा सूचना राज्याचे कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी शनिवारी दिल्या.

हिमायतबाग फळसंशोधन केंद्रातील सभागृहात आज कृषी आयुक्त सिंह यांनी सकाळच्या सत्रात औरंगाबाद विभागाचा, तर दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर विभागाचा आढावा घेतला. यावेळी औरंगाबाद विभागातील बीड जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले असून, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात अद्याप ३० टक्के पंचनामे रखडल्याचे समोर आले. त्यामुळे सिंह यांनी कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ररखडलेले पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. पंचानाम्यांसोबतच राज्य व केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी नेटाने प्रयत्न करण्याच्या सूचना देखील सिंह यांनी दिल्या. यांत्रिकीकरणासह राष्ट्रीय फलोत्पादन, ठिबक सिंचन, शेडनेट, पॅक हाउस, शेततळे आदी योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांपासून कृषी सहायकांपर्यंत सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. साहेबराव दिवेकर, यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

...अन्यथा कारवाई
राष्ट्रीय फलोत्पादन योजनेच्या संथ अंमलबजावणीबाबत सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. काही जिल्ह्यात वर्ष संपत आले तरी राष्ट्रीय फलोत्पादन निधी खर्च न झाल्याबद्दल त्यांनी नापसंती दर्शवली. काम करा, योजना चांगल्या राबवा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ला दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीने ‘एमआयएम’ला शनिवारी मोठा झटका दिला. दमडीमहल येथील अतिक्रमण हटाव प्रकरणी हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून विरोधी पक्षनेता फेरोज खान यांच्यासह गटनेता नासेर सिद्दिकी, जमीर कादरी, सरवत बेगम, साजेदा फारुकी या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव कायदेशीर तरतुदीच्या अधीन राहून राज्य शासनाकडे पाठवण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.
दमडीमहल ते जालना रोड या रस्ता रुंदीकरणाआड येणारी बांधकामे पाडण्याची कारवाई महापालिकेतर्फे केली जात होती. त्यावेळी पालिकेने ऐतिहासिक दमडीमहल पाडून टाकली. जवळच असलेले श्रीराम पवार यांचे घरही पथकाने पाडले. पवार यांचे बांधकाम अतिक्रमित असून ते पाडण्याची मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी लावून धरली होती. घर पाडताना एमआयएमच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी दमदाटी केल्याचे आरोप होत होते. हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी स्थायी समितीच्या चार सदस्यांनी केली होती. महापौर नंदकुमार घोडेले यांना निवेदन देऊन विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची विनंतीही करण्यात आली होती.
भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी दमडीमहल येथील कारवाईचा उल्लेख केला. कारवाईचे चित्रीकरण दाखवण्याची मागणी त्यांनी केली. फेरोज खान यांनी कारवाईच्या वेळी दमदाटी केली, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पद रद्द करण्याची मागणी वानखेडे यांनी केली. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी पालिका अधिकाऱ्यांनाच कोंडीत पकडले. अतिक्रमण ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे असा उल्लेख त्यांनी केला. शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले, पवार यांच्या घरावरची कारवाई कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली याचा खुलासा झाला पाहिजे. भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी कायद्याचा आधार घेत पालिका प्रशासनाला कोंडीत पकडले. कायदेशीर तरतुदीआधारे कारवाईची मागणी शिंदे यांनी केली.
एमआयएमचे विकास एडके, गंगाधर ढगे, सरवत बेगम, शिल्पाराणी वाडकर, अॅड. माधुरी अदवंत यांनीही मत मांडले. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी फेरोज खान यांच्यावर कारवाईची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामविस्तार दिनी युतीच्या नेत्यांना विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी (१४ जानेवारी) ‘एक विचार एक मंच’ संकल्पना राबवली जाणार आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या दलित नेत्यांनी नामविस्तार दिनी फिरकू नये असा निर्णय आंबेडकरी पक्ष व संघटनांनी घेतला. तसेच भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामागे ताकद उभी करण्यावर एकमत झाले.
नामविस्तार दिनी दरवर्षी प्रत्येक पक्ष आणि संघटना स्वतंत्र मंच उभारून कार्यक्रम आयोजित करीत असते. हा पायंडा मोडीत काढून एकाच मंचावर कार्यक्रम घेण्याचा निर्णय आंबेडकरी संघटनांनी घेतला आहे. याबाबत सुभेदारी विश्रामगृह परिसरात शनिवारी बैठक झाली. त्यात तरूण पदाधिकाऱ्यांनी परखड मते मांडली. एकत्र आल्याशिवाय आंबेडकरी विचारांचा दबदबा वाढणार नाही. काही नेते स्वहितासाठी समाजात फूट पाडतात. हा प्रकार रोखून नामविस्तार दिन एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘एक विचार एक मंच’ संकल्पना राबवली जाणार असून प्रमुख नेते या निर्णयापासून दूर आहेत. तरूण पदाधिकाऱ्यांची संयोजन समिती नेत्यांची भेट घेऊन निर्णय सांगणार आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मंत्रिमंडळात असलेले रामदास आठवले यांच्या नावाला काही तरुणांनी विरोध केला. मात्र, आठवले यांची नामविस्तारात मोठी भूमिका आहे. त्यामुळे त्यांना विरोध न करण्यावर एकमत झाले.
युतीच्या ज्या नेत्याला येण्याची इच्छा असेल त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन यावे. अन्यथा, कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरकू नये असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात राज्य पातळीवरील मोजकेच नेते भाषण करणार आहेत. प्रत्येकाला स्वतंत्र वेळ दिली जाणार आहे. संयोजन समितीत शेकडो भीमसैनिक सहभागी आहेत. आंबेडकरी पक्ष आणि संघटनांची ताकद वाढवण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. त्यामुळे विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्याच्या सीईओंना अटक आणि सुटका

$
0
0

जालना : महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांना कदीम जालना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यानंतर लगेचच त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प संचालक पदावर कार्यरत असलेल्या महिलेने गुरुवारी चौधरी यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर काही वेळातच त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान, जिजाऊ ब्रिगेडने, चौधरी यांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना निवेदनाद्वारे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच सिटी बस खरेदीने नमन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सिटी बस सुरू करण्यासाठी सुरुवातीला पाच बस खरेदी करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. शॉर्ट टेंडर काढून ही खरेदी केली जाईल. त्यासाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया पालिकेतर्फे तत्काळ सुरू केली जाणार आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीचे (स्पेशल पर्पज व्हेकल) अध्यक्ष तथा राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांच्याकडे लावून धरली होती. स्मार्टसिटी प्रकल्पात अर्बन ट्रान्सपोर्ट मोबॅलिटी हा एक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सिटी बसचा मुद्दा लाऊन धरला. २३ जानेवारी रोजी किमान पाच बस सुरू कराव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. पोरवाल यांनी सिटी बसच्या संदर्भात उपसमिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक शनिवारी झाली. बैठकीला महापौर घोडेले यांच्यासह सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्टसिटी प्रकल्पाचे नोडल ऑफिसर सिकंदर अली, पोलिस विभाग, एस. टी. विभाग, आरटीओ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती महापौरांनी दिली. ते म्हणाले, ‘स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून तात्काळ पाच सिटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत चांगल्या दर्जाच्या या बस असतील, असे बैठकीत ठरविण्यात आले. शॉर्ट टेंडर काढून खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे. टेंडर काढण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. बस खरेदी करून त्या एसटी महामंडळाला चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया संपेल,’ असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

महामंडळाची तयारी
सिटी बस खरेदीच्या अनुशंगाने रिक्वेस्ट फॉर प्रपोजल काढले जाणार आहे. त्यात केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या सर्व निकषांचा समावेश केला जाणार आहे. पालिकेतर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या बसेस वेगवेगळ्या मार्गावर चालवण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून तात्काळ अत्यंत चांगल्या दर्जाच्या पाच सिटी बस खरेदी करण्यात येतील. शॉर्ट टेंडर काढून खरेदी प्रक्रिया केली जाईल. टेंडर प्रक्रिया तत्काळ सुरू करू.
- नंदकुमार घोडेले, महापौर

...लालपरी!
- २९ सिटी बस सुरू
- १२ मार्गावर बस
- ४ स्कूल बस
- ५ सिटी बसची खरेदी
- २३ जानेवारीपासून सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गॅस्ट्रो प्रकरण केवळ अपघात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘छावणीतील गॅस्ट्रो प्रकरण केवळ एक अपघात होता, असा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. या विषयावर आगामी दहा ते पंधरा दिवसांत दोषींवर कारवाई करू, असे ब्रिगेडीअर डी. के. पात्रा यांनी जाहीर केले आहे,’ अशी माहिती उपाध्यक्ष संजय गारोल यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा आज झाली. बैठकीमध्ये छावणी परिषदेच्या पाच सदस्यीय समितीने सादर केलेल्या गॅस्ट्रोर प्रकरणाच्या चौकशी अहवालावर बंद दाराआड इन कॅमेरे दोन तास चर्चा झाली. यावेळी उपाध्यक्ष संजय गारोल यांच्यासह माजी उपाध्यक्ष किशोर कच्छवाह, कर्नल शर्मा, एम. आनंद आणि सीईओ विजय कुमार नायर यांची उपस्थिती होती. समितीने दिलेल्या अहवालात विविध कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत.
या अधिकाऱ्यांच्या जबाबावरून छावणी भागात घडलेले गॅस्ट्रो प्रकरण हे अपघाती असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय ब्रिगेडिअर डी. के. पात्रा आगामी पंधरा दिवसांत घेतील, अशी माहिती गारोल यांनी दिली. दरम्यान, बैठकीत वार्ड क्रमांक ३, ४, ५, ६ आणि ७ या वॉर्डात अन्य कामांच्या जागी आता जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांमध्ये हे काम केले जाणार आहे.

अहवालातील मुद्दे
- छावणी बोर्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांची माहिती नाही.
- कर्मचाऱ्यांना कामाबाबत माहिती किंवा प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
- कर्मचाऱ्याने सुटी घेतल्यानंतर त्याच्या कामाची जबाबदारी कोणावर आहे, याचीही माहिती दिलेली नाही.
- पाण्याचे नमुने तसेच टाक्यांची स्वच्छता याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही.
- महानपालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो, मात्र पालिकेनेही निश्चित वेळेमध्ये पाणी नमुन्याची तपासणी केली नाही.
- टेक्निकल स्टॉफ नसल्यामुळे सँपल कलेक्शन होत नाही. कर्मचारी कमी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ खैरेंकडून रावतेंना घरचा आहेर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एसटी कामगारांना रुबाबदार ड्रेसचे वाटप केले. या ड्रेसवर त्यांना स्लीपर घालण्याची वेळ येऊ देऊ नका. वेतन करार करून घसघशीत वाढ द्या. अन्यथा हा प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत नेऊ,’ असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिला.

एसटी महामंडळाच्या वतीने दोन वर्षानंतर रेडिमेड ड्रेस वाटपाचा कार्यक्रम विभाग नियंत्रक कार्यालयाच्या परिसरात झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, सुरक्षा व दक्षता अधिकारी म. ज्ञ. केंजळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विभागातील विविध पदांवरील २९ कर्मचाऱ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. खैरे म्हणाले, ‘एसटी कामगारांचे वेतन खूप कमी आहे. त्यामध्ये कामगारांच्या मुलांचे शिक्षणही पूर्ण होऊ शकत नाही. खासगी ड्रायव्हर आता महिन्याला पंधरा हजार रुपये पगार मागतो. तेव्हा एसटी कामगारांची मागणी चुकीची नाही. यामुळेच त्यांना आंदोलन करावे लागते. कोर्ट-कचेरी बाजूला ठेवून वेतन करार करा. एसटी कामगारांना न्याय द्या. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रश्न नेऊ,’ असा घरचा आहेर खैरे यांनी रावतेंना दिला.

ड्रेस निघाले खराब; सोयगावचा बहिष्कार
ड्रेस वाटप कार्यक्रमातील अनेक ड्रेस खराब होते. त्यामुळे कामगारांनी हे ड्रेस परत केले. एसटीच्या कामगार शाखेने कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व आगार प्रमुखांना या कार्यक्रमाची माहिती दिली होती. तरीही सोयगाव आगाराचे कर्मचारी इकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, अशी चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुश्राव्य गायकीला रसिकांची दाद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सव शनिवारी सुरू झाला. या महोत्सवात पहिल्या दिवशी जगमित्र लिंगाडे याच्या एकल तबला वादनाने मैफल सुरू झाली. तालबद्ध ‘पेशकार’ सादर करीत जगमित्रने मैफलीत रंग भरले. मध्य लयीतील वादनाने अवघे नादविश्व उभे केले. तीन ताल, रेले, तुकडे, गत, परण अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. संवादिनीवर देवेंद्र देशपांडे यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ शास्त्रीय गायक एम. व्यंकटेशकुमार यांचे सुश्राव्य गायन रंगले. ‘राग यमन’मधील ‘मेरा मन बांध लिनो’ ही रचना सादर केली. आरोह-अवरोह आणि जोरकस शैलीचा उत्तम उपयोग करीत त्यांनी गायन रंगवले. या बहारदार गायनात रसिक तल्लीन झाले. छोटा ख्याल तेवढाच उत्कटतेने सादर केला. ‘सखी येरी आयी पिया बिन’ बोलावर वातावरण संगीतमय केले. तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तानपुऱ्यावर रोहन गावडे यांनी साथसंगत केली.
दरम्यान, या महोत्सवाचे उदघाटन एम. व्यंकटेशकुमार यांनी केले. यावेळी स. भु. शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, डॉ. नंदकुमार उकडगावकर, डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. प्रदीप जबदे, डॉ. जगदीश खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. देशात हजारो शिक्षण संस्था आहेत. मात्र, तिथे संगीत अकादमी नसते. या शंभर वर्षांच्या संस्थेत संगीत अकादमी असल्याचा आनंद आहे. मराठवाड्यात पूर्वीपासून नाट्य संगीताचा प्रभाव आहे. या भूमीत चांगले कलाकार घडवण्यासाठी प्रयत्न करा,’ असे एम. व्यंकटेशकुमार म्हणाले. तर ‘स. भु. शिक्षण संस्था वर्षभरात ख्यातनाम गायकाचे चार शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. या उपक्रमाला रसिकांच्या प्रतिसादाने सुरूवात होईल,’ असे अॅड. वकील यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पाटील आणि प्रा. सोनल नंदनूरवाले यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुगम संगीत आज
गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे. सरस्वती भुवन महाविद्यालायचे विद्यार्थी अभंग सरस्वती सादर करणार आहेत. त्यानंतर प्रसिद्ध गायिका नंदिनी आणि अंजली गायकवाड यांचे सुगम गायन होईल. रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधुभावासाठी माजी सैनिकांचा पुढाकार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील नागरिकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी माजी सैनिक मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी शांती संदेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीचौक येथील झाशी राणी उद्यानात आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक, पोलिस अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस उपायुक्त दीपाली धाटे -घाडगे, पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भगवान बाबा बालिकाश्रम येथील पूजा हरार, कौशल बोर्डे, पूजा गोसावी, लंका ठोंबरे यांनी ‘आजा वो सब मिलके... रबसे दुआ मागे जीवन सुकून चाहे,’ हे गीत सादर केले. कमांडर वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. केले. श्रीमती घाडगे यांनी मार्गदर्शन करताना आपण भारतीय आहोत. सर्व धर्माचा आदर केला पाहिजे. आम्हाला केवळ तिरंगा राष्ट्रध्वजच हवा, असा संदेश समाजात गेला पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमामुळे चांगली सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले. शांती संदेश विषयीची पत्रके नागरिकांना वाटण्यात आली. ‘एकच झेंडा- तिरंगा झेंडा ‘एकच नारा भारत देश हमारा’ आदी घोषणा देण्यात आल्या. विंग कमाडर टी. आर. जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कर्नल पिंपळे, कर्नल राज, कर्नल सोळवे, अशोक हंगे यांनी पुढाकार घेतला. पोलिस उपनिरीक्षक धरमसिंह सुंदरडे, विजय पोळ, इथापे, श्रीमंत गोर्डे पाटील, मनोज देहाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखकांनी कायद्यांची माहिती पोहचवावी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘साहित्यिकांनी कायद्यातील बदलांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी. त्यामुळे त्यांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर समाजासाठी होईल,’ असे आवाहन मुंबई हायकोर्टाच्या न्या. मृदुला भाटकर यांनी शनिवारी ‘नुक्कड’ साहित्य संमेलनात केले.
पुष्पक मंगल कार्यालयात आजपासून हे संमेलन सुरू झाले. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्याला न्या. भाटकर यांच्यासह व्यासपीठावर विक्रम भागवत, डॉ. माधवी वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. भाटकर म्हणाल्या, ‘लोकशाहीची मूल्य, तत्त्व कायद्याने जपली आहेत. अनेक चांगली कायदे आपल्याकडे आहेत, परंतु आपण ते फारसे वापरत नाहीत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हुंडाबळी सारखा कायदा आहे. त्यात अनेक चांगले बदल झाले, तरी हुंडाप्रथा सुरू आहे. समाजातील उच्चशिक्षितांनी पुढे यायला हवे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, माहितीचा अधिकार अशी अनेक कायदे चळवळीच्या माध्यमातून समोर आले. काळानुरूप कायद्यामध्ये आपले कायदे मंडळ बदल सुचविते. त्या बदलांचीही माहिती सर्वसमान्यांना असावी. साहित्यिकांनी सर्वसामांन्यांपर्यंत ती पोहचविण्याची गरज आहे. कायदे अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापरले गेले, तर लोकशाही अधिकाधिक बळकट होईल. लोकांसाठी केलेले चांगले कायदे अधिकाधिक वापरले गेले, तर गरजवंताला न्याय मिळेल. न्यायदानाची प्रक्रिया सोपी नसते. साक्ष, पुरावे पडताळून पाहताना कस लागतो. उत्तम कायद्याच्या राज्यासाठी प्रत्येकाने सजग असणे महत्त्वाचे असते.’ यावेळी विक्रम भागवत, डॉ. माधवी वैद्य यांचीही भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी २० ई बुक्स, ६० ऑडिओ बुक्सचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात ‘कथा आशय विषय आणि आकृतिबंध’ चर्चासत्र झाले. यामध्ये गणेश कनाटे, शशी डंभारे, संजय मोरे, मेघा देशपांडे, विनया पिंपळे, शिरीष कुलकर्णी, सुवर्णा पावडे यांनी सहभाग घेतला.

आज कथा अभिवाचन
संमेलनात रविवारी सकाळी नऊ वाजता लेखकांसाठी डिजिटल मार्केटिंग, १०.३० वाजता आयडिया टू बुक-लेखनाचा प्रवास, दुपारी १२ वाजता नुक्कड कथा अभिवाचन होणार आहे. यामध्ये संगीता कुलकर्णी, अक्षय वाटवे, केतकी करंदीकर आणि कलाकार सहभागी होतील. दुपारी अडीच वाजता समारोप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नमंजुषा स्पर्धेत नाथ व्हॅली प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एरव्ही फोटो, व्हिडिओ आणि टीव्हीमध्ये दिसणारे पक्षी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा आनंद रविवारी पक्षीप्रेमींना घेतला. दोन दिवसांच्या पक्षी महोत्सवाच्या समारोपदिनी पैठण येथे आयोजित पक्षी निरीक्षणाला अनेक शाळांचे विद्यार्थी, नागरिकांची गर्दी झाली होती. महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत नाथ व्हॅली शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.

भानुदास चव्हाण सभागृहात शनिवारपासून हा महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आज करण्यात आले. दोन दिवस पक्षी छायाचित्र प्रदर्शन, मनोरंजक, ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा, पक्षी निरीक्षण आदी कार्यक्रम झाले. रविवारी पक्षी निरीक्षणासाठी पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत नाथ व्हॅली स्कूलचे वरूण पाटणी व निलय वाणी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पैठणच्या आयकॉन पॅराडाइज इंग्लिश स्कूल, पैठण (द्वितीय) संस्कार विद्यालय (तृतीय) यांनी यश मिळविले. निबंध स्पर्धतील विजेत्यांसह फाउंडेशनतर्फे वन्यजीव अभ्यासक्रम प्रमाणपत्र कोर्स पूर्ण करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

एन्व्हायरॉन्मेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अॅकॅडमी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, सीएमआयए, वन विभाग वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि एमटीडीसी यांच्या सहकार्याने सहा व सात जानेवारी रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक दिलीप यार्दी यांनी सांगितले.

समारोपप्रसंगी मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उत्तम काळवणे, के. एम. सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आश्विनी यार्दी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महोत्सवासाठी रामकृष्ण बिडवई, अमेय देशपांडे, प्रसाद गुरू, अभय कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला.

विविध स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी
निबंध स्पर्धा शालेय गट ः प्रथम वैष्णवी गायकवाड, आयकॉन इंग्लिश स्कूल, पैठण, द्वितीय प्रथमेश वर्मा, क्लोव्हरडेल स्कूल, तृतीय कल्याणी चंद्र, शारदा मंदिर. खुला गट ः प्रथम विशाखा पतंगे, द्वितीय अपेक्षा मुळे, तृतीय वैशाली धामणगावकर. छायाचित्र स्पर्धा ः प्रथम सार्थक अग्रवाल, तृतीय ः मीनाक्षी राजपूत आणि उत्तेजनार्थ वेद जहागीरदार, गोविंद कदम, शिशिर जाधव. शाळांच्या सहभागाच्या तिसऱ्या स्पर्धेत मुकुल मंदिरचे आशिष पंडित, बलराज भागवत, वूडरिच स्कूलचे आयुष प्रसाद, शिवानी माचकर, शारदा मंदिरचे अनुश्री वैद्य, मयुरी कुलकर्णी, स्टेपिंग स्टोन स्कूलचे तय्यब फारुकी, ऋतिका रंजवा, संस्कार विद्यालयाचे सोहम देवळाणकर, संजना गोसावी यांना सहभागाची प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images