Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परराज्यात चोरी करणारी टोळी गजाआड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
परराज्यात चोऱ्या करून सदरील माल ट्रकद्वारे आणणाऱ्या टोळीतील पाच जणांना उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ करण्यात आली.
चोरीचे साहित्य ट्रक मधून सोलापूरहून उस्मानाबादकडे येत असल्याची खबर पोलिस निरीक्षक डी. एम. शेख यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आयुर्वेदिक कॉलेजजवळ संशयित ट्रक क्रमांक ( एम. एच. २५ बी ७४६२) थांबवून तपासणी केली असता या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात टायर, बॅटरीज तसेच डिझेलने भरलेले प्लस्टिकचे कॅन आढळून आले. चौकशी अंती हा सर्व माल केरळमधून चोरून आणल्याचे समोर आले.
यावेळी पोलीस पथकाने ट्रकसोबतचे चंदर भास्कर काळे, नवनाथ अनिल शिंदे, दशरथ भीमा काळे, अशोक गोपीनाथ काळे, व नाना भास्कर काळे
(सर्वजण रा. तेरखेडा जि. उस्मानाबाद ) यांना ताब्यात घेतले. यातील चंदर काळे हा अनेक गुन्ह्यातील आरोपी आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपींना शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलवाहिनीची प्रतीक्षा संपेना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंतच्या नवीन जलवाहिनीच्या कामाला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. या जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला एक डिसेंबरपर्यंत सुरुवात करा, असे स्पष्ट आदेश छावणी परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर अनुराग विज यांनी २४ नोव्हेंबरच्या बैठकीत दिले होते, मात्र कामाच्या मुदतीला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी कामाला सुरुवात झालेली नाही.

दूषित पाण्यामुळे छावणी परिसरात नोव्हेंबर महिन्यामध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आणि तब्बल १२ ते १४ हजार छावणीवासियांना गॅस्ट्रोचा फटका बसला. एकट्या छावणी परिषदेच्या रुग्णालयात सहा हजार नागरिकांवर उपचार करण्यात आले. त्यानंतरही डिसेंबरअखेरपर्यंत गॅस्ट्रो रुग्णांचा काही प्रमाणात ओघ सुरुच होता. त्यामुळे गॅस्ट्रो प्रकरणाची चौकशी करून चार डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांनी दिले होते. त्याचवेळी कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन स्वतंत्र जलवाहिनीला ४० लाखांचा निधी मंजूर करून एक डिसेंबरपर्यंत जलवाहिनीचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश तत्कालीन अध्यक्षांनी २४ नोव्हेंबरच्या परिषदेच्या बैठकीत दिले होते. मात्र अजूनही कामाचा श्रीगणेशा झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

वर्क ऑर्डर झाली
जलवाहिनीच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन किमान दोन आठवडे झाली आहेत, तर जलवाहिनीचे डिझाइनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून छावणी परिषदेला प्राप्त झाले आहे. मात्र अजूनही काम सुरू झालेले नाही.

येत्या दोन दिवसांत जलवाहिनीचे काम सुरू होईल व एक ते दीड महिन्यात जलवाहिनीचे काम पूर्ण होईल. आता काम सुरू होण्यात कोणतीही अडचण नाही. – संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळदुर्ग येथील यात्रेनंतर परिसराची साफसफाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नळदुर्ग येथील श्री खंडोबा यात्रा ३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ या कालावधीत पार पडली. यात्रे दरम्यान, मैलारपूर (नळदुर्ग) परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली होती. हा परिसर शुक्रवारी पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गकरांच्या सहकार्याने स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके व शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी व पालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यंदा खंडोबा यात्रेत सुमारे आठ लाख भाविकांनी हजेरी लावली. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात मैलारपूर परिसरात दुकाने आणि हॉटेल्स विविध खेळणीचे दुकाने आणि इतर दुकाने मांडण्यात आली होती. दरम्यान, यात्रा संपल्यानंतर मैलारपूर परिसरात सर्वत्र प्लॉस्टीक पिशवी आणि नारळाची कवचाडे, इतर कचरा मोठ्या प्रमाणात साठला होता. शुक्रवारी मुख्याधिकारी गायकवाड यांनी पूर्ण साफ करण्याचा संकल्प केला होता. त्यास शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील अंजनी प्रशाला, नॅशनल मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा, सय्यद अब्दुलाशहा उर्दू मेमोरियल माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, अध्यापक विद्यालय आदी शाळांचे विद्यार्थी व पालिकेचे सर्व कर्मचारी या साफ स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

यंदा प्रथमच स्वच्छतेकडे लक्ष
यंदा प्रथमच या यात्रेतील स्वच्छतेकडे नळदुर्ग नगरपालिकेने अधिक लक्ष दिल्याने खंडोबा देवस्थान समितीने तसेच नळदुर्गवासियांनी पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’ प्रकरणात लाखोंचा गैरव्यवहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत झालेल्या टीडीआर घोटाळ्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची कबुली महापालिका प्रशासनानेच दिली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेतील टीडीआर घोटाळा ‘मटा’ ने उघडकीस आणला. त्यासंदर्भात आमदार इम्तियाज जलील यांनी नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला महापालिका प्रशासनाने दिलेले लेखी उत्तर ‘मटा’ च्या हाती लागले आहे. ‘औरंगाबाद महापालिकेत २००८ ते २०१७ या कालावधीत टीडीआर देण्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, हे खरे आहे का,’ असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पालिकेने म्हटले आहे की, हे खरे आहे. नमूद कालावधीतील काही टीडीआर प्रकरणात सकृतदर्शनी अनियमितता आढळून आल्याने त्या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेने प्रश्नाच्या उत्तरात पूरक टिप्पणी देखील जोडली आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत २२८ प्रकरणात टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यात आला आहे. २०१५ यावर्षी काही टीडीआर प्रकरणात अनियमितता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असता प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात चार प्रकरणात अनियमितता आढळून आली आहे. या चारही प्रकरणात प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यामुळे तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना, तत्कालीन दोन उपअभियंते, तत्कालीन दोन शाखा अभियंते यांची खातेनिहाय चौकशी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे. यापैकी दोन उपअभियंता व एक शाखा अभियंता सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने तत्कालीन सहाय्यक संचालक, त्यावेळी सेवेत असलेले उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, विभागीय चौकशीला आधीन राहून त्यांना रुजू करून घेण्यात आले आहे, असे या टिपण्णीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय धोरणापासून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरापर्यंत, दर्जांपासून दरापर्यंत जागरूकता वाढणे गरजेचे आहे. कृषी उत्पादनांसाठी शेती ते कारखाना ते ग्राहक अशा सर्वच स्तरांवर सुव्यवस्थित यंत्रणा निर्माण होणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनीही आता पूरक व्यवसायकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले, तर शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्या तळागळापर्यंत पोचविण्यासाठी अधिक प्रयत्नाची गरज आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, सहसंयोजक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अॅग्रिकल्चर, कृषी विभाग यांच्यातर्फे अयोध्यानगरी मैदानावर आयोजित ‘महा-अॅग्रो २०१८’ या कृषी प्रदर्शनाचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शुक्रवारी उद्‍घाटन झाले. पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर अध्यक्षस्थानी होते. खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मानसिंह पवार आणि राम भोगले, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, महाराष्ट्र चेबंरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, समीर दुधगावकर, विजयअण्णा बोराडे, त्र्यंबक पाथ्रीकर, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम मुख्य समन्वयक अॅड. वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते.

अध्यक्ष बागडे यांनी, शेतकऱ्यांना हवे पाणी, वीज शेतकऱ्यांना पाणी आणि वीज मुबलक मिळाल्यास फायद्याची शेती करण्यास कुणीच रोखू शकणार नाही, मात्र या प्रमुख दोन्ही गोष्टी मिळत नसल्याने शेती व शेतकऱ्यांचा विकास रखडला आहे. शेतकऱ्यांनी जलफेरभरण, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

खासदार दानवे यांनी, ‘नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यात शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पेाचत नाहीत. परिणामी शेती व शेतकरी दोन्ही अडचणीत आहेत. सरकारी योजना आणि पायाभूत सोयी सुविधा शेतकऱ्यांना मिळाल्या तर कर्जमुक्तीची गरजच उरणार नाही. यासाठी आता सर्वांना काम करावे लागेल,’ असे नमूद केले.

सरकारने १४ जिल्ह्यांत शाश्वत विकास करण्याचे निश्चित केले असून, त्यानुसार विकास कामे पूर्ण करण्यास सुरुवात झाली आहे. गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करणे व समूहशेतीला चालना देण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलयुक्त शिवार, शेततळे, जलसंधारणची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरावर भर
उसाच्या शेतीपेक्षा पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन या माध्यमातून जास्त उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे आता अनिवार्य झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी या माध्यमातूनच आता उद्योजक व्हायला हवे, अशी अपेक्षा मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचा गौरव
मंगल वाघमोडे, शिवाजीराव देशमुख, मधुकर चिंगरे, दीपक पवार, चंद्रशेखर कुलकर्णी, कपिलेश्वर सोनटक्के, विठ्ठल व चंद्रकांत क्षीरसागर, गजानन गावंडे, दत्ता काकडे, महादेव हंगे, नारायण इथ्थर, बाळकृष्ण पाटील, रामाराम महाजन, ज्ञानेश्वर चौधरी या शेतकऱ्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

दानवे, बागडेंमुळे जानकर ताटकळले
औरंगाबाद ः अयोध्यानगरीच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तास उशिरा झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे उशिरा आल्याने नियोजित वेळी उपस्थितीत असलेल्या पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना मात्र ताटकळत थांबावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कृषी प्रदर्शनाला येणार होते, मात्र भीम कोरेगाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा रद्द झाला. विधानसभा अध्यक्ष बागडे, खासदार दानवे कार्यक्रमाला आले, पण त्यांना सुमारे दीड तास विलंब झाला. मंत्री जानकर मात्र कार्यक्रम स्थळी वेळेवर पोचले होते. अन्य प्रमुख पाहुणे नसल्याने त्यांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनास भेटी दिल्या. शेवग्याचा धपाट्याचा आस्वादही घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधीच्या प्रतीक्षेत ‘नेट’धारक

$
0
0

औरंगाबाद-राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेची काठिण्य पातळी कमी झाल्यानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ परीक्षेचे कमी कालावधीत आकलन शक्य झाले आहे. ‘नेट’ उत्तीर्णांचा आकडा वाढत असला तरी अध्यापनाच्या संधी कमी झाल्या आहेत. प्राध्यापक होण्याची प्रतीक्षा केल्यानंतर आता ‘नेट’धारक विद्यार्थी दुसऱ्या क्षेत्राकडे वळले आहेत.
भाषा विषयात ‘नेट’ उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आहेत. या परीक्षेची धास्ती कमी झाल्यामुळे पदव्युत्तरचे विद्यार्थी कसून तयारी करतात. नेट-सेट पात्र होणे प्रत्येकाचे ध्येय असल्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. तुलनेने अध्यापन क्षेत्रात संधी कमी झाल्यानंतर विद्यार्थी दुसऱ्या क्षेत्राकडे वळले आहेत. भाषा आणि सामाजिकशास्त्रे विषयात नेटधारकांची संख्या जास्त आहे. प्राध्यापक होण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर अनेकजण प्रसारमाध्यमे, एनजीओ, सेवा क्षेत्र, पर्यटन आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरले आहेत. स्पर्धा परीक्षेत ‘व्याकरण’ महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्याचे क्लासेस तेजीत आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या ‘नेट’ परीक्षेचा निकाल गुरुवारी (४ जानेवारी) जाहीर झाला. विद्यापीठ कॅम्पसमध्ये निकालाचा जल्लोष दिसत होता. विविध विभागातील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे कॅम्पसमध्ये ‘नेट’ची चर्चा रंगली. सामाजिकशास्त्रे, वाणिज्य, विज्ञान, संगणक अशा विविध विषयांतील उत्तीर्णांचे मोठे प्रमाण आहे. ‘नेट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन वर्ग नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. काही विषयांचे पुरेसे साहित्य नसल्यामुळे अभ्यास कठीण असतो. नाट्यशास्त्र विभागात डॉ. गणेश शिंदे यांनी सात विद्यार्थ्यांना दोन महिने दररोज ‘नेट’बाबत मार्गदर्शन केले. यातील अर्जुन आश्रोबा टाकरस व श्रीकांत नंदकुमार भालेराव हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेट-सेट परीक्षेबाबतची धास्ती कमी झाल्यानंतर उत्तीर्णतेचे प्रमाण वाढत आहे. विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळते. दरमहा २५ हजार रूपये आणि पाच हजार रूपये एचआरए मिळतो. तर सीनिअर रिसर्च फेलोशिपमध्ये २८ हजार आणि पाच हजार ६०० रुपये, अशी रक्कम आहे. संबंधित विषयातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिपची विशेष मदत होते.

प्राध्यापक कधी होणार ?

नेट-सेट पात्र झाल्यानंतरही अध्यापनाची संधी मिळत नाही. नोकरभरती बंद असल्यामुळे शैक्षणिक संस्थांतील भर्ती थांबली आहे. शासकीय सेवेतील संधी अत्यंत कमी असून त्याची प्रतीक्षा करावी लागते. प्राध्यापक होण्यासाठी संस्थाचालक देणगी घेत असल्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. शिक्षण क्षेत्रातील अधोगती नेट-सेट पात्र विद्यार्थ्यांची संधी डावलत आहे.

‘नेट’ परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तुलनेने संधी कमी आहेत. केंद्रीय पद्धतीने भर्ती होत नाही. इतर विषयांना देशभरात वाव असला तरी भाषा विषयांच्या संधी कमी आहेत.
- वाल्मिक वाघमारे, संशोधक विद्यार्थी

नेट परीक्षा खूप अवघड होती. दोन महिने नेट अभ्यासक्रमाचे तास केल्यामुळे बराच फायदा झाला. नाट्यशास्त्र विषयात उत्तीर्ण झाल्याचा विशेष आनंद आहे.
- अर्जुन टाकरस, नेट उत्तीर्ण विद्यार्थी

नाट्यशास्त्र विभागात डॉ. गणेश शिंदे यांनी तासिका घेऊन मार्गदर्शन केले. मला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळणार आहे. अध्यापनापूर्वी संशोधनाची संधी आहे.
- श्रीकांत नंदकुमार भालेराव, नेट उत्तीर्ण विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप - एमआयएम वाद गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांवरील अतिक्रमणे, शहर विकास योजनेतील रस्त्यांचे रुंदीकरण यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभा भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम यांच्यातील वादामुळे गाजण्याची शक्यता आहे. दमडीमहल येथील अतिक्रमित बांधकाम पाडताना विरोधीपक्षनेते फेरोज खान यांनी पालिकेच्या पथकातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. हाच मुद्दा उपस्थित करून भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी एमआयएमसह फेरोज खान यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

दमडीमहल - चंपाचौक ते जालनारोड या शहर विकास आराखड्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पालिकेतर्फे केले जात आहे. त्यातील दमडीमहल ते चंपा चौकापर्यंतचे रुंदीकरणाचे काम करण्यात आले. त्यासाठी ऐतिहासिक दमडीमहल पाडण्यात आला. दमडीमहलजवळच श्रीराम पवार यांच्या घराचे बांधकाम होते. हे बांधकाम मात्र पालिकेच्या पथकाने पाडले नाही. पवार यांच्या घराचे बांधकाम पाडण्याचा मुद्दा एमआयएमच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी प्रतिष्ठेचा केला होता. यासंदर्भात वेळेवेळी स्थायी समितीच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात बुधवारी पालिकेच्या पथकाने पवार यांचे घर पाडून टाकले. ही कारवाई सुरू असताना फेरोज खान यांच्यासह एमआयएमचे काही नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी खान यांनी पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली, असा आरोप केला जात आहे. त्याचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. या चित्रिकरणाच्या आधारे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी भाजपतर्फे केली जात आहे. शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ते चित्रिकरण दाखवा, अशी मागणी उपमहापौर विजय औताडे यांनी महापौरांकडे केली आहे. सर्वसाधारण सभेतही ही मागणी जाहीरपणे केली जाण्याची शक्यता आहे. त्यावरून सभेत वाद निर्माण होईल, असे मानले जात आहे.

सिटीबस खरेदीबद्दल बैठक
स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पाच सिटी बस खरेदी करण्याबद्दल शनिवारी बैठक होणार आहे. बस खरेदीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्मार्टसिटीच्या ‘एसपीव्ही’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, एसपीव्हीचे स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे व महापौर नंदकुमार घोडेले यांचा समावेश आहे. चार सदस्यांच्या समितीची बैठक सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. त्यात बस खरेदी, बसथांबे, बसचे मार्ग आदींबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांचे फोन स्वीकारा, वन कर्मचाऱ्यांना तंबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागरिकांकडून येणाऱ्या फोन, संदेश यांची गंभीर दखल घेत कायदेशीर कार्यवाही कारवाई करा, नागरिकांना प्रतिसाद दिला नाही, तर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा उपवनसंरक्षक सतीश वडस्कर यांनी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.
मराठवाड्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ साडेचार टक्के वनक्षेत्र असल्यामुळे त्या भागात पाणीटंचाई आणि अपुऱ्या पावसाच्या संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन तहानलेल्या मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर झाडांच्या लागवडीच्या माध्यमातून सावली देण्यासाठी एकीकडे वन मंत्रालयाकडून प्रयत्न होत आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धनसाठी महावृक्ष लागवड, हरित सेना यासह विविध उपक्रम, योजना हाती घेतल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होत असताना लाकूडतोडीसह वनगुन्ह्याबाबत नागरिक माहिती देत असतानाही प्रत्यक्ष फिडवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनच त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले. त्यात नुकत्यातच एक घटनेत ग्रामस्थाला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यास माहिती देत नाराजी व्यक्त केली.
या घटनेची उप वनसंरक्षक वडस्कर यांनी गंभीर दखल घेत वनगुन्ह्याबाबत माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना प्रतिसाद द्या, फोन घ्या अन्यथा कठोर कारवाईला समोरे जा, असा सज्जड इशारा लेखी पत्राद्वारे बजाविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात आरेचा आता एकच ब्रँड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरे ब्रँड विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असून, ‘शासकीय-खासगी सहभागातून’ (पीपीपी) हा प्रकल्प हाती घेतला जाईल. यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

आरेच्या मालकीचे राज्यात विविध ठिकाणी भूखंड आहेत. त्यांची विक्री केली जाणार नाही किंवा ते कोणालाही दिले जाणार नाहीत. आरे ब्रँड विकसित करण्यासाठी हे भूखंड वापरले जातील. राज्यात आरे हाच एकच ब्रँड असावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जानकर यांनी सांगितले.

‘पीपीपी’च्या माध्यमातून हे काम हाती घेतले जाईल, असेही त्यांनी नमूद करत राज्यातील दुग्ध उत्पादकांना अधिक लाभ व्हावा, चांगला दर मिळावा; तसेच परराज्यातून येणारे दुधाला कसा आळा घालता येईल, यासाठीही प्रयत्नशील असल्याचे जानकर यांनी सांगितले केले. केंद्र सरकारने मराठवाडा आणि विदर्भताली दुग्ध विकासासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यामाध्यमातून काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत महिला स्वच्छतागृहाची दुरवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील महिला स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर या संतप्त झाल्या. वारंवार सूचना देऊनही स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला खडसावले. यापुढे तक्रार आली तर कडक कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.

जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी जे स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले आहे. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव, स्वच्छतेविषयी अनास्था असल्याने दहा महिन्यांपूर्वी महिला कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यावेळी दैनंदिन स्वच्छता करून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही दिवसांनंतर पहिली परिस्थिती उद्‍भवल्याने जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी असलेल्या कक्षातील स्वच्छतागृहाचा वापर केला जात आहे. त्याचीही अवस्था वाईट झाल्यामुळे त्रस्त महिला कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष डोणगावकर यांची भेट घेऊन अडचण सांगितली. अध्यक्षांनी दोन्ही स्वच्छतागृहांना भेट देऊन पाहणी केली. त्याठिकाणी पाणी उपलब्ध नव्हते, स्वच्छता केलेली नव्हती. हे पाहून अध्यक्ष संतापल्या आणि त्यांनी प्रशासनाला सूचना केली की यापुढे महिला स्वच्छतागृहाची दुरवस्था अजिबात सहन केली जाणार नाही. दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले गेले तर कडक कारवाई करण्यात येईल. स्वच्छतागृहात मुबलक पाणी उपलब्ध करून द्या, असे आदेशही श्रीमती डोणगावकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकृतीबंधासाठी पालिकेला शासनाची पाच स्मरणपत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने महापालिका पाच स्मरणपत्रे पाठवून आकृतीबंध मंजुरीसाठी सादर करा, असे कळविले आहे. सर्वसाधारण सभेत अकृतीबंधाला मंजुरी मिळाली असली तरी पालिका प्रशासनाने तो अद्याप शासनाकडे पाठवला नाही. त्यामुळे नवीन पदांच्या निर्मितीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

येत्या तीन ते पाच वर्षांत महापालिकेतील बहुतांश अधिकारी, कर्मचारी निवृत्त होतील, असे मानले जात आहे. रिक्त होणाऱ्या जागाची दखल घेऊन पालिकेने आकृतीबंध तयार केला. पुढील दहा वर्षांचा विचार करून आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या अस्थापनेवर चार हजार ७९९ पदे मंजूर आहेत. आकृतीबंध तयार करताना त्यात एक हजार ७९५ पदांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण पदांची संख्या सहा हजार ५९४ इतकी झाली आहे. पालिका प्रशासनाने सहा हजार ५९४ पदांचा आकृतीबंध सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता शासनाकडे पाठवला. सभेची मान्यता नसल्यामुळे शासनाने तो परत महापालिकेकडे पाठवला. त्यानंतर भगवान घडमोडे यांच्या महापौरपदाच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली.

आकृतीबंधाला सर्वसाधारण सभेने मंजुरी देऊन तीन महिने झाले, पण अद्याप पालिकेच्या प्रशासनाने तो शासनाकडे पाठवला नाही. आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवण्यासंदर्भात शासनाकडून पालिकेला पाच स्मरणपत्र पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाचे स्मरणपत्र येऊनही आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवण्यात येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावकरांना स्मार्टसिटीचे चॉकलेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कचरा डेपोच्या विरोधात आलेल्या नारेगाव व परिसरातील गावकऱ्यांना महापौरांनी शुक्रवारी स्मार्टसिटीचे चॉकलेट देऊन परत पाठवले. स्मार्टसिटी प्रकल्पातून घनकचरा व्यवस्थापनाचे काम महापालिका करणार आहे. यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्या, असे आवाहन महापौरांनी गावकऱ्यांना केले. गावकरी मात्र अल्टिमेटम देऊन निघून गेले. कचराडेपोचा प्रश्न १६ जानेवारीपर्यंत सुटला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला.

नारेगाव - मांडकी शिवारातील कचराडेपो बंद करा, या ठिकाणी कचरा आणणे थांबवा या मागणीसाठी नारेगाव, मांडकीसह त्या भागातील सुमारे २० गावांच्या गावकऱ्यांनी दिवाळीच्या तोडांवर आंदोलन पुकारले होते. सलग तीन दिवस आंदोलन सुरू राहिल्यामुळे शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. गावकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केली होती. तेव्हा महापालिकेला कचरा डेपो बंद करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत सर्वानुमते देण्यात आली होती. तीन महिन्यांची मुदत १६ जानेवारी रोजी संपत असल्यामुळे पुंडलिक अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे एक शिष्टमंडळ महापालिकेत आले होते. शिष्टमंडळात मनोज गायके, कल्याण औटे, साईनाथ चौथे, देविदास हिर्डे आदींचा समावेश होता. सुरुवातीला त्यांनी उपमहापौर विजय औताडे यांनी भेट घेतली. त्यानंतर ते औताडे यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले यांना भेटण्यासाठी आले. कचरा डेपो प्रकरणात मार्ग काढण्यासाठी त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी महापालिकेला तीन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत १६ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे उरलेल्या दहा - बारा दिवसांत योग्य ती कार्यवाही करा, अशी विनंती पुंडलिक अंभोरे यांनी महापौरांना केली. कचराडेपोमुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेने कचरा डेपो तर बंद केलाच नाही, पण दररोज त्याच ठिकाणी कचरा टाकणे पुन्हा सुरू केले आहे. नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे डेपोवर कचरा आणणे थांबवा, कचराडेपोवरील कचऱ्याची विल्हेवाट लावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. कचराडेपोवर आणला जाणारा कचरा तात्काळ थांबवला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

शिष्टमंडळाशी चर्चा करताना महापौर घोडेले यांनी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात महापालिका काम करणार आहे असे स्पष्ट केले. कचरा डेपोवरील कचरा शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट करण्याबद्दलही महापालिका निर्णय घेणार आहे. वॉर्डातला कचरा वॉर्डातच संपवण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रे लावण्यात येणार आहेत. यासंदर्भात स्मार्टसिटीच्या एसपीव्हीची बैठक (स्पेशल पर्पज व्हेकल) १८ जानेवारीला होत आहे. या बैठकीत कचरा डेपो आणि कचरा याबद्दल ठोस निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी शिष्टमंडळाला दिले. या सर्व प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील, त्यामुळे महापालिकेला दोन महिन्यांचा अवधी द्या, असे आवाहन महापौरांनी केले. गावकऱ्यांनी मात्र या आवाहनाबद्दल मत व्यक्त न करता १६ जानेवारीला मुदत संपत आहे, असे सांगून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा एक प्रकारे अप्रत्यक्ष इशाराच देत महापौरांचे दालन सोडले.

कचरा डेपो ः नारेगाव, मांडकी शिवारात
डेपोचे क्षेत्र ः सुमारे ३५ एकर
डेपोवर साचलेला कचरा ः २० लाख टन
रोज आणून टाकला जाणारा कचरा ः ४०० टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकिपीडिया जनजागृती कार्यशाळा मंगळवारी

$
0
0

औरंगाबादः मराठी भाषा पंधरवड्यानिमित्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग आणि राज्‍य मराठी विकास संस्‍था यांच्या वतीने मराठी विकिपीडियाविषयक जनजागृती व नोंदलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. येत्या मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत कार्यशाळा होणार आहे. या नोंदीचे सूत्र ‘मराठवाडा : भाषा, साहित्‍य, समाज, संस्‍कृती, इतिहास’ असे आहे.
मराठी युनिकोड टंकलेखन प्रशिक्षण व विकिपीडिया नोंद लेखनविषयक कार्यशाळा विद्यापीठाच्‍या ग्रंथालयाच्‍या सहकार्याने होईल. कार्यशाळेत युनिकोड मराठी टंकलेखनाच्‍या अनुषंगाने भारतलिपी व गुगल इनपुट संदर्भात प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर विकिपीडियाची ओळख व स्‍वत:चे खाते उघडणे, नोंदी समाविष्‍ट करणे, उपलब्‍ध नोंदीत भर घालणे, नोंदींचे संपादन करणे, छायाचित्रांचा समावेश करणे, स्‍वत:चे पान उघडणे, परिसरातील नोंदींचे संकलन करणे याबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. या कार्यशाळेत फक्त ५० प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रवेश देण्‍यात येणार आहे. नोंदणीसाठी समन्‍वयक डॉ. कैलास अंभुरे यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागप्रमुख प्रा. अशोक देशमाने यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पर्यटन प्रशासन विभागाने ‘स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटन’ मोहीम राबवली. अजिंठा लेणी व वेरूळ लेणी येथे विद्यार्थ्यांनी स्वच्छ पर्यटनावर पथनाट्य सादरीकरण केले. तसेच तीन हजार पर्यटकांना माहिती पुस्तिका, टोप्या व पेपरवेट अशा भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.
स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटन या मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत डॉ. राजेश रगडे, प्रा. सुभाष जाधव, डॉ. माधुरी सावंत यांनी मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण हायस्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छ पर्यटनावर आधारीत लघुपट दाखवत डॉ. सौरभ दीक्षित यांनी मोहिमेचा उद्देश सांगितला. तसेच खुल्या चर्चासत्रात पर्यटन अधिकारी व व्यावसायिकांनी स्वच्छ पर्यटनासंबंधित सूचना मांडल्या. यावेळी केंद्रीय पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, राज्य परिवहन महामंडळ, एअर इंडिया, टुरिस्ट गाइड संघटना, टुरिझम प्रमोटर गिल्ड, गाइड संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. हर्षदा सातघरे, प्रा. संदीप कापसे, प्रा. बाबासाहेब जोगदंड, राणीपंचशिला बनसोडे, सोनाली गायकवाड, अमोल घुकसे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या कामांची श्वेतपत्रिका काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागील तीन वर्षातील एसटी महामंडळाने घेतलेल्या निर्णयाची, कामांची व खर्चाची श्वेतपत्रिका काढावे, असे आवाहन इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले.
एसटी महामंडळाने बस व बसस्‍थानकाची स्वच्छता करण्यासाठी १२९३ स्वच्छक व ५१४ सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यानंतरही त्यांच्या कामाचा विचार न करता खासगी कंत्राटदारास ४४७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. निविदा प्रक्रियेनुसार भाडेतत्वावरील १५०० बस कोणाच्या आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय स्मार्टकार्ड योजना, वायफाय, टायर खरेदी, भरती प्रक्रिया, बाहेरून बस बांधून घेणे आदी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये जाहिरातीसाठी खर्च, मराठी भाषा दिन, वर्धापन दिन, गणवेश वाटप यावर केलेला खर्च केला आहे. या निर्णयांचा परिणाम एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला आहे.
एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग दिला जात नाही. कर्मचारी वेतनवाढीबाबत आर्थिक उत्पन्नाचे कारण देऊन वेतनवाढीवर मर्यादा आणली जाते. यामुळे मागील तीन वर्षांतील निर्णय व खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी माहिती छाजेड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जीएसटी’चे कामकाज दुसऱ्या दिवशीही बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागातील (जीएसटी) अधिकारी व कर्मचारी गुरुवारपासून सामूहिक रजेवर आहेत. या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशीही कार्यालयीन कामकाज बंद होते. दरम्यान, सायंकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले. शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यासयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

सर्व संवर्गातील रिक्त जागा भरा, केंद्राच्या धर्तीवर वस्तू व सेवाकर काम आता केले जाणार असल्यामुळे समानकाम समानपद समान वेतनश्रेणी देण्यात यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी जीएसटी विभागाचे राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनास पहिल्या दिवशीप्रमाणे शुक्रवारीही शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटनेने केला आहे. या आंदोलामुळे कार्यालयात शुकशुकाट होता.

शासनाने जीएसटी मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आठवड्यात बैठक घेत पुढील दिशा ठरविण्यात येईल. तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कनचे विमान पुढील महिन्यात ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादचा समावेश उड्डाण योजनेत करण्यात आला असून यामुळे लहान विमान कंपन्यांनी येथून विमानसेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डेक्कन विमान कंपनीच्या प्रतिनिधींनेही पुढील महिन्यात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत दिली.
येथील विमानतळावरून सध्या जेट एअरवेज, एअर इंडिया आणि ट्रुजेट या कंपन्याची विमाने मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला जातात. उड्डाण योजनेतून झुम एअर, आणि डेक्कन विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्यास स्वारस्य दाखवले आहे. झुम एअरने त्यांच्या वेबसाइटवर औरंगाबाद-दिल्ली विमान सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. पण, दिल्लीमध्ये टाइम स्लॉट मिळत नसल्यामुळे अद्याप विमान सुरू झालेले नाही. डेक्कन विमान कंपनीने जळगाव आणि नाशिक येथून सेवा सुरू केली असून औरंगाबादमधूनही विमान सुरू करण्याची शक्यता आहे.

कार्गो हब सुरू होणार

विमानतळावरून शेतमाल किंवा औद्योगिक उत्पादनाची थेट परदेशात वाहतूक होण्यासाठी कार्गो हब तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कार्गो हबची संबंधित कामे अंतिम टप्‍प्यात आहेत. केंद्रीय सुरक्षा समितीच्या पाहणी अहवालानंतर कार्गो हब सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

उड्डाण योजनेंतर्गत विविध विमान कंपन्यांकडून प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे आले आहेत. त्यामुळे औरंगाबादहून येत्या काळात नवीन विमाने सुरू होतील. कार्गोचेही काम मार्गी लागेल.
-डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमचे गोंधळी नगरसेवक जेलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून खुर्च्या फेकत राजदंड पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन या दोन नगरसेवकांना शुक्रवारी अटक करण्यात आली. कोर्टाने या दोघांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पालिकेच्या १६ ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावर चर्चा सुरू असताना बायजीपुऱ्याचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर (वॉर्ड क्रमांक ६०) व टाउन हॉलचे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद (वॉर्ड क्रमांक २०) यांनी गोंधळ घातला. महापौराचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुर‌क्षा अधिकारी बापू जाधव यांना मारहाण करीत खुर्ची फेकून मारली. याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे नगरसेवक घटना घडल्यापासून पसार झाले होते. त्यांना शुक्रवारी अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आले. त्यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र ट्रेड फेअरचे उद‍्घाटन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाण्यातील कलाग्राममध्ये विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्र ट्रेड फेअरचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र प्रदेश आणि औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटन यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाग्राम येथे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात २८० जणांचा सहभाग आहे. एक लाख चौरस फुटांवर हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कृषी, ऊर्जा, विविध उत्पादक, बांधकाम व्यावसायिक यांसह विविध व्यापार, उद्योगांची दालने प्रदर्शनात असतील. दरम्यान, उदघाटन कार्यक्रमाला भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महपौर नंदकुमार घोडेले, माजीउपमहापौर प्रशांत देसरडा, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष आणि मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल मालानी व विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

सकाळी दहापासून खुले
प्रदर्शनात चर्चासत्र, खाद्यसंस्कृती, अपारंपरिक ऊर्जा, रिन्युएबल ऊर्जा साधने, नव्या जुन्या वितरक-विक्रेत्यांशी संवादही होणार आहे. हे प्रदर्शन कलाग्राम चिकलठाणा येथे रोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात यावेळेत सर्वांसाठी खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी ​

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर
निलंगा शहरात बुधवारी घडलेली घटना दुर्देवी असून या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.
लातूर येथील उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, उपविभागीय अधिकारी भवान आगे-पाटील, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, ‘कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ निलंगा येथे पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या अनुचित प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. यानंतर पुढे कोणताही प्रकार घडू नये म्हणून निलंगा येथे जादा पोलिस कुमक पाठवून दिली होती. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.’
लातूर जिल्ह्यातील परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली असून पालकमंत्र्यांनी पोलिस व प्रशासकीय अधिकारी यांचे कौतुक केले. निलंगा येथील जनतेने भयभीत होण्याचे कारण नाही. शहराला सर्वधर्म समभावाची परंपरा असल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी पोलिस अधीक्षकांमार्फत करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

निलंग्यात दीडशे जणांविरुद्ध गुन्हा
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ येते बंद दरम्यान बुधवारी झालेल्या दगडफेकप्रकरणी ३५ जणांसह इतर १५० महिला पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. निलंगा बंदही शांततेत सुरू असताना काही आंदोलनकर्त्यांनी वाहनांची तोडफोड, मारहाण व दगडफेक केली. यामुळे बंदला हिंसक वळण लागले. या दगडफेकीत पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. काही आंदोलनकर्ते व नागरिकही जखमी झाले होते. गुरुवारपासून निलंग्यातील वाहतूक सुरळीत असली, तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या दगडफेकप्रकरणी ३५ जणांसह इतर १५० महिला-पुरुषांवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणासही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images