Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पितृसत्तेची आक्रमकता थांबू शकते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सध्या देशाला आक्रमक पुरुषसत्ताक राजकारणाने घेरले आहे, मात्र संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही वाढणारी पितृसत्तेची आक्रमकता थांबू शकते. संविधानाच्या अधिकाराची जाण असल्याने सर्वांचेच जगणे अधिक सुलभ होईल,’ असे प्रतिपादन अॅड. निशा शिऊरकर यांनी केले. ‘महिला आणि कायदे’ या विषयावर त्या बोलत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राने ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ’ या एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा शनिवारी झाली. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, किरण मोघे आणि डॉ. स्मिता अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. मोघे यांनी महिलाविषयक कायद्यावर भाष्य केले. ‘स्त्री प्रश्नांच्या आधारावर चळवळी उभ्या राहतात व त्यातूनच अनेक कायदे निर्माण होतात, मात्र कायदे व दुसऱ्या बाजूला समाजातील स्त्री-पुरूष समतेचे राजकारण होणे गरजेचे आहे,’ असे मोघे म्हणाल्या. दिवसभर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या २०१३ च्या अधिनियमावर सांगोपांग चर्चा झाली. दुपारच्या सत्रात अॅड. गीता देशपांडे यांनी अधिनियामावर मांडणी केली. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील डॉ. अपर्णा कोतापल्ले यांनी अंतर्गत समितीत काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई कशी करता येऊ शकेल यावर चर्चा केली. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीसंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींवर सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी भाष्य केले. यावेळी सजग महिला संघर्ष समितीच्या डॉ. रश्मी बोरीकर आणि विधी विभागाचे प्रा. आनंद देशमुख यांची उपस्थिती होती.

ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. स्मिता अवचार यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. प्रा. अश्विनी मोरे, प्रा. मंजुश्री लांडगे, प्रवीण सरकटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. निर्मला जाधव, संतोष लोखंडे, विकास टाचले, संजय पोळ व विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१९ व २१ जानेवारी रोजी वैदिक संमेलनाचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन व श्री संत ज्ञारेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान औरंगाबादतर्फे १९ ते २१ जानेवारी दरम्यान ‘अखिल भारतीय वैदिक संमेलन’ औरंगाबादमध्ये होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांच्या उपस्थितीत संमेलनाला सुरुवात होणार आहे. तर, स्वागताध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे असतील अशी माहिती आयोजन समितीचे अनिल भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनात १९ जानेवारी रोजी सकाळी प. पू. जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंग भारती करवीरपीठ यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे. त्यानंतर वाहन रॅली तर, उदघाटन सोहळा सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांच्याहस्ते उदघाटन होईल. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी व स्वागताध्यक्ष चंद्रकांत खैरे हे राहणार आहेत. २१ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या संमेलनात वेगवेगळ्या सत्रांमध्ये वैदिक परंपरेवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ‘चतुर्वेद विविध शाखा मंत्र पाठ तथा वैदिकोंका सम्मान’, ‘वैदिक परंपरा में महिलाओं का स्थान’ ‘वेदोखिलो धर्ममूलम्’ ‘तस्मात् शास्त्रं प्रमाणंते’, ‘वेद और विज्ञान’ विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. समारोप कार्यक्रमाला खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तीन दिवसात राज्य, देशपातळीवरील वेदाचार्य, शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आयोजन समितीचे प्रा. डॉ. रवींद्र मुळे, संयोजक दुर्गादास मुळे, कार्याध्यक्ष संजय जोशी, पी. यू. कुलकर्णी, शिवाजीराव शिंदे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इटलीची सफर एक मनस्वी अनुभवः डॉ.कडेठाणकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इटलीतील सफर माझी एक मनस्वी अनुभव देऊन जाणारी सफर होती. हा अनुभव विलक्षण, मिश्किल आणि जगण्याचे भान देणारा होता व खूप संपन्न करून गेला, असे मत डॉ. अनंत कडेठाणकर यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात रविवारी संक्रांतीच्या मुहुर्तावर ‘स्वागत’ या कार्यक्रमात कडेठाणकर यांनी त्यांच्या ‘इटालियानो’ हे पुस्तक लिखाण आणि इटलीच्या सफरीविषयी सांगितले. व्यासपीठावर मसापचे पदाधिकरी दादा गोरे आणि रामचंद्र काळुंखे यांची उ‌पस्थिती होती.
कडेठाणकर म्हणाले, हे पुस्तक म्हणजे प्रवासवर्णन आहे. यात आलेले अनुभव इटलीतील खानपान, तेथील सुखवस्तुंच्या कल्पना आणि भौतिकवस्तुंच्या बाबत मिश्किल पद्धतीत मांडणी केली. इटलीतील राहणीमान, तेथील पर्यटन, तेथील वास्तु, तेथील नागरिक, मित्र डॅनियल आणि त्यांचे कुटुंबीय, तेथील खानपान यांच्याविषयी आलेले अनुभव सांगितले. संपूर्ण कार्यक्रम त्यांनी स्लाइड शोद्वारे सादर केला. यावेळी साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवले यांच्या सभेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

$
0
0

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री आणि ‘रिपाइं’चे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा संतप्त कार्यकर्त्यांनी उधळून लावली. अवघ्या पाच मिनिटांत आठवले यांनी भाषण आटोपते घेतले. गोंधळ घालणाऱ्या २२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली.

कोरेगाव भीमा घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याचा आंबेडकरी अनुयायांचा आक्षेप आहे. ‘एक मंच एक विचार’ संकल्पना राबवत इतर आंबेडकरी पक्ष एकत्र आले, मात्र रिपाइं (ए) पक्षाने स्वतंत्र मंच उभारून आठवले यांची जाहीर सभा घेतली. या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. विद्यापीठ परिसरात आठवले यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तरूणांचे घोळके फिरत होते. जाहीर सभेच्या ठिकाणी तरूणांनी खुर्च्यांची मोडतोड केली. आठवले भाषणाला उभे राहिल्यानंतर घोषणाबाजी अधिक वाढली. ‘ऐक्यासाठी तयार असून माझा गड बरखास्त करीन. कुणी ऐक्य तोडल्यास जिल्हाबंदी व तालुकाबंदी करा,’ असे आठवले म्हणाले, मात्र घोषणाबाजी सुरू असल्यामुळे त्यांनी पाच मिनिटांत भाषण आटोपते घेतले. यावर्षी आठवले यांच्यासोबत मंचावर शिवसेना-भाजप युतीचे कुणीही नेते उपस्थित नव्हते. गोंधळ घालणाऱ्या २२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ नामविस्तार दिन; आंबेडकरी मंडळींचे अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २४ वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रवेशद्वार आणि शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली. मराठवाड्यातील हजारो अनुयायांनी अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला.
नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात रविवारी (१४ जानेवारी) दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रम झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची लक्षणीय उपस्थिती होती. नामांतर लढ्यातील शहिदांचे स्मरण करीत नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेने सकाळी औरंगपुरा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. समता सैनिकांनी एकत्रितपणे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, जगदीश गवई, एस. के. भंडारे, अशोक कदम, डी. एम. आचार्य, अशोक कांबळे, प्राचार्य वैशाली प्रधान, प्राचार्य डॉ. अजित वाडेकर, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, प्राचार्य एन. एन. बेहरा उपस्थित होते. मराठवाड्यातील हजारो अनुयायांनी विद्यापीठ परिसरात गर्दी केली होती. प्रबोधनात्मक पुस्तकांची उत्तम विक्री झाली. आंबेडकरी चळवळीच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती. फोटो, पुतळे, कॅलेंडर यांची लहान दुकाने परिसरात थाटण्यात आली होती. भीमगीत कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. व्याख्याने, भीमगीते आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. विद्यापीठ परिसरात सायंकाळी अधिक गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी अनुयायांची वर्दळ कायम होती.

पोलिस बंदोबस्त

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर शहरात सामाजिक तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नामविस्तार दिनी विशेष पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. विद्यापीठ प्रवेशद्वार आणि परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था होती. ‘एक मंच एक विचार’ संकल्पना राबवत २४ संघटनांनी एकाच मंचावर कार्यक्रम घेतले, तर रिपाइंने स्वतंत्र मंच उभा केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे विशेष पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सामाजिक न्यायाची लढाई

नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन म्हस्के, आणि वसंतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. नामंतराची लढाई सामाजिक न्यायाची लढाई होती. सद्यस्थितीत नव्या सामाजिक लढाईसाठी तयार रहा असे देशमुख म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता बनकर यांनी केले आणि एकनाथ पाखरे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. राहुल म्हस्के, माधवराव गोरे, प्रा. कोमल बिरारे, प्रा. नम्रता पांडे, प्रा. वृषाली पुरंदरे, अनिल साळवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ फुकट्या प्रवाशांकडून लाखाचा दंड वसूल

$
0
0

नांदेड - विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २८४ फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक लाख रुपयांना दंड वसूल करण्यात आला. एकाच दिवसात एवढे फुकटे प्रवासी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने तसेच अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेतयांची मनमानी वाढल्याने तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी होत्या. याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विशेष मोहिम राबवली. नांदेड-मुदखेड, नांदेड-अदिलाबाद, नांदेड-मनमाड, नांदेड-अकोला या मार्गावर सकाळपासूनच वेगवेगळ्या गाड्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. दक्षिण मध्य रेल्वेच्या वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, सहाय्यक व्यवस्थापक रवी वर्मा, बेनहर या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमधील २८४ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून सुमारे लाख रुपयांचा दंड वसूल केला.
विशेष पथकाने एकूण ९ गाड्या तपासल्या. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पथकाने क्षमतेपेक्षा जास्त लगेज घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्याविरुद्धही दंडाची कारवाई केली. आरक्षित बर्थवरून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना समज देऊन सोडवण्यिात आले. ही विशेष मोहिम राबवताना रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती, असे सांगण्यात आले.


रेल्वे प्रशासनाने रविवारी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मोठ्या प्रमाणावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. दररोज अप-डाऊन करणाऱ्या असंख्य प्रवाशांना त्याचा अनुभव आहे. स्वच्छता, पाणी, पंखे, लाईट या सोयी सुविधाही योग्य प्रमाणात मिळत नाहीत. पिण्याचे पाणी, त्याची शुद्धता तसेच खाद्यपदार्थांच्या किंमतीबाबत प्रवाशाची एकप्रकारे आर्थिक पिळवणूक होते.
रामचंद्र कऱ्हाळे, रेल्वे प्रवासी, नांदेड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलसाठा वाढविण्यासाठी जलशिवार उपयुक्त’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण ५८६ गावांची निवड करण्यात आली असून, तीनही टप्प्यातील कामांमुळे जिल्ह्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मृद, जलसंधारण व रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी केले.
उस्मानाबाद येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा नियोजन अधिकारी आडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे कांबळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, उमरगा, कळंब, परंडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जलयुक्त शिवार अभियान, रोजगार हमी योजनेची जिल्ह्यातील सर्वच कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहेत. या सर्व कामांतून पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी आराखडा तयार करावा व त्यानुसार कामकाजाचे योग्य नियोजन करुनच कामे करावीत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देताना सांगितले की, सन २०१५-१६ ची २१ हजार २५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे सन २०१५-१६ मध्ये २५ हजार १९०.६८ टी.सी.एम. पाणीसाठा झाला असून ८९ हजार ४५२.३६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे. सन २०१६-१७ मधील १६ हजार ७९५ कामांपैकी ९ हजार ७५९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे १६ हजार १६३.३९ टी.सी.एम. पाणीसाठा झाला असून ९ हजार ३३०.२४ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

यावेळी सचिव एकनाथ डवले यांनी सर्व विभागप्रमुखांकडून जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला. उपस्थित विभागप्रमुखांनी आपापल्या विभागासंबंधी कामकाजाबाबतचे सादरीकरण यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजातील विधवांना दिले संक्रांतीचे वाण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
मकरसंक्रांत हा सण प्रामुख्याने सुवासिनींचा सण म्हणूनच साजरा केला जातो. समाजातील वैधव्याचे दुःख सोसणाऱ्या महिलांना मात्र या सणाच्या काळात उपेक्षित ठेऊन दुर्लक्षित केले जाते. बीड जिल्ह्यातील एका शिक्षिकेने मात्र, विधवा महिलांना वाण देऊन हा सण आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला.
काकड हिरा येथील शिक्षीका मनिषा जायभाये यांचे पती रामकीसन हे सैन्यात नौकरीस होते. मात्र, २००९ मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. याचे शल्य मनीषा यांच्या मनास खूप त्रास देत होते. आपल्या सारख्या विधवा महिला सण उत्सवात सहभागी होऊ शकत नाहीत, हे पती निधनाचे दुःख कुणाकडे व्यक्त करू शकत नाहीत. नेमके हेच दुःख आपल्याही वाट्याला आले आहे. समाजातील या महिलांसाठी आपण काय करू शकतो हा विचार मनात आल्यानंतर मनिषा यांनी या महिलांना साडीचे वाण देऊन संक्रांत साजरी करण्याचा निश्चय केला. हा विचार कुटुंबातील सर्वांना पटला व त्यांनी सहमती दर्शवली. या बरोबरच गावातील लोक प्रतिष्ठित नागरिक, सहकारी यांनी पुढे येत सहकार्य केले.
अशा प्रकारच्या सण उत्सवास समाजातील विधवांना मानाचे स्थान मिळावे. या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजातील रुढी परंपरा जोपासताना आमच्यासारख्या विधवा महिलांचा विचार केला गेला पाहिजे. म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे. महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आनंद होत असल्याचे यावेळी बोलताना मनीषा जायभाये यांनी स्पष्ट केले.
यावेळी सत्यभामा बांगर, काकडहिराचे सरपंच महादेव जायभाये, सूर्यकांत जोगदंड, आदिसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यातील दिव्यांगांना साहित्याचे वाटप करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना शंभर टक्के अपंग साहित्य वाटप करण्याचा प्लॅगशिप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक पंचायत समितीस्तरावर अपंगांना साहित्य वाटपाचे मेळावे घेण्यात येणार असून याअंतर्गत सर्व दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती जिल्हा परिषद गटातंर्गतच्या विविध विकास कामांची सुरुवात तीर्थ येथे पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अहमदपूरचे आमदार विनायक पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, माजी आमदार सर्वश्री गोंविद केंद्रे, बब्रुवान खंदाडे यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, संजय दोरवे, पंचायत समिती सभापती अलका केंद्रे, गणेश हाके, नागनाथ निडवदे उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, ‘राज्य सरकार मागील तीन वर्षांपासून विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवित आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत देशातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे गावागावांत पूर्ण करून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे विकेंद्रीत साठे निर्माण करून टंचाईवर मात केली आहे.’
कर्जमाफी, नुकसान भरपाई, विमा हप्ता आदिच्या माध्यामातून राज्य सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये किमान दोन लाख रूपये वर्ग केला असून शेतकऱ्यांचा एक ही पैसे कपात न करण्याचे निर्देश बँकांना दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक बेघर व्यक्तीला घरकुलाचा लाभ मिळवून दिला जाणार आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार विनायक पाटील, माजी आमदार केंद्रे व भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी ही मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते तीर्थ येथे मुख्यमंत्री पेयजल योजना, महादेव मंदिराचे सभागृह व तीर्थ ते हिप्पळगाव रस्ता आदि कामांचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर निलंगेकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रास्ताविक बांधकाम सभापती देशमुख यांनी केले. जिल्हा परिषदेतंर्गत मुख्यमंत्री पेयजल योजना, मंदिराचे सभागृह व तीर्थ हिप्पळगाव दोन किलो मीटरच्या रस्ता या कामांची माहिती देऊन हाडोळती जिल्हा परिषद गटातंर्गच्या गावामधील रस्ते कामांसाठी निधीची मागणी केली. सूत्रसंचालन केशव काचे यांनी केले

चाकुर-गुलबर्गा रेल्वेचे पन्नास टक्के काम पूर्ण होईल
२०१९ सालापर्यंत चाकुर ते गुलबर्गा रेल्वेचे पन्नास टक्के काम पूर्ण करण्यात येईल, तर लातूर रोड स्टेशनचे चाकुर स्टेशन नामकरणाचा निर्णय ही लवकरच होईल. लातूर जिल्ह्यासह अहमदपूर मतदार संघातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हँड हायजिन’वर डॉक्टरचा वेधक व्हिडिओ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ठेवूया स्वच्छता हाताची, घेऊया काळजी आरोग्याची’ असा मराठमोळा संदेश देत हात धुण्याचे अनेक शास्त्रीय फायदे तितक्याच साधेपणाने व वेगवेगळ्या उदाहरणांसह समजून सांगणारा शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. अजिता सुहृद अन्नछत्रे यांचा व्हिडिओ ‘यू-ट्यूब’वर झळकत आहे. सरळ-साध्या भाषेत व एका लयीत आणि बासरीच्या आल्हाददायक व हलक्या सुरांनी हा छोटासा व्हिडिओ वेधक ठरला आहे.

शहरातील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हृदयरोग भूलतज्ज्ञ डॉ. अन्नछत्रे यांनी हात धुण्याविषयी विविध धार्मिक संदर्भ देत हात धुण्याचे महत्त्व किती आधीपासून प्रचलित आहे, हे सहज लक्षात आणून दिले आहे. त्याचवेळी सर्व वयामध्ये आणि विशेषतः मुलांनी स्वच्छ हात धुणे किती आवश्यक आहे, याची माहिती विविध शास्त्रीय संदर्भ देत दिली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये जंतुसंसर्ग रोखण्यासाठी रुग्णांना तपासण्यापूर्वी-नंतर, उपचार-शस्त्रक्रियांपूर्वी-नंतर सर्वांनीच नेमकी काळजी कशी घ्यावी, याचीही सविस्तर माहिती डॉ. अन्नछत्रे यांनी दिली आहे. रुग्णालयांमध्ये विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने हात न धुतल्यास त्याचा प्रतिकुल परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर कसा होऊ शकतो आणि त्यामुळेच रुग्णांच्या जिवाला कसा धोका निर्माण होऊ शकतो, याचे उदाहरणही व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. त्यातूनच हात धुण्याच्या सात शास्त्रीय पद्धतींचा झालेला उदय आणि त्या प्रत्यक्ष पद्धती, हेदेखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. या सात पद्धतींची सवय मुलांना योग्य वेळीच लागली तर अनेक आजारांना रोखणे शक्य होईल आणि शाश्वत आरोग्यपूर्ण जीवन वाट्याला येईल. जेवणापूर्वी-नंतर, प्रातर्विधीनंतर, स्वयंपाक करण्यापूर्वी, अस्वच्छतेची कोणतीही कामे केल्यानंतर, बाळाला स्तनपान-दुग्धपान करण्यापूर्वी, कोणतेही औषधे घेण्यापूर्वी, आजारी व्यक्तींच्या स्पर्शापूर्वी तसेच स्पर्शानंतर हात स्वच्छ गरजेचे आहे. तसेच खेळून आल्यावर व मुले आजारी असताना मुलांचे हात वारंवार स्वच्छ धुणे उपयुक्त ठरते, असेही त्या म्हणतात.

डायरिया-न्युमोनियाचे लाखो मृत्यू रोखणे शक्य
डायरियामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील १.५ दशलक्ष मुलांचा जगामध्ये मृत्यू होता. मात्र स्वच्छ हात धुण्यामुळे ४० टक्के डायरियाचे मृत्यू रोखणे शक्य आहे. त्याचवेळी न्युमोनियामुळे जगात दरवर्षी पाच वर्षांखालील १.८ दशलक्ष मुलांचा मृत्यू होतो. मात्र दिवसातून १० वेळा स्वच्छ हात धुण्यामुळे श्वसनमार्गांच्या आजारांचा प्रसार ५५ टक्क्यांनी रोखणे शक्य होऊ शकते. त्याशिवाय सर्दी, खोकला, अतिसार, टायफॉइड, खरूज, डोळ्यांचा जंतुसंसर्ग यासारखे आजारदेखील रोखणे किंवा निदान त्यांचा प्रादुर्भाव कमी करणे नक्कीच शक्य आहे, असेही त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील दंगल प्रकरणातील सहा संशयित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी सोमवारी (१५ जानेवारी) दिले.
कोरेगाव भीमा प्रकरणावरून शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणात उस्मानपुरा पोलिसांनी नारायण सुभाष साळवे (वय ३२, रा. नारायणनगर), आनंद उत्तम दाभाडे (वय २२, रा. फुलेनगर), शुभम दिलीप मगरे (वय १९,रा. सातारा परिसर), विशाल खरात (वय २४, रा. फुलेनगर), राजू दादाराव गायकवाड (वय ३०, लाडगाव, ता. औरंगाबाद), अजय अशोक म्हस्के (वय १९, रा. फुलेनगर) यांना ३ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, वैद्यकीय कारणांवरून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना ११ जानेवारी रोजी अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (१५ जानेवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश कोर्टाते दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीदार’ विद्यापीठ कोरडेठाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जलयुक्त शिवार’ योजना, जुन्या विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेची नळजोडणी असूनही विद्यापीठात पाण्याचा ठणठणाट आहे. सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या सामाजिकशास्त्रे विभागात मागील आठवड्यापासून पाणीपुरवठा बंद आहे. विज्ञान, वाणिज्य आणि वृत्तपत्रविद्या विभागातही पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी विद्यार्थी थेट कॅन्टीन गाठत असल्यामुळे स्थावर विभागाचा गलथानपणा उघडकीस आला आहे. कर्मचारी वसाहतीत मात्र सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे शेकडो विद्यार्थी पायाभूत सुविधांपासून वंचित असताना प्रशासन डोळेझाक करीत आहे. कॅम्पसमध्ये पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थावर विभागाची आहे. विद्यार्थ्यांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून त्यांची गैरसोय वाढवली आहे. सामाजिकशास्त्रे इमारतीत इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन या विभागांसह अध्यासने आहेत. सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. प्रत्येक मजल्यावर वॉटर कुलर आहेत. पण, एकाही वॉटर कुलरमध्ये पाणी नाही. काही कुलर नादुरुस्त आहेत आणि काही अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहेत. पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी थेट कँटीन गाठावी लागत आहे. काही विद्यार्थी घरून किंवा वसतीगृहातून पाणी घेऊन येतात. ‘मटा’ प्रतिनिधीने विभागांना भेटी देऊन वॉटर कुलरची पाहणी केली. सर्व कुलर कोरडेठाक आणि अस्वच्छ होते. विद्यार्थ्यांनी मागणी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. समाजशास्त्र विभागातील वॉटर कुलर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. पाणी घरूनच आणत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘आरओ’ कार्यान्वित करून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे स्थावर विभागाचे अभियंता आर. डी. काळे यांनी कुलगुरुंना सांगितले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसमोरच आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात तीन महिने उलटल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. स्थावर विभाग विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करीत असल्याचे उघड झाले आहे.

‘आरओ’ प्लांट निरुपयोगी
विद्यार्थ्यांना पाणी मिळत नसताना परीक्षा विभागात कार्यान्वित असलेला तीन लाख रूपयांचा ‘आरओ प्लंट’ निरुपयोगी ठरला आहे. परीक्षा विभागातही जारचे पाणी वापरले जात आहे. ‘आरओ प्लांट’ला पाणी पुरवठा होत असलेल्या हौदाचा काही भाग उघडा आहे. पाणी पिताना धडपडून दोन कुत्रे दगावले होते. त्यामुळे कर्मचारी या प्लॉटचे पाणी पित नाहीत. आरओ प्लॉन्टला मनपाची नळजोडणी केल्यास अडचण दूर होऊ शकते, मात्र पाण्यावर भरमसाठ खर्च होऊनही प्रशासन निष्क्रिय आहे.

‘पाणीदार’ कॅम्पस
विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘जलयुक्त शिवार योजने’अंतर्गत ५० लाख रूपये खर्च करून काम करण्यात आले. जुन्या विहिरींची फेरबांधणी आणि जलफेरभरण करण्यात आले. या कामांवर मोठा खर्च झाला आहे. कॅम्पस पाणीदार असूनही नियोजनाअभावी पाणी टंचाई आहे. मोठा खर्च करणारे विद्यापीठ प्रशासन पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करू शकत नाही का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणीपुरवठ्यासाठी चार कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे योग्य पाणी पुरवठा केला जातो. विभागात पाणी पुरवठ्यासाठी नियोजन करण्यात आलेले नाही.

सामाजिकशास्त्रे विभागातील विद्यार्थी वसतिगृहातून पाणी आणतात. अनेक दिवसांपासून वॉटर कुलर कोरडे आहेत. विद्यार्थ्यांना इतर सुविधा देऊ नका, पण पिण्यासाठी पाणी द्या.
- समाधान दहीवाळ, संशोधक विद्यार्थी

सातत्याने आंदोलन करूनही विद्यापीठातील पाणी समस्या सोडवण्यात आली नाही. कुलगुरू केवळ आश्वासने देण्यात मग्न आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांवर त्यांनी कधीही चर्चा केली नाही.
- अमोल दांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाभिक समाजातर्फे नगराध्यक्षांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
येथील नाभिक समाज व जिवा महाले संघटनेतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा रविवारी सत्कार करण्यात अाला. यावेळी समाजाच्या सहान जागेवर सभाभृह बांधण्याची मागणी करण्यात अाली. या सभाभृहासाठी खासदार रावसाहेब दानवे यांनी खासदार निधी मंजूर केलेला अाहे, त्यामुळे हे समाज मंदिर लवकरच उभारले जाईल, असे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सांगितले.
या कार्यक्रमाा भाजप अाेबीसी अाघाडीचे जिल्हा संघटक कचरू जाधव, जिल्हा सचिव विष्णू वखरे, नाभिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष दादासाहबे काळे, मंगेश साेनवणे, उमाकांत वैद्य, रामदास राऊत, जिवा सेना जिल्हाध्यक्ष सुरेश बाेर्डे, तालुकाध्यक्ष गणेश वखरे, संत सेवा महाराज सेवा भावी संस्थेचे पदाधिकारी व सर्व नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक एकनाथ ढाेके, द्वारका जाधव, शामबाई गुंजाळ, अश्विनी जाधव, इंदुबाई मिसाळ, जफर चिस्ती, रत्ना साेनवणे, अकबर पटेल, वैशाली शिनगारे, गणेश राऊत, राम बनसाेड, याेगेश मिसाळ, वाल्मिक जाधव यांच्यासह अादी मान्यवर उपस्थित हाेते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये राजकीय खलबते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड तालुका खरेदी विक्री संघाच्या दालमिलच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आजी, माजी आमदारांनी एकत्र येऊन राजकीय खलबते केली. स्तुतीसूमने उधळत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील योजना आखल्या.
तालुका खरेदी विक्री संघाच्या दालमिलचे सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी आमदार अब्दुल सत्तार व माजी आमदार नितीन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आमदार सुभाष झांबड यांच्या हस्ते उपळा येथील १६ गुरे दगावलेल्या ११ शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी पाच हजारांचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार माजी आमदार नामदेव पवार यांनी हजेरी लावली. डीपीसीच्या बैठकीसाठी आमदार सत्तार गेल्यानंतर नितीन पाटील यांनी आमदार झांबड यांच्यावर स्तूतीसुमने उधळत जिल्ह्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत सोबत काम करणार असल्याचे सांगितले. माजी आमदार किशोर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस उमेदवारमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. नितीन पाटील यांनी तिसऱ्या पक्षाची आशा धरू नये, नसता मदत मिळणार नाही असे स्पष्ट केले. माजी आमदार नामदेव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत करत उशिरा सुचलेले चांगले विचार, असा टोला लगावला.
या कार्यक्रमासाठी बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, खरेदी विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस, जिल्हा परिषद सभापती धनराज बेडवाल आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे सचिव के. बी. काळे यांनी केले, तर कैलास अकोलकर यांनी आभार मानले.

झांबडांचे कल्याण !

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदार झांबड सध्या चांगले काम करत आहेत, असे प्रमाणपत्र दिले. जो शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातो, त्यांचे परमेश्वर कल्याणच करतात, झांबड यांचेही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी फिरकी त्यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांची अवैध वाहतूक; अकरा जनावरांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
विनापरवाना जनावरांची वाहतूक करणारी पिकअप शहर पोलिसांनी पकडून त्यातील दोन बैलांसह ११ वासरांची गोशाळेत रवानगी केली.
शहरातील म्हसोबा मंदिराजवळ (महिंद्रा पिकअप एम एच १९, बी एम ३३९४) हा दोन बैल व ११ वासरे घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तत्काळ म्हसोबा मंदिर परिसरात जाऊन या वाहनाची तपासणी केली असता वाहनात दोन बैल व ११ वासरे असल्याचे निदर्शनास आले. वाहनचालक शेख रियाज शेख बाबू (वय २४, रा. सिल्लोड) यास पोलिसांनी जनावरे वाहतूक परवान्याची विचारणा केली. पण, परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन यातील जनावरे गोशाळेत पाठवली. तसेच ए. एच. ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शेख रियाज शेख बाबू याच्यावर कलम ११ (१)ड प्राणी अधिनियम १९६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


होळकर खून; पत्नीसह दोघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शेकटा येथील शाखाधिकारी जितेंद्र नारायण होळकर यांच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी व त्यांची पत्नी भाग्यश्री तसेच शिवसेनेचा माजी शाखाप्रमुख किरण गणोरे यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (१५ जानेवारी) फेटाळला.
याप्रकरणी मृत जितेंद्र होळकर (रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर, औरंगाबाद) यांचे भाऊ प्रदीप उर्फ बाळासाहेब होळकर (वय ४८, रा. कांबी, ता. शेवगाव, जि. नगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ९ सप्टेंबर २०१७ रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जितेंद्र यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा कापून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयावरून जितेंद्र यांची पत्नी भाग्यश्री व किरण गणोरे यांना अटक करण्यात आली असता, त्यांनी संशयित आरोपी शेख तौशिफ, शेख इब्राहिम, शेख हुसेन उर्फ बाबू शेख बशीर यांना खुनाची सुपारी दिल्याची कबुली दिली होती. मृत जितेंद्र हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. या संदर्भात संशयित आरोपी पत्नीच्या मोबाइलवर चॅटिंग सुरू होती, हे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आरोपींना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान, भाग्यश्री व किरण गणोरे यांनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता.

मुलांच्या जीविताला धोका

जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व मृताचा मुलगा यशराज आणि मुलगी साक्षी यांची साक्ष महत्त्वाची असून, संशयित आरोपी भाग्यक्षी ही साक्षीदारांची आई व मृताची पत्नी आहे. आरोपींना जामीन मंजूर केल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो. तसेच साक्षीदारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. ही विनंती मान्य करून दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहीर केल्याप्रमाणे द्या शेतकरी कर्जमाफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी करताना ३५ हजार कोटींची कर्जमाफी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. निकष, ऑनलाइन अर्ज दाखल करणे तसेच अन्य क्लिष्ट प्रक्रियेमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रिपाइं (डेमोक्रेटिक) चे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत गायकवाड यांनी हा मुद्दा सविस्तरपणे मांडला. राज्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. त्याच्या डिजिटलायझेशनसाठी सरकारने तीन हजार २०० कोटी रुपये खर्च करून १३ शासननिर्णय काढले. या आधीच्या कोणत्याही कर्जमाफीसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितले नव्हते. फॉर्म भरताना आधार कार्ड सक्तीचे केले, संयुक्त कुटुंबाच्या नावाखाली एकालाच कर्जमाफीचा निर्णय घेतला. नंतर आधार कार्ड सक्तीचे नाही, असे जाहीर करूनही सक्ती का केली गेली, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.
ऑनलाइन माहिती एकत्र करण्यासाठी सरकारने इनोव्हेव्ह कंपनीला काम दिले पण त्याचे कार्यारंभ आदेश दिले नाहीत. सरकारचा हा हलगर्जीपणा आहे. कंपनीकडून कर्जमाफीचे फॉर्म भरलेला डाटा व सॉफ्टवेअर करप्ट झाले. त्यामुळे सरकारला कर्जमाफीची तारीख वेळोवेळी बदलून जाहीर करावी लागली. प्रत्यक्षात एक कोटीवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली, असे राज्य सरकारने सांगितले होते. त्यानंतर ५५ ते ७० लाखच अर्ज प्राप्त झाले, उर्वरित ४० लाख अर्ज गेले कुठे ? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.
कर्जमाफी नाही, शेतमालाला भाव नाही. बोंडअळीमुळे झालेले नुकसान, वीजबिल वसुलीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा, त्यामुळे उडीद, तूर, मुग, सोयाबीन, ऊस या शेतात उभ्या असलेल्या पीकांना पाणी देणे अवघड झाले आहे. याबाबतही सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

रक्कम कमी कशी ?

सुरुवातीला ३५ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. पण ती २४ हजार कोटींवर कशी काय आली ? महसूलमंत्री म्हणाले, की १० लाख शेतकऱ्यांचे खाते बोगस आहे. ऑनलाइन प्रक्रिया राबवूनही १० लाख बोगस खाते कसे काय आले?, असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रमेश गायकवाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायडेच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रेत्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ड्रायडेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सहा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करीत वीस हजारांची देशी विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी शहरातील विविध भागात करण्यात आली.
गुन्हेशाखेच्या पोलिसांनी रविवारी सकाळी पद्मपुरा भागात दिनेश घनश्याम बरंडवाल (वय ३१ रा. पद्मपुरा) याला अटक करून १७०० रुपयांची दारू जप्त केली. तसेच क्रांतिचौक पोलिसांनी गांधीनगरमध्ये सागर अशोक जोनवाल (वय २२ रा. गांधीनगर) याला अटक करून ७८० रुपयाची दारू जप्त केली. या दोन्ही प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी उज्ज्वल नामदेव ससाणे (वय ५० रा. पैठणगेट) याला मुकुंदवाडी भाजीमंडईत अटक केली. त्याच्या ताब्यातून ७२८ रुपयांची दारू जप्त केली. तसेच एका ५५ वर्षांच्या महिलेला अटक करून ७८० रुपयांची दारू जप्त केली. या दोन्ही प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको पोलिसांनी सनी सेंटरमागे पिसादेवी रोडवर १३ हजार ७५० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला. हा दारूसाठा वाहतूक करणारा पोलिसांना पाहून पळून गेला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुंडलिकनगर पोलिसांनी विश्रांती चौकात संतोष गोकुळ विंचूरकर (वय ४५ रा. जयभवानीनगर) याला अटक करून १५६० रुपयाची दारू जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गहाळ रिव्हॉल्वर शोधण्यात अपयश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मद्यपी पोलिस अमित स्वामी याचे रिव्हॉल्वर गहाळ होऊन तब्बल दहा दिवस उलटले आहेत. याचा तपास गुन्हे शाखेतर्फे करण्यात येत आहे. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. दहा दिवस उलटले अद्याप पोलिसांना कोणतेही यश आलेले नाही.
६ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता आकाशवाणी चौकात रिक्षाचा अपघात होऊन पोलिस कर्मचारी अमित स्वामी याच्यासह रिक्षाचालक अभिषेक रुद्राक्ष व चंद्रकांत साळवे हे तिघे जखमी झाले होते. हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. पोलिस कर्मचारी स्वामी याने त्याचे शासकीय रिव्हॉल्वर व दहा काडतूस गहाळ झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. रिव्हॉल्वर व काडतूस हरवल्याने पोलिस दल हादरून गेले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली. दहा दिवसांपासून या तिघांची चौकशी सुरू आहे. मात्र हे तिघेही आपण दारू पिली होती, आपल्याला काही आठवत नसल्याचे सांगत आहेत. सायबर सेलच्या वतीने या तिघांच्या कॉलडिटेलची चौकशी सुरू आहे. मात्र तपासात कोणताही धागा हाती लागत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. निलंबित अमित स्वामी सध्या गावाकडे गेला असून उर्वरित दोघांचीही पोलिसांनी सुटका केली आहे.

खबऱ्यांवर विसंबून

या तिघांकडून काही माहिती मिळत नसल्याने आता पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आहे. हे रिव्हॉल्वर कोठून गहाळ झाले याचा तपास पोलिस करीत आहेत. कोणाला या रिव्हॉल्वरबाबत माहिती असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन यापूर्वीच गुन्हेशाखेने केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात टँकरची गरज काय ?

$
0
0

जिल्ह्यात टँकरची गरज काय ?

पालकमंत्र्यांचा बैठकीत सवाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षी सिंचन क्षेत्रावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही जिल्ह्यात नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ का येते, अशी विचारणा पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त टँकरची गरज का पडते याची माहिती आठवडाभरात सादर करा अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

जिल्ह्यातील विकासकामे आणि नियोजित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजित समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एन. के. राम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी जिल्ह्यातील चारशे गावांना जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा केला. पाणीपुरवठा आणि विविध उपाययोजनांवर तब्बल २० कोटी रूपये निधी खर्च करण्यात आला. टँकरची बिले अद्याप देण्यात आली नसल्याचा मुद्दा आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषद सदस्याने विहीर अधिग्रहणाचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना दिले नसल्याचे सांगितले. या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद आणि रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संबंधितांची बिले आठवडाभरात देण्याची सूचना केली. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला असूनही ६५ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत असून या गावांची जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांकडून उलट तपासणी करावी असे कदम यांनी सांगितले. या मागणीमागे टँकर लॉबी सक्रिय आहे का याचा शोध घ्या. गेल्या पाच वर्षांत कोणत्या एजन्सीने पाणीपुरवठा केला आणि त्यांचे कुणाशी लागेबांधे आहे याची तपासणी करून अहवाल द्या अशी सूचना कदम यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना केली. जिल्ह्यात जलसंधारण कामांवर कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्यामुळे जलसंधारणाची कामे गेली कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर अधिकारी मौन बाळगून होते.
शहिदाच्या गावात काम
शहीद संदीप जाधव यांच्या गावातील १४ कामे डिपीडीसीमधून तात्काळ करा असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. पण, विकासकामांचा केवळ प्रस्ताव पाठवला असा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला. यावर नाराजी व्यक्त करीत पालकमंत्र्यांनी सर्व प्रस्ताव परत घेऊन गावातील सर्व विकासकामे जिल्हा नियोजन आराखड्यातील निधी वापरून पूर्ण करावी अशी सूचना कदम यांनी केल्या.
घाटीसाठी निधी द्या
पालकमंत्री कदम यांच्या सहाय्याने घाटी रूग्णालयात सातशे रूपयात एमआरआय सुविधा सुरू करण्यात आली. याचा उल्लेख करून घाटीला यंत्रसामग्री खरेदीसाठी निधी देण्याची मागणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केली. सध्या व्हेंटीलेटरची खूप गरज आहे. वीस कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्यात कपात होऊन दोन ते तीन कोटी रूपये मिळतात असे येळीकर यांनी सांगितले. यावर येत्या २६ जानेवारीला घाटीला भेट देऊन निर्णय घेऊ असे कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images