Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वे विद्युतीकरणाचे काम सर्व्हेक्षणात अडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला खरा, परंतु अद्याप या मार्गाचे सर्वेक्षणच झालेले नसल्याचे लक्षात आल्याने हे काम लांबले आहे.

नगरसोल नरसापूर रेल्वे इंजिन फेल झाल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे तीन तासांहून अधिक वेळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. औरंगाबाद रेल्वे मार्गावर सध्या डिझेल इंजिनद्वारे रेल्वे वाहतूक केली जात आहे. उन्हाळ्यात डिझेल इंजिन फेल होण्याच्या घटना वाढतात. यामुळे या रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनमाड ते मुदखेड ७८० किलोमीटर रेल्वे मार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली आहे. विद्युतीकरण करण्यासाठी महाउर्जा विभागाला काम देण्यात आले आहे. या रेल्वे मार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी फूट बाय फूट सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सिग्नल, पॉईंट आणि लेव्हल क्रॉसिंगचा सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संबंधित विभागाकडून हे सर्व्हेक्षण झालेलेच नाही. यामुळे सर्वेक्षणाच्या कामातच रेल्वे विद्युतीकरणाचे काम अडकले असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

………

मुदखेडकडे काम सुरू?

मनमाड मुदखेड रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या काम एकीकडे रखडले आहे. मात्र, त्याचवेळी मुदखेडकडे विद्युतीकरणासाठी उपकेंद्र तयार करणे तसेच अन्य कामाला सुरुवात करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

...

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनीचा विनयभंग; दोघांना ६ महिने शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीतील विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची कायम छेड काढणाऱ्या दोन तरुणांना सहा महिने कारावासाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली.

महापालिकेच्या शाळेत इयत्ता दहवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून आरोपी दिनेश लक्ष्मण घाटे (२२) व आरोपी किशोर विष्णू शेजवळ (२३, दोघे रा. राहुलनगर) हे तिला त्रास देत होते. विद्यार्थिनीने त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु दोघांचा त्रास वाढतच गेल्याने विद्यार्थिनीने तिच्या आई-वडिलांना सांगितले. मुलीच्या आई-वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणांच्या आई-वडिलांनाही सांगितले. दरम्यान, २१ मे २०१६ रोजी सायंकाळी अल्पवयीन विद्यार्थिनी घराजवळील दुकानावर गेली असता, त्या ठिकाणी आरोपी दिनेश व किशोर हे दोघे तिथे आले व त्यांनी पुन्हा त्या मुलीची छेड काढली. त्यामुळे ती रडत रडत घरी आली आणि घडलेल्या प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात दिनेश व किशोर यांच्याविरोधात कलम ३५४ (ड), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

\Bदोघांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड

\Bखटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी दिनेश व आरोपी किशोर यांना सहा महिने कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींच्या दालनात झाली ‘ समांतर सर्वसाधारण सभा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मुख्य सभागृहात सोमवारी खरीखुरी सर्वसाधारण सभा सुरू असताना दुसरीकडे स्थायी समितीच्या सभापतींच्या दालनात 'समांतर सर्वसाधारण सभा' सुरू होती. या सभेला फक्त तीन पदाधिकारी उपस्थित होते. हे पदाधिकारी प्रत्येक अधिकाऱ्यांना बोलावून विविध कामांबद्दल अँटीचेंबरमध्ये चर्चा करीत होते. महापौरांनी किंवा कोणत्याही गटनेत्यांनी या 'समांतर सभेबद्दल' आक्षेप घेतला नाही.

सर्वसाधारण सभा पालिकेच्या मुख्यालयात बरोबर साडेअकरा वाजता सुरू झाली. त्यानंतर १२ वाजून २० मिनिटांनी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम पालिका सभागृहातून निघून गेले. राम निघून गेल्यावर महापौरांनी काहीवेळासाठी सर्वसाधारण सभा तहकूब केली. दरम्यानच्या काळात स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्या दालनाच्या अँटीचेंबरमध्ये बारवाल यांच्यासह उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेते विकास जैन एकत्र आले. अँटीचेंबरमध्ये त्यांची 'सभा' सुरू झाली. एका-एका कार्यकारी अभियंत्यांना बोलावून हे तिघे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करीत होते. शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याबरोबर तिन्हीही पदाधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. बारवाल यांची सभापतिपदाची मुदत १ मे रोजी संपत आहे. त्यांची मुदत संपेपर्यंत १०० कोटी रुपयांचा रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर यावा या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. रस्त्याचे प्रकरण सध्या हायकोर्टात आहे. २४ एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी अंतिम ठरावी व त्यानंतर लगेचच रस्त्यांच्या कामाचे टेंडर मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत यावा यासाठी प्रयत्न करा, असे तिन्हीही पदाधिकाऱ्यांनी शहर अभियंत्यांना सांगितल्याचे सुत्रांकडून कळाले.

रस्त्यांच्या कामांच्या निविदेबरोबरच कचरा प्रक्रियेसाठी मशीन्स खरेदी करण्याचे टेंडर देखील महापालिकेने काढले आहे. त्यासाठी शासनाने महापालिकेला दहा कोटी रुपये दिले आहेत. मशीन्स खरेदीसाठीचे टेंडर उघडण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल आहे. टेंडर उघडल्या उघडल्या ते स्थायी समितीत आणून त्याला मंजुरी घ्या, अशा सूचनाही या तिन्हीही पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केल्याचे बोलले जात आहे.

महापौरांनी सर्वसाधारण सभा तहकूब करेपर्यंत उपमहापौर औताडे सभागृहात होते. तहकुबीच्या नंतर सभा सुरू झाली आणि औताडे सभागृहातून गायब झाले. जैन आणि बारवाल सभागृहात आलेच नव्हते. त्यांनी सुरूवातीपासूनच अँटीचेंबरमध्ये तळ ठोकला होता. सभा तहकूब झाल्यावर औताडे त्यांच्यात सामील झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचा धक्का लागल्यानं पोलिसाला मारहाण

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीचा धक्का लागल्यावरून सहायक पोलिस निरीक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार कटकटगेट भागात घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास नानाजी ठाकरे हे सध्या जिन्सी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता ठाकरे दुचाकीवर कटकटगेट भागातून जिन्सी पोलिस ठाण्यात ड्युटीवर येत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला एक स्कुटीचालक येऊन धडकला. ठाकरे यांनी त्याला याबाबत विचारणा केली. यावेळी तेथील चौघांनी ठाकरे यांचा गळा पकडून हाताचापटाने मारहाण केली. या प्रकरणी ठाकरे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी इकबालखान, हमीदखान व कटकटगेट येथील ए वन वॉटर सप्लायर्स दुकानात काम करणाऱ्या दोन अनोळखी तरुणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय भदरगे तपास करीत आहेत.

एपीआय ठाकरेंविरोधात निवेदन

दरम्यान याच प्रकरणात जमात रझा ए मुस्तफा संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची भेट घेऊन सहायक पोलिस निरीक्षकाने धर्मगुरूला मारहाण केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी निवेदन देऊन केली. निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सकाळी अब्दुल सत्तार मस्जीदचे इमाम खारी हाफीज, सलीम रजवी हे कटकटगेट येथे पाणी घेण्यासाठी आले होते. यावेळी एक व्यक्ती वाचवा वाचवा म्हणत दुकानात आला. त्याच्या पाठीमागे एपीआय ठाकरे होते. ठाकरे यांनी दुकानात त्या व्यक्तीला मारले. यावेळी इमाम रजवी यांनी त्यांना साहेब बसून चर्चा करा अशी विनंती केली. यावर ठाकरे यांनी त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली तसेच ऑफीसमधील फायली फेकून दिल्याचा आरोप केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरावर संकट नाही, हा तर संक्रमण काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरावर कोणतेही संकट नाही, हा संक्रमणाचा काळ असून संक्रमण काळात गोंधळ होतोच, या काळात नागरिकांनी संयम ठेवण्याची गरज आहे, असे मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर सोमवारी (१६ एप्रिल) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

औरंगाबादमध्ये काम करण्याला मोठा वाव आहे. येथील अनुभव चांगला असल्याचे सांगत त्यांनी शहरातील महापालिका प्रशासनावर मात्र जाता जाता नाराजी व्यक्त केली. कचराप्रश्न हा महापालिकेनेच निर्माण केलेला प्रश्न असून त्यांनाच हा प्रश्न सोडवावा लागणार असल्याचे सांगत पालिकाप्रशासनाने शहरातील पाणीप्रश्नाकडे पूर्णपने दुर्लक्ष केले असून असमान वितरण व्यवस्थेमुळे ही स्थिती निर्माण झाली. कमी कालावधीमुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

सध्या केवळ कागदावर दिसत असलेली कामे लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून समृद्धी महामार्ग, शहरातील रस्ते, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, डीएमआयसी, स्मार्ट सीटी प्रकल्प तसेच समांतर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा अचानक नागरिकांना आपल्याच घरासमोर कचरा पाहून त्यांचे धैर्य कमी झाले ही स्वाभाविक स्थिती आहे, आयुक्तपदाच्या कार्यकाळात यासाठी आपण साडेसात कोटी रुपयांना तत्काळ मंजुरी देऊन ४३३ कंपोस्टिंग पीट तयार करण्याचा निर्णय घेतला. यातील ३५ टक्के कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यापुर्वी कंपोस्टिंग पीटचे बांधकाम पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बदलीची चर्चा होतीच

वर्षभराच्या कार्यकाळातच बदली झाली, आपण बदलीसाठी प्रयत्न केले होते काय ? या बद्दल नवल किशोर राम म्हणाले, बदलीसाठी प्रयत्न केले नाही, पण बदली होणार असल्याची चर्चा दोन दिवसांपुर्वी होती. औरंगाबाद शहरामध्ये चांगला अनुभव मिळाला याचा पुणे येथे काम करताना उपयोग होणार असल्याचे सांगत त्यांनी अमरावती, विदर्भ तसेच मराठवाड्यात काम केल्याच्या अनुभवामुळे पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पावसाचे तीन बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीनंतर आता मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कहर सुरू केला असून, रविवारी (१५ एप्रिल) परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसाने तीन नागरिकांचा बळी गेला, तर सात जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद शहर व परिसरात सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.

बोंडअळीच्या संकटातून सावरलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यातील गारपीटीनंतर आता विभागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. या पावसामध्ये राम माधवराव बिराजदार (५९, रा. मौजे किल्लारी, ता. औसा, जिल्हा लातूर), आशा हनुमान आवकाळे (३०, पिंपरी देशमुख, ता. परभणी), सय्यद सोहेल सय्यद हमीद (१६, मोजे वाजेगाव, जि. नांदेड) यांचा वीज पडून मृत्यू झाला. या पावसामध्ये परभणी जिल्ह्यातील चार, तर नांदेड जिल्ह्यातील तीन जण जखमी झाले आहेत. परभणी तालुक्यातील मिरखेल या गावच्या रेखा निवृत्ती भालेकर; तसेच सरस्वती भरकड या डीपी कोसळून तारा तुटल्याने जखमी झाल्या. याच गावातील नागनाथ बनसोडे व जनाबाई बनसोडे हे दाम्पत्य भिंत लागल्यामुळे जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील सय्यद सलमान सय्यद मुन्ना, शेख अफसर शेख अन्वर व शेख फय्याज शेख बाबा हे वीज पडल्याने जखमी झाले आहेत.

सर्वाधिक ५.२० मिलिमीटर पाऊस नांदेड जिल्ह्यात, तर परभणी २.१६, हिंगोली १.३०, बीड ०.३९, लातूर ३.८० तर उस्मानाबाद जिल्ह्यात ०.५४ मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसामध्ये परभणी जिल्ह्यातील तीन, नांदेड दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक जनावर दगावले असून, परभणी तालुक्यातील एक, नांदेड पाच, लातूर चार, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ मोठी जनावरे दगावली असल्याचा अहवाल महसूल विभगाला प्राप्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी तीन दिवसात पीएमसी नियुक्त करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएमच्या परिसरात विकसीत केल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठीच्या पीएमसीची नियुक्ती येत्या तीन दिवसांत करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या प्रशासनाला दिले.

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी पाच कोटी रुपये प्राप्त झाले. स्मारकाच्या उभारणीबद्दल पालिका प्रशासनाने आतापर्यंत काय केले आहे याचा खुलासा करा, अशी मागणी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी सर्वसाधारण सभेत सोमवारी केली. यावर खुलासा करताना कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, 'स्मारकाच्या पीएमसीसाठी टेंडर काढले आहे. हे टेंडर मंजूरीसाठी स्थायी समितीच्या समोर ठेवले आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.' यावर महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १९ एप्रिल रोजी औरंगाबादेत येत आहेत, तोपर्यंत पीएमसी निश्चित करा. येत्या तीन दिवसांत पीएमसी निश्चित झाली पाहिजे. यासाठी स्थायी समितीच्या सभापतींना विनंती करा. पीएमसीचे टेंडर मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडून कार्योत्तर मान्यता घ्या. टेंडर मंजूर झाल्यावर संबंधित पीएमसीला कार्यादेश द्या.'

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याबद्दलचा प्रश्न राजू शिंदे यांनी विचारला. या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनीच खुलासा केला. ते म्हणाले, येत्या आठ ते दहा दिवसात या कामाची निवीदा निघेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद विभागात कर्जमाफीचे १९२१ कोटी जमा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांमधील चार लाख ४० हजार ७८२ शेतकऱ्यांना खात्यावर १९२१ कोटी ४८ लाख १८ हजार २०० रुपये वाटप करण्यात आले. उर्वरित रकमेपैकी काही रक्कम खाजगी बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. त्याची आकडेवारी दहा दिवसांत संकलित होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधी पक्षांसह विविध राजकीय पक्षांनी सरकारकडे साकडे मांडले होते. प्रचंड पाठपुराव्यानंतर सरकारने निकषाच्या अधीन राहून कर्जमाफी केली. त्यात गरजू शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल, यासाठी काही अटी लादण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागले. मुदतीच्या आत औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमधून पाच लाख १७ हजार ९६९ शेतकरी लाभार्थी ठरले. या शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक आणि ग्रामीण बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम भरण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले. ३१ मार्चपर्यंत विभागातील पाच लाख १७ हजार ९६९ शेतकऱ्यांपैकी चार लाख ४० हजार ७८२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वरील तीन बँकांच्या माध्यमातून देण्यात आला.

जिल्हा लाभार्थी शेतकरी प्राप्त रक्कम लाभार्थी शेतकरी वाटप झालेली रक्कम

औरंगाबाद १,७३,३२९ ६७६ कोटी ३४ लाख ९९ हजार १,४७,९७३ ४९४ कोटी ९ लाख८१ हजार

जालना १,५७,८८६ ९५६ कोटी ४५ लाख ५९ हजार १,२३,८५१ ५९३ कोटी ८० लाख६१ हजार

परभणी १,४३,२४२ ७४६ कोटी ३७ लाख५१ हजार १,३२,४७१ ७२० कोटी४२ लाख८७ हजार

हिंगोली ०,४३,५१२ १६१ कोटी ८४ लाख७२ हजार ०३६,४८७ ११३ कोटी १४ लाख ८७ हजार

एकूण ५,१७,९६९ २५४१कोटी २लाख ८२ हजार ४,४०,७८२ १९२१ कोटी४८ लाख१८ हजार

………………………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा भागात टँकरने मोफत पाणीपुरवठा करा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळ्याच्या दिवसांत सातारा-देवळाई भागातील नागरिकांना महापालिकेतर्फे टँकरच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला व प्रशासनाला तसे आदेश दिले.

औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डांना तीन-चार दिवसांआड पाणी मिळते, पण सातारा-देवळाई भागाला पाणी मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी सातारा-देवळाई भागाचा समावेश महापालिकेत झाला, पण अद्याप या भागात महापालिकेने पाण्याची सोय केली नाही. किमान उन्हाळ्यात तरी या भागाला टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करा, असे राजू शिंदे यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. एमआयडीसीकडून पाच एमएलडी पाणी आणण्याचे प्रस्तावीत आहे, त्यातच दोन एमएलडीची वाढ करा. एमआयडीसी कडून सात एमएलडी पाणी घ्या. त्यातील पाच एमएलडी शहरासाठी तर दोन एमएलडी सातारा-देवळाईसाठी वापरा असे शिंदे म्हणाले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिंदे यांच्या दोन्हीही मागण्या मान्य केल्या व प्रशासनाला तसे आदेश दिले. टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तात्काळ करा असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या आरोपींना शिक्षा करा - मुकाती फाऊंडेशन कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद :

कठूआ व उन्नाव येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत अत्याचारासाठी जबाबदार असलेल्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी हारूण मुकाती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी युसूफ मुकाती, हरविंदर सिंग सलुजा, डॉ. मंजू जिल्ला, डॉ. वज्रपाणी पाटील यांच्यासह कैलास जैन सह इम्रान कादरी, शेख आमेर, सय्यद अन्वर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात दीड हजार नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेप्युटी आरटीओपदी संजय मेत्रेवार रुजू

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद प्रादेशक परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदाती सूत्रे संजय मैत्रेवार सोमवारी स्वीकारली. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांची प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नती झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदाचा कार्यभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश खर्राडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मुंबई येथून संजय प्रभाकर मेत्रेवार यांची औरंगाबादला बदली करण्यात आली. मेत्रेवार यांनी मराठवाड्यात उस्मानाबाद येथेही काम केलेले असल्याची माहिती आरटीओ विभागाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा हिंदू-मुस्लिम एकता मंचचा कँडल मार्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जम्मू काश्मीरच्या कठूवा येथील आठ वर्षांच्या आसिफाच्या बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ शहरातील जनता देखील रस्त्यावर उतरली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता पैठणगेट ते गांधी पुतळा शहागंज असे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. युवा हिंदू-मुस्लिम एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मेणबत्त्या पेटवून यावेळी आसिफाला श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार इम्तियाज जलील, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आसिफाला न्याय द्या, जलदगती कोर्टात हा खटला चालवावा, आसिफाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मंचचे अध्यक्ष नासेरखान, नीलेश शिंदे, मसरून खान, नविन ओबेरॉय, मुकेश सोनवणे, गौतम माळकरी, मोईल इनामदार, वसीम अहेमद, इद्रीस नवाबखान, नदीम पटेल, फेरोज मुलतानी व अमोल राऊत यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण समाज रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान परशुराम जन्मोत्सवाअंतर्गत रविवारी शहरात विविध आठ ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आठ शिबिरांमध्ये मिळून ४८२ जणांनी रक्तदान केले.

ब्राह्मण समाज समन्वय समितीअंतर्गत ब्राह्मण बिझनेस नेटवर्क आणि चित्पावन ब्राम्हण मंडळ यांच्यातर्फे आयोजित या शिबिरांचे उद्घाटन दत्ताजी भाले रक्तपेढी, येथे लायन्सचे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-२ विवेक अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विकास गोंधळेकर, सुहास सहस्रबुद्धे, समन्वय समितीचे अध्यक्षअनिल पैठणकर, कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, प्रकल्प प्रमुख आशिष सुरडकर, सचिव मिलिंद दामोधरे, राजू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोमवारी आयोजित शिबिरांमध्ये दत्ताजी भाले रक्तपेढी येथे ७५, काण्व भवन , शिवाजीनगर, गारखेडा- ५९, काळा गणपती मंदिर, एन-१ सिडको- ५१, मध्यवर्ती कार्यालय, औरंगपुरा - ४७, जागृत हनुमान मंदिर, बजाजनगर - ५७, जगदंबा मंदिर, ब्राह्मण गल्ली, बेगमपुरा- ५९, उमरीकर लॉन्स, बीड बायपास, सातारा परिसर - ७२ आणि सप्तपदी मंगल कार्यालय, एन-७ बळीराम पाटील शाळेसमोर येथे ६२ जणांनी रक्तदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज शहरात मनपा विरोधात ‘गार्बेज वॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरिकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला असून महापालिका अजूनही शहराला कचराकोंडीतून मार्ग काढू शकली नाही. केवळ बैठका आणि उपायांवर चर्चा करत दिवस ढकलणे सुरू आहे. कचऱ्याला आगी लावण्याचा आणि अशास्त्रीय पद्धतीने कचरा विल्हेवाट लावण्याचे प्रकार घडत आहेत. या असह्य स्थितीत नागरिकांच्या वतीने मंगळवारी (१७ एप्रिल) रोजी काढण्यात येणाऱ्या 'गार्बेज वॉक' ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी या निमित्ताने व्यापारी महासंघासह अनेक संघटना-संस्था प्रतिनिधींची नियोजनासाठी बैठक झाली. गार्बेज वॉकमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दोन महिने उलटूनही महापालिका प्रशासन कचरा समस्येत कोणताही ठोस उपाय करताना दिसत नाही. यामुळेच गार्बेज वॉक काढून कचऱ्याची एकसष्ठी साजरी केली जाईल. नागरी संघटन असलेल्या औरंगाबाद कनेक्ट टीमने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, आर्किटेकट संघटनेचे संजय पाठे, दिलीप सारडा, स्वप्नील पारगावकर, दीपक देशपांडे, तसेच गोविंद कुलकर्णी, राजेंद्र जोशी, सारंग टाकळकर, अरुण देशपांडे, प्रा. प्रशांत अवसरमल, अण्णासाहेब खंदारे, विशाल बंस्वाल, नुपूर भालेराव, दत्तात्रय सुभेदार, गीता देशपांडे, अक्षय जैस्वाल, शरद लासूरकर, सचिन दराडे, अजय बोरीकर, राहुल पवार, इम्रान खान, भरतसिंग चव्हाण, राजन सावरीकर, आणत मोताळे, दिनेश चोपडा, संजय राखुंडे, सुबोध जाधव, अक्षय बाहेती, हेमंत अष्टपुत्रे, संदीप सोनार, अनिरुद्ध उमरकर, चंद्रशेखर शर्मा, सुलभ भाले, सुलभ खंदारे, सरस्वती पवार, गौरी पांडे आदी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत गार्बेज वॉकचे नियोजन करण्यात आले. महापालिका प्रशासनाला जाब विचारणारा हा वॉक औरंगाबाद शहरात नागरी ऐक्याचा पहिलाच जागर आहे. पैठणगेट येथून स्व.गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी ९ वाजता या अभिनव वॉकला सुरुवात होईल. गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेन मार्गे महापालिकेपर्यंत हे आयोजन आहे. यावेळी कचरा छायाचित्रांचे चालते प्रदर्शन केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत २७ वर्षांनंतर महिला सीइओ

$
0
0

झेडपीत २७ वर्षांनंतर महिला सीइओ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिनी मंत्रालयाचा कारभार दोन तपानंतर म्हणजे तब्बल २७ वर्षांनंतर महिला अधिकारी पाहणार आहेत. पवनीत कौर यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा परिषदेत हा बदल पाहावयास मिळणार आहे.

१९८१ - ८२ च्या काळात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लिना मेहेंदळे यांनी काम पाहिले होते. हा काळ औरंगाबाद व जालना जिल्हा विभाजनापूर्वीचा होता. त्यानंतर २७ वर्षांत एकही महिला अधिकारी सीइओ म्हणून आल्या नव्हत्या. मधुकरराजे अर्दड यांच्या जागेवर जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या संचालक पवनीत कौर यांची नियुक्ती झाली आहे. श्रीमती कौर २०१४ बॅचच्या आयएएस आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष महिला आहेत. याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, समाजकल्याण अधिकारी श्रीमती राठोड, महिला व बालकल्याण सभापती कुसुमताई लोहोकरे, शिक्षण व आरोग्य सभापती मीनाताई शेळके या महिला अधिकारी व पदाधिकारी जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. श्रीमती कौर रुजू यांच्या नियुक्तीची जिल्हा परिषदेत चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा विल्हेवाटीवर आज खंडपीठात सुनावणी

$
0
0

कचरा विल्हेवाटीवर आज खंडपीठात सुनावणी

औरंगाबाद: शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात दाखल याचिका आणि तीसगाव, मिटमिटा, कांचनवाडी येथील नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकावर मंग‌ळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर दुपारी २.३० वाजता सुनावणी होणार आहे.

शहरात दैनंदिन निघणारा कचरा विकेंद्रित पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित करून कंपोस्टिंगच्या कामासाठी ४३६ कंपोस्टिंग पीटचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु सर्वच ठिकाणी जागा उपलब्ध होऊ शकत नसल्याने केंद्रीय पद्धतीने सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया आवश्यक असल्याने त्यासाठी चिकलठाणा गट न. २३१, रमानगर, पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव, हर्सूल, मिटमिटा या सात जागा सुचविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शनिवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिनिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे व्याख्यानासह विविध कार्यक्रमाचे आयोजन आले होते. डॉ. आंबेडकर जयंती मुख्य मिरवणुकीत सहभागी भीमसैनिकांना प्रतिष्ठाणातर्फे पाण्याचे पाउच वाटप करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सनी लाहोट, सत्या लाहोट, दीपक रिडलॉन, सनी कागडा, आशिष तुसामड, प्रीतेश चावरिया, रितेश लाहोट, सूरज लाहोट आदी उपस्थित होते.

\Bपोस्टल कर्मचारी संघटना\B

अखिल भारतीय पोस्टल कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रांतीचौक पोस्ट ऑफिसचे प्रभारी पोस्ट मास्तर के. एम. खान, प्रादेशिक सचिव देवेंद्र परदेशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पोस्टल पतसंस्थेचे संचालक एम. एम. चुंगडे, टी. एन. साळवे, डी. डी. कुलकर्णी, नंदकुमार खोसे, जी. जी. सोनवणे, एस. आर. सुरडकर, एस. एच. तामटे, रामकृष्ण बर्डे, बबलू कुमार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी वेतनवाढ बोलणी फिस्कटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एसटी व्यवस्थापनासोबत वेतनवाढीबाबत झालेली बोलणी फिस्कटली आहे. व्यवस्थापनाने पगारवाढीचे पॅकेज अमान्य केले. त्यामुळे वेतन कराराचा प्रश्न परिवहन मंत्र्यांच्या कोर्टात आहे,' अशी माहिती कामगार संघटनेचे सचिव हनुमंत ताटे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ताटे म्हणाले, 'दोन एप्रिल रोजी मुंबईत विविध पक्ष संघटनेसोबत परिवहन मंत्र्यांनी कामगार कराराबाबत बैठक घेतली. या बैठकीत कामगार संघटनेने सर्व संघटनांना सोबत घेऊन कामगार हिताचा करार करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी परिवहन मंत्र्यांनीच कामगार संघटनेसोबत वेतन करार करण्याचे जाहीर केले. एक मे रोजी वेतन करार घोषित करण्याचा शब्द दिला. यानंतर वाटाघाटीसाठी कामगार संघटना आणि एसटी महामंडळाचे अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत ७४१ कोटी रुपये पॅकेजचा प्रस्ताव दिला. मात्र, ही पगारवाढ संघटनेने अमान्य केली. वाटाघाटीच्या बैठकीत प्रशासनासमोर संघटनेने कामगार वेतन वाढीचे सूत्र ठेवले. त्यानुसार २१ मार्च २०१६चे मूळ वेतन अधिक ३५०० हजार रुपये गुणिले ३.५७ या सुत्राने वेतनवाढ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच कनिष्ठ वेतन श्रेणी असलेल्या कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव प्रशासनाने अमान्य करून त्यांचा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांकडे पाठविला आहे. सध्या हा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांकडे आहे. त्यांनी घोषित केलेल्या सन्मानजनक वेतनवाढीच्या निर्णयावर आम्ही विश्वास ठेवून आहोत. आता वेतनवाढी निर्णयासाठी परिवहन मंत्र्यांसोबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. कामगार हिताचा प्रस्ताव दिल्यास निर्णय होईल,' अशी माहिती ताटे यांनी दिली. या पत्रकार परिषदेत संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र मोटे आणि विभागीय अध्यक्ष सुरेंद्र साळुंखे यांची उपस्थिती होती.

………

\B...असे कसे भूलजाव!

\Bएसटी व्यवस्थापनासोबत झालेल्या वाटाघाटी बैठकीत व्यवस्थापनाने पगारवाढीचा प्रस्ताव दिला. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपावेळी १०७६ कोटींचा प्रस्ताव दिल्याची आठवण प्रशासनाला करून दिली. तेव्हा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी वो प्रस्ताव भूलजाव असे सांगितले. यावर संघटनेने पाच महिन्यांत तीनशे कोटी रुपये कमीचा प्रस्ताव कसा विसरावा, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब वातावरणामुळे विमान मुंबईला परतले

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व परिसरातील हवामान खराब असल्यामुळे सोमवारी (१६ एप्रिल) दुपारी जेट एअरवेजचे विमान आकाशात घिरट्या घालून मुंबईला परतले. हे विमान सायंकाळी औरंगाबादेत आले.

जेट एअरवेजचे विमान मुंबईहून औरंगाबादला सायंकाळी चार वाजून ४० मिनिटांनी येणार होते. नियोजित वेळेनुसार विमान औरंगाबादेत आले, मात्र ढगाळ वातावरण, आणि जोरदार वाऱ्यामुळे हे विमान उतरू शकले नाही. विमानाने चार ते पाच घिरट्या आकाशात मारल्या आणि काही वेळेनंतर हे विमान मुंबईकडे इंधन भरण्यासाठी नेण्यात आले. औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर सुमारे शंभरावर प्रवासी होते. वातावरण अनुकूल झाल्यानंतर सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी हे विमान औरंगाबाद विमानतळावर उतरले, पावणे आठच्या सुमारास हे विमान मुंबईकडे निघून गेल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. खराब वातावरणामुळे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्याचबरोबर मुंबईला जाणारे प्रवासी विमानतळावर सुमारे अडीच तास ताटकळले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकावर हल्ला; तिघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उधारीवरून झालेल्या वादातून युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना रविवारी (१६ एप्रिल) अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींना शुक्रवारपर्यंत (२० एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी सुलेमान उस्मान शेख (रा. हुसेन कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, तिरुमला मंगल कार्यालय परिसरात पानटपरी चालवतो. १४ एप्रिल रोजी रात्री फिर्यादी हा पुंडलिकनगर रोडने घरी जात असताना एका मोबाइल शॉपीसमोर आरोपी मयुर याच्यासह आरोपी ऋषिकेश उर्फ जितू मोहन गोसावी (२०) व आरोपी प्रवीण अरुण चव्हाण (दोघे रा. गजानन कॉलनी, गारखेडा) हे बसलेले होते. त्यांच्यासमोरुन फिर्यादी जात असताना आरोपी मयूर याने साडेतीनशे रुपयांच्या उसनवारीवरून फिर्यादीच्या पोटात चाकूने गंभीर वार केला. त्यावर फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर नागरिक जमा झाले आणि त्यांनी फिर्यादीला खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन तिन्ही आरोपींना रविवारी अटक करण्यात आली.

\B

चाकू, कपडे जप्त करणे बाकी\B

तिन्ही आरोपींना सोमवारी कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू व कपडे जप्त करणे, आरोपींच्या साथीदारांचा शोध घेणे, तसेच मोबाइल जप्त करुन सीडीआर-एसडीआर क्रमांक मिळवणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images