Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मंतरलेले पाणी पाजून लुबाडल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंतरलेले पाणी पाजून एक महिला व तिच्या साथीदारांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे, अशी तक्रार करत काही पीडित महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी संशयित महिलेच्या घरातून बुधवारी एक कासव जप्त केले असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

पुण्यात बांधकाम व्यवसाय करते असे सांगत संशयित महिलेने तक्रारदारासह अन्य महिलांशी मैत्री केली. ओळख झाल्यानंतर ती घरात बोलावून पाण्यामध्ये उदी, रक्षा टाकून प्रसाद म्हणून देते असे. याने सर्व संकट दूर होतील असे सांगून अंगात आल्यानंतर हातउसने पैसे घेत असे. अनेकांनी दागिने विकून तिला पैसे दिले. मात्र, पैसे परत मागितल्यावर ती नकार देते असे, तर तिचे साथीदार धमकी देत. संशयित महिलेने काहींना धनादेश तसेच बाँडवर लिहून देत वेळकाढूपणा केला, पण वारंवार मागणी करूनही पैसे दिले नाही. जादूटोणा करण्यासाठी संशयिताने घरात एक कासव अवैधरित्या पाळल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान अर्जदारासह अन्य तक्रारदारांनी बुधवारी पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. त्यावर पोलिसांनी संशयितेच्या घरातून कासव ताब्यात घेत रात्री वन विभागाच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने कला शाखेत मिळवले ९४ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नसतो. त्यासाठी फक्त माझा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे, हा आत्मविश्वास असावा लागतो. याच बळावर एका भाजीपाला विक्रेत्याची मुलगी अश्विनी लेंभेने कठीण परिस्थितीवर मात करत कला शाखेत चक्क ९३.५३ टक्के गुण मिळवले आहेत.

हडको-११मधील भाजी मंडईत दुर्गाबाई व काकासाहेब लेंभे हे भाजीपाला विकण्याचे काम करतात. यांना अश्विनी आणि कृष्णा दोन मुले. लेंभे कुटुंब भाजीपाला विकून घराचा उदरनिर्वाह चालवितात. घरची परिस्थिती अतिशय बिकट. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा खर्च करणे अशक्यच. अश्विनीने परिस्थितीचा, गरिबीचा बाऊ न करता बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. गोदावरी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या अश्विनीला दहावीत ९० टक्के गुण होते. तीने कला शाखेला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी तिला कला शाखेला जातेय म्हणून विरोध केला. मात्र, ती ठाम राहिली. तिला आयएएस व्हायचे आहे. घरची परिस्थिती महागड्या शिक्षणासाठी नाही, अशावेळी स्पर्धा परीक्षेतून करिअर करायचे हे आठवीलाच तिने ठरविले आणि कला शाखा निवडल्याचे ती सांगते. शिस्तबद्ध अभ्यास केला नाही, परंतु जे केले ते मनातून केले. कॉलेजमधील शिक्षकांनी घेतलेला सराव, मदत आणि आई-बाबांनी तुला हवे ते कर, पण ते उत्तम कर हा दिलेला मंत्र यावर हे यश मिळविल्याचे ती सांगते. आपला आलेख चढता ठेवायचा हे निश्चित केले होते. त्यात दहावीपेक्षा सरस कामगिरी करता आली ही आपल्या ठरविलेल्या ध्येयामुळे असे ती सांगते. आश्विनीला हिंदी विषयात १०० पैकी ९९ गुण आहेत.

\Bएकवेळच्या स्वयंपाकाची जबाबदारी

\Bआई-वडील दोघेही भाजीपाला विकण्यासाठी जातात अशावेळी घरी संध्याकाळचा स्वयंपाकाची जबाबदारी अश्विनीवर असते. ते करून मिळेल त्यावेळेत तिने अभ्यास केला. सरावासाठी रात्रभर जागरण केले. तिला लिखानाची आवड आहे. विविध वर्तमान पत्रात ती विविध विषयावर लिखान करते. तिने अनेक वक्तृत्व स्पर्धाही गाजविल्या आहेत. मुलीच्या यशाने आई-वडिलांना आभाळ ठेंगणे झाले आहे. वडिलांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तर आई अशिक्षित आहे. अशावेळी आश्विनीचे हे यश इतरांसमोर आदर्श निर्माण करणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेतन कराराची त्वरित अंमलबजावमी करा या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे शहरातील बँकांचे व्यवहारावर ठप्प झाले. नेट बँकिंग, एटीएममुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी धनादेश अडकले आहेत. दोन दिवसांत सुमारे हजार कोटी रुपयांचे क्लिअरिंग ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून सरकारचा निषेध केला.

युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्सने पुकारलेल्या संपात शहरातील बँकांचे कर्मचारी सामील झाले आहेत. अनेक ग्राहकांना संपाची माहिती शाखेत आल्यानंतरच कळाली. क्लिअरिंगसाठी आलेले धनादशे वठण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवला. या संपात फोरममधील नऊ संघटनांनी सहभाग घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. इंडियन बँक असोसिएशनने प्रस्तावित केलेल्या दोन टक्के वेतनवाढीला संघटनांनी विरोध केला आहे. 'हम सब एक है', 'न्याय मिळालयाच हवा' आदी घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा फोरमने केला आहे. यावेळी रवी धामणकर, राजेंद्र मुंगीकर, उत्तम भाकरे, महेश गोसावी, गणेश पैठणे, हिंद्रप्रकाश जयस्वाल, सुनील शिंदे, विजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

\Bव्यवहारांवर परिणाम

\B

बँक ग्राहकांनी आर्थिक व्यवहारांसाठी मोबाइल अॅप्लिकेशन, नेट बँकिंगचा वापर केला. संपाचा पहिलाच दिवस असल्याने एटीएममध्ये पुरेशी रोकड होती. मात्र, गुरुवारी खडखडाट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बँक सुरू झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील. पण, संपाचा परिणाम या आठवड्यात जाणवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी प्रकरणी साडेतीनशे जणांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत निकालाच्या टक्केवारीत विज्ञान शाखा पुढे आहे. तर, पुनर्परीक्षार्थींच्या निकालाची टक्केवारी ३७.८२ एवढी आहे.

औरंगाबाद विभागातून पाच जिल्ह्यातून पाच हजार ३३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २०१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केज येथील उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी १३०७ विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले. तीन मार्च रोजी केज गटसाधन केंद्रावर सील करून ठेवलेल्या उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. याप्रकरणी ११ शिक्षक, तीन सेवकांवर कारवाई करण्यात आल्याचे मंडळांच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

\Bविज्ञान शाखा टक्केवारीत पुढे

\Bबारावी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला आहे. विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेल्या पैकी ९५.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद विभागातून ७७ हजार ४१२ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली होती. त्यापैकी ७४ हजार ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान पाठोपाठ वाणिज्य टक्केवारीत आहे. त्यानंतर कला व एचएससी व्होकेशनचा क्रमांक लागतो.

\B

शाखानिहाय निकाल\B

शाखा... परीक्षार्थी...उत्तीर्ण... टक्केवारी

विज्ञान.. ७७४१२...७४०८१.... ९५.७०

वाणिज्य.. १३३८९....११८९३... ८८.८३

कला...... ६३२५६....५११५७.. ८०.८७

व्होकेशनल.. ५०२९......४०४२.... ८०.३७

\Bजिल्हानिहाय निकाल

\Bजिल्हा…........... विद्यार्थी.. उत्तीर्ण.. टक्केवारी

औरंगाबाद.. ५९६०९... ५२३१४१...८९.१५

बीड..............३७५५६......३३४५५.....८९.०८

परभणी..........२२५८७......२०३०६.....८९.९०

जालना...........२७१८२.....२३७७२.....८७.४५

हिंगोली...........१२१५२......१०४९९....८६.४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादहून कार चोरी; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खुलताबादहून कारची चोरी झाल्याच्या प्रकरणामध्ये आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यातून हस्तांतरीत करून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी (३० मे) कोर्टात हजर करण्यात आले असता, गुरुवारपर्यंत (३१ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी मोहम्मद जहीर मोहम्मद शब्बीर (३५, रा. युनूस कॉलनी, कटकटगेट) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, खुलताबाद येथील जरजरीबक्ष दर्ग्याच्या दर्शनासाठी फिर्यादी गेला होता आणि त्याने त्याची कार दर्ग्याजवळच्या झाडाखाली लावली होती. फिर्यादी दर्शनाहून परतताच त्याला त्याची कार आढळून आली नाही आणि त्याच्या कारची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरून खुलताबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आरोपी शेख बाबर शेख अख्तर (४४, रा. बायजीपुरा) याला दुसऱ्या गुन्ह्यातून हस्तांतरीत करुन मंगळवारी (२९ मे) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (३१ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको पोलिस ठाण्यातच दोन गटांत ‘फ्री स्टाइल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तक्रार देण्यासाठी आलेल्यावरच हल्ला केल्याने पोलिस ठाण्यातच फ्री स्टाइल हाणामारी झाली. सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहायक फौजदार सरदारसिंह राजपूत यांनी तक्रार दाखल केली. राजपूत मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत होते. यावेळी शेख नबी शेख करीम (वय २७ रा. वरूडकाजी) हा तक्रार देण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या विरोधी गटाचे आरोपी शेख शहारूख शेख लाल, शेख इरफान शेख लाल व शेख लाल शेख रज्जाक पोलिस ठाण्यात आले. ठाणे अमलदारासमोरच त्यांची तक्रार देण्यावरून हाणामारी सुरू झाली. ही हाणामारी पोलिसांनी सोडवली. याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी चारही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या नोटीस केराच्या टोपलीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्यवर्ती बसस्थानकात २१ जून २०१६ रोजी पार्सलमध्ये रसायनाचा स्फोट झाला होता. यानंतर स्थानिक दहशतवाद विरोधी कक्षाने शहरातील इन्स्टाकार्ट कुरिअरसह अन्य एजन्सींना, पार्सलमधून रसायने, शस्त्रे, दाहक वस्तू आदींचे ने-आण करू नये, अशी नोटीस बजाविली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पार्सलमधून शस्त्रसाठा आल्याच्या घटनेमुळे दिसून येत आहे.

पार्थडीला स्टेशनरीच्या नावाखाली रसायनाचे पार्सल २१ जुन २०१६ रोजी बसमधून पाठवण्यात आले होते. हमालाने हे पार्सल खाली ठेवल्यानंतर त्याचा स्फोट झाला होता. यामध्ये हमालासह सहाजण जखमी झाले होते. तपासामध्ये हे रसायन एका महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेसाठी पाठवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेची स्थानिक दहशतवाद विरोधी कक्षाने दखल घेतली होती. त्यावेळी शहरातील सर्वच कुरिअर एजन्सला पार्सलमधून स्फोटक वस्तू, रसायने, ज्वलनशील पदार्थ, शस्त्रे आदी पाठवण्यात येऊ नयेत किंवा मागवू नयेत अशी नोटीस बजावण्यात आली होती. अशा प्रकरणांत कलम १८८नुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी इन्स्टाकार्ट कुरिअर कंपनीचे कार्यालय पोलिस आयुक्तालयासमोरील इमारतीमध्येच होते. इन्स्टाकार्टला देखील

त्यावेळी नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मंगळवारच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅप्रेंटशीप योजनेसाठी ‘सीएमआयए’ची ‘टीपीए’ म्हणून निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या कौशल्यविकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या अॅप्रेंटशीप योजनेला प्रभावीपणे राबविण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) ची थर्ड पार्टी एजंट (टीपीए) म्हणून निवड करण्यात आली आहे. याद्वारे औरंगाबाद व परिसरातील उद्योगांमधून हजारो गरजूंनी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीएमआयए अध्यक्ष प्रसाद कोकिळ, माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी जीआयझेड या जर्मन संस्थेचे तांत्रिक सल्लागार रविशंकर कोरगल उपस्थित होते.

गर्दे म्हणाले, सीएमआयएच्या पुढाकाराने आणि जीआयझेडच्या मदतीने मराठवाडा स्किल हब विकसित करण्यात येणार आहे. त्यातून उद्योग क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होणार आहे. उद्योगांची अडचण मोठ्या प्रमाणावर दूर होईल. त्यात पुढचे पाऊल म्हणून सीएमआयएला केंद्र सरकारच्या कौशल्यविकास मंत्रालयाकडून टीपीए म्हणून मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत विविध उद्योगांमध्ये अॅप्रेंटशीप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. सहा महिने ते तीन वर्षे कालावधी विभागनिहाय अॅप्रेंटशीपसाठी असेल. सद्यस्थितीला दिल्या जाणाऱ्या किमान वेतनाच्या ७० टक्के रक्कम संबंधित विद्यार्थ्याला दिली जाईल. ज्या कारखान्यात हा उपक्रम राबविला जात असेल, त्या व्यवस्थापनाकडून ही रक्कम दिली जाईल. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी केंद्राकडून प्रतिविद्यार्थी १५०० रुपये याअंतर्गत दिले जातात. ती रक्कम या ७० टक्क्यांमध्ये समाविष्ट होईल. विद्यार्थी आणि उद्योगाचा मध्यबिंदू म्हणून सीएमआयए काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विस्थापित शिक्षकांचा बदली धोरणाविरुद्ध संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामविकास खात्याकडून यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत झालेल्या बदल्यांनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर बदली होऊनही जागा न मिळालेल्या विस्थापित शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषद गाठून अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. महिला शिक्षकांनी तर अत्यंत पोटतिडकीने व्यथा मांडल्या. बदली धोरण राबविताना अनेक चुका झाल्या असून त्या दुरुस्त कराव्यात, अशी एकमुखी मागणी केली.

जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचा दावा करत विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, महिला शिक्षक बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत आल्या. बदल्यांमध्ये ५२७ शिक्षक विस्थापित झाले आहेत. पती-पत्नी एकत्रीकरणात ६० ते ७० किलोमीटर दूर गावात गेलेल्या संतप्त शिक्षकांनी अध्यक्षांसमोर व्यथा मांडल्या. बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांची तपासणी करा, समानीकरणाच्या जागा जाहीर करून तिथे विस्थापित शिक्षकांची नियुक्ती करा, आदी मागण्या मांडल्या.

अनेक शिक्षकांनी अपंगांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून ज्युनियर शिक्षकांनी सिनियरला खो देण्याचे प्रकार घडले असून, पती-पत्नी विस्थापित झाले. दुर्गम शाळांवरील शिक्षिकांना बदलीच मिळाली नसल्याच्या तक्रारी यावेळी महिला शिक्षिकांनी केल्या. आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोयीच्या जागा आणि जिल्ह्यात असलेल्यांवर अन्याय कशासाठी? असा सवाल करीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शिक्षकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याचा आरोपही करण्यात आला. झेडपी अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. शिक्षकांवर झालेला अन्याय आणि निर्माण झालेले प्रश्न निश्चितपणे सरकार दरबारी मांडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

\Bबदली प्रतीक्षेतील शिक्षकांमध्ये आनंद\B

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत बदली झालेले अनेक शिक्षक बुधवारी नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले. वर्षानुवर्षे दुर्गम भागात, अंतर्गत भागात, जोडीदारापासून दूर अंतरावर सेवेत व वेगवेगळ्या गंभीर आजारांनी पिडीत शिक्षकांना या बदलीमुळे फायदा झाल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले. २८ मे रोजी बदली आदेश जिल्हा परिषदेत आले. २९ मे रोजी शिक्षकांच्या हातात बदली आदेश देण्यात आले. चारही संवर्गातील हजारो शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाली. बुधवारी शिक्षक नव्या शाळेत रुजू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगिरी कॉलेज निकाल

$
0
0

देवगिरी कॉलेज निकाल

असलेशा गारुळे (विज्ञान)

९१.८४

तेजस दहाड (विज्ञान)

९०.९२

अमन भार्गवा (विज्ञान)

९०.७६

साईचरण हांडे (विज्ञान)

९०.६१

प्रसाद मोताळे (विज्ञान)

९०.४६

श्रेया भोसले (वाणिज्य)

९६

रितिका सोनवणे (वाणिज्य)

९५.८४

मिताली कुलकर्णी (वाणिज्य)

९५.७

मानसी बियाणी (वाणिज्य)

९५.७

आकाश जारवाल (कला)

८९.६९

श्रेयस ललित (कला)

८९.५३

शीतल लव्हाळे (कला)

८९.५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एएमआरडीए’ जसे आहे तसेच चालवा!

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एएमआरडीए) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला असला तरी कर्मचारी भरती आणि नियुक्तीचा आराखडा फेटाळला आहे. यामुळे सद्यस्थितीत हे प्राधिकरण जसे चालले आहे, तसेच चालवा, अशा सूचना शासनाने प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना केल्या आहेत.

प्राधिकरणात येणाऱ्या गावांची हद्द, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेकडील सीमांकन जाहीर केले असले तरी तेथे अधिकृत, अनधिकृत काय होत आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राधिकरणाकडे यंत्रणाच नाही. 'एएमआरडीए'ला नियोजन प्रधिकरण म्हणून नगरविकास विभागाने फेब्रुवारीत मंजुरी दिली. परंतु नगररचना नियमानुसार विकास परवानग्यांचे अधिकार दिले नसल्याने महानगर हद्दीतील बहुतांश गावांतील अकृषक परवानग्यांना ब्रेक लागला होता. आता कर्मचारी आणि स्वतंत्र कार्यालय होणार नसेल, तर ते प्राधिकरण कागदावरच राहणार हे स्पष्ट आहे.

\Bप्राधिकरणाचे क्षेत्र \B

औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र जिल्ह्यातील औरंगाबाद मनपा, खुलताबाद नगरपालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, खुलताबाद तालुक्याच्या सीमेपर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रसाठाप्रकरणी आठव्या आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शस्त्रसाठाप्रकरणी शहरातील आठव्या आरोपीला मंगळवारी (२९ मे) अटक करण्यात आली. त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, ५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले.

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार पुंडलिक भंडारे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 'इस्टाकार्ड कुरिअर सर्व्हिसेस'मार्फत शस्त्रांची ऑर्डर देऊन वेगवेगळी शस्त्रे शहरामध्ये मागवल्याप्रकरणात आठवा आरोपी विजय कडुबा खरात (२९, रा. इंदिरानगर, गारखेडा) याला मंगळवारी (२९ मे) रात्री नागेश्वरवाडी परिसरातील लॉजवर अटक करण्यात आली. या आरोपीसोबत आणखी एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले. आरोपी विजयला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, ऑनलाइन शस्त्रे मागवण्याचा नेमका उद्देश काय होता, औरंगाबाद शहरामध्ये दंगलीचे वातावरण असताना ऑनलाईन शस्त्रात्रे खरेदी करून कोणते षडयंत्र रचण्यात आले होते, याचा सखोल तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपी विजयला पाच जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरिअर ऑफिसमधून पुन्हा तलवारी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नागेश्वरवाडी व जयभवानीनगर येथील ऑफिसमधून पोलिसांनी पुन्हा बुधवारी तलवारी, चाकू असे एकूण सात शस्त्र जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टवरून मागवलेला शस्त्रसाठा सोमवारी मध्यरात्री जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी सात जणांना बेड्या ठोकल्या होत्या. या कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इन्स्टाकार्ट एजन्सीच्या जयभवानीनगर व नागेश्वरवाडी येथील कार्यालयाचीही तपासणी केली. यावेळी भिवंडी येथून २९ मे व ३० मेच्या सकाळी इन्स्टाकार्ट सर्व्हिसच्या नागेश्वरवाडी येथील कार्यालयात शस्त्र असलेले पार्सल पाठविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नागेश्वरवाडीतील कार्यालयाची तपासणी केली असता पाच तलवारी, एक जांबिया, एक दोनपाती चाकू असे एकूण सात प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली.

ऑनलाइन शस्त्रे कुरिअरद्वारे भिवंडी येथून पाठविण्यात येत आहेत. शस्त्रात्र मागविण्याऱ्या ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित ग्राहकांचा शोधही केला जात आहे. मात्र ही शस्त्रे कोणत्या कंपनीतून पाठविण्यात आले? या पूर्वी शहरातील अन्य कुरिअर कंपनीकडून अशी शस्त्रे पाठविण्यात आली आहेत का? याचाही तपास पोलिस करित आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडिक, सुभाष शेवाळे, संजय धुमाळ, सतीश हंबरडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...सावधान, तंबाखू घेतोय हृदयाचाही बळी!

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

तंबाखुजन्य पदार्थांचा सर्वाधिक घातक परिणाम हृदयावर होत असून, जवळपास ७५ टक्के हृदयरोगींनी कधी ना कधी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन केले आहे किंवा करत आहेत. तंबाखुमुळेच बहुतेक रक्तवाहिन्यांवर घातक परिणाम होत असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण शहरातील तज्ज्ञांनी 'मटा'कडे नोंदविले.

तंबाखुमुळे दरवर्षी जगात सात दशलक्ष मृत्यू होतात आणि जगातील धुम्रपान करणारे जगातील ८० टक्के नागरिक हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदविले आहे. तंबाखुमुळेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतरही अवयवांचे कर्करोग होतात. त्याशिवाय हृदयावर होणारा तंबाखुचा परिणामही तितकाच घातक आहे, हेही वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झा्ल्यामुळेच यंदाची थीम ही 'तंबाखू आणि हृदयरोग' अशी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर म्हणाले, पाश्चात्य लोकांची शरीरप्रकृती, तेथील थंड वातावरण, प्रदूषणाचे प्रमाण, आहार-विहाराच्या पद्धती यामुळे तंबाखुजन्य पदार्थांचा घातक परिणाम जेवढा पाश्चात्य व्यक्तींवर होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातक परिणाम हा भारतीयांवर होतो. त्यामुळे आपण तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करणे म्हणजे पेटत्या निखाऱ्यांवर ज्वलनग्राही पदार्थ ओतण्यासारखे आहे. मुळात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांमुळे शहरातील वेगवेगळ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळेच हृदयरोग, हृदयरोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. हाता-पायांच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होऊन निरनिराळ्या समस्या उद्भवतात. तंबाखुजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते. त्यातही भारतातील हवामान, वाढते तापमान, प्रदूषण आणि मुळात भारतीय व्यक्तीची शरीरप्रकृती आदी बाबी लक्षात घेता भारतीयांनी तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांपासून दूर राहणे शहाणपणाचे ठरते, असेही डॉ. मगरकर म्हणाले.

अशीही हमखास 'हिस्ट्री'!

आमच्याकडे विविधांगी उपचारांसाठी येणाऱ्या ७५ टक्के हृदयरोगींनी कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन केले आहे, हेही लक्षात आल्यावाचून राहात नाही. तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन नाही आणि रक्तदाब-मधुमेहदेखील नाही, तरीही हृदयरोग आहे, असे पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण असतात, असेही लक्षात आल्याचे डॉ. मगरकर म्हणाले. त्यामुळेच आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक हृदयरोगीला आम्ही तंबाखुपासून वंचित होण्याचा सल्ला देतो व त्याचा काटेकोरपणे पालन करून घेतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. शहरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद खर्चे यांनीही, आमच्याकडे येणाऱ्या ७० टक्के हृदयरोगींना तंबाखुजन्य पदार्थांचे कधी ना कधी व्यसन होते किंवा आहे, असे लक्षात आल्याचे नमूद केले.

फुफ्फुसांचा परिणाम पुन्हा हृदयावर

कोणत्याही धुम्रपानामुळे थेट फुप्फुसावर परिणाम होतो आणि फुप्फुसावर गंभीर परिणाम झाल्यानंतर त्याचे 'प्रेशर' पुन्हा हृदयावर येते आणि हृदयाचे 'पंपिंग' गंभीररित्या प्रभावीत होते, ज्याचा परिणाम आयुष्यभरासाठी होऊ शकतो. त्यामुळेच सातत्याने दम लागणे, थोडे चालले तरी अस्वस्थ वाटणे, सीओपीडी हा दीर्घकालीन दमा होणे असे एक ना अनेक परिणाम होतात, असेही शहरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे म्हणाले. जेव्हा कोणतीही 'फॅमिली हिस्ट्री' नसते आणि उच्चरक्तदाब व मधुमेहही नसतो तरी हृदयरोगाचा झटका येतो, तेव्हा त्यामागे धुम्रपान किंवा तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन हमखास असू शकते, असेही मत डॉ. देशपांडे यांनी नोंदविले.

फिल्टर सिगारेट तेवढीच घातक

समाजामध्ये फिल्टर किंवा इलेक्ट्रिक सिगारेट कमी घातक असल्याचा गैरसमज आहे. या प्रकारच्या सिगारेटनेही तेवढेच घातक परिणाम होतात, हे तरुण पिढीने तसेच नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. अलीकडे धुम्रपान-तंबाखुची सवय सोडण्यासाठी शास्त्रीय पद्धती विकसित झाल्या आहेत आणि संबंधित तज्ज्ञही उपलब्ध आहेत. याचा लाभ घेऊन तंबाखुमुक्त होण्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे, असेही आवाहन डॉ. खर्चे यांच्यासह इतर तज्ज्ञांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी औरंगाबादमधील पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांडून मिळालेल्या माहितीवरून, तालुक्यातील बीबखेडा येथील घटना असून, पीडित मुलगी बिबखेडा शिवारात वास्तव्यास आहे. आरोपी मुलगा जालींदर काळे हा  पिकाला पाणी देण्यासाठी येत असे. तो पीडितेच्या घरीही येत होता. एप्रिल २०१७मध्ये आई, वडील व भाऊ घरी नसताना व पीडित मुलगी एकटी आहे अशी संधी साधून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. यानतंर 'ही घटना कुणाला सांगितली, तर तुला व तुझ्या लहान भावाला मारून टाकीन,' अशा धमक्या देऊन वारंवार लैगिंक अत्याचार करण्यात आला. दरम्यान गर्भवती अल्पवयीन पीडितेने  २३ एप्रिल २०१८  रोजी मुलीस जन्म दिला. यानतंर पिडीत मुलीने तब्येत सुधारल्यानतंर  पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली, याप्रकरणी आरोपीविरुद्ध दाखल गुन्हा कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक शेख हमीद शेख चांद हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संपामुळे बँक ग्राहकांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुरुवारी शहरातील बँकिंग व्यवस्था कोलमडून पडली. सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या धनादेशांचे क्लिअरिंग अडकले. संपाचा परिणाम एटीएमवर झाला असून बहुत एटीएममधील रोकड संपल्याने नागरिकांचे हाल झाले.

देशभरातील विविध नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्सतर्फे ३० व ३१ मे, असे दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप केला. वेतन कराराची त्वरित पूर्तता करावी, या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. शहरातील बँक कर्मचाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासमोर गुरुवारी सकाळी निदर्शने केली. सरकारी धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. 'एआयबीईए'चे देविदास तुळजापुरकर, 'एनसीबीई'चे महेश गोसावी, 'एआयबीओए'चे उत्तम भाकरे, एआयबीओसी सुनील शिंदे, 'एनओबीओ' संघटनेचे हरिप्रकाश जैस्वाल 'एनओबीओडब्ल्यू'चे गणेश पैठणे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व शाखांमध्ये कामकाज झाले नाही.

\Bपैशासाठी भटकंती\B

संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बुधवारी नेट बँकिंग, एटीएमचा आधार होता. परंतु, गुरुवारी अनेक एटीएममधील पैसे संपले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. शहरातील सुमारे दीडशे एटीएममधील पैसे संपल्याचे अधिकृत सूत्रांनी 'मटा'ला सांगितले. त्यात गुरुवारी खासगी नोकरदारांचा पगाराचा दिवस होता. पगार झाला तरी एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकांना पैसे असलेल्या एटीएमचा शोध घेत भटकंती करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस..डॉ. खुशाल मुंडे

बनावट कागदपत्रांआधारे मालमत्तांची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबादच्या सालारजंगच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रआधारे विक्री करण्यात आल्याप्रकरणी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी दुपारी अटक केली. मोहम्मद नसिरोद्दीन मोहम्मद उस्मानोद्दीन कुरेशी (वय ५३, रा. सेंट्रल नाका) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीने रोशणगेट भागात सालारजंगचा प्रशासक असल्याचे भासवत कार्यालय देखील थाटले आहे.

याप्रकरणी मीर महेमूद अलीखान बशारत अली खान (वय ६७, रा. वाहेदनगर, जुना मालकपेठ, हैदराबाद) यांनी तक्रार दाखल केली. अली खान यांचे वडील सालारजंग तिसरे मीर युसूफ अलीखान यांच्याकडे कामाला होते. अविवाहित असलेल्या युसूफ अलीखान यांच्या महाराष्ट्रासह इतर ठिकाणी मालमत्ता आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर हैदराबाद उच्च न्यायालयाने तडजोड डिक्री दाखल करण्यात आली होती. अलीखान यांच्यासह त्यांचे भाऊ व बहिणींची नावे देखील या डिक्रीमध्ये आहे. यामध्ये १२५ जणांमध्ये सालारजंग यांच्या मालमत्तेची वाटणी करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी मोहम्मद नसिरोद्दीन मोहम्मद उस्मानोद्दीन कुरेशी (वय ५३ रा. सेंट्रल नाका) याने सालारजंगचा प्रशासक असल्याचे भासवत करीम कॉलनी, रोशणगेट भागात कार्यालय थाटले होते. नसिरोद्दीन याने बनावट कागदपत्रे तयार करीत सालारजंग यांच्या औरंगाबाद व पुणे येथील मालमत्तांची विक्री केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद नसिरोद्दीनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नसिरोद्दीनला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, एपीआय अमोल सातोदकर, पीएसआय सुभाष खंडागळे, जमादार गोकुळ वाघ, प्रकाश काळे, दत्तू गायकवाड, सुनील फेपाळे, कारभारी गाडेकर, मनोज उईके, सचिन संपाळ, महेश उगले, दादासाहेब झारगड व जयश्री फुके यांनी केली.

\Bया मालमत्तांची करण्यात आली विक्री\B

- बायजीपुरा येथील ४४४ एकर १८ गुंठे जागेचा मुख्तारनामा गोपीनाथ घारपगारे याना ११ लाखांत करून दिला

- जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंगच्या २० हजार चौरस फूट जागेचा विकसन करार मोहम्मद इफ्तेकार याना दहा लाखांत करून दिला

- समर्थनगर, सावरकर चौकाजवळील २१ हजार चौरस फूट जागा शिवाजी पाठक यांना दहा कोटी ४४ लाखामध्ये कायम खरेदीखत करून दिले. यापैकी तीन कोटी रुपये घेतले

- समर्थनगर जोशी हॉस्पिटल समोरील जागा अडीच कोटीत चिरंजीवलाल शर्मा याना कायम स्वरुपी विकण्याचा करार केला

- वरद गणेश मंदिराजवळील ३२०० चौरस फुटांचा प्लॉट इगोविंद कुटिनीयर यांना एक कोटी २० लाख रुपयांत कायम स्वरुपी विकण्याचा करार केला

- देवप्रिया हॉटेलमागील २४००० चौरस फुटांचा प्लॉट शेख अक्रम (रा. मालेगाव) यांना विक्री करण्याचा करार करीत ६० लाख रुपये घेतले

- पुणे बंड गार्डन येथील पाच एकर जागा राजेंद्र आत्माराम यादव याना १३० कोटी रुपयामध्ये कायम स्वरुपी विकण्याचा करार केला

- समर्थनगर येथील मुक्ती सोपान आश्रमाजवळील आठ हजार चौरस फुटांचा प्लॉट दिलीप घोटकर व किशोर नागरे यांना एक कोटी ६० लाख रुपयामध्ये कायम स्वरुपी विकण्याचा करार केला

- कुशलनगर येथील पाच हजार चौरस फुटांचा प्लॉट पियूष लाहोट यांना दोन कोटी रुपयांत विकण्याचा करार केला नंतर हाच प्लॉट अब्दुल हफीज शेख याना दोन कोटी रुपयांत विक्री केला.

- जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील नऊ एकर २० गुंठे जागा अब्दुल समीर हाजी व कलीम कुरेशी यांना अकरा लाख रुपयात विक्री करण्याचा करार केला

- रोशणगेट येथील दोन एकर जागा मोहम्मद खमर याना पाच लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा करार केला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीत कारची तोडफोड; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात नुकत्याच उसळलेल्या दंगलीमध्ये हॉस्पिटलच्या पार्किंगमधील कारची तोडफोड करून नऊ लाखांचे नुकसान केल्याच्या प्रकरणामध्ये अक्षय रामदास मघाडे व शुभम श्याम गुलारे उर्फ गुल्हार या दोन आरोपींना बुधवारी (३० मे) अटक करण्यात आली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (दोन जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी दिले.

याप्रकरणी मोहम्मद शोएब अब्दुल मुनाफ (२८, रा. राजाबाजार) यांनी फिर्यादी दिली होती. फिर्यादीनुसार, दंगलीच्या काळात दवाखान्याच्या पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेल्या कारची तोडफोड करुन नऊ लाखांचे नुकसान करण्यात आले होते. या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या १४३, १४७, १४८, १४९, ४३६, ४३५, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये अक्षय रामदास मघाडे (२०, रा. पंचशील चौक, बौद्धविहार बाजुला, जिन्सी) व शुभम श्याम गुलारे उर्फ गुल्हार (२३, रा. अंगुरीबाग) या आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून तोडफोडीचे साहित्य, आरोपींचे कपडे जप्त करणे बाकी असून, साथीदारांचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंगा हिसकावल्याने प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेष्ठ नागरिकावर तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता बसैयेनगर भागात घडली. जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिन्सी गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या २४ तासांत आरोपीचा शोध घेत अटक केली. आरोपीकडून शेवग्याच्या शेंगा काढून घेतल्याने सुडबुद्धीने त्याने हा प्रकार केल्याची कबुली दिली.

पांडुरंग जग्गनाथ काळे (वय ८०, रा. गादिया पार्क, बसैयेनगर, अॅपेक्स हॉस्पिटलजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. काळे हे मंगळवारी सायंकाळी स्कुटीवर लाँड्रीमधून कपडे घेऊन येत होते. यावेळी बसैयेनगरात महेश काबरा यांच्या घराजवळ त्यांच्या दुचाकीला अडवून तोंडाला रुमाल बांधलेल्या आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. यामध्ये काळे गंभीर जखमी झाले होते. या आरोपीचा जिन्सी पोलिसांच्या वतीने शोध सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरण प्राप्त केले होते. यामध्ये तीन संशयित दुचाकीवर जाताना आढळून आले. या तिघांचा शोध घेत चौकशी करण्यात आली. यामध्ये विजय यादव साबळे (वय २५ रा. जुना बायजीपुरा) याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी आरोपी साबळेने काळे यांच्या बंगल्यातील शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडून घेऊन जात होता. यावेळी काळे व त्यांच्या चालकाने त्याला पकडून त्याच्याकडील शेंगा हिसकावून काढून घेतल्या होत्या. या गोष्टीचा राग साबळेच्या मनात होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने मंगळवारी काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याची माहिती दिली. आरोपी साबळेला अटक करण्यात आली असून ही कारवाई उपायुक्त राहूल श्रीरामे, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जोगदंड, पीएसआय भदरगे, एएसआय शेख रफीक, शेख हरूण, राठोड, गावंडे, सय्यद अतिक, नागरे, गणी, जफर, बावीस्कर जिवडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images