Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण करीत तिचा ब्लेडने गळा चिरून खून करणाऱ्या पती ठकुबा तुकाराम भागवत याला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी सोमवारी (२५ जून) ठोठावली.

याप्रकरणी मृत द्वारकाबाई ठकुबा भागवत हिचे मामा कैâलास सीताराम वाघ (रा. वडोदबाजार) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सिल्लोड तालुक्यातील पिंपळपेट येथील आरोपी ठकुबा तुकाराम भागवत याचे लग्न द्वारकाबाई हिच्यासोबत २००२मध्ये झाले होते. पती ठकुबा हा मद्यपी होता व कायम नशेत राहात होता. तो कामधंदा करत नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी द्वारकाबाई ही आपल्या मुलांसोबत पूर्णा नगरातील विटभट्टीच्या वस्तीवर राहून विटभट्टीवर काम करत असे, मात्र ठकुबा तिला दारुसाठी वारंवार पैसे मागत असे व पैसे दिले नाही तर पत्नीला मारहाण करीत असे. त्यातच, पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकेल, अशी धमकी ठकुबा याने १४ नोव्हेंबर २०१५ रोजी दिली होती. त्याच दिवशी सायंकाळी घरी आल्यावर त्याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, द्वारकाबाईने पैसे देण्यास नकार दिल्यावर, तिला बेदम मारहाण करत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. त्यावेळी विवाहितेने जिवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरड केला, परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे ती क्षणार्धात कोसळली व त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

\Bपाच हजार रुपये दंड\B

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून कोर्टात दोषरोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवे‍ळी, सरकार पक्षाने नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी पती ठकुबा याला भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये दोषी ठरवून जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत पर्यायाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत पर्याय देण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू होणार होती. परंतु, पर्याय देण्याची सुविधाच उपलब्ध करून दिली नसल्याने ही प्रक्रिया होऊ शकलेली नाही. गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाची पहिली फेरी २५ ते २८ जूनपर्यंत होती. त्यासाठी गुणवत्ता यादी रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार होती. परंतु, ही यादी थेट रात्री साडे दहाच्या सुमारास वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली, तर सोमवारी पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज, शाखांचे पर्याय द्यायचे आहेत. पहिल्या फेरीसाठी गुरुवारपर्यंत हे पर्याय विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरावयाचे आहेत. त्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, तंत्रशिक्षण विभागातर्फे वेळापत्रकही जाहीर केले गेले. प्रत्यक्षात सोमवारी पर्याय देण्यासाठी सुविधाच उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. रात्री उशिरापर्यंत पर्याय देण्यासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत होते. त्याबाबत प्रशासनाकडूनही काही स्पष्ट करण्यात आले नाही. परिणामी, विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ७ जूनपासून सुरुवात झाली आहे.

\Bवेळापत्रकात अनेकदा बदल\B

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत अनेकदा बदल केले गेले. त्यामुळे वेळापत्रक कोलमडल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीच्या अनेक नियमांमध्ये बदल केले. तांत्रिक अडचणीमुळेही नियोजित वेळापत्रक पाळणे अवघड जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नियोजित वेळेनुसार प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील हजारो पालक, विद्यार्थी प्रतीक्षा करत असतात.

\Bराज्यपालांच्या निर्णयाने दिलासा\B

प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळीच जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र सरकारी प्रक्रियेत अडकल्याने प्रवेशावरच टांगती तलवाल होती. सुरुवातील २७ जूनपर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होणार नाहीत, असे चित्र होते. राज्यपालांनी लक्ष घालत प्रक्रियेत शेवटचा टप्प्या पूर्ण होईपर्यंत प्रमाणपत्र सादर करता येईल, असा निर्णय दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात आपत्ती, कक्ष मात्र झोपेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळा सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनकक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, मात्र या कक्षाला जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीची माहितीच मिळत नाही, त्यामुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना हवेत विरल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात ग्रामीण भागात नैसर्गिक संकट आल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला लगेचच मिळावी, संकट कोसळलेल्या गावांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पावसाळ्यात या कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात घडलेल्या घटनांबाबत नियंत्रण कक्षाला कुणीही माहिती दिली नाही. यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवर; तसेच शहर परिसरात घडलेल्या घटनेची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना मिळत नाही. महसूल यंत्रणा गावपातळीपर्यंतपोचलेली आहे. कोतवाल, पोलिस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी असे अनेक कर्मचारी गावांशी व ग्रामस्थांनी जोडलेले आहेत. गावात कोणतीही घटना घडल्यास या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वात आगोदर माहिती पोचते. ही माहिती शासकीय यंत्रणांना देणे अपेक्षित असते, मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या आपत्तीची माहितीच आपत्ती निवारण कक्षाला देण्यात आली नाही. तहसील स्तरापासून जिल्ह्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गेल्या महिन्यात दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानंतर सर्वच विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करून, आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज असल्याचे कळवले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी तहसील स्तरावरील, जिल्हा स्तरावरील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलेले आहे. शिवाय मे महिन्यात आपत्तीदरम्यान मदतकार्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साधन सामग्रीचा सुस्थितीबाबतचा आढावाही घेण्यात आलेला आहे, आता हे सर्व कागदावरच झालेले असल्याचे दिसून येत आहे.

\B

नारेगाव, उपळी घटनेची माहितीच नाही\B

पोखरी येथील तलाव भरल्यामुळे शहराजवळ असलेल्या नारेगाव येथील वसाहतींमध्ये पाणी शिरले होते; तसेच दमदार पावसामुळे फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील पूल खचल्याची घटना घडली. सिल्लोड तालुक्यातील उपळी गावाजवळील पूल वाहून गेला. शहरातील उघड्या नाल्यामध्ये पडून दोन जणांना जीव गमवावा लागला होता. या सर्व या घटनांनंतर दोन दिवसांनंतरही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पूर्ण माहिती मिळाली नाही.

\Bधोकादायक पुलांचा अहवालच नाही

\Bमान्सूनपूर्वी आपत्तीसंदर्भात दोन वेळेस विविध यंत्रणांना सतर्क करण्यासाठी; तसेच त्यांचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांची बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आल्या. जिल्ह्यात किती धोकायदाक पूल आहेत, याबाबत काय उपाययोजना केल्या अशी विचारणा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आली होती, मात्र आतापर्यंत कोणतीही माहिती व अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरपुड्यासाठी जाणारे चार मित्र ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परभणी येथे साखरपुड्यासाठी जात असलेल्या भावी नवरदेवासह चार जणांचा कारच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जालना रोडवरील करमाडजवळील सटाना पाटी गावाजवळ झाला.

या अपघातात नवरदेव शहजाद युनूस शेख (वय २३ रा. दिल्लीगेट), तबरेसखान शरीफखान (वय २४ रा. कैलासनगर), मुजफरोद्दीन वहीजोद्दीन शेख (वय २६ रा. शरीफ कॉलनी) व चालक अबुदबीन हसनबीन समिदा (वय २५ रा. बायजीपुरा) यांचा मृत्यू झाला. शफीकखान सलीमखान (वय २४) व उमर हसनबीन समीदा (वय २६ दोघे रा. बायजीपुरा) हे गंभीर जखमी झाले. शहजाद युनूस शेख याचा दिल्लीगेट परिसरात फळविक्रीचा व्यवसाय होता. त्यांचा सोमवारी दुपारी दोन वाजता परभणी येथे साखरपुडा होता. या कार्यक्रमाला जाण्यासाठी शहजाद व त्याचे मित्र सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथून निघाले. सुमारे साडेअकरा वाजता ते करमाडच्या पुढे सटाना पाटीजवळ चालक अबुदबीन याचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार डाव्या बाजूने उलटत सुमारे तीनशे फुट फरफटत गेली. त्यानंतर एका शेतातील नाली पार करत तारेच्या कुंपनाचा खांब तोडत ती शेतात जाऊन पडली. हा भीषण अपघात पाहताच ग्रामस्थांनी कारकडे धाव घेतली. या अपघातात कारच्या पुढील बाजुचा चेंदामेंदा झाला होता. जखमी सहा जणांना कारबाहेर काढून रुग्णवाहिकेतून घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, रस्त्यातच चार जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

\Bमृतापैकी दोन नवविवाहित

\B

या अपघातातील तबरेस खान यांचा चार महिन्यापूर्वी, तर मुजफरोद्दीनचा अवघ्या एक महिन्यापूर्वी विवाह झाला आहे. तबरेस हे मेकॅनिक होते, तर मुजफरोद्दीन यांचे किराणा दुकान आहे. जखमी शफीकखान हे एसी मेकॅनिक, उमर हे रिक्षाचालक आहेत.

\Bसाखरपुड्यासाठी आला हैदराबादवरून \B

कारचालक अबुदबीन हा हैदराबाद येथे गेला होता. मित्र शहजादचा साखरपुडा असल्याने तो सोमवारी सकाळीच औरंगाबादेत दाखल झाला. शहरात आल्यानंतर सर्व मित्रांना कारमध्ये घेऊन तो परभणीला निघाला होता. मात्र करमाडपुढे त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

\Bघाटी हॉस्पिटलमध्ये गर्दी\B

सहा मित्रांचा अपघात झाल्याची माहिती समजत नाही तोच चौघांचा मृत्यू झाल्याचेही समजले. सोशल मिडियावर देखील अपघाताच्या पोस्ट व्हायरल झाल्या. यामुळे हे सहाजण राहत असलेल्या बायजीपुरा, कटकटगेट, रोशन गेट, दिल्ली गेट, कैलासनगर भागातील त्यांच्या मित्रांनी घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. यामुळे हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवा, शिवसेनेची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा जात प्रमाणपत्र तडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना दिला. यासंदर्भात सोमवारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

विविध अभ्यासक्रम प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते. येथील समिती कार्यालयात त्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी शिवसेनाा कार्यालयास प्राप्त झाल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. आर्थिक पिळवणूक करणे अन्यायकारक असून, असे प्रकार थांबले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी समाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, राजेंद्र दानवे, हिरा सलामपुरे, गणपत खरात, संजय हरणे, नगरसेवक बन्सी जाधव, सतिष कटकटे, रवींद्र गांगे, सचिन रिडलॉन, गणेश लोखंडे, गणेश अंबिलवादे, रणजित दाभाडे, श्रीरंग आमटे, गितेश मुळे, प्रशांत पांचाळ उपस्थित होते.

\Bमदत केंद्र स्थापन \B

विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होऊ नये, त्यांना मदत व्हावी, यासाठी खोकडपुरा येथील समाजिक न्याय भवनासमोर शिवसेनेने मदत केंद्र सुरू केले आहे. केंद्राचे उद्घाटन शहर प्रमुख बा‌ळासाहेब थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. उप शहरप्रमुख राजेंद्र दानवे, प्रशांत पांचाळ यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी शाळांच्या निवड प्रक्रियेस आव्हान, प्रधान सचिवांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकरीता शासनाच्या आदिवासी विकास विभागाने १८ मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकास खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी आादिवासी विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे यासाठी २०१०-२०११ पासून निवासी शाळांमध्ये योजना राबविण्यात येते. २०१५-२०१६ पासून विद्यार्थी संख्या २५०० वरून २५ हजार करण्यात आलेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये २१ एप्रिल २०१५ नुसार पहिली ते पाचवी करीता प्रवेशाची तरतूद रद्द करून २०१८ मध्ये केवळ पहिली आणि दूसरीसाठीच तरतूद करण्यात आली. सोनपेठ (जि. परभणी) येथील रामराव नाईक बहुउद्देशिय संस्था संचलित सायखेडा येथील मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक शाळेस २०१७-२०१८ साली मान्यता प्रदान करण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही करण्यात आली नाही. याविरोधात संस्थासचिव अंकुश जाधव यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याची बाजू डी.बी.पवार यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी ३ जुलैला होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएसबीए’ शाळेचे पालक तहसीलदारांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पीएसबीए शाळेच्या इमारतीचा भार ज्या पिलरवर आहे, त्या पिलरचा काही भाग कोसळ्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळेने दुरुस्तीसाठी शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सोमवारी पालकांनी भीतीपोटी आपत्ती निवारण कक्ष, तहसीलदार, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

जालना रोडवर असलेल्या या शाळेच्या इमारतीच्या व्हरंड्यात असलेल्या पिलरचा काही नुकताच पडला आहे. घाबरलेल्या विद्यार्थ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आल्याचे पालकांनी त्या दिवशी सांगितले. अर्धातास शाळेच्या बाहेर मैदानात विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. प्रकारानंतर घाबरलेल्या पालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष, तहसीलदारांशी संपर्क करत शाळा प्रशासनाबाबत तक्रार केली. पाल्यांच्या सुरक्षेची काळजी व्यक्त करत शाळा प्रशासनाने याबाबत पालकांना विचारात घेतले नसल्याचे पालकांनी सांगितले. शाळेने शुक्रवारपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे मोबाईलवर पालकांना मॅसेज पाठविले. याबाबत शिक्षण विभागाशीही काही पालकांनी संपर्क केला. शिक्षण विभागाच्या पथकाने पाहणी केल्याचेही कळते. शाळा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याबाबत शिक्षण विभागाला कळविलेले नसल्याचेही समोर आले. त्यामुळे विभागानेही नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा मोबाइलवर संदेश पाठवित शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्याबद्दल पालकांना विचारात घ्यायला हवे होते, असेही पालकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना मारहाण; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्युत खांबाचा शॉक लागून गाय मरण पावल्याचा फोन आल्यामुळे 'महावितरण'च्या दोन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ‍ी धाव घेतल्यानंतर त्यांना शिविगाळ व मारहाण करणाऱ्या प्रमोद रावसाहेब वाडेकर, गणेश कारभारी गायकवाड यांना सोमवारी (२५ जून) अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना बुधवारपर्यंत (२७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दिले.

याप्रकरणी 'महावितरण'चे कर्मचारी तुळशीराम फकिरा सपकाळ (२५, रा. मयूर पार्क, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील कार्यालयात कामावर असताना, नारेगाव भागातील एका विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरून गाईला शॉक लागला आणि त्यात गाय मरण पावली, असा फोन फिर्यादीला रात्री नऊच्या सुमारास आला. त्यानंतर फिर्यादी त्याच्या सहकाऱ्यासह दुचाकीवर तातडीने घटनास्थळी पोचले असता, जमलेल्या लोकांनी फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्याला शिविगाळ करण्यास सुरुवात केली.

आरोपी प्रमोद रावसाहेब वाडेकर (२५) व गणेश कारभारी गायकवाड (३१, दोघे रा. नारेगाव) यांनी फिर्यादीला गंभीर मारहाण करून फ्रॅक्चर केले, अशी तक्रार फिर्यादीने दिल्यावरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी दोघांना सोमवारी अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बियाणे विक्री जोमाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वरुणराजाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदी असून, पेरणीला वेग आला आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली असून, खतांच्या वाढत्या किंमतीचा सामना करण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे. खताच्या एका पोत्यामागे ८० ते १४० रुपये वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख १८ हजार हेक्टर असून, सात लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा पेरणी प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांनी खरिपासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, दुसरीकडे कृषी सेवा केंद्रातही बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, बोंडअळीचा प्रादुर्भावाचा फटका सहन कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांना आता खताच्या वाढत्या किंमतीचाही सामना करण्याची वेळ आली आहे.

संयुक्त खताच्या किंमतीच्या दरात गेल्यावर्षीपेक्षा ८० ते १४० रुपये (५० किलोच्या बॅगमागे) वाढल्याचे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी वाढल्याचे चित्र कृषी निविष्ठा केंद्रात दिसून येत आहे. दरम्यान, अनुदानित रासायनिक खत विक्री करताना ई-पोस यंत्राचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

खतांच्या किमती

खत पूर्वी आता

१०:२६:२६ १,०५५ १,१३५

२०:२०:० ८५० ९३०

१५:१५:१५ ८८७ ९७५

पोटॅश ५८० ६५०

(किंमत रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील काही भागांमध्ये २७ व २८ जून रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबाद शहरात २५ ते २९ जून हे पाचही दिवशी ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांमध्ये मराठवाड्यात आकाश ढगाळ राहून वाऱ्याचा वेग अधिक राहील तसेच औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मध्यम ते भारी तर बीड, जालना व परभणी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच पाऊस राहील. ११ जून रोजी मराठवाड्यातील २४ मंडळात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने १२ जून ते २० जून दरम्यान दांडी मारली होती. दोन दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याच्या तुलनेत विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय अभ्यासक्रमासाठी उद्या बैठक

$
0
0

औरंगाबाद - राजकारणात करिअर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विशेष अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. तरुणांना राजकारणाचे महत्त्व लक्षात यावे व चांगले नेतृत्व उदयास यावे हा विभागाचा उद्देश आहे. अधिसभेच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे यांनी हा ठराव मांडला होता. 'राजकारणात करिअर' या अभ्यासक्रमासाठी डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत प्रा. राहुल म्हस्के, प्रा.बाबासाहेब कोकाटे, शेख जहूर व पंकज भारसाखळे यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक बुधवारी (२७ जून) होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंत विद्यार्थ्यांचा कन्नडमध्ये सत्कार 

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

 सकल मराठा समाजातर्फे रविवारी (२४ जून) शिवाजी महाविद्यालयात  गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 अरुण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी  उपप्राचार्य रामचंद्रजी काळुंखे, सागर जाधव, प्रा. संजय गायकवाड, प्राचार्य विजय भोसले,  उद्योजक  मनोज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत साहित्यात पीएचडी पूर्ण करणारे डॉ. रुपेश मोरे, 'एसटीआय'पदी यांची निवड झालेले किशोर भोसले, 'पीएसआय'पदी निवड झालेले किशोर मोतिंगे व साईनाथ बारगळ, दहावी व बारावीतील तालुक्यातील ३० गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला शिक्षणमहर्षी स्व. के. के जाधव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार बारावीत तालुक्यातून प्रथम आलेल्या विक्रांत संजय गायकवाड व स्व. शिवाजी आबा बोलधने गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दहावीत तालुक्यातून प्रथम आले सृष्टी विनोद पवार यांना देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरातील पालकांची, समाज बांधवाची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस संपल्यावर सायंकाळी प्लास्टिकबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण दिवस संपल्यावर सोमवारी महापालिका प्लास्टिक विरोधी कारवाईसाठी सक्रिय झाली. सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान विविध भागात कारवाई करत ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी ८५ किलो कॅरिबॅग देखील जप्त केल्या. दररोज सकाळ आणि सायंकाळी प्लास्टिक विरोधी कारवाई केली जाणार आहे.

राज्य शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर शनिवारपासूनच पालिकेतर्फे अंमलबजावणी होणे अपेक्षित होते, पण शनिवारी कोणतीच कारवाई केली नाही. कारवाई सोमवारपासून केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून कारवाई सुरू होईल, असे मानले जात होते. परंतु, अधिकारी दिवसभर बैठका आणि कारवाईच्या नियोजनात गर्क होते. पालिकेची पथके सायंकाळी पाच वाजता रस्त्यावर उतरली. कारवाईसाठी नऊ झोन कार्यालयनिहाय नऊ पथके कार्यान्वीत झाली आहेत. ही कारवाई स्वच्छता निरिक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी नऊपैकी सात पथकांनी दंड वसूल केला. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी कारवाईचे नियोजन केले.

प्लास्टिक बंदीची कारवाई कशी आणि कुठून सुरू करावी या बद्दल पालिकेचे प्रशासन संभ्रमावस्थेत होते. त्यामुळे दिवसभर अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. झोन कार्यालयनिहाय पथक स्थापन देखील होत नव्हते. त्यामुळे सकाळी सुरू होणारी कारवाई सायंकाळी सुरू झाली. आता उद्या मंगळवारपासून नियमित कारवाई केली जाईल, असे पालिकेने कळवले आहे.

झोन कार्यालय - वसूल दंड (रुपयांमध्ये)

१ - ७०००

२ - ३०००

३ - २५००

४ - १०,०००

५ - ७०००

६ - निरंक

७ - ५०००

८ - २०००

९ - निरंक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक व्यापाऱ्यांचा अघोषित बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने जारी केलेल्या प्लास्टिकबंदीचा फटका विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, व्यापाऱ्यांना बसत आहे. प्लास्टिक पिशव्या, डबे यांचा सर्रास वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, भाजी-फळ विक्रेत्यांची अडचण झाली आहे. बंदीची अंमलबजावणी सुरू होताच प्लास्टिक विक्रेत्यांनी अघोषित बंद सुरू केला आहे. व्यवसाय, रोजगार बुडाल्यानंतर आम्ही घर कसे चालविणार, सरकारने यातून काही मार्ग काढवा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणीही संतप्त व्यापाऱ्यांनी केली.

शहरातील राजा बाजार, अंगुरीबाग, पानदरिबा, जुना मोंढा आदी भागात प्रामुख्याने प्लास्टिक विक्रेत्यांची दुकाने आहेत. बेकरी, किराणा, पोळी-भाजी केंद्र, टेलरिंग, शेती उपयोगी, दूध डेअरी, नर्सरीसह सर्व प्रायमरी पँकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक कॅरिबॅग विक्रीची दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून या भागात आहेत. ग्राहकांची नेहमी गर्दी असलेली ही दुकाने सध्या कुलूप बंद आहेत. प्लास्टिकबंदीसंदर्भात कारवाई सुरू होताच व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवल्याने औरंगाबाद प्लास्टिक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा व सचिव शेख नाजीम यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

प्लास्टिक विक्री व्यवसायात शहरात ३० ठोक विक्रेते असून, किरकोळ विक्रेत्यांची संख्या सुमारे ३०० आहे. व्यवसायच बंद झाला, तर या व्यापाऱ्यांनी व त्यांच्यावर अंवलबून लोकांनी जीवन कसे जगावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अन्य व्यावसायिकही यामुळे अडचणीत आले असून, बड्या उद्योगपतीनी निर्मिती केलेल्या वस्तूची विक्री अद्यापही प्लास्टिकमधूनच केली जाते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, त्यांना सूट का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. किरकोळ व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणू नका, अन्यथा कुटुंबासह इच्छामरणास परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.

\Bअन्य व्यवसायावर परिणाम

\Bप्लास्टिकबंदीचा परिणाम अन्य व्यवसायाही होऊ लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्लास्टिकबंदीचा निर्णय चांगला आहे, पण साखर, डाळ यांसह अन्य माल कशात द्यावा, असा प्रश्न यामुळे निर्माण झाल्याचे किराणा दुकानदार विनोद ओस्तवाल यांनी सांगितले. कागदामधून किराणा सामान विकणे अवघड होत आहे, कारण पुडा फुटून सर्व माल एकत्र होण्याची भीती आहे. आम्ही पर्याय शोधत असून ग्राहकांनी पिशवी आणावी, यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कॅरिबॅग मिळत नसल्याने ब्रेड, खारी आदी उत्पादित वस्तू कशात पॅक कराव्यात, असा प्रश्न बेकरी चालक मतीन खान यांना पडला आहे. शहरात लहान-मोठ्या मिळून सुमारे दोन हजारांच्या आसपास बेकरी आहेत. टोस्ट, ब्रेड, लादी, क्रिमरोल आदी बेकरी वस्तूसाठी प्लास्टिकशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगत बंदीमुळे सभ्रम निर्माण झाल्याचे सांगितले.

व्यवसायच नाही, तर घेतलेले कर्ज कसे फेडणार, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. मुलांचे शिक्षण, लग्नकार्यासह रोजच्या भाकरीचा प्रश्न आहे. प्लास्टिकबंदीबाबत तोडगा काढला जावा, अन्यथा शेकडो व्यापारी व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. सरकारने सकारात्मक विचार करावा अन्यथा कुटुंबासह इच्छामरणासाठी परवानगी द्यावी.

- ओमप्रकाश भुतडा, अध्यक्ष, औरंगाबाद प्लास्टिक विक्रेता संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या निर्णयाची माहिती ग्रामीण भागात पोचविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात सरकारने घेतलेल्या निर्णयाची, योजनांची माहिती जनतेपर्यत पोचविण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे गावागावांत जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांनी दिली.

यावेळी प्रदेश कार्यकारिणी  सदस्य सुरेश बनकर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी, युवा मोर्चाचे  प्रदेशाउपाध्यक्ष सुनील मीरकर, विलास पाटील, राजेंद्र ठोंबरे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मोठे म्हणाले की, या शासनाने गरीबांसाठी जनधन योजना, घराघरांमध्ये वस्तीवर वीज, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालये बांधून महिलांचा सन्मान केला, जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा योजनेत पाच लाख रुपयाचा विमा दिला, गोरगरीब महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन दिले. पंतप्रधान विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण दिले, पैसेवारीच्या पद्धतीत बदल केला. देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात रास्ते बांधणीची कामे घेतली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी इंदू मिलची जागा उपलब्ध करून दिली. आरबी समुद्रात छत्रपती  शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणीसाठी मान्यता दिली. यासह अनेक निर्णय या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी घेतले आहेत, हे निर्णय गावागावांत जाऊन सांगितले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडी फिरवली नाही, सफाई मजूर निलंबित

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घंटागाडी फिरवली नाही, रस्त्यावरचा कचरा देखील उचलला नाही म्हणून महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी गौतम कांबळे या सफाई मजुराला निलंबित केले.

कांबळे यांच्या निलंबनाच्या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे की, झोन क्रमांक १ अंतर्गत आसेफिया कॉलनी, जयभीमनगर या परिसरात रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. नागरिकांनी सांगितले की, या भागात घंटागाडी न पाठवल्यामुळे कचरा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. आपण या ठिकाणचा कचरा उचलण्याची कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबी लक्षात घेऊन आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, भांडार अधिक्षक संजय जक्कल यांची बदली अस्थापना अधिकारी (२) या पदावर आयुक्तांनी केली आहे. जक्कल यांच्याकडे अस्थापना अधिकारी (१) या पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीजी प्रवेशाला मुदत‌वाढ

$
0
0

२८ जूनपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन, ऑनलाइन प्रक्रियेचा गोंधळ कायम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. प्रवेशाची अंतिम यादी २२ जून रोजी जाहीर करण्यात आली. मात्र, प्रवेशाला जेमतेम प्रतिसाद असल्यामुळे २८ जूनपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. तसेच रिक्त जागांसाठी 'स्पॉट अॅडमिशन' राबविण्याचे नियोजन सुरू आहे.

दोन वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जात आहे. मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्यामुळे यावर्षी ऑनलाइन सीईटी घेण्यात आली. कला शाखेला 'सीईटी'मधून वगळले होते. मात्र, विद्यपीठ कॅम्पसमध्ये कला व सामाजिकशास्त्रे विषयांसाठी सीईटी घेण्यात आली. महाविद्यालय आणि कॅम्पसमध्ये वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या विषयांना चांगला प्रतिसाद आहे. उपयोजित कला आणि आंतरविद्याशाखेच्या काही विषयांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तीन टप्प्यात प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांच्या पर्यायासह जाहीर करण्यात आली. संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयांचा पर्याय निवडण्याची मुभा आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पर्याय निवडले. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसल्यामुळे प्रक्रिया रेंगाळली आहे. पदव्युत्तर प्रवेशासाठी २२ जून रोजी जाहीर करण्यात आली. २३ आणि २४ जून रोजी सुटी असल्यामुळे पुरेसे प्रवेश झाले नाही. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनानुसार २७ जूनपासून तासिका सुरू होणार होत्या. मात्र, प्रवेशाचा खोळंबा झाल्याने मुदतवाढ आणि स्पॉट अॅडमिशनचा पर्याय निवडण्यात आला आहे. सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 'स्पॉट अॅडमिशन'चा देण्यात येणार आहेत. प्रथम प्रवेश यादी चार जून रोजी जाहीर झाली होती. पहिल्या टप्प्यात १०१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या फेरीत एकूण दोन हजार ५९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आतापर्यंत फक्त तीन हजार १२४ प्रवेश झाले आहेत. महाविद्यालय पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजार ८२५ आहे. पसंतीक्रम आणि प्रवेशित विद्यार्थ्यांची तफावत दूर करण्यासाठी मुदतवाढीचा पर्याय निवडण्यात आला.

\Bकॅम्पसमध्ये प्रवेश सुरू

\B

विद्यापीठ कॅम्पसमध्ये मागील वर्षी जवळपास ३० टक्के जागा रिक्त होत्या. यावर्षी २० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. सामाजिकशास्त्रे, भाषा आणि उपयोजित कला विषयाला कमी प्रतिसाद मिळाला. या जागा रिक्त राहणार आहेत. सध्या रिक्त जागेसाठी प्रवेश देण्यात येत आहेत.त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे.

\B'पीजी सीईटी'चा आलेख

\B

एकूण अर्ज - १८ हजार १६५

सीईटी देणारे विद्यार्थी - १४ हजार ९१०

महाविद्यालय पसंतीक्रम -९ हजार ८३३

कागदपत्रे पडताळणी केलेले विद्यार्थी - ५ हजार ९२२

प्रवेश घेतलेले विद्यार्थी - ३ हजार १२४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ विद्या परिषद; निवडणूक शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येत्या ३० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उत्कर्ष पॅनल व विद्यापीठ विकास मंच यांच्यात थेट लढत होणार आहे. व्यवस्थापन परिषद निवडणुकीनंतर विद्यापीठात विद्या परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या उमेदवारात डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. व्यंकटेश लांब आणि डॉ. दयानंद भक्त यांचा समावेश आहे. पुरूष प्रवर्गात डॉ. विलास खंदारे व डॉ. शंकर अंभोरे आणि महिला प्रवर्गात डॉ. प्रतिभा अहिरे व डॉ. सय्यद शरफून निहार यांच्यात सरळ लढत आहे. आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचने मोर्चेबांधणी केली आहे. विद्या परिषदेतून दोन सदस्य व्यवस्थापन परिषदेत जाणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ७८ मतदार असले तरी काही जागा रिक्त असल्यामुळे जवळपास ६५ मतदार राहण्याची शक्यता आहे. नियुक्त सदस्यांची संख्या ही विकास मंचची जमेची बाजू ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचे प्रलंबित कामे मार्गी लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

वाहतुकीच्या दृष्टीने दमडी महल रस्त्याचे काम, कटकट गेट पुलाचे काम होणे आवश्यक आहे. यासाठी निधी ठेवलेला आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्याकडे केली.

महापालिकेच्या संबंधित प्रलंबित कामांबाबत महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्यासोबत आमदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (२५ जून) आंबेडकर संशोधन केंद्रात चर्चा केली. यावेळी एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी तसेच एमआयएमच्या अन्य नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी आमदार जलील म्हणाले, 'जकात नाका येथे दररोज कचऱ्याचा ढिग वाढत असून दररोज प्रक्रिया करण्याचे काम होत नाही. यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याचा धोका आहे. लवकरात लवकर जकात नाका येथील कचऱ्याची समस्या निकाली काढावी.' कचऱ्याची समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देत हा विषयही मार्गी लावण्याचे आश्वासन निपुण विनायक यांनी दिले.

'पिरगैब सहाब ते दमडी महाल रस्त्याचे केवळ २० टक्के काम बाकी आहे. हे काम झाल्यास पिरगैब सहाब लेबर कॉलनी मार्गे जाणारी वाहने थेट बाहेर निघू शकतात', असे सागंत जलील यांनी हे काम लवकर करण्याची मागणी केली. आयुक्तांनी या कामाला गती देण्याचा त्यांना शब्द दिला, अशी माहिती एमआयएमचे पालिकेतील गटनेते नासेर सिद्दीकी यांनी दिली.

………

नेहरू भवन येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर

महापालिकेची नेहरू भवन ही एकेकाळची वैभवशाली इमारत होती. आज या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. नेहरू भवन येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी दोन कोटी रुपये एवढा निधी आला आहे. नेहरू भवनच्या इमारतीच्या जागेवर बहुउद्देशीय इमारत बांधून एक मोठे सभागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील सिंचन अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

मराठवाड्यात १७ ते १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून हे क्षेत्र ४० टक्क्यांवर घेऊन जायचे आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या निश्चितपणे कमी होतील. येणाऱ्या काळात मराठवाड्यातील महत्त्वाच्या विषयांसोबतच प्रामुख्याने सिंचन आणि आरोग्य क्षेत्रावर लक्ष देण्यात येऊन विभागासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मराठवाड विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.

डॉ. कराड यांनी सोमवारी (२५ जून) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उशीर झाला आहे तरी गती घेऊ, असा विश्वास व्यक्त करत डॉ. कराड म्हणाले, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सिंचनासाठी ४० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. यातील जास्तीत जास्त निधी मराठवाड्यासाठी आणण्यासाठी प्रयत्न करू. मराठवाड्यात शेती हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्‍त्रोत आहे, मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे विभागात शेतीवर आधारित उद्योग आणण्यासाठी विकास मंडळ प्रयत्न करेल व यासाठी यासाठी पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा करण्यात येईल.

औरंगाबाद ही पर्यटन राजधानी आहे, मात्र राजधानीचा पाहिजे तसा विकास झाला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तसेच मराठवाड्यात रेल्वेचे जाळे वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सध्या औरंगाबाद येथून मर्यादित विमानसेवा आहेत. येणाऱ्या काळात औरंगाबाद- जोधपूर- जयपूर - दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कराड यांनी सांगितले.

लवकरच मराठवाडा दौरा

मराठवाडा विकासासाठी आपण लवकरच सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार असून आढावा घेऊन विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कराड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images