Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

व्यंगचित्राद्वारे मनसेने उडवली मनपाची खिल्ली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमची टक्केवारी खोर मनपा काळ्या यादीतील ठेकेदारांना काम देते, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधींची व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवली. रस्त्यांची कामे काळ्या यादीतील ठेकेदारांना देऊन शहराचा बट्याबोळ करू नका, अशी मागणी मनसेच्या वतीने मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्य शासनाने गेल्यावर्षी सिमेंट रस्ते बनविण्यासाठी मनपाला १०० कोटींचा निधी दिला आहे. मनपाने त्यात आणखी ५० कोटी रुपये टाकून दीडशे कोटींचे रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी २५ कोटींच्या सहा कामांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. यापैकी पाच कामांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. विविध कंपनी ठेकेदारांच्या या निविदा आहेत. यापैकी दोन कंपन्यांची तक्रार आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी देखील या दोन्हीपैकी एका ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे. हे ठेकेदार काळ्या यादीत असताना त्यांना पुन्हा ७५ कोटींच्या रस्त्याची कामे मनपा प्रशासन देत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शहरातील रस्त्यांची विकासकामे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काळ्या यादीतील ठेकेदारांना काम देण्यात येऊ नये अन्यथा मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, मनविसे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर आदींच्या सह्या आहेत.

टक्केवारीसाठी काळ्या यादीतील ठेकेदारांना रस्त्यांची कोट्यावधी रुपयांची कामे देण्याचे षडयंत्र मनपातील काही अधिकारी आखत आहेत. शहरातील विकासकामे प्रामाणिकपणे करण्यात यावी. काळ्या यादीत असलेल्या ठेकेदारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही. त्यामुळे या ठेकेदारांना कामे देण्यात येऊ नये.

संदीप कुलकर्णी, जिल्हा संघटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकशीच्या घेऱ्यातलाच चौकशीदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेमध्ये अक्षरश: काहीही होऊ शकते. आता हेच पाहा, ज्या अधिकाऱ्याची टीडीआर घोटाळ्यात विभागीय चौकशी सुरू आहे, त्याच अधिकाऱ्याडे महापौरांनी चक्क १८ कोटींच्या पेमेंटची चौकशी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी हे अधिकारी डॉ. डी. पी. कुलकर्णी यांना निलंबित देखील केले आहे. महापौरांच्या या निर्णयाबद्दल हसावे की रडावे अशा प्रतिक्रिया दबक्या आ‌वाजात व्यक्त होत आहेत.

पाणीपुरवठा विषयी विशेष सर्वसाधारण सभेत भाजप गटनेते प्रमोद राठोड व नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी लेखा विभागाकडून गेल्या काही दिवसात तब्बल अठरा कोटींचे पेमेंट केल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना माजी महापौर भगवान घडमोडे व माजी सभापती राजू शिंदे यांनीही साथ दिली. वानखेडे म्हणाले, लेखा विभागाने आतापर्यंत किती बिले, कुणाच्या आदेशावरून काढली. कंत्राटदारांची बिले देताना ज्येष्ठता यादीचा निकष पाळला का असे प्रश्न उपस्थित केले. महापौरांच्या आदेशानंतर मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी खुलासा केला व दिलेल्या बिलांची माहिती दिली. यावर राठोड म्हणाले, लेखा विभागाने साडेआठ कोटींची बिले काढली. देखभाल दुरुस्तीची साडेतीन कोटींची देखील बिले काढली. महापौरांच्या सांगण्यावरून हे पेमेंट केल्याचे अधिकारी सांगतात. यावर केंद्रे म्हणाले, मी अशा प्रकारचे कोणतेही विधान केले नाही. उपमहापौर विजयऔताडे म्हणाले, साडेअठरा कोटींचे पेमेंट लेखा विभागाने केले, त्याची माहिती आयुक्तांना आहे का ? विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी साडेसात कोटींचे पेमेंट कोणत्या निकषाखाली केले असा सवाल करत बिल काढण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. महापौरांनी याची दखल घेतली. ते म्हणाले, कंत्राटदारांचे बिल देताना अनियमितता झाली आहे. मनमानी पद्धतीने हे काम केले. त्यामुळे लेखा विभागाचा कारभार संशयास्पद आहे. मुख्य लेखआधिकारी केंद्रे यांच्याकडून नगरसेवकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींची आहे, आम्ही पालिकेचे ट्रस्टी आहोत. नगरसेवकांचा मान राखा असे, त्यांनी केंद्रे यांना बजावले. त्यानंतर त्यांनी १८ कोटींच्या पेमेंटची चौकशी उपायुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी करतील. १५ नोव्हेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल १७ नोव्हेंबरला सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. टीडीआर घोटाळ्यात डॉ. कुलकर्णी यांची विभागीय चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांना निलंबित देखील केले होते.

\Bबहिणीच्या घरासमोरील पथदिवे बंद

\Bलेखा विभागाने महावितरणचे पैसे न भरल्यामुळे शहराच्या काही भागातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने बंद केला आहे, अशी माहिती महापौरांनी सर्वसाधारण सभेत दिली. ते म्हणाले, माझ्या बहिणीच्या घरासमोरील पथदिवे यामुळेच बंद आहेत. अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील पेमेंट न करता लेखा विभागाने वेगळ्याच कंत्राटदारांचे पेमेंट केले, असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचाऱ्यांना साडेतीन हजारांचा बोनस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येकी साडेतीन हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी जाहीर केला. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर दोन कोटी ६८ लाख आठ हजारांचा बोजा पडणार आहे.

कर्मचारी बोनस संदर्भात दोन दिवसांपूर्वी महापौरांच्या उपस्थितीत सर्व कामगार, कर्मचारी संघटनांचे नेते, पदाधिकारी, पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांना २,४१९ रुपये बोनस देण्याची तयारी महापौरांनी दाखवली. त्याला सर्वच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. गेल्यावर्षी साडेतीन हजार रुपये बोनस देण्यात आला होता, यंदाही तेवढाच बोनस द्या अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार महापौरांनी बोनसबद्दल गुरुवारी नव्याने घोषणा केली. २,६१४ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने ८५० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ हजार ५०० रुपये आग्रीम रक्कम देण्यात येणार आहे. दैनिक वेतनावरील कर्मचारी, वर्ग तीन - वर्ग चारचे कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सातारा - देवळाई येथील पालिकेचे कर्मचारी यांना दोन हजार रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. ३५० जणांना याचा लाभ होणार आहे. लिंकवर्कर्स, आशा वर्कर्स, तासिकातत्वावरील शिक्षक, अंशकालीन कर्मचाऱ्यांना १५०० रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. ११६ जणांना ही भेट मिळेल. बचतगटांच्या ३५२ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाची दोन महिन्याची थकबाकी देखील दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिस्ट फेस्टिव्हलवर बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हलच्या नावाखाली दोन वर्षांपासून शहरात धम्मपीठाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर सुरू आहे. हा गैरवापर थांबवण्यासाठी बौद्ध उपासक महासंघाची स्थापना करण्यात आली. उपासक महासंघाचा बुद्धिस्ट फेस्टिव्हलवर बहिष्कार आहे, अशी माहिती महासंघाचे अनिलकुमार सोनकामळे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शहरात येत्या रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. हा बुद्धिस्ट फेस्टिव्हल भाजप-सेना पुरस्कृत असल्याचा वाद निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी बौद्ध उपासक महासंघाने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. भिख्खू संघाला विश्वासात न घेता परस्पर केलेले फेस्टिव्हलचे आयोजन वैयक्तिक लाभासाठी व राजकीय हेतूने प्रेरीत आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नेत्यांनाच आमंत्रित केले आहे. त्यांचे विचार बाबासाहेब व तथागत बुद्ध विचारांचे मारक आहेत. राजकीय नेते धम्मपीठावर असल्यामुळे धम्मपीठाचे पावित्र्य भंग पावत आहे. धम्मपीठावरुन फक्त धम्मदेसनाच व्हावी, राजकीय भाषणबाजी नको असे बौद्ध उपासक महासंघाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मागील दोन वर्षी पार पडलेल्या फेस्टिव्हलचे फलित धम्मोपयोगी व समाजहितोपयोगी नाही अशी भावना उपासकांची आहे. तसेच राजकीय नेत्यांनी बौद्धांचा उल्लेख 'दलित' केला. हा बौद्धजनांचा अपमान आहे, असे महासंघाने निवेदनात म्हटले आहे. धम्मपीठाचे महत्त्व लक्षात घेऊन धम्मात राजकीय, कलुषित मनाच्या लोकांची घुसखोरी थांबविण्यासाठी आंबेडकरवादी अनुयायांनी फेस्टिव्हलवर बहिष्कार घालावा असे आवाहन महासंघाने केले. या पत्रकार परिषदेला महासंघाचे दिनकर ओंकार, भंते सुदतबोधी, मुकुंद सोनवणे, अनिलकुमार सोनकामळे, कैलास कांबळे, अॅड. अशोक म्हस्के, अरुण शिरसाट आदी उपस्थित होते.

बहिष्काराला पाठिंबा

आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हल बौद्ध विचारांशी अंतर राखणारा असल्यामुळे बहिष्कार टाकण्याचे आवाहन उपासक संघाने केले आहे. याबाबत शहरात पत्रके वाटण्यात आली आहेत. बहिष्कार मोहिमेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे फेस्टिव्हलच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय घुसखोरी रोखण्यासाठी मोहिम राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांचा चारा शिल्लक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यात जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारीनंतर मराठवाड्यात चाराटंचाईचे भीषण संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसणे सुरू झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये त्यांची तीव्रता वाढणार आहे. मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका जनावरासाठी दररोज तीन ते सहा किलो चाऱ्याची आवश्यकता असते, मात्र उपलब्‍ध चाऱ्यानुसार हा चारा केवळ जानेवारीपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या कालावधीत चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, पशुपालकांना पशुधनाचा सांभाळ करणे अवघड होणार आहे. मराठवाड्यात ६७ लाख ७ हजार ६१२ जनावरे असून, त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना जनावरे जगवणे अवघड ठरणार आहे. मराठवाड्यात यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला मराठवाड्यात मका, सोयाबीन, ज्वारीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातचे पीक, तर गेलेच शिवाय चाराही उपलब्ध होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

६७ लाख जनावरांचा प्रश्न

मराठवाड्यात लहान मोठी अशी एकूण ६७ लाख जनावरांची संख्या असून, यामध्ये ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे आहेत, तर विभागात शेळ्या मेढ्याची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात जनावरांच्या संख्येच्या तुलनेत दररोज २६ हजार ३३० टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सध्या चाऱ्याची स्थिती पाहता केवळ जानेवारीपर्यत पुरेल इतकाच चारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील पशुधन

जिल्हा................ जनावरांची संख्या..........रोज आवश्यक चारा

औरंगाबाद................१०६७४९२......................३७८७

जालना....................६९९०२४.........................२८१०

परभणी.....................६२२२००......................२६०७

बीड..........................१२२४७९८..................४४९९

लातूर.........................७५२४२६...................३०६५

उस्मानाबाद.................७३७३४७...................२९४०

नांदेड.........................११४४७२५.................४६७५

हिंगोली.......................४५९६८०..................१९४६

एकूण.....................६७०७६१२...................२६३३०

जनावरांना दररोज आवश्यक

जनावरांचा प्रकार............ चारा (वाळलेला)........... पाणी

मोठी जनावरे...................६ किलो..................३० लिटर

लहान जनावरे..................३ किलो..................१५ लिटर

\B१०० टक्के अनुदानावर बियाणे, खत वितरण

\Bराज्यातील संभाव्य चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनास आवश्यक चारा उपलब्‍ध व्हावा; तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती, प्रजनन क्षमता कायम राखण्यास मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर वैरण पिकांच बियाणे व खते वितरण हा प्रकल्प राबवण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशुपालक, शेतकऱ्यांकडे किमान दहा गुंठे जमीन उपलब्‍ध आहे; तसेच सिंचनसुविधा उपलब्‍ध आहे त्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते (प्रतिगुंठे रक्कम ४६० रुपयांच्या मर्यादेत) अनुदान देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात सहा लाख नागरिकांची तहान टँकरवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे यंदाही मराठवाडा दुष्काळाच्या खाईत सापडला असून, पाणीसंकट गहिरे झाले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच विभागातील तब्बल २२४ गावांना व दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. या गावांमधील तब्बल सहा लाख लोकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

मराठवाड्यातील ४७ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, सर्वाधिक दुष्काळाच्या झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसत आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला असल्याने अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ५३ टक्केच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १९४ गावांमधील चार लाख ७९ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात टंचाई आराखडा संपुष्टात येण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे टँकर सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यानंतरही जिल्ह्यातील टँकरचा चढता आलेख नोव्हेंबर महिन्यातही सुरू आहे. सध्या पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. जालना जिल्ह्यातही पावसाअभावी २४ गावे व दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाला तर बीड जिल्ह्यातील सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

\B२६१ विहीरींचे अधिग्रहण

\B‌ऑक्टोबर अखेरीसच मराठवाडा विभागातील २६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये १३० विहिरी टँकरसाठी, तर १३१ विहिरींचे अधिग्रहण टँकर व्यतिरिक्त करण्यात आले आहे.

\Bमराठवाड्याची स्थिती

\Bजिल्हा.............टँकर.............. अवलंबून लोकसंख्या

औरंगाबाद.........२२८...................४ लाख ७९ हजार ५४६

जालना.............४२......................८४ हजार २७८

नांदेड...............२........................१२ हजार ६००

बीड.................११..........................२३ हजार ६२९

उस्मानाबाद........१........................१ हजार ४९५

एकूण................२८४..................६ लाख १ हजार ५४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साज पैठणीचा’ उपक्रमात महिलांचा उत्साह शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'साज पैठणीचा' उपक्रमात असंख्य महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, एकतानगर भागातून छाया वाकेकर यांनी पैठणी साडी जिंकण्याचा मान मिळवला.

'साज पैठणीचा' उपक्रमांतर्गत दररोज शहरातील प्रत्येक वॉर्डात तीन ठिकाणी महिलांचे विविध खेळ, स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत आहे. इतकेच नव्हे तर प्रेक्षक महिलांना देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे जिंकत आहेत. या उपक्रमात विजेत्या महिलांना पैठणी साडी, ट्रॅव्हलिंग बॅग, गालिचा, क्वाइन अशा भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमांसाठी नॉलेज पार्टनर 'लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल', हेल्थ पार्टनर 'गेटवेल कॅन्सर क्लिनिक' सक्सेस पार्टनर डॉ. शिवकुमार गोरे यांचे 'सुखायु सुश्रुत हॉस्पिटल' व 'शिंदे प्रॉपर्टीज' यांचे सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन 'आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान'च्या संचालिका, नागेश्वरवाडी येथील नगरसेविका कीर्ती महेंद्र शिंदे यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९०२१६५९३९४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

स्पर्धेतील विजेते

प्रथम : संजीवनी डांगे

द्वितीय : लता जाधव

तृतीय : रुपाली सांगळे, अनिता नरवडे

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : संध्या वाघमारे, शीला काकडे, अनिता घोडके

एकतानगर

प्रथम : मीराबाई मगरे

द्वितीय : छाया वाकेकर

तृतीय : सिंधू सोनवणे,

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : अश्विनी धनेकर, छाया भावले, रेखा वानखेडे

अंतिम विजेते

एकतानगर

पैठणी साडी : छाया वाकेकर

ट्रॅव्हलिंग बॅग : सविता नरवडे

गालिचा : संजीवनी डांगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ती रात्र' ठरली सर्वोत्कृष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेत भांडूप परिमंडळाचे 'ती रात्र' हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर लातूर परिमंडळाचे 'विठ्ठला' या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या नाट्यस्पर्धेचा समारोप तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी (३१ ऑक्टोबर) झाला. महावितरणचे मुख्य अभियंता (औरंगाबाद) सुरेश गणेशकर, डॉ. मुरहरी केळे (अकोला), अनिल भोसले (कोल्हापूर), प्रभारी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, परीक्षक प्रा. अनुया दळवी, प्रा. दिलीप महालिंगे, प्रा. किशोर शिरसाठ, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

बुधवारी (३१ ऑक्टोबर) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अकोला परिमंडळाने केंद्र शासनाच्या बेटी बचाव बेटी पढ़ाओ अभियानाने प्रेरित होऊन स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध महिला सक्षमीकरणाचा एल्गार दाखवणारे चंद्रकांत शिंदे लिखित 'बाबा, मी तुमचीच मुलगी आहे' हे नाटक सादर केले. तर कोल्हापूर परिमंडळाने महाविद्यालयीन वसतिगृहात राहणाऱ्या चार मित्रांची कथा शिवाजी देशमुख लिखित तुफान विनोदी 'कार्टी नं-१' या नाटकातून सादर केली. दोन्ही नाटकांना रसिकांची गर्दी झाली होती.

वैयक्तिक पारितोषिके

दिग्दर्शन : प्रथम - प्रशांत जानराव (लातूर), द्वितीय - डॉ. संदीप वंजारी (भांडूप), अभिनय (पुरुष) : प्रथम - डॉ. संदीप वंजारी (भांडूप), द्वितीय - गणेश राणे (अकोला), अभिनय (स्त्री) : प्रथम - दीप्ती थोरात (भांडूप), द्वितीय - ज्योती मुळे (अकोला), नेपथ्य : प्रथम - महेंद्र चुनारकर, उदय गुरव (भांडूप), द्वितीय - गणेश बंगाळे (अकोला), प्रकाशयोजना : प्रथम - अमोल काळे (लातूर), द्वितीय - मकरंद आवडेकर, शकील महात (कोल्हापूर), संगीत : प्रथम - दिलीपकुमार मेहेत्रे (भांडूप), द्वितीय - अमोल साळुंके (लातूर), रंगभूषा व वेशभूषा : प्रथम - सागर मारुलकर (कोल्हापूर), द्वितीय - प्रमोद कांबळे (विठ्ठला), उत्तेजनार्थ (अभिनय) : प्रमोद कांबळे (लातूर), दीपेश सावंत (भांडूप), संतोष पाटील (अकोला), नजीर अहमद (कोल्हापूर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमआयएम’च्या १६ नगरसेवकांचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेस विरोध करणारे 'एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापौरांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात प्रवेश नाकारला. या निर्णयाचा निषेध करून सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या 'एमआयएम'च्या सोळा व काँग्रेसच्या एका नगरसेवकाला महापौरांनी एक दिवसासाठी निलंबित केले.

पाणीपुरवठा व्यवस्थेच्या संदर्भात आयोजित विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी महापौरांना मतीन यांना यापुढे सर्वसाधारण सभेच्या सभागृहात प्रवेश न देण्याच्या निर्णयाची आठवण करून दिली. राठोड यांच्या या सूचनेमुळे 'एमआयएम' गटनेते नासेर सिद्दिकी आणि विरोधीपक्षनेते जमीर कादरी आक्रमक होत एखाद्या सदस्याला सभागृहात येण्यापासून रोखता येणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी त्यांना साथ दिली. एखाद्या सदस्याला सभागृहात येऊ न देण्याचा ठराव घेता येत नाही, असा दुजोरा त्यांनी दिला. भाजपचे राजगौरव वानखेडे म्हणाले, सर्वसाधारण सभेत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. माजी महापौर भगवान घडमोडे म्हणाले, शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही आहे. सय्यद मतीन यांच्यामुळे सतत शांतता भंग पावते. त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात येऊ नये. 'एमआयएम'चे विकास एडके, 'भाजप'चे रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनीही मत व्यक्त केले. यानंतर लगेचच 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यात अफसर खान देखील सहभागी झाले. सय्यद मतीन यांना सभागृहात प्रवेश देण्याबाबत पुढील सर्वसाधारण सभेपर्यंत आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासून घेतो, तोपर्यंत तुम्ही सर्वजण आपापल्या जागेवर बसा आणि सर्वसाधारण सभा चालवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन महापौर घोडेले यांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना केले. मात्र, ते नगरसेवक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे यासर्वांचे एक दिवसासाठी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला.

\Bनिलंबित नगरसेवक

\B'एमआयएम'चे अजीम, जमीर कादरी, संगिता वाघुले, इरशाद इब्राहीम, नासेर सिद्दिकी, जहाँगिरखान, अय्युब जहागिरदार, गंगाधर ढगे, तसलीम बेगम, खान सायरा बानो, सरवत बेगम, शेख नर्गीस, अब्दुल नाईकवाडी, विकास एडके, लता निकाळजे, सलमा कुरेशी आणि काँग्रेसचे अफसर खान.

\Bखुर्च्यांची मोडतोड\B

महापौरांनी निलंबनाचे आदेश दिल्यावर 'एमआयएम' आणि कॉँग्रेसचा एक असे १७ नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सभागृहाच्या बाहेर असलेल्या खुर्च्यांची मोडतोड केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांभीर्य लक्षात घेऊन कामाचा वेग वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी व जनावराला चारा-पाणी उपलब्‍ध करून देण्याच्यादृष्टीने टंचाईच्या उपायात्मक कामांचा वेग वाढवा, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात टंचाई उपाययोजना तसेच विविध पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक लोणीकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

लोणीकर म्हणाले, विभागात ४४ तालुके गंभीर तर तीन तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ आहे. सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आपापल्या स्तरावर टंचाई कृती आराखड्याची गतिमानता व अंमलबजावणीच्या दृष्‍टीने आढावा बैठक घ्याव्या, सर्व जिल्ह्यांनी आपापल्या कामांचे 'डीपीआर' महिन्याभरात तयार करून निधीचा योग्य विनियोग करून जनतेला टंचाई परिस्थितीत योग्य दिलासा मिळेल, असे काम करावे असे निर्देश लोणीकर यांनी दिले. या बैठकीमध्ये टंचाई कृती आरखड्याबाबत प्रत्येक जिल्ह्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी‌ दिली.

\B१५२ योजनांचे ई-भूमीपूजन

\Bबैठकीपूर्वी मराठवाड्यात सुरू करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या १५२ योजनांचे ई- भूमीपूजन लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. १५२ योजनांच्या कामांची अंदाजित रक्कम १५९ कोटी रुपये राहणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ११, जालना १३, परभणी १, हिंगोली ३, नांदेड १५, उस्मानाबाद ४, बीड ५३ तर लातूर जिल्ह्यातील ५२ अशा विभागातील १५२ योजनांचा यामध्ये समावेश आहे.

\Bवॉटरग्रीडच्या कामाचा श्रीगणेशा

\Bमराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा दूर करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर वॉडरग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार असून शेती, उद्योग आणि पिण्याचे पाण्यासाठी असलेल्या या ग्रीडचे काम येत्या सहा महिन्यांपासून सुरू होईल, असे लोणीकर यांनी सांगितले. वॉटरग्रीड संदर्भात इस्‍त्रायल सरकारसोबत करार झाला असून या संबंधी अनेक बैठका झाल्या. या संदर्भात तीन रिपोर्ट प्राप्त झाले असून, उर्वरित तीन रिपोर्ट दोन महिन्यात प्राप्त होतील, असेही लोणीकर यांनी सांगितले.

\Bअभियंत्यांना माहित नाही

\Bशेती, उद्योग आणि पिण्याचे पाणी एकत्रित तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतात नाही. आपल्याकडे असे काम झालेले नाही. त्यामुळे आपल्या अभियंत्यांना एकत्रित ग्रीडचे काम कसे करावे याची माहिती नाही, असे म्हणत लोणीकर यांनी वॉटरग्रीडची माहिती देताना इस्‍त्रालयचे तोंडभरून कौतुक करत कराराबद्दल माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा वाहतुकीला मनाई

$
0
0

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे भविष्यामध्ये जिल्ह्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्यातील पशुधनास पुरेसा उपलब्‍ध व्हावा यासाठी जिल्ह्यातून परजिल्ह्यात, परराज्यात होणाऱ्या चारा वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५३ टक्के पाऊस झाल्यामुळे सर्व नऊ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. यामुळे जनावरांना चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आदेश काढण्यात आले आहे. हा आदेश ३० जून २०१९ या कालावधीपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीच्या पेपरमध्ये चुकीचे प्रश्न

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. गारखेडा परिसरातील विद्याधन महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी एम. ए. (इंग्रजी) विषयाचा पेपर होता. या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील दोन प्रश्न विचारण्यात आले. यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे परीक्षा प्रक्रिया थांबवण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी माहिती घेऊन अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना पाठवले. ऐनवेळी दोन प्रश्न बदलण्यात आले. त्यामुळे दुपारी दोन वाजता सुरू होणारा पेपर तीन वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची विद्यापीठ प्रशासनाने माहिती घेतली. पदवी परीक्षेतही वाणिज्य विषयांच्या पेपरमध्ये सलग दोन दिवस चुका झाल्या होत्या. पदव्युत्तर परीक्षेतही हा प्रकार घडल्यामुळे प्रश्नपत्रिका निर्मितीची प्रक्रिया वादात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीदार राजकारण तापले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. मुळा धरणातील पाणी शुक्रवारी सायंकाळी जायकवाडीत पोचले. नांदूर मधमेश्वर आणि ओझर बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला, मात्र गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय रखडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करून अधिकाऱ्यांनी पाणी रोखल्याचा वाद उभा राहिला आहे. भाजपच्या आमदार देवयायी फरांदे यांनी पाणी थांबवण्याचे पत्र दिल्यामुळे मराठवाड्यातील भाजपच्या आमदारांची अडचण झाली आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. मुळा धरणातून सर्वाधिक १२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी नेवासा येथे पाणी पोचले. गोदापात्रात सायंकाळी पाणी पोचल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. नांदूर मधमेश्वर व ओझर बंधाऱ्यांतून सकाळी पाणी सोडण्यात आले. निळवंडे, मुळा, दारणा आणि मुकणे धरणातून विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून गुरुवारी सायंकाळी पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी थांबवण्याचे पत्र दिले होते. यासंदर्भाने पाण्याची तूट लक्षात घेऊन पाणी थांबवल्याचे परिपत्रक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासनाने काढले. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पाण्याच्या वादाबाबत मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि पाटबंधारे महामंडळाने कोणताही खुलासा केला नाही. हा राजकीय खेळ कुणाच्या आदेशावरून खेळला गेला, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पाणीप्रश्नावर भांडणाऱ्या भाजपच्या मराठवाड्यातील आमदारांनीही मौन धारण केले आहे. गंगापूर व पालखेड धरणाच्या पाण्याचा वाद जोर धरण्याची शक्यता आहे.

अन्यथा कारवाई करा

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या १९ सप्टेंबर २०१४च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे ऊर्ध्व धरणातून पैठण धरणासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही ३१ ऑक्टोबरपर्यंत करणे आवश्यक आहे. अन्यता, अधिनियम २००५मधील कलम क्रमांक २६ नुसार कार्यवाही होऊ शकते. याबाबत गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने खुलासा केलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून अधिकाऱ्यांनी पाणी थांबवल्यामुळे मराठवाड्यात संताप वाढला आहे.

धरणनिहाय विसर्ग

नांदूर मधमेश्वर : ११ हजार १९२

निळवंडे : सात हजार ९९०

ओझर बंधारा : सात हजार ६४९

मुळा : १२ हजार

दारणा : १० हजार ३४३

मुकणे : एक हजार

(विसर्ग क्युसेकमध्ये)

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आहेत. कॅबिनेटनेही तसाच निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. पाणी अडवणारे लोक न्यायालय आणि सरकारपेक्षा मोठे नाहीत. पाणी अडवले तरी मराठवाड्याला दोन दिवसात पाणी मिळेल.

- बबनराव लोणीकर, पाणीपुरवठामंत्री

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दरवर्षी पाणी सोडण्याचा नियम केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. पाणी सोडण्याबाबत बैठका सुरू असताना कुणी आक्षेप घेतला नाही. पाणी सोडताच आक्षेप घेऊन पाणी अडवणे योग्य नाही. याबाबत सरकार आणि प्रशासन खुलासा करीत नाही, हे दुर्दैव आहे.

- प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ कोटी भारतीय मनोविकारांनी ग्रस्त; ७५ टक्के उपचारांविनाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१३० कोटींपेक्षा जास्त जनसंख्या असलेल्या भारतामध्ये केवळ पाच हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत आणि १५ कोटी भारतीय निरनिराळ्या मनोविकारांनी ग्रस्त असताना त्यातील तब्बल ७५ टक्के भारतीयांना उपचार मिळत नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळ‍े मनोविकारतज्ज्ञांची संख्या वाढण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न व्हायला पाहिजेत, असा सूर मनोविकारतज्ज्ञांच्या दोन दिवसीय परिषदेत तज्ज्ञांमधून उमटला.

इंडियन सायकियाट्रिस्ट सोसायटीची उपशाखा असलेली 'यंग सायकियाट्रिस्ट' व एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय परिषदेला एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात शुक्रवारी (२ नोव्हेंबर) सुरवात झाली. ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. एम. एस. व्ही. के. राजू, डॉ. अजित भिडे, डॉ. पी. एम. जाधव, डॉ. मुर्गेश वैष्णव, डॉ. ओ. पी. सिंग, डॉ. राजेश बोरा, डॉ. अरुण मारवाले, डॉ. मनस्वी गौतम, डॉ. शिव गौतम आदींच्या उपस्थितीत परिषदेचे उद्‌घाटन झाले.

या प्रसंगी ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. राजू म्हणाले, २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशामध्ये १५ कोटी व्यक्तींना विविध मानसिक आजारांनी ग्रासले आहे. मात्र तरीही ७५ टक्के व्यक्तींना योग्य व नेमके उपाचार मिळत नाहीत. मानसोपचारतज्ज्ञांची संख्या अजूनही अत्यल्प कमी असल्यामुळेच ही स्थिती देशावर ओढवत असल्याचे मत डॉ. राजू यांनी नोंदविले. जोपर्यंत मनोविकारतज्ज्ञांची संख्या वाढत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेचा विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या वेळी डॉ. निना सावंत यांनी मानसिक आरोग्य व लैंगिक समस्या यांचा संबंध विषद करीत या संदर्भातील समस्यांकडे लक्ष वेधले, तर परस्पर संवाद संपल्याने नवीन पिढी व्यसनांच्या आहारी गेल्याबद्दल डॉ. भिडे यांनी चिंता व्यक्त केली. या परिषदेत डॉ. माणिक भिसे, डॉ. गीतांजली देशमुख, डॉ. निकुंज गोकाणी, डॉ. गौरव मोरांबीकर, डॉ. आशिष मोहिदे, डॉ. मोनाली देशपांडे यांनी सहभाग नोंदविला.

\Bसर्वांत कमी तज्ज्ञ भारतात

\Bजगभरामध्ये सर्वांत कमी मनोविकारतज्ज्ञ भारतामध्ये उपलब्ध आहेत. ७ कोटींची जनसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये ११ हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत, तर ३० कोटी जनसंख्या असलेल्या अमेरिकेमध्ये ५० हजार तज्ज्ञ आहे. मात्र तब्बल १३० ते १३५ कोटींच्या भारतामध्ये केवळ ५ हजार मनोविकारतज्ज्ञ असल्याचेही परिषदेत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजनेत नागरिकांचा हस्तक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठा योजनेत नागरिक हस्तक्षेप करतात, लाइनमनला व्हॉल्व्ह बंद करू दिला जात नाही, असा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला. त्यांच्या आरोपामुळे स्थायी समितीचे सदस्य व्यथीत झाले.

नगरसेविका शेख नर्गीस यांनी नेहरूनगर - कटकटगेट वॉर्डाचा पाणी प्रश्न मांडला. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. कमी दाबाने पाणी येते असे त्या म्हणाल्या. यासंदर्भात कोल्हे यांना खुलासा करण्यास सभापती रेणुकादास वैद्य यांनी सांगितले. कोल्हे म्हणाले, जे सप्लाय एक तास असतात ते दीडतास चालवले जातात. लाइनमनला व्हॉल्व्ह बंद करू दिला जात नाही. पाणीपुरवठ्यात हस्तक्षेप केला जातो. हस्तक्षेप बंद केला तर पाणी पुरवठा सुरळीत होईल. कोल्हे यांच्या या विधानावर नगरसेवक गजानन बारवाल यांनी आक्षेप घेतला. कोल्हे यांचे म्हणणे चुकीचे आहे. नियोजनाचा अभाव आहे. अधिकाऱ्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर अंकुश नाही, असा आरोप त्यांनी केला. सत्यभामा शिंदे यांनी त्यांच्या वॉर्डातील पाणी प्रश्न मांडला. त्या म्हणाल्या, माझ्या वॉर्डात सातव्या दिवशी पाणी आलेले नाही. नागरिक त्रस्त आहेत.

\Bपोलिसात तक्रार द्या

\Bसभापती राजू वैद्य यांनी पाणीपुरवठ्याबद्दल कोल्हे यांना आदेश देताना सांगितले की, हस्तक्षेप होतो अशी उत्तरे देऊ नका. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसात तक्रार देवून कारवाई करा. पाणीपुरवठा विभागाला योग्य नियोजन करता येत नाही का, असा सवाल त्यांनी केला. योग्य प्रकारे नियोजन करा, सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत होऊ देऊ नका, असे आदेशही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’ला विचारून बिले काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेखा विभागाने अठरा कोटींची बिले वाटल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेनंतर शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत देखील निघाला. यापुढे स्थायी समितीला विचारल्याशिवाय बिले काढू नका, अन्यथा तुमचे अधिकार गोठवले जातील, असा इशारा सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी मुख्यलेखाधिकारी सुहास केंद्रे यांना दिला.

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी झाली. बैठकीत नगरसेवक गजानन बारवाल, रुपचंद वाघमारे, शेख नर्गीस यांनी लेखा विभागाकडून दिलेल्या अठरा कोटींच्या बिलांचा मुद्दा उपस्थित केला. वाघमारे म्हणाले, माझ्या वॉर्डात काम केलेल्या कंत्राटदाराचे बिल दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचे बिल न काढता अन्य कंत्राटदारांची बिले काढली. कोणत्या निकषाच्या आधारे बिल काढण्यात आले याचा खुलासा करा, असे सभापतींनी मुख्यलेखाधिकारी केंद्रे यांना सांगितले. केंद्रे यांनी निकष सांगितले. पाणीपुरवठा, विद्युत आणि रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या पेमेंटला प्राधान्य दिले असे ते म्हणाले. काढलेल्या बिलांचा तपशील देखील त्यांनी सादर केला. पाणीपुरवठ्याचे दीड कोटी रुपये, रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे तीन कोटी ७२ लाख, विद्युत विभागाचे तीन कोटी एक लाख, जनरल बी - एक चे दोन कोटी ५७ रुपये, डीपी रस्त्यांचे सात कोटी ५५ लाख रुपयांचे पेमेंट केले असे केंद्रे यांनी सांगितले. प्राधान्यक्रमानुसार ही बिले देण्यात आल्याचे लक्षात येत नाही. यापुढे स्थायी समितीला विचारल्याशिवाय कोणतेही बिल देऊ नका, असे आदेश सभापतींनी केंद्रे यांना दिले. स्थायी समितीला न विचारता बिले दिली तर तुमचे आर्थिक अधिकार गोठवले जातील असे ते केंद्रेंना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यापासून गॅस; तीन निविदा प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी महापालिकेकडे तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. कांचनवाडी येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हर्सूलसाठी दोनच निविदा आल्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.

कांचनवाडी व हर्सूल येथे कचऱ्यापासून बायोमिथेनायझेशनचा प्लांट उभारण्याचे पालिकेने ठरविले आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत बॅन्को कन्स्ट्रक्शन प्रा. लि., रुद्राणी कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि जैन अँड राय कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी निविदा भरल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बॅन्को कंपनीची निविदा सर्वात कमी दराची आहे. प्रशासनाशी वाटाघाटी झाल्यानंतर या निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला जाणार आहे. हर्सूल येथे खुल्या तंत्रज्ञानाच्या आधारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी हॅक्युपी सिस्टीम लिमिटेड आणि मायोवेसल्स अँड मशीन्स प्रा. लिमिटेड या दोन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएमएस आल्याने ‘स्थायी’ बैठक तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका ज्येष्ठ नगरसेवकाला 'एसएमएस' आला आणि स्थायी समितीची बैठक तहकूब झाली. तहकुबीनंतर चार तासात अनेक घटनाघडामोडी घडल्या. या घडामोडींनी गुरुवारीच वेग घेतला होता.

शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून रस्त्यांची कामे करण्यासाठीच्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी केले होते. नेहमी स्थायी समितीची बैठक सकाळी साडेअकरा वाजता होत असते. आज मात्र सभापतींनी सकाळी नऊ वाजताच बैठकीचे आयोजन केले, परंतु बैठक दहा वाजता सुरू झाली. पाणीपुरवठ्यासह अन्य विषयांवर सदस्यांनी चर्चा केली. त्यानंतर गजानन बारवाल यांनी रस्त्यांच्या निविदांच्या संदर्भात हायकोर्टाने काय आदेश दिले आहेत याची माहिती द्या, अशी मागणी केली. यावेळी सभागृहात विधीसल्लागार उपस्थित नव्हत्या. उपायुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी देखील उपस्थित नव्हते, ते कोर्टात गेले होते. दोन्हीही अधिकारी बैठकीला नसल्याचे कारण सांगून सभापतींनी स्थायी समितीची बैठक दुपारी साडेचारपर्यंत तहकुब केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तहकुबीमागे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचे मूळ कारण नव्हते. स्थायी समितीमधील एका ज्येष्ठ सदस्याला 'एसएमएस' आला, त्यांनी तो 'संबंधितांना' दाखवला आणि सभापतींनी बैठक तहकूब केली. 'अर्थपूर्ण' चर्चेला पूर्णविराम मिळत नव्हता. त्यामुळे सर्वच संबंधितांची तगमग सुरू होती. गुरुवारी याच संदर्भात रेल्वेस्टेशन भागातील एका बंगल्यात बैठकांचे पर्व सुरू होते. पाणीपुरवठा सारख्या महत्वाच्या विषयावरील सर्वसाधारण सभेत न थांबता काही पदाधिकारी व नगरसेवकांनी बैठकांच्या पर्वात हजेरी लावली. महापालिकेच्या कारभारावर अंकुश असलेल्या नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

\B...अन् निविदांना मंजुरी

\Bशुक्रवारी स्थायी समितीची बैठक तहकूब झाल्यावर देखील अर्थपूर्ण बैठकांचे पर्व सुरूच होते. दरम्यान स्थायी समितीच्या त्या ज्येष्ठ सदस्याला आलेल्या 'एसएमएस'ची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली. 'एसएमएस' नंतर घटनाघडामोडी थंडावल्या आणि स्थायी समितीने शंभर कोटींच्या रस्त्यांच्या निविदांना मंजुरी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’ घोटाळ्याची चौकशी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या नगररचना विभागात झालेल्या टीडीआर (विकास हक्क हस्तांतरण) घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाचे पथक शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. तब्बल दोन तास पथकाने चौकशी केली व काही महत्वाच्या कागदपत्रांची मागणी केली. महाराष्ट्र टाइम्सने २०१६मध्ये हा घोटाळा उघड केला होता. यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाली. शासनाने नगररचना विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार ही चौकशी करण्यात येत आहे.

पालिकेच्या नगररचना विभागाने २२८ प्रकरणात 'टीडीआर' मंजूर केले आणि संबंधितांना त्याचे वाटप केले. मंजूर केलेल्या 'टीडीआर'पैकी काही 'टीडीआर' बोगस असल्याचे व काही 'टीडीआर' प्रकरणात 'डबलगेम' झाल्याचे 'मटा'ने उघडकीस आणले. त्यानंतर 'एमआयएम' आमदार इम्तियाज जलील यांनी या घोटाळ्याबद्दल विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शासनाने 'टीडीआर' घोटाळ्याची नगररचना विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी केली जाईल व त्याचा अहवाल विधिमंडळात सादर केला जाईल असे आश्वासन दिले. गेल्या एक वर्षात चौकशीत काहीच प्रगती झाली नाही. चौकशीसाठी उपसंचालकांनी पालिकेच्या नगररचना विभागातून 'टीडीआर'च्या फाइल आणि रजिस्टर मागवून घेतले. मात्र, चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही. चौकशी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी उपसंचालक नरेश कावळे महापालिकेत दाखल झाले. नगररचना विभागात सहाय्यक संचालकांच्या दालनात बसून त्यांनी दोन तास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नकाशे आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. सोमवारपर्यंत ही माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर, उपअभियंता ए. बी. देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते.

\Bमाहितीच मिळत नाही

\B'टीडीआर' प्रकरणांच्या संदर्भात महापालिकेकडून माहितीच मिळत नाही. 'टीडीआर'च्या फाइल आणि रजिस्टर त्यांनी दिले, पण अन्य कागदपत्र - नकाशे दिले नाहीत. त्यासाठी मी महापालिकेत आलो होतो. माहिती न मिळाल्यामुळे चौकशी अहवाल तयार करता आला नाही. सोमवारपर्यंत माहिती उपलब्ध करून देतो असे अधिकाऱ्यांनी महापौरांच्या समक्ष सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. माहिती मिळाली तर हिवाळी अधिवेशनात चौकशी अहवाल सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उपसंचालक नरेश कावळे यांनी दिली.

\Bमहापौरांची धावाधाव

\B'टीडीआर' प्रकरणांच्या चौकशीसाठी उपसंचालक आले आहेत याची माहिती मिळाल्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सभागृहनेता विकास जैन यांच्यासह नगररचना विभागात धाव घेतली. सुमारे अर्धा - पाऊणतास ते या विभागात होते. त्यांनी कावळे यांचीही भेट घेतली. महापौर आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आले होते का, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या दोन वर्षांपासून भूलथापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे काही सांगू नको. दोन वर्षांपासून नसत्या भूलथापा दिल्या जात आहेत. तुमचा विमान प्रवास होणार नाही, असे आई म्हणाली. कारण दोन वर्षांपासून विमान प्रवासाची नुसती आश्वासनेच मिळत होती, असा अनुभव विमान प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्याने महापौरांसमोर सांगितला आणि सारेच थक्क झाले.

पालिका शाळेतील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून विमानाने दिल्लीची सहल घडविण्यात आली. या विद्यार्थ्यांचे शुक्रवारी सकाळी औरंगाबादच्या विमानतळावर आगमन झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सकाळी साडेसहा वाजता विमानतळावर जावून त्यांचे स्वागत केले. पालिकेच्या चिकलठाणा शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र सोळुंके यांनीही विद्यार्थी व गावातील नागरिकांसह ढोल ताशांच्या गजरात या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विमान प्रवास करून आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना दुपारी महापौरांनी आपल्या दालनात बोलावले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाची सफर घडविण्याचे २०१६ वर्षी ठरविण्यात आले होते, पण सहलीची तारीख ठरत नव्हती. दोन - तीन वेळा तारीख ठरली, पण ती रद्द झाली. तीन दिवसांपूर्वी जेव्हा विमानाने दिल्लीला जाण्याचे निश्चित झाले तेव्हा अजीम शहा या विद्यार्थ्याने मोठ्या आनंदाने ही बातमी आपल्या आईला सांगितली. तेव्हा आई म्हणाली, महापालिकेचे काही सांगू नको. दोन वर्षांपासून नुसत्या भूलथापा दिल्या जात आहेत. आईबद्दलचा हा अनुभव त्याने सांगितल्यावर महापौर देखील थक्क झाले. आता दरवर्षी गुणवंतांच्या विमान सहलीचे आयोजन करा, त्या त्या वर्षीच सहल काढा, अशी सूचना त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली.

\Bखूप मज्जा आली...

\Bएक विद्यार्थिनी म्हणाली 'सब्र का फल मिठा होता है' असे आमच्या बाईंनी शिकवले. ते आता खरे झाले. विमानातून जाताना खूप मज्जा आली. भीती वाटली नाही. आई - वडिलांसाठी आग्र्याचा पेठा, मथुरेचा पेढा आणि श्रीकृष्णाची मूर्ती आणल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भावंडांसाठी खेळणी आणल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लबने ब्लेजर दिले आहे. ब्लेजर प्रथमच घातले, ते घातल्यावर आपण कोणीतरी विशेष आहोत असे वाटू लागले, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images