Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विधानसभा अध्यक्षांच्या घरापुढे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसींच्या) आरक्षण पूर्ववत ठेवा या मागणीसाठी गुरुवारी (८ ऑगस्ट) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भरपावसात अर्धनग्न होऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी बागडे यांना भेटून निवेदन देण्यात आले.

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक संख्या असूनही त्यांना २७ टक्के आरक्षण दिलेले आहे. शासनाने नुकताच अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसींच्या)आरक्षणात कपात केली आहे, हे अतिशय निषेधार्थ असल्याचे म्हणत यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारा अध्यादेश त्वरित रद्द करून व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कमी होणार नाही यासाठी न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या वतीने भक्कमपणे बाजू मांडावी, असे बागडे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अर्धनग्न आंदोलनात एल. एम. पवार, प्रा. विजय महाजन, निशांत पवार, गजानन सोनवणे, संदीप घोडके, चंद्रकांत पेहरकर, विलास ढंगारे, प्रसन्ना राऊत, योगेश हेकाडे, विनायक पारशर, साईनाथ करवंदे, शरद रावते, प्रभूशेठ जाधव, बाळासाहेब शिंदे, पुंडलिक गायकवाड, सुनील धाडगे, गोपाल भड, देविदास सोनवणे, सुनील कातबाने, अजय भालेकर, बाळासाहेब सोनवणे, अर्जुन गाडेकर, विजय जाधव, कृष्णा गाडेकर, विलास गाडेकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छंदामुळे आव्हानांशी झगडण्याची ताकद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जगात काहीही अशक्य नाही. फक्त आव्हाने स्वीकारण्यास सदैव तयार रहा. आव्हानांना समोर जाणे आपल्याला मजबूत करते आणि आत्मविश्वास देते. सोबत छंद जोपासा, कारण छंदामुळेच आव्हानांशी झगडण्याची ताकद येते,' असे आवाहन गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी केले. ते देवगिरी महाविद्यालयात मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित 'रेअर शेअर'मध्ये बोलत होते.

सिंघल यांनी या कार्यक्रमात आपली वाटचाल सांगितली. ते म्हणाले, 'पोलिस विभागात सेवा बजावताना तुम्हाला वेगवेगळी पार्श्वभूमी, समुदाय आणि परिस्थितीशी सामना करावा लागतो. येथे बरीच आव्हाने व संधी आहेत. माझ्या सेवेत मी नाशिक, कुंभमेळा, संयुक्त राष्ट्र, नांदेडमधील गुरुदा गद्दी उत्सव आणि दक्षिण-मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र, नागपूर येथे सेवा बजावली. मला विविध परिस्थितींचा सामना करावा लागला. प्रत्येक परिस्थिती वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली. तेथे अनेक आव्हाने व अडचणी आल्या, परंतु माझ्या छंदांमुळे मला प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास मदत झाली. मला फोटोग्राफी, योग, धावणे, पोहणे आणि सायकलिंगसारखे विविध छंद आहेत. हे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. त्यामुळे आपणही छंद विकसित करा. मग तो कोण्यातही प्रकारचा छंद असो. छंद आपल्याला सुखी आयुष्य जगण्यास शिकवते आणि इतकेच नाही तर, छंद आम्हाला सक्रिय राहण्यासही मदत करतात,' असे सिंघल म्हणाले. कार्यक्रमाला उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

माझ्यासाठी छंद स्ट्रेस बस्टर म्हणूनच काम करतात. ते ताण-तणाव नाहीसा करतात. खरेच छंद आपल्याला सुखी आयुष्य जगण्यास शिकतात. त्यामुळे तुम्हाला आवडतील ते छंद विकसित करा. आनंदाने जगा.

- रवींद्र सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधी दुकान फोडले; परप्रांतीयांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुण्याहून भाड्याने घेतलेल्या कारने येऊन गोमटेश मार्केटमधील औषधी दुकान फोडल्याप्रकरणात जितेंद्रकुमार मांगीलाल व सुजाराम उर्फ सुजा पुनवाराम या परप्रांतीय आरोपींना हॉटेलातून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना मंगळवारपर्यंत (१३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) दिले.

या प्रकरणी अमोल रमेश झंवर (२६, रा. आकाशवाणी समोर, व्यंकटेनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, झंवर यांचे गोमटेश मार्केटजवळ औषधालय आहे. ३१ जुलै रोजी रात्री झंवर यांनी दिवसभराच्या व्यवहाराचे ४९ हजार ५०० रुपये गल्यात ठेवून ते दुकान बंद करुन घरी गेले होते. संधी साधत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्यातील रक्कम चोरुन नेली होती. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी जितेंद्रकमुमार मांगीलाल (२३) व सुजाराम उर्फ सुजा पुनवाराम (२४, दोघे रा. राजस्थान) यांना बसस्थानक परिसरातील एक हॉटेलमधुन अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून चोरी केलेली रक्कम जप्त करणे, आरोपींच्या साथीदारांना अटक करणे बाकी असून गुन्ह्याचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी डॉक्टर कामावर रुजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवासी डॉक्‍टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप गुरुवारी (८ ऑगस्ट) सकाळी मागे घेण्यात आला. त्यामुळे घाटीतील निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळपासून कामावर रुजू झाले व बुधवारी विस्कळीत झालेली रुग्णसेवा गुरुवारी सुरळीत झाल्याचे घाटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंडा घातलेले ६० हजार पोलिसांनी दिले मिळवून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सायबर ठकाने ऑनलाइन लांबवलेली ५९ हजार ९६९ रुपयांची रक्कम ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्याने परत मिळवून दिली. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. गेल्या दीड वर्षात विविध ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात साडेएकोणीस लाखांची रक्कम सायबर ठाण्याने परत मिळवून दिली आहे.

अमोल प्रदीप पवार (रा. कनकुरी, ता. गंगापूर) या तरुणाला अज्ञात मोबाइलधारकाने बँकेतून बोलतेय म्हणूत कॉल केला. एटीएम कार्ड बंद होणार आहे. सुरू ठेवायचे असल्यास कार्डची माहिती द्या आणि त्यावर आलेला ओटीपी क्रमांक सांगा असे सांगितले. पवार यांनी विश्वास ठेवत ही माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातून ऑनलाइन तीन वेळा एकूण ५९ हजार ९६९ रुपये काढून घेतले. पवार यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर सेलच्या पथकाने सबंधित नोडल अधिकाऱ्याशी बोलत झालेला व्यवहार ब्लॉक करत गेलेली संपूर्ण रक्कम वाचवली. ही कारवाई सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अशोक घुगे, पीएसआय एम. एम. सय्यद, कैलस कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश मोईम, सविता जायभाय, योगेश तरमाळे, लखन पाचोळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड यांनी केली.

आपला एटीएम, क्रेडिट कार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही सांगू नका. कुठल्याही लिंक शेअर करू नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. असे प्रकार आढळल्यास सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

- मोक्षदा पाटील - पोलिस अधिक्षक, ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा विनयभंग; ज्येष्ठाला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाळाला दूध पाजणाऱ्या विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणारा ६२ वर्षीय सुषाभ सूर्यभान नागरे याला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) दिले.

या प्रकरणी २० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पीडित विवाहितेच्या नणंदेची प्रकृती ठिक नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व पीडितेची सासू नणंदेजवळ थांबली होती. १६ मार्च २०१८ रोजी रात्री साडेनऊला पीडितेचे पती व सासरे हेदेखील रुग्णालयात गेले होते. घरी कोणी नसल्याने बाळाला झोपवून विवाहिता गल्लीतील महिलांसोबत बाहेर गप्पा मारत बसली होती. रात्री ११ वाजेच्या सुमारास बाळ उठल्याने विवाहिता त्याला दूध पाजण्यासाठी घरात गेली. ही संधी साधत परिसरात राहणारा आरोपी सुभाष सूर्यभान नागरे हा विवाहितेच्या घरात घुसला व त्याने विवाहितेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. विवाहितेने आरडा-ओरडा केल्याने आरोपीने धूम ठोकली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात विवाहिता, शेजारी राहणाऱ्या दोन महिला व परिस्थीतीजन्य पुरावे महत्वाचे ठरले.

\Bदंडाची रक्कम पीडिता

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, तर कलम ३५४ व ३५४ (ब) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. तसेच दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून बागडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याची फसवणूक; पुण्याचा भामटा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील व्यापाऱ्याकडून चार एसी घेऊन त्याचे पैसे बँकेत जमा केल्याचा बनावट संदेश पाठवून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पुण्याचा भामटा सर्फराज अहेमद मन्सूर अली याला गुरुवारी (८ ऑगस्ट) अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (१३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

या प्रकरणी संजय रावसाहेब वरकड (४८, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची क्रांतीचौक परिसरात सुंगधा एअरकॉन अ‍ॅण्ड रेफ्रिजरेशन नावाची फर्म आहे. ३ मे रोजी फिर्यादी दुकानावर असताना त्याला आरोपी सर्फराज अहेमद मन्सूर अली (२९, रा. पुणे, मूळ रा. कर्नाटक) याने पाटील या नावाने फोन केला. आरोपीने फिर्यादीला पाच एसी मागितले. त्यानंतर आरोपीने पाचऐवजी चार एसीची मागणी केली. चार एसींचे एक लाख १६ हजार रुपये बँकेत पाठविल्याचा बनावट मॅसेज फिर्यादीला व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाठविला. खात्री करण्यासाठी फिर्यादीने दुकानातील एकाला बँकेत पाठविले. मात्र बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने त्याला माहिती मिळाली नाही. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला फोन करुन एसी ट्रव्हल्सने लातूर येथे पाठविण्याचे सांगत त्यांना पत्ता दिला. त्यानुसार फिर्यादीने एसी पाठविले. दुसऱ्या दिवशी फिर्यादीने बँकेत चौकशी केली असता पेमेंट जमा झाले नसल्याच्या स्पष्ट झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकान फोडणारी आंतरराज्य टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहने किरायाने घेत शहरात दुकान फोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या टोळीने इतर शहरात देखील अशाप्रकारे गुन्हे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोमटेश मार्केट येथील पशुसेवा औषधालय या दुकानाचे शटर एक ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपींनी तोडून ४९ हजारांची रक्कम पळवली होती. दुकानमालक अमोल झवर यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान दुकानाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. यामध्ये आरोपींनी आरईव्हीव्ही सिंबॉल असलेली कार गुन्ह्यात वापरल्याचे दिसले. पोलिसांनी इंटरनेटवर या सिंबॉलबाबत माहिती घेतली. यावेळी पुणे शहरातील आरईव्हीव्ही कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग कार किरायाने देत असल्याचे दिसून आले. या कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ही कार आकाश शर्मा नावाने बुक केल्याचे निष्पन्न झाले. कार बुकिंग करता दिलेल्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन घेतले असता हा मोबाइलधारक औरंगाबादमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शोध घेत संशयित आरोपी जितेंद्र कुमार मांगीलाल (वय २३) आणि सुजाराम पुनवाराम उर्फ सुजा (वय २४ दोघे रा. मालीयोका वास, मांडवला, जि. जालौर, राजस्थान) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई एपीआय राहुल सूर्यतळ, पीएसआय सोनटक्के, सुशीला खरात, नसीमखान, सय्यद सलीम, गोपाळ सोनवणे, राजेश फिरंगे, मिलिंद भंडारे, मंगेश मनोरे, राजेश चव्हाण, हनुमंत चाळणेवाड यांनी केली.

\Bगुन्हा करण्यासाठी आले आणि अडकले

\Bपथकाने शोध घेतला असता मोबाइलचे लोकेशन औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक दाखवण्यात आले. पोलिसांनी या परिसरातील सर्व लॉज आणि हॉटेल तपासले. एका लॉजमध्ये हे दोघे आढळून आले. त्यांनी पुणे येथून किरायाने दुचाकी आणली होती. या दुचाकीचा वापर करून शहरात ते गुन्हे करून पुन्हा पसार होणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिंदे कुटुंबाला मदत; आचारसंहितेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठा आरक्षणासाठी प्राणत्याग करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून आर्थिक मदत मिळण्यातील अडचणी कायम आहेत. धनादेश तयार आहे, पण विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तो देता येत नाही; आचारसंहिता संपल्यानंतर तो दिला जाणार आहे. काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथील पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून प्राणत्याग केला होता. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे दहा लाख रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले, तरी आर्थिक मदत दिली नाही. या बद्दल 'मटा' ने वाचा फोडल्यावर १८ जूनच्या पालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. शिंदे कुटुंबाला तत्काळ मदत दिली जाईल, असे महापौरांनी जाहीर केले, पण त्यानंतरही मदत

मिळाली नाही. काकासाहेब शिंदे हे महापालिका क्षेत्राबाहेरचे असल्याने मदत कशी करायची, आर्थिक तरतूद कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर महापौरांनी तोडगा काढला आणि सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या प्रस्तावाचा संदर्भ देत शिंदे कुटुंबाला मदत देण्यासाठी सर्वसाधारण सभेची हमी पालिका प्रशासन व शासनाला देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी वापराच्या वस्तू द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुरामुळे हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. घरे पाण्याखाली गेली असून दैनंदिन उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरात गरजेच्या वस्तू गोळा करण्यात येणार आहेत. येत्या दहा व अकरा ऑगस्टला प्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर, सांगलीसह व इतर पूरग्रस्त भागांत नागरिकांना विविध माध्यमातून मदत करण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि शिवाई उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे. सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना सामाजिक सभागृहात व मंगल कार्यालयात निवास, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक मदतीची गरज असून, औरंगाबाद जिल्ह्यातून दहा व ११ ऑगस्टला मोंढा नाका उड्डाणपूल व सिडको उड्डाणपुलाखाली पूरग्रस्त सेवा केंद्रात मदत स्वीकारली जाणार आहे. ११ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता मदत कोल्हापूर, सांगलीकडे पाठवली जाणार आहे. नागरिकांनी घरातील जुने, पण वापरण्यायोग्य कपडे, चादरी, स्वेटर, ताडपत्री यासह बिस्किट, चिवडा, राजगिरा लाडू किंवा आठ दिवस टिकणारे खाद्य पदार्थ द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक योगेश धामोरीकर, राहुल बनसोड, अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपाचा ९२ टक्के पेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाच्या ९२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, मकावरील अमेरिकन लष्करी अळी पाठोपाठ आता कापसावर मावा अळीचा प्रादूर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र सात लाख १८ हजार हेक्टर असून, यंदा सात लाख ३५ हजार ५८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख ७८ हजार ७८० हेक्टरवर (९२. २८ टक्के) पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. चार लाख ३७ हजार ८१६ सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापैकी आतापर्यंत तीन लाख ९७ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर (९०.७६ टक्के) कापसाचा पेरा झाला आहे. मकावर लष्करी अळीचे संकट असतानाही जिल्ह्यात एक लाख ८६ हजार १३५ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली. सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या तुलनेते हे प्रमाण १२१ टक्के एवढे आहे. भुईमुगाची पेरणी पाच हजार ७७१ हेक्टरवर (११५ टक्के), तीळ १३२ हेक्टरवर (२३ टक्के), सूर्यफुल पाच हेक्टरवर (२ टक्के) तर, सोयाबीन पिकांची पेरणी दहा हजार ६९१ हेक्टरवर झाली आहे. यासह ज्वारी ७५३ हेक्टर, बाजरी ३० हजार ९४८ (५९ टक्के), तूर पेरणी २८ हजार ५६८ हेक्टरवर तसेच उडीद चार हजार २६ आणि मुगाचा पेरा दहा हजार ७९२ हेक्टरवर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूरग्रस्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठात निधी संकलन केले. विद्यापीठात शनिवारी गरजेच्या वस्तू गोळा केल्यानंतर ही मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी मदत संकलन सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. फक्त अंगावरील कपड्यासह नागरिक सुरक्षितस्थळी पोहचले आहेत. जेवण, औषधी, कपडे यांची नितांत गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निधी गोळा केला. या उपक्रमाबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी माहिती जाणून घेतली. तसेच काही वस्तू देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन मदत करील, असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. विद्यापीठाच्या इतर विभागात शनिवारी निधी व वस्तू स्वीकारला जाणार आहे. जमा झालेला निधी व वस्तू जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे, असे अमोल दांडगे यांनी सांगितले. यावेळी दीपक बहीर, दीक्षा पवार, पूजा सोनवणे, पांडुरंग नखाते, साजिद शेख, भरत चव्हाण आदी उपस्थित होते.

दरम्यान, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी मदत संकलन केंद्र सुरू केले आहे. मराठा हॉटेल मध्यवर्ती बसस्थानकासमोर, मीना स्वस्त औषधी मेडीकल महेशनगर, सिडको एन ५ येथील श्री गजानन टी हाऊस, सिडको एन-नऊ आराध्य हॉस्पिटल, कस्तुरा क्लिनिक राहुलनगर येथे मदत स्वीकारली जाणार आहे, असे अक्षय पाटील यांनी कळवले आहे.

\Bशहरात आज संकलन\B

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरात शनिवारी व रविवारी गरजेच्या वस्तू संकलित केल्या जाणार आहेत. सिडको व मोंढा नाका उड्डाणपूल येथे निधी संकलन केंद्र राहणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तू, कपडे, स्वेटर, औषधी, खाद्य पदार्थ देण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड, शिवाई उद्योग समूहाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइटवर जाहिराती करून विद्यार्थ्यांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाची मान्यता नसताना वेबसाइटवर जाहिराती करीत विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन शैक्षणिक संस्थाविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि मॉर्डन टेक्निकल एज्युकेशन अशी या संस्थाची नावे आहेत. एप्रिल २०१८ ते मे २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी मानवी हक्क सरंक्षण जागृती समितीच्या उपाध्यक्षाने गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील डॉ. अभिषेक सुभाष हरिदास (वय ३६, रा. राहुल नगरजवळ, कर्वे पुतळा, कोथरुड) हे मानवी हक्क संरक्षण जागृती या सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. काही शैक्षणिक संस्थांकडून शिक्षण शिखर संस्थांची मान्यता न घेता विविध विषयातील पदवी-पदविका अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात असल्याची माहिती त्यांना इंटरनेटवरून मिळाली. त्यावरुन त्यांनी उच्च शिक्षण विभाग व तंत्र शिक्षण विभाग तसेच पोलिस दलाला माहिती दिली. अशातच त्यांना मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन संस्थेची इंटरनेटवर माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी अधिक माहिती घेतली. तेव्हा या संस्थेकडून संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध अभियांत्रिकी शाखेतील पदविका देत असल्याचे तसेच प्यॅरामेडिकल, अ‍ॅग्रीकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, हेल्थ यांच्याही पदविका दिल्या जात असल्याचे वेबसाइटवरून कळाले. त्याशिवाय हे अभ्यासक्रम शासन मान्य असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे डॉ. हरिदास यांनी शासन मान्य असलेल्या संस्थांच्या यादीत या संस्थेचे नाव तपासले. तेव्हा ही संस्था शासन मान्य नसल्याचे समजले. त्याची अधिक माहिती घेतली असता या संस्थेने अनेक शिक्षण संस्थांना स्वत:ची संलग्नता प्रदान केली आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन अभ्यासक्रमाच्या पदविका स्वत:च्या नावाने देत असल्याचेही वेबसाइटवरून कळाले. त्यामुळे या संस्थेविषयी डॉ. हरिदास यांना शंका आली. याबाबत त्यांनी तंत्रशिक्षण विभागाला देखील कळवले होते. याप्रकरणी त्यांनी सिटीचौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दोन्ही शैक्षणिक संस्थाच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संभाजी पवार तपास करीत आहेत.

\Bअसा केला प्रकार उघड

\Bडॉ. हरिदास यांनी याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी संस्थेच्या वेबसाइटवर नाव बदलून संपर्क साधला. त्यावेळी त्यांना प्रवेश सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तेथील महिलेने त्यांना स्वत:चा मोबाइल क्रमांक, माहिती पत्रक, प्रवेश फॉर्म, फीसबाबत माहिती देणारे पत्रक तसेच बँक खात्याचा क्रमांक कळवण्यासाठी ईमेल आयडी दिला. विविध कोर्सच्या फीची माहिती दिली. डॉ. हरिदास यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी थोडी फीस भरतो असे कळवले. यानंतर त्यांना ईमेलवर दहावी पासचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि फोटो आदी कागदपत्रे मागवण्यात आली. यानंतर २९ जुलै रोजी हरिदास यांनी न्यू मॉर्डन एज्युकेशनच्या बँक खात्यात पाचशे रुपये भरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांची तस्करी; दोघांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जनावरांची तस्करी करून विक्री करणाऱ्या दोघांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींनी सहा गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

वडोदबाजार हद्दीतील पीरबावडा, भवन, सोयगाव आदी ठिकाणावरून बकऱ्या चोरीस जाण्याचे प्रकार घडले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाला पडेगाव येथील काही संशयित आरोपींचा या गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीवरून पथकांची या संशयितांवर नजर होती. बुधवारी हे आरोपी बकऱ्या चोरी करण्यासाठी चिखली येथे गेल्याची माहिती पथकांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने फुलंब्री रोडवर सापळा रचला. संशयित वाहन आल्यानंतर त्याला अडवण्यात आले. यावेळी वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून त्यांना पकडले. वाहनातील संशयित आरोपी नासेर शब्बीर पठाण (वय २४) आणि सोहेल शेख मजहर (वय १९ रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) यांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. यावेळी आरोपींनी अनेक ठिकाणावरून बकऱ्या चोरून त्या विक्री केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय दुलत, गणेश मुळे, विठ्ठल राख, श्रीमंत भालेराव, सुनील शिराळे, धीरज जाधव, दीपेश नागझरे, गणेश गांगवे, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी केली.

\Bबकऱ्या चोरल्याची कबुली

\Bदोन्ही आरोपींनी चिखली येथून बकऱ्या चोरल्या होत्या. त्याची विक्री त्यांनी राजूर येथे केली. या विक्रीचे चाळीस हजार रुपये त्यांना मिळाले होते. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर वाहनांची झडती घेतली. यावेळी बकऱ्यांची विष्टा तसेच उग्र वास येत होता. अधिक चौकशीत त्यांनी नुकत्याच बकऱ्या चोरून विकल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइलचा सर्वाधिक धोका मुलांचे डाेळे, मेंदुला

$
0
0

औरंगाबाद :


मोबाइल फोनद्वारे बाहेर पडणारे रेडिएशन हे प्रौढांपेक्षा मुलांमध्ये तब्बल ६० टक्के जास्त शोषले जाते, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. हे रेडिएशन मुलांच्या मेंदू व नेत्र आरोग्यासाठी जास्त धोकादायक आहेत. हे लक्षात घेऊन मुलांना मोबाइल फोनपासून जास्तीत जास्त दूर ठेवा. महत्त्वाचे म्हणजे मोबाइलसह टीव्ही, लॅपटॉप, आयपॅड आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्क्रीन टाइम कमी करून मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे, असा सल्ला मुलांच्या नेत्र आरोग्य जनजागृती मासानिमित्त नेत्ररोगतज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.


ऑगस्ट महिना हा 'चिल्ड्रन्स आय हेल्थ अँड सेफ्टी मंथ' म्हणून भारतात पाळला जातो. यानिमित्ताने नेत्ररोगतज्ज्ञांनी सध्याच्या परिस्थितीमुळे मुलांच्या नेत्र आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अमित वांगीकर म्हणाले, फटाके तसेच मोबाईलचा अतिरेकी वापर हे मुलांमध्ये गंभीर नेत्रविकारांना आमंत्रण देणारे ठरत आहे. फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याची भीती असतेच. सध्या फटाक्यांचा वापर कमी-कमी होत आहे; परंतु मोबाइलचा आणि त्यातील गेम्सचा मुलांकडून अतिवापर होत आहे. मोबाइलमध्ये गेम्स खेळताना त्यांना वेळेचे भान राहात नाही, महत्त्वाचे म्हणजे अंधारात मोबाइलचा वापर हा जास्त त्रासदायक ठरतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मोबाइलमधून बाहेर पडणारे रेडिएशन हे कर्करोग वाढीस पूरक (कार्सिनोजेनिक) आहे. हे रेडिएशन प्रौढांपेक्षा मुलांमध्ये ६० टक्के जास्त शोषल्या जाते. त्याचवेळी रेडिएशनचा प्रतिकुल परिणाम हा मुलांच्या मेंदू तसेच नेत्रांवर सर्वाधिक होतो. त्यामुळेच मुलांच्या हातात मोबाइल देणे पालकांनी टाळले पाहिजे.

अलीकडे लपून-छपून 'पोर्न साईट' बघण्याचे प्रमाणही वाढले असून, त्याचे विचित्र सामाजिक परिणामही दिसून येत असल्याचे डॉ. वांगीकर म्हणाले. स्क्रीम टाईम वाढल्यामुळेच डोळ्यांमधील कोरडेपणा झपाट्याने वाढत आहे. अर्थात, कोरडेपणाची समस्या ही केवळ बालकांमध्येच नसून प्रौढांमध्येही सर्रास दिसून येत आहे. तसेच इतर कारणांसह वाढलेल्या स्क्रीन टाईममु‌ळे मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाणही आता सात ते आठ टक्क्यांवर गेले आहे, असे नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ. सुनील कसबेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरहरी महाराजांच्या जयघोषाने न्हाऊन निघाला जयंती सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभंगाचा निनाद, टाळांचा गजर अन् नरहरी महाराजांच्या जयघोषाने शुक्रवारी (९ ऑगस्ट) जयंती सोहळा न्हाऊन निघाला. सोनार समाजाचे आद्यदैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या जयंतीनिमित्त भर पावसात निघालेली पारंपरिक मिरवणूक लक्षवेधी ठरली.

जयंती सोहळ्यानिमित्त सकाळी लोटाकारंजा येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर पैठण गेट परिसरातून दुपारी बाराला मिरवणुकीस प्रारंभ झाला. राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते. नरहरी महाराजांच्या प्रतिमेसह फुलांनी सजविलेला रथ, पारंपरिक पेहराव व भगव्या फेट्यातील महिला-पुरुष, भजनी मंडळ आणि फुगड्या-पावलीचे नृत्य, चित्तथरारक कवायतींमुळे सोहळा चित्ताकर्षक ठरला. संस्थान गणपती मंदिरात महाआरतीने शोभायात्रेचा समारोप झाला. त्यानंतर भाविकांनी अग्रसेन भवन, सराफा रोड येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी सोनार पंचायत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन उदावंत (सावखेडकर), संजय सराफ, शशिकांत उदावंत, संदीप अहिरराव, संजय जोजारे, भास्करराव टेहरे, सुहास बार्शीकर, सुरेश टाक (हैदराबादकर), कमलाकर दहिवाळ, राजेंद्र मुंडलिक, अनिल प्रिंपीकर, श्याम अडाणे, चंद्रकांत जोजारे, भगवानराव शहाणे, दिगंबर नरहरी उदावंत सावखेडकर, संजय देवगिरीकर आदींनी परीश्रम घेतले. महिलांमध्ये शोभा मुंडलिक, जयश्री बुटे, विजया बार्शीकर, रेखा डहाळे, अनिता शहाणे, आशा सावखेडकर, छाया मुंडलिक आदींसह कारागीर व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोपर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी तसेच मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात दोषी नसलेल्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या दोन प्रमुख मागण्यासाठी इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते.

या धरणे आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहे. सुप्रीम कोर्टात सध्या प्रलंबित प्रकरणामध्ये जेष्ठ वकिलांची नियुक्ती करून मराठा आरक्षण म्हणजे एसईबीसी आरक्षण टिकवण्यासाठी गांभिर्याने नियोजन करावे, अॅट्रॉसिटी अॅक्ट तरतुदींचा त्रास थांबवावा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीामालास हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, जमिनी संपादित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास तात्काळ मदत देण्यात यावी, शासकीय पदोन्नतीत मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी तसेच एसईबीसीच्या वर्गातील टक्केवारीच्या प्रमाणात तात्काळ पदोन्नती देण्याबाबत आदेश देण्यात यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी संयुक्त कृती कार्यक्रम जाहीर करावा, मराठा समाज आणि महामानवांची बदनामी थांबवण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना दहा लाखांच्या मागणीसह कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीस घेण्याचे मान्य करण्यात आले होते. याची शीघ्र गतीने अमलंबजावणी करण्यात यावी, आरक्षण आंदोलनात दोषी नसलेल्या तरुण आणि कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. या धरणे आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, अभिजित देशमुख, विजय काकडे, रमेश गायकवाड, सतीश वेताळ, मनोज गायके, रेखा वहाटूळे, प्रदिप घरदे, शिवाजी जगताप यांच्यासह इतरांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त वीज कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यासाठी धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र वीज निवृत्त जेष्ठ नागरिक संघातर्फे शुक्रवारी, क्रांतीदिनी महावितरणाच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. पेंन्शन आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांतर्गत येणाऱ्या महापारेषण, महानिर्मिती, महावितरण या कंपनीतील साडेनऊ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचा वीज निवृत्त जेष्ठ नागरिक संघ आहे. यामध्ये अधिकारी, अभियंते, कर्मचारी आदींचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या उपदानाची रक्कम. विना वितरीत भविष्य निर्वाह निधी रक्कम, रजेचा मोबदला, ईपीएस-९५, निवृत्ती वेतन प्रकरणे, वेतन विसंगती प्रकरणे, गाळे भाडे रक्कम, अनाठायी ठोठावलेल्या दंडाची रक्कम परत मिळणे, मेडिक्लेम आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वीज कर्मचाऱ्यांना पेंन्शन आदी मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सतीश न्यायधीश, प्रकाश अहिरे, भगीरथ पाडळकर, अरुण सातारकर, सुभाष जोशी, मुथ्थया अण्णा यांच्यासह आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगारासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शिक्षकांना अनुदान देण्याची घोषणा विधान परिषदेच्या सभागृहात शासनाने २८ नोव्हेंबर रोजी केली, पण त्याची अंमलबजावणी अद्याप केली नाही. त्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पाच ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. नऊ ऑगस्टपासून शालेय कामकाज बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. नऊ ऑगस्टपर्यंत शासन निर्णय जारी करण्यात आला नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार जालना-अंबड रस्त्यावर विभागीय अध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी, प्रा. गणेश आघाव, प्रा. भगवान काळे, रमेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केज येथे शिवाजी चौकात राजेश गीते, राहुल कांबळे, भाऊराव खिचडे यांच्या नेतृत्वाखाली 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. परभणी येथे शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व धोंडीराम तोंडारे, विजय काळे, प्रा. देवकर यांनी केले. हिंगोली येथेही मोर्चा काढण्यात आला. हिंगोली येथील मोर्चात सुमारे एक हजार विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. वसमत येथे शिक्षक बेमुदत उपोषण सुरु केले आहे. प्रा. गुंडाळे, बालाजी जेजुरकर, सचिन कोल्हे, संदीप गुंडाळे, प्रकाश साळवे, मानकेश्वर गलांडे यांच्यासह अन्य शिक्षक उपोषणाला बसले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images