Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डाळिंबाला दुष्काळाच्या झळा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई वाढल्यामुळे फळबागा संकटात आहेत. औरंगाबाद तालुक्यात अडीच हजार एकरावर डाळिंबाच्या बागा जगवण्यासाठी मल्चिंगचा वापर सुरू झाला आहे. पैठण तालुक्यात मोसंबीच्या बागांवर दुष्काळाची कुऱ्हाड पडली आहे. दुष्काळाच्या तडाख्यात फळबागा वाळल्यामुळे कृषी क्षेत्राचे अर्थकारण मोडीत निघाले आहे.

तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या फळबागा जळाल्यामुळे शेतकरी कमी पाण्यातील डाळिंबाकडे वळले आहेत. मागील दोन वर्षात जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. यावर्षी कमी पावसामुळे डाळिब बागा संकटात आहेत. सध्या शेततळ्याच्या पाण्यावर बागा तग धरुन आहेत. मल्चिंग आणि ठिबक सिंचनचा वापरही सुरू झाला आहे; मात्र पुढील चार महिने शेततळ्याचे पाणी पुरणार नसल्यामुळे अनेकांनी शेजारील तालुक्यातून टँकरने पाणी आणण्याची तयारी दाखवली आहे. औरंगाबाद तालुक्यात ९७७ हेक्टरवर डाळींब फळबागा आहेत. मराठवाड्यात हा तालुका डाळिंबाच्या क्षेत्रात अव्वल आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असला तरी यावर्षी कमी पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. करमाड, दुधड, भांबर्डा, औरंगपूर या परिसरात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डाळिंबाचा बहार धरता आला नाही. शिवाय झाडे वाळणार असल्यामुळे अनेकांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची धडपड सुरू केली आहे. झाडाच्या बुंध्याशी भुसा, वाळलेली पाने टाकून नैसर्गिक पद्धतीने मल्चिंग करावे किंवा प्लास्टिक आच्छादन करावे असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या आहेत; मात्र बागा टिकणार का असा प्रश्न आहे. राज्य सरकारने फळबागधारकांसाठी अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येईल. तर एप्रिल महिन्यात अनुदान मिळणार आहे. या विलंबामुळे अनुदान त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वैजापूर तालुक्यात ६१२ आणि पैठण तालुक्यात ५६३ हेक्टर डाळींबाचे क्षेत्र आहे. यावर्षी दिल्ली, नाशिक, सूरत आणि गुवाहाटीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी डाळींब विक्री केली. आता या फळबागा जगवण्यासाठी धडपड सुरू आहे.

पाणी टंचाई वाढली

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे फळबागा संकटात आहेत. मागील तीन वर्षांपासून शेततळ्यांवर बागा जगवल्या आहेत. यंदा शेततळीसुद्धा कोरडी असल्यामुळे फळबाग जगवण्याचे संकट उभे राहिले आहे. पाण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


वेरूळ लेणीतील पर्यटकांना मधमाशा, माकडांचा त्रास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

वेरूळ येथील कोरीव शिल्पकला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. परंतु, लेण्यातील आग्या मोहळाच्या मधमाशा व माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे पर्यटक हैराण झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यामुळे पुरातत्व खात्याचे सहा कर्मचारी व आंध्रप्रदेशातील ५४ पर्यटक शनिवारी जखमी झाले.

वेरूळ लेणीच्या क़डा उंच असून त्यावर अनेक ठिकाणी आग्या मोहळ बसले आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने येथील मधमाशा पाणी पिण्यासाठी नेहमी उठतात. त्यामुळे घाबरलेले पर्यटक मधमाशांना हाकलण्यासाठी रुमाल फेकतात. त्यामुळे मधमाशा हल्ला करतात. सध्या लेणी क्रमांक ९, १०, १६, ३२ मध्ये आग्या मोहळ बसले आहे. लेणी क्रमांक ३२मधील शनिवारी कर्मचारी व पर्यटक जखमी झाले.

लेणी परिसरात माकडांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडे पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळ काढतात. खाद्यपदार्थ घेऊन दिला नाही, तर पर्यटकांना चावा घेतात. वन विभागाने मधमाशा व माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी काळजी घेण्यात येत आहे. लेणी क्रमांक ९, १०, १६, ३२मधील आग्या मोहळ धूर करून काढून टाकण्यात आले आहे. दर मंगळवारी आग्या मोहळासाठी मोहीम राबविली जाईल.

- राजेश वाकलेकर, संवर्धन सहायक, एएसआय

निम्मे शेतकरी मदतीपासून वंचित

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील निम्म्या शेतकऱ्यांना अद्याप खरीप हंगामातील सरकारी मदत मिळाली नाही. या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिला नसल्याचा दावा तहसील कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले नाही. राज्य शासनातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाकरीता पहिल्या टप्प्यात ९ कोटी १७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम वाटप करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गावनिहाय याद्या तयार केल्या आहेत. सद्यस्थितीत १८२६१ अल्पभूधारक शेतकरी व २३५१ बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. सद्यस्थितीत २२,९०६ अल्पभूधारक व ३२८२ बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

तहसील प्रशासनाला रक्कम मिळाल्यानंतर याद्या तयार करून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकेकडे पाठवल्या आहेत. पंरु, काही लाभार्थ्यांचे बँकेत खाते नाही, काही क्रमांक चूक निघाले यामुळे रक्कम जमा होऊ शकली नाही. शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे खाते क्रमांक द्यावा, असे आवाहन तहसीलदार किशोर देशमुख यांनी केले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी

तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ही रक्कम २० गावांत दिली जाणार आहे. त्या गावांची नावे पुढीलप्रमाणेः लहान्याचीवाड़ी, डोंगरगाव शिव, बिल्डा, चिंचोली बुद्रुक, साताळा बुद्रुक, जळगाव मेटे, बोरगाव अर्ज, भोयगाव, दरेगाव दरी, धामणगाव, सुलतानवाडी, नायगव्हाण, लालवण, हिवरा, एकघर पाडळी, लोहगड नांद्रा, बाभुळगाव तरटे, बोधेगाव बुद्रुक, जानेफळ, बोधेगाव खुर्द

संयुक्त खातेधारक

संयुक्त खातेधारकांनी महा-ई-सेवा केंद्रामार्फत संमतीपत्र घेऊन संबंधित तलाठ्याकडे बॅंक खाते क्रमांक व संमती पत्र द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयुक्तालयाच्या निर्मितीला स्थगिती

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्यात दुसरे महसूल आयुक्तालय नांदेडला करण्याच्या अधिसुचनेला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेली स्थगिती ही लातूर आयुक्तालय निर्मिती कृती समितीने आर्धी लढाई जिकंल्यासारखीच आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री खडसे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, असे कृती समितीचे नेते अॅड. मनोहरराव गोमारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लातूर कृती समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शेकापचे उदय गवारे, भाजपचे भारत साबदे, महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील, बसवंत उबाळे यांची उपस्थिती होती. यावेळी अॅड मनोहर गोमारे म्हणाले, 'दोन फेब्रुवारीपर्यंत उस्मानाबाद, लातूर आणि बीडच्या काही भागातील नागरिकांनी ३५२ हरकती नोंदवल्या आहेत. कृती समितीच्या आंदोलनाची सरकारने दखल घेवून शुद्धीपत्रक काढून एक सदस्यीय अभ्यास समिती नेमली आहे. त्यामुळे लातूरकरांनी आयुक्तालयाची आर्धी लढाई जिंकली आहे.'

लातूरकरांची महसूल आयुक्तालयाची मागणी ही गुणवत्तेवर, मराठवाड्याच्या समतोल विकासांवर आणि शासनावर आर्थिक बोजा न टाकणारी आहे. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यासाठी लातूर हे सोयीचे ठिकाण आहे. याची अधिक माहिती देण्यासाठी कृती समितीच्यावतीने महसूल मंत्री खडसे, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटी घेण्यात येणार आहेत. सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरला येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या भेटीची वेळ मागितली असून त्यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तुम्ही चित्र विका, आम्ही कपडे विकतो!: रावसाहेब दानवे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

'तुम्ही चित्र विका, आम्ही कपडे विकतो,' या शब्दांत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी दानवे शनिवारी जालना शहरात आले होते. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूट लिलावावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेला जोधपुरी सुट हा चर्चेचा विषय ठरला होता. विरोधकांबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेदेखील या मुद्द्यावरून भाजपवर कुरघोडीची संधी सोडली नाही. सुटासह भेट म्हणून मिळालेल्या विविध वस्तूंचा लिलाव करून त्यातून आलेली रक्कम गंगा स्वच्छतेसाठी वापरण्याची योजना आखून भाजपने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 'मोदींनी दररोज आपले कपडे विकावे, किमान त्यामुळे भारतातील काळा पैसा तरी बाहेर येईल,' या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला घरचा आहेर दिला होता. ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना दानवे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या चित्रांचा लिलाव करून पैसे जमा केले. ते पैसे

समाजकारणासाठी वापरले. मोदीजी पण त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तू विकून त्यातून मिळालेल्या पैशाने समाजकार्य करणार आहेत. फक्त सूटच नव्हे तर त्यांना भेट म्हणून मिळालेले नारळदेखील त्यांनी लिलावात ठेवले होते. यात गैर काय? तुम्ही चित्र विका, आम्ही कपडे विकतो.'

शिकण्याच्या उर्मीला सलाम!

$
0
0

सदिशांनी पन्नाशीच्या घरात दिली बारावीची परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयुष्यभर तिने कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसले. हे करताना तिचे लग्नानंतर सुटलेले शिक्षण बाजुलाच राहिले, पण शिकण्याला वयाचे बंधन नसते, हे तिला पक्के ठाऊक होते. म्हणूनच वयाच्या पन्नाशीच्या घरात तिने शिक्षणाची कास धरली. या उज्ज्वल आशादायी पणतीचे नाव म्हणजे सदिशा पानसंभाळ. त्या डॉ. झाकीर हुसेन ज्यूनिअर हायस्कूलमध्ये १२ वीची परीक्षा देत आहेत.

सदिशांचा मुलगा मेकॅनिकल इंजिनीअर. मुलगीही एलएलएमच्या प्रथम ‌वर्षात. सदिशा १९८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर लग्न आणि परिवाराची जबाबदारी अंगावर आली. मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आले. तेव्हा शिक्षण सुटले ते सुटलेच. आता मुले शिकली-सवरली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्यामुळे पुन्हा एकदा आतली शिकण्याची उर्मी जागी झाली.
....

पुन्हा शिक्षण सुरू केले. उद्योग सुरू करायचाय. केंद्रात तरुण मुलांत परीक्षा द्यायला आले. मनात भीती होती. मात्र माझ्याच वयाची एक महिला पेपरला होती. त्या माझ्याकडे पाहून हसल्या. मी ही हसले. आपल्या सारखेच अन्य कोणीतरी परीक्षा देत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

- सदिशा पानसंभाळ
...........

सदिशाने शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही तिला पाठिंबा दिला. पूर्वी मी आणि बायको आमच्या मुलांची परीक्षा संपण्याची वाट पाहत वर्गाबाहेर थांबायचो. आता पत्नीची परीक्षा संपण्याची वाट पाहत आम्ही उभे आहोत.

- एम. आर. तांबे.

पाण्यासाठी भाजपचा ठिय्या; खैरेंकडून आरोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी ठिय्या देऊन बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) गुंगारा दिला. आता येतो, मग येतो असे म्हणत नगरसेवकांच्या भेटीला महाजन आलेच नाहीत. कार्यकारी अभियंतांना निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांनी पाठवून दिले. या प्रकारामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली; तर भाजपच्या या भूमिकेवर खैरेंनी आरोपांच्या फैरी झाडत लक्ष्य केले.

केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर स्वतःचे बळ वाढवण्याच्या मागे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकारी लागले आहेत. अन्य पक्षातील नगरसेवक व कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे भाजपमध्ये पार पडत आहेत. 'स्वबळ' वाढवण्याच्या मागे लागलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी पाणीप्रश्न हाती घेऊन दुपारी महापालिका गाठली. बाराच्या सुमारास उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात नगरसेवक एकत्र आले. त्यात गटनेते संजय केनेकर, महेश माळवतकर, साधना सुरडकर, प्रशांत देसरडा, अनिल मकरिये, संजय चौधरी, राजू शिंदे, हुशारसिंग चव्हाण, सुरेंद्र कुलकर्णी, जगदीश सिध्द, प्रमोद राठोड, उर्मिला चित्ते, प्रीती तोतला, पंकज भारसाखळे, राजगौरव वानखेडे, रावसाहेब गायकवाड, सत्यभामा शिंदे, कमल नरोटे यांचा समावेश होता. या नगरसेवकांसह काँग्रेस आघाडीचे गटनेते मीर हिदायत अली, रवी कावडे यांचा समावेश होता. शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून पाणीपुरवठा योजना पालिकेने पुन्हा ताब्यात घ्यावा, समांतर जलवाहिनीचा करार रद्द करावा या दोन मागण्यांवर मतैक्य झाल्यावर सर्व नगरसेवक आयुक्तांच्या दालनात गेले. त्यांचे नेतृत्व शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांनी केले. आयुक्त दालनात नव्हते. त्यामुळे या सर्वांनी त्यांच्या दालनाता ताबा घेतला व आयुक्त येत नाहीत तो पर्यंत दालनातून उठणार नाही असा पवित्रा घेतला. त्यांनी आयुक्तांना निरोप पाठवला. बैठकीत आहे, थोड्याच वेळात येतो असा निरोप आयुक्तांनी नगरसेवकांना पाठवला. त्यामुळे नगरसेवक आयुक्तांची वाट पहात बसले. दीड-दोन तास वाट बघितल्यानंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि उपअभियंता वसंत निकम आयुक्तांच्यावतीने नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी आले. नगरसेवकांनी त्यांच्या हाती निवेदन सोपवून आयुक्तांचे दालन सोडले.

आयुक्तांचा नगरसेवकांना गुंगारा

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्याने आयुक्त प्रकाश महाजन गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पालिकेत सकाळी साडेअकराच्या सुमारास आले होते. यावेळी उपमहापौरांसह भाजपचे नगरसेवक तेथे उपस्थित होते. पाण्याबद्दल चर्चा करायची आहे, दालनात चला अशी विनंती नगरसेवकांनी केली, पण महत्त्वाच्या बैठकीला जायचे आहे असे म्हणून आयुक्त तेथून निघून गेले. त्यांनी थेट सिध्दार्थ उद्यान गाठत, या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

प्रतीक्षा ‘झेडटीसीसी’ कार्यान्वित होण्याची

$
0
0

>> निखिल निरखी

सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी औरंगाबादच्या 'झेडटीसीसी'ला मान्यता मिळूनही समिती कार्यान्वित न झाल्याने 'ब्रेन डेड' रुग्णांच्या अवयवांचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. याकामी 'मटा'ने पुढाकार घेऊन चर्चा घडवून आणली. परिणामी 'डीएमइआर'च्या प्रभारी सहसंचालकांनी अध्यक्षपदाची घोषणा करून समिती स्थापन करण्याचे संकेत दिले. त्यामुळे मराठवाड्यातून प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे ५०० पैकी काहींना तरी जीवनदान मिळावे, अशी अपेक्षा आहे.
................

ब्रेन डेड अर्थात मेंदूच्या दृष्टीने मृत ठरलेली व्यक्ती इतर अवयव चांगले असले तरी मृत समजण्यात येते. त्यामुळे अशा रुग्णाच्या काही चांगल्या अवयवांचे प्रत्यारोपण देशातील महानगरांमध्ये कमी प्रमाणात का होईना सुरू झाले आहे. केवळ डोळे, मूत्रपिंड नव्हे, तर हृदय, फुफ्फुस, त्वचेचेही प्रत्यारोपण यशस्वीरित्या होत आहे. मात्र भारतात अशा प्रकारच्या ब्रेन डेड रुग्णांच्या प्रत्यारोपणाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. ब्रेन डेड रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी भारतीय कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) मोठ्या शहरांमध्ये स्थापन झाली आहे. औरंगाबादेतही या समितीला साडेतीन-चार वर्षांपूर्वी मान्यता मिळाली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. जी. काळे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र इतर सदस्यांची नियुक्ती न झाल्याने समिती अस्तित्वातच आली नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी 'ऑर्गन डोनेशन डे' निमित्त 'मटा'ने पुढाकार घेऊन सलग पाच ते सहा दिवस प्रत्यारोपणाशी संबंधित विविध वृत्त प्रसिद्ध केले. विषयतज्ज्ञांची 'राऊंड टेबल कॉन्फरन्स'ही घेण्यात आली. या वेळी घाटीचे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांच्यासह शहरातील डझनभर मूत्रपिंडविकारतज्ज्ञ व इतर डॉक्टर उपस्थित होते. याच चर्चेत डॉ. भोपळे यांनी ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांचे नाव जाहीर केले आणि तसा प्रस्तावही घाटी प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाला (डीएमइआर) पाठविण्यात आला. मात्र हा प्रस्ताव दोन्ही निवडणुका व लालफितीत अडकून पडला. 'मटा'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिलेले 'डीएमइआर'चे प्रभारी सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कुलकर्णी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली व समिती लवकरच स्थापन होईल, असे संकेतही दिले आहेत. या संदर्भातील शासकीय आदेश घाटी प्रशासनाला लवकरच प्राप्त होईल व समिती स्थापन होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. ही समिती स्थापन झाल्यानंतर ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवांचे प्रत्यारोपण सुरू होणार आहे. अर्थात, त्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्नही तितकेच महत्वाचे ठरणार आहेत.

दरमहा १० ब्रेन डेड रूग्ण

औरंगाबाद शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये व आयसीयूमध्ये महिनाभरात १० ते १५ ब्रेन डेड रुग्ण दाखल होतात किंवा गंभीर रुग्ण हे ब्रेन डेड ठरतात. त्यामुळे किमान २५ ते ३० रुग्णांवर डोळे, किडनीचे प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीनुसार होऊ शकते. अर्थात, ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांची इच्छा असेल, तरच हे शक्य आहे. अशा नातेवाईकांची मानसिकता तयार करणे, हेही आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठी समुपदेशन करणारी टीम या समितीला आवश्यक ठरणार आहे. त्यावरच या समितीचे यश अवलंबून असेल. हे काम आव्हानात्मक असले तरी, त्यानंतर या जीवनदायी उपक्रमाची काहीअंशी मानसिकता तयार होईल.


भाजीपाला शेतीतून पाच लाखांचे उत्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अवघ्या तीन एकर शेतामध्ये पाच लाखांहून अधिकचे भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न येरमाळा येथील धीरज कवडे या युवकाने केला आहे. डीएडचे शिक्षण होऊन‌ही नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्येच हे मास्तर रमले आहेत.

येरमाळा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकाची ही यशोगाथा आहे.बालपणापासूनच धीरजला शेतीचे आकर्षण होते. बीए, डीएड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मास्तर होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, सहजासहजी नोकरी मिळण्याची चिन्हे न दिसल्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित असलेली साडेतीन एकर शेतीची मशागत करून त्यातून भरघोस उत्पन्न घेण्याचा त्यांनी चंगच बांधला. वायरमन म्हणून महावितरणमध्ये सेवा बजावणाऱ्या त्याचे वडील कल्याण कवडे यांनीही त्याला साथ दिली. पैशाचा ताळमेळ घालून त्यांनी शेतामध्ये दोन विंधन विहिरी घेतल्या. नशिबाने ही त्यांना साथ दिली. एका विंधन विहिरीला चांगले तर दुसऱ्या विंधन विहिरीला बऱ्यापैकी पाणी लागले. कल्याण कवडे हे शेतीत पारंपरिक पीक घ्यायचे. यातून खर्चाचा ताळमेळ जुळायचा नाही. धीरजने पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या अल्पशा शेतीत भाजीपाला घ्यावयचे ठरविले. त्यांनी दुष्काळी स्थितीत काकडी, फ्लॉवर कोबी, सिमला मिरची तसेच शुगरबेबी कलिंगड आणि टोमॅटोची लागवड केली. येथूनच त्याच्या शेतीला कलाटणी मिळाली. शेतात त्यांनी स्वखर्चाने शेततळे घेतले. पाण्याचे योग्य ते नियोजन करून त्यांनी भाजीपाला शेतीत भरघोस यश मिळविले. उत्पादित भाजीपाल्यासाठी त्यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबईची बाजारपेठ गाठली. बघता बघता अवघ्या दीड ते दोन महिन्यांत त्यांनी पाच लाखांहून अधिकचा भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविला. आता या शेतात शेडनेट उभारण्याचा त्याचा विचार आहे. मात्र, या कामी शासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी यानिमित्ताने बोलून दाखविली.

शेततळे घेण्यासाठी म्हणूनही शासनाचे दरवाजे ठोठावले. मात्र, लालफितीच्या कारभाराला वैतागून आपण स्वखर्चानेच शेतात शेततळे घेतल्याचे कवडे यांनी स्पष्ट केले.

‘समांतर’ पाण्यावरून पेटली कळ

$
0
0

लाठ्याकाठ्यांसह नगरसेवक जलकुंभावर; सिडको एन ५ येथील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जिसकी लाठी, उसकी भैंस,' या म्हणीचा प्रत्यय सोमवारी (२३ फेब्रवारी) सिडको एन ५ येथील जलकुंभावर आला. आपल्या वॉर्डातील पाण्याची पळवापळवी झाल्याचे लक्षात आल्यावर चक्क लाठ्याकाठ्यांसह नगरसेवक आपल्या वॉर्डातील नागरिकांसह जलकुंभावर पोहचले. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली.

सिडको एन ३, एन ४ भागात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्यामुळे या भागाचे नगरसेवक प्रमोद राठोड सकाळी सहाच्या सुमारास आपल्या कार्यकर्त्यांसह हातात काठ्या घेऊन सिडको एन ५ येथील जलकुंभावर आले. आमच्या वॉर्डात पाणी का सोडत नाही, असा जाब त्यांनी जलकुंभावरील कर्मचाऱ्यांना विचारला. राठोड यांचे रौद्ररुप पाहून कर्मचारी गर्भगळीत झाले. त्यांनी लगेचच एन-३ , एन-४ भागाचा पाणीपुरवठा सुरू केला. हा पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे विठ्ठलनगरचे पाणी बंद झाले. त्यामुळे नगरसेविका सत्यभामा शिंदे यांचे पती माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह जलकुंभावर पोचले. प्रमोद राठोड यांनी त्यांच्याही हातात काठी सोपवली. त्यानंतर शिंदे यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. विठ्ठलनगरचे पाणी का बंद केले. याचे उत्तर द्या, असे ते कर्मचाऱ्यांना म्हणत होते. त्यामुळे काय करावे, कुणाचे ऐकावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला.

शहागंजच्या जलकुंभावर मारहाण

नवाबपुरा भागात रविवारी (२२ फेब्रुवारी) पाणीपुरवठा होणार होता, पण पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागात सोमवारी पाणीपुरवठा होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती, पण पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या शहागंज येथील जलकुंभावरील कर्मचाऱ्याने राजाबाजार - धावणी मोहल्ला या भागाचा पाणीपुरवठा सुरू केला. या प्रकारामुळे नवाबपुरा येथील नागरिक जलकुंभावर आले. काही जणांनी जलकुंभावर काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. नगरसेवक मीर हिदायत अली यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि नागरिकांना शांत केले.

समांतरचे ऑफिस फोडले

सलग आठ दिवस पाणीपुरवठा न झाल्यामुळे चिडलेल्या नेहरूनगर येथील नागरिकांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास शहागंज येथील समांतर जलवाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. नेहरूनगरचे नागरिक शहागंज येथील जलकुंभावर धाऊन गेले. या ठिकाणी समांतरचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे कार्यालय आहे. संतापलेल्या नागरिकांनी या कार्यालयाची तोडफोड केली.
...
पाण्यासाठी भाजप नगरसेवकांनी केलेले आंदोलन राजकीय आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी ते पाण्याचे राजकारण करीत आहेत. ही योजना मी आणली असली तरी त्याला संमती देण्याचे काम भाजपच्या तत्कालीन महापौर विजया रहाटकर यांनी केले. त्यामुळे या योजनेबद्दल सर्वानुमते निर्णय होणे गरजेचे आहे. भाजपचे नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यांना ही योजना नको असेल तर त्यांनी करारावर स्वाक्षरी का केली, या संदर्भातली सर्व माहिती 'मातोश्री' च्या कानावर घातली आहे.

- चंद्रकांत खैरे, खासदार.

औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा

$
0
0

>> अब्दुल वाजेद, औरंगाबाद

स्पाइस जेटने औरंगाबाद विमानसेवा बंद केल्यानंतर आता रामशरण एअर लाइन्सच्या ट्रू जेट कंपनीकडून हैदराबाद ते औरंगाबाद ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.

औरंगाबाद विमानतळावरून स्पाइस जेटने आपल्या विमानसेवेची सुरुवात औरंगाबाद ते हैदराबाद विमानसेवेने सुरू केली होती. याच वेळी जेट एअरवेजनेही हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. स्पाइस जेटने ही विमानसेवा पाच हजार ते आठ हजार रुपयांमध्ये सुरू केली होती. याशिवाय १९९९ रुपयांची स्पेशल ऑफर देण्यात आली होती. ही सेवा सहा महिने सुरू होती, नंतर त्यानंतर स्पाइस जेटने ही सेवा बंद करून औरंगाबाद - दिल्ली सेवा सुरू केली होती.

हैदराबाद; तसेच दक्षिणेतून शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी रामचरण एअर लाइनने ट्रू जेट ‌ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीला हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. विमानतळ प्राधिकरणाकडून विमान सेवा सुरू करण्याची परवानगी मिळताच कंपनीकडून पाच शहरांमध्ये या सेवेचा आरंभ करण्यात येणार आहे.

* तिरुपती कनेक्शनही मिळणार

रामचरण एअर लाइनच्या ट्रू जेटची विमानसेवा ही साई दर्शनासह तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठीही उपयुक्त असेल. औरंगाबादहून बालाजी दर्शनासाठी अनेक भाविक जातात. पूर्वी स्पाइस जेटच्या औरंगाबाद-हैदराबाद सेवेची कनेक्टिव्ही तिरुपतीपर्यंत नव्हती. प्रवाशांना हैदराबादेत एक दिवस थांबावे लागत होते. रामचरण एअर लाइनने हैदराबाद-औरंगाबाद विमानसेवा सुरू करताना तिरुपती कनेक्शन मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

* धार्मिक पर्यटनावर कंपनीचे लक्ष

हवाई वाहतूक क्षेत्रात रामशरण एअर लाइन्स ही नवी कंपनी आहे. औरंगाबादसह राजमुंद्री, बेंगळुरू, तिरुपती, विजयवाडा या पाच शहरांतून कंपनीच्या हवाई वाहतूक सेवेला सुरुवात होत आहे. माजी केंद्रीयमंत्री चिरंजिवी यांचे पूत्र रामशरण यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. धार्मिक पर्यटनाचा उद्देश समोर ठेऊन कंपनीने ही सेवा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सात बंदिवानांना जेलमध्ये मारहाण

$
0
0

बंद‌िवानांचा कोर्टात तक्रार अर्ज दाखल

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खुनाच्या आरोपाखालील सात बंद‌िवानांनी कोर्टात हजर करण्याची विनंती केल्यामुळे त्यांना हर्सूल जेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली आहे. या बंदिवानांनी कोर्टात तक्रार अर्ज दाखल करून मारहाण करणाऱ्या जेल पोलिसांवर कारवाईची विनंती केली आहे. या सात जणांना मोक्का लावण्यात आला आहे.

हर्सूल जेलमधील पिंट्या पंढरीनाथ काळे, ठाकूर पंढरीनाथ काळे, कबेस पंढरीनाथ काळे, रभन घाणेकर चव्हाण, लाठ्या रभन चव्हाण, खेडकर टाभर चव्हाण व पांड्या टाभर चव्हाण या सात जणांवर खुनाचा आरोप आहे. त्यांना मोक्का लावण्यात आला आहे. त्यांची कोर्टात १७ फेब्रुवारी रोजी तारीख होती; मात्र जेल प्रशासनाने त्यांना कोर्टात हजर केले नाही.या सात जणांनी जेल प्रशासनाचे मोबीन साहेब यांना कोर्टात तारखेसाठी हजर करण्याची विनंती केली. त्यावरून जेल पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कोर्टात करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. जेलमध्ये काही बरेवाईट झाल्यास मोम‌िन साहेब यांना ‌जबाबदार धरण्यात यावे, असे या तक्रारीत म्हटले आहे. शिवाय मारहाण झाल्याने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत व दोषी पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी विनंती तक्रार अर्जात करण्यात आली आहे. हा तक्रार अर्ज अॅड. जी. जे. मोटे यांच्यामार्फत दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हजारो नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचा खेळ अजूनही सुरूच आहे. क्रांतिचौक जलकुंभावरील पडलेला स्लॅब दुरूस्त करा किंवा त्यावर छत टाका, असे पत्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन वेळा 'समांतर'ला दिले, पण कंपनीने त्या पत्रांना जुमानले नाही. त्यामुळे हा जलकुंभ उघडाच आहे. इथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

क्रांतिचौकात महापालिकेचे वॉर्ड कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरातच दोन मोठे जलकुंभ बांधण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे सहा दशकापूर्वी बांधण्यात आलेल्या जलकुंभाचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळून आता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला, परंतु त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष दिले नाही. या जलकुंभातून सुमारे ३० हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. छत कोसळल्यामुळे जलकुंभातील पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जाते. पालापाचोळा, कचरा सतत जलकुंभातील पाण्यात पडतो. तेच पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहचवले जाते. 'मटा' ने या संदर्भात वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केल्यावर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलकुंभावर स्लॅब टाकण्याची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची आहे म्हणून हात वर केले. त्यानंतर पालिकेने कंपनीला जलकुंभावरचा स्लॅब दुरुस्त करण्यासाठी दोन पत्र दिली, पण या दोन्हीही पत्रांची दखल कंपनीने अद्याप घेतली नाही.

वॉर्ड सभापतींच्या पत्राकडेही दुर्लक्ष

'मटा'मध्ये सातत्याने वृत्त प्रसिध्द झाल्यावर वॉर्ड सभापती सुनिता सोनवणे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नावे आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या नावे पत्र देऊन जलकुंभावर छत टाकण्याची मागणी केली. पाणीपुरवठा विभाग आणि कंपनीने त्याकडेही दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बारावीच्या परीक्षेत बोर्ड ‘फेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परीक्षा केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा दावा करणाऱ्या बोर्डाच्या कारभार सोमवारी इंग्रजीच्या पेपरदरम्यान उघडा पडला. चक्क जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. विशेष म्हणजे वर्गात पुरेसा प्रकाशही नाही, हे चित्र औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारसावंगी येथील परीक्षा केंद्रावरील आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत सोमवारी (२३ फेब्रुवारी) इंग्रजीचा पेपर झाला. कॉपीमुक्त अभियानामुळे गैरप्रकारांना आळा बसल्याचा दावा करणाऱ्या शिक्षण मंडळ आणि महसूल विभागाचे पितळ आज उघडे पडले. औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर भौतिक सुविधांचा ठणठणाट आहे. दुसऱ्या बाजुला या केंद्रांवर कॉप्यांचे प्रमाण भरपूर होते.

फुलंब्रीजवळ असलेल्या बाजारसावंगी येथील केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क खाली बसून परीक्षा दिली. भौतिक सुविधा असतील तरच केंद्र दिले जाते, परंतु या केंद्रावर पुरेसे बाकडे सोडाच वर्गात पुरेसा प्रकाश नसताना विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागत आहे. केंद्रावर एका बाकावर दोन-दोन विद्यार्थी बसून पेपर लिहित होते. केंद्रावर परीक्षार्थींची संख्या तब्बल ७८० एवढी होती. फुलंब्री केंद्रावरही कॉपीचा प्रकार आढळून आला. सामूहिक कॉपीचे प्रकार सर्रास सुरू होते.

जनरेटरही नाही

परीक्षा केंद्रावर अविरत विद्युतपुरवठा असावा, यासाठी तेथे जनरेटची सुविधा आवश्यक आहे, तशा सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत. यानंतर शासनानेही यावर्षी कॉलेजांकडून हमीपत्र भरून घेतले, परंतु ग्रामीण भागातील केंद्रावर जनरेट असल्याची माहिती केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
..

विद्यार्थ्यांची गैरसोय होणे चुकीचे आहे. याबाबत अध्यक्षांना तातडीने सूचना देण्यात आल्या असून, संबंधित प्रकाराबाबत दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. - विनोद तावडे, शिक्षण मंत्री.

पाणीपुरवठा पुन्हा पालिकेकडे

$
0
0

महापालिकेचा निर्णय; 'समांतर'ला हद्दपारीची अंतिम नोटीस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून (मंगळवार) महापालिकेच्याच माध्यमातून पाणीपुरवठा केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, 'समांतर'चा करार रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला बजाविण्याची तयारी करण्यात आली असून, तीही उद्याच बजाविली जाणार आहे.

औरंगाबाद शहराची पाणीपुरवठा योजना महापालिकेने १ सप्टेंबर २०१४पासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या ताब्यात दिली आहे. तेव्हापासून संपूर्ण शहरात कंपनीतर्फे पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने पाणीपुरवठा विस्कळित होत असल्यामुळे नागरिक त्रासले आहेत. वारंवार विस्कळित होणारा पाणीपुरवठा, जलवाहिनीचे वॉर्डा-वॉर्डांमध्ये खोळंबलेले काम, त्यामुळे अनेक भागांत निर्माण झालेला दूषित पाण्याचा प्रश्न आदींची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत अनेकवेळा चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, कंपनीसोबत झालेल्या करारातील त्रुटींबद्दल विचार करून त्यातून काही मार्ग काढावा, यासाठी सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना महापालिकेने पुन्हा ताब्यात घ्यावी व कंपनीला नियमानुसार तत्काळ बडतर्फीची नोटीस द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर लगेचच महापालिकेच्या प्रशासनाने पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली. त्याबरोबरच सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड कंपनीला समांतर जलवाहिनीचा करार रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला. उद्या ही नोटीस बजाविली जाणार आहे. दहा दिवसांत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करा, अन्यथा करार रद्द करू, असा उल्लेख त्या नोटीसमध्ये असेल. मंगळवारपासून शहराची पाणीपुरवठा योजनाही ताब्यात घेण्याचे पालिकेच्या प्रशासनाने जाहीर केले आहे.

घटनाक्रम

'समांतर'चा प्रस्ताव पालिकेच्या सभेतः २००६ - ०७

शासनाची प्रस्तावाला मान्यताः २००९

केंद्राकडून योजनेसाठी १४४ कोटींचा पहिला हप्ताः २०१०

कंपनीबरोबर महापालिकेचा करारः २०१२

पाणीपुरवठा योजना कंपनीकडे हस्तांतरितः १ सप्टेबर २०१४

'समांतर'बद्दल पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत बैठकः २६ जानेवारी २०१५

महापालिका प्रशासनाकडून कंपनीला पहिली नोटीस दिलीः ३० जानेवारी २०१५


'त्या' शाळेचा अहवाल मागविला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारसावंगी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी बारावीची परीक्षा जमिनीवर बसून परीक्षा देत आहेत. 'मटा'ने मंगळवारच्या अंकात बोर्डाच्या व्यवस्थेचा पंचनामा केला. तेव्हा शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या केंद्राचा तातडीने अहवाल सादर करा, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाने विभागीय मंडळाला दिल्या आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा केंद्रावर सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा करणाऱ्या बोर्डाचा कारभार सोमवारी उघड झाला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी आसन व्यवस्था नाही.

काही केंद्रावर जनरेटरच नसल्याचे समोर आले. बाजार सावंगी केंद्रावर तर इंग्रजीच्या पेपरला तर चक्क परीक्षार्थींना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. यावर 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकला. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्य शिक्षण मंडळाने या वृत्ताची तातडीने दखल घेतली. या केंद्रातील सुविधांचा आढावा घेत, तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय मंडळ कार्यालयाला दिले आहेत.

दरम्यान औरंगाबादसह लातूर विभागातही अनेक परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधांचा प्रश्न आहे. मंडळाच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील ३२ केंद्रावर जनरेटर नाही. अशा केंद्राचा आढावा घेत, त्या केंद्राचा अहवाल राज्य मंडळ आणि शासनाकडे पाठविला जाणार आहे.

बाजारसावंगी केंद्राचा तहसीलकडून पंचनामा

खुलताबाद ः तालुक्यातील बाजारसावंगी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील परीक्षा केंद्राचा मंगळवारी (२४ फेब्रुवारी) तहसील कार्यालयातर्फे पंचनामा करण्यात आला. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सचिन घागरे यांनी दिली. नायब तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता एका हॉलमध्ये फरशीवर बैठक क्रमांक टाकलेले आढळून आले. बुधवारच्या हिंदीच्या पेपरसाठी ४२ विद्यार्थी होते; बैठक व्यवस्था सुरळीत होती. इंग्रजीच्या पेपरला ८०५ विद्यार्थ्यांपैकी ७७५ उपस्थित होते, ३० विद्यार्थी गैरहजर होते, अशी माहिती केंद्र संचालक डी.पी. सोनवणे यांनी माहिती दिली. बाजारसावंगी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्र क्रमांक १४२ वर विद्यार्थीसंख्या ८०८ असून बेंच ४५० उपलब्ध आहेत. या केंद्रावर ४५० विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात तितकेच बेंच उपलब्ध असल्याचे परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांना कळविण्यात आले होते, असे सांगण्यात आले.

दरोड्यानंतर मुलाचे धाडस

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोडेखोरांनी धमकी दिल्यानंतरही जुनेदखान यांच्या कुटंबातील अरीबखान हा चौदा वर्षांचा मुलगा धाडस करून बंगल्याबाहेर आला. त्याने अंधारात पायी जाऊन बेकरीत दरोडा पडल्याची माहिती दिली.

दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ सुरू होता तेव्हा एका खोलीत झोपलेल्या अरीबखान, त्याची मोठी बहीण सना व लहान भाऊ मुजीब यांना जाग आली. खोलीत तीन ते चार दरोडेखोर घुसले, तेव्हा तिघांनी झोपण्याचे सोंग घेतले. तोंडावर मफरल गुंडाळलेल्या व एकाने लेदर जाकेट घातलेल्या दरोडेखोरांनी तिघांना उठवून दंडुका दाखवून धमकावत पैसे कोठे आहेत, याची विचारणा केली. भीतीने गर्भगळीत झालेल्या तिघांना काहीच सूचत नसल्याने एकाने मराठीत झोपा, असे सांग‌ितले. दरोडेखोर निघून गेल्यानंतर या मुलांनी जुनेदखान व साहेबजान खान जखमी झाल्याचे पाहिले. दरोडेखोरांनी मोबाइल बंद करून हिसकावून घेतल्याने संपर्कासाठी साधन नव्हते. त्यामुळे आरीबखान धाडस करून बंगल्याबाहेर आला व बेकरीवर जाऊन दरोडा पडल्याची माहिती दिली. त्यानंतर बेकरीतील कामगार व नातेवाईकांनी बंगल्याकडे धाव घेतली. बंगल्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असताना त्याची गेटवरील वॉचमनला काहीही समजले नाही. बेकरीतून नातेवाईक व कामगार आल्यानंतरच घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला.

दरम्यान, पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन तपासाबद्दल सूचना केल्या आहेत. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून इतर पोलिस ठाण्यातील निष्णात कर्मचाऱ्यांना तपासासाठी बोलावण्यात आले आहे.

लष्करी अधिकारीही धावले

छावणी परिसर लष्कराच्या अखत्यारित आहे असल्याने दरोड्याची माहिती समजल्यानंतर ब्रिगेडीअर रेड्डी घटनास्थळी आले होते. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, दिनकर हाके, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी बोलावलेले श्वान बंगल्याच्या आवारातच घुटमळले. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले जुनेदखान हे कराटेपटू आहेत. त्यांनी प्रतिकार केल्याने दोन ते तीन दरोडेखोर झटापटीत जखमी झाल्याची माहिती घरातील सदस्यांनी पोलिसांना दिली.

माह‌ितगाराची साथ असल्याचा संशय

जुनेदखान यांच्या बंगल्यावर सहा महिन्यांपूर्वी दरोड्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा त्यांनी बेकरीवरील कामगारांना बोलावून घेतल्याने दरोडेखोर पळून गेले होते. त्याचे चित्रणही सीसीटीव्ही झाले होते. मात्र ही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. दरोडेखोरांनी साहेबजान खान यांच्या खोलीनंतर थेट जुनेदखान यांची खोली गाठली होती. त्यावरून दरोड्यात बंगल्याची माह‌ितगार व्यक्ती सहभागी असावी किंवा मदत असावी, अशी पोलिसांना शंका आहे.

सीसीटीव्ही फोडले

साहेब खान यांनी बंगल्यात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. बंगल्याचा सात फूट उंच व त्यावर सर्वत्र काचा लावलेली कंपाउंड वॉल आहे. दरोडेखोरांनी कंपाउंड वॉलच्या काचा असलेला थोडा भाग पाडून त्यावरून बंगल्यात प्रवेश केला. त्यांनी तीन कॅमेऱ्यांची दिशा बदलली व एक कॅमेरा तोडून पाण्याच्या ड्रममध्ये फेकला. दर्शनी भागातील कॅमेरा तोडला. कॅमेऱ्यांचे कंट्रोलिंग असलेल्या 'डीव्हीआर'वर दांड्याने प्रहार करून रेकॉर्डिंग सिस्टिम नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा डीव्हीआर ताब्यात घेतला असून फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तंत्रनिकेतनच्या सव्वाशे शिक्षकांना सेवासातत्य

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यासह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या ११५ कंत्राटी अधिव्याख्यातांना त्यांच्या नेमणूक तारखांपासून सेवासातत्य मिळणार असून, एक मार्च २०१५ पासून सर्व आर्थिक लाभ मिळणार आहेत. अब्दुल वाहेद सिद्दीकी व इतर ५७ याचिकांच्या एकत्रित सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी दिलेल्या आदेशाने अधिव्याख्यातांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विविध शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी सेवासातत्य मिळावे, या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर, तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी प्राध्यापकांना नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार नियमित करण्याचे आदेश राज्य शासनाने काढलेले आहेत. तसेच नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रिम कोर्टाने कायम केला व राज्य शासनाचे अपील फेटाळण्यात आल्याकडे कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले. त्याचवेळी मुंबई येथे हायकोर्टाने याच पद्धतीच्या कंत्राटी प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याचे आदेश दिल्याचेही कोर्टात नमूद करण्यात आले. न्यायमूर्तींनी याची नोंद घेत याचिकाकर्त्यांना एक मार्च २०१५ पासून आर्थिक लाभ, तर त्यांच्या नेमणुकांच्या तारखांपासून सेवासातत्य देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रदीप देशमुख, अॅड. आनंद इंदराळे, अॅड. रवी आडगावकर, अॅड. अजित कडेठाणकर यांनी काम पाहिले.

मराठवाड्यातील लाभार्थी

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे सुमारे ११५ अधिव्याख्यातांना सेवासातत्य मिळणार आहे. यामध्ये औरंगाबादसह जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, जळगाव आदी ठिकाणच्या अधिव्याख्यातांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील अनेक अधिव्याख्याते पीएचडीधारक असून, १५-१८ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. मात्र त्यांना एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा महाविद्यालयात रुजू व्हावे लागत होते.

औरंगाबादकरांना एअरकार्गोचा फायदा

$
0
0



धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद
‌जागतिकस्तरावर औरंगाबादची उलाढाल आता ५ हजार कोटींवर जाणार आहे. येत्या मार्च अखेरीस एअरकार्गोची सेवा सुरू होताच हे चित्र दिसेल. सध्या १२५ उद्योजक ८० देशांत औरंगाबादमध्ये तयार झालेला माल पाठवतात. ही उलाढाल १ हजार ५०० कोटींची आहे. एअरकार्गोने हे चित्र पालटणार आहे. याचा फायदा नवे उद्योजकांना होईल, असा सूर औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त झाला.

औरंगाबादमधून १२५ उद्योजक वर्षाकाठी थोडाच माल विदेशात पाठवतात. यातील १२ उद्योजक हे दर महिन्याला त्यांचा माल विदेशात पाठवतात. वर्षाकाठी या १२ उद्योजकांची उलाढाल १ हजार २०० कोटींची आहे. बाकीच्या उद्योजकांची उलाढाल सुमारे ३०० कोटींपर्यंत आहे, तर विदेशातून आयात करून औरंगाबादमध्ये होत असलेली उलाढाल ३६० कोटींची आहे.

औरंगाबादमधील या १२ उद्योजकांनी जानेवारी २०१३-डिसेंबर २०१३ या वर्षात, ६४२ कोटी तर जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ पर्यंत सुमारे ६०८ कोटींचा व्यवसाय केला आहे. ज्या १२ उद्योजकांमुळे शहरातील आयात निर्यात वाढली आहे त्या उद्योजकामध्ये एन्ड्रर्स अँड हाऊसर्ज या कंपनीचा वाटा मोठा आहे. त्या खालोखाल अजंता फार्माचा नंबर लागतो. नव्याने होत असलेल्या एअरकार्गो व हबमुळे मुख्य १२ उद्योजकांच्या यादीत आणखी नवे २० उदयोजक वाढतील, असा अंदाज आहे.

या मालाची निर्यात

तापमान मापक

औषधे

ऑप्टिकल फायबर्स

मोजमापयंत्र

बिओपीपी फिल्म

प्लास्टिक उत्पादने

ऑटो पार्ट

आयातीत अग्रेसर कंपन्या

एन्ड्रर्स अॅण्ड हाऊसर्ज फ्लोटेक.

एन्ड्रर्स अॅण्ड हाऊसर्ज ऑटोमेशन.

हॉस्पिरा हेल्थ केअर

जैन इरिगेशन

निर्यातीत उल्लेखनीय कंपन्या

एन्ड्रर्स अॅण्ड हाऊसर्ज फ्लोटेक

लिमिटेड, वाळूज.

एन्ड्रर्स अॅण्ड हाऊसर्ज ऑटोमेशन अँड इन्स्ट्रुमेंट लिमिटेड, वाळूज.

एन्ड्रर्स अॅण्ड हाऊसर्ज वेटझर्स इंडिया लिमिटेड, वाळूज.

वोक‍्हार्ट लिमिटेड, चिकलठाणा.

अंजता फार्मा लिमिटेड, वाळूज.

स्टरलाईट टेक्नॉलॉजी, शेंद्रा.

कॉस्मो फिल्म, शेंद्रा.

हॉस्पिरा हेल्थ केअर इंडिया लिमिटेड, वाळूज.

जैन इरिगेशन

औरंगाबादमध्ये एअर कार्गोमुळे सुमारे १ हजार कोटीहून अधिक उलाढाल वाढेल. वेळ-पैसा, कामाची बचत होईल. या शिवाय रेल्वेद्वारे होणाऱ्या आयात-निर्यातीपेक्षा याचा फायदा अधिक असेल. सध्या १२५ उद्योजक आणि काही छोटे उदयोजक ८० हून अधिक देशांमध्ये औरंगाबादहून माल पाठवतात. याशिवाय पर्यटन, उद्योग व व्यवसायासाठी जाणारेही आहेत. त्यांनाही याचा फायदा होईल.- आशिष गर्दे, सचिव, सीएमआयए.

मार्च-अखेरीस हे काम होईल अशी ९९ टक्के खात्री असून केंद्रीय उड्डयन मंत्री व त्या विभागाकडे याचे काम गेले आहे.

- कुमार संतोष, उत्पादन शुल्कचे आयुक्त.

पाणी आहे, भरणार कोण?

$
0
0



म. टा प्रतिनिधी, पैठण

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर टँकर भरण्यासाठी व्हॉल्व्हमन नियुक्त न केल्याने तालुक्यातील नऊ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद झाला आहे. हे टँकर फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोर दोन दिवसांपासून ताटकळले आहेत.

पैठण तालुक्यातील ४६ गावांना सध्या ६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी फारोळा व मुधलवाडी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरून नऊ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या पैठण उपविभागातर्फे फारोळा येथे व्हॉल्व्हमन नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत पंचायत समिती पाणीपुरवठा विभागप्रमुख सुधाकर काकडे हे फारोळा येथे थांबून टँकरमध्ये पाणी भरून देत असत. पंचायत समितीने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या पैठण येथील उपअभियंत्याला व्हॉल्व्हमन नियुक्तीसाठी कळविले आहे. त्या विभागाकडून बोरडे नावाचा व्हॉल्व्हमन एकच दिवस आला. परिणामी दोन दिवसांपासून टँकरमध्ये पाणी भरणे बंद आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राबाहेर दोन दिवसांपासून टँकर उभे आहेत.

फारोळा येथून तालुक्यातील तुपेवाडी, ढाकेफळ, बन्नीतांडा, दोरखेड, बंगलातांडा, नरसिंहतांडा, कारकीन, लाखेगाव व अलीपूर या नऊ गावांना नऊ टँकरच्या १९ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. दोन दिवसांपासून टँकर बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठरावाला केराची टोपली

फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर व्हॉल्व्हमन नेमावा, असा ठराव पंचायत समितीने मंजूर केला आहे. त्यानुसार पंचायत समितीने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या पैठण उपविभागाकडे पाचवेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पैठण उपविभागाने त्याची दखल घेतली नाही. फारोळा येथून पाणी भरण्यासाठी व्हॉल्व्हमनच्या नियुक्तीसाठी पैठण येथील उपअभियंतांसोबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु, ते व्हॉल्व्हमन नियुक्तीसाठी टाळाटाळ करीत आहेत.

- उल्हास सोमवंशी, गटविकास अधिकारी

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>