Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हर्षवर्धन जाधव यांचे घूमजाव

$
0
0

औरंगाबादः आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 'मुस्लिमांचा मताधिकार' या विषयावर घूमजाव केले आहे. आमदार जाधव यांनी कन्नड येथे, 'खासदार संजय राऊत यांचे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मान्य असेल, तर यापुढे शिवसेनेत काम करणार नाही', अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर सायंकाळी त्यांनी या वक्तव्याचा प्रसिद्धीपत्रक काढून इन्कार केला आहे. 'राऊत यांच्या भूमिकेला आपला विरोध आहे. अशा परिस्थितीत आपण शिवसेनेत काम करण्यास इच्छुक नाही,' असे आमदार जाधव म्हणाले होते. मात्र, कन्नड येथे पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना केलेल्या विधानांचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला आहे. वस्तुतः आमदार जाधव यांनी ही भूमिका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खर्च सादर न केल्याने ३१ उमेदवारांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमदेवारांनी प्रचार सुरू केला आहे. नियमानुसार उमदेवारला दररोजचा खर्च सादर करणे आवश्यक आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ या कार्यालयाअंतर्गत ३१ उमदेवारांनी खर्च सादर न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.

वॉर्ड क्रमांक २ मधील घोरपडे राहुल रंगनाथ, काशीनाथ रघुनाथ जाधव, सोनोने उत्तम पिसाजी, आनंद सुखदेव पगारे, वॉर्ड ३ मधील सुनील नामदेव बनकर, बोर्डे मिलिंद पुंडलीकराव, वॉर्ड ४ मध्ये तडवी रशीद, ज्योती जयेश अभंग, निंभारेकर भय्यासाहेब लक्ष्मण, चव्हाण राहुल धोंडिसिंग, वॉर्ड ६ मध्ये रंजना गोपालसिंग बच्छिरे, अनिता रत्नाकर जाधव, संगीता राजीव इंगळे, सुरेखा विजय जाधव, शोभा पंडितराव कांबळे, कल्पना कैलास पवार, शोभा सुधाकर रगडे, मनिषा साहेबराव वैद्य, वॉर्ड ७ मधून ललीतवंशी कुमार सरदेशपांडे, सुनील माधवराव परदेशी, वॉर्ड ८ मधून रत्नकुमार भागाजी गायके, भाऊसाहेब नाथा गरड, दामोधर जुलालसिंग शिसोदे, वॉर्ड ९ मधून वंदना मनोज मेठी, वॉर्ड ३० मधून प्रशांत पुंडलिकराव आव्हाळे, चांदणे नितीन, मनोज विलास चौधरी, सतीश साहेबराव व शिंगणे सागर रतनसिंग यांना नोटीस देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीने साताऱ्यातील रस्ते चिखलमय

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सातारा

अवकाळी पावसाने सातारा देवळाईतील रस्ते चिखलमय झाले असून जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होतात तसे हाल उन्हाळ्यातही झाले आहेत. नगरपालिका झालेल्या सातारा-देवळाईतले हे चित्र नजिकच्या भविष्यात तरी बदलेल, अशी आशा नागरिक बाळगून आहेत.

सातारा-देवळाईत रस्त्याचे हालच आहेत. अनेक कॉलनी, नगर, वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे दर पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्यावी लागते. यंदा अवकाळी पावसाने अनेकदा तडाखा दिला. त्यामुळे उन्हाळ्यातही रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यांसाठी नुकताच ७२ लाख रूपयांचा निधी नगरपालिकेला मिळाला आहे. त्यातून आठ रस्त्यांची कामे होणार आहेत, परंतु त्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.

गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे आमदार रोडवरील संभाजी चौकात पाण्याचे भले मोठे डबके साचले आहे. तसेच ओमनगरी ते आलोकनगर, महाराणा प्रताप शाळेकडून आलोकनगरला जाणारा रस्ता, उर्जानगर, साईनाथनगर, सत्कर्मनगर, संतकृपा सोसायटी आदी ठिकाणचे रस्ते चिखलमय झालेले असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. नाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतरही पाण्याचे डबके बरेच दिवस तसेच राहते. त्यामुळे डास व दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

आतापर्यंत ग्रामपंचायत असल्यामुळे निधीची अडचण येत होती, परंतु आता नगरपालिका झाल्यामुळे रस्त्याची कामे तातडीने हाती घेतली जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ही कामे लवकर झाली तर येत्या पावसाळ्यात तरी हाल होणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीमुळे लाखोंचे नुकसान !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळ व त्यानंतर अवकाळी पावसाचा सुरू असलेल्या माऱ्यामुळे मराठवाड्यातील जनता हैराण झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस व गारपीटीमुळे विभागात आतापर्यंत ६ जणांचा बळी गेला. अवकाळीमुळे घरे व गोठ्यांचेही लाखोंचे नुकसान झाले असून १२३ जनावरेही दगावली आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यामध्ये ९ एप्रिलपासून दररोज अवकाळी पाऊस होत असून अनेक भागात मोठ्या प्रमाणावर गारपीटही झाली आहे. लातूर जिल्ह्यातील ७९ गावांना झोडपले, तर औरंगाबाद जिल्ह्यातील ५०, उस्मानाबाद ४१, परभणी १३ व नांदेड जिल्ह्यातील ४२ गावांना झोडपले.

वादळी वाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १, जालना २, नांदेड २ व लातूर जिल्ह्यात १ असे सहा जणांचा बळी गेला आहे. अवकाळीमुळे लहान-मोठी अशा १२३ जनावरे दगावली आहेत, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ५३, जालना १०, परभणी ६, हिंगोली ४, नांदेड १२, लातुरमध्ये ८ तर उस्मानाबादमध्ये सर्वाधिक ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. या जनावरांमुळे ४ लाख ८१ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपसमोर अपक्षांचा शड्डू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रामनगर (क्र. ८६) वॉर्डात भाजपचे उमेदवार भगवान घडमोडे यांना अपक्षांचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे. ते या वॉर्डातून तिसऱ्यांदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेकडून उमेदवारी मागणारे राजेंद्र तोरणमल यांनी अपक्ष अर्ज दाखल करून युतीच्या उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे. यामुळेच यावेळी युती पुढील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

रामनगरमधूनच भाजपचे सक्रिय कार्यकर्ते प्रल्हाद बनसोडे हे उमेदवारी मिळावी यासाठी पयत्नशील होते. परंतु तसे न झाल्याने त्यांनी काँगेसमध्ये जाणे केले. बालाजी शहाणे, सविता घुले, संगीता पवार हे देखील भाजपचेच सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांना घडमोडे यांच्यामुळे उमेदवारी मिळाली नाही. यामुळे त्यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाग्यश्री राजपूत या रिंगणात आहेत, पण खरी लढत काँग्रेस भाजपमध्येच होणार असल्याचे मतदार सांगतात.

घडमोडे यांनी १९९५ मध्ये विठ्ठलनगर, २००५ मध्ये रामनगर आणि २०१० मध्ये त्यांच्या पत्नी सविता घडमोडे यांनी विठ्ठलनगरमधून पालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. या वेळी घडमोडे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. रामनगर शिवसेना-भाजपचा गड आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत युतीमुळे सलग एकहाती विजय मिळवणे शक्य झाले आहे, पण या निवडणुकीत नेत्यांची मुले-नातेवाइकांनाच उमेदवारी मिळत असल्याने मतदार, नाराज उमेदवारांत प्रचंड रोष आहे. वॉर्डात अनुसूचित जातीतील २ हजार ८५६, तर अनुसूचित जाती जमातीतील १२७ मतदार आहेत. वॉर्डाची लोकसंख्या १० हजार ४२९ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIM समोर बंडखोरांची डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने उडी घेतली आहे. मात्र, पक्षांतर्गत बंडाळी आणि बंडखोरांचे आव्हान पक्षाला पेलावे लागणार आहे.

आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी वॉर्डातून वाहेद अली हाशमी उर्फ अबू आला हाश्मी, रोझेबाग येथून इमरान पटेल, शरीफ कॉलनी येथून अब्दुल अजीम यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्या यादीत कैसर कॉलनीतून सीमा मुस्तफा खान यांना तिकीट जाहीर करण्यात आले. मात्र, दुसऱ्या यादीत त्यांचा पत्ता कट कापण्यात आला. त्यांच्या जागी शहानवाज खान यांच्या पत्नीला तिकीट दिले. त्यामुळे मुस्तफा नाराज झाले. त्यांनी उमेदवारी दाखल केली. अखेरच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. याशिवार अजत चाचू यांची नाराजी पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. या सहा वॉर्डांसह अन्य वॉर्डांत एमआयएमकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. या नाराजीचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एमआयएमच्या प्रचाराची धुरा हैदराबाद येथून येणारी टीम सांभाळणार आहे. उमेदवारी वाटपानंतर पक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी आणि प्रचाराचे नियोजन करण्यासाठी हैदराबादहून तीन आमदार आणि नांदेडचे नगरसेवक येणार आहेत. या टीमवर प्रचाराची धुरा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवसी यांनी शहरातील विविध भागातून प्रचार फेऱ्या घेतल्या होत्या. आता महापालिका निवडणुकीतही ओवेसींच्या प्रचार फेरीचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला आव्हान गड राखण्याचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागील पंचवीस वर्षांपासून विश्वभारती कॉलनी वॉर्डाचे प्रतिनिधीत्व भाजपचे नगरसेवक करीत आहेत. या निवडणुकीत भाजप उमेदवाराला राष्ट्रवादीचे आव्हान आहे. या 'सुरक्षित' वॉर्डात उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. अर्चना निळकंठ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद वाढले असून, आता परंपरागत वॉर्ड राखण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.

विश्वभारती कॉलनी हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत वॉर्ड आहे. सातत्याने भाजपचा नगरसेवक विजयी झाल्यामुळे या वॉर्डातून राजकीय नशीब आजमावण्याची अनेकांची इच्छा असते. नवीन वॉर्डनिहाय रचनेनंतर पूर्वीच्या तुलनेत वॉर्ड अधिक आटोपशीर झाला आहे. भाजपचा हक्काचा मतदार असल्यामुळे वॉर्डात उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. विद्यमान नगरसेवक साधना सुरडकर यांना देवानगरी हा नवीन वॉर्ड देण्यात आला; मात्र विश्वभारती कॉलनी हा जुना वॉर्ड द्यावा असा सुरडकर यांचा आग्रह होता. अखेर या वादातून त्यांनी देवानगरी वॉर्डातून उमेदवारी मागे घेतली. तर विश्वभारती कॉलनीत अर्चना शैलेंद्र निळकंठ यांना भाजपची उमेदवारी मिळाली. या कारणावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढला असून प्रचारावर परिणाम जाणवत आहे. 'सर्वसाधारण स्त्री' प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या वॉर्डात संगीता शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्ञानदा कुलकर्णी (अपक्ष), तृप्ती पवार (अपक्ष), अर्चना निळकंठ (भाजप), चंद्रकला दांडगे (काँग्रेस) आणि अनुजा कन्नडकर (अपक्ष) या सहा महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. श्रीकृष्णनगर आणि इतर वसाहतीत उत्तम जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता शिंदे यांनी प्रचारात वेग घेतला आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शिंदे दाम्पत्याचा वावर असून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. तर काँग्रेसच्या चंद्रकला दांडगे पक्षाच्या परंपरागत मतदारांना आवाहन करीत आहेत. मध्यमवर्गीय मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या वॉर्डात भाजपसाठी निवडणूक आव्हानात्मक आहे. कारण मागील पाच वर्षात पुरेशी विकासकामे झाली नसल्याची नाराजी मतदारांमध्ये आहे. सध्या आपल्या पातळीवर प्रत्येक उमेदवाराचा प्रचार सुरू असला तरी कुणाच्याही बाजुने जनमत झुकलेले नाही. विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने एका रुग्णाचा घाटीत मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : 'स्वाइन फ्लू'मुळे बुलडाण्याच्या एका महिला रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्वाइन फ्लू वॉर्डात मंगळवारी (१४ एप्रिल) मृत्यू झाला. वॉर्डात तीन संशयित रुग्ण दाखल आहेत. यापैकी दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. चौता पाडळी (बुलडाणा) येथील लक्ष्मीबाई पुंजाजी गायकवाड (४५) यांना १० एप्रिल रोजी घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात १४० रुग्ण दाखल झाले. त्यातील ५६ रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले व त्यातील २२ रुग्णांचा घाटीत मृत्यू झाला. तर, ३४ रुग्ण बरे झाले, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामाआधीच बिलांना फुटले पाय

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय निवासस्थानाच्या डागडुजीसाठी मंजूर झालेल्या ४० लाखांचे अंतिम प्रारूप तयार होण्यापूर्वीच बिले निघाल्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पीडब्ल्यूडी व आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ आहेत. मग काम पूर्ण न होताच बिले कशी निघाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या सिडको एन - एक भक्तीनगर परिसरातील शासकीय निवासस्थानाच्या डागडुजीची मागणी नोंदविण्यात आली होती. मार्च संपण्यापूर्वी कामांसाठी ४० लाखांच्या मागणीस मंजुरी मिळाली. कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याकडून रितसर प्रक्रियेस परवानगी मिळाल्यानंतरच निविदा काढण्यात येतात आणि मग पुढे काम सुरू होते. अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांनी या कामासाठी महिनाभरापूर्वी मंजुरी दिली. नियमानुसार मंजूर झालेल्या कामाचे तुकडे पाडता येत नाहीत, पण निविदा न करताच या कामाचे दोन तुकडे केले गेले. कंपाऊंड वॉलचे काम सुरू आहे. अंतर्गत दुरुस्तीही अजून पूर्ण झालेली नाही, असे असताना बिले मात्र पूर्ण किमतीची काढली गेली. सुमीत व श्रद्धा मजूर सहकारी संस्थेला २८ जानेवारी रोजी चार तुकडे करून कामाचे वाटप केले गेल्याचे 'पीडब्ल्यूडी'मधील सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यापासून उपअभियंत्यांपर्यंत सर्वांनीच डोळेझाक केली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिकाऱ्यांना दिले पत्र

कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी यांनी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. आरोग्य विभागाचे हे काम कधी मंजूर झाले ? त्यासाठी किती निधी मिळाला ? काम कधी सुरू झाले याबाबत माहिती देण्याबाबत पत्रातून मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांच्याशी संपर्क साधला असता ते कार्यालयात उपस्थित नव्हते. मोबाइलवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा उपसा केल्यास गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यात सध्या पाणीटंचाई भेडसावत असल्यामुळे सांजूळ येथील तलावातून जवळपास २५ वीजपंप तहसीलदार किशोर देशमुख यांनी नुकतेच काढून टाकले. पुन्हा वीजपंपाद्वारे पाणी खेचल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

सध्या सर्वत्र पाणी टंचाई भासत असल्याने तालुक्यातील अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा अत्यल्प पाउस पडल्यामुळे तालुक्यातील बहुतांश तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सांजूळ प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे बेकायदेशीररित्या तलावात विद्युत पंप टाकलेल्या शेतकऱ्यांना समज देऊन पंप हटविण्यात आले. यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांने तलावात पंप टाकल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले. त्यावेळी पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, महावितरण, पोलिस व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

दुष्काळ असल्यामुळे सांजूळ तलावातील वीजपंप समज देऊन हटविण्यात आले आहेत. यापुढे बेकायदेशीररित्या वीजपंप आढळल्यास संबंधितवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

किशोर देशमुख, तहसीलदार, फुलंब्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा तोच कंत्राटदार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत यापूर्वी निकृष्ट काम केलेल्या व दिलेल्या कालवधीत काम पूर्ण न करणाऱ्या चारनिया कन्स्ट्रक्शनलाच पुन्हा एकदा प्राधिकरणाअंतर्गत कोर्ट रोडचे काम देण्यात आले आहे. चारनिया कन्स्ट्रक्शनकडून त्वरित काम काढून घ्यावे अशी मागणी नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

प्राधिकरणाअंतर्गत दोन वर्षांपूर्वी सह्याद्री हॉटेल ते खंडोबा चौक या रस्त्याचे काम अठरा कोटी रुपयात चारनिया कन्स्ट्रक्शन यांच्यासह पाच कंत्राटदारांना देण्यात आले होते. मात्र, दोन वर्षाचा कालवधी लोटल्यानंतरही या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तयार झालेला रस्ता तडकलेला आहे. या रस्त्याच्या कामाचे 'थर्ड पार्टी इन्स्पेक्शन' करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी, प्राधिकरणामार्फत संभाजी चौक ते पंचायत समिती या कोर्ट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता जवळपास ३.६८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे. सदरील रस्ता दोन कंत्राटदाराकडून पूर्ण करण्यात येत आहे. या कामाच्या कंत्राटदारांची माहिती शहरातील सामाजिक कार्यकर्ते बंडेराव जोशी यांनी घेतली असता, कोर्ट रोडच्या दोन्ही रस्त्याचे काम चारनिया कन्स्ट्रक्शनला देण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. यापूर्वी घेतलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट व अद्याप पूर्ण न करू शकणाऱ्या चारनिया कन्स्ट्रक्शन या रस्त्याचे काम कसे देण्यात आले याविषयी त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. कोर्ट रोडचेही काम सह्याद्री हॉटेल या रस्त्याप्रमाणेच निकृष्ट होणार असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

सह्याद्री रस्ता ते खंडोबा चौक या रस्त्याप्रमाणेच कोर्ट रस्त्याचे काम होण्याची शक्यता असून चारनिया कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मागणी करणारे निवेदन जयाजीराव सूर्यवंशी यांनी विभागीय आयुक्त यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदान मिळेना; MIM चिंताग्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेचे आयोजन १६ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या सभेसाठी एमआयएम पदाधिकाऱ्यांकडून जागेची शोधाशोध सुरू आहे पालिका निवडणुकीत एमआयएमने एकूण ५२ वॉर्डातून आपले उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादहून ओवेसी बंधू दाखल होणार आहेत. ओवेसी बंधूच्या प्रचार सभेसाठी आमखास मैदानाचे ‌नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमखास मैदान प्रीमीअर लिगसाठी आधीच बुक करण्यात आले आहे. यामुळे १६ तारखेच्या सभेसाठी तयारी करण्याचा प्रश्न एमआयएम पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.‌

तसेच आमखास मैदानावर ओवेसींची पुन्हा सभा होऊ नये, यासाठी विरोधीकांनी नियोजन केल्याचे समजते. त्यामुळे एमआयएम पदाधिकाऱ्यांनी ओवेसीच्या सभेसाठी रोषन गेट येथील गिरणी मैदान, रेल्वे स्टेशन भागातील एका शाळेच्या मैदानाचाही विचार सुरू केला आहे. तसेच अन्य मैदानांची पाहणी केली असून, यातील एक मैदान निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय काही पदाधिकाऱ्यांनी आमखास मैदान मिळावे यासाठीही आपला प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आमखास लक्की

विधानसभा निवडणुकीत आमखास मैदानावर झालेल्या सभेमुळेच 'औरंगाबाद पूर्व'मध्ये एमआयएमला चांगली मते मिळाली होती. शिवाय 'औरंगाबाद मध्य'मध्ये आमदार इम्तियाज जलील यांच्या रुपाने एमआयएमला विधानसभेत एक जागा मराठवाडयातून मिळविता आली. त्यामुळे आमखास मैदानावरच ओवेसी बंधूंची सभा व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

ओवेसींवर भिस्त

एमआयएमच्या प्रचाराची सारी भिस्त ओवेसी बंधूवर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी उशीरा प्रचार सुरू केला. त्यामुळे त्यांना म्हणाव्या त्या प्रमाणात मतदारांपर्यंत पोहचणे जमले नाही. आता ओवेसी बंधू आल्यानंतरच प्रचाराला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आवेसींच्या वॉर्डनिहाय रॅलीचे आयोजन पक्षाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टी-२०च्या नावाखाली फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रीलंकेतील टी ट्वेंटी स्पर्धा खेळण्यासाठी पाठवू म्हणत क्रिकेटपटूंना ८० हजारांचा गंडा घालणाऱ्या दोघांना सोमवारी (१३ एप्रिल) रात्री गुन्हे शाखेने बेड्या घातल्या. पवन सुलताने, प्रमोद उघडे अशी त्यांची नावे आहेत. संघटनेचा अध्यक्ष अॅड संजय डोंगरे व सचिव सुधीर जाधव फरार आहे. या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचा अंदाज आहे.

२०१२मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे काही दैनिकांत टी ट्वेंटी क्रिकेट खेळण्याबाबत जाहिरात आली. राज्यवर्धन मारुती सोनकांबळे (रा. देगलूर, जि. नांदेड) या गर्व्हमेंट पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने सदर निवडीसाठी हजेरी लावली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अॅड संजय डोंगरे, सल्लागार पवन सुलताने, सचिव सुधीर जाधव व सहसचिव प्रमोद उघडे यांच्यासोबत त्याची भेट झाली.

या शिबिरात राज्यवर्धनची निवड करण्यात आली. संघटनेकडून नेपाळ येथे स्पर्धा असून, त्यासाठी दहा हजार रुपये लागणार असल्याचे त्याला सांगितले. १४ सप्टेंबर २०१२ रोजी नेपाळला जाण्यासाठी राज्यवर्धनने सुधीर जाधवकडे दहा हजार रुपये दिले. त्यानंतर त्याला निवडीचे पत्र मिळाले. तसेच २ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या काळात नेपाळ येथील पोखरा येथे त्याला स्पर्धा खेळवण्यासाठी पाठविले. या स्पर्धेनंतर राज्यवर्धनला श्रीलंकेत जानेवारी २०१३ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याचे पत्र संघटनेने दिले. त्याच्याकडून रोख तसेच बँकेच्या खात्यावर विविध टप्प्यात ८० हजार वसूल केले. पैसे दिल्यानंतर बराच कालावधी उलटला, पण त्याला स्पर्धेसाठी बोलाविले नाही. त्याने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली, तेव्हा त्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्याने पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविले. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी पवन सुलताने व प्रमोद उघडेला अटक केली. संघटनेचा अध्यक्ष संजय डोंगरे व सचिव सुधीर जाधव फरार आहेत. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

बनावट संघटना

आरोपींनी उघडलेली संघटना बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोणत्याही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, बीसीसीआय, आयसीसीआय किंवा केंद्र शासन, राज्य शासनाच्या क्रीडा विभागाची या संघटनेला मान्यता नाही. आपले बिंग फुटू नये म्हणून आरोपींनी राज्यवर्धनचा पासपोर्टही आपल्याकडे ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीत पाणी सोडण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शहरातील सर्व सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दुषित होत आहे. परिणामी, नदीपात्रातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाच गावांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित दुषित पाणी पुढे सोडून देत जायकवाडी धरणावरील हायड्रो प्रोजेक्टमधून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी या भागातील गावकऱ्यांनी केली आहे.

गोदापात्रातील पाणी पुढे सोडून, नाथषष्ठी काळात गोदापात्र कोरडे करण्यात आले होता. नाथषष्ठी झाल्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटल्यावरही जायकवाडी धरणावर कार्यान्वित करण्यात आलेल्या हायड्रो प्रोजेक्ट मधून गोदावरी पात्रात अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यातच पैठण शहरातील सर्व सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सरळ गोदापात्रात सोडण्यात येत असल्याने शिल्लक पाणीसाठा दुषित होत आहे.

सध्या, गोदापात्रातील पाण्यावर पाटेगाव, दादेगाव, कावसन, सायगाव व चनकवाडी या पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून मागच्या एक महिन्यापासून पाणी न सोडल्याने व शहराच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे गोदापात्रातील पाणी दिवसेन्‍दिवस दुषित होत आहे. यामुळे वरील पाचही गावाच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी, या पाचही गावाच्या नागरिकांनी शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भेटून निवेदन दिले. व त्वरित जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी सोमनाथ नजन, गणेश खेडकर, सुधीर रावस, अशोक पाचोडे, लक्ष्मणराव जाधव, मदनराव गोरे, सुमित पाचोडे आदी गावकर्यांनी सह्या केल्या आहे.

कोरड्या पात्रामुळे वाळूचोरांचे फावले

जायकवाडी धरणातून पाणी न सोडल्याने, पैठणला येणाऱ्या भाविक, वारकरी व दशक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांना दुषित पाण्यात स्नान करावा लागत आहे. यामुळे भाविकांमध्येही नाराजी पसरली आहे. पाणी न सोडल्याने सध्या जवळपास सर्वच गोदापात्र कोरडा पडला आहे. याचाच फायदा वाळूचोर घेत असून नाथमंदिराच्या पाठीमागून रात्री वाळूचे अवैध उत्खनन व चोरी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शिक्षण समिती नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या बैठकीत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल शिक्षण समिती सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमेतमुळे प्रलंबित असल्यामुळे शिक्षकांना त्रास होत असल्याबद्दल बैठकीत लक्ष वेधण्यात आले. समितीची मासिक बैठक बुधवारी झाली. सभापती विनोद तांबे अध्यक्षस्थानी होते. कामचुकार लिपिकास कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशी मागणी श्याम राजपूत यांनी केली. पाच वर्षांवरील सेवा झालेल्या शिक्षकांना कायम करावे, उच्च शिक्षण घेतलेल्या पदवींना कार्योत्तर मान्यता देणे, गणित व विज्ञान विषयाचे पदवीधर पदोन्नती देणे, आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतनवाढ द्यावी, जिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढावीत, जीपीएफ प्रकरणे वेळेत निकाली काढावीत आदी मागण्या मांडण्यात आल्या. बबन कुंडारे, सुरेखा जाधव, पुष्पा जाधव, संगीता सुंब, मधुकर वालतुरे, आबासाहेब जगताप, भगवान सोनवणे यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारपीटग्रस्त गावांत पंचनामे सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

नुकत्याच झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागांच्या नुकसानीचा अंदाज काढण्यासाठी प्रशासनाने तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, करंजखेड, पिशोर व नाचनवेल गटातील ३२ गावांमध्ये पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभाग, कृषी विभाग व ग्रामसेवक, असे त्रिस्तरीय पथक फोटोसह पंचमाने करणार आहेत.

तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, करंजखेड, पिशोर व नाचनवेल या गटातील गावांना २०१२ मध्ये कोरडा दुष्काळ व ८ मार्च २०१४ ला गारपिटीला सामोरे जावे लागले आहे. याच परिसरात शनिवारी व रविवारी काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. सतत तीन वर्षांपासून निसर्गाचा मार सहन करावा लागत असल्याने व हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाले आहेत. सिल्लोड तालुक्याला लागून असलेले घाटशेंद्रा, तळनेर, लोहगाव, टाकळी (अंतूर), जामडी, गणेशपूर आदी गावांना जास्तीचा फटका बसला आहे. या परिसरातील १२०० हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, बाजरी, मिरची, मका या पिकांसह आंबा, चिकू, डाळींब बागाचाही समावेश आहे.

अंधानेर, भिलदरी, पिशोर येथील काही शाळांचे व घरांचे पत्रे उडून गेल्याने काही जण जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत. या परिसरात खासदार चंद्रकांत खैरे, उपविभागीय अधिकारी राजू नंदकर, तहसीलदार महेश सुधळकर यांनी भेटी देवून पाहणी केली. शासनाकडून परिसरातील नेवपूर, वाकी, तळनेर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, वडोद, लोहगाव, जामडी (ज,), करंजखेड, रेऊळगाव, शिपघाट,दुधमाळ, भिलदरी (ना.), सायगव्हाण, हरसवाडी, लोंझा, पांगरा, भोपेवाडी, बेलखेडा, नागद, कोंड्बारी, बोरमळी, नागदतांडा, सोनवाडी, वडगाव (जा.), रोजवेपूर, कोळंबी, चिंचोली (लि.), दहीगाव, शेलगाव या गावांत पंचनामे करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ हजार हेक्टर शेती वादळी पावसामुळे बाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

वादळी पाऊस व गारपिटीमुळे सिल्लोड तालुक्यातील चार मंडळात १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची बचत व नियोजन करून रब्बीची पेरणी केली. रब्बी हंगामात सतत घोंगवणारे आभाळ वातावरणातील बदल व अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसला. यावर्षी पिकांसाठी पोषक वातावरण मिळालेच नाही. या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी पिके घेतली. उश‌िरा पेरणी केलेला गहू हरबरा, उन्हाळी बाजरी, मका, बियाण्याचा कांदा, डाळींब, पपई, चिकू, आंबा आदी पिके या गारपिटीत सापडली. यावर्षी कांदा बी चे पीक उत्तम आले होते. ते सोंगणी मळणीच्या टप्प्यात असतांना वादळी वारे व गारपिटीच्या माऱ्यात सापडले. शेतकऱ्यांची पुढील शेती हंगामासाठी या पिकावर भिस्त होती. सध्या पुढील खरीप हंगाम दीड महिन्यावर आले असताने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 'प्राथमिक अंदाजानुसार १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर नेमके क्षेत्र समोर येईल,' अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुभाष अघाव यांनी दिली. स्पॉट पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा प्रत्यक्ष फोटो काढून केला जाणार आहे. त्यानंतर चावडी वाचन केले जाईल, असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस पडूनही टँकरवाढ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. अनेक नदी-नाले भरून वाहिले, मात्र जिल्ह्यातील टँकरची संंख्याही वाढत आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या २२ ने वाढून ३९१ झाली आहे.

पाऊस पडल्यामुळे अनेक जलस्त्रोत पुन्हा पुनरुज्जीवत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांत सरासरी १५.७३ मिल‌ीम‌ीटर पाऊस पडला आहे. त्यापूर्वीही पावसाने अधून मधून हजेरी लावली आहे. त्यामुळे टँकरची संख्या कमी होणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ५ लाख ७२ हजार ८२७ नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

जिल्ह्यातील २५२ गावे व ८ वाड्यांना ७ एप्रिल रोजी ३६९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर मराठवाड्यात ९ एप्रिलपासून वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यात १० एप्रिलपासून पावसाची सुरुवात झाली. जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, गंगापूर, औरंगाबाद तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. पैठण तालुक्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली. तरीही टँकरची संख्या कमी होत नाही.

सध्या सोयगाव वगळता इतर सर्व तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद, पैठण, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांमध्ये टँकरची संख्या मोठी आहे. गेल्या चार दिवसांमध्ये औरंगाबाद तालुक्यात १० मि. मी., फुलंब्री १७.२५, पैठण ३.२५, सिल्लोड ३६.१३, सोयगाव ४०.३३, वैजापूर तालुक्यात २, गंगापूर ५.६७, कन्नड २२.८८ तर खुलताबाद तालुक्यामध्ये ४ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी जास्त पावसाची नोंद आहे त्या ठिकाणी टँकरची संख्या कमी होणे अपेक्षित होते. उलट आठवड्याभरात प्रशासनाने टँकरची संख्या २२ ने वाढवली आहे.

५ लाख नागरिक अवलंबून

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव वगळता इतर सर्व तालुक्यांतील ५ लाख ७२ हजार ८२६ नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील ९८ हजार ४२३, फुलंब्री ५३ हजार ४५०, पैठण १ लाख ३७ हजार ८२६, गंगापूर १ लाख ४२ हजार १९५, वैजापूर ८२ हजार ५७५, खुलताबाद ९ हजार १७१, कन्नड ६ हजार ५२८, तर सिल्लोड तालुक्यातील ४२ हजार ५३० नागकांना टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील टँकर

तालुका टँकर

औरंगाबाद ७१

फुलंब्री ४०

पैठण १००

गंगापूर ७१

वैजापूर ७८

खुलताबाद ०६

कन्नड ०६

सिल्लोड १९

एकूण ३९१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा गळा दाबून खून

$
0
0

औरंगाबाद : वानखेडे नगरात महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या महिलेचा दीर फरार झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. अनैतिक सबंधातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानखेडेनगरात शिवाजी भगवान सोनवणे हा पत्नी रोहिणी, मुलगा जयेश, कार्तिक व लहान भाऊ रामेश्वर सोबत राहतो. मंगळवारी शिवाजी कामावर गेला होता. सायंकाळच्या सुमारास रामेश्वरने दोन्ही मुलांना बाहेर खेळायला पाठवले. घराला कुलूप लावून रामेश्वर निघून गेला. घराला कुलूप लावलेले असल्याने दोन्ही मुले शेजारी राहणाऱ्या आजीकडे झोपण्यास गेली. रात्री शिवाजी कामावरून घरी परतला, मात्र कुलूपाची चावी नसल्याने तो गॅलरीतच झोपला. बुधवारी सकाळी नातेवाईकांच्या मदतीने शिवाजीने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी आतमध्ये रोहिणी पलंगावर बेशुद्धावस्थेत आढळली. घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रोहिणीचा दीर रामेश्वर फरार झाला असून त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, रोहिणीचा पती शिवाजीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच रामेश्वरचा विवाह झाला होता. त्याची पत्नी माहेरी गेलेली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता रोहिणी व रामेश्वरचे भांडण झाले होते. यावेळी तिला पेटवून देण्याचा प्रयत्न रामेश्वरने केल्याची माहिती रोहिणीचा मोठा मुलगा जयेश याने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’शी लहानग्याचे ‘दोन हात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किडनी आजारावर उपचार सुरू असतानाच ताप-सर्दी-खोकल्यासह दम लागून जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आणि तब्बल पाच-सहा दिवस बेशुद्ध अवस्थतेमुळे व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. त्यानंतरही ऑक्सिजनवर, असे तब्बल चार आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वारंवार प्रकृती गंभीर झाली. प्रत्येक वेळी डॉक्टरांनी शर्थ लढविली आणि इच्छाशक्तीच्या बळावर १४-१५ वर्षांचा वैभव मृत्युच्या दाढेतून यशस्वी बाहेर आला.

मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या वैभव बाळासाहेब देशमुख याच्यावर काही महिन्यांपासून किडनीच्या आजारावर (नेफ्रॉटिक सिन्ड्रोम) उपचार सुरू आहेत. त्यातच त्याला सर्दी-खोकला-ताप सुरू झाला आणि दम लागून बेशुद्ध अवस्थेत १७ मार्च रोजी संजीवनी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. किडनी आजारावरील उपचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर व स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळे तातडीने आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. एसआरएल लॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आजाराची खात्री झाली. शरीरातील प्राणवायूचे प्रमाण ९० टक्क्यांपुढे आवश्यक असताना, त्याचे प्राणवायूचे प्रमाण ५० टक्क्यांवर आले होते. प्रकृती गंभीर बनली होती व कधी काय होईल, याची शाश्वती राहिली नव्हती. डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न केले आणि सुधारणेचा बारीकसा किरण दिसू लागला, मात्र त्यानंतरही त्याला अनेक दिवस ऑक्सिजनवर व नंतर वॉर्डात ठेवावे लागले. चार आठवड्यांनी बरा झाल्यानंतर त्याला १३ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली.

पेपर न दिल्याचे शल्य

दहावीची परीक्षा सुरू असतानाच वैभवचे आजारपण बळावले. चार विषयांचे पेपर दिले, पण चार विषयांचे पेपर आजारापणामुळे राहून गेल्याचे शल्य वैभवला आहे. त्याची इच्छाशक्ती चांगली असल्यामुळेच तो आजारातून बाहेर पडू शकला, असे त्याची बहीण विशाखा व आई वैशाली देशमुख म्हणाल्या.

'नेफ्रॉटिक सिन्ड्रोम'च्या उपचारात 'स्टिरॉइड'चा वापर करावा लागतो व 'स्टिरॉइड'मुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळेच स्वाइन फ्लूचा संसर्ग होण्याची आणि आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊनच उपचार सुरू होते. मेंदूच्या संसर्गाचा रुग्णाच्या प्रकृती, प्रतिकारशक्ती व स्वाइन फ्लूशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असू शकतो. 'ईएसआय'मुळे रुग्णाला कुठलाही खर्च आला नाही.

- डॉ. प्रशांत जाधव, संजीवनी बाल रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images