Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुन्हा अवकाळी पावसाचे संकट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पुन्हा एकदा या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शहराच्या कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. रविवारी (१० मे) कमाल ३९.२ तर किमान २१.६ अंश सेल्सियस असे नोंदवण्यात आले. गेल्या काही दिवसांपसासून शहराच्या कमाल व किमान तापमानात कायम चढउतार होत आहे. त्यामुळे दुपारी प्रचंड ऊन असते, तर रात्री मात्र वादळीवाऱ्यासह पावसाचे प्रकार घडत आहेत. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे शहरातील नागरिक मात्र हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात उन्हाचा पारा किंचित कमी होणार असला, तरी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

११ ते १६ मे दरम्यान शहरात किमान तापमानाचा पारा २५ ते २६ अंश सेल्सियसपर्यंत, तर कमाल तापमानाचा पारा ३८ अंशापर्यंत राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान १३ मे रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगची ढकलगाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इंजिनीअरिंगच्या परीक्षा अखेर तेरा दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. तसे परिपत्रक प्राचार्यांना पाठविण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार २७ मेपासून अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या परीक्षा सुरू होतील.

विद्यापीठाने अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १४ मेपासून सुरू होतील, असे जाहीर केले होते. निकालाला लांगलेला विलंब अन् रिड्रेसल प्रकरणांचा ताळेबंद न बसविता आल्याने अखेर विद्यापीठाला परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर व्हायला एप्रिल अखेर लागला. यानंतर अद्याप रिड्रेसल प्रकरणांचा गोंधळ सुरू आहे. नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा २७ मेपासून सुरू होणार आहेत. पदवी, पदव्युत्तरच्या या परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील. यामुळे परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणी असेल, निकालाची प्रक्रिया असेल. हे निकालही लाबंण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही विद्यापीठांच्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपत आल्या आहेत, असे असले तरी आपल्या विद्यापीठाची परीक्षा मे अखेर सुरू होणार आहेत. यामुळे पालक, विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.

१ जूनपासून आर्किटेक्चरचे पेपर

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षासह फार्मसी, एमफार्म, बी.टेक. अभ्यासक्रमाच्या परीक्षा २७ मे पासून सुरू होतील. अभियांत्रिकी पदव्युत्तर एमई, एमटेक व आर्किटेक्चर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १ जूनपासून घेण्यात येतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

'फार्मसी'ची फरफट

अभियांत्रिकीमुळे फार्मसी, बी.टेक. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचीही फरफट होत आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षाही नव्या वेळापत्रकानुसार होणार आहे. अभियांत्रिकीसह या विद्यार्थ्यांनाही नव्या वेळपत्रकानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.

सत्र संपलेले आहे. त्यामुळे परीक्षा ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेता आली असती. वेळापत्रक पुढे गेले असले, तरी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल हेही खरे आहे.

- डॉ. सुधीर देशमुख, प्राचार्य, जेएनईसी.

परीक्षा पुढे गेल्याने पुढची प्रक्रियाही लांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे लक्षात घेता वेळापत्रक पुढे ढकलणे फारसे संयुक्तीक वाटत नाही.

- डॉ. उल्हास शिऊरकर, संचालक, देवगिरी इंजिनीअरिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर उन्हाळ्यात येळगंगेत पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

दुष्काळाच्या झळा बसत असतांना श्रीक्षेत्र वेरूळ येथील ऐतिहासिक येळगंगा नदीपात्रात ठिकठिकाणी पाण्याचे डोह व पुरातन विहीर सापडली आहे. भर उन्हाळ्यातही हे डोह व विहीर पाण्याचे भरलेली आहे.

शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी सांसद आदर्श गाव योजनेत वेरूळची निवड केल्यानंतर येळगंगा नदीच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुष्काळी परिस्थितीत नदीपात्रात पाणी लागल्याने वेरूळमध्ये आनंद साजरा होत आहे. यामुळे मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. भयंकर दुष्काळ अनुभवलेल्या गावाचा कायापालट येळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनामुळे होत आहे. योग्य पद्धतीने जलसंधारण केले, तर भूजलपातळी उंचावून विहिरी अथवा तलावातून मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते.

येळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेत येळगंगा नदीपात्रात वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणे, झाडेझुडपे हटविण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानाची प्रेरणा घेऊन कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचार्यांनी ५६ हजार रुपये, महाराष्ट्र बँकेने पाच लाख रुपये, अॅक्सीस बँकेने चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली. बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, वेरूळचे ग्रामस्थ, स्वंयसेवी संस्था, उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला.

सध्या येळगंगा नदीवर पोलिसांनी श्रमदानातून वनराई बंधार्याचे काम केले आहे. वेरूळ लेणी क्रमांक ३२पासून कोसळणारा सीता न्हानी धबधब्याजवळच्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील गाळ काढून भारतीय पुरातत्व विभागानेही हातभार लावला आहे. स्वंयस्फुर्तीने अनेकजणांचा या कामी हातभार लागत आहे. श्रमदान तसेच आर्थिक मदत, डिझेलच्या खर्चासाठी मदत, जेसीबी यंत्र अशा विविध माध्यमातून अनेकांची मदत होत आहे.

येळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू असून नदीपात्रावर जास्तीतजास्त सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढून गावाचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघू शकतो.

- शैलेश क्षीरसागर, सदस्य जिल्हा परिषद

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रेरणेने कुठलाही निधी न घेता सगळ्यांनी मिळून राबविलेला हा उपक्रम वरदान ठरणारा आहे. यामुळे ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

- वासुदेव सोळुंके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदान देण्यात टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाकडून शालेय साहित्य व इमारत दुरुस्तीसाठी जाहीर केलेले ३ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान येऊन एक महिना उलटला. मात्र, शिक्षण विभागाकडून अजूनही या अनुदान वाटपात टोलवाटोलवी सुरू आहे, असा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे.

शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान २००४ पासून बंद होते. दहा वर्षानंतर (२०१३) हे अनुदान सुरू करण्यात आले. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे शाळांना हे अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार औरंगाबादमधील शाळा व्यवस्थापनाने केली आहे. शासनाने शाळांना पाचव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांच्या पगारानुसार चार टक्के वेतनेतर अनुदान व एक टक्का इमारत देखभाल भत्ता देण्याची तरतूद केली. शालेय साहित्य, इमारत दुरुस्तीसाठीचा हा निधी मार्चमध्ये आलेला आहे. आता मे महिन्याचा पंधरवाडा होत आला, तरी हा निधी शाळांना वर्ग झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ३ कोटी ९६ लाखांचा निधी आला, असून सुमारे तीनशे शाळांना या निधीचा लाभ होणार आहे. लेखा परीक्षणाच्या नावाखाली शिक्षणाधिकारी कार्यालय वेळकाढूपणा करत असल्याचे शाळा व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. गतवर्षी शाळांच्या थेट बँक खात्यावर हा निर्धी वर्ग करण्यात आल्यानंतर यंदा हा खटाटोप का? असा सवालही करण्यात आला आहे.

शासनाने शाळांना पाचव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांच्या पगारानुसार चार टक्के वेतनेतर अनुदान व एक टक्का इमारत देखभाल भत्ता देण्याची तरतूद केली आहे. मार्चमध्ये हा निधी आलेला असताना, दोन महिने होत आले तरी निधी शाळांना वर्ग करण्यात आलेला नाही. कॅम्प लावत बँक खाते, लेखा परीक्षणाची माहिती घेतली जात आहे. महिनाभर ही प्रक्रिया सुरू आहे. सर्व माहिती शिक्षण विभागाकडे असताना पुन्हा माहिती भरून घेतली जात आहे. इतर जिल्ह्यात निधी वितरित झाला. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात शाळांना वेठीस धरले जात आहे.

- वाल्मिक सुरासे, अध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात पडला; मसनात गेला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाने झोडपले, राजाने मारले तर तक्रार कुणाकडे करायची? अशी एक म्हण आहे. जयभवानीनगरमधील शिवाजी महाराज पुतळा चौकातील रस्ता उखडला आहे. येथेच वाहनांची पार्किंग केलेली असते. वाहनधारकांच्या जीवावर बेतणाऱ्या या कोंडीकडे प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे आम्ही तक्रार तर कुणाकडे करायची, असा सवाल इथला रहिवासी आणि वाहनधारक करतो आहे.

शिवाजी महाराज चौकात मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वसंतराव नाईक चौक ते मुंकुंदवाडी रेल्वे स्टेशनला जाणारे प्रवाशी याच मार्गाचा वापर करतात. याशिवाय पुंडलिकनगरहून राजनगरला जाण्यासाठी याचा चौकातून वाहनधारक जातात. सिडको एन २ च्या कामगार चौकातून येणारी वाहने या चौकातून वळण घेत, पुंडलिकनगरकडे जात असतात. सध्या सिडको एपीआय कॉर्नर ते वसंतराव चौकासह रामगिरी हॉटेल पर्यंत मोठा उड्डाणपुल तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे जयभवानीनगर भागातील अनेक वाहनधारक हे जयभवानीनगर चौकाचा वापर करित आहेत. या चौकाला हातगाडीवाल्यांच्या अतिक्रमणाने वेढलेले आहे. त्यामुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याशिवाय कामगार चौकाकडे जाणारा आणि कामगार चौकाकडून जयभवानीनगर भागाकडे येणारा रस्ताही खराब झाला आहे. शिवाय जयभवानीनगर चौकातून पुंडलिकनगरकडे जाणारा रस्ताही खराब झाला आहे. याकडे महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. या चौकात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाडयामुळे चौकातील रस्ताच अरुंद होत आहे. याचा फटका चौकातून जाणाऱ्या वाहनधारकांना सोसावा लागत आहे.

नागरिकच होतात टॅफिक पोलिस

चौकात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीच उपाययोजना नाही. रिक्षा व अॅपेचालकांची या ठिकाणी सर्रास मनमानी सुरू असते. भर रस्त्यात रिक्षा व अॅपे उभ्या करून वाहतूक कोंडी केली जाते. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षा या पुतळ्याभोवती उभ्या केल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जमत नाही. हीच गत सिडकोच्या तेराव्या योजनेकडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर हातगाड्या उभ्या केल्या जातात व त्यापुढे रिक्षाही उभ्या असल्याने तब्बल अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडी होते. शेवटी नागरिकच मध्यस्थी करून ही कोंडी सोडवतात.

अतिक्रमणाचा वेढा

शिवाजी महाराज चौकात हातगाड्यांचे अतिक्रमण असते. अगदी रस्त्यावर, दुकांनांपुढे विक्रेते साहित्य घेऊन बसलेले असतात. यामुळे वाहन चालवताना कायम अपघात होण्याच्या शक्यता जास्त आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही विक्रेते बसलेले असतात. आपल्यामुळे वाहनांना त्रास होत आहे किंवा वाहनांची कोंडी आपल्यामुळे होऊ शकते, याची कल्पना या विक्रेत्यांना नसते. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई नियमित चौकात होत नसल्याने, या फटका वाहनधारकांना सोसावा लागत आहे.

वाहतूक पोलिसांचा कामापुरता मामा

जयभवानीनगर चौकात लहान मोठे अपघात कायम घडतात. महिन्यातून एकदा किंवा दोनदा व्हीव्हीआयपी येणार असतील तेव्हाच वाहतूक पोलिसांची चौकासाठी डयुटी लावली जाते. अन्यथा हा चौक वाहतूक कोंडी, बेशिस्त प्रवासी वाहतूक आणि वाहनांच्या अपघातासाठी मोकळा ठेवला जात आहे. या चौकातील रस्त्यांवर अनाधिकृत असलेल्या रिक्षावाल्यांना या चौकातून बाहेर काढण्यासाठी पोलिस येत असतात. सदर पोलीस रिक्षावाल्यांना चौकातून बाहेर काढतातही, मात्र पोलिस गेल्यानंतर पुन्हा चौकात रिक्षांचे अतिक्रमण कायम असते.

भाजीमंडईसाठी वेगळी जागा असावी

अॅपे रिक्षा, रिक्षा, हातगाड्या, फेरीवाले साऱ्यांचे या चौकात अतिक्रमण असते. पोलिसांनी पिटाळले तर ते पुन्हा येतात. या परिसरात अनेकदा भाजी विक्रेते बसतात. भाजी विक्रेत्यांच्या गाड्यांसमोर ग्राहकांची खरेदी सुरू असते. त्यामुळे चौकात वाहनांच्या रांगा लागतात. या चौकाची अवस्थाही गजानन महाराज मंदिर चौकाप्रमाणे होण्याची भीती आहे. त्यामुळे परिसरात भाजीमंडईसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी लागेल.

जयभवानीनगरचा चौक जेव्हा मी निवडून आलो तेव्हा खराब होता. चौकात नऊ ते दहा लाखांचे गट्टू बसविले. या चौकातील काही रस्ते खराब झाले आहेत. गजानन महाराज ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्ता तयार होत आहे. चौकातील अतिक्रमण हटविण्याबाबत मी वारंवार पत्र दिले होते. महापालिकेचे अधिकारीच अतिक्रमण हटवित नाहीत. रिक्षा त्रास कमी व्हावा यासाठी या चौकात वाहतूक पोलिस कर्मचारी नेमा म्हणूनही पत्र दिले होते. त्यावरही कारवाई झालेली नाही.

- बालाजी मुंढे, माजी नगरसेवक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग कॉलेजांची पंधरा दिवसांत तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, पॉलिटेक्निक आदी व्यवसायिक अभ्यासक्रमांची तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून सहसंचालक कार्यालयांना तपासणीचे निर्देश देण्यात आले असून पंधरा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुविधा नसणाऱ्या कॉलेजांतील प्रवेश रोखले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पारंपरिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक कॉलेजांमध्येही सोयीसुविधांचा अभाव आहे. यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत असल्याने शासनाने संस्थांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी तंत्रशिक्षण सहसंचालक स्तरावर होणार असून तशा प्रकारचे पत्र देण्यात आली आहेत. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वसतिगृह, शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी, वाहतूक व्यवस्था, कँटीन, वीज, पाणी, इंटरनेट कनेक्शन आदी सुविधांची तपासणी केली जाणार आहे. यासह कॉलेजांनी अखिल भारतीय ‌तंत्रशिक्षण परिषदेला दिलेल्या शपथपत्रात व प्रत्यक्षात असलेली स्थिती तपासली जाणार आहे. कॉलेज तपासणीचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश सहसंचालकांना देण्यात आले आहेत.

विभागात १८४ कॉलेज

मराठवाड्यात तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित १८४ इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमसीए, एमबीए कॉलेज आहेत. एआयसीटीई संलग्नीकरणाची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने तपासणी होत नाही. या तपासणीमुळे कॉलेजांतील स्थिती समोर येणार आहे.

सूचनेनुसार तपासणीसाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. विविध सुविधांबद्दलची सत्यता पडताळून शासनास वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्यशासन कॉलेजबद्दलचा निर्णय घेईल.

- डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शाळांनी शुल्क मागितल्याचे निष्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत चाटे स्कूल आणि भास्कराचार्य शाळेत पालकांकडून मोफत प्रवेशासाठी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. 'आरटीई'नुसार २५ टक्के जागांवरील मोफत प्रवेश शाळा पालकांकडून पैसे वसूल करीत असल्याचे वृत्त 'म.टा.' ने प्रकाशित केले आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने ही कारवाई सुरू केली.

'म. टा.' च्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोमवारी (११ मे) पथके स्थापन करून शाळांची तपासणी सुरू केली आहे. या पथकांनी सोमवारी बारा शाळांची तपासणी केली, त्यात अनेक शाळांनी बनवेगिरी केल्याचे उघड झाल्याची माहिती देण्यात आली. लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालक शाळांमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे अठरा ते वीस हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. त्याबद्दल पालकांनीही शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ही तपासणी पुढील दोन दिवस चालणार आहे. शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी स्वतः चाटे स्कूल आणि भास्कराचार्य शाळेत पाहणी केली. तपासणीत शाळेने शुल्क मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे उपासनी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य उपकेद्र बंद; नागरिकांचे हाल

$
0
0

जिल्हा परिषदेचे उपकेंद्र एप्रिलपासून बंद

म. टा. प्रतिनिधी, सातारा

नगरपालिका स्थापन झाल्यामुळे सातारा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषदेने एप्रिलमध्ये बंद केले आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे हाल होत आहेत. नगरपालिकेकडे अद्याप कोणतीही यंत्रणा नसल्याने गरोदर महिला व बालकांसाठी आवश्यक असलेल्या एमसीटीएस (मदर अॅण्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टम) क्रमाकांसाठी कुठे जावे, हा मोठा प्रश्न आहे.

सातारा येथील उपकेंद्र बऱ्याच वर्षांपासूनचे आहे. या उपकेंद्रांतर्गत लसीकरण, एमसीटीएस क्रमांक देणे आदी कामे केली जात होती. परंतु, आता हा भाग नगरपालिकेत गेल्यामुळे जिल्हा परिषदेने एप्रिलपासून उपकेंद्र बंद केले आहे. नगरपालिकेची स्थापना होऊन ९ महिने झाले असले तरी नगरपालिकेची स्वत:ची कोणतीच यंत्रणा नाही. सातारा-देवळाई येथील ग्रामपंचायतीच्या ४२ कर्मचाऱ्यांवर पालिकेचा गाडा ओढला जात आहे.

शिवाय मुख्याधिकाऱ्यांकडेही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे ते येथील नागरिकांना आज तरी वैद्यकीय सुविधा देऊ शकत नाहीत. यामुळे नागरिकांचे हाल होत असून, कुठल्या का यंत्रणेमार्फत होईना परंतु नागरिकांना सेवा पुरविण्याची मागणी जिल्हा परिषदत सदस्या योगिता बहुले यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा-देवळाई पालिकेची दोन महिन्यांत निवडणूक

$
0
0

निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सातारा-देवळाई नगरपालिका की महानगरपालिका हा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी निवडणूक आयोगाने जुलै, ऑगस्ट महिन्यात येथील निवडणूक घेण्याची हालचाल सुरू आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवले आहे.

ऑगस्ट २०१४ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये येथील निवडणूक होणे अपे‌क्ष‌ित होते. त्यानुसार ३ फेब्रुवारी रोजी वॉर्ड रचना व आरक्षणही जाहीर झाले. दुसरीकडे त्याच दिवशी हा परिसर महानगरपालिकेत घेण्यासंदर्भातील ठरावही घेण्यात आला. त्यामुळे महानगरपालिकेत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. या निर्णयाविरूद्ध विनायकराव हिवाळे यानी न्यायालयात धाव घेतली. तेव्हा राज्य शासनाने अधिसूचना मागे घेतल्याने नगरपालिकाच राहण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु, मनपा निवडणुकीनंतर पुन्हा या हालचालींनी वेग धरला. मनपात घेण्यासंदर्भात हरकती व सूचना मांडण्याची संधी दिली. विभागीय आयुक्तांमसोर झालेल्या सुनावणीत तिघांनी नगरपालिकाच राहू द्यावी, असे म्हणणे मांडले. महानगरपालिकेत समावेश करावा, असे कुणीच म्हटले नाही. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

निवडणूक आयोगाने राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या ६६ नगर पंचायती व १ नगरपालिकेची निवडणूक जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात घेण्यासंदर्भात शुक्रवारी (८ मे ) जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. नगरपालिकेची निवडणूक २५ वॉर्डासाठी होईल. यासंदर्भातील वॉर्ड रचना, आरक्षण याबाब पूर्ण झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी या परिसराचा महानगरपालिकेत समाविष्ट झाला, तर पोटनिवडणूक होऊन, तर २ किवा ५ वॉर्डासाठी निवडणूक होईल. परंतु, त्यासाठी नव्याने वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करावे लागेल. यापूर्वी वॉर्ड रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात नगरपालिका क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्याच्या चर्चेने उचल खालली. त्यामुळे कार्यकर्ते ढेपाळले होते. आता पुन्हा एकदा राजकीय जुळवा-जुळव करण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे सात कोटी नाल्यात जाणार !

$
0
0

महापौरांनी केली पाहणी, वर्षभर साफसफाई करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षाप्रमाणे यंदाही नाला सफाई मोहिमेबद्दल महापालिकेत चर्चा सुरू झाली आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी शहरातील प्रमुख नाल्यांची पाहणी केली, फक्त पावसाळ्याच्या तोंडावर नाल्यांची साफसफाई न करता वर्षभर ही मोहीम राबवा, असे आदेश त्यांनी दिले. दरम्यान नाला सफाईच्या कामासाठी सात कोटी रुपये खर्च केले जाण्याची शक्यता आहे.

पावसाळा सुरू होणार असल्यामुळे महापालिकेचे प्रशासन नाले सफाईवर लक्ष केंद्रीत करू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौर तुपे यांनी काही प्रमुख अधिकाऱ्यांसह रोहिला गल्लीचा नाला, महापालिका इमारतीच्या पाठीमागचा नाला, बारुदगरनाला, नाथ सुपर मार्केटचा नाला, औरंगपुरा भाजी मंडईचा नाला, औषधीभवनचा नाला याची पाहणी केली. नाल्यांची अवस्था फारच वाईट असल्याचा अभिप्राय त्यांनी नोंदवला. त्यांनी नालेसफाईच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. नालेसफाईचे नियोजन फक्त पावसाळ्यात न करता वर्षभर नाले साफ राहतील, या दृष्टिने नियोजन करा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नालेसफाईच्या कामासाठी आयुक्त, शहर अभियंता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी आपापसात समन्वय ठेवावा अशी सूचना त्यांनी केली.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौरांच्या नाले पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी नालेसफाईच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे सुरू केले आहे. सुमारे सात कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक फक्त पावसाळ्याच्या काळातीलच असेल असे बोलले जात आहे. नालेसफाईची महापालिकेची आतापर्यंतची पध्दत लक्षात घेता पहिल्याच पावसात नाले साफ होतात.

पालिकेच्या पथकातर्फे किंवा पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांतर्फे नाल्यांची साफसफाई होताना क्वचितच दिसते. त्यामुळे सुमारे सात कोटी रुपयांचा निधी 'नाल्यात' जाण्याचीच शक्यता आहे.

फवारणी करण्याचे आदेश

नाल्याची दुर्गंधी, त्यामुळे होणारे आजार याची गंभीर दखल घेत महापौर तुपे यांनी नाल्यांवर औषधी फवारणी करण्याची सूचना केली. दलालवाडी भागात त्यांना नागरिकांच्या घरात दूषित पाणी आढळले. घरांमधील पाणीसाठ्यांमध्ये अबेट औषध टाकण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहराज्यमंत्र्यांनी संकेत पाळायला हवा होता : खडसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी बिअरबारचे केलेले उद्घाटन संकेताला धरून नाही. त्यांनी संकेत पाळायला हवा होता. हा प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते,' अशी मार्मिक प्रतिक्रिया सोमवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

गृहराज्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी अहमदनगरमध्ये एका बिअरबार आणि परमीट रुमचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुधीर तांबे आदी राजकीय नेते उपस्थित होते. या उद्घाटनानंतर वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्र्यांनी बिअरबारचे उद्घाटन केले तर कसे, अशी चर्चा रंगत आहे. यावर उत्तर देताना खडसे यांनी हा प्रकार योग्य नसल्याचे सांगितले.

दरम्यान, शहरातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत खडसे म्हणाले की, 'शहरातील पानचक्की, घाटी परिसरामध्ये अनेक मालमत्ता या वक्फ बोर्डाच्या आहेत. जुनाट व जीर्ण झालेल्या ऐतिहासिक दरवाजांमुळे पुल तसेच रस्त्यांचे कामे करता येत नाही. यामुळे या भागातील एक रस्ता तयार करण्याची जबाबदारी ही वक्फ बोर्ड घेणार असून या संदर्भातील १० कोटी रुपये अल्पसंख्यांक विभागाकडून महापालिकेला देण्यात येतील. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये हा रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.' शहरातील ऐतिहासिक दरवाजांमुळे रस्त्यांचा विस्तार करणे शक्य नाही, या संदर्भात काही वर्षांपूर्वी प्रदीप जैस्वाल यांनी प्रश्न उपस्थित केला होता, ही आठवणही खडसे यांनी यावेळी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंग खासगी व्यक्तीच्या घशात

$
0
0

पैठणगेटचे पे अँड पार्क पुन्हा वादात; नागेश्वरवाडीत टवाळखोरांचा उच्छाद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पार्किंगच्या जागांवर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पैठणगेट येथील बहुचर्चित पार्किंग पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यक्तीच्या घशात घातले असून, नागेश्वरवाडी येथे पार्किंगसाठी राखून ठेवलेल्या भूखंडावर टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे महापालिकेला पार्किंगच्या जागांपासून उत्पन्नच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पैठणगेट, गुलमंडी येथे महापालिकेने 'पे अँड पार्क'ची व्यवस्था केली आहे. याशिवाय अन्य भागातही 'पे अँड पार्क'ची व्यवस्था करण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे. नागेश्वरवाडी येथील पार्किंगची जागा त्यातलाच एक भाग आहे. पैठणगेटचे 'पे अँड पार्क' नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. महापालिकेच्या नावाने या ठिकाणाहून वाहनचालकांकडून वसुली केली जाते. मात्र, पालिकेच्या लेखी या ठिकाणच्या वाहनतळासाठीच्या कंत्राटदाराची नोंदच नाही. त्यामुळे दिवसभरात किती पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे पालिकेत भरले जातात का, या बद्दल संशय निर्माण झाला आहे. या वाहनतळाशेजारी मोठी कचराकुंडी आहे. या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे वाहनतळात वाहने उभे करण्यासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागेश्वरवाडी येथेही महापालिकेने वाहनतळ तयार करून 'पे अँड पार्क'ची व्यवस्था केली आहे. मात्र, या ठिकाणी वाहने उभी केली जात नाहीत. काही टवाळखोरांच्या उच्छादामुळे या ठिकाणचे नागरिकही त्रस्त झाले आहेत. प्रामुख्याने दुपारच्या वेळी या भागात टवाळखोरांचा त्रास वाढला आहे.


पैठणगेट येथील वाहनतळाच्या संदर्भात लगेचच माहिती देता येणार नाही. मी सध्या बाहेरगावी आहे. उद्या शहरात आल्यावर माहिती घेऊन देतो.
- वसंत निकम, मालमत्ता अधिकारी, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्तमानात सकारात्मकता हवी!

$
0
0

सेकंड इनिंग साकारताना

आर. पी. दुसे, औरंगाबाद

संयमाच्या सदगुणाबरोबर यशस्वी संसार फुलविण्यासाठी परस्पर सामंजस्य असणे गरजेचे आहे. एक वाक्यता करून ध्येय गाठण्याचे कसब त्यामुळेच निर्माण होते. नसता संसार रथाची छत्तीसच्या आकड्यात गुंतण्याची शक्यता असते. दुधात मिसळेली साखर जसे आपले अस्त‌ित्व ठेवते, पण आपल्या स्थ‌ितीमध्ये बदल करते. दुधाशी एकरुप होते. तसेच पती पत्नीच्या विचारांचे मिलन होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे छत्तीस चे रुपांतर त्रेसष्ठमध्ये होवू शकते. तेव्हा परस्पर विचारांचा सन्मान करून एकमेकाच्या भावनेचा समरसतेचा सकारात्मक विचार केला, तर आयुष्य एकमदम प्रसन्न होऊन जाते. आयुष्याची संध्याकाळ सुखाच्या झडीचा आपल्यावर वर्षाव करते.

पती पत्नीच्या मनोमिलनात संयमाची पाल चुकचुकू नये, नसता दुधात मिठाचा खडा पडलाच म्हणून समजा. संशयी वृत्ती हे दुःखाचे मूळ असून त्यामुळे मधूर फळालासुद्धा मुकावे लागते आणि आयुष्याच्या सरळ मार्गावर काट्याची पेरणी झाल्यासारखे होते. सहसा अहंपणाला दूरच ठेवल्यास संयम, सामंजस्य निश्चित जवळ आल्याशिवाय राहणार नाही. गद्य आणि पद्याची जीवनाशी संगत करताना एका लेखकाने सांगितले आहे की पुरुष हा गद्य असेल तर स्त्री ही पद्य आहे. गद्य पद्य ह्या संग्रहाचे नाव संसार आहे. सुखी जीवन आहे. तेव्हा परस्पर रंग, रुप, कर्म, आकार याचा अहंमपणा न बाळगता हा संसार रथ चालवला तर मग दुःख, कष्ट, अपमान विरह कोठे शिल्लक राहणार आहे.

आत्मसमर्पणाची इच्छा, अतिदुर्लभ महत्त्वाकांक्षा, सन्मानाची अपेक्षा, न ठेवता सन्मानाने प्रतिसाद देवून पतीपत्नीमध्ये विश्वास, आनंद निर्माण होवू शकतो आणि त्यामुळे आयुष्यात शाश्वसता निश्चित निर्माण होवू शकते. निवृत्त जीवनात सुख, समाधान, आनंद हवा अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. त्या दृष्टीने संपूर्ण आयुष्य आपण खर्ची घालत असतो, पण त्याचे बिजांकूर तारुण्यात रुजत असतो. त्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ भोगविलास असू नये. केवळ बाहेरच्या रंगाला भुलू नये. अंतर्गत संस्कार, वृत्ती, प्रेम, आपुलकीला जास्त महत्त्व देवून त्याची जपवणूक केली तर ह्रद्यात स्फूर्ती, उल्हास, आनंद आपल्या ठायी आल्याशिवाय राहणार नाही आणि निवृत्तीच्या काळात त्याची रसाळ फळे आपल्याला चाखायला मिळतील. तेव्हा ज्येष्ठांना आपल्या भविष्यात डोकावून पहा, आपली गाडी कोणत्या स्टेशनवर थांबली आहे. वर्तमानात तरी सकारात्मक बदल करा.


प्रेम प्राप्त करायचे असेल, त्याच्या जीवनात लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या अंगी सहनशीलतेचा असली पहिजे. विशेषतः पति पत्नीच्या नात्यामध्ये प्रेमाचा वर्षाव व्हावा. आयुष्यात कटू गोड प्रसंगाची उजळणी होते. जीवन संग्राम जवळून पाहण्याची ती पर्वणी असते. अनेक गुण अवगुणाची झळ पोहचत असते, अशा वेळी चांगल्या गोष्टीनी हुरळून न जाता किंवा कठीण गोष्टींची हुरहुर मनात न ठेवता संयमाने आपण त्याचा आपल्या वाटचालीत उपयोग करून घ्यावा. त्यातून संसार रथ पुढे न्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायकोर्टाची राज्य शासनास केबीसी प्रकरणी नोटीस

$
0
0

सहा हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण

म . टा . विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

नाशिक येथील केबीसी क्लब अॅण्ड रिसॉर्ट व केबीसी मल्टी ट्रेड प्रा. लि. या दोन कंपन्यांती सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत न्या. संजय गंगापूरवाला व न्या. एआयएस चीमा यांनी राज्य शासनासह सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, केबीसी मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, केबीसी क्लब अण्ड रिसॉर्टस प्रा. लि. यांना नोटीस बजावण्याचे दिले आहेत.

ही याचिका रमेश गंगाराम भालकर व इतर ७० गुंतवणूकदारांतर्फे करण्यात आली आहे. नाशिक येथील केबीसी क्लब अॅण्ड रिसॉर्ट व केबीसी मल्टी ट्रेड प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांच्या गोठवण्यात आलेल्या खात्यांतून मिळालेले, लॉकरमध्ये मिळालेल्या रकमा व सोने तसेच घोटी, चांदवड येथील रिसॉर्टसाठी घेण्यात आलेली जागा व केलेले बांधकामाची शासनाने नेमलेल्या प्रशासकाकडून जप्त करण्यात आले. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमा परत मिळविण्याकरिता दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी ६ मे रोजी झाली. या याचिकेवर १७ जून २०१५ रोजी पुढील सुनावमी होणार आहे. तोपर्यत शासकीय अतिरिक्त अभिभोक्ता यांनी शासनातर्फे अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे का व त्या अधिकाऱ्याने काय कारवाई केली, याबाबत माहिती घेण्यास सांगितले.

नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्र व गुजरात व आंध्रप्रदेशांत या कंपन्यांनी २०१० पासून गुंतवणूक योजना राबविली. या प्रकरणी कंपनीविरोधात आडगाव पोलिस स्टेशन, नाशिक येथे ७ मार्च २०१४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याचिकाकर्त्यातर्फे सतीश तळेकर, उमाकांत औटे, अमोल चालक, अजिंक्य काळे, तर शासनातर्फे गिरीश थिगळे हे काम पाहत आहेत.

दरम्यान, केबीसीचे मुख्य कार्यकारी संचालक भाऊसाहेब चव्हाण व संचालिका आरती चव्हाण १७ जून २०१४ रोजी भारत सोडून सिंगापूरला पोलिसांच्या परवानगीने पलायन केले. त्यांना त्याच दिवशी जमीन मिळाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य समन्वयकास अटक

$
0
0

परिचारिका पुनर्नियुक्तीसाठी घेतली नऊ हजाराची लाच

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालयातील समन्वयकाला नऊ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कंत्राटी पारिचारीकेच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यासाठी ही लाच मागितली होती. ही कारवाई सोमवारी (११ मे) दुपारी साडेतीन वाजता आमखास मैदानाजवळील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आली.

राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात एक परिचारिका अकरा महिन्याच्या कंत्राटावर कार्यरत आहे. त्यांना काम समाधानकारक असल्यास कालावधी वाढवून देण्यात येतो. या परिचारिकेने पुनर्नियुक्तीकरीता जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिवाजी मच्छिंद्र पाचोडे याच्याकडे अर्ज केला होता. हा आदेश देण्यासाठी शिवाजी पाचोडे याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. या परिचारिकेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याबद्दल तक्रार केली.

या तक्रारीवरून आमखास मैदानाजवळील राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सापळा रचण्यात आला. यावेळी पाचोडे याला परिचारिकेकडून नऊ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सापळ्याचे नियोजन केले. अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीश घोडके, अमोल वडगांवकर, मीरा सांगळे, नितीन गायकवाड आदींनी ही कारवाई यशस्वी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बक्षिसाच्या आमिषाने तरुणाला २७ हजारांचा ऑनलाइन गंडा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन खरेदी करीता ग्राहक म्हणून निवड झाल्याचे सांगत बक्षिसाचे आमिष दाखवून तरुणाला २७ हजार ५०० रुपयाला गंडवण्यात आले. ही घटना रविवारी (१० मे) सायंकाळी घडली. याप्रकरणी जवाहर कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश गिरी (वय ३२ रा. काबरानगर) या तरुणाच्या मोबाइलवर ०१२०३८९३३०० या क्रमांकावरून रविवारी फोन आला. समोरील व्यक्तीने मिड वे शॉप या ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या साइटवर खरेदी करीता काही निवडक ग्राहकांना ऑफर देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर खरेदी केल्यास हमखास बक्षीस लागणार असल्याची हमी त्या व्यक्तीने दिली. गणेश यांनी होकार कळवल्यानंतर त्याने मिडवे शॉपच्या वेबसाइटवर लॉगिन करण्यास सांगितले. गणेशने लॉगिन केल्यानंतर त्याला 'एंट्री फी' तसेच विविध कारणे दाखवत त्यांनी सुरुवातीला सहा हजार ९९९ व नंतर ऑनलाइन २० हजार ५०० रुपये, असे एकूण २७ हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर या व्यक्तीने गणेश यांच्यासोबत संपर्क टाळला. पैसे भरल्यानंतर समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जवाहर कॉलनी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांचा कर्मचाऱ्यावर हर्सूल जेलमध्ये हल्ला

$
0
0

गोंधळ घालण्यास विरोध केल्याने मारहाण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोंधळ घालण्यास विरोध केल्यामुळे एका कैद्याने हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील एका पोलिसावर हल्ला केला. त्याच्या हल्ल्यात पोलिस जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (११ मे) सकाळी साडेअकरा वाजता घडली. जखमी पोलिसावर उपचार करण्यात आले असून याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सुल कारागृहात मेहताब अली (रा.मालेगाव) हा कैदी शिक्षा भोगत आहे. हा कैदी अपहरणाच्या गुन्ह्यातील आहे. मेहताब अली सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता गोंधळ घालत होता, तसेच नियमबाह्य वर्तवणूक करीत होता. त्याला शिवानंद कोल्हे या कर्मचाऱ्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मेहताबने त्याला विरोध करीत त्याच्यावर लोखंडी पट्टीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तोंडावर वार बसल्याने कोल्हे जखमी झाला. त्यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात कोल्हे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक विनोद शेकदार यानी दिली.

मारहाण करणारा कैदी बेशिस्तीसाठी कुख्यात

मेहताबअली बेशिस्त वर्तणूकीबद्दल प्रसिद्ध आहे. त्याला याआधी नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे बेशिस्त वर्तन केल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. तेथेही त्याने धुडगूस घातला. त्यामुळे त्याची २३ नोव्हेंबर २०१४ रोजी येरवड्यातून हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. हर्सूल जेलमध्येही या ठिकाणी देखील त्याचे वर्तन बेशिस्त ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंड्सविरोधात शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सीबीएसईची मान्यता नसतानाही प्रवेश देणाऱ्या इंडस शाळेवर कारवाई करा, अशी तक्रार पालकांनी सोमवारी थेट शिक्षण उपसंचालकांकडे केली. ही पालकांची फसवणूक असून, या शाळेवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणी आठ दिवसांत कारवाई करू, असे आश्वासन शिक्षण उपचसंचालकांनी दिले आहे.

शहरातील अनेक इंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. काही शाळांना तर मान्यताच नसल्याचे समोर आले आहे. असे असताना शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळा सर्रास सुरू आहेत. इंड्स स्कूलच्या पालकांनी सोमवारी (११ मे) पोलिस आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळेबाबत तक्रार दिली. सीबीएसईची मान्यता नसताना, व्यवस्थापन मान्यता असल्याचे सांगते. आकर्षक जाहिरातीद्वारे, प्रेझेंटेशन द्वारे पालकांना भुलवते व प्रवेश घेण्यास भाग पाडते, असा आरोप पालकांनी केला आहे. सीबीएसईची मान्यता नसल्यामुळे आठवीनंतर पाल्यांना इतर शाळेत प्रवेश घेण्यास सांगितले जाते. पालकांची ही फसवणूक असून शाळेवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे पालकांनी केली आहे. पाच वर्षांपासून शाळेचा हा प्रकार सुरू आहे. शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे यांची भेट घेत पालकांनी सविस्तर चर्चा केली तसेच कारवाईची मागणी केली. यावेळी शीतल काळुंगे, हेमंत पाचुरकर, विशाल पाटील, सचिन परळकर, प्रफ्फुल वाकळे, अजय पाटील, सी. व्ही. धवलशंकर, सुनील शिंदे, प्रज्ञा मुंडे, नीता देशमाने, रवींद्रसिंग, संतोष काळुंगे, संजय इंगळे यांची उपस्थिती होती.


पालकांची तक्रार मी ऐकली आहे. शाळेकडे मान्यता नसताना शाळा चालविली जात असल्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल, तशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, आठ दिवसात कारवाई केली जाईल.
- सुधाकर बनाटे, शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद.

शाळा पाच वर्षांपासून हा प्रकार करते आहे. पालकांची ही फसवणूक असून, आम्ही याबाबत शिक्षण विभागाला निवेदन सादर केले आहे. पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार आहोत.
- शीतल काळुंगे, पालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपाइं ऐक्यासाठी आठवलेंचा पुढाकार

$
0
0

प्रकाश आंबेडकरांशी संवाद साधण्याची तयारी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रातील मंत्रीपदासाठी भाजपकडून मिळालेला ठेंगा, औरंगाबाद पालिका निवडणुकीतील दारुण पराभव, रिपाइंचा एकही कार्यकर्ता निवडून येत नाही याचे शल्य उराशी घेत अखेर रामदास आठवले यांनी रिपाइं ऐक्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधण्याची तयारी त्यांनी दर्शवली. सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा मनोदय व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऐक्य करावायाचे असेल तर त्यासाठी एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांनी आराखडा तयार करावा. ऐक्य झाल्यानंतर काही नेते, कार्यकर्ते फुटले तर अशांना समाजाने धडा शिकवित त्यांना थारा देऊ नये. ऐक्य घडविण्यासाठी आता जनतेने उठाव केला पाहिजे. ऐक्याबाबत प्रसंगी आपण स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधू.'

आठवले यांनी फडणवीस सरकारचे कानही टोचले. ते म्हणाले, 'राज्यातील महायुतीच्या सरकारचे काम चांगले सुरू आहे, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामाला गती द्यायला हवी. राज्यात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. ते थांबविण्यासाठी गाव पातळीवर दलित अत्याचार निवारण समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने गावात प्रबोधन करून अत्याचार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

राज्यात मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली दलित अत्याचार समिती असते. त्या समितीची प्रत्येक महिन्याला बैठक होणे अपेक्षित असते. मात्र, सरकार आल्यापासून एकही बैठक झाली नाही,' असे आठवले यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस रिपाइंचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, दौलत खरात आदी उपस्थित होते.

आम्हाला अच्छे दिन केव्हा?

'सत्तेत दहा टक्के वाटा देऊ, असे ल‌िख‌ीत वचन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती करताना भाजपने दिले. दहा नाही तर किमान पाच टक्के वाटा दिला पाहिजे. विधान परिषदेत रिपाइंला एक जागा देऊन राज्यात एक मंत्रीपद आणि केंद्रात एक मंत्रीपद द्यावे.' याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला. दिल्लीत हवा असलेला बंगला निश्चित मिळेल, असा आशावाद व्यक्त करायलाही ते विसरले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर विद्यापीठ प्रशासन हलले !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अवैध वृक्षतोड आणि गुराढोरांचा मुक्त संचार रोखण्यासाठी अखेर विद्यापीठ प्रशासनाने दोन प्रवेशमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच परिसरात सुरक्षा वाढविण्यासाठी २० सुरक्षारक्षकांची भर्ती करण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांपासून 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'उजाड विद्यापीठ' या वृत्तमालिकेतून विद्यापीठाच्या अनागोंदीवर प्रकाश टाकला होता.

शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिक सरपणासाठी झाडे तोडतात. मोठ्या फांद्या तोडण्यासाठी लोखंडी आकडे वापरत असल्याचे पाहणीत आढळले होते. विद्यापीठ परिसरात नियमित सरपणासाठी वृक्षतोड सुरू असूनही सुरक्षारक्षक रोखत नव्हते. या प्रकारामुळे विद्यापीठाची वनराई झपाट्याने घटत आहे. दुर्मिळ झाडांसाठी प्रसिद्ध असलेल्या वनस्पतीशास्त्र उद्यानाची दूरवस्था झाली आहे. उपद्रवी लोकांचा वावर वाढल्यानंतर उद्यानाचे अतोनात नुकसान सुरू आहे. या गैरप्रकारांबाबत 'मटा'ने 'उजाड विद्यापीठ' ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. सतत तीन दिवस वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासन जागे झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी सुरक्षा विभागाची तातडीने बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच वृक्षतोड आणि गुरांचा मुक्त संचार रोखण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. पहाडसिंगपुरा व बेगमपुरा भागातील नागरिक रहदारीसाठी वापरत असलेला सामाजिशास्त्र विभाग इमारतीजवळील प्रवेशमार्ग बंद करण्यात येणार आहे. तसेच गेस्ट हाउसच्या मागील मार्गही बंद केला जाणार आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी दोन्ही मार्ग बंद राहणार आहेत. सध्या विद्यापीठात केवळ ३८ सुरक्षारक्षक असल्यामुळे नवीन २० सुरक्षारक्षकांची भर्ती होणार आहे. या माध्यमातून विद्यापीठाचा लौकिक कायम ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


उद्यानाचे काय?
कधीकाळी विद्यापीठाचा लौकिक असलेली वनस्पतीशास्त्र उद्यानाची वाताहत झाली आहे. या उद्यानाला पूर्वीचे वैभव मिळवून देण्याची गरज आहे. दुर्मिळ वृक्ष वठले असून काही झाडे तोडण्यात आली आहेत. या उद्यानाच्या जतन आणि संवर्धनासाठी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images