Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

व्यापाऱ्याला २ लाखाला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुना मोंढा भागातून व्यापाऱ्याची दुचाकीला लावलेली सव्वा दोन लाखाची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. व्यापाऱ्याचे लक्ष पैशाच्या बॅगपासून विचलित करण्यासाठी चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या कुलूपात फेविक्विक टाकून ठेवले होते. कुलुप उघडण्याच्या प्रयत्नात व्यापारी असताना चोरट्यांनी संधी साधून पैशांची बॅग लांबविली.

श्रीकांत विजयनारायण खटोड (वय ३७ रा. खटोड कॉम्पलेक्स, निराला बाजार) यांचे नवा मोंढा भागात जय ट्रेडींग कंपनी नावाने दुकान आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता खटोड दुकान उघडण्यासाठी आले. यावेळी बँकेत भरण्यासाठी त्यांनी सव्वा दोन लाखाची रक्कम एका बॅगेत आणली होती. दुकानापाशी आल्यानंतर त्यांनी नोकराला दुकान उघडण्यासाठी चावी दिली. नोकर कुलुप उघडण्याच्या प्रयत्नात असताना त्याला कुलुपामध्ये फेविक्विकसारखा सारखा चिकट पदार्थ तसेच काड्या टाकलेल्या आढळून आढळल्या. हा प्रकार त्याने खटोड यांना सांगितला. खटोड पैशाची बॅग अॅक्टीव्हा दुचाकीला अडकवून कुलुप उघडण्यासाठी गेले. खटोड आणि नोकर कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात असतानाच संधी साधून चोरट्यांनी पैशाची बॅग लंपास केली. थोड्या वेळाने हा प्रकार खटोड यांच्या लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची दिरगांई

खटोड यांनी घडलेल्या प्रकाराची क्रांतिचौक पोलिसांना तातडीने माहिती दिली. मात्र, पोलिसांनी कोणतीही तत्परता दाखवली नाही. सायंकाळी पोलिस पथकाने घटनास्थळी जावून माहिती जाणून घेतली. यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

पाळत ठेवून कृत्य?

शनिवारी दुकानातील व्यवहाराची रक्कम खटोड यांनी घरी नेली होती. रविवारी असल्याने बँक बंद होती. सोमवारी ही रक्कम त्यांना बँकेत भरावयाची होती. मात्र, त्यापूर्वी ही घटना घडली. चोरट्यांना या गोष्टीची कल्पना असल्याची शक्यता पोलिसांना वाटत असून त्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांनी कुलुप बिघडवण्याचा प्रकार केला असल्याची शंका व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


LBT साठी साताऱ्यात कँप लावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा भागातील व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करासाठी नोंदणी करावी यासाठी महापालिका सातारा भागातील ग्रामपंचायत कार्यालयात कॅंप लावणार आहे. व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी एक महिन्याचा अवधी दिला जाईल.

सातारा-देवळाई परिसर शासनाने महापालिकेत समाविष्ट केला आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापाऱ्यांना एलबीटी लागू करण्यासाठी महापालिकेची यंत्रण सज्ज झाली आहे. याच संदर्भात महापालिकेने सातारा - देवळाई भागाचे ढोबळ सर्वेक्षण केले. त्यानुसार या भागात पाचशे ते साडेपाचशे छोटे - मोठे व्यापारी असण्याची शक्यता आहे. या सर्व व्यापाऱ्यांना आता स्थानिक संस्थाकराची नोंदणी करावी लागेल.

शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी सातारा-देवळाई परिसरात गोदाम थाटले आहेत. त्यात विविध साहित्य ठेवले आहे. आता या गोदामातील साहित्यालाही एलबीटी आकारली जाणार आहे. एलबीटीच्या माध्यमातून सातारा-देवळाई भागातून दरमहा २५ ते ३० लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा अंदाज पालिकेने बांधला आहे.

व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी करावी म्हणून सातारा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिबिर सुरू करण्याचे नियोजन आहे. या संबंधीची फाइल आयुक्तांना सादर केली आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर लगेचच शिबिर सुरू केले जाईल.

- संजय पवार, एलबीटी अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादुरुस्त मोबाइलचे पैसे ३० दिवसांत द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निराला बाजारातील 'झी मोबाईल शॉपी'मधून खरेदी केलेल्या नवीन मोबाईल हँडसेटमध्ये अनेक बिघाड आढळले आणि दुरुस्तीसाठी अधिकृत सर्व्हिस सेंटरकडे तब्बल ४५ दिवस हँडसेट देऊनही कुठलीच दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतलेल्या ग्राहकाला पाच हजार रुपये नुकसान भरपाईसह हँडसेटचे पूर्ण पैसे ३० दिवसांत व्याजाने देण्याचे आदेश मंचाने 'झी शॉपी'ला दिले आहेत.

सिडको एन सात परिसरातील रहिवासी अमोल लक्ष्मण भालेराव यांनी २३ ऑगस्ट २०१२ रोजी 'स्पाईस' कंपनीचा मोबाईल हँडसेट 'झी'मधून १०,२०० रुपयांना खरेदी केला. मात्र, हँडसेट खरेदी केल्यानंतर त्याचे 'टच पॅड' दुरुस्त न होणे, धूळ जमा होणे, स्पीकर बंद पडणे, 'प्रॉक्झिमिटी सेन्सर'चा दोष असणे आदी बिघाड वारंवार होत होते. हे दोष दूर करण्याची विनंती भालेराव यांनी 'झी शॉपी'ला अनेकवेळा केली. तसेच कॅनॉट प्लेस येथील 'स्पाईस मोबिलिटी लि.' या कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरकडे तब्बल ४५ दिवस हँडसेट देऊनही हँडसेटची दुरुस्ती करून देण्यात आली नाही. या संदर्भात भालेराव यांनी ई-मेलद्वारे सतत पाठपुरावा केला. मात्र, तरीसुद्धा उपयोग झाला नाही म्हणून भालेराव यांनी जिल्हा ग्राहक मंचात ४ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली आणि हँडसेटची रक्कम परत मिळावी व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली. या संदर्भात, हँडसेटमध्ये गंभीर स्वरुपाचे दोष आहेत आणि वारंवार दुरुस्ती करुनही त्या दोषांचे निर्मूलन झाले नसल्यामुळे तक्रारदारास हँडसेट खरेदीचा उपयोग झाला नाही आणि म्हणून तक्रारदाराची तक्रार योग्य आहे, असे मत ग्राहक मंचाने व्यक्त केले.

१२ टक्के व्याजाने ग्राहकाला पैसे

या प्रकरणी 'झी मोबाईल शॉपी'ने भालेराव यांना २३ ऑगस्ट २०१२ पासून दरसाल दरशेकडा १२ टक्के व्याजाने १०,२०० रुपये ३० दिवसांच्या आत परत द्यावेत. तसेच 'झी शॉपी' व 'स्पाईस' कंपनीने तक्रारदारास या तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासाबद्दल वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तरित्या पाच हजार रुपये देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी १३ मे २०१५ रोजी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोलगेटचे कामगार संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहतीत २२ वर्षांपासून सुरू असलेली कोलगेट कंपनी येत्या जूनपासून बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कामगार, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून उर्वरित स्टाफला एक जूनपर्यंत कंपनीत काम शिल्लक ठेवण्यात आले आहे. औरंगाबादेतील कंपनीत कोलगेट दंत पावडरचे उत्पादन होत होते.

कोलगेट पामोलिन इंडिया लिमिटेड ही बहुराष्ट्रीय कंपनी २२ वर्षांपूर्वी औरंगाबादेत सुरू झाली. सुरुवातीला कोलगेट दंत पावडर, साबण, शेव्हिंग क्रीमचे उत्पादन होत होते. पुढे साबण आणि शेव्हिंग क्रीमचे उत्पादन बंद झाले आणि केवळ दंत पावडर तयार होऊ लागली. गेल्या काही वर्षांत दंत पावडरची मागणी घटत असल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापनाने वाळजूचा प्लँट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

एमआयडीसीकडून कंपनीने त्याकाळी घेतलेल्या जमिनीची किंमत आज १५० ते २०० कोटींच्या घरात आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे कळताच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींना कंपनीला भेट घेऊन व्यवस्थापन प्रतिनिधींशी चर्चा केली, पण त्यातून स्पष्टपणे कंपनी बंद होणार की नाही याबाबत ठोस माहिती पुढे आली नाही. दंत पावडरचे मार्केट कमी झाल्यानेच प्लँट बंद करणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. १५० कामगार, कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत. कंपनी बंद झाल्यास १५० कुटुंबीयांचा अडचण होणार आहे.

आम्ही काही दिवसांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना भेटलो. कंपनी बंद न करता दुसऱ्या वस्तूचे उत्पादन सुरू करावे, जेणेकरून कामगारांची उपासमार होणार नाही, अशी मागणी केली होती. व्यवस्थापनाने त्याचा सकारात्मक विचार केला तर कामगार हिताचे होईल.

- लक्ष्मण साक्रूडकर, जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद मजदूर युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणाला थारा नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जो पर्यंत आपण महापौर आहोत तो पर्यंत खासगीकरण, बीओटीला थारा देणार नाही. जी काही कामे करायची आहे ती महापालिका स्वतः करेल,' अशी रोखठोक भूमिका महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

साफसफाईच्या कामाचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. एक खासगी संस्था नेमून त्या माध्यमातून सर्वेक्षणासह साफसफाईच्या संदर्भात सल्ला घेण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. या संदर्भातील फाइलवर आज आयुक्तांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती पत्रकारांनी महापौरांना दिली. त्यावर तुमचे मत काय, असा प्रश्न विचारला. या बाबत बोलताना महापौर तुपे म्हणाले, 'आयुक्तांकडे कोणती फाइल दाखल झाली आणि त्या फाइलवर आयुक्तांनी स्वाक्षरी केली का, या बद्दल मला काहीच माहिती नाही. आयुक्तांनी स्वाक्षरी केली असली तरी ती फाइल अंतिम निर्णयासाठी सर्वसाधारण सभेतच येणार आहे. या पुढे कोणताही उपक्रम खासगीकरणाच्या माध्यमातून राबवायचा नाही असे आपले स्पष्ट मत आहे. घनकचऱ्याच्या संदर्भात यापूर्वी महापालिकेत तसा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा प्रयोग फसला. त्यात शहराचेच नुकसान झाले. बीओटीच्या प्रकल्पांचीही तशीच स्थिती आहे. बीओटीच्या माध्यमातून जे प्रकल्प विकसित करण्यात आले, त्यात महापालिकेला पाठीमागची जागा दिली. बीओटी प्रकल्पातील दर्शनीभागातील दुकाने विकसकाने विकली. खासगीकरण आणि बीओटीचा प्रयोग शहरासाठी लाभदायक ठरलेला नाही. त्यामुळे यापुढे अशा योजना राबवायच्या नाहीत असे आपण ठरवले आहे,' असे तुपे यांनी स्पष्ट केले.

खासगीकरणातून फसलेले प्रकल्प

सत्यम फर्टिलायझर्स.

रॅमके (घनकचरा व्यवस्थापनासाठी नेमलेली कंपनी).

एएमटी (औरंगाबाद म्युनिसीपल ट्रांसपोर्ट-सिटीबस सेवा).

हैदराबादची स्पेक (मालमत्ता कर आकारणीसाठी नेमलेली कंपनी).

पथदिव्यांची बीओटीच्या माध्यमातून देखभाल.

जाहिरात फलकांचे खासगीकरण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालव्यांतून पाणी सोडल्याचा ‘औरंगाबाद’वर नगण्य परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र, हिरडपुरी आणि आपेगाव बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे औरंगाबादच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे औरंगाबाद वाटर युटिलिटी कंपनीकडून सांगण्यात येत आहे, मात्र सध्या डाव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा दाब फार कमी आहे. त्यामुळे त्याचा पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला आहे. सध्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी वीज निर्मिती केंद्र, हिरडपुरी, आपेगाव बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र याविषयी चौकशी केली असता परळीसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. १६ मेपासून अडीच दशलक्ष घनमीटरप्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत १६ दशलक्ष घनमीटर सोडण्यात आले आहे. कालव्यातून पाणी चोरी होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाची पथके तैनात करण्यात आली आहे. १२० किलोमीटरचे अंतर पार करून जायकवाडीचे पाणी वीज केंद्रापर्यंत पोहोचले आहे.

आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठीही धरणाच्या डाव्या कालव्यातून १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अाहे. गेल्या शनिवारपासून बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या डाव्या कालव्यातून ११०० क्युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. यापैकी ९०० क्युसेक हे परळी वीज केंद्रासाठी व उर्वरित २०० क्युसेक दोन्ही बंधाऱ्यासाठी आहे.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग हाउस धरणाच्या डाव्या कालव्याजवळ आहे. सध्या धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा काय परिणाम होत असेल, याबाबत जायकवाडी पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अशाेक चव्हाण यांनी सांगितले की, डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातून औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग हाउसपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याचा दाब थोडा कमी होत आहे, मात्र त्याचा पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभ, पाइप लाइनकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराची पाणीपुरवठा योजना समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या ताब्यात देऊन महापालिकेला नऊ महिने उलटले, या काळात कंपनीने शहरात नवीन जलकुंभाचे बांधकाम केले नाही आणि नवीन जलवाहिनीही टाकली नाही. केवळ पाणीपट्टी वसुलीवरच कंपनीचा भर आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात समप्रमाणात पाणी वाटपाचा प्रश्न कायमच आहे.

महापालिकेने १ सप्टेबर २०१४ रोजी पाणीपुरवठा योजना 'समांतर'च्या ताब्यात दिली. त्यानंतर कंपनीने पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यात पैठण येथे नाथसागरावरील पंप हाउसपासून औरंगाबाद शहरापर्यंत २००० मिलीमीटर व्यासाची पाइप लाइन टाकण्याचे काम लगेचच सुरू होणे अपेक्षित होते, पण ते अद्याप सुरू करण्यात आले नाही. शहरांतर्गत पाइप लाइनच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यालाही प्राधान्य देण्यात आले नाही. पाइप लाइन टाकण्याच्या कामाबरोबरच शहराच्या विविध भागात जलकुंभ बांधण्याचे काम कंपनीने हाती घेणे गरजेचे होते. हे कामही अद्याप हाती सुरू करण्यात आले नाही. शहरात सध्या ५२ जलकुंभ आहेत. नवीन १३ जलकुंभ बांधण्याची तरतूद महापालिकेने कंपनीबरोबर केलेल्या करारात केली आहे. नऊ महिन्यांत करारातील या मुद्यालाही कंपनीने स्पर्श केला नाही. त्यामुळे नऊ महिन्यांत कोणतेही काम सुरू केले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर कंपनीने जलकुंभ बांधण्यासाठी विविध ठिकाणी माती परीक्षणाचे काम केले, पण त्यानंतर पुढे त्यात काहीही प्रगती झाली नाही. जलवाहिनीचे काम आणि जलकुंभ बांधण्याचे काम होत नाही, तोपर्यंत शहराचा पाणीप्रश्न कायम राहील, असे मानले जात आहे.

शिवाजीनगरचा जलकुंभ अद्याप वापराविना

पाणीपुरवठ्याच्या नेटवर्कमध्ये शिवाजीनगरमध्ये उभारलेला जलकुंभ अद्याप जोडण्यात आला नाही. एवढा एक जलकुंभ वगळता अन्य जलकुंभ पालिकेच्या ताब्यात आहेत. शिवाजीनगरचा जलकुंभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्याच ताब्यात असल्याची माहिती आहे. या जलकुंभाला क्रॉस कनेक्शन करण्यात आलेले नाही. जलकुंभापासून स्वतंत्र पाइप लाइन टाकण्यात आलेली नाही. जलकुंभ भरण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे या जलकुंभाचा वापर करण्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसा वाढूनही टंचाइचे चटके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंप हाउसमधून गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यावर्षी पाण्याचा उपसा वाढला आहे, तरीही शहरात पाण्याची टंचाई मात्र कायमच आहे. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने केलेल्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

औरंगाबाद शहराला जायकवाडीच्या नाथसागरातून पाणीपुरवठा केला जातो. नाथसागराच्या डाव्या कालव्यावर महापालिकेने यासाठी पंप हाउस बांधले आहे. तेथे जुने आणि नवीन असे दोन पंप हाउस आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून ४२० अश्वशक्ती क्षमतेचे आठ पंप २४ तास कार्यरत असतात. त्यांच्या मदतीने उपसलेले पाणी शहरापर्यंत आणले जाते. दरवर्षी मे महिन्यात पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करते. त्यातून मार्ग काढण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; गेल्यावर्षी मे महिन्यात १४० ते १४५ एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाण्याचा उपसा केला जात होता. वेळापत्रक निश्चित करून हे पाणी शहरात वितरित केले जात असे. महापालिकेने १ सप्टेंबर २०१४पासून शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या ताब्यात दिली आहे. त्यानंतर कंपनीने किमान तीन ते चार वेळा जलवाहिनीच्या दुरुस्तीची आणि जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्याची कामे केली. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात किमान १० एमएलडी वाढ झाल्याचा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला होता.

गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा नाथसागरातून केला जाणारा पाण्याचा उपसाही वाढला आहे. सध्या १५० ते १५५ एमएलडी पाणी उपसले जाते. म्हणजे यावर्षी १० ते १५ एमएलडी पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यानंतरही शहरात पाण्याचा प्रश्नाने गंभीर स्वरून घेतले आहे.

वाढलेले पाणी कुठे जाते?

गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ एमएलडी पाणी वाढलेले असेल तर, ते कुठे जाते, असा प्रश्न शहरातील पाण्याची समस्या पाहिल्यावर पडतो. वाढलेले पाणी कंपनीतर्फे परस्पर विकले जाते का, नवीन ग्राहक कंपनीने शोधले आहेत का, असे प्रश्न निर्माण होतात. कंपनीने नवीन ग्राहक शोधलेले नसतील आणि पाण्याची परस्पर विक्री कंपनीतर्फे केली जात नसेल तर मग वाढलेल्या पाण्याचे काय होते, याचा शोध संबंधितांनी घेण्याची गरज आहे.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणी वाटपाचे नियोजन नाही. पैठणहून जेवढे पाणी उचलले जाते आणि शहरात तेवढे पाणी आणले जाते. त्या पाण्याचे वितरण योग्य प्रकारे केले जात नाही. पाणी विकण्याचा धंदा या कंपनीने सुरू केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण वाढले आहे, पण ते नागरिकांच्या घरापर्यंत पोचत नाही. या संदर्भात सर्वसाधारण सभेत आवाज उठवू.

- राजेंद्र जंजाळ, सभागृहनेते, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम व्यवसायातील मंदी LBT च्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बांधकाम व्यावसायात मंदी आल्याचा फटका महापालिकेला बसू लागला आहे. सिमेंट आणि स्टील (लोखंड) यांच्या माध्यमातून होणारे उत्पन्न घटले असून, त्यामुळे महापालिकेला दरमहा सुमारे ५० लाख रुपयांना मुकावे लागत आहे.

स्थानिक संस्थाकर (एलबीटी) महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. शहरातील विविध व्यावसायिकांची नोंदणी या करासाठी करून महापालिकेने एलबीटीचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून एलबीटीचे उत्पन्न घटू लागले आहे. त्याचे प्रमुख कारण बांधकाम व्यवसायातील मंदीचे असल्याचे सांगितले जाते. सिमेंटच्या माध्यमातून महापालिकेला गेल्यावर्षी १३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते तर, स्टीलमधून २१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे या उत्पन्नास १० टक्के घट झाली आहे. सिमेंट आणि स्टील यांतून मिळणारे एलबीटीचे उत्पन्न त्यामुळे दर महिन्याला ५० लाख रुपयांनी घटले आहे. ही तूट वर्षभरात पाच ते सहा कोटींचा घरात जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

तूट भरून निघणे अवघड : औरंगाबाद शहरासाठी बांधकाम व्यवसाय हा कणा असल्याचे मानले जाते. दरवर्षी या कराच्या उत्पन्नात १० टक्के वाढ होणे अपेक्षित असताना यंदा हा आलेख उतरता झाला आहे. १० टक्क्यांनी उत्पन्न घटले आहे. येत्या काळात ते भरून निघेल, याची शाश्वती देता येत नाही, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टरलाइटचे अधिकारी चौकशीच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीत घातक रसायन सोडल्याप्रकरणी 'स्टरलाइट'च्या आणखी तीन अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. प्लांट हेड अनिल भदोरिया, युनिट हेड नटराजन व राजेंद्र डोईफोडे यांचा यात समावेश आहे.

खाममध्ये सोडलेले घातक रसायन स्टरलाइट कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. या कंपनीचा पुरवठा व्यवस्थापक अमित रत्नपारखी, रसायनांची विल्हेवाट लावणारे आरोपी सुमित खांबेकर, आगाखान व इतरांना अटक केलेली आहे. गुन्हे शाखेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर कंपनीकडून कागदपत्रे मिळाली. कंपनीचा अधिकारी राजेंद्र डोईफोडे यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर ते रजेवर निघून गेले. कंपनीच्या अन्य अधिकांऱ्याचीही चौकशी करायची आहे. कंपनीच्या असहकार्याच्या धोरणामुळे गुन्हे शाखेने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तीन अधिकाऱ्यांना समन्स बजावल्याची माहिती तपास अधिकारी अविनाश आघाव यांनी दिली.

कंत्राटदाराचे असहकार्य

ठाणे येथील आर. सी. मेहता याची जेटसन्स, गुजरातमधील वापी येथील प्रकाश चित्रोडा याची शिवम सोल्यूशन आणि मध्य प्रदेशातील खारगौन येथील बालाजी क‌ेमिकल इंडस्ट्रिज यांना कंपनीने कंत्राट दिले होते. आर. सी. मेहता यांनी वृद्ध आणि आजारी असल्याचे सांगून अटकपूर्व जामीन मिळविला. गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांचे सहकार्य मिळत नसल्याने गुन्हे शाखेने कोर्टात जामीन रद्द करण्याबाबत अर्ज सादर केल्याचेही आघाव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोबीघाटावर पालिकेचेच नाव

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या अडीच दशकापासून कोर्टात प्रलंबित असलेला शाहनूरवाडी येथील धोबीघाटच्या जागेचा प्रश्न सुप्रीम कोर्टात निकाली निघाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णायानुसार तहसील प्रशासनाने सात-बारावर मूळ मालकाचे नाव लावले होते. खंडपीठाचा निर्णय रद्द करून औरंगाबाद प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला. यामुळे जागेच्या सात-बारावर औरंगाबाद महापालिकेचेच नाव लागणार आहे.

शाहनूरवाडी येथील धोबीघाटच्या जागेवर महापालिकेने बीओटी तत्त्वावर मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी केली. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णायानुसार तहसील प्रशासनाने सात-बारावर मूळ मालकाचे नाव लावले होते. हा निर्णय रद्द ठरवून सुप्रीम कोर्टाने मूळ मालकास जागेच्या मालकीसाठी योग्य कोर्टाकडे जाण्याची मुभा दिली आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे कोट्यवधींच्या जागेवर महापालिकेने उभारलेला प्रकल्प संकटात सापडण्याची चिन्हे होती. आता त्या जागेवरील प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे.

या जागेसंदर्भात मालक भीमसिंह परदेशी आणि महापालिका यांच्यात वाद होता. महापालिकेने या जागेवर २००६मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा निर्णय घेतला. बीओटी तत्त्वावर तेथे मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करण्याता आली आहे. कॉम्प्लेक्सच्या मागील बाजुच्या मोकळ्या जागेवर युरोपियन पद्धतीचे मार्केट उभारण्यात आले आहे. तत्पूर्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेले अपील फेटाळून लावले होते. या जागेसंदर्भात मूळ मालक भीमसिंह परदेशी यांचे पूत्र जयसिंह परदेशी यांनी २०१०मध्ये मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल २६ मार्च २०१३ रोजी लागला होता. हायकोर्टाने परदेशी यांचा दावा मान्य केला होता. या निर्णयाला पालिकेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. याचा निर्णय महापालिकेच्या बाजुने झाला.

कोट्यवधींचा भूखंड

हे प्रकरण २६ वर्षे जुने आहे. ही जागा जयसिंग परदेशी यांच्या मालकीची होती. महापालिकेने त्यांच्याशी वाटाघाटी करून जमिनीचा मोबदला देऊन संबंधित मालकाकडून ही जमीन घेतली होती. या जागेवर दावा करत भीमसिंग परदेशी यांनी कोर्टात धाव घेतली. जमिनीची मालकी मूळ मालकाची आहे, असा निर्वाळा हायकोर्टाने दिला होता. भिरूबाई गंगाराम मोघे यांचा हस्तक्षेप अर्ज सुप्रीम कोर्टात निकाली काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाण्यांचा दुष्काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

यंदा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या पेरणीमध्ये वाढ होणार आहे. मात्र, सोयाबीनच्या बियाण्यांच्या मागणी व पुरवठा यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात खरिप हंगामात उडीद, मूग, मॉडर्न सुर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तूर, व तीळ ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. आता पेरा पद्धतीत बदल होत असून, शेतकरी नगदी पिकांवर भर देत आहेत. सोयाबीन आणि कापसाकडे कल वाढू लागल्यामुळे बियाण्यांचा काळाबाजार होत आहे. सोयाबीनचा तुटवडा लक्षात घेवून आताच सोयाबीनच्या दराने उचल खालली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला पाणीटंचाईचा फटका बसला. पाणी कमी पडल्यामुळे सोयाबीन परिपक्व बनले नाही आणि उत्पादनात घट झाली. त्यामुळे यंदा खरिप हंगामात सोयाबीनचा तुटवडा भासेल, अशी भविष्यवाणी शासनाच्या कृषी विभागानचे केली आहे. शिवाय यास मार्केट यार्डातील जाणकार व्यापारीही दुजोरा देत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र २०१३ च्या खरिपात १ लाख ४५ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनची वाढती मागणी लक्षात घेवून सोयाबीन बियाण्यासाठी कृषी विभिगाने महाबीजसहीत अन्य खासगी कंपन्याकडे मागणी नोंदविली आहे. मात्र, मागणीच्या निम्मे बियाणेसुद्धा उपलब्ध होईल किंवा नाही याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

बियाण्याची पळवापळव

कृषी विभागाने सोया‌बीन बियाण्याबाबत दिलेल्या या इशाऱ्यामुळे सोयाबीनची पळवापळव बाजारपेठेत आता सुरू झाली आहे. नेमका याचा लाभ व्यापाऱ्यांना अपेक्षित आहे. खरिप हंगाम सुरू होण्यास आता दहा-बारा दिवसांचा कालावधी उरला असतानाच शेतकऱ्यांकडून आताच सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील व्यापारी बियाण्याचा तुटवडा भासवित अधिक लाभ घेण्याच्या दृष्टीने हातोहात हे बियाणे विक्रीसाठी बीड किंवा अन्य जिल्ह्याकडे वळवितात, असा आरोपही करण्यात येत आहे.

कापसाचे क्षेत्र वाढणार

जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे संकेत असल्यामुळे बीटी कॉटन बियाण्याचाही तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महिको कंपनीच्या कनक जातीच्या बियाण्याला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. परंतु या बियाण्याचा मुबलक पुरवठा उस्मानाबाद जिल्ह्याला कंपनीकडून केला जात नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

दोन महिन्यांपूर्वी सोयाबीनचे दर ३८०० रुपये प्रतिक्विंटल होते. आता हे दर ४००० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

- प्रशांत बलदोटा, आडत व्यापारी

सोयाबीन बियाण्याच्या वाढत चाललेल्या किंमती आणि तुटवडा लक्षात घेता शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे वापरताना बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

- मदन मणियार, कृषी विभाग, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा बंदी कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राज्य सरकारने बंदी घातल्यानंतरही उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गुटख्यांची विक्री सुरूच आहे. या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे यंत्रणा उपलब्ध नसल्याने बंदी कागदावरच राहिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातून बस, प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने, खासगी ट्रॅव्हल्स यांच्याबरोबरच रेल्वेमधून गुटख्याची सर्रास तस्करी होत आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी समांतर यंत्रणा उभी केली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांना चुकवित हा उद्योग सुरू आहे. बंदीमुळे या गुटख्याची चढ्या दराने विक्री होत आहे. मात्र, तलफ भागविण्यासाठी चढ्या दराने मिळणाऱ्या मिळणाऱ्या गुटख्याविषयी शौकिनांचीही तक्रार नाही. अन्न व औषध प्रशासनात महेश झगडे आयुक्त असताना त्यांचा गुटखाबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न होता. झगडे यांच्या बदलीनंतर बंदीकडे काणाडोळा केल्याचे चित्र आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारीही कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कारवाईच होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांचेही मनोधैर्य वाढले आहे.

गुटखा जप्त केल्यानंतर, कारवाईचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. तरीही अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची पोलिसांची तक्रार आहे.

औषध प्रशासनाची दिरंगाई

मेजेगुर (ता. उमरगा) बसस्थानकाशेजारी २२ मे रोजी रात्री सुमारे १ लाख २० हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. हा गुटखा बेवारस स्थितीत आढळून आला. त्याची माहिती उस्मानाबाद येथील अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आली. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत अन्न सुरक्षा अधिकारी मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले नव्हते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गुटख्याचा साठा जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात येते. तरीही त्याचे श्रेय घेण्याची संधी अन्न व औषध प्रशासनाला मिळत असते. श्रेय घेण्यासाठीही या अधिकाऱ्यांकडून उत्सुकता दाखविण्यात येत नसल्याकडे पोलिसांकडून लक्ष वेधण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ हजार रुपयाला १ टँकर पाणी !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका असमर्थ ठरल्याने पडेगाव, मिटमिटा परिसरातील नागरिकांना पाण्याकरिता टँकरवर खर्च करावा लागत आहे. या परिसरात पाच हजार लिटरच्या टँकरसाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. परिसरातील पाणीपातळी खालावल्याने बोअरचे पाणी कमी झाले आहे. मुख्य शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला पडेगाव, मिटमिटा परिसर सोयी सुविधांपासून कोसो दूर आहे. या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सुविधा सोडवण्यासाठी मनपाकडून प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना शहरात राहूनही गावाकडचा अनुभव घ्यावा लागतो.

पालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जात नसल्याने पिण्याच्या पाण्यापासून सांडपाण्यापर्यंत नागरिकांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या गृहप्रकल्प योजना आकारास आल्या. या गृहप्रकल्पांमधील रहिवाशांनी बोअरवेल खोदले आहेत. परंतु, तब्बल ४०० ते ५०० फूट खोदल्यावर काही प्रमाणात पाण्याचा स्त्रोत मिळतो.

पोलिस कॉलनी, रामगोपालनगर, तारांगण कासलीवाल, देवगिरी व्हॅली, अर्चअंगण, राधाकृष्ण हाउसिंग सोसायटी, पिस हॉम, बक्तूलनगर, मिस्बाह कॉलनी आदी परिसरात शेकडो कुटुंबांचे वास्तव्य आहे. या भागात नोकरदारापासून मजुरी करणार्यांपर्यंत सर्वस्तरातील नागरिकांचा समावेश आहे. त्यांना बोअरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लात आहे. सध्या पाणीपातळी कमी झाल्याने सर्वांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे परिसरात टँकरचालकांचे फावत आहे.

पैसे मोजूनही प्रतीक्षा

मिटमिटा गावाला तब्बल चार दिवसाने पाणी पुरवठा होतो. हा पुरवठा पुरसा नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरचालकांना पैसे देवूनही बर्याचवेळा वाट पहावी लागते. मागणी वाढल्याने त्यांची अरेरावी सहन करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१ दशलक्ष घनमीटरची रोज वाफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीव्र उन्हामुळे विभागातील सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणामधील १ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत अाहे. नाथसागरात सध्या ४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्यामुळे सध्या तरी औरंगाबादकरांना पाणी कमी पडण्याची शक्यता नाही. जायकवाडी धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यातून नियोजनानुसार येत्या गुरुवारपर्यंत २४ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार अाहे. शुक्रवारपासून कालव्यातील पाणी सोडणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या (कडा) अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या जायकवाडी धरणामध्ये १०२ दशलक्ष घनमीटर (४.७० टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेसा असल्याचे अधिकारी सांगतात. पैठण येथील नाथसागरावर (जायकवाडी) सिंचनासाठी सुमारे सव्वालाख शेतकरी अवलंबून आहेत. बीड, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सध्या जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात येत आहे. उजव्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बीड, औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील सुमारे ६० गावांसाठी उपयोगी पडणार आहे. उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेले हे पाणी प्रत्येक दहा किलोमीटरवर तयार करण्यात आलेल्या काठ नियामकामध्ये (सीआर) साठवून ठेवण्यात येणार आहे. डाव्या कालव्यामधून सोडण्यात येत असलेले पाणी आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्याच्या परिसरातील २३ गावांसाठी वापरण्यात येणार आहे. परळी वीज निर्मिती केंद्रापर्यंत उजव्या कालव्यातून सोडलेले सुमारे ७० टक्के पाणी पोचेल, असेही 'कडा'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रत्येक थेंबाचा वापर

कालव्यांमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे सुमारे २० ते ३० टक्के गळती होत असली तरी, या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठीच होणार आहे. उजव्या कालव्यामध्ये साठविलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार असल्यामुळे सोडलेले पाणी किती प्रमाणात अखेरपर्यंत पोचते याएेवजी पाण्याचा उपयोग होणार हे महत्त्वाचे असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

३० जूनपर्यंत उपयुक्त साठा पुरेल. तीन ते चार दिवसानंतर कालवे बंद करण्यात येणार आहेत. ढगाळ वातावरण झाल्यास बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होईल.

- एस. पी. भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी प्रकल्प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता ३ दिवसांआड पाणी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणातून परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी सोडलेल्या पाण्याचे कारण समोर करून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने आता शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा घाट घातला आहे. त्याची छुपी अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली. आधीच बिघडलेल्या वेळापत्रकामुळे पाण्यासाठी त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांचा वैताग आणखी वाढणार आहे.

महापालिकेने सप्टेंबर २०१४पासून शहराची पाणीपुरवठा वितरण व्यवस्था युटीलिटी कंपनीकडे (समांतर) देण्यात आली. या कंपनीने जायकवाडी ते औरंगाबाद समांतर जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी देणे अपेक्षित होते, पण कंपनीकडून कुठलीच उपाययोजना झाली नाही. औरंगाबादकरांना उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके बसू लागले होते. तांत्रिक कारणे सांगून आठवड्यातून एकदा सक्तीचा गॅप पाणीपुरवठ्यात दिला गेला. महिनाभरापासून पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कंपनीकडून यासाठी तांत्रिक कारणे दिली जात आहेत. यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे. शहरात दैनंदिन मागणीच्या तुलनेत १० एमएलडी पाणी कमी येते. शिवाय उन्हाळ्यामुळे १० एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. हे २० एमएलडीचे चुकलेले गणित जुळविण्यात कंपनीचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. या कारणामुळे लोकांचा उद्रेक वाढू शकतो, राजकीय मंडळी याचे भांडवल करून कंपनीच्या विरोधात वातावरण तयार करू शकतात, अशी शक्यता गृहित धरून नवीन शक्कल लढविली आहे. परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी सध्या जायकवाडी धरणातून पाणी सोडले जात आहे. त्याचा फटका शहराला पाणी मिळविण्यासाठी होत असल्याचे 'समांतर'च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एरवी जायकवाडीतून २४ तास पंपाद्वारे पाणी उचलले जाते. धरणात पाणी कमी झाले आहे. त्यामुळे २४ ऐवजी १९ तासच पाणी उचलणे सुरू आहे. पाच तासांचा गॅप भरून निघणे अवघड आहे. त्यात २० एमएलडी पाण्याचा दररोज बसणारा फटका यामुळे शहराची पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळित झाली आहे. याबाबत अधिक चर्चा होऊ नये म्हणून रविवारपासून कंपनीने तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सिडकोसह शहरातील काही भागात या वेळापत्रकाची अंमलबजावणीही सुरू झाली. जायकवाडी धरणात पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २०१२मध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणात मध्यभागी अॅप्रोच कॅनल तयार करण्यात आला होता. त्यामुळे धरणातून दुसरीकडे पाणी सोडले तरी त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे अशक्य आहे, पण कंपनीकडून स्वतःचे दोष लपविण्यासाठी ही शक्कल लढविली जात आहे. दोन दिवसांनंतर संपूर्ण शहरातच तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल. कागदोपत्री तीन दिवसांआड दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे.

पाणीपुरवठा दोन दिवसांआडच आहे. त्यात बदल केलेला नाही. तांत्रिक अडचणी, जायकवाडीतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी खेचणाऱ्या पंपांना गवत आड येत आहे. त्याची सफाई करण्यासाठी दिवसातून किमान दोनदा पंप बंद करावे लागतात. त्याचा परिणाम पाण्यावर होतो. मागणी व पुरवठ्याचे गणित सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- अर्णब घोष, बिझनेस हेड, औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटाने घेतली ‘मँगो की पाठशाला’

$
0
0




औरंगाबाद टाइम्स टीम

स्वीट अॅँड सोर मँगो पानीपुरी, खाकरा मँगो विथ सालसा, पोटॅटो क्युब चिली सॉस, न्यूट्री मँगो ब्लास्ट, मँगो पनीर रोल व मँगो अॅपेटायझर हे सर्व पदार्थ आंब्यापासून बनविता येतात, असे जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही म्हणाल, 'शक्यच नाही.', पण विश्वास ठेवा हे सर्व पदार्थ आंब्यापासूनच बनविले जातात आणि हेच पदार्थ गृहिणींना शिकविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने एक खास कार्यशाळा आयोजित केली होती 'मँगो रेसिपी वर्कशॉप' या नावानं. या कार्यशाळेत आहारतज्ज्ञांनी दाखविलेल्या रेसिपींमुळे स्वयंपाकामध्ये निपूण असलेल्या महिलांनीही तोंडात बोटे घातली. त्या आश्यर्यचकित झाल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी पटापट या सर्व रेसिपींची कृती लिहून घेतली, ज्यांनी शक्य होतं त्यांनी मोबाइलमध्ये शूटिंग करून घेतलं आणि घरी जावून आपल्या पतीराजांना, मुलांना त्या तयार करून खाऊ घालण्याचा निर्धार व्यक्त केला.

आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपींकरता गृहीणी, तरुणी व खव्वयांनी चांगलीच गर्दी केली होती. मंगळवारी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत झालेल्या कार्यशाळेत हॉटेल मॅनोरचे एक्झिक्युटिव्ह शेफ अर्जुन खरेल व आहारतज्ज्ञ स्नेहा वेद या दोघांनीही इन्संट, हटके व तितक्याच देखण्या रेसिपी सादर करून या फळांच्या राजाची शान आणखीनच वाढवली. हॉटेल एन. एच. २११ या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर होते.

आंबा फळांपासून बनणाऱ्या निवडक रेसिपींचाच परिचय सर्वांना असतो, पण वर्कशॉपमध्ये तज्ज्ञांनी आंब्याची पानीपुरी, सालसा, रोल, टिक्की अशा रेसिपी सादर करून थक्क केले. जसजसा कार्यक्रम पुढे जात होता अजून काय नवे शिकायला मिळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोचली होती. शेफ अर्जुन खरेल यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर स्वीट अॅँड सोर मँगो पानीपुरी, खाकरा मँगो विथ सालसा, पोटॅटो क्युब चिली सॉस आणि सर्वांचेच लक्ष वेधणारी नटी नटस् मॅँगो कुल्फी बनवून सर्वांनाच थक्क केले. तर स्नेहा वेद यांनी न्यूट्री मँगो ब्लास्ट, मँगो पनीर रोल व मँगो अॅपेटायझर या रेसिपीस सादर केल्या. आंबा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्यामुळे आंब्याचा मौसम जाण्यापूर्वी आंब्यांचा पुरेपूर आनंद घ्या, असे‌ही त्यांनी सांगितले. तज्ज्ञांनी सांगितलेला प्रत्येक शब्द सर्वजण टिपून घेत होते. तर बहुतकांचे मोबाइलमध्ये रेकॉडिंग करणेही सुरू होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशी याने केले. यावेळी हॉटेल मॅनोरचे जनरल मॅनेजर सुनील मुखर्जी यांची उपस्थिती होती. तर हॉटेल स्टाफनेही सहकार्य केले.

आंब्याच्या रेसिपी पाहून महिलाही आश्चर्यचकित

खाकरा विथ मॅँगो सालसा

साहित्यः मसाला खाकरा ४, चिरलेली लाल व पिवळी सिमला मिर्ची प्रत्येकी ४-४ चमचे, आंब्याचे तुकडे ८ चमचे, मीठ चवीनुसार, कोथंबीर १ चमचा, बारिक चिरलेल्या मिर्ची २, टोबॅस्को सॉस ( चिली सॉस म्हणून वापर होतो व बाजारात सहज मिळते), ऑलिव्ह ऑईल किंवा साधे तेल.

कृतीः खाकरा वगळता सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले एकजीव करा. एका चमच्याने मिश्रणाला थोडे दाबा व खाकऱ्यावर पसरवा. खाकरा विथ मँगो सालसा तयार.

पोटॅटो क्युब विथ मँगो चिली सॉस

साहित्यः अर्धा किलो बटाट्यांना अर्धे कच्चे उकडून घ्या व क्युबच्या आकारात कापा. कॉर्नफ्लोअर ४ चमचे, चिली फ्लेक्स १ चमचा, आंब्याचा पल्प, सीझनिंग, मिर्चीची पेस्ट, तळण्याकरता व सॉसकरता तेल.

कृतीः बटाट्यांच्या कापांवर कॉर्नफ्लोअर टाका, मीठ टाकून चांगले घोळून घ्या. एका प्लेटवर हे तुकडे पसरावा व दुसऱ्या भांड्यात काप काढा. जेणेकरून अतिरिक्त पीठ निघून जाईल. आता या तुकड्यांना डीप फ्राय करा.

सॉसकरताः एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. चिलीफ्लेक्स, मिर्चीची पेस्ट, मँगो पल्प, मीठ आणि सिझनिंग टाका व परतून घ्या. पुन्हा थोडे पाणी टाका व ढवळून घ्या. एक मिनिट या सॉसला उकळी येऊ द्या. आता बटाट्यांचे काप सॉसमध्ये टाका व परतून घ्या. पोटॅटो क्युब विथ चिली सॉस तयार.

पाणीपुरी लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची. याच पाणीपुरीला शेफ अर्जुनने ट्विस्ट देत तिखट आणि गोड पाणीपुरी तयार केली.

साहित्यः कच्ची कैरी अर्धा किलो, पुदीन्याची पाने साधारणतः ४० ग्रॅम, हिरवी मिर्ची २, कोथंबीर ५० ग्रॅम, काळे मीठ १ चमचा, भाजून बारीक केलेले जिरा पावडर १ चमचा, गरज वाटल्यास पीठीसाखर, मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा, उकडलेली ‌काळे चने साधारणतः १ वाटी, पुरी आणि चवीनुसार मीठ

तिखट पाणीपुरीकरता कृतीः आंबे स्वच्छ धुवा आणि कुकरमध्ये १० मिनिटे उकडवा. ‌थंड झाल्यावर कैरीचा गर काढून घ्या आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा.

दुसऱ्या भांड्यात पुदीना, हिरवी मिर्ची, कोथं‌बीरची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा. यात आंब्याचा गर, काळे मीठ, जीरा पावडर व चवीनुसार मीठ टाकून पाणी टाका. पाण्याचे प्रमाण फार जास्त वा कमी असू नये. हे पाणी फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. सर्व्ह करताना पुरीत उकडलेला बटाटा, चना स्टफ करा आणि कच्च्या कैरीच्या पाण्यात बुडवून द्या व या पाणीपुरीचा आनंद घ्या.

मीठी पानीपुरी

साहित्यः आंबे ८०० ग्रॅम, ३ चमचे साखर, पुरी

कृतीः काही आंब्यांचे काप करा. तर उरलेल्या आंब्याचा गर मिक्सरमधून काढा. यात साखर व थंड पाणी टाका. पाणीपुरी सर्व्ह करताना आंब्याचे बारिक तुकडे पुरीत स्टफ करा व आंब्याच्या गोड पाण्यासोबत सर्व्ह करा.

नटी नटस् मँगो कुल्फी

साहित्यः ४ आंबे, रबडी, सुकामेवा (बदाम, काजू व पिस्ता), थोडी कणिक.

कृतीः या आंब्यांना फ्रीजमध्ये ठेवा. आता आंब्याची वरची बाजू कापून घ्या व फूट पकडच्या सहाय्याने कोय अलगद काढून घ्या. आंब्यामध्ये छोट्या चमच्याच्या सहाय्याने रबडी व सुकामुवा स्टफ करा. प्लास्टिकच्या झाकणाने आंब्याचे तोंड बंद करा. आता बिर्याणीला दम मारतो याप्रमाणे कणीकेने हे झाकण सीलबंद करा व फ्रीजमध्ये ४ ते ५ तासांकरता ठेवा. सर्व्ह करताना चाकूच्या सहाय्याने आंब्याचे साल व झाकण काढून घ्या व आंब्याचे काप करून सर्व्ह करा.

न्युट्री मँगो ब्लास्ट

साहित्यः ओटस, पोहे, आंब्याचे तुकडे व आंब्याचा रस (हापूस असेल तर उत्तम) प्रत्येकी १-१ वाटी, १ मोठी वाटी आंबा-मध सिरप, २ मोठे चमचे तीळ, १ चमचा तेल, गरजेनुसार तीळ

कृतीः ओटस व पोहे मिक्सरमधून बारिक करून घ्या. यात आंब्याचा रस टाकून मिश्रण छान भिजवून घ्या व हव्या त्या आकाराच्या टिक्की बनवा. या टिक्कींना तिळात घोळा. एका पॅनमध्ये तेल गरम करून ही टिक्की मंद आचेवर परतून घ्या. सर्व्ह करताना डिशमध्ये टिक्की, आंब्याचे काप व आंबा-मध सिरप टाकून सर्व्ह करा.

आंबा मध ‌सिरपः १ वाटी पाण्यात १ वाटी मध किंवा १ वाटी साखर टाकून पाण्याचा एकतारी पाक करा. आता गॅस बंद करा व नंतरच १ वाटी आंब्याचा रस टाका व आंबा-मध सिरप तयार.

मँगो अॅपेटायझर

साहित्यः २ चमचे आंब्याचा रस, १ वाटी पाणी, चवीनुसार मीठ, धने पूड, तिखट प्रत्येकी १ चमचा, २ आमसूल, १ छोटा चमचा तेल, १ दालचिनीचा तुकडा, २-३ कडीपत्त, १ छोटा चमचा गूळ

कृतीः एका भांड्यात २ चमचे आंब्याचा रस व १ मोठी वाटी पाणी एकत्र करा. यातच धने पूड, तिखट पूड टाका. पॅनमध्ये तेल गरम करा. यात कडीपत्ता, दालचिनी व आमसूलची फोडणी द्या. आता आंब्याचे मिश्रण टाका. दोन मिनिटे उकळी येऊ द्या. मँगो अॅपेटायझर गरम किंवा थंड सर्व्ह करा.

मँगो पनीर रोल

साहित्यः चिरलेला आंबा, पनीर प्रत्येकी १-१ वाटी, २ पोळ्या (पाण्याऐवजी नुसत्या दुधात भिजवलेल्या कणकेच्या असतील तर उत्तम), ३ चमचे दूध, १ छोटी वाटी मध, २ चमचे आंबा-मध सिरप, चिमूटभर चाट मसाला, १ वाटी तीळ, चवीनुसार मीठ

कृतीः एका पॅनमध्ये आंब्याचे काप नुसतेच परतून घ्या, यात कुस्करलेले पनीर व मध टाकून अलगद परतून घ्या. हे मिश्रण ‌थंड होऊ द्या. पोळी घ्या व यावर आंबा-मध सिरप पसरवा. यावर पनीर व आंब्याचे मिश्रण पसरवा. यावर थोडे तीळ व चाट मसाला टाकून रोल करा व फँकीचा आकार द्या. पॅनमध्ये थोडे तेल घ्या व हा रोल शॅलो फ्राय करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय कार्यकारिणीत अभाविपचे मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखिल विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पहिल्या दिवशी युवा मसुदा, शैक्षणिक धोरण, सामाजिक परिस्थिती व ध्येयधोरणावर बुधवारी दिवसभर दोन सत्रात मंथन झाले.

या दोन्ही सत्रांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नागेश ठाकूर, सुनील आंबेकर, राष्ट्रीय सचिव आशिष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, शैक्षणिक धोरण ठरवताना २ ते ५ एप्र‌िलपर्यंत झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकांचा आढावा घेणे, नव्या मुद्यांसह सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर मंथन करणे, नवा आरखडा तयार करताना सामाजिक मुद्यांना समोर ठेवणे, नक्षलवाद नष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आदी विविध मुद्यांसह नव्या शैक्षणिक धोरणासाठी आखलेल्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष सुरेश मुंडे, प्रदेशमंत्री विवेकानंद उजळंबकर, स्वागत सचिव अविनाश जहागीरदार, महानगर मंत्री स्वप्नील बेगडे आदींसह देशभरातून आलेले ३५८ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अभाविपच्या कार्यकर्ता संमेलनास प्रतिसाद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने पूर्व कार्यकर्ता संमेलन पाटीदार भवन येथे पार पडले. यावेळी व्यासपीठावर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेश ठाकूर, राष्ट्रीय महासचिव श्रीहरी बोरकर, राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांची मुख्य उपस्थिती होती. औरंगाबाद येथे १९८३ पासून पूर्णवेळ काम केलेल्या अनिल कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, गुरूनाथ मगे, शिवाजी दहिबावकर, प्रवीण घुगे, धनंजय इं‌चेकर, संतोष गाताडे, विक्रम फडके या कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सरपंचाला लाचप्रकरणी अटक

$
0
0

नांदेड : निधी मंजुरीच्या संमती पत्रावरील स्वाक्षरीसाठी ५ टक्के रकमेची मागणी करणाऱ्या महिला सरपंचाला आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. भोकर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

शोभाबाई राऊत असे महिला सरपंचाचे नाव असून, ती अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (खु.) येथील सरपंच आहे. शेलगाव येथील पाणीपुरवठ्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. हे काम पांडुरंग बांधकाम जी. यांना मिळाले आहे. हे काम ७४ लाख रुपयांचे असून, यातील पहिल्या टप्प्यातील कामाचा २० लाख ८५ हजार रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. या कामातील पाच टक्के रक्कम मिळावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. या प्रकरणात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना, राऊत आणि राजू राजेगोरे यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबातील चौघांचा अपघातामध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नळदुर्ग-तुळजापूर राज्य मार्गावरील चिवरी पाटीजवळ (ता. तुळजापूर) बुधवारी सकाळी दहा वाजता झाला.

गंगाबाई दामोदर घरगडे (वय ६५), संभाजी दामोदर घरगडे (वय ३२), बळवंत दशरथ घरगडे (वय ४०) आणु सुरज संभाजी घरगडे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील मृत लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द गावातील असून, ते नातेवाइकाच्या लग्नासाठी चिवरी येथे जात होते. त्यावेळी तुळजापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक बसली. यामध्ये चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला.

या प्रकरणात चारही मृतदेहांचे जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. मोघा गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images