Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

११ वी, १२ वी चा खर्च दोन लाखांच्या घरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी, बारावीचे शिक्षण आता दोन लाखांच्या घरात गेले आहे. खासगी शिकवणीच्या शुल्कांची मोठी उड्डाणे सुरू आहेत. त्यामुळे पालकांसाठी शिक्षण महाग झाले आहे. पदवी, पदव्युत्तरचे शिक्षणही लाखोंच्या घरात आहे.

दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थी, पालकांची पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. ज्युनिअर कॉलेज ते पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी करावा लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे. अकरावी, बारावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला, तर कॉलेजांच्या शुल्कापेक्षा खासगी शिकवणीच्या शुल्कापोटी भरावी लागणारी रक्कम मोठी आहे. अनुदानित अभ्यासक्रम असेल, तर शुल्क अडीचशेच्या घरात आहे. विषय अनुदानित नसेल, तर साधारणतः तीन हजार ते १२ हजार रुपये शुल्क आकरले जाते. विज्ञानानंतर वाणिज्य शाखेचा क्रमांक लागतो. विज्ञानप्रमाणेच वाणिज्य शाखेच्या प्रवेशाचे शुल्क आहे. कॉलेज प्रवेशापेक्षा अधिक शुल्क हे पालकांना खासगी शिकवण्यासाठीच मोजावे लागते. मेडिकल, इंजिनीअरिंगचे तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी खासगी शिकवणीचा आधार घेत असल्याने याचे प्रमाण वाढते आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वर्षाला साधारणतः ८० हजार ते १ लाख १० हजाराच्या घरात खर्च येतो. यातुलनेत आयटीआयला २० ते ३५ हजार रुपये एवढा वार्षिक खर्च येतो.

शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. याची प्रचिती विद्यार्थी म्हणून आम्हालाही येते. वाढती स्पर्धा, त्या स्पर्धेत आपण टिकावे यासाठी तशी तयारीही करावी लागते.

- श्रेयस ठाकूर

चांगले शिक्षण मिळावे, स्पर्धेत आपले स्थान असावे असे प्रत्येकाला वाटते. शिक्षण महाग झाले आहे. त्याचा ताण पालकांच्या खिशावर पडणार हे निश्चित आहे.

- ऋतुजा शिंदे

पदवीही याच वाटेवर

पदवीचे शिक्षणही महाग झाले आहे. इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए अशा अभ्यासक्रमांचे शुल्क आणि त्यासाठी आवश्यक ते शैक्षणिक साहित्य याचाच खर्च दीड लाखांच्या घरात जातो. या तुलनेत पारंपारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची रक्कम ही तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे.

...असे आहे शुल्क

११, १२ विनाअनुदानितः ३ हजार ते १२,०००

खासगी शिकवणी शुल्कः २० हजार ते १ लाख ८० हजार

पदवी पारंपारिक अभ्यासक्रमः २ हजार ते १० हजार

व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमः ६० हजार ते ९५ हजार

पदव्युत्तरः २.५ हजार ते ८० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादचे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज देशात दहावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'द वीक' व 'हंसा सर्व्हे एजन्सी'ने देशपातळीवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश 'टॉप १५' कॉलेजांमध्ये करण्यात आला आहे. औरंगाबादच्या कॉलेजने दहावे स्थान मिळविले आहे. त्याचवेळी देशातील ४००पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील ४ वैद्यकीय महाविद्यालयांनी 'टॉप ३०'मध्ये, तर देशातील ३०५ दंत महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील ३ दंत महाविद्यालयांनी 'टॉप १५'मध्ये स्थान मिळविले आहे.

'द वीक'ने २१ जूनच्या साप्ताहिकामध्ये देशभरातील दंत व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अनुक्रमे 'टॉप १५' व 'टॉप ३०' महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाचा चौथ्यांदा 'टॉप १०'मध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 'आउटलुक'ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने २०११, २०१२ व २०१३ अशी सलग तीन वर्षे पहिल्या दहा महाविलयात स्थान मिळविले होते. 'द वीक'ने यंदा केलेल्या सर्वेक्षणामध्येही 'शासकीय दंत' पुन्हा दहाव स्थान मिळविले आहे. या सर्वेक्षणात 'द वीक'ने भारतीय दंत परिषद, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व विद्यार्थ्यांकडून माहिती मिळविली. त्याचबरोबर ७४१ शैक्षणिक तज्ज्ञ, २२४० विद्यार्थी, २५० भावी विद्यार्थी व नियुक्त्या देणाऱ्या विविध २० कंपन्यांकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारे 'टॉप १५' व 'टॉप ३०' महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे.

'टॉप'मध्ये सेवाग्राम, मुंबईचे कॉलेज

'द वीक'ने प्रसिद्ध केलेल्या दंत महाविद्यालयांच्या 'टॉप १५'मध्ये मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय (तिसरे), मुंबईतील महापालिकेचे नायर डेंटल हॉस्पिटल (पाचवे) यांचा समावेश आहे. 'टॉप ३0' वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज (आठवे), मुंबईतील के. ई. एम मेडिकल कॉलेज (१३वे), मुंबईतील बी. जे. मेडिकल कॉलेज (सर्वोत्कृष्ठ २१वे) व वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (२२वे) यांचा समावेश आहे.

'टीम वर्क'मुळेच सलग चौथ्यावेळेस शासकीय दंत महाविद्यालयाला देशात दहावे स्थान मिळाले असून, ही बाब मराठवाड्यासाठी नक्कीच भूषणावह आहे. यापुढेही अजून वरच्या क्रमांकावर स्थान मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- डॉ. सुरेश बारपांडे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा काढणार डोळ्यातून पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पावसाने ओढ दिल्याने उस्मानाबादेत भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र, सुखावला आहे. दरवाढीमुळे येत्या काळात कांदा सर्वसामान्याच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

जिल्ह्यात सध्या मान्सून दाखल झाला असला तरी पाऊस मात्र ठराविक भागातच झाल्याने अद्याप सर्वत्र भाजीपाल्यांची लागवड होऊ शकली नाही. शिडकाव्या स्वरूपात होत असलेल्या पावसामुळे खरीपाचा पेरा सुद्धा झालेला नाही. शासकीय आकडेवारीनुसार १६ जून अखेर जिल्ह्यात खरीपाचा पेरा केवळ एक टक्का इतका झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेर भाजीपाल्यांचे दर हे चढेच राहतील असा अंदाज मंडईतील काकडी, गवार, भेंडी, कोथिंबीर, पालक, चुका, मेथी, शेवगा शेंग आदींची दर कडाडले आहेत.

मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीत घट होऊन पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने पाले भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यंदा उन्हाळ्यातही भाजीपाल्याचे दर तसेच स्थिर होते. परंतु, मे महिन्यातून निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

सध्या मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने मंडईत भाजीपाल्याच्या दराची तेजीकडे वाटचाल सुरू आहे. दारोदारी फिरून भाजी विकणाऱ्याकडे कुठल्याही भाजीसाठी किलो मागे किमान साठ रुपये मोजावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतीक्षा असून पाऊस पडल्यानंतरच भाजीपाल्याच्या दरत घसरण होईल, असा मंडईतील जाणकारांचा अंदाज आहे. भाजीपाल्यांच्या दर वाढीने गृहिणींचे बजेट पार कोलमडले असून, भाजी घेताना आता सर्व सामान्यांना शंभर रुपयांची नोट कमी पडू लागली आहे. भाज्यांच्या दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असून सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उन्हाळी कांद्याचा साठा हा मर्यादितच असून तो आता संपण्याच्या मार्गावर आहे. खरीप हंगामातील कांदा सप्टेंबर अखेर बाजारपेठेत येईल. त्यामुळे कांद्याचे दर भडकण्याची चिन्हे आहेत. बाजारपेठेतील आडत्याकडून (दलाल) वर्तविली जात आहे. कांद्याच्या शिल्लक साठा लक्षात घेता यंदा सर्व सामान्यांच्या डोळ्यातून कांदा पाणी काढणार की काय अशी स्थिती आहे.

पालेभाज्यांचे प्रतिकिलो

प्रकार / पेंढी

गवार ८० रुपये

काकडी ५० रुपये

भेंडी ६० रुपये

टोमॅटो २५ ते ३० रुपये

वांगी ४० ते ५० रुपये

दोडका ६० रुपये

कारले ८० रुपये

शेवगा शेंग १०० रुपये

कोथिंबीर गड्डी ३० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणच्यासाठी चटकदार धांदल!

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद

नाव काढताच तोंडाला पाणी आणणाऱ्या कैऱ्यांचे लोणचे घालण्यासाठी सध्या महिला वर्गात गडबड सुरू आहे. सध्या २० रुपये किलोंपासून कैऱ्या मिळत आहेत. एक-दोन पाऊस पडल्यानंतर गृहिणी लोणचे बनवण्यास सुरुवात करतात. वातावरणातील गारव्यामुळे हे लोणचे टिकाऊ आणि अधिक रुचकर होते, असे गृहिणींचे व आहारतज्ज्ञांचे मत आहे. शहरातील सर्व बाजार, औरंगपुरा, गजानन महाराज मंदिर परिसर, शिवाजीनगर, शहागंज भागात लोणच्याच्या कैरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सिल्लोड, नाशिक, बहाळ, बऱ्हाणपूरसह विविध भागांतून व्यापाऱ्यांनी कैऱ्या आणल्या आहेत. सध्या २० ते २५ रुपये किलो दराने कैऱ्यांची विक्री सुरू आहे.

लोणचे मसाल्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. मोहरी ७० ते ९० रुपये किलो, लसूण ७० ते १०० रुपये किलो, तेल १२० ते १३० रुपये किलो दराने विकले जात आहे. चिनी मातीच्या बरण्या २०० ते ३०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. कैरीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून यंदा कैऱ्याची आवक झाली आहे. नाशिक, घाटी, कळवण, चाळीसगाव, भडगाव तालुक्यातून आलेल्या गावरान, कलम, रामपुरी, तोतापुरी कैऱ्यांना पसंदी आहे.

असे टिकवा

कैऱ्या, इतर पदार्थ कोरडे असावेत.

साहित्य, हात कोरडे करून घ्यावेत.

योग्य प्रमाणात मीठ वापरा.

फोडणी पूर्ण गार झाल्यावर वापरावी.

बरण्या स्वच्छ, कोरड्या असाव्यात.

बरण्यांना आतून गरम करून थंड केलेले मोहरी तेल लावा.

कैरी खरेदीसाठी सकाळीपासून लगबग सुरू होते. दुपारी १२ पर्यंत १५ ते २५ रुपये, त्यानंतर भाव १२ ते १५ रुपये प्रति किलो होतात. ५ रुपये ते १० रुपये किलोप्रमाणे कैऱ्या फोडून मिळतात.

- जनार्दन जाधव, कैरी विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतात रसायन सोडल्याचा अहवाल द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा शिवारातील शेतात सोडण्यात आलेल्या रसायनप्रकरणाचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असे आदेश पालकमंत्री व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिले. हे प्रकरण 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणले होते. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पीडित शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

शेंद्रा शिवारातील आत्माराम ठुबे व इतर काही जणांच्या शेतामध्ये विषारी रसायने सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅडिको एन व्ही कंपनीचे हे रसायन असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारी देऊन महिना उलटला, पण याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोमवारी पालकमंत्री जिल्हा नियोजन ‌समितीच्या बैठकीसाठी शहरात आले होते. यावेळी शेंद्रा कमंगर, टाकळी वैद्य आणि कुंभेफळ येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री कदम यांनात निवेदन दिले.

पालकमंत्री कदम यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले. टाकळी वैद्य येथील रामेश्वर वैष्णव या शहरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीतील पाण्यात उग्र वास येणारे रसायन मोठ्या प्रमाणात झिरपले आहे. त्यांनीही पालकमंत्र्याकडे दाद मागितली असून, कारवाईची मागणी केली आहे.

औद्योगिक वसाहतीमधून शेतांमध्ये, नद्यांमध्ये केमिकल सोडण्यात येत आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दोन दिवसांत या रसायन सोडण्याच्या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- रामदास कदम, पालकमंत्री व पर्यावरणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा मंत्री लोणीकरांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश देणारे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासह जालना जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या.पी.आर. बोरा यांनी दिले आहेत.

परतूर तालुक्यात चंद्रभागाबाई अंभिरे, प्रभावती पवार, सय्यद मजहर आझम सय्यद नुरोद्दिन,अंकुश वाशिंबे व व्ही.के.एस.एस.सोसायटी, सोयंजना यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत या स्वस्त धान्य दुकानदार मालकांनी परतूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुरेश जेथलिया यांचा प्रचार केला होता. या मतदारसंघातून पालकमंत्री लोणीकर निवडून आले.त्यांनी परतूर तालुक्यातील ९ स्वस्त धान्य दुकानदर मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश पुरवठा अधिकारी यांना दिले होते. नागपूर येथे २० डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले होते.

मंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणी करून तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागविले. या अवहालानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत. सरकारतर्फे मंजुषा देशपांडे यांनी नोटीस स्वीकारली. या याचिकेची पुढील सुनावणी ३ आठवड्यानंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगचे तंत्र बिघडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचे बिघडलेले गणित यंदाही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. १ लाख ६० हजार जागांसाठी राज्यात केवळ १ लाख ७ हजार विद्यार्थीच प्रवेशासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये यंदाही चाळीस हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

तंत्रशिक्षण विभागातर्फे इंजिनीअरिंग प्रवेशाची सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात ऑनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेनंतर पहिली गुणवत्ता यादी सोमवार (२२ जून) रोजी तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केली. यातून यावर्षी इंजिनीअरिंगचे चित्र कसे असेल, हे स्पष्ट झाले आहे. राज्यात इंजिनीअरिंग प्रवेशासाठी यावर्षी १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांची प्रवेश संख्या १ लाख ६० हजार एवढी आहे. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या रिक्त जागांचे बिघडलेले गणित यंदाही कायम राहील असे चित्र आहे.

मॅनेजमेंटमधून ३२ हजार जागांवर प्रवेश

व्यवस्थापन कोट्यातून २० टक्के जागांवर प्रवेश दिले जातात. राज्यातील एकूण प्रवेश क्षमतेपैकी ३२ हजार जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येतात. मागील वर्षी या कोट्यातून सुमारे ७ हजार जागांवरच प्रवेश झाले. या कोट्यातील जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या. राज्यात गेल्या वर्षी १ लाख १० हजार जागांवर प्रवेश झाले होते.

मराठवाड्यात ५ हजारा जागा रिक्त राहणार

गेल्या वर्षी १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. यंदा हा आकडा २ हजाराने वाढला असला तरी, त्यामुळे फार मोठा फरक पडेल असे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. मराठवाड्यात १६ हजार ५०० जागांसाठी ११ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे सुमारे ४ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

तंत्रशिक्षण विभागाने गुणवत्ता यादी जाहीर केली. याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. किती जागा रिक्त राहतील हे आत्ताच सांगता येणार नाही.

- डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगरीची चार पिल्ले दगावली

$
0
0

उन्मेष देशपांडे , औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील मगरीने सहा महिन्यांपूर्वी जन्म दिलेल्या सहा पित्लांपैकी चार पिल्लांचा मृत्यू झाला आहे. प्राणिसंग्रहालयाच्या इतिहासात मगरीने प्रथमच पिल्लांना जन्म दिला होता. या प्रकारामुळे त्यांच्या संगोपनाच्या संदर्भात शंका व्यक्त केली जात आहे.

प्राणिसंग्रहालय संचालकांच्या कार्यालयामागे असलेल्या हैदात दोन मगरी आहेत. तेथील मगरीने सहा महिन्यांपूर्वी सहा पिल्लांना जन्म दिला. त्यांच्या जन्माची माहिती प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने १५ दिवस गुप्त ठेवली होती. या पिल्लांना त्यांच्या आईबरोबरच हौदात ठेवण्यात आले होते. जन्मानंतर दुसऱ्या आठवड्यात एक पिल्लू दगावले. त्यानंतर चार महिन्यात आणखी तीन पिल्लांचा मृत्यू झाला. चार पिल्ले दगावल्यावर प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन जागे झाले. त्यांनी उरलेल्या दोन पिल्लांना जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन पिल्लांना आता त्यांच्या आईपासून वेगळे करण्यात आले आहे. सोलापूरच्या प्राणिसंग्रहालयातून मगरीची पाच पिल्ले काही दिवसांपूर्वी गायब झाली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत मगरीची चार पिल्ले दगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मगरीची प्री-मच्युअर्ड डिलेव्हरी झाली होती. अन्न पचत नसल्याने चार पिल्लांचा मृत्यू झाला. त्यांच्या पोस्टमार्टेमध्ये ही बाब स्पष्ट झाली. या पिल्लांचा त्यांच्या आईने योग्य प्रकारे सांभाळ केला नाही. त्यामुळे दोन पिल्लांना आता अन्यत्र ठेवले आहे.

- डॉ. बी. एस. नाईकवाडे, संचालक, प्राणिसंग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत शाळांना प्रत्येकी लाखाचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अनधिकृत ४६ शाळांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या शाळा तातडीने बंद कराव्यात आणि अहवाल तीन दिवसांच्या आत सादर करावा, असे बजावण्यात आले आहे. या शाळांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड लावण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.

सभापती विनोद तांबे यांच्या आदेशानुसार या शाळांवर कारवाई करण्यात येत आहे. सर्व शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून शाळा तातडीने बंद करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. शाळा बंद न केल्यास तसेच दंड भरण्यास विलंब केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे उपासनी यांनी सांगितले.

अनधिकृत माध्यमिक शाळा

जिल्ह्यातील सात माध्यमिक शाळा सरकारच्या परवानगीशिवाय अनधिकृतरीत्या सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भगवान सोनवणे यांनी जाहीर केले आहे. या अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणेः नॅशनल मराठी हायस्कूल, घटांब्री (ता.सिल्लोड), नॅशनल मराठी हायस्कूल, सारोळा (ता.सिल्लोड), शनेश्वर विद्यालय, चारठा (ता.जि. औरंगाबाद), माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव (वळण) (ता.फुलंब्री), स्वामी विवेकानंद विद्यालय, बोधेगाव (ता. फुलंब्री), नॅशनल मराठी हायस्कूल मोढा (ता.सिल्लोड)

या शाळांत घेऊ नका प्रवेश

राजे शिवाजी इंग्लिश स्कूल, निल्लोड (ता.सिल्लोड), स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, गोळेगाव (ता.सिल्लोड), किडस गुरुकुल इंग्रजी प्राथमिक शाळा, सिल्लोड, कै.दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल, दहेगाव ( ता. वैजापूर), युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, एमआयडीसी चिकलठाणा, दिल्ली पब्लिक स्कूल, माळीवाडा, नाथ अकादमी इंग्रजी प्राथमिक शाळा, पैठण, सरस्वती बालक मंदिर,वाळूज, सरस्वती बालक मंदिर, लांझी रोड, वाळूज, ज्ञानदीप पब्लिक स्कूल बकवालनगर, नायगाव (ता.गंगापूर), हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूल, वाळूज, किडस पॅराडाईज इंग्लिश स्कूल बजाजनगर, ज्ञानभवन इंग्लिश स्कूल बजाजनगर, एकता इंग्रजी प्राथमिक शाळा, तुर्काबाद (ता.गंगापूर), महाराष्ट्र भूषण पब्लिक इंग्लिश स्कूल, गंगापूर, काटेश्वर पब्लिक स्कूल, काटे पिंपळगाव (ता.गंगापूर), रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल जयभवानीनगर, बजाजनगर, सरस्वती इंग्लिश स्कूल घाणेगाव (ता.गंगापूर), सरस्वती बालक मंदिर, बजाजनगर, स्वामी विश्वकर्मा इंग्लिश स्कूल वसूसायगाव (ता.गंगापूर), श्री विनायक प्राथमिक विद्यालय, जोगेश्वरी (ता.गंगापूर), औरंगाबाद माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल सोयगाव, स्वामी विवेकानंद विद्यालय, बोधेगाव, जिजामाता प्राथमिक विद्यालय, चिकलठाण (ता.कन्नड), आदर्श प्राथमिक विद्यालय, आदर्शनगर अंधानेर (ता.कन्नड), मदर तेरेसा इंग्लिश इंग्रजी प्राथमिक शाळा, अंधानेर (ता.कन्नड), शाहू महाराज इंग्रजी प्राथमिक शाळा, पाचोड (ता.पैठण), श्री शनैश्वर विद्यालय, चारठा, लाडसावंगी (ता.औरंगाबाद), योगेश्वरी इंग्रजी प्राथमिक शाळा, महालपिंप्री (ता.औरंगाबाद), दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, चौका (ता. औरंगाबाद), प्रतीक्षा इंग्रजी प्राथमिक शाळा (जुने नाव) शेंद्रा फाइव्हस्टार इंग्रजी शाळा, कुंभेफळ, पीके अण्णा पाटील प्राथमिक शाळा, गारखेडा (पत्ता - वडगाव कोल्हाटी गंगापूर), कँपियन इंग्लिश स्कूल पिसादेवी, विजया कॉन्व्हेंट स्कूल गारखेडा परिसर, ज्ञानेश ग्लोबल स्कूल, चित्तेपिंपळगाव, अनुमाई विद्या मंदिर, सातारा परिसर, किडस किंगडॉम इंग्रजी प्राथमिक शाळा, सातारा परिसर, हेडगेवार मेमोरिअल पब्लिक स्कूल, सातारा परिसर, डायमंड इंग्लिश स्कूल, देवळाई, छत्रपती राजे संभाजी प्राथमिक शाळा, सातारा परिसर, शंभूराजे प्राथमिक विद्यालय, सातारा परिसर, उर्दू प्राथमिक शाळा, देवळाई, शेंद्रा फाईव्ह स्टार प्राथमिक इंग्रजी शाळा, कुंभेफळ, मातोश्री जिजामाता पब्लिक स्कूल बाजार सावंगी (ता.खुलताबाद)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्याची छावणीतही टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे शहराचा पाणीपुरवठा हस्तांतरित झाल्यानंतर छावणीलाही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे, अशी तक्रार छावणी परिषदेतील शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. त्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विनीत लोटे, मनपा पाणीपुरवठा अभियंता हेमंत कोल्हे, कंपनी अधिकारी अर्णव घोष, छावणी परिषद उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांची उपस्थिती होती. छावणी परिषदेला महानगरपालिकेकडून दोन एमएलडी पाणीपुरवठा होत होता. कंपनीकडे समांतर जलवाहिनी योजना हस्तांतरित केल्यापासून कमी पाणी दिले जात आहे, अशी तक्रार आहे.

ठरल्याप्रमाणे पुरेसा पाणीपुरवठा करावा, या मागणीकडे कंपनी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे नगरसेवकांनी बैठकीत लक्षात आणून दिले. त्यानंतर खासदार खैरे यांनी लोकसंख्या व नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश दिले. नगरसेवक संजय गारोल, अभियंता निलेश तनपुरे, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, शिवाजी बनकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाई, साताऱ्याच्या विकासाचे गाडे रुतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरालगतच्या २८ गावांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या बहुचर्चित झालरक्षेत्र प्रारूप आराखड्यावर निर्णय घेण्यास राज्य शासनाला एक वर्षात सवड मिळालेली नाही. परिणामी, मनपात समाविष्ट झालेल्या देवळाई-सातारा या परिसरातील विकास कामांवरही परिणाम झाला आहे.

वाढते शहरीकरण लक्षात घेऊन शहरालगतच्या २८ गावांतील १५ हजार १८४ हेक्टरचे झालर क्षेत्र विकासित करण्यासाठी राज्य शासनाने २००६मध्ये सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली. नागरिकांच्या विरोधामुळे सिडकोने तयार केलेला पहिला आराखडा शासनाने रद्द केला. त्यानंतर नगररचना उपसंचालक कार्यालयनाने आराखडा तयार करून सिडको कार्यालयास दिला. तो सिडकोने २०१३ मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर दोन हजार २२७ आक्षेप व हरकती दाखल झाल्यात. त्यावर सिडको नियुक्त समितीने सुनावणी पूर्ण करून जून २०१४ च्या पहिल्या आठवड्यात सिडको मुख्य कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल संचालक मंडळासमोरील सादरीकरणानंतर अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालावर शासनातर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, या २८ गावांतील नागरिकांना अपेक्षित सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

दरम्यान, झालरपट्यातील देवळाई-सातारा हा परिसर नुकताच महापालिकेत सामाविष्ट करण्यात आला आहे. प्रारूप विकास आराखड्यावर अंतिम निर्णय न झाल्याने मनपाला प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच सिडकोप्रमाणे महापालिकाही नियोजन प्राधीकरण असल्याने पुन्हा नव्याने विकास आराखडा तयार केला जाईल की झालरक्षेत्र आराखड्यानुसार काम केले जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडकोचा माघारीचा प्रयत्न

भूसंपादनास नागरिकांचा विरोध, पायाभूत सुविधा विकास कर देण्यास नागरिकांचा नकार यामुळे विकासकामांवरील अपेक्षित खर्च करण्यासाठी निधी उभा राहणार नाही, असे सिडको वाटते. त्यामुळे झालरक्षेत्र विकासाची जबाबदारी अन्य प्राधिकरणाकडे सोपवावी, असे पत्र सिडकोने ऑक्टोबर २०१४ मध्ये शासनाला दिले आहे.

विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन निर्णयानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.

- एच. व्ही. आरगुंडे, प्रशासक सिडको

सातारा, देवळाई परिसर नव्याने मनपात समाविष्ट झाला आहे. तेथे सुविधा पुरविणे गरजेचे असून निधीचीही आवश्यकता आहे. विकास आराखड्यास अंतिम मंजूरी मिळल्यास कामांना गती मिळेल.

- त्र्यंबक तुपे, महापौर मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सावता माळी वसतिगृहासाठी गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन किंवा व्यवसाय शिक्षण शहरात घेता यावे, यासाठी प्रवेशिका अर्ज मागविले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (२६ जून) सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत मुलाखती होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी वसतिगृहाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका तसेच सामाजिक किंवा लोकप्रतिनिधींची त्यांच्या लेटर पॅडवर शिफारस असावी, असे वसतिगृहाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींच्या शिक्षणासाठी आणखी २४४ बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गावपासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सोय करण्यासाठी आणखी २४४ बस वाढविण्याचा निर्णय मानव विकास मिशनने घेतला आहे. त्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या ६२५ बसद्वारे ही सेवा दिली जाते.

मानव विकास मिशनद्वारे २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यात मिशनव्दारे विविध उपक्रम, योजना राबविल्या जातात. या तालुक्यांत आरोग्य सेवा पुरविणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, दरडोई उत्पन्न वाढवणे, यासाठी साह्य केले जाते. घरापासून शाळेपर्यंतचे अंतर जास्त असल्याने अनेक मुली शाळा सोडून देतात. त्यांचे कमी वयात लग्न लावून दिल्याने या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचाही प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशनतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी

मोफत बससेवा पुरवली जाते. हा उपक्रम चार वर्षापासून सुरू असून सध्या ६२५ बसमधून मुली शाळेत जातात. या बसची बांधणी आणि सेवा राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येते. या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी २४४ बस वाढविण्याचा निर्णय मिशनने घेतला. अमरावती जिल्ह्यातील दोन आणि बीड जिल्ह्यातील एक तालुका वगळता मिशनच्या कार्यक्षेत्रातील सर्व तालुक्यात प्रत्येकी दोन बस देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बसच्या देखभाल दुरुस्तीकरिता रक्कम वाढवून देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या मागणीमुळे नवीन बस सुरू करण्यास विलंब झाला. परंतु, हा प्रश्न निकाली निघाल्याने नवीन बस लवकरच सेवेत दाखल होतील, असे सांगण्यात आले.

एक लाख विद्यार्थिनींची सोय

या बसमधून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यिनींना गाव ते शाळेपर्यंत मोफत प्रवास करण्याची सोय आहे. या योजनेतून प्रत्येक तालुक्यात किमान पाच बस देण्यात आल्या आहे. दहा ते पंधरा गावासाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला आहे. सध्या सुमारे ७० ते ७२ हजार विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होत असून नवीन बसमुळे आणखी ३० हजार विद्यार्थिंनीची सोय होणार आहे.

विद्यार्थिनींसाठी मोफत बस प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच नवीन बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थिनींचे शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे.

- भास्कर मुंडे, आयुक्त मानव विकास मिशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक पातळीवर यशाचा डंका पिटणाऱ्या शहरात महिलांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी कमालीचे दुर्लक्ष करत आहेत. शहरात बोटावर मोजण्याइतकी स्वच्छतागृहे असल्याने, कामासाठी घराबाहेर निघणाऱ्या महिलांची कोंडी होते. खरेच या प्रश्नावर प्रशासन कधी जागे होणार, असा सवाल इथली नारीशक्ती करत आहे.

औरंगाबाद प्रचंड विस्तारले. चकचकीत मॉल संस्कृती आली, पण सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहे बांधावित याचे नियोजन झालेच नाही. त्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले गेले नाहीत. महापालिकेची जी प्रसाधनगृहे आहेत, त्यांची स्वच्छता, साफसफाईबद्दल न बोललेलेच बरे. त्यामुळे खरेदी किंवा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलेला एक वेळ एटीम चटकन मिळेते, पण स्वच्छतागृह शोधूनही मिळत नाही. औरंगपुरा, समतानगरसारख्या काही वस्त्यांमध्ये तर या स्वच्छतागृहांचे दरवाजेही पळविण्यात आले आहेत. या स्वच्छतागृहांच्या बाजूचा परिसर अत्यंत घाणेरडा आहे. इथल्या असुरक्षित वातावरणामुळे रात्रीच्या वेळी एकटी महिला चुकूनही इथे जाण्यास धजावत नाही. काही स्वच्छतागृहे जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहेत. गुलमंडी सारख्या गजबजलेल्या परिसरात तर महिलांचा सर्वात जास्त वावर. मात्र, वर्षानुवर्षे इथल्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगार, भाजीविक्रेत्या, दुकानदार किंवा खरेदीला येणाऱ्या महिलांकरता स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे या महिलांना सकाळी कामावर आल्यापासून ते घरी जाईपर्यंत त्रास सहन करावा लागतो.

जिथे सार्वजनिक प्रसाधनगृह आहे, तिथे प्रचंड घाण आहे. त्यामुळे वॉर्डात प्रसाधनगृहासाठी पुढाकार घेतला की विरोध होतो. समजूत घालून या विषयाला न्याय देऊ.

- कीर्ती शिंदे, नगरसेवक, नागेश्वरवाडी

वॉर्डात महिला स्वच्छतागृहे असावीत यासाठी पालकमंत्र्यासोबत चर्चा केली. यापुढे प्रत्यक्ष कृतीकरता महिला नगरसेवक मिळून गांर्भीयाने लक्ष घालू.

- यशश्री बखरिया, नगरसेवक, राजाबाजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या बदलीत अनियमितता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामविकास खात्याने मे २०१५ मध्ये सार्वत्रिक बदल्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेची तालुकास्तरीय सर्वसाधारण बदली करण्यात आली. या बदलीत कुठलेही निकष पाळले गेले नाहीत. चुकीच्या पद्धतीने अनियमितता करून केलेली बदली रद्द करावी यासाठी बी. एल. भोजने गेल्या महिनाभरापासून आरोग्य विभागात चकरा मारत आहेत, पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

मे २०१५ मध्ये झालेल्या तालुकास्तरीय सर्वसाधारण बदल्यांमध्ये श्रीमती भोजने या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, टाकळीमाळी (ता.औरंगाबाद) येथे आरोग्य सेवक या पदावर कार्यरत होत्या. बदली प्रक्रियेत त्यांची ढवळापुरी उपकेंद्रात बदली करण्यात आली. याठिकाणी कुठलेच निकष पाळले गेले नाहीत, असा दावा श्रीमती भोजने यांनी केला. तालुकास्तरीय बदल्या करताना सेवाज्येष्ठता यादी प्राधान्य दिले जाते. त्यानुसार वरच्या क्रमांकावर बदलीपात्र असलेल्या कर्मचाऱ्याला तीन चॉइस दिले जातात. या यादीमध्ये भोजने यांचा पहिला क्रमांक अपेक्षित होता, पण बदलीच्या वेळी त्यांचे नाव पाचव्या क्रमांकाला होते. बदलीच्या वेळी त्यांनी यंत्रणेला माहिती करून दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांना चॉइस न मिळाल्याने ढवळापुरी उपकेंद्रात नियुक्ती देण्यात आली. उपकेंद्रांच्या बाबतीतही हाच नियम लागू होता. चौका व ओहर उपकेंद्रात बदलीपात्र नसलेल्या आरोग्य सहायक (एएनएम) यांच्या बदल्या करण्यात आल्या. भोजने यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे गेल्या महिन्यांत यासंदर्भात रितसर तक्रार देऊन चौकशीची मागणी केली.

अनियमितता झाल्याने भोजने नवीन ठिकाणी रुजू झालेल्या नाहीत. सध्या कुठेच नियुक्ती नसल्याने त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात चकरा मारत आहेत. मंगळवारी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची तयारीही श्रीमती भोजने यांनी दर्शविली आहे.

आदेश देऊनही चौकशी नाही

सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडेही हे प्रकरण गेले. चौधरींनी चौकशीचे आदेश दिले होते. महिना उलटून गेला तरीही चौकशी झालेली नाही. प्रशासनाच्या टोलवाटोलवीवर सीइओंकडून बुधवारी कारवाई अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला समूह संघटकांच्या ज्येष्ठता डावलून नियुक्त्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेवा ज्येष्ठता यादी डावलून महापालिकेत समूह संघटक महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी 'अर्थपूर्ण' चर्चा केली नाही, त्यांची अन्य गावी बदली केली. त्यामुळे या महिलांवर अडचणींचा डोंगर कोसळला आहे.

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (एनयुएलएम) योजनेअंतर्गत कंत्राटी व निश्चित स्वरुपाच्या मानधनावर महापालिकेत समूह संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेअंतर्गत २००४-०५ च्या सर्वेक्षणानुसार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींची संख्या १५,००० पेक्षा जास्त आहे. प्रत्येक तीन हजार कुटुंबामागे एक समूह संघटक नियुक्त करण्याचे शासनाचे आदेश आहेत. महापालिकेत सध्या याच सर्वेक्षणाच्या आधारे काम केले जात आहे. या कामासाठी समूह संघटक म्हणून महिला काम करीत आहेत. नऊ समूह संघटकांमध्ये सत्वगुणा जोगदंड आणि सरला मेश्राम या दोघी सेवा ज्येष्ठता यादीनुसार अन्य काही समूह संघटक महिलांपेक्षा ज्येष्ठ आहेत. असे असताना त्यांची नियु्क्ती महापालिकेत न करता अनुक्रमे कन्नड आणि वैजापूरला मानधनावर करण्यात आली आहे. या बदलीच्या संदर्भात जोगदंड आणि मेश्राम यांनी महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. बदली रद्द करण्याची मागणी केली. ही मागणी करताना त्यांनी त्यांच्या कौटुंबिक अडचणींचा उल्लेख निवेदनातून केला. वैयक्तिक आजारपण आणि वयोवृध्द वडिलांचे आजारपण याची कल्पना दिल्यावरही बदली करण्यात आली, असा या दोघांचा आक्षेप आहे.

तेरा महिन्यांपासून मानधन नाही

सेवाज्येष्ठता डावलून करण्यात आलेली नियुक्ती आणि नियुक्तीच्या नंतर करण्यात आलेली बदली या दोन्ही घटना अन्यायकारक आहेत. तेरा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, त्यामुळे आत्महत्या करावी का? असा विचार मनात घोळत असल्याची हतबलता जोगदंड आणि मेश्राम यांनी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसैनिकाच्या कन्येला धमक्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंग्रजांना, रझाकारांना धडकी भरवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाची स्वातंत्र्यात परवड सुरू आहे. काल्डा कॉर्नर येथील मीरा श्रीनिवास खोत यांची जमीन बळकावण्यासाठी गुंडांकडून घरात घुसून धमक्या देण्यात येत आहेत. मंगळवारी खोत यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे दाद मागितली. कारवाई न झाल्यास वडिलांची शौर्यपदके परत करू, असा इशाराही दिला.

मीरा खोत. वय वर्ष ५४. स्वातंत्र्यसैनिक कॉलनी राहतात. यांचे वडील श्रीनिवास खोत स्वातंत्र्यसैनिक होते. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. एलआयसीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. श्रीनिवास खोत यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलन सक्रिय सहभाग घेतला. १९४८ च्या रझाकाराविरुध्दच्या आंदोलनात उडी घेतली. गोवा मुक्तिसंग्राम तसेच तेलंगणासंदर्भातील आंदोलनातही ते आघाडीवर होते. सध्या खोत यांचे स्मारक उभारण्याचे काम अंबाजोगाईत सुरू आहे. त्यांच्या कुटुंबाची औरंगाबादमध्ये परवड सुरू आहे. खोत यांनी १९६७ साली काल्डा कॉर्नर परिसरात जमीन घेतली. काही वर्षांनी सालारजंगची मालमत्ता असल्याचे सांगत, या प्रकरणी काही जणांनी कोर्टात दावा दाखल केला होता. मात्र, सुप्रिम कोर्टाने १९९७ साली खोत यांच्याकडून या जमिनीचा निकाल दिला. गेल्या काही वर्षांपासून ही जमीन रिकामीच होती. वडिलांचे निधन झाल्यामुळे ही जमीन मीरा खोत यांनी आपल्या नावावर केली. त्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी त्या गेल्या असता, एका गुंडाने त्यांना आडकाठी केली आणि धमक्या दिल्या. या प्रकारामुळे दुखावलेल्या मीरा खोत यांनी पोलिस आयुक्तालय गाठून आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत हा प्रकार सांगितला. सुरुवातीला आयुक्तांना हा न्यायलयीन वाद वाटला. यावर मीरा खोत यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयाला न्याय मिळत नसेल तर काय अर्थ अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर अमितेशकुमार यांनी तत्काळ हे प्रकरण गुन्हेशाखेकडे चौकशीसाठी सोपवले.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात धडाकेबाज कारवाई केली. नियम मोडणाऱ्यांना वठणीवर आणले. आता मीरा खोत यांना या धमक्यांपासून आणि जमीन हडपणाऱ्यांपासून सुटका मिळविण्यासाठी फक्त अमितेशकुमार यांच्याकडून आशा आहे. त्या आशेपायी त्यांनी पोलिस आयुक्तालयाची पायरी चढली. त्यांच्या पाठीशी राजकीय सर्वपक्षीय नेते, पुढारी, उभे राहिले तर त्यांच्या हक्काच्या जमिनीचा लढा नक्कीच यशस्वी होईल. गावगुंडांच्या घरात घुसून होणाऱ्या धमक्या थांबतील आणि छळवाद थांबेल असा आशावाद मीरा खोत यांना आहे.

गुंडाचा मस्तवालपणा

मंगळवारीही एक गुंड मीरा खोत यांच्या घरी गेला. कोट्यवधी रुपयांची ही जमीन आपल्यालाच विका. इतरांना विकल्यास त्यातली चाळीस टक्के रक्कम आपल्याला द्या, असे धमकावले. तसेच स्वातंत्र्यसैनिकाविषयी अपशब्द काढले. या प्रकारामुळे मीरा खोत हादरून गेल्या. त्यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे आपली कैफियत मांडली.

आज प्रथमच स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे तक्रार केली. गुन्हेशाखेकडे हे प्रकरण दिले आहे. जर खरच अशा पध्दतीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असेल तर, त्याच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करू.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयाना जर अशा प्रकारची गुंडगिरी सहन करावी लागत असेल तर गंभीर आहे. पोलिसांकडे या प्रकरणी दाद मागितली आहे.

न्याय मिळाला नाही तर वडिलांना मिळालेली सर्व पदके शासनाकडे परत करू.

- मीरा खोत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपुत्र चोराकडून नऊ दुचाकी हस्तगत

$
0
0

औरंगाबाद : शहर तसेच परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोराला क्रांतीचौक गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्याचा हा मुलगा असून त्याच्या ताब्यातून नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत. हर्सूल भागातील एका तरुणाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती क्रांतिचौक गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून सय्यद शोयेब सय्यद सादीक उर्फ गुड्डू (रा.हर्सुल) याला अटक करण्यात आली. पोलिस चौकशीमध्ये त्याने नऊ दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. बनावट चावीने दुचाकी चोरून त्याची विक्री करण्यात येत होती. या गाड्यांचे सुटे पार्ट शोयेब विकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला केले आत्महत्येस प्रवृत्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहा लाख रुपयांच्या हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र तदर्श न्यायाधीश (१) आर. आर. काकाणी यांनी फेटाळला.

सुनील नायबराव बावणे (३४, रा. म्हाडा कॉलनी, औरंगाबाद) याचा विवाह शीतल हिच्याशी २३ मे २०१३ रोजी झाला होता. विवाहानंतर सुनीलने पत्नीला वर्षभर चांगले नांदवले. त्यांची मुलगी (अक्षता) एक वर्षाची झाल्यानंतर सुनीलने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पैशाच्या मागणीवरून शीतलच्या आई-वडिलांनी सुनील यास दहा-दहा हजार रुपये दिले. सुनीलने मध्येच नोकरी सोडून पीएचडीचे शिक्षण सुरू केले. पीएचडी झाल्यानंतर पुन्हा नोकरीसाठी दहा लाख रुपयांची मागणी करीत पत्नीचा छळ सुरू केला. दरम्यान, १५ मे २०१५ रोजी जाफ्राबाद येथे सासरकडील नातेवाईकाच्या विवाहासाठी सुनील गेला असता वादविवाद करून पत्नीच्या वडिलांचा अपमान केला आणि सासरच्यांशी संबंध तोडून टाकले. पत्नीने आई-वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिला घरातून हाकलून दिले. पत्नीच्या आई-वडिलांनी तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पत्नीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पत्नीचा भाऊ श्रीकांत शिवाजीराव कोलते (२७, रा. प्रतापगडनगर, हडको, औरंगाबाद) यांनी ५ जून २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनीलला ९ जून २०१५ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून अटकेमध्ये असलेल्या आरोपीने नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. या संदर्भात, आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुन्हा गुन्हा करू शकतो आणि स्वतःच्या मुलीला ब्लॅकमेल करून पुरावा नष्ट

करण्याचा प्रयत्न करू शकतो, यामुळे आरोपीला जामीन देऊ नये, अशी बाजू सरकारी वकील राजू पहाडिया यांनी मांडली. दोन्हीबाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश काकाणी यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना दीड लाखाचे पारितोषिक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोलवाडी लिंक रोडवर उद्योगपतीच्या बंगल्यावर दरोडा टाकून २४ लाखांचा ऐवज पळविणाऱ्या तिघांना क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली आहे. ३० मे रोजी ही घटना घडली होती. आरोपीमध्ये बोरा ज्वेलर्स दरोड्यातील मास्टरमाइंड विठ्ठल वाघमारेसह अट्टल गुन्हेगार अजय ठाकूरचा समावेश आहे. सातारा हद्दीत घडलेला हा गुन्हा क्रांतिचौक गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या कर्मचाऱ्यांना दीड लाखाचे पारितोषिक देऊन गौरविले आहे.



उद्योगपती प्रवीण तुलसियान यांचा गोलवाडी भागात बंगला आहे. ३० मे रोजी तुलसियान कुटुंब बाहेरगावी गेले होते. घराच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दोन वॉचमन व स्वंयपाकी ठेवला होता. रात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. वॉचमन व स्वंयपाकी यांना चाकूचा धाक दाखवत स्टाफ रूममध्ये बंद करण्यात आले. बेडरूममधील कपाटातून या दरोडेखोरांनी चार लाख रूपये व वीस लाखांचे दागिने असा चोवीस लाखाचा ऐवज लंपास केला होता. या खळबळजनक घटनेचा सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील सर्वच पोलिस यंत्रणा या गुन्ह्याच्या तपासाच्या कामी लागली होती. दरम्यान, क्रांतिचौक पोलिस ठाण्यातील गुन्हेप्रकटीकरण पथकातील संतोष मुदीराज व मनमोहन मुरली कोलमी यांना या गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील दरोडेखोर विठ्ठल शिवाजी वाघमारे (वय ४० रा. रेणुकानगर, शिवाजीनगर), याचा हात असल्याची माहिती मिळाली होती. विठ्ठल वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची माहीती दिली. पोलिसांनी अट्टल घरफोड्या अजय रमेश वाहूळ उर्फ ठाकूर (वय २० रा. एकतानगर, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) व विनोद राम चाबुकस्वार (वय २३ रा. सिध्दार्थनगर एन १२ हडको) यांना अटक केली. त्यांचे दोन साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती, बाबाराव मुसळे आदींची उपस्थिती होती.

सोने ठेवले लपवून

आरोपींनी दरोडा टाकल्यानंतर रोख रक्कम वाटून घेतली. मात्र, सोन्याचे दागिने सातारा परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी लपवून ठेवले होते. रोख रक्कम संपल्यानंतर त्यांनी सोने विक्रीस काढले होते. पोलिसांनी ३०० ग्रॅम सोने हस्तगत केले असून एका सोनाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या पसार साथीदारांकडे उर्वरित मुद्देमाल असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.

या गुन्ह्यामध्ये तुलसियान यांच्या नोकरांपैकी किंवा परिचितापैकी कोणी सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप तसे तपासात समोर आलेले नाही. या प्रकरणी आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

वीस दिवसांपूर्वीच्या चौकशीत अजय ठा‌कूरची पोलिसांना गुगली

या दरोड्यामध्ये कुख्यात घरफोड्या अजय ठाकूरचा समावेश आहे. गुन्हा केल्यानंतरही तो शहरात राजरोस वावरत होता. दरोडा पडल्यानंतर गुन्हेशाखा व सबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांची चौकशीसाठी उचलबांगडी केली होती. सातारा पोलिसांनी अजयला पोलिस आयुक्तालयात हजर केले होते. सातारा पोलिस व गुन्हेशाखेच्या तो बारा ते चौदा तास ताब्यात होता. गोलवाडी दरोड्यासंदर्भात त्याचीही चौकशी झाली, परंतु निर्ढावलेल्या अजयने पोलिसांना सहज गुंगवले. आपला काही सबंध नसल्याचे सांगत त्याने मौन साधले. पोलिसांनी देखील त्याची बाब गंभीरतेने घेतली नसल्याने चौकशी फॉर्म भरून त्याला सोडण्यात आले. त्यानंतरही शहरात त्याचे वास्तव्य कायम होते. मात्र, क्रांतीचौक पोलिसांनी त्याचे ‌बिंग फोडले. बाल गुन्हेगार असल्यापासून अजय गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर मुकूंदवाडी, उस्मानपुरा, क्रांतिचौक, सिटीचौक, सिडको, जवाहरनगर, जिन्सी व सातारा पोलिस ठाण्यात तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. २ एप्रिल रोजी त्याला दरोड्याच्या तयारीत असताना शहानूरवाडी चौकात साथीदारासह पकडण्यात आले होते. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याची सुटका झाली होती. त्यानंतर महिन्याभरातच त्याने दरोड्यासारखा मोठा गुन्हा करीत गुन्हेगारी क्षेत्रातच असल्याचे दाखवून दिले.

पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात मिशन फत्ते

गोलवाडी येथे तुलसियान यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कर्मचाऱ्यांची मिटिंग घेतली. त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. क्रांतिचौक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी संतोष मुदीराज व मनमोहन मुरली कोलमी यांना खबऱ्याने पक्की माहिती दिली. खबऱ्या विश्वासू असल्याने पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांना ही माहिती देण्यात आली. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना ही माहिती सांगितली. आयुक्त अमितेशकुमार यांनी गुप्तपणे मिशन राबविण्याचे आदेश दिले. एकाचवेळी विविध ठिकाणावरून दरोडेखोर विठ्ठल वाघमारे, अजय ठाकूर व विनोद चाबूकस्वारला उचलण्यात आले. त्यांना वेगवेगळे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला वाघमारेला आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. त्याने कबुली दिली. काही वेळातच अजय ठाकूर व चाबूकस्वारला हजर केले. आरोपींना आपले बिंग फुटल्याचे समजले. त्यांनी गुन्हा मान्य करीत सोने विक्री केल्याचे सांगितले. क्रांतिचौक पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आयुक्तांनी कौतुक केले. पूर्ण पथकाला एक लाखाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. तर गुन्हा उघडकीस आणणाऱ्या कोलमी व मुदीराज यांना प्रत्येकी पंचवीस हजाराची रोख रक्कम देत गौरविण्यात आले. तसेच दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या मुनीर पठाण यांना देखील पंधरा हजाराचे पारितोषिक देण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, पीएसआय गणेश धोक्रट, सतिश आहेरकर, संतोष मुदीराज, मनमोहन मुरली कोलमी, दिलीप मोदी, समद पठाण, मुनीर पठाण, अमोल शिंदे, प्रकाश डोंगरे, एजाज शेख, नवनाथ परदेशी व नितीन चौधरी यांनी हे मिशन फत्ते केले.

विठ्ठल वाघमारे दरोड्याचा मास्टमाइंड

या दरोड्याचा मास्टरमाइंड विठ्ठल वाघमारे आहे. ७ फेब्रुवारी २०१० रोजी वाघमारे याने आंध्रप्रदेशातील कुख्यात दरोडेखोर जुल्फीसिंग बावरी याच्या टोळीला सोबत घेऊन पुंडलिकनगर येथील बोरा ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. यामध्ये रिवॉल्वरचा धाक दाखवून अठरा लाखाचा ऐवज लुटण्यात आला होता. विठ्ठलने या दरोड्याचा प्लॅन आखला होता. बोरा ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी रात्री त्याने सिल्लोड येथे दुकान फोडले होते. बोरा ज्वेलर्समध्ये पोलिसांनी पकडल्यास त्यांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक त्याने हा गुन्हा केला होता. गुन्हेशाखेने त्याला ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी बोलावल्याचे सांगत त्याला नेण्यात आले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर विठ्ठलने गुन्हा कबूल केला होता. विठ्ठल वाघमारे याचे रेल्वे स्टेशन व मुरलीधरनगर भागात लॉटरीचे दुकान आहे. गोलवाडी येथे गुन्हा केल्यानंतर देखील तो राजरोजसपणे दुकान चालवत होता. या गुन्ह्यामध्ये त्याचा हात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याला याची कुणकुण लागू दिली नाही. सोमवारी अचानक त्याच्या दुकानातून त्याला उचलण्यात आले. चौकशीसाठी पोलिस आयुक्तांनी बोलावले असे सांगत आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. त्याला पोलिसी पाहूणचार मिळताच त्याने दरोड्याची कबुली दिली.

लॉटरी, पत्त्यामध्ये घातले पैसे

आरोपींना रोख रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी आपसात ती रक्कम वाटून घेतली. यापैकी लॉटरी सेंटर चालक असलेल्या आरोपी विठ्ठलच्या दुकानात काही आरोपींनी लॉटरी खेळण्यामध्ये रक्कम खर्च केली. तर आरोपी अजय ठाकूर याने पत्त्याच्या जुगारामध्ये त्याची रक्कम घातली. मौजमजा करण्यावर ही रक्कम उडवली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images