Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सातशे गावांत पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात जून महिन्यातील दमदार पावसामुळे १८०० च्या पलिकडे गेलेला पिण्याच्या पाण्याचा टँकरचा आकडा निम्मा झाला होता. मात्र एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे टँकरची संख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या आठवड्यात उन्हाचा चटका वाढल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एका आठवड्यात टँकरची संख्या १३६ ने वाढली. मराठवाड्यात ७३६ गावे व ३९१ वाड्यांना ९९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस आठ जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या १८६० होती. मात्र त्यानंतर मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने चार जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. परिणामी टँकरची संख्या कमी होत गेली. २० जून रोजी ११३२, २९ जून रोजी १००३ व ६ जुलै रोजी टँकरच्या संख्या ८६३ पर्यंत कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा टँकरची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. सध्या मराठवाड्यात ९९९ टँकरने पाणी पुरवले जात आहे. जून महिन्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात होते, त्यानंतर ही संख्या तीनवर आली. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६४ गावांना ८१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ४७८ टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत.

पावसानंतरही विभागात ३३७६ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४९, जालना ११२, परभणी २८९, हिंगोली ३०, नांदेड ४१९, बीड ८११, लातूर ८३० व उस्मानाबाद जिल्ह्यात ८३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात १४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय टँकर

औरंगाबाद - ८१

जालना - ६४

परभणी - २१

हिंगोली - ३

नांदेड - १११

बीड - ४७८

लातूर - ९२

उस्मानाबाद - १४९

एकूण - ९९९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेसबुकवरील मैत्रीमुळे डॉक्टरला २५ लाखाचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । उस्मानाबाद

तुळजापूर येथील उच्चशिक्षित डॉक्टरला फेसबुकवरून मैत्री करणे महागात पडले आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून (सोशल मिडीया) आकर्षित व भुरळ पाडणारे फोटो दाखवत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुण डॉक्टरला २५ लाखाचा गंडा एका टोळीने घातला.

तुळजापूर येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पवन पाटील (रा. पाटोदा) याने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील व्हॉट्सअप ग्रुपमधील बारा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. पवन पाटील यांनी स्वतःचे फेसबुक अकाऊंट आहे. फेसबुकवर चॅटींगचा खेळ करीत असताना त्यांची मैत्री एका मुलीसोबत झाली. त्यावेळी प्रियांका शहा नावाच्या या मुलीने डॉक्टर पवन यांच्याशी सलगी वाढवित त्यांना आकर्षित केले. तिने सुंदर फोटोद्वारे डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखविले व आई-वडिल म्हणून इतर लोकांना डॉ. पवन बरोबर फोनद्वारे बोलायला लावले. लग्नाची आमिषे यातच डॉक्टर फसले. तिने डॉक्टरकडे पैशाची मागणी केली. त्यांनी बँक खात्यावर आतापर्यंत २५ लाख रुपये भरले.जेव्हा डॉक्टर संभाव्य पत्नी होणाऱ्या या सुंदर मुलीला भेटण्यास गेले तेव्हा या मुलीने भेट टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरचा संशय बळावला व फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रियांका उर्फ अपर्णाने दिलेल्या पत्त्यावर घराचा शोध घेतला असता सत्य समोर आले. अपर्णा उर्फ प्रियांका ही ३५ ते ४० वर्षाची विवाहिता आहे.

याप्रकरणी पुण्यातील अपर्णा संताजी उर्फ सत्यजीत बसवंत हिच्यासह कुणाल गांधी, संताजी बसवंती, सुरेश भोसेकर, भविष्या वाडिया उर्फ पिंकी, एम. वाडिया, दीपिका पंडित, विजू उर्फ राघवेंद्र कटाप, आकाश चव्हाण, गौरी उर्फ रेणुका काकडे, कौशल्य नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यापैकी तीन जणांना तुळजापूर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवश्यकतेनुसार चारा डेपो सुरू करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

सलग चौथ्या वर्षीही पावसाने अद्यापपर्यंत दडी मारल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे तसेच तीव्र पाणीटंचाईचा सामनाही करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध पाणीस्त्रोत पिण्यासाठी राखीव ठेवणे आणि जेथे ज्याप्रमाणे आवश्यकता असेल तेथे गरजेनुसार चारा डेपो आणि चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र, कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावरच राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

उस्मानबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, आमदार मधूकर चव्हाण, राहुल मोटे, राणा जगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्ह्यातील पाणीपरिस्थिती, पीकपरिस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, जिल्ह्यात सुरू असणारी रोजगार हमी योजनेची कामे, उपलब्ध मजूर संख्या आदींचा तपशीलवार आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी उपस्थितांना सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली.

पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे यावर्षीही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि राज्य शासन मिळून एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्याची भूमिका घेतात, हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात टंचाई आहे. त्यामुळेच अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुंबईत चर्चा केली.. आज शेतकरी संकटात आहे. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काही दिवस पुरेल इतकाच चारा शिल्ल्क आहे. अशावेळी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.'

यावेळी आमदार चव्हाण यांनी गावातील स्त्रोत कोरडे पडत असून त्याठिकाणी तात्काळ पर्यांयी व्यवस्था करण्याची मागणी केली. रोहयोवर अधिक लक्ष द्या, चारा छावण्यास सुरु करा, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. टंचाईच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ हाती घेण्याची सूचना आमदार मोटे यांनी केली तर आमदार पाटील यांनी जिल्ह्यालगतच्या सीमेवरील तालुक्यातील काही ठिकाणचे पाणीसाठे आरक्षित कऱण्यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केली. आमदार चौगुले यांनी, रोहयोंतर्गत ज्या कामांची मागणी येईल, त्यांना तात्काळ मंजुरी देण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना केली.

लोकप्रतिनिधींची बैठक

सध्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यावे अथवा पिकांची निवड कशी करावी, याबाबत कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागांनी मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिप्परच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या एका टिप्परने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. रवींद्र म्हसुजी वाहूळ (वय ४५, रा. नागसेन नगर) असे मृताचे नाव आहे. उस्मानपुरा भागात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी टिप्पर चालकास ताब्यात घेतल्याचे उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, रवींद्र वाहूळ हे रिक्षाचालक आहे. घरासमोरच त्यांनी रिक्षा उभी केली होती. सकळी ११च्या सुमारास ते घरातून रिक्षाकडे जात असताना महापालिकेच्या टिप्परने (क्रमांक एमएच २० ए ५७०३) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, टिप्पर जप्त करण्यात आला असून, चालक जगदीश भाऊराव गायकवाड (वय ४८, रा. क्रांतीनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे उस्मानपुरा पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीच्या नावाखाली लाखोंचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका नामांकित फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीला हाताशी धरून अहमदनगर आणि शहरातील भामट्यांनी अनेकांना लाखो रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सचिन अशोक सिरसाठ (२५, रा. कोल्हार, ता. राहुरी), व्यापारी मकबूल शेख लाला (४२, रा. चिश्तिया कॉलनी) आणि बजाज फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी बंडू जनार्दन वैद्य (३१, रा. गजानन कॉलनी, गारखेडा) यांना अटक केल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली असून, कोर्टाने या तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पसार असलेल्या प्रशांत बाबासाहेब कुहिले (३०, रा. कोल्हार) आणि विनोद दुबे (रा. पुणे) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

अटकेत असलेल्या सिचन सिरसाट व त्यांच्या साथादारांनी सिडको (एन-७) अविष्कार चौकात मनी फायनान्स आणि पी. के. कार्पोरेशन नावाने या भामट्याने अलिशान कार्यालय स्थापन केले होते. दीड महिन्यापूर्वी गंगाधर विष्णू पठारे (रा, गांधीनगरी अपार्टमेंट, एमआयडीसी चिकलठाणा) यांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज हवे होते. त्यामुळे ते या फायनान्स कंपनीत गेले होते. चार टक्के व्याजदाराने ६४ हजार रुपयांचे कर्ज देऊ, असे कंपनीतर्फे त्यांना सांगण्यात आले.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे पठारे यांनी त्यांना आधारकार्डची झेरॉक्स आणि चेक दिला. यानंतर भामट्यांनी प्रोझॉन मॉलमधील क्रोमा शो रुम आणि तेथून बाबा पेट्रोल पंप परिसरातील बजाज फायनान्सच्या कार्यालयात पठारे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. तीन दिवसांत कर्ज मंजूर करण्याचे आश्वासनही दिले.

दरम्यान, प्रशांत कोहिले याने पठारेंना बोलावून घेतले आणि त्यांना वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचा ३९ हजारांचा चेक दिला. उर्वरित रक्कम रोख देण्यात येईल, असेही सांगितले. भामट्यांनी दिलेल्या तारखेनुसार पठारे यांनी बँकेत चेक जमा केला, परंतु बँक खात्यात रक्कम नसल्याने तो परत आला. यानंतर संपर्क साधण्यासाठी म्हणून पठारे यांनी फायनान्स कंपनी गाठली. त्यावेळी हे भामटे कंपनीला टाळे ठोकून पसार झाले.

कर्ज वसुलीसाठी फोन

भामट्यांनी पठारे यांच्या कागदपत्रांच्या आधारे महागड्या कंपनीचा ६४ हजार रुपये किंमतीचा मोबाइल खरेदी केला. याची माहिती पठारेंना नव्हती. ८ जून रोजी अचानक पठारेंना बजाज फायनान्स कंपनीतून कर्जाचा पहिला हप्ता म्हणून ६ हजार ४०० रुपये भरण्याबाबत फोन आला, पण, कर्ज घेतलेले नसल्याने हप्ता कसा, असा प्रश्न त्यांना पडला. फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी, ३ मे रोजी आपले ६४ हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यातून आपण ६४ हजारांचा मोबाइल खरेदी केल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पठारे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

बनावट शिक्के ताब्यात

फसवणूक झालेल्या दहा जणांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, भामट्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता बनावट शिक्के, प्रज्ञा सुपर शॉपी, साईराज एंटरप्राईजेस, पी. के. कॉर्पोरेशन या बनावट कंपन्यांच्या नावाची पावती पुस्तके सापडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या ३ जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

झटपट पैसे कमविण्यासाठी चार युवकांनी लातूरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. शुक्रवारी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केली. तिघानांही कोर्टाने २२ तारखेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

लातूरातील विशाल नगर भागातून जितेन गांगर या रेडीमेड कापड विक्रेत्यांचा १३ वर्षांचा मुलगा रोजच्या प्रमाणे दुपारच्या वेळी शिकवणीला जात होता. यावेळी विशाल नगरातील चौकात एक मोटार येऊन थांबली त्यातील तरुणांनी मुलाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कार थांबवली. पत्ता विचारत असतानाच त्याला मोटारीतून पळूवन नेले. त्यावेळी जवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. त्याच वेळी एकाला त्यांनी जोरदार ओव्हरटेक केले होते. त्यामुळे कोण आहेत हे पाहण्यासाठी ते उभे राहिले. त्यावेळी जमलेले लोक पळत आले. त्यांनी त्या मोटारमध्ये मुलाला पळवून नेले जात असल्याची माहिती दिली. ती माहिती पत्रकाराने त्याच क्षणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिली. डॉ. चव्हाण यांनी जिल्ह्याच्या नाकेबंदी सोबतच शेजारील जिल्ह्यातील पोलीसांनाही सर्तक केले त्यामुळे बीड जिल्ह्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यानंतर काही तासात ती कार आणि तीन आरोपी सापडले. त्यामधील एक आरोपी पळून गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी मुख्य आरोपी अस्लम अकबरखान पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर इतर प्रकरणातील गुन्हे दाखल आहेत. परंतु, अपहरणासारखा हा त्याचा पहिलाच प्रयत्न आहे. त्याच्या सोबतचे उमाशंकर स्वामी आणि आशीफ शेख हे त्याचे सोबती आहेत. त्यांच्यावर जुने गुन्हे नाहीत. चौथाही आरोपी लवकरत सापडेल असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवगिरी’वर काळे पॅनेलचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनलने मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलला २१ पैकी २० जागा मिळाल्या तर विधानसभा अध्यक्ष हर‌िभाऊ बागडे व विद्यमान अध्यक्ष डॉ. नामदेव गाडेकर यांच्या सहकारी संस्था विकास पॅनलला फक्त सोसायटी मतदारसंघाची एक जागी विजय मिळविता आला. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विलास औताडे यांच्या पॅनलला साधे खाते सुद्धा उघडता आले नाही.

देवगिरी साखर कारखाना निवडणूक आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीने गाजली. यामध्ये डॉ. कल्याण काळे व बागडे-गाडेकर यांच्यातच ही चुरस होती. विलास औताडे यांनी ही तिसरे पॅनल पटांगणात आणले होते. डॉ. गाडेकर हे विद्यमान चेअरमन तर विलास औताडे हे व्हाईस चेअरमन होते. या दोघांमध्ये पुर्ण पाच वर्ष बेबनाव राहिल्याने कारखाना गेल्या सातवर्षांपासून सुरू होऊ शकला नाही. हे सर्वांसमोर असतांना दोघांनीही स्वतंत्र पॅनल उभे केले. कारखाना बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे सर्व मतदारात यांच्याबद्दल द्वेश निर्माण झाला होता. त्यामुळे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना मतदारांनी मौठा कौल दिला. गाडेकर पॅनलला बऱ्यापैकी मतदान झाले. मात्र औताडे यांना यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना या पंधरा दिवसात पराभवाचे फटके बसत गेले. फुलंब्री व औरंगाबाद तालूका खरेदी विक्री संघ, औरंगाबाद बाजार समिती व आता देवगिरी साखर कारखाना निवडणुकीत त्यांना मोठा हादरा बसला आहे.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे फुलंब्री-जातेगांव गट नितिन शंकरराव देशमुख (३ हजार ७२६),अजगर पटेल (३ हजार ६२६), लहु मानकापे (३ हजार ६५६), वारेगांव-गणौरी गट - सुभाष गायकवाड (३ हजार ७११), सुभाष जाधव (३ हजार ३४७), गणेश तांदळे (३ हजार ८४४), लाडसावंगी- पुंडलिकराव अंभोरे (४ हजार २२५),जगन्नाथ काळे (४ हजार २२६),सुदाम मते (३ हजार ५३७). चिकलठाणा -माळीवाडा गट रावसाहेब औताडे (४ हजार ७१),राजेंद्र जगदाळे (३ हजार ५४२),बबनराव डोळस (तीन हजार ३६३),पिंप्रीराजा-गोलटगांव- विलास गव्हाड (३ हजार ८४७), शाम गावंडे (३ हजार ८९६), शिवाजीराव पवार (३ हजार ६४७).अनुसुचित जाती-भीमराव गंगावणे (४ हजार ९७), विमुक्त जाती गणेश सोलंकर (३ हजार ९१३), ओबिसी- देविदास ढंगारे (चार हजार ५०), महिला राखीव- कमलबाई उबाळे (३ हजार ८०६), काताबाई म्हस्के (३ हजार ६३५) तर डॉ. गाडेकर यांचे चिरंजीव आशिष गाडेकर यांना ६७ पैकी ३५ मतदान झाले. हे सोसायटी मतदारसंघातून चार मताने विजयी झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या काचांवर काळ्या फिल्म कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेली मोहीम थंडावली आहे. त्यामुळे सुमारे कारच्या काचांवर ६० ते ८० टक्के काळ्या फिल्म कायम आहेत. पोलिस आणि आरटीओ विभागाने डोळेझाक केल्यामुळे या कार निर्धास्तपणे धावत आहेत. शहरातील बहुसंख्य ऑटोमोबाइल दुकानांवर काळ्या फिल्मची सर्रास विक्री केली जात आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिने चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावू नयेत, असे आदेश २७ एप्रिल २०१२ रोजी सुप्रीम कोर्टाने दिले . वाहनांच्या काचा पारदर्शक ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वाहनांच्या काळ्या काचांवर आक्षेप घेतला. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारच्या काचांवरील फिल्म काढण्यासाठी मोहीम राबविली. काही दिवसांनंतर ही मोहीम गुंडाळण्यात आली. सर्वसामान्य वाहनधारकांसह उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या वाहनांनाही काळ्या काचा कायम आहेत.

कायदा काय म्हणतो?

केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९, नियम १०० (२) ः वाहनांच्या समोरील व मागील काचेची पारदर्शकता ७० टक्क्यापेक्षा अधिक, तर खिडक्यांच्या काचेची पारदर्शकता ५० टक्क्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, मात्र शहरातील वाहनांची परिस्थिती पाहिल्यास पुढची काच सोडल्यास इतर सर्व खिडक्यांच्या काचा ८० ते १०० टक्के काळ्या असल्याचे दिसते.

फक्त शंभर रुपये दंड

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर रंगीत ‌फिल्म लावणे गुन्हा आहे, मात्र त्यासाठी दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. केवळ शंभर रुपये दंड आकारून वाहनधारकाला सोडून दिले जाते. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनाच या काचेवरील फिल्म काढण्याचे कष्ट घ्यावे लागतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डीपी’ची अडचण गुलदस्त्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रखडलेल्या सुधारित विकास आराखड्याबाबत असलेली अडचण घेऊन महापालिकेचे प्रशासन कधी शासनापर्यंत आलेच नाही, असे म्हणत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी महापालिकेच्या प्रशासनावरच तोफ डागली आहे. विशिष्ट मुदतीत विकास आराखडा मंजूर झाला नाही तर, तो मंजूर झाला आहे, असे मानले जाईल, अशी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. कोणत्याही शहराचा विकास आराखडा रखडला जाऊ नये अशी शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांमुळे डीपी रखडल्याची बातमी 'मटा'ने प्रसिद्ध केली. औरंगाबाद शहरासह १८ खेड्यांचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झाले नाही. महापालिका प्रशासन त्याचे खापर नगररचना विभागावर फोडत आहे. यासंदर्भात 'मटा'ने नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधून पालिकेच्या रखडलेल्या सुधारित विकास आराखड्याबद्दल माहिती घेतली.

डॉ. रणजीत पाटील म्हणाले, 'विकास आराखड्याबाबत काही अडचणी असतील तर, महापालिकेच्या प्रशासनाने शासनासमोर त्या मांडायला हव्यात. त्यातून मार्ग काढता आला असता. महापालिकेच्या प्रशासनाने विकास आराखड्यासंदर्भात शासनाकडे काहीच माहिती दिलेली नाही. ठराविक मुदतीत विकास आराखडा केला नाही तर, तो मंजूर झाला (डिमड् सॅक्शन) असे

मानले जाईल, अशी सुधारणा कायद्यात करण्यात आली आहे. मुंबईसाठी एका वर्षाचा तर, उर्वरित महापालिकांसाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत विकास आराखडा मंजूर झाला नाही तर, तो आराखडा मंजूर झाला असे समजले जाईल.' केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे विकास आराखडा रखडतो, असे नाही. विकास आराखड्यासंदर्भातील कायद्यात सुधारणा केल्यामुळे आता भीती राहिलेली नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

दूरदृष्टी ठेवून घेतला निर्णय

केंद्र सरकारची स्मार्टसिटी आणि अमृत योजना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विकास आराखड्याच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली. शासनाने दूरदृष्टी ठेवून हा निर्णय घेतला आहे. विकास आराखड्यामुळे एखाद्या शहराची स्मार्टसिटी किंवा 'अमृत'मधील प्रवेशाची संधी हुकू नये, अशी शासनाची या मागची भूमिका आहे, असेही डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएस्सीचे विद्या‌र्थी निकालामुळे चिंतेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बीएस्सी अंतिम वर्षाच्या रिड्रेसल प्रकरणामधील उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेऊन दोन आठवडे उलटले, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह कायम आहे.

बीएस्सी अंतिम वर्षातील केमिस्ट्रीमध्ये अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. उत्तरपत्रिका योग्य प्रकारे तपासल्या नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. त्यामुळे पुन्हा पेपर तपासणीची मागणी करण्यात आली होती. विद्यापीठाने यासंदर्भात समिती स्थापन केली. तपासणीत त्रुटी असल्याचे समितीने मान्य केले. यानंतर उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेची सुरुवात होऊन १५ दिवस उलटले. अद्याप विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्याचबरोबर दोषी प्राध्यापकांवर काय कारवाई होणार, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रवेशाची प्रक्रिया संपली

सुधारित गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका परत मागविण्यात आल्या आहेत. सुधारित गुणपत्रिका केव्हा मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही. एकीकडे ही प्रक्रिया सुरूच आहे तर, दुसरीकडे प्रवेशाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय, असा प्रश्न आहे.

विविध विषयांचा प्रश्न

केमिस्ट्रीसह आयटी व इतर विषयांमधील विषयांनी रिड्रेसलसाठी अर्ज भरले. एकूण अर्जांची संख्या दीड हजार आहे. यात सर्वाधिक अर्ज केमिस्ट्रीचे आहेत. केमिस्ट्रीच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू आहे, यात इतर विषयांचे काय, असा प्रश्न कायम आहे.

विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना सुधारित गुणपत्रिका लवकरच देण्यात येतील. उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेला वेळ लागतो. तपासणीचे केंद्र अनेक आहेत. प्राप्त अर्जांनुसार तेथील उत्तरत्रिका शोधून तपासणी केली जाते. ही प्रक्रिया सुरू आहे.

- डॉ. प्रल्हाद लुलेकर, परीक्षा नियंत्रक, विद्यापीठ

अद्याप विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्या केव्हा मिळणार अन् पुढील प्रवेशाचे काय, हे स्पष्ट नाही. प्रक्रियेच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाता कामा नये.

- अॅड. ज्योती पत्की, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुसा’त विद्यापीठाला हवेत १८५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनाचा विस्तारासाठी 'रिसर्च हब' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या हबसह नवीन संकल्पना, पायाभूत सुविधांचा विस्तार यासाठी राष्ट्रीय माध्यमिक उच्च शिक्षण अभियानातंर्गत विद्यापीठाने १८५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. शिक्षकांना विषयांचे अत्याधुनिक ज्ञान घेता यावे, यासाठी 'अॅकॅडमिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'ही विचाराधीन आहे.

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानांतंर्गत (रुसा) शासनाने विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविले. उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जावाढ यासाठी विद्यापीठाने विस्ताराच्या विविध संकल्पना मांडल्या आहेत. विद्यापीठाने 'रुसा' अंतर्गत १८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर केले आहेत. यात पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, वसतिगृहांसारखे महत्त्वाचे विषय आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य शाखांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एकाच छताखाली संशोधन करता यावे, नवीन संकल्पना समोर याव्यात म्हणून 'रिसर्च हब' उभारण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे. 'हब'मध्ये विद्या शाखानिहाय अत्याधुनिक सुविधा, उपकरणे उपलब्ध करून दिले जातील.

कॉलेजांकडून प्रस्तावासाठी आग्रह

'रुसा'मध्ये कॉलेजांचेही प्रस्ताव यावेत, यासाठी विद्यापीठ प्रशासन आग्रही आहेत. 'रुसा'साठी कॉलेजचे नॅक मूल्यांकन झालेले असणे आवश्यक आहे. नॅक 'अ' किंवा 'ब' मानांकन असेल तरच कॉलेज 'रुसा'अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यासाठी पात्र आहे. याबाबत मराठवाड्यातील कॉलेजांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली.

अॅकॅडमिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट

प्राध्यापकांना शिक्षणासाठी लागणारे अत्याधुनिक ट्रेनिंग उपलब्ध व्हावे, अध्यापनातील नवनवीन पद्धतींची तोंडओळख त्यांना व्हावी म्हणून विद्यापीठाने अॅकॅडमिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रस्तावित केले आहे. इन्स्टिट्यूटच्या उभारणीसाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हैदराबादच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट धर्तीवर देशातील ही शिक्षकांना ट्रेनिंग देणारी देशातील एकमेव इन्स्टिट्यूट ठरेल. तेथे शिक्षकांसह, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाईल.

विद्यापीठाला अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा, असे प्रयत्न आहेत. विद्यापीठाचा प्रस्ताव अतिशय प्रभावी आहे. प्रस्ताव तयार करण्याच्या कामात कुलगुरूंनी स्वतः त्यात लक्ष घातले आहे.

- डॉ. के. रवींद्र रेड्डी, रुसा समन्वयक, विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगिरी किल्ल्यावर होणार ‘लाइट अॅण्ड साउंड शो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद पर्यटन जिल्हा घोषित होताच देवगिरी किल्ल्याच्या परिसरात 'लाइट अॅण्ड साउंड शो' सुरू करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पावले उचलली आहेत. यादव ते निझाम असा बाराशे वर्षांचा कालखंड या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न दुबईची कंपनी करणार आहे. गेल्या महिन्यात 'एमटीडीसी'च्या समितीने सर्वेक्षण केले आहे.

जयपूर, ग्वाल्हेर, दिल्ली, गोवळकोंडा किल्ल्याच्या धर्तीवर देवगिरी परिसरात 'लाइट अॅण्ड साउंड शो' सुरू होणार आहे. महामंडळाने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. मागील महिन्यात विशेष समितीने किल्ला परिसराचे सर्वेक्षण केले. भारतमाता मंदिराजवळ पर्यटकांची आसनव्यवस्था करण्यावर एकमत झाले आहे. रामदेवराय यादव ते निझाम असा हजार वर्षांचा कालखंड यात मांडला जाणार आहे. या कामाची जबाबदारी दुबईच्या नामांकीत कंपनीवर सोपवली जाणार आहे. प्रकल्पासाठी किमान पाच ते दहा कोटी रूपये खर्च येईल. दररोज सायंकाळी शो सादर केला जाणार आहे. यामुळे पर्यटकसंख्या वाढेल असा विश्वास पर्यटन विभागाला आहे. मुख्य दरवाजा, चांदमिनार ते मेंढा तोफेपर्यंत ध्वनी व प्रकाशयोजना दिसणार आहे. घोड्यांच्या टापांच्या आवाजांनी पर्यटकांना ऐतिहासिक अनुभव मिळणार आहे. प्रकाशयोजनेतून इतिहास उलगडणार असून लोकप्रिय अभिनेत्यांचा आवाज चित्रफितीसाठी वापरण्याचा विचार आहे. एकावेळी २०० पर्यटक हा सशुल्क शो पाहू शकतील.

पुरातत्व विभागाची प्रतीक्षा

प्राचीन स्मारकाजवळ मोठा आवाज करणे आणि तीव्र प्रकाशझोतास मनाई आहे. या नियमांचा विचार करूनच केंद्रीय पुरातत्व विभाग 'लाइट अॅण्ड साउंड शो'ला परवानगी देणार आहे. राज्य सरकार, 'एमटीडीसी' आणि जिल्हा प्रशासन नव्या प्रयोगासाठी अनुकूल आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्वच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. साउंड शोबाबत दिल्ली कार्यालयातून निर्णय होईल असे दौलताबाद येथील केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी एस. बी. रोहणकर यांनी सांगितले.

देवगिरी किल्ला परिसरात 'लाइट अॅण्ड साउंड शो' सुरू करण्याची संकल्पना 'एमटीडीसी'चे संचालक पराग जैन यांची आहे. हा प्रयोग देवगिरी किल्ल्याच्या सौंदर्यात भर टाकणारा आणि पर्यटनवृद्धीसाठी अनुकूल ठरणार आहे.

- चंद्रशेखर जैस्वाल, प्रादेशिक उपव्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिचडीचे नमुने तपासणीसाठी

$
0
0

लातूरः अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १६० विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या योजनेतून दिल्या जाणाऱ्या खिचडीतून विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी. जी. परगणे यांनी दिली.

डॉ परगणे म्हणाले, 'शुक्रवारी दुपारी धसवाडी गावातील प्राथमिक शाळेत देण्यात आलेली खिचडी खाल्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या होण्याचा त्रास झाला. त्यामुळे बाधीत विद्यार्थ्यांना अहमदपूर तालुक्यातील अंधोरी आणि अहमदपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते'. अनेकांना औषधोपचार करून घरी सोडण्यात आले. अहमदपूरच्या रुग्णालयात २७ आणि अंधोरीच्या रुग्णालायत तीन विद्यार्थी सकाळपर्यंत औषधोपचार घेत होते. त्यांना ही सकाळी घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेची शिक्षण विभाग चौकशी करत असून अन्न व औषध प्रशासनानेही शाळेत वाटप केलेल्या खिचडीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगपुऱ्यात दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन गटांत झालेल्या किरकोळ हाणामारीनंतर काही समाजकंटकांनी दगडफेक करून पानटपरी, दुकानांची तोडफोड केली. औरंगपुरा परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. त्यात यात चार दुकानदारांसह आठ जण जखमी झाले.

औरंगपुरा भागात दुपारी दोनच्या सुमारास तरुणाच्या दोन गटांत जुन्या वादातून हाणामारी झाली. त्यात दोन तरुणांना जबर मार लागला. या घटनेनंतर काही वेळेतच दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी परिसरात धुडगूस घातला. परिसरातील दुकाने बंद करा, असे धमकावत जिल्हा परिषद मैदानालगत असलेल्या दुकानावर हल्ला चढवला. यात अमर ढेकाळे यांची पानटपरी, तेथील चहाटपरीची तोडफोड केली. पानटपरी चालक लक्ष्मीकांत दहिवाल यांनाही टोळक्याने मारहाण केली.

या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव पसरला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत चार दुकानदार किरकोळ जखमी झाले असून, अन्य दोन तरूण जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगपुरा भागातील घटना एका टोळक्याने घडवलेली असून, नागरिकांनी घाबरू नये. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. निर्भयपणे आपले व्यवहार सुरू ठेवावेत.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या ‘शॉपिंग’ला ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टीव्ही सेंटरलगतच्या मैदानावर सिडको प्रशासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय (एनओसी) शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम करणे महापालिकेला भोवले आहे. एनओसी नसल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून या कॉम्प्लेक्सचे काम थांबवावे लागले. पार्किंगला जागा सोडण्यासह अंतर्गत रस्ते करण्याच्या अटीवर सिडकोने एनओसी दिली, पण त्यामुळे कॉम्प्लेक्समधील तीन दुकानांवर गंडांतर आले आहे.

टीव्ही सेंटर लगतच्या मैदानावर ५३ दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि त्यामागे स्टेडियम बांधण्याची योजना महापालिकेने आखली होती. दुकानदारांकडून दुकानाची पूर्ण किंमत घेऊन कॉम्प्लेक्सचे काम करण्याचे महापालिकेने ठरविले होते. त्यातून महापालिकेला किमान वीस लाखांचा फायदा होणार होता. शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन महापालिकेने वाजतगाजत केले आणि लगेचच कामही सुरू केले. संबंधितांना एका वर्षाच्या आत दुकाने ताब्यात देण्याचेही जाहीर केले.

भूमिपूजनानंतर सिडको प्रशासनाने कॉम्प्लेक्सच्या बांधकामावर आक्षेप घेतला. सिडको प्रशासनाच्या एनओसी शिवाय बांधकाम करता येणार नाही, असे महापालिकेला कळवले. सिडको प्रशासनाने या प्रकल्पाला एनओसी द्यावी, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले. सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एनओसी देण्यासाठी पार्किंग आणि अंतर्गत रस्त्यांचा मुद्दा लावून धरला. महापालिकेने शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे डिझाइन तयार करताना पार्किंगसाठी जागा सोडलेली नव्हती. त्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्यावर उभा केली जाणार, हे स्पष्ट होते. रस्त्यावर वाहने उभी केल्यास वाहतुकीला अडथळा होईल, असा मुद्दा सिडको प्रशासनाने उपस्थित केला. शिवाय कॉम्प्लेक्सच्या रचनेत पालिकेने अंतर्गत रस्त्यांचे नियोजन केले नव्हते. यावरही आक्षेप घेण्यात आला. या आक्षेपातून मार्ग काढण्यासाठी ५३ऐवजी ५० दुकाने बांधण्याचे महापालिकेने ठरविले आहे. तीन दुकानांच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय अंतर्गत रस्त्यांची कामेही केली जाणार आहेत. महापालिकेने त्याची हमी दिल्यानंतर सिडको प्रशासनाने या प्रकल्पाला गेल्या आठवड्यात एनओसी दिली आहे.

शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी पार्किंगची व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते करण्याची हमी महापालिकेने दिल्यामुळे सिडको प्रशासनाने बांधकामासाठी एनओसी दिली. कॉम्प्लेक्सचा भूखंड क्रीडांगणासाठी राखीव आहे. तेथे क्रीडांगणच विकसित केले जाईल, असे महापालिकेने सिडकोला कळविले आहे.

- एच. व्ही. आरगुंडे, प्रशासक, सिडको.

शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी पार्किंगची व्यवस्था व अंतर्गत रस्ते करण्याचे सिडकोने महापालिकेला कळविले आहे. त्या सुविधा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविल्यावर गेल्या आठवड्यात या प्रकल्पाला सिडकोने एनओसी दिले. त्यामुळे आता शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम गतीने सुरू होईल.

- अफसर सिद्दिकी, कार्यकारी अभियंता, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘देवगिरी’ निवडणुकीत बागडेंना झटका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या देवगिरी साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या गटाने २१ पैकी २० जागा जिंकून सत्ताधाऱ्यांना आसमान दाखविले. विशेष म्हणजे कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर हे यावेळी बागडे गटात सामील झाले होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांचे पुत्र विलास औताडे यांचे स्वतंत्र पॅनेल असूनही काळे गटाने घवघवीत यश मिळविले.

बागडे आणि काळे यांच्यातील द्वंद्व गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्याला माहित आहे. बागडे सलग दोन वेळा विधानसभेत पराभूत झाले होते. त्याचे उट्टे काढत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बागडेंनी काळेंना पराभूत केले. राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष बनले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दूध संघ, जिल्हा बँकेच्या माध्यमातून बागडे यांनी आपल्या हातात सूत्रे ठेवली, पण स्वतःच्या फुलंब्री तालुक्यातील सहकारी संस्था मात्र ते राखू शकले नाहीत. फुलंब्री खरेदी विक्री संघ काळे गटाने जिंकला, त्यापाठोपाठ औरंगाबाद बाजार समिती, खरेदी विक्री संघही काळे गटाच्या ताब्यात राहिले. कारखान्याची निवडणूक दोन दिवसांपूर्वी झाली. जिल्ह्यातील राजकीय मंडळींचे त्याकडे लक्ष लागले होते. नामदेवराव गाडेकर, हरिभाऊ बागडे एकत्र आल्यामुळे निवडणुकीत चुरस होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिडकोच्या घराचे पैसे व्याजासह परत द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटी कार्यालयाकडे येथील रहिवाशांना घरे बांधून देण्याची इच्छा नसेल तर गेल्या आठ वर्षांपासून या रहिवाशांच्या होत असलेले छळ थांबवून आठ टक्के प्रमाणे ८ हजार ५५० जणांचे पैसे तात्काळ परत द्या, अशा सूचना आमदार हेमंत पाटील यांनी दिल्या.

सन २००३ ते २००४ मध्ये सिडको येथील आठ हजार पाचशे पन्नास रहिवाशांनी मिळून प्रत्येकी एक हजार या प्रमाणे ८५ लाख पन्नास हजार एवढी रक्कम सिडको गृहनिर्माण कार्यालयाकडे मागील आठ वर्षांपासून भरलेली असतांना देखील त्यांना आजपर्यंत सिडको कार्यालयाकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत. अनेक अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेत आहेत. शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रमोद मैड यांनी अनेकवेळा सिडको गृहनिर्माण कार्यालयाकडे खेटे घालून सुद्धा हाती काहीच न लागल्याने त्यांनी ही बाब आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेऊन कर्तव्य दक्ष आमदार हेमंत पाटील यांनी सिडको गृहनिर्माण कार्यालयात संबंधीत अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावून सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा व उदासिनतेचा समाचार घेतला.

यावेळी पाटील म्हणाले, 'सिडकोच्या रहिवाशांना गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून नवीन घरे बांधुन देऊ म्हणून सिडको कार्यालयाने येथिल नागरीकांची फार मोठी फसवणूक केली आहे. त्यांना लुबाडायचे काम केले आहे. सिडको गृह निर्माण कार्यालयाची उदासिनता पाहता अनेकांचे असलेले घराचे स्वप्न डोळ्यांतच विरणार असल्याने खेद वाटतो.'

हेळसांड आता थांबणार

आगामी काळात तुमचे पैसे व्याजासह परत मिळवून दिल्या शिवाय मी शांत बसणार नाही असे सांगून आमदार हेमंत पाटील यांनी सिडको प्रशासनाला दिलेल्या दणक्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून सिडकोवासीयांची घरासाठी होत असलेली हेळसांड आता थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादची मदार उजनीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा व रुईभर या प्रकल्पातील जलसाठा संपुष्ठात आल्याने सध्या काही भागाची पाण्याची तहान शहरालगतच्या शेकापूर साठवण तलावातील पाण्याने भागविली जात आहे. मात्र, या शेकापूर प्रकल्पातील जलसाठा आता संपुष्ठात येऊ लागल्याने येथील पाणी १५ ऑगस्टपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. आगामी काळात उस्मानाबाद शाहराला उजनी पाण्यावर अवलंबून राहावे लागणार असून, त्यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी दिली.

आताही उस्मानाबाद शहरातील निम्म्या भागाला उजनी पाणीपुरवठा योजनेद्वारेच पाणीपुरवठा केला जातो. सध्या प्रतिदिन चार एमएलटी पाणी उपसा केला जातो. आगामी काळात उजनीहून आठ एमएलटी पाणी उचलावे लागणार आहे. उस्मानाबाद नगरपालिकेच्या दृष्टीने ही खर्चिक व न पेलणारी बाब असली तरी जन हिताच्या दृष्टीने हे केलेच जाणार आहे. उस्मानाबादचा पाणी पुरवठा सुरळितपणे ठेवला जाईल.

उजनी पाणीच्या उपस्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊनये यासाठी उजनी, खांडवी (बार्शी) आणि उस्मानाबाद (हातलादेवी) येथील पंप हाऊसचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

तेरणा, रुईभर, शेकपूर यासह अन्य योजनेचे पाणी उस्मानाबादसाठी वापरले जात होते. याशिवाय शहरात नगरपालिकेने विभागवार बोअर घेवून त्याद्वारे सुध्दा पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या दुष्काळामुळे यंदाही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातील जलसाठे संपुष्ठात आले आहेत. बहुसंख्य बोअरचे कुपनलिकेचे पाणी आटले आहे. नवीन बोअरला ७०० फुटात पाणी लागण्याची शाश्वती नाही. जिल्ह्यात मुबलक पाऊस आलाच तर या स्थानिक योजनांचा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उपयोग होणार आहे. मात्र, तातडीने या योजना पूर्ववत सुरू होणे अवघडच आहे.

पाण्याचा अपव्यय टाळावा

आता उस्मानाबादकरांना पाण्यासाठी पूर्णतः उजनी पाणी पुरवठा योजनेवरच अवलंबून राहवे लागणार आहे. यामुळे शहरवासीयांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा शिवाय पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक लुटल्याप्रकरणी सहा जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

चालकांना रस्त्यात लुटून चालत्या ट्रकमधून फेकल्याने एका चालकाचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहा चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडून काल लोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. १६ जुलै रोजी कारेगाव शिवार (ता. लोहा) येथे यातील फिर्यादीचा ट्रक क्र. एम. पी. ०९ अेजी ५१६ या ट्रकसमोर आडवी मोटार सायकल लावून ट्रक थांबवली. आरोपीनी ट्रकमध्ये प्रवेश करून फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून पैसे घेण्यासाठी मारहाण केली.

यावेळी ट्रक चालकास ट्रकमधून ढकलून देण्यात आले. त्यासोबतव ट्रकमधील दोन मोबाइल चोरुन नेले होते. याप्रकरणी अशोक बालसिंह सोळंकी (रा. बंडनगर, ता. पुनसा जि. खंडवा) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक घोरपडे यांच्याकडे दिला होता. हा गुन्हा करून फरार असलेले संशयीत आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे व तसेच खून, दरोडा, घरफोडीसारखे गुन्हे करून फरार असलेल्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे पोलिस अधीक्षक परमजीत सिंह दहिया, अप्पर पोलिस अधीक्षक संदिप डोईफोड यांनी आदेश दिले होते.

पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपींस अटक करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करुन त्यांना योग्य त्या सूचना केल्या होत्या. या विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. डोईफोडे, पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे यांनी मोठ्या शिताफिने याप्रकरणातील सहा आरोपींना पकडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दरोड्याचा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी ‌दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

अतिक्रमण हटाव मोहिमेच्यावेळी दगडफेक केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ३०० उठबश्या काढायला लावल्याने युवकाच्या किडनीवर सूज आली आहे. त्या पीडित युवकाने नोंदवलेल्या जवाबाचा एक व्हिडिओ सध्या व्हॉटसअपवर व्हायरल झाला आहे. या प्रकारास एएसपी गेडाम यांचे पथक जबाबदार असल्याचे या युवकाने या व्हिडिओ जबाबात सांगितले.

शहरातील उड्डानपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेत कोणीतरी अतिक्रमण करून देवाची मूर्ती स्थापित केली होती. अतिक्रमण हटाव मोहिमेच्यावेळी जमावाने दगडफेक केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना सदर घटनेचा व्हिडिओ फुटेजवरुन पोलिसांनी सतीश वाघ या तरुणाला त्याच्या घरातून उचलून नेले होते. भारती कॉम्पलेक्स येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयात नेऊन सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या पथकाने मारहाण करुन ३०० उठबश्या काढण्याची शिक्षा केली. तब्बल ३०० उठबश्या काढल्याने सतीश वाघ याला लघवीचा त्रास जाणवू लागला. सुरवातीला जालन्यातील एका खासगी रुग्णालयात त्याचायावर उपचार करण्यात आला. परंतु प्रकृती अधिक बिकट होत असल्याने सतीश वाघ याला तडकाफडकी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्नालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. दरम्यान, याच रुग्नालयातील आयसीयूमधील वाघ याचा एक वीडियो सध्या व्हॉटसअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सतीश वाघ याचा हॉस्पिटलमधील जबाब चित्रीकरण करण्यात आले आहे.

त्यामध्ये त्या युवकाने, माझी काहीच चुकी नाही. बाहेर काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो. परंतु, अचानक दगडफेक सुरू झाल्याने पळापळ सुरू झाली. त्यामुळे घाबरुन मी पण तेथून पळालो. यावेळी पोलिसांच्यावतीने व्हिडिओ शूटिंग करण्यात आली. त्याच व्हिडीओचा आधार घेत पोलिसांनी मला घरातून उचलून नेले. पोलिसांनी माझे एकही ऐकून घेतले नाही. सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या पथकाने मला उठबश्या काढण्यास सांगितले. सलग ३०० उठबश्या काढल्याने मला किडनीचा त्रास सुरू झाल्याचा आरोप वाघ याने या व्हिडिओतील जबाबात केला आहे.

पोलिसांनी अवैध धद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा वचपा काढण्यासाठी काही असामाजिक तत्वांकडून बिनबुडाचे आरोप लाऊन पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, आम्ही अशा दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कर्तव्य बजावत राहु. याप्रकरणाची अप्पर पोलिस अधिक्षकांमार्फत चौकशी सुरू आ‌हे.

- दीक्षितकुमार गेडाम, सहाय्यक पोलिस अधीक्षक, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images