Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रखडलेले ५ रस्ते राज्यमंत्र्यांच्या दरबारात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यांसाठी शासनाने निधी दिल्यानंतरही अद्याप काम सुरू न झाल्याबद्दल नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाच रस्त्यांच्या कामाचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिले जात असल्याची तक्रार आल्यामुळे त्यांनी या विषयावर बैठक बोलावून सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील दहा रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रिटने बांधण्यासाठी राज्य शासनाने तीन महिन्यांपूर्वी २५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. आमदार अतुल सावे यांनी या निधीसाठी पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी विशेष निधी मिळवला. त्यामुळे निधीअभावी रखडलेली ही कामे तत्काळ सुरू होतील आणि शहरवासीयांना दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. तथापि, महापालिकेचा घोळ सुरूच राहिला. मिळालेल्या निधीतॅन दहा रस्त्यांची कामे होणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढून पाच रस्त्यांचे कामे करण्याचे ठरवण्यात आले. हे रस्ते निवडून निविदाही काढण्यात आली. आठ निविदा विकल्या गेल्या, त्यापैकी तीन निविदा दाखल झाल्या. विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवून निविदा काढल्याचे आरोप त्यानंतर महापालिकेच्या प्रशासनावर झाले. त्या आरोपातच निविदा अजूनही दबलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात निविदा प्रक्रियेच्या संदर्भात शासन दरबारी तक्रार झाली. या तक्रारीची दखल घेऊन राज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सुनावणीही झाली. सुनावणीचा तपशील हाती आला नसला तरी शासनाने पैसे देऊनही रस्त्यांचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. महापालिकेने रस्त्याचे काम लवकर सुरू करावे व कामात दर्जा राखावा अशा सूचना त्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने मात्र अद्यापही निविदेला अंतिम मान्यता दिली नाही, त्यामुळे रस्त्यांचे काम रखडले आहे.

रस्त्याच्या कामाचे टेंडर लगेचच होऊन काम सुरू व्हायला हवे होते, पण अद्याप ते सुरू झालेले नाही. शहरातील नागरिकांची चांगल्या रस्त्यांची गरज लक्षात घेता महापालिकेने काम लवकर सुरू करायला हवे. स्मार्ट सिटीच्या दर्जाचे रस्ते तयार करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

दिलीप थोरात, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेरिटेज टीडीआरसाठी हायकोर्टात याचिका

$
0
0

औरंगाबाद : राज्य शासनाकडून मंजूर पालिकेचे शहर विकास योजनेमधील पहाडसिंगपुरा रस्ता रुंदीकरणात जमीन गेलेल्या मालमत्ताधारकांना हेरिटेज टीडीआर देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत औरंगाबाद महापालिकेला शपथपत्र दोन आठवड्याच्या आत दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.

शहरातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्ते आणि २४ मीटर रुंद (उत्तर-दक्षिण) विकास योजना रस्त्यांचे रुंदीकरण महापालिकेने करणे आवश्यक आहे. जेणे करून ऐतिहासिक वारसा असलेल्या हेरिटेज वास्तूंना देशी व विदेशी पर्यटकांना जाता येईल असा रस्ता तयार करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे परकीय चलनाची आवक देखील वाढेल, त्या बाधित जागेचे टीडीआर देत तो रस्ता रुंद करणे हीदेखील पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.

औरंगाबाद शहरातील पहाडसिंगपुरा या हेरीटेज परिसर प्रवण क्षेत्रात एक एफएसआय देय असतानाही ५ मीटर उंचीचेच बांधकाम करावे, असे निर्बंध महापालिकेने घातले आहे. १२ सप्टेंबर २००८च्या अधिसूचनेनुसार शहरात इतरत्र वापरता येईल असा हेरिटेज टीडीआर देण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्ताकडून देवदत्त पालोदकर, महापालिकेतर्फे मंजुषा देशपांडे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार विद्यार्थी संशोधनाला पारखे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पूर्वपरीक्षा - ३ (पेट-३) मधील विषयनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी अखेर जाहीर केली असून, यंदा ३८५४ पैकी २६४७ विद्यार्थी संशोधनासाठी पात्र ठरले आहेत. १ हजार २६ मार्गदर्शकांकडे रिक्त जागांची संख्या मोठी असली, तरी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळालेले नाहीत.

जानेवारी २०१४ला सुरू झालेलीही पेट -३ची प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यास ऑगस्ट २०१५ उजाडला आहे. सर्व विषयांच्या पात्र विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे. यात २०१५ शैक्षणिक वर्षात २,६४७ विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळाली आहे. विद्यापीठाला या प्रक्रियेतील गुंता सोडवायला दीड वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लागला आहे.

विद्यापीठात विविध विषयांच्या संशोधक मार्गदर्शकांची संख्या १ हजार २६ एवढी आहे. त्यांच्याकडे एकूण प्रवेश क्षमता ४ हजार २५८ एवढी आहे. पेट-३मध्ये एकूण २,६४७ विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळणार आहे. आरआरसीसाठी ३८५४ विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. यातील सुमारे बाराशे विद्यार्थी अपात्र ठरले, तर जे पात्र ठरले अशा अनेक विद्यार्थ्यांना मान्यता पत्रासाठी खेटे मारावे लागत आहेत. रिक्त जागांचा आकडा मोठा असतानाही अनेक विद्यार्थ्यांची फरफट होत आहे.

सायन्स आघाडीवर

विद्यापीठाने विविध ५३ विषयांसाठी पात्र ठरलेल्या संशोधकांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या सायन्स विद्याशाखेचे आहेत. सायन्सच्या १५ विषयांत एकूण ६८१ विद्यार्थी संशोधनास पात्र ठरले आहेत. यापाठोपाठ सोशल सायन्सेसचा क्रमांक लागतो. ११ विषयात एकूण ६७० विद्यार्थी संशोधन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांच्या खांद्यावर दप्तराचे ओझे कायम

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

चिमुकल्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात सरकारने घेतला, मात्र अद्यापही शालेय विद्यार्थ्यांच्या खांद्यांवर २० ते २२ किलोंचे ओझे कायम आहे. दरम्यान, सरकारच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेने दप्तरांच्या ओझ्याची तपासणी करण्यासाठी २८ पथके नेमली, मात्र त्यापैकी केवळ तीन पथकांनी काम सुरू केले आहे.

शालेय दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या २० ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यांना तणावमुक्त, आनंददायी शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या ८५० तर, जिल्हा परिषदेच्या अनुदानित-विनाअनुदानित-अंशत: अनुदानित १०४४ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४ लाखांवर विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने २८ पथकांची नियुक्ती केली. आजपर्यंत त्यापैकी केवळ तीन पथके कार्यरत झाली आहेत, असे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले. पालकांनी मुलाचे वजन तपासून त्याप्रमाणात दप्तराचे वजन आवश्यकतेनुसार कमी करावे. दप्तरात कमी जाडीच्या वह्या, पाठ्यपुस्तकांशिवाय प्रयोगवह्या, अनावश्यक लेखन साहित्य, खाजगी प्रकाशनाचे साहित्य, गाइड, खासगी शिकवणीचे दप्तर, अधिक वजनाचा कंपास, फॅशनेबल दप्तर, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, खेळाचे साहित्य, सौंदर्य प्रसादने आदी वस्तूही दप्तरातून कमी कराव्यात. वेळापत्रकांनुसार आवश्यक साहित्य दप्तरात द्यावे, कमी वजनाचा आहार द्यावा, पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकांना शिक्षण विभागाने केल्या आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी व ते तपासण्यासाठी २८ पथके नेमली आहेत. त्यापैकी ३ पथके कार्यरत झाली आहेत. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून सूचना दिल्या आहेत. पथकांच्या माध्यमातून दप्तरांचे ओझे तपासण्यात येईल. त्यांचा अहवाल पुढील आठवड्यात येणार आहे.

- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलासादायक पुनरागमन

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दीड-पावणेदोन महिन्यापासून गायब झालेल्या पावसाचे मराठवाड्याच्या बहुतांश भागात झालेले पुनरागमन संकटात सापडलेल्या खरिपाच्या पिकाला जीवदान देणारे ठरले. औरंगाबादसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मंगळवारी सकाळपासून भीज पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस पडल्याची नोंद आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र पावसाने हजेरी लावली नाही.

यावर्षी मृगनक्षत्राचा मुहूर्त साधून मराठवाड्यात पावसाला दमदार सुरुवात झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विभागात पावसामुळे समाधानकारक वातावरण होते, मात्र जूनच्या उत्तरार्धात पाऊस गायब झाला. निम्मा जून आणि संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. सुरुवातीच्या पावसामुळे विभागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, मात्र दीड ते पावणेदोन महिने कोरडे गेल्यामुळे खरिपाचे पीक संकटात सापडले होते.

गेल्या महिनाभरात विभागात वाऱ्याचा वेग जास्त होता. त्यामुळे आभाळ भरून येऊनही पाऊस पडत नव्हता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी विभागात पावसाला सुरुवात झाली. औरंगाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात सकाळी पाऊस सुरू झाला. दिवसभर रिमझिम पाऊस होता. त्याचबरोबर जालना, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत दिवसभर सर्वदूर रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांना एक ते दीड आठवड्यांसाठी जीवदान मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘BPCL’चे पेट्रोल औरंगाबादेत महाग

$
0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

पेट्रोल खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहक मीटरकडे बारकाईने पाहतो, मात्र शहरात आपण एखाद्या पंपावर पेट्रोल ३० पैशांनी महाग घेत असल्याची जाणीव शहरवासीयांना नाही. शहरात तीन शासकीय कंपन्यांचे तीन वेगवेगळे दर अाहेत. त्यात दहा पैशांपासून ते तीस पैशांपर्यंतचा फरक आहे. भारत पेट्रोलिअम कार्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) पंपांवर पेट्रोल व डिझेल सर्वात महागडे आहे.

औरंगाबाद शहरात एकुण ४१ पेट्रोल पंप आहेत. त्यात तीन शासकीय आणि दोन खाजगी ‌कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. भारतीय पेट्रोलिअमचे ९, आयओसी (इंडियन आइल) २१, आणि हिदुस्थान पेट्रोलिअमचे ११ पेट्रोल पंप आहेत. याशिवाय रिलायन्सचे दोन आणि इस्सार कंपनीच एक पेट्रोल पंप आहे. रोज शहरात तीन लाख लिटरच्या पेट्रोलची विक्री होत आहे. तिन्ही सरकारी कंपन्यांना पानेवाडी डेपोतून इंधन पुरवठा केला जातो.

एका ठिकाणाहून आणलेल्या पेट्रोलच्या विक्री किमतीत मात्र तफावत आहे. 'बीपीसीएल'चा पेट्रोलचा दर 'आयओसी'पेक्षा लिटरमागे ३० पैशांनी महाग आहे. बीपीसीएलच्या पंपावर वाहधारकांना ३० पैशांनी महाग असलेले पेट्रोल घ्यावे लागते. त्याचबरोबर 'बीपीसीएल'च्या डिझेलचा दरही 'आयओसी'च्या तुलनेत २० पैसे जास्त आहे.

शहरात विविध भागात विविध पेट्रोल कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. या तफावतीची कारणे पेट्रोल कंपन्यांनी दिलेली नाही. राज्यात किंवा देशात कोठेही पेट्रोलचे वेगवेगळे दर नाहीत. याबाबत पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने कंपनीकडे या प्रश्नाचा विचार करण्याची विनंती केली आहे, मात्र कंपनीचे प्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

- अखिल अब्बास, औरंगाबाद पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशन

पेट्रोलवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांची संख्या जास्त आहे. एका चार चाकीत किमान १५‌ लिटरच्या आसपास पेट्रोल भरण्यात येते. १ हजार रुपयांत १५ लिटरऐवजी १४ लिटरचे पेट्रोल मिळते. कारचालकाला ५० ते ६० रुपयांचा फटका बसतो.

- प्रभाकर दौड, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शाळेतच सुरू करा दप्तरालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये ग्रंथालयांप्रमाणे दप्तरालय सुरू करावे. शाळेतील अभ्यासाच्या वह्या, पुस्तके तेथे ठेवावीत, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.
शिक्षकांनी गृहपाठाचे व वह्या तपासणीचे दिवस निश्चित करावेत. पहिली, दुसरीसाठी गृहपाठ बंधनकारक करू नये. जाड कव्हरच्या वह्यांची सक्ती नको. पहिल्या व दुसऱ्या सत्रासाठी स्वतंत्र वर्ग व गृहपाठ यांच्या वह्या ठेवाव्यात. जोड विषयासाठी एकच वही वापरावी. कार्यानुभव, चित्रकला, संगणक अशा विषयांच्या वह्या शाळेतच ठेवाव्यात. ग्रंथालयाप्रमाणे शाळेत दप्तरालय सुरू करावे. खेळाचे साहित्य शाळेत उपलब्ध करून द्यावे. शाळेत स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी. ई-लर्निंगचा वापर वाढविण्यात यावा, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याची अंमलबजावणी अद्याप पालक, शिक्षक काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नाहीत. महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) जीआरची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार इंग्रजी शाळांनी बदल सुरू केले आहेत.

- मनीष हांडे, सचिव, मेस्टा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीः खडसे

$
0
0

औरंगाबादः गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. मंगळवारी दुपारी औरंगाबाद विमानतळावरून या प्रयोगासाठी उड्डाण केलेल्या विमानातून २० फ्लेअर सोडण्यात आले व दुपारी ३ वाजता बी‌ड जिल्ह्यातील लिंबागणेश, तांबा राजुरी, पाडळी, माजलगाव व शेवगात तालुक्यांतील एका गावामध्ये पावसाचा प्रयोग यशस्वी झाला. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत चाचणी घेण्यात आली. या प्रयोगाला २७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा प्रयोग २०० तास करण्यात येणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

राज्यात दोन केंद्र

काही जिल्ह्यांत कमी पाऊस होतो. तेथे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी रडार, कंट्रोल रूम उभारण्याचा विचार शासन करीत आहे. औरंगाबाद येथील कृत्रिम पावसाची ही यंत्रणा कायम ठेवण्यात येणार असून, त्याशिवाय राज्यात आणखी एका ठिकाणी ही यंत्रणा कायमस्वरुपी उभारण्याचा विचार सुरू आहे. जून महिन्यापूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचेही खडसे यांनी सांग‌ितले.

असा पडला पाऊस

चिकलठाणा विमानतळावरून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी कृ‌त्रिम पावसाच्या या विमानाने 'ट्रायल'साठी उड्डाण घेतले. १०० किलोमिटर परिसरात फिरलेले हे विमान सर्वप्रथम शेवगाव तालुक्यात गेले. त्यानंतर जालना जिल्ह्यावर फेऱ्या मारून विमान लिंबागणेश, तांबा राजुरी (ता. शिरुर कासार, जि. बीड); तसेच माजलगाव व शेवगाव तालुक्यांत गेले. विमानातील रडारच्या माध्यमातून पर्जन्यवृष्टीला योग्य असलेल्या ढगांची निवड करून २० फ्लेअर सोडण्यात आले. यानंतर अर्ध्या तासाने या गावांवर पाऊस झाला असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उड्डाणपुलांचे १५ कोटी थकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेतून जालना रस्त्यावर तीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. या पुलाच्या कामापोटी कंत्राटदारांना दिली जाणारी टप्पेनिहाय रक्कम गेल्या दोन महिन्यांपासून थकित आहे. जवळपास १५ कोटी रुपये थकल्याने पुढच्या कामाचा वेग मंदावण्याची भीती आहे.

जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाच उड्डाणपूल प्रस्तावित होते. त्यापैकी क्रांतिचौक आणि सेव्हन हिल येथील उड्डाणपूल मागेच उभारले. महावीर चौक, मोंढा नाका आणि सिडकोतील वसंतराव नाईक चौकात तीन उड्डाणपुलांची कामे सुरू झाली. मोंढा नाका उड्डाणपूल वेगाने तयार झाला. पूल १०० टक्के पूर्ण झाला असून त्याची किंमत २१ कोटी ३३ लाख रुपये होती. एमएसआरडीसीच्या नियमानुसार कामाच्या टक्केवारीप्रमाणे कंत्राटदाराला पेमेंट दिले जाते. ज्या प्रमाणात काम झाले त्यानुसार ठरविलेली रक्कम दिली जाते. मोंढा नाका पूल पूर्ण तयार होऊनही आजवर ८० टक्के पेमेंट दिले गेले. महावीर चौक आणि वसंतराव नाईक चौकातील पुलाचे काम ६० टक्क्यांपर्यंत पोचले असून त्यांना द्यावयाच्या पैशाच्या बाबतीत मात्र एमएसआरडीसी अपयशी ठरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामांच्या प्रगतीचा अहवाल आणि देयके दर दोन महिन्यांनी सादर केले जातात. मे महिन्यांत सादर केलेल्या देयकांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. औरंगाबाद कार्यालयातून देयके मंजुरीसाठी मुंबईला पाठविली जातात. एमएसआरडीसीकडे मुबलक निधी नसल्याने ही देयके अदा केलेली नाहीत.

राज्य सरकारचे धोरण बदलल्याने फटका

पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर लावण्यात येणारा उपकर तसेच राज्यभरातील एमएसआरडीसीने केलेल्या कामांच्या मोबदल्यात उभे केलेल्या टोलनाक्यावरील वसुलीच्या रकमेतून या कामांना निधी पुरविला जातो. दोन महिन्यांपूर्वी टोलनाक्यांचे धोरण राज्य सरकारने बदलले. त्यामुळे अपेक्षित रक्कम संकलित होण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्याचा फटका औरंगाबादच्या कामावर बसला आहे.

तीनही कामाच्या प्रगतीचा अहवाल आणि देयके वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आली आहेत. अनुदान प्राप्त होताच देयके अदा केली जातील.

- उदय भरडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेची तिजोरी फोडून साडेतेरा लाख पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील कालीमठ (उपळा) येथील बँक ऑफ महाराष्ट्रची तिजोरी फोडून चोरांनी १३ लाख, ६९ हजार २६२ रुपये पळवून नेले. चोरांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) रात्री गॅस कटरने तिजोरी फोडली आहे.

उपळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील सफाई कामगार गणेश बाबासाहेब टुपके यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी (५ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजता स्वच्छता करण्यासाठी बँक उघडली. त्यावेळी बँकेतील पडदे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. बँकेत काही तरी विचित्र घडल्याची शंका आल्याने त्यांनी त्यांनी शाखा व्यवस्थापक धनंजय श्रीपाद पाटणकर यांना त्वर‌ित माहिती दिली. पाटणकर हे कन्नड शाखेचे व्यवस्थापक सुरेश पाटील यांना ही माहिती देऊन त्वर‌ित शाखेत आले. त्यावेळी बँकेत चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या शाखेच्या खिडकीचे ग्रील तोडलेले आढळले. तेथून चोरांनी बँकेत प्रवेश करून गॅस कटरने तिजोरी

फोडली आहे. पाटणकर यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर कन्नडचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर, पोलिस उपनिरीक्षक रोहित बेंबरे, संदीप काळे, पोलिस नाईक दीपक नागझरे, कैलास करवंदे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. यावेळी खिडकीचे ग्रील तोडून चोर बँकेत घुसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान औरंगाबाद येथील झोनल व्यवस्थापक विजयकुमार कांबळे यांनी बँकेला भेट देऊन पाहणी केली. शाखा व्यवस्थापक पाटणकर यांच्या फिर्यादीवरून कन्नड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज गायब

बँक ऑफ महाराष्ट्रची ही शाखा कालीमठ मंदिरासमोर उपळा गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. बँकेच्या मागून अंबाडी नदी वाहते. ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी दिवसभर मतदान व पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दुपारपर्यंत वीज नसल्याने चोरांचे फावले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोला जोडणाऱ्या रस्त्याची आस

$
0
0

इंदिरानगर,बायजीपुरा

मध्यमवर्गीय, कष्टकऱ्यांची वसाहती म्हणून इंदिरानगर बायजीपुरा (क्रमांक ५९) वॉर्ड ओळखला जातो. या निवडणुकीत हा वॉर्ड नागरिकांचा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होता. वॉर्डात गल्ली क्रमांक २१ ते ३३ पर्यंत, गादिया पार्क, गोधडीपुरा, संजयनगरच्या काही भागाचा समावेश होतो. वॉर्डात अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची सर्वाधिक संख्या असून त्या खालोखाल मध्यमवर्गीय नागरिक येथे राहतात. वॉर्डाची लोकसंख्या सुमारे ३५ हजारापेक्षा जास्त आहे. दाटवस्ती व अरूंद गल्ल्यांमुळे अनेक भागात मोठे वाहन जाणे अशक्य आहे. वॉर्डात काही रस्ते सुस्थितीत असलेतरी गल्ली क्रमांक २१, २४, २६ आणि २७ येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे वाहनधारक, पदचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर अधिक हाल होतात.

वॉर्डातील जुनाट ड्रेनेज लाइन वारंवार फुटते. प्रामुख्याने गोधडीपुरा, गादिया पार्क, विपुल अपार्टंमेन्ट परिसरात या प्रश्नांची तीव्रता आहे. येथे नवीन ड्रेनेज लाइन टाकावी, अशी नागरिकाची मागणी आहे. पथदिवे बदलणे आणि काही ठिकाणी नव्याने पथदिवे लावण्याची गरज आहे.

या वॉर्डाला एमजीएमजवळील जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, दिलेले वेळापत्रक मनपा प्रशासन कधीच पाळत नाही, अशी तक्रार आहे. सकाळी सहा वाजता येणारे पाणी अनेकदा दुपारी येते, असा आरोप आहे. वेळापत्रकाप्रमाणे पुरेसे पाणी मिळावे, अशी मागणी नागरिकांनी केली.वॉर्डातील गल्ली क्रमांक ३३ आणि काही परिसरात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याठिकाणी लवकरच नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. सिडकोला जोडणारा लक्ष्मण चावडी ते एमजीएमपर्यंत सुमारे साठ फुटी रस्ता या वॉर्डातून जातो. या रस्त्याचे काम कैलासनगरपर्यंत झालेले आहे, त्यापुढील रस्ता त्वरित करावा, अशी मागणी जोर धरत आहे. हा रस्ता जालना रोडला पर्याय ठरणारा आहे. वॉर्डात मनपाची दहावीपर्यंत शाळा, व्यायामशाळा आहे. परंतु, मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान नाही.

नगरसेवकाचा परिचय

पक्षीय आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या रमेश भानुदास जायभाय हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) तर्फे निवडून आले आहेत. हा वॉर्ड दहा वर्षांपासून रिपाइंच्या ताब्यात आहे. तिसऱ्यावेळीही जायभाय यांचा विज झाल्याने रिपाइंचा गड मजबूत झाला आहे.

नगरसेवक काय म्हणतात

वॉर्डातील अंतर्गत रस्ते उत्तम पद्धतीने तयार केले आहेत. नव्याने समाविष्ट काही भागात नवीन रस्ते करणे आवश्यक आहे. पथदिवे बदलण्यात येणार असून जुनी ड्रेनेज लाइन बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुलांना खेळण्यासाठी जागा नाही. मनपा शाळेचे मैदान शाळा सुटल्यानंतर मुलांना वापरण्यासाठी मिळावे याकरिता खेळणी, हॉलीबॉल मैदान करावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या घरकूल योजनेचा गरीब, गरजूंना लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. महिलांना स्वंयरोजगार मिळवून देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाची मदत घेणार आहे. कैलासनगर ते एमजीएम रस्ता तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- रमेश जायभाय, नगरसेवक

नागरिकांच्या प्रतिक्रिया

पाणी कधीच वेळापत्रकानूसार येत नाही. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे.

- पद्मा भुईगळ

ड्रेनेज लाइन जुनाट झालेली आहे. अनेकदा फुटते. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येते. आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या ड्रेनेज लाइन नवीन टाकली पाहिजे.

-देवानंद अंभोरे

स्वच्छेतेसाठी प्रयत्न होत असलेतरी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेते कमी आहे. त्या वाढ केल्यास हा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत मिळले.

- मनोहर गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील वक्फ बोर्डाचा टास्क फोर्स कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वक्फ बोर्डाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत राज्य शासनाने टास्क फोर्स तयार करण्याची घोषणा केली होती. दोन महिन्यानंतरही टास्क फोर्स तयार करण्याबाबत कोणतीही पाउले उचलण्यात अालेली नाहीत. राज्याभरातील अनेक वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर शासकीय तसेच खासगी व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. राज्यात अशा मालमत्तांची संख्या १०८८ असून, त्यांना कलम ५४ प्रमाणे वक्फ बोर्डाकडून नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत.

बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाच्या उत्तरात प्रधान सचिव जयश्री मुखर्जी यांनी अतिक्रमणे हटविण्याबाबत टास्क फोर्स स्थापन करण्याबाबत लेखी उत्तर दिले होते. न्या. ए.टी.ए.के शेख यांनी दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. टास्कफोर्समध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या निर्णयाला दोन महिने उलटले तरीही राज्यात टास्कफोर्स तयार करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाली करण्यात आलेली नाही, अशी माहिती वक्फ बोर्डाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रयोगात विसंवादाचे ढग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातला कृत्रिम पाऊस विसंवादात अडकला आहे. दिवसभरात विमान कुठे गेले, त्यांनी किती फ्लेअर्स सोडले याची माहितीच लवकर मिळत नाही, अशी कबुली आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी बुधवारी (५ ऑगस्ट) दिली. त्यामुळे हा २७ कोटींचा प्रयोग पाण्यात जाणार का, अशी भीती निर्माण झाली आहे.

मंगळवारपासून मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरू आहे. मात्र दिवसभरात विमान गेले कुठे, ते कोणत्या मार्गावर आहे, त्यांनी दिवसभरात किती फ्लेअर्स सोडले याची माहिती संबंधित एजन्सीकडून लवकर मिळत नाही, अशी कबुली दिवसे यांनी दिली. त्यामुळे या प्रयोगात एजन्सीधारक आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याचे बुधवारी उघड झाले.

विमान आले अन् ढग गायब

मंगळवारी सकाळपासूनच लातुरात पावसाने हजेरी लावली. मात्र, बुधवारी दुपारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आलेले विमान लातूर विमानतळावर उतरण्याआधीच ढग गायब झाले.

खडसे, बागडेंची हवाई पाहणी

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आणलेल्या विमानातून बुधवारी महसूल मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबाद ते लातूरदरम्यान पाहणी केली केली. या विमानाने सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लातूरकडे उड्डाण घेतले. औरंगाबाद ते लातूर दरम्यान सात फ्लेअर्स सोडल्याची माहिती खडसे यांनी लातूर येथे दिली. पत्रकार परिषद आणि इतर कार्यक्रमामुळे हे विमान जवळपास दोन तास लातूर विमानतळावर थांबले. लातूरहून परतल्यानंतर क्लाऊड सिडिंग आणि फ्लेअर्स सोडण्यात आले. यामुळे कुठे आणि किती पाऊस पडला याची माहिती मिळाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्स उलटल्याने सहा जण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव काळीपिवळी ट्रॅक्स उलटून सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी ( ४ ऑगस्ट ) चिकलठाणा येथील एलपीजी पंपाजवळ घडला. सखाहरी चांगदेव तांबे (वय-५५, रा. लाडसावंगी), दिनेश राठोड (वय-२१, रा. कचनेर), सत्यशिला तुळजाराम पांडे (वय- २८, रा. रोहीलगड), तुळजाराम मनोहर पांडे (वय ३२, रा. रोहीलगड), देवबाई नामदेव गिरी (वय ६५, रा. आपत-भालगाव), मालीनबाई रामचंद्र घोडके (वय ६५, रा. पाचोड) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्रवाशांना घेऊन ही काळीपिवळी ट्रॅक्स करमाडकडे निघाली होती. चिकलठाणा येथील एलपीजी पंपाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्स रस्त्याशेजारच्या खड्ड्यात उलटली. या प्रकरणी अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वातीन वर्षांनंतरही गूढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित श्रुती भागवत खुनाच्या घटनेस सव्वा तीन वर्षे उलटूनही या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिस अपयशीच ठरले आहेत. श्रुती यांचे बंधू मुकुल करंदीकर यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आता या प्रकरणातील गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी पोलिस आणखी किती दिवस घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.

उल्कानगरी येथील श्रीनाथ आपार्टमेंटमधील रहिवासी श्रुती विजय भागवत यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्री खून करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांना घराच्या मागील दारापर्यंत ओढत नेले आणि एका गादीमध्ये गुंडाळून मृतदेह पेटवून देण्यात आला होता. पती नोकरीनिमित्त दुबईत, मुलगा पुण्यात राहत असल्याने त्या येथे एकट्याच होत्या. या खळबळजनक घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही महिला संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली होती.

तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी तपासासाठी विविध पथकांची स्थापना केली. अनेकांची चौकशी करण्यात आली. कॉल रेकॉड तपासण्यात आले. एवढेच नव्हे तर फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदतही घेण्यात आली. डीएनए फिंगरप्रिंटही घेण्यात आले होते, परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. सव्वा तीन वर्षांनंतरही या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेतच आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिस उपायुक्त आटोळे यांनी सांगितले.

या खून प्रकरणाचा तपास लागावा, आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आज ना उद्या आरोपींना पोलिस पकडतील, अशी अपेक्षा आहे.

मुकुल करंदीकर, श्रुती भागवत यांचे भाऊ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलास जिवे मारण्याची धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका वकिलाला पाच लाख रुपयांची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी फिर्यादीचे दैनिक तसेच शाळा बंद पाडण्यासाठी विविध कार्यालयात अर्जफाटे केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

शेख नवाब शेख अहमद शेख मोहम्मद ( वय ६२, रा- जिन्सी) असे फिर्यादीचे नाव असून ते वकील आहेत. शमशूल हक जिया ऊल हक याच्यासह खालेद अबू तुराब, अब्दुल माजेद उर्फ कैसर कुरेशी, अब्दुल गफार आणि अब्दुल सत्तार (सर्व रा. पैठणगेट) हे २०१३ पासून पाच लाख रुपये देण्याची मागणी फिर्यादीस करित आहेत. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळीही या आरोपींनी पैशांची मागणी केली. पाच लाख रूपये न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय खालेद विरुद्धच्या प्रकरणातून वकीलपत्र काढून घेण्याचीही धमकी दिल्याची तक्रार शेख नवाब यांनी पोलिसात दिली आहे.

आरोपीने अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचा महाराष्ट्र उपसचिव असल्याचे भासवून तसे व्हिजिटिंग कार्ड, लेटर पॅड तयार केले. त्याआधारे विविध कार्यालयात देऊन फिर्यादीचे घर तोडण्यात यावे, घरातील विद्युत पुरवठा बंद करा, तसेच फिर्यादीच्या मालकीचे दैनिक, संस्थेची शाळा व हॉस्पिटल बंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाब आणला, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शेख नबाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जिन्सी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शाहेद सिद्दीकी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुसऱ्याच्या नावे असलेली कार स्वतःच्या मालकीची असल्याची थाप मारून विक्री करणाऱ्याविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेख इरफान शेख रहेमान ( वय २८, रा. भडकलगेट) असे फिर्यादीचे नाव असून ते वाहनचालक म्हणून काम करतात. समतानगर येथील शेख आसिफ शेख युसूफ (वय ३१) यांच्याकडून त्यांनी इंडिगो टीडीआय (एम.एच. ०४ डीई ६४३०) कार जानेवारी २०१५ मध्ये पावणे दोन लाख रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारादरम्यान शेख आसिफ याने औरंगाबाद जिल्ह्याची पासिंग करुन देतो, कागदपत्र पंधरा दिवसात देतो, असे आश्वासन दिले होते. वारंवार मागणी करूनही कागदपत्रे दिली नाहीत. कागदपत्रांची मागणी केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने धास्तावलेल्या शेख इरफान याने कार संदर्भात अधिक चौकशी केली असता कार दुसऱ्याचीच असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक लक्षात येताच त्यांनी क्रांतिचौक पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाचवेळी दोन शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या दोन वर्षांच्या बालकावर दुर्बिणीद्वारे एकाचवेळी दोन हृदयशस्त्रक्रिया एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी झाल्या. दोन्ही शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आल्या. आतापर्यंत एमजीएम रुग्णालयात राजीव गांधी योजने अंतर्गत ११० बालकांवर दुर्बिणीच्या साह्याने यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

वजन वाढत नसल्याच्या तक्रारीसह सतत सर्दी-खोकला होत होता म्हणून या बालकाला एमजीएम रुग्णालयात दाखविण्यात आले. त्याची तपासणी करण्यात आली असता बाळाच्या हृदयाला १६ मिलिमीटर आकाराचे छीद्र (एएसडी) व ३ मिलिमीटर पीडीए (आओर्टा व पल्मोनरी आर्टरीला जोडणारी नळी) असल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णालयातील मानद बाल हृदयविकारतज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी दोन्ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १६ मिलिमीटरची छत्री (डिव्हाईस) टाकली आणि पीडीएसुद्धा बंद केला.

एवढ्या लहान बालकावर दुर्बिणीच्या साह्याने एकाचवेळी दोन वेगळे उपचार करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असून, हे उपचार रुग्णालयात यशस्वी झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले. तसेच आतापर्यंत रुग्णालयात राजीव गांधी योजने अंतर्गत ११० बालकांवर दुर्बिणीच्या साह्याने यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या बालकांमध्ये असलेले जन्मजात छीद्र दुर्बिणीच्या साह्याने छत्री टाकून बंद करण्यात आले व इतर बालकांची हृदयाची झडप फुग्याद्वारे उघडण्यात आली, अशी माहिती डॉ. सुगावकर यांनी दिली. या शस्त्रक्रियांसाठी त्यांना डॉ. सुहृद अन्नछत्रे, डॉ. योगेश बेलापूरकर तसेच भूलतज्ञ डॉक्टरांनी मोलाचे सहाय्य केले.

बालकांतील 'पीडीए'चे प्रमाण १५ टक्के

आओर्टा (हृदयातील मुख्य रक्तवाहिनी) व पल्मोनरी आर्टरीला जोडणारी नळी म्हणजेच पीडीए ही एक प्रकारची नळी जन्मानंतर दोन ते सात दिवसांपर्यंत आपोआप बंद होते. जन्मापूर्वी ती उघडी असते व जन्मानंतर नैसर्गिकरित्या बंद होते. मात्र, ती नैसर्गिकरित्या बंद न झाल्यास न्युमोनिया व इतर गंभीर आजार-गुंतागुंत निर्माण होऊ शकते. हे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे तीन महिन्यात ही नळी बंद न झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे बंद करावी लागते आणि बालकांमध्ये नैसर्गिकरित्या पीडीए बंद न होण्याचे प्रमाण हे १० ते १५ टक्क्यांपर्यंत आहे, असे हृदय शल्यचिकित्सक डॉ. अन्नछत्रे यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमजेएसवाय’ कंत्राटदारांचे ११ ऑगस्ट रोजी दिल्लीत धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे पूर्ण करूनही महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे केंद्र सरकारकडे तब्बल १,५०० कोटींची देयके थकित आहेत. ही रक्कम मिळत नसल्याने अनेक कामे ठप्प झाली आहेत. केंद्राचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील कंत्राटदार ११ ऑगस्ट रोजी दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

'ग्रामसडक योजनेच्या निधीत महाराष्ट्राला ठेंगा' या मथळ्याखाली 'महाराष्ट्र टाइम्स'ने १३ जुलै रोजी सर्वप्रथम हा विषय मांडला होता. राज्यातील कामांचे १,५०० कोटी रुपये थकित आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ६७ कामांसाठी ९४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निधी मिळालेला नाही. सद्यस्थितीत २५ कोटींची बिले कार्यालयात पडून असून सुरू असलेल्या कामांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी २५ कोटींची आवश्यकता आहे. संसदेत सोनिया गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्रातील पीएमजेएसवायचे कंत्राटदार ११ व १२ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणार आहेत.

प्रधानमंत्री ग्रामसडके योजनेंतर्गत झालेल्या कामांची बिले थकित आहेत. त्यामुळे आमची अडचण होत आहे. काही कामे किरकोळ कारणावरून अडली असून ती पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील जनतेला फायदाच होणार आहे. केंद्राने तत्काळ निधी उपलब्ध देणे आवश्यक आहे.

- विनोद फुनशी, मुकर्रम सिद्दीकी, कंत्राटदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबाद-अजमेर रद्द; सचखंडच्या मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्यप्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे औरंगाबादहून जाणारी हैदराबाद अजमेर रेल्वे रद्द करण्यात आली आहे. तर सचखंड एक्स्प्रेसचा मार्ग वळविण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने उत्तरेकडे जाणाऱ्या एकूण सहा रेल्वे रद्द केल्या आहेत. यात ६ ऑगस्टला जाणारी नांदेड-श्रीगंगानगर रेल्वे, ५ ऑगस्टची हैदराबाद-अजमेर रेल्वे रद्द करण्यात आली. अजमेर-हैदराबाद एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२७१९) आणि ८ ऑगस्टची श्री गंगानगर - नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२४८६) ही रद्द करण्यात आली. तसेच दिल्लीकडे जाणारी अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस रेल्वे ५ ऑगस्ट रोजी इटारसी, खंडवा, मनमाड ऐवजी इटारसी, भुसावळ या मार्गे धावली. ६ ऑगस्ट रोजी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मनमाड, खंडवा, इटारसी मार्गाऐवजी आता मनमाड, जळगाव, सुरत, कोटा आणि मथुरा मार्गाने धावणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images