Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाडा झाला माळरान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग तीन वर्षांपासून अवर्षणाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाची स्थिती आहे. खरीपाचे बहुतांश पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. बहुतांश ठिकाणी नेस्तनाबुत झालेल्या पेरण्या, लाखो हेक्टरवरील खुरटलेले खरीप यामुळे मराठवाडा ओसाड माळरानासारखा भासू लागला आहे, नांदेड व हिंगोली वगळता सहा जिल्ह्यांच्या एकुण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक ११ व १२ ऑगस्ट रोजी दौऱ्यावर येत आहे.

मराठवाड्यामध्ये खरीपाची ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३२ लाख हेक्टरवर पेरणी झाली मात्र ऐन पावसाळ्यात पावसाने दगा दिल्यामुळे सुमारे १० लाख हेक्टरवर दुबार पेरण्यांचे संकट ओढवले आहे. पावसाअभावी हे रानही आता मोकळेच राहणार आहे. विभागामध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यामध्ये टंचाईची भीषण स्थिती आहे. पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातील अतिरिक्त सचिव तथा केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. सिंग यांनी आढावा घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी संपूर्ण मराठवाड्याची स्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगीतले की, विभागात यंदा आजवर सरासरी १८६.६९ मिलिमीटर पाऊस झाला आहे, विभागात आजवर झालेला पाऊस अपेक्षित पावसाच्या तुलनेत ४५ टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत २४ टक्के एव्हडा आहे. विभागातील ७६ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात सरासरीच्या २५ टक्यांहुन कमी, ३७ तालुक्यात २६ ते ५० टक्के तर १२ तालुक्यात ५१ ते ७५ टक्के तर अवघ्या पाच तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, विभागात एकुण ४२१ महसुली मंडळांपैकी २६५ मंडळात ५० टक्क्यांपेक्षा कमी कमी पाऊस झाला आहे. खरीप पेरणीचे प्रमाणे सुमारे ८७ टक्के आहे, जलसाठ्याची परिस्थिती चिंताजनक असून केवळ ६.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे ८७० गावे आणि ४५४ वाड्यांना ११८८ टँकरद्वारे तहान भागवण्यात येत असल्याची माहितीही यावेळी विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली.

या गावांना देणार भेट

मंगळवारी सकाळी ८ वाजता पथकाचा दौरा औरंगाबाद जिल्ह्यापासून सुरूवात होणार असून सर्वप्रथम पैठण तालुक्यातील ७४ जळगाव, ढोरकीन, कारकीन या गावांना भेटी दिल्यानंतर वडीगोद्री, पाचोड, शहागड, पाडळशिंगी, गेवराई, बीड तालुक्यातील काही गावांची पाहणीनंतर मांजरसुंबा, उस्मानाबाद तालुक्यातील वाशी, कळंब, ढोकी, मुरुड मार्गे लातुरला मुक्काम. बुधवारी सकाळी लातूर तालुक्याची पाहणी करुन आंबाजोगाई, परळी, गंगाखेड, परळाणी, जिंतूर, सेलू, मंठा, जालना मार्गे पथक औरंगाबादला येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील वडोदबाजार येथील बाजारातून जनावरे घेऊन जाणाऱ्या टेंम्पो चालकाने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर दखमी होऊन मरण पावला. हा अपघात पाथ्री गावाजवळ सोमवारी (१० ऑगस्ट ) सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला.

औरंगाबाद जळगाव राज्य मार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून सोमवारी जनावरे घेऊन वडोदबाजार येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोने वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टेम्पो (एम. एच.२०, ए ए ९७५५) व मोटार सायकल (एम. एच. १९, एल ५२४१) यांच्यात समोरासमोर धडक झाली. मोटार सायकलस्वार भिक्कन शहा फिरोज शहा (वय ३०, रा. मालेगाव, ता.भोकरदन जि. जालना) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घाटी रग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताची नोंद वडोदबाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर उर्जेसाठी मराठवाडा अनुकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशात सौर उर्जेवर खूप चर्चा असली तरी प्रत्यक्ष काम अभावानेच होते. सर्वाधिक लख्ख सूर्यप्रकाशाचे दिवस असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारल्यास देशाची विजेची गरज पूर्ण होईल. विकासाला गती देण्याचे काम सौर उर्जा करील' असे प्रतिपादन सौर उर्जेचे अभ्यासक व उद्योजक डॉ. गुंडू साबदे यांनी केले. शहरात सोमवारी (१० ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लातूर जिल्ह्यातील गणेशवाडी येथील डॉ. गुंडू साबदे यांचे पवई येथे एम. टेक झाले. शिक्षणानंतर अमेरिकेतील कंपनीत त्यांनी अनेक वर्षे महत्त्वाच्या पदावर काम केले. भारतातील वीज तुटवडा व समस्यांचा विचार करून साबदे यांनी २००९ पासून सौर उर्जा क्षेत्रात काम सुरू केले. जनजागृतीसह पुण्यात सौर उर्जा निर्मिती यंत्र प्रकल्प सुरू केला. याबाबत डॉ. साबदे म्हणाले, 'सौर उर्जेचा विषय निघताच प्रत्येकवेळी अनुदानाचा विचार केला जातो. मात्र, विजेपेक्षा अत्यंत स्वस्त दरात सौर उर्जा उपलब्ध होईल. २००९ मध्ये एक मेगावॅट सौर उर्जेच्या प्लँटसाठी १५ कोटी रूपये खर्च येत होता. शासनाने १८ रूपये प्रति युनिट खरेदीची तयारी दाखवूनही प्रकल्प उभारले नाही. सध्या प्रकल्पाचा खर्च सहा कोटी आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा निर्मिती शक्य आहे. तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यात सौर उर्जेचा उत्तम वापर होतो. महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असल्याने शासनाने गांभीर्याने विचार करून परिपूर्ण धोरण ठरवावे'. दरम्यान, सिल्लोड येथे सौर उर्जेवर पेट्रोल पंप व चाकण येथे २० कंपन्या या उर्जेवर चालतात. स्टील उद्योगात दूरदृष्टिने सौर उर्जा वापरल्यास उद्योग बंद पडण्याची नामुष्की येणार नाही', असे साबदे म्हणाले. तैवान, अमेरिका या देशांमधील सोसायटीत जनरेटर नसतो. कारण रहिवाशांना विजेची खात्री असते असा अनुभव त्यांनी सांगितला. यावेळी 'अपार उर्जे'चे श्याम दंडे उपस्थित होते.

... तर प्रत्येक गाव उजळून निघेल

'देशात कच्छ, जोधपूरनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात लख्ख ऊन असते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या भागात सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाला खूप वाव आहे. वीज निर्मितीतून मराठवाड्याचा विकासही साधणे शक्य आहे', असे डॉ. साबदे म्हणाले. खेड्यातील घरांवर सौर उपकरण बसवल्यास प्रत्येक गाव उजळून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार महापालिकेचा; काम कलेक्टर ऑफिसचे

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेचा पगार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे पगार व वेतनवाढ पालिका प्रशासनाने थांबवल्या. किती कर्मचारी असे काम करतात, याचा शोध सुरू आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागात महापालिकेतील काही कर्मचारी वर्षानुवर्षे काम करतात. प्रामुख्याने शिक्षक आणि कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. महापालिकेच्या अस्थापना विभागाने आयुक्तांच्या आदेशानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात तीन कर्मचारी या विभागाच्या रडारवर आले. मुकुंद गायकवाड, हरिभाऊ पवार आमि अन्सारी मसीउद्दीन अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतात आणि पगार मात्र महापालिकेचा उचलतात. त्यामुळे या तिघांचे पगार थांबवण्याचे व पगारवाढ न देण्याचे पत्र अस्थापना विभागाने लेखा विभागाला दिले आहे. हे तिन्ही कर्मचारी कनिष्ठ लिपिक या संवर्गातील आहेत. अस्थापना विभागाने सर्व विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांना पत्र दिले असून, त्यांच्या विभागातील किती कर्मचारी, किती दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतात याची माहिती द्या, त्यांचे वेतन थांबवण्याची कारवाई करा असे कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय पथकाकडून आज दुष्काळाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. सिंग हे मंगळवारी विभागातच्या पाहणी दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

त्यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील पीक, पाणी, चारा, पाणीसाठ्यांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी, दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची माहिती दिली व अशा योजनांना केंद्र सरकारने मदत करावी, असे सांगितले. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी या जिल्ह्यांच्या विविध गावांमध्ये केंद्राचे पथक भेट देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

$
0
0

उस्मानाबादः राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या एका नेत्याने शासकीय टेंडर मिळविण्यासाठी शिवाय राजकीय लाभापोटी विवाहित महिलेवर बलात्कार करून तिला देह व्यापारासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जुबेर उर्फ अहमद काझी येथे आरोपीचे नाव असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा तो प्रदेश सदस्य आहे. विवाहित महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून या महिलेला अनेक शासकीय अधिकारी व राजकीय नेते मंडळी यांच्याकडे देह व्यापार करायला भाग पाडले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पीडित महिलेवर अशा प्रकारचा अन्याय सुरू होता. आरोपी महिलेला औरंगाबाद, मुंबई, दिल्ली येथे घेऊन जात असे व त्याच्या कामासाठी या ‌महिलेवर अत्याचार करायला लावत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितली. उस्मानाबाद येथील न्यायालयाच्या आदेशानुसार ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर आठवड्यात ५० टँकरची भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात जून महिन्यातील दमदार पावसामुळे १८०० च्या पार गेलेला पिण्याच्या पाण्याचा टँकरचा आकडा निम्मा झाला होता. मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुन्हा एकदा टँकरसंख्या वाढत आहे. विभागात दर आठवड्याला किमान ३५ ते ५० टँकर वाढत असून सध्या ८७० गावे, ४५४ वाड्यांना ११८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्यात मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने चार जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे विभागातील टँकरची संख्या कमी झाली होती. ६ जुलै रोजी टँकरच्या संख्या ८६३ पर्यंत कमी झाली. सध्या मराठवाड्यात ११८८ टँकरने पाणी पुरवले जात आहे. जून महिन्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात होते, त्यानंतर ही संख्या तीनवर आली. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील ८८ गावांना ११४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ४८२ टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत. सध्या विभागात ३६८८ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ६३, जालना २१७, परभणी ३३२, हिंगोली ६१, नांदेड ४३९, बीड ८८२, लातूर ८६६ व उस्मानाबाद जिल्ह्यात ८९३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात २५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून आठवड्याभरातच ३८ टँकर सुरू करावे लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठशे जणांना गंडवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुलभ कर्ज देण्याचे आमीष दाखवून शहरातील नागरिकांना शिवशक्ती इन्व्हेस्टमेंट कंपनीने कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सिडको बसस्टँड परिसरातील अक्षयदीप प्लाझा या इमारतीमध्ये या कंपनीने कार्यालय थाटले होते. फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत दाद मागितली असून आर्थिक गुन्हेशाखेकडे प्रकरण सोपविण्यात आले आहे.

दोन महिन्यापूर्वी या कंपनीने अक्षयदीप प्लाझामध्ये कार्यालय उघडले होते. सुलभ दराने लाखो रुपयांचे कर्ज देण्याबाबत त्यांनी जाहिरात केली होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी कंपनीशी संपर्क साधला. यावेळी तेथील एका तरुणीने नोंदणीपोटी अडीच हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. त्यांचे ओळखपत्र, सातबारा आदी कागदपत्रे कंपनीकडून घेण्यात आली. यानंतर त्यांच्या घराची देखील पाहणी कंपनीने केली. पंधरा दिवसानंतर कर्जासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना कर्ज मंजूर प्रक्रिया पूर्ण झाली असा फोन करीत सौरभ गुप्ता याने बोलावून घेतले. त्यांच्यावर इतर काही कर्ज आहे का याची विचारणा करीत पडताळणी केल्याचा बहाणा केला. दरम्यान, त्यानंतर कंपनीकडून काही प्रतिसाद आला नसल्याने नागरिकांनी सोमवारी कंपनीचे कार्यालय गाठून विचारणा केली. यावेळी कंपनीचा संचालक सौरभ गुप्ता व नमनसिंग नावाची व्यक्ती पसार झाल्याचे निदर्शनास आले. येथील कर्मचाऱ्यांना देखील या संदर्भात जास्त माहिती संचालकांनी दिली नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिस आयुक्तालय गाठून दाद मागितली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आ‌र्थिक गुन्हेशाखेकडे हे प्रकरण चौकशीसाठी सोपवले आहे.

तीन ते पंधरा लाख कर्जाचे आमीष

कंपनीने तीन, आठ व पंधरा लाखाचे कर्ज मंजूर झाल्याची ‌थाप नागरिकांना मारली. या कर्जाच्या प्रक्रियेसाठी दहा ते सत्तर हजार रूपये त्यांच्याकडून उकळण्यात आले. जालना, बीड, औरंगाबाद व परभणी येथील सुमारे ८०० नागरिकांना गंडा घालण्यात आल्याचा आरोप फसवणूकदारांचा असून सव्वा दोन कोटी रुपयापर्यंत ही रक्कम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फॉक्सकॉन औरंगाबादेत?

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांत जगात आघाडीवर असलेल्या 'फॉक्सकॉन' कंपनीकडून औरंगाबादेत मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार ३५ हजार कोटींची गुंतवणूक कंपनी महाराष्ट्रात करणार असून, त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरात येऊन जागेची चाचपणी केली होती.

फॉक्सकॉनने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याचे तीन दिवसांपूर्वी अधिकृतरीत्या जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात जागेची चाचपणी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत कंपनीचा पत्रव्यवहार सुरू होता. तीन महिन्यांपूर्वी कंपनीच्या वरिष्ठ शिष्टमंडळाचे पथक औरंगाबादेत आले होते. शेंद्रा एमआयडीसीच्या जागेची पाहणी केल्यानंतर हॉटेल ताजमध्ये या पथकाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; कंपनीला १७०० एकर जागा हवी आहे. सद्यस्थितीत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर याठिकाणी एकत्रितरित्या एवढी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तीन टप्प्यांत गुंतवणुकीचा निर्णय कंपनीने करारादरम्यान जाहीर केला. ३५ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्मिती करणारी देशातील ही सर्वांत मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरणार आहे.

आयपॅड - आयफोनच तसेच विविध कंपन्यांच्या टीव्हीचे स्क्रिन्स, इलेक्ट्रॉनिक चिप्स आदी उपकरणांची निर्मिती कंपनीमार्फत करण्यात येते. औरंगाबादेतील औद्योगिक विकास आणि गेल्या काही वर्षांत निर्यातक्षमतेत झालेली वाढ यामुळे परदेशी कंपन्यांकडून औरंगाबादला पहिली पसंती दिली जात आहे. त्याच अनुषंगाने 'फॉक्सकॉन'चे अधिकारी तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादला आले होते.

एमआयडीसीने त्यांना जागा दाखविल्यानंतर कंपनीने येथे येण्याची मानसिकता निश्चित केली होती. शनिवारी झालेल्या करारात मुंबई, पुण्याचा उल्लेख करण्यात आला, पण तिसरा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणण्यात कंपनीचा अधिक रस असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादकरांना यंदाही ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद पुण्याजवळील पिंपरी-चिंचवडला मिळाल्याने यंदाही उस्मानाबादकरांची निराशा झाली आहे. ८८वे साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते घुमानला घेण्यात आले. त्यामुळे यंदाचे साहित्य संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादकरांना नक्कीच मिळणार, अशी अपेक्षा होती. पण, तीदेखील फोल ठरली आहे.

आर्थिक पाठबळ, मुबलक मनुष्यबळ आणि सोयीसुविधांची सुसज्जता हे निकष ठिकाणाच्या निवडीसाठी वापरण्यात आले. या निकषांच्या आधारे पिंपरी चिंचवडला साहित्य संमेलन घेण्याचे ठरले. उस्मानाबादला यजमानपदासाठी डावलण्यामागे दुष्काळ, पाणीटंचाई अशा सबबी सांगण्यात येत असल्या, तरी काही राजकीय नेतेमंडळींच्या आग्रहास्तव संमेलनाचे यजमानपद पिंपरी-चिंचवडला देण्यात आल्याची चर्चा आहे. ८९वे साहित्य संमेलन उस्मानाबादला घेण्यात येईल, अशी पुसटशी वाच्यता संमेलनाचे यजमानपद घुमानला देताना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळींच्या दबावाला व अर्थकारणाला बळी पडून हा निर्णय झाल्याची चर्चा खासगीत रंगत आहे.

अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये घेण्यात यावे, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. कोणत्याही निधीची अपेक्षा न बाळगता व साहित्यिकांना साजेशे आदारातिथ्य करीत हे संमेलन यशस्वी करण्याचा चंग उस्मानाबादकरांनी मनाशी बांधला होता. उस्मानाबादेतील जिल्हा मराठी पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघ,व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक संघ, महिला बचत गट, बार असोसिएशन आदींचा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनासाठी पाठिंबा होता. उस्मानाबादकरांची आग्रही मागणी आणि संमेलनाची पूर्वतयारी पाहून पुणे येथून आलेल्या पथकातील पदाधिकाऱ्यांनी समाधानही व्यक्त केले होते. मात्र, ८८वे साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची घोषणा करताना घुमानची घोषणा करून या साहित्य महामंडळाच्या कारभाऱ्यांनी उस्मानाबादवर अन्याय करीत उस्मानाबादकरांना त्यानंतरही ८९वे साहित्य संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादलाच देण्यात यावे, अशी मागणीचा रेटा मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावून धरला होता.

यासाठी उस्मानाबाद जिल्हा शाखेने घुमान येथे शक्तीप्रदर्शनही केले. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ग्रामीण भागांतून सर्वाधिक २००हून अधिक साहित्यिक व रसिक घुमानला नेले. तिथे उस्मानाबादकरांनी संत गोरोबा काकाची दिंडी काढून घुमानकरांसहीत देशभरातून आलेल्या साहित्यप्रेमी मंडळींची मने जिंकली. ८९वे साहित्य संमेलन उस्मानाबाद येथेच होणार याची छाप पाडण्यात उस्मानाबादकर यशस्वीही झाले. परंतु, यंदाही साहित्य महामंडळाच्या कारभाऱ्यांनी उस्मानाबादकरांची विनंती डावलली.

८८वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले नाही. त्यामुळे ८९वे साहित्य संमेलनाचे यजमानपद निश्चित मिळेल, अशी आम्हाला आशा होती. तसे गाजरही साहित्य परिषदेच्या कारभाऱ्यांनी दाखविले होते. परंतु, परिषदेचे कारभारी कशाला बळी पडले, हे उमजत नाही. यजमानपद न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील साहित्यप्रेमी मंडळी नाराज आहेत. यजमानपदासाठी नेमके काय हवे असते, याचा खुलासा परिषदेच्या कारभाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

- नितीन तावडे, जिल्हाध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर अफवांचे पीक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात सोशल मीडियावरून अफवांचे पीक पसरवले जात असून याद्वारे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार केले जात आहे. जिल्ह्यात फासे पारध्यांची मोठी जमात आली असून त्यांच्याकडून दरोडे टाकण्यात येत असल्याची ही अफवा आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील संबंधित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात फासे पारध्यांची मोठी जमात आली आहे, त्यांच्याकडून दरोडे टाकण्यात येत आहेत, चोरट्यांना अटक केली आहे, तेर व ढोकी परिसरात रात्री फासे पारधी मोठ्या प्रमाणात आले आहेत, तेथील काही लोकांना मारहाण करून काहींना लुबाडले, दहशत निर्माण करून ग्रामस्थांना लुटण्याबरोबरच ते मुलेदेखील पळवित आहेत, ढोकी पोलिसांनी यातील काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला अशा स्वरूपातील बातम्या सोशल मीडियावर येत आहेत. या संदर्भातील काही फोटोही व्हॉट्सअॅपवर टाकले जात आहेत. या संदेशाबाबत कसलीही खातरजमा या मंडळींकडून केली जात नसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडे जिल्ह्यात भुरट्या चोऱ्या, हाणामारीचे प्रकार, घरफोडी अशा बातम्या वर्तमानपत्रातून येत आहेत. त्यातच या बातम्या कानावर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.

अशा प्रकारचा कोणताही प्रकार जिल्ह्यात घडला नसल्याची माहिती स्थनिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक हर्षद खेडकर यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात अद्याप कोणालाही चोरटे, सापडलेले नाहीत, कुणी चोरट्यांना पाहिल्याचे खात्रीपूर्वक सांगत नाहीत, कोणताही अनुचित प्रकार, चोरी किंवा दरोडा अशा प्रकारातून झाल्याची तक्रार कोणीही केलेली नाही किंवा जिल्ह्यातील एकाही पोलिस ठाण्यात प्राप्त झालेली नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या अफवाचे वारे वाहू लागले आहेत. हेतूतः बातम्या पसरवून सामाजिक आरोग्य बिघडविऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. जिल्ह्यात कोठेही फासे पारधींचा समूह आलेला नाही किंवा त्यांच्याकडून गैरकृत्य झाल्याची तक्रार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एखादी बातमी कळल्यास त्याची खातरजमा करावी.

- अभिषेक त्रिमुखे, जिल्हा पोलिस प्रमुख, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिका आणि मला मर्यादा आहेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'लातूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी मागण्या मांडायच्या आहेत, तेथे मी मांडत असून याबाबतीत माझ्या आणि महापालिकेच्या मर्यादा आहेत,' असे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी केले. राज्य सरकार आवश्यक गोष्टी करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, 'लातूर शहराच्या पाण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री योग्य ते निर्णय घेतील. परंतु, पाण्याचा प्रश्न संपविण्यासाठी शहरातील बेकायदा कनेक्शन, फुटलेल्या पाइपलाइन, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नळाला तोट्या असणे आणि नळाला मीटरची सक्ती असणे आवश्यक आहे. नळाला मीटर असले, तर पालिका वर्षाला १८०० रुपये पाण्यासाठी घेते आणि पाणी देत नाही, असे होणार नाही. वापरलेल्या पाण्याचेच बिल येईल आणि ते आजच्या पेक्षा कमी असेल.'

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीच्या वेळी जी भाषा वापरली जाते, जो प्रकार घडत आहेत त्याबद्दल देशमुख यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, 'काँग्रेसच्या नगरसेवकांना आम्ही संयम बाळगायला सांगितले आहे. परंतु, एकूणच चर्चेचा स्तर उंचावला पाहिजे. विकासाच्या अजेंड्यावर किमान दोन वर्षे तरी पाणी पुरवठा हाच विषय ठेवावा लागेल.'

मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी शहरातील विविध १९ स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्णतपासणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी काही महत्त्वाच्या चाचण्या, तपासणी करायची आहे ती पन्नास टक्के सवलतीच्या दरात केली जाणार असून गरज असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि त्यानंतरची तपासणी मोफत केली जाईल, असे या उपक्रमाचे समन्वयक डॉ. अशोक पोतदार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यातील गावांत दुष्काळाचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील दोदडगाव व वडीगोद्री या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची; तसेच शेततलावाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

दोदडगाव येथे राष्ट्रीय फलोत्पादन मोहिमेंतर्गत फळबागांसाठी उभारण्यात आलेल्या शेततळ्याची; तसेच परिसरातील शेतीची पाहणी करून पीक परिस्थितीची माहिती पथकाने घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. वडीगोद्री येथील शासकीय विश्रामगृहावर केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी परिसरात पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असल्याचे सांगून पाऊस न पडल्याने दुबार पेरणीबरोबरच पिके हातची गेल्याची व्यथा बोलून दाखवली. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उद्भवला असल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. केंद्रीय पथकाने पाहणी केल्याने आता तरी शासनाकडून काही तरी मदत मिळेल, अशी अपेक्षा दुष्काळग्रस्त जालनेकरांना लागली आहे. पथकासमवेत कृषी विभागाचे सहसंचालक कैलास मोते, फलोत्पादन विभागाचे संचालक सुदाम आडसूळ, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जालन्याचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे, बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

अपेक्षित पावसाच्या सात टक्केच पाऊस

दरम्यान, जुलै महिन्यात अपेक्षित पावसाच्या केवळ सात टक्केच पाऊस झाला असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे, तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने पिके जळाली आहेत. त्याचबरोबर कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात संबंधित टीमशी संपर्क साधण्यात आला असून जिल्ह्यात ज्या सर्कलमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजघडीला नागरिकांना १५० टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांनो, सरकार तुमच्या पाठीशी आहे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती आणि जलशिवार मोहिमेच्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. 'सरकार तुमच्या पाठीशी आहे,' असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

महामार्गावरील कन्हेरवाडी येथील शेत शिवाराची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पथकाला शेतकऱ्यांशी बोलतना भाषेची अडचणी जाणवली. पण, सीईओ सुमन रावत यांनी दुभाषकाची भूमिका पार पाडून संवादामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. शेतकऱ्यांनी आपापली गाऱ्हाणी पथकासमोर मांडली. निसर्गनिर्मित संकटाचा शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा, असे आवाहन पथकप्रमुक राघवेंद्रसिंह यांनी केले.

इंदापूर येथे पथकाने विलास गपाट यांच्या शेतीला भेट दिली. शेती जगवण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर येडशी शिवारात त्यांनी काही शेतकऱ्यांची भेट घेतली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या वेळी पथकाची भेट घेऊन भरघोस मदत करण्याचे आवाहन केले. आमदार मधुकर चव्हाण यांनीही पथकाची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचे सादरीकरण पथकाला केले. यानंतर हे पथक जिल्ह्यातील सारोळा, चिकली, पाडोळी येथील जलशिवार मोहिमेची कामे पाहून औसामार्गे लातूरला रवाना झाले.

पथकाची गाडी शेतकऱ्यांनी अडवली

कन्हेरवाडी येथून इंदापूरकडे हे पथक निघाले असता काही शेतकऱ्यांनी या पथकाची गाडी अडवून तातडीने मदत करण्याची विनंती केली. शिवाय, हाताला काम, पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा देण्याची मागणी केली. 'सरकार तुमच्या पाठीशी आहे. घाबरू नका,' असा धीर देण्याचा प्रयत्न पथकाने या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने बोगस शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा अजूनही सुरूच आहेत. झेडपीचे पथक येत असल्याची माहिती शाळांना आधीच पोचते. त्यामुळे काहीवेळ शाळा बंद राहते. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. अचानक तपासणी करा, तथ्य आढळले नाहीतर राजीनामा देऊ,' असे आव्हान स्थायी समिती सदस्य भाजपचे ज्ञानेश्वर मोठे यांनी दिले आहे.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा मंगळवारी घेण्यात आली. अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती शीला चव्हाण, सरला मनगटे, संतोष जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, छायादेवी शिसोदे, सदस्य दीपकसिंह राजपूत, अनिल चोरडिया, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोठे आदींची उपस्थिती होती.

ऐनवेळच्या मुद्यांवर चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप सदस्य ज्ञानेश्वर मोठे यांनी अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित केला. सिल्लोड तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या सात अनधिकृत शाळांवर अद्याप कारवाई केली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी कार्यवाही केल्याचे स्पष्ट केले. मोठे म्हणाले, की तुमची पथके जेव्हा तपासणीसाठी येतात त्याची माहिती शाळा व्यवस्थापनाला आधीच कळते. पथक जाईपर्यंत शाळा बंद केली जाते. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तुम्ही शाळेचे फळे तपासून पाहा. तथ्य आढळले नाही तर राजीनामा देतो, असे आवाहन दिले.

राजपूत यांनी हाच मुद्दा पुढे उपस्थित करत ५० पैकी ११ शाळांवरच कारवाई कशी काय असे विचारले. लिटल वूडस शाळेबाबत विचारणा केली असता उपासनी यांनी या शाळेची मान्यता वेगळ्या नावाने होती. शासनाकडून मिळालेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर वेगळे नाव होते. त्यामुळे पत्र देताना तसा उल्लेख केला गेला, अशी बाजू मांडली. राजपूत म्हणाले, की या शाळेची गेल्या वर्षीही तक्रार होती. यंदा जानेवारीपासून प्रवेश दिले गेले. साडेतीन कोटी रुपये फीसचे जमा झाले. शाळेत मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत, असा अहवाल असतानाही कारवाई कशी झाली नाही, असा सवाल उपस्थित केला. या मुद्यावरून सभागृहात एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागातील कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पालोदकर यांनी केली.

समाजकल्याण विभागांतर्गत दलितवस्ती सुधार योजनेची जी कामे झाली आहेत. त्याची दहा टक्के रक्कम देय आहे. ही रक्कम का थांबविली, असा प्रश्न राजपूत यांनी विचारला. अतिरिक्त सीइओ वेदमुथा यांनी झालेल्या कामांची तपासणी अन्य तालुक्यांतील अधिकाऱ्यांकडून केली जाईल त्यानंतर बिले दिली जातील असे स्पष्ट केले. त्यावर झेडपीतील कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा विश्वास नाही काय ? तक्रारी असतील त्याठिकाणी चौकशी करा अन्य ठिकाणची बिले विनाकारण अडवू नका अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रशासनाने संमती दर्शविली.

वैयक्तिक लाभ योजनेसाठी प्रशासनाचा उपक्रम

सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांबद्दल प्रशासनाने तयार केलेले वेळापत्रक सांगितले. दहा सप्टेंबरपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांकडे लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज करावे लागतील. अर्जांची छाननी होऊन ते पुढे मुख्यालयात येतील. त्यानंतर जानेवारीअखेर सर्व योजनांचा लाभ निवडल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांना दिला जाईल, यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वानराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

फुलंब्री : वानराच्या हल्ल्यात तालुक्यातील तालुक्यातील धामणगांव येथील शेतकरी मरण पावला आहे. शेतात काम करताना वानर अचानक अंगावर धावून आल्याने घाबरलेल्या शेतकऱ्यांस ह्रदयविकाराचा झटका आला व ते जागीच गतप्राण झाले.

धामणगांव येथील शेतकरी सुपडू रशीद शेख (वय ५५) हे गट नंबर ४१९ मधील शेतात शुक्रवारी (७ आगस्ट) काम करीत होते. तेव्हा वानरांचा धुमाकूळ सुरू झाला. सुपडू शेख यांना काय करावे हे सुचेना, तेवढ्यात एक वानर अचानक धावून आले. त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी पळ काढला परंतु, यावेळी घाबरल्याने त्यांना हदयविकाराचा झटका आला आणि ते जागेवर गतप्राण झाले. त्यांच्या मृतदेहाचे शनिवारी (८ आॅगस्ट) औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात पोस्टमार्टेम करण्यात आले. सुपडू शेख यांना केवळ एक एकर जमीन असून ते अत्यंत गरीब आहेत. नैसर्गिक आपत्ती साह्य देऊन कुटुंबियास हातभार धीर द्यावा, अशी मागणी पत्नी रजियाबी शेख यांच्यासह गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅमकीविरुद्ध लढाईत नऊ लाखांचा खर्च

$
0
0

औरंगाबाद : रॅमकीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी अडीच वर्षात महापालिकेने सुमारे नऊ लाख रुपये खर्च केले आहेत. न्यायालयीन लढाई सुरूच असून त्यावर पडदा केव्हा पडणार या बद्दल साशंकता आहे.

महापालिकेने शहरातील साफसफाईचे कंत्राट रॅमकी या संस्थेला दिले होते. कालांतराने रॅमकी कंपनी व महापालिकेचे कर्मचारी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. रॅमकी बरोबरचा करार मोडला गेला. त्यामुळे रॅमकीने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती जे. एफ. रिबेलो यांचा लवाद नियुक्त केला. या लवादाच्या समोर आतापर्यंत दोन वेळा सुनावणी झाली. २०१३ पासून सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेसाठी महापालिकेला आतापर्यंत नऊ लाख रुपये खर्च आला आहे. रॅमकी आणि महापालिका यांच्यातील कायदेशीर कारवाई केव्हा संपेल याबद्दल काहीच सांगता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजप्रवाह उतरल्याने विहीर मजुराचा मृत्यू

$
0
0

कन्नड : पाण्यात विजेच्या प्रवाह उतरल्याने विहीर खोलीकरणाचे काम करणाऱ्या शेख नौशाद शेख उस्मान (वय २६, रा. माटेगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील टापरगाव शिवारात घडली.

हरिदास लालचंद क्षीरसागर यांच्या गटनंबर ५६ मधील मालकीच्या विहिरीचे खोलीकरणाचे काम चालू होते. या कामाचा ठेका शेख नौशाद यांनी घेतला होता. ते रोजच्या प्रमाणे काम करण्यासाठी मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता चेळ्याच्या साह्याने विहिरीत उतरत होते. त्यावेळी विहिरीच्या पाण्यात वीजप्रवाह असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. चेळ्यातून पाण्यात पाय ठेवताच विजेच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेला दुसरा सहकारी प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावला. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिस हेड कॉन्सटेबल मनोज घोडके, पोलिस मित्र संतोष ढोले यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी वसतिगृहातील सात विद्यार्थिनी आजारी

$
0
0

औरंगाबाद : जुबलीपार्क येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील सात विद्यार्थिनींना सोमवारी रात्री अचानक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सायंकाळच्या जेवनानंतर विद्यार्थिनींना अचानक पोटात दुखत होते. त्यामुळे त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. यातील चार मुलींची प्रकृती सुधारली आहे. खराब जेवणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. तर जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा आरोप 'मनविसे'ने केला आहे. याबाबत त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाने दोन जणांची समिती तत्काळ नेमत संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. यात सहाय्यक प्रकल्प अधिकारी यू. जी. पाटील, दिलीप घोघरे यांचा समावेश आहे. त्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची चौकशी केल्याचे माहिती अधिकारी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अजंता’मध्ये १६ हजारांची पगारवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाण्यातल्या अजंता फार्मा कंपनीतील कामगारांचा खिसा आता वाढीव १६ हजारांच्या पगाराने खुळखुळणार आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांत याबाबत नुकताच करार झाला. याबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त केले.

कामगारांच्या दरमहा प्रत्यक्ष पगारात १६ हजारांची वाढ झाली, तर अप्रत्यक्ष ४ हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा त्यांना मिळणार होणार आहे. पहिल्या वर्षी (ऑक्टोबर २०१४ पासून) १२ हजार ८००, दुसऱ्या वर्षी १ हजार ६०० व तिसऱ्या वर्षी १ हजार ६०० अशी दरमहा पगार वाढ होईल. यासह दर सहा महिन्यांनी विशेष भत्ता वाढेल. बोनस आणि अनुदान म्हणून १६ हजार ४०० रुपये, एलटीए १३ हजार ५०० व सहा दिवसाची पगारी रजा तसेच व्यवस्थापन स्वखर्चाने कामगारांची दोन दिवसांची शैक्षणिक सहल, स्वेटर, बूट इत्यादीसाठी तीन हजार रुपये देईल. दुर्दैवाने कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी पाच हजार रुपये, प्रत्येक कामगारास बिनव्याजी कर्ज म्हणून ७० हजार रुपये व दोन महिन्यांचा पूर्ण पगार मिळेल. तसेच एक लाख ३० हजार रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, प्रत्येक कामगारांचा अडीच लाख रुपयांचा अपघाती विमा, अडीच लाख रुपयांचा नैसर्गिक मृत्यू विमा, कामगार निवृत्त झाल्यास किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या मुलास पात्रतेनुसार कंपनीत नोकरी असा करार ऑक्टोबर २०१४ पासून ते ३१ मार्च २०१८ असेल, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे कार्यालय मंत्री गणेश भोसले यांनी दिली.

करारावर संघटनेतर्फे अध्यक्ष भगवान शहापूरकर, सरचिटणीस श्रीपाद कुटासकर, कामगार प्रतिनिधी ए. आर. पल्लेया, आर. एच. गाडेकर, जी. के. जाधव, ए. यु. डिके, ए. बी. उचित तर कंपनीतर्फे टेक्निकल प्रेसडेंट एस. एच. अगरवाल, जे. डी. जोशी, थंपी जाकोब, पी. एस. गालफाडे, पी. बी. धन्नक यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, २१ ऑगस्ट रोजी संघटनेने मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images