Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एसी पर्यटन बस पुढच्या आठवड्यात

$
0
0

पेंटिंगचे काम चार महिन्यांपासून रखडले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून पर्यटन स्‍थळांकडे जाण्यासाठी दोन वातानुकूलित बस पुढच्या आठवड्यात पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या बसच्या पेंटिंगचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले होते. ते अंतिम टप्प्यात आहे. या बसची गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद शहरात मोठ्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक येतात. त्यांना अजिंठा आणि वेरूळ येथे जाण्यासाठी वातानुकूलित बस उपलब्ध असावी, या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी एसटी महामंडळाला जिल्हा नियोजन मंडळातून (डीपीडी) सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा विशेष निधी दिला होता. या निधीतून वातानुकूलित बस विकत घेण्यात येणार होत्या. त्याची प्रक्रिय गेल्या वर्षभरापासून सुरू होती. या बसवर अजिंठा आणि वेरूळची चित्रे रिंगविण्याचे काम रखडले. त्यामुळे बस पर्यटकांच्या सेवेत येण्यास उशीर होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी वातानुकूलित बसवरील चित्रांची निवड केली, मात्र या पेंटिंगचा अतिरिक्त खर्च कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळविले. हा खर्च एसटी महामंडळ करणार आहे. येत्या काही दिवसांत पेंटिंगचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या बस औरंगाबाद विभागाला देण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यात या बस पर्यटकांच्या सेवेसाठी तयार असतील, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पर्यटन बसचे अनेक प्रयोग

केंद्रीय पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा यांनी औरंगाबाद दर्शन बस सेवा सुरू केली होती. ही सेवा अनेक वर्षे सुरू होती, मात्र पर्यटन विभागाच्या धोरणात बदल झाल्यानंतर या बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येथे आलेले पर्यटक अजिंठा, वेरूळकडे उपलब्ध होईल त्या वाहनातून जात होते. एसटी महामंडळाने दीड वर्षांपूर्वी अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी जुन्या झालेल्या बस बदलण्याचा निर्णय घेतला. हिरव्या रंगाची युरो-वन बस पर्यटन विभागाच्या कार्यालयापासून विविध स्‍थळांना भेटी देण्यासाठी सुरू केली. या सेवेला अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्याने बस बंद करण्यात आली.

दहा वर्षांपूर्वी अजिंठ्यात खासगी वाहनांना निर्बंध

वाहनांच्या प्रदूषणामुळे लेणीवर परिणाम होत असल्याने अजिंठ्यात खासगी वाहनांवर दहा वर्षांपूर्वी निर्बंध घालण्यात आले होते. फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी या मार्गावर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वापरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचा खर्च जास्त होता. त्यामुळे याबसऐवजी कमी प्रदूषण करणाऱ्या युरो-वन बस आणि मिडी बस सुरू करण्यात आल्या. ही सेवा सुमारे आठ वर्षे सुरू होती. दीड वर्षांपूर्वी ही सेवा बंद करून पाच शीतल आणि पाच साध्या बस सुरू करण्यात आल्या आहेत.

मिडी बस ग्रामीण भागात

अजिंठा लेणीच्या मार्गावर ‌मिडी म्हणजेच छोट्या आकाराच्या बस सुरू करण्यात आल्या होत्या. ही बस सेवा अचानक बंद करून तेथे साध्या बस सुरू करण्यात आल्या. महामंडळाने दिलेल्या मिडी बस सिल्लोड आगारात देण्यात आल्या असून, त्या ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करीत आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे पर्यटन बस येण्यास उशीर होत आहे. पेंटिंगची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर या बस औरंगाबादला येण्याची शक्यता आहे.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाद जुनेच; विरोधक मात्र नवे

$
0
0

एकेकाळचे सत्ताधारी उचलताहेत विरोधाचे तेच विषय

म. टा. प्रतिनिधी, जालना

समन्यायी पाणी वाटप, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठवाड्यातील दुष्काळ यांसारख्या समस्यांवर मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर ताशेरे ओढले. विरोधक म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका योग्य असली, तरी या समस्या आघाडीच्या सत्ताकाळात का सुटल्या नाहीत, याविषयी सामान्य जनतेला कुतूहलच आहे.

मराठवाड्याला दुष्काळ नवा नाही. २०१२मध्ये झालेल्या दुष्काळाची तुलना १९७२मधील दुष्काळाशी करण्यात आली. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या थेट मदतीकरता नाना पाटेकर यांच्यासारखे कलाकार धावून आले. शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा निर्णय वैयक्तिकरित्या ज्याचा-त्याचा असला, तरी राजकीय नेत्याने थेट शेतकऱ्याला मदत केल्याची माहिती तूर्तास तरी दिसत नाही. आंदोलने आणि इतर मार्गांतून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू असलेला विरोध योग्य असला, तरी शेतकऱ्यांचे दुखणे संपायला तयार नाही. कर्जमाफीची मागणी विरोधकांनी केली असली, तरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे विरोधकांनी अद्याप पुरते खोडून काढल्याचे दिसत नाही. दुष्काळी अनुदानाचे २३० कोटी रुपये आणि विशेष म्हणजे यंदा मात्र प्रथमच जालना जिल्ह्यात पीकविम्याचे विक्रमी १९० कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे जिल्हाभर वाटप सुरू आहे. त्यामुळे नक्की कोणत्या आधारे विरोधक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत, हे समजायला तयार नाही.

मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी यासंदर्भात सांगितले, 'जायकवाडीच्या उर्ध्व भागात जी धरणे झाली त्याची मंजुरी आणि कामे अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातदेखील झाली आहेत. त्या वेळी ते काय करत होते?

त्यांनी तेव्हा ही आक्रमकता का दाखवली नाही? त्यांचे सहकारी विखे समन्यायी पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधारी असताना आणि आताही हिंसक भाषा बोलतात. यावर चव्हाण काय प्रत्युत्तर देतील?'

सत्ता गेली तरी गटबाजी कायम

काँग्रेसची केंद्रातील व राज्यातील सत्ता गेली तरी जालना जिल्ह्यातील गटबाजी मात्र, कायम आहे. माजी आमदार कैलास गोंरट्याल व प्रदेश चिटणीस संजय लाखे-पाटील यांचे दोन गट अस्तित्वात आहेत. त्याशिवाय माजी आमदार निवडणुकीपुरते काँग्रेसचे काम करतात. त्यानंतर मात्र, त्यांची पाच वर्ष शिवसेनेच्या नेत्यांशी सलगी असते. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. ‌ही सर्व गटबाजी थांब‌विण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी प्रयत्न करायला हवे होते. मात्र, या दौऱ्यावेळी चव्हाण यांनी गटबाजीकडे दुर्लक्षच केले.

'तरच वाद थांबतील'

जालनाः समन्यायी पाणी वाटप झाले तरच पाण्यासाठी विविध ठिकाणी निर्माण झालेले वाद थांबतील. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने दिलेल्या आदेशाचे राज्य सरकारने कठोरपणे पालन करण्याचीच भूमिका घेतली पाहिजे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील जायकवाडीचे पाणी अडवण्यात सक्रिय आहेत हे लक्षात आणून दिले असता त्यांची त्यांची बाजू ते मांडत आहेत. मी सर्वांना समान न्याय मिळेल असाच एक विचार करत असल्याचे सांगून खासदार चव्हाण यांनी थेट उत्तर देणे टाळले. मराठवाड्यातील आयएमए दुसरीकडे नेले. मुंबई नागपूर मार्ग औरंगाबादहून जळगाव मार्गे नेण्यात येणार आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मराठवाड्यातील केवळ एक शहर आहे. नागपूरच्या विकासाला आमचा आक्षेप नाही पण मराठवाडय़ाचा विचार कोण आणि कधी करणार ? असे चव्हाण म्हणाले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, कैलास गोरंट्याल, पार्वताबाई रत्नपारखे, कल्याण काळे, विलास औताडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेवर बलात्कारप्रकरणी कोठडी

$
0
0

नांदेड : आईसाठी टीबीच्या गोळ्या घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर काढलेल्या फोटोच्या आधारावर ब्लॅकमेल करून मे २०१५ पासून अनेक वेळा विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या एका कंत्राटी क्षयरोग होमव्हिजीट अधिकाऱ्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सूर्यवंशी यांनी २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली.

वसमत (जि. हिंगोली) येथील विवाहिता टीबी आजार असलेल्या आईला भेटण्यासाठी नांदेडला आली होती. आईला टीबीच्या गोळ्या आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर कंत्राटी क्षयरोग होमव्हिजीट अधिकारी राजनसिंह तौर याने गुंगीचे औषध पाजून बलात्कारर केला. हा प्रकार विवाहितेला गुंगी गेल्यानंतर कळला. तेंव्हा राजनसिंहकडे विचारणा केली असता मी तुझे अश्लिल फोटो काढले आहेत. तेंव्हा तू कोणालाही याबाबत काही सांगितले तर ते फोटो मी तुझ्या नवऱ्याला दाखवून देईल आणि तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. त्यानंतर ही विवाहिता सासरी गेली. पण राजनसिंह तिला नेहमी मोबाइलवर फोन करून पुन्हा एकदा ये अशा धमक्या देवू लागला. त्या विवाहितेने फोन नंबर बदलल्यानंतरही त्या विवाहितेच्या आजारी आईला गोळ्या देण्याचे काम करणाऱ्या राजनसिंहने नवीन नंबर शोधून नांदेडला बोलावून अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचया तक्रारीवरुन १९ ऑगस्ट २०१५ रोजी पोलिस उपनिरीक्षक अमृता बोरचाटे पाटील यांनी या विवाहितेचा पूर्ण जबाब नोंदवून घेतला. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात राजनसिंह तौर (वय ३९) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. २५ ऑगस्टला पोलिसांनी राजनसिंह तौरला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार-टेम्पोच्या धडकेत एक जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर वडीगोद्रीपासून जवळच असलेल्या बारसवाडा पाटीजवळ टोयोटा कार व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले.

प्रदीप बाबूराव सातपूते ( वय २७ रा. मोरेवाडी, ता. आंबेजोगाई) असे मरण पावलेल्या कारचालकाचे नाव आहे. सुदेश गगणे (वय २७) व डॉ. अजय ठोंबरे (वय २७ रा. दोघेही रा. मोरेवाडी ता. अंबेजोगाई) अशी जखमींची नावे आहेत. बीडहून औरंगाबादकडे जाणारा टेम्पो क्रं. (एम. एच. १५-४७३३ ) व औरंगाबादकडून बीडकडे जाणारी टोयोटा कार (एम. एच. ४४-२४३०)ची समोरा-समोर धडक झाली. या घटनेची माहिती कळताच गोंदी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिताराम म्हेत्रे, पोलिस कॉन्स्टेबल श्रीधर सानप, बी. आर. आहेर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना पाचोड येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघात होताच टेम्पो चालक फरार झाला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बी. आर. आहेर हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या बहाण्याने भरदिवसा चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

पाणी पिण्याचा बहाण्याने आलेल्या चोरट्याने आखाड्यावरील महिलेचे तोंड दाबून दागिने लुटले. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास हिमायतनगर शहरापासून सात किलो मीटर अंतरावर असलेल्या आखाड्यावर घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हिमायतनगर येथील शेतकरी संतोष गाजेवर यांचा शहरापासून उत्तरेस ७ किलो मीटर अंतरावर शेतातील सालगड्यासाठी आखाडा आहे. त्याठिकाणी चांदु पुंजाराम अंबेकर हे पत्नी अंजनाबाई सोबत राहतात. बुधवार सकाळी चांदु अंबेकर शेतातील कापसावर पडलेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीचे काम करीत होते. त्यावेळी सालगड्याची पत्नी अंजनाबाई या स्वयंपाक करीत होत्या. दरम्यान, अंगावर काळे टीशर्ट असलेला एक युवक आला. त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. याच वेळी पाठीमागुन अन्य एका युवकाने येवून तोंड दाबून धरले. कोणीही नसल्याचे पाहून दोघांनी महिलेच्या कानातील २ ग्रॅमचे कर्णफुले व गळ्यातील २ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने काढून घेऊन पलायन केले.

चोरटे पसार होताच महिलेने आरडा-ओरडा केला. फवारणी करणारे पती व अन्य एक मजूर धाव घेतली मात्र तोपर्यंत अज्ञात चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच शिकावू उपविभागीय अधिकारी एस. डी. बारी, पोलिस निरीक्षक अशोक चाटे यांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बहुजनांनी पाटीदार समाजाचा आदर्श घ्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

गुजरातमध्ये पाटीदार समाजाने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी हार्दिक पटेल यांचे अभिनंदन केले. बहुजन समाजाची एकजुट असावी तर पाटीदार समाजासारखी असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना ज्यांना स्वताच्या राज्यातील आंदोलन हाताळता येत नाही त्यांनी मोठ-मोठी भाषणे देऊ नयेत असा टोला ही लगावला.

नारायण राणे म्हणाले, 'बहुजन समाजाने एकजुट दाखवली पाहिजे. परंतु, महाराष्ट्रात तसे होत नाही. राज्यातील पाटलांची पाटीदार समाजासारखी एकजुट असावी असे मत व्यक्त केले. सध्याच्या मंत्रिमंडळात नाव घेण्यासारखा एक तरी मंत्री आहे का ? असा सवाल करून जैतापूरचा प्रकल्प आता होणारच आहे. शिवसेनेच्या खासदाराचा वरचा मजला रिकामा असतो त्यांना काहीही माहित नसते. सध्या जैतापूर प्रकल्पाच्या कामाला वेग आलेला आहे. त्या प्रकल्पाच्या कंपाउंडच्या आत जाण्याची शिवसेनेची हिमंत नसल्याचे सांगून त्यांचे खासदार हे फक्त चपाती पुरते उरले असल्याचा आरोप त्यांनी केला.

कायमस्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी कोयनेतून मराठवाड्याला पाणी देण्याबाबत गेली काही वर्ष चर्चा होते. परंतु, ठोस अस काही होत नाही. त्यासाठी किमान त्याचा अभ्यास तरी व्हावा असे मत व्यक्त करून राणे यांनी तसे पाणी आणता येत असेल तर कोकण त्याला विरोध करणार नाही कोकणी माणुस दिलदार असतो असे सांगितले.

'मला कोणाला विचारावे लागत नाही'

मी अधिकृतरित्या आलो की, मला कोणी पाठवले हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून राणे म्हणाले, 'माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, मला कोणाला विचारावे लागत नाही. मी काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितले आहे. आता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. सरकारकडून सर्व करून घ्यायाचा मी सल्ला दिला आहे. त्यासाठी मी आता जिल्हाधिकारी यांनाही ही भेटणार असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिहारसारखे मदतीचे पॅकेज द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारील देशाला विमानाने पाणी पाठविण्याची मदत करू शकतात. त्यासोबतच बिहारला सव्वालाख कोटी रुपयांची मदत घोषीत करतात. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी फक्त साडेपाचशे कोटी मदत करतात, ही विसंगती आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राणे यांनी गुरुवारी स्वतंत्रपणे लातूर तालुक्यातील चिंचोलीराव वाडी, गंगापूर, पेठ या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. सरकार कसे चालवायचे, आदेश कसे द्यायचे याची माहितीच फडणवीस यांना नाही. पुस्तके वाचून फक्त बोलत राहयचे एवढेच त्यांना माहित असल्याचे ते म्हणाले.

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस जी मागणी करीत होती तीच मागणी मी करीत आहे असे सांगून राणे म्हणाले, 'दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पुढील खरिपाचे पीक घरी येईपर्यंत सर्व बिले, कर, शुल्क माफ करावी आणि प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये रोख मदत करावी.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री औरंगाबादला आले होते. त्यातच त्यांनी आढावा बैठक घेतली.' आठवड्यातून दोन दिवस ते नागपूरात असतात. त्यामुळे ते केवळ नागपूरचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मराठवाड्यात चारा, पाण्यासाठी आदेश देऊन ते पूर्ण झाले किंवा नाही याची माहिती घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शहर अध्यक्ष मोईज शेख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील-कव्हेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भोसले आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीचे पाणी पिण्यासाठी राखीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

राज्यातील सर्व पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्युत मोटारीच्या साह्याने जायकवाडी धरणातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या निर्णयाचा परिसरातील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर परिणाम जाणवणार आहे.

जायकवाडी धरणात कितीही पाणीसाठा शिल्लक असला तरी पैठण, गंगापूर व शेजारील जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यातील शेतकरी विद्युत मोटारीने पाणी उपसा करून शेती करतात. यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व पाणीसाठे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जायकवाडी पाटबंधारे विभागाला अद्याप असा कोणताही आदेश मिळाले नसला तरी येत्या एक किंवा दोन दिवसात आदेश प्राप्त होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भार्गोदेव यांनी दिली. यामुळे, विद्युत मोटारीच्या सहाय्याने धरणातून पाणीउपसा करणारे शेतकरी धास्तावले आहेत.

वीस हजार मोटारी

या चारही तालुक्यातील आठ हजार विद्युत पंपाना अधिकृतरित्या पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, तर जवळपास दहा ते बारा हजार विद्युत मोटारीने अवैधपणे धरणातून पाणी उपसा करण्यात येतो. एकूण वीस हजार पंपाद्वारे दोन्ही जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

उद्योगांवर संक्रांत?

जायकवाडी धरणातून उद्योगाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दहा टक्क्याने कपात करण्यात आली आहे. सध्या धरणात जेमतेम ४.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणखी कपात होण्याची शक्यता भार्गोदेव यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाने निर्णय घेतला असून आदेश अद्याप प्राप्त झाला नाही. आदेश मिळताच जायकवाडी धरणावरील सर्व मोटारी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

- संजय भार्गोदेव, कार्यकारी अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉटेलमध्ये चोरी करणारा चार तासांत जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळ येथील हॉटेल लेक व्ह्यूमध्ये चोरी करणाऱ्यास खुलताबाद पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. सुरेश शेषराव सोनवणे (रा. म्हैसमाळ), असे त्याचे नाव असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

म्हैसमाळ येथे लेक व्ह्यू हॉटेलचे मालक राजू गंगाधर देवलवार १५-२० दिवसांपासून आजारी असल्याने हॉटेल बंद होते. वॉचमन काम सोडून गेल्यामुळे हॉटेलच्या देखरेख करायला कोणीही नव्हते. देवलवार २५ ऑगस्ट रोजी म्हैसमाळ येथे हॉटेलमध्ये आले असता त्यांना हॉटेलचे कुलूप तोडलेले दिसले. हॉटेलमधील फ्रीज, गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, टेबल, खुर्च्या, मिक्सर आदी सुमारे ५९ हजार ९५० रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, सहायक फौजदार खंडागळे, यू. आर. जाधव, एन. एन. पोटुळे, आर. पी. मोहिते, इर्शाद पठाण, मगरे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. खबऱ्याच्या मदतीने एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार- ट्रक अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कार व ट्रकच्या अपघातात कारमधील शिक्षक ठार झाला असून अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात पाचोडजवळील दोदडगाव फाट्याजवळ झाला.

अंबेजोगाई तालुक्यातील मोरवाडी येथील रहिवासी प्रदीप बाबुराव सातपुते (वय २७), सूरज बाबासाहेब गगने (वय २७) व अजय अशोक ठोंबरे (वय २६) ते तीन तरुण एम एच-४४ जी २४५० या क्रमांकाच्या कारने औरंगाबादकडे जात होते. त्यांच्या कारची पाचोडजवळील दोदडगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणारा ट्रकसोबत (एम एच-१५ जी ४७३५) धडक झाली. अपघातात कारमधील तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. त्याठिकाणाहून जाणारे आधार समूहाचे अरुण मगरे यांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबर वर फोन केला, मात्र पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे जखमींना उपचार मिळण्यास उशीर झाला. तिन्ही जखमींना पाचोड येथील रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी प्रदीप सातपुते यांना मृत घोषित केले. प्रदीप सातपुते हे शिक्षक होते.

पाचोड येथील ग्रामीण रुगणालयात नऊ महिन्यांपासून रुग्णवहिकाच उपलब्ध नाही. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने काही जणांना जीव गमवावा लागत आहे. पाचोड येथील रुग्णवाहिका पुणे येथे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात मटक्याचा फास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाच्या वेढ्यासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात मटक्याचा फास आवळला जात आहे. पैठणनंतर सोयगाव व कन्नड तालुक्यात बुकींचे जाळे पसरले असून, शेतकरी, शेतमजूर मुंबई-कल्याणचा आकडा लावून जुगारात फसत आहेत.

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील हुतात्मा स्मारकासमोर, गावात अन्य दोन ठिकाणी मुंबई-कल्याण मटका राजरोसपणे घेतला जात आहे. या परिसरात दिवसभर जुगारी व दारूड्यांची गर्दी होत असून, महिला व शाळकरी मुलांना वावरणे कठीण झाले आहे. मटक्याच्या अड्ड्यापासून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व महादेव मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. फर्दापूर शेजारील जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे बंद असल्याने तेथील जुगारी व दारूडे फर्दापूरमध्ये येऊन मटका खेळत आहेत. फर्दापूर येथील जुगार अड्ड्यांना काहीवेळा अक्षरशः जत्रेचे स्वरूप येत आहे. मटक्यासोबतच सोयगाव तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक व अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे. याचा त्रास अजिंठा लेणीच्या पर्यटकांना होत आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तान्हुल्याचे पालक सापडेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निजामाबाद - पुणे पॅसेंजर रेल्वेत तीन महिन्याच्या चिमुकल्याला सोडून महिला पसार झाल्याची घटना जालना रेल्वेस्टेशनवर १२ ऑगस्ट रोजी घडली. तेव्हापासून ते तान्हुले बाळ येथील साकार संस्थेत असून अद्याप त्याच्या पालकांचा शोध लागलेला नाही. बालकाचा सांभाळ करण्याची इच्छा असल्यास नैसर्गिक पालकांनी तीस दिवसांच्या आत संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे. निझामाबाद-पुणे पॅसेंजर जालन्यात थांबली असता 'मी सामना घेऊन येते, तोपर्यंत बाळाला संभाळता का', अशी विनंती एका महिलेने स्वाती देशमुख यांना केली होती. त्यांच्याकडे बाळाला देऊन गेलेली महिला परत आलीच नाही. त्यामुळे देशमुख यांनी घडलेली घटना सांगत लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात चिमुकल्याला (मुलगा) सोपविले. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार १४ ऑगस्ट रोजी त्या बालकास काल्डा कॉर्नर येथील साकार संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किलेअर्क भागात काळीपिवळी जाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीचौक पोलिस ठाणे हद्दीतील पंचकुवा स्मशानभूमीजवळ अजीजखान उर्फ अज्जूभाई यांनी त्यांची काळीपिवळी जीप मंगळवारी रात्री उभी केली होती. अज्ञात आरोपींनी ही जीप पेटवून दिली. सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. अज्जूभाई हे अॅटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी आहेत. अज्ञातांनी जीप जाळण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे बोलून लांबवला लॅपटॉप

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाशी बोलणे झाल्यानंतर लॅपटॉप देण्यास सांगितल्याची थाप मारीत एका भामट्याने जेष्ठ नागरिकाला गंडा घातला. रेल्वे स्टेशन एमआयडीसी कॉलनी येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी कॉलनीतल सुदर्शन हाउसिंग सोसायटीमधील अशोक विनोरकर (वय ६०) यांच्या घरी विनाक्रमांकाच्या दुचाकीवर एक तरूण आला. प्रशांत प्रतापराव देशमुख (वय २४, रा. रा. पारध, ता. भोकरदन) असे नाव सांगत विनोरकर यांना तुमच्या मुलाशी बोलायचे आहे असे सांगितले. विनोरकर यांनी फोन लावून दिल्यानंतर प्रशांत मोबाइलवर बोलत घराबाहेर गेला. काही वेळाने पुन्हा घरात येऊन तुमच्या घरातील लॅपटॉप मुलाने माझ्याजवळ देण्यास सांगितला असल्याची थाप मारली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विनोरकर यांनी लॅपटॉप त्याच्याजवळ दिल्यानंतर तो पसार झाला. त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर प्रशांतने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरूद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय पद‌ाधिकाऱ्याचा सुपूत्र

संशयित आरोपी प्रशांतचे वडील जालन्यातील एका पक्षाचे पद‌ाधिकारी होते. प्रशांत हा विनोरकर यांच्याकडे सिडस कंपनीमध्ये नोकरीला होता. शेतकऱ्यांना स्वस्तात बियाणे देण्याचे सांगत त्याने काही रक्कम जमा करून विनोरकर यांना दिली होती. याचा तपशील लॅपटॉपमध्ये आहे. त्यामुळे हा लॅपटॉप त्याने पळवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला दोन दिवसांची कोठडी

$
0
0

औरंगाबाद : मेसमध्ये शिरून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सिडको पोलिसांनी त्याला कात्रज येथून मंगळवारी अटक केली.

संशयित आरोपी विनोद रावसाहेब शिंदे हा तरुण एका मेसमध्ये जेवणासाठी जात होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मेसमध्ये एकट्या असलेल्या २४ वर्षांच्या तरुणीवर दारूच्या नशेत बलात्कार केला होता. यानंतर सातत्याने तिला धमक्या देत त्याने अत्याचार केले; तसेच तिच्या मोबाइलवर अश्लील मेसेज व फोन करून त्रास दिला. या प्रकारला कंटाळलेल्या तरुणीने सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीला कोर्टापुढे हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेलमधील वैद्यकीय सुविधांत वाढ हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल कारागृहाला बुधवारी पोलिस आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पथकासह भेट देत पाहणी केली. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. कारागृह अधिक्षक विनोद शेकदार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्यासह पथकांतील सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये कैद्यांची घाटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी, व्हिडिओ कॉन्फरसिंग; तसेच कैद्यांची सुरक्षितता यासह इतर मुद्यावर चर्चा करण्यात आली. हर्सूल कारागृहातील कैद्यांना तपासणीसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात येते. यावेळी त्यांच्यासोबत जेल कर्मचांऱ्याचा बंदोबस्त देण्यात येतो. तपासणीदरम्यान कैदी पळून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. हर्सूल कारागृहात वैद्यकीय सुविधा आहेत. त्या वाढविल्यास कैद्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये आणावयाची जास्त गरज राहणार नाही. अपवादात्मक गंभीर परिस्थितीमध्ये त्यांना घाटीत हलवता येऊ शकते; तसेच व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या सुविधेबाबत देखील चर्चा करण्यात आली. यावेळी कारागृहातील सुविधांची देखील पाहणी पथकाच्या वतीने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...दुष्काळात महाग होऊन गणराय आले!

$
0
0

सरासरी १० ते २० टक्क्यांनी किमती वाढल्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणराय चैतन्य आणतात. मरगळ दूर करतात. त्यांच्या आगमनाने निराशेचे मळभ दूर होतात. वातावरण प्रफुल्लित होते. अवघ्या २० दिवसांवर त्यांची प्रतिष्ठापना आलीय. मात्र, यंदा दुष्काळातही गणराय सरासरी १० ते २० टक्क्यांनी महाग होऊन आलेत. तरीही सण दणक्यात होईल, असा अंदाज मूर्तीकार वर्तवत आहेत.

औरंगपुरा, जिल्हा परिषद मैदान, गजानन महाराज मंदिर परिसर आणि ‌सेव्हन हिल्स जवळ मूर्तीकारांनी त्यांची दुकाने सजवणे सुरू केले आहे. सेव्हन हिल्स जवळ राजस्थानी मूर्तीकारांचे मूर्ती रंगव‌िण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लहान आकाराची गणेशमूर्ती सुमारे अगदी १० रुपयांपासून ते ५०१ रुपयांपर्यंत, मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती १ हजार ते ३ हजार आणि मोठ्या मूर्ती किमान ५ हजार ते ५० हजारापर्यंत उपलब्ध आहेत. औरंगपुऱ्यातील भाजी मंडई पुढे असणाऱ्या मूर्तीकाऱ्यांच्या कामांना वेग आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्ती अगदी १०० रुपयांपासून ५ हजारापर्यंत उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद मैदानाच्या जवळ व पुंडलिकनगर गजानन महाराज मंदिर परिसरात मूर्तींचे दुकाने सजवणे सुरू झाले आहेत. 'शाडू व पेणच्या मूर्ती तयार आहेत. नावे नोंदवा', असे एसएमएस व व्हॉट्सअॅपद्वारे कळवणे सुरू झाले आहे.

इकोफ्रेंडली मूर्तींना मागणी

इकोफ्रेंडली मूर्तींना मागणी वाढली आहे. दोन लाखांहून अधिक घरगुती लहान मूर्ती विकल्या जातील, असा अंदाज व्यावसायिक व्यक्त करत आहेत. या मूर्तींच्या किमती आवाक्यात असून पर्यावरणाला धोका नाही. याबाबत जनजागृती होत असल्याने या इकोफ्रेंडली मूर्ती घेण्याचा कल वाढला आहे. आकारानुसार १०० ते ७ हजार रुपयांपर्यंत या मूर्तीचे दर आहेत.

मूर्तींच्या किमती आम्ही मागील वर्षानुसारच ठेवल्या. १०१ पासून ५ हजारापर्यंत किमती आहेत. डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे पेणहून मूर्ती आणणे महागात पडत नाही.

- अरविंद पाठक, मूर्ती व्यावसायिक

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमती वाढल्या आहेत. मूर्ती आकारात फरक पडत चालला आहे. मोठ्या मूर्तींना मागणी वाढत चालली आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्यात.

- राजनाथ, मूर्तीकार

मी यंदा २ हजार मूर्ती तयार केल्या. सर्वच इकोफ्रेंडली आहेत. यांचे दर साधारण ३०० पासून सुरू आहेत.

- प्रमोद डवले, मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खटावकरच्या कारनाम्यांची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी निलंबित झालेला सहायक पोलिस निरीक्षक हरीष खटावकर पूर्वीपासून वादग्रस्त आहे', अशी चर्चा आता दबक्या आवाजात पोलिस दलात सुरू आहे.

खटावकर सात वर्षांपूर्वी दहशतवादविरोधी पथकात कार्यरत होता. तेव्हा त्याचे नाशिक रोडवरील ढाब्यावर मारहाणीचे प्रकरण गाजले होते. श्रुती कुलकर्णी या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. सिडको पोलिस ठाण्यात श्रुती कुलकर्णी तक्रार देण्यास गेली असता, तिला सहायक फौजदार हरीष खटावकरने अपमानस्पद वागणूक दिली. 'तुझ्या आईचे वागणे तसेच असेल. त्यामुळे तुझेही असेच वागणे सुरू आहे', अशी अपमानास्पद शेरेबाजी केली. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या श्रुतीने आत्महत्या केली. तिची बहीण श्रध्दाने पोलिस आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर खटावकरची सुरुवातीला मुख्यालयात बदली करण्यात आली. त्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले. २००७ ते २००९ दरम्यान खटावकर दहशतवाद विरोधी पथकात कार्यतर होता. त्यावेळी एका शासकीय कामानिमित्त नाशिकला पथक ‌रवाना झाले. नाशिकहून परतत असताना हॉटेलवर पार्टीदरम्यान काही स्थानिक गावकऱ्यांशी त्याचा वाद झाला. यावेळी गावकऱ्यांनी या पथकाला चोप दिला. तेव्हा खटवाकरची पळता भुई थोडी झाली होती. श्रुती आत्महत्या प्रकरणात निलंबन झाल्यानंतर खटावकरच्या या कारनाम्यांची मोठ्या चवीने पोलिस दलात चर्चा सुरू आहे. खटावकरने अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे श्रुतीचे खच्चीकरण झाले होते. त्याला याप्रकरणी सहआरोपी करायची मागणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीच केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांना पोषण आहारात मिष्टान्न योग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतर्गत दररोजच्या पोषण आहारासह सणाच्या दिवशी मिष्टान्न भोजन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. जिल्हातील सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांना सणाच्या दिवशी मिष्टान्न भोजन दिले जाणार आहे. गुजरातमध्ये असा उपक्रम सुरू आहे.

प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या ४००४ असून सुमारे ६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शालेय पोषण आहारात लोकसहभाग असावा, हे प्रमुख उद्दिष्ट शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी आता गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे वाढदिवस, संस्थांचे सुवर्ण महोत्सव, जन्मशताब्दी, लग्न समारंभ, निरोप समारंभ, सण याप्रसंगांचे निमित्त साधून 'स्नेहभोजन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून 'स्नेहभोजन' हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे नियोजन शाळेमार्फत केले जाणार आहे. लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल. योग्य पोषण मूल्य असलेला आहारही मिळेल, असे अनेक फायदे या उपक्रमामुळे होणार आहेत. लोकसहभागामुळे सरकारचा खर्चही वाचणार आहे. दानशूर व्यक्ती स्नेहभोजन देतील त्यादिवशी पोषण आहाराच्या खर्चात बचत होणार आहे.

हा उपक्रम ऐच्छिक स्वरुपाचा आहे. त्याचे वर्षभराचे नियोजन आवश्यकतेनुसार बदल शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे. मिठाई, जेवण, मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा, फळे, शिजवलेले पदार्थ असा आहार देता येणार आहे. स्नेहभोजन शाळेच्या मध्यान्ह भोजनाच्या वेळेतच आणि शाळेच्या कामकाजावर परिणाम होऊ देता विद्यार्थ्यांना दिले जाईल. या उपक्रमांतर्गत संबंधितांनी शाळेला रोख रक्कम देता खाद्यपदार्थ किंवा इतर आवश्यक वस्तू देणे अपेक्षित आहे. त्यांनी दिलेल्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल. स्नेहभोजनाची तारीख ठरविण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती आणि संबंधित व्यक्ती, संस्था यांनी बैठक घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा व आनंददायी आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.

- भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद.

हा उपक्रम गुजरातच्या 'तिथीभोज' या उपक्रमावर आधारित आहे. त्यामुळे शासनाचा पैसा वाचेल, लोकसहभागही वाढेल, समाजसेवा करतानाही अनेक जण भोजन देण्यासाठी पुढे येतील. लवकरच यासंबंधी सर्क्युलर काढून शाळांना व व्यवस्थापनांना माहिती दिली आहे.

- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयटीत ‘बिग डेटा’ अकादमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डेटा तंत्रज्ञानाचे ज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने एमआयटीने बिग डेटा अकादमीची स्थापन केली आहे. या अकादमीसाठी जगातील नामांकित बिग डेटा कंपन्यांचे शैक्षणिक सहकार्य मिळाले आहे.

बिग डेटा क्षेत्रात विविध तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यात ओपन सोर्स (मुक्त प्रणाली) असलेल्या हडुप तंत्रज्ञान जगात अग्रेसर आहे. हडुप प्रकल्प निर्मिती सर्वप्रथम 'याहू'सर्च इंजिन कंपनीने केली होती. इंटरनेट, क्लाउड कम्प्युटिंगनंतर बिग डेटा तंत्रज्ञान व्यावसायिक जगाचा कायापालट करेल, असे सर्व्हेक्षणातूनही समोर आले आहे. यामुळे अशा प्रकारची बिग डेटा अकादमी कॉलेजमध्ये स्थापन करण्यात आली. अकादमीत विद्यार्थ्यांना बिग डेटा तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकासहित सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमआयटी समूहाचे महासंचालक प्रा. मुनीष शर्मा यांच्या हस्ते अकादमीला सुरुवात झाली.

नवीन तंत्रज्ञान समजणे ही पहिली पायरी आहे. समजलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरात आणले पाहिजे. ते नोकरीच्या स्वरुपात असेल किंवा व्यवसायाच्या रुपात असू शकते, असे प्रा. शर्मा म्हणाले. अकादमीचे समन्वयक प्रा. बी. एन. क्षीरसागर यांचीही यावेळी उपस्थिती होती. सायली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. सुरेश भवर यांनी आभार मानले. प्रा. प्रशांत बंड यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images