Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महागडे मोबाइल, गाड्या वापरता; मग शुल्कमाफी का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दहा हजारांचे मोबाइल, महागड्या गाड्या वापरता, मग तुम्हाला शुल्कमाफी हवी कशाला, २० एकर बागायती जमिनीवाले असणारेही शुल्कमाफी मागत आहेत,' अशी मुक्ताफळे शुल्कमाफीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी उधळली. विविध कॉलेजांच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना सडेतोड उत्तर देत, त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.

सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षाशुल्क शासनाने माफ केले, परंतु त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. याच मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराओ घालत निवेदन सादर केले. परीक्षा शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, शैक्षणिक शुल्कमाफ करावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांना उत्तर देताना कुलगुरूंनी शुल्कमाफ करण्यास असर्थतता दर्शविली. ते म्हणाले,'मुलं दहा हजाराच मोबाइल वापरतात, महागड्या गाड्या आहेत आणि फी माफी मागतात. वीस एकर बागायती आहे आणि शुल्कमाफी मागता.'

कुलगुरूंच्या या वक्तव्यांचा विद्यार्थ्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. मराठवाड्यात पाणीच नाही तर, बागायती जमीन येणार कोठून? सगळ्यांना एका तराजूत कशाला मोजता, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. 'तुमच्या प्राचार्यांना विचारून तुम्ही आला का? त्यांना बोलवा,' असे कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना म्हणाले. त्यानंतर विद्यार्थांनी कुलगुरूंच्या निषेधाच्या घोषणा देत विद्यापीठ दणाणून सोडले.

प्राचार्यांना पत्र लिहणार
विद्यार्थ्यांचा संताप पाहता कुलगुरूंनी सारवासारव केली. सगळ्या प्राचार्यांना लिहून दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाईल व त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जातील. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही हा प्रश्न ठेवला जाईल असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले.

मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे. अशावेळी कुलगुरूंचे हे वक्तव्य असंवेदनशीलता दर्शविणारे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्कमाफीसाठी वेगळी तरतूद करून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला. शासनाने परीक्षा शुल्कमाफी केली, परंतु विद्यापीठ प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात आले. त्याची दखल घेण्यापेक्षा तेच असे विधाने करतायेत हे योग्य नाही.
- संग्राम कोते पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांना सहावा वेतन आयोग

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील विनाआनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे शपथपत्र राज्याचे मुख्य सचिवांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केले आहे. राज्यातील ३ लाख शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

शहरातील महाराष्ट्र पब्लिक आणि स्वामी विवेकानंद या शाळेतील शिक्षकांनी केंद्रीय कायद्यातील तरतुदीनुसार एकसमान वेतन मिळण्याची विनंती केली आहे. न्या. संभाजी शिंदे आणि न्या. पी. आर. बोरा यांनी सचिवांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र दाखल केले असून, यात एकसमान सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य केली आहे. याशिवाय विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी विविध कायदे व नियमात बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, साधारण सहा महिन्यांत ती पूर्ण केली जाईल, असे शपथपत्रात म्हटले आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या शिक्षण संस्थांना विनाअनुदानित व कायम विनाअनुदान तत्त्वावर शाळा, जुनिअर कॉलेज चालविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यात विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये सुरू आहेत. अशा महाविद्यालयात कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३ लाख आहे. त्यांना वेतन व अनुषंगिक आर्थिक लाभ देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे, मात्र राज्यातील बहुसंख्या विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतरांकडून विनावेतन काम करून घेतले जाते.

अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन अदा केले जाते, मात्र विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना एक समान काम करूनही सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जात नाही.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकसमान वेतन मिळावे, अशी तरतुद बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायदा २००९मध्ये असूनही शासन निर्णय निर्गमित करून केवळ अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तरांना सहावा वेतन आयोग लागू आहे.

याप्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. या कार्यकाळात राज्य शासनाला शपथपत्रानुसार कार्यवाही करून कार्यपूर्ती अहवाल कोर्टात द्यावा लागणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे बी. एल. सगर-किल्लारीकर व केदार अनमोले यांनी बाजू मांडली.

तीन लाख कर्मचाऱ्यांना लाभ
या प्रकरणात शपथपत्र सादर करण्यात आले असून, यामुळे राज्यातील जवळपास २९०० विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांतील ३ लाख कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार वेतन, इतर अनुषंगित फायदे मिळणार हे आता निश्चित झालेले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवीदास जयंतीनिमित्त उत्साहात मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'जोर से बोलो जय रवीदास', 'रवीदास महाराज की जय', अशा जयघोषात संत शिरोमणी गुरू रवीदास यांच्या जयंतीनिमित्त मिरवमूक काढण्यात ढोल ताशांच्या गजरात क्रांतिचौकातून निघालेल्या मिरवणुकीत सजीव देखावा, फुलांनी सजविलेल्या रथातील गुरू रवीदास यांची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती.

संत शिरोमणी गुरू रवीदास यांच्या ६३९व्या जयंतीनिमित्त सोमवारी केंद्रीय जयंती उत्सव समितीने मोठी मिरवणूक काढली. क्रांतिचौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी समिती अध्यक्ष डॉ. गोपालसिंह बच्छिरे, भरत बरथुने, लक्ष्मण रेसवाल, राजन शिंदे, आर. आर. धस, सुरेश गवळे, माजी नगरसेवक संजय रिडलॉन यांच्यासह अन्य उपस्थित होते. गुरू रविदासांच्या दोह्यांचे स्मरणही यावेळी करण्यात आले. आकर्षक रथामध्ये संत शिरोमणी रवीदार यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ही मिरवणूक पैठण गेट, गुलमंडीमार्गे औरंगपुरा येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणूकीत शहरातील पदमपुरा, टिव्ही सेंटर, रामनगर या भागातून विविध वाहने सजवून मिरवणूकीत सहभागी करण्यात आले आहे. यावेळी सुरेश गवळे, शिवलाल अक्षेय, मोहनलाल गोरमे यांच्यासह अन्य मान्यवरांची यांची उपस्थित होती.

सजीव देखावा
क्रांतिचौकातून निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी संत शिरोमणी रवीदास यांचा सजीव देखावा दाखविण्यात आला होता. या सजीव देखाव्यात विविध राज्यांच्या राजांनी १५ राजांनी संत शिरोमणी गुरू रवीदास यांच्याकडून दीक्षा घेतली होती. त्याचा देखावा मिरवणूक सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा चौकशी अहवाल मार्चमध्ये

$
0
0

म. टा .विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. या समितीचा अहवाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाणार असल्याची माहिती औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सोमवारी दिली. या याचिकेची सुनावणी ३ मार्चपासून रोज होणार आहे.

समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात तीन याचिका करण्यात आल्या आहेत. सोमवारी या याचिकांवर सुनावणी झाली. खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समितीतर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करून योजनेचे स्वरूप, समांतरचा करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे.

सोमवारी या याचिकेची सुनावणी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांच्यासमोर झाली. औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत राज्य शासनाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात होते. या प्रकरणात राज्य शासनाने आजपर्यंत शपथपत्र दाखल केले नाही. यासंदर्भात गिरासे यांनी कोर्टाला माहिती दिली. विधिमंडळ अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समांतरची चौकशी करण्यासाठी समितीची घोषणा केली होती. याची चौकशी संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती करणार आहे. या समितीचा अहवाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. त्यानंतरच राज्य शासन शपथपत्र दाखल केले जाऊ शकतो, असे गिरासे यांनी कोर्टाला सांगितले. सोमवारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे जेष्ठ वकील विजय थोरात यांनी बाजू मांडली. दिवाण यांच्यातर्फे उदय बोपशेट्टी, राजेंद्र दाते पाटील यांच्यातर्फे अनिल गोळेगावकर, विजय शिरसाट यांचे वकील प्रदीप देशमुख, पालिकेतर्फे नंदकुमार खंदारे आणि राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरसिंग गिरासे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूमंत्र : अक्षरांवर ‘इलाज’ करणारे सर

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना लहानपणापासूनच हस्ताक्षराचे महत्त्व समजावून सांगितले जाते. पहिली ते चौ‌थीच्या वर्गामध्ये केवळ रेषांचा सराव करून घेतला जातो. पाचवी ते आठवी या वर्गातील ४५ विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर काढण्याचे धडे दिले जातात.

विद्यार्थी सुरुवातीला चांगले अक्षर काढताना आळस करत होते. शाळेत जून २०१३पासून सुंदर हस्ताक्षर उपक्रम सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये मोठा बदल होण्यास सुरुवात झाली असल्याचे सचिन वालतुरे सांगतात. जसा रुग्णावर इलाज करतात, त्या पद्धतीने अक्षरावर इलाज करणाऱ्या या शिक्षकाने सुंदर हस्ताक्षरासाठी मूलभूत माहिती असलेली एक पुस्तिका तयार करून दिली आहे. सुंदर हस्ताक्षर म्हणजे काय, त्याचे महत्त्व किती, असे पुस्तकात साध्या व सोप्या पद्धतीत सांगितले आहे. त्यामुळे कमी कालावधीत विद्यार्थ्यांत सुंदर अक्षर काढण्याची गोडी निर्माण झाली. प्रत्येक वर्गात अर्धा तास सुंदर अक्षर काढण्याचा सराव करून घेतला जातो. रेषा, आकार यांच्या सरावाने अक्षर सुबक होते. शिक्षक फळ्यावर सुविचाराचे लेखन करतात व विद्यार्थी ८ ते १० वेळा तो सुविचार सुंदर हस्ताक्षरात लिहितात. सुंदर हस्ताक्षर असलेल्या विद्यार्थ्याला गटप्रमुख म्हणून नेमले जाते. गटप्रमुख इतरांच्या चुकांची दुरुस्ती करतो. त्याचबरोबर गटप्रमुख चांगल्या अक्षरासाठी मार्गदर्शन करते. प्रत्येक वर्गामध्ये हजेरी क्रमांकाप्रमाणे दररोज एक विद्यार्थी सुविचार, दिनविशेष, बातम्यांचे फलकावर लेखन करतो. शुद्धलेखनासाठी पानभर लिखाण केले जाते. त्यातून चुका काढल्या जातात, मात्र शाळेने पानभर शुद्धलेखनाचे लिहिण्याची संकल्पनाच मोडीत काढली. पाठाच्या कोणत्याही दोनच ओळी अशा लिहा, पण त्या वाचाव्या वाटतील, अशा लिहा, अशा सूचना वारंवार देऊन या मुलांमध्ये अक्षरांबद्दल गोडी निर्माण करण्यात आली. पत्रलेखन कसे करावे, हे प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून शिकविले जाते. शिक्षकदिन, नवीन वर्षाभिनंतर, पक्षी वाचवा अभियान, दिवाळी शुभेच्छा या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रे मान्यवरांना पाठवली जातात. अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या पत्राला उत्तरेही पाठवली आहेत.

सुंदर अक्षराची शाळा म्हणून जिल्हा परिषदेची ही शाळा नावारुपाला येत असून, विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर हे परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर झालेले पाहून पालकांचाही शाळेबद्दल विश्वास वाढला. गावकरी मंडळींनी शाळेला आर्थिक मदत देणे सुरू केले व शाळेचे रूपच पालटून गेले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए. व्ही. शुक्ला, इतर शिक्षकांच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर झाले आहे, असे सचिन वालतुरे सांगतात.

गोंधळ झाला कमी...
सुट्टीच्या काळात शाळेत दिसणारे गोंधळाचे चित्र आता बदलले आहे. विद्यार्थ्यां जुन्या वह्यांच्या शिल्लक पानांवर, फळ्यावर काहीतरी लिहित बसलेले असतात. सुंदर हस्ताक्षराची गोडी निर्माण झालेले विद्यार्थी शाळेच्या वऱ्हांड्यात, झाडाखाली, मंदिराच्या ओट्यावर सरळ, आडव्या रेषा मारत बसलेले असतात.

गृहपाठाची अनोखी सिस्टिम
वालतुरे सरांनी शाळेत गृहपाठाच्या वह्यांऐवजी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक फोल्डर फाइल दिली. त्यामुळे एकाच कागदावर गृहपाठ करून त्यांचा संग्रह केला जातो. त्यामुळे वह्यांचे ओझेही कमी झाले. त्यातून प्रत्येक वर्षी होणारा किमान २०० रुपये खर्चही वाचला. एकदा खरेदी केलेली फाइल किमान ५ वर्षे ‌सहज टिकते. यामुळे वारंवार होणार खर्चही टाळता आला. आपली फाइल वर्गात सर्वात सुंदर असावती म्हणून विद्यार्थी आता काळजीपूर्वक लिखाण करू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीत मालमत्ता कर वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी परिषदेने यंदा मालमत्ता करात सुमारे ३० टक्के कर वाढण्याचा घाट घातला आहे. याची अंमलबजावणी अजून झाली असून, या निर्णयवार आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्यांचाच कालावधी दिला आहे. दरम्यान, ही वाढ नगर पालिकेच्या धर्तीवर करण्यात आली असल्याची माहिती छावणी परिषदेच्या सीईओ पूजा पलिचा यांनी दिली.

पलिचा म्हणाल्या, 'यंदा ही वाढ करण्यात येणार असून, याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यावी लागणार आहे. छावणी परिषदेने मालमत्ता करात ३० टक्के वाढ फक्त सुचविली आहे. अजून त्याला मंजुरी दिली गेलेली नाही. या वाढीसंबंधी रहिवाशांना नोटीस दिल्या गेल्या आहेत. आक्षेप, हरकती मागवण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला आहे.'

अचानक करवाढीबाबत छावणी नागरिकांमध्ये संमिश्र प‌तिसाद आहे. हा विषय येत्या २९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत गाजणार असल्याचे मानले जाते. दरम्यान, छावणी परिषदने गेल्या अनेक वर्षांत मालमत्ता करात दरवाढ केली नव्हती. विशेष म्हणजे २००२नंतर मालमत्ता करात वाढ केली होती. छावणी विकास परिषदेचे अध्यक्ष मयंक पांडे यांनी याबाबत म्हणाले, 'परिषदेने नागरिकांकडून आक्षेप, हरकती मागविल्या आहेत. वॉर्डात पाणी, रस्त्यांची समस्या असल्यामुळे याला विरोध होईल. छावणी परिषद मूलभूत सुविधा देण्यासाठी अपशयी ठरली आहे. नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यात येत्या आठ-दहा दिवसांत यावर अधिक चर्चा होईल आणि नंतर छावणीकडे यासंदर्भात छावणीतील नागरिक निवेदनही देण्याची शक्यात आहे.'

दरम्यान छावणीने ही मालमत्ता करवाढ आजुबाजुच्या नगर पालिकांकडे पाहून केला आहे. याशिवाय १४-१५ वर्षांत करवाढही झालेली नाही यामुळे दरवाढ करणे आवश्यक आहे, असे पलिचा यांनी स्पष्ट केले. २९ फेब्र‌ुवारीला सर्वसामान्यांना दिलासा मिळतो की दरवाढीला सामोरे जावे लागते हे सर्वसाधारण सभाच ठरवेल.

सात हजारांपर्यंत कर
सध्या छावणी परिषदेतर्फे ५०० रुपयांपासून सात हजार रुपयांपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. मालमत्ता करातून छावणीला सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळते. छावणीला पथकरातून रोज चार लाख रुपये मिळत होते. हे उत्पन्न एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे मालमत्ता करात वाढ करण्यात येत असल्याचे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण खनिज वाहतुकीला एसडीएम जबाबदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळू, दगड, मुरूमाचा बेकायदा उपसा आणि चोरटी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तेथील संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर तेथील बीट जमादार, तलाठी व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा गौण खनिज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळामुळे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वाळूचे लिलाव झाले नाहीत, तरीही शहरात सर्रास वाळू साठेबाजी आणि वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात खदानींतून दगडाचा उपसा करण्यासाठी परवाना देण्यात आला नाही, तरीही दगड, खडीची वाहतूक करण्यात येते. शासनाच्या आदेशानुसार गौण खनिजांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीची सोमवारी बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

वाळू आणि दगडाचे बेकायदा उत्खनन करून त्याची चोरटी वाहतुक सुरू असून, आम्हाला पोलिस, आरटीओ आणि महसूल कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले अाहे. यासंदर्भात तक्रारी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. अवैध वाळूची व दगडाची चोरी पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्यासाठी जेथून चोरी होत असेल, तेथील अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. यासंदर्भात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात याव्यात, असेही बैठकीत ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिजन डॉक्युमेंट लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य महिला आयोगाकडे ५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी प्रलंबित आहेत. हे आव्हान खूप मोठे असले तरी तळागाळातल्या कार्यकर्तीच्या, प्रत्येक महिलेच्या मदतीने आयोगाला सक्षम व कार्यान्वित करणार अाहे. आयोगाचे व्हिजन डॉक्युमेंट लवकरच येणार असल्याचे भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.

भाजप महिला आघाडीने सोमवारी विजया रहाटकर यांचा सत्कार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष व नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत, पालिका स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी रहाटकर यांनी, वार्डाची अध्यक्ष ते भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास सोपा नसला तरी एका सामान्य कार्यकर्त्याला भाजपमध्येच न्याय मिळतो, अशा शब्दांमध्ये संवादास सुरुवात केली. राजकारण की, प्रशासकीय सेवा, त्यातून यात मी राजकारण निवडले ते महिलांना मिळणऱ्या ३३ टक्के आरक्षणामुळे. निर्णयप्रकियेत महिलांना मिळालेली संधी योग्य वाटली. अनेकदा विरोध झाला, टीका झाली तरी, मी त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न केला. कारण राजकारणात आजचा विरोध कधीच कायमच नसतो. मिळालेली प्रत्येक संधी ही पक्षाची जबाबदारी समजून काम केले, असे त्यांनी सांगितले.

आयोगाची अध्यक्ष म्हणून सामान्य महिलेपर्यंत आयोग कसा पोचेल व राजकारणातील सामान्य कार्यकर्तीही कशी आयोगाची दिशादर्शक बनेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पोलिस व सामाजिक संघटना यांच्यात समन्वय साधून आयोगाला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही रहाटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फ्यूजन’ची जादू न्यारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय व पाश्चात्य संगीताचा मिलाफ असलेला 'फ्यूजन' प्रकार पाहताना रसिकांनी ठेका धरला. सतारवादक चिराग कट्टी आणि सहकाऱ्यांच्या वादनाचे नादमाधुर्य कलाग्राम ऋतुरंग महोत्सवाची रंगत वाढवणारे ठरले. या महोत्सवात सोमवारी सायंकाळी फ्यूजन व लोकनृत्य सादर झाले.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कलाग्राम ऋतुरंग महोत्सवाचा तिसरा दिवस फ्यजूनने अविस्मरणीय केला. चिराग कट्टी व सहकाऱ्यांनी 'वॉर्मअप' पीसद्वारे सादरीकरणास सुरूवात केली. हळूवार गीतांची धून व सांघिक ठेका श्रवणीय ठरला. त्यानंतर 'राग खमाज'मधील संगीत रचना सादर करण्यात आली. सर्व वादकांची एकरूपता दाखवणारे 'शिवतांडव' उत्तम रंगले. 'कमिटमेंट फॉर इव्हर' हा प्रकार 'राग चारूकेशी'त सादर करून रसिकांनी दाद मिळवली. तबला, सतार, ड्रम्स, सिंथेसायझर व गिटार वाद्यांद्वारे कट्टी यांनी संगीतविश्व उभे केले. यानंतर रसिकांनी लोकनृत्याची बहारदार पर्वणी अनुभवली. छत्तीसगढचे पंथी, काकसार लयबद्ध नृत्य लक्षवेधी होते. महाराष्ट्राचे सोंगी, बाला नृत्य व मध्य प्रदेशच्या भगुरिया नृत्याला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज समारोप
ऋतुरंग महोत्सव पाहण्यासाठी विदेशी शिष्टमंडळ दाखल झाले आहे. या महोत्सवाचा मंगळवारी कलाग्राममध्ये सायंकाळी समारोप होणार आहे. केतकी नेवपूरकर यांचे शास्त्रीय नृत्य, अश्विनी भिडे - चापेकर यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निधी असलेली कामे वेळेत पूर्ण करावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून मिळवलेला निधी परत जाऊ देऊ नका. निधी उपलब्ध असलेली कामे वेळेत पूर्ण करा व जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा करा, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी केली. जिल्ह्यातील रस्ते व बांधकामाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खैरे यांनी बांधकाम भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व एमएसआरडीसीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रस्त्यांचा व घाटी रुग्णालयाच्या कामांचा आढावा घेतला. केंब्रिज ते महावीर चौक या राष्ट्रीय महामार्गाचे महापालिका हद्दीतील रस्त्यांचे भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे, सोबतच औरंगाबाद-पैठण, अजिंठा औरंगाबाद रस्त्यासाठीच्या जमिनीचे संपादन त्यांनीच करावे, असे निर्देश खैरेंनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग २११ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत कामात येणाऱ्या अडचणीला सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले. कन्नड, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील अत्यंत वाईट अवस्था असलेल्या रस्त्यांच्या कामांना दुरुस्तीची कामे नव्याने प्रस्तावित करण्याचेही निर्देश खासदार खैरे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेत पास व्हायचे तर २ हजार द्या !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तुला परीक्षेत कॉपी करायची असेल तर, दोन हजार रूपये दे, केंद्रप्रमुखांना द्यायचे आहेत, अशी मागणी कॉलेजमधील शिक्षकांकडून होते आहे,' असे खळबळजनक पत्र जालना जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने थेट मंडळ अध्यक्षांना पाठविले आहे. या पत्रामुळे कॉपीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. शिक्षण मंडळ यावर काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. बारावी परीक्षेत इंग्रजीच्या पेपरला ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त अभियान फेल ठरल्याचे समोर आले. यानंतर आता एका विद्यार्थिनीच्या पत्राने खळबळ उडाली आहे. भोकरदन तालुक्यातील विद्यार्थिनीने मंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठवित कॉपीसाठी कॉलेजचे शिक्षण पैसे मागत असल्याचे आरोप तिने केला आहे. माझी घरची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी मला कॉलेजमधील शिक्षकांकडून दोन हजार रुपयांची मागणी होते आहे.

कॉपीसाठी केंद्रप्रमुखांना हे पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे हे पैसे दे नाही तर तुला नापास केले जाईल, भरारी पथकाकडून कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली जात असल्याचे तीने तक्रारपत्रात म्हटले आहे. यासह बिडकीन जवळील एका ग्रामीण परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचे पत्रही नागरिकाने पाठविले आहे. त्यामुळे मंडळात खळबळ उडाली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

विद्यार्थिनीच्या पत्रानंतर मंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थिनीला परीक्षेत अडचणी येऊ नये, याची दखल घेऊन सत्यता पडताळावी, अशी सूचना मंडळाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॉपीशिवाय पास होऊ शकते

पैशासाठी भरारी पथकाकडून पकडण्याची धमकी दिली जात असल्याचे विद्यार्थिनीने पत्रात म्हटले आहे. 'आम्ही कॉपीशिवाय पास होऊ शकतो,' असा विश्वासही विद्यार्थिनीने पत्रात व्यक्त केला आहे. परीक्षा संपण्यापूर्वी आपल्या मदतीची अपेक्षा आहे, असेही तिने पत्रात शेवटी म्हटले आहे. हे पत्र हिंदीतून लिहिलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे लग्न न करण्याचा संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

दुष्काळी स्थितीमुळे सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजाला आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकट ओढावल्याने आई-वडीलांना यावर्षी तर लग्नाचे संकट नको या भावनेतून गेवराई तालुक्यातील वारूळ तांड्यावरील बंजारा समाजाच्या २५ मुलींनी यावर्षी लग्न न करण्याचा निर्धार केला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे घरातील वृद्ध सदस्यांचे आजारपण, पोराबाळांची शिक्षण आणि वयात आलेल्या मुलीची लग्न कशी करायची हा मोठा प्रश्न दुष्काळान मांडून ठेवला आहे. ज्या वयात लग्नाची गाठ जोडायची त्या वयात आई वडिलांकडे लग्नाला लागणाऱ्या खर्चाही तरतूद नाही. त्यामुळे या मुलींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

वडिलांनी लग्नाची चिंता मनात ठेवून टोकाचा निर्णय घेऊ नये याच भावनेतून गेवराई तालुक्यातील वारूळ तांड्यावरच्या बंजारा समाजाच्या मुलीचा निर्धार केला आहे. गावातील एका मुलीचे लग्न पैशाअभावी होऊ शकले नाही त्यामुळे गावातील लग्नाच्या वयात आलेल्या सर्वच मुलीनी यंदा लग्न न करता तो पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गावांमध्ये फक्त ज्येष्ठ नागरीकच

तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील निम्म्याहून अधिक घरांना कुलूप आहे. काही लोक ऊसतोडणीला गेली आहेत, तर बरेच जण कामा धंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरीत झाली आहेत. या घरांनी आता फक्त मुली आणि म्हातारी माणसे आहेत. आधीच खायचे आबाळ आणि त्यातच पुन्हा लग्नाला येणारा अवाढव्य खर्च करायचा कुठून या प्रश्नांने त्या व्यतीत झाल्या आहेत. या मुलींनी आई-वडीलांच्या डोक्यावरचे ओझं काही काळासाठी तरी बाजूला सारण्याचा निर्णय घेतला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहजीवन सोसायटीत सापडले कासव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
बजाजनगरमधील एका घरात मंगळवारी दुपारी कासव सापडले. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हे कासव पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
बजाजनगर येथील सहजीवन सोसायटीत सविता संजय लेंडाळ या भाडेकरू आहेत. त्या मंगळवार दुपारी दळण व घरघुती काम आटोपून खाटेवर आराम करत होत्या. त्यावेळी त्यांना टेबलाखालून खट खट आवाज आला. हा आवाज कशाचा आहे, हे पाण्यासाठी त्यांनी पाहिले असता तेथे कासव असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी रामेश्वर भगस आणि नवनाथ भगस धावत आले. त्यांनीही कासव असल्याचे पाहिले. ही माहिती त्यांनी तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत पाटील शेळके आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल भगवान जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घरात कासव निघल्याची वार्ता पसरल्याने अनेक महिलांनी त्याची पूजा केली. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी कासवाला पकडले व वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समतेसाठी सर्वांनी एकत्र यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
'देशातील पीडित कष्टकरी समाजाला दोन वेळेचे अन्न मिळेल, सर्व प्रभुची लेकरे संबोधली जातील, तेव्हा जगात समानता प्रस्तापित होईल, असा संदेश संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांनी दिला. त्यांना अभिप्रेत समजा निर्मितीसाठी एकत्र यावे,' असे प्रतिपादन संत रोहिदास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गजानन नांदूरकर यांनी केले.
बजाजनगर येथील संत रोहिदास महाराज जयंती महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. राजन शिंदे हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, सुरेश गवळे, अग्निशमन विभागप्रमुख प्रविण घोलप, जयश्री घाडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक दिनकर वाघमारे, एम. डी. सोनवणे आदींची उपस्थिती होती. रांगोळी स्पर्धेत मंगल विठ्ठल सातपुते (प्रथम), सुवर्ण मोरे (द्वितीय), रेखा नांदूरकर (तृतीय), संगीत खुर्ची स्पर्धा महिला गट - उषा माटे (प्रथम), मंगल वाघमारे (द्वितीय) मुले- विनय उसरे (प्रथम), अदित्य गुलाब चव्हाण (द्वितीय), ऋतुजा अंबाळकर (तृतीय) यांनी यश मिळवले. त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. शीला व दिनकर वाघमारे या दाम्पत्यांकडून देण्यात आलेल्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. उत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र आंबेकर, सविता अंबेकर, मनीषा उसरे, किरण वझळे, पुष्पा इंगळे, मधुकर पानझडे, पंकज खंदारे, उत्तम वझळे, प्रल्हाद माने, सदाशिव वाघमारे, संजय अंगळे, मिलिंद माठे, कांतीलाल पाठे, पद्माकर मोरे, शहाजी गवळी, अशोक गणगे, साहेबराव कांबळे, हनुमंत कदम, श्रीकृष्ण अंबाळकर, रामेश्वर शेगोकार, नागोराव वाघमारे, प्रा. गोविद ढगे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उत्तम वझळे यांनी केले तर, जितेंद्र अंबेकर आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरमध्ये रस्ता रुंदीकरणाला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या गंगापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. रस्त्यावरील दुभाजक व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाल्याने केवळ या रस्त्याचा नव्हे तर संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. या रस्त्याच्या कामानंतर शहरातील गजबजलेल्या येवला रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी शहरातील गंगापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. आंबेडकर पुतळ्यापासून जवळपास सातशे मीटर रस्त्याचे काम करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामात महावितरण कंपनीच्या डीपी व विद्युत खांबांचा अडथळा असल्याने व बांधकाम विभागाकडे खांबांचे स्थलांतर करण्यासाठी तीस लाख रुपयांची तरतूद नसल्याने हे काम रखडले होते. अखेर विद्युत खांब व डीपी न काढताच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्याचे शंभर फूट रुंदीकरण करण्यात येऊन त्यावर दुभाजक टाकण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीला प्रशस्त झाला आहे. येत्या काही दिवसात रस्त्याचे काम पुर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, शहरातील स्टेशन रस्त्यावरील दोन किलोमिटर भागातील अतिक्रमणे पाडून सार्वजनिक बांधकाम विभागाने २००८ मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्यानंतर गंगापूर रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात आल्याने दोन मुख्य रस्ते रुंद झाले आहेत. परंतु, पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या येवला रस्त्याचे काम मंजुरीअभावी रखडले आहे. या रस्त्यावरुन नाशिक, मुंबई व अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. लाडगाव टी पॉइंटवर नेहमीत वाहनांची कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा येतो. तसेच छोट्या-मोठ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवलेला येवला रस्ता रुंदीकरणाचा पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला नसल्याची माहिती आहे. बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे प्रस्ताव शासनाकडे जात असले तरी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे या रस्त्याचा विकास खुंटल्याची येथील नागरिकांचे मत आहे. या रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नगरपालिकेचा करवाढ टाळून ३० लाख रुपयांची शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी सादर केला आहे. रस्ते व नाल्यांवरील विकासकामाचा निधी वळता करून शहराची तहान दररोज भागवणार असल्याचे या अर्थसंकल्पात म्हटले आहे.
नगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे पुतळे उभारण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.चालू आर्थिक वर्षाचा ३० कोटी ६१ लाख ६९ हजार ६९९ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्याधिकारी संतोष आगळे, उपनगराध्यक्ष साहेबाँ पठाण, नगरसेवक वाल्मिक लोखंडे, विक्रम पाटे, सुनील पवार, शिवकुमार जैस्वाल, युवराज बनकर, उपासना शर्मा, शहेनाजबी सालार, अनिता कवडे, इफ्तेकार शेख, स्वाती कोल्हे, ज्योती बिरारे, राजू पवार, शिवकुमार जैस्वाल, बिजलाबाई जाधव, नफीसा बेगम, शेख हसीना बेगम, अहमद अली आदी नगरसेवकांची उपस्थिती होती.
कचरा उचलण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे, ओला व सुका कचऱ्यांचे घरांतून संकलन करणे, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व बेघरांसाठी राजीव गांधी आवास योजना राबवणे ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. घरे बांधण्यासाठी भूसंपादनासाठी १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कन्नड शहराचा काही भाग पाणंदमुक्त करण्यासाठी ८० लाख व नगरपालिका निवडणुकीसाठी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. करांची संपूर्ण वसुली झाल्यास ३० लाख रुपये शिल्लक राहतील, असे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले. पाणीपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण करून शहरास दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करणे हे उद्दिष्ट असल्याचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसान भरपाई देण्याचे महिकोला आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
कापूस बियाणांची उगवण न झाल्याच्या प्रकरणात कृषी विभागाने महिको कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. कृषी संचालक जयंत देशमुख यांच्या आदेशात गणोरी येथील १३ शेतकऱ्यांना एक महिन्यात एक लाख ४२ हजार ५४१ रुपये अदा करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी विभागाकडून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याबद्दल 'म.टा.' ने पाठपुरावा केला होता.
तालुक्यातील गणोरी येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यात महिको कंपनीने बाहुबली ७९१८ हे कापसाचे बियाणे पेरले. या बीटी बियाणांतून नॉन बीटी कापसाची झाडे उगवल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या बाबत शेतकऱ्यांनी दुकान मालकामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलंब्रीचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे महिको कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही तक्रा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्यानंतर पुणे येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभाग व जिल्हास्तरीय गुणवत्ता पथकाने प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. या पाहणीत नॉन बीटी झाडे असल्याचे आढळून आले. या पथकाने नॉन बीटी झाडांचे नमुने सोबत नेले. त्याला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने 'म.टा.'ने पाठपुरावा केला. या बाबतचे वृत्त १९ जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कंपनीला नोटीस बजावून सुनावणी घेतली. सुनावणीअंती कृषी संचालक जयंत देशमुख यांनी १३ शेतकऱ्यांना तीस दिवसांत एक लाख ४२ हजार ५४१ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम एका महिन्यात न दिल्यास २४ टक्के दराने व्याज आकारणी करावी, असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅम्बुलन्स न आल्याने जखमी पाऊण तास पडून

$
0
0

खुलताबाद-औरंगाबादकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारने (एम एच १८, ए टी ०३९७) धडक दिल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता कोहिनूर कॉलेजसमोर झाला. जोराची धडक बसूनही हेल्मेट घातल्याने ग्रामसेवक बी. एम. पाटील यांचे प्राण वाचले. १०८ क्रमांकावर कळवूनही अॅम्बुलन्स न मिळाल्याने जखमी पाटील हे घटनास्थळी पाऊण तास पडून होते.
ग्रामसेवक पाटील मोटारसायकलवरून (एम एच २० सी के ८००४) औरंगाबादकडे जात होते. कारने धडक दिल्यानंतर ते कारच्या समोरच्या काचेवर आदळले. अपघातात काच फुटून डोक्यावरील हेल्मेटमुळे त्यांचे रक्षण झाले. अपघातानंतर १०८ क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स मागवण्यात आली. मात्र एक अॅम्बुलन्स म्हैसमाळ यात्रेत व दुसरी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेची वाट पाहत सुमारे एक तास जखमी जागेवरच होते. अखेर कल्याण भदलगे यांनी कारमधून पाटील यांना उपचारासाठी औरंगाबादला नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायरान जमिनीसाठी वैजापुरात उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील मनूर शिवारातील गायरान जमिनीबद्दल ग्रामसभेत ठराव घ्यावा व एक ई वर नोंद घेण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियातर्फे सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
मनूर शिवारातील गट क्रमांक १९२ व १९३ मधील जमिनीवर १९७८ पासून अतिक्रमण करण्यात आले असून मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला आहे. परंतु, गावातील काही मंडळी जातीवादाच्या मानसिकतेतून ही जमीन कसण्यास गायरानधारकांना त्रास देत आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी एक ई ला नोंद घेतली नसून ग्रामसभेचा ठराव मिळण्यासही अडचण येत आहे. नवीन जीआर नुसार या जमिनीबाबत ग्रामसभेचा ठराव व एक ई उताऱ्यावर त्वरित नोंद घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जे. के. जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश गायकवाड, साहेबराव पडवळ, बाळासाहेब त्रिभुवन, प्रवीण गायकवाड, सुनीता लाड, आसराबाई चव्हाण, इंदुबाई चव्हाण, शकुंतलाबाई चव्हाण, लक्ष्मीबाई अभंग आदींनी उपोषणात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी संघर्षाची हा वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
'असंघटीत असल्याने शेतकरी नेहमी संकटात असतो. शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार सोडून शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी व सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संघटीत होवून संघर्ष करण्याची वेळ आली आहे,' असे प्रतिपादन किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे यांनी केले.
पैठण येथे आयोजित किसान सभेच्या अधिवेशनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य सचिव किसन गुजर हे प्रमुख पाहुणे होते. पुढे बोलताना डॉ ढवळे म्हणाले, सध्या शिवाजी महाराजांचा राज्य चालवण्याचा आदर्श समोर ठेवून राज्य चालवण्याची गरज आहे. किसान सभा यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आसमानी संकट नसून ते सुलतानी संकट आहे. या संकटाच्या काळात किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन डॉ. ढवळे यांनी केले. डॉ. गणेश शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात किसान सभेची कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष रामेश्वर मोरे, सचिव सचिन पांडव, कार्याध्यक्ष भाऊसाहेब झिरपे, सदस्य गणेश शिंदे, रामेश्वर म्हस्के, आर. के. वाघचौरे, एन. बी. बांगर, दीपक गिरी यांची निवड झाली आहे. या अधिवेशनात दुष्काळ रोजगार हमी योजना विद्यार्थ्यांची शुल्क माफी आदी मागण्यांबद्दलचे ठराव मंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images