Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘स्टेट कॅन्सर’साठी एक पाऊल पुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला 'स्टेट कॅन्सर हॉस्पिटल'चा दर्जा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तीन निरीक्षकांनी शुक्रवारी (२९ जुलै) हॉस्पिटलची पाहणी केली व हॉस्पिटलमधील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे तिन्ही निरीक्षकांनी हॉस्पिटलमधील पायाभूत सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त केले असून, केंद्राला निरीक्षकांना सकारात्मक अहवाल दिल्यानंतर हॉस्पिटलला 'स्टेट कॅन्सर'चा दर्जा मिळण्याचा आणि केंद्राकडून ८४ कोटींचा निधी मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत.

बारावी पंचवार्षिक योजना व केंद्र सरकारच्या 'नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटीस, कार्डिओव्हॅस्कुलर डिसिज अँड स्ट्रोक' (एनपीसीडीसीएस) या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत प्रत्येक राज्यातील एका हॉस्पिटलला १२० कोटींपर्यंत निधी देण्याची तरतूद आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ८४ कोटींचा निधी केंद्र सरकार, तर ३० टक्के म्हणजेच ३६ कोटींचा निधी संबंधित राज्य सरकारने देणे अपेक्षित आहे. त्यानुसार राज्य सरकारने शहरातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटलची निवड करून त्याची शिफारस केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. या संदर्भात हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने दिल्लीतील 'एलएचएमसी' संस्थेचे रेडिओथेरपी विभागप्रमुख डॉ. वा. के. सक्सेना, नवी दिल्लीतील 'एसजेएच'मधील रेडिओथेरपी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विकास मधोलिया व पुण्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालयाचे संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी शुक्रवारी हॉस्पिटलची पाहणी केली. रुग्णालयातील रेडिएशन, किमोथेरपी तसेच शस्त्रक्रियेच्या सोयी-सुविधा, रुग्णांचा ओघ, उपकरणांची माहिती, रुग्णालयातील डॉक्टर-तज्ज्ञांची माहिती घेतली. या प्रसंगी तिन्ही निरीक्षकांसमोर रुग्णालयासंदर्भात 'पॉवर पॉइंट प्रेझेेटेशन' सादर करण्यात आले. आतापर्यंत हॉस्पिलमध्ये झालेल्या दुर्मिळ शस्त्रक्रियांबाबतही माहिती देण्यात आली. या वेळी 'डीएमईआर' सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे, घाटीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, रुग्णालयातील डॉक्टर-तंत्रज्ञ-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

पॉझिटिव्ह रिपोर्ट देणार

या प्रसंगी निरीक्षक डॉ. सक्सेना यांनी उत्तर प्रदेश, बिहारमधील कर्करुग्णांना मिळणाऱ्या अत्यंत तोकड्या सोयी-सुविधांवर बोट ठेवत, महाराष्ट्रामध्ये व विशेषतः औरंगाबाद-नागपूरमध्ये मिळणाऱ्या शासकीय सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सकारात्मक रिपोर्ट देणार असून, त्यामुळे 'स्टेट कॅन्सर हॉस्पिटल'चा दर्जा मिळून व हॉस्पिटल अधिकाधिक अद्ययावत होण्याच्या दृष्टीने निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही डॉ. सक्सेना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीच्या छळामुळे पोलिस पती बेपत्ता

$
0
0

औरंगाबाद ः पत्नी व सासरच्या छळाला कंटाळून पोलिस कर्मचारी मंगळवारपासून बेपत्ता आहे. या कर्मचाऱ्याने पोलिस आयुक्तांना आपण आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी पाठवली आहे. दरम्यान या पोलिसाच्या पत्नीने सिडको पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याचा अर्ज दिला.

श्याम बाबूलाल पोळ हे पोलिस कॉन्स्टेबल सिडको सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत. २६ जुलैपासून पोळ बेपत्ता झाले. दरम्यान पोळ यांनी पोलिस आयुक्त आमितेशकुमार यांच्या नावे एक चिठ्ठी लिहून पाठवली आहे. यामध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करीत असून माझा मृतदेह पत्नीच्या ताब्यात न देता माझ्या मुलांना माझा चेहरा दाखवा अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीने पती हरवल्याची तक्रार सिडको पोलिसात दिल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांना यश आले नाही. चिठ्ठी मिळाल्यानंतर अमितेशकुमार यांनी हे प्रकरण गांर्भियाने घेत पोळ यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी सिडको परिसरातील विहिरी, आडाची देखील तपासणी केली. मात्र, काही हाती लागले नाही. बेपत्ता पोळ यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाश्वेतादेवींच्या साहित्यात शोषितांचे प्रतिबिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
(कै.) महाश्वेतादेवी या जशा चांगल्या लेखिका होत्या तशाच त्या चांगल्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या साहित्यात वंचित, शोषित, दलित, आदिवासींचे प्रतिबिंब होते, असे मत शहीद भगतसिंह अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी रविवारी (३१ जुलै) आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त केले.
सिडको एन सात परिसरातील व्ही. डी. देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. भाकपचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. शेंडगे म्हणाले, प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांचे पती कम्युनिस्ट होते. त्यामुळे त्यांच्या लेखनावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता. त्या जशा चांगल्या लेखिका होत्या, तशा त्या चांगल्या कार्यकर्त्या होत्या. मुळात चांगला लेखक-लेखिका होण्यासाठी चांगला कार्यकर्ता-कार्यकर्ती असणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, दलित, शोषित, आदिवासी समाज मागे पडणार नाही, याची काळजी महाश्वेतादेवींच्या १०० कादंबऱ्या, २० कथांमधून प्रतिबिंबित होते, असेही डॉ. शेंडगे म्हणाले. डॉ. कानगो म्हणाले, सुदैवाने महाश्वेतादेवींच्या काळात उपेक्षितांना सोबत घ्यावे, असे वातावरण होते. मात्र मागच्या १०-१५ वर्षांत समाज पूर्णपणे बदलला आणि ही आज चिंतेचे बाब आहे, असेही डॉ. कानगो म्हणाले. समाधान इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वि. रा. राठोड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुडन्यूजः नाशिकचा प्रवास साडेतीन तासांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्य शहरांत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाने विनावाहक एक थांबा बस योजना सुरू केली आहे. या योजनेतून औरंगाबाद-नाशिक मार्गावर सोमवारपासून (१ ऑगस्ट) बस सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर १० ऑगस्टपर्यंत औरंगाबाद-धुळे आणि औरंगाबाद-जळगाव मार्गावरही एक थांबा बस सुरू होणार आहे.
मध्यवर्ती बस स्‍थानकावरून नाशिककरिता एक थांबा सकाळी ६ पासून सायंकाळी साडेसातपर्यंत दर अर्ध्या तासाने बस सोडण्यात येणार आहे. दिवसभरात १४ बसच्या २८ फेऱ्या केल्या जाणार आहेत. हा प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होणार आहे. नाशिककडे जाताना येवला बसस्‍थानक व औरंगाबादला परत येतना वैजापूर बसस्‍थानकावर थांबा घेतला जाणार आहे. या बसचे प्रति प्रवासी भाडे २७६ रुपये आहे. या मार्गावर निमआराम बससेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र पाटील यांनी दिली.
नाशिकची बस सुरू झाल्यानंतर धुळे आणि जळगाव मार्गावर एक थांबा बस सुरू केली जाणार आहे. औरंगाबाद-धुळे बस ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही बस धुळ्याकडे जाताना चाळीसगाव व औरंगाबादला परत येताना कन्नड बसस्‍थानकावर थांबणार आहे. १० ऑगस्टपासून जळगाव मार्गावर बस सोडली जाणार आहे. जळगावला जाताना पहूर व औरंगाबादला येताना सिल्लोड येथे बस थांबविण्यात येणार आहे. या बसच्या २२ फेऱ्या होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्ट : पोषण आहाराची तपासणी

$
0
0

'मटा'च्या वृत्तमालिकेची दखल; शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली समिती
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे पोस्टमार्टेम करणारी 'पोषण की शोषण? ' ही वृत्तमालिका महाराष्ट्र टाइम्समध्ये २५ जुलैपासून प्रसिद्ध करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे निकृष्ट दर्जाचे अन्न, स्वयंपाकघरांची दुरवस्था त्यातून स्पष्टपणे दाखवून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी त्याची दखल घेऊन शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या तपासणीसाठी पाच सदस्यांच्या भरारी पथकाची तातडीने नेमणूक केली आहे. स्थानिक बचतगटामार्फत पोषण आहार दिला जात नसेल, त्या शाळांतील आहार तत्काळ बंद करा, असे आदेशही मोगल यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्यासाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सरकारच्या निकषानुसार पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटांत १०० व १५० ग्रॅम तांदूळ, उसळ देणे बंधनकारक आहे. आहार देण्यासंदर्भात सहा दिवसांचे वेळापत्रकही देण्यात आले आहे, पण जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून सरकारी आदेश धाब्यावर बसवून पोषण आहार पुरविला जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'ने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील गावे निवडून अचानक तपासणी केली आणि पोषण आहारातील गैरप्रकार उघडकीस आणले. प्रमाणापेक्षा कमी दिला जाणारा आहार, अस्वच्छ स्वयंपाकघर, धान्याची होणारी नासाडी आदींवर प्रकाश टाकला.
या वृत्तमालिकेची दखल घेऊन शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी शनिवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. बैठकीत शालेय पोषण आहार योजनेच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली. पोषण आहाराच दर्जा तपासण्यासाठी पाच सदस्यांची समितीची स्थापना करण्यात आली. हे भरारी पथक पुढल आठवड्यात जिल्ह्यातील काही गावांना अचानकपणे भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहे. समितीमध्ये शालेय पोषण आहार लेखाधिकारी, दोन अधीक्षक आणि दोन विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे मोगल यांनी सांगितले.

...तर पोषण आहार बंद करा
शिक्षणाधिकारी मोगल यांनी वडगाव (खु) आणि नायगाव या दोन गावांना भेटी देऊन तेथील शालेय पोषण आहाराची तपासणी केली. नायगाव येथे पोषण आहाराचे नियोजन नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वडगाव येथे २५ किलोमीटर अंतरावरून पोषण आहार पुरविला जात होता. स्थानिक बचतगटातील सदस्यांना आर्थिक मदत व्हावी, सक्षमीकरण व्हावे असा योजनेचा हेतू आहे, पण अनेक ठिकाणी स्थानिक बचतगट नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक बचतगट नसेल तर त्यांचा पोषण आहार बंद करा, असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे मोगल यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणे, सोडलेल्या पाण्याचा होणार हिशेब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरण मृतसाठ्यात असूनही वरच्या भागातील पाणी कालव्यांमार्फत खरीप पिकांसाठी तसेच पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू असला तरी १५ ऑक्टोबर रोजी सोडण्यात आलेल्या सर्व पाण्याचा हिशेब करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पळवापळवीचा प्रश्न नाही, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले.
यावर्षी नगर, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याऐवजी कालव्यांद्वारे पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत बिराजदार म्हणाले की, वरच्या भागातून सोडण्यात आलेल्या सर्व पाण्याचा हिशेब मंडळ काटेकोर ठेवत आहे. यावरून वरच्या धरणाचा निश्चित झालेल्या कोट्यातून खरिपासाठी तसेच पिण्यासाठी खर्च करण्यात आलेले पाणी देय होणाऱ्या पाण्यातून वजा करण्यात येते. त्यामुळे सध्या वरच्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे काटेकोर मोजमाप करून हिशेब ठेवण्यात येणार आहे.

समन्यायी कोटा
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्र‌ाधिकरणाच्या आदेशात तरतूद आहे की, प्रकल्पाच्या मर्यादेनुसार लाभक्षेत्रातील पिकांसाठी किंवा पिण्यासाठी पाणी वापरता येऊ शकते. परंतु, लाभक्षेत्राबाहेर या पाण्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे वरच्या धरणातून सिंचन, बिगरसिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी तसेच बाष्पीभवनाचे सुद्धा १५ ऑक्टोबर रोजी मोजमाप करण्यात येणार आहे. त्यावेळी जायकवाडी तसेच वरच्या धरणातील उपलब्ध पाण्याचा हिशोब करून नियमानुसार पाण्याचा समन्यायी कोटा निश्चित होतो.

समन्यायी पाणीवाटपाच्या नियमानुसार सोडण्यात आलेल्या सर्व पाण्याचा हिशेब मंडळ काटेकोरपणे करणार आहे. प्रकल्पाच्या मर्यादेनुसार लाभक्षेत्रात खरिपासाठी वापरलेले पाणी याचा तंतोतंत हिशेब होणार आहे.
-सी. ए. बिराजदार, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट-४’ला अखेर मुहूर्त मिळाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट-४) घेण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रानुसार २० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करावी लागणार आहे. विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले, मात्र मार्गदर्शक आणि रिक्त जागांचा आकडा अनिश्चितच आहे. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने निकष बदलले आहेत, त्याचाही विचार 'पेट-४'साठी केला गेला नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. पूर्वपरीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जुलै ते २० ऑगस्ट यादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पीएच.डी. विभागात दाखल करण्यासठी विद्यार्थ्यांना मुदत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९पासून पीएच.डी.साठी प्रवेशपूर्व परीक्षेतून प्रवेश देण्यात यावेत, असे आदेश दिले, परंतु या विद्यापीठाची 'पेट' परीक्षा कायम वादात अडकली. त्यामुळे आजपर्यंत केवळ तीन पेट परीक्षा होऊ शकल्या. त्यात पेट-४चे वेळापत्रक जाहीर केले, परंतु ही परीक्षा केव्हा घेतली जाणार हे मात्र निश्चित नाही. त्यासह मार्गदर्शकांची संख्या किती आहे, त्यांच्याकडे रिक्त जागा किती याबाबत अद्यापही घोळ कायम आहे. तत्कालिन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्यापासून ते विद्यमान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातही रिक्त जांगाचा ताळमेळ घालणे प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे पेटबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत.

निकषाचे काय
पीएच.डी.बाबात यूजीसीने २००९नंतर आता ५ जुलै २०१६ रोजी निकषात फेरबदल करत नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. संशोधनाचा कालावधी वाढविणे, संशोधक मार्गदर्शकांकडे विद्यार्थी निश्चिती, निकष स्पष्ट केले. त्याचा अभ्यास करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाला प्रयत्न करावे लागतील, परंतु अद्याप विद्यापीठाकडे कोणत्या विषयात किती संशोधक मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या किती आहे, रिक्त जागांचा आकडा किती याबाबत स्पष्टता नाही. बदललेले निकष, अपुरी माहिती यामुळे 'पेट-४' सुरू होण्यापूर्वीच अडचणीत सापडली आहे.

सध्या प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्याची तयारी आहे. मार्गदर्शक, विद्यार्थी संख्या, रिक्त जागांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. परीक्षेपूर्वी याबाबतची आकडेवारी जाहीर केली जाईल.
- डॉ. सतीश पाटील, बीसीयूडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

पेट-१.....ः २०१०
उत्तीर्ण...ः २,८५०

पेट-२.....ः २०१२
पात्र.......ः ३,२५०

पेट-३.. ः २०१३
पात्र..... ः ४१००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाध्यक्ष सत्तार घेणार शनिवारी काँग्रेस नेत्यांचा वर्ग

$
0
0

औरंगाबाद : नियुक्ती झाल्यापासून जिल्ह्यातील काँग्रेसचे काय काम केले, कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले, लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय प्रकल्प राबविले, याचा सविस्तर आढावा जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार शनिवारी सहा ऑगस्ट रोजी घेणार आहेत.
गांधीभवन येथे शनिवारी दिवसभर सत्तारांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काम करत नाहीत, त्यांना पदावरून हटवा, असे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी बोलाविली आहे.

काम न करणाऱ्यांची पदे जाणार
मार्गदर्शन वर्गासंदर्भात 'मटा'शी बोलताना आमदार सत्तार म्हणाले,'पद दिल्यानंतर ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडली जाणे आवश्यक आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. आगामी सहा महिन्यांत पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या जातील. ज्यांचे काम अतिशय वाईट आहे. त्यांची जबाबदारी काढून घेतली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चित्रपट ही सांस्कृतिक चळवळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'पूर्वी चित्रपट ही सांस्कृतिक चळवळ होती. 'बॉलिवूड' अशी संकल्पना अस्तित्वात नव्हती. समाजाला सुसंस्कृत करण्यात शिक्षण व चित्रपट प्रभावी माध्यम असल्याची बिमल रॉय यांची ठाम भूमिका होती. या भूमिकेतूनच त्यांनी प्रबोधनात्मक चित्रपट निर्मिती केली,' असे प्रतिपादन रिंकी रॉय - भट्टाचार्य यांनी रविवारी येथे केले. बिमल रॉय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने बिमल रॉय चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. सात दिवसांच्या महोत्सवात अभिजात चित्रपट दाखवण्यात आले. या महोत्सवाचा रविवारी गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात समारोप करण्यात आला. यावेळी मंचावर बिमल रॉय यांच्या कन्या रिंकी रॉय-भट्टाचार्य, डॉ. सरोज बावडेकर, प्रा. दिनकर बोरीकर, डॉ. श्रीरंग देशपाडे, डॉ. जगदिश खैरनार आणि ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिंकी रॉय यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बिमल रॉय यांच्या चित्रपटांवर त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. 'समाजाला सुसंस्कृत करण्यात शिक्षणासह चित्रपट प्रभावी माध्यम आहे. बिमलदांना याची जाणीव असल्यामुळे त्यांच्या प्रॉडक्शन हाउसचा लोगो वैशिष्ट्यपूर्ण होता. बंगाली साहित्याचा विशेष प्रभाव असल्याने त्यांनी आशयसंपन्न चित्रपट निर्मिती केली. बिमलदांना जाऊन ५० वर्षे झाली, पण अजूनही रसिक विसरले नाही. कारण चित्रपट सांस्कृतिक चळवळ असल्याचे तत्व त्यांनी जपले होते. सध्या फिल्म सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट दाखवते. त्यातून हेच तत्व जपण्याचे माझे प्रयत्न आहेत,' असे रॉय म्हणाल्या.
महोत्सवात दररोज चित्रपटाची वैशिष्ट्ये सांगणारे सिनेपत्रकार अशोक उजळंबकर व सुधीर सेवेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मेधा लखपती यांनी करून दिला. प्रा. किशोर शिरसाठ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जगदीश खैरनार यांनी आभार मानले.

फिल्म क्लब स्थापन
औरंगाबाद शहरात दर्जेदार चित्रपट दाखवून सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यासाठी स. भु. शिक्षण संस्थेने फिल्म क्लबची स्थापना केली आहे. या क्लबचे रिंकी रॉय यांनी उदघाटन केले. यावेळी ज्येष्ठ रसिक श्रीकांत तांबे यांना रॉय यांनी फिल्म क्लबचे ओळखपत्र प्रदान केले. प्रत्येक महिन्यांत दोन जागतिक दर्जाचे चित्रपट या क्लबद्वारे दाखवले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उडान’तर्फे बालमधुमेहींच्या ४०० पालकांना मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'उडान' या बालमधुमेही मुलांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या वतीने बालमधुमेहींची (टाइप - १ डायबेटीस) शास्त्रशुद्ध काळजी घेण्यासाठी बालमधुमेहींच्या पालकांसाठी रविवारी (३१ जुलै) विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मधुमेहतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञांनी सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. यात चारशेपेक्षा जास्त पालकांनी सक्रिय सहभाग घेतला.
जागतिक 'इन्सुलिन डे'चे निमित्त साधून ही कार्यशाळा घेण्यात आली. स्टेशन रोडवरील भानुदास चव्हाण सभागृहात ही कार्यशाळा झाली. उद्घाटन टेंडर केअर शाळेच्या संचालक शैलजा केंकरे यांच्या कार्यशाळेचे हस्ते आले. बालमधुमेहींची काळजी कशी घ्यावी, त्यांची काळजी घेताना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, यासह पालकांच्या मनातील शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यशाळेमध्ये मधुमेहतज्ज्ञ डॉ. अर्चना सारडा, बंगळुरू येथील डॉ. सूची चुग, डॉ. अजय रोटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित जोशी, डॉ. प्रफुल्ल संकलेचा, डॉ. रेणू बोराळकर, डॉ. शैलजा ताठे, पूजा दुसाद, डॉ. कल्याण मोरे, आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली देशमुख, उषा गजिले यांनी मार्गदर्शन केले. 'उडान'च्या प्रमुख डॉ. अर्चना सारडा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यशाळेसाठी डॉ. संपत सारडा यांच्यासह डॉ. कल्याण मोरे यांच्यासह कर्मचारी, सहकारी, स्वयंसेवक आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे संघ अजिंक्य

$
0
0

पुणे संघ अजिंक्य
अंतिम सामन्यात सांगली संघावर मात
लोगो - राज्य सॉफ्टबॉल स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने सांगली संघाचा पराभव करून विजेतेपद पटाकाविले.
कन्नड येथील तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्विकारली. पुणे संघाने १४-९ असा एकतर्फी विजय नोंदवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुणे संघाकडून समृद्धी मुळे, वैष्णवी चव्हाण, प्रीती कांबळे, वैष्णवी वडणे यांनी ११ होमरन केले. स्पर्धेच्या नियमानुसार सांगली संघास बॅटिंगची संधी देण्यात आली. सांगली संघ पहिल्या डावात एकही होमरन करू शकला नाही. पुणे संघाने दुसऱ्या डावात तीन होमरन केले. दुसरा डाव खेळताना सांगली संघाने सहा होमरन केले. त्यामुळे सामन्यातील चुरस वाढली. अखेरच्या डावात सांगली संघाने तीन होमरन काढले. परंतु, त्यांना ९-१४ असा पराभव स्वीकारावा लागला. सांगलीच्या स्नेहा पाटोळे, मैथली पाटील यांनी चिवट झुंज दिली.
कोल्हापूर संघाने जळगाव संघावर ५-३ अशी मात करून तिसरा क्रमांक मिळविला. दुसऱ्या डावापर्यंत ३-३ अशा बरोबरीत सामना होता. कोल्हापूरच्या ऐश्वर्या पुरी, करिश्मा कुडचे यांनी चांगली कामगिरी बजावली.
पारितोषिक वितरण
उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार विनोद गुंडमवार, राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, जगदीश खैरनार, सुरज येवतीकर, प्रशांत जगताप, नितीन पाटील, डॉ. उदय डोंगरे, मिलिंद दर्प यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी राकेश खैरनार, प्रवीण शिंदे, प्रदीप बोरसे, जगदीश चव्हाण, गणेश बेटुदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपूत समाजातील मुलांचा हुंड्यास विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळ बदलत आहे. जुन्या पद्धतींमध्येही बदल आवश्यक आहे. संस्कृती व परंपरा टिकवण्याचेही आव्हान समोर आहे. त्याचबरोबर हुंडापद्धतीसारख्या जुनाट व बुरसटलेल्या परंपराही कालबाह्य व्हाव्यात, असा सूर राजपूत समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात रविवारी उमटला.

राजपूत चेतना मंचच्या माध्यामातून सकल राजपूत समाज वधू-वर परिचय मेळावा संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित करण्यात आला. आमदार अतुल सावे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, नगरसेवक शिवाजी दांडगे, राजपूत महासंघाचे राज्य अध्यक्ष नंदलाल राजपूत, राजपूत चेतना मंचचे अध्यक्ष जग‌तसिंह परिहार, उपाध्यक्ष भगवानसिंह चव्हाण, सचिव शंकरसिंह ठाकूर, प्रकाशसिंह गौर, शंभुसिंह दीक्षित, युवा अध्यक्ष अमरसिंह परदेशी आदी उपस्थित होते. समाजाला संबोधताना आमदार सावे यांनी, मुला-मुलींना अशा कार्यक्रमात भाग घ्यावा, असे आवाहन केले. राजपूत समाजात अनेक जाती पोटजाती असल्याने त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होत नसे, मात्र महाराणा प्रताप यांना मानणाऱ्यांना राजपूत समजून बेटी व्यवहार करण्यावर भर देण्यात आला. वधू-वर परिचय मेळाव्याचे यंदाचे सातवे वर्ष अाहे. नव्या संकल्पासह समाजातील मोठ्यांनी अनेक बदलांसाठी समाजाला आवाहन केले. त्यामध्ये प्रामुख्याने हुंडापद्धतीला विरोध व सामूहिक वि‌वाहासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. समाजाच्या रेखा काकरवाल यांनीही मुलींना शिक्षण व विधवा मुलींचा पुर्नविवाह व्हायला हवा, असे विचार 'मटा'शी बोलताना व्यक्त केले. जुन्या प्रथांना नाकारून घटस्फोटित व विधवा मुलींच्या लग्नासाठीही नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे मुल व मुली दोघांमध्येही शिक्षणाचे प्रमाण चांगले होते. विधुर, घटस्फोटित, विकलांग यांचीही नोंदणी यामध्ये करण्यात आली.

कार्यक्रमाला राजेंद्रसिंह चव्हाण, पवनसिंग बायस, शशिकांतसिंह चव्हाण, दिलीपसिंह हजारी, हुकुमचंद चव्हाण, विजयसिंग बारवाल, सचिन बैनाडे, पृथ्वीसिंह बायस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटक महेंद्रसिंह ठाकुर, महेंद्रसिंह परिहार, मनोज‌सिंह परिहार, प्रसिद्धीप्रमुख विजयसिंह झाला, राज ठाकूर, भाग्यश्री राजपूत, गीता बायस, जयश्री ठाकुर, जयश्री चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

परराज्यातूनही नोंदणी

मेळाव्यासाठी मराठवाड्यासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही नोंदणी झाली होती. कार्यक्रमापूर्वी नोंदणी झालेल्या २४० मुला-मुलींचे पत्रिकेसह कार्यक्रमात नोंदणी झालेल्यांची स्वतंत्र पुस्ति‌काही काढण्यात येईल, असे पदाधि‌काऱ्यांनी सांगितले. इतर समाजाप्रमाणेच याही समाजात मुलींचे प्रमाण कमी असल्याची खंत परिहार यांनी बोलून दाखवली. मुलींना प्रोत्सा‌हन मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याने अध्यक्ष जगतसिंह परिहार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार दानवेंविरुद्ध शिवसेना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री/ पैठण

विदर्भ राज्याच्या पाठिंबा देणाऱ्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आघाडी उघडली आहे. फुलंब्री येथील खुलताबाद टी पॉइंट येथे निदर्शने करून खासदार दानवे यांचा निषेध करण्यात आला. पैठण येथे महाराणा प्रताप चौकात निदर्शने करून त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला पूरक भूमिका मांडली आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदारांच्याविरुद्ध खुलताबाद टी पॉइंट येथील महात्मा फुले चौकात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार दानवे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व तालुकाप्रमुख ठोंबरे, शहरप्रमुख रमेश दुतोंडे, राजेंद्र काळे, सोमिनाथ करपे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत जाधव, नामदेव काळे, उत्तम ढोके, मधुकर सोनवणे, संजय मोटे, सुधाकर ठोंबरे, रामदास शिसोदे, हरिदास घरमोडे, विशाल गंगावणे यांच्यासह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.

खासदार दानवे यांच्या वक्तव्याचे पडसाद पैठण शहरात सुद्धा उमटले. शहरप्रमुख प्रकाश वानोळे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी पावणेबारा वाजता महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दानवे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनात दिलीप मगर, सोमनाथ परळकर, विलास घायाळ, संतोष धापटे, कपिल कावसनकर, विकास बागले, सोनू शिंदे, ईश्वर दगडे, जितू परदेशी, शिवराज पारीख, योगराज बुंदिले, शंकर निवारे, शिवाजी पठाडे, सरपंच भाऊ लबडे, सरपंच साईनाथ होरकटे आदी सामील झाले होते.

संबंध नसताना मागणी

खासदार दानवे यांनी यापूर्वी पैठणची रेल्वे पळवली आहे. आता ते महाराष्ट्राचे तुकडे करू इच्छित आहेत. मात्र, शिवसैनिक भाजपची वेगळ्या विदर्भाची मागणी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. मराठवाड्यातील जालना मतदारसंघातून निवडून येणारे व संबंध नसताना वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या खासदार दानवे याना यापुढे तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा पैठणमधील शिवसैनिकांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीसीचे चव्हाण दांपत्य पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण व त्याच्या पत्नीला जवाहरनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून हस्तांतरित करून अटक केली आहे. रविवारी या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असता ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुंतवणूकदाराची सव्वानऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने ३० ऑक्टोबर २०१४ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष गोपीनाथ पाडळे (वय ३४ रा. शिवाजीनगर) यांनी एप्रिल २०११मध्ये केबीसी ग्रुपमध्ये गुंतवूणक केली होती. केबीसीतील एक आरोपी दादासाहेब पोटे याने त्यांना यासाठी प्रोत्साहित केले होते. पाडळे यांनी सात वेळेस २ लाख ३३ हजार ४०० रुपयाची गुंतवणूक केली होती. या रक्कमेपोटी पाडळे यांना केबीसीकडून ९ लाख १३ हजार रुपये मिळणार होते, मात्र सप्टेंबर महिन्यात केबीसीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. पाडळे हे फसवणुकीची तक्रार देण्यासाठी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले.

आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथे गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. यानंतर पाडळे यांनी कोर्टात दाद मागितली. कोर्टाने आदेश दिल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०१४ रोजी भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण या संचालकासह पोटे व इतर अकरा आरोप‌ींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, पसार असलेल्या भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण याना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. जवाहरनगर पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाने चव्हाण दांपत्याला हस्तांतरित करून घेत अटक केली आहे. रविवारी या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता त्याना कोर्टाने ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी ह‌ी माहिती दिली.

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक

केबीसीच्या स्कीममध्ये औरंगाबाद व परिसरातील हजारो नागरिकांनी गुंतवणूक केली होती. यामध्ये बिडकीन, मावसगव्हाण, लोहगाव, तोंडोळीसह अंबड तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांचा समावेश आहे. नाशिक पोलिसांचे पथक जबाब घेण्यासाठी शहरात आले असता साडेअकराशे गुंतवणूकदारांनी लेखी स्वरुपातील जबाब त्यांच्याकडे नोंदवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ संचालकाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ​ विमानतळाचे कंत्राट देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या औरंगाबाद विमानतळाचे संचालक अलोक प्रेमप्रकाश वार्ष्णेय यांना शनिवारी (३० जुलै) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वार्ष्णेय यांच्या घरात आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली असून, त्यांच्या दिल्लीतील लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी रक्कम व दागिने असल्याचे समोर आले आहे. अधिक तपासासाठी त्यांना तीन ऑगस्टपर्यंत 'सीबीआय'च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पौर्णिमा कर्णिक यांनी दिले आहेत.

औरंगाबाद येथील विमानतळाचे 'ग्राउंड क्लिअरन्स' कामाचे कंत्राट देण्यासाठी 'इंटरनॅशनल एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या सहाय्यक महाव्यवस्थापकाला वार्ष्णेय यांनी ५० हजारांची लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता १० हजारांचा ठरला होता. याबाबतची तक्रार 'सीबीआय'ला देण्यात आल्यानंतर 'सीबीआय'ने सापळा रचला होता आणि १० हजारांचा लाच स्वीकारताना वार्ष्णेय यांना शनिवारी अटक करण्यात आली. 'सीबीआय'चे एसपी एम. आर. कडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर वार्ष्णेय यांच्या घरात; तसेच कार्यालयात 'सीबीआय'ने छापा टाकला असता, वार्ष्णेव यांच्या घरात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. वार्ष्णेय यांच्या दिल्लीतील एका लॉकरमध्ये मोठी रक्कम, दागिने आढळले आहेत.

आवाज-लिखाणाचे नमुने तपासणार

याप्रकरणी आरोपी वार्ष्णेय यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा, लॉकरमधील बेहिशेबी रकमेचा तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी वार्ष्णेय यांच्या आवाजाच्या व लिखाणाच्या नमुन्यांची तपासणी करणे आहे. या प्रकरणात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, इतर कोणी साथीदार आहेत का, याचा सविस्तर तपास करणे आहे. त्यामुळे आरोपीला सीबीआय कोठडी देण्याची विनंती 'सीबीआय'चे सरकारी वकील डी. एन. म्हस्के यांनी विशेष कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून वार्ष्णेय यांना बुधवारपर्यंत (तीन ऑगस्ट) सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किडके धान्य; मापात पाप!

$
0
0

Manoj.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः सरकारने मोठा गाजावाजा करत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून जिल्हा परिषद शाळांत शालेय पोषण आहार सुरू केला. निवडणुका आला की, प्रचारात टिमकी वाजवण्यापुरती या योजनेची आठवण येते, मात्र जिल्ह्यातील फर्दापूर तांडा जिल्हा परिषद शाळेला अनेकदा किडके धान्य पुरवण्यात येते. धान्याच्या गोण्या कमी वजनाच्या असतात. धान्य संपले, की दोन-दोन कधी चार-चार महिने योजना बंद असते. मग या आहारातून मुलांचे पोषण होणार की शोषण, असा सवाल गावकरी करत आहेत.
सरकारी योजना, तिचा हेतू चांगला असतो. मात्र, अंमलबजावणीत घोडे पेंड खाते. तशीच गत या योजनेची झाली आहे. फर्दापूर तांड्यावर इयत्ता चौधीपर्यंत शाळा आहे. या शाळेची १८ ऑगस्ट रोजी पाहणी केली. येथे रोज एकूण ८८ विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना खरेतर शालेय पोषण आहार योजना एक वरदान ठरणारी आहे, मात्र अंमलबजावणीत होणाऱ्या कुचराईमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या योजनेस पुरविण्यात येणारे धान्य अत्यंत हलक्या प्रतीचे असते. बऱ्याचदा दाळ आणि तांदळाला कीड लागलेली असते. हे धान्य बदलून मिळत नाही. मग नाईलाजाने याच धान्याची खिचडी विद्यार्थ्यांना शिजवून द्यावी लागते. बर ही सरकारी योजना, याबद्दल तक्रार करायची तर कुणाकडे, असा प्रश्न बचतगट चालकांना आणि शिक्षकांना पडतो. विशेष म्हणजे सरकार दरबारकडून मिळणारा धान्य पुरवठा अचानक बंद होतो. तुळसाबाई पंढरी चव्हाण यांनी या बचत गटाचे कंत्राट घेतले आहे. त्यांच्या घरची परिस्थितीही हलाकीची. जिथे स्वतःच्या पोटची भ्रांत तिथे ८८ विद्यार्थ्यांना काय खाऊ घालणार. मग अशा वेळी धान्य येईपर्यंत पोषण आहार योजना बंद असते. जवळपास दोन-दोन तर अनेकदा चार-चार महिन्यात शाळेत खिचडी शिजतच नाही.

बालविवाहाचे प्रमाण जास्त
शाळेतील मुलींचे शिक्षण खूप लवकर बंद होते. अनेक मुली चौथीनंतर शाळेसाठी दुसऱ्या गावाला जात नाहीत. त्यांची घरकाम आणि शेतकामात मदत घेतली जाते. पोषण आहारामुळे उपस्थितीचा पट वाढला आहे. मात्र, यातल्या बहुतांशी मुली माध्यमिक शिक्षणही पूर्ण करत नाही. अनेक मुलांची चौदाव्या, पंधराव्या वर्षीच लग्ने केली जातात. ही चिंताजनक बाब आहे.

गोण्यात मारतात काटा
पोषण आहारासाठी धान्य पाठविताना ५० किलोच्या गोण्या पाठविण्यात येतात, मात्र बहुतांश गोण्यांमध्ये फक्त ४० किलो धान्य असते. डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. तांदूळही महाग आहे. प्रत्येक वेळेस या धान्य वाटपाच्या मापात पाप कोण करते, याचे उत्तर ना इथल्या शिक्षकाला मिळाले आहे, ना बचत गटाला. शिक्षण विभागाकडून या मापाची चौकशी व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

मुलांची गळती गंभीर
शाळेत येणारी बहुतांशी मुले ही बंजारा समाजातील आहेत. ऊसतोड हंगाम सुरू झाला, की पालक कामावर जातात. मग विद्यार्थ्यांची शाळा बंद पडते. एकतर चिमुकल्या हातात पोटामुळे कोयता येतो, किंवा घरात लहान मुलांचा सांभाळ करत या विद्यार्थ्यांना थांबावे लागते. अनेकदा मुले पालकांसोबत दुसऱ्या गावी मोलमजुरीसाठी स्थलांतर करतात. सहा महिने जवळपास ५० टक्के मुले शाळेतच येत नाहीत. या मुलांना सातवीपर्यंत नापासही करता येत नाही. ती पास होतात, मात्र परिस्थितीने त्यांचे शिक्षण हिरावून घेतलेले असते. शालेय पोषण आहार योजना चांगल्या पद्धतीने राबविली, तर राज्यातील अशा हजारो मुलांचे कल्याण नक्कीच होणार आहे.

भाषेची समस्या
फर्दापूर तांडा येथील शाळेत भाषेची समस्या गंभीर आहे. शाळेत येणारी बहुतांश मुले बंजारा समाजातील आहेत. त्यांची मातृभाषा वेगळी. त्यामुळे पहिलीपासून मराठी शिकवताना शिक्षकांना अडचण येते. अनेकदा विद्यार्थ्यांना शिक्षकांना काय शिकवायचे तेच समजत नाही. जे शिकवलेले असते ते पेपरमध्ये लिहता येत नाही. विद्यार्थी उत्तर व्यवस्थित देतात, मात्र त्यांना कागदावर उतरविणे अवघड जाते. ज्या शाळेत बंजारा शिक्षक आहेत, तिथे ही समस्या कमी जाणवते.

शिजवून द्यावे वाटत नाही
अनेकदा पुरविण्यात येणारा तांदूळ आणि डाळ इतकी खराब असते, की विचारूच नका. तांदळाचे पीठ झालेले असते. त्यात जाळ्या, अळ्या, नुशा असतात. दाळीचीही हीच गत असते. बचत गटाला हे अन्न विद्यार्थ्यांना शिजवून द्यायलाही अंगावर काटा येतो. कारण त्यांचीही मुले याच शाळेच शिकतात. खिचडीचे धान्य शेवटी किती धुणार. त्यामुळे ही योजना चालवायची असेल, तर चांगल्या प्रतीच्या धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

चव ना ढव; भाजी-मसाला दुर्मिळ
विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारी खिचडी अतिशय बेचव असते. भाजीपाल्यासाठी पैसे मिळत नाहीत. मसाल्यासाठीही कमी पैसे मिळतात. त्यात जितका मसाला येईल, तितकाच आणला जातो. त्यामुळे खिचडीला फक्त पिवळ्या पाण्याची फोडणी दिलेली असते. 'हे विद्यार्थी गरीब असल्यामुळे खातात. अन्यथा ते यांनी या खिचडीकडे ढुंकूनही पाहिले नसते,' अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

शिक्षकांनी केले शाळेला कुंपण
शाळेत सध्या जे. पी. कोळी, डी. एस. बावस्कर आणि बी. आर. गावित हे तीन शिक्षक आहेत. शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे हे तिघेच चार वर्ग सांभाळतात. शाळेला कुंपण नसल्यामुळे गावातील गुरे-ढोरे शाळा परिसरात घुसायची. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून शाळेला कुंपण घातले. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बंजारा समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावली. याबद्दल गावकरी शिक्षकांचे कौतुक करतात, मात्र अजूनही शाळेत विजेची सोय नाही. त्यामुळे अनेक कामात अडचण येते.

शाळेय पोषण आहार योजनेचा मोठा बोलबाला करण्यात आला. मात्र, आमच्या शाळेत अनेकदा किडके धान्य येते. डाळ, तांदूळ हलक्या प्रतीचे असते. आमची मुले गरीब म्हणून असा भेदभाव केला जातो का? अशा योजनेतून मुलांचे पालन-पोषण होणार तरी कसे?
- भगवान चौहान, ग्रामस्थ, फर्दापूर तांडा

फर्दापूर तांडा शाळेतील शिक्षक चांगले आहेत, मात्र येथे एक शिक्षक कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. या शिक्षकाची लवकरात लवकर भरती करावी. शालेय पोषण आहार योजनेत देण्यात येणाऱ्या खिचडीचा दर्जा सुधारण्यात यावा.
- नामदेव चौहान, ग्रामस्थ, फर्दापूर तांडा

आमचे सगळेच सर खूप चांगले शिकवतात. आम्हाला मराठी लिहिण्यात अनेकदा अडचण येते. काही-काही शब्द समजत नाहीत. तेव्हा सर आमच्या भाषेतून हे शब्द आम्हाला सांगतात. आमची शाळा बंद होऊ नये, यासाठी आमच्या घरी येऊन सरांनी ताकीद दिली.
- करिना चौहान, विद्यार्थिनी, फर्दापूर तांडा

आम्हाला मराठी आता चांगले समजते. मात्र, बऱ्याचदा लिहिण्यात अडचण येते. आमच्या घरी शिकलेले कोणी नाही. आई-वडील मजुरी करतात. अनेकदा घरकामासांठी आमच्या मैत्रिणींनी शाळा बुडवावी लागते. अनेक मैत्रिणी घरातल्यांसोबत कामासाठी शेतात जातात.
- नंदिनी चौहान, विद्यार्थिनी, फर्दापूर तांडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : घरगुती व्यवसायाला टीमवर्कची जोड

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
कुटुंबाला हातभार लावण्यासाठी राणी चौंडिये यांनी चार वर्षापूर्वी इमिटेशन ज्वेलरीचा घरगुती व्यवसाय सुरू केला. घरगुती पद्धतीने एखादा छोटा-मोठा व्यवसाय करावा, असे वाटत होते. लग्नाच्या अगोदरपासून असा व्यवसाय करण्याची आवड होती. घरी नुसते बसायचे नाही, असे त्यांनी मनोमन ठरविले होते. घराबाहेर पडून व्यवसाय सुरू करणे त्यांना परिस्थितीमुळे शक्य नव्हते. नोकरी केली तर वेळा सांभाळाव्या लागतात. आठ ते नऊ तास घराबाहेर रहावे लागते. त्यामुळे घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होते हे लक्षात घेऊन चौंडिये यांनी नोकरी न करता घरीच काही तरी करण्याचा निर्णय घेतला. राणी चौंडिये या माहेरीही भावंडांबरोबर काम करीत होत्या.
आम्ही तीन भावंडे, आम्ही सर्व मिळून सुपाऱ्या फोडत होतो, असे त्या सांगतात. लग्नानंतर अशाच प्रकारचे काम करायचे, असे त्यांनी ठरविले. त्यांना त्यांचे पती शांतीलाल, मुलगा कुणाल आणि मुलगी श्रृती यांनी साथ दिली. चार वर्षांपूर्वी गारखेड्यातील सूत गिरणीमागे असलेल्या काबरानगरात त्यांनी छोटेसे दुकान भाड्याने घेतले. त्यात त्यांनी इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला. महिलांसाठी आवश्यक ते सर्व दागिने त्यांनी या दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. घरापासून हे दुकान काही अंतरावर होते. त्यामुळे घर आणि दुकान दोन्ही सांभाळताना त्यांची कसरत होत होती. ही कसरत टाळण्यासाठी त्यांनी घरातच छोटीशी जागा करून तेथे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. घरातील एका छोटाशा भागचे रुपांतर दुकानात करण्यात आले. आता दुकान आणि घर एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे दोन्हीकडे लक्ष देणे सहज शक्य होते, असे चौंडिये सांगतात. घर आणि दुकान एकाच ठिकाणी असल्यामुळे सकाळी साडेसहापासून रात्री अकरापर्यंत दुकान उघडे ठेवणे शक्य होते.
सुरुवातीला फक्त इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर या व्यवसायाला अन्य साहित्याचीही जोड देण्यात आली. दूध, ब्रेड, अंडी यांसह किराणा साहित्य, स्टेशनरी साहित्य देखील आता त्यांनी या दुकानात विक्रीसाठी ठेवले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानात एक एक साहित्य वाढवत गेलो, असे त्यांनी सांगितले. सिझनेबल वस्तू देखील दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जातात. सणा-वारासाठीचे साहित्यही ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाते. त्यात राख्या, गणपती, होळीचे रंग, पतंग, मांजा याचा समावेश असतो. त्यामुळे दुकानावर ग्राहकांची ये-जा नेहमीच सुरू असते. घरगुती व्यवसाय सुरू करण्याचा उद्देश कुटुंबाला हातभार लावण्याचा असला तरी मुलांना देखील व्यवहार ज्ञान आले पाहिजे, हा देखील एक आहे, असे त्या सांगतात. मुलं आपल्या आई-वडीलांकडे सहजपणे पाच-दहा रुपये मागतात. पालकांकडून पाच-दहा रुपये मिळवणे त्यांना सोपे वाटते, पण तेवढे पैसे कमावण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मात्र त्यांना कळत नाही. घरीच दुकान सुरू केल्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान देखील येऊ लागले आहे, असे त्या सांगतात. सुरुवातीच्या काळात दुकानासाठी बाजारपेठेतून साहित्य खरेदी राणी चौंडिये यांचे पती शांतीलाल करायचे. आता खरेदीसाठी पतीबरोबर त्याही बाहेर पडूलागल्या आहेत. आपण स्वतः बाजारात खरेदीसाठी गेल्यावर महिलांच्या दागिन्यांसाठीचे नवीन ट्रेंडस् लक्षात येतात. मार्केट काय आहे, कसे आहे हे कळते. महिलांसाठी वस्तू घेताना त्याची रेंजही बघावी लागते. स्वस्त आणि चांगल्या वस्तू उपलब्ध करून द्याव्या लागतात. बाजारात आपण स्वतः गेल्यावर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून खरेदी करावी लागते, असे त्यांनी सांगितले. दुकानाच्या माध्यमातून घरखर्च भागतो. छोट्या-मोठ्या कामासाठी पैसा हाती राहतो. त्यामुळे काळजी नसते असे राणी चौंडिये अभिमानाने सांगतात.
दुकान वाढवण्यासाठी त्यांनी मुद्रा कर्ज घेतले आहे. महिलांचे गारमेंटस् दुकानात ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. प्रत्येक महिलेने गृहोद्योग सुरू करावा. त्यातून त्या स्वावलंबी व सक्षम बनतील. स्वतःच्या पायावर उभ्या राहतिल, असे चौंडीये यांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिने नागरिक ‘खड्ड्या’तच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंचा-इंचावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांपासून औरंगाबादकरांची आणखी दोन महिने तरी सुटका होणार नाही, हे खुद्द महापालिका आयुक्तांनीच बुधवारी स्पष्ट केले. नव्या रस्त्यांवर खड्डे कसे पडले याची चौकशी केली जाईल, त्यानंतर टेंडर मंजूर झाल्यावर आणि पाऊस थांबल्यावर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी उत्तरे देऊन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी हात वर केले.
रोजच्या पावसाने शहरातील नवे-जुने रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून 'जैसे थे' असलेल्या खड्ड्यांना नव्या खड्ड्यांची जोड मिळाली आहे. पालिका याबद्दल उदासीन आणि पदाधिकारीही ढिम्म आहेत. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून अक्षरश: उधळतच वाहने हाकावी लागत आहेत. व्हाइट टॉपिंगचे रस्ते वगळता सर्वच रस्त्यांची वाताहत झाली आहे. पावसाळ्यात डांबरीकरण शक्य नाही, पण महापालिकेने किमान मुरूम, पेव्हर ब्लॉक, सिमेंट भरून मोठे खड्डे तरी बुजवावेत अशी नागरिकांची भावना आहे, पण या भावनेची दखल घ्यायला महापालिकेचे प्रशासन व पदाधिकारी तयार नाहीत.
पत्रकारांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेऊन खड्ड्यांविषयी चौकशी केली. ते म्हणाले, 'खड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे हे मान्य, पण खड्डे लगेच बुजवता येणार नाहीत. त्यासाठी टेंडर काढले आहे. टेंडर मंजुरीनंतर खड्डे बुजवण्यास सुरुवात केली जाईल. पावसात खड्डे बुजवता येणार नाहीत. रस्त्यांसाठी महापालिकेने बजेटमध्ये तरतूद केली आहे, त्यानुसार कामे सुरू केली जातील. यापुढे रस्त्यांची कामे व्हाइट टॉपिंगची किंवा सिमेंट काँक्रिटचीच होतील, डांबरी रस्ते केले जाणार नाहीत.'

एमजीएम रस्त्याचे काम दोन महिन्यात
कैलासनगर ते एमजीएम या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याचे काम दोन महिन्यांत सुरू होऊ शकेल असे आयुक्तांनी सांगितले. या कामात ११ मालमत्ता बाधित होतात, त्यात दोन कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची महापालिकेची तयारी आहे. दरम्यान, कैलासनगरात रस्त्याचा सर्व्हे करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी बुधवारी गेले होते, पण नागरिकांच्या विरोधामुळे त्यांना माघारी फिरावे लागले.

अधिकाऱ्यांवरही कारवाई
डिफेक्ट लायबिलिटी पिरिअड संपण्यापूर्वी खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. खराब रस्त्यांबद्दल संबंधित अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी यांनी स्पष्ट केले.

पदाधिकारी ढिम्म
खड्ड्यांच्या संदर्भात पालिकेचे पदाधिकारी अकार्यक्षम ठरू लागले आहेत. महापौर त्र्यंबक तुपे यांनी आदेश देऊनही खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनातर्फे प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले यांना, 'गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांबद्दल काही निर्णय घेणार का' असे विचारले तेव्हा पहावे लागेल, आमची 'प्री-मिटींग' होते, त्यात काय ठरते ते पाहू अशी उत्तरे त्यांनी दिली

---
मटा भूमिका
---
हा छळ थांबवा
---
पावसाळ्यात खड्डे सर्वच शहरांत दिसतात, पण ते बुजविण्यासाठी पालिकांची लगबगही दिसून येते. औरंगाबादेत मात्र रस्ता पालिकेचा असो की, सार्वजनिक बांधकाम खात्याचा. दुरुस्तीचे चित्र दुर्मिळच. ज्यांनी रस्ता केला, ज्यांनी त्यावर देखरेख केली त्यांना खड्ड्यांचे सोयरसुतक नसते, पण पदाधिकाऱ्यांनाही त्याचे गांभीर्य नाही. कदाचित दुचाकी त्यांच्यासाठी इतिहासजमा झाल्या आणि आता कच्च्या रस्त्यांवरून चालू शकणाऱ्या महागड्या एसयूव्ही त्यांच्याकडे आलेल्या असल्यामुळे खड्ड्यांचा त्रास त्यांना होत नसावा. खड्डे चुकविताना दुचाकी आणि चारचाकींचे कित्येक किरकोळ अपघात रोज हाेत आहेत. एकही चौक किंवा रस्ता असा उरलेला नाही जेथे मोठे खड्डे नाहीत. हे खड्डे भर पावसातही 'हाय ग्रेड' सिमेंटने बुजवता येतात, पण तशी इच्छा हवी. पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून नागरिकांचा खड्ड्यांमार्फत केला जात असलेला छळ ताबडतोब थांबवावा. आणखी दोन महिने त्यांचा अंत पाहण्याचे कारण नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची दुर्दशा; आयुक्त हाजीर हो!

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या अवस्थेवर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात होणाऱ्या सुनावणीला महापालिका आयुक्तांनी हजर रहावे, असे तोंडी आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. एल. वडणे यांनी दिले आहेत. या याचिकेची सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.
शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेवर वकील रुपेश जैस्वाल यांनी २०१३मध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेत खंडपीठाने वेळोवेळी दखल घेऊन विविध आदेश दिले आहेत. बुधवारी याचिका सुनावणीस निघाली असता, जैस्वाल यांनी खंडपीठाने वारंवार आदेश देऊनही रस्त्यांची दूरवस्था कशी कायम आहे, याबद्दल शपथपत्र सादर केले. आजवर तयार केलेल्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात होत आहेत. पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्स हॉटलिड प्रकल्प सुरू करण्याचा ठराव ७ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत घेतला. त्यानुसार तीन आठवड्यांत हा प्रकल्प सुरू करण्याचे शपथपत्र सादर केले. प्रत्यक्षात अद्याप तो सुरू केला नाही, असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख तर शासनातर्फे श्रीरंग दंडे हे काम पाहत आहेत.

शपथपत्रातून पोलखोल
- गोलवाडी ते महावीर चौक हा ४ किलोमीटरचा रस्ता १ जानेवारी २०१६ रोजी सुरू करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. अद्याप रस्ता अर्धवट.
- मोंढा नाका उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते तयार करून सहा महिनेही झाले नाहीत, तरी या रस्त्यावर मोठे खड्डे.
- औरंगाबाद-जालना रस्त्यावर २०१५ मध्ये तब्बल ८ कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यावर मोठे खड्डे. त्याचे छायाचित्रच जैस्वाल यांनी खंडपीठात सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्ष्णेयची ‘हर्सूल’ जेलमध्ये रवानगी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विमानतळाचे कंत्राट देण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या व त्यातील १० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला औरंगाबाद विमानतळाचा संचालक आलोक वार्ष्णेय याची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी बुधवारी दिले.
औरंगाबाद येथील विमानतळाच्या 'ग्राऊंड क्लिरन्स' कामाचे कंत्राट देण्यासाठी मालाड येथील 'इंटरनॅशनल एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या सहाय्यक महाव्यवस्थापकाला वार्ष्णेय याने ५० हजारांची लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता १० हजारांचा ठरला होता. याबाबतची तक्रार 'सीबीआय'ला देण्यात आल्यानंतर 'सीबीआय'ने सापळा रचला होता आणि १० हजारांचा लाच प्रत्यक्ष स्वीकारताना वार्ष्णेय याला शनिवारी अटक करण्यात आली. दरम्यान, रविवारी वार्ष्णेय याला कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत सीबीआय कोठडी ठोठाविली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी, आरोपी वार्ष्णेय हा वरिष्ठ अधिकारी असून, त्याच्या घराची व कार्यालयाची झडती घेण्यात आली आहे. त्यात काही आक्षेपार्ह दस्ताऐवज सापडले आहेत. तसेच दिल्लीत एक लॉकर असल्याचेही तपासात स्पष्ट झाले असून, आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती सीबीआयचे विशेष सरकारी वकील डी. एन. म्हस्के यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन आरोपी वार्ष्णेय याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

जामीन अर्ज फेटाळला
आरोपी वार्ष्णेय याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने बुधवारी दिल्यानंतर आरोपीने जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. मात्र, कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे वार्ष्णेय याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images