Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याचे वरदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर रब्बी पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा व करडई या प्रमुख पिकांची पेरणी सुरू असून, ज्वारीचे क्षेत्र तुलनेने वाढण्याची शक्यता आहे. कमी पाऊस पडलेल्या भागात पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
रब्बी पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असल्यामुळे पेरणीचा वेग वाढला आहे. रब्बी ज्वारी प्रमुख पीक असून, जिल्ह्यात ९१ हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या ४१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गव्हाचे क्षेत्र घटले होते. पाणी नसल्यामुळे बागायती क्षेत्र अत्यंत कमी होते. यावर्षी बागायती क्षेत्रात तुलनेने वाढ झाली आहे. जिल्ह्यात गव्हाचे एकूण क्षेत्र ४३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत ५५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कडधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. काही भागात हरभरा पिकाची पेरणी वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के पेरणी झाली आहे. हरभरा पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. तीळ, करडई, जवस, सूर्यफूल या गळीत धान्याच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर आहे. करडईचे सर्वाधिक क्षेत्र असून चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. पाण्याची पाळी देणे शक्य असलेल्या ठिकाणी गव्हाचे पीक घेण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. खरीप हंगाम जास्तीच्या पावसाने हातचा गेला आहे. कापूस, सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान झाले. वाहून गेलेली पिके मोडून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची तयारी केली. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत गव्हाची पेरणी करता येईल. बहुतेक ठिकाणी मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगाम फायदेशीर ठरणार आहे.

फळबागांना फायदा
दुष्काळात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागा जळाल्या होत्या. या बागा तोडून शेतकरी रब्बीची पिके घेत आहेत. विहिरी व तलावात पाणी असल्यामुळे फळबागा आणि ऊस लागवड वाढण्याची शक्यता आहे. कारखान्याला ऊस देण्यापेक्षा काही शेतकरी बेणे विकत आहेत. बेण्याचा प्रतिगुंठे दर असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळत आहे. पुढील वर्षी उसाचे क्षेत्र वाढणार आहे.

रब्बीचे क्षेत्र
जिल्हा.............टक्के
औरंगाबाद.......५१.२९
जालना............८७.२९
बीड...............९१.०५
लातूर..............१०८.३८
उस्मानाबाद......४८.८५
नांदेड.............५२.८०
परभणी...........५९.६५
हिंगोली...........४७.१४
(पेरणीचे एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये)

पुरेसा पाऊस पडलेल्या तालुक्यात रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे. गंगापूर, वैजापूर आणि पैठण तालुक्याच्या काही भागात रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारी, हरभरा व गहू या पिकांचे चांगले उत्पादन होईल.
- डॉ. एस. बी. पवार, कृषीविद्यावेत्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगद बक्कळ; ओसरली खळखळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभूतपूर्व चलन टंचाईमुळे शहरातील बॅँकात निर्माण झालेल्या गर्दीची खळखळ मंगळवारी ओसरली. जवळपास ७०० पैकी ६०० एटीएम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातले ११० एटीएम एसबीआयचे आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळित झाले.
पाचशे व हजारांच्या नोटबंदीमुळे गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांची चलन कोंडी झाली. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांच्या बैठकीत या परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्या तरी सुट्या पैशांमुळे व्यवहारात अडचण निर्माण झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. यावर मंगळवारपासून चलनामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले होते. मात्र, औरंगाबादमध्ये मंगळवारी उशिरापर्यंत बँकांमध्ये या नोटा उपलब्ध झाल्या नाहीत.
या संदर्भात स्टेट बँक ऑफ ‌इंडिया सिडको शाखेचे व्यवस्थापक सुनील शिंदे म्हणाले ‘पाचशे रुपयांच्या नोटासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. बँकेत पाचशे रुपयांच्या नोटा नसल्या तरी व्यवहार सुरळीत सुरू आहेत.’ आज शहरातील बहुतांश बँकेचे व्यवहार सुरळित होण्यास सुरुवात झाली. दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिडको शाखेमध्ये गर्दी, गोंगाट न होता व्यवहार सुरळीत सुरू होते. तर एटीएमवरील गर्दी कमी झाल्याचे चित्र होते.

बड्या व्यवहारांवर दहा पथकांची नजर
नोटबंदीनंतर सोने, वाहन, फर्निचर आदी बड्या व्यवहारांवर विक्रीकर विभागाच्या दहा पथकांनी डोळ्यात तेल घालून करडी नजर ठेवली आहे. केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत अनेकांनी महागड्या वस्तूंसह सोने-चांदी, फर्निचर, वाहने खरेदीचा सपाटा लावल्याचे समोर येत आहे. या व्यवहारातील खरेदी, विक्रीच्या पावत्या तपासण्याची विशेष मोहीम विक्रीकर विभागाने हाती घेतली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संबंधित दालनात नेमकी किती उलाढाल झाली याची नोंद, शिल्लक माल, विक्री व खरेदी झालेला माल यांची आकडेवारी तपासली जात आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात हे काम सुरू असल्याचे विक्रीकर सहआयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. आतापर्यंत नेमक्या किती दुकानांची तपासणी करण्यात आली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, सर्वच व्यवहार बारकाईने तपासले जात असून संशयास्पद व्यवहाराचे आकडेवाडी, माहिती तपासणी अंती स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

बँकेसमोर रांगेत मारामारी; एक जखमी
पाचशे व हजार रुपयांच्या रद्द नोटा बदलून घेण्यासाठी लागलेल्या रांगेत मारामारी झाल्याचा प्रकार तालुक्यातील काटशिवरी फाटा (गदाना) येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेसमोर मंगळवारी सकाळी घडला. या मिनी बँक शाखेत मंगळवारी सकाळी सकाळी १०.३० वाजता संजय कचरू अधाने (रा. गदाना) हे रांगते थांबले होते. तेव्हा, त्यांना माझ्यापुढे का जात आहे, असे म्हणून शिवीगाळ करण्यात आली. यावेळी झालेल्या मारामारीत हातातील कड्याने अधाने यांचे डोके फुटले असून गंंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी गंभीर अवस्थेत गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संजय अधाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन उत्तम वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप सोळुंके तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ वाहन विक्री दाखविली दिवाळीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीनंतर वाहन विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. अनेकांनी आठ नोव्हेंबरनंतर वाहन खरेदी करून ती दिवाळीत म्हणजे ऑक्टोबरबमध्ये खरेदी केल्याचे दाखवले. या प्रकरणी आरटीओने वाहन डिलर्सची कसून चौकशी सुरू केली आहे.
आठ नोव्हेंबरनंतर झालेल्या वाहन विक्री परिणामांची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने मागवली होती. त्यानुसार आरटीओने चौकशी केली असता तब्बल २४५ टक्के वाहन विक्री वाढल्याची माहिती समोर आली. यानंतर दिवाळीत किती वाहने विकली आणि नोटबंदीनंतर किती वाहनांची विक्री झाली याची तपासणी आरटीओ कार्यालयाने सुरू केली.
वाहन डिलर्सने ग्राहकांना गाडी विकल्यानंतर एक सेलडिड देण्यात येते. या सेल डिडवर नोटाबंदीनंतरची तारीख आहे का? याचा शोध सुरू आहे. आरटीओने ही माहिती घेतल्यानंतर नोटबंदीच्या काळात आणखी २,३४० वाहनांची जास्त विक्री (२६ टक्के) झाल्याची माहिती समोर आली.

पितळ उघडे पडले
वाहन खरेदी-विक्री व्यवहाराची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. यात अनेक डिलर्सनी वाहन विक्री व्यवहार नोटबंदीपूर्वी दाखवून काळेबेरे केल्याचे समजते. मात्र, उर्वरित कागदपत्रांची नोटबंदीनंतर पूर्तता केल्याने हे पितळ उघड पडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांची नोटबंदी; ‘आरबीआय’ला नोटीस

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकेत केंद्र, राज्य सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मंगळवारी न्या. आर. एम. बोर्डे व न्या. एस. एस. पाटील यांनी नोटीस बजावली.
सहकारी बँकांशी केलेल्या दुजाभावाविरोधात धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य किरण गुलाबराव पाटील यांनी जनहित याचिका केली आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टनुसार परवाना असतानाही नोटा स्वीकारणे व बदलण्यास मनाई करण्यात आली आहे, हे निर्बंध हटविण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
केंद्राने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला व जुन्या नोटा बदलण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत दिली. सरकारी, खासगी बँकांना नियमानुसार नोटा बदलण्याचा अधिकार देण्यात आला. त्यात शिखर सहकारी बँकेचा समावेश होता, पण जिल्हा बँकाना संधी देण्यात आली नव्हती.
या याचिकेची सुनावणी मंगळवारी झाली. त्यावेळी मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात याच प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. या सर्व याचिका वर्ग करण्यात येऊन त्यावर एकत्रित सुनावणी घेण्याचा अर्ज केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी खंडपीठात याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ पी. एम. शहा व अमोल सावंत यांनी बाजू मांडली. केंद्र शासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर संजीव देशपांडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने श्रीकांत अदवंत, राज्य शासनातर्फे अमरजीतसिंह गिरासे यांनी म्हणणे मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीचा निर्णय रद्द करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीचा निर्णय रद्द करा, दोन हजारांच्या नोटा बंद करा, सर्वसामान्य नागरिकांना पुरेसे सुटे पैसे उपलब्ध करून द्या, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी औरंगपुरा येथे निदर्शने केली.
महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ झालेल्या आंदोलनात काळा पैसा जाहीर करा, लोकांच्या बँक खात्यात १५ लाख कधी येणार जवाब दो, जवाब दो आदी घोषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनामध्ये मनोहर टाकसाळ, राम बाहेती, अशफाक सलामी, अभय टाकसाळ, प्रकाश बनसोड, देविदास राजळे, एस. एन. नईम, विकास गायकवाड, संदीप पेठे, संजय भूमकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी भाकपच्या वतीने ‘पैसा सर्वसामान्यांचा, फायदा धनवंतांचा’ या पुस्तिकेची विक्री करण्यात आली. केंद्र सरकारने अचानक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे देशभरात खळबळ माजली. भाजी विक्रता, रिक्षावाला, किराना दुकानदारांजवळ ग्राहकांना परत देण्यासाठी सुटे पैसे नाहीत. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या असून सरकार दररोज नवनवीन निर्णय घेत असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे भाकपच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लांब केसांनीच त्याचा कापला गळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुकान फोडणाऱ्या संशयिताचा गळा त्याच्या लांब केसांनीच कापला. केवळ सीसीटीव्ही फुटेजमधील संशयावरून एका चार्लीने पकडलेला आरोपी अट्टल गुन्हेगार निघाला. मात्र, त्याच्या दोन साथीदारांनी पोबारा केला. चित्रपटाला साजेशी असणारी ही घटना सोमवारी रात्री गारखेड्यातल्या सूतगिरणी चौकात घडली.
सूतगिरणी चौकात जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पीएसआय आहेर व त्यांचे पथक तसेच चार्ली पथकाचे संदीप देशमुख, विनोद गायकवाड प्रवीण बळीराम व राजेंद्र बडे हे रात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी एसबीएच बँकेच्या एटीएमजवळ त्यांना एका दुचाकीवर तीन संशयित आढळले. या तिघांना पोलिसांनी हटकले असता त्यांनी पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला, तर दोघे पसार झाले. पकडलेल्या आरोपीचे नाव शुभम विलास सोनवणे (रा. जयभवानीनगर) असे असून त्याच्या ताब्यातून एक पांढरी गोणी पोलिसांनी जप्त केली. यात चाकू, टॉमी, दोरी, मिरची पूड, फायटर आदी साहित्य ‌सापडले. पलायन केलेल्या आरोपीमध्ये कुख्यात गुन्हेगार शुभम भिकुलाल जाट (रा. शिवाजीनगर) व सचिन उत्तमराव कळसकर (रा. जयभवानीनगर) यांचा समावेश आहे. उल्कानगरी भागात घरात घुसून जबरी चोरी करण्यासाठी येत असल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून घरफोडीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त राहुल श्रीरामे, एसीपी खुशालचंद बाहेती, माणिक बाखरे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, मनिष कल्याणकर, एपीआय गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अन् सुगावा लागला
त्रिमूर्ती चौकातील परिधान ड्रेसेस हे रेडिमेड कपड्याचे दुकान दोन चोरट्यानी फोडले होते. तोंडाला कपडा बांधलेल्या या चोरापैकी एका चोरट्याचे केस लांब होते. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हे फुटेज या चार्ली पथकाकडे होते. शुभमला पकडल्यानंतर त्यांना लांब केसावरून संशय आल्याने त्यांनी फुटेज तपासले. यानंतर हा आरोपी शुभमच असल्याचे उघड झाले.

वीस हजारांचे बक्षीस
आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या पोलिस पथकाचा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वीस हजार रुपयांचे बक्षीस देत गौरव केला आहे. या पथकामध्ये पीएसआय आहेर, जमादार फारुक देशमुख, माणिक हिवाळे, पांडुरंग तुपे, चार्ली पथकाचे संदीप देशमुख, विनोद गायकवाड, प्रवीण बाळाराम व राजेंद्र बडे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीसाठी मालमत्ता सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कराची एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांच्या मालमत्ता सील करा, त्यांची नावे वृत्रपत्रातून प्रसिद्ध करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार अशा बड्या थकबाकीदारांची यादी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोट बंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीत ९ नोव्हेंबरपासून २१ नोव्हेंबरपर्यंत १३ कोटी १० लाख रुपयांचा कर जमा झाला. या वसुलीचा आढावा बकोरिया यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. जुन्या नोटांच्या माध्यमातून २४ नोव्हेंबरपर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्यानंतरही कर वसुलीच्या कामात गती राहिली पाहिजे, अशी सूचना बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यासाठी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता सील करा, असे आदेश त्यांनी दिले. अशा थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर करमूल्य निर्धारक व संकलक विभागाने थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. दोन दिवसांत यादी तयार होईल आणि त्यानंतर जप्तीच्या कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
ज्या नागरिकांनी किंवा बांधकाम व्यावसायिकांनी घर बांधण्यासाठी, गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बांधकाम परवानगी घेतली आहे, पण भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही, अशा व्यावसायिकांना बांधकाम परवानगीच्या तिप्पट दंड आकारा व त्यांच्या मालमत्तांना कर आकारणी करा, असे आदेशही बकोरिया यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या मालमत्तांची संख्या सुमारे दहा हजार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांधकाम परवानगी घेतली, पण भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही याची माहिती तात्काळ मिळण्यासाठी नगररचना विभागाचे स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्याची सूचनाही बकोरिया यांनी केली.

आठवड्यातून एक दिवस कर आकारणीसाठी
मोठे गृहनिर्माण प्रकल्प आणि नव्याने केली जाणारी बांधकामे यांना मालमत्ता कर आकारण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करा. त्या दिवशी फक्त कर आकारणीचेच काम करा, असे आदेश आयुक्त बकोरिया यांनी कर आकारणी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अशा मालमत्तांची यादी करण्याची सूचनाही त्यांनी केली.

मटा भूमिका ः दट्ट्या हवाच
नोटबंदी जाहीर होताच शहरातील ‘गरीब’ नागरिकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची महापालिकेवर अशी बरसात केली की, आजपर्यंत झाली नव्हती एवढी वसुली झाली. नागरिकांकडे पैसे नाहीत म्हणून ते कर भरू शकत नाहीत, हा समज खोटा ठरला. राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखो रुपयांचा कर थकवून आपले कोणी काहीही करू शकत नाही, हा बड्या मंडळींचा खाक्या पालिका आयुक्तांनी हाणून पाडला आहे. त्यामुळे नियमित कर भरणाऱ्यांना यातना आणि करबुडव्यांना सुविधा, हे चित्र बदलण्यास मदत होईल. आयुक्तांनी करबुडव्यांची नावे जाहीर करावीत, जेणे करून या शहराला समस्यांच्या दरीत लोटणारे कोण आहेत, हे करदात्यांनाही कळेल. शिवाय त्यांच्याकडून रग्गड दंड वसूल करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हर डाउन; परीक्षा अर्ज रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. सर्व्हर डाउन असल्याने अर्ज भरण्यास एक तासाभरापेक्षा अधिक वेळ लागत आहे. सायंकाळी उशिरा अर्ज भरण्याची वेळ शाळांवर आली आहे. तशा तक्रारीही मंडळाकडे मोठ्या प्रमाणात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहावीसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून सुरू आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु वेबसाइट वारंवार हँग होत असल्याने परीक्षा अर्ज भरण्याच्या अडचणीत भर पडली. शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता २८ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करता येणार आहेत. असे असले तरी तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का, असा प्रश्न शाळा व्यवस्थापना सतावत आहे. औरंगाबाद विभागातून दहावीला सुमारे पावणेदोन लाख आणि बारावीला दीड लाख विद्यार्थी नोंदणी करतात. प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी काही मुख्याध्यापकांनी केल्याचेही मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.

जन्मस्थळाचीही नोंद
मंडळाने अर्जासोबत जन्मस्थळाची नोंद करण्याच्याही सूचना शाळांना दिल्या आहेत. अर्ज भरताना आधारकार्ड क्रमांकही घेतला जात आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांचा आधार कार्ड नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल, त्यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांचे हमीपत्र आवश्यक असेल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज भरताना उशीर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, परंतु सध्या प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. तक्रारी करणाऱ्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
- वंदना वाहुळ, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजी ब्रिगेडच्या पक्षाची ३० नोव्हेंबरला घोषणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संभाजी ब्रिगेड संघटनेला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी मुंबई येथील रंग शारदा सभागृहात संभाजी ब्रिगेड या पक्षाची अजेंड्यासह अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पक्षाच्या लाँचिंगसाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, आ. ह. साळुंके, मा. म. देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. पक्षाचा झेंडा, लोगोला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली असून, लाँचिंगचे गीत दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी कंपोज केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संघटनेला राजकीय मान्यता मान्यतेनंतर प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये पक्षाच्या लाँचिंगच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

जिल्हा परिषद, पंचायत समिती लढविणार
सांगली येथे २०१५मध्ये झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय पक्ष स्थापनेचा निर्णय झाला होता. फुले-शाहु-आंबेडकर यांचा विचारांवर चालणारा हा पक्ष राजकारणातही शंभर टक्के समाजकारण करणार असून, शेतीमालाला हमी भाव, दारूमुक्त गाव यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात पंचायत समिती व जिल्हा परिषदांसह सर्व निवडणुका पक्ष लढवणार असल्याचे डॉ. भानुसे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाल्मीकिरामायण’चे शुक्रवारी प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी पाच वर्षे रामायणावर ८८ प्रवचने दिली. या प्रवचनांचे संपादित रूप असलेल्या ‘वाल्मीकिरामायण’ ग्रंथाचे शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) प्रकाशन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन होईल, अशी माहिती प्रकाशक साकेत भांड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे. रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे, परंतु मूळ वाल्मीकिरामायण समोर ठेवून त्यावर मराठीत प्रवचन देणे महत्त्वपूर्ण आहे. जलतज्ज्ञ चितळे यांनी पाच वर्षांत वाल्मीकिरामायणावर ८८ प्रवचने दिली. त्याचे संपादित रूप ‘वाल्मीकिरामायण’ ग्रंथ आहे. वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून नुसती रामकथा नाही. त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, चालीरीती, राज्यव्यवस्था, राजाकडून असलेल्या अपेक्षा, मानवी संबंध अशा अनेक विषयांची विस्तृत मांडणी आहे. चितळे यांनी १९५८पासून मूळ वाल्मीकिरामायणाचा अभ्यास केला आहे. जवळपास ५० वर्षांच्या मनन, चिंतनातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. विजया चितळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संकलित केलेल्या प्रवचनांचे आशा देवधर यांनी संपादन केले आहे. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन साकेत प्रकाशनने केले आहे. या पत्रकार परिषदेला साकेत भांड, प्रतिमा भांड, सारंग टाकळकर, ज्योती नांदेडकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय शिक्षकांना मनशक्तीचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मेंदूशास्त्र म्हणजे काय, उजव्या मेंदूचा विकास कसा करायचा, स्वभावानुसार विद्यार्थ्यांचे गुण, दोष कसे ओळखायचे, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी काय करावे, याचे धडे औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक सध्या गिरवित आहेत. शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ‘ज्ञानवर्गा’चे आयोजन केले आहे.
मुलांच्या स्वभावानुसार, कलानुसार शिकविण्यावर अनेक शिक्षक वेगवेगळ्या कल्पना राबवितात. त्यात विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र कसे ओळखायचे, त्यांच्यातील चांगले गुण वाढविण्यासाठी, दोष कमी करण्यासाठी काय करायला हवे. अभ्यासातील एकाग्रता कसे वाढविता येईल, याबाबत शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी हे ज्ञानवर्ग आयोजित केले आहेत. मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या मदतीने हे वर्ग भरविण्यात आले आहेत. महात्मा गांधी मिशनच्या रुक्मिणी सभागृहात हे ज्ञानवर्ग सुरू अाहेत. दिवसभरात सहा सत्रातून शिक्षकांना मार्गदर्शन केले जात आहे.
दीड तासाच्या वर्गात ‌शिक्षकांना शिक्षण म्हणजे काय, त्याचा उद्देश काय इथपासून ते विद्यार्थ्याला कसे समजून घ्यायचे, मुलांच्या व्यक्तिमत्वातील गुण ओळखत त्याला कसे बळ द्यायचे, दोष असतील, तर ते कमी करण्यासाठी काय करायला हवे, याबाबत मार्गदर्शन केले जाते. मेंदूशास्त्राचा विकास याची ओळख करून दिली जाते. चार दिवस हे वर्ग चालणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

या मुद्द्यांवर भर
शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शना बारा गुणांवर भर देण्यात येतो. चांगले वागणे, कृतज्ञता बुद्धी, क्रीडा कौशल्य, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्व अशा मुद्द्यांचा समावेश आहे. हे मार्गदर्शन म्हणजे विज्ञानमार्गाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

शिक्षण म्हणजे केवळ शिकवणे, शिकणे असे होत नाही. त्याचा उद्देश काय हे शिक्षकांना कळावा हा या मार्गदर्शनामागचा हेतू आहे. विद्यार्थ्याची वर्गातील एकाग्रता कशी वाढेल, त्यांच्या मेंदूचा विकास कसा होईल यांबाबत आम्ही मार्गदर्शन करतो.
- मयूर चंदणे, मार्गदर्शक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : लढवय्या उद्योजक

$
0
0

nikhil.nirkhee@timesgroup.com
Tweet : nnirkheeMT
देशमुख कुटुंबीय औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील देऊळबाजार गावचे. शिवाजी यांचे वडील (कै.) व्यंकटराव देशमुख हे शेतकरी होते आणि घरात शिक्षणाचे फारसे वातावरण नव्हते. तरीही शिवाजी यांनी गावात दहावीपर्यंतचे शिक्षण जिद्दीने घेतले आणि आयटीआय करण्यासाठी औरंगाबाद गाठले. १९८२मध्ये आयटीआय झाल्यानंतर चिकलठाणा परिसरातील एका युनिटमध्ये ट्रेनी ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली. कामाच्या गुणवत्तेमुळेच पुढच्या काही महिन्यांत जालना एमआयडीसीतील एनआरबी कंपनीत ट्रेनी ऑपरेटरची संधी मिळाली. मशीनमधील प्रत्येक गोष्ट सर्वांगाने शिकण्याची वृत्ती आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसण्याची तयारी असल्यामुळेच वरिष्ठांचे लक्ष वेधल्या गेले नसते तरच नवल. याच ध्यासामुळे काम करताना १६-१६, १७-१७ तास कुठे जात होते, हे त्यांचे त्यांना कळत नव्हते. एखादा तांत्रिक पेच उभा राहिला, तर तो यशस्वीपणे सुटेपर्यंत स्वस्थ न बसण्याच्या वृत्तीमुळेच त्यांची ऑपरेटरवरून टेक्निशियन पदावर पदोन्नती करण्यात आली. अर्थात, या पदोन्नतीलादेखील एक सशक्त कारण घडले. शिवाजी यांची तल्लख बुद्धी व कामातील गुणवत्तेमुळेच कोलकात्याच्या एका मान्यताप्राप्त कंपनीत त्यांना वरच्या पदाची ऑफर आली आणि ही संधी न सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळेच त्यांनी ‘एनआरबी’मध्ये राजीनामा दिला; परंतु त्यांचा राजीनामा कंपनीने स्वीकारला नाही आणि कोलकात्याची संधी याच कंपनीत देण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापन-तांत्रिक कौशल्यामुळेच चार वर्षांत सिनिअर इंजिनिअर व त्यापुढील सहा वर्षांत सुप्रिटेंडंट म्हणून पदोन्नती मिळाली. इंजिनिअरच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त झोकून देऊन काम करणाऱ्या शिवाजी यांच्या कामातील अचुकतेमुळेच त्यांच्या पुढ्यात असिस्टंट मॅनेजरची संधी उभी ठाकली होती, मात्र मनात काहीतरी वेगळेच होते. शिवाजी यांच्यासोबत काम केलेले त्यांचे जिवलग मित्र आणि औरंगाबाद येथील उद्योजक राजेश मानधनी यांच्या सहवासामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे आणि औरंगाबाद येथील उद्योजकीय वातावरणामुळे आपणही छोटा-मोठा उद्योग सुरू करावा, हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यावेळी मोठी मुलगी ‘बीएएमएस’च्या पहिल्या वर्षाला होती व मुलगा दहावीत होता. मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैसा लागला तर कुठून आणायचा, हाही विचार मनामध्ये डोकावत होता. हा विचार त्यांनी पत्नीजवळ मांडला आणि पत्नीने लगेच पाठिंबा दिला. हाच विचार त्यांनी त्यांचे मित्र मानधनी यांना बोलून दाखविल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले नसते तरच नवल. शिवाजी यांचे ‘फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइड’ डॉ. भालचंद्र कानगो यांनीही हिम्मत दिली.

‘डू ऑर डाय’ या मनस्थितीतून त्यांनी वाळूज येथे युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘एनआरबी’ने तेव्हाही त्यांना थांबवण्याचा, नवीन संधी देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना विचार पक्का होता आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःचे जालन्यातील घर चार लाखाला विकले, ५० हजारांचे सेव्हिंग होते व काही प्रमाणात पीएफचे पैसे, असा साडेसहा लाखांचा निधी उभा राहिला. त्याचवेळी ‘एनआरबी’तील जिवाभावाच्या मित्रांनी शिवाजी यांच्यासाठी कर्ज घेतले. या आठ लाखातून वाळूज एमआयडीसीमध्ये छोटेखानी भाड्याची जागा व मशीन घेऊन वयाच्या ४३ व्या वर्षी ‘परफेक्ट इंजिनिअररिंग वर्क्स’ हे युनिट सुरू करून मिळेल ते काम सुरू केले. सर्व प्रकारची कामे करून सुरुवातीच्या काही महिन्यांत फक्त दहा-बारा हजारांचा व्यवसाय होत होता, तर नोकरी सोडताना ३२ हजार वेतन मिळत होते. या स्थितीमुळे आर्थिक घडी विस्कटली होती. तरीदेखील सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून घर-युनिट सुरू होते. एकच माणूस कामासाठी ठेवला होता आणि दोघे मिळून प्रेस टूल, गेजेसेस, फिक्स्चर्सचे काम करत होते. तारेवरची कसरत सुरू असतानाच अवघ्या सहा महिन्यात त्यांची कुठलीही चुकी नसताना समोरुन येणारा दुचाकीस्वार त्यांच्या स्कुटरला जोरात धडकला आणि यात त्यांचा एक पाय शब्दशः तुटून लुळा पडला. प्रचंड वेदना होत होत्या. मदतीला कोणीही धावून येत नव्हते. तशाही स्थितीत त्यांनी फोन करून मित्र मानधनी यांना घडला प्रकार सांगितला आणि मानधनी यांनी शिवाजी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. स्वतःचा उद्योग सुरू करताना स्वतःजवळील सगळी पुंजी त्यांनी उद्योगात लावली होती व बचत शून्य होती. त्यातच कंपनी सोडल्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी बंद पडली होती व उपचार करण्यासाठीही पैसे नव्हते. अशा अत्यंत कठीण काळात त्यांचे मित्र मानधनी धावून आले आणि शिवाजी यांच्यावरील उपचारांचा सगळा ८०-९० हजारांचा खर्च स्वतः केला. त्यांना डॉक्टरांनी आराम सांगितला होता, परंतु आपण घरी पडून राहिलो तर नुकतेच सुरू केलेले युनिटचे काय होणार, या विवंचनेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही आणि अपघातानंतर २०व्या दिवशी ते रिक्षाने युनिटमध्ये जाणे-येणे सुरू केले. एकाजागी बसून राहून सूचना देत, प्रश्न सोडवत काम सुरू केले. काय वाट्टेल ते झाले तरी जिंकणारच, या जिद्दीतून त्यांनी दिवस-रात्र काम सुरू केले आणि त्याचेच फळ म्हणून २००७पासून त्यांना कधीच मागे वळावे लागले नाही. त्यांच्या दर्जात्मक कामामुळेच ज्या कंपनीत दोन दशकांपेक्षा जास्त काळ जीव ओतला त्या ‘एनआरबी’नेही त्यांना काम देऊन मोठा विश्वास टाकला आणि तो विश्वास त्यांनी सार्थ करून दाखविला.

अनेकांना उद्योजक म्हणून घडवले
‘एमआरबी’प्रमाणेच ग्रीव्हज कॉटन, लोंबार्डिनीसह रांची येथील एसएनएल बिअरिंग्ज व पंतनगर येथेही आज त्यांची उत्पादने पाठविली जातात. मुळात कठीण कामात घुसायचे आणि जे इतर उद्योजक तयार करणार नाही, ते तयार करायचे आणि तेही दर्जा व अचुकतेसह, अशी जिद्द असल्यामुळेच शिवाजी यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार नियोजनपूर्वक केला. आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल एक कोटीवर गेली आहे. एवढ्या दहा वर्षांत एकही तक्रार कोणाकडूनही आली नसल्याचे ते आवर्जुन सांगतात. वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी असेल, संयम, हिम्मत असेल तर तरुणांनी जरुर उद्योगाकडे यावे, असेही ते म्हणतात. आज त्यांचा इंजिनिअर मुलगा व सूनदेखील उद्योगात आले आहेत आणि ते जमिनीवर राहून मोठ्या कष्टाने उद्योग पुढे नेत आहेत. सामाजिक कामातही ते अग्रणी आहेत आणि ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेच्या विकासासाठी त्यांनी दीड लाख रुपयांचा निधी दिला. कंपनीत काम करणाऱ्या किमान चारजणांना त्यांनी उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, प्रोत्साहन दिले आणि कामही मिळवून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबदल: महाबँकेचा अधिकारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिझर्व्ह बँकेने नोट बदलून देण्यासाठी केलेले नियम मोडून एका व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात नोटा बदलून दिल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र बँकेच्या उदगीर शाखेतील अधिकाऱ्यासह अन्य तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. नागरिकांकडे असलेल्या नोटा बदलून देण्याचे काम १० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. नोटा बदलून देण्यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. उदगीर येथील महाराष्ट्र बँकेतील अधिकारी विकास कदम आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन शंभर रुपयांच्या नोटा दिल्याचा संशय आहे. नोटा बदलून देण्याचा नियम मोडून गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे अधिकारी कदम व तीन रोखपालांना निलंबित केल्याची माहिती महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक महेश बन्सवाणी यांनी दिली.
महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक उदगीर येथे गेले आहे. ते या गैरप्रकाराची तपासणी करीत आहे, असेही बन्सवाणी यांनी सांगितले. महाराष्ट्र बँकेच्या या शाखेतून व्यापाऱ्याला सुमारे २० लाख रुपयांच्या नोटा बदलून दिल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीओटी प्रकल्पांचे काम थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर सुरू करण्यात आलेले प्रकल्प आहे त्या स्थितीत ताब्यात घ्या, असे आदेश महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी दिले. आयुक्तांनी या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत.
महापालिकेने २००६पासून ‘बीओटी’तत्वावर बांधकाम करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सिद्धार्थ उद्यानात फूड प्लाझा, रेल्वे स्टेशनजवळ व्यावसायिक संकुल, जालना रोडवर दोन व्यापारी संकुले, शहानूरवाडी येथील धोबी घाटाच्या जागेवर युरोपिअन मार्केट उभारण्याची योजना आखण्यात आली. यापैकी फूड प्लाझा आणि युरोपिअन मार्केटचे काम रखडले आहे. औरंगपुरा भाजी मंडई, शहागंज भाजी मंडई आणि वसंत भवन येथील व्यापारी संकुल ही कामे चार वर्षांपूर्वी नव्याने बीओटी मध्ये घेण्यात आली. त्यापैकी एकही काम अद्याप पूर्ण झाले नाही. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर, ‘आहे त्या स्थितीत या प्रकल्पांचे काम थांबवा आणि प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात घ्या,’ असे आदेश बकोरिया यांनी दिले. त्यामुळे १६ वर्षांपासून सुरू असलेला बीओटीचा खेळ संपेल, असे मानले जात आहे.
शहरातील मोबाइल टॉवर्सचे मूल्यमापन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अनधिकृत टॉवर्स दंड आकारून नियमित करा. एका टॉवरचा उपयोग अनेक ऑपरेटर करीत असतील तर त्या टॉवरचा कर वाढवा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

अपूर्ण बीओटी प्रकल्प
- सिद्धार्थ उद्यानातील फूड प्लाझा ः बांधकाम एक दशकापासून सुरू
- वसंत भवन ः पूर्णत्वाची मुदत १८ महिने, तीन वर्षांनंतरही काम सुरूच
- औरंगपुरा भाजी मंडई ः पूर्णत्वाची मुदत १८ महिने, तीन वर्षांनंतरही अद्याप काम सुरू झाले नाही
- शहागंज भाजी मंडई ः पूर्णत्वाची मुदत १८ महिने, तीन वर्षांनंतरही अद्याप काम सुरू झाले नाही.
- शहानूरवाडी येथील युरोपिअन मार्केट ः पाच वर्षांपासून काम सुरूच आहे, सध्या आठवडी बाजार भरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११० अतिक्रमणे हटविणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंबेडकर नगर ते जळगाव टी पॉइंट मार्गावरील ११० अनधिकृत बांधकामांवर ८ डिसेंबरपासून हटविण्यात येणार आहेत. या बांधकामधारकांना पालिकेकडून नोटीस देण्याचे काम सध्या सुरू आहे.
वसंतराव नाईक ते जळगाव टी पाइंट रस्ता तयार करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने १५ मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड सोडण्यात आला होता. या रस्त्यावरील हॉटेल लेमन ट्री ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतचा सर्व्हिस रोड रस्ता सध्या उपयोगात आहे. मात्र, गरवारे कंपनीनंतर आंबेडकर नगर समोरील सर्व्हिस रोड आंबेडकर नगर ते जळगाव टी पॉइंटपर्यंत अतिक्रमणामुळे बंद झाला होता. ‌या बाबत महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद टाइम्समध्ये ६ मे रोजी बातमीही प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर अतिक्रमण हटविण्याबाबत नागरिक आणि नगरसेवकांनी मागणी केली. नगरसेवक विजय औताडे यांनीही प्रयत्न केले. या रस्‍त्यावर सर्व्हिस रोड नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे मत या रस्त्याची पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केले होते. या पाहणीनंतरच हे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. उपायुक्त रवींद्र निकम, नगररचना विभागाचे कारभारी घुगे, गंगाधर भांडणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय विभागाचे अधिकारी एस. एस. कुलकर्णी, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद तसेच अतिक्रमण हटाव पथक तसेच वॉर्ड अधिकारी कार्यालयाकडून आंबेडकर नगर ते जळगाव टी पॉइंट रस्‍त्यावरील अतिक्रमीत बांधकाम धारकांना नोटीस देण्याचे काम मंगळवारपासून सूरू करण्यात आले आहे. ७ डिसेंबरपर्यंत रस्त्यावरील बांधकामे हटविण्याची सूचना नोटीसमधून करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांनी सहा दुकाने हटविली
आंबेडकर नगर ते जळगाव टी पॉइंटच्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळताच या रस्त्यावरील सहा ते सात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने हटवून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘परळी पालिकेच्या चाव्या पंकजांकडे द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
परळी वैजनाथ हे शहर राजकीयदृष्ट्या वजनदार शहर म्हणून देशात परिचित आहे. या शहराने अद्वितीय लोकनेता घडवला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचे सरकार राज्यात आहे. हे सरकार परळीचे आहे. पंकजांच्या रुपाने परळीची राज्यात सत्ता असून नगरविकास विभागाच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. सर्वांग सुंदर परळीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजांच्या ताब्यात नगरपरिषद देऊन विकासाची साखळी पूर्ण करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केले.
भाजपा-शिवसेना-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अरूणोदय मार्केट मैदानावर सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड, जेष्ठ नेते मदेव आघाव, अशोक जैन, विनोद सामत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे,चंद्रकांत नवले, रिपाइं नेते धम्मानंद मुंडे, भाजप जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके उपस्थित होते.
दरम्यान, विकासाचे बेलपत्र वैद्यनाथाला वाहण्यासाठी नगरपरिषद ताब्यात द्या अशी मागणी मी तुमच्याकडे करत आहे, असे सांगून परळीच्या स्वाभिमानी जनतेच्या विश्वासावर व बळावर नगरपरिषद जिंकणारच असा आत्मविश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. तर शिवसेना कर्तृत्ववान बहिणींच्या सदैव खंबीरपणे पाठीशी उभी असल्याची ग्वाही अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ‘आघाडी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शहरे बकाल झाली. महायुतीच्या शासनाने शहरे विकसित करण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण यासह विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. दहा वर्षांपासून बंद असलेल्या योजना पूर्ण करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून प्रलंबित सर्व कामे मार्गी लावू, त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. घनकचरा निरूपयोगी नसून त्यापासून खत, विद्युत निर्मिती आदी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. घनकचऱ्यांच्या खतास मागणी वाढत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या कामात पारदर्शकता, गतीशिलता व गुणवत्ता येण्यासाठी यंत्रणा राबवली जाणार आहे.’ सभेचे सूत्रसंचालन सचिन स्वामी यांनी तर आभार उमेश खाडे यांनी मानले. या सभेला जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...विशेष मुलांसह पालक, शिक्षकही रमले खेळानंदात!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर रोज खेळाडूंची लगबग असते. मात्र, बुधवारी विशेष मुले, त्यांचे पालक व शिक्षकांची गजबज होती. आयकॉन सेंटरच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्‍त सेंटरच्या स्पेशल एज्युकेशन अॅँड थेरेपी ग्रुप आय प्रोग्रेसच्या वतीने ‘खेळानंद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खेळानंदमध्ये सकाळी अकरा ते दुपारपर्यंत मुलांसाठी विविध कार्यक्रम व खेळ घेण्यात आले. इस्कॉन अन्‍नामृतचे जगदिया पोटभरे, उद्योजिका डॉ. ज्योती दाशरथी, जयंत गलांडे, बजाज समाज सेवा केंद्राच्या सुनिता तगारे, नवजीवन संस्‍थेच्या विश्वस्त शर्मिला गांधी, डॉ. प्रिया भाले, मंजुषा राऊत, मानसतज्ज्ञ मधुरा अन्वीकर, डॉ. अंजली बॅँगलोर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. अध्यक्षस्‍थानी डॉ. विक्रांत पाटणकर होते. यावेळी आयकॉन सेंटरसह आरंभ ऑटिझम सेंटर, स्वयंसिद्धा संस्‍था, उत्कर्ष कर्णबधीर संस्‍था, यलो स्कूल, नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अॅँड रिहॅबिलीटेशन ऑफ मेंटली रिटार्टेड संस्था, त्वरितादेवी शाळा, कानिफनाथ शाळा, बजाज समाज सेवा केंद्र, छावणीचे उड्डान सेंटर, असिसी आशा निकेतन या शाळातील दोनशेपेक्षा जास्त मुले उपस्थित होते. वयाप्रमाणे मुलांचे गट करून बादलीत चेंडू टाकणे, बॉक्सवरून चालणे, तीन पायांची शर्यत, पास द पास सारखे विविध खेळ घेण्यात आले. तर शिक्षकांसाठीही पास द पास खेळ घेण्यात आला. एरवी मुलांमध्ये रमणाऱ्या शिक्षकांना हा चांगला बदल तर होताच, पण आपल्या शिक्षकांनाही अशाप्रकारे धावताना पाहून मुलांनाही आश्चर्य वाटले. या उपक्रमासाठी इस्कॉन, सिपला व मराठवाडा सांकृतिक मैदानानेही सहकार्य केले. डॉ. माधवी शेळके यांनी परिचय करून दिला. तर आयकॉनच्या अर्चना जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रतिमा वेलदोडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष असावा व सुनील महाकाल यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्‍त्र विभागाचे विद्यार्थ्यांनीही सहकार्य केले. आयकॉनतर्फे सदोष व्यक्तीमत्व असणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांसाठी चाचणी व समुपदेशन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पालकांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी आयकॉन सेंटर, २०१, समर्थनगर येथे संपर्क करावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयकॉनच्या स्वाती सौंदणकर, राजेंद्र जाधव, वत्सला तावरे, रश्मी शर्मा, सगुणा मराठे आदींनी परिश्रम घेतले.

खेळानंदचे हे तिसरे वर्ष आहे. यानिमित्‍ताने विशेष मुलांच्या संस्‍था एकत्र येतात व मुलांसाठीही वेगळा अनुभव असतो. वर्धापन दिन अशा पद्धतीने साजरा करावा, ही माझी कल्पना प्रत्यक्षात येताना खूप समाधान वाटते. - अर्चना जोशी, आयकॉन संस्‍था

खेळानंदमध्ये विशेष मुले, पालक व शिक्षकांना सहभागी करून घेतल्याने सर्वांनाच कार्यक्रमाची उत्सुकता असते. समाजातील दानशूरांकडून‌ही उपक्रमाला मदत होते. सर्वांसोबत वर्धापन दिन साजरा करणे खूप चांगला अनुभव आहे. - मधुरा अन्वीकर, मानसतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादचा कायापालट घडवू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद नगरपालिकेच्या कारभारची सूत्रे भाजपच्या हाती द्या, उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देऊन नगरप‌ालिकेच्या माध्यमातून शहराचा कायापालट घडवू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादेत दिली.
नगरपालिका निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला उस्मानाबादकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन काळे आदींची उपस्थितीती होती.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्‍यमातून सर्व झोपडपट्टीधारकांना घरकुल देण्यात येतील अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या योजनेचे काम यापूर्वीच राज्य सरकारने सुरू केले आहे. मात्र, याचे श्रेय लाटण्याचा उद्योग राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. उस्मानाबाद नगरपालिकेतील टक्केवाराचा कारभार सर्वश्रृत आहे. भाजपची सत्ता येताच येथील गोरखधंदे बंद केले जातील. नगरपालिका कारभार पारदर्शक गतीशील व गुणवत्तापूर्वक व्हावा यासाठी इ-गव्हर्नन्स पद्धतीचा अंमल केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील नगरपालिका भ्रष्टाचाराचे अड्डे न बनता विकासाचे अड्डे झाले पाहिजेत. उस्मानाबाद नगरपालिकेला यापूर्वीही आमच्या सरकारने निधीची चणचण भासू दिली नाही. मात्र, येथील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने या निधीचा योग्य विनियोग केला नाही. जनतेला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामी ते कमी पडले. यापूर्वीच्या येथील सत्ताधाऱ्यांनी उस्मानाबादच्या विकासाचे नियोजन केले नाही. त्यामुळेच हे शहर बकाल बनले आहे. देशातही शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने स्मार्ट सिटी, अमृत योजना, किमान कौशल्य विकाससारखे कार्यक्रम आखले. राज्यातील सर्व शहरे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी सरकारने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटी रद्द करून देशात अर्थिक क्रांती घडवून आणण्याचा ऐतहासिक असा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फटका दहशहतवादी व आतंकवादी यांच्यासह पाकिस्तानला बसला आहे. सर्वसामान्य जनता या निर्णयामुळे सुखावली आहे. अर्थिक क्रांतीच्या या नरेंद्र मोदी यांच्या महायज्ञात आपण सर्वांनी सहभागी होऊन अर्थक्रांतीचे स्वातंत्र्य सेनानी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

उस्मानाबाद शहराला दत्तक घेण्याची तयारी
उस्मानाबाद पालिकेत भाजपला सत्ता द्या, विकासाच्या कामाची जबाबदारी माझी राहिल, याची खात्री बाळगा. एवढेच नव्हे तर उस्मानाबाद शहराला दत्तक घेण्याची आपली तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सां‌गितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनविण्याचा उद्योग

$
0
0


dhananjay.lambe@timesgroup.com
Tweet : @dhananjayLMT
औरंगाबाद : आज जगभरात उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढत चालला आहे. हिंसा वाढत चालली असून, लोक अस्वस्थ झाले आहेत. जनता आणि शासक यांच्यातील नाते सैल होत चालले आहे. अशा परिस्थितीत माणुसकीची शिकवण देणारे सूफी विचारच माणसाला सन्मार्ग दाखवतील, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे माजी प्रमुख, एमायरेटस फेलो प्रोफेसर डॉ. अतीकुल्लाह यांनी केले.
मौलाना आझाद महाविद्यालयात डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अॅंड अॅडव्हान्स रिसर्चतर्फे ‘सूफी-संत परंपरा, भाषा, साहित्य आणि संस्कृती’ विषयावर तीन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यानिमित्त शहरात आलेले डॉ. अतीकुल्लाह यांच्याशी ‘मटा’ने संवाद साधला.
डॉ. अतीकुल्लाह म्हणाले, ‘आजच्या वातावरणात लोक त्रस्त आहेत. शांतता भंग होत चालली आहे. लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे. अशा वातावरणात सूफी विचारच योग्य मार्ग दाखवू शकेल. हा विचार कोणत्याही धर्म-पंथाशी निगडीत नाही. तो मानवतेची शिकवण शतकानुशतके देत आला आहे. त्यामुळे या विचाराची चळवळ देशभरात चालविली गेली पाहिजे. आज सर्वत्र उजव्या विचारसरणीचा पगडा दिसून येतो. या लोकांनी राजकारण कलंकित करून ठेवले आहे. यांच्यात स्वार्थ ओतप्रोत भरला आहे. त्यामुळे राजकारण हाच एक धर्म बनला आहे. धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान केले आहे. आमचा भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. गेल्या ७० वर्षांत आम्ही जी शिकवण मिळविली, त्यात बिघाड होतो की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. असे घडले तर आमचा जगातील दबदबा कमी होईल आणि आमची प्रतिष्ठा धुळीस मिळेल.’
भारताला शेकडो वर्षांची सूफी परंपरा आहे. सूफी संतांनी सर्व धर्मांच्या लोकांना तेराव्या शतकापासून मानवतेची शिकवण दिली. देशात १८व्या शतकापर्यंत त्यांचा दबदबा होता. सूफी संत निझामोद्दीन अवलियांनी लिहिलेल्या ‘फवाइदुल फव्वात’ ग्रंथात माणसांना जोडण्याचे तत्त्व सांगितले होते. सूफी संतांनी न्यायाची बाजू लावून धरली. एकदा बादशहा शाहजहान, सूफी संत सय्यद मीर यांना भेटायला गेला. त्याला मीर यांनी तीनच शब्दांचा संदेश दिला की, ‘अवाम के साथ इन्साफ करो’. त्या काळात सूफी संत आपल्या शिष्यांना ‘रिस्के हलाल’ प्राप्त करण्याची शिकवण देत असत. म्हणजे ‘स्वत: आपल्या हातांनी कमवा, खा आणि जगा, इतरांपुढे हात पसरू नका.’ त्यामुळे ते कोणाकडून दान घेत नव्हते, असे डॉ. अतीकुल्लाह यांनी नमूद केले.
पश्चिम भारतात अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक दिल्लीहून गुजरातमार्गे आले, त्याच काळात या भागात सूफी विचार फोफावला. म्हणून मराठवाडा, गुजरातमध्ये सूफी विचारांचा प्रभाव आजही जाणवतो, असे निरीक्षण डॉ. अतीकुल्लाह यांनी नोंदविले.
‘नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लॅंग्वेज (एनसीपीयूएल)’ या चर्चासत्राचे मुख्य संयोजक होते. देशाच्या विविध भागातील सूफी अभ्यासकांनी यात सहभाग नोंदविला.

...म्हणून पाकिस्तान ‘तबाह’ झाला
‘पाकिस्तान ‘तबाह’ झाला, याला कारणीभूत तेथील राजकीय नेतेच आहेत, ज्यांनी धर्माचा आधार घेऊन राजकारण केले. झिया उल हक यांनी आपली खुर्ची टिकविण्यासाठी मुल्लांची मदत घेतली, म्हणून पाकिस्तानची दुर्दशा आजही कायम आहे. उजव्या विचारसरणीचे लोकही त्याच वाटेने जात आहेत आणि हेच धोकादायक आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशातील पहिला आधुनिक जलतरण तलावाची उभारणी शहरातील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात करण्यात येणार आहे. हा तलाव स्टेनलेस स्टीलचा असेल. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान प्रथमच अवलंबण्यात येणार असून, अवघ्या अडीच महिन्यात काम पूर्ण होणार आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात ४०६० चौरस मीटर जागेत स्टेनलेस स्टिलचा जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. हा तलाव ऑलिंपिक स्पर्धेच्या असेल. तलावाचा आकार ५० मीटर लांब व २५ मीटर रूंद असेल. त्याची खोली १.३५० मीटर ते २ मीटर असेल. तलावाशेजारीच ५१० चौरस मीटर जागेवर विविध कार्यालये असतील. प्रेक्षकांसाठी एक भव्य गॅलरीही उभारण्यात येणार आहे. १९९ चौरस मीटर जागेवर गॅलरी असेल. त्यात २७३ प्रेक्षक बसण्याची क्षमता असणार आहे, अशी माहिती साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली.
भांडारकर म्हणाले, ‘स्टेनलेस स्टीलचा उपयोग करून प्रथमच जलतरण तलाव उभारण्यात येत आहे. देशातील हा पहिलाच तलाव असणार आहे. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतुंचा विचार करूनच या तलावाची उभारणी करण्यात येणार आहे. तिन्ही ऋतुंत तलावातील वातावरण जलतरणपटूंसाठी पोषक राहिल अशी रचना करण्यात येणार आहे. तलावाचा प्रवेशव्दार अत्यंत आकर्षक पद्धतीचे असेल. त्यामुळे प्रवेश करतानाच खेळाडूंना उत्साहवर्धक वाटेल. परिसरालगत विविध झाडेही लावण्यात येणार आहेत.’
केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनच्या माध्यमातून हा जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. या तलाव परिसरात फिल्टरेशन प्लँट, चेंजिंग रूम्स, आधुनिक जिम, जलतरणासाठी लागणारे ट्रेनिंग साहित्य, मल्टिपर्पज हॉल अशा २१ प्रकारच्या सुविधा असतील. योगा, अॅक्रोबिक, मीटिंगसाठी मल्टिपर्पज हॉलचा उपयोग करता येणार आहे. प्रशिक्षक, लाइफ गार्डस्, प्लँट ऑपरेटर यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयेही असणार आहेत.

देशातील पहिला स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव औरंगाबादेत होत आहे हीच ऐतिहासीक गोष्ट आहे. तलावाच्या उभारणीनंतर भारतीय जलतरण संघांचे शिबिरे होण्यास प्रारंभ होईल. शहरातील उदयोन्मुख जलतरणपटूंनाही याचा मोठा फायदा होईल. आधुनिक सुविधा व दर्जेदार प्रशिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याने भविष्यात शहरातून अनेक जलतरणपटू निश्चित घडतील.
- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images