Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३,५०० खातेदार रडारवर

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
औरंगाबाद ः प्राप्तिकर विभाग मराठवाड्यातील साडेतीन हजार बँक खातेदारांना नोटीस बजावणार आहे. सध्या विविध बँक खात्यांची छाननी विभाग करीत आहे. या खात्यांत नोटबंदीच्या घोषणेनंतर गेल्या अडीच महिन्यांत ५० हजार रुपयांवर रकमांचे व्यवहार झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्व खातेदारांना नोटीस पाठविण्याचे काम प्राप्तिकर विभागाने सुरू केले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या नोटीस ई-मेल व कुरिअरद्वारे दिल्या जात आहेत.

नोटबंदीच्या घोषणेनंतर काही बँक खात्यांत ५० हजार रुपयांवर पैसे भरण्यात आले. काही खात्यांत सातत्याने पैसे भरण्यात येत होते. या खात्यांची माहिती संबंधित बँकांनी प्राप्तिकर विभागाला कळविली आहे. याशिवाय पॅन कार्ड, आधार कॉर्ड यांची लिंक बँकांच्या खात्यांना असल्याने या खात्यांत झालेल्या व्यवहारांच्या नोंदी प्राप्तिकर विभागाकडे आहेत. त्याआधारे नोटीसचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व नोटीस ई-मेलच्या माध्यमातून आणि कुरिअरद्वारे पाठविण्यात येतील. ई-मेलवर आलेल्या नोटीसला खातेदारकर ई-मेलद्वारेच उत्तर देऊ शकतील, मात्र यासाठी प्राप्तिकर विभागाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय सातत्याने व्यवहार करताना पॅन कार्डची माहिती न देणाऱ्या खातेदारांनाही नोटीस बजावली जाणार आहे. ‘केवायसी’ पूर्ण नसणे, खात्यांत मर्यादेपेक्षा जास्त रकमांचे व्यवहार करणे या कारणांमुळे नोटीस बजावण्यात येत आहेत.

पॅनकार्ड नसलेल्यांनाही नोटीस
काहींनी संपूर्ण वैयक्तिक माहिती न देता (केवायसी) बँक खाती उघडली आहेत. त्यांच्या खात्यांवर नोटबंदीच्या निर्णयानंतर मोठी व्यवहार झाले आहे. त्यांनाही प्राप्तिकर विभाग नोटीस बजावणार आहे. अशा खातेदारांना नोटीसला उत्तर देताना ‘पॅन कार्ड का काढले नाही,’ याचेही स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

एका अधिकाऱ्याकडे १०० खाती
मराठवाड्याच्या प्राप्तिकर विभागास २ प्रमुख प्राप्तिकर आयुक्त आणि ३० प्रा‌प्तिकर अधिकारी (इन्स्पेक्टर) आहेत. या प्रत्येकाला सुमारे १०० खात्यांची सखोल चौकशी, छाननी आणि नोटीस बजावण्याचे अधिकार दिले आहेत. दिल्लीतील प्रा‌प्तिकर विभागाने घेतलेल्या बैठकीत या सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

गरीब कल्याण योजनेत १० कोटीहून अधिक जमा
केंद्र शासनाने इन्कम डिक्लेरेशन स्किम जुलै-सप्टेंबर २०१६पर्यंत राबविली. त्यात अघोषित उत्पन्न दाखवण्याची संधी नागरिकांना मिळाली होती. त्यानंतर नोटबंदीची घोषणा करण्यात आली. नोटबंदीनंतर गरीब कल्याण योजना २०१७ जाहीर करण्यात आली. या योजनेतही अघोषित संपत्ती जाहीर करून, पेनल्टी भरण्याची संधी दिली. या योजनेत शहरातील ५ जणांनी सुमारे १० कोटींहून अधिक रक्मक जमा केल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेचा लेखा विभाग सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट स्वाक्षऱ्या करून बिले उचलल्याची आणखी काही प्रकरणे समोर आल्यामुळे मंगळवारी रात्री महापालिकेचा लेखा विभाग सील करण्यात आला. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या आदेशानंतर ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजिंठा पेस्ट कंट्रोल कंपनीने लिपिकापासून आयुक्तांपर्यंत सर्वांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून नऊ लाख ९७ हजार रुपयांचे बिल उचलण्याचा प्रयत्न केला. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. त्यापाठोपाठ याच कंपनीच्या बिलाचे आणखी एक प्रकरण समोर आले. त्यानंतर २३ लाख आणि सव्वासहा लाखांची बिले अशाच पद्धतीने दिल्याची प्रकरणे उघड झाली. सव्वासहा लाख रुपयांचे बिल दिल्याची फाइल अद्याप गायब आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त बकोरिया यांनी मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसांपूर्वी चौकशी समिती नेमली. लेखा विभागातून या समितीला आवश्यक ती कागदपत्रे मिळाली नाहीत. दरम्यान, मंगळवारी दुपारी काही
नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. लेखाधिकारी पवार यांच्याकडून पदभार काढण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. या पार्श्वभूमीवर बनावट स्वाक्षऱ्या करून बिले उचलण्यात आल्याची काही प्रकरणे मंगळवारी उघड झाली. या प्रकारामुळे आयुक्त बकोरिया यांनी संपूर्ण लेखा विभाग सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री साडेनऊच्या सुमारास प्रशासनाने लेखा विभागाला सील ठोकले.

बनावट स्वाक्षऱ्या करून बिले उचलण्याच्या आणखी काही फाइल लेखा विभागात सापडल्या आहेत. रात्रीतून तेथील फाइल, कागदपत्रे लांबविली जाण्याची शक्यता वाटली. त्यामुळे या विभागाला सील करण्यात आले आहे. उद्या सकाळी हे सील काढण्यात येईल. त्यानंतर चौकशी करण्यात येईल.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या; तरुणीला वाचवले

$
0
0

सातारा : सातारा परिसरातील चाटे हायस्कूलच्या मागे, गट क्रमांक ९९मधील विहिरीत मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका तरुण, तरुणीने उडी मारली. त्यावेळी तेथे शेळ्या चारत असलेल्या मुलाने पाहिल्यामुळे आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या तरुणीला विहिरीतून बाहेर काढले, परंतु तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
सुमीत अप्पासाहेब कुंटे (२१, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) याने १७ वर्षांच्या तरुणीसोबत सातारा परिसरातील चाटे हायस्कूलच्या मागे असलेल्या विहिरीत उडी मारली. तेथे असलेल्या नागरिकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. टकले नावाच्या नागरिकाने विहिरीतून त्या तरुणीस बाहेर काढले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला. विहिरीत उडी मारण्याआधी सुमीत व तरुणीने दुपारी दीडच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. ते सातारा परिसरात आले. विहिरीजवळील परिसरात ते बराच वेळे फिरले. त्यांच्यात भांडणही झाले. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी मारली.

मोबाइल शुटिंग रोखले
फायर ब्रिगेडचे जवान तरुणाचा शोध घेत असताना काही जण मोबाइलद्वारे शुटिंग करीत होते. त्यांना पोलिसांनी रोखले. काहींनी मोबाइलमध्ये फोटो काढले होते. ते पोलिसांनी डिलिट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्ससमोर अर्थसंकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन वेळेवर मिळावे म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने ‘पेन्शन सेल’चा आगळावेगळा प्रयोग राबविला होता, पण प्रशासनाने अचानकपणे हा विभाग बंद केल्यामुळे पुन्हा एकदा पेन्शनर्स संकटात सापडणार आहेत. अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा फटका ज्येष्ठांना बसला आहे.
झेडपीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन मिळण्याची पद्धत पूर्वी फार किचकट होती. तालुक्याच्या ठिकाणाहून आलेली यादी जिल्हा मुख्यालयात एकत्र करणे. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव ट्रेझरीकडे पाठविणे. तेथून मान्यता मिळाल्यानंतर पेन्शनचा निधी झेडपीच्या खात्यावर जमा करून घेणे. त्यानंतर तो तालुक्याच्या डिमांडनुसार वितरित करणे आदी प्रक्रिया करावी लागत होती. त्यासाठी १० ते २१ दिवस लागत होते. हा त्रास कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सीईओ डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी मुख्यालयात पेन्शन सेलची स्थापना केली. त्यासाठी तीन कर्मचारी नेमले. प्रत्येक तालुक्याला एक असे आठ आणि औरंगाबाद तालुक्यात पेन्शनरांची संख्या जास्त असल्याने येथे एक अधिक असे नऊ कर्मचारी पेन्शनच्या कामासाठी नियुक्त केले होते. सेलच्या स्थापनेनंतर सहा कर्मचारी कमी झाले. बँकेनेही या कामासाठी मदत केली. मुख्यालयातील तीन कर्मचारी ६८०० पेन्शनरांच्या निवृत्ती वेतनाचे काम करत होते. त्यामुळे सरकारकडून आलेली ग्रँट ट्रेझरीकडून मागविणे, ती झेडपीच्या अकाउंटला भरून तालुकानिहाय वितरित करण्याऐवजी एकत्रित बिल बनविणे आणि आरटीजीएसद्वारे पेन्शन अकाउंटमध्ये जमा करणे असे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. गेल्या दीड वर्षात या पद्धतीत क्वचित प्रसंगी अडचणी आल्या.
प्रशासनाने अचानकपणे निर्णय घेऊन जानेवारीपासून जिल्हा परिषदेतील पेन्शन सेल बंद केला. त्यामुळे पेन्शनधारकांना आता पुन्हा विलंबाचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे पारदर्शी आणि गतीमान प्रशासन राबविण्याचा दावा सरकारकडून केला जातो. जिल्हा परिषदेनेही अनेक नवीन कार्यपद्धती स्वीकारली असताना केवळ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी घेतलेल्या निर्णयाचा फटका मात्र ज्येष्ठांना बसणार आहे.

जिल्हा परिषदेत सुरू केलेला पेन्शन सेल बंद करण्यात आला आहे. आता पूर्वीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी बिले पाठवून पेन्शन जमा करण्याची प्रक्रिया होईल.
- उत्तम चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन मंदिर, मूर्ती सापडल्या

$
0
0

अतुल कुलकर्णी, बीड
जिल्ह्यातील अंबाजोगाईतील बाभुळबन परिसराची स्वच्छता करताना जमिनीत गाडलेल्या प्राचीन मंदिराचा भाग, अनेक मूर्ती आणि शिलालेख असा ठेवा आढळला आहे. तीन महिन्यांपासून परिसरात खोदकाम सुरू असून आतापर्यंत सापडलेल्या मूर्तींची संख्या ६५ झाली आहे.
अंबाजोगाईतील हनुमंत पोखरकर यांनी तीन महिन्यांपूर्वी, बाराखांबी मंदिर परिसराच्या स्वच्छतेचे काम आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने सुरू केले. मंदिरावर वाढलेली मोठमोठी झाडे, अस्ताव्यस्त पडलेले मातीचे ढिगारे बाजूला करीत असताना त्यांना जमिनीत गाडली गेलेली एक मूर्ती सापडली. नंतर त्यांनी शोध सुरूच ठेवल्याने गेल्या तीन महिन्यांत अनेक मूर्ती, शिलालेख सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानापासून प्रेरणा घेऊन पोखरकर यांनी सहकाऱ्यांसह ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
अंबाजोगाईला ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज, रोज ढब्बू पैशाची शाई लागणारे दासोपंत यांची समाधी याच परिसरात आहे. कोकणवासीयांचे कुलदैवत असलेली जोगेश्वरी देवी याच शहरात वास्तव्याला आहे. हत्तीखाना आणि बाराखांबी हे प्राचीन शिल्प अप्रतिम कलाकुसर आणि अजोड कलेचा नमुना आहे. या परिसरात असलेल्या सकलेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरील दगडी मंडपाला बाराखांबी म्हणून ओळखतात. या ठिकाणची स्वछता सुरू असताना मूर्ती सापडल्याने खोदकाम सुरु करण्यात आले. जेसीबीचीही मदत घेतली जात आहे. मूर्ती आणि शिल्पांना इजा पोहोचू नये म्हणून फक्त दिवसा खोदकाम केले जात आहे. गुजरातमधील ‘समस्त महाजन परिवारा’ने जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले त्यानंतर या कामाची गती वाढली.

बघता क्षणी भुरळ पाडणाऱ्या अप्रतिम मूर्ती जमिनीत गाडल्या गेल्या होत्या. काळाच्या ओघात हा लाखमोलाचा ठेवा बेपत्ता झाला होता. तो आता सापडत आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे.
- हनुमंत पोखरकर, अंबाजोगाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचे बिल भरण्यासाठी ‘कॅश’चाच मार्ग

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
कॅशलेसकडे एक पाऊल टाकताना सर्व सरकारी कार्यालयातील व्यवहार ऑनलाइन केले जात आहेत, पण कोट्यवधी जनतेशी संपर्क असलेल्या महावितरणकडून विजेच्या बिलांचा भरणा करून घेण्यासाठी अद्याप राज्यात कोठेही पॉइंट ऑफ सेल्स (पीओएस) स्वाइप मशीन उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सुविधा कधी उपलब्ध होणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० नोटा चलनातून रद्द ठरविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पुढील ५० दिवसांत सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. नोटबंदीनंतर दैनंदिन व्यवहारासोबत वीज, दूरध्वनीची देयके भरण्यासाठी गर्दी झाली. नोटांच्या अडचणीमुळे नागरिकांच्या रांगाच रांग पाहावयास मिळत होत्या. व्यावसायिकदृष्ट्या हॉटेल्स, पेट्रोलपंप, रुग्णालयांमधून स्वाइप मशीनची सुविधा करून दिल्याने तेथे नागरिकांचे हाल झाले नाहीत, पण सरकारी कार्यालयांमधून वेगळाच अनुभव येत आहे. राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महावितरण कार्यालयात महिन्याचे वीजबिल भरण्यासाठी नागरिकांना कॅशलेस पद्धतीसाठी अडचणी येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने बिल भरणा करणाऱ्यांना फारशा अडचणी येत नाहीत, पण काही ठिकाणी बिलाच्या ठराविक रकमेवर सेवाकर आकारला जातो. त्यामुळे संभ्रम वाढत आहे. दुसरीकडे बँक खात्याच्या अकाउंटला बिल लिंक केल्यास महिन्याच्या ठराविक तारखेला आपोआप बिलाची रक्कम महावितरणकडे जमा होते. याचा वापर करणाऱ्यांची संख्या तुलनेत फारच कमी आहे.
स्मार्ट फोन धारकांना मदत म्हणून महावितरणने अॅप तयार केले. राज्यात साडेआठ लाख नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करून घेतले आहे, पण ग्रामीण भागातील नागरिकांना या तंत्रज्ञानाची माहिती नाही. बँक अकाऊंट असल्याने एटीएम व डेबिट कार्ड आहेत.
पैसे न काढता या कार्डाचा वापर करून स्वाइप मशीनद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्द राहिली, तर त्याचा कोट्यवधी ग्राहकांना फायदाच होणार होता. महावितरण प्रशासनाने अद्याप याबाबत काहीच हालचाली न केल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

महावितरणचे वीजग्राहक
- घरगुती : १६२६१४२०
- कृषी : ३६६७८८३
- औद्योगिक : ४३८३६६
- अन्य :१२९६६१
- व्यावसायिक : १५६९०४३

महावितरणच्या ग्राहकांमधून औद्योगिक ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने बिल भरणा केला जातो. अनेक घरगुती ग्राहक ऑनलाइन व अॅपद्वारे भरतात, पण ग्राहकांना स्वाइप मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण व्यवस्थापनाकडून वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे. राज्यात सर्वत्र त्याची कनेक्टिव्हिटी द्यावी, यासाठी आमचा आग्रह आहे.
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ लाखांचा पानमसाला जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) लासूर स्टेशनमधील एका पानमसाला गोदामावर मंगळवारी छाप टाकून सुमारे ११ लाखांचा पानमसाला जप्त केला. एफडीएने नववर्षांत केकेली ही पहिलीच मोठी कारवाई अाहे.
लासूर स्टेशन येथील शिक्षक कॉलनी डोणगाव रोड येथे गुटखा व्यावसायिक कल्पेश भारत सोनी यांच्या गोदामात अन्न व औषध प्रशासनाने २४ जानेवारीला मंगळवारी छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या गोदामाची सखोल माहिती मिळवली होती. छाप्यात हिरा पान मसालाची ११९ पोती, रॉयल ७१७ तंबाखूची सुमारे २५ पोती जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत सुमारे ११ लाख २० हजार ४७० रुपये आहे. सोनी यांच्या विरोधात एफडीएकडे तक्रारही नोंदवण्यात आली आहे. ही कारवाई विभागाचे सहआयुक्त चं. भा. पवार, सहायक आयुक्त (अन्न) अ. घी. पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राम मुंडे, वर्षा रोडे, गो. वि. कासार या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकृत रोमिओमुळे महिलांत दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समर्थनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विकृत रोडरोमियोमुळे भीतीचे वातावरण आहे. एकट्या महिलेची छेडछाड, अश्लील इशारे करून हा रोडरोमियो पसार होत आहे. येथील महिलांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गुन्हेशाखा गाठून या संदर्भात तक्रार दिली.
समर्थनगर हा मध्यवर्ती परिसर असला तरी दुपारच्या वेळी या भागात सहसा रस्त्यावर वर्दळ नसते. गेल्या काही महिन्यापासून दुपार किंवा सकाळच्या सुमारास एकटी महिला दिसल्यास तिची छेडछाड करण्याचे प्रकार वाढत आहे. पाठीमागून येऊन चापट मारून पसार होणे, अश्लील कृत्य करणे आदी प्रकार या विकृतांकडून होत आहे. क्रांतिचौक पोलिस ठाण्यात या संदर्भात तीन महिन्यापूर्वी तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हे प्रकार सुरूच राहिले. गेल्या काही दिवसात पुन्हा अशा घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी सकाळी कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या पाठीत बुक्का मारून दुचाकीस्वार पसार झाल्याची घटना घडली. हा प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला. मंगळवारी येथील नगरसेवक ऋषिकेश खैरे, सुधीर जाधव, महिला सुरक्षा समिती सदस्य किरण शर्मा तसेच इतर महिलांनी गुन्हेशाखेचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची भेट घेत हा प्रकार कानावर टाकला. या भागात सकाळी व दुपारच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची तसेच रोडरोमियोचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बुधवारी क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी समर्थनगर गाठून संशयिताचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेले फुटेज घेतले आहे.

गेल्या काही महिन्यात आमच्या भागात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिला तसेच दुपारी देखील एकट्या महिलेची छेडछाड करण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी या ठिकाणी सातत्याने सकाळी व ‌दुपारी गस्त घातल्यास या रोडरोमियोंना धाक बसून हे प्रकार टळू शकतात.
किरण शर्मा- महिला सुरक्षा समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसाने पळवले खुनाच्या आरोपीला ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
व्यापारी अनिल शर्मा खून प्रकरणातील आरोपी संतोष मोरे पाटील याला पळवून लावण्यात बंदोबस्तावरील पोलिसाचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अशोक निकम, पळून गेलेला आरोपी मोरे व त्याचे साथीदार अशा सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील हॉटेल नक्षत्रमध्ये व्यापारी अनिल हवासिंग शर्मा (वय ४२, रा. सिडको, एन २) यांचा १८ जानेवारी २०१६ रोजी खून करण्यात आला आहे. हॉटेलमालक व मित्र असलेल्या संतोष मोरे याच्या वाढदिवसाच्या पार्टीत ही घटना घडली होती. पैशांच्या व्यवहारावरून वाद झाल्याने मोरे याने रिव्हॉल्वरने शर्माच्या डोक्यात तीन गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून फेकून दिले, असा आरोप आहे. जानेवारी २०१६ पासून मोरे हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याची वैजापूर कोर्टात पेशी असल्याने त्याच्यासह अन्य गुन्ह्यातील ११ आरोपींना शासकीय वाहनातून (एम. एच. २० ए एफ १७१८) मंगळवारी सकाळी दहा वाजता वैजापूर येथे नेण्यात आले. त्यावेळी मुख्यालयातील १३ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. मोरे याच्या प्रवासाची जबाबदारी पोलिस कर्मचारी अशोक निकम (मूळ रा. सोयगाव) व महिला कर्मचारी द्रौपदी बनकर यांच्याकडे होती. निकम हे पूर्वी राज्य राखीव दलात कार्यरत होते. निकम यांच्या ताब्यातून मोरे याने मंगळवारी पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी पळून गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता समजली. त्यानंतर रात्रीतून त्याला शोधण्यासाठी चार पथके नगर, नाशिक, जालना व परभणी जिल्ह्यात गेले आहेत. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार यांनी पोलिस निकम याची रात्री साडेबारापासून चौकशी केली.
या प्रकरणात जामीनावर असलेला संतोषचा भाऊ दीपक मोरे, विष्णू ईखे, महेश उर्फ पप्पू नाईकवाडे यांच्यासह संतोष जगताप व एक महिला संतोष मोरे याला भेटण्यासाठी वैजापूर कोर्टात गेले होते. दरम्यान, याप्रकरणी पळून गेलेला संतोष मोरे, दीपक मोरे, विष्णू ईखे, महेश उर्फ पप्पू नाईकवाडे, संतोष जगताप, पोलिस कर्मचारी अशोक निकम यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली. पोलिस कर्मचारी निलंबित आरोपीला खासगी वाहनातून आणणे, पळून जाण्यासाठी मदत करणे या आरोपावरून पोलिस कर्मचारी अशोक निकम याला निलंबित करण्यात आले आहे. आरोपी पार्टी बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिस कर्मचारी द्रौपदी बनकर या मंगळवारी गैरहजर होत्या, अशी माहिती समोर येत आहे.

असा पळाला आरोपी
संतोष मोरे याचे कोर्टातील कामकाज दुपारी साडेबारापूर्वी आटोपले व पुढील तारीख मिळाली. पण, अन्य आरोपींची पेशी दुपारी होते. त्यामुळे मोरे याला इतर आरोपींसह शासकीय वाहनाने हर्सूल जेलमध्ये आणणे आवश्यक होते. पण, मोरे याला भेटण्यासाठी आलेला भाऊ, इतर साथीदार, पोलिस कर्मचारी निकम हे खासगी वाहनाने औरंगाबादमध्ये आले. मोरे याच्या सातारा परिसरातील घरी गेले. निकम याला पुढील खोलीत बसवून मोरे फ्रेश होण्यासाठी आतल्या खोलीत गेला व मागील दाराने दुसऱ्या वाहनाने पळून गेला, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. खूनप्रकरणातील संशयित आरोपी असताना लांबचा प्रवास करताना मोरे याला हातकडी घातली नव्हती, असे स्पष्ट होत आहे.

बसमधून आल्याचा बनाव
मोरे याचे नातेवाईक, साथीदार कोर्टात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला एसटी बसने औरंगाबादेत आणले. महावीर चौकात उतरत असतानाच मोरे याने हाताला झटका देऊन पळ काढला, असा दावा पोलिस कर्मचारी निकम याने केला आहे. ‘जानेवारी २०१६ मध्ये एका कोर्ट पेशी दरम्यान मोरे हा सातारा परिसरात राहत असल्याचे समजले होते. त्याला शोधण्यासाठी रिक्षाने त्याच्या घराकडे गेलो. मला पाहताच त्याचा भाऊ दीपक मोरे पळून गेला, तर कोर्टात भेटण्यासाठी आलेली महिला घरात होती. त्यावेळी आरोपी मोरे याचे कपडे घरात होते. पण तो पळून गेला होता. त्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीकडून शंभर रुपये घेऊन निघालो, ग्रामीण पोलिस मुख्यालयाचे पोलिस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देण्यासाठी गेलो,’ अशी माहिती पोलिस कर्मचारी निकम याने चौकशीत दिली आहे.

पोलिसाच्या जबाबात विसंगती
मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमाराला मोरे पळून गेल्याचे निक्म याने सांगितले. पण, त्याने या घटनेची माहिती सायंकाळी सहा वाजेपर्यंत वरिष्ठांना दिली नाही. बस कोणती होती, बसचे तिकीट कुठे आहे, शासकीय वाहनाने का आणले नाही, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पोलिस कर्मचारी निकम यांनी दिली नाही. त्यामुळे आरोपी पळून जाण्यात निकमचा हात असल्याचा संशय असल्याचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत असलटवार यांनी सांगितले.

याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. संतोष मोरे याला शोधण्यासाठी चार पथके विविध जिल्ह्यात रवाना केली आहेत. पोलिस कर्मचारी अशोक निकम याला निलंबित केले आहे.
-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटबंधारे पथकाला खेर्ड्यात पिटाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील खेर्डा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी बुधवारी गेलेल्या पाटबंधारे विभागाच्या पथकाला गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. खर्डा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी करत गावकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या पथकाला हाकलून लावले.

यावर्षी चांगला पाऊस पडल्याने तालुक्यातील खेर्डा प्रकल्प ६० टक्के भरला होता. त्यामुळे नेहमी पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या प्रकल्याच्या परिसरातील १५ ते २० गावांचा उन्हाळ्यात निर्माण होणारा प्रश्न मिटणार आहे. खर्डा प्रकल्पातून या परिसरातील १० ते १२ ग्रामपंचायतींनी भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केला आहे. सध्या प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता धनंजय गर्जे हे बुधवारी खर्डा प्रकल्पातून सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडण्यास येणार अशी माहिती या भागातील नागरिकांना मिळाली होती. त्यामुळे बालानगर, तांडा, ववा, वडाळा, कासार पाडळी, खेर्डा, पाचलगाव, वरुडी या गावातील शेकडो गावकरी प्रकल्पावर जमले. गोदावरी पाटबंधारे विभागाचे पथक येताच गावकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध केला व प्रकल्पातून पाणी सोडू दिले नाही. शाखा अभियंता धनंजय गर्जे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, उन्हाळ्यात पाण्यासाठी तरसावे लागणार असल्याने संतप्त गावकऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. गावकऱ्यांचा पवित्रा पाहून पाटबंधारे विभागाच्या पथकाने तेथून काढता पाय घेतला.

या प्रकल्पाच्या खालच्या बाजुस कालवा बांधण्यात आला आहे. तेव्हापासून पहिल्यांदाच चांगला पाणीसाठा झाल्याने कालवा परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, गावकऱ्यांनी विरोध केल्याने आम्ही न सोडता परत आलो.
- धनंजय गर्जे, शाखा अभियंता

पाणीटंचाईमुळे आमच्या भागातील गावकऱ्यांनी खूप हाल सोसले आहेत. खेर्डा प्रकल्पात पाणीसाठा असल्याने या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. पण, प्रशासनाने त्याचा विचार न करता काही धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी पाणी सोडण्यात निर्णय घेतला आहे. पण आम्ही सिंचनासाठी एक थेंबही पाणी सोडू देणार नाही.
- अमोल गोर्डे, सरपंच, बालानगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा कट्टा ः भ्रष्टाचाराचीच स्वच्छता व्ह‌ायला हवी

$
0
0

स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षण व मूल्यमापनाच्या कामातील लाचखोरीच्या प्रकरणाने या उपक्रमावरच अभियानावर प्रश्नचिन्ह लागले आहे. चांगले रँकिंग मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा प्रकार समोर आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. ‘वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी आपली मते प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या युवा कट्ट्यावर परखडपणे मांडली. विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वच्छता हा घटक महत्त्वाचा आहे. चांगले रँकिंग मिळाले म्हणजे शहर स्वच्छ आहे, असे म्हणणे अयोग्य असल्याचे मत विद्यार्थ्यांनी मांडले. भ्रष्टाचार ही विकृत मानसिकता असून, घडलेला प्रकार देशासाठी लाजिरवाणा आहे. देशातून भ्रष्टाचाराचीच स्वच्छता केली पाहिजे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

लाचेची मागणी निंदनीय
शहराला स्वच्छतेचे चांगले रँकिंग देण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. खरेतर अशा प्रकारचे मूल्यमापन करणे योग्य आहे, असे मला वाटत नाही. हे मानांकन कशाप्रकारे दिले जाते, त्याचे निकष काय आहेत, याची सर्वसामान्यांना माहिती हवी. सर्वसमान्य व्यक्तिलाही स्वच्छतेमध्ये आपलाही काही ‘रोल’ आहे, हे समजायला हवे.
-कमलाकर लांडगे

चांगल्या हेतूला लाचेमुळे हरताळ
शहर स्वच्छ हवे, हे सांगावे लागते. त्यासाठी अभियान राबवाले जाते, हेच लाजिरवाणी गोष्ट आहे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसे गाव, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पाणंदमुक्त गाव असे अभियानही वर्षानुवर्ष राबविले जात आहेत. त्यावर नियंत्रणासाठी ‘गुड मार्निंग पथक’ नेमण्यात आले. त्याचा किती उपयोग झाला? आता स्वच्छतेच्या अभियानातही भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला. त्यामुळे हेतू कितीही चांगला असला तरी, अर्थ उरत नाही.
- आदेश लेंडाळ

मूल्यांकनावर आता प्रश्नचिन्ह
लाचखोरीच्या प्रकाराने स्वच्छतेबाबत देशभर झालेल्या शहरांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याच्या चौकशीनंतर अनेक गोष्टी पुढे येतील. असे असले तरी, अशा घटनांमधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. स्वच्छतेबाबत आपण जागरूक असल्यास लाच मागण्याचा प्रश्नच येत नाही. आपण स्वच्छतेबाबत सक्षम होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. ‘स्वच्छते’साठी सोशल मीडियाचाही चांगला उपयोग करता येऊ शकतो.
- अश्विनी करले

आयुक्तांमुळे भ्रष्टाचार उघड
शहर स्वच्छ असणे हे गरजेचे आहेच, परंतु ते केवळ मानांकनावरून शहर स्वच्छ आहे, हे ठरता कामा नये. सर्वसामान्यांचा सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचे निकष दिले जाणारे मानांकन याबाबत अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना माहिती असावी. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकारच घडणार नाहीत. भ्रष्टाचाराला रोखायचे असेल, तर आपणही तेवढेच जागरूक असायला हवे. आयुक्तांनी योग्य भूमिका नसती घेतली, तर हा प्रकारही समोर आला नसता.
- रेखा गुंजाळ

संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी
‘स्वच्छ भारत अभियान’ हे देशासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे परिणाम उमटतील. त्यामुळे संपूर्ण प्रकाराची देशपातळीवर परिपूर्ण चौकशी होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाने जागरूक असणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या प्रथा वेळीच रोखता आल्या पाहिजेत. प्रक्रियेतही देशपातळीवर बदल करावे लागतील. स्वच्छता हा विकासात महत्त्वाचा घटक आहे.
- परमेश्वर कालापाड

निकषांची माहिती सर्वांना असावी
शहरांच्या स्वच्छतेवर भर देण्यासाठी अशा प्रकारचे मूल्यमापन करून रँकिंग देण्यास हरकत नाही. ही स्पर्धा पारदर्शक आणि निकोप असावी. अशा प्रकारे लाचखोरीतून हे मानांकने दिले जात असतील, तर ते चुकीचे आहे. स्पर्धेचे निकष सर्वसमान्यांना माहिती असायला हवेत. पारदर्शकतेसाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वसामान्यांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यावर भर दिला गेला पाहिजे.
- रजंना माळवे

लाचखोरी लाजिरवाणी
लाचेचा घडलेला प्रकार आपल्यासाठी नव्हेतर देशासाठी लाजिरवाणी घटना आहे. स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची असते. त्याचे मूल्यमापन भ्रष्टाचारावर होत असेल, तर अरोग्याचे मूल्यमापनही चुकीचेच होईल, याचे भान लोकप्रतिनिधींपासून ते अधिकारी, सर्वसामान्यांनानीही ठेवायला हवे. आपण अनेक वेगवेगळे ‘डे’ साजरे करतो. त्यात न थुंकण्याचा दिवस साजरा करू शकतो का? याचाही विचार व्हावा; तसेच भ्रष्टाचाराच्या विकृत मानसिकतेला रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.
- दीप्ती गिरी

आयुक्तांचे धाडस कौतुकास्पद
आयुक्तांनी दाखविलेले धाडस खरेच कौतुकाचे आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याचे अधिकाऱ्याने मनावर घेतले, तर किती बदल घडू शकतो हेच यातून समोर आले. या प्रकारातून काही धडे घेण्याचीही गरज आहे. केंद्राने मूल्यांकनात अधिक पारदर्शकता कशी येईल, याचा विचार करवा. त्यामुळे शहरे अधिक स्वच्छ राहतील. त्यातून ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ या संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. यासाठी प्रशासनासह सर्वसामान्यांनीही प्रयत्न करावेत.
- सुरेखा कोल्हे

आता स्वच्छतेकडे पालिकेने लक्ष द्यावे
औरंगाबादच्या महापालिकेने दाखविलेले धाडस अतिशय अभिमनास्पद आहे. चुकीच्या पद्धतीने मिळालेले मानांकन हे भविष्यासाठी योग्य ठरले नसते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शहराच्या स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आयुक्त, महापालिका प्रशासनाने अधिक जागरूक राहून शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.
- प्राजक्ता वाघ

अभियानावरील विश्वास उडेल
अभियान चांगले आहे, परंतु ते गांभीर्याने राबविले जात नाही. स्वच्छतेचे चांगले रँकिंग देतो म्हणून अधिकारी लाच मागत असतील, तर ही कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. तसे झाले नाही, तर अशा अभियानावरचा सर्वसमान्यांचा विश्वास उडेल. स्वच्छतेवर शहराचे सौंदर्य ठरते. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आम्ही तरुण म्हणून आमच्याही जबाबदारी निश्चित करायला हव्यात.
- कावेरी नवपुते

स्वच्छतेची स्पर्धा पारदर्शक असावी
आपण जे अभियान, धोरणे राबवितो त्याचे काय होते हे या प्रकरणातून समोर आले. पूर्णपणे अभ्यास करूनच असे अभियान राबविणे जाणे गरजेचे आहे. योजनेकडे गांभीर्याने पहायला हवे. नदी जोड प्रकल्पाचे काय झाले, हे आपण पाहिले. एखादे अभियान आपण मिशन म्हणून का पूर्ण करू शकत नाहीत? याचा विचार सर्वांनी करायला हवा. स्वच्छतेचा प्रश्न तर सर्वांच्या आरोग्याशी निगडित आहे.
- करुणा घाईत

भ्रष्टाचाराला प्रोत्साहन
आपल्या देशात भ्रष्टाचाराने आधिच कळस गाठलेला असताना, हा प्रकार समोर आला. अशा मूल्यांकनातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. असे अभियान पारदर्शकपणे राबविण्यासाठी अतिशय कठोर पाऊले उचलली जायला हवीत. पंतप्रधानांनी सुरुवात चांगली केली, परंतु अनेकजण केवळ फोटो पुरते अभियानात सहभागी होत असतील, अभियानाला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागत असेल, तर मूळ हेतूला धक्का पोचतो.
- गौरव जाधव


भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वांनी पुढे यावे
आपण महासत्तेचे स्वप्न पाहत असू, तर ते पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या प्रकारांना रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. जगातील इतर देश स्वच्छतेबाबत किती जागरूक असतात, हे आपण पाहतो. त्यांची शिकवण आपण आत्मसात करायला काय हरकत आहे. जगाशी स्पर्धा करायचे असेल, तर काही गोष्टी आपण बदलायला हव्यात. त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित व्हायला हवी.
- सौरभ राठोड

निकषांतबदल करा
सर्वेक्षण व मूल्यमापनाच्या कामात पारदर्शकता असेल, तर स्पर्धा तेवढ्याच दर्जाची ठरली असती. खऱ्या अर्थाने अभियानाचे ते फलित ठरले असते. स्वच्छतेच्या महत्त्वतेकडे आपण किती दुर्लक्ष करतो, हेच या घटनेतून समोर आले. आरोग्य, विकासासाठी स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरांचे मूल्यांकन करून त्यांना मानांकन दिले, तर त्यात अनेकदा गोंधळ उडू शकतो हे लक्षात घेत केंद्रस्तरावरून नवे बदल व्हायला हवेत.
- भाग्यश्री मठदेवरू

विश्वासार्हतेवर लाचखोरीने प्रश्न
या घटनेने एकूणच अभियानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. आपल्यासह इतर शहरात ही मंडळी गेली. तेथील मूल्यमापन कसे झाले असेल किंवा त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, हे चौकशीअंती समोर येईल. मूल्यमापनाची प्रक्रिया पारदर्शक करण्यावर शासनाने भर द्यायला हवा. जेणकरून यानंतर होणारे मूल्यमापन अधिक चांगल्या पद्धतीने होईल आणि जी शहरे खऱ्या अर्थाने पात्र आहेत, त्यांचा गौरव होईल.
- मयुरी ढोरमारे

लाचखोरीची दखल केंद्र सरकार घेईल
केंद्र पातळीवर अशा घटनांची योग्य ती दखल निश्चित घेतली जाईल, असे मला वाटते. कारण, पंतप्रधानांचे या अभियानाकडे विशेष लक्ष दिसते. स्वच्छतेबाबत प्रत्येक भारतीयाचीही तेवढीच जबाबादारी आहे. स्वतःपासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते. स्वच्छतेबाबत कृतीवर भर दिला गेला पाहिजे. आपल्या घरापासून स्वच्छतेचा संदेश देत परिसर स्वच्छतेवर भर दिला गेला पाहिजे. त्यामुळे हे अभियान यशस्वी ठरेल आणि गैरप्रकारांनाही आपोआप आळा बसेल.
- कल्पना डकले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय आयुक्तांची विद्यार्थ्यांसह सफाई मोहीम

$
0
0

औरंगाबाद : महापालिका आयुक्त, शिक्षण आयुक्तपदावर असताना स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेणारे डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विभागीय आयुक्तपद स्वीकारताच स्वच्छेतला प्राधान्य देत काम सुरू केले आहे. त्यांनी बुधवारी सुभेदारी परिसरातील शासकीय ज्ञान विज्ञान कॉलेजसमोर साफसफाई मोहीम राबविली. महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि कॉलेजचे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले.
कार्यालयांमधील साफसफाईला महत्त्व दिले जाईल, असे डॉ. भापकर यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतानाच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांनी शासकीय कार्यालये आणि कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम आजपासून हाती घेतली. सुभेदारी विश्रामगृहजवळ असलेल्या शासकीय ज्ञान विज्ञान कॉलेजच्या परिसरात या मोहिमेला सुरुवात केली. स्वतः विभागीय आयुक्त सफाई करीत असल्याने कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले. डॉ. भापकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. विभागातील सर्व शासकीय कार्यालय आणि कार्यालयांचा परिसर स्वच्छ असायला हवा, म्हणून ही मोहीम सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्याला मागील काही वर्षांमध्ये दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा पावसामुळे थोडेसे चित्र बदलले आहे. असे असले तरी आणखी काम करण्याची गरज आहे. स्वच्छतेचाही मोठा प्रश्न असून, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या कामासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन ही त्यांनी केले. महापालिका आयुक्त बकोरिया यांच्यासह कॉलेजच्या प्राचार्य डॉ. कुमूद खेर्डेकर-गोरे, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत परिसराची साफसफाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा निर्णय दानवेंच्या कोर्टात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपच्या सोबत घेण्याचा निर्णयाचा चेंडू आता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या कोर्टात अडकला. विशेषत: मुंबईसह अन्य महापालिकांमधील युतीच्या चर्चेमध्ये दानवे व्यग्र आहेत. त्यामुळेच, युतीच्या चर्चा आणि वाटाघाटीची खलबते लांबणीवर पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
लोकसभेच्या निवडणुकांनंतर जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व वाढले आहे. त्यातच, विधानसभा निवडणुकीत बदनापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपाने खेचून घेतला. तसेच, परतूर आणि मंठा हे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे आणि भोकरदन व जाफ्राबाद रावसाहेब पाटील दानवे यांचे होमपीच आहे. त्यामुळे, या सर्व ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्व जागा भाजपच्या वाट्याला आल्या पाहिजे, असा भाजपचा दावा आहे. घनसावंगी तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते पडल्यामुळे, तेथे भाजपची ताकद जास्त असल्याकडे भाजपचे लक्ष वेधत आहे.

रेवगावरून चुरस
जिल्ह्यातील रेवगाव सर्कलवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. रेवगाव सर्कलमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून अनिरूद्ध खोतकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते सलग पाच वेळा जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष असा मोठा दांगडा अनुभव असलेल्या अनिरूद्ध खोतकर यांच्या रेवगाव सर्कल मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. भादरंगे म्हणाले, ‘जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्या ५५ होती, ती संख्या आता ५६ सदस्य झाली आहे. वाढलेले सर्कल म्हणजे, रेवगाव सर्कल. हे आमचेच गाव असल्यामुळे, त्यावर आमचा नैसर्गिक हक्क आहे’

दानवे-खोतकर चर्चेकडे लक्ष
जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा शब्द अंतिम आहे आणि त्यामुळेच ही मोठी चर्चा जालन्यात सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आणि राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मधील राजकीय वाद या निवडणुकीत मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. आतापर्यंतच्या चर्चांमध्ये दानवे उपस्थित नव्हते. पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि खोतकर यांच्यामध्येच चर्चा होत होती. मात्र, दानवे यांच्याशिवाय चर्चा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, दानवे आणि खोतकर यांच्यामध्ये चर्चा कशी होते, यावरच जिल्ह्यातील युतीचे भवितव्य अवलंबून आहे.

आघाडीत समसमानचा सूर
आघाडीसाठी माजी मंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्थानिक पातळीवरील राजकारणातील नेत्यांची लुडबूड होत असते. मात्र, एकत्रित काम करण्याची गरज असल्याचा सल्ला टोपे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तरीही, काँग्रेसच्या परंपरागत वर्चस्वाला हादरे बसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व काँग्रेस समसमान जागावाटपाची प्राथमिक चर्चा आम्ही करतो आहोत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीकडील दुर्लक्षामुळे आगडोंब उसळेल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गुजरात, महाराष्ट्रात व अन्य राज्यांत आरक्षण विषयक आंदोलनांचा उठलेला आगडोंब, हे आर्थिक समस्यांचे विद्रोही प्रगटीकरण आहे. देशातील आर्थिक पुनर्रचनेतून निर्माण झालेले विकासाचे कोणतेही तुषार शेतीवर अवलंबून असलेल्या वर्गावर पडले नाहीत. त्यामुळे समाजातील असंतुष्ट गट आंदोलने करीत आहेत, असे मत अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी साहित्य संमेलन व्याख्यामालेचे पहिले पुष्प गुंफताना व्यक्त केले आहे.
चौथ्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. मंगळवारी येथील खचाखच भरलेल्या येथील कुसुम सभागृहात ‘आर्थिक उदारीकरणाची पंचेवीस वर्षे व पुढील दिशा’ या विषयावर टिळक बोलत होते. ते म्हणाले, ‘जगात आणि देशात झालेल्या आर्थिक पुनर्रचना (आर्थिक सुधारणा) या त्या-त्या काळाच्या आणि परिस्थितीचे अपत्य होत्या भारतात आर्थिक समस्या सोडविताना राज्यकर्त्यानी ठरविलेली आर्थिक धोरणे आणि निर्णय असे या सुधारणांचे स्वरूप होते. चीनप्रमाणे ठरवून जाणीवपूर्वक आपण कोणत्याच आर्थिक पुनर्रचना केल्या नाहीत. गेल्या पंचवीस वर्षात झालेलेले हे आर्थिक पुनर्रचनेचे प्रयोग म्हटले तर यशस्वी झाले, म्हटले तर अपयशी ठरले.जे झाले ते सर्वच चुकले असे मी म्हणणार नाही.’
मागच्या निवडणुकीत आधीच्या कांग्रेस सरकारचा निवडणूक जाहीरनामा आणि भाजपचा निवडणूक जाहीरनामा बघून विकासाचे बिहार मॉडेल श्रेष्ठ की विकासाचे गुजरात मॉडेल श्रेष्ठ, या वादाला तोंड फुटले होते, याची आठवण त्यांनी सांगितली. दोन्ही मॉडेलची एकत्रित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दिल्लीत कोणाचीही सत्ता असो शेतीमध्ये गुंतवणूक, दिल्लीतील सरकार कोणत्याही पक्षाचं वा आघाडीचे असो, उद्योगांसाठी ऊर्जा, तरुण हातांसाठी उत्पादक स्वरूपाचा दर्जेदार रोजगार, पायाभूत सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी भरपूर निधी आणि महागाईवर नियंत्रण हे सरकारच्या आर्थिक कार्यक्रमपत्रिकेवरचे पहिले पाच विषय असावेच लागतील, असे त्यांनी सांगितले.
आधीच्या सरकारप्रमाणेच याही सरकारने शेतीविकासाकडे केलेले दुर्लक्ष, गरम विकासाला दिलका जाणारा अपुरा निधी, सिंचनाच्या सुविधांकडे होणारे दुर्लक्ष्य ,कौशल्य व क्षमता निर्माण न करता उच्च शिक्षणाचा पांढरा हत्ती पोसण्याचे प्रयत्न, यातून भाऊ हिस्से वाढलेली शेती आणि शेतकरी आणखी अडचणीत येतील आणि ज्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले आहे त्या वर्गाच्या आरक्षण सदृश्य आंदोलनाचा आगडोंब उसळेल, असा इशारा टिळक यांनी दिला आहे.
सूत्रसंचालक प्रा. विश्वधर देशमुख यांनी प्रास्ताविकात घडाभर तेल जाळल्याने, विद्यमान सरकारच्या नोटबंदी आणि अन्य निर्णयांवर बोलायला वक्त्यांना वेळ मिळाला नाही​,​ असे लोक बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ढोलकीच्या तालावर’ तरुणाई थिरकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ‌औरंगाबाद
‘झिंग झिंग... झिंगाट’सह येड लागलं, ढोलकीच्या तालावर अशा प्रसिद्ध गाण्यांवर देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजची अवघी तरुणाई थिरकली. कॉलेजच्या ‘क्वसार्स’ महोत्सवाचा बुधवारी जल्लोषात समारोप झाला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात ‘क्वसार्स-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी महोत्सावात ग्रुप डान्स, सोलो गायन आदी कला प्रकारांचे सादरीकरण केले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात उपस्थित रसिकांची मने जिंकली. श्रेया देशपांडे हिने ‘दिल है छोटा सा’ हे गीत आपल्या खास शैलीत सादर करून उपस्थितांची वाहवाह मिळवली. नितीन वाघमारे याने ‘झिंगाट’ गीतावर ठेका धरला. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्नेहल आणि श्रृती या विद्यार्थिनींनी ‘ढोलकीच्या तालावर’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘वाजले की बारा’ आदी लावण्यांचे फ्युजन सादर केले. उपस्थितांनी टाळ्या आणि वन्समोअरची दाद दिली.
निलिमा बारवाल हिने ‘दमा दम’ हे गीत आपल्या आवाजात सादर केले. नेहा उपाध्याय हिने ‘कजरा मोहब्बत वाला’, रमेश जाधवने ‘रूक जा’, सुचिता धुमाळने ‘ये मेरा दिल’ आदी गाणी सादर करत महोत्सवात रंगत आणली. यावेळी संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. डॉ. गजेंद्र गंधे, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. राजेश औटी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभराच्याही छापल्या बनावट नोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट नोटा प्रकरणातील आरोपींनी दोन हजारांच्या नोटाबरोबर शंभर रुपयांच्याही बनावट नोटा तयार केल्याचे उघड झाले आहे. अंबड येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी दोन हजारांच्या नऊ बनावट नोटांसह शंभर रुपयाची एक बनावट नोट आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले रसायन, स्कॅनर जप्त केले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सय्यद समीर पसार असून, त्याचा शोध सुरू आहे.
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी महमंद इर्शाद या घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला रविवारी अटक केली होती. त्याच्या ताब्यातून दोन हजारांच्या १८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याला नोटांचा पुरवठा करणाऱ्या फिरोज देशमुख यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन हजारांच्या दोन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.
या आरोपींनी दिलेल्या माहि‌तीमध्ये अंबड येथील सय्यद समीर अकबर हा सूत्रधार असल्याचे समोर आले. मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाने अंबड गाठले.

एका खोलीत कारखाना
अंबडमध्ये पाचोड रोडवर समीरने एक खोली भाड्याने घेतली होती. रात्रीच्या सुमारास या खोलीमध्ये नोटा छपाईचा कारभार चालत होता. पोलिसांनी खोलीतून स्कॅनर, कम्प्युटर, नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले रसायन, बाँड पेपर आणि कम्प्युटरशी संबंधित साहित्य जप्त केले आहे. यावेळी दोन हजारांच्या नऊ बनावट नोटा पोलिसांना खोलीमध्ये आढळल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार सय्यद समीर अकबर पसार असून, त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे.

शंभराची नोट चुरगाळून टाकली
पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता एक चुरगाळलेली शंभराची नोट पोलिसांना आढळली. नोट तपासण्यात आली असता, ती देखील बनावट असल्याचे निष्पन्न झाले. नोट व्यवस्थित कापण्यात आली नसल्याने आरोपींनी ती तेथेच चुरगाळून आरोपींनी फेकून दिली होती. यावरून आरोपींनी शंभरा बनावट नोटाही चलनात आणल्याचे समोर आले.

घाटीतील कर्मचारी निलंबित
बनावट नोटा प्रकरणातील आरोपी व घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोहमंद इर्शाद मोहमंद इसाक (२७, रा. शाहबाजार) याला बुधवारी निलंबित करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी निलंबनाचे आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी इर्शाद याला रविवारी अटक करण्यात आली होती व त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुक फ्रेंडचा मॅनेजरला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फेसबुक फ्रेंड झालेल्या इंग्लंडच्या तरुणीने बँक मॅनेजरला तीन लाखांचा गंडा घातला. ‘माझ्याकडे १२ कोटी रुपये आहेत. भारतात आल्यावर आपण भेटू,’ असे आमिष तिने या मॅनेजरला दाखवले. दिल्ली येथे कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याची थाप मारून २ लाख ९० हजार रुपये मॅनेजरकडून ऑनलाइन मागवले. याप्रकरणी डायना जेनेथ नावाच्या तरुणीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका खासगी बँकेत दीपक अटल (रा. महेशनगर, मूळ रा. इंदूर) हे प्रशिक्षणार्थी मॅनेजर म्हणून गेल्या वर्षापासून कार्यरत आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्यांची फेसबुकवर चॅटिंग करताना डायना जेनेथ (रा. इंग्लंड) हिच्याशी ओळख झाली. दोघे रोज चॅटिंग करीत होते. १२ जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरू होता. दरम्यान, आपण भारतात येणार असल्याचे डायनाने अटल यांना सांगितले. अटल यांना विश्वास बसावा म्हणून तिने विमानाचे तिकीट देखील त्यांना ई-मेल केले. १२ जानेवारी रोजी डायनाने अटल यांना आपण दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्याची माहिती दिली. ‘मला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असून, माझ्याकडे इंग्लंडचे चलन आहे. त येथेे चालत नाही,’ असे सांगत भारतीय चलन पाठवण्याची विनंती केली. डायनाने दिलेल्या बँक खात्यावर अटल यांनी सुरुवातीला १ लाख ९५ हजार रुपये व नंतर पुन्हा ९५ हजार रुपये ऑनलाइन भरले. १३ जानेवारी रोजी पुन्हा डायनाने अटल यांना कस्टम अधिकारी सोडत नसून, पुन्हा दोन लाख टाकण्याची विनंती केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने अटल यांनी ही रक्कम टाकली नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक अटल यांनी मंगळवारी जिन्सी पोलिस ठाण्यात डायनाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जमादार भाऊसाहेब जगताप तपास करीत आहे.

अधिकाऱ्याला मित्राने केले सावध
डायनाने दोन लाख रुपये टाकण्याची मागणी केल्यानंतर अटल यांनी त्यांच्या एका मित्राला हा प्रकार सांगितला. या मित्रांने त्यांना सतर्क करीत फेसबूक अकाउंट खोटे असल्याची माहिती दिली. यानंतर अटल यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वोक‍्हार्टची जमीन शाळेसाठी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
वोक‍्हार्ट कंपनीने शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी घेतलेल्या ३१५ एकरपैकी केवळ ५ एकर जमिनीचा वापर उद्योगासाठी केला आहे. त्यांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केले, असा आक्षेप घेऊन कुंभेफळ येथील ४० शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत राज्य शासन व वोक््हार्ट कंपनीला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्या. विद्याधर कानडे व न्या. संगीतराव पाटील यांनी दिले.
कुंभेफळचे शेतकरी साहेबराव शेळके व अन्य ३९ शेतकऱ्यांनी याचिका केली आहे. मुंबई येथील वोक््हार्ट कंपनीने शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी घेतलेल्या ३१५ एकर जमिनीपैकी केवळ ५ एकर जमिनाचा वापर उद्योगासाठी केला. उर्वरित जमिनीचा वापर शाळेसाठी केला आहे. त्यांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केले, वोक््हार्ट कंपनीला १९९७-९८मध्ये ३१५ एकर जमीन देण्यात आली, पण या जमिनीचा उपयोग अन्य बाबींसाठी करण्यात आला. त्यामुळे कुंभेफळ येथील शेतकऱ्यांनी जमिनी परत कराव्यात, अशी विनंती एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी आणि महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खंडपीठात धाव घेतली. प्राथमिक सुनावणीत एमआयडीसीने नोटीस घेतली. शेतकऱ्यांची बाजू चंद्रकांत ठोंबरे हे मांडत आहेत. एमआयडीसीतर्फे श्रीरंग दंडे, तर शासनाकडून आनंद शिंदे हे काम पाहत आहेत.

पाल्यांना नोकरी नाही
कंपनीने पाच एकर क्षेत्रात औषधीचा कारखाना उभारला. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलसाठी उर्वरित जमीन वापरली. ५० ते ६० शेतकऱ्यांना एक हजार चौरस मीटरचे भूखंड देण्यात आले. १९९७ नंतर दुसऱ्या टप्यात शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना एकरी सात ते आठ लाख रुपये भाव देण्यात आला. तिसऱ्या टप्यात २३ ते २४ लाख रुपये एकर भाव देण्यात आला. १५ टक्के भूखंड, कंपन्यांमध्ये प्राधान्याने नोकरी देण्याच्या अटीवर शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या. शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरी न देता कराराचे उल्लंघन केले, असा आक्षेप याचिकेत घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटी’चे ‘मान्यवरां’ना फोन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या निर्णयानंतर संशयास्पद व्यवहारांमुळे प्राप्तिकर खात्याने औरंगाबाद शहरातील सुमारे एक हजार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. संबंधित खातेदारांकडे व्यवहारांचा तपशील मागण्यात येणार आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अनेक ‘मान्यवरां’कडे प्राप्तिकर विभागाने दूरध्वनीवरून बँक व्यवहारांबाबत विचारणा केली.
मराठवाड्यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून, खातेदारांना नोटीस बजावण्यात येणार असल्याबाबत ‘मटा’ने बातमी प्रकाशित केली. त्यानंतर बुधवारी प्राप्तिकर विभागाने अनेक ‘मान्यवरां’शी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यात शहरातील आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, लॉन्स संचालक, रिसॉर्ट संचालक आणि नामांकित हॉटेल्स व्यावसायिक यांचा समावेश आहे. त्यांना बँक खात्यात भरण्यात आलेल्या रकमांचा तपशील, प्राप्तिकर विभागाने पाठविलेल्या नोटीस मिळाल्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात येण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील अनेक बँकांमधली खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यात औरंगाबाद शहरातील सुमारे दीड हजार खात्यांचा समावेश आहे. व्यवहारासंबंधीचा तपशील या खातेदारांना सादर करावा लागणार आहे. याशिवाय बुधवारपासून प्रा‌प्तिकर आयुक्त, उपायुक्त आणि प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शहरालगतचे दोन नामांकित रिसॉर्ट, वॉटर पार्क, काही हॉटेल व्यावसायिकांनाही प्रा‌प्तिकर विभागाने नोटीस पाठवल्या आहेत. त्यांच्या संचालकांना प्राप्तिकर विभागाच्या छावणीतील कार्यालयात बोलावून घेण्यात आले आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.

बँकांही सतर्क
दरम्यान, शहरात बुधवारपासून बँकांचे अधिकारीही सतर्क झाले आहेत. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी-शेड्युल्ड बँकांमध्येही बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची चर्चा होती. अनेक खात्यांविषयी बँक अधिकारी दबक्या आवाजात बोलत होते. बँकांमधील खाती प्रा‌प्तिकर विभागाच्या साइटशी लिंक असल्याने बँक अधिकाऱ्यांनी खाते आणि खातेदारांविषयी सतर्कता बाळगणे सुरू केले आहे. मंगळवारी, बुधवारी शहरातील अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने चौकशीसाठी बोलावून घेतले होते. यात खासगी बँकांतील अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच टीडीआर प्रकरणे तपासा

$
0
0

औरंगाबाद : पडेगाव-मिटमिटा भागातील टीडीआरची (विकास हक्क हस्तांतर) प्रकरणे काळजीपूर्वक तपासा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या विभागाचा कारभार ऑनलाइन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
बकोरिया यांनी नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुमारे तीन तास बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी काही रजिस्टर आणि त्यातील नोंदीही तपासल्या. त्यांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे नगररचना विभागात खळबळ उडाली आहे.
सकाळी पावणेअकरा वाजता बकोरिया नगररचना विभागात पोचले. सहाय्यक संचालक ए. बी. देशमुख यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या विभागाचा कारभार ऑनलाइन झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करा, अशी सूचना त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कम्प्युटर विभागाचे प्रमुख बारी यांनाही नगररचना विभागात बोलावून घेण्यात आले होते. या विभागातील सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्याची स्वतंत्र फाइल करा, असे आदेश त्यांनी बारी यांना दिले. आतापर्यंत देण्यात आलेल्या २१४ टीडीआरपैकी ५० ते ६० टीडीआर पडेगाव-मिटमिटा भागातील आहेत. या टीडीआरसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणांसह टीडीआरच्या ज्या प्रकरणांमध्ये संशय घेतला जात आहे, ती सर्व प्रकरणे तपासा. त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश देखील बकोरिया यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images