Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठाचे ‘व्यवस्थापन’ फेल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचे व्यवस्थापन पुरते ढेपाळले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. गुणपत्रिका कॉलेजांना पोहचल्या मात्र, गुणपत्रिकांवर प्रात्यक्षिकांचे गुण समावेश करण्याचे विद्यापीठ विसरले. त्यामुळे पुरता गोंधळ उडाला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा, निकालातील गैर कारभाराची मालिका सुरूच आहे. व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेत प्रात्यक्षिकाच्या गुणांचा समावेश करण्याचेच विद्यापीठ विसरल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर-२०१६मध्ये एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. काही कॉलेजांना गुणपत्रिकाही पाठविण्यात आल्या. बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिकेवरून समोर आल्यानंतर विचारपूस सुरू झाली. त्यावेळी गुणपत्रिकेत प्रात्यक्षिकाच्या गुणांचा समावेशच करण्यात आला नसल्याचे लक्षात आले. चूक लक्षात येताच, परीक्षा विभागानेही गुणपत्रिका परत मागविल्या. शुक्रवार-शनिवारी असे दोन दिवस हा गोंधळ सुरू होता. आता, या गुणपत्रिका पुन्हा नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सुत्रांनी ‘मटा’ला सांगितले. ही प्रक्रिया केव्हा होणार आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका केव्हा मिळणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

अशी होते प्रक्रिया..‘तांत्रिक’ अडचणींची ढाल...
‘एमबीए’ अभ्यासक्रमासाठी ८०-२० पॅटर्न आहे. चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) नुसार होणाऱ्या या परीक्षेत ८० गुण थिअरी तर २० गुण प्रॅक्टिकलचे असतात. डिसेंबरमध्ये कॉलेजांनी प्रॅक्टिकलचे गुण विद्यापीठाकडे सादर केले. उत्तरपत्रिका तपासणीनंतर ‘थिअरी’चे गुण आणि प्रात्यक्षिकाचे गुण असे मिळून त्याचे ‘ग्रेड’मध्ये रूपांतर केले जाते आणि गुणपत्रिकेवर ग्रेड दिले जातात. ही सर्व प्रक्रिया गोपनीय व संगणकावर होते. प्रोसेसिंग करताना प्रात्यक्षिकाचे गुण अॅड करण्याचेच विद्यापीठ विसरले. आता, या प्रकरणात तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या या कामात हलगर्जीपणा विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटी बस नसल्यामुळे कंपनी बसला पसंती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत सिटी बस सुरू करण्याचे नियोजन महापालिकेच्या स्तरावर केले जात आहे. शेंद्रा ते वाळूज या मार्गावर सिटीबस प्राधान्याने चालवावी यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात सुमारे ४३ टक्के कामगार सिटीबस नसल्यामुळे कंपनी बसला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबादचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर पालिकेने ग्रीनफिल्ड आणि पॅनसिटीचा प्रकल्प तयार केला. ग्रीनफिल्ड अंतर्गत चिकलठाणा शिवारात नियोजनबद्ध शहर विकसित केले जाणार आहे. पॅन सिटी अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात प्रामुख्याने काम केले जाणार आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेकल) मार्फत केले जाणार आहे. ग्रीनफिल्डचा प्रकल्प पुढील दहा वर्षांचा असल्यामुळे एसपीव्हीच्या माध्यमातून सिटीबस सेवा शहरात सुरू करण्याला प्राधान्य देण्याचे एसपीव्हीचे मुख्याधिकारी व पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ठरविले आहे. सिटीबस सेवा सुरू करण्यापूर्वी ‘होमवर्क’ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आयटीडीपी ( इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी) आणि एमआयटी कॉलेजतर्फे सिटीबसच्या मार्गांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहराचा औद्योगिक विस्तार लक्षात घेता शेंद्रा आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारी सिटी बस सेवा पहिल्या टप्प्यात सुरू करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहर व परिसरात राहून या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये जाणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या प्रवासासंदर्भात प्राथमिक सर्वेक्षण एमआयटी कॉलेजच्या माध्यमातून करण्यात आले. सिटीबस नसल्यामुळे कामगारांना कंपनी बसवर अवलंबून रहावे लागते, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ४३ टक्के कामगार कंपनी बसचा वापर करतात. कंपनीबस आर्थिकदृष्ट्या परवडणारी असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. कंपनी बसची जागा सिटी बसने घेतली, तर कामगारांना तुलनेने कमी दरात प्रवास करता येणे शक्य आहे. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांत नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या कामगारांपैकी ५३ टक्के कामगार औरंगाबाद शहरातील आहेत. सिटी बस नसल्यामुळे त्यांना कंपनी बसचा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. कारखान्यात ये - जा करणाऱ्या कामगारांना सध्या तीस ते साठ मिनिटे प्रवास करावा लागतो. सिटीबस सुरू झाल्यास या वेळेत कपात होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५० शाळांच्या संचमान्यता गायब

$
0
0



Makarand.Kulkarni
@timesgroup.com

Tweet : @makarandkMT

औरंगाबाद ः राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार शाळांनी ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी संचमान्यता ऑनलाइन सादर केल्या. जिल्ह्यातील १२०२ शाळांनी संचमान्यता सादर केली, पण शालेय शिक्षण विभागाकडे तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने चक्क २५० शाळांच्या संचमान्यताच गायब झाल्या आहेत. संचालक कार्यालयाला त्या ऑनलाइन दिसत नसल्याने या शाळांची प्रशासकीय अडचण झाली आहे. संचमान्यता गेल्या कुठे ? याचे मोठे कोडे शिक्षण विभागाला पडले आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या शाळांना दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत संचमान्यता सादर करावी लागते. त्यानुसार शाळेत वर्ग किती तुकड्या किती ? विद्यार्थी आणि त्या प्रमाणात शिक्षक आहेत की नाही? याची माहिती सादर करावी लागते. अनुदान मिळविण्यासाठी पूर्वी शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून टाकत असत. दहा वर्षांपूर्वीपर्यंत अशा बोगसगिरीचे पेव फुटले होते. त्यावेळी महसूल विभागाला हाताशी धरून शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळा तपासल्या. शाळांची बोगसगिरी उघड झाली होती. त्यानंतर संचमान्यता सादरीकरणात टप्प्याटप्प्यात बदल केले गेले. दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन संचमान्यतेची पद्धती अमलात आणली गेली. ३० सप्टेंबरपर्यंत शाळांना संचमान्यता सादर केल्या.
औरंगाबाद जिल्ह्यातून खाजगी अनुदानित,विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यता या चार गटांतील शाळांनी संचमान्यता सादर केल्या. त्याची पडताळणी करून अहवाल सादर होणे अपेक्षित होते.
दरम्यान, शिक्षण विभागाने पुणे येथील संचालक कार्यालयास पत्रव्यवहार करून संच बेपत्ताप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यास दोन महिने उलटून गेले तरी संचमान्यता सापडलेल्या नाहीत. त्यामुळे शाळांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण संचालकांना संचमान्यता ऑनलाइन दिसत नाहीत. इकडे शाळांनी तर संचमान्यता सादर केलेल्या आहेत. त्याची नोंद शाळांकडे आहे. ऑनलाइन क्लस्टरवरून संचमान्यता प्रिंट काढण्याचे ऑप्शनही मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या या कारभाराचा फटका २५० शाळांना बसत आहे. या शाळांमधून ८३ शाळा अनुदानित गटाच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपी पलायन प्रकरणी एकास बेड्या

$
0
0


औरंगाबाद : खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संतोष मोरे याला पळून जाण्यात मदत केल्याचा संशय असलेला त्याचा भाऊ दीपक मोरे यास शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चौकशी करून त्यास वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील हॉटेल नक्षत्रमध्ये व्यापारी अनिल हवासिंग शर्मा (रा. सिडको, एन २) यांचा १८ जानेवारी २०१६ रोजी खून झाला. याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संतोष मोरे गेल्या वर्षापासून न्यायालयीन कोठडी होता. सुनावणीसाठी त्याला २५ जानेवारी रोजी वैजापूर कोर्टात नेण्यात आले. तेथून परत येताना तो पसार झाला. यात त्याच्या भाऊ दीपक मोरे, अन्य साथीदारांसह बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी अशोक निकम याने मदत केल्याचा आरोप आहे. पसार दीपक मोरे हा शनिवारी दुपारी शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे पथकाने टी. व्ही. सेंटर परिसरातील एका फ्लॅटमध्ये दडून बसलेल्या दीपकच्या मुसक्या आवळल्या.

संतोषचा शोध सुरू
पसार झालेल्या संतोष मोरे यांच्या शोधार्थ नाशिक, परभणीसह अन्य काही भागांत पोलिस पथके पाठविण्यात आली आहेत. अद्याप त्याचा शोध लागला नाही. त्याचा भाऊ हाती सापडल्याने संतोष विषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप मृत्यू प्रकरण; सीआयडीकडून पाहणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राहुल गायकवाड याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सीआयडी क्राइमच्या पथकाने शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच राहुलच्या पालकासह अन्य नातेवाईकांचे जबाब नोंदविले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुचाकी चोरीच्या संशयावरून राहुल गायकवाड व अन्य दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. शासकीय वाहनातून राहुलने उडी मारल्याने तो जखमी झाला. शुक्रवारी पहाटे घाटीत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांच्या मारहाणीत राहुलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून शनिवारी पथकाने डोमेगाव येथे जात मृत राहुलच्या नातेवाईकांची भेट घेत त्याच्या वडिलांसह अन्य चार ते पाच जणांचे जवाब घेतले. ज्या वाहनातून राहुलने उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले त्या वाहनाचा (एमएच २०, सी यू- ००५१) पंचनामा केला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने राहुलचे साथीदार म्हणून ताब्यात घेतलेले साजन गायकवाड आणि लक्ष्मण तुपे यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इको सेन्सिटीव्ह झोनसाठी सर्वेक्षण सुरू

$
0
0



म.टा. प्रतिनिधी, नगर

जायकवाडी जलाशयाच्या परिसरात इकोसेन्सिटीव्ह झोनसाठी पुन्हा हालचाली वेगाने सुरू झाल्या असून मधल्या काळात झालेल्या आंदोलनांची दखल घेत याची सीमा रेषा १० किलोमीटरऐवजी ५०० मीटर करण्यात आली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण सुरू झाले असून नगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्याचाही यामध्ये समावेश आहे. सीमारेषेच्या आतील अतिक्रमणे हटविण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली आहे.
जायकवाडी जलाशयाचा ८६ हजार एकरचा परिसर १९८६ मध्ये पक्षी अभयरण्य म्हणून घोषित केलेला आहे. या जलाशयात प्रजननासाठी अनुकूल वातावरण आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. चित्रबलक, फ्लोमिंग, चक्रांग, चक्रवाक, चमचा, पट्टाकंदन, खंड्या यासारखे ७० प्रजातीचे पक्षी येथे येतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या पानवनस्पती व माशांच्या ७६ प्रकारच्या जाती जलाशयात आहेत. यामुळे या धरणाचे महत्त्व लक्षात घेऊन सुमारे ३४ हजार हेक्टर क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सर्वेक्षणासाठी सीमारेषा ठरविण्यावरून आंदोलने झाली होती. त्यानंतर बराच काळ हे काम बंद होते. आता औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत ते पुन्हा सुरू केले आहे. डिसेंबरमध्ये यासंबंधी बैठक झाली. त्यानुसार जलसंपदा, वन विभाग यांच्या मदतीने काम सुरू करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात पाच बीट प्रमुख व पाच सहायक कर्मचारी यांच्यामार्फत काम सुरू आहे. या क्षेत्राच्या पाचशे मीटर आत झालेले बांधकाम यांची पाहणी व मोजमाप केले जात आहे. याशिवाय शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे यांच्याही नोंदी घेण्यात येत आहेत. ही सर्व माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मधल्या काळात थांबलेले हे काम आता पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यासंबंधी पुढे काय होणार याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. मात्र, प्रशासनाने पाचशे मीटरची सीमा रेषा गृहीत धरून काम सुरू केल्याचे दिसून येते. त्यामुळे या सीमा रेषेच्या आतील बांधकाम पाडावे लागणार, या शक्यतेमुळे या भागात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. जायकवाडी जलाशयाच्या परिसरातील सर्वेक्षणाचे काम पंधरा दिवसांपासून सुरू आहे. बांधकाम पाहणी व मोजमापाचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे शेवगाव पाटबंधारे विभागाचे बीट कालवा निरीक्षक राजेंद्र दराडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित वस्ती योजना; कामांकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्ती सुधार योजनेची कामे ज्या वेगाने व्हायला हवीत ती होत नाहीत. संबंधित विभागासाठी असलेले कर्मचारी त्यासाठी जबाबदार असून त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून कामे मार्गी लावावीत, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेनेने केली आहे.
जिल्हाध्यक्ष वैभव तायडे यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की दलितवस्ती सुधार योजनेद्वारे ग्रामीण भागातील दलित वसाहतींमध्ये सुधारणा व विकासकामे केली जातात. मात्र समाजकल्याण विभागाकडून योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही. या कामासाठी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी श्रीमती साळुंके या योग्य प्रकारे काम करत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. नवीन प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात अनेक त्रुटी दाखविल्या जातात. ज्यामुळे लाभार्थ्यांची अडचण होत आहे. आपण या प्रकरणी योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तायडे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉ. तुळजापूरकर चळवळीचे समग्र नेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कॉम्रेड देविदास तुळजापूरकर हे बँकिग चळवळ, ट्रेड युनियनमधील समग्र नेते आहेत. त्यांच्या या नेतृत्वगुणामुळेच ते आज बँकिग युनियनच्या राष्ट्रीय पातळीवर सहसचिव म्हणून जात आहेत,’ अशा शब्दात आयटकचे नेते व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी तुळजापूरकर यांचा गौरव केला.
एआयबीईए या बँकिंग युनियनच्या राष्ट्रीय सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल रविवारी तुळजापूरकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. कानगो बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश धोपेश्वरकर, राष्ट्रीय सहसचिव ललिता जोशी, एसबीएचएसएचे माजी जनरल सेक्रेटरी के. एन. थिगळे यांची उपस्थिती होती.
डॉ. कानगो म्हणाले, बँकिंग क्षेत्र सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. भांडवलदारांची सत्ता वाढत आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरणाचे प्रस्ताव, विलिनीकरणाचे प्रस्ताव येत आहेत. अशावेळी औरंगाबादसारख्या ठिकाणाहून बँकिंग क्षेत्रातील जाणकार आज ट्रेड युनियन सांभाळतोय हे नक्कीच भुषणावह बाब आहे. याशिवाय फक्त संघटितांसाठीच नव्हे, तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही चळवळीची जाणीव ठेवणारा हा माणूस आहे. त्यांच्याविषयी असलेली तळमळ त्यांच्याकडे कायम आहे. यामुळे बँकिंग क्षेत्र, वित्तीय क्षेत्रातील संघटनेला एक समग्र नेता मिळाला आहे. या नेत्याची जडणघडण आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहिली आहे.
यावेळी सुरेश धोपेश्वरकर म्हणाले, मी एआयबीईए ही संघटना माणुस म्हणून जगलो आहे. आज तुम्ही लोकांनी मला भीष्मपितामह, असे मला संबोधले आहे. माझ्या अनुभवाची गरज पडली तर देविदास तुळजापूरकरांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा. त्यांची चूक झाली तर मी त्यांचे कान पकडू शकतो, असे तुम्हा सर्वांच्या समोर आश्वासन देतो. पण, जागतिक पातळीवर सध्या ट्रेड युनियन आणि बँकिंग युनियनच्या संकल्पना, गरजा आणि आवश्यकता बदलत असताना तुळजापूरकर यांच्यासारख्या व ललिता जोशींसारख्या खंबीर नेतृत्वाची बँकिंग युनियनला गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी ललिता जोशी यांनी तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल. राष्ट्रीयपातळीवर मुंबई वगळता औरंगाबादला संघटनेत मोठे नेतृत्व मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. संघटना, आगामी ध्येयधोरणे, युवा संगठन आणि आगामी संपा विषयी माहिती देत नोटबंदीवर ललिता जोशी यांनी ताशेरे ओढत बँक कर्मचारीवर्गास मोठा लढा द्यायचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. जगदीश भावठाणकर यांनी केले. प्रास्ताविक धनंजय कुलकर्णी यांनी केले. स्वागत रवी धामणगावकर, जसबिरसिंग टुटेजा, उत्तम भाकरे यांनी केले.

विचारांच्या सामर्थ्यावर लढाई
‘खाजगी बँकांच्या शिरकावामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा उद्योगातील एकूण वाटा १९ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. विलिनीकरणासारख्या गोष्टीने हा वाटा आणखी खाली येण्याची भीती आहे. ते ध्यानात घेता व्यवस्थेचा भाग बनून सर्वांना सोबत घेऊन विलिनीकरणाचा विरोध करावा लागणार आहे. संघर्षातूनच विकास साधला जातो. तत्त्वांशी विचार न करता विचाराच्याच सामर्थ्याने ही लढाई लढावी लागणार आहे. अाजपर्यंत अनेकांच्या सहकार्यामुळे इथपर्यंत मजल मारता अाली,’ या शब्दात कॉ. तुळजापूरकर यांनी सत्काराला उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला पोलिसाकडून डॉक्टरांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना एका महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा झाल्याच्या आरोप करून महिला पोलिस अधिकारी व नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. याप्रकरणी कुठे गुन्ह्याची नोंद केली गेली नाही व प्रकरण मिटविण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे.
क्रांतिचौक पोलिस स्टेशन हद्दीतील एका हॉस्पिटलमध्ये या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या बालकावर उपचार सुरू होते. न्यूमोनियासदृश विकाराने आजारी असलेल्या बालकावर तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने या बालकाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकाराने भावनाविवश होऊन महिला पोलिस आणि नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्याची औरंगाबादबाहेर नुकतीच पदोन्नतीवर बदली झाली आहे.
मृत बालकाचे पोस्टमार्टेम करण्यात आले. डॉक्टरांच्या जवाबावरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद घेण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण दडपण्यासाठी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी दबावतंत्राचा वापर करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राहुल गायकवाड प्रकरणातून पोलिस प्रशासन अडचणीत आले होते. आता हे प्रकरण वाढले, तर पोलिसांची अडचण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्व उत्साहात जगन्नाथ यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘हरे कृष्ण, हरे कृष्ण-कृष्णा कृष्णा, हरे हरे ! हरे राम, हरे राम-राम राम, हरे हरे !’ अशा जयघोषाने रविवारी शहर दुमदुमले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे (इस्कॉन) संस्थापकाचार्य ए. सी. भक्‍तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांच्या औरंगाबाद शाखेतर्फे रविवारी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली.
या रथयात्रेत शेकडो भाविक सामील झाले होते. विविध रंगांच्या फुलांनी सजविलेल्या रथामध्ये भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या आकर्षक मूर्ती विराजमान होत्या. खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर स्मिता घोगरे, साधना सुरडकर, सुरेंद्र कुलकर्णी, इस्कॉन औरंगाबाद अध्यक्ष डॉ. रोहिणी प्रिय प्रभू, मुंबई येथील डॉ. मधवाचार्य प्रभू, डॉ. ऋषिकेश आनंद प्रभू, डॉ. जय हनुमान प्रभू, डॉ. प्रेम पद प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ ओढण्यास सुरवात झाली. पारंपरिक वेशभूषा साकारून सहभागी झालेले भाविक जयघोष करीत रथ ओढत होते. रथाच्या मार्गात जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर ठिकठिकाणी फुलांचा सडा टाकून स्वागत करण्यात आले. विविध भागांमध्ये रथ पोहोचल्यावर दर्शनासाठी भाविक गर्दी करीत होते. रथयात्रेत वैष्णव तिलक लावून पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता परिधान करून सहभागी झाले होते. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रथयात्रेस प्रारंभ झाला. रिद्धी-सिद्धी पेट्रोलपंपमार्गे खिंवसरा पार्क - उल्कानगरी - अग्निहोत्र चौक - चेतक घोडा - त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज चौक - रिलायन्स मॉल - हिंदुराष्ट्र चौक - स्टेट बॅंक ऑफ पटियाला - पुंडलिकनगर चौक यामार्गे शिवछत्रपती कॉलेज एन-तीन सिडको येथे रथयात्रेचा समारोप झाला. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. रथयात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी भाविकांना पाणी, खाद्यपदार्थ आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. गेली तीन महिने परिश्रम घेऊन सुंदर असा रथ बनविण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईला चिठ्ठी लिहून रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आई मला माफ कर,’ अशी चिठ्ठी लिहून सुनील जाधव (वय ३६) या तरुणाने रविवारी जालना डेमू रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
संग्रामनगर रेल्वे उड्डाणपूलाजवळ एका ३६ वर्षीय युवकाने, जालना डेमू रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव सुनिल जाधव असून हा युवक चाटे स्कूलमध्ये बस ड्रायव्हर म्हणुन काम करित होता. मुत्यूपूर्वी सुनिल जाधव यांनी आपल्या आईच्या नावाने पत्र लिहून आई मला माफ कर असं लिहून, माझ्या मुत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
संग्रामनगर रेलवे उड्डाणपूलाजवळ रविवारी दुपारी तीन वाजून ४९ मिनिटाला सुनील जाधव हा तरूण साताऱ्याच्या बाजुला येऊन उभा राहिला होता. तेथील एका हातगाडीवर त्याने वडापाव खाल्ला. त्यावेळी रेल्वे येत असल्याची चाहूल लागताच तो रुळाकडे गेला. रेल्वे जवळ येताच त्याने तिच्यासमोर उडी मारली. रुळाजवळ उभे असलेले श्रीमंत गोर्डे पाटील, कैलाश भातपुढे, योगेश साळवे, सचिन कांबळे, दीपक ठाकूर, संजू दर्मपुरी, गणेश वासाने, प्रकाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत खूप वेळ झाला होता. रेल्वेने सुनीलला २० ते २५ फुटापर्यंत ओढत नेले, त्याचा तेथेच मृत्यू झाला. या घटनेची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आली.
या तरुणाच्या पाकिटात ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो व चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत आईची सेवा करू शकत नसल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. ‘आई मला माफ कर, माझ्या मुत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे चिठ्ठीत लिहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडवे आलात, तर तेथेच आडवे करू

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षात महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर आणण्याचे काम केले आहे. ‘जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी’ हे आमचे सूत्र आहे असे सांगताना भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नाव न घेता, आडवे येतील त्यांना आडवे करू, असा इशारा दिला.
खुलताबाद येथे भाजप कार्यकर्त्यांच्या रविवारी विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, किशोर धनायत, आसाराम तळेकर, संजय केनेकर, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ आदी उपस्थित होते.
मित्र पक्षाशी युती करण्यासाठी चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. भाजपचा युती करण्याचा प्रयत्न होता. मात्र शिवसेनेला युती नको होती. भाजपने ११४ जागांची मागणी केली. मुंबई शहरात भाजपचे आमदार १५, शिवसेनेचे १४ आमदार आहेत. त्यामुळे जागा वाढवून मागितल्या, तर काय चुकले, असा सवाल खासदार दानवे यांनी उपस्थित केला. ‘जिसकी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी’ हे आमचे सूत्र होते. युती तोडून शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. पहिली फेरी झाली मुद्दा होता पारदर्शकपणे निवडणूक लढविण्याचा. द्विपक्षीय समिती असली पाहिजे. दुसरी मिटिंग झाली. निर्णय झाली नाही. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन असते तर त्यांना दुखः झाले असते, असे ते म्हणाले.
‘राज्यात २५ जिल्हा परिषद आणि १० महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षाला जिंकायच्या आहेत. यापूर्वी राज्यामध्ये २१२ नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ७३ ठिकाणी नगराध्यक्ष आणि १२०७ नगरसेवक जिंकून राज्यातील एक नंबरचा पक्ष ठरला. पूर्वी भाजपचे ८ नगराध्यक्ष होते २४० नगरसेवक होते. देशातील एक नंबरचा पक्ष भाजप आहे. देशात सर्वात जास्त खासदार, राज्यात आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक भाजपचे आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यातील सभा करून आलो. याठिकाणी पूर्वी दुर्बिण लावून भाजप कार्यकर्ता सापडत नव्हता. तेथे आता हजारो कार्यकर्ते आज भाजपचे काम करीत आहेत,’ असा दावा त्यांनी केला. ‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडीच वर्ष आणि राज्यात दोन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले अनेक निर्णय लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. मोदी सरकारने आणेवारीची पद्धत बदलली. पूर्वी ५० टक्के नुकसान झालेले गाव दुष्काळग्रस्त जाहीर व्हायचे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३३ टक्के नुकसान झालेले गाव दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले. पिकविमा मिळाला. शेतकऱ्यांना विमा भरायचा असेल खताच्या किंमती पाच वर्ष वाढणार नाहीत, खताच्या किंमती वाढल्या तर फरकाचे पैसे सरकार देईल. राज्यात जलयुक्त शिवार योजना आणली. एक वर्षात शेतकऱ्यांच्या जमिनी न घेता २४ टीएमसी पाणी अडविले. काँग्रेस आणि भाजप सरकारमधील फरक गावागावात सांगून मतदारांच्या लक्षात आणून द्या. मतदार भाजपच्या पाठिशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. या मेळाव्यास भाजप कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

राज्यात पुन्हा भाजपच
महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचेच असतील असा खासदार दानवे यांनी यावेळी बोलताना केला. भाजप कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत न डगमगता ताकदीने हिंमतीने बंडखोरी न करता राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिका ताब्यात घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेपाच लाख बालकांना जिल्ह्यात डोस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील ४ लाख ७४ हजार ९५२ बालकांना रविवारी (२९ जानेवारी) पल्स पोलिओ लस पाजण्यात आली. यामध्ये शहरातील शहरातील ६१४ बुथद्वारे तसेच १४ एक्झिट पॉईंटद्वारे एक लाख ८६ हजार बालकांना लस पाजण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे ९२ टक्के बालकांना ही लस पाजण्यात आल्याचे रविवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले.
यामध्ये औरंगाबाद तालुक्यामध्ये ४८१२८ बालकांना (९१ टक्के) लस पाजण्यात आली. पैठण तालुक्यात ३५७१८ बालकांना (९६ टक्के), गंगापूर तालुक्यात ४५११८ बालकांना (९२ टक्के), वैजापूर तालुक्यात २७३१० बालकांना (९५), खुलताबाद तालुक्यात ११०३१ बालकांना (१०० टक्के), कन्नड तालुक्यात ३१२२३ (८५ टक्के), सोयगाव तालुक्यात १२३२२ (९२ टक्के), सिल्लोड ३३८४१ (९४ टक्के), फुलंब्री तालुक्यात १७८५३ बालकांना (९३ टक्के) लस पाजण्यात आली. शहरामध्ये एक लाख ९६ हजार ८३९ बालकांना लस पाजण्याचे टार्गेट होते. प्रत्यक्षात एक लाख ८६ बालकांना म्हणजेच ९४ टक्के बालकांना लज पाजण्यात आली. लस देणे राहिलेल्या बालकांचा घरोघरी शोध घेऊन त्यांना लवकरच लस पाजण्यात येईल, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी वाहतूकदारांचे उद्या ‘चक्का जाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरटीओ शुल्कवाढ, पोलिसांच्या दंडातील वाढ मागे घ्यावी यासह इतर मागण्यांसाठी विविध प्रवासी वाहतूक संघटनांनी मंगळवारी (३१ जानेवारी) चक्का जाम आंदोलन जाहीर केले आहे. प्रवासी वाहतूकदार आमखास मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.
आरटीओ शुल्क वाढीच्या विरुद्ध ३१ जानेवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन घोषित केले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी रविवारी मराठवाडा टॅक्सी मेटॅडोर अॅण्ड जीप ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहनसिंह ओबेरॉय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान, ट्रॅव्हल्स असोसिऐशनचे अध्यक्ष राजन हौजवाला, लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष बुद्धीनाथ बराळ यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या दिवशी रिक्षा, टॅक्सी, काळी पिवळी, टेम्पो, ट्रॅव्हल बस, स्कूल बस, खासगी प्रवासी वाहने बंद ठेवली जाणार आहेत. या आंदोलनात सर्व वाहने आमखास मैदानावर जमा होणार असून तेथेच वाहने दिवसभर थांबवली जातील, अशी माहिती रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे निसार अहेमद यांनी दिली.

आंदोलनाच्या मागण्या
- शुल्कवाढीचा २९ डिसेंबर २०१६ रोजीचा निर्णय मागे घ्यावा
- फेरफार व बोगस परवाने रोखण्यासाठी परवाना पत्रावर फोटो लावावा, ते आधार लिंक करावे
- पोलिसांच्या दंडात झालेली वाढ मागे घ्यावी
- आरटीओ कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवावी
- शहरात एलपीजी, सीएनजी पंप सुरू करावेत
- मूळ कागदपत्रे जमा केल्यानंतर आवक क्रमांक देण्याची पद्धत आरटीओ कार्यालयात लागू करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रागावणे हा तात्पुरता वेडेपणाः डॉ. परब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एखाद्या गोष्टीवर संतापून कोणतीही कृती करणे हे योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या हातून चूक होण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी आपल्या कृतीने पश्चातापाचीही वेळ येऊ शकते. कारण रागावणे हा तात्पुरता वेडेपणाच असतो. त्यामुळे एखाद्या कृतीवर व्यक्त होण्याची तुमची कृती बदला आणि आयुष्य सुखकर करा, असा सल्ला कार्पोरेट ट्रेनर आणि काउन्सिलर बीके डॉ. सचिन परब यांनी रविवारी दिला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात डॉ. परब यांचे सकाळी साडेसात वाजता ‘क्रोधमुक्त जीवन जीने की कला’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची उपस्थिती होती.
डॉ. परब म्हणाले, ‘एका क्षणाच्या रागाने अनेकांचे जीवन उद्धवस्त केले. मी तुरुंगात जाऊन अनेक गुन्हेगारांशी संवाद साधला. त्यातील अनेक जण चांगल्या कुटुंबातून आलेले. कोणी प्राचार्य, तर कोणी इंजिनीअर. त्यांनी अनुभव सांगितले त्यावेळी हेलावून गेलो. आम्ही वाईट नाही, पण एक मिनीट संतुलन ढळले आणि होत्याचे नव्हते झाले, असे ते म्हणाले. राग आल्यास आपला विवेक नष्ट होते. त्यामुळे सारासार विचार करण्याची शक्ती आपण गमावून बसतो. आपली बुद्धी काम करत नाही. राग आल्यानंतर गप्प बसणे, मौन बाळगण्यानेही स्वतःचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी स्वतःला बदला. तुमचे विचार बदला. नकारात्मक भावना मनातून काढून टाका. मी माझ्या भावना नियंत्रणात ठेवेन, याची जाण स्वतःला करून द्या. जसे विचार कराल, तसेच व्हाल. त्यामुळे स्वतःतल्या प्रेमाची, शांतीवृत्तीची स्वतःलाच जाणीव करून द्या. तुमचे जीवन आनंददायी होईल,’ असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नवीनचंद्र रेड्डी म्हणाले, ‘ईश्वरीय विद्यालयाच्या माध्यमातून शांती सुव्यवस्था टीकवण्याचे काम सुरू आहे. बीडमध्ये मी हे शिबिर घेतले होते. त्याचा अनेकांना फायदा झाला. रोजच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी ध्यान धारणा गरजेची आहे. या विद्यालयातून तुम्हाला मानसिक शांती आणि शक्ती मिळते.’
सूत्रसंचालन दीपादीदी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. विद्यार्थिनींनी शास्त्रीय संगीतातून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी सभागृह श्रोतांनी भरले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ७.३० वाजता ‘२१वीं सदी की चुनौतियां एवं उनका समाधान’ या विषयावर डॉ. परब मार्गदर्शन करणार आहेत.

मैं मम्मी का रिमोट कंट्रोल!
डॉ. परब यांनी यावेळी अनेक अनुभव सांगितले. ‘पती इंजिनीअर, बायको सर्जन. मात्र, दोघांत भांडण व्हायचे. इंजिनीअरने रागात टेबलावरील काच फोडला. पन्नास हजारांचा मोबाइल फेकण्यासाठी घेतला, तेव्हा राग आल्याचे समजले. मुलांवर रागवण्याने ते अभ्यास करणार नाहीत. फक्त पुस्तक घेऊन बसतील. उलट मुलेच आज ‘मैं मम्मी का रिमोट कंट्रोल हुँ,’ म्हणतात. त्यांना माहित असते तुम्हाला राग कसा, केव्हा, का येतो ते. त्यामुळे रागाशिवाय काम कसे होईल, याचा विचार करा. राग येणे म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आपण स्वतःला करून घेणे,’ असे परब म्हणाले. त्यांनी उपस्थितांचे दहा मिनीट ध्यान करवून घेतले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

डॉ. परब यांचा सल्ला
- राग आल्यास स्थळ सोडा.
- एक ते दहापर्यंत आकडे मोजा.
- तुमच्या राग किती हे समजेल.
- सहा म्हणेपर्यंत राग राहणे धोकादायक.
- पोट दुखणे, डोके दुखणे रागाचे लक्षण.
- झोप पूर्ण होत नसेल, तर राग येतो.
- रागामुळे हृदयविकार, कॅन्सरचा धोका.
- तुमच्यातील रागाचे बटन ओळखा.
- लवकर राग येणे म्हणजे आणीबाणी.
- ध्यानातून रागाचे शमन शक्य.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटीबससाठी जालना रोड, बायपासचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेंद्रा-वाळूज औद्योगिक वसाहतींना सिटीबसच्या माध्यमातून जोडण्यासाठी जालना रोड आणि बीड बायपास रस्त्याचा वापर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या दोन मार्गांसह शहराच्या अन्य काही भागांपर्यंत सिटीबस पोचवण्यासाठी पहिल्या टप्प्यात किमान ५० बसची आवश्यकता असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पॅनसिटीच्या माध्यमातून औरंगाबाद शहरात ‘अर्बन ट्रॅफिक मोबिलिटी’ ही योजना राबवली जाणार आहे. त्यात सिटीबसचादेखील समावेश आहे. औरंगाबाद परिसरात येऊ घातलेल्या डीएमआयसी प्रकल्पामुळे शेंद्रा आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहती अधिक जवळ येतील, असे गृहित धरून या वसाहतींना जोडण्यासाठी जालना रोड आणि बीड बायपासमार्गे सिटीबस सेवा सुरू करण्याची कल्पना सिटीबसच्या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण केलेल्या एमआयटी कॉलेजने मांडली आहे. औद्योगिक वसाहतींशिवाय शहरातील अन्य मार्गांवरही सिटीबस सेवा सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात किमान ५० सिटीबस पॅनसिटीच्या माध्यमातून सुरू कराव्या लागतील, असे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
जालना रोडमार्गे शेंद्रा ते वाळूज असा प्रवास करायचा असेल तर किमान एक ते दीड तास लागतो. दर पंधरा मिनिटांनी एक बस सोडल्यास या मार्गावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी सहा बसची व्यवस्था करावी लागणार आहे. म्हणजे या मार्गावर १२ बस लागतील. बीड बायपास रस्त्यावरही एवढ्याच बस लागतील. त्याशिवाय २६ बस शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
जालना रोड, बीड बायपास रस्त्याशिवाय रेल्वे स्टेशन ते शहागंज, रेल्वे स्टेशन ते हर्सूल, औरंगपुरा ते विद्यापीठ, औरंगपूरा ते रेल्वे स्टेशन, औरंगपूरा ते शिवाजीनगर या लांब पल्ल्याच्या व प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या मार्गांचा विचारदेखील सिटीबस सेवा सुरू करताना करावा लागणार आहे.
बसथांबे कुठे असावेत, त्यांची रचना कशी असावी, त्यांचा दर्जा कसा असावा, बस डेपोसाठीची जागा कुठे असावी, कर्मचारीवर्ग कसा उपलब्ध करून घ्यावा, याचेही नियोजन करावे लागणार आहे. पुणे, अहमदाबादसह अन्य काही प्रमुख शहरांमध्ये बीआरटीएसच्या माध्यमातून सिटीबस सेवा चालवली जाते. आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे या शहरांमधील सिटीबस सेवा विस्कळित झाली आहे. त्याची पुनरावृत्ती औरंगाबादेत होऊ नये यासाठी नियोजन केले जाणार आहे.

मंगळवारी होणार सर्वेक्षण
पॅनसिटीअंतर्गत सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण मंगळवारी (३१ जानेवारी) केले जाणार आहे. केंब्रिज शाळा, हर्सूल टी पॉइंट, महावीर चौक, रेल्वे स्टेशन, सिडको बस स्टँडचा चौक या पाच ठिकाणी आयटीडीपीचे प्रतिनिधी व एमआयटी कॉलेजचे विद्यार्थी सर्वेक्षण करणार आहेत. विशिष्ट वेळेत या मार्गांवरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या, वाहनांचे प्रकार, प्रवासासाठी लागणारा अवधी या मुद्यांच्या आधारे सर्वेक्षण केले जाईल, असे एमआयटी कॉलेजचे प्रा. सुमीर जैस्वाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होडीचा जीवघेणा प्रवास संपण्याच्या मार्गावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्यानंतर परंडा तालुक्यातील आलेश्वर ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दररोज सीना नदीतून होडीने जीवघेणा प्रवास करणाऱ्या आलेश्वरच्या विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी शासनाच्यावतीने पूल बांधण्याचे निश्चित झाले आहे. विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे त्यासाठी सहा कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
सीना नदीवरील हा पूल व्हावा यासाठी आलेश्वर ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्नशील होते. परंतु, या कामी त्यांना लोकप्रतिनिधींची साथ मिळत नव्हती. भाजप नेते तथा विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी आलेश्वर ग्रामस्थांच्या या प्रलंबित मागणीकडे जातीने लक्ष दिल्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.
परंडा व करमाळा तालुक्याच्या सीमेवरील सीना नदीच्या काठावर वसलेले सुमारे दीड हजार वस्तीचे हे गाव आहे. आलेश्वर गावापासून परंडा सुमारे ३५ किलोमीटर तर करमाळा १६ किलोमीटर अंतरावर आहे. परंडा येथून एक बस आलेश्वरला येते, परंतु तिचा मार्ग वेगळा आहे. त्याच्या व्यतिरिक्त या गावाला प्रवासाचे दुसरे साधन नाही. करमाळ्याकडे जायचे तर सीना नदीच्या पात्रातील होडीचाच वापर येथील ग्रामस्थांना घ्यावा लागतो. परंडापेक्षा करमाळ्याचे अंतर हे आलेश्वर ग्रामस्थांसाठी कमी असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी व ग्रामस्थांचा करमाळयाशीच संपर्क आहे.
आलेश्वर येथे पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी येथील मंडळींचा करमाळयाकडे ओढा आहे. शाळेला जाण्यासाठी येथून वाहतुकीची कुठली सोय नसल्याने येथील मंडळींना होडीचाच आधार घ्यावा लागतो. हा प्रकार स्वातंत्र्यापासून सुरू आहे.
आलेश्वर येथून करमाळ्याकडे जायचे असल्यास वाघाचीवाडी, मोर गव्हाण, तांदुळवाडी मार्गे जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र, या मार्गे बसेसची सोय उपलब्ध नाही. तांदुळवाडी चालत गेल्यास तेथूनही बसची सुविधा नाही. आलेश्वर ते तांदुळवाडी हे अंतर दहा किलोमीटर आणि तांदुळवाडी ते करमाळा हे अंतर वीस किलोमीटर आहे. त्यामुळे पर्यायी आणि जवळचा मार्ग म्हणून सीना नदीच्या पात्रातील होडीचा मार्ग ग्रामस्थ नाइलाजास्तव अवलंबतात. जीव मुठीत घेवून त्यांचा हा प्रवास वर्षानुवर्षे सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी हॉस्पिटलच्या दुरुस्तीला ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावणेतीन कोटी रुपयांच्या निधीतून घाटीची डागडुजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि हा निधी गेल्या सहा महिन्यांपासून घाटीच्या खात्यामध्ये पडून आहे, मात्र अद्यापही या कामांना प्रारंभ झालेला नाही. हा निधी आधी बांधकाम विभागाकडे जमा करा, नंतरच काम सुरू करू, या भूमिकेतून बांधकाम विभागाने कामाला प्रारंभ केलेला नाही, तर काम झाल्यानंतरच निधी वर्ग करावा, असे स्पष्ट आदेश असल्यामुळे व पूर्वीच्या अनुभवामुळे घाटी हा निधी ‘बांधकाम’ला कामा होण्यापूर्वी वर्ग करण्यास तयार नाही. एकूणच या स्थितीमुळे निधी परत जातो की काय, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
राज्य शासनाच्या १ कोटी १० लाखांच्या निधीतून वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या होणार आहेत, तर १ कोटी ६४ लाखांच्या निधीतून रुग्णालय परिसरातील ओपीडी बिल्डिंग, सर्जिकल बिल्डिंग, मेडिसिन बिल्डिंगमधील वेगवेगळी कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बांधकाम समितीचे अध्यक्ष व अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, सदस्य सचिव व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, सदस्य व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, दोन्ही प्रशासकीय अधिकारी, बांधकाम-विद्युत विभागाचे अभियंता आदींच्या उपस्थितीत ९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याच निधीतून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचीही प्रलंबित कामे होणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतील अत्यंत दयनीय अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या टॉयलेटच्या दुरुस्तीलाही याच निधीतून मुहूर्त लागणार आहे. कॉलेज बिल्डिंगची किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी, कॉलेजमधील मोडकळीस आलेल्या महात्मा गांधी ऑडिटोरियमची दुरुस्ती, विविध विषयांचे व्याख्यान कक्ष, परीक्षा सभागृह, नर्सिंग कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहातील दुरुस्तीचेही नियोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी घाटी रुग्णालयातील विविध वॉर्ड, ओपीडी बिल्डिंग, सर्जिकल बिल्डिंग, मेडिसिन बिल्डिंग यासारख्या जुन्या-नव्या इमारतींमधील बांधकाम दुरुस्त्यांही होणार आहेत. या संदर्भात घाटीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी पुढाकार घेऊन, संबंधित बांधाकाम व विद्युत विभागाला आदेश दिले आहे, मात्र किमान दोन आठवडे होऊनही कुठल्याच कामांना प्रारंभ झालेला नाही. उर्वरित दोन महिन्यांमध्ये म्हणजेच ३१ मार्चपर्यंत ही कामे झाली नाहीत, तर पावणेतीन कोटी रुपयांचा निधी परत जाणार आहे.

विचित्र भूमिकेमुळे त्रांगडे
हा निधी आधी बांधकाम विभागाकडे वर्ग करावा, त्यानंतर काम सुरू करू, अशी भूमिका बांधकाम विभागाने घेतली आहे. तर, काम झाल्याशिवाय बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करू नये, असे पत्र खुद्द ‘डीएमईआर’नेच घाटीला दिल्याचे समजते. त्यामुळे पावणे कोटींचा निधी परत जातो की काय, अशी शंका घेतली जात आहे. हा निधी परत गेला तर त्याची जबाबदारी कुणाची, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मागच्या वर्षीही हा निधी परत गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती होणार का, अशीची चर्चा सुरू झाली आहे.

२५ लाख रुपये खर्चून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे केली जाणार असल्याचे खुद्द अधिष्ठातांनी दोन आठवड्यांपूर्वीच सांगितले होते, मात्र अद्याप निवासस्थानांची कुठलीच कामे सुरू झालेली नाहीत. त्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधी पाहणीदेखील केलेली नाही.
- राजेंद्र पोहाल, प्रदेशाध्यक्ष, भीमशक्ती कर्मचारी संघटना

पावणेतीन कोटी रुपयांच्या निधीतून अद्याप कुठलीच कामे सुरू झालेली नाहीत. हा निधी परत गेला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी बांधकाम विभागाची राहील.
- डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतविभागणी टाळण्याच्या मुख्य उद्देशाने आघाडी झाली असल्याचे काँग्रेसचे आमदार दिलीप देशमुख यांनी जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दिलीप देशमुख म्हणाले, ‘औसा विधानसभा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी १० आणि पंचायत समितीच्या ११ जागा लढविणार आहेत. उर्वरीत सर्व जागा काँग्रेस लढविणार आहे. तरी सुद्धा सक्षमतेच्या मुद्यावर एखादी जागा कमी जास्त होऊ शकते. औशाच्याबाबतीत बैठका सुरू असल्याचे सांगितले. एक दोन दिवसात तो ही प्रश्न राहणार नाही.’
सहमतीच्या राजकारणावर माझा नेहमीच भर असतो. सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा विकास करावा यासाठी प्रयत्न असतात. परंतु, देशातच सध्या धर्म, संस्कृती यावर अधिक भर असल्यामुळे धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होत असून ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हे मतविभाजन टाळण्यासाठी आम्ही कोण किती जागा लढवविणार याला महत्व न देता लातूर लोकसभा मतदार संघाची रचना लक्षात घेऊन आघाडी केली आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे अधिकार हे अशोक चव्हाण यांना देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
आमदार अमित देशमुख यांनी विरोधकाच आव्हान पेलण्यासाठी दोन्ही पक्षाची आघाडी होण गरजेचे होते असे सांगून सक्षम उमेदवार हाच मुख्य मुद्दा असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘मताची विभागणी होऊ नये यासाठी सक्षम उमेदवार हाच निकष लक्षात ठेऊन आम्ही आघाडी केली आहे.’
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष मोईज शेख यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दगडुसाहेब पडीले, रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, संभाजी सुळ, सुनीता आरळीकर, बी. व्ही. मोतीपवळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यातील हाय प्रोफाइल कुंटणखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

शहरातील शकुंतलानगर येथील एका तीनमजली इमारतीत भरदिवसा सुरु असलेल्या हाय प्रोफाइल कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारला. विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत ३ कॉल गर्ल्स, ३ ग्राहक आणि कुंटणखाना चालविणाऱ्या एका आंटीला रंगेहात पकडण्यात आले.

शकुंतलानगर येथील उच्च्भ्रूवस्तीतील एका इमारतीत कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांना खबऱ्यामार्फफत मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांचा विशेष पथक रविवारपासून त्या परिसरात नजर ठेवून होता. दरम्यान, सोमवारी दुपारी काही कॉलगर्ल्स आणि ग्राहक त्या इमारतीत गेल्याचे पोलिसांना समजले. यांनतर विशेष पथकातील एका पोलिस शिपायाला बनावट ग्राहक बनवून इमारतीत पाठविण्यात आल्यानंतर तेथे कुंटणखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर परिसरात दबाब धरुन बसलेल्या विशेष पथक आणि दामिनी पथकाने सदर कुंटणखानावर छापा मारला.
याकारवाईत ३ कॅलगिरल्स,३ ग्राहक आणि कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला रंगेहात पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्याल्सपैकी दोघीजण औरंगाबादच्या तर एकजण जालन्याची आहे. दरम्यान, त्यांच्याकडून रोख २७ हजार ५०० रुपये, एक स्विफ्ट डिझायर कार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, कुंटणखाना चालविणाऱ्या आंटी केंद्रेबाईच्या नावाने प्रसिद्ध आहेत. ग्राहकांमध्ये बडे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे बोलले जाते.



याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images