Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची मुसंडी

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकून अव्वल स्थान पटकाविले आहे. शिवसेनेने १८ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला. झेडपीचे अध्यक्षपद यावेळी भाजपला मिळणार आहे.

यावेळी मात्र पैठण वगळता सर्व तालुक्यांमधून भाजपचे उमेदवार निवडून आले. औरंगाबाद तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी दहा पैकी पाच जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले. फुलंब्री तालुक्यात तीन जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. खासदार चंद्रकांत खैरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी कन्नडची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पारड्यात केवळ दोन जागा आल्या. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी घवघवीत यश मिळविले. गंगापूरमध्ये चार जागा भाजपने जिंकल्या. खुलताबादमध्ये तर विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. पैठण तालुक्यात शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी नऊ पैकी सात जागा जिंकून ‘भाजपसाठी पैठण बहोत दूर है’ याची प्रचिती दिली. भाजपला गेल्या निवडणुकीत केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र हा आकडा २२ वर पोचल्याने भाजपने ग्रामीण भागात मुसंडी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅट्रॉसिटी गैरवापर रोखण्याची जबाबदारी राज्यावर

$
0
0


म. टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याला (अॅट्रॉसिटी ) आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात केंद्र शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यामध्ये या कायद्यांचा गैरवापर रोखणे तसेच प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. यावर न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एस. एस. पाटील यांनी राज्य शासनाला नोटीस काढण्याचे निर्देश दिले.
लातूर जिल्ह्यातील दत्ता कदम, रामकृष्ण कदम आणि बीड जिल्ह्यातील सुरेश करपे यांनी या संदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी, दलित अन्याय, अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अॅट्रॉसिटी कायदा ) घटनेनुसार वैध नाही, असे घोषित करावे यासह कायद्यांच्या गैरवापरास प्रतिबंध करून प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमावली तयार करावी यासह इतर विनंती केली आहे.
दत्ता कदम यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल झाला होता. लातूरच्या सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले असता, उच्च न्यायालयानेही त्यांना निर्दोष ठरविले. यावर कदम यांनी नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती याचिकेमध्ये केली आहे. प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने हा कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयातील मध्य प्रदेशविरुद्ध रामकिशन लोहिया प्रकरणातील निकालाच्या अनुषंगाने कायद्याच्या वैधतेवर विचार करण्यास नकार दिला. मात्र, इतर विनंतीवर विचार करण्यासाठी प्रकरण सुनावणीस घेतले.
सुनावणीवेळी केंद्र शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, घटनेच्या सातव्या परिशिष्टानुसार एखाद्या गुन्ह्याची नोंद करणे, तपास करणे, अभियोग दाखल करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध करणे याची जबाबदारी राज्य शासनाची असते आणि यातच अॅट्रॉसिटी कायदाही येतो. याच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारीही राज्य शासनाचीच असते. देशभरात या कायद्यान्वये दाखल प्रकरणांची संख्या आणि गुन्हा सिद्धता व शिक्षेचे प्रमाण यांची आकडेवारीही यात सादर करण्यात आली.
केंद्र शासनाच्या वतीने दाखल प्रतिज्ञापत्रावर उत्तरादाखल याचिकाकर्त्यांच्या वतीने अतिरिक्त म्हणणे सादर करण्याची परवानगी खंडपीठाने दिली. खंडपीठाने राज्य शासनास नोटीस बजावून पुढील सुनावणीत या कायद्यांचा गैरवापर रोखणे आणि प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात काय उपाययोजना केली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने कुलदीप पाटील यांनी बाजू मांडली. त्यांना ज्ञानेश्वर पोकळे, दत्तात्रय सरवदे यांनी साह्य केले. राज्य शासनातर्फे अविनाश बोरुळकर आणि केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी बाजू मांडली. या याचिकेची सुनावणी २४ मार्चला होणार आहे.

नुकसानभरपाईची तरतूद
ज्या कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन शिक्षेचे प्रमाण कमी असते तो कायदाच रद्द करा, असे म्हणता येणार नाही. या संदर्भात दाखल फिरण्यात खोटी आहे, असेही म्हणता येणार नाही. एखाद्या प्रकरणात झालेली निर्दोष मुक्तता म्हणजे प्रकरणच खोटे, असे म्हणता येणार नाही. गुन्हा सिद्ध करता आला नाही, असे म्हणता येईल. प्रत्येक प्रकरणात निकाल देताना न्यायालय अनेक बाबींचा विचार करते. फौजदारी प्रकारात गुन्हा सिद्ध करण्यासाठी संशयापलीकडील पुरावा सादर करावा लागतो. असा पुरावा नसेल तर न्यायालय निर्दोष मुक्तता करते. मात्र, याचा अर्थ गुन्हा घडलाच नाही, असा होत नाही. फौजदारी दंड संहितेत एखाद्याला एखाद्या प्रकरणात खोटेपणाने गोवले आणि तसे सिद्ध झाले, तर त्याला नुकसानभरपाईची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळालेला आरोपी १५ मिनिटांत जेरबंद

$
0
0


वैजापूर : गुन्ह्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणलेल्या आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न पोलिस व न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे फसला. पोलिस व कर्मचाऱ्यांनी लांबवर पाठलाग करून अवघ्या पंधरा मिनिटात फरार आरोपीला जेरबंद केल्याचे थरारनाटय शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडले.
दिलीप विठ्ठल राठोड (रा. टाकरवन तांडा नंबर १ ता. माजलगाव) असे पोलिसाच्या रखवालीतून पळून जाणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पत्नीचा खून केल्याच्या गुन्हयात वाळूज एम. आय. डी. सी पोलिसानी त्याला ५ मे २०१६ रोजी अटक केली होती. अटकेनंतर त्याची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सदरील गुन्हयाच्या सुनावणीसाठी पोलिसानी त्याला हर्सूल कारागृहातून शुक्रवारी वैजापूरच्या जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात आणले होते. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांसमोर उभे करण्यापूर्वी पोलिसानी आरोपीच्या हातातील बेडी काढली होती. ही संधी साधून आरोपी दिलीपने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन दुसऱ्या मजल्यावरून पलायन केले. दरम्यान संबधित पोलिसांनी आरडाओरड केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. एन. रयतूवार, एच. एस. शिरसाठ इतर पोलिस कर्मचारी, न्यायालयाचे बिलिफ लक्ष्मीकांत दंडारे यांनी पाठलाग करून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील सावता नगर वसाहतीत आरोपीच्या शितीफीने मुसक्या आवळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५० चिमुकले बचावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या संत तुकाराम नाट्यगृहात घडला. नाट्यगृहातील स्टेजवर लाइट, पडद्यांसाठी बांधलेला लोखंडी रॉड कोसळला, त्यावेळी तेथे सुमारे अडीचशे चिमुकले होते. दैव बलवत्तर म्हणून कुणालाही मार लागला नाही, पण या निमित्ताने नाट्यगृहाची दुरावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या जंबो किड्सच्या ज्युनिअर केजी आणि केजीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात होते. त्यासाठी दुपारी तीनपासूनच चिमुकल्यांसह पालक नाट्यगृहात आले होते. स्नेहसंमेलनातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास चिमुकल्यांना स्टेजवर बोलावण्यात आले. एकाच वेळी दोनशे ते अडीचशे बालके स्टेजवर चढले. मुख्य कार्यक्रम सुरू होण्यास १५ ते २० मिनिटांचा अवधी असल्यामुळे शिक्षिकांनी बालकांना स्टेजच्या विंगेत आणि ग्रीन रुमच्या बाजूने उभे केले. कार्यक्रमच्या उद्घाटनाची लगबग सुरू असतानाच स्टेजच्या वरील बाजुला लावलेला एक मोठा लोखंडी रॉड स्टेजवर कोसळला.
दोरीच्या सहाय्याने या लोखंडी रॉडची उंची अॅडजेस्ट केली जाते. विगेंचे पडदे, लाइटची रचना रॉडच्या माध्यमातूनच केली जाते. त्यातील एक रॉड सव्वाचारच्या सुमारास कोसळला. त्यावेळी कार्यक्रम सुरू नव्हता. लहान मुलेही स्टेजवर नव्हती. त्यामुळे दुर्घटना टळली. रॉड पडताच पालकांमध्ये धावपळ सुरू झाली. कोणत्याही बालकाना इजा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाराशे रुग्णांची मोफत तपासणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) सुरू झालेल्या तीन दिवसीय अतुल्य आरोग्य शिबिरात पहिल्याच दिवशी बाराशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
पुंडलिकनगर परिसरातील तिरुमला मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, औषधी, गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. महापौर भगवान घडमोडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद‍्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, कामगार मोर्चाचे प्रमुख संजय केणेकर, अनिल मकरिये, गजानन बारवाल, जालिंदर शेंडगे, सुरेंद्र कुलकर्णी, प्रमोद राठोड, रेखा पाटील, मनिषा भन्साली, संजय जोशी, शिरीष बोराळकर, ज्ञानोबा मुंढे, मंगलमूर्ती शास्त्री, रावसाहेब खेडकर आदी उपस्थित होते. शिबिरात आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक रुग्ण, गरजूंनी नोंदणी केली आहे. कॅन्सर तज्ज्ञ, कार्डियॅक, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ईएनटी, ऑर्थेापेडिक्स, डेनिस्ट, फिजिशयन, सर्जन आदीसह विविध भागातील चाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग प्रकरणात प्रधान सचिवांना मागितले स्पष्टीकरण

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात पोलिसांनी दखल न घेतल्याने पित्याने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या प्रकरणात गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी अतिरिक्त सविस्तर शपथपत्र दाखल करावे असे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी दिले.
शहरातील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एक अज्ञात व्यक्ती वारंवार फोन करून आणि अश्लिल मेसेज पाठवून त्रास देत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेऊन प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी याचिका दाखल केली. याचिकेत म्हटल्यानुसार औरंगाबाद शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत छेड काढण्याच्या प्रकाराने त्रस्त झालेल्या अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्या करून जीवन संपवले.
पोलिसांच्या असंवेदनशिलतेमुळे अशी प्रकरणे वाढत आहेत. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने छेड काढणाऱ्यांची हिंमत वाढत आहे. त्यामुळे छेड काढणाऱ्याच्या विरोधात ठोस कारवाई करण्याचे आदेश गृहसचिवांना तसेच पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक (जिन्सी) यांना द्यावेत अशी विनंती याचिकेत केली. याचिकाकर्त्यातर्फे सुदर्शन साळुंके यांनी, तर सरकारतर्फे प्रीती डिग्गीकर या काम पाहत आहेत.

७ मार्चला सुनावणी
या पुर्वीच्या सुनावणीच्या अनुशंगाने गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ यांनी शपथपत्र दाखल केले होते. मात्र, शपथपत्रात विनयभंगाला कंटाळून केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे स्पष्टीकरण नव्हते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील विद्यार्थिनींच्या छेडछाडीसंदर्भात पोलिसांचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष या मुद्यावर प्रधान गृह सचिवांनी अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. या याचिकेची सुनावणी ७ मार्चला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यासाठी दुहेरी कराचा भार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने सक्रिय झालेल्या महापालिकेने आता नागरिकांवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन उपभोक्ता कर लावण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. घराघरांत डस्टबिन पुरवण्याच्या नावाखाली पालिकेतर्फे गेल्या चार वर्षांपासून उपभोक्ता कर वसूल केला जात असताना पुन्हा नव्या कराचा प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनाने ठेवला आहे.
मालमत्ता करवाढीसंदर्भात महापालिकेच्या प्रशासनाने १७ फेब्रुवारी रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवला होता. सुमारे २० ते २५ टक्के कर वाढीची शिफारस या प्रस्तावाच्या माध्यमातून प्रशासनाने केली आहे. कोणताही निर्णय न घेता हा प्रस्ताव स्थायी समितीने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे वर्ग केला. आता त्यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
करवाढीच्या प्रस्तावाबरोबरच घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरातील सर्व मिळकतधारकांकडून उपभोक्ताकर वसूल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनाने ठेवला आहे. निवासी वापराच्या मिळकतीस १०० रुपये, तर निवासेत्तर, व्यावसायिक, शैक्षणिक, औद्योगिक वापराच्या मिळकतीस ५०० रुपये कर आकारण्याचा हा प्रस्ताव आहे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गतच मिळकतधारकांना उपभोक्ता कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या मोबदल्यात प्रत्येक मिळकतधारकाला ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र डस्टबिन्स दिल्या जातील, असे नमूद करण्यात आले होते. नागरिकांना अद्याप स्वतंत्र डस्टबिन्स मिळाल्या नाहीत. या उपभोक्ता करापोटी निवासी मालमत्ताधारकांना ३०० रुपये, तर व्यावसायिक मालमत्ताधारकांना ७०० रुपये भरावे लागतात.
सोमवारच्या सभेत नव्या उपभोक्ता कराचा प्रस्ताव मंजूर केला, तर नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी जास्तीचा पैसा मोजावा लागणार आहे.

मालमत्ता करातून वसूल केले जाणारे कर
१) सामान्य कर
२) साफसफाई कर
३) राज्य शिक्षण कर
४) वृक्ष कर
५) अग्निशमन कर
६) जल भार कर
७) जलनिःसारण कर
८) मनपा शिक्षण कर
९) पथ कर
१०) रोजगार हमी कर
११) सिवरेज कर
१२) उपभोक्ता कर

घनकचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांवर जास्तीच्या कराचा बोजा टाकणे योग्य नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचे महापालिका खासगीकरण करणार नाही, मग वेगळा कर कशासाठी? महापालिका स्वतःच घनकचरा व्यवस्थापनात काम करणार असेल, तर संपूर्ण यंत्रणा पालिकेकडे आहे. प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत साधकबाधक चर्चा होईल.
- रेणुकादास वैद्य, शिवसेना नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचार चॉकलेटसारखे असावेत!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘विचार चॉकलेटसारखे असावेत. चॉकलेट थोडी उष्णता दिल्यावर पाहिजे त्या आकारात वळवता येत. त्याचवेळी विचार क्रिस्टलसारखे पारदर्शी, स्वच्छ व शुद्ध हवे. द्विधामनस्थितीतील व्यक्ती कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. आपले विचार शुद्ध, सुस्पष्ट करा,’ असे आवाहन अभिनेत्री पूर्वा नीलिमा सुभाषने शुक्रवारी केले.
सजग महिला संघर्ष समिती आणि जन शिक्षण संस्थान औरंगाबाद संचलित विजयेंद्र काबरा समा‌जकार्य महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित युवक-युवती मेळाव्यात पूर्वाने तरुणांशी संवाद साधला. यावेळी स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लढ्ढा, प्राचार्य सतीश सुराणा, मंगल खिंवसरा, रश्मी बोरीकर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. स्मिता अवचार, मनोरमा शर्मा, मृणालिनी फुलगीरकर, नगरसेवक कीर्ती शिंदे उपस्थित होत्या. सामाजिक भाव आणि कौशल्य विकास मेळाव्याचा विषय होता. यावेळी शहरातील विविध महाविद्यालयांच्या १९३ विद्यार्थ्यांनी गटचर्चेत भाग घेतला होता.
यावेळी पूर्वा म्हणाल्या, ‘सुशिक्षित असणे म्हणजेच सुसंस्कृत असणे असे अजिबात नाही. शिक्षणासोबतच कौशल्य विकास व चांगले विचार आत्मसात करता यायला हवे. स्त्रीला सन्मान देताना मी सन्मान देतोय न असा ‌अविर्भाव नको. तर एकमेकांना सारखाच सन्मान देता यायल हवा. स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष नसून पुरुषसत्ताक पद्धती विरुद्ध माणूस असा संघर्ष आहे. पुरूषसत्ताक पद्धतीमुळे केवळ स्त्रीवरच नव्हे, तर पुरुषांवरही दबाव येतो,’ असेही पू्र्वा म्हणाली.
प्रा. मनोरमा शर्मा, मंगला खिंवसरा, रश्मी बोरीकर, सुनिता जाधव, अॅड. गीता देशपांडे, डॉ. अनू मधाळे, स्मिता अवचार, पद्मा तापडिया यांनी चर्चेसाठी समन्वयक म्हणून काम पाहिले.

स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य हवे
स्त्रियांसाठी घरसुद्धा असुरक्षित झाले असून नातेवाईकांकडून होणारा त्रास सर्वाधिक पाहायला मिळतो. मुली-महिला स्वतःचे संरक्षण करूच शकत नाही, असे अजिबात नव्हे. मात्र, तिचा प्रतिकार तिनेच करावा. मदतीला पुरुष आले तर बरे, अन्यथा नाही आले तरी चालेल. निवडणुकांमध्ये महिला उमेदवार जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, ही संधी स्त्रीची हुशारी म्हणून नव्हे, तर आरक्षणामुळे मिळाली. चुलीवर स्वयंपाक करणारी महिला थेट पंचायत समितीत गेली. तयारीची मधली प्रक्रिया गाळून पद मिळाल्यावर कोणतीही स्त्री भांबवणारच. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य हवे. जोडीदाराची निवड केवळ शिक्षण किंवा कुटुंबावरून करण्यापेक्षा ती व्यक्ती म्हणून कशी आहे यावर व्हावी. स्त्रीचे करिअर टाइमपास नव्हे, तर पुढे जाण्याचा अधिकारी तिलाही आहे, असे अनेक मुद्दे गटचर्चेतून पुढे आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वधर्म समभावाचा दिला संदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) शिवाजीनगर येथे सर्वधर्मसमभावाचा सजीव देखावा सादर करण्यात आला. नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी या देखाव्याचे उद‍्घाटन केले.
सर्वधर्म निराकार परमेश्वराला मानतात. तो परमेश्वर आत्मिक सुख, शांती आणि समृद्धीचा महासागर आहे. प्रत्येक आत्म्याचा तो पिता आहे, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला. या देखाव्याच्या उद्‍घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र लघाने-पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या देखाव्यासाठी ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या छत्रपतीनगर, सातारा सेंटरच्या बी. के. स्नेहल दीदी, बी. के. रघुनाथभाई , बी. के. विजयभाई, बी. के. डॉ. हेमंत, प्रभाकर सोळुंके, महावीर संचेती आदींनी परिश्रम घेतले. दिवसभर सातारा, देवळाई व शिवाजीनगर भागातील नागरिकांनी या देखाव्याला भेट देऊन माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाळासिद्धी’ला शाळांचाच खो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळांचा गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘शाळासिद्धी’ उपक्रमाला शाळांनीच खो दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४१२७पैकी केवळ ९१ शाळांनीच नोंदणी केली आहे. माध्यमिक शाळांचा या उपक्रमाला विरोध आहे. त्याचबरोबर या उपक्रमासाठी तयार केलेली वेबसाइट हँग होत असल्याचा अनुभव आहे.
शिक्षण विभाग शाळांची तपासणी करून त्यांची गुणवत्ता निश्चिती करणार आहे. त्यासाठी यंदा ‘शाळासिद्धी मूल्यांकन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रारंभी शाळांनी नोंदणी करून स्वयंमूल्यांकन करणे अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यनिर्धारक तपासणी करून शाळांचा दर्जा निश्चित करणार आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी शाळांनी करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांची या मूल्यांकन प्रक्रियेबाबत नकारत्मकता दिसून येत आहे. अद्याप केवळ ९१ शाळांनीच नोंदणी केल्याचे समोर आले आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे ‘शाळासिद्धी’ला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता आहे.

माध्यमिक शाळांचा विरोध
जिल्ह्यात ४१२७पैकी शंभर शाळांनीही गुरुवारपर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे ‘शाळासिद्धी’ला किती प्रतिसाद आहे, हे स्पष्ट झाले. त्यातच आता माध्यमिक शाळांनीही त्याला विरोध केल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना नोंदणी बंधनकारक करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. शा‍ळांची नोंदणी झाली नाही, तर मार्चचे पगार थांबवू, असा दमही शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्याचेही सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. त्यामुळे शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे.

असे असेल मानांकन
शाळांना प्रथम स्वयंमूल्यांकन करावयाचे आहे. त्यात सोयीसुविधा, निकाल अशा विविध सात क्षेत्रांतील ९९९ गुणांची चाचणी असेल. त्या गुणवत्तेवर ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे चार गट तयार करण्यात येणार आहे. हे मानांकन पाच वर्षांसाठी वैध असणार आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या शाळांची एका त्रयस्थ यंत्रणेमार्फत फेरतपासणी करण्यात येणार आहे. राज्य निर्धारक ही तपासणी करणार आहेत. राज्यात असे १३२ निर्धारकही शिक्षण विभागाने नेमले आहेत. या मूल्यांकनामुळे शाळांचा दर्जा, गुणवत्ता विद्यार्थी, पालकांना समजणार आहे.

जिल्ह्यातील शाळा संख्या....४१२७
‘शाळासिद्धी’साठी नोंदणी.....९१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित न्यायाधिकरणाकडे प्रदूषणाबाबत दाद मागा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
मद्य कारखान्यांतून सोडण्यात आलेल्या दूषित पाणी सोडण्यात आल्यामुळे सुखना नदीत प्रदूषण वाढले आहे, असा आक्षेप घेणाऱ्या याचिकेत पर्याय उपलब्ध आहेत. याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाकडे धाव घेऊन दाद मागावी, असे निर्देश देत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी जनहित याचिका निकाली काढली.
चिकलठाणा येथील युनायटेड ब्रेव्हरिज या मद्य निर्मिती कारखान्यातून सुखना नदीमध्ये सोडण्यात येणारे दूषित पाणी, रसायने आणि घातक द्रवपदार्थ यामुळे नदीत जलप्रदूषण होते; तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायद्याच्या कलम १४, १६ व १९नुसार याचिकेतील विनंत्यांच्या अनुषंगााने हरित न्यायाधिकरण योग्य तो आदेश देऊ शकते, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे चंद्रकांत ठोंबरे, कारखान्यातर्फे पी. के. जोशी, एमआयडीसीतर्फे श्रीहरी दंडे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उत्तम बोंदर यांनी काम पाहिले.

नागरिकांना गंभीर आजार
नदीमधील जलप्रदूषण रोखण्यासाठी युनायटेड ब्रेव्हरिज कंपनीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. परिणामी ब्रिजवाडी, नारेगाव, सिंधीबन आदी परिसरातील नागरिकांना गंभीर आजार होतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ कारखाना बंद करण्याच्या आणि कारवाईच्या नोटीसा कारखान्याला बजावल्या, मात्र कोणतीही कारवाई केली नाही, असे याचिकाकर्ता बंडू पवार यांनी याचिकेत म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत बदलाचे वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वजाबाकीच्या फेऱ्यात अडकलेल्या शिवसेनेमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाल्यावर पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होतील, असे मानले जात आहे. वर्षानुवर्षे पदांवर असलेल्यांचा करिश्मा संपल्याची नोंद शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता तो ढासळू लागल्याचे चित्र आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेची औरंगाबाद जिल्ह्यात पिछेहाट झाली आहे. महापालिका एकहाती ताब्यात घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या नगरसेवकाची संख्या एक ने कमी झाली. सातारा, देवळाई वॉर्डांच्या पोटनिवडणुकीतही शिवसेनाला पराभवाचे तोंड पहावे लागले.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे २० नगरसेवक निवडून आले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पाच नगरसेवक वाढले, पण एकाही नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष होऊ शकला नाही. भाजपच्या ताब्यात दोन नगराध्यक्षपद गेले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किमान २५ जागी उमेदवार निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे नेते करीत होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेची यावेळी फक्त एक जागा वाढली. निवडणुकीच्या काळातच काही महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेना सोडून गेले. त्यांना थांबवण्यात किंवा त्यांची नाराजी दूर करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले नाही.

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर बदल
आगामी काळात ओहोटी थांबवून पुन्हा भरती आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल होण्याचे एका वरिष्ठ नेत्याने सूचित केले. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीवर लक्ष देतील. गेल्या काही वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या काही पदाधिकाऱ्यांच्या पदांमध्ये बदल केले जाणार असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमली शिवमंदिरे

$
0
0

औरंगाबाद : ‘बम बम भोले...’, ‘ हर हर महादेव...’, ‘ओम नम: शिवाय...’ या गजरांनी शहरातील सर्व महादेव मंदिरे शुक्रवारी दुमदुमून गेली. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सर्व ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवमंदिरामध्ये विद्युत रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
खडकेश्वर परिसरातील खडकेश्वर मंदिर, नागेश्वरवाडीतील नागेश्वर मंदिर, उल्कानगरीतील ओंकारेश्वर मंदिर, टिळकपथ नर्मदेश्वर, दशमेश नगरमधील दशमेश्वर मंदिर, कुंभारवाड्यातील अमृतेश्वर, एसबी कॉलनीतील ओंकारेश्वर, खाराकुआंमधील महादेव मंदिर, झांबडमधील महांकालेश्वर मंदिरात पहाटेपासूनच रांगा होत्या. गारखेडा परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात ३०० जोडपे हवनासाठी बसले होते. सिडकोतील तीन-३मधील महादेव मंदिरात सकाळपासून रांगा होत्या. शहरातील सर्वच शिवमंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. महारूद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात आले होते. जय भोलेनाथ, हर हर महादेव, अशा घोषणा आणि महामृत्युंजय जाप, ओम नमः शिवाय मंत्रजपही करण्यात आला. सर्व परिसरात भावभक्तीमय वातावरण बनले होते. शिवदर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बहुतांश मंदिरांच्या परिसरात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक तैनात होते. मंदिर परिसरात सीसीटीव्हीचाही वॉच होता.

शहराबाहेरील महादेव मंदिरातही गर्दी
सातारा परिसर, देवळाई परिसर, शिवाजीनगर, चिकलठाणा, मुकुंदवाडी, पळशीचे पारदेश्वर मंदिर, वाळूज पडेगाव, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, इटखेडा, बजाजनगर, हर्सूल या भागांतील महादेव मंदिरात शुक्रवारी अभिषेक, जाप आणि धार्मिक कार्यक्रम झाले. या परिसरातील ग्रामस्थांमध्येही शिवरात्रीनिमित्त साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी नवी गणिते

$
0
0

ravindra.taksal@timesgroup.com
Tweet : @ravindratMT
औरंगाबाद ः जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना विधान परिषदच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची समिकरणे बदलल्याची चर्चा रंगू लागली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज संस्थेत भाजपचे १०१ आणि शिवसेनेचे ९६ असे एकूण १९७ सदस्य आहेत. अपक्ष आणि अन्य २५हून अधिक सदस्यांचा शिवसेना, भाजपला पाठिंबा आहे. दुसऱ्या बाजुला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकूण १८६ सदस्य आहेत. पक्षीय संख्याबळ पाहता शिवसेना, भाजपने युती केल्यास या मतदारसंघात विजय मिळू शकतो.
विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुमारे तीन वर्षांचा कालवधी बाकी आहे. काँग्रेसचे विद्यामान आमदार सुभाष झांबड यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नज‌िकचे प्रतिस्पर्धी किशनचंद तनवाणी यांचा पराभव केला होता. तनवाणी यांनी ही निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती. आता तनवाणी भारतीय जनता पक्षात आहेत.
औरंगाबाद महापालिकेसह गेल्या वर्षी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुका झाल्या. वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्ट प्रकरणामुळे होणे बाकी अाहे. सिल्लोड नगरपालिका निवडणुकीसाठी वर्षभराची प्रतीक्षा आहे. गुरुवारी या दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.
या सर्व स्थानिक स्वराज संस्थेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसकडे १४० सदस्य आहेत. त्याखालोखाल भाजपचे १०१ सदस्य आहेत. काँग्रेसची सदस्यसंख्या जास्त असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कमकुवत आहे. राष्ट्रवादीचे केवळ ४६ सदस्य या मतदारसंघात आहेत. दुसऱ्या बाजुला शिवसेनेचे ९६ सदस्य या दोन जिल्ह्यांत आहेत. शिवसेना, भाजप मिळून १९७ सदस्य होता. अपक्ष व अन्य मिळून २५हून अधिक सदस्यांचा युतीतील पक्षांना पाठिंबा आहे. अपक्षांपैकी काही सदस्य भाजपच्या बाजुचे आहेत. काही सदस्य शिवसेनेच्या बाजुने आहेत. त्याचबरोबर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर शहर विकास आघाडीचे १० नगरसेवक आहेत. तेही युतीच्याच गोटात असतील. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला या निवडणुकीत बाजी मारणे शक्य आहे.

भाजपही करू शकतो मतदारसंघावर दावा
विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेपेक्षा जास्त सदस्य आहेत. औरंगाबाद महापालिकेत भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचाही गट आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सदस्यसंख्या जास्त असल्याचे कारण पुढे करून भाजप या मतदारसंघावर दावा करू शकते. वैजापूर आणि सिल्लोड या पालिकांच्या निवडणुका त्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

एमआयएमची भूमिका महत्त्वाची
औरंगाबाद महापालिकेत ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन’ (एमआयएम) २४ नगरसेवक आहेत. त्याचबरोबर कन्नड पालिकेत या पक्षाचे दोन सदस्य आहेत. त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते.

पक्षीय बलाबल
भाजप : १०१
शिवसेना : ९६
काँग्रेस : १४०
राष्ट्रवादी काँग्रेस : ४६
रिपाइं (डेमोक्रॅटिक) : ०३
एमआयएम : २६
अपक्ष : २४
मनसे : ०२
बसप : ०५
परतूर श. वि. आ. : १०
स्व. रायभान जाधव विकास
आघाडी : ०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरातील काँग्रेसचे लाँचिंग फसले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघावर सर्वार्थाने पकड असतानाही भाजपने काँग्रेसपेक्षा जास्त मतदान मिळवले. त्यामुळे या मतदारसंघावरील काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले असून दिग्गजांचा पराभवामुळे काँग्रेसची भविष्यातील वाटचाल बिकट झाली आहे. काँग्रेसला या निवडणुकीच्या निमित्ताने धीरज देशमुख यांचे लॉचींग करायचे होते. परंतु, जिल्ह्यात झालेल्या दारुण पराभवामुळे ते फसले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा शिवाजीराव पाटील-कव्हेकर या मांजरा साखर पट्टयातून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकुरकर यांनी अग्रह धरला होता. परंतु, मांजरा पट्टयात देशमुख परिवाराचा विरोध झुगारुन उमेदवारी दिल्यानंतर काय होते याचा दणका निवळी गटातील मतदारांनी कव्हेकरांना व पर्यायाने चव्हाण, चाकुरकर यांना दिला आहे. या मतदारसंघात भाजपच्या नवख्या उमेदवार प्रिती शिंदे विजयी झाल्या.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी विधानसभेची उमेदवारी हुकल्याने दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांनी एकुरगा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली. या निवडणुकीत तीन हजार पेक्षा अधिक मतांनी ते विजयी झाले. काँग्रेसला या निवडणुकीच्या निमित्ताने धीरज देशमुख यांच लॉचींग करायचे होते. परंतु जिल्ह्यात झालेल्या दारुण पराभवामुळे ते फसले आहे.
या मतदार संघात जिल्हा परिषदेचे १३ गट येतात. त्यामध्ये रेणापूर तालुक्यातील चार, लातूर तालुक्यातील सात आणि औसा तालुक्यातील दोन गटाचा समावेश आहे. या मतदार संघातील रेणापूर पंचायत समितीच्या आठ पैकी आठ जागा भाजपने जिकंल्या आहेत. तर चार गटापैकी दोन गट जिंकले आहेत. लातूर तालुक्यातील महत्वाच्या निवळी आणि गाधवड या जिंकल्या आहेत.
या वेळी काँग्रेसने त्यांनी पाच वर्षांत काय विकास केला हे सांगितलेच नाही. फक्त नोटाबंदी, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी टार्गेट करुन भाषणे केली. त्याचा राग जनतेच्या मनात वाढत गेला. कारण तुम्ही काय केल ते सांगा ? असे स्पष्टपणे मतदार बोलून दाखवत होते. त्याचा परिणाम हा भाजपच्या विजयात झाला.
या मतदारसंघात मनसेने भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ही श्रेय शिवसेनेला कुठे मिळाले नाही. मुरुड या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप नाडे यांनी विजय मिळवून मुरुड म्हणजे नाडे हे समिकरण पुन्हा एकदा पक्क केले. भाजपसोबत जर शिवसेनेची युती असती तर मुरुडमध्ये शिवसेनेला नक्की फायदा झाला असता, असे दोन्ही बाजुचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.



निवडणुक काळात मतदारात, कार्यकर्त्यात आमच्या बाजुने उत्साह होता. हा उत्साह मतात परिवर्तीत झाला नाही. हे आमच्यासाठी अनाकलनीय आहे. आम्ही योजना राबविण्यात, निधी आणण्यात कमी पडलो नसलो तरी, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमधील आपापसातील बेबनाव ही कारणीभूत ठरला नाही. आम्ही कार्यकर्त्यांशी भेटून नेमकेपणानी माहिती घेत आहोत.
त्र्यंबक भिसे, आमदार, लातूर ग्रामीण.

निवडणुकीत हरलो तरी माझा जनतेशी असलेला संपर्क कमी झाला नव्हता. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सहकार्यानी मतदारसंघात विविध योजना आणल्या आहेत. त्या योजनाची अंमलबजावणी करून घेतली आहे. निवडणुकीच्या वेळी आमचे नियोजन, संघटनात्मक काम, एकजुटीने लढवेली निवडणूक, पालकमंत्री संभाजी पाटील, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, गावपातळीवरचे कार्यकर्त्यांनी एकत्रीत काम केले.
रमेश कराड, भाजप पदाधिकारी, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत

$
0
0



औरंगाबाद : चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या अशा साडेनऊ लाख रुपयांच्या नोटा बीड पोलिसांनी शुक्रवारी रात्री हस्तगत केल्या. या प्रकरणी औरंगाबादेतील एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली असून, जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा घेण्यासाठी संशयित आरोपी गेवराईकडे जात होता, अशी माहिती तपासात समोर येत आहे.
चलनातून हजार, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बाद करण्यात आलेल्या आहे. या नोटा अवैध मार्गाने बदलून घेण्यासाठी एक व्यापारी कारने शेगावहून गेवराईकडे जाणार आहे, अशी माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिस अधीक्षक श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक राजकुमार चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर व पथकाने चकलांबा फाटा येथे रात्री सापळा रचला. संशयित कार (एमएच २१ व्ही ७८०२) निदर्शनास येताच पोलिसांनी कारवाई करत चालकास ताब्यात घेतले. कारचालक असलेला जमीर जमील खानने (रा. नारेगाव, औरंगाबाद) सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यात एक हजार तसेच पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा असल्याचे आढळून आले. चौकशी जमीर याने हा बाद झालेली रोकडच्या बदल्यात चलनी नोट आणण्यासाठी गेवराईला जात असल्याचे समोर आले. औरंगाबादतील एका व्यक्तीने या नोटा जमीर यास दिल्या. तसेच जमीर हा शुज विक्रेता असून, तो कमिशनपोटी जुन्या नोटा बदलून देण्याचे काम करत असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यास गुणांसाठी नकोः गोडबोले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्पर्धेच्या युगात केवळ गुणांच्या मागे धावत अभ्यास करू नका, तर विषयावर प्रेम करा,’ असा सल्ला प्रसिद्ध विज्ञान लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी भावी अभियंत्यांना दिला. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी शनिवारी संवाद साधला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘विंग्स-२०१७’ या उपक्रमासाठी ते आले होते. कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. ए. एस. भालचंद्र यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘माझा लेखन प्रवास’वर बोलताना गोडबोले म्हणाले, ‘आयुष्यात सगळ्या क्षेत्रातील फार मोठी माणसे लवकर भेटली. त्यामुळे विचार बदलण्यास मदत झाली. भिल्ल समाजातील तरुणांसोबत उघड्या आभाळाखाली रहाण्यापासून न्यूयॉर्कच्या पंचतारांकित हॉटेलचे रहाण्यापर्यंत हा जीवन प्रवास आहे. विज्ञान व तंत्रज्ञानासोबत सामाजिक चळवळीतही काम करता आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, कल्पकतेला साजेसे क्षेत्र निवडावे म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये, कामामध्ये आपल्याला रस निर्माण होईल. आजच्या जगात टेक्निकल नॉलेज असेल तरी प्रझेंटेशन स्किल आवश्यक आहे.’ आपल्या मार्गदर्शनात त्यांनी संपूर्ण लेखन प्रवास मांडला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे ही दिली. प्राचार्य डॉ. मुरनाळ, डॉ. भालचंद्र यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय अवाशंक व सायली बाभुळगावकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विशाख कराळे यांने करून दिला. तर, आभार प्रा. एस. डी. अहिरराव यांनी मानले.

‘उद्योग’ क्षेत्राला गवसणी घाला
विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रश्न विचाराली. त्यात मराठी तरुणांना प्रशासकीय क्षेत्रातील लाल दिव्याचे वेड आहे. अशावेळी तरुणांच्या अंगी कोणते गुण असावेत? असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला उत्तर देताना गोडबोले म्हणाले, ‘प्रशासकीय सेवेकडे वळणे गैर नाही. मात्र, तेथे सर्वांना यश मिळेल असे नाही. अशावेळी मराठी माणसाने इतर क्षेत्रांकडेही लक्ष द्यावे. विशेषतः मराठी माणूस उद्योजकतेसाठी पुढे नाही असा समज आहे. तो समज पुसून टाकण्यासाठी तरुणांनी पुढे यावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झकेरिया कॅम्पस’चे लवकरच विद्यापीठ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ओळख असलेल्या रफिक झकेरिया कॅम्पसचे रुपांतर २०२० पर्यंत विद्यापीठात करण्याचा मानस पद्मश्री फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बोलून दाखविला. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबादच्या (आयएचएम-ए) पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण वातावरणात हा समारंभ पार पडला.
‘आयएचएम-ए’चा २१ वा पदवीदान सोहळा हॉटेल विवांताच्या (ताज) सभागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर हडर्सफिल्ड विद्यापीठाचे प्रोफेसर कॉलीन बॅमफोर्ड, डॉ. पी. व्ही. रामन्ना मूर्ती, फरत जमाल, चिन्मय शर्मा, आनंद अय्यंगार, डॉ. ए. जी. खान, प्राचार्य सतीश जयराम, डॉ. मोहम्मद फारुकी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे यावेळी झकेरिया म्हणाल्या, ‘संस्था साठव्या वर्षात पर्दापण करीत आहे. चांगले आणि दर्जेदार शिक्षणावर आमचा भर आहे. आगामी काळात विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.’ प्रोफेसर कॉलीन बॅमफोर्ड आपल्या भाषणात म्हणाले, ‘भारत हा जगातील वेगाने प्रगती करणारा देश आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या या देशात उत्पादन, आयटी, पर्यटन, चित्रपट, क्रीडा अशा क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारत आहेत. त्यामुळे संधी प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.’

गणपती मलेतीरा, मेहा कुमार ठरले अव्वल
समारंभात अभ्यासक्रमादरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारने गौरिवण्यात आले. यामध्ये डॉ. रफिक झकेरिया शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार मुलांमध्ये बीए (हॉनर्स) हॉटेल मॅनेजमेंटच्या गणपती मलेतीरा तर मुलींमध्ये बीए (हॉनर्स) कलनरी आर्टसची मेहा कुमारला मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सांजवताना’मधून अस्थिरतेचा हुंकार!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘माणसाच्या जगण्यात झालेल्या बदलांची दखल कवीने घेत गझल स्वरुपात त्याची उत्कृष्ट मांडणी केली आहे. सिमेंट क्राँकीटच्या जंगलात अस्थिर, अशांत, तणावपूर्ण जीवनशैलीचा अनुभव कवीने आपल्या कवितेतून समर्थपणे मांडला आहे,’ असे प्रतिपादन समीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी शनिवारी केले.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात कवी व पत्रकार विष्णू सलामपुरे यांच्या ‘सांजवताना’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. श्रीरंग देशपांडे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जेवळीकर म्हणाले, ‘माणसाची आजची जीवनशैली ही बेफान धावणाऱ्या घोड्यासारखी झाली आहे. हेवेदावे, अहंकार यामुळे गाढव झालो आहोत का असा प्रश्न पडतो. माणूस स्वतःपासून एकटा, आत्ममग्न झालेला दिसून येतो. जगण्यातील बदलांचे प्रतिबिंब या कवितांमध्ये पडले आहे. गझल प्रकाराने या कवितांचे लेखन केले आहे. भाषा या जपल्या पाहिजेत. गझल रचनाबंध प्रकाराची नाकेबंदी होऊ दिली नाही पाहिजे. जगण्यातील सहजता त्यांच्या कवितेत दिसून येते. भाषेची कसरत न करता त्यांनी कवितांचे लेखन केले आहे. सामाजिक आशय आक्रमक होऊ न देता संयमाने त्यांची सुरेख मांडणी केली आहे.’

यावेळी डॉ. श्रीरंग देशपांडे, रंगनाथ काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. जयदेव डोळे यांनी प्रास्ताविक केले. डोळे म्हणाले, ‘शेती, सफरचंद, पत्रकार आणि काव्य अशा चार पदरी अविष्कार लेखकाने घडवला आहे. निसर्ग कवी म्हणून त्यांची ओळख आहे.’ कवी विष्णू सलामपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांचा हा दुसरा कविता संग्रह आहे. यापूर्वी ‘गुलमोहराच्या झाडाखाली’ हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, पर्वत कासुरे, रेखा जैस्वाल, प्रकाश तत्सत यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. चिन्मय प्रकाशनचे विश्वंभर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६ मार्चला ‘गोल्डन इरा’चे आयोजन

$
0
0


म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद
नटण्यामुरडण्याची, वेशभूषेची आवड आणि स्टेज गाजवण्याची इच्छा असणाऱ्या युवती व महिलांसाठी खूषखबर. जागतिक महिला दिनानिमित्त जुन्या अभिनेत्रींची वेशभूषा करून स्टेज गाजवण्याची संधी खास तुमच्यासाठी साथी सेवा संस्थेने ‘गोल्डन इरा’ या कार्यक्रमातून आणली आहे. ६ मार्चला तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान स्पर्धा होईल.
‘गोल्डन इरा’ कार्यक्रम जुन्या अभिनेत्रींची वेशभूषा व जुन्या गाण्यांसह नाविन्यपूर्ण संगम असेल. मुमताज, वहिदा रहेमान, मधुबाला, वैजयंतीमाला, आशा पारेख, हेमामालिनी, रेखा आदी सौंदर्यवतींच्या अभिनयाने, नृत्याने सर्वांना मोह‌ित केले होते. या अभिनेत्रींच्या वेशभूषा व नृत्यसंगम या माध्यमातून दाखवायचा आहे. स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली व निःशुल्क असून कपल म्हणूनही स्पर्धेत भाग घेता येईल. मात्र, दोन्ही स्पर्धक मुली किंवा महिलाच असाव्या लागतील.

तीन मार्चपर्यंत नोंदणी
स्पर्धेसाठी तीन मार्चला दुपारी ४.३० वाजता ऑडिशन घेण्यात येणार आहेत. इच्छुकांनी तीन मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन किरण शर्मा, उमा जैस्वाल व माधुरी धुप्पड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी किरण शर्मा (९८२३४९२१११), माधुरी धुप्पड (९८५०१२७३२४) व उमा जैस्वाल (९८२३७६१२३२) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>