Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘भूमी अभिलेख’ची वीज सेवा खंडित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
२६ लाखांच्या थकित वीज बिल वसुलीसाठी भूमी अभिलेख प्रशिक्षण शाळेची वीजसेवा महावितरणे खंडित केली आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात अचानक मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची बदली झाल्याचा आदेश आल्यानंतर मागील तीन दिवसांपासून ही वीजबिल वसुली थंड बस्त्यात पडली होती. मात्र, मंगळवारी गणेशकर रुजू झाल्यानंतर महावसुलीच्या कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद शहर एक विभागांतर्गत अनेक शासकीय कार्यालय आहेत. दमडी महालच्या बाजूला असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाला ‌डिसेंबर २०१६ पासून १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान एकूण २३ लाख ७७ हजारांच्या वीज बिल वसुलीची नोटीस महावितरणने फेब्रुवारी महिन्यात दिली होती. संबंधित विभागाकडून या पैशाचा भरणा करण्यात आला नाही. वारंवार या कार्यालयाशी वीज बिल भरण्याबाबत ‌संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

आतापर्यंतची कारवाई
औरंगाबाद व जालना जिल्हयात आतापर्यंत २९४५ वीज ग्राहकांकडून एक कोटी ५९ लाख ३४ हजार रुपये वसूल करण्यात आले. सूचना, विनंत्या, नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या १६५ वीज ग्राहकांचा ४१ लाख २९ हजार रुपये थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करून मीटर व वायरी जप्त केल्या. १८ थकबाकीदारांचा दोन लाख एक हजार रुपयांच्या वीज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मित्रच निघाला विश्वासघातकी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोबाइलवर सातत्याने अश्लील मेसेज व फोटो येत असल्याने ती घाबरली होती. जिवाभावाच्या मित्राला हा प्रकार सांगितल्यानंतर काही काळ प्रकार बंद व्हायचा. नंतर काही दिवसांनी पुन्हा मेसेज येणे सुरू होत होते. तिने अखेर कंटाळून सायबर सेल गाठले. तेव्हा तिला त्रास देणारा कोणी नसून, ती ज्याला सांगत होती तो मित्रच विश्वासघातकी निघाला.
कॉलसेंटरमध्ये काम करीत असलेल्या एका बावीस वर्षांच्या तरुणीची एका पंचवीस वर्षांच्या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीत झाले. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी तरुणीच्या मोबाइलवर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अश्लील मेसेज व फोटो पाठवण्यात आले. घाबरलेल्या तरुणीने आपल्या मित्रालाच हा प्रकार सांगितला. त्याने मी बघतो असे सांगितले. यानंतर काही दिवस प्रकार बंद झाला. यानंतर तिला पुन्हा दुसऱ्या अनोळखी क्रमांकावरून मेसेज येणे सुरू झाले. तिने पुन्हा हा प्रकार मित्राला सांगितला. यानंतर हा प्रकार बंद झाला. यानंतर काही दिवसांनी पुन्हा मेसेज आले. या प्रकाराने ही तरुणी कंटाळली होती. तिने सायबर सेल गाठून हा प्रकार सांगितला. सायबर सेलच्या पथकाने तपास सुरू केला. त्यांनी तिला आलेले मोबाइल क्रमांक तपासले. या मोबाइल सिम कार्डचा वापर फक्त तिला मेसेज करण्यापुरते केल्याचे दिसून आले. या तरुणीला जे काही फोटो आले होते, ते फक्त तिच्या मोबाइलमध्ये तसेच तिच्या मित्राच्या मोबाइलमध्येच होते. पोलिसांनी हा धागा पकडून चौकशी केली. यावेळी तिच्या मित्राने आपणच तिला हे मेसेज त्रास देण्यासाठी पाठवल्याची कबुली दिली. या तरुणाविरुदध तरुणीच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेश थिटे, हेमंत तोडकर, नितीन आंधळे आदींनी केली.

संशयावरून दिला त्रास; दुसऱ्याच्या नावावर कार्ड
तरुणीच्या मित्राचा तिच्यावर संशय होता. ही आपल्याला सोडून कोणाशी बोलते असे त्याला वाटत होते. या संशयापोटी तो तिला घाबरवण्यासाठी त्रास देत होता. यामुळे ती कायम आपल्याच संपर्कात राहील असे त्याला वाटत होते. हा तरुण एका मोबाइल कंपनीच्या गॅलरीत कामाला आहे. त्यांच्याकडे सिमकार्ड घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाच्या कागदपत्राचा वापर करीत त्याने सिमकार्ड घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराला बाजार पोलिसांच्या रडारवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कॅनॉट प्लेस येथील हॉटेल, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांवर कारवाई केल्यानंतर आता पुढील लक्ष्य निराला बाजार असणार आहे. कॅनॉट प्लेस येथील कारवाई नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतरच केली. तशाच तक्रारी निराला बाजाय येथून आल्या आहेत,’ असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
शनिवारी पोलिस आयुक्तांनी कॅनॉट प्लेस परिसरात भेट दिली. या परिसरात रहिवाशांनी तसेच व्यापाऱ्यांनी हुल्लडबाजांचा महिला व तरुणींना त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तसेच या भागात असलेल्या हॉटेलचालकांनी फूटपाथवर अतिक्रमण केल्याच्याही तक्रारी होत्या. अमितेशकुमार यांनी भेट दिल्यानंतर सहा हॉटेल दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या सहाजणांना ताब्यात घेत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान कॅनॉट प्लेसप्रमाणेच निराला बाजार परिसरातील रहिवाशी तसेच व्यापाऱ्यांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून लवकरच निराला बाजार भागात देखील कारवाई करण्याचे संकेत आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.

‘ती’ कारवाई तक्रारीवरून
कॅनॉट प्लेसमधील हॉटेलचालक मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा काही तासांत बस्तान मांडत होते. वारंवार हा प्रकार घडत होत. यामुळे पोलिसांना या ठिकाणी कारवाई करावी लागली. तसेच येथील महिलांनी या भागात कॉलेजचे मुलेमुली येऊन अश्लील वर्तन करीत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून तशा सूचना दामिनी पथकाला दिल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

कॅनॉटमध्ये पुन्हा कारवाई
शनिवारी पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही सोमवारी सायंकाळी दहा जणांच्या तरुणांच्या गटाने एका मित्राचा रस्त्यात वाढदिवस साजरा केला. या दहा जणांना ताब्यात घेत पोलिस आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी त्यांची चौकशी केली असता शनिवारी केलेली कारवाई या दहाजणांना माहित नव्हती. त्यामुळे या तरुणांना समज देऊन सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांना उत्तरासाठी मुदत

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील अल्पवयीन मुलीवर गेल्यावर्षी अत्याचार झाला होता. या प्रकरणात पोलिस आयुक्तांना तक्रार अर्जावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्यांनी दखल न घेतल्याने औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांना उत्तर दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या प्रकरणात पोलिस आयुक्तांना २० मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
पीडित मुलीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. शहरातील सोळावर्षीय मुलीने २ ऑगस्ट रोजी वेदांतनगर पोलिस चौकीत अत्याचाराची तक्रार दिली होती, पण वेळीच तिची दखल घेण्यात आली नाही. प्रकरणात आरोपी आर्यन ऊर्फ नरेश भिवसिंग राठोड व त्याचा मित्र दीपक रोकडेविरोधात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने जामीन दिला. पोलिसांनी न्यायालयात योग्य बाजू मांडली नसल्याचे म्हणणे याचिकेत मांडले आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठीही पीडित मुलीने खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी प्रलंबित आहे. तर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पीडितेने फौजदारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात काहीच कार्यवाही न झाल्याने पीडितेने अवमान याचिका दाखल केली आहे. मुलीची बाजू रुपेशकुमार बोरा हे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीनंतरही निर्जळीचे संकट

$
0
0


औरंगाबाद ः औरंगाबाद आणि जालना शहरासाठी जायकवाडी धरणातून उचलण्यात आलेल्या पाण्याची ७ कोटी ८३ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे बुधवारपासून (८ मार्च) पाणी उपशात टप्प्या-टप्प्याने कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील गळती दुरुस्तीनंतरही निर्जळीचे संकट कायम आहे.
जायकवाडी धरणातून शहरासाठी २०१६ – १७ या आर्थिक वर्षात उचलण्यात आलेल्या पाण्याची ६ कोटी ५० लाख ८९ हजार तर जालना नगरपालिकेकडे १ कोटी ३२ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे. थकीत पाणीपट्टी वसुली बाबत जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेकदा पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र, तरीही पाणीपट्टी भरणा न केल्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून औरंगाबाद महापालिका तसेच जालना नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबाद व जालन्यासाठी दररोज १७० एमएलडी (०.१७ दशलक्ष घनमीटर) पाण्याचा उपसा करण्यात येतो. ८ मार्च रोजी दोन तास, ९ मार्च रोजी ३ तास, १० मार्च रोजी सहा तास, ११ मार्च रोजी ८ तास तर १२ मार्च रोजी औरंगाबाद व जालना शहरासाठी जायकवाडी धरणातून करण्यात येणारा उपसा पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

गळती दुरुस्ती अंतिम टप्प्यात
औरंगाबादला पाणी पुरविणाऱ्या जलवाहिन्यांतील गळती दुरुस्ती करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले. बुधवारी सकाळी नऊपर्यंत सर्व गळत्या दुरुस्त केल्या जातील. त्यानंतर जायकवाडीहून शहरात पाणी येण्यास सुरवात होईल. परिणामी गुरुवार सकाळपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य, उपमुख्य, आणि अंतर्गत जलवाहिन्यांवरील ३५ गळत्या दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी नऊपासून सुरू झाले. पालिकेच्या दाव्यानुसार २४ तासांत दुरुस्ती पूर्ण होईल. त्यानंतर जायकवाडी ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी येण्यास १० ते १२ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हर्सुलमुळे दिलासा
यंदा हर्सूल तलावात पाणी साठले आहे. हर्सूल तलावातून जुन्या शहरातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होतो. सद्यस्थितीत आठ वॉर्डांना पुरवठा केला जातो. जायकवाडीच्या शटडाउनमुळे शहरात पाणीबाणी होणार असली, तरी हर्सूल तलावांतर्गत असलेल्या शहागंज, एसटी कॉलनी, रोजाबाग, दिल्लीगेट, राजाबाजार आदी वसाहतींना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य अभियंता गणेशकर यांची बदली रद्द

$
0
0


म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद
महावितरणच्या औरंगाबाद - जालना परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची नांदेड येथे केलेली बदली अखेर मंगळवारी रद्द करण्यात आली.
गणेशकर यांची अचानक तडकाफडकी नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी बदली करण्यात आली होती. या बदलीचा वीज कर्मचारी अधिकारी संघटनेने विरोध केला होता. याशिवाय शहरातील उदयोजक तसेच अन्य संघटनांनीही गणेशकर यांच्या बदलीविरोधात थेट प्रकाशगडापर्यंत धाव घेतली होती. कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची बदली का केली, असा सवाल विविध संघटनेकडून उपस्थित करण्यात आला होता.
गणेशकर यांनी वीज वसुलीबाबत महामोहीम सुरू केली. अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढले आहेत. तरीही अशी बदली योग्य नसल्याचे पत्र प्रकाशगडावर पाठविण्यात आले होते. अखेर नागरिक, विविध संघटना तसेच वीज कर्मचारी अधिकारी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे प्रकाशगडावरून मंगळवारी संध्याकाळी सुरेश गणेशकर यांची बदली रद्द केल्याचे आदेश औरंगाबाद विद्युत भवनच्या कार्यालयात धडकले. त्यानंतर कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्यांदाच दिसला दुर्मिळ पक्षी!

$
0
0


औरंगाबाद ः चौका (ता. औरंगाबाद) येथील डोंगररांगेत पहिल्यांदाच ‘व्हाइट कॅपेड बंटींग’ पक्षी आढळला आहे. महाराष्ट्रात पक्ष्यांच्या ५७७ प्रजातींची नोंद आहे. मात्र, हा पक्षी आढळल्यामुळे संख्या ५७८ झाली असल्याचा दावा पक्षीमित्र पंकज शक्करवार यांनी केला आहे.
रूपाली व पंकज शक्करवार या पक्षी अभ्यासकांना चौक्याच्या डोंगरातील पक्ष्यांचे निरीक्षण करताना महाराष्ट्राला नवीन असलेला ‘व्हाइट कॅपेड बंटींग’ हा चिमणीच्या आकाराचा अत्यंत रेखीव पक्षी सावंगी भागात आढळला. हा पक्षी महाराष्ट्रात प्रथमच दिसल्याने त्याचे मराठी नाव ठेवलेले नाही. ‘बंटींग’ म्हणजे ‘भारीट’ पक्षी. त्यामुळे या पक्ष्याला ‘पांढऱ्या टोपीचा भारीट’ म्हणता येईल. या पक्ष्याच्या सहा प्रजाती नोंदवल्या गेल्या होत्या’ असे शक्करवार यांनी सांगितले. नव्या प्रजातीची संख्या व इतर विस्तृत अभ्यास करण्यासाठी सतत दहा दिवस माग ठेवण्यात आला. पक्षी अतिशय लाजाळू असल्याने दूरवरून निरीक्षण करण्यात आले. हा पक्षी काश्मीर, हिमालय भागासह पाकिस्तान, कझाकीस्तान, उझबेकीस्तान व तझाकीस्तान या भागात आढळतो.

वृक्षतोड व मानवी अतिक्रमणाकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे. मनपाने सावंगी भागात कचरा डेपो प्रस्तावित केला आहे. सारोळा आणि चौक्याच्या डोंगररांगांबाबत संबंधित सरकारी विभागांची अनास्था जैवविविधतेसाठी अत्यंत धोकादायक आहे. - पंकज शक्करवार, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकरची ५ ठिकाणी छापेमारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राप्तिकर विभागाच्या गेल्या पाचदिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईचा धडाका बुधवारी सुरूच होता. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ज्वेलर्स, कोचिंग क्लास, उद्योजक सध्या प्राप्तिकरच्या रडारवर आहेत.
शहरातील अनेक बँक खाती सध्या संशयितरित्या व्यवहार झाल्याने प्राप्तिकर विभागाच्या ‘स्कॅनिंग’मध्ये आली आहेत. यामुळे अनेक खाती गोठवली गेली असून त्यांचा आकडा प्राप्तिकरविभागाकडून समजला नाही. यामुळे सध्या बँक खातेदारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटबंदीदरम्यान हजार, पाचशे रुपयांच्या माध्यमातून काळा पैसा विविध खात्यांत भरण्यात आला होता. संशयित खातेधारकांकडे या पैशांचा तपशील मागण्यात आला. मात्र, त्यांनी हिशेब सादर केला नाही. त्यामुळे त्यांची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे. ‘आयटी’ विभागाने एक मार्चपासून कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये तीन; तर बीड जिल्ह्यात चार ठिकाणी छापे टाकले. सोमवारी हिंगोली व वसमतच्या पाच व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने ‘ऑपरेशन क्लीन मनी’अंतर्गत छापे टाकले होते. या सर्व व्यापाऱ्यांच्या दस्ताऐवजांची तपासणी मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होती. या कारवाईत सुमारे १३ कोटी २० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. यापैकी साडेनऊ कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत वळविण्यात आले. उर्वरित साडेचार कोटी रुपयांवर दंडात्मक कारवाई करून कर वसूल करण्यात आला. सोमवारी हिंगोलीतील पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यात हळद व्यापारी, पेट्रोल पंपचालक, साखर व्यापारी, किराणा होलसेलर, भुसार व्यापाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्यातील सुमारे ४०० बँक खातेदार ‘आयटी’च्या रडारवर आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत सुमारे २० कोटींहून अधिक वसुली झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

बँक खातेदारांमध्ये खळबळ
सध्या व‌िविध बँक खातेदार चार्टर्ड अकाऊंटंटकडे जाऊन येत आहेत. खात्यांना गोठवणे, नोटीस येणे, खुलासे करणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. आपआपल्या खात्यांची चौकशी न होता ती पुनर्व्यवहारीत कसे होईल, यासाठी खातेदार सीएंकडे धाव घेत आहेत. सध्या शहरातील एकूण बँक खातेदारांपैकी १० ते २० टक्के खाती गोठवल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिद्धार्थ उद्यानाला लागणार सील

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचे आकर्षण असलेल्या सिद्धार्थ उद्यानाकडे करमणूक कराचे तब्बल दीड कोटी रुपये थकले आहेत. या कराच्या वसुलीसाठी तहसीलदारांनी उद्यान अधीक्षकांना नोटीस बजावली असून येत्या तीन दिवसांत कराची रक्कम न भरल्यास उद्यानाला सील ठोकण्याचा इशारा दिला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असलेले सिद्धार्थ उद्यान हे बच्चेकंपनीचे आकर्षण आहे. उद्यानात लहान मुलांसाठी ट्रेन तसेच इतर खेळण्याची साधने आहेत. उद्यानात प्रवेश, मनोरंजन आणि करमणूक करण्यासाठी महापालिकेकडून शुल्क आकारण्यात येते. मात्र, या तिकीट शुल्कावरील करमणूक कराची रक्कम जिल्हाप्रशासनाकडे भरण्यात येत नाही, कर आकारणीच्या नियमाप्रमाणे गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून करमणूक शुल्क व अधिभार मिळून १ कोटी ६० लाख ९८ हजार रुपयांची रक्कम होते. यापैकी १० लाख रुपये महापालिकेने भरले आहेत. मात्र, उर्वरित १ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी महापालिकेकडे आहे. या कराच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे अपर तहसील कार्यालयाकडून थकित दीड कोटींचा करमणूक कर तीन दिवसात भरा, अन्यथा उद्यानाला सील ठोकण्यात येईल, असा इशारा नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

-
मटा भूमिका
-
दुष्टचक्र थांबेल?
-
मार्च महिना उजाडला की सर्व यंत्रणा करवसुलीसाठी खडबडून जाग्या होतात. वर्षभर चालढकल करायची आणि पाणी गळ्याशी आल्यावर कारवाया करायच्या, ही प्रत्येक खात्याची कार्यपद्धती आहे. तिला अनुसरून महसूल विभागाने सिद्धार्थ उद्यानाला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे महावितरण, सिंचन खात्यानेही पालिकेला नोटीस बजावली आहे. आता एकदम एवढी रक्कम पालिका उभी करणार का, हा प्रश्न आहे. अर्थात, नोटीसप्रमाणे तहसीलदारांनी उद्यानाला सील ठोकले तर गैरसोय सर्वसामान्यांचीच होणार आहे. लोकांनी नियमित कर भरला, तर पालिकाही देय असलेला कर थकवणार नाही. करवसुली थंडावली की पालिका कोंडीत सापडते आणि मग संपूर्ण शहराला कधी पाण्यासाठी, कधी विजेसाठी, तर कधी उद्यानासाठी वेठीस धरले जाते. हे दुष्टचक्र कधी थांबणार आहे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ गळत्या दुरुस्त; आजपासून पाणीपुरवठा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेने मंगळवारपासून मेगा शटडाऊन करत घेत छोट्या मोठ्या ३५ गळत्या दुरुस्त केल्या. गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच ढोरकीन केंद्राची स्वच्छता हाती घेण्यात आली. बुधवारी मध्यरात्रीपासून शहराकडे पाणी येणे सुरू झाले असून गुरुवारी सकाळपासून शहराच्या काही भागात पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.
जायकवाडी ते शहरापर्यंत १४००, १२०० आणि ७०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिन्यांवरील गळत्यांची दुरुस्ती मंगळवारी सकाळपासून करण्यात आली. शहराला नव्या वाहिनीतून ११५, जुन्या वाहिनीतून ३० असा १४५ एमएलडी पाणी मिळते. मंगळवारी सकाळी नऊ ते बुधवारी रात्री उशिरापर्यंत १४०० व १२०० नवीन जलवाहिनीवरील गळत्यांची दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर जायकवाडी येथून पाण्याचा उपसा सुरू झाला. दरम्यान ढोरकीन जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता पालिका प्रशासनाने हाती घेतली. त्यामुळे जायकवाडीहून येणारे पाणी फारोळ्याकडे वळविण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजता हे पाणी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पोचले. तेथून अकरा वाजेपर्यंत हे पाणी नक्षत्रवाडी एमबीआरमधून शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या दिशेने झेपावले. गुरुवारी सकाळपर्यंत जवळपास सर्वच भागातील टाक्यात मुबलक पाणी साठले जाणार असून ज्या भागात पाणी येण्याचा दिवस असेल त्या भागांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले.

क्रेन लावून स्वच्छता
जायकवाडीतून वाहिन्यांद्वारे पाणी ढोरकीन केंद्रात आणले जाते. गेल्या काही वर्षांत या केंद्राची स्वच्छता न झाल्याने गवत, शेवाळ, गाळ मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्याचा परिणाम पंप बंद पडण्यावर होत होता. या जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम बुधवारी दुपारी दोन क्रेन व दहा कामगार लावून सुरू करण्यात आले. हे काम गुरुवारी सकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची ३३ लाखांची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुलाला एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्याची ३३ लाख तीस हजारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पुणे व सातारा येथून दोन दलालांना गुन्हेशाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
हडको एन ९, एम २ भागात एक पंचावन वर्षांचे शेतकरी राहतात. या शेतकऱ्याचा मुलगा राजेश (नाव बदलेले आहे) याला डॉक्टर व्हायचे असल्याने दोन वर्षांपासून अभ्यास करीत होता. गेल्या वर्षी राजेशने नीटची प्रवेशपूर्व परीक्षा दिली. या फॉर्मवर विद्यार्थ्याची पूर्ण माहि‌ती असते. ही माहिती मिळवत एक एप्रिल २०१६ रोजी संशयित आरोपी विजय शिवराम नलावडे (रा. चिंचवड, पुणे) याने राजेशच्या वडिलांशी संपर्क साधला. राजेशला एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष नलावडेने दाखवले होते. नलावडेची भेट घेतल्यानंतर आपले शंकराचार्य इन्स्टट्यूट मेडिकल अँड रिसर्च सेंटर, भिलई, छत्तीसगड येथे व इन्स्टट्यूट मेडिकल अँड रिसर्च सेंटर, मायणी जि. सातारा येथे दोन मेडिकल कॉलेज असल्याची माहिती दिली. या बोलण्यावर विश्वास ठेवून राजेशच्या वडिलांनी रोख व आरटीजीएसद्वारे २१ लाख रुपये नलावडेकडे भरले. यावेळी अॅडमिशनचे रजिस्ट्रेशन झाल्याची एक बनावट पावती देखील त्यांनी राजेशच्या वडिलांना दिली. दरम्यान काही दिवसानंतर भिलई येथील कॉलेज बंद झाले असून, सातारा येथील कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यास सांगितले. याबाबत राजेशच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी नलावडेला पैशाची परत मागणी केली. यावेळी नलावडेने त्यांना दहा लाखाचा चेक दिला. मात्र, हा चेक बँकेत टाकल्यानंतर पाच वेळा बाऊन्स झाला. नलावडे याने पुन्हा राजेशच्या वडिलांना सातारा येथील कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याबाबत गळ घातली. सातारा येथील कॉलेजमध्ये प्रशांत देशमुख नावाच्या व्यक्तीशी त्यांची भेट झाली. रानडेकडे देखील त्यांनी सुमारे १२ लाख रुपये भरले. यानंतरही त्यांचे अॅडमिशनचे काम झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी विजय नलावडे (रा. चिंचवड, पुणे) व प्रशांत रानडे (रा. बोरीवली इस्ट, मुंबई) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी मंगळवारी सातारा येथून महेंद्र रामचंद्र देशमुख व पुण्यावरून विजय नलावडे याला अटक केली. आरोपी प्रशांत रानडे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

शेती विक्रीची रक्कम
राजेशच्या वडिलांनी त्यांची जमीन नुकतीच शासनाच्या एका प्रकल्पासाठी विकली होती. ही जमीन विक्री करून आलेली रक्कम त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी नलावडे व देशमुखला दिली होती. यानंतर राजेशच्या वडिलांनी आरोपीकडे पैशासाठी पाठपुरावा सुरू केला होता. यावेळी आरोपींनी त्यांच्या मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या राजेशच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळी पिवळी टॅक्सी शहरात धावणार

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
पोलिस आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी काळी-पिवळी टॅक्सीवर घातलेली बंदी उठविल्यामुळे या टॅक्सी आता शहरात धावणार आहेत.
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. संगीतराव पाटील यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली असता पोलिस प्रशासनाने बंदीचा आदेश मागे घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे नियमन करण्यासाठी, तसेच लोकांना धोका, अडथळा आणि गैरसोय होऊ नये म्हणून सहा आणि नऊ आसनी काळी-पिवळी टॅक्सींना प्रायोगिक तत्वावर ३ जून २०१५ रोजी शहरात प्रवेश बंदी केली होती. पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ अन्वये ही प्रवेशबंदी लागू केली होती. त्यानुसार फुलंब्रीकडून येणाऱ्या टॅक्सींना दिल्लीगेटपर्यंतच प्रवेशाची परवानगी होती, तर नगरनाक्याकडून येणाऱ्या टॅक्सींना लोखंडीपुलापर्यंत, पैठणकडील टॅक्सींना रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलापर्यंत आणि जालन्याकडील टॅक्सींना चिकलठाणा येथील गोशाळेपर्यंतच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती. इतर मार्गांवरील टॅक्सींनाही शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली होती. कलम ११५ खालील आदेश केवळ ३० दिवसांपर्यंतच वैध असतो. असे असताना गेल्या वर्षभरापासून टॅक्सींना शहरात प्रवेश बंदी अद्यापही चालूच आहे. अशा टॅक्सींवर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करून दंड वसुल केला जातो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांच्या बंदीविरोधात काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारक शेख हसन शेख रामजू व इतर ९ जणांनी खंडपीठात आव्हान दिले होते. कलम ११५ च्या वैधतेची मुदत संपली तरी पोलिस टॅक्सींना बंदी करून इतर कलमांखाली शहरात अनेक कारवाई करीत आहेत. शहरात अनेक उड्डाणपूल आहेत. आरटीओंनी काळी-पिवळी टॅक्सींना परवाने दिले आहेत असा युक्तीवाद टॅक्सीधारकांचे वकील रामेश्वर तोतला यांनी केला.

मूलभूत हक्कांवर गदा
टॅक्सीधारकांनी कर्ज घेवून टॅक्सी खरेदी केल्या आहेत. त्याचे हप्ते भरावे लागतात. शहरात प्रवेश बंदी केल्यामुळे टॅक्सीधारकांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंदीमुळे टॅक्सीधारकांच्या व्यवसायाच्या मुलभूत हक्कावर गदा आली आहे. या उलट ओला, टॅक्सी फॉर शुअर व लक्झरी बसेसला शहरात प्रवेशबंदी नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ७३ टक्के करवसुली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे कोणतीही सक्ती न करता प्रशासनाने करवसुलीचे टार्गेट पूर्ण केले होते. मात्र, यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभी विभागात ७३ टक्के करवसुली करण्यात आली आहे. करवसुलीचे ५०८ कोटी ९५ लाख रुपयांचे उद्दीष्ट पूर्ण करताना प्रशासनाने आतापर्यंत ३७३ कोटी ३५ लाख रुपयांची (७३.३६ टक्के) वसुली केली आहे.
विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी काही दिवसांपूर्वी महसुली करवसुलीसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. यानुसार प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महसुली उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले. प्रशासनाला मार्चअखेरपर्यंत जमीन महसूल, करमणूक, गौणखणिज तसेच इतर असे ५०८ कोटी ९५ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३७३ कोटी रुपयांपर्यंत वसुली झाली होती. महसुली करवसुलीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर येत्या काही आठवड्यामध्ये प्रशासनला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. करवसुलीसाठी तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी जबाबदारी सोपविण्यात आली असून करमणूक कराची वसुली कर निरीक्षकांमार्फत करण्यात येत आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी अखेर मराठावड्यात ६९ टक्के कर वसुली करण्यात आली होती.

हिंगोलीची निम्मी वसुली
विभागात उस्मानाबाद जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभीच १०७ टक्के करसंकलन करून उद्दीष्ट पूर्ण केले असले तरी नांदेड, लातूर जिल्ह्यांची मात्र करवसुलीत पिछाडी झाली आहे. मार्च महिना उजाडला तरी हिंगोली जिल्ह्याची केवळ ५० टक्केच वसुली झाली आहे. नांदेड ५३.९१ तर लातूर जिल्ह्यात ६४ टक्के वसुली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​समाजातील सक्षमांचा गौरव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भावाचा झालेला पराभव जिव्हारी लागणे, जीवन जगण्याचे रहस्य व्यायामापेक्षा आहारात, समाजासमोर लेखणीतून सत्य मांडण्याची धडपड, भावी पिढी घडवण्याचे ध्येय, एका शब्दामुळे बदललेले आयुष्य, संशोधन करून पेंटट मिळवण्यासाठी विदयार्थी दशेपासून सुरू असलेली वाटचाल अशा विविध क्षेत्रात काम करून कुटुंब, तसेच समाजासाठी सक्षमा ठरलेल्या आठ महिलांचा गौरव जागतिक महिला दिनानिमित्त एमजीएम सक्षमा पुरस्काराने बुधवारी गौरव करण्यात आला.
प्रा. तसनीम पटेल (लेखिका), ललिता पवार (माध्यम क्षेत्र), दीपाली जाधव (उद्योग क्षेत्र), वैजयंता मिसाळ (शिक्षण), पृथा वीर (पत्रकारिता), साधना आढाव (पोलिस उपनिरीक्षक) अमरिन शेख (क्रीडा), चैताली कुलकर्णी (संशोधन क्षत्र अन्न प्रकिया तंत्रज्ञान) अशा वेगवेगळ्या क्षेत्रात या आठही महिलांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत यश मिळवले असून, अशा या कर्तृत्ववान महिलांचा डॅा. अपर्णा कक्कड, प्राप्ती देशमुख, डॉ. स्वाती शिरडकर यांच्या हस्ते एमजीएम सक्षमा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यातील काहींचा जीवनपट ध्वनिचित्र फितीद्वारे दाखवण्यात आला. तर काहींचा अश्विनी दाशरथे यांनी मुलाखत घेऊन उलगडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना, आरोग्याचे रहस्य फक्त व्यायामावर नसून, ७० टक्के आहारावर अवलंबून असल्याचे उद्योजिका दीपाली जाधव यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक असलेल्या साधना आढाव यांनी पोलिस क्षेत्र वाईट नसून, आव्हानांचा सामना करण्यासाठी या क्षेत्रात जास्तीत मुलींनी येण्याचे आवाहन केले. एकेकाळी निरक्षर असलेल्या वैजयंता मिसाळ बहिस्थ शिक्षण घेऊन आज शाळा चालवत आहेत.
समस्या ही व्यक्तीपेक्षा मोठी नसून, कुणाचे तरी शब्द व जिद्द असेल आहे त्या संकटावर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले. पत्रकारितेचा वसा घेतलेल्या पृथा वीर यांनी समाजातील समस्या सोडवण्यासाठी कुठलीही भीडभाड न ठेवता निष्पक्ष लिखाणाला प्राधान्य देतात. विद्यार्थी असलेल्या चैताली कुलकर्णीने काजव्यापासून प्रकाश मिळू शकतो, त्याचा उपयोग वीज निर्मितीसाठीही होऊ शकतो यावर संशोधन सुरू केले असून, त्याचे पेटंट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गावात माझा भाऊ कुस्ती खेळत असताना त्याचा पराभव झाला. या पराभवाचा बदला घेण्यासाठी मी कुस्ती शिकले व माझ्या भावाला पराभूत करणाऱ्याला पराभूत केले. मला देशासाठी आलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे ध्येय आहे.- अमरीन शेख, कुस्तीपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्यांचा सत्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आदर्श अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना गौरविण्यात आले.
भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, महिला व बालकल्याण समिती सभापती सरला मनगटे, शीला चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उत्कृष्ट काम झाले. त्यात आदर्श ठरलेल्या ५६ जणींचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषण कमी करणे, पूर्वप्राथमिक शिक्षण, माता सक्षमीकरण, बैठकांमधून मातांना मार्गदर्शन, मटका फ्रिज पद्धती, अंगणवाडीमध्ये परसबाग, आरोग्य व पोषण मिशन, अंगणवाडी आयएसओ, डिजिटल करणे आदी उपक्रम उत्कृष्टपणे राबविलेल्या ४४ अंगणवाडी सेविका व १७ पर्यवेक्षिकांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार, सभापती लता वानखेडे, सरोजा काळे, आयटकचे राम बाहेती आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पी. व्ही. चोरमले, अनिल बडते, वामन ठोंबरे, नितीन तवार, चंद्रकांत नलावडे, नरेश दोणकलवार, रवी कुरा, नितीन राऊत आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिगरबाज स्त्री शक्तीला सलाम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपले प्रत्येक कर्तव्य पार पाडून उत्कृष्ट पालक आणि कष्टातून पुढे आलेल्या स्त्री शक्तीचा बुधवारी पुंडलिक नगरमधील वंदे मातरम् बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्य ज्योती सुरासे होत्या. महाराष्ट्र राज्य बाल शिक्षण परिषदेच्या सदस्य सुनिता कुलकर्णी (पुणे), वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश मोरे उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन प्रत्येकीचे स्वागत करण्यात आले. महिला पत्रकारांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्या गावंडे, आरती जोशी, रुचिका पालोदकर, भाग्यश्री जगताप व उज्वला साळुंके यांचा समावेश होता. सुनिता कुलकर्णी यांनी मुलांच्या अभ्यासावर संवाद साधला. तर निर्मला परदेशी यांनी महिलांना निर्भय होऊन तक्रार करा, असे आवाहन केले. सहशिक्षिका योगिता शिसोदे, जिज्ञासा पवार, अनिल राठोड, सुनिता सोनवणे, सांकिशा निकाळजे, अनिता पाटणे, साहेबराव चौरे, शारदा सगले, स्मिता दीक्षित, आशा काथार, सुनंदा मुंडलिक आदींनी परिश्रम घेतने. पत्रकारांच्या वतीने आरती जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेडिरेकनर’ दरात १५% वाढीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात झालेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याचा फटका मुद्रांक शुल्काच्या रूपाने जमा होणाऱ्या महसुलाला बसला असला तरी प्लॉट, फ्लॅटच्या दरात कोणतीही कमी झाली नाही. यामुळे एप्रिल महिन्यात नव्याने जाहीर होणाऱ्या रेडिरेकनर दरात १० ते १५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव रजिस्ट्री कार्यालयातून पाठवण्यात आला असून याबाबत मात्र अंतिम निर्णय मुद्रांक व नोंदणी महानिरिक्षक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्येकवर्षी १ जानेवारी रोजी नवीन रेडिरेकनरचे दर जाहीर केले जात होते. मात्र, गेल्यावर्षी मराठवाडा तसेच राज्याच्या इतर भागात दुष्काळ पडल्यामुळे शासनाने २०१७ मध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे १ एप्रिल रोजी हे दर जाहीर करण्याचा निर्णय घेतला. रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, नगररचना, भूमिअभिलेख आणि महसूल विभाग यांच्यातर्फे सर्वे केला जात आहे. या सर्व्हेमध्ये मालमत्तांचे बाजारमूल्य, त्यात झालेली वाढ, जमीन तसेच प्लॉट, फ्लॅटचे झालेले व्यवहार आदींचा अभ्यास करून कोणत्या भागात मागणी अधिक आहे, याची माहिती घेतली जाते. यावरून नव्याने शहर विकसित होणाऱ्या विविध भागांचा रेडिरेकनर दर वाढवला जातो. याच सर्व्हेमध्ये नोटबंदीच्या निर्णयामुहे खरेदी विक्रीच्या व्यवहारावर झालेला परिणाम यामुळे महसूललाला बसलेला फटका आदींचा विचार करण्यात येत आहे. या संदर्भात मुद्रांक व नोंदणी महानिरिक्षकांनी राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीतही नोटबंदी व त्यामुळे महसूलावर झालेल्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी रेडिरेकनरचे दर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावे, अशीही मागणी काही अधिकाऱ्यांनी केली. मात्र, महानिरीक्षकांनी या दरात किमान दहा ते पंधरा टक्के वाढ करण्यावर अधिक भर दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीणचे दर कायम?
शहरी भागात दहा ते पंधरा टक्के नैसर्गिक वाढ करण्यात येऊन ग्रामीण भागात मात्र मालमत्तांचे दर कायम ठेवण्याची शक्यता आहे. किंवा किमान पाच टक्के दरवाढ होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी दिलेला प्रवेश नंतर केला रद्द

$
0
0

औरंगाबाद : सर्व शासकीय नियमांनुसार नागपूर येथील शासकीय आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला व त्यासाठी शासकीय शुल्कही भरले, मात्र त्यानंतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय प्रवेश रद्द करण्यात आला, असा आरोप पाडळी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील विद्यार्थिनी अनुपमा आसाराम शेळके व काका अर्जुन शेळके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
अनुपमाने तक्रारीत म्हटले आहे की, शासनाच्या प्रवेशाविषयीच्या परिपत्रकानुसार माझी नागपूर येथील आयुर्वेद महाविद्यालयात ३० नोव्हेंबर २०१६ रोजी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. महाविद्यालयात दोन जागा विदेशी विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. नियमानुसार प्रवेशाच्या अंतिम दिवसापर्यंत ज्या घटकासाठी प्रवेश राखीव असतो, तो विद्यार्थी न आल्यास इतर विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात येतो. असा प्रवेश देताना टक्केवारीची अटही शिथील होते. या सर्व नियमांना अधीन राहून मला ३० नोव्हेंबर २०१६ रोजी प्रवेश देण्यात आला, मात्र १३ डिसेंबर २०१६ रोजी माझा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे मला एका पत्राद्वारे कळविण्यात आले. मला बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. माझा प्रवेश कशामुळे रद्द केला, या विषयी लेखी विचारणा केली असता, ‘आपला प्रवेश हा संबंधित अधिष्ठातांनी स्वतःच्या मनाने केला, मेरिटनुसार आपला प्रवेश करण्यात आलेला नाही. आपला प्रवेश ३० नोव्हेंबर २०१६ नंतरचा अर्थात १ डिसेंबरचा आहे. ही जागा विदेशी विद्यार्थ्यासाठी राखीव होती,’ असे स्पष्टीकरण महाविद्यालयाने दिले. ते चुकीचे व अन्यायकारक आहे. माझा प्रवेश ३० नोव्हेंबर २०१६ रोजीचा आहे. पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात ६८ गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात येतो व अधिकृत समजण्यात येतो. मला मात्र ८८ गुण मिळूनही माझा प्रवेश अनधिकृत कसा, असा सवालही अनुपमाने उपस्थित केला आहे.

शेतकरी कन्येवर अन्याय
माझ्यावरील अन्याय हा ग्रामीण भागातील एका शेतकरी कन्येवरील अन्याय आहे. मला योग्य न्याय मिळाला नाही, तर मी कोर्टात जाणार आहे, असा इशाराही अनुपमा शेळके हिने ‘कॉम्पिटन्ट ऑथॉरिटी अँड कमिशनर’ला (स्टेट सेल, मुंबई) १४ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठाला ८० लाख रुपये

$
0
0

औरंगाबाद : विधी विद्यापीठासाठी शासनाने तात्पुरत्या स्वरुपात ८० लाख रुपये मंजूर केले. ‘ओएसडी’च्या नियुक्तीनंतर विद्यापीठाच्या कामकाजाला वेग आला आहे. प्रशासकीय इमारतीच्या डागडुजीचे कामही वेग घेत आहे.
अनेक वर्षांपासून विधी विद्यापीठाचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले. कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विधी विद्यापीठ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरुवातीचे दोन वर्षे विद्यापीठाचे वर्ग शासकीय बीएड कॉलेजमध्ये भरविण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज कॉलेजसमोरील इमारतीत होणार आहे. त्याच इमारतीत ग्रंथालय, अभिरूप न्यायालय, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिंनीसाठी स्वतंत्र रूम, अधिकाऱ्यांची दालने असतील. कुलगुरूच्या निवडीची प्रक्रिया विलंबाने झाली. त्यामुळे विद्यापीठासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद नाही. अशावेळी शासनाने तात्पुरत्या स्वरुपात विद्यापीठासाठी ८० लाखाची तरतूद केली असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. त्यासह विद्यापीठासाठी ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू आणि ओएसडी यांच्या संयुक्त बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कळते. विद्यापीठासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यासाठी, प्रशासकीय इमातरीची डागडुजी, ‘क्लॅट’चे शुल्क अशा विविध बाबींसाठी निधी आवश्यक होता. अर्थसंकल्पात तरतूद होईपर्यंत निधी नसल्याने अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेत हा निधी मंजूर करण्यात आल्याचे कळते.

‘क्लॅट’चा प्रस्ताव..
औरंगाबाद विधी विद्यापीठात यंदापासून बीए एलएलबी हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया ‘कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट’द्वारे (क्लॅट) व्हावी यासाठी नवनियुक्त कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश प्रयत्नशिल आहेत. यंदा ‘क्लॅट’ घेण्याची जबाबदारी चाणक्य नॅशनल लॉ युनिर्व्हसिटीकडे आहे. त्यासाठी पाठविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. देशपातळीवरील ‘क्लॅट’मध्ये सहभागी होण्यासाठी शासनपातळीवरूनही प्रयत्न सुरू असल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवरील जयहिंद पब्लिक हायस्कूल केंद्रावर बुधवारी बारावीच्या पेपरला तब्बल १२ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचे भाऊ शाळेच्या व्यवस्थापन मंडळावर आहेत. अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या शाळांमध्येच ‘कॉपीयुक्त’ परीक्षेचा प्रकार उघड झाल्याने त्यावर मंडळ काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. पेपरफुटीमुळे चर्चेत आलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा महापूर आला आहे. बुधवारी रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जयहिंद पब्लिक हायस्कूल केंद्राची निरंतर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्या पथकाने तपासणी केली. त्यावेळी तब्बल १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याचे त्यांनी ‘मटा’ला सांगितले. विद्यार्थ्यांकडे गाइड होते. या विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले. सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण संस्था, शेळगाव आटोळ या संस्थेचे हे हायस्कूल आहे. शाळेच्या व्यवस्थापन मंडळावर प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचे भाऊ, पत्नी असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

पेपर सुरू होतानाच भरारी पथक आले, अशी माहिती केंद्रप्रमुखांनी मला दिली. त्यावेळी अनेकांकडे गाइड असू शकतात. या प्रकारात काही पर्यवेक्षक दोषी असतील, तर त्यांना परीक्षेच्या कामकाजातून वगळण्यात येईल.
- माणिकराव देशमुख, अध्यक्ष, सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण संस्था.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images