Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लाडसावंगी शाळेची चौकशी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमिनीवर बसून परीक्षा, कॉप्यांचा महापूर असे प्रकार लाडसावंगीतील परीक्षा केंद्रावर आढळून आल्यानंतर मंडळाला जाग आली आहे. परीक्षा केंद्रप्रमुख बदलण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. मंगळवारी मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉप्या करण्याचे प्रकार समोर आले. औरंगाबादजवळ असलेल्या लाडसावंगीतील जिल्हा परिषद हायस्कूल परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिली. तेथे अनेक पर्यवेक्षकच कॉपी देत असल्याचे समोर आले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या केंद्रावरील कॉप्यांचा महापूर आणि भौतिक सुविधांची वानवा मांडली. त्यामुळे दिवसभर मंडळात लाडसावंगी परीक्षा केंद्राचीच चर्चा होती. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मंडळाने केंद्रप्रमुख तातडीने बदलले. या प्रकरणात कोण-कोण दोषी आहे, प्रत्यक्ष कॉपी पुरविण्यात पर्यवेक्षकांचा सहभाग आहे का, सोयी-सुविधांची काय स्थिती आहे, यासंदर्भात चौकशी समिती नेमल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्राची तपासणी करून अहवाल मंडळाला सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या केंद्राला भरारी पथकाने भेट दिली, पण त्यावेळी पथकाला जमिनीवर बसून परीक्षा देणारे विद्यार्थी दिसले कसे नाहीत, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

तीर्थपुरी केंद्रावरही जमिनीवर बसून परीक्षा
कोणत्याही विद्यार्थ्याला जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बेंचची व्यवस्था करण्याच्या सूचना मंडळाने दिलेल्या आहेत. तरीही अनेक विद्यार्थ्यांवर जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ आली आहे. लाडसावंगीप्रमाणे तीर्थपुरी येथील परीक्षा केंद्रावरही काही विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिल्याचे मंडळ अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी ‘मटा’ला सांगितले. या दोन्ही केंद्रांवर आवश्यक ते बाकडे उपलब्ध करून दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

कॉपींचे प्रकार थांबेनात
पेपरफुटीमुळे बारावीची परीक्षा राज्यभर गाजते आहे. बारावी परीक्षेत आजच्या पेपरमध्ये एकूण १६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यात १२ परीक्षार्थी एकाच केंद्रावरील आहेत. शिक्षणाधिकारी यांचे भाऊ अध्यक्ष असलेल्या जयहिंद पब्लिक हायस्कूल या परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर आला. शिक्षण मंडळाचे भरारी, महसूलचे बैठे पथक, केंद्राबाहेर ‘सीसीटीव्ही’ अशा अनेक उपायानंतरही दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान कुचकामी ठरले आहे. बुधवारी बारावीचा रसायशास्त्राचा पेपर होता. या विषयात १६ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणात कारवाई करण्यात आल्याचे विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी सांगितले. त्यात शहरालगत असलेल्या जयहिंद पब्लिक हायस्कूल या एकाच केंद्रावर १२ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली. औरंगाबाद तालुक्यात २, तर बीड जिल्ह्यात २ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. जयहिंद पब्लिक हायस्कूलच्या व्यवस्थापन मंडळावर प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचे भाऊ, पत्नी असल्याचे सूत्रांनी सांगितले. निरंतर शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या परीक्षा केंद्रावर भरारी पथक परीक्षा सुरू झाल्यापासून गेले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शाळा शिक्षणाधिकाऱ्यांशी संबंधित असो, की कोणाचीही, गैरप्रकार होत असेल, तर कारवाई होणारच. कोणाचीही गय केली जाणार नाही. जयहिंद पब्लिक हायस्कूल परीक्षा केंद्राचा अहवाल मी मागविला आहे. त्याचबरोबर खाली बसून परीक्षा देण्याची वेळ येऊ नये म्हणून बेंच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- शिशीर घोनमोडेे, विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​साडेसहा कोटींसाठी पाणीपुरवठा तोडला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
थक‌ित पाणीपट्टी व अनधिकृत नळकनेक्शन यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बगडा उगारणाऱ्या महापालिकेला लभा क्षेत्र विकास महामंडळाने (कडा) चांगलाच दणका दिला. साडेसहा कोटींच्या थकबाकीसाठी ‘कडा’ने पालिकेचा जायकवाडीतून होणारा पाणीपुरवठा तोडला. कसेबसे पन्नास लाख रुपये भरल्यावर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
जायकवाडीतील पाण्यावर कडा कार्यालयाचे नियंत्रण असते. धरणातील पाणी कोणत्या संस्थेला कसे द्यायचे, त्याचा दर काय ठेवायचा याचा निर्णय हे कार्यालय करते. शहराला महापालिका पाणीपुरवठा करीत असली, तरी महापालिकेला कडा कार्यालयाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. कडा कार्यालयाने पालिकेला पाण्याचे दर ठरवून दिले आहेत. निवासी वापरासाठी महापालिका कडा कार्यालयाकडून पाणी घेत असल्यामुळे त्याचा दर तुलनेने कमी आहे. दर कमी असताना देखील महापालिकेकडे ६ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी होती. वारंवार मागणी करूनही थकबाकी भरली जात नसल्यामुळे बुधवारी सकाळी कडा कार्यालयाने जायकवाडीतून होणारा पाणीपुरवठा तोडला. सुमारे बारा तास पाणीपुरवठा बंद होता. महापालिकेने पैशांची जुळवाजुळव करून ५० लाख रुपये भरल्यावर रात्री उशीरा जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मुख्य जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्त करण्यासाठी पालिकेने चोवीस तासांचा शटडाऊन घेतला होता. ‘कडा’ ने पाणीपुरवठा तोडल्यामुळे चोवीस तासांचे शटडाउन सतरा तासांनी पुढे ढकलले गेले. त्यामुळे नागरिकांची होरपळ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२९ खातेधारकांना एकच जामीनदार

$
0
0


औरंगाबाद ः अपघात विमा घोटाळ्यात अटकेत असलेला दलाल शेख लतीफने बनावट विमाधारकांचे खाते उघडण्यास मदत करत तो एकटाच २९ खातेधारकांना जामीनदार राहिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झालेल्या दोन पोलिसांना आर्थिक गुन्हेशाखेने हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.
३ फेब्रुवारी रोजी बनावट अपघात झाल्याचे दाखवत एचडीएफसी विमा कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. पोलिसांनी डॉ. महेश मोहरीर, जमादार आर. आर. शेख व विमा ऐजंट शेख लतीफ शेख अब्दुलला बेड्या ठोकल्या. याप्रकरणात पोलिस जमादार आर. डी. नरवडे व शेख मुश्ताक यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये दोघेही दोषी असल्याचे आढळले असून त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तक्रारदार सतीश अवचारचा देखील आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोपी अवचारने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी कोर्टाने हा अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लतीफची भूमिका होती महत्त्वाची
बनावट विमा घोटाळ्यात लतीफची भूमिका महत्वाची होती. अशा दोन बनावट खातेदारांनी नुकतीच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. लतीफच्या सांगण्यावरून आपण बँकेत खाते उघडले असून, तोच आमचा जामीनदार असल्याचे सांगितले. यापैकी एका खात्यामध्ये एक लाख ६५ हजार, तर दुसऱ्याच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या नुकसान भरपाईची तीन लाखांची रक्कम जमा झाली होती. या दोघांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देत उर्वरित रक्कम लतीफने स्वतः घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. या दोघांची पुन्हा एकदा वैदकीय तपासणी करून त्याचा अहवाल मागवल्याची माहिती आयुक्त अ‌मितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा केंद्राची खिरापत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जय हिंद कॉपी प्रकरण हिमनगाचे एक टोक असल्याचे गुरुवारी उघड झाले. या संस्थेकडून परीक्षा केंद्राचा प्रस्तावच नव्हता, असे पत्रच शिक्षणाधिकाऱ्यांनी मंडळाला दिल्याने खळबळ उडाली आहे, तर मग या ‘जय हिंद’ हायस्कूलला परीक्षा केंद्राची खिरापत कोणी वाटली, असा सवाल निर्माण होत आहे.
जालना रोडवरील ‘जयहिंद’ परीक्षा केंद्रावर बुधवारी बारावीच्या पेपरला तब्बल १२ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी निरंतर शिक्षण विभागाच्या लता सानप यांच्या पथकाने कारवाई केली. माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांचे भाऊ, पत्नी हायस्कूलच्या व्यवस्थापन मंडळावर आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित शाळांमध्येच ‘कॉपीयुक्त’ परीक्षेचा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंडळाने या केंद्रावर कारवाईचे संकेत दिले आहेत. केंद्राचा अहवाल शिक्षण मंडळाच्या तदर्थ समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे मंडळ अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले. तसेच, यंदा प्रथमच या परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली, परंतु आता केंद्र दिल्यावरून गुंता वाढण्याची शक्यता आहे. संबंधित केंद्राकडून परीक्षा केंद्रासाठीचा प्रस्ताव आला की नाही? याबाबत मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही एकवाक्यता नसल्याची चर्चा आहे. तर कॉलेजचा प्रस्तावच नव्हता, असे शिक्षणाधिकारी यांनी गुरुवारी दिलेल्या पत्रात म्हटले. त्यामुळे आणखी गुंता वाढण्याची शक्यता आहे.

...तर संवेदनशील केंद्र
परीक्षा संपल्यानंतर ज्या केंद्रावर कॉपी प्रकार आढळले त्या केंद्रावर काय कारवाई करायची याबाबत तदर्थ समितीसमोर ही प्रकरणे ठेवली जातात. एका केंद्रावर ५ पेक्षा अधिक कॉपी आढळल्या, तर ते केंद्र पुढच्या परीक्षेला संवेदनशील म्हणून घोषित केले जाते.

शिक्षणाधिकारी म्हणतात...
या प्रकरणाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘सुंदरवाडीतील जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयाला १२ वीचे केंद्र देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला नाही. मंडळाने बैठक व्यवस्था विचारात घेऊन सदर ठिकाणी केंद्र मंजूर केले. त्यासह १२ विद्यार्थ्यांकडे कॉपी साहित्य आढळल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सदर ठिकाणी मंडळातर्फे केंद्रसंचालक बदलून देणेबाबत कारवाई करावी. पुढील शैक्षणिक वर्षापासून केंद्र इतरत्र देऊन हे केंद्र बंद करावे.’

‘कॉपी’ थांबेना, १५५ पकडले
गुरुवारी बीड जिल्ह्यात बारावीच्या पेपरला १३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कॉपी प्रकरणांचा आकडा १५५ वर गेला आहे. पेपरफुटीमुळे बारावीची परीक्षा गाजते आहे. त्यासह औरंगाबाद विभागात कॉपी आणि जमिनीवर बसून अनेक परीक्षार्थींना परीक्षा द्यावी लागत असल्याचे समोर आले. त्यात गुरुवारी १३ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली. मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. हे सगळे विद्यार्थी बीड जिल्ह्यातील आहेत. त्यासह आता बारावी परीक्षेत कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्यांची संख्या १५५ वर पोचली आहे.

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय कारणास्तव शिक्षण मंडळ केंद्र वाढवू शकते. विद्यार्थी संख्या वाढल्याने परीक्षा केंद्र वाढवावे लागले. त्यात हे केंद्र देण्यात आले. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की तेथे गैरप्रकार व्हावेत. गैरप्रकाराबाबत चौकशी होऊन मंडळ योग्य ती कारवाई निश्चित करेल. - शिशीर घोनमोडे, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटी’च्या छाप्यात दोन कोटी वसूल

$
0
0


औरंगाबाद : प्राप्तिकर विभागाने औरंगाबादमधील चार मोठ्या आस्थापनांकडून सुमारे २ कोटींचा कर ‘पंतप्रधान कल्याण गरीब योजने’त जमा केला आहे. त्यात शहरातील एक नामांकित मद्य विक्रेता आणि एका कोचिंग क्लास संचालकाचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये गेल्या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत शहरात एकूण ७ छापे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर १२ हजारांहून अधिक बँक खात्यांची चौकशीही सुरू झाली आहे.
नोटबंदीच्या काळातील व्यवहारांबाबत संशय असल्यामुळे ही १२ हजारांहून अधिक खाती गोठविण्यात आली होती. औरंगाबाद प्राप्तिकर विभाग रेंज-१मध्ये मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जालना, रेंज-२ मध्ये उस्मानाबाद, बीड लातूर, रेंज-३मध्ये औरंगाबाद शहराचे दोन भाग येतात. प्राप्तिकर विभागाने शनिवारपासून कर वसुलीची मोहीम तीव्र केली असून, अनेक नामांकित आस्थापनांवर ‘सर्च’ आणि ‘सर्व्हे’ सुरू केले आहेत, असे प्राप्तिकर विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात धारूर बंद
बीड जिल्ह्यातल धारूर येथे काही ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. हिशेब आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून धारूरमध्ये सर्व सराफा व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली.

उदगीर, लातूरात कोटींची वसुली
लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि उदगीर या तीन ठिकाणी गेल्या दोन-चार दिवसांपासून छापे टाकण्यात येत आहेत. या छाप्यांतून सुमारे १ कोटींची वसुली करण्यात आली आहे. अनेक बँक खाती गोठवली गेली असून, या तिन्ही परिसरातून ५० लाखांहून अधिक निधी ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’त जमा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा निकाल लांबणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीला अनुदानित महाविद्यालयासह विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांनीही नकार दिला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तपासणी केंद्रांवर उत्तरपत्रिका पडून आहेत. त्यामुळे बारावीचा निकाल लांबू शकतो.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांना २८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. परीक्षेपूर्वीच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने (जुक्टा) प्रत्येक दिवशी ‘एक उत्तरपत्रिका तपासणी’ हे आंदोलन जाहीर केले. त्यापाठोपाठ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेज कृती समितीनेही उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी केंद्रावर पाठविले जात आहेत, परंतु तेथे ते तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. आजपर्यंत महत्त्वाचे पेपर संपले, परंतु प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झालेली नाही. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजांमधील सुमारे ८८ हजार शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने बारावीचा निकाल लांबणिवर पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेज कृती समितीने विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जुक्टातर्फे मुख्य नियामकांची दैनंदिन बैठक झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष, सचिवांना मागण्यांचे निवेदन दिले जाते. विनाअनुदानित शिक्षक कृती समितीने, अनुदान द्यावे, अशी मागणी केली. प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी जुक्टाने केली आहे.

हे झाले पेपर
बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू झाली. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, संगित अशा विषयाचे पेपर झाले. पेपर तपासणीवर बहिष्कार असल्याने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी केंद्रावर पडून आहेत.

आम्ही रोज एक उत्तरपत्रिका तपासत आहोत. शिक्षकांच्या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. दरवेळी फक्त आश्वासन दिले जाते. आम्ही दररोज मंडळ अध्यक्षांना निवेदन देत आहोत. - राजेंद्र पगारे, राज्य कोषाध्यक्ष, जुक्टा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचन करून पालक चीनचा विक्रम मोडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गुरुकुल ऑलम्पियाड स्कूलतर्फे १९ मार्च रोजी ‘पालक स्वतःच्या पाल्याकरिता करणार वाचन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती आयोजक सतीश तांबट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
तांबट म्हणाले, ‘जागतिक पातळीवर यापूर्वी सर्वाधिक २ हजार ४७० लोकांनी सहभाग घेत अशा प्रकारचे वाचन केल्याचा विश्वविक्रम चीनच्या नावावर आहे. तो विक्रम मोडित काढण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दंगल चित्रपटातील रिअल लाइफ हिरो, प्रख्यात कुस्तीपटू महावीर सिंह फोगाट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. करिअरच्या बाबतीत पालकांची जागरुकता या हेतूने ‘पालक स्वतःच्या पाल्याकरिता करणार वाचन’ (पॅरेंट्स रिडिंग टू देअर वॉर्डस) हा उपक्रम जागतिक पातळीवर ओळखला जातो. या उपक्रमात लायन्स क्लब ऑफ रॉयल व ड्रिम्स क्रिएशन यांचाही सहभाग आहे,’ असे तांबट यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला लायन्स क्लब औरंगाबाद रॉयलचे अध्यक्ष मनोज बोरा, पोजेक्ट चेअरमन हर्षदीप अग्रवाल, गणेश साळुंके आदींची उपस्थिती होती.

चार हजार पालकांची नोंदणी
‘श्रीहरी पव्हेलियनच्या मैदानावर रविवारी (१९ मार्च) ९.३० वाजता या उपक्रमास सरुवात होईल. त्यासाठी आजपर्यंत सुमारे चार हजार पालकांनी नोंदणी केली असून किमान दहा हजार पालक, विद्यार्थी सहभागी होतील. त्यामुळे आपण हा विश्वविक्रम मोडू,’ अशी अशी आशा तांबट यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या थकबाकीदारांच्या जप्त्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मालमत्ता कर वसुली मोहीम तीव्र करा, बड्या थकबाकीदारांच्या जप्त्या करा,’ असे आदेश महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्य शासनाने सर्व महापालिका आयुक्तांसाठी लेखी आदेश काढले व सक्तीने मालमत्ता कर वसूल करा असे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेने कर वसुलीचे नियोजन केले आहे. कर वसुलीसाठीच्या नियमित कर्मचाऱ्यांसह प्रत्येक वॉर्डासाठी एक कर्मचारी या प्रमाणे ११५ कर्मचारी जास्तीचे दिले आहेत. सहा विभागप्रमुखांना सहा वॉर्ड कार्यालयांची जबाबदारी दिली. विभागप्रमुख व वॉर्ड अधिकारी यांनी समन्वय ठेवून वसुली करावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते.
वसुलीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी बकोरिया यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम यांच्यासह सर्व वॉर्ड अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वसुली मोहिमेत व्यावसायिक थकबाकीदारांकडून वसुली करण्याकडे विशेष लक्ष द्या, असे आयुक्तांनी सांगितले. बड्या व्यावसायिक थकबाकीदारांची यादी तयार करून वॉर्ड निहाय त्यांची जप्ती सुरू करा, असे आदेश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वॉर्डात पालिकेतर्फे रिक्षा फिरवली जाणार आहे. कर भरण्यासाठी आवाहन करणारी कॅसेट रिक्षामध्ये लावली जाणार आहे. दर शनिवार व रविवारी पालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्ड कार्यालय सुरू ठेवण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली.

चित्रपटगृह चालकांची बैठक
मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात महापालिकेने तयार केलेली जाहिरात चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याच्या सुरुवातीला व मध्यंतरात दाखवण्याचे आवाहन चित्रपटगृह चालकांना करण्यात आले. यासाठी पालिकेने चित्रपटगृह चालकांची बैठक घेतली, सर्वांनी यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना सलाम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मूत्रपिंड विभागाच्या वतीने अवयवदान केलेल्या दात्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच अवयवदानाच्या चळवळीत वेगवेगळ्या स्वरुपात योगदान दिलेले डॉक्टर-परिचारक-परिचारिका-वॉर्ड बॉय, तसेच रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी-पोलिस-सुरक्षारक्षकांचाही ‘एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, ‘एमजीएम’चे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, वैद्यकीय संचालक डॉ. अजित श्रॉफ, प्रताप बोराडे, डॉ. अपर्णा कक्कड आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात अवयवदान केलेले (कै.) गणेश शंकर घोडके, (कै.) मंदाबाई किसन गडवे, (कै.) मिलिंद मनोहर हेलवाडे यांच्या कुटुंबियांसह डॉ. दामले, डॉ. कक्कड, डॉ. बी. के. सोमाणी, डॉ. अभय महाजन, डॉ. सरीता कुलकर्णी, डॉ. सुधीर कुलकर्णी, श्री. शिंदे, सुनंदा साळुंके, सुमन चौधरी, स्वाती खरे, रझिया शेख, सिता अग्रवाल, सुनिता अस्वले, रसिका जाधव आदींसह मराठवाड्यातील पहिल्या मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. क्षितिजा गाडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. या निमित्त ‘फिर जिंदगी’ हा लघुपट दाखविण्यात आला. अश्विनी दाशरथे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘नेफ्रॉलॉजी’त जूनपासून फेलोशिप
‘एमजीएम’मध्ये येत्या जूनपासून मूत्रपिंडविकारशास्त्र (नेफ्रॉलॉजी) या विषयामध्ये फेलोशिप सुरू करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमात डॉ. जाधव यांनी जाहीर केले. तसेच पैशाअभावी कोणत्याही रुग्णाला परत जाण्याची वेळ येऊ नये, अशी विनंतीवजा सूचनाही त्यांनी विभागाला उद्देशून केली. ‘एमजीएम’मध्ये महिन्याला ६०० ते ७०० डायलिसिस होतात व आतापर्यंत एमजीएम रुग्णालयात ७५ ‘किडनी ट्रान्स्प्लान्ट’ झाले असून, लवकरच शतकोत्तर ट्रान्स्प्लान्ट होतील. मागच्या वर्षापासून ‘डीएम-नेफ्रॉलॉजी’ अभ्यासक्रमही सुरू झाल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

जीवनशैली कारणीभूतः डॉ. भापकर
सद्यस्थितीत जगामध्ये १० टक्के व्यक्तींना किडनी विकार आहे व अडीच कोटी लोकांना रोज डायलिसिस करावे लागते. २०१३ मध्ये हे प्रमाण दुप्पट होण्याची भीती आहे. निसर्गाच्या विरुद्ध आमुलाग्र बदललेली चुकीची जीवनशैली, किटकनाशकांचा वाढलेला अमर्याद वापर, व्यायामाचा अभाव तसेच दिवस-रात्र भौतिक सुखाच्या मागे धावण्यामुळे किडनीविकारांसह बहुतेक आजार फोफावले आहेत. त्यामुळेच मानसिक स्वास्थ्य पुरते बिघडत चालले आहे आणि त्याचे रूपांतर अनेक आजारांमध्ये होत आहे. याचा खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षणही डॉ. भापकर यांनी नोंदविले.

व्यासपीठावर अवयवदानाची प्रतिज्ञा
या निमित्त मान्यवरांनी व्यासपीठावर डोनर कार्डावर सही करुन अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली आणि अवयवदानाचे आवाहन केले. तर, सभागृहात अवयवदाच्या प्रचारार्थ ‘रिस्ट बँड’ व ‘डोनर कार्डां’चे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाला युवकांची आवर्जुन हजेरी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमोहनातून कोट्यवधीची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
संमोहनाच्या माध्यमातून फसवणूक करून जालन्यातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याला कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्याच्या प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जाफ्राबाद येथील एका महाराजांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आध्यात्मिक गुरू आणि मार्गदर्शक म्हणून प्रख्यात असलेल्या या कथित महाराजांच्या अनेक लिलांची प्रकरणी उघडकीस येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे.
अनेक भक्तांवर संमोहनाच्या माध्यमातून मोठ्या गाड्या, सोने आणि रोख रक्कम उचलण्याच्या महाराजांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे. जालना येथील ठोक औषधी विक्रेते रामप्रताप घनश्याम या प्रतिष्ठानचे मालक घनश्याम सीताराम गोयल हे जाफ्राबाद येथील या कथित महाराजांच्या जाळ्यात अशाच एका परिचित मित्राच्या ओळखीतून अलगद ओढले गेले. महाराज सगळ्या भक्तांना साखर, लिंबू, पाणी काही मंत्र म्हणत फुंकर मारून देतात त्यांना काळी जादू ,वशीकरण येते असे सगळे सांगतात. त्यामुळे गोयल यांचा या महाराजांवर विश्वास बसला, असे या तक्रारीत म्हटले आहे.
आपल्या मर्जितल्या लोकांना आणि नातेवाईकांना या महाराजांनी गोयल यांना मोठ्या रक्कमा उसनवारी देण्यासाठी मध्यस्थी केली. मी सांगितले त्या व्यक्तीला तू रक्कम दे, तुझे कल्याण होईल. परतफेडीची चिंता करू नको हे सगळे लोक चांगले जमीनदार आहेत. माझी जबाबदारी आहे, माझा शब्द अंतिम असतो, मी सांगेल तसेच हे सगळे जग चालते, मला विचारले नाही तर मी काळी जादू करून त्यांचा सर्वनाश करतो असे महाराजांनी त्यांना सांगितले. त्यांच्या या सर्व सांगण्यावरून नऊ लोकांना सात कोटी, ७४ लाख, ४२ हजार ५०० रूपये उसने दिले. या उसनवारीची परतफेड होत नसल्याने गोयल यांनी महाराजांच्या माध्यमातून तगादा लावला असता त्यातील काही जनांनी जमिनीची खरेदीखत लिहून दिले मात्र, प्रत्यक्षात ताबा दिला नाही.

दरम्यान, या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याचे गोयल यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी महाराजांना बोलण्यासाठी त्यांच्या पत्नीने प्रयत्न केला. पण सगळे फसवत आहेत, हेच त्यांनाही समजले. याच काळात महाराजांनी काळी जादू येते, असे सांगून तुम्हाला ४० किलो सोने गुप्तधन मिळऊन देतो असे आश्वासन गोयल यांना दिले.
याच प्रकरणात पुन्हा एकदा गोयल यांनी महाराजांना फोन केला असता त्यांनी गोयल यांना मोबाइलवर धमक्या दिल्या. पोलिस व न्यायाधीश चांगले मित्र आहेत. तुलाच जेलमध्ये टाकतो तुझा सर्वनाश करतो, अशा धमक्या महाराजाने गोयल यांना दिल्या, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे.


पुढाऱ्यांची महाराजांच्या दरबारात हजेरी
जाफ्राबाद येथील एका स्थानिक महाविद्यालयात हे महाराज लिपिक या पदावर नौकरी करत होते, याच काळात त्यांना सिध्दी प्राप्त झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांची महाराजांच्या दरबारात चांगली उठबस आहे. अनेक सरकारी अधिकारी महाराजांच्या संपर्कात आहेत. जालन्यातील एका खासगी इंग्लिश स्पिकींग कोर्स चालकाला याच महाराजाने आपल्याच नावाने इंग्रजी भाषा शिकण्याचे एक यंत्र काढून दिले आणि त्याच्या विक्रीच्या उलाढालीतून मोठी माया जमवल्याची चर्चा आहे. गोयल यांनी या महाराजांच्या बोलण्याची चित्रफित पोलिसांना दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व भोकरदन व जाफ्राबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी वसावे हे चौकशी करत आहेत. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
ज्योती प्रिया सिंह, पोलिस अधीक्षक, जालना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांचा अभ्यासासाठी समिती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यात मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे यावर अंकुश मिळवण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, विविध विभागाचे अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिल्या.
या समितीने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आर्थिक, मानसिक, कौटूंबिक व सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करावा व तसा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
कृषी विभागाअंतर्गत कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता 'आत्मा' प्रकल्पाच्या जिल्हा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. त्यांनी बीड जिल्ह्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्याबाबत चिंता व्यकत केली. बीड
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. गेल्या काही वर्षांत सलग दुष्काळ होता. त्यामुळे त्या काळात नापिकी, कर्जबाजारीपणा, यामुळे निराश होऊन शेतकरी आत्महत्या करीत होता. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाला. पीकपाणी मुबलक झाले असले तरी शेतकरी आत्महत्या सुरूच आहे.
यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यात मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. यावेळी जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली. पाण्याच्या मुबलकतेमुळे पीक परिस्थितीही चांगली राहणार असताना जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शेतकरी
आत्महत्या सर्वांना चिंताग्रस्त करणाऱ्या आहेत. परिस्थितीत सुधारणा झाली तरी शेतकरी आत्महत्या का झाल्या आहेत. याचा प्रत्यक्ष कुटूंबियांना भेटून कारण मिमांसा करण्याची गरज आहे.
यासाठी आत्माअंतर्गत प्रमुख अधिकारी व सदस्यांची समिती नेमण्यात यावी. या समितीने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची आर्थिक, मानसिक, कौटूंबिक व सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करावा व तसा अहवाल सादर करावा. अहवालानूसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही राम म्हणाले.
या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया, आत्माचे संचालक भास्कर कोळेकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच प्रगतीशील
शेतकरी सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएडच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे ‘केंद्र’ चक्क हॉटेलमध्ये!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
राज्यातील शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार वैजापूर तालुक्यातील अाघूर येथे गुरुवारी घडला. भावी शिक्षकांची प्रात्यक्षिक परीक्षा चक्क एका हॉटेलच्या परिसरात घेण्यात आली. तेथे झाडाखाली, ओट्यावर बसून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉप्याही करण्यात आल्या. पिढी घडविणाऱ्यांची परीक्षाच अशा ढिसाळ पद्धतीने घेतल्याने हे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकविणार, असा प्रश्न आहे.
वैजापूर तालुक्यातील आघूर येथे पद्मावती अध्यापक महाविद्यालय अाहे. तेथे सध्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा सुरू आहेत. बीएड द्वितीय वर्षाच्या ४६ विद्यार्थ्यांची शुक्रवारी प्रात्यक्षिक परीक्षा होती, परंतु परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयात पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासनाने या विद्यार्थ्यांना चक्क जवळच असलेल्या एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत परीक्षा देण्यासाठी नेले. तेथे आसन व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांनी वाटेल तेथे बसून प्रात्यक्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडविली. दोन पर्यवेक्षक रस्त्याच्या बाजुलाच टेबल व खुर्ची टाकून गार्डिंग करत होते.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट बुक घरून पूर्ण करून आणणे गरजचे असते. महाविद्यालयात अंतर्गत परीक्षक व बाह्य परीक्षक यांच्यासमोर सादरीकरण करावे लागते, परंतु या ठिकाणी विद्यार्थी परीक्षा खोलीमध्ये न बसता इतरत्र बसून कॉपी करीत होते. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विचारले असता, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने उघड्यावर परीक्षा घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या परीक्षेबाबत मला सविस्तर माहिती घ्यावी लागेल. संबंधित विभागाकडे यासंदर्भात विचारणा केली जाईल.
- दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू?

$
0
0

औरंगाबाद : ‘कामाचा प्रचंड व्याप असून, विभागात अपुरा कर्मचारीवर्ग आहे. येथे कर्मचारी भरा, अन्यथा माझी बदली करा. मी राजीनामा देऊ का स्वेच्छानिवृत्ती घेऊ, की जीवाचे काही बरेवाईट करू,’ इशारा देणारे गौण खनिज विभागातील अव्वल कारकुन गजानन चौधरी यांचा गुरुवारी अचानक मृत्यू झाला. प्रशासन, वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे.
चौधरी यांनी संघटनेमार्फत सोमवारी कामाच्या तणावाबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर दोन‌ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. खुलताबाद येथे राहणारे चौधरी हे गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजता अचानक कोसळले. त्यांना तत्काळ खुलताबाद येथील रुग्णालयात हलवले. डॉक्टरांच्या शिफारशीवरून त्यांना घाटी हॉस्प‌िटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शुक्रवारी जिल्ह्यात काम बंद ठेवणार असल्याचे संघटनेचे जिल्हाअध्यक्ष महेंद्र गिरगे यांनी सांगितले. ११ मार्च रोजी मराठवड्यातील काम बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी अॅपद्वारे ८०० बँकातून ९ कोटींची लूट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या अॅपचा गैरफायदा घेत काही ठगांनी औरंगाबाद येथील ८०० बँकांमधून तब्बल ९ कोटी ४३ लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे. या ८०० बँकांमधील १ हजार २१४ खात्यांमधून ही रक्कम लंपास करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आले असून बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केंद्र सरकारने यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस नावाचं हे अॅप केंद्रसरकारने तयार केले आहे. पण या अॅपचा गैरफायदा घेत ठगांनीगोरगरिबांच्या खात्यांवरच डल्ला मारला आहे. गोरगरिबांची जनधन, स्कॉलरशिप आणि झिरो बॅलन्स अकाऊंट असणारे ग्राहक यांना या लुटारुंनी टार्गेट केले आहे. या यूपीआय घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत मुकुंदवाडी आणि सिडको पोलिसांनी ४ जणांना अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत संशयास्पद व्यवहार झालेल्या ४०० बँक खात्यांची देवाण-घेवाण तात्पूरती थांबविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या यादीचा गोंधळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अर्थमंत्र्यांना प्रस्ताव सादर केल्यानंतरही दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीचा घोळ अजूनही सुरू आहे. त्यामुळे यादीमधील रस्त्यांची नावे अादलाबदल करण्याचा खेळ रंगात आला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत रस्त्यांची यादी अंतिम करण्याची कसरत मुंबईत सुरूच होती. या सर्व प्रकरणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना डावलल्याने येत्या काळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्ते विकासासाठी दीडशे कोटी रुपये दोन टप्प्यात देण्याचे राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केले. त्यांच्या सूचनेनुसार महापौर भगवान घडमोडे यांनी मंगळवारी मुंबईत जावून रस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव सादर केला. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रस्ताव सादर करण्यापूर्वी शनिवारी महापौर बंगल्यात बैठक झाली. या बैठकीत सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. आपापल्या मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांचा समावेश मंत्र्यांकडे सादर करावयाच्या यादीत असला पाहिजे, यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यानुसार यादी अंतिम केली जाणार होती. मात्र, मंगळवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थमंत्र्यांना प्रस्ताव सादर केला. सादर केलेल्या प्रस्तावात पुन्हा बदल केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मुंबईत एका बड्या नेत्याच्या दालनात यादीबद्दल खल सुरू होता. यावेळी भाजपचेच पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्ताव सादर करताना व यादी अंतिम करताना शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांना दूर ठेवल्याचेच चित्र होते. त्यामुळे रस्त्यांची यादी जाहीर केली जाईल, तेव्हा त्याचे पडसाद उमटतील असे बोलले जात आहे. रस्त्यांवरून लोकप्रतिनिधींमध्ये रस्सीखेच सुरू झाल्यामुळे शासनाच्या निधीतून रस्त्यांची कामे सर्वसमावेशक होतील का, या बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्य रस्त्यांच्या समावेशाची सूचना
‘रस्ते विकासासाठी दीडशे कोटी रुपये शासनाकडून दिले जातील, पण या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांची कामे करा. गल्लीबोळातील रस्त्यांची कामे करू नका,’ असे स्पष्ट आदेश अर्थमंत्र्यांनी पालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांच्या अंतिम यादीत अर्थमंत्र्यांची सूचना मान्य केली जाते का, याबद्दल पालिकेच्या वर्तुळात उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तो’ प्रस्ताव मुख्यमत्र्यांनी पुन्हा पालिकेला पाठवला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोकरभरतीसंदर्भात तयार केलेल्या आकृतीबंधाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेशिवाय केल्यामुळे सरकारने हा प्रस्ताव पुन्हा महापालिकेला पाठवला असून, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने प्रस्ताव प्राप्त झाल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नासंदर्भात दिले.
महापालिकेतील नोकरभरती आणि आकृतीबंध यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला बुधवारी मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. औरंगाबाद महापालिकेतील ४१४४ पदापैकी ४८० पदे रिक्त आहेत. पुढील दोन वर्षांत ३० टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. आकृतीबंधानुसार शासनाकडे मान्यतेसाठी प्रलंबित असलेली नवीन १५०० पदास शासन मान्यता देणार का?, राज्यात इतर क वर्ग महापालिकेत ७५०० ते ८००० कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेतील पदांना मान्यता देण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून केली होती.

...तर उचित निर्णय
चव्हाण यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘महापालिकेने आकृतीबंधास मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, सदर प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता घेतलेली नाही. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पुन्हा पालिकेला पाठवला आहे. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने प्रस्ताव प्राप्त झाल्यावर कर्मचारी भरतीचा शासन उचित निर्णय घेईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून ४७ हजार लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एटीएम कार्डची अदलाबदली करून जेष्ठ नागरिकाचे अज्ञात आरोपीने ४७ हजार रुपये लंपास केले. हा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी रेल्वेस्टेशन येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद तुकाराम ताजणे (वय ६१ रा. रेल्वेस्टेशनजवळ) हे मंगळवारी दुपारी रेल्वेस्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी पैसे निघत नसल्याने पाठीमागच्या व्यक्तीने त्यांना मदत करतो, असे सांगत एटीएम कार्ड व ‌पासवर्ड विचारला. त्यानंतर मशीनमध्ये कार्ड टाकून पैसे निघत नसल्याचे सांगत कार्ड परत दिले. यानंतर ताजणे यांच्या खात्यातून मंगळवार व बुधवार या दिवसात ४७ हजार रुपये काढण्यात आले. हा प्रकार समजल्यानंतर ताजणे यांनी त्यांना दिलेले कार्ड पाहिले असता ते राजेंद्र‌ त्रिंबक चौधर यांच्या नावाचे असल्याचे दिसून आले. याप्रकरणी ताजणे यांनी पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक इंगळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीचे काम; वडगावमध्ये वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी. वाळूज
वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतंर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाच्या पोटी ग्रामपंचायतीकडून ९८ लाख रुपये मिळूनही आगाऊ बिलाची मागणी कंत्राटदाराने केली आहे. पण, नियमानुसार कामाची पूर्तता केल्याशिवाय बिल अदा न करण्याची भूमिका ग्रामसेवकाने घेतली आहे. दुसरीकडे ग्रामसेवकाच्या भूमिकेला पदाधिकारी व सदस्यांनी विरोध केला असून लोकप्रतिनिधीकडून दबाव आणला जात आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाकडून विकास कामासाठी एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. वडगाव कोल्हाटी गावाच्या हद्दीलील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून गावातील जलकुंभापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. हे काम कंत्राटदार बाबासाहेब ढाकणे यांनी घेतले असून आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. तर, जलकुभापासून एमआयडीसीच्या पंपहाउसपर्यंत जाणाऱ्या जलवाहिनीचे काम अर्धवट आहे, बजाजनगर व एमआयडीसीच्या सर्व रस्त्याला ओलांडून जाण्याच्या ठिकाणी काम अर्धवट आहे, असे ग्रामसेवक ए. सी. पटेल यांचे म्हणणे आहे. कामाच्या दर्जाची तपासणी झाल्याशिवाय बिल अदा न करण्याची भूमिका ग्रामसेवकाने घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या कामापोटी ग्रामपंचायतीकडून तब्बल ९८ लाख रुपये अदा केले आहेत, उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पण जलवाहिनीच्या कामाची तपासणी न करता ग्रामपंचायत पदाधिकारी कंत्राटदाराच्या पाठिशी आहेत. बिल अदा करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.

शासनाच्या निधीचा योग्य वापर करून दर्जेदार काम करण्याचा हेतू आहे. कंत्राटदाराने सर्व चौकातील कामे अर्धवट ठेवले आहेत. एमबीमध्ये दिलेल्या कामाच्या दर्जाची तपासणी केल्यानंतर बिल अदा करण्याची तरतूद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियमात आहे. त्या नियमांच्या अधीन राहून काम करण्यात येईल.
- ए. सी. पटेल, ग्रामसेवक

अंदाजपत्रकानुसार औद्योगिक विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून वडगाव कोल्हाटी जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मला माझ्या कामाचे बिल मिळाल्याशिवाय उर्वरित काम सुरू करणे शक्य नाही.
- बाबासाहेब ढाकणे, कंत्राटदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटशास्त्राच्या विद्यार्थ्यांचेही अभ्यास दौरे हवेत

$
0
0

नाटशास्त्राच्या विद्यार्थ्यांचेही अभ्यास दौरे हवेत

नाट्यमहोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी चंद्रकांत कुलकर्णी यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद - नाट्यशास्त्र विभागातून शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना थेट नाटक, चित्रपटाच्या व्यावसायिक जगात पाऊल ठेवावे लागते. ते पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांना तो प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी नाट्यशास्त्र विभागाने अन्य विभागांप्रमाणे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी अभ्यास दौरा आयोजित करावा. ज्यातून त्यांनी मुंबईसह अन्य ठिकाणी व्यावसायिक पातळीवर काय सुरू आहे याचा अभ्यास होईल. त्यातील बारकावे त्यांना प्रत्यक्ष तेथील कलाकारांना भेटून, बोलून अभ्यासता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी बुधवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या ४२ नाट्यमहोत्सवाचे उद्‍घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची उपस्थिती होती.
उद्‍घाटन समारंभाप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रा. सतीश पाटील आणि नाट्यशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांची उपस्थिती होती. महिला दिनाचे औचित्य साधून उद्‍घाटन समारंभाच्या सूत्रसंचालनापासून आभार प्रदर्शनापर्यंतची सर्व सूत्रे विभागाच्या विद्यार्थिनींनी सांभाळली.
चंद्रकांत कुलकर्णी पुढे म्हणाले की, विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र अशा सर्व विषयांना विज्ञान संबोधले जाते. मात्र, नाटशास्त्राला कला म्हणून बाजूला ठेवले जाते. तथापि हे देखील एक विज्ञान आहे, शास्त्र आहे. त्यामुळेच अन्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाला प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून अभ्यास दौरे आयोजित केले जातात. त्याप्रमाणेच नाटकाच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक रंगभूमीवर अभ्यासदौरा करून अनुभव देण्यात यावा.
कुलगुरू चोपडे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात या विभागाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत घडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठ प्रशासनाकडून नाट्य विभागाला काहीही कमी पडू दिले जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. डॉ. जब्दे, प्रा. डॉ. सतीश पाटील यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विभागाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवून विभागाचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
झाड नाटकाचा आज प्रयोग
शुक्रवारी (१० मार्च) अमोल पाणबुडे लिखित व अभिमान उनवणे दिग्दर्शित झाड या नाटकाचा प्रयोग विद्यापीठाच्या नाट्यगृहात सादर होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा प्रयोग होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा लाखांची बॅग पळवणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
अजंठा वाइन शॉपमधून पाच लाख ९५ हजार रुपयांची रक्कम बंदुकीचा धाक दाखवून लूटणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. या पाच जणांपैकी दोघे वैजापूर शहरातील रहिवासी आहेत.
वैजापूर शहरातील स्टेशन रोडवर प्रकाश चव्हाण यांचे अजंठा वाइन शॉप आहे. त्यांच्या दुकानातील दोन नोकर २७ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता दिवसभरात दुकानात जमा झालेली पाच लाख ९६ हजार रुपयांची रक्कम एका बँगमध्ये भरून ते प्रकाश चव्हाण यांना गोदावरी कॉलनी येथील घरी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. कॉलनीत काही अंतर गेल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून रक्कम पळवली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा घडल्यानंतर दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे व पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी आरोपींचा वैजापूर, वीरगाव व अहमदनगर भागात शोध घेतला. या शोध मोहिमेत हा गुन्हा वैजापूर येथील फुलेवाडी रोड भागात राहणाऱ्या वैभव पोपट सरवर याने साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी वैभवला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता या गुन्ह्यात संजय हरिभाऊ वाघ (रा. भायगाव वैजापूर), रोहित अशोक आहिरे (रा. समतानगर टाकळी रोड नाशिक), सागर मनोहर ढवळे (रा. टाकळी रोड नाशिक) व किरण पुंडलिक पवार (रा. अनुसयानगर नाशिक) यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. यापैकी काही आरोपींना पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून जळगाव, नाशिक येथील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर्व आरोपींना वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस नाईक शेख कासम, हवालदार जितेंद्र बोरसे, सुनील ढेरे, योगेश हरणे, गोपाल पाटील, गणेश सोनवणे, अबुबकर शेख, सुभाष ठोके व वैजापूर पोलिस स्टेशनचे विजय खोकड, राहुल थोरात यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images