Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कारची धडक, बुलेटचे तुकडे; एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
भरधाव कारने बुलेटला धडक दिल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील पालेजा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदाम पवार (वय ३५) व सुरेश पाडेकर (वय ४६, दोघे. रा. धोत्रा ता. कोपरगाव) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादकडून मुंबईकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारची (एम एच २६ ए एफ १२८३) वैजापूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या बुलेटला धडक बसली. या अपघातात बुलेटवरील सुदाम पवार व सुरेश पाडेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवले. या अपघातात स्विफ्ट कारचे नुकसान झाले असून बुलेटचे तुकडे झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैजापूर तालुक्यात ९३ लाभार्थ्यांना गॅस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर वन परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तलवाडा, वाकला, बिलोणी या गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत शासन निर्णयानुसार ७५ टक्के अनुदानावर नुकतेच गॅस कनेक्शन देण्यात आले. वृक्षतोडीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून ९३ कुटुंबांना गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक वनसंरक्षक पी. पी. वरुडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तलवाडा येथील सरपंच भाऊसाहेब मगर, दिलीप सोनावणे, रत्तन मगर, सुनील कदम, गोरख बोढरे, मंगल शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्राने जाहीर केली आहे. यादीत नाव असलेल्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. या योजनेतून वैजापूर तालुक्यातील ९३ लाभार्थी पात्र ठरले. योजनेनुसार ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन घेण्यासाठी बीपीएलधारकांना १७०० रुपये भरावे लागतात. १७०० रुपयांचा वाटा वन विभाग भरतो. गॅस कनेक्शनची मालकी कुटुंबातील महिलेच्या नावे आहे. पात्र लाभार्थ्याची यादी कंपनीने गॅस वितरकांकडे पाठविली आहेत. त्यासाठी ग्राहकांना दारिद्र्य रेषेचे कार्ड, कार्डातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, बँक खात्याचे पासबुक, दोन पासपोर्ट फोटो, मतदान कार्ड अथवा वीजबिल द्यावे लागणार आहे. यासाठी विनाशुल्क अर्ज आणि कागदपत्र गॅस कंपनी भरून घेणार आहे. योजनेनुसार लाभार्थ्यांना पहिल्या वर्षी १२ सिलिंडर, दुसरे वर्ष ८, तिसरे वर्ष ६ व चौथ्या वर्षी चार सिलिंडर देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुलीच्या लग्नात अक्षतांच्या ऐवजी बियाणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या मुलीच्या लग्नात अक्षदांच्या जागी वऱ्हाडी मंडळींच्या हाती तांदूळ, ज्वारी न देता त्यांच्या हाती विविध प्रकारच्या झाडांच्या बिया देण्यात आल्या तर... ही कल्पनाच किती छान वाटते ना ! साताऱ्यात आकाश लॉन्स येथे मंगळवारी थाटात पार पडलेल्या एका लग्नात वऱ्हाडींच्या हाती दहा प्रकारच्या बिया मिळाल्या आणि ते आश्चर्यचकित झाले. वधूपित्याने या बिया देत आपल्या कृतीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

वन विभागात कार्यरत असलेले भगवान खर्राटे यांची मुलगी निशा हिचा विवाह वैजापूरचे सतीश गायकवाड यांच्याशी मंगळवारी पार पडला. वनमजूर असलेल्या भगवानरावांनी व पत्नी शोभा यांनी कष्टाने मुलांना मोठे केले. बिटेक झालेल्या मुलीचा विवाह ठरल्यावर लग्नात अक्षतांसाठी तांदूळ, ज्वारी वाया जावू द्यायची नाही असे त्यांच्या मनात होते. त्यासोबत वृक्ष लागवडीचा संदेश देण्याचाही विचार त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी चिकलठाण्यातील एका नर्सरीतून सीताफळ, साग, लक्ष्मी, तरू, हिरडा, बेहडा, आमलतास, सिसू, पुत्रजीवा, काजू, बांबू, चिंच, बेल, अर्जून, आवळा आणि बिजा ही दहा प्रकारची बियाणे त्यांनी आणली. ती प्लास्टिकच्या छोट्या पिशवित भरून अक्षतांऐवजी वऱ्हाडींच्या ही बियाणे दिली. अशा प्रकारची २५० पाकिटे लग्नात वाटण्यात आली.

अक्षता फेकण्यापेक्षा बियांचे रोपण करून झाडे वाढवा, असा संदेश यातून देण्यात आला. आपले अन् झांडांचेही आशिर्वाद मुलीला मिळतील, असे सांगत त्यांनी या बिया दिल्या. आलेल्या पाहुण्यांनी ही कल्पना खूपच आवडली.

युवकाने घेतला आदर्श

बियाणांच्या पिशवीत वधूवरांच्या नावाची एक चिठ्ठी टाकण्यात आली. ही चिठ्ठी जिथे करण्यात आली तेथील युवक राहुल वैद्य यानेही हे पाहून भोकरदनमधील शिरसगाव येथे आयोजित मित्राच्या बहिणीच्या लग्नातही अशाप्रकारे बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १२०० रुपयांच्या विविध प्रकारच्या बियांची खरेदीही त्याने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवणी गोवंश जपण्याची धडपड

$
0
0



अरुण समुद्रे, लातूर

सेंद्रीय आणि पारंपरिक शेतीचे पुनर्जिवन करण्याचा प्रयत्न होत असतानाच, जनावरांचे देशी वंश जपण्याविषयीही चर्चा होत आहे. अशाच पद्धतीने लातूर भागातील देवणी हा गोवंश जपण्यासाठी बाभळगावातील एका गोपालकाची धडपड सुरू आहे. गायीचे पालनपोषण योग्य पद्धतीने केले, तर उत्पन्नाच्या रुपामध्ये चांगला फायदा होतो, असेच या उदाहरणातून दिसून येत आहे.
बच्चेसाहेब देशमुख असे या बाभळगावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून, देवणी गायींविषयी त्यांची विशेष आस्था आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये देवणी वंशाच्या चार गायी असून, त्यांचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी त्यांची कायम धडपड असते. गायींसाठी अंगणात चांगला गोठा तयार केला आहे. गायीला उष्णतेचा किंवा डास-चिलटांचा त्रास होउ नये म्हणून पंख्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक गायीच्या खाण्या-पिण्याचे वेळापत्रकही काटेकोरपणे पाळण्यात येते. खुराक देण्याच्या आणि पाणी देण्याच्या या वेळांमुळेच देशमुख कुटुंबीयांचा दिवस पहाटे साडेचार वाजल्यापासून सुरू होतो. या व्यवसायामध्ये कष्ट असले, तरीही, मिळणारे उत्पन्नही समाधानकारक आहे. त्यामुळे, गोपालन केल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘देशी गायींचे गोमूत्र, शेण, गायींच्या दुधापासून तयार केलेल तूप यांचे दर अविश्वसनीय आहेत. द्राक्ष बागायतदार, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी गोमुत्रासाठी आधीच बुुकिंग करुन ठेवतात. या गायींच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांनाही विशेष मागणी असते. गायींच्या तुपाचा भाव हा प्रतिकिलो १८०० रुपये आहे.’ या गायींच्या पालन पोषणाच्या माध्यमातुनच अल्पभुधारक शेतकरी असतानाही दोन मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, घराच बांधकाम पूर्ण केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

देवणी वंशाचा ‘ब्रँड’
मराठवाड्यात विशेषत: लातूर परिसरामध्ये आढळणारा देवणी गोवंश अत्यंत देखणा मानला जातो. देवणी गायीचे आयुष्य २० ते ३० वर्षांपर्यंत असते. देवणी गाय सर्वसाधारणपणे आयुष्यात १४ ते १५ वेळा वेत देतात. एका वेळी दोन ते अडीच लिटर दूध देणारी ही गाय आहे.

गायीचा वाढदिवस उत्साहात
गायींचे पालनपोषण करताना, बच्चेसाहेब यांचा या जनावरांवर एवढा जीव जडला आहे, की त्यांनी गौरवी या गायीचा तिसरा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा केला. ते म्हणाले, ‘ही गाय दररोज पाच लिटर दूध देेते. या गौरवी देवणी गायीस सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेत प्रथम पुरस्कार रोख रक्कम सात हजार देऊन आणि चॅम्पियन म्हणून निवड झाल्याबद्दल चांदीचा रथ मिळालेला आहे.’ बच्चेसाहेब देशमुख यांना सतरा वर्षांत जिल्हा, विभाग, राज्य पातळीवरचे किमान साठ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना सह्याद्री वाहिनीचा कृषी सन्मान पुरस्कारही मिळालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याचे अपहरण, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैशाच्या व्यव्हारातून पेट्रोलपंप चालकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी दहा आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ एप्रिल रोजी घडला होता.
प्रशांत प्रकाशचंद बोरा (वय ४१ रा. सहयोगनगर) यांचा पेट्रोलपंप असून त्यांचा ज्ञानेश्वर भागचंद ठोंबरे यांच्यासोबत आर्थिक व्यव्हार होता. या व्यवहाराची काही रक्कम बाकी असल्याने त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातून बोरा यांचे ११ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घरी जाताना अपहरण करण्यात आले. त्यांना वाहनातून झाल्टा फाटा येथे नेले व एटीएममधून बळजबरीने काही रक्कम काढून घेण्यात आली. त्यानंतर मारहाण करून सोडण्यात आले. यानंतर २८ एप्रिलपर्यंत आरोपींनी त्यांची पैशासाठी वारंवार पिळवणूक केली. याप्रकरणी बोरा यांनी पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी दखल घेतली नसल्याने त्यांनी कोर्टात दाद मागितली. याप्रकरणी कोर्टाने जवाहरनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार आरोपी ज्ञानेश्वर ठोंबरे व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात खंडणी, अपहरण, मारहाण, धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीएसआय आहेर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा सुरळीत करा

$
0
0

पाणी पुरवठा सुरळीत करा

भाकपची निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बापूनगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करवा, नाल्यांची साफसफाई करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महापालिकेसमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दीड-दोन वर्षांपासून बापूनगर भागातील पाणीपुरवठा खंडित झालेला होता. मध्यंतरी निदर्शने केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच पाणी पुरवठा बंद करण्यात आला. सध्या दोन महिन्यांपासून या भागात पाणी पाणीपुरवठा नाही. उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नालेसफाईही होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आज भाकपच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन केले. नालेसफाई तात्काळ करा, पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवा, अशा मागणी केली. निदर्शने केल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरू होतो. नंतर काही दिवसांनी पुरवठा बंद केला जातो, यामागे कोण आहे याची चौकशी करावी, नालीवर ढापे नसल्याने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे, त्याची दुरुस्ती करावी, आयुक्तांनी या भागास भेट द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अॅड. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात झालेल्या या निदर्शनात पुष्पा बिरारे, उज्वला नरवडे, कमलबाई कीर्तीशाही, कविता होर्शिळ, सरसाबाई म्हस्के, शालूबाई कांबळे आदींसह अन्य महिलांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडवाळीत हाणामारी; ७ जखमी, १३वर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतीच्या बांधाच्या कारणावरून तालुक्यातील वडवाळी येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत सात जण जखमी झाले. याप्रकरणी वडवालीच्या उपसरपंच, माजी सरपंचासह १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वडवाळी येथील घोंगडे कुटुंबात शेतीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याप्रकरणी, रमेश जगन्नाथ घोंगडे यांनी बाबासाहेब रघुनाथ घोंगडे यांच्या विरोधात पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या कारणावरून सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान घोंगडे कुटुंबीयामध्ये लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने तुफान हाणामारी झाली. हाणामारीत दोन्ही गटाचे एकूण सात जण जखमी झाले असून दोन्ही गटांनी पैठण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. रमेश घोंगडे यांच्या फिर्यादीवरून सतीश बाबासाहेब घोंगडे, बाबासाहेब रघुनाथ घोंगडे, दत्ता बाबासाहेब घोंगडे, रघुनाथ दगडू घोंगडे, बबाबाई बाबासाहेब घोंगडे व रेखा सतीश घोंगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बाबासाहेब रघुनाथ घोंगडे यांच्या तक्रारीवरून रामनाथ जगन्नाथ घोंगडे, रमेश जगन्नाथ घोंगडे, सोमनाथ रामनाथ घोगडे, गणेश रामनाथ घोंगडे, माजी सरपंच मीराबाई रमेश घोगडे, वडवालीच्या उपसरपंच मुक्ताबाई रामनाथ घोंगडे व कडुबाई बाळू घोंगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुजीत बडे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा नाही तर कारवाईला सामोरे जा

$
0
0

विमा नाही तर कारवाईला सामोरे जा

आरटीओचा वाहनचालकांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

‘तुमच्या वाहनाचा विमा उतरविण्यात आलेला नाही, तर कारवाईला सामोरे जा’ असा इशाराच जणू आरटीओने आपल्या कृतीतून दिला आहे. एकाच दिवसात ५८ वाहनधारकांना विमा नसल्याने दंड करण्यात आला.

शहरात वाहनांची संख्या साडेपाच लाखांवर पोहोचली आहे. यातील अनेक वाहने दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची आहेत. यातील अनेक वाहनांचा विमा उतरविण्यात आलेला नाही. वन टाइम टॅक्स भरून रस्त्यावर चालविण्यात येत असलेल्या वाहनधारकांमध्ये असा प्रकार दिसून येत आहे. अशा वाहनांच्या अपघातात एखादी व्यक्ती दगावल्यास अशा व्यक्तीला नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे आरटीओने विमा न काढलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे.

वायू वेगात पथकाच्या अधिकाऱ्यांना या वाहनमालकांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दररोज ५० वाहनांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विमा नसलेली ६२ वाहने पकडण्यात आली. त्यातील ५८ जणांना दंड आकारण्यात आला.

विमा नसलेल्या वाहनांवर आगामी काळात अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओचे श्रीकृष्‍ण नखाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छावणीत बच्चे कंपनीची धूम

$
0
0

छावणीत बच्चे कंपनीची धूम

उन्हाळी शिबिरात दीडशे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरात आयोजित उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी धूम केली असून, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी दंग झाले आहेत. तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केली असली तरी शिबिरात शहर परिसरातील १५० विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

या शिबिराला ११ मे रोजी सुरुवात झाली. या शिबिरामध्ये कला, क्रीडा तसेच विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. ‘मार्शल आर्टस्’सह विद्यार्थ्यांना नृत्याचे धडेही प्रशिक्षकांकडून दिले जात आहेत. वेगवेगळ्या हस्तकलांमध्ये विद्यार्थी रमले असून, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे आता शिबिरार्थी कुठल्याही वस्तू फेकून देण्याऐवजी त्यापासून कोणत्या वस्तू तयार करता येऊ शकतील, याचा नक्कीच विचार करतील, अशी अपेक्षा केली जात आहे. जादुच्या प्रयोगांनीही शिबिरात रंगत आणली आहे. ताणतणावाच्या निर्मूलबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मनःशांती, स्वयंशिस्त अंगी रुजावी म्हणून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रशिक्षांकडूनही धडे दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य रुजवण्याच्या हेतुने बास्केट बॉल, लॉन टेनिस आदी खेळांबाबत प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जात आहे. त्याचवेळी शिबिरार्थींची वैद्यकीय व दंत तपासणीही डॉक्टरांकडून करण्यात आली. त्याशिवाय इतर खेळ व उपक्रमांमध्येही विद्यार्थी हिरीरीने सहभागी होत असून, मेजर आर. के. ध्यानचंद हे शिबिरासाठी पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरचीच्या शेतात रात्रीचा पहारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांनी निर्यातक्षम मान्सूनपूर्व मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र या पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी रात्रीचा खडा पाहरा द्यावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
सिल्लोड तालुका अजिंठा डोंगररांगेला लागून आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने वन्य प्राणी आहेत. तालुक्यात सध्या हजार ते १२०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी मिरचीची लागवड केली आहे. काही शेतकरी सध्या मिरची लागवड करीत आहेत. तालुक्याच्या शेतकऱ्यांचे शेतीचे अर्थचक्र मिरचीने बदलून टाकल्याने मेहनत व नियोजनाच्या बळावर शेतकरी पूर्वहंगामी मिरची लागवड करतात. ही मिरची उन्हाळ्यात लावली जात असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला तोडणीसाठी येते, त्यावेळी मिरचीला चांगला भाव मिळतो. पालोद, अन्वी, डोंगरगाव, शिवना, आमठाणा, पानवडोद, सारोळा, गोळेगाव, अजिंठा आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड झालेली आहे. हे पीक जोपासण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पाणी राखून ठेवले, तर काही शेतकरी पाणी विकत घेऊन पीक जगवत आहेत.
या परिस्थिती निलगाई, देवाला सोडलेली जनावरे, हरीण, काळवीट यांचे कळप नुकतीच वाढ होत असलेल्या पिकाची नासधूस करीत आहेच. या जनावाराचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात कळप आहेत. त्यामुळे ते मिरची पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर पहरा द्यावा लागत आहे. शेतकरी गटा गटाने लागवड केलेली मिरची सांभाळत आहेत. जंगली जनावरे आल्यानंतर शेतकरी रात्रीच्या वेळी एकमेकांना सांगून प्राण्यांना हाकलून लावत आहेत. दरवर्षी जंगली प्राण्यांची संख्या वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मिरची लावली नाही व ज्यांच्याकडे पाणी आहे ते शेतकरी जंगली प्राण्याच्या भीतीने मान्सूनपूर्व कापूस लागवड करण्यास धजावत नाहीत. लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या मिरचीच्या नाजूक पिकाचे उन्हापासून रक्षण करावे लागत आहेत. त्यातच जंगली प्राण्यांचा त्रास वाढला आहे. जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी मिरची पिकाच्या शेताला हिरव्या कापडाची जाळी, साडी, धोतर, लुगडे यांचे कुंपण उभारले आहे. वन्य प्राणी हे कापड फाडून शेतात घुसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परळी’ची क्षमतावाढ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

मराठवाड्यातील एकमेव औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळीतील वीजनिर्मितीची क्षमता वाढणार आहे. या केंद्रामध्ये २५० मेगावॉट क्षमतेचा आणखी एक वीजनिर्मिती संच उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासाठी दोन हजार ८१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
परळी वीजनिर्मिती केंद्रामध्ये पाच संच कार्यरत असून, यातून ११३० मेगावॉट वीजनिर्मिती होते. आता नवी संचाची उभारणी झाल्यानंतर, या केंद्राची क्षमता वाढून १४२० मेगावॉट होणार आहे. यामुळे, राज्याला आगामी काळामध्ये लागणाऱ्या वीजपुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. या संचाच्या उभारणीला आणि प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
परळीच्या नवीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरात सध्या २५० मेगावॉट क्षमतेचे तीन संच कार्यान्वित आहेत. सध्या असलेल्या संच क्रमांक आठच्या बाजूला २५० मेगावॉट क्षमतेचा आणखी एक संच उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी पुरेशी जागा देखील त्याठिकाणी उपलब्ध आहे. राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेऊन या संचाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन संच उभारण्यासाठी लागणाऱ्या २०८१ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

४७ वर्षांचा इतिहास
मराठवाड्यातील परळी येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे भूमिपूजन १९६५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले आणि १५ नोव्हेंबर १९७१ मध्ये या केंद्रातून प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरुवात झाली होती. २०१० साली या ठिकाणी सात संचातून ११९० मेगावॉट वीजनिर्मिती होत होती. मात्र दोन संचाचे आयुर्मान झाल्याने, सुरुवातीचे प्रत्येकी ३० मेगावॉट क्षमतेचे दोन संच बंद करण्यात आले. आता २१० मेगावॉटचे तीन संच आणि २५० मेगावॉटचे दोन संच असे पाच संच कार्यान्वित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीच्या महापौरपदी मीना वरपुडकर

$
0
0



परभणी : महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्यामुळे चर्चेत आलेल्या परभणीमध्ये महापौरपदीही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीना वरपुडकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या १८ सदस्यांचा पाठिंबा अपक्षांना दिल्यानंतर, बदललेल्या समीकरणांनंतरही वरपुडकर यांनी भाजपचा पाठिंबा मिळवत चित्र पालटवण्यात यश मिळविले. दरम्यान, उपमहापौरपदी काँग्रेसने माजूलाला उर्फ सय्यद समी सय्यद साहेबजान यांची निवड झाली असून, त्यांनी भाजपच्या विद्या पाटील यांचा पराभव केला.
परभणी महापालिकेमध्ये सर्वाधिक ३२ जागा मिळवत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीसाठी जादूई आकडा गाठण्यामध्ये काही जागा कमी पडत होत्या. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष नगरसेविका शेख अलीया अंजूम यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे, प्रत्यक्ष मतदानावेळी वेगळी समीकरणे उदयाला येतात का, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेच्या बी. रघुनात सभागृहामध्ये व्यासपिठावर पिठासीन अधिकारी पी. शिवाशंकर यांच्यासह मनपा आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव चंद्रकांत पवार यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. मतदानावेळी यामध्ये शिवसेनेचे ५ व राष्ट्रवादीचे अमोल पाथरीकर असे एकूण ६ सदस्य गैरहजर राहिले. दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौर पदासाठी काँग्रेसच्या मीना वरपुडकर यांना ४० सदस्यांनी हात उंचावून समर्थन दिले. यामध्ये काँग्रेस ३१, एक अपक्ष व भाजपच्या आठ सदस्यांचा समावेश आहे. तर त्यांच्या विरोधात शेख अलीया अंजूम यांना राष्ट्रवादी काँग्रेसची १७ आणि एक अपक्ष अशी १८ मते मिळाली.
उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजूलाला यांना ३२ मते मिळाली. यामध्ये काँग्रेसचे ३१ व एक अपक्ष यांनी त्यांना मतदान केले. तर, भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांना केवळ भाजपचीच ८ मते मिळाली. या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

भाजपचा ‘पोपट’
महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देत, उपमहापौर आपल्या पक्षाचा बसविण्याचे भाजपचे मनसुबे होते. मात्र, काँग्रेसने आपल्याच पक्षाच्या माजूलाला यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे, महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याचा काँग्रेसला फायदा झाला, तरी उपमहापौरपद त्यांना मिळालेच नाही. भविष्यात, पक्षाच्या सदस्यांची कामे होण्यासाठी सहकार्य मिळावे, म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिल्याची भूमिका भाजपचे गटनेते मोकिंद खिल्लारे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टातून पळण्याचा दरोडेखोराचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
दरोड्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी वैजापूर येथील कोर्टात आणलेल्या आरोपीने लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. पाठलाग करतांना त्याने दगड मारल्याने एक पोलिस जखमी झाला आहेः
वाळूज येथील २८ जुलै २०१६ रोजीच्या दरोड्यात पोलिसांनी कोमल ठकसेन काळे (वय २०, रा. वाळूज, ता. वैजापूर) याला अटक केली होती. त्याला मंगळवारी सुनावणीसाठी वैजापूर येथील जिल्हा कोर्टात आणण्यात आले होते. त्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास लघुशंकेच्या बहाण्याने
पोलिसांला इतरत्र नेले. तेथे पोलिसाच्या हाताला झटका देत हथकडीसह पलायन केले. कोर्टाच्या पूर्व दिशेने आरोपी पळाल्याचे लक्षात येताच पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक भुमाना रयतुवार, वैजापूर पैलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, सहायक फौजदार परसराम पगार, पी. व्ही. कसाब, डी. व्ही. कासार, दीपक पावळे, सहायक फौजदार एच. टी. चौरे, बबन गुंजाळ, हरेश शिरसाठ, आर. जी. तायडे यांनी पाठलाग केला. बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ असलेल्या संरक्षक तारेजवळ आरोपीने दगडफेक करून पोलिसांचा प्रतिकार केला. झुडपातून पळाल्याने व दगडफेकीमुळे तायडे हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी त्याच्या मुसक्या तेथे आवळल्या. या घटनेमुळे कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाच्या घरी सोडवत होते इंजिनीअरिंगचा पेपर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकीचे पेपर सुरू असताना आज बुधवारी नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरी बसून उत्तरपत्रिका सोडविताना तब्बल २६ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग परीक्षेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. हे सगळे पेपर द्वितीय आणि तृतीय वर्षातील पेपर होते. हे सगळे पेपर साई अभियांत्रिकी कॉलेज सेंटरचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २ मेपासून सुरुवात झाली. त्यात चक्क परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका नगरसेवकाच्या घरी सोडविताना विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी झालेला पेपर आज बुधवारी सोडविताना हे विद्यार्थी आढळल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी द्वितीय आणि अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या विविध ५ शाखांचे विविध १९ पेपर होते. त्यात द्वितीय वर्षाचे ८ तर, अंतिम वर्षाचे ९ पेपर होते. त्यापैकी बीई सिव्हिल चा हा पेपर असल्याचे कळते. साई अभियांत्रिकीचे हे विद्यार्थी असून प्राध्यापकांच्या मदतीने हे पेपर सोडविले जात असल्याचे कळते. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

पेपर कॉलेजकडेच कसे...

अभियांत्रिकीला होम सेंटर द्यायचे की नाही यावरून प्रशासनाची दुटप्पी भूमिका समोर आली. त्यात परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी पेपर विद्यापीठाकडे जमा केल्या जातात. असे असताना, कॉलेजकडे उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्याच कशा हा प्रश्न ‌उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाचा बेजबाबदारपणाच अशा घटनांना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षबांधणी, निवडणुकीच्या तयारीला लागा

$
0
0

पक्षबांधणी, निवडणुकीच्या तयारीला लागा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

‘लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी करा. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा,’ असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले.

जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची आढावा बैठक मंगळवारी मुंबईत झाली.

चव्हाण यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. गेल्या तीन महिन्यांत पक्षाने काय काम केले ? कोणत्या निवडणुकीत काय पद्धतीने रणनीती अवलंबिली ? केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कोणती आंदोलने केली ? सहभाग कसा होता ? कोणते नेते सातत्याने गैरहजर आहेत ? त्यांच्या कार्यपद्धतीचे काय ? याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुठलीच गटबाजी नाही. कोणत्याही निवडणुकीला आम्ही तयार आहोत, असे जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, काँग्रेसमधील गटबाजी कुठेच लपून राहिलेली नाही. अगदी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर त्याचे जाहीर प्रदर्शन वारंवार झालेले आहे. त्यामुळे या मुद्यावर बैठकीत फारशी चर्चा झाली नाही. मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी सांगितले, ‘भविष्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. त्याच्या तयारीला आतापासूनच लागा. तळागाळापर्यंत जाऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करा. जेणेकरून काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत होईल. विशेष म्हणजे पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम पुन्हा एकदा हाती घ्या,’ असे आदेश चव्हाणांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तार कुठे आहेत;

बैठकीत विचारणा

बैठकीला पक्ष सदस्य नोंदणी निरीक्षक शर्मांसह जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार आदींसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. आमदार अब्दुल सत्तार, सुरेश पाटील आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. सत्तारांच्या गैरहजेरीमुळे अशोक चव्हाणांनी ‘सत्तार कुठे आहेत,’ अशी विचारणा केली.

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका आम्ही घेत आहोत. पक्ष बांधणी सोबतच निवडणुकीची तयारी हा विषय सांगितला जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीला लोक कंटाळले असून नागरिकांना आत्मविश्वास देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आता तळागाळात जाऊन दिलासा देणार आहेत.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवकाच्या घरी सोडवला पेपर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना नगरसेवक सीताराम सुरेच्या सुरेवाडीतील घरामध्ये मंगळवारी झालेल्या इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा पेपर पुन्हा सोडवणाऱ्या २७ विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. तर साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचे संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व सीताराम सुरेलाही बेड्या ठोकल्या. या कारवाईने शिक्षणक्षेत्रात भूंकप झाला आहे.
सुरेवाडी परिसरातील किरण सुरे या विद्यार्थ्याच्या घरी साई इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी मंगळवारी झालेल्या द्वितीय वर्षाच्या द्वितीय सत्राचा ‘बिल्डिंग कंस्ट्रक्शन अँड ड्रॉइंग’ विषयाचा पेपर सोडवत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेला दिली. या माहितीवरून सुरेवाडी येथील किरणच्या घरावर मंगळवारी रात्री अकरानंतर छापा टाकण्यात आला. बुधवारी पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी घरामध्ये काही विद्यार्थी पेपर सोडवताना दिसून आले. या विद्यार्थ्यांजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, नोटस सापडल्या. यावेळी २७ विद्यार्थ्यांसह संस्थाचालक मंगेश नाथराव मुंढे वय (रा. आदित्यनगर, गारखेडा), प्राध्यापक विजय केशव आंधळे (रा. सिडको) व नगरसेवक सीताराम सुरेला (रा. सुरेवाडी) बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पीएसआय राजेंद्र बांगर यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षण मंडळ आणि इतर परिक्षांमधील गैरव्यवहार तसेच फसवणूक, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे, पीएसआय विजय जाधव, राजेंद्र बांगर, सुभाष खंडागळे, सहायक फौजदार नसीम पठाण, योगेश गुप्ता,‌ सिद्धार्थ थोरात, लालखा पठाण, प्रदीप शिंदे, बबन इप्पर, संदीप क्षीरसागर, चंद्रकांत सानप, रवी दाभाडे व भालेराव यांनी केली. ही कारवाई करणाऱ्या पथकाला पोलिस आयुक्तांनी पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर केले.

रथी-महारथी सापळ्यात
घटनास्थळी पकडलेले संस्थाचालक मंगेश मुंढे व प्राध्यापक विजय आंधळेकडे चौकशी केली त्यांनी प्राचार्य संतोष शिवाजी देशमुख (रा. एन पाच सिडको) व अमित माणिक कांबळे (रा. एन पाच सिडको) यांचाही सहभाग असल्याची माहिती दिली. प्राध्यापक आंधळेने दुसरे संस्थाचालक अॅड. गंगाधर नाथराव मुंढेच्या (रा. गारखेडा) सहमतीने या उत्तरपत्रिका लिहायला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी संस्थाचालक मुंढेलाही बेड्या ठोकल्या.

४८ उत्तरपत्रिका जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून विद्यार्थ्यांकडून २३ उत्तरपत्रिका, एक प्रश्नपत्रिका, प्राध्यापक विजय आंधळेकडून २५ उत्तरपत्रिका, एक सेंटर रिपोर्ट, रोख ३२ हजार, विद्यार्थी सचिन माटवनकरकडून परिक्षेचे २३ ड्रॉइंग ‌शिट, ३१ मोबाइल असा दोन लाख ८८ हजारांचा ऐवज जप्त केला.

साई अभियांत्रिकी कॉलेज परीक्षा केंद्राविषयी घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल. कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्यात येईल. याबाबत गुरुवारी बैठक घेण्यात येईल. यात आणखी काय कारवाई करायची याचा निर्णय घेण्यात येईल. - डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

अटकेतील विद्यार्थी
- किरण सीताराम सुरे (रा. सुरेवाडी, हर्सूल, औरंगाबाद)
- प्रणव नरहरी पाटील (रा. फजल मार्केट, गारखेडा, औरंगाबाद)
- सौरभ शांताराम कुऱ्हाडे (रा. एन १,सिडको, औरंगाबाद)
- रमेश शिवाजी शिंदे (रा. मयूर पार्क, औरंगाबाद)
- केतन विश्वास बागल (रा. बालाजीनगर, औरंगाबाद)
- प्रदीप काशीनाथ नामदे (रा. मयूरपार्क, औरंगाबाद)
- सागर सोमनाथ खैरनार (रा. पडेगाव, औरंगाबाद)
- सुरेश जयराम काळे (रा. हडको, औरंगाबाद)
- अमोल प्रभाकर मते (रा. मयूर पार्क, औरंगाबाद)
- राजेंद्र देविदास वाहूळकर (रा. शिवाजीनगर, औरंगाबाद)
- दिनेश राजू ‌शिनगारे (रा. एकनाथनगर, औरंगाबाद)
- अतिश अण्णासाहेब थोरात (रा. एन आठ, सिडको, औरंगाबाद)
- शिवराज देवनाथ साळुंके (रा. वेदांतनगर, औरंगाबाद)
- दिलीप केतन साळवे (रा. एन ९, हडको, औरंगाबाद)
- रामकिसन श्रीहरी मुंढे (रा. एन ९, हडको, औरंगाबाद)
- मोहम्मद आजाद मोहम्मद नसीरअली (रा. दिल्लीगेट, औरंगाबाद)
- शेख शहाबाज शेख अब्दुल (रा. क्रांती चौक, औरंगाबाद)
- विजय रावसाहेब फरकाडे (रा. एन सहा, सिडको, औरंगाबाद)
- दिग्विजय सुभाष दौंड (रा. हर्सूल, औरंगाबाद)
- शीतल महादेव बटुळे (रा. माधवनगर, पैठण)
- प्रियांका कारभारी वाहटुळे (रा. पिंपळगाव, ता. फुलंब्री)
- अमोल तेजराव खरात (रा. जांभळी जहांगीर, कन्नड)
- दीपक श्रीरंग मोहिते (रा. बाळापूर सिल्लोड)
- मयुरी शामराव देशमुख (रा. परपगाव ता. केज)
- पुष्कर मुकुंद रत्नपारखी (रा. योगेश्वरीनगर, जालना)
- सचिन सतीश माटवनकर (रा. पनवेल, मुंबई)
- निखिल जनार्धन म्हात्रे (रा. डोंबवली पूर्व, मुंबई)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘साई इंजिनीअरिंग’ची मान्यता रद्द होणार का?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई अभियांत्रिकी कॉलेजच्या उत्तरपत्रिका फेरलेखन रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने केंद्रावर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, विद्यापीठ कठोरात कठोर कारवाई करत कॉलेजच्या संलग्नीकरणासोबत मान्यता रद्द करण्यास धजावणार का, याची उत्सुकता लागली आहे.
उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळ्याची घटना समजल्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. केंद्राच्या ‘गोपनीय कक्षातून’ उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचे सील तोडून दोन गठ्ठे गायब झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. याबाबत विद्यापीठ कोणाला पाठिशी घालणार नाही, असे परीक्षा नियंत्रकांनी स्पष्ट केले.

सीसीटीव्ही बंद; तक्रारींकडे दुर्लक्ष
पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन तपासणी, पंचनामा केला. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीही तपासणी केली. कॉलेजमध्ये सायंकाळी ५.२० नंतरचे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके यांनी सांगितले. परीक्षेशी संबंधित ज्या खोलीमध्ये प्रश्नपत्रिका डाऊनलोड केली जाते, उत्तरपत्रिका ठेवल्या जातात ती जागा सीसीटीव्हीच्या नियंत्रणात असणे बंधनकारक आहे. मात्र, या निकषांना केराची टोपली दाखवित कॉलेजमध्ये असे गैरप्रकार सुरू होते.

उत्तरत्रिका ने-आण करण्यासाठी वाहन नाही
परीक्षा केंद्र मार्गदर्शिकानुसार उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तत्काळ तपासणी केंद्रावर घेऊन जाणे अपेक्षित असते. विद्यापीठ औरंगाबादमध्ये १४ परीक्षा सेंटरवरून अभियांत्रिकीची परीक्षा घेत आहे. शहरातच असलेल्या या केंद्राहून विद्यापीठ दोन-दोन दिवस उत्तरपित्रकांचे गठ्ठे घेऊन जात नाही. उत्तरपित्रका ने-आण करण्यासाठी दोनच वाहने अपुरे असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके यांनी सांगितले. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अशा गैरकारभारांना बळ मिळत आहे.

शाहू अभियांत्रिकीमध्ये परीक्षा
कॉलेजचे परीक्षा केंद्र तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढील या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे पेपर कांचनवाडी परिसरातील छत्रपती शाहू अभियांत्रिकी कॉलेजमध्ये होणार आहेत. अभियांत्रिकी परीक्षा २३ मे पर्यंत चालणार आहेत.

साई अभियांत्रिकी परीक्षा केंद्रासंदर्भात घडलेला प्रकार विद्यापीठाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा आहे. या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. संलग्नीकरण रद्द करण्याबाबत प्रशासनाने आता भूमिका घ्यावी. त्यासाठी परीक्षा विभाग शिफारस करणार आहे. - डॉ. डी. एम. नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

अभियांत्रिकी परीक्षा
विविध शाखांचे विद्यार्थी..............४५०००
साई परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी........३५४
एकूण परीक्षा केंद्र.................................२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० हजारांपासून होते उत्तरपत्रिका फेरलेखन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे फेरलेखन रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू असून त्यासाठी २० हजारांपासून ५० हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात. हे केवळ विद्यापीठ प्रशासन उत्तरपत्रिका लगेच जमा करून घेत नसल्याने घडते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
साई अभियांत्रिकी कॉलेजच्या बुधवारी उघडकीस आलेल्या रॅकेटमध्येही नेमके असेच घडले आहे. परीक्षा केंद्र मार्गदर्शिकेचे पालन न करता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे त्याच दिवशी पोचते केले नाहीत. त्यामुळेच शिवसेना नगरसेवक सीताराम सुरेच्या घरात बसून उत्तरपत्रिका सोडवण्यापर्यंत इंजिनीअरिंगच्या २६ विद्यार्थ्यांची मजल गेली. हे सगळे संगनमतानेच झाल्याची चर्चा आहे.
विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंगच्या परिक्षांना दोन मेपासून सुरुवात झाली. मंगळवारी द्वितीय आणि अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या विविध पाच शाखांचे विविध १९ पेपर होते. त्यात द्वितीय वर्षांचे आठ तर, अंतिम वर्षाचे नऊ पेपर होते. त्यापैकी बीई सिव्हिल द्वितीय वर्षाचा हा पेपर होता. या फेरलेखन रॅकेटमध्ये साई अभियांत्रिकीचे हे विद्यार्थी असून संस्थाचालक आणि काही प्राध्यापकांचाही समावेश आहे.
अभियांत्रिकीला होम सेंटर द्यायचे की नाही यावरून प्रशासनाची दुटप्पी भूमिका समोर आली. त्यात परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी पेपर विद्यापीठाकडे जमा केले जातात. मात्र, कॉलेजकडेच उत्तरपत्रिका कशा ठेवल्या हा प्रश्न ‌उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाचा बेजबाबदारपणाच अशा घटनांना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

नियम धाब्यावर
परीक्षा कशी घ्यावी त्यासह मूल्यांकन, केंद्र प्रमुख, सह केंद्रप्रमुखांना सूचनांपासून परीक्षेतील अवैध मार्गासंबंधी शिक्षासूची अशा विविध नियमावली विद्यापीठाच्या ‘परीक्षा केंद्र मार्गदर्शिका’मध्ये नमूद केली आहे. त्यात उत्तरपत्रिकांच्या गठ्यासंबंधी एकूण ११ सूचना दिल्या आहेत. त्यातील आठव्या क्रमांकाच्या सूचनेत ‘जिल्हा मूल्यांकन केंद्र असलेल्या स्थानिक परीक्षा केंद्र प्रमुखांनी आपल्या परीक्षा केंद्रावरील उत्तरपित्रकांचे गठ्ठे त्याच दिवशी परीरक्षक यांना पोचते करणे बंधनकारक आहे,’ असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, तरीही दोन-दोन दिवस उत्तरपत्रिकांचे गठ्ठे कॉलेजांमध्ये असतात. हे गठ्ठे कॉलेजांमध्ये ठेवण्याचे कारण काय? याचे गौडबंगाल विद्यापीठ प्रशासनालाच माहिती.

मंत्रालयातून विचारणा
उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांचे फेरलेखन करणारी ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी घटना. या घटनेचे शासनाकडून दखल घेण्यात आली असून शिक्षणमंत्र्यांनी तंत्रशिक्षण विभागाकडून याबाबत माहिती घेतल्याचे कळते. त्यासह याप्रकरणी लक्ष देण्याचेही सूचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

...अशी फत्ते होते डील
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे फेरलेखन रॅकेट अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यासाठी ज्यांना अशा मार्गाने उत्तीर्ण व्हायचे आहे, अशांना हेरून डील केली जाते. २० हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत डील ठरते. विषयनिहाय हा दर वेगवेगळा असतो. त्यात अभियांत्रिकीला होम सेंटर आहेत. त्यामुळे अशा कॉलेजांचे फावते. त्यात अनेक प्राध्यापकांचाही सहभाग असतो. विद्यापीठ प्रशासनही उत्तरपत्रिका लगेच जमा करून घेत नाही. त्यामुळे अशा रॅकेटचे फावते. विद्यार्थी गळाला लागला की, त्याला रात्री उशिरा बोलावून उत्तरपत्रिका दिली जाते व सोडवून घेतली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकी परिक्षेला गोंधळ, पेपरफुटीचे ग्रहण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यात अपयशी ठरलेल्या विद्यापीठ प्रशासनाने यंदा होमसेंटर द्यायचे नाही, असा घेतलेला निर्णय अ‍वघ्या काही तासांत निर्णय फिरवला. अभियांत्रिकीत गोंधळाअभावी परीक्षा अभावानेच झाली. २०१२ आणि २०१६मधील पेपरफुटी आणि सहकेंद्रप्रमुखाला झालेली मारहाण राज्यभर गाजली.
विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी परीक्षेत २०१२मधल्या फेपरफुटीने राज्यभर खळबळ उडाली. त्यावर्षी २३मेचा ‘मॅथेमॅटिक्स-३’ पेपर आदल्यारात्रीच विद्यार्थ्यांकडे होता. त्यानंतर हा पेपर रद्द केला. त्यावेळी विद्यापीठाने सत्यशोधन समितीची स्थापना केली. त्यांनी अहवालात अनेक सूचना केल्या. त्यात विद्यापीठाच्या स्ट्राँग रूम कशी असुरक्षित आहे. त्यासह सीसीटीव्ही बंद, प्रश्नपत्रिका, उत्तरपित्रका वितरणातील त्रुटी अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकत काही बदल सुचवले. त्यानुसार ऑनलाइन प्रश्नपित्रका पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातही प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर होणारा गोंधळ रोखण्यास विद्यापीठाला यश आले नाही.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
अभियांत्रिकीसारख्या महत्वाच्या परीक्षा आणि त्यातील सुधारणांकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सीसीटीव्हीच्या नियंत्रणात प्रश्नपत्रिकांच्या छायांकीत प्रती काढण्यापासून, उत्तरपत्रिकांचे गठ्ठ्यांचे पॅकिंग कशी असावी याबाबत सगळी नियमावली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज विद्यापीठांना सादर करणे कॉलेजांना बंधनकारक असते. परंतु, त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करते.

होम सेंटरमुळे बळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या परीक्षा होम सेंटरवर होतात. याचाच फायदा अशा कॉलेजांनी घेतल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातंर्गत २२ अभियांत्रिकी कॉलेज आहेत. त्यातील औरंगाबाद शहरातील अशा प्रकारे उत्तीर्णतेचे रॅकेट चालविणाऱ्या कॉलेजांची नावे विद्यार्थ्यांना माहिती आहेत. अनेकदा त्याबाबत तक्रारी विद्यापीठाकडे आल्या, परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून मिळणाऱ्या अभयामुळे अशा कॉलेजांनी अक्षरशः अभियांत्रिकीचा बाजार मांडला आहे.

साईची मान्यता २०११ मधील
साई अभियांत्रिकी चौकाला २०११मध्ये एआयसीटीईने मान्यता दिली आहे. २०११पासून येथे सुरू असलेल्या या कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या पाच शाखा आसून सुमारे ४२० प्रवेश क्षमता असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

कुलगुरू दौऱ्यांमध्येच व्यस्त
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आपल्या दौऱ्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अभियांत्रिकीचे पेपर सुरू असतानाही त्यांचे दौरे सुरूच आहेत. विद्यापीठातील अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगुरू डॉ. चोपडे आज दिल्लीत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या मुलाखतीसाठी ते गेल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर गडबडीची ३५ वर्षे जुनी परंपरा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंजिनीअरिंगच्या पेपरचे फेरलेखन करणारा प्रकार बुधवारी उघडकीस आला. गैरप्रकारांनी इंजिनीअरिंग विभाग कायम चर्चेत असतो. या विभागात गडबड होण्याची परंपरा तब्बल ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. पूर्वी परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सुरू झालेला हा प्रकार आता खूप वाढीस लागल्याने त्याची लागण स्थानिक विद्यार्थ्यांमध्येही झाली आहे.
राज्यात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यभर इंजिनीअरिंग कॉलेजचे पेव फुटले. अनेक कॉलेजेस सुरू झाले. ८०च्या दशकात या महाविद्यालयांच्या फीसचा प्रश्न गाजत होता. त्यावेळी परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे बंधन नसल्याने उत्तर भारत, दक्षिण भारतातून विद्यार्थी मोठ्या संख्येने भारतात येत. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आलेले अनेक विद्यार्थी औरंगाबादमध्ये ८ ते १० वर्षे रमत होते. काहींनी या ठिकाणी व्यवसायही सुरू केले होते. पदवी मिळविण्यासाठी गैरप्रकारांचा शोध घेत या विद्यार्थ्यांचा विद्यापीठातील तसेच इंजिनीअरिंग विभागातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांशी संपर्क आला आणि एक वेगळे जाळे निर्माण झाले होते. ८० व ९० च्या दशकात इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमधील काही कर्मचारी परराज्यातील विद्यार्थ्यांना हाताशी धरून परीक्षा संपल्यानंतर पेपर लिहिणे, मार्कमेमोमध्ये मार्क वाढवून घेणे, पुनर्तपासणीमध्ये मार्क वाढवून घेण्याची कामे सर्रास करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या काळी एका पेपरसाठी १० ते २० हजार रुपये दर दिला जात होता. त्या काळातही इंजिनीअरिंगचे गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाया झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकारांना आळा बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण ते थांबण्याऐवजी हे प्रकार वाढतच गेले. दरम्यान परराज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंधने आली. त्यामुळे स्थानिक विद्यार्थी या गैरप्रकारामध्ये गुंतले गेले. त्यातूनच बुधवारी साई इंजिनीअरिंग चौका येथील विद्यार्थ्यांच्या फेरलेखनाचा प्रकार समोर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images