Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अंबाजोगाईत आज सामुदायिक विवाह

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
नैसर्गिक संकटामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथील वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मानवलोक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १९ मे रोजी अंबाजोगाई येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यासाठी १८ वधू-वरांची नोंदणी झाली असून हा विवाह सोहळा मानवलोकच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाला. मात्र, त्यापूर्वी सलग काही वर्षे जिल्ह्याला दुष्काळी धग लागली होती. या स्थितीमुळे हताश झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला होता. या वर्षी जिल्ह्यातील साठ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली मुलीची लग्न, शिक्षण आणि कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे आजारपण या समस्या शेतकरी कुटुंबाला भेडसावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबच्या पाच शाखांनी पुढाकार घेत ८ मे २०१४ रोजी मानवलोक कार्यालयात सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. १३ जणांचे लग्न लावून या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य दिले होते.
पुण्याच्या रोटरी क्लबचे कार्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दर वर्षी असाच विवाह सोहळा घेण्याचे त्याचवेळी जाहीर केले होते. त्यानुसार गतवर्षीही दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. २०१४ साली १३ जोडप्यांचे, २०१५ साली १६ जोडप्यांचे विवाह पार पडले. २०१६ म्हणजे या वर्षी सुमारे ३८ जणांनी सामूहिक विवाह सोहळयात लग्न केले.
यावेळी वराला सफारी ड्रेस, टॉवेल, टोपी, हळदीचा ड्रेस तर वधुला हळदीची व लग्नाची साडी दोन ग्रॅम मनी मंगळसूत्र, जोडवी तसेच संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मानवलोकच्यावतीने शुक्रवारी संध्याकाळी हा सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा मानवलोकच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या सर्वधर्मिय सामुहिक विवाहाचे आयोजन केले आहे. हा सोहळा सर्वच नागरिकांनी यशस्वी करावा. नवदांपत्यांना आर्शिर्वाद देण्यासाठी सर्वस्तरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा, अनिकेत लोहिया अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा, जयसिंग चव्हाण, अभिजीत गाठाळ यांच्यासह वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मानवलोक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ दर घसरल्याने मोसंबी उत्पादक अडचणीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तूर, कांदा, द्राक्ष व डाळिंबा पाठोपाठ आता मोसंबीच्या दरातही कमालीची घसरण झाल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मराठवाड्यात मोसंबीचा गड समजल्या जाणाऱ्या जालना मंडईत मोसंबीची बेसुमार आवक झाल्याने मोसंबी दरात मोठी घसरण झाली. परिणामी पुणे, मुंबईसह दिल्ली मंडईतही मोसंबीचे दर गडगडले.
मोसंबीचे दर गडगडल्याने उस्मानाबादसह मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक हतबल झाला असून, त्याला अर्थसहाय्य करीत आधार देण्याची गरज आहे, असे मत उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथील प्रगतशील फळ उत्पादक राजेंद्र मुंदडा यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले. राजेंद्र मुंदडा यांच्याकडे ३० एकरावर मोसंबीची व ८० एकरावर केशर आंब्याची बाग आहे. या मोसंबी दर घसरणीचा त्यांनाही मोठा फटका बसला आहे.
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मोसंबीचे दर हे साधारणतः ३५ ते ४० हजार रुपये प्रतिटन इतके होते. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून हेच दर तीन ते चार हजार रुपये प्रतिटन इतके घसरले आहेत. परिणामी, सध्या मोसंबी उत्पादकाना मोसंबी काढणीचा खर्च ही पदरचा करावा लागत आहे. त्यामुळे अनेक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोसंबी बाग जोपासण्याचा नाद सोडून बाग नष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे.
सततच्या चार वर्षाच्या दुष्काळानंतर यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे मोसंबीच्या बागा चांगल्याच बहरल्या होत्या. मोसंबीही दृष्ट लागावी इतकी लागली होती. परंतु, मंडईतील दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादकांनी यंदा भरघोस उत्पनाचे जे स्वप्न पाहिले होते. त्याच्यावर पाणी फेरले गेले. यंदा दैवाने व निसर्गाने साथ दिली. मोसंबीचे उत्पादनही अपेक्षापेक्षा मुबलक झाले. परंतु, नशिबाने साथ न दिल्यामुळे मोसंबीला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली.

शेतकरी बागा मोडण्याच्या मनस्थितीत
मोसंबी बाग जोपासण्यासाठी घेतलेले कर्ज आता कसे फेडायचे या विवंचनेत सध्या मोसंबी उत्पादक आहेत. मोसंबीच्या दरात झालेल्या मोठ्या दर घसरणीमुळे यंदा मोसंबी उत्पादक पार मेताकुटीला आला असून, आर्थिक विवंचनेमुळे तो आता बागा मोडण्याच्या मनस्थितीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वऱ्हाडाच्या जीपला अपघात; चार ठार

$
0
0

परभणी - सेलू तालुक्यातील रायपूर येथील विवाह सोहळा आटोपून परतत असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या क्रुझर जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर अन्य सहा वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.
जालना जिल्ह्यातील वाटुर फाटा येथील भगस कुटुंबातील मुलाचा विवाह सेलू तालुक्यातील रायपूर येथील गाडेकर कुटुंबातील मुलीसोबत गुरुवारी दुपारी १ वाजता पार पडला. विवाहानंतर वर पक्षाकडील मंडळींनी जेवणे आटोपून परतीचा प्रवास सुरू केला. त्यांची क्रुझर जीप (एमएच २१ डी ७३६४) सेलू-देवगाव दरम्यान, गिरगाव पाटीजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे पाच-सहा पलट्या खाऊन गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. ज्यामध्ये चार जण ठार व सहा जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी सदरील गाडीत २० प्रवाशी असल्याची माहिती घटना स्थळावरून मिळाली. याच गाडीचे मागे विवाह सोहळ्यातील वराडी मंडळीची दुसरी गाडी असल्यामुळे घटना स्थळावरून जखमीना तत्काळ रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था झाली. यातील काही जखमींना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर काही जखमींना मंठा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मंठा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कल्याण श्रीराम बादल (वय ३५, रा. एद्लापूर), भीमराव नभाजी शिंदे (वय ६०), शरद बालासाहेब रोहीणकर (वय ३८), गीताराम वायाळ (वय ७०, सर्वजण रा. वाटूर) अशी मृतांची नावे आहेत. तर आकाश राजेंद्र पांचाळ (१८), रमेश गणपत खवणे (४२), भानुदास अंबादास बगस (४० रा. सर्व वाटूर) यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर उर्वरित तीन जखमींना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक इमारतींची पालिकेला आठवण

$
0
0

धोकादायक इमारतींची पालिकेला आठवण

दोन वर्षात एकही कारवाई नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळा येताच महानगरपालिकेला पुन्हा शहरातील धोकादायक इमारतींची आठवण झाली आहे. शहरातील अशा ५० धोकादायक इमरतींना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षात एकाही अशा धोकादायक इमारतीवर प्रशासनाने कारवाई केलेली नाही.

पालिकेला पावसाळा जवळ आला की, नालेसफाईसह धोकादायक इमारतींची आठवण येते. शहरातील अशा धोकादायक इमारतींना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. शहरात अशा ५० धोकादायक इमारती असून त्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसांत या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. या इमारती विशेषतः जुन्या शहरातच आहेत. ज्यामधील अनेक इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. पावसाळ्यात या इमारतींना धोका होऊ शकतो. त्यात जिवितहानीही होऊ शकते. अशा दुर्घटना टाळता याव्यात यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर या नोटिसा देण्यात येणार आहेत, परंतु या नोटिसा केवळ कागदोपत्रीच राहतात. प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही.

दोन वर्षात एकही इमारत पाडली नाही

दोन वर्षात एकही धोकादायक इमारत पाडण्यात आलेली नाही. महापौरांच्या आढावा बैठकीतही हा प्रश्न समोर आला तेव्हा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. नियमानुसार पालिका इमारत मालकाला इमारत पाडून घेण्याची नोटीस बजावते. त्यानंतही धोकादायक इमारत पाडली नाहीतर, पालिका ती इमारत पाडू शकते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ही प्रक्रिया केवळ फार्स ठरल्याचे बोलले जाते. त्यातच यंदा आता पावसाळा जवळ येताच नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भागातील इमारती

धोकादायक इमारतींपैकी अनेक इमारतींमध्ये कुटुंब राहतात. त्या इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात अशा सूचना नोटीसमध्ये करण्यात येतात. धोकादायक इमारतीपैंकी बहुतांशी इमारती या जुन्या शहरात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारती औरंगपुरा, रंगारगल्ली, शहागंज, सिटी चौक, कुंभारवाडा अशा परिसरातील आहेत. पुढील दोन दिवसात अशा इमारतींना अतिक्रमण विभागाकडून नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत खासगी क्लास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षापासून मोफत शिक्षण मिळणार आहे. आयुक्तांनी आयोजित केलेल्या बैठकीत कोचिंग क्लासच्या संचालकांनी याबद्दलची तयारी दर्शवली. सामाजिक बांधीलकीच्या भावनेने कोचिंग क्लासचे संचालक हा उपक्रम राबविणार आहेत.
महापालिकेच्या ७० शाळांपैकी १२ शाळांमध्ये दहावीचे वर्ग आहेत. या वर्गांमध्ये गरीब घरातील मुले - मुली शिक्षण घेतात. दोन - तीन वर्षांपासून पालिका शाळेतील दहावीच्या परीक्षेचा निकाल उंचावू लागला आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी या शाळांमधून पुढे येऊ लागले आहेत. येत्या काळात दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा आलेख उंचवावा यासाठी पालिकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी १६ मे रोजी शहरातील खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला १५ क्लासचे संचालक उपस्थित होते. महापालिकेच्या शाळेत दहावीच्या वर्गात जेवढे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या सर्वांची मोफत शिकवणी घेण्याची तयारी क्लासेसच्या संचालकांनी दाखवल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली. पाचशे ते सातशे विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिक्षण घेतात. या सर्वांना खासगी क्लासेसमध्ये शिक्षण दिले जाणार आहे. मुगळीकर यांनी घेतलेल्या बैठकीला चाटे क्लासेस, व्हिजन क्लासेस, मापारी क्लासेस, पठाण - बाबर क्लासेस, पॉझिटीव्ह क्लासेस, माऊली क्लासेस, व्यवहारे क्लासेस, ज्ञानसागर क्लासेस आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रत्येक शाळेत फस्टएड बॉक्स
महापालिकेच्या सत्तर शाळा आहेत. प्रत्येक शाळेमध्ये फस्टएड बॉक्स उपलब्ध करून दिला जाणार आहे. आतापर्यंत कोणत्याही शाळेत फस्टएड बॉक्स नव्हता. सोमवारी एका शाळेत फस्टएड बॉक्सचे उद्‍घाटन महापौरांच्या हस्ते करू, अशी माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल सुधाकर कोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास का उशीर लागला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी पीडित मुलीची औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास उशीर लावल्याचे आमदारांना सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना फिर्याद देऊ नये यासाठी का दबाव आणला, सकाळी साडेनऊ वाजता पीडित मुलीचे वडील आले असता दुपारी साडेतीन वाजता फिर्याद दाखल करण्यात आली, हा उशीर कशामुळे अशी विचारणा केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजगुरू यांनी आपल्याकडे सिल्लोड उपविभागाचा अतिरिक्त पदभार असून तिकडेही अॅट्रासिटी व बलात्कार प्रकरणात चौकशीसाठी गेलो होतो. सकाळी दहा वाजता पोलिस निरीक्षक भुजंग यांचा फोन आल्यानंतर लगेच आलो. पीडित मुलगी व वडिलांच्या तक्रारीत विसंगती असल्याने फिर्याद दाखल होण्यास उशीर झाल्याचे सांगितले. आमदार प्रशांत बंब यांनी आपण कारवाई करणार की पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे जाऊ, अशी विचारणा केल्यानंतर राजगुरू यांनी लेखी तक्रार द्या, चौकशी करतो, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबित अधिकाऱ्यांना सेवा बहाल करण्याचा ऐनवेळी प्रस्ताव ?

$
0
0

निलंबित अधिकाऱ्यांना सेवा बहाल करण्याचा ऐनवेळी प्रस्ताव ?

महापालिकेची आज सर्वसाधारण सभा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

निलंबित अधिकाऱ्यांना चौकशीच्या आधीन राहून सेवा बहाल करण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव उद्या शनिवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्यासाठी काही नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विविध कामातील अनियमीततेमुळे आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना विभागीय चौकशीनंतर क्लिनचिट मिळाली आहे. उर्वरित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. निलंबित केल्यामुळे हे अधिकारी कामावर नाहीत, परंतु ७५ टक्केनुसार त्यांचा पगार सुरू आहे. महिन्याला साडेसहा लाख रुपये या अधिकाऱ्यांच्या पगारावर खर्च केले जातात. कामावर नसताना या अधिकाऱ्यांवर साडेसहा लाख रुपये खर्च करण्यापेक्षा विभागीय चौकशीच्या आधीन राहून या अधिकाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून ऐनवेळी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. यापूर्वीही अशा प्रकारचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी घेतला होता, पण त्याला बकोरिया यांनी उघडपणे विरोध करून प्रस्ताव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवला. शासनाने अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शासनाचा निर्णय व चौकशीच्या आधीन राहून निलंबित अधिकाऱ्यांना पालिका सेवेत घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे.

समांतर जलवाहनी, भूमिगत गटार योजना, पाणीपट्टीत करण्यात आलेली दरवाढ यावर सर्वसाधारण चर्चा होण्याची शक्यता आहे. वारकरी भवनाच्या धर्तीवर जमातखाना व बुद्धीजम भवन उभारण्याचा निर्णय देखील होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करा

$
0
0

सरकारी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करा

विभागीय आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

पावसाळा सुरू होण्यास अवघे १५ दिवस शिल्लक असताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिरांवर पावसाळ्यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.

नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींवर छतावरील पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येत आहे. मात्र, अनेक इमारतींमध्ये पावसाचे पाणी संकलन करण्याची व्यवस्था झालेली नाही. म्हणून मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, तलाठी कार्यालय, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर आदी सर्व इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाण्याचे संकलन करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

मराठवाड्यात अनियमित पडणारा पाऊस, कमी होणारे वनक्षेत्र, वृक्षतोडीमुळे सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. भूगर्भातील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे, पावसाचे दिवसही कमी होत असल्यामुळे कमी कालावधीत पडणारे पाणी हे जमीनीत न मुरता वाहून जाते, जमीनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवणे आवश्यक आहे. यासाठी घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढेल. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे शुद्ध पाण्याचे प्रमाण तसेच पाण्याची गुणवत्ता वाढेल व घरगुती वापरासाठी अगदी जवळ जास्त कालावधीसाठी पाणी मिळू शकेल, असेही आयुक्तांनी विविध कार्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखीमार्गात बदल; तीस गावांत संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
संत एकनाथ पालखी मार्ग वळवण्याचा प्रयत्न आष्टी-पाटोद्याचे आमदार भीमराव धोंडे करत असल्याचे वृत्त ‘म.टा.’त प्रसिद्ध झाल्यानंतर पारंपरिक मार्गावरील पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील दहा व लगतच्या वीस गावांतील नागरिक संतप्त झाले आहे. पारंपरिक मार्ग बदलण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा पैठण ते पंढरपूर मार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारने ७०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. पण, आमदार भीमराव धोंडे हे पालखी मार्गात बदल करून राजकीय फायद्यासाठी मतदारसंघातून वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाथवंशज पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी केला आहे.
हे वृत्त छापून आल्यानंतर मार्गातून वगळण्यात येणाऱ्या पिपळ्याचीवाडी, डोळेवाडी, सांगळवाडी, डिसलेवाडी, रायमोहा, दगडवाडी, वंजारवाडी, टाकळवाडी, आवळवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, उंबरविहारा, तांबा राजुरी व या गावालगतच्या तागडगांव, नागरेवाडी, आनंदगांव, खलापूरी, जांब, खोकरमोहा, हिवरसिंगा, बरगवाडी, राजुरी या गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या गावातून आमदार धोंडे यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे.
पालखी मार्गात कोणताही बदल न करता विकास करण्याची मागणी करणारे निवेदन या भागातील नागरिकानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे. या निवेदनावर सुधाकर जाधव, सुलेमान पठाण, बापूसाहेब येळे, भारत जाधव, निजामोद्दीन शेख, शिवाजी वारे, राजाभाऊ जाधव, दिलीपराव जगताप, लहू ढाकणे, बबन पवार,अॅड. रामकृष्ण मिसाळ, मारुती पाखरे, हरीभाऊ सांगळे, जानराव डिसले, राजाभाऊ सानप, संजय सानप, सुभाष मेहेत्रे, शरद मेहेत्रे, हाशम शेख, पांडुरंग सानप, शिवशंकर सानप, पी. जी. सानप, शेख नूर, मुराद पठाण, कैलास मिसाळ, दिनकर पालवे, छबूराव सानप, तात्याराम विघ्ने, सखाराम जाधव, नागरगोजे, बोडखे आप्पा, केशव राजगुरू, केशवराव जाधव, जानराव मंडलिक, कमरूद्दीन शेख, गुलजार पठाण, रामराव सानप यांच्या सह्या आहेत.

संत एकनाथ महाराज यांची पालखी आमच्या गावातून जाते याचा आम्हाला अभिमान आहे. या पालखीसोबत धार्मिक भावना जुळलेल्या आहे. काही राजकीय मंडळी स्वार्थासाठी हा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आम्ही हे कदापी होऊ देणार नाही.
-प्राचार्य डॉ. नामदेवराव सानप, रायमोहा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी मानधनापासून वंचित

$
0
0

मध्यान्ह भोजन शिजविणारे

कर्मचारी मानधनापासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या अनेक स्वयंपाकी व मदतनीसांचे गेल्या सहा महिन्यापासूनच मानधन रखडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. केवळ एक हजाराच्या तोकड्या मानधनावर ते कार्यरत असून त्यांच्या नैपुण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत मानधन अडविण्यात आल्याचे समजते.

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात पावणे तीन हजार शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. आहार शिजविण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले असून हे काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस महिलांना महिन्याकाठी एक हजार रुपये मानधन दिले जाते. गतवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होताच चार महिन्याचे मानधान त्यांना अदा करण्यात आले, परंतु ऑक्टोबर २०१६ पासून मार्च २०१७ पर्यंतचे मानधन या कर्मचाऱ्यांना अद्यापही देण्यात आलेले नाही.

अत्यंत तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी काम करतात. असे असतानाही सहा महिन्याचे त्यांचे मानधन न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत, परंतु आठ महिन्यानंतरही हा प्रश्न अद्यापही सुटला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर बलात्कार; पोलिसाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तेरा वर्षांच्या मुलीवरील बलात्कारप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबलला सोमवारपर्यंत (२२ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी शुक्रवारी (१९ मे) दिले.
आरोपी व पोलिस शिपाई सुधाकर कोळी हा पीडित मुलीच्या घरी बुधवारी रात्री गेला होता. तिच्या वडिलांना राष्ट्रीय महामार्गावरील विशिष्ट वाहनावर लक्ष ठेवण्याचे सांगून त्यांना घराबाहेर पाठवले. त्यानंतर आरोपी कोळीने पीडितेला घराबाहेर नेऊन तिला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यावरून आरोपी कोळीविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, यापूर्वी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आहे का, आरोपीने तिला मोबाईल दिल्याचे समजते व हा मोबाइल त्याच्याकडून जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे बाकी असल्याने आरोपाला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका मुख्यालयात मोफत वायफाय, सोलार यंत्रणा

$
0
0

पालिका मुख्यालयात मोफत वायफाय, सोलार यंत्रणा

रेन वॉटर हार्वेस्टिंगही होणार

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या सर्व इमारतींवर सोलार यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून मोफत वायफाय सिस्टीमही लवकरच सुरू केली जाणार आहे. शहराची स्मार्टसिटीकडे होणारी वाटचाल ही महापालिकेच्या मुख्यालयापासून केली जावी यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद शहराची निवड केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेबरोबरच सोलार सिटीमध्ये झालेली आहे. स्मार्टसिटीच्या पॅनसिटी प्रकल्पात संपूर्ण शहर वायफाय करण्याचे प्रस्तावित आहे. सोलार सिटी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालये, संस्थांवर सोलार सिस्टीम यंत्रणा बसवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेतर्फे हे काम केले जाणार असून या कामाची सुरुवात महापालिकेच्या इमारतींपासूनच करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. महापालिकेच्या तीन मुख्य प्रशासकीय इमारती आहेत. या तिन्हीही इमारतींवर सोलार पॅनल लावण्याचे काम लगेचच सुरू केले जाणार आहे. इमारतींमधील विद्युत यंत्रणा या पॅनलच्या मदतीने चालविणे शक्य होणार आहे. यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणावर बचत अपेक्षित आहे.

सोलार पॅनल बरोबरच महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत वायफाय यंत्रणा देखील कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी एका कंपनीबरोबर चर्चा झाली असून कोणताही मोबदला न घेता ती कंपनी प्रशासकीय इमारतींमध्ये वायफाय यंत्रणा बसवून देण्यास तयार आहे, असे मुगळीकर यांनी सांगितले. स्मार्टसिटी अंतर्गत संपूर्ण शहर वायफाय करण्याच्या कामाला २५ जूनपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत वायफाय यंत्रणा कार्यान्वित झालेली असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग देखील केले जाणार आहे. संबंधित विभागाला या संदर्भात आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुगळीकर यांनी दिली.

वॉटर कुलरची व्यवस्था

महापालिकेच्या मुख्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. टँकरद्वारे पाणी आणावे लागत होते. गेल्या आठवड्यात मुख्यालयाच्या इमारतीसाठी पाइपलाइन टाकून कनेक्शन घेण्यात आले आहे. पाइपलाइनचे पाणी एका टाकीत घेवून ते वॉटर कुलरद्वारे पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना टँकरवर बादल्या घेऊन जाण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करा

$
0
0

सरकारी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करा

विभागीय आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

पावसाळा सुरू होण्यास अवघे १५ दिवस शिल्लक असताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिरांवर पावसाळ्यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.

नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींवर छतावरील पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येत आहे. मात्र, अनेक इमारतींमध्ये पावसाचे पाणी संकलन करण्याची व्यवस्था झालेली नाही. म्हणून मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, तलाठी कार्यालय, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर आदी सर्व इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाण्याचे संकलन करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

मराठवाड्यात अनियमित पडणारा पाऊस, कमी होणारे वनक्षेत्र, वृक्षतोडीमुळे सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. भूगर्भातील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे, पावसाचे दिवसही कमी होत असल्यामुळे कमी कालावधीत पडणारे पाणी हे जमीनीत न मुरता वाहून जाते, जमीनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवणे आवश्यक आहे. यासाठी घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढेल. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे शुद्ध पाण्याचे प्रमाण तसेच पाण्याची गुणवत्ता वाढेल व घरगुती वापरासाठी अगदी जवळ जास्त कालावधीसाठी पाणी मिळू शकेल, असेही आयुक्तांनी विविध कार्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच जूनपासून नवी सिटीबस सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनपासून खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पहिल्या टप्प्यात १५ सिटीबस सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासंदर्भात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्याचा महापालिकेचा हा दुसरा प्रयत्न आहे.
सिटीबस ही औरंगाबादची गरज आहे. एस.टी. महामंडळाची सिटीबस सेवा तुटपुंजी आहे, शिवाय सिटीबस सेवा चालवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे एसटीने स्पष्ट केल्यामुळे पालिकेने खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. स्मार्टसिटी प्रकल्पाचा सिटीबस सेवा हा एक भाग आहे. पॅनसिटीअंतर्गत महापालिकेला सिटीबस सेवा सुरू करावी लागणारच आहे. त्यादृष्टीने शहरातील एका खासगी संस्थेच्या मदतीने सिटीबस सेवा सुरू करण्यात येत आहे, असे मुगळीकर यांनी सांगितले. ५ जूनपासून ही सेवा सुरू व्हावी, असा प्रयत्न आहे, असा उल्लेख त्यांनी केला. एक बस ३५ आसनांची असेल. बसचा मार्ग, तिकीट दर व अन्य बाबी ठरविण्यासाठी सोमवारी महापालिका, आरटीओ, एसटी महामंडळ, खासगी संस्था यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व तपशील ठरविला जाईल, असा विश्वास मुगळीकर यांनी व्यक्त केला.

खासगी संस्था कोणाची?
सिटीबस सेवा सुरू करणाऱ्या खासगी संस्थेचे नाव आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले नाही. सोमवारची बैठक होऊ द्या, सर्वकाही ठरू द्या, त्यानंतर त्या संस्थेचे नाव जाहीर करू, असे ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार; भाजपच्या आमदाराशी संबंधित असलेल्या संस्थेबरोबर पालिका सिटीबस सेवा सुरू करण्याचा करार करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर डॉ. नेटके यांची हकालपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॉपी प्रकरणात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तातडीने बैठक घेऊन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांची हकालपट्टी केली. कॉपी प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर कुलगुरुंनी शुक्रवारी सकाळी बैठक घेतली. साई कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याची शिफारस करून कॉलेज ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे, असे डॉ. चोपडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या २७ विद्यार्थ्यांना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी बुधवारी सामूहिक कॉपी करताना पोलिसांनी अटक केली. कॉपीप्रकरण राज्यभर गाजल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी परीक्षा व मूल्यमापन अधिकारी डॉ. दिगंबर नेटके यांची हकालपट्टी केली. हा पदभार डॉ. राजेश रगडे यांना सोपवण्यात आला. याबाबत पत्रकार परिषदेत कुलगुरुंनी विद्यापीठ प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ‘साई इंजिनीअरिंग कॉलेजचे परीक्षा केंद्र रद्द केले असून, २३ मेपर्यंत छत्रपती शाहू महाराज कॉलेजात परीक्षा घेण्यात येईल; तसेच साई कॉलेजात यावर्षी नवीन प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार नाही. सध्याच्या दोन वर्षांच्या विद्यार्थ्यांची त्याच कॉलेजात सोय करण्यात येईल किंवा इतर कॉलेजात समावेश करण्यात येईल. कॉलेज केंद्रप्रमुख प्रा. अमित कांबळे, सहकेंद्रप्रमुख अभिजीत गायकवाड व प्राचार्य संतोष देशमुख यांना परीक्षा प्रक्रियेतून कायमचे बडतर्फ केले आहे; तसेच त्यांची शिक्षक मान्यता रद्द करण्यात येईल,’ असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले.
कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे; तसेच कॉलेज ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका दोन-चार दिवस संबंधित परीक्षा केंद्रात ठेवल्याचा प्रकार धक्कादायक असून, भविष्यात उत्तरपत्रिका परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी विद्यापीठात आणल्या जातील. उस्मानाबाद उपकेंद्र परिसरातील उत्तरपत्रिकासुद्धा त्याच दिवशी आणण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती डॉ. चोपडे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. राजेश रगडे उपस्थित होते.

विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन
साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. एम. डी. शिरसाट असून, डॉ. प्रवीण वक्ते, प्राचार्य सी. एम. राव किंवा डॉ. साधना पांडे सदस्य आहेत. संबंधित कॉलेजची आणि विद्यार्थ्यांची चौकशी करून समिती अहवाल सादर करणार आहे, मात्र अहवाल देण्यासाठी निश्चित कालावधी ठरवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज तुमची सावलीही सोडेल तुमची साथ

$
0
0

आज तुमची सावलीही सोडेल तुमची साथ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद - आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाहीत, असे म्हटलं जातं, पण उद्या (२० मे) तुमची सावलीही तुमची साथ सोडणार आहे. हो, कारण शनिवारी आहे ‘झिरो शॅडो डे.’

शनिवारी शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी एमजीएम जेएनईसी परिसरात खास व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबादच्या अक्षांशनुसार वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव आपल्याला घेता येतो. २० मे रोजी व २१ जुलै रोजी शून्य सावलीचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो, परंतु २१ जुलै रोजी आपल्याकडे पावसाळा असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे ही घटना अनुभवता येईलच याची शाश्वती नाही. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

२० मे रोजी ही घटना औरंगाबाद येथून पाहाणे शक्य होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात सकाळी १०:३० ते दुपारी ०१ वाजेपर्यंत ही घटना पाहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शून्य सावलीचा अनुभव दुपारी १२:२८ दरम्यान घेता येईल. याविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी नांदेड येथील एमजीएमच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर हे उपस्थित असणार आहेत. विज्ञानप्रेमींनी आणि शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष्णुप्रयागला अडकले १०२ औरंगाबादकर

$
0
0

औरंगाबाद :

बद्रीनाथ, केदारनाथ परिसरात शुक्रवारी दरड कोसळल्याने सुमारे दीड हजार पर्यटक अडकले आहेत. यात औरंगाबादचे सुमारे १०२ जण असल्याचे येथील टूर ऑपरेटर मंगेश कपोते यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

कपोते स्वत: टूर घेऊन गेले असून यांच्यासोबत सुमारे ३२ जण आहेत. विष्णुप्रयाग या गावात औरंगाबादचे पर्यटक अडकले असून जिथे दरड कोसळल्या आहेत त्या पलीकडेही काही स्थ‌ानिक टूर ऑपरेटर परतीच्या प्रवासात होते. यात औरंगाबादचे सुमारे ७२-७५ जण असल्याचेही कपोते यांनी सांगितले. अडकलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असून वैद्यकीय खर्चही वाढला आहे. विष्णुप्रयाग परिसरातील हॉटेल व लॉज व्यावसायिकांनी खोल्यांचे दर १०० टक्क्यांनी वाढवले आहेत. अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले असल्याचेही कपोते म्हणाले.

नियंत्रण कक्ष स्थापन

औरंगाबाद येथील १०२ भाविक उत्तराखंडात असण्याची शक्यता राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने व्यक्त केली आहे. उत्तराखंडात आपले कुटुंबीय अथवा नातेवाईक असल्यास त्यांची माहिती औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला (०२४० २३३१०१७ किंवा ०९९७०९७७४५२) द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी रोखला वैजापुरात बालविवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शहरातील आंबेडकरनगर भागात होणारा बालविवाह पोलिसांनी रोखला. वधू व वर पक्षाकडून दोघे सज्ञान झाल्यानंतर विवाह करण्याचे शपथपत्र घेण्यात आल्याने पुढील कारवाई करण्यात आली नाही. मात्र, वऱ्हाडाला परत न पाठवता साखरपुडा करण्यात आल्याने मंडपाची शोभा राहिली.
येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानकासमोरच्या आंबेडकरनगर भागात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहातील नाशिक जिल्ह्यातील वधू अल्ववयीन व आंबेडकरनगर येथील वर विवाहयोग्य वयाचा नसल्याची माहिती वैजापूर पोलिसांना अहमदनगर येथील चाईल्ड होमचे रवी भिंगारदिवे यांच्याकडून मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, पोलिस नाईक सचिन सोनार, विशाल पडळकर, हवालदार विजय खोकड यांच्या पथकाने विवाहस्थळी भेट दिली. त्यावेळी वऱ्हाड आले होते व लग्नाची तयारी सुरू होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वधुचे वय १७ वर्ष ८ महिने व वराचे वय २० वर्ष १० महिने असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा विवाह होऊ शकणार नाही, असे पोलिसांनी बजावले. पण मोठा खर्च केल्याने लग्न लावणारच, असा आग्रह धरून दोन्ही बाजुची मंडळी अडून बसली. बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल होऊन दोन वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड होऊ शकतो, अशी माहिती देऊन पोलिसांनी खाक्या दाखवला. त्यानंतर लग्न रद्द करण्याची दोन्ही बाजूंनी तयारी दाखवली. त्यांच्याकडून वधू व वर सज्ञान झाल्यानंतर विवाह करण्याचे शपथपत्र घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसरपंचाकडून महिला सरपंचाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजित औरंगाबाद पंचायत समितीची आमसभा प्रश्नांच्या भडिमाराने गाजली. या सभेत बोलताना लायगाव येथील महिला सरपंचाने उपसरपंचाकडून मारहाण व शिवीगाळ होत असल्याची तक्रार केली.
मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात दुपारी २ वाजता सभा सुरू झाली. पंचायत समिती सभापती तारा उर्किडे, उपसभापती कविता राठोड, जिल्हा परिषद सदस्य बबनराव कुंडारे, रेणुका शिंदे, मीना शेळके, रामकिसन भोसले, अर्जुन शेळके, अनुराग शिंदे, रमेश पवार, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, गटविकास अधिकारी व्ही. के. हरकळ उपस्थित होते. प्रारंभी २०१५-१६ च्या आमसभेच्या कार्यवृत्तांताचे वाचन झाले. अनुपालन अहवाल सादर झाल्यानंतर २०१६-१७ मध्ये राबविलेल्या विविध योजनांची माहिती व २०१७-१८ साठी नऊ लाखांचे मूळ अंदाज पत्रक सादर झाले. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
गावातील प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून सरपंच, सदस्यांनी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने अध्यक्ष बागडे यांनी एकाएकाने मुद्दे मांडावेत, शक्यतो आधीच लेखी प्रश्न दिले असते तर त्यांची सोडवणूकीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असते, असे नमूद केले. पण,अनेक जण ऐकण्याच्या मनस्थिःतीत नव्हते. त्यामुळे बागडे यांनी काही प्रश्नांची सोडवणूक केल्यानंतर अध्यक्षीय समारोपाचे भाषण केले. बोलण्यास संधी न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गांधेली येथील राहुल सावंत यांनी बोलू दिले जात नसेल तर सभा कशासाठी घेतली, असा सवाल करत निषेध केला. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनीही व्यासपीठावरुन याबाबत नाराजी व्यक्त करत निषेध केला. भाजपचे कल्याण गायकवाड यांनी निषेध करणाऱ्यांचा निषेध केला.

मारहाणीचा आरोप

लायगाव येथील महिला सरपंचाने उपसरपंचाकडून मारहाण व शिवीगाळ होते, त्रास दिला जातो, असा आरोप सभेत केला. मला भाऊ नाही, असे म्हणत त्या महिलेने न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर गावातील वाद हा गावपातळीवर मिटविण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी दिला.

तर निलंबित करा

वरझडी येथील विजेच्या तारा लोंबकळत असल्याचा मुद्दा काहींनी उपस्थित केला. त्यावर काम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच बागडे यांनी अधिकाऱ्यांनी सभेनंतर प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल द्यावा, काम झाले असा चुकीचा अहवाल संबंधित कर्मचाऱ्याने दिला असेल, तर दोषींना निलंबित करा, असे निर्देश दिले. पीरवाडी येथील शाळा खोलीचे बांधकाम आमदार निधीतून करू, असे एका प्रश्नांवर बोलताना नमूद केले. यासह पाणी पुरवठा, रस्ते आदी विविध प्रश्न या सभेत उपस्थित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना हटविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनीअरिंग कॉलेजातील कॉपी प्रकरणात टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अभियांत्रिकी कक्षातील सात कर्मचाऱ्यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. या कर्मचाऱ्यांची विद्यापीठातील इतर विभागात बदली झाली आहे. कॉपी प्रकरणात नाहक आरोप होत असल्यामुळे दुसऱ्या विभागात बदली करण्याची मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती, पण त्यापूर्वीच कुलगुरुंनी त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता.
अभियांत्रिकीच्या परीक्षेत काही महाविद्यालये आणि परीक्षा विभागातील कर्मचारी संगनमताने गैरप्रकार करीत असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून करण्यात येतो. काही कर्मचारी अनेक वर्षे त्याच विभागात ठाण मांडून बसल्यामुळे बदली करण्याची मागणी संघटनांनी केली होती. साई कॉलेजच्या कॉपी प्रकरणातनंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी प्रमुख कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. एकूण सात कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बदल्यांचा निर्णय प्रलंबित होता. या निर्णयाची अंमलबजावणी केली असे चोपडे यांनी स्पष्ट केले.

बदली झालेले कर्मचारी
परीक्षा व मूल्यमापन विभागातील अभियांत्रिकी कक्षातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात कक्ष अधिकारी डॉ. पी. एस. पडूळ, एन. एम. तुपे (वरिष्ठ सहायक), डी. एन. बकले (वरिष्ठ सहायक), ए. जी. मानपुरे (वरिष्ठ सहायक), एस. बी. चव्हाण (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), पी. बी. निकाळजे (वरिष्ठ सहायक) व अब्दुल रिझवान (कनिष्ठ सहायक) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images