Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घोटाळ्याचे पाच लाख भरण्यासाठी महिलेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कंपनीत काम करताना केलेल्या गैरव्यवहाराची पाच लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी विवाहितेचा छळ होत असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. हे पैसे माहेरातून आणण्यासाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना आळंजकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे ११ मे २०१४ रोजी गांधीवाडी रांजनखोल (ता. श्रीरामपूर) येथील विशाल आळंजकर याच्यासोबत लग्न झाले आहे. लग्नानंतर चार-पाच महिने सासरी चांगले वागवण्यात आले. विशाल हा एका दूध डेअरी कंपनीत सिव्हिल इंजिनीअर होता, त्याने कंपनीत गैरव्यवहार केला. त्याची भरपाई करण्यासाठी माहेरातून पाच लाख रुपये आणण्यासाठी छळ करण्यात आला. सासुने कल्पनाला हाकलून लावून दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. सासरी कल्पना यांना शिविगाळ, मारहाण करण्यात आली. गावातील ज्येष्ठांनी मध्यस्‍थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही कल्पना यांना मारहाण सुरूच राहिली. या छळाला कंटाळून कल्पना आळंजकर यांनी तक्रार दिली. त्यावरून विशाल नारायण आळंजकर, नारायण आळंजकर, अनसुया आळंजकर, वनिता रामहरी उगले, स्वाती योगेश आळंजकर आदींवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लोड तालुक्यात पाऊस आठवड्यापासून गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यात पावसाने एक आठवड्यापासून दीड मारली आहे. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन-चार दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
सिल्लोड तालुक्यात मान्सूनपूर्व व मृग नक्षत्रातील पाऊस पडला. आतापर्यंत १४० मिमी पाऊस झाला आहे. ७ जूननंतर एक, दोन वेळआ पाऊस पडल्याने मृगाची पेरणी साधण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. तालुक्यात सर्वदूर सारखा पाऊस पडलेला नाही. पण, जमिनीत कमी ओल असतानाही पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांना पेरणी केली. मात्र, एक आठवड्यापासून पाऊस गायब झाला आहे. दररोज कडाक्याचे ऊन पडत असून प्रचंड उकाडा आहे. पण, पाऊस चकमा देत आहे. वाढत्या उन्हामुळे कोंब फुटणाऱ्या पिकांनाही माना टाकल्या आहे. पेरणी केलेल्या मका, सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, मूग, मान्सूनपूर्व लागवड केलेली मिरची यांना सध्या पाण्याची गरज आहे. हे पीक बाळसे धरण्याच्या स्थितीत असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवाददिल झाले आहेत. अजिंठा, शिवना, अंभई परिसरात केलेली धूळपेरणी धोक्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्याने मोठा खर्च करून जमिनीच्या पोटात बियाणे पेरले आहे. येत्या दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतीचे गणित बदलणार आहे.
कापूस पिक उगवत असताना ते तरारून वर येण्यासाठी दमदार पावसाची गरज असते. पण, पावसाने दडी मारल्याने कापूस उगवण्यास बाधा येत आहे. यामुळे कपाशीत मोठ्या प्रमाणात तुटा पडत आहे. परिणामी, तुटा पडलेल्या ठिकाणी पुन्हा कापूस लागवड करावी लागणार आहे. पावसाअभावी मका पिकात किडे झाले असून पाऊस झाल्यात ते नष्ट होतील. मका पिकातही तुटा दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यात उघडीप; शेतकरी हवालदिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
मृग नक्षत्रात फक्त तीन वेळेस पडलेल्या जोरदार पावसामुळे गेल्या रविवारपर्यंत तालुक्यात ७५ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. पण, गुरुवारपासून पावसाने खंड दिल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत.
या वर्षी तालुक्यातील शेतकरी कापूस पिकाकडे वळला असल्याने मका, अद्रक, तूर या पिकांच्या क्षेत्रात घट दिसत आहे. तालुक्यातील आठ मंडळात १० जून रोजी ४०.३७ मिमी, १२ जून रोजी १९.६२ मिमी व १५ जून रोजी २०.६२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस देवगाव रंगारी महसूल मंडळात व सर्वात कमी पाऊस करंजखेड महसूल मंडळात झाला. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ जूनपर्यंत तालुक्यात ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपासाठी असलेल्या ९३ हजार ८२१ हेक्टरपैकी सुमारे ७० हजार ३६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. प्रामुख्याने कापसाच्या ५१ हजार ५६५ पैकी ४० हजार हेक्टर, मका २५ हजार ८१४ हेक्टर पैकी १९ हजार हेक्टर, तूर ४ हजार पैकी ३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

अद्रकमध्ये घट
कन्नड तालुका अद्रक लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच अद्रक लागवडीस उशीर व मोठी घट दिसून येत आहे. आठवड्यात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती सदस्याचे अपहरण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

आर्थिक व्यवहारातील बाकीवरून बीड पंचायत समितीच्या सदस्यांचे अपहरण केल्याची घटना बीडमध्ये सोमवारी रात्री घडली. मात्र, पोलिसांनी मंगळवारी पहाटे पाठलाग करत, या सदस्याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात एक आरोपी हाती लागला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
बबन माने सदस्य असे या पंचायत समिती सदस्याचे नाव असून, ते बीड तालुक्यातील लिंबागणेश गणाचे सदस्य आहेत. बीड शहरातील पालवण चौक भागातून सोमवारी सायंकाळी सात वाजता त्यांचे अपहरण करण्यात आले. माने यांनी दुष्काळात जनावरांसाठी छावणी सुरू केली होती. या छावणीच्या व्यवहारात काही जणांशी देणे बाकी होते. या बाकी संदर्भात वारंवार त्यांच्याकडे पैशाची मागणी होत होती. लाखो रुपयांच्या व्यवहारावरून माने यांचे अपहरण केल्याचे समोर आले असून, माने यांना वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या अपहरणाचा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
माने दररोज सायंकाळी पालवण चौकात फिरायला जातात. ही गोष्ट लक्षात घेऊन आरोपींनी सोमवारी सायंकाळी त्यांचे अपहरण करण्याचा कट रचला. पांढऱ्या रंगाच्या जीपमधून चार ते पाच जण तिथे आले आणि त्यांनी माने यांना मारहाण करून जीपमध्ये टाकले. आरोपी त्यांना धानोरा रोडकडे घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. अधीक्षक जी. श्रीधर यांनी यंत्रणा कामाला लावून जिल्हाभर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाटोदा पोलिसांनी शंभर चिरा व शहरातील शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी लावली होती. रात्री पावणे बारा वाजता पांढरी जीप शिवाजी महाराज चौकात आली. चालकाने ब्रेक लावला अन् पोलिसांना हुलकावणी देऊन गाडी वेगाने पुढे निघून गेली. संशयावरून नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी या गाडीचा दुचाकीवरून पाठलाग केला. चालकाने जीप खर्डा रस्त्याने वळविली. जामखेड तालुक्यातील डिघोळ येथे अखेर पोलिसांनी जीप अडवली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन जीपमधील तिघे जण पळून गेले. जीपमधील एकमेव आरोपी महादेव दहिफळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरण आणि मारहाण झालेले माने प्रचंड घाबरले होते. पाटोदा पोलिसांनी आरोपी दहिफळे व अपहृत माने यांना गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.

छावणीच्या व्यवहारातून कट
आरोपीला ताब्यात घेतल्यानंत पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीअंती माने यांचे पैशाच्या कारणावरून अपहरण झाल्याचे उघडकीस आले. आरोपींच्या ताब्यातील जीपमध्ये (एमएच ४४ २३५७) धारदार शस्त्रे आढळून आली. छावणीच्या व्यवहारातील पैसे मिळत नसल्याने महादेव दहिफळे यास माने यांच्या अपहरणाची सुपारी दिली गेली असावी, असे चौकशीत पुढे आले. या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ हजारांचे रेशनचे धान्य वेरूळमधून जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
कसाबखेडा येथील स्वस्त धान्य दुकानदार सुनील अमोलकचंद पांडे याने स्वतःच्या फायद्यासाठी वेरूळ येथील शेख युनूस ऊर्फ डकार शहा यांच्या घरात साठवलेले ४२ हजार ५६५ रुपयांचे धान्य खुलताबाद पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी सुनील पांडे व शेख युनूस या दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांना वेरूळ येथील युनूस शहा ऊर्फ डकार शहा याच्या घरात कसाबखेडा येथील स्वस्त धान्य दुकानदार सुनील पांडे याने स्वतःच्या स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ, साखर साठवली असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तहसीलदारांना पत्र लिहून या ठिकाणी छापा मारला. या कारवाईत ३१ गोण्या धान्य सापडले. या गोण्यांची पाहणी केली असता त्यावर गव्हर्मेंट ऑफ हरियाना (एस. सी. आय.),असे इंग्रजीत लिहिलेले आले. पोलिसांनी ४५ किलो वजनाच्या गव्हाच्या ३० गोण्या एकूण १३५० किलो (२० हजार २५० रुपये), ४५ किलो वजनाच्या तांदळाच्या ३२ गोण्या तांदळाने एकूण १४५० किलो (१७ हजार २८० रुपये) साखरेच्या ५० किलोच्या दोन गोण्या व ३५ किलोची एक गोणी एकूण १३५ किलो (४७२५ रुपये) ३१ रिकामे पोते (३१० रुपये), असा ४२ हजार ५६४ रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई नायब तहसीलदार मोहनलाल हरणे व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार एस. बी. पंडुरे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हेड कॉन्स्टेबल पी. बी. तांबे, बाबासाहेब थोरात, हनुमंत सातपुते, विष्णू चव्हाण यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत हे तपास करीत आहेत. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानदार सुनील अमोलकचंद पांडे (वय ४८, रा. कसाबखेडा) व शेख युनूस ऊर्फ डकार शहा (रा. वेरूळ) या दोघांना एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅथॉलॉजिस्ट मुंबईत; सह्या जालना, जळगावच्या रिपोर्टवर!

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
औरंगाबाद ः एकीकडे डॉक्टरांच्या ‘कट प्रॅक्टिस’विरोधात राज्य सरकार कायदा करण्याचा विचार करत आहे, तर दुसरीकडे राज्यभरातील रुग्णांना सर्व अत्याधुनिक लॅबच्या सेवा देण्याचा करार झालेल्या ‘एचएलएल’कडून व ‘सार्वजनिक आरोग्य विभागा’आडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. पॅथॉलॉजिस्टच्या उपस्थितीतच सर्व चाचण्या होणे अनिवार्य असताना पॅथॉलॉजिस्ट मुंबईत, तर त्याच पॅथॉलॉजिस्टच्या सह्या जालना व जळगावच्या रिपोर्टवर वापरल्याचे ‘मटा’कडे प्राप्त झालेल्या रिपोर्टवरून उघड झाले आहे.
राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सर्व रुग्णांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक लॅबच्या चाचण्यांच्या सेवा देण्यासाठी ‘एचएलएल लाइफकेअर लिमिटेड’ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा राज्य सरकारशी काही महिन्यांपूर्वी करार झाला आहे. या करारानुसार ‘एचएलएल’मार्फत राज्यातील सुमारे ३३ जिल्ह्यांमध्ये छोट्या-मध्यम-मोठ्या प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. आतापर्यंत १५ जिल्ह्यात या सेवा कार्यरत झाल्या आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गोरेगाव (मुंबई) येथील एकाच पॅथॉलॉजिस्टच्या सह्या जालना व जळगावच्या रिपोर्टवर आढळून आल्या आहेत व हे रिपोर्ट ‘मटा’च्या हाती लागले आहेत. सद्यस्थितीत सर्व १५ जिल्ह्यातील रिपोर्टवर याच एकमेव पॅथॉलॉजिस्टच्या सह्या असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ‘एमसीआय’च्या नियम-निकषांनुसार आणि राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार, कुठल्याही प्रयोगशाळेत पॅथॉलॉजिस्टच्या प्रत्यक्ष (फिजिकल प्रेझेन्स) मार्गदर्शनाखालीच सर्व सँपलवर प्रक्रिया होणे, चाचण्या होणे अपेक्षित आहे व रिपोर्ट देण्याआधी संबंधित पॅथॉलॉजिस्टने चाचण्यांची प्रक्रिया तपासणे आवश्यक आहे. मात्र जालना व जळगावमध्ये सुमारे १५० किलोमिटरचे अंतर असताना मुंबईतील पॅथॉलॉजिस्टच्या सह्या सर्रास वापरल्याचे स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच १५ जिल्ह्यातील रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

करारामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, याचा तपास करणार असून, ‘एचएलएल’ने नियमांचे उल्लंघन केले असल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. सतीश पवार, संचालक, सर्वजनिक आरोग्य विभाग

‘एमसीआय’नुसार पॅथॉलॉजिस्टच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच सर्व चाचण्या झाल्या पाहिजेत व कोणताही रिपोर्ट देण्याआधी संबंधित पॅथॉलॉजिस्टने चाचण्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. कोणत्याही रिपोर्टची शेवटची जबाबदारी संबंधित पॅथॉलॉजिस्टचीच आहे. दिल्लीतील २० सेंटरमध्ये एकाच पॅथॉलॉजिस्टच्या सह्या असलेल्या पॅथॉलॉजिस्टवर कारवाई झाली आहे व अशा कारवाया मुंबईतही झाल्या आहेत.
- डॉ. शिवकुमार उत्तुरे, माजी एमएमसी सदस्य व राज्य आयएमएचे कोषाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरात होणार २८ कोटी रुपयांचे रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
बजाजनगरातील रस्त्यांच्या विकास कामाचा सपाटा एमआयडीसीने लावला आहे. यापूर्वी सुरू असलेल्या मुख्य रस्त्यासोबतच बजाजनगरातील अंतर्गत १७ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यात चिंचबन कॉलनी व अल्फन्सा शाळेजवळील नाल्याच्या विकास कामाचा समावेश आहे.
वाळूज एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर बजाजनगर ही निवासी वसाहत वसवण्यात आली. त्यावेळी नवीन रस्ते बांधले होते. त्यानंतर केवळ डागडुजी करण्यात येत होती. गेल्या ३० वर्षांत रस्त्याची चाळणी झाल्याने रस्त्याची कामे करण्याची मागणी होत होती. बजाजनगरातील एकूण २२ किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या. त्यापैकी ५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पावणे चार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. उर्वरित १७ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच पार पडली. या कामावर २७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या निधीत बजाजनगर भागातील अर्धवट असलेल्या नाल्याचा कामाचा व अल्फोन्सा शाळेजवळील नाल्याचा कामाचा समावेश आहे. एमआयडीसी प्रशासनाच्या या निर्णायामुळे बजाजनगरातील नागरिकांना गुळगुळीत रस्ते मिळणार आहेत. पण, ही कामे दर्जेदार करावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई कॉलेजचे प्रवेश थांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सामूहिक कॉपीप्रकरणी साई इंजिनीअरिंग कॉलेजची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाला विद्यापीठाने माहिती दिली असून, अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेतून साई कॉलेज वगळले आहे. कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याबाबत बुधवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेजचे सामूहिक कॉपी प्रकरण राज्यभर गाजत आहे. याप्रकरणी ३१ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजचे प्राचार्य व उपप्राचार्य कारागृहात असून, पोलिस तपास सुरू आहे. साई कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करून कॉपीच्या गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. यावर विद्यापीठ प्रशासनाने डॉ. एम. डी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. या समितीने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना चौकशी अहवाल सादर केला. या अहवालावर विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. दिलीप खैरनार, डॉ. मजहर फारुकी, डॉ. संजय साळुंके आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर उपस्थित होते. विद्यापीठातील विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. साई कॉलेजचे सामूहिक कॉपी प्रकरण बैठकीचा मुख्य मुद्दा होता. विद्यापीठाची प्रतिमा डागाळण्याचे काम कॉलेजमधील गैरप्रकाराने झाले. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवण्याची कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला माहिती कळवली. सध्या अभियांत्रिकी शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, मात्र प्रक्रियेतून साई कॉलेज वगळण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने
तात्काळ निर्णय घेत वेबसाइटवरील यादीतून साई कॉलेजचे नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.

संलग्नीकरण रद्द?
साई कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावर बुधवारी शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे. संलग्नीकरण रद्द झाल्यानंतर कॉलेजचे विद्यार्थी इतर कॉलेजात समाविष्ट करण्यात येणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने साई कॉलेजचे संलग्नीकरण काढण्यासाठी मार्गदर्शन मागवले होते. विधिज्ञांशी चर्चा केल्यानंतर संलग्नीकरण रद्द करण्यावर विद्या परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माहिती पुस्तिकांचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन नोंदणीसाठी शाळांमध्ये गर्दी केली. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत माहिती पुस्तिका अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याने शाळा आणि झोन सेंटरमध्ये धावपळ उडाली आहे. शिक्षण विभागाने मंगळवारी प्रवेशाचा आढावा घेऊन शिल्लक माहिती पुस्तिका परत करण्याचे शाळांना आदेश दिले. सायंकाळपर्यंत ११ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी शहरात ऑनलाइन अर्ज सादर केले होते.
औरंगाबाद शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. प्रथमच होत असलेल्या प्रक्रियेत शिक्षण विभागाने नियोजन करूनही अनेक त्रुटी समोर येत आहेत. माहिती पुस्तिका संपल्याने मंगळवारी विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. ऑनलाइन प्रक्रिया नऊ जूनपासून सुरू झाली असून, २७ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत आहे. त्यासाठी शहरात पाच ठिकाणी झोन सेंटर उभारण्यात आले आहेत. प्रवेशासाठी नोंदणी शाळा स्तरावर सुरू आहे. मागील दोन दिवसांत माहिती पुस्तिकांचा तुटवाडा जाणवत असल्याने काही शाळां व झोन सेंटरने विभागाकडे पुस्तिकांची मागणी केली आहे. शाळानिहाय ऑनलाइन प्रवेशाचा आढावा घेण्याचे काम मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. त्यात माहिती पुस्तिका किती घेतल्या, प्रवेश किती झाले, किती पुस्तिकांची गरज आहे, किती शिल्लक राहतील, किती विद्यार्थ्यांची नोंदणी झाली, किती विद्यार्थी नोंदणी व्हेरिफाय केली आदी आढावा घेण्यात आला. त्यानंतर शिल्लक पुस्तिका आज त्वरित केंद्रावर परत करण्यात आल्या. अद्याप प्रक्रिया पूर्ण न झालेली नाही. शहरात १०४ कॉलेजांमध्ये २२ हजार ९४० जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाने २५ हजार पुस्तिका वाटप केल्या. वाटप झाल्यानंतर मागणी वाढल्याने शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे. शाळा, सेंटरवर मंगळावारी काही विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकेविना परतावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

११ हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी
९ जूनला ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झालीतरी, राज्यमंडळाने दहावीचा निकाल १३ जून रोजी जाहीर केला त्यानंतरच प्रवेश प्रक्रियेला गती आली. विद्यार्थ्यांना २३ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. त्यानंतर झोन सेंटरवर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाला नियोजन करावे लागणार आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी सायंकाळपर्यंत ११ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी ऑनलाइन नोंदणी केली.

शहरात कॉलेज ः १०४
प्रवेश क्षमता ः २२९४०

शाळांना गरजेपेक्षा अधिक माहिती पुस्तिका दिल्या आहेत. त्यांकडून शिल्लक पुस्तिका परत मागविल्या आहेत. त्या गरज असेल तेथे पोचविल्या जात आहेत. गरज पडली, तर शिक्षण विभाग नवीन पुस्तिकांची तजवीज करेल.
- वैजनाथ खांडके, उपसंचालक, शिक्षण विभाग, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नव्या नियमांचा खातेदारांना भुर्दंड

$
0
0

नव्या नियमांचा खातेदारांना भुर्दंड

स्टेट बँकेने खात्यावरील व्यवहारांवर आकारला दंड, नियमच माहित नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्टेट बँकेसह बहुतांश बँकांनी खातेदारांच्या खात्यांवर काही रक्कम नावे (डेबिट) टाकून सरळसरळ दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. या दंड वसूल केल्याची माहिती खातेदारांना आपले पासबुक अपडेट केल्यानंतरच मिळत आहे. आपल्याच खात्यावरील विविध व्यवहारांवर लागत असलेला दंड, त्यासंदर्भातील माहितीच नसल्याने गोंधळात भर पडत आहे.

नव्या आर्थिक वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. मात्र याची कोणतीही कल्पना नसल्याने खातेदार गोंधळात पडले आहेत. स्टेट बँकेच्या नियमानुसार महानगर क्षेत्रातील ग्राहकांना कमीत कमी ५ हजार, शहरी भागातील ग्राहकांना ३ हजार आणि निमशहरी भागातील ग्राहकांना २ हजार आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना १ हजार रुपये खात्यात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. खात्यात ही ठराविक रक्कम नसेल तर दंड आकारला जात आहे. तसेच एका महिन्यात तीनपेक्षा जास्त वेळा खात्यावर व्यवहार केला तरीदेखील बँकेकडून ५० रुपये दंड आकारला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे यात केवळ खात्यातून पैसे काढणे हा व्यवहार गृहित धरलेला नसून तुमच्या खात्यात तीन वेळापेक्षा जास्त वेळेस पैसे भरले तरीही हा दंड पडणार आहे.

एसबीआयचे नवे नियम

१) स्वत:च्या अकाऊंटमध्ये ३ वेळा पैसे भरण्याची किंवा काढण्याची मुभा आहे. यानंतर प्रत्येक व्यवहारावर ५० रुपये द्यावे लागतील.

२) ग्राहक मेट्रोसिटीत असेल तर त्याने खात्यामध्ये कमीतकमी ५ हजार रुपये ठेवणे आवश्यक असेल. जर ग्राहक शहरी भागात राहणारा असेल तर त्याने ३ हजार रुपये खात्यात कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे.

३) निमशहरी भागातील खातेदार असेल तर कमीतकमी २ हजार रुपये खात्यात ठेवणे आवश्यक आहे.

४) ग्रामीण भागातील खातेदार असल्यास कमीतकमी १ हजार रुपये खात्यात ठेवणे आवश्यक आहे.

५) हे नियम न पाळल्यास खातेदारास दंड म्हणून २०० रुपये द्यावे लागतील. याशिवाय तुम्ही तुमच्या खात्यात आवश्यक असलेले पैसे ठेवणार नाही तोपर्यंत हा दंड वाढत जाईल. याला सबचार्जेस असे संबोधण्यात आले आहे.

६) महिन्यातून केवळ ५ वेळा एटीएमचा वापर मोफत करू शकता. त्यापेक्षा अधिक वापर झाला तर प्रत्येक प्रत्येक व्यवहारावर २० रुपये लागतील.

७) इतर बँकांचे एटीएम एसबीआय एटीएमवर वापरल्यास तेही जास्तीत जास्त ३ वेळा वापरता येईल. त्यानंतर प्रत्येक व्यवहार २० रुपये लागतील. एसबीआय खातेदाराने मर्यादेपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यातही सर्व्हिस टॅक्स वेगळा भरावा लागेल. ४ व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर एसबीआय ग्राहकाने इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत.

८) जर महिन्यातून अनेकदा एसबीआयचे एटीएम वापरण्याची तुमची इच्छा असेल तर खात्यात कमीत कमी २५ हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे.

९) जर महिन्यातून अनेकदा एसबीआय आणि एसबीआय व्यतिरिक्त सर्वच एटीएमचा वापर करणार असाल तर तर खात्यात कमीतकमी एक लाख रुपये ठेवणे आवश्यक आहे.

१०) बँक एसएमएस सेवा देते. ही सेवा देताना तीन महिन्यांत १५ ते १७ रुपये कापण्यात येतात. जर ही सेवा मोफत हवी असेल तर खात्यात कमीतकमी २५ हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे.

११) स्टेट बँकेत फटाक्या नोटा, खराब नोटा जमा करतानाही चार्जेस लागणार आहेत. ५ हजार रुपयांच्या नोटा बदली करताना २ ते १० रुपये व त्यावर सर्विस टॅक्स द्यावा लागणार आहे. फाटलेल्या, कापलेल्या आणि गळालेल्या नोटा बदलण्यासाठी एसबीआय ५ रुपयांपर्यंत चार्ज लावणार आहे. २० हून अधिक नोटा किंवा ५००० रुपयांहून अधिक रक्कमेच्या फाटलेल्या नोटा बदलताना हे दर आकारले जाणार आहेत. एखाद्या ग्राहकाने २० नोटांपर्यंत बदलण्यासाठी आणलेल्या असतील आणि त्या नोटांची एकूण किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी असल्यास दर लागणार नाही. तसेच ती रक्कम ५ हजार रुपयांच्या आत असल्यास आणि नोटांची संख्या २० हून अधिक असल्यास प्रत्येक जास्तीच्या नोटवर २ रुपयांप्रमाणे दर आकारला जाणार आहे. यासोबतच, ग्राहकांवर सर्व्हिस टॅक्स अतिरिक्त लावले जातील. नोटा २० हून अधिक आणि रक्कमही ५००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास प्रत्येक जास्तीच्या नोटवर ५ रुपये आकारले जाणार आहेत.

१२) स्टेट बँकेतून खात्यातून व एटीएममधून तीन वेळा पैसे काढणे मोफत असेल. यानंतर ५० रुपये प्रत्येक व्यवहारासाठी लागतील.

१३) डेबीट कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास त्यावरही चार्जेस लागणार.

१४) डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड रिलीज करताना व्हिसा आणि मास्टरकार्ड ग्राहकांना देतानाही त्यावर सेवा चार्जेस लागणार, पण रूपे कार्ड मोफत दिले जाईल. त्यावर कोणताही चार्ज लागणार नाही. आतापर्यंत प्रत्येक खात्यासाठी मोफत दिले जाणारा एटीएम डेबिट कार्ड यापुढे घेण्यासाठी एसबीआय पैसे घेणार आहे. बँका हा नियम सामान्य बचत खाते धारकांना सुद्धा लागू आहे. बँकांकडून रुपे कार्ड मोफत दिले जाईल. या व्यतिरिक्त मास्टर किंवा व्हिसा डेबिट कार्ड घेण्यासाठी ग्राहकांकडून पैसे उकळणार आहे.

१५) स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत पीओएस मशीनद्वारे पैसे काढले तरीही चार्जेस लागणार आहेत.

१६) स्टेट बँकेने लॉकर भाडेही वाढवले आहे. एक वर्षात लॉकर वापरण्यावरही मर्यादा घातल्या आहेत. १२ वेळा उपयोग केला तर १०० रुपयांसहित सर्विस टॅक्स वेगळा द्यावा लागणार आहे.

१७) चेकबुक (धनादेश पुस्तक) वापरतानाही वर्षभरात ५० चेक्स मोफत आहेत. त्यानंतर प्रत्येक चेकला ३ रुपये द्यावे लागणार आहे. याशिवाय २५ पानी चेक बुक करता ७५ रुपये व स‌‌र्विस टॅक्स भरणे आवश्यक केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त एसीतील भाषणाने वृक्ष लागवड होणार ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वृक्षारोपणाचे आवाहन करून भाषण संपवत असतानाच विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका शेतकऱ्याने एसीत भाषण करून काय उपयोग, असे म्हणत चांगलेच खडसावले. ‘अंकुर रोपवाटिकेसाठी वर्षभरापासून प्रस्ताव पडून आहे, त्यावर अधिकारी काहीच बोलत नाहीत, नुसते भाषण करून काय उपयोग,’ असा सवाल त्याने केल्याने सभागृहातील सर्वच आश्चर्याचकीत झाले.
वन विभागामार्फत मंगळवारी संत तुकाराम नाट्यगृहात बांबू शेतीपूरक व्यवसाय, लागवड, उत्पादन, प्रक्रिया, बहुपयोगी व स्वयंरोजगारांच्या संधी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटननंतर विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी भाषण केले. वृक्ष लागवड कार्यक्रम, बांबू लागवड यासह उतर मुद्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. भाषण संपवून खुर्चीवर विराजमान होत नाहीत तोच परभणी जिल्ह्यातील विष्णू सोळुंके या शेतकऱ्याने, एसीत भाषण करून काहीच उपयोग होत नाही, वर्षापूर्वी दिलेल्या प्रस्तावावर शासकीय अधिकारी काहीच निर्णय का घेत नाही, शेतकऱ्यांचे भले कसे होणार, असा प्रश्न विचारला. या शेतकऱ्याने लालफितीशाहीबद्दल रोष व्यक्त केला. या प्रकारामुळे काही अधिकाऱ्यांनी सोळुंके यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेतली.

कारवाईचे आदेश
‍विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी या शेतकऱ्याच्या तक्रारीची व्यासपीठावरूनच दखल घेतली. हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे तर अन्य कोणाला काही प्रश्न असतील, तर ते समजावून घेऊन निकाली काढा, याची माहिती तातडीने सादर करा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वन विभागाची अंकुर रोपवाटिका गावात सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यावर एक वर्षांपासून निर्णय झालेला नाही. पाठपुरावा करूनही त्याबद्दल अधिकारी बोलत नाहीत. त्यामुळे भावना व्यक्त केल्या. विभागीय आयुक्तांनी लक्ष घातल्याने आता निर्णय लागेल. जिल्ह्यात एकाही प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
- विष्णू सोळुंके, शेतकरी, जि. परभणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सत्तारांच्या अटकेसाठी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
आमदार अब्दुल सत्तार यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरात भराडी चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.
भाजपतर्फे गोळेगाव येथे जळगाव- औरंगाबाद महामार्गावर, भोकरदन रस्त्यावरील पिंप्री फाटा, बनकिन्होळा येथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, शहराध्यक्ष विष्णू काटकर, राजेंद्र ठोंबरे, ठगण भागवत, कमलेश कटारिया, विनोद मंडलेचा, विजय वानखेडे, सचिन पाखरे, पुंडलिक खोमणे, अर्जुन गवळीकर, काकासाहेब फरकाडे, रावसाहेब फरकाडे, सुनील काळे आदींचा सहभाग होता. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना दिले.
फुले आंबेडकर विचार कृती समितीतर्फे दहिगाव घटनेप्रकरणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला. आमदार सत्तार यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर स्वार्थासाठी केला, त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे, असा आरोप करण्यात आला. ही जमीन महार हाडोळा असून जमिनीचे मालक भिकाजी राघोजी साळवे आहेत. ही जमीन मूळ मालकाला द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना देण्यात आले. या निदर्शनात अॅड. अशोक तायडे, प्राचार्य सुनील वाकेकर, दादाराव वानखेडे, प्रभाकर पारधे, बनेखान पठाण, पोपट पगारे, विनोद पगारे, कडुबा जगताप, अनिल खरात, प्रकाश शिंदे, सुखदेव जगताप, प्रकाश पवार आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ योगदिनानिमित्त शहरात योगदिंडीचे आयोजन

$
0
0

योगदिनानिमित्त शहरात योगदिंडीचे आयोजन

विविध शाळांचा सहभाग

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (२० जून) शहरात चार ठिकाणी योगदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध भागातील शाळांनी सहभाग घेतला.

विभागीय क्रीडा संकुल ते यशवंत कला महाविद्यालय या मार्गावरील योगदिंडीला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रणजित पवार, योगासनपटू आरती पाल यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. चिश्तिया पोलिक चौकी चौक ते बळीराम पाटील हायस्कूल मार्गावरील योगदिंडीस डॉ. राजेश गुजराती, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, प्राचार्य नारायण बाभुळगावकर, प्राचार्य उगलाल राठोड, उदय कहाळेकर, डॉ. संदीप जगताप, जयाजी पवार, वैभव दांडेगावकर, उमेश बडवे, अमृत बिऱ्हाडे, अशोक यादव, विवेक देशपांडे, प्रल्हाद राहेगावकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. पुंडलिकनगर चौक ते एमआयटी हायस्कूल या मार्गावर निघालेल्या योगदिंडीस प्रा. राकेश खैरनार, विजय पाटील, विजय सोनवणे, नरवडे, गुरूदीपसिंग संधू, सदानंद सवळे, भागवत गोरे, कैलास वाहुळे, गणपत पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

योगदिंडीत सोनामाता विद्यामंदिर, बळीराम पाटील हायस्कूल, मनपा शाळा एन-७, पद्मसिंग पाटील, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, रिव्हरडेल हायस्कूल, कर्मवीर शंकरसिंग नाईक हायस्कूल, सरस्वती भुवन हायस्कूल, आ. कृ. वाघमारे प्रशाला, शिशुविहार शाळा, शिवछत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध चौकांमध्ये योगासनाचे प्रात्यक्षिके सादर केली. चारही ठिकाणी निघालेल्या योगदिंडीच्या समारोप प्रसंगी योगाचे महत्त्व सांगण्यात आले.

योगदिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभागाचे कापसे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, उमेश बडवे, गुरूदीपसिंग संधू, संजय मुंडे, विनय राऊत, युवराज राठोड, कृष्णा केंद्रे, लाड, संजय रणदिवे, संध्या झोपे, पी. वाय. सरोटे, असोलकर, राकेश खैरनार, विजय सोनवणे, कैलास वाहुळे, भिकन आंबे, उमेश गुंजाळ, परळकर, चंद्रशेखर पाटील, उदय पंड्या, सदानंद सवळे, यशवंत लिमये, गणेश बेटुदे, सचिन बोर्डे, अक्षय बिरादार, विनोद दिंडोरे, दिनेश जायभाय आदींनी पुढाकार घेतला.

मुख्य सोहळा आज

जागतिक योगादिनानिमित्त बुधवारी (२१ जून) मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता होणार आहे. या प्रसंगी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिका शाळांचीही गगनभरारी

$
0
0

पालिका शाळांचीही गगनभरारी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यात जिल्हा परिषद शाळांनी गेल्या काही वर्षांत आघाडी घेतली आहे. त्या धर्तीवर शहरातील महापालिका शाळांनीही गगनभरारी घेतली आहे. विशेषतः चार वर्षांपासून निकालाचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत आहे.

औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ७२ शाळा आहेत. त्यापैकी १५ शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत. कम्प्युटर, इ लर्निंगद्वारे पालिका शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेतो. डिजिटल वर्ग, सेमी इंग्रजी, ज्ञानरचनावाद, शब्दांचे कार्ड, वाक्यांचे कार्ड तयार करून वाचन लेखन केले जाते. गणित पेटीचा उपयोग करून भूमिती अध्यापन केले जाते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली. पायाभूत चाचणी, संकलित चाचणीतून विद्यार्थ्यांचे टॅलेंट वाढल्याचे दिसून येते. किराडपुरा उर्दू नंबर १ शाळेत शिकलेली दोन मुले वकील, दहा मुली शिक्षक झाल्या. याशिवाय क्रीडा स्पर्धांमधून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. चिकलठाणा, नारेगाव (उर्दू), मुकुंदवाडी शाळांमधील विद्यार्थी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, सीए, इंजिनीअर, डॉक्टर आहेत.

मुकुंदवाडी शाळा प्रगत आहे. क्रीडांगण, वर्गखोल्या, कम्प्युटर, शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थी संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात खाजगी शाळांची प्रचंड स्पर्धा सुरू असताना पालिका शाळांमधून वाढणारी गर्दी निश्चितच दिलासाजनक आहे. हे करताना कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांच्या बाबतीतही पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. एक किंवा दोन शिक्षकी शाळांमधून विद्यार्थी कमी असतील तर या शाळा लगतच्या शाळेत संलग्नित केल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. बन्सीलाल नगरच्या शाळेतून शिकलेले विद्यार्थीही आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या हजारोंची बक्षीस योजना जाहीर केली गेली.

तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वाढावी, यासाठी बक्षिस योजना जाहीर केली. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखोंची बक्षीसे देण्यात आली. यामुळे पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द निर्माण झाली. त्याचा परिपाक म्हणून पालिका शाळांचा दहावीचा निकाल एकदम उंचावला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर पालिका आयुक्त असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी फायदेशीर ठरणारा गुणवत्ता कक्ष स्थापन केला होता. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत अद्ययावत माहिती संकलित होत होती. आता हा प्रकल्प बंद झाला आहे. हा कक्ष पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी भाऊ दीदी प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचा खूप फायदा झाला. भविष्यात पालिका प्रशासनाने शाळांना आणखी सुविधा पुरविल्या तर त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ ३९ शाळांमध्येच फुटबॉलचे मैदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक फुटबॉल स्पर्धेच्यानिमित्ताने क्रीडा विभागाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ६०० शाळांमध्ये प्रत्येकी पाच फुटबॉल वाटप करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४ हजार २७ शाळांपैकी अवघ्या ३९ शाळांमध्येच फुटबॉलचे मैदान असल्याचे आकडेवारी सांगते. या पार्श्वभूमीवर फुटबॉलचे ग्लॅमर निर्माण करण्याचे मोठे आव्हान क्रीडा विभागासमोर असणार आहे.
सतरा वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद प्रथमच भारताला मिळाले आहे. त्यानिमित्ताने क्रीडा विभागाने राज्यभर ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात ४ हजार २७ शाळांपैकी अवघ्या ३९ शाळांमध्येच फुटबॉलचे मैदान असल्याचे दिसून आले. औरंगाबाद शहरात ८६१ शाळा आहेत. फुटबॉलचे मैदान मात्र अवघ्या १६ शाळांमध्ये आहे. औरंगाबाद व गंगापूर या दोन तालुक्यांत प्रत्येकी सहा, कन्नड तालुक्यात तीन, पैठण व फुलंब्री तालुक्यांत दोन, खुलताबाद, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांत प्रत्येकी एक फुटबॉलचे मैदान आहे. ३९ शाळांमध्ये फुटबॉलचे संपूर्ण मैदान उपलब्ध आहे. फुटबॉलचे अर्ध मैदान असणाऱ्या शाळांची संख्या ३५ एवढी आहे. औरंगाबाद शहरात सहा, औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांत प्रत्येकी चार, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी तीन, पैठण, सोयगाव तालुक्यात प्रत्येकी दोन मैदाने आहेत. संपूर्ण मैदान व अर्ध मैदान केवळ ७४ शाळांत आहे.

स्पर्धांमध्ये तालुक्यांत कमी प्रतिसाद
क्रीडा विभागातर्फे आंतरशालेय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. तालुकास्तरीय शालेय फुटबॉल, जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धा अशा तीन फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जाते. चौदा, सतरा व एकोणीस अशा तीन वयोगटांत स्पर्धा घेतल्या जातात. २०१६-१७ या वर्षात या तिन्ही स्पर्धांमध्ये ३८९ शाळा सहभागी झाल्या होत्या. तालुकास्तरीय स्पर्धेत औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड, पैठण, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर व फुलंब्री या तालुक्यांत १२२ शाळांनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबाद शहरातील ९१ शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत औरंगाबाद शहरातील ८३ शाळेच्या संघांचा सहभाग होता. तिन्ही वयोगटात औरंगाबाद शहरात १७४ संघांचा सहभाग होता. औरंगाबाद शहर व तालुक्यातील शाळांचा तिन्ही वयोगटातील सहभाग ३८९ शाळांचा होता.

‘फुटबॉलविषयी आवड निर्माण होईल’
यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे म्हणाल्या, ‘६०० शाळांमध्ये प्रत्येकी पाच फुटबॉल वाटप करण्यात येणार आहेत. फुटबॉल खेळाची सुविधा नसलेल्या शाळांमध्ये फुटबॉलची आवड असणारे खेळाडू आहेत. अशा शाळांमध्ये फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमातून फुटबॉल खेळाचे आकर्षण वाढावे हा मुख्य हेतू आहे. स्पर्धांच्या आयोजनासाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता असते. सरावासाठी छोटे मैदानही पुरेसे असते. फुटबॉल खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंकरिता हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. शाळांचाही फुटबॉल खेळातील रुची वाढेल आणि भविष्यात फुटबॉलच्याही सुविधा शाळेत निर्माण होतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंग प्रवेशासाठी शुक्रवारी मार्गदर्शन

$
0
0

औरंगाबाद : इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेत पहिली फेरीसाठी विद्यार्थ्यांना २३ जुलैपासून ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. कॉलेजांची निवड, विषय आणि कट ऑफ कसा असेल, यांसह प्रवेश प्रक्रियेबाबत असलेल्या शंका, प्रश्नांची उत्तरे मिळावित म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे २३ जून रोजी मिशन इंजिनीअरिंगअंतर्गत ‘ऑप्शन फार्म’ कसे भरावेत, यावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक यांच्यासह प्रवेश प्रक्रियेतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
इंजिनीअरिंगच्या सुधारित प्रवेश प्रक्रियेत नोंदणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया संपली आहे. आता प्रत्यक्ष प्रवेश फेरीला सुरुवात होत आहे. ती प्रक्रिया कशी असेल, ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, कोणता अभ्यासक्रम चांगला, सीईटी स्कोअर चांगला आहे, पण निवड कशी करावी, विविध जागांचा तपशील, टीएफडब्ल्यूएस योजना काय, अशा विविध प्रश्नांची माहिती विद्यार्थी, पालकांना व्हावी म्हणून या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात शुक्रवारी (२३ जून) रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक डॉ. गोविंद संगवई हे मार्गदर्शन करणार आहेत.

मिशन इंजिनीअरिंग ‘ऑप्शन फॉर्म’ भरताना
- स्थळ ः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सभागृह, उस्मानपुरा
- तारीख ः २३ जुलै
- वेळ ः सकाळी ११ वाजता
- मार्गदर्शक ः सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, डॉ. गोविंद संगवई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात २६६ डॉक्टर बोगस

$
0
0


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात २६६ बोगस वैद्यकीय व्यावसायिक कार्यरत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या २६६ असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय व्यवसायाला अपात्र असणाऱ्या डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी समिती सदस्यांना दिले. ‘एमडी’ पात्रता धारक वैद्यकीय व्यावसायिकांनी कोणत्या विषयात ‘एमडी’ केले आहे, त्याचा स्पष्ट फलक लावावा, अशा सूचना बैठकीत त्यांनी दिल्या. बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी समितीच्या अशासकीय सदस्यांसह तालुका अरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

पोलिसांत दोन गुन्हे दाखल
बॉम्बे नर्सिंग अॅक्टअंतर्गत ३०५ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २०४ रुग्णालये नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. आतापर्यंत केवळ दोन वैद्यकीय व्यावसायिकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘भाभा ट्रॉन’साठी प्रतीक्षा ‘बंकर’ची

$
0
0

‘भाभा ट्रॉन’साठी प्रतीक्षा ‘बंकर’ची

२.६९ कोटींपैकी केवळ ४० लाखांचा निधी प्राप्त; उर्वरित सव्वादोन कोटींचा निधी मिळणार कधी?

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील आमखास मैदानासमोरील महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अस्सल भारतीय बनावटीचे ‘भाभा ट्रॉन-दोन’ हे खास उपकरण अलीकडेच दाखल झाले असून, हे उपकरण कार्यरत होण्यासाठी ‘बंकर’ची आवश्यकता आहे. मात्र, बंकरचे काम रखडले असून, २ कोटी ६९ लाखांपैकी केवळ ४० लाखांचा निधी राज्य सरकारकडून बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. उर्वरित सव्वा दोन कोटींचा निधी कधी मिळणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबईतील ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ने औरंगाबादच्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला आपले उपकेंद्र म्हणून जाहीर केले आहे आणि त्याचाच भाग म्हणून ‘टाटा हॉस्पिटल’कडून कॅन्सर हॉस्पिटलला ‘भाभा ट्रॉन दोन’ हे अस्सल भारतीय बनावटीचे उपकरण देण्यात आले आहे. ‘भाभा ट्रॉन’साठीच ‘बंकर’चे काम हॉस्पिटलच्या मागे सुरू आहे. अर्थात, ‘बंकर’चे काम अपेक्षेप्रमाणे रखडले आहे. २१ सप्टेंबर २०१६ रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ‘बंकर’च्या कामाचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी, सहा महिन्यात बंकरचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. मात्र, आठ महिने उलटूनही काम पूर्ण झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर ‘बंकर’साठीचा निधीदेखील रखडला आहे. एकूण २ दोन कोटी ६९ लाखांच्या निधीपैकी आतापर्यंत ४० लाखांचा निधी मिळाला असल्याचे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘बंकर’चे काम पूर्ण झाल्याशिवाय ‘भाभा ट्रॉन’ कार्यरत होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन काम जलद गतीने पूर्ण होण्याची गरज व्यक्त होत आहे.

अस्सल भारतीय बनावटीचे उपकरण

‘भाभा ट्रॉन-२’ हे अस्सल भारतीय बनावटीचे उपकरण असून, अणुउर्जा विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी) तंत्रज्ञानाखाली बंगळुरू येथील ‘पनाशिया मेडिकल टेक्नॉलॉजिस’ येथे ‘भाभा ट्रॉन’ची निर्मिती होत आहे. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’कडून आतापर्यंत देशभरात अशी १० ते १२ उपकरणे विविध रुग्णालयांमध्ये देणगी स्वरुपात देण्यात आली आहे. विदेशातही ८ ते ९ उपकरणे देण्यात आल्याचे ‘टाटा’ शैक्षणिक संचालक डॉ. कैलाश शर्मा यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील रस्ता नव्हे अडथळ्यांचा मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
येथील संभाजी चौक ते अहल्यादेवी होळकर चौक या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे हा रस्ता नसून, अडथळ्यांचा मार्ग बनला आहे. विशेष म्हणजे सातारा प्रभाग कार्यालयाकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. गेल्या वर्षी मुरूम टाकून खड्डे बुजवलेले खड्डे नुकत्याच झालेल्या पावसाने उघडे पडले आहेत.
या रस्त्याचे २०१२ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत डांबरीकरण झाले होते. सातारा गाव, तांडा, श्री विसर्जन विहीर, मनपा प्रभाग कार्यालय, भारत बटालियन, इंजिनीअरिंग कालेज, खंडोबा मंदिर, जिल्हा परिषध शाळा आदींना जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे सर्वात जास्त रहदारी याच रस्त्यावरून होते. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. एकता कालनीजवळील पुलावर नेहमी पाणी साचते. त्यामुळे स्कूल बस, बटालियनची वाहने व गावकऱ्यांना जाताना कसरत करावी लागते. श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनस्वार घसरून पडण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षी मनपाने खड्डे बुजवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात मुरूम टाकला. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने तो वाहून केला. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे अवघड झाले आहे. विद्याथ्यांना शाळेत सोडणे पालकांना अवघड झाले आहे.
-राहुल शिंदे

रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाइन गेलेली आहे. तसेच वाहतुकीला अडथळा करणारे महावितरणचे खांबही आहेत. दोन्ही तातडीने हललावेत.
-रमेश बाहुले

पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात होतात. तसेच दुर्गंधी पसरून आजारांनाही निमंत्रण मिळते. रस्ता मोठा करावा.
-सोमीनाथ शिराणे

या रस्त्याच्या डांबरीकरणाचे इस्टिमेट तयार करून निविदा काढण्यासाठी दिलेले आहे. ते मंजूर झाले की डांबरीकरण करण्यात येईल.
-पी. जी. पवार, वार्ड अभियंता, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्लक्षामुळे खेळाडूंचा राज्याला रामराम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या बक्षीसाची रक्कम अजूनही प्रलंबीत असल्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी आहे. राज्य सरकार खेळांना प्रोत्साहन देत नसल्यामुळे राज्यातील तीसपेक्षा जास्त खेळाडूंनी कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांकडून खेळण्याला प्राधान्य दिले आहे.
राज्य सरकारने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी बक्षीसाची घोषणा केली होती. मात्र, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या १२३ खेळाडूंंचे सव्वा पाच कोटी रूपये राज्य सरकारकडे थकले आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या घोषणेनंतर हाती काहीच न आल्यामुळे खेळाडू नाराज आहेत.
केरळमध्ये २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चौथा क्रमांक मिळविला होता. यात २३ खेळाडूंना सुवर्ण, ४३ खेळाडूंना रौप्य आणि ५० जणांना ब्राँझ पदक मिळाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुवर्णपदक विजेत्याला पाच लाख, रौप्य पदक विजेत्याला तीन आणि ब्राँझ पदक विजेत्या खेळाडूला दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर संघाच्या प्रशिक्षकाला देखील दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार होता. सत्तांतरानंतर क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यात बक्षीसाची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली होती. या खेळाडूंमध्ये उस्मानाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेती सुप्रिया गाढवे आणि राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेती सारीका काळे यांचाही समावेश होता.
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने क्रीडामंत्री तावडे यांना रखडलेल्या बक्षीसाच्या रकमेविषयी नऊ स्मरणपत्रे दिली आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंतही पाठपुरावा करण्यात आला. मात्र, धोरणात काहीही फरक पडलेला नाही.

सरकार कुचकामी
दर्जेदार खेळाडू महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांना पर्याय देत आहेत. दोन वर्षांपासून त्यांच्या पारितोषिकाची रक्कम राज्य सरकार देऊ शकले नाही. मैदानात केवळ हजेरी लावणाऱ्यांना गुणदान करणाऱ्या क्रीडा संघटनांची कोट्यवधीमध्ये उलाढाल आहे. गुणांच्या घोळाची चौकशी करण्याची मागणी करूनही कारभारात फरक नाही. राज्याचे क्रीडा धोरण सक्षमपणे राबविण्यात कुचकामी ठरलेले असल्याची टीका महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे खजिनदार धनंजय भोसले यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images