Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधात समावेश करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील नोकर भरतीच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधात सध्या दैनिक वेतनावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश करा आणि आकृतीबंधाचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेत ठेवा, असे निर्देश महापौर भगवान घडमोडे यांनी प्रशासनाला दिले. या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे त्यांनी जाहीर केले.
महापालिकेच्या अस्थापनेवर १७९५ नवीन पदे भरण्याचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. ऐनवेळचा विषय मांडून आकृतीबंध मार्च महिन्यात मंजूर करून घेण्यात आला. आकृतीबंध मंजूर झाल्याचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दोन महिन्यानंतर कळाल्याने सर्वांनी या विरोधात आघाडी उघडली. परिणामी, मंजूर आकृतीबंधात सुधारणा करण्याचे आदेश महापौरांना द्यावे लागले. सुधारित आकृतीबंध गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा ऐनवेळचा विषय म्हणून मांडण्यात आला. त्याला एमआयएमच्या नगरसेविका समीना शेख यांनी आक्षेप घेतला. सर्वसाधारण सभा सुरू होण्याच्या दोन तास आधी हा विषय हाती पडल्याने त्यावर अभ्यास करण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी केली. काँग्रेसचे अफसर खान व भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी दैनिक वेतनावरील २०४ कर्मचाऱ्यांचा मुद्या उपस्थित केला. अन्य महापालिकेत आकृतीबंध करताना दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेचा आकृतीबंध करताना हीच पद्धत अवलंबली, अशी मागणी त्यांनी केली. दैनिक वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव, पद यासह सविस्तर आकृतीबंध करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशमुख यांनी पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
महापौरांनी ही बाब मान्य करून आकृतीबंधात दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांचा समावेश करा असे निर्देश दिले. आकृतीबंधावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा भागात साडेआठ कोटींतून नऊ रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई भागात साडेआठ कोटी रुपयांमधून नऊ रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. बीड बायपास रस्त्याला जोडणारे हे रस्ते असून त्यांच्या डांबरीकरणाचे काम लवकर सुरू केले जाणार आहे.
सातारा-देवळाई भागात बांधकाम परवानगी देताना सिडको प्रशासनाने विकास शुल्कापोटी नागरिकांकडून काही रक्कम वसूल केली होती. त्यापैकी साडेआठ कोटी रुपये आठ महिन्यांपूर्वी महापालिकेला मिळाले आहेत. या रक्कमेतून सातारा-देवळाई भागातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांनी मांडला होता. त्याला कैलास गायकवाड, कचरू घोडके यांनी अनुमोदन दिले. प्रस्तावावर चर्चा करताना भाजपचे राजू शिंदे यांनी सातारा-देवळाई भागातील रस्त्यांची आवश्यकता विषद केली. या भागात मोठी लोकवस्ती आहे व पक्के रस्ते असावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे सिडकोकडून मिळालेल्या निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे सिद्धांत शिरसाट यांनी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, अशी सूचना केली. त्याला नंदकुमार घोडेले व राजू वैद्य यांनी समर्थन दिले. अप्पासाहेब हिवाळे यांनी मात्र आक्षेप घेतला. साडेआठ कोटी रुपयांमध्ये दहा रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणे शक्य नाही, असे ते म्हणाले. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी एमआयटी कॉलेज ते सातारा गाव हा रस्ता साडेआठ कोटीतून वगळण्याची सूचना केली. ते म्हणाले, मी महापौर असताना या रस्त्यासाठी एक कोटींची तरतूद केली, आता कंत्राटदाराला वर्कऑर्डर देखील देण्यात आली आहे. एकाच रस्त्यावर पुन्हा खर्च करण्यापेक्षा त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचे काम करा. महापौर भगवान घडमोडे यांनी ही सूचना मान्य करून साडेआठ कोटींमधून सातारा-देवळाई भागात रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

या रस्त्यांचे डांबरीकरण होणार

रेणुका माता मंदिर ते चाटे शाळेकडे जाणारा रस्ता.
शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग ते देवळाई तांडा.
नाईकनगर ते विनायकनगर.
हॉटेल शिदोरी ते प्रकाश महाजन यांच्या घरापर्यंतचा रस्ता.
घराणा फर्निचर ते प्रवीण कुलकर्णी यांच्या घराचा रस्ता.
दत्त मंदिर ते हरीप्रसादनगर.
साईनाथनगर ते अलोकनगर
सातारा गावातील पुलापासून खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता.
कमलनयन बजाज हॉस्पिटल ते सुधाकरनगरकडे जाणारा रस्ता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचे ‘ग्राहकच’ आमचे ब्रँड अॅम्बेसेडरः चितळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आमचे ग्राहकच आमचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. शेतकरी ते ग्राहक असे आमचे ब्रिदवाक्य राहिल्याने दूध, मिठाई आणि नमकीन व्यवसायात आमची चौथी पिढी यशस्वी होत आहे,’ असे प्रतिपादन चितळे बंधू मिठाईवाले या नामांकित उद्योगाचे संचालक गिरीश चितळे यांनी केले.
औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे गुरुवारी आयोजित ‘रेअर शेअर’मध्ये गिरीश चितळे यांनी उद्योगाचा प्रवास उलगडला. हा ४४ वा कार्यक्रम ‌देवगिरी कॉलेजच्या विश्वकर्मा हॉलमध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाथग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल, देविगरी कॉलेजचे मोहन सावंत, सतीश कागलीवाल, डॉ. सुनील देशपांडे होते.
चितळे म्हणाले, आम्ही या व्यवसायात १९३५ साली आलो. आमचे आजोबा बी. जी. चितळे यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आज आमची चौथी पिढी या व्यवसायात आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम होऊन आज मिठाई, नमकीन, दूध, दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती संपूर्ण यांत्रिकपद्धतीने करत आहोत. आमचे ७६ जणांचे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कुटुंबातील संवाद, एकोपा आणि वैयक्तिक पातळीवर दिले गेलेले स्वातंत्र्य यामुळे पुढील शंभर वर्षेही हीच परंपरा कायम राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. उद्योग समुहाने सांगलीतील भिलवाडी हा भाग कसा संपन्न केला, शेतकरी कसे एकत्र आणले, गाई-म्हशींचे संगोपन कसे केले जाते याची इत्यंभूत माहिती ‌देणारी शॉर्टफिल्म दाखवण्यात आली.

असे होईल दुष्काळाचे सावट दूर

मराठवाड्यातील दुष्काळाचे सावट दूर होऊ शकते, हे सांगून शेतकरी, दूधदुभती जनावरे आणि व्यवसाय यांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे. याचे नियोजन मी भिलवाडी येथील कारखान्यात बसून करू शकतो, असे सांगून चितळे यांनी उपस्थितांची मने ज‌िंकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ लाखांची खंडणी; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्‍नाचे फोटो व व्हिडिओ इतरत्र पाठवून बदनामी करू, असे धमकावत सासऱ्याला १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या नांदेडमधील दोघांना शुक्रवारपर्यंत (२१ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. पाटील यांनी दिले.
या प्रकरणी शहरातील वेदांतनगर भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची सून मुळची नांदेड येथील आहे. लग्न झाल्यानंतर पतीशी घरगुती वाद झाल्यानंतर ती नांदेड येथे राहायला गेली. संबंधीत सूनेचा परिचय असलेला आरोपी विजेंदर उर्फ नयन विलास माने (वय ३०, रा. नांदेड) हा गेल्या वर्षभरापासून फिर्यादीला सूनेचे फोटो व व्हिडिओ आपल्याकडे आहे. तो इतरत्र पाठवून तुमची बदनामी करू, असे फोनवरुन नेहमी धमकावत १५ लाखांच्या खंडणीची मागणी करत होता. या त्रासाला वैतागून फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी विजेंदर यासह आरोपी पृथ्वीराज प्रकाशसिंग ठाकूर (वय १९, रा. नांदेड) याला अटक करण्यात आली होती. दोघा आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर केले असता, दोघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईएसआयसी हॉस्पिटल नावापुरतेच

$
0
0

ईएसआयसी हॉस्पिटल नावापुरतेच

सुधारणा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; कामगार नेते भवलकर यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ईएसआयसी हॉस्पिटल केवळ नावापुरते उरले आहे. अनेक पदे रिक्त आहेत. या सर्वांचा परिणाम रुग्ण सेवेवर होत असून तातडीने सुधारणा करा, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा कामगार नेते उद्धव भवलकर यांनी मटाशी बोलताना दिला. जिल्ह्यात सुमारे दोन लाख कामगार आहेत. ईएसआयसाठी कामगार व संबंधित कंपनी व्यवस्थापनेकडून दरमहा कोट्यावधी रुपये घेतले जातात. त्यातुलनेत आरोग्य सुविधा का नाही, असा सवाल त्यांनी केला.

सामाजिक सुरक्षा म्हणून औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारने राज्याच्या मदतीने ईएसआय हॉस्पिटल सुरू केले आहेत. त्यापैकी १०० खाटांचे हॉस्पिटल चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आहेत. तर, मुकुंदवाडी, वाळूज आदी भागात आरोग्य केंद्र आहे.

औरंगाबादेत सव्वा दोन लाख कामगार ईएसआय हॉस्पिटलशी संलग्न आहे. त्यांच्या पगारातून ईएसआय सुविधेसाठी कपात केली जाते. त्यात कंपनी मालकांचाही वाटा असतो. यातून दरवर्षी जमा होणारी रक्कम कोट्यावधींची आहे. मात्र, असे असतानाही सदस्य असलेले कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ईएसआय हॉस्पिटलमध्ये योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. अनेक रोगांवर उपचार केले जात नाहीत. त्यामुळे कामगारांना अन्यत्र जावे लागते, असा आरोप भवलकर यांनी केला आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरातील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १४८ जागा रिक्त आहेत. केवळ १०५ अधिकारी, कर्मचाऱ्यावर हॉस्पिटलचा भार आहे. त्यामुळे रुग्ण चांगल्या आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहेत. त्यास सर्वस्वी राज्य शासनाचा आरोग्य विभाग कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगाव खूनप्रकरणी चौघे पोलिस कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून झाल्याच्या प्रकरणात चौघा आरोपींना सोमवारपर्यंत (२४ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
या प्रकरणी मृत सीमा राठोड (वय १५) हिचे वडील रामदास सरदार राठोड यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सीमा ही १४ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेली असता, शेख मुश्ताक शेख महेमूद (वय २२), ज्ञानेश्वर जानसिंग राठोड (वय २२), भुऱ्या भालचंद्र पवार (वय २१) व शेख महेमूद मस्जीद शेख (वय २१, सर्व रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांनी पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यामुळे गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी १५ जुलै रोजी मुलीचा मृतदेह घाटनांद्रा घाटात सापडला.

गंभीर, दुर्मिळ गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले असता, हा गंभीर व दुर्मिळ बाललैंगिक गुन्हा असून सखोल तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सीईओंचा कारभार व्हीसी रुममधून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांनी दोन दिवसांपासून आपला कारभार व्हीसी रुममधून सुरू केला आहे. कंत्राटदाराच्या ४३ लाख रुपयांचे बिल अदा न केल्याने खुर्ची जप्त झाल्याने सीईओंवर ही वेळ आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शाळा इमारत बांधकामाचे ४३ लाखांचे देयक थकवल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची आणि पाच संगणक कोर्टाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आले होते. मुळ २० लाखाचे हे काम १९८८ मध्ये टी. ए. चोपडा यांनी केले होते. बांधकाम करताना, बांधकाम विभागातून अडचणी निर्माण झाल्याने काम रेंगाळले होते. काम पूर्ण झाल्यानंतरही बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारचे बिल अदा केले नाही. त्या विरोधात कंत्राटदार कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने व्याजासह रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. परंतु, जिल्हा परिषदेने रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने दोन दिवसांपूर्वी सीईओंची खुर्ची कोर्टाच्या आदेशाने जप्त करण्यात आली.
त्यामुळे दालनात खुर्ची व अन्य साहित्य नसल्याने मधुकर राजे आर्दड यांनी गेल्या दोन दिवसापासून व्हीसी रुममधून कार्यालयीन काम सुरू केले आहे. या प्रकरणाची संचिका गहाळ झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा निधी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर उचलला नाही ना? अशीही शंका उपस्थिती केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील २५ गावांमधून जात असून बदनापूर तालुक्यातील दहा गावे व जालना तालुक्यातील १५ गावांमधून जवळपास १२०० शेतकऱ्यांची पाचशे हेक्टर जमीन महामार्गामध्ये संपादीत होत आहे. या मार्गाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनी तसेच संघर्ष समिती व शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपासंदर्भात बदनापूर तालुक्यातील अकोला (निवळक) व जालना तालुक्यातील (कडवंची) या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन महामार्गात बाधित होणाऱ्या शेत जमिनीतील फळबाग व इतर पिकांची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व पशुसंर्वन व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी कडवंची येथील शेतकऱ्यांच्या शेतावर मंत्र्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांप्रती अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे. तसेच बाधित झालेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात येणार असून या करीता राज्य शासनाची शेतकऱ्यां प्रती सकारात्मक भूमिका असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जालन्यात नमुद केले. यावेळी आमदार शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए. बी. गायकवाड, राज्य महामार्गाचे अप्पर जिल्हाधिकारी (प्रशासन) जगदिश मणियार, कार्यकारी अभियंता उदय भरडे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके उपस्थित होते.
मंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पुढे म्हणाले, ‘नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा मोठा प्रकल्प असून नागपूरहून मुंबईला बसने जाण्यासाठी १५ ते १६ तास लागतात. ते महामार्ग झाल्यामुळे नागपूर ते मुंबईला जाण्यासाठी सहा ते सात तास लागतील. रस्ता व दळणवळण ही देशाची रक्त वाहीणी आहे. त्यामुळे हा महामार्ग देशाच्या विकासात निश्चितच मोलाची भूमिका बजावणार असून शेती संबंधित उद्योग व विविध व्यवसायाला यामुळे चालना मिळणार आहे. समृध्दी महामार्ग सर्व सामान्य तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून महामार्ग पुढे जाईल व जास्तीत- जास्त लाभ या महामार्गामुळे घडून येतील.’
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील २५ गावांमधून जात असून बदनापूर तालुक्यातील दहा गावे व जालना तालुक्यातील १५ गावांमधून जवळपास १२०० शेतकऱ्यांची पाचशे हेक्टर जमीन महामार्गामध्ये संपादीत होत आहे. शेतकऱ्यांना संपादीत जमिनीचा मोबदला देण्यासाठी जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी जालना येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात बोलविण्यात आले होते. यावेळी भगवान साळुबा येवले, बाबासाहेब साळुबा येवले, उमाजी साळुबा येवले या शेतकऱ्यांनी त्यांचे जमीचे खरेदीखत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास करून दिले. यावेळी राज्याचे पशुसंर्वन, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जमीनीच्या खरेदी खताची कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तातरीत केली.

रेडीरेकनरच्या दरापेक्षा जादा मावेजाचा दर - खोतकर
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातून नागपूर –मुंबई समृद्धी महामार्गातंर्गत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाधित जमिनीला रेडीरेकनरच्या दरापेक्षा जास्तीत जास्त मावेजा दर देण्यात येणार असून या भागातील महामार्गामध्ये नष्ट होणारे स्ट्रक्चर (बांधकामे) गोठे, घरे, शेततळे, विहीरी, फळझाडे, बगीचे यांचे मुल्यांकन करून जास्तीत जास्त महामार्गात बाधित झालेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. द्राक्षाच्या एका (वेल) झाडासाठी मोबदला म्हणून दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचेही त्यांनी नमुद केले. यासाठी शेतकरी हा केंद्र बिंदू मानून नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग पुढे जाईल. यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे मंत्री खोतकर यांनी नमूद करून या भागातील झीज भरून काढण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

##############################

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अधिसभा निवडणुकीची चुरस वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध प्रवर्गातील अधिसभा सदस्य निवडणुकीची ऑनलाइन मतदार नोंदणी संपली. नोंदणीकृत पदवीधर प्रवर्गात सर्वाधिक ४३ हजार ५२० मतदारांनी नोंदणी केली. विद्यापीठाशी संलग्नित ४२५ महाविद्यालय असूनही प्राचार्य प्रवर्गात २१० आणि संस्थाचालक प्रवर्गात फक्त २५८ मतदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६अंतर्गत अधिसभा व विविध प्राधिकरणाच्या निवडणुका होणार आहेत. अधिसभेसाठी पदवीधर महाविद्यालयीन शिक्षक व प्राचार्य प्रत्येकी दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रत्येक प्रवर्गात पाच जागा खुल्या असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटके विमुक्त जाती-जमाती व महिला प्रवर्गातून प्रत्येकी एक सदस्य निवडला जाणार आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षक तीन जागा व संस्थाचालक दहा जागा यासाठी अधिसभा सदस्यांची निवडणूक होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी २० जून ते २० जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. तसेच विविध अभ्यास मंडळांच्या विभागप्रमुखांची नोंदणी करण्यात आली. ऑनलाइन नावनोंदणी केलेले मतदार २२ जुलैपर्यंत सत्यप्रत निवडणूक विभागात जमा करणार आहेत.

दरम्यान, पदवीधर प्रवर्गासाठी रिंगणात उतरलेल्या पॅनलच्या सदस्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. विद्यापीठाशी संलग्न चार जिल्ह्यातील कॉलेजात विशेष मोहीम राबवून मतदार नोंदणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून लाखो पदवीधर बाहेर पडले आहेत. निवडणुकीसाठी फक्त पाच हजार नोंदणी होणे चिंताजनक आहे. विशेष जनजागृती करून नोंदणी वाढवा आणि नोंदणीचा कालावधी वाढवा अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी केली होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर नोंदणीला विशेष वेग आला. निवडणुकीत वर्चस्व मिळवणे गरजेचे असल्याने नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी भर दिला.

मतदानाचा अधिकार डावलला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील सहयोगी प्राध्यापक डॉ. निर्मला जाधव व प्रा. अश्विनी मोरे यांना मतदार नोंदणी करता आली नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्त्री अभ्यास केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. या प्राध्यापिकांची नियुक्ती योजनेतील असल्यामुळे नोंदणी होत नसल्याचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी सांगितले. याबाबत ‘बामुक्टो’ शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची मान्यता आणूनही मोरे व जाधव यांची नोंदणी करण्यात आली नाही. विशेष म्हणजे मॉडेल कॉलेजचा संकेतस्थळावरील यादीत समावेश आहे. कायमस्वरूपी नियुक्ती असूनही मतदानाचा अधिकार डावलल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या हटवादी भूमिकेमुळे घडला.

प्रक्रिया लांबणीवर
विद्यापीठ अधिसभेसाठीची अंतिम मतदार यादी अर्ज जमा झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पदवीधर, प्राध्यापक, पदव्यूत्तर प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक प्रवर्गातील अधिसभा सदस्य निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार ३० ऑगस्टपर्यंत अधिसभा सदस्य निवडणे बंधनकारक आहे. मात्र, मतदार नोंदणीचा विलंब पाहता प्रक्रिया पार पडण्यास किमान महिनाभर उशीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
सत्तांतरानंतरची लातूर शहर महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा काँग्रेस सदस्यांच्या गोंधळात पार पडली. गोंधळी वातावरणातच आवाजी मतदानाने सत्ताधारी भाजपाने विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करून घेतले. अनेक वर्षानंतर पालिकेच्या राजकारणातून काँग्रेस सत्तेपासून दूर गेली आहे. भाजपने ‘झिरो टु हिरो’ कामगिरी मतदानातून करून दाखवली असली तरी पालिकेत अवघ्या एक मताचे बहुमत भाजपला आहे. त्यामुळे पहिल्या सर्वसाधारण सभेविषयी शहरात प्रचंड उत्सुकता होती.
सभेच्या प्रारंभापासून गोंधळ होणार याची चिन्हे दिसू लागली होती. कोणी कुठे बसावे यावरुनच आवाज वाढवून बोलण्यास काँग्रेसने सुरुवात केली. त्यानंतर विषयपत्रिका बाजूला ठेऊन शहरातील समस्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अॅड. दीपक सुळ यांनी केली. सत्ताधारी भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला. परंतु महापौर सुरेश पवार यांनी चर्चेला परवानगी दिली. शहरातील समस्येवरून सुरू झालेली चर्चा अखेर मुख्यमंत्र्यांनी २६७ कोटी रुपये मंजूर केले तर त्याचे आदेश कुठे आहेत. यावर येऊन ठेपली आणि सत्ताधारी जनतेची दिशाभूल करीत आहेत अशा आरोपांना सुरुवात झाली. त्यानंतर काँग्रेसचे सदस्य महापौराच्या समोरील व्यासपीठावर चढले आणि गोंधळ घातला. यावेळी विक्रांत गोजमगुंडे, रवीशंकर जाधव, सपना किसवे आदि सक्रिय झाले होते. प्रशासन विरोधी सदस्याचे ऐकत नसल्याची तक्रार विक्रांत गोजमगुंडे यांनी केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर सुरेश पवार म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचा कायदेशीर अभ्यास करून पालिकेच्या हिताचा विचार करून मत द्यावे असे आयुक्तांना कळविले आहे. काँग्रेसच्या काळात जे त्यांना कधी जमले नाही ते आम्ही दोन महिन्यांत करून दाखवत आहोत. त्यामुळे त्यांना ते सहन होत नाही. त्यांना फक्त पक्षीय राजकारण करायचे आहे. त्यांना विकासाशी काही देण घेणे नाही. आम्ही विकास कामेच करीत राहणार आहोत.’
दरम्यान, विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी सर्वसाधारण सभेतील विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

गोंधळातच विषयांना मंजुरी
या गोंधळातच सभागृह नेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी विषय पत्रिकेवरील विषय मांडले. त्याला शैलेश स्वामी यांनी अनुमोदन दिले आणि विषय मंजूर करण्यात आले. या विषयात जनतेच्या हिताचा विषय म्हणजे पाणी टंचाईच्या काळातील पाणीपट्टी माफ करण्याविषयी मुख्यमंत्र्याकडे विनंती केली. शहराच्या चार ही बाजूला दहन आणि दफन भुमीसाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणे, सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यासारखे विषय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘आयटीआय’चे वेळापत्रक जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तायादीनंतर पुढच्या प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी अखेर जाहीर करण्यात आले आहे. पहिली प्रवेशाची फेरी २४ जुलैपासून सुरू होत आहे. गुणवत्ता यादी १५ जुलै रोजी जाहीर झाली तरी, पुढच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते.

राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेत १९ जून ते आठ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी व निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अंतिम गुणवत्ता यादी १५ जुलै रोजी जाहीर करण्यात आली, परंतु पुढच्या प्रक्रियेचे वेळापत्रकाची प्रतिक्षा राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांना होती. त्याचे वेळापत्रक अखेर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने बुधवारी जाहीर केले. वेळापत्रकाचे स्वरूप जाहीर करण्यात आले. वैधानिक व समांतर आरक्षणावर आधारित आयटीआय संस्था व अभ्यासक्रमनिहाय जागा वाटपाचा तपशील संस्थांना तपासणीसाठी २० जुलै रोजी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवडयादी २२ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहा निवडयादी २४ जुलै रोजी वेबसाइटवर जाहीर केली जाणार व एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ ते २८ जुलैपर्यंत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी निवड झालेल्या संस्थेत प्रवेशाची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दुसऱ्या फेरीसाठी ३० जुलै ते एक ऑगस्टदरम्यान पर्याय देण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. निवड यादी तीन ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची प्रक्रिया चार ते सात ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्ण करावयाची आहे. तिसरी फेरीसाठी नऊ ते ११ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना पर्याय निवडता येणार आहेत. १३ ऑगस्टला गुणवत्ता यादी, तर १४ व १६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी देण्यात आला. चौथी फेरीसाठी विद्यार्थ्यांना १८ ते २० ऑगस्टपर्यंत पर्याय द्यायचा आहे. २२ ऑगस्ट ला गुणवत्ता यादी तर, २३ ते २६ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे.

चार फेऱ्यांनंतर समुपदेशन
प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण होतील. त्यानंतर समुपदेशन फेरी होणार आहे. त्याची प्रक्रिया २७ ऑगस्टला सुरू होणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्याला स्वतः हजर रहावे लागेल. त्यानंतर त्याच दिवशी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार प्रवेश होतील, तर खाजगी संस्थांमधील समुपदेशन फेरी २५ ते ३१ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ एमफिल परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीएचडी. पूर्वपरीक्षेच्या (पेट) निकालाची घसरलेली टक्केवारी चर्चेत असताना एमफिल. सीईटीसुद्धा नकारात्मक गुणांकन पद्धतीनुसार राबवण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.

पीएचडी धर्तीवर एम. फिल. अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन पद्धती राबवत असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी म्हटले आहे. विद्यापीठाच्या ऐनवेळच्या निर्णयाचा फटका बसल्याने विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १८ पदव्युत्तर विभागात एमफिल अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बुधवारी बैठक घेऊन पेट, पीजी साईटी, प्रवेश प्रक्रिया, एमफिलसह प्रमुख विषयांचा आढावा घेतला. प्रत्येक विभागाला संशोधनासाठी वाढीव निधी दिला असून संशोधनाचा दर्जा सुधारून विद्यापीठाचा नावलौकीक वाढवण्यावर भर असल्याचे कुलगुरू म्हणाले.

विद्यापीठातील १८ विभागात एमफिल.अभ्यासक्रम सुरू आहे. मराठी, हिंदी, उर्दू, पाली, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, लोकप्रशासन, ग्रंथालयशास्त्र, वाणिज्यशास्त्र, पत्रकारिता, गणित, व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र आदी विभागांचा समावेश आहे. एमफिल ‘सीईटी’ वेळापत्रक जाहीर झाले असून ३० जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाइन सीईटी
एमफिल प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ‘निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम' असणार आहे. ‘पेट’च्या धर्तीवर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व विभागांची एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड परिसरात पावसाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड शहर परिसरात गुरुवारी दुपारपासून सरीवर सरी कोसळत आहेत. रात्री भीज पाऊस आणि दिवसा जोरदार सरी आणि पुन्हा रिमझीम असा पडणारा पाऊस शेती आणि पाणी साठे वाढण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या पावसामुळे बळीराजात आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.५४ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २६.९९ टक्के पाऊस जिल्ह्यात गुरुवार २० जुलै २०१७ रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत सरासरी ८.५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकूण १३६.५६ मिलीमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६.९९ टक्के एवढा पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान लाभले आहे. पाणी पातळीत वाढ होण्यासाठी येत्या काळात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...पक्षीप्रेमींमुळे फ्लेमिंगोचा जीव वाचला!

$
0
0

औरंगाबाद : जखमी झालेल्या एका फ्लेमिंगोला पक्षीप्रेमींमुळे वेळेत उपचार मिळाले आणि त्याला जीवनदान मिळालं. ही घटना गुरूवारी (२० जुलै) घडली.

पवननगर, हडको भागात राहणाऱ्या स्वप्निल व अक्षय पाटील यांच्या घराच्या गच्चीवर पहाटे हा फ्लेमिंगो आढळला. तो जखमी असून हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वैद्यकीय मदतीसाठी पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांच्याशी संपर्क केला. डॉ. पाठक यांनी तातडीने सर्पमित्र नीतेश जाधव यांना पाटील यांच्या घरी पाठवत फ्लेमिंगोला काळजीपूर्वक घेऊन येण्यास सांगितले. फ्लेमिंगोची पाहणी केल्यानंतर पाठक यांनी पक्षी तज्ज्ञ सतीश पांडे यांच्याशी चर्चा केली व उपचार केले. पतंगाचा मांजामुळे फ्लेमिंगोच्या पंखास, हाडाला जखमा झाल्या होत्या. नियमित औषधोपचारानंतर येत्या आठ दिवसांत फ्लेमिंगो ठिक होईल, असे डॉ. पाठक यांनी सांगितले. दरम्यान, फ्लेमिंगोला तातडीने उपचार मिळावे यासाठी स्वप्निल, अक्षय डॉ. पाठक यांच्याकडे आले. घरातून घाईत निघाल्याने ते पैसे घेण्यास विसरले होते. त्यांना पवननगराकडे परत जाणेही शक्य नव्हते. रिक्षाचालक किशोर भिंगारे यांच्या लक्षात आली. त्यांनी या पक्षी मित्रांना प्रवासासाठी पैसे देत मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खड्ड्यावरून राजकीय चिखलफेक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यासाठी निधी आणला कोणी, श्रेय कोणाचे, तुमचे विंचू पुराण झाले असल्यास शहरातील खड्ड्यांकडेही लक्ष द्यावे अशी शेलक्या शब्दांतून टोलेबाजी करत गुरुवारी (२० जुलै) पोलिस आयुक्तालयातील कार्यक्रमातच आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील यांनी महापौर भगवान घडमोडे यांच्यावर तोफ डागली. याला महापौरांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिले. त्यामुळे एमजीएम कॅम्पसच्या रुक्मिणी सभागृहात झालेला हा कार्यक्रम चक्क पावसाळ्यातली राजकीय चिखलफेक ठरला.
कार्यक्रमाचे उदघाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पोलिस, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, इम्तियाज जलील उपस्थित होते.

‘विंचू’नंतर खड्डे बघा!
आमचे महापौर ‘विंचू चावलामुळे’ खूप फेमस झाले आहेत. त्यांनी शहरातील खड्ड्यांकडेही लक्ष द्यावे. कार्यक्रमाला सगळ्याच नेत्यांनी पोलिसांशी पंगा नको म्हणून उपस्थिती लावली की काय? पोलिसांनी हेल्मट सक्तीच्या नावाखाली लोकांची पिळवणूक करू नये. पूर्वीचे आयुक्त नुसतेच ‘सिंघम’ होते, पण यशस्वी यादव हे तर ‘डबल सिंघम’आहेत. ‘लखनौ’मध्ये त्यांचा अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आला. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात यावे. - संजय शिरसाट, आमदार

निधी आपण आणला म्हणा
रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला. हा निधी आपणच आणला असा दावा शिवसेना-भाजपचे नेते करत आहेत, मात्र हा निधी आपण शहराचे महापौर आहोत म्हणून शहरवासीयांसाठी आणला आहे, असे का म्हटले जात नाही? विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे शहरातील आहेत. राज्याच्या सर्वाधिक मोठ्या पदावर आज बागडे आहेत. ते विधानभवनात आले की मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांना उभे राहावे लागते. जोपर्यंत बागडे बसण्यास सांगत नाहीत, तोपर्यंत कोणीही खाली बसू शकत नाही. एवढ्या मोठ्या पदावर असलेले बागडे हे त्यांच्या अधिकारात सहज चार ते पाच कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्ही बसविण्यासाठी देऊ शकतात. मग आम्हा आमदारांकडे दहा-दहा लाख रुपये आपण का मागता? तरीही सीसीटीव्हीसाठी मी दहा लाख रुपये देणार. - इम्तियाज जलील, आमदार

रुसवा, निषेध सोडा
शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी प्रथमच आला आहे. त्याचे स्वागत करणाऱ्याऐवजी कुणी रुसते, कोणी निषेध करतो. यामुळे शहर स्मार्ट होणार आहे का ? ‘नाना’ मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतात, पण शहराच्या विकासात आपले योगदान नको का ? त्यासाठी सर्वांनी निधी द्यावा. त्याचा विसर पडता कामा नये. स्मार्ट सिटीजन, स्मार्ट विद्यार्थी असेल तर स्मार्ट सिटी निश्चितच होईल. - भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘वेतन सुधार’ची बैठक गुंडाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराबाबत मते जाणून घेण्यासाठी गुरुवारी मुख्य बसस्थानकात झालेली बैठक (२० जुलै) वेतन सुधार उपसमिती सदस्यांना काही मिनिटांत गुंडाळावी लागली. ‘वेतन करार करा,’ अशी मागणी करणारे कामगार आणि ‘सातवा वेतन आयोग लागू करा’, यासाठी आग्रही असलेले कामगार आमने-सामने आल्याने बैठकीत गोंधळ उडाला.

वेतन सुधार उपसमितीचे महाव्यवस्थापक तथा उपसमितीचे अध्यक्ष माधव काळे, मुख्यकामगार अधिकारी टी. एस. ढगे, उपमहाव्यवस्थापक (चालन) मिलिंद बंड, मुख्यलेखाधिकारी पळणीकर तसेच महाव्यवस्थापक व्ही. आर. रत्नपारखी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता बैठक सुरू झाली. बैठकीत एसटी चालक, वाहक, मेकॅनिक यांच्यासह लिपीक म्हणून काम करणाऱ्या एसटी कामगारांनी मांडली. अर्धा तासांत जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याने बोलण्यास सुरुवात केली. हा पदाधिकारी उठताच मागील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. उपसमितीच्या परिपत्रकात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे मत घेऊ नये, असे निर्देश असताना संघटनेचे पदाधिकारी बोलत असल्याने कामगारांचा तोल गेला. त्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणाबाजी सुरू केली. संघटनेचे पदाधिकारी तसेच कामगार आमने-सामने आल्याने बैठकीत अचानक घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे वेतन सुधार उपसमितीच्या सदस्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. समिती सदस्य कारमध्ये बसून नाशिककडे निघाले असताना कामगारांनी त्यांची गाडी अडवून वेतन आयोगाची मागणी केली. विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी स्वतः समोर येऊन कामगारांना हटवून समितीची गाडी जाण्यासाठी मार्ग करून दिला.

वेतनाबाबतच्या मागण्या
- सातवा वेतन आयोग लागू करा.
- कनिष्ठ कर्मचाऱ्यांची पगारवाढ करा.
- नियमित कामगारांना २५ टक्के पगार वाढ.
- यंदाच्या करारात ८५ टक्के वेतन वाढ दया

कपड्यासाठी केले अर्धनग्न आंदोलन
एसटीच्या चिकलठाणा कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना चार वर्षांपासून गणवेश नाही. त्यासाठी कापड द्यावे. एकतर्फी प्रसारित केलेले परिपत्रक रद्द करावे, एक जुलै २०१६पासूनचा सात टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने द्यावा आदी मागण्यांसाठी गुरुवारी चिकलठाणा कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी एसटी कामगार संघटनेच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

आंदोलनात सुमित गोसावी, अल्का कर्णिक, प्रकाश महाजन, विलास धारगड, शेख सरदार, राजू पवार, एस. डी कांबळे, प्रमोद राजमाने, पी. एस. वडीपल्ली आदी सहभागी झाले. यावेळी विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सांळुके, विभागीय सचिव राजेंद्र मोटे, विभागीय कार्याध्यक्ष हारून पठान, विभागीय कोषाध्यक्ष रवींद्र डाखोरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पुरवठा विभागाला जाग; पेट्रोल पंप तपासणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठाण्यातील पोलिसांनी औरंगाबादमधील पेट्रोल पंपांची तपासणी करून टाळे ठोकले, आणि मापातले पाप काढले. ही कारवाई होऊनही पंधरा दिवस लोटले. त्यानंतर आता कुठे जिल्हा पुरवठा विभागाला जाग आली असून, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (२० जुलै) तीन पंपांची तपासणी केली.

पेट्रोल पंपात चिप बसवून पेट्रोल चोरी केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शहर गुन्हे शाखा, तिन्ही ऑइल कंपन्यांचे अधिकारी आणि वजन मापे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील दहा पेट्रोल पंपाची तपासणी केली. या तपासणीत चुन्नीलाल पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी उघड झाली. याशिवाय तीन पंपावर इरॉटिक डिलेव्हरीचे प्रकरण उघड झाले. त्यामुळे चुन्नीलाल पेट्रोल पंपाला टाळे ठोकले. ही कारवाई झाल्यानंतर आता उशिराने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रांती चौकातील पेट्रोल पंपासह जालना रोडवरील दोन पंपांची तपासणी केली. पेट्रोल भरणाऱ्या यंत्राची तपासणी केली. शिवाय पंपातून पाच लिटरच्या मापात पेट्रोल टाकून यंत्र नीट चालते की नाही हे पाहण्यात आले. आगामी काळात शहरातील वीस पंपांची तपासणीही केली जाणार आहे.

डबल लॉक सिस्टीम लावा
जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पंप चालकांनी काही दिवसांपूर्वी ‌पुरवठा विभागाला दिलेल्या निवेदनाची आठवण करून दिली. या निवेदनात पंपांना डबल लॉक सिस्टीम लावण्याबाबत विनंती केली होती. ही विनंती मान्य करा, अशी मागणी पंप चालकांनी अधिकाऱ्यांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतण्यावर कुऱ्हाडीचे घाव; बाप-लेकास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकाला पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. सैय्यद यांनी शुक्रवारी ठोठावली.
या प्रकरणी खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या जखमी कृष्णा श्रीरंग जाधव (वय ३८, रा. वाघेरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर विठ्ठल जाधव (वय २९, रा. वाघेरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २४ फेब्रुवारी २०१४ रोजी कृष्णा हे काही जणांसह ट्रॅक्टरद्वारे मक्याची पोती आणण्यासाठी शेतात गेले होते. ट्रॅक्टरमध्ये पोती भरताना तिथे कृष्णा यांचा चुलता आत्माराम तुळशीराम जाधव (वय ४५, रा. वाघेरा) आणि कृष्णा यांचा चुलत भाऊ शालिकराम आत्माराम जाधव (वय १९, रा. वाघेरा) हे बाप-लेक आले. त्यांनी मक्याची पोती भरण्यास विरोध केला. त्यावर कृष्णा यांनी चुलत भाऊ तसेच चुलत्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी शालिकराम याने सोबत आणलेली कुऱ्हाड आत्माराम याने हिसकावून घेत कृष्णा यांच्या डोक्यात वार केले व दोन्ही आरोपी तेथून पळून गेले. त्यामुळे कृष्णा खाली कोसळून बेशुद्ध झाले. त्यानंतर कृष्णा यांना आधी सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात व नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील जखमी कृष्णा व आरोपींमधील शेतीचा वाद दिवाणी कोर्टात प्रलंबित आहे.

दंडाची रक्कम जखमीला द्या

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील शरद बांगर यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी व गंभीर जखमी झालेले कृष्णा, तसेच फिर्यादी व वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे कोर्टात सिद्ध झाले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरुन व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने दोन्ही आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर दंडाची सर्व रक्कम कृष्णा यांना देण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी अॅड. विकास ढाकणे यांनी अॅड. बांगर यांना सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ९८ गावांना पुन्हा टँकरद्वारे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक टँकर सुरू असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रारंभीच्या दमदार पावसानंतरही टंचाई कायम आहे. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे ९८ गावांना पुन्हा एकदा टँकरफेरा सुरू झाला असून ९३ गावातील २ लाख १४ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.
सध्या गंगापूर तालुक्यात ४५ गावात सर्वाधिक ४३, औरंगाबाद २८ गावात २४, सिल्लोड ११ गावात १३, वैजापूर ७ गावात ७, तर कन्नड तालुक्यातील ११ गावात ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३१ हजार ६३२, गंगापूर तालुक्यातील १ लाख ३९ हजार, वैजापूर १० हजार ८५४, कन्नड ८ हजार ३३०, तर सिल्लोड तालुक्यातील २५ हजार ११९ असे एकूण दोन लाख १४ हजार नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९६.४१ मिलीमिटर पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस २९.१ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस, महावितरण करणार वीज मीटर तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिमोटचा वापर करीत वीज चोरी करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. महावितरणाने शून्य रिडिंग असलेल्या ८०० ग्राहकांची यादी गुन्हे शाखेला दिली होती. यातील संशयित वीज ग्राहकांच्या घरी महावितरणाच्या पथकासोबत जाऊन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
रिमोटचा वापर करून ग्राहकांकडून वीज चोरी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने अनेक ग्राहकांना ही सुविधा पुरवल्याची कबुली दिली आहे. शून्य मिटर रिडिंग असलेल्या ग्राहकांची यादी गुन्हे शाखेने महावितरण कार्यालयाला मागवली होती. ही यादी ‌मिळाल्यानंतर यापैकी ५० ग्राहकांना नोटीस पाठवून जबाबासाठी बोलावण्यात आले होते. ही मंडळी जबाब देण्यासाठी आल्यानंतर त्यापैकी अनेकांच्या मीटरमध्ये तांत्रिक दोष असून त्यांनी महावितरण कार्यालयाकडे तक्रारी देखील केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा मह‌ावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये जे ग्राहक वीज चोर असून शकतात. त्यांची माहिती देण्याचे सांगण्यात आले. तसेच या संशयित ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरण व गुन्हे शाखेचे पथक तपासणी करणार आहे. जे ग्राहक वीजचोरीमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

आरोपीला कोठडी

रिमोटद्वारे वीज चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२४ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. सैय्यद यांनी दिले.
या प्रकरणी हडको एन-१२ येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभयंता अविनाश ज्ञानेश्वर चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी त्याच्या सहकाऱ्यांसह मीटर तपासणीसाठी गेला असता, आरोपी किशोर रमेश रूईकवार (वय ३६, रा. छत्रपतीनगर, हर्सुल, औरंगाबाद) याने रिमोटद्वारे वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी आरोपीला गुरुवारी अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने रिमोट कुठून आणला, कुणाकडून बसवून घेतला व असे प्रकार वाढले असल्याने यामागे कोण आहे, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images