Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ ‘भावली’तले पाणी पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी आरक्षित असलेल्या भावली धरणातील पाणी शहापूर तालुक्यातील ११३ गावांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा पाण्याचा वाटा आणखी कमी झाला आहे.

मुकणे, भावली, भाम व वाकी या चार धरणातील ११ अब्ज दलघफु पाणी प्रकल्पासाठी आरक्षित असताना पाटबंधारे विभागाने विविध कारणांसाठी तब्बल ९.७५ अब्ज दलघफु पाणी वळवल्याने ११ पैकी केवळ सव्वाअब्ज दलघफु पाणी शिल्लक राहिले आहे. यातून एक लाख एकर क्षेत्राचे सिंचन करण्यासाठी कसे नियोजन करणार, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘१९७८मध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरणाचे ४.५० अब्ज दलघफु (टीएमसी), भावली धरणाचे १.५० अब्ज दलघफु, वाकी धरणाचे २.६२ अब्ज दलघफु व भाम धरणाचे २.३८ अब्ज दलघफु असे एकूण ११ अब्ज दलघफु (टीएमसी) पाणी आरक्षित करण्यात आले होते. यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना खरीपाची दोन, रब्बीचे एक व एक उन्हाळी असे चार आवर्तन सोडण्याचे नियोजन होते. त्यानंतरच्या काळात भावली धरणातील ०.२५ टीएमसी पाणी स्थानिक जनतेसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाने २००७ मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानंतर्गत नाशिक शहरासाठी २०४१ पर्यंत सहा टीएमसी पाणी देण्याचा ठराव संमत केला. याशिवाय २०१४ नंतर पाण्याची गळती ०.८० टीएमसी वरून अचानक २.५० टीएमसी करण्यात आली. त्यामुळे वेथापूर व गंगापूरच्या हक्काच्या ११ टीएमसी पाण्यात मोठी कपात झाली. आता राज्य शासनाने भावलीतील एक टीएमसी पाणी शहापूर तालुक्याला दिल्याने नामका प्रकल्पासाठी आरक्षित धरणातून तब्बल ९.७५ टीएमसी पाण्याची कपात होणार आहे. त्यामुळे वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यांना भविष्यात पाण्यासाठी व सिंचनासाठी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असून त्याविरोधात लढू,’ असा इशारा ठोंबरे यांनी दिला. याप्रसंगी अमृत शिंदे उपस्थित होते.

याचिका दाखल करणार
‘वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी आरक्षित असलेल्या भावली धरणातील पाणी शहापूर तालुक्यातील गावांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आधीच दुष्काळी असलेल्या आमच्या वाट्याचे पाणी कमी होणार आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. लवकरच याचिका दाखल करणार आहोत,’ अशी माहिती ठोंबरे यांनी दिली.

प्रमुख मागण्या
- नामकाच्या शेतचाऱ्यांची कामे पूर्ण करा.
- दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी मिळावे.
- अप्पर वैतरणाचे पाणी मुकणे धरणात सोडावे.
- नामकाचे नियोजन गोदावरी पाटबंधारेने करावे.
- लाभक्षेत्रातील जमिनीचे सपाटीकरण करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ महिनाभरात बोगस डॉक्टर शोधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणारे तसेच बोगस डॉक्टर महिनाभरात शोधून अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही माहिती जर योग्य पद्धतीने संकलित झाली तर जिल्ह्यातील अनेक बोगस, अनधिकृत डॉक्टरांना लगाम बसणार आहे.

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून गाजत असतो. झेडपीच्या लेखी २६३ बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांची यादीही तयार केली गेली. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात एकाच दिवशी जिल्ह्यात धाडी टाकून या डॉक्टरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. दरम्यान, गेल्या महिन्यात झेडपी आरोग्य विभागाने वाळूज परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची तपासणी केली आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या मोहिमेला पुढे नेत डीएचओ खतगावकर यांनी तीन दिवसांपूर्वी तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक पत्र काढले आहे. त्यात म्हटले आहे, की आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये किती वैद्यकीय व्यावसायिक आहेत ? किती हॉस्पिटल्स आहेत ? त्यांनी बाँबे नर्सिंग अॅक्टनुसार नोंदणी केली आहे काय ? त्यांची नेमकी पदवी काय ? कुठल्या पॅथीचा व्यवसाय करत आहेत ? आदी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. सप्टेंबर अखेर आपापल्या कार्यक्षेत्राचा आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पाठवावा, त्यातून निष्पन्न होणाऱ्या अनधिकृत व बोगस डॉक्टरवर कारवाई केली जाणार आहे. वर्षानुवर्षे या प्रश्नी काम करणाऱ्या झेडपी प्रशासनाला यावेळी तरी यश मिळणार काय ? हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मराठवाड्यात सहा टोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुप्रतीक्षित धुळे-सोलापूर महामार्गावरील टप्पा एक व दोनचे काम वेगाने सुरू असून या संपूर्ण रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना आठ टोल भरावे लागतील. यातील सहा ‌टोल मराठवाड्यात, तर सोलापूर व धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक टोल असेल.

महामार्गावर जळगाव व सोलापूरमध्ये प्रत्येकी एक तर मराठवाड्यात येडशी, पारगाव (जि. उस्मानाबाद), पाडळशिंगी (जि. बीड), पाचोडजवळ (जि. औरंगाबाद), कन्नड (जि. औरंगाबाद) व भांगसीमाता गडाजवळ (जि. औरंगाबाद) एक असे सहा टोल नाके मराठवाड्यात राहणार आहेत. रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यावर अधिसूचना काढण्यात आल्यानंतर कंत्राटदार कंपनी ‘आयआरबी’ टोलवसुली करू शकणार आहे. साधारणपणे डिसेंबर अखेर पर्यंत ८० टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंर या रस्त्यावरुन जाण्यास टोल द्यावा लागण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर ते येडशी तसेच येडशी ते औरंगाबाद दरम्यान बहुतांश ठिकाणी चौपदरी रस्‍त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या रस्त्यावरून वाहतुकही सुरू आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसऱ्या टप्यामध्ये काही तांत्रिक बाबी वगळता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन करण्यात आले आहे.

रस्त्यातील ७०० हेक्टरपैकी ६१८ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर राहील, असे या रस्त्याचे डिझाइन तयार केले आहे. रस्ता तयार झाल्यानंतर औरंगाबादहून बीडपर्यंत अवघ्या एका तासाच्या, तर सोलापूरपर्यंत तीन तासांच्या पोचणे शक्य होईल. महामार्ग पूर्ण झाल्यावर राज्याच्या पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचा टप्पा होणार असून, शिवाय उत्तर भारताकडील उद्योग क्षेत्र आणि दक्षिणेकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असेल. त्यामुळे औरंगाबादेतील उद्योग-व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.


१२५ ‌किलोमीटर रस्ता तयार
वेगाने काम सुरू असलेल्या सोलापूर – औरंगाबाद – धूळे राष्ट्रीय महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याच्या वाहतुकीचे चित्र बदलणार असून, महामार्ग औरंगाबादच्या पायाभूत सुविधांचा कणाच ठरणार आहे. सध्या सोलापूर ते येडशी (१०० किमी) यापैकी ६८ किलोमीटर तर येडशी ते औरंगाबाद (१९० किमी) यापैकी ५६ किलोमिटर असा एकूण २९० पैकी १२५ किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.

सोलापूर ते औरंगाबाद
- २९० किलोमीटर अंतर
- १२५ किलोमीटर रस्ता तयार
- २०१८ पर्यंत उर्वरित काम पूर्ण
- ८ ठिकाणी होणार टोल वसुली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पार्किंग शुल्क वसुली; ‘मोतीवाला’वर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनधिकृत पार्किंग शुल्क वसुली प्रकरणी निराला बाजार येथील मोतीवाला ट्रेड सेंटरचा मालक व व्यवस्थापकावर शुक्रवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी सुनील विठ्ठल कोटकर (रा. उत्तरानगर, ब्रीजवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कोटकर हे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मोतीवाला ट्रेड सेंटर येथे गेले होते. त्यांनी तेथील पार्किंगमध्ये दुचाकी लावली. यावेळी एका व्यक्तीने त्यांना दहा रुपयाची मागणी केली. कोटकर यांनी त्याला मोबाइलच्या दुकानात काम असल्याचे सांगितले तरी देखील दुचाकी उभी करण्यासाठी दहा रुपये द्यावे लागतील, असे त्या व्यक्तीने सांगितले. कोटकर यांनी दहा रुपये दिल्यानंतर त्यांना पार्किंगच्या दुचाकीची पावती त्या व्यक्तीने दिली. या पावतीवर वसूल करणाऱ्याचे नाव, दिनांक, दुचाकी क्रमांक तसेच सर्व्हिस टॅक्स किंवा जीएसटी क्रमांक असे काहीही आढळून आले नाही. कोटकर यांनी चौकशी केली असता मोतीवाला ट्रेड सेंटरच्या मालकाने व व्यवस्थापक शेख मुश्ताक शेख कय्युम यांनी वसुलीसाठी माणसे ठेवली असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी बेकायदा पार्किंग शुल्क वसूल केल्याबाबत तसेच जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी कोटकर यांच्या तक्रारीवरून मोतीवाला ट्रेड सेंटरचा मालक व व्यवस्थापक शेख मुश्ताक शेख कय्युम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे- घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आ‌र्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ‌श्रीकांत नवले, एपीआय अमोल सातोदकर यांनी ही कारवाई केली.

नागरिकांनी पुढे यावे
आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या दोन दिवसांत बेकायदा पार्किंग शुल्क वसुलीप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. गुरुवारी प्रोझोन मॉलच्या पार्किंग एजन्सीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरातील शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल तसेच इतर सार्व‌जनिक पार्किंग चालकांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत. या संदर्भात महापालिकेकडून नियमावली मागवण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नवले यांनी दिली. पार्किंग संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री‌कांत नवले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आईचे घर जाळले; तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेती नावावर करून दिली नाही म्हणून दारूच्या नशेत शिविगाळ व मारहाण करणाऱ्या आणि आईचे घर जाळून टाकणाऱ्या मुलाला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी ठोठवली.

या प्रकरणी परीघाबाई तुळशीराम भिंगारे (ता. जैतापूबर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांची फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या नावावर दीड एकर शेती आहे व फिर्यादी ही कुडाच्या घरात राहात होती. २२ मे २०१५ रोजी फिर्यादीचा मुलगा अशोक तुळशीराम भिंगारे हा दारू पिऊन आला आणि शेती स्वतःच्या नावावर करुन देत नसल्याच्या रागातून आईला म्हणजेच फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच रागाच्या भरात आईचे घर जाणून टाकले. यात संसारपयोगी साहित्य, रोख रक्कम, भांडी व धान्य जळून खाक झाले व यात सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी मुलगा अशोक तुळशीराम भिंगारे याच्याविरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एल. आर. कांबळे यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरुन व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २० दिवस कारवास ठोठवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना कोठडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारा वर्षीय अल्पवयीन मुलीस घरातील धुणी भांडीसह इतरही कामे करून घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तिघांना मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी (८ सप्टेंबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, बुधवारपर्यंत (१३ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.

संबंधित अल्पवयीन मुलीला आई-वडील नसल्यामुळे ती मावशीकडे राहात होती. तिच्याकडून घरातील धुणी-भांडी करून घेत येत होते व काम केले नाही, तर तिला मारहाण करून घरबाहेर हकलून देण्यात येत असे. जेवायला दिले जात नव्हते व शौचालयात ठेवले जात होते. दरम्यान, मुलगी घरात एकटी असल्यावर मावशीचा पती सुधीर गोविंद सुरडकर (३६), मामा संतोष जुमडे (३२) हे तिच्यावर अत्याचार करीत होते. याची माहिती संबंधित मुलीने मावशीला दिली; परंतु मावशीने त्याकडे दुर्लक्ष करून उलट माराहाण केली. संबंधित मुलगी शाळेत रडू लागल्यानंतर ही बाब शिक्षकांच्या लक्षात आली. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मावशीचा पती, मामा व मावशीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. एस. चव्हाण यांनी तपास करून मावशीचा पती सुधीर सुरडकर, मामा संतोष जुमडे व मावशी इंदूबाई सुरडकर या तिघांना अटक केली. तिघांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे, तसेच गुन्हा गंभीर असून अल्पवयीन मुलगी ही असहाय्य आहे. त्यामुळे तिघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक लोकअभियोक्ता विनोद कोटेचा यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने तिघा आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘मनसे’ची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

यावेळी मनसेच्या वतीने सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याने कोणत्याही अटी व शर्ती न घालता सरसकट कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीजन्य औजारावरील व साहित्यावरील जीएसटी रद्द करावी, पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, ठिबक सिंचनाची अनुदान योजना पुर्ववत सुरू करावी, वन्य प्राण्यामुळे होणारे शेतीचे नुकसान वन विभागाद्वारे शेतकऱ्यांना देण्यास वनविभागांना बंधनकारक करावे या मागण्यासोबत इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्याची शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील, दिलीप चितलांगे, अशोक तावरे, संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंग भिकाने, प्रशांत नवगिरे, राजेंद्र गपाट, राजेंद्र मोटे, गजानन गिते, भास्कर गाडेकर विजय चव्हाण, अंकुश जाधव, रुपेश सोनटक्के आदींची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा सबलीकरणासाठी गणेश मंडळाकडून २० लाखांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक भान जागे ठेवत उत्सव साजरा करावा यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी पुढाकार घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या बळीराजा सबलीकरण अभियानाला देणगी देण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला जिल्ह्यातील ३५० सार्वजनिक गणेश मंडळानी प्रतिसाद दिला. बळीराजा सबलीकरण अभियानासाठी तब्बल २० लाख रुपयाची आर्थिक मदत जमा झाली आहे. गणेश मंडळाच्या प्रत्येक बैठकीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा डॉल्बीसाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरण्यासाठी देण्यासाठी मंडळानी त्यांच्या गावातील, प्रभागातील पोलिस अधिकाऱ्यांकडे चेक, रक्कमा दिल्या.
जिल्ह्यातील प्रत्येक मंडळाने त्यांच्या जमलेल्या वर्गणीच्या प्रमाणात अगदी आकराशे रुपयापासून ते २१ हजार रुपयापर्यंतची मदत या अभियानाला दिली असून अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनीही एक दिवसाचा पगार या अभियानाला देण्याचे घोषीत केले आहे. अद्याप काही पोलिस ठाण्याकडून माहिती येणे शिल्लक असल्यामुळे नेमका आकडा सांगता येत नसला तरी सध्या २० लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम जमा होईल, असा विश्वास डॉ. शिवाजी राठोड यांनी ‘मटा’शी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ शेकडो घरात शिरले पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर व परिसराला शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाऊण तास पावसाने झोडपल्याने महापालिकेच्या यंत्रणेची दाणादाण उडाली. विविध भागातील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. अनेक ठिकाणचे चेंबर फुटून वाहू लागल्यामुळे व्यापारी संकुलांच्या तळघरात पाणीच पाणी झाले. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

शहराला सकाळी दोन तास पावसाने झोडपून काढले. त्यानंतर दिवसभर पावसाळी वातावरण होते. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान आकाश भरून आले आणि धुवांधार पावसाला सुरुवात झाली. पोवसाचा जोर इतका होती की अल्पावधीत शहरातून वाहणारे प्रमुख नाले तुडूंब भरून वाहू लागले. नाल्यांना पूर आल्यामुळे भरपावसात हा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान शेकडो घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाल्या. सिडकोची बारावी योजना असलेल्या शिवाजीनगरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांमध्ये तारांबळ उडाली. खिवंसरापार्क येथे सोनवणे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले. विकासनगरातील धूत गेस्ट हाऊसच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी झाले होते. पैठणगेट परिसरात अनेक व्यावसायिक संकुलांच्या तळघरात पाणी शिरले. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले. औरंगपुरा येथील सावता माळी मंदिराच्या शेजारी तळघरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली.

खोकडपुरा भागातील शिवाजी हायस्कूलच्या परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. समर्थनगरातील वरद गणेश मंदिराचा परिसर, टाऊनहॉल भागातील घरे, क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या जवळ असलेल्या शिवाजी कॉलनीमधील घरांमध्ये पाणी शिरले. या प्रकारामुळे रहिवाशांचे व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेली नवीन चेंबरची कामे पावसामुळे उघडी पडली. अनेक चेंबर फुटल्यामुळे त्यातून वाहणारे घाण पाणी दुकानांमध्ये, तळघरांमध्ये शिरले. सखल भागात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना नागरिकांना कसरत करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन देतो, औरंगाबादेत मोठा उद्योग आणा

$
0
0

जमीन देतो, औरंगाबादेत मोठा उद्योग आणा
गुंतवणूक परिषदेच्या समारोपात विधानसभा अध्यक्ष बागडेंचे उद्योगमंत्री देसाईंना आव्हान
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘उद्योगमंत्री सुभाष देसाई, तुम्ही औरंगाबादला मोठा उद्योग आणा, मी जमीन द्यायला तयार आहे. डीएमआयसीसाठी आणखी जमीन देण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. मात्र. पूर्वी संपादित केलेल्या दहा हजार एकरवर मोठा आणा’, अशा स्पष्ट शब्दात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंना आव्हान दिले.
‘सीआयआय’च्या एक दिवसीय मराठवाडा गुंतवणूक परिषदेचा समारोप शुक्रवारी संध्याकाळी झाला. यावेळी बागडे बोलत होते. व्यासपीठावर यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सीआयाआयचे चेअरमन उद्योजक ऋषी बागला, राम भोगले, मोहिनी केळकर, सिमन्नसचे अमीत रॉय, परिषदेचे चेअरमन एन. श्रीराम, सीएमआयएचे चेअरमन प्रसाद कोकिळ यांची उपस्थिती होती.
शेंद्रा पंचताराकित उद्योग स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकाच बैठकीत जमिनी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी त्यांना एकरी ४४ ते४८ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. डीएमआयसीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वखुशीने जमिनी दिल्या. अजूनही जमिनी देण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, संपादित केलेल्या दहा हजार एकर जमिनीवर मोठा उद्योग आणण्याची गरज आहे, असे सांगून ‘देसाई, तुम्ही मोठा उद्योग आणा, मी जमिनी मिळवून देतो,’ असे आव्हानच बागडे यांनी दिले. युवकांनी बौद्धिक क्षमता, कौशल्य विकसीत करून नोकरीऐवजी उद्योगांची कास धरावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
गुंतवणुकीवर ११० टक्के परतावा - देसाई
मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. येथे येत असलेल्या उद्योगांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या ११० टक्के परतावा देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. नवउद्योजकांसाठी राज्य सरकारने सिडबीकडे २०० कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून दिले असून उद्योगासाठी १०० टक्के बीज भांडवल दिले जात आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. उद्योग विकासाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राज्यशासन कृतीशील असून छोट्या उद्योग व्यवसायांना पाठिंबा, सामुहिक सुविधा देण्याच्या दृष्टीने लवकरच ५५ नवीन क्लस्टर उभारण्यात येणार आहे. त्यापैकी १० ते १२ क्लस्टर मराठवाड्यात तयार करण्यात येणार आहे, असे सांगून सुभाष देसाई पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक उद्योजकांनी शून्यातून सुरुवात करत आपल्या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली आणि आपल्यातील कल्पकता आणि धोका स्वीकारण्याच्या वृत्तीतून आपला उद्योग व्यवसाय देशपरदेशात वाढवलेला आहे. त्यातून प्रेरणा घेत लोकांनी नोकरीतून उद्योग व्यवसाय स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. बाहेरील उद्योग औरंगाबादेत स्थिरावत असताना स्थानिक उद्योजकांनीही विलक्षण प्रगती केल्याचे राम भोगले यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन वर्षांत अडीच हजार कोटींची गुंतवणूक
दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘इन्व्हेस्ट इन मराठवाडा’ परिषदेच्या माध्यमातून विभागात येत्या पाच वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे ‘सीआयआय’चे उद्दिष्ट होते. या अंतर्गत दोन वर्षांत २ हजार ५००कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात यश मिळाले असून, ८०० जणांना रोजगार मिळाला असल्याचे ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष व परिषदेचे चेअमरन एन. श्रीराम यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मोदींची जीएसटी पन्नास उद्योगपतींसाठी

$
0
0

परभणी - मुळात जीएसटीची संकल्पना काँग्रेसचीच आहे. मात्र, मोदींची जीएसटी मोठ्या पन्नास उद्योगपतींच्या फायद्यासाठीची आहे. यामध्ये लहान व्यापारी संपणार आहेत. करप्रणालीचे काम आस्थेने आणि विचारपूर्वक व्हायला हवे. १८ टक्क्यांहून अधिक कर आकारला जाऊ नये, असे आमचे विचार होते. मात्र, मोदींनी २८ टक्क्यापर्यंत कर वाढवला. व्यापाऱ्यांना १२ महिन्यात १२ फॉर्म भरावे लागत आहेत. काम सोडून फॉर्मच भरायचे का, असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परभणीत उपस्थित केला. तसेच एकदा व्यापाऱ्यांनी फॉर्म भरला की, इन्कम टॅक्स व इतर खात्याचे लोक मागे लागणार. मोदींना जीएसटीचा ड्रामा करायचा होता. म्हणून रात्री १२.३० वाजता जाहीर केली, अशी टीका त्यांनी केली.
परभणीतील नूतन विद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी झालेल्या संघर्ष सभेत राहुल गांधी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकुरकर, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, खासदार राजीव सातव, खासदार रजनी पाटील, विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात, अब्दुल सत्तार, आमदार संतोष टारफे, एम. एम. शेख, बसवराज पाटील, नसीम खान, सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, महापौर मीना वरपुडकर, नदीम इनामदार, हरिभाऊ शेळके, मुजाहिद खान, माजी खासदार तुकाराम रेंगे-पाटील हे उपस्थित होते.
महाराष्ट्रात ३५ हजार कोटींच्या कर्जमाफीचे मार्केटींग भाजप सरकार करत आहे. मात्र, प्रत्यक्षात ५ हजार कोटींचीच कर्जमाफी झाल्याचा आरोप केला. शिवाय, काँग्रेसच्या दबावामुळेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा भाजप आणि आरएसएसवाली आहे, काँग्रेसवाली नाही, अशी खिल्लीही राहूल गांधी यांनी उडवली.
भाजप सरकार हे सर्वसामान्यांसाठी काम करत नसून देशातील मोजक्यात ५० उद्योगपतींसाठी काम करत आहे. त्यामुळे देशातील राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व सामान्य आपल्या रोजीरोटीसाठी परेशान असताना दिसत आहेत. तीन वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रूपये टाकण्याचे खोटे आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण झाले नाही. केवळ दोन-तीन दिवस झाडू हातात घेवून देशाला स्वच्छ करतो म्हणणारे मोदी आज त्यावर बोलण्यासही तयार नाहीत.
काँग्रेसच्या काळामध्ये ९ टक्क्यांपर्यंत गेलेला जीडीपी या भाजपच्या काळात पूर्णतः खाली आला आहे. केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटी कायदा हा समाजातील छोट्या व्यापारी, उद्योगपतींसाठी घातक आहे. एक देश एक टॅक्स म्हणणार्या पंतप्रधानांनी जीएसटीमध्येच मोठ्या प्रमाणावर विभागणी केली आहे. हा जीएसटी कायदा देशातील मोजक्याच मोठ्या उद्योगपतींसाठी फायदेशीर असून या कायद्यामुळे देशातील छोटे व्यापारी, उद्योगपती कालांतराने नष्ट होतील, अशा जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी परभणीकरांचे आभार मानले व काँग्रेसवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, संताष टारफे, तुकाराम पाटील, एम. एम. शेख, हरिभाऊ शेळके, महापौर मीना वरपुडकर यांनी मनोगते व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी केले. तर आभार नदीम इनामदार यांनी व्यक्त केले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांशी संवाद
राहुल गांधी यांनी वसमत रोडवरील एरंडेश्वर या गावात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांशी संवाद साधला. या ठिकाणी त्यांनी सुरक्षाकवच तोडून शेतात बसलेल्या शेतकरी महिलांजवळ जावून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांचे चिखलामध्ये कपडे देखील भरले. दरम्यान, सुरक्षाकवच तोडून अचानक शेतकऱ्यांमध्ये गेलेल्या राहुल गांधींमुळे पोलिसांचा गोंधळ उडाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक मॅनेजरची हातपाय बांधून हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

येथील सातारा भागातील छत्रपतीनगर येथे आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बँकेचे व्यवस्‍थापक जितेंद्र नारायण होळकर यांची अज्ञात मारेकऱ्यांनी राहत्या घरी हत्या केली.

मारेकऱ्यांनी जितेंद्र होळकर यांना खुर्चीवर बसवून, त्यांचे हातपाय बांधून त्यांना ठार केले. त्यांच्या उजव्या हाताचं बोट कापल्याचंही उघडकीस आलं आहे. हत्येमागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्वत: घटनास्‍थळाची पाहणी केली असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बिल्डर मेहताची हर्सूलमध्ये रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद
तब्बल १८८ ग्राहकांची २० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर मेहता यास तीन सप्टेंबर रोजी बेड्या ठोकण्यात आल्या. शनिवारी त्याची कोठडी संपल्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली.

पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येईल, उद्यान विकसित करण्यात येईल तसेच पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाईल, अशी वेगवेगळी आश्वासने देऊन बिल्डर समीर मेहता याने तिसगाव येथील अक्षय तृतीया फ्लॅट ओनर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फिर्यादीसह १८८ फ्लॅटधारकांकडून प्रत्येकी ११ हजार रुपये म्हणजेच एकूण २० लाख ६८ हजार रुपये घेतले, मात्र मेहताने कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. तसेच बिल्डर मेहता व त्याची पत्नी मेघना मेहता यांनी कराराचा भंग करून फसवणूक केल्याची तक्रार विलास जंजाळ यांनी दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात कलम ४२०, ३४ तसेच ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॉट अक्ट’च्या कलम ३ (२), (आय), १०, ११, १३ अन्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी बिल्डर मेहता याला बुधवारी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, बिल्डर मेहता यास न्यायालयाने शनिवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक व्यवस्थापकाची हात-पाय बांधून हत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा गावातील शाखा व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर (वय ४७) यांची शुक्रवारी मध्यरात्री अडीचला हत्या झाली. सातारा भागातील छत्रपतीनगरात हा प्रकार घडला.
त्यांच्या पत्नी भाग्यश्री जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यालय प्रमुख आहेत. त्यांना यश हा नववीत शिकणारा मुलगा आहे.
होळकर यांच्या घरात शुक्रवारी रात्री पत्नी व मुलगा एका बेडरूममध्ये व होळकर दुसऱ्या बेडरूममध्ये झोपले होते. मध्यरात्री काहीतरी आवाज येत असल्याने भाग्यश्री यांना जाग आली. काही वेळाने जोरात आरडाओरड सुरू झाली. त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाहेरून कडी लावून बंद करण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी शेजारच्यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. शेजाऱ्यांनी घरात येऊन यश आणि भाग्यश्री यांचा दरवाजा उघडला. भाग्यश्री जितेंद्र यांच्या बेडरूमकडे गेल्या असता त्यांना सर्वत्र रक्ताचा सडा दिसला. जितेंद्र यांचा हात दोरीने बांधून त्यांचा गळा चिरलेला होता. ते जमिनीवर पडलेले होते. त्यांच्या उजव्या हाताची बोटेही कापली गेली होती. हे दृश्य पाहून भाग्यश्री आणि शेजाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक काकडे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जितेंद्र यांना घाटीत हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मारेकरी एकापेक्षा अधिक
हत्येच्या कारणांचा पोलिस विविध अंगाने तपास करीत असून मृत जितेंद्र आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, एकटा मारेकरी अशा प्रकारे हत्या करणे शक्य नाही. मारेकरी एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता असून त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात यांनी सांगितले.
...
क्या है, कितना है, देदो
मारेकरी आणि जितेंद्र यांच्यात झटापट सुरू असताना, मारेकरी, ‘क्या है, कितना है, देदो’ अशा शब्दांत ओरडत असल्याचे भाग्यश्री यांनी पोलिसांना सांगितले. मात्र घरातील कोणतेही सामान अस्ताव्यस्त नव्हते किंवा घरातून सोने, चांदी, रोकड अशी कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याने हत्या का झाली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीतील ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी

$
0
0


टीम मटा, औरंगाबाद
सलग तिसया दिवशी मराठवाड्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील ११ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ज्यामुळे सेलू-मानवत व सेलू-वालूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. लातूर शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या मांजरा धरणात ६० टक्के पाणीसाठा झाल्याचे वृत्त आहे.

सेलू-मानवत, पाथरी-सोनपेठ रास्ता ठप्प
परभणी : दहा-बारा दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यतील संपूर्ण सेलू तालुक्यासह ११ मंडळांमध्ये जवळपास अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. ज्यामुळे सेलू-मानवत व सेलू-वालूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ३५.२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात ५७ मिलिमीटर पाऊस तर त्याखालोखाल मानवत आणि सोनपेठ मध्ये ५२ मिलिमीटर पाऊस व परभणी ४९.१३, जिंतूर ३८.७, पुर्णा १६.६०, पाथरी ३७, पालम ६, गंगाखेड तालुक्यात ९ मिलिमीटर पाऊस पाऊस नोंद झाला. या प्रमाणेच ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून यात जिंतूर १०० मिलिमीटर पाऊस, केकरजवला ६२, कोल्हा ५७, झरी ७१, जांब ६०, परभणी ५९, सोनपेठ ५९, सेलू ६२, देऊळगाव ६२, खुपटा ६१ आणि वालूर ६० यांचा समावेश आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्रीनंतर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती अन रातभर बरसला. ज्यामुळे लहान मोठे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. शनिवारीदेखील दुपारी जोरदार पाऊस झाला. परभणी शहरात ७३.४ मिलिमीटर पाऊस एवढी नोंद कृषी विद्यापीठात झाल्याची माहिती हवामान विभागप्रमुख डॉ. डाखोरे यांनी दिली.
रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे सेलू-मानवत व सेलू-वालूर मार्गावरील लेंडी नदीसह ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शनिवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक जिंतूरमार्गे वळविण्यात आली होती. त्यासोबतच पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील लेंडी नदीला पूर आला होता. ज्यामुळे पाथरी-सोनपेठ मार्गावरील वाहतूक देखील दुपारी १ वाजेपर्यंत बंद होती. दरम्यान, सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असला तरी मागील २ महिन्याच्या खंडामुळे पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील महत्वपूर्ण येलदरी धरणात अजूनही केवळ ४.६७ टक्के एवढाच पाणी साठा झाला आहे. या धरणासह माध्यम प्रकल्पांमधील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी अजून दमदार आणि जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

मांजरा धरणात ६० टक्के पाणीसाठा
बीड : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने बीड जिल्ह्यात हजेरी लावली. या पावसामुळे आता प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. लातूरसह अंबाजोगाई, केज, कळंब आदी प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करीत असलेल्या धनेगाव परिसरातील मांजरा धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. आष्टी तालुक्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी पात्रांतून पाणी वाहत आहे. बीड शहर व परिसरातील ओढे भरून वाहत आहेत. तसेच बिंदुसरा नदीपात्रातील पाणीही वाढले आहे.

उस्मानाबादमध्ये दमदार
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात सलग दुसया दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद शहरापासून वाहत असलेल्या भोगावती नदीला पाणी आले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूपप्राप्त झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. उमरगा, नळदुर्ग व अणदूर परिसरात पाऊस सुरूच होता.

नांदेडमध्ये मुसळधार
नांदेड - नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागात सलग तिसया दिवशी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजात आनंदाचे वातावरण असून यामुळे कापसावर पडलेला अळीचा प्रार्दुभाव काही प्रमाणात कमी होणार असल्याने शेतकरी वर्गाची चिंता काहीशी मिटली आहे.

लातूरमध्ये सरीवर सरी
लातूर - लातूर शहर परिसरात शनिवारी पावसाने विश्रांती दिली असली तरी जिल्ह्यातील औसा, निलंगा व काही भागात शनिवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे आता प्रकल्पातील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लघू व मध्यम प्रकल्प पाण्याने भरले असून मोठे प्रकल्प भरण्यासाठी अजून पावसाची प्रतीक्षा आहे.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ मतदार अर्जांची पुन्हा छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची मतदार छाननी प्रक्रिया वादात सापडली आहे. विवाहापूर्वीचे आणि विवाहानंतरच्या नावात साम्य नसल्यामुळे आठ हजार महिला मतदार बाद होण्याची शक्यता होती. मात्र, विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर योग्य नमुन्यातील अर्जांची पुन्हा छाननी करून मतदारांना समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येक टप्प्यावर रखडलेल्या अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आठ हजार महिला मतदारांची नावे छाननीत मतदार यादीतून बाद झाली. पदवी प्रमाणपत्रावरील नाव आणि आधार कार्डावरील नाव वेगवेगळे असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव मतदार बाद झाले. तब्बल आठ हजार मतदारांची नावे वगळल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवत महिला मतदारांना समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्यात आली. पदवीधर सिनेटसाठी लक्षणीय मतदार नोंदणी झाली आहे. महिला मतदारांच्या पदवी प्रमाणपत्रावर वडीलांचे नाव असते, तर आधार कार्डावर पतीचे नाव व नवीन आडनाव असल्यामुळे संभ्रम होण्याची शक्यता आहे. पदवी प्रमाणपत्रावरचे नाव गृहित धरावे किंवा दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याचे संबंधित महिला मतदाराकडून अर्ज घेऊन नोंदणी करावी अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी केली. महिला मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे काळे यांनी सांगितले. तर जुळत नसलेले आवेदनपत्र रद्द करण्याची विनंती सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. प्रारूप मतदार यादीतील महिला मतदारांची नावे पदवी प्रमाणपत्रानुसार नसतील किंवा नाव बदलासंबंधी अर्जासोबत विवाह नोंदणीतील छायांकित प्रत किंवा शासकीय राजपत्राची छायांकित प्रत जोडली नसल्यास मतदारयादीत गंभीर त्रुटी राहतील. इतर विद्यापीठांनी पदवीधर विवाहित स्त्रीकडून उपरोक्त लिखित कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. आपल्या विद्यापीठानेही वरील कागदपत्रे जोडली नसल्यास आवेदनपत्र रद्द करावीत असे निवेदन संघटनेने केली आहे. या निवेदनावर प्रकाश इंगळे, पवन साळवे, अमरदीप वानखेडे, राहुल खंदारे, सिद्धार्थ मोरे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने अर्ज छाननी प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. अधिक मतदारांना समाविष्ट करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

राजकीय डावपेच
विद्यापीठ निवडणुकीत सर्वाधिक मतदार नोंदणी झाली असून विद्यापीठात सक्रिय संघटनांनी राजकीय डावपेच सुरू केले आहेत. आठ हजार मतदारांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पुन्हा करण्यावर काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तर काही संघटनांनी जोरदार समर्थन केले. ‘सुरक्षित’ मतदार कमी करण्यावर आणि वाढवण्यावर प्रतिस्पर्धी गट भर देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘तिच्या’ आयुष्यात कायम दुष्काळच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्त्रीचे विश्व कायम पाण्याभोवती फिरते, मात्र तिच्या आयुष्यात कायम दुष्काळ असतो,’ अशी खंत महिला अभ्यासकांनी शनिवारी व्यक्त केली. त्या महसूल प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘महिला व पाणी धोरण’ या परिसंवादात बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर अॅक्शन अॅडच्या राज्यप्रमुख नीरजा भटनागर, स्त्री अभ्यासक डॉ. वृषाली किन्हाळकर, पत्रकार दीप्ती राऊत, विकास अध्ययन केंद्राचे संचालक सुरेश शेळके, नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव उपस्थित होते. या संस्थांच्या वतीने ‘एकल महिला व पाणीप्रश्न’ या विषयावर अभ्यास करण्यात आला होता. या सर्वेक्षणाचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ. किन्हाळकर म्हणाल्या, ‘एकल महिला, दुष्काळ व पाणी समानार्थी शब्द आहेत. आयुष्यभर ती पाणी भरते. घरातल्या कामांमध्येही तिचे सगळे विश्व पाण्याभोवती असते. पाण्यासाठी कष्ट घेताना तिच्या डोळ्यांत पाणी येते, पण त्या पाण्याची किंमत ना पुरुषाला ना स्त्रीला. म्हणूनच तिच्या आयुष्यात कायम दुष्काळ असतो. जिवंत असताना तिला तिनेच आणलेले पाणी कुणी देत नाही. बस मरतानाच तिला पाणी मिळते.’

नीरजा भटनागर म्हणाल्या, ‘जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा स्त्रीचे अधिकार जप्त होतात. ही सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. ती एकटी, असहाय्य आहे म्हणत बहुतांशवेळा ढोंग माजवले जाते. त्यापेक्षा तिला या देशाची नागरिक समजा. जेणेकरून तिला एका स्वतंत्र नागरिकाचे अधिकार मिळतील. दुसरे म्हणजे ती घरी असते. म्हणजे ती काहीच करत नाही असा अर्थ लावणे म्हणजे तिच्या प्रेमाचा, तिच्या काळजीचा अपमानच आहे. अॅक्शन अॅडने या विषयावर ‘मेरी बीवी कुछ नही करती’ अशी डॉक्युमेंटरी बनवली होती. ज्यामध्ये सर्व पुरूष असेच म्हणाले की त्यांची घरातली सर्व कामे पत्नी करतात, पण बाकी काही करत नाही. प्रत्येक कामाची तुलना पैशांमध्ये होत नाही. काही देशांमध्ये गृहिणींना कामगाराचा दर्जा आहे. आपण दर्जा तर दूर साधे तिच्या कामाचे कौतुक करत नाही.’ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रिया धारूरकर, फुलतांबा आशा केंद्राचे धनंजय धनवटे, पत्रकार पद्मभूषण देशपांडे, प्रा. युसूफ बेन्नूर आदी उपस्थित होते.

एकही मागणी पूर्ण नाही
दीप्ती राऊत म्हणाल्या, ‘महिला ही संकल्पना अजून स्वीकारलीच गेली नाही. समाजात तिचे स्थान दुर्लक्षित आहेच. पण माध्यम प्रतिनिधी म्हणूनही मला खेदाने म्हणावे लागते की, ती पहिल्या पानावर दोनवेळा असते. एक तर तेव्हा जेव्हा ती अंतराळात जाते आणि दुसऱ्यांदा जेव्हा तिच्यावर बलात्कार होतो तेव्हा. एरवी मधल्या राखाडी पानांमध्ये तिचे अस्तित्व नसतेच. १९९४ मध्ये औरंगाबादमध्ये परितक्त्या हक्क परिषद घेण्यात आली. त्यावेळी सहा लाख परितक्त्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यातून एकल महिलांचे प्रश्न व मागण्या पुढे आल्या. गंमत म्हणजे एकल महिला व पाणी प्रश्न अभ्यासातही त्याच मागण्या आल्या आहेत. अर्थात २०१७पर्यंत परितक्त्यांची संख्या वाढली व आता आधार कार्ड सक्तीचे झाले. हे दोन बदल वगळता इतक्या वर्षात शासनाला या महिलांची एकही मागणी पूर्ण करता आली नाही. कारण आपत्ती कोणतीही असली तरी त्याचे परिणाम स्त्रीलाच भोगावे लागतात.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेंट्रल कॅश कलेक्शन सेंटर उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ग्राहकांची वीज बिल भरण्यासाठी होणारी गैरसोय टळावी म्हणून राज्यात लवकरच ६७ ठिकाणी कॅश कलेक्शन सेंटर सुरू गेले जातील,’ अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष संजीवकुमार यांनी शनिवारी दिली.

महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने राज्यतील महावितरण कर्मचारी आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यातील संवाद कार्यक्रम तापडिया नाटयगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहव्यवस्‍थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, महाव्यवस्थापक शंकर शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, सी. एन. देशमुख, कृष्णा भोयर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात विविध ठिकाणांहून आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी, सूचना मांडल्या. त्यावर संजीवकुमार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘अनेक ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र दूर आहे. त्यामुळे अनेकांना अडचणी येतात. त्यासाठी राज्यात ६७ ठिकाणी ही सोय करू. महावितरण सध्या तोट्यात आहे. तुम्ही पैसे वसूल करा. मी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतो. वीज कर्मचाऱ्यांच्या रजेपासून ते बढतीपर्यंतची सर्व कामे ऑनलाइन होतील. अॅपवरूनही कर्मचाऱ्यांना रजा टाकता येईल.’

ठाणे येथे महावितरणची ११ ठिकाणी संपत्ती आहे. याबाबत वारंवार सांगूनही कारवाई करण्यात येत नाही, असा मुद्दा ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने मांडला. ‘आगामी दोन महिन्यांत ही कारवाई पूर्ण केली जाईल,’ असे त्यांनी सांगितले. वीज बिलाच्या तक्रार वेळेवर सोडविल्या जात नाहीत म्हणून नागरिकांकडे बिलाची थकबाकी वाढत जात आहे. असा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला. याबाबत स्पष्टीकरण देताना संजीवकुमार म्हणाले, ‘अभियंत्यांनी वीज बिलाच्या तक्रारी वेळेवर सोडवाव्यात. अन्यथा त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे जातील,’ असा इशारा त्यांनी दिला.

काथ्याकूट नको
महावितरण कार्यालयात वीज वसुलीसाठी सैनिक म्हणून महावितरण कर्मचारी तैनात असतात, मात्र कॅप्टन कार्यालयात असतो. ही तक्रार कर्मचाऱ्यांनी मांडली. या तक्रारीचा धागा धरत संजीवकुमार म्हणाले, ‘सैनिकासोबत कॅप्टन नसेल, तर मी असेन. फक्त कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध वागावे. एखादा निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करावी, मात्र निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाची चिकित्सा, काथ्याकूट करू नये. पोलिस, सैनिकाप्रमाणे निर्णयाची अंमलबजावणी करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरनेट युगात संवेदनशीलता शाबूत ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘इंटरनेट नामक माहितीचे महाजाल, साधनांची लयलूट अशा परिवर्तन व्यवस्थेत समाजाचे प्रश्न बदलले आहेत. या परिस्थितीत सामाजिक प्रश्नांची सोडवूणक करणे आपल्या पुढील आव्हान आहे. सरकारने ही जबाबदारी पेलताना संवेदनशीलता शाबूत ठेवावी,’ असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी शनिवारी केले.

माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांचा भानुदासराव चव्हाण सभागृहात मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रत्नाकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘माहिती, तंत्रज्ञानाच्या युगात समाज बदलत गेला, तसे प्रश्नही बदलत गेले. आजची पिढी ही रोखठोक, स्पष्टता, अधिरता, कल्पकता असलेली आहे. त्यामुळे समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उत्तरांची मांडणीही बदलावी लागेल. माहिती आणि बालहक्क आयोगातील प्रश्न हे समजाशी निगडित आहेत. दोघांची निवड त्यांच्या सामाजिक कार्याची पोच पावती आहे,’ असा उल्लेख त्यांनी केला. सत्काराला उत्तर देताना धारूरकर म्हणाले, हा सत्कार माझ्या जीवन प्रवासात मला प्रेरणा देणाऱ्यांचा सत्कार आहे. तर जबाबदारीची जाणीव निर्माण करून देणारा हा सत्कार असल्याची भावना घुगे यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी संगीता धारूरकर, वर्षा घुगे उपस्थित होत्या.

माहिती अधिकाराचा गैरवापर
सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘माहिती अधिकाराचा अनेकदा खंडणीखोरी, ब्लॅकमेलिंगसारखा गैरवापर होत आहे. असे असले तरी, या मूळ कायद्याची चौकट ही चांगली आहे. हा चांगुलपणा समाजासमोर येणे आणि त्याचा हेतू पाहणे गरजचे आहे. पत्रकारितेतून विधायकता हद्दपार होत आहे. नकारात्मक बातम्यांचे प्रमाण वाढले आहे,’ याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात आजपासून श्रमिक साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांना समर्पित करण्यात आलेल्या पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवारी (९ सप्टेबर) होत आहे. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आ. ह. साळूंखे अध्यक्षस्थानी असून ज्येष्ठ साहित्यिक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उदघाटक आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, ज्येष्ठ कादंबरीकार दिनानाथ मनोहर व ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे उपस्थित राहणार आहेत.
सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन (सीटू) या कामगार संघटनेतर्फे होत असलेल्या या दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाची सुरूवात रविवारी सकाळी आठ वाजता ग्रंथ सन्मान मिरवणुकीने होईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक निघणार आहे. माजी आमदार कॉ. नरसय्या आडम त्याची सुरूवात करतील.
जालन्यातील अंबड नाका परिसरातील शगून मंगल कार्यालयात कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्य नगरी उभारण्यात आली आहे. रविवारी दुपारी ‘कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. पत्रकार जयदेव डोळे अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख उपस्थितांत क‌ॉ. सईद अहेमद आणि वक्ते गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्म संगी यांचा समावेश आहे. त्यासोबतच रविवारी सायंकाळी ‘आम्ही दोघं’ ही लघुनाटिका आणि ‘परिवर्तनाचा जलसा’ ह‌ा कार्यक्रम होणार आहे. रविवारी रात्री निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images