Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नाथसागरातून पाणी सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्या झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे गुरुवारी रात्री ११च्या सुमारास नाथसागरातून दहा हजार क्युसेक पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. प्रकल्पाचे आठ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाथसागरात सुमारे १२ टक्के पाणी शिल्लक होते. जून महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. त्यामुळे नाथसागरात पाणी येण्यास सुरुवात झाली होती. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडला. त्यानंतर १५ ऑगस्टनंतर जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नगर व नाशिक जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. काल (बुधवारी) रात्री धरणातील साठा ८९ टक्क्यांपर्यंत पोचला होता. गुरुवारी नगर, नाशिक जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे ऊर्ध्व भागातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले, मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्त पाणलोटात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत वेगाने वाढ झाली.
गुरुवारी सायंकाळी सहापासून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले. सहा वाजता प्रकल्पात ७९ हजार क्युसेक पाणी येत होते. ते रात्री आठ पर्यंत एक लाख पाच हजार क्युसेक आणि रात्री नऊ वाजता एक लाख १७ हजार क्युसेकपर्यंत पोचले. रात्री आठ वाजता धरणात उपयुक्त साठा ९५.३२ टक्के होता. तो दहापर्यंत ९६.२० टक्क्यांपर्यंत पोचला.
येणाऱ्या पाण्याचे प्रमाण विचारात घेऊन शुक्रवारी सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र जास्त पाणी येत असल्याने गुरुवारी रात्री ११च्या सुमारास पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘कडा’च्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाच्या सत्र परीक्षा डिसेंबर अखेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिेया रखडल्यामुळे पदव्युत्तर वर्गाच्या तासिका तब्बल दोन महिने उशिरा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाचे कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक दुरूस्त करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत सत्र परीक्षा डिसेंबरच्या अखेरीस घेण्याचे निश्चित केले आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासन शुक्रवारी अधिकृत घोषणा करणार आहे.
विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षेत ‘सीईटी’ लागू केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. सीईटी ते स्पॉट अॅडमिशन हा गोंधळ तब्बल महिनाभर सुरू होता. प्रक्रिया पूर्ण होऊन एक सप्टेंबरपासून नियमित तासिका सुरू आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार ९० दिवस तासिका होणे बंधनकारक आहे. नियोजित परीक्षा आणि नियमात तफावत असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने समिती नेमून शैक्षणिक वेळापत्रक तयार केले. या समितीची वेळापत्रकासाठी गुरुवारी बैठक झाली. नियमांचे पालन करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर एकमत झाले. तसेच सत्र परीक्षा डिसेंबर अखेरीस घेण्यावर सदस्यांनी शिक्कामोर्तब केले. या शैक्षणिक वेळापत्रकाची शुक्रवारी घोषणा करण्यात येणार आहे.
दरम्यान, अभियांत्रिकी शाखेच्या ‘एटीकेटी’प्राप्त विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. परीक्षा विभागात नवीन नियमानुसारचे ‘सॉफ्टवेअर’ नाही. त्यामुळे ‘एमकेसीएल’च्या तज्ज्ञांनी विद्यापीठात प्रात्यक्षिक दाखवले. सॉफ्टवेअर कार्यान्वित करणे आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे गुणपत्रिका मिळण्यास किमान एक महिना लागेल असे सूत्रांनी सांगितले.

‘बामुक्टा’चे निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची सत्र परीक्षा एक नोव्हेबरपासून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्र परीक्षा ११ ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे परीक्षा घेणे त्रासदायक होईल. त्यामुळे परीक्षा एक नोव्हेंबरपासून घेण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टा) केली. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना गुरुवारी निवेदन दिले. यावेळी डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुद्र फाउंडेशनतर्फे अन्नदान

$
0
0

रुद्र फाउंडेशनतर्फे अन्नदान

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रुद्र फाउंडेशनच्या वतीने घाटी हॉस्पिटल व परिसरातील शेकडो रुग्णांचे नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. काही तरुणांनी एकत्र येत या फाउंडेशनची स्थापना केली आहे.
समाजातील वंचित घटकांना पोटभर अन्न देता यावे म्हणून फाउंडेशनच्या सदस्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध घरी न करता गोरगरीबांना अन्नदान केले.
सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी (बुधवारी) घाटी परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष निरज सोनवणे, सदस्य धनंजय सोनार, अभिजित सोनवणे, दिनेश चौधरी, गणेश चौधरी, धनंजय सोनार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजोबा-नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील महालगाव येथे तलावात आजोबा व चार वर्षाचा नातू गुरुवारी दुपारी चार वाजता वाहून गेले. दहेगाव शिवारात बोर नदीच्या पात्रातील पाण्यात पडून एका ५० वर्षाचा इसम मरण पावला.
महालगाव येथील बबनराव त्र्यंबक विखे (वय ५५, रा. बगडी तालुका गंगापूर) व वैभव ज्ञानेश्वर भंडारे (वय ४, रा. महालगाव) अशी आजोबा व नातवाची नावे आहेत. बबनराव विखे यांचा मृतदेह सापडला असून नातवाचा शोध सुरू आहे, अशी माहिती वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी दिली. तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे महालगाव येथील बस स्थानकाजवळचा तलाव तुडूंब भरला आहे. या तलावात हे दोघे वाहून गेले. दहीगाव शिवारातील बोर नदीच्या पात्रातील पाण्यात पडून संतराम देवराव सोनवणे (वय५०) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता सापडल्याचे वैजापूर पोलिसांनी सांगितले. वीरगाव-मुर्शदपूर येथे बुधवारी वीज पडून कारभारी पंढरीनाथ जाधव व संजय बारे यांच्या घराचे नुकसान झाले. वीज पडून संतोष रामदास कदम यांचे कापसाचे पीक जळाले. सिद्धापूरवाडीचा संपर्क रस्त्यावर पाणी साचल्याने तुटला आहे.

रिक्षा बुडाली

पैठणः जायकवाडी धरणासमोरील छोट्या पुलावरून गुरुवारी रिक्षा नदीत (एम एच २०, ई एफ १४१८) गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पडली. पुलावरील नागरिकांनी रिक्षाचालकाला नदीतून बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. मनोज मुरकुटे (वय ३०, रा. खडकेश्वर औरंगाबाद) याने गुरुवारी भाडे आणले होते. प्रवासी सोडल्यानंतर त्याला पैठण स्थानकातून जायकवाडी धरणाचे भाडे मिळाले. तो प्रवाशाला सोडून परत येताना हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंग मेन युनिटला ‘स्थायी’च्या मंजुरीचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंपहाउसमध्ये इन्व्हर्टरच्या धर्तीवर रिंग मेन युनिट लावण्यात येणार आहे. पण, ते महापालिका स्थायी समितीची बैठ आठवडाभरात न झाल्याने खर्चाला मान्यता मिळालेली नाही. या युनिटची किंमत २५ लाखांपेक्षा जास्त असल्याने खर्चाला स्थायी समितीच्या परवानगीची गरज आहे.
महापालिकेने जायकवाडी, ढोरकीन, फारोळा आणि नक्षत्रवाडी या चार ठिकाणी पंपहाउस उभारले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर या चारही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसल्याने पंपहाउस अनेक तास बंद राहते. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे महापालिकेने चारही पंपहाउसला इन्व्हर्टरच्या धर्तीवर रिंग मेन युनिट बसवून घ्यावे, अशी सूचना महावितरणला केली आहे. महापालिकेने युनिट बसवण्याचे पैसे भरले, तर महावितरण युनिट बसवून देण्यास तयार आहे. त्यावर एक महिन्यांपासून महापालिकेत खल सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फारोळा येथील पंपहाउसमध्ये रिंग मेन युनिट बसवण्यासाठी महापालिकेने दोन दिवसांपूर्वी महावितरणकडे २५ लाख रुपये धनादेशाव्दारे जमा केले. येत्या आठ-पंधरा दिवसात युनिट बसवण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जायकवाडी येथील पंपहाउसमध्ये युनिट बसवण्याचा खर्च २८ लाख रुपये आहे. पालिकेच्या नियमानुसार २५ लाखांपेक्षा जास्तीच्या खर्चाला स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता आहे. स्थायी समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून तोपर्यंत जायकवाडीच्या पंपहाउसवर विजेचा लपंडाव सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे.

कार्योत्तर मान्यता

सध्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित होत असून त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. स्थायी समिती सभापतींनी २८ लाखांच्या खर्चाला कार्योत्तर मान्यता देण्याची तयारी दाखवली, तर युनिट बसवण्याचे काम लवकर होऊ शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईच्या ‘ड्रीम होम’प्रदर्शनाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित ‘ड्रीम होम’ प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांनी केले. क्रांती चौकातील हॉटेल मॅनोर लॉन्स येथे हे प्रदर्शन सुरू झाले आहे.
व्यासपीठावर या वेळी क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार, सचिव आशुतोष नावंदर, ड्रीम होम प्रदर्शनचे चेअरमन नरेंद्रसिंग जबिंदा, माजी अध्यक्ष सुनील पाटील उपस्थित होते.
यावेळी मुगळीकर म्हणाले, ‘ड्रीम होम प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना अत्यंत माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याचा क्रेडाईचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे.’ हे प्रदर्शन गुरुवार ते रविवार दररोज सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले असेल. क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी आपल्या संबोधनात जीएसटी आणि 'रेरा' नंतर बांधकाम व्यवसायामध्ये आलेली मंदी आता ओसरली असून, हा व्यवसाय पुन्हा वेग घेत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सचिव आशुतोष नावंदर यांनी केले. प्रदर्शन यशस्वीतेकरिता क्रेडाईचे विकास चौधरी, नीलेश अग्रवाल, विजय शक्करवार, अर्चित भारूका, रमेश नागपाल, नितीन बगडिया, देवानंद कोटगिरे, पंजाब तौर, रामेश्वर भारूका, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, बालाजी येरावार, रोहित सूर्यवंशी आदी प्रयत्नशील आहेत.

अडीचशेपेक्षा जास्त प्रकल्प

प्रदर्शनात शंभरावर दालने असून, ६० बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या अडीचशेपेक्षा जास्त योजना यात सादर केल्या आहेत. याशिवाय विविध वित्तीय कंपन्या, गृहसजावट यांचीही दालने आहेत. एमएसईबी, महापालिका, सिडको, पर्यटन विकास महामंडळ आदींचीही दालने आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांनी केली महापौरांची कानउघाडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुलीच्या कामाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांनी गुरुवारी महापौर भगवान घडमोडे यांची तिखट शब्दांत कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ‘मटा’ शी बोलताना सावे यांनी ‘कर वसुलीच्या खासगीकरणाला भाजपचा विरोध आहे. खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याबद्दल आपण आयुक्तांना पत्र देणार असल्याचे सांगितले.
मालमत्ता कर आकारणी, मालमत्तांचे सर्वेक्षण आणि वसुलीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव महापौर भगवान घडमोडे यांनी गुपचूप मंजूर केला. या संदर्भातील वृत्त ‘मटा’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महापालिकेत खळबळ उडाली. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी कर वसुलीच्या कामाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सावे आणि महापौर घडमोडे एकत्र आले. यावेळी सावे यांनी महापौरांना गुपचूप मंजूर केलेल्या प्रस्तावाबद्दल जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘कर वसुलीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. नागरिकांमध्ये वेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांची परवानगी घ्यायला हवी होती. जो प्रस्ताव मंजूर केला, त्यात बदल करावा लागेल,’ असेही त्यांनी महापौरांना सांगितले. आमदारांनीच कानउघाडणी केल्यामुळे महापौर अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान ‘मटा’ शी बोलताना सावे म्हणाले, ‘मालमत्ता सर्वेक्षणाच्या कामाचे खासगीकरण करणे ठिक आहे, पण कर वसुलीच्या कामाच्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे. सर्वेक्षण खासगीकरणातून झाल्यावर कर वसुली महापालिकेनेच केली पाहिजे. सगळ्याच कामाचे खासगीकरण झाले, तर महापालिका काय काम करणार ? कचरा संकलन व वाहतुकीचे खासगीकरण करण्याचा ठराव देखील असाच गुपचूप मंजूर केल्याचे समजले आहे. तो प्रस्ताव देखील आपण मागवला आहे,’ असा उल्लेख सावे यांनी केला.

शिवसेना कोर्टात जाणार

कर वसुलीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करा, या कामासाठीची टेंडर प्रक्रिया करू नका, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेतर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. टेंडर प्रक्रिया केली, तर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक व माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी हे पत्र दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...अंबा बैसली सिंहासनी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्णपुऱ्यातील देवीची घटस्थापना, महापूजा, महाआरती गुरुवारी सकाळी सात वाजता करण्यात आली. त्यानंतर शहरातील नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

कर्णपुरा येथील मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिराचे पुजारी व कर्णपुरा नवरात्र महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी यंदाचे अध्यक्ष अंकुश दानवे, करणसिंग काकस, संतोष दानवे तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कर्णपुरा यात्रेला देखील गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिर, हर्सूल हरसिध्दी माता, कोर्टाची देवी, हिंगोलांबिका मंदिर, एन नऊ परिसरातील रेणुका माता मं‌दिर आदी मं‌‌दिरात देखील पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. हरसिद्धी देवीच्या मंदिरातही गुरुवारी सकाळी सात वाजता घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष जनार्दन औताडे, संजू सांडू हरणे, रावसाहेब औताडे, डॉ. भरत हरणे, उत्तमराव चव्हाण, गोकुळ जैस्वाल, नंदू हरणे, बंडू देवा, चंद्रकांत औताडे, मंदिराचे पुजारी भालेकर यांची उपस्थिती होती.

साताऱ्यात गर्दी
सातारा परिसरातील रेणुका माता मंदिरात सकाळी घटस्थापना करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नवरोत्सवाच्या काळात होमहवनासह या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच साताऱ्यातील हायकोर्ट कॉलनी येथेही सार्वजनिक नवरात्र उत्सवाला सुरुवात गुरुवारी सुरुवात झाली. या ठिकाणी रास-दांडियाचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.

अधिकृत वीज जोडणी घ्यावी
नवरात्र उत्सवात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाय योजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रती युनिट तीन रुपये १० पैसे अधिक एक रुपया २१ पैसे वहन आकार अर्थात व्हिलिंग चार्जेस व इंधन असे वीज दर निश्चित केले आहेत. व्हिलिंग चार्जेससह हा दर घरगुती वीज दरापेक्षा फक्त १० पैशांनी अधिक आहे. तर वाणिज्यिक दरापेक्षा दोन रुपये ९९ पैसे प्रतियुनिट कमी आहे. नवरात्र उत्सवात काही ठिकाणी अधिकृत वीज जोडणी न घेता घरगुती किंवा अन्य मार्गाने अनधिकृत वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय नवरात्र उत्सव मंडळासमोर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उत्सव मंडळांनी वीज जोडणीसाठी जवळच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ कत्तलखाना उभारणी; कंत्राटदाराला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत तीन वर्षांपूर्वी अत्याधुनिक कत्तलखाना उभारणीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होते. कंत्राटदाराला बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने प्रकल्पाचे काम रखडल्याचे शुक्रवारी समोर आले. त्यानंतर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

२०१४ च्या प्रारंभी पडेगाव येथे पालिकेच्या जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा कत्तलखाना उभारणीचा प्रस्ताव तत्कालीन महापौर कला ओझा यांच्या काळात मंजूर झाला. त्यानंतर ३४ कोटींच्या या पीपीपी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया जुलै २०१४मध्ये राबविण्यात आली. ६ एजन्सींपैकी अल कुरेश एक्सपोर्ट ही एजन्सी निश्चित करून कार्यारंभ आदेशही देण्यात आले. मात्र, उर्वरित सहापैकी ‘मे. फ्रिगोरिफिकी अलाना लिमिटेड’ कंपनीने पालिकेच्या निविदा प्रक्रियेला हायकोर्टात आव्हान दिले. त्यामुळे वर्षभर काम रखडले. २२ जून २०१५ रोजी पालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आजपर्यंत पालिका प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. दरम्यान, कंत्राटदाराकडेही पैसा उपलब्ध नसल्याने त्याने काम सुरू केले नाही, ही बाब जेव्हा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासमोर आली, तेव्हा त्यांनी शुक्रवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आढावा बैठक घेतली. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरही कत्तलखान्याचा प्रकल्प का रखडला ? याचा जाब आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विचारला. या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाचे काम का सुरू केले नाही ? याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटीस पाठविण्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, उपायुक्त अयुब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी स्कॅनच्या दुरुस्तीला कंपनीचा नकार

$
0
0

सिटी स्कॅनच्या दुरुस्तीला कंपनीचा नकार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वार्षिक देखभालीचे थकलेले २५ लाख रुपये डिसेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन देऊनही, कंपनीचा आडमुठेपणा कायम असून, कंपनीने घाटीतील स‌िक्स्टीफोर स्लाइस सिटी स्कॅन मशीनच्या दुरुस्तीला नकार दर्शवला आहे. परिणामी, घाटीतील एकमेव चालू स्थितीतील ६ स्लाइस सिटी स्कॅन मशीनवर तपासण्यांचा दुप्पट ताण वाढला आहे. सद्यस्थितीत ६ स्लाईस मशीन जवळजवळ २४ तास सुरू आहे आणि त्यावर दररोज किमान ८० ते ९० रुग्णांची तपासणी होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागामध्ये स‌िक्स्टीफोर स्लाइस व ६ स्लाइस अशा दोन सिटी स्कॅन मशीन आहेत. मात्र, मागच्या आठवड्यापासून स‌िक्स्टीफोर स्लाईस मशीन बंद पडले आहे. त्याचवेळी संबंधित स‌िक्स्टीफोर स्लाईस सिटी स्कॅन मशीनच्या वार्षिक देखभालीचे (सीएमसी) २५ लाख रुपये गत जूनपासून थकल्याचा संदर्भ देत कंपनीने मशीनच्या दुरुस्तीस नकार दिला. त्यानंतर डिसेंबरपर्यंत थकलेले पैसे देण्यात येतील, असे लेखी आश्वासनही घाटी प्रशासनाच्या वतीने कंपनीला देण्यात आले. मात्र, त्यानंतरही कंपनीने मशीनच्या दुरुस्तीला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. स‌िक्स्टीफोर स्लाईस मशीन बंद पडल्यामुळे विभागातील ६ स्लाइस मशीनवर तपासण्या दुपटीने वाढल्या आहेत व हे प्रमाण मशीनच्या क्षमतेच्या कितीतरी जास्त आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, सध्या ६ स्लाइस मशीनवर दररोज ८० ते ९० रुग्णांच्या तपासण्या होत असून, या अतिरिक्त ताणामुळे ६ स्लाइस मशीन बंद पडली तर घाटीमध्ये सिटी स्कॅनची सुविधाच राहणार नाही, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, लेखी आश्वासन देऊनही दुरुस्तीला नकार देणाऱ्या कंपनीला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये का टाकू नये, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दोन महिन्यांपूर्वी ६ स्लाइस मशीनदेखील ‘ट्यूब’अभावी दीड-दोन महिने बंद पडली होती. त्याच्या निधीच्या मंजुरीसाठीही
मोठी प्रशासकीय कसरत करावी लागली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीसाठी २३ लाखांचा गंडा; एक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये लिपिक व शिपाई पदाच्या नोकरीचे आमीष दाखवून तब्बल २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर आले असता, मंगळवारपर्यंत (२६ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले. दत्तात्रय हरिभाऊ आंभोरे (वय ४२, रा. रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालना), असे त्याचे नाव आहे.
या प्रकरणी उत्तम पुंजाजी झिने (वय ५५, रा. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ते एसएससी बोर्डामध्ये गणित विषयाचे नियामक म्हणून काम करीत होते. त्यांच्या हाताखाली संशयित आरोपी दत्तात्रय हरिभाऊ आंभोरे (वय ४२, रा. रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालना) हा काम करत होता. दत्तात्रय याने ऑक्टोबर २०१४ मध्ये झिने यांची ओळख संशयित आरोपी राजेश झांगोजी सोनटक्के (वय ४२, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) याच्याशी करून दिली. त्यातून सोनटक्के याने झिने व दत्तात्रय याला घरी भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी सोनटक्के याने महावितरण (कल्याण), विक्रीकर कार्यालय (ठाणे), वखार महामंडळ (औरंगाबाद), पशुसंवर्धन विभाग (पुणे) आदी ठिकाणी शिपाई व लिपिकपदाची भरती होणार असून, कोणी ओळखीचे असेल तर सांगा, त्यांना नोकरीला लावून देतो, असे आमीष दाखवले. शिपाईसाठी सात लाख, तर लिपिकपदासाठी नऊ लाख रुपये लागतील, असे सांगितले. झिने यांची मुलगी शुभांगी उत्तम झिने (वय २५), भाचा ज्ञानेश्वर देवेंद्र जाधव (वय २५, रा. लोणी गवळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा), सुधीर रमेश सरकटे (वय २७, रा. हिवरा गडलिंग, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा), विकास सुभाष चव्हाण (वय ३०, रा. चिलखीरोड, बुलडाणा) व नितीन मारोती अंभोरे (वय २७, रा. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) यांच्याकडून त्याने २३ लाख रुपये घेतले. उर्वरित पैसे नियुक्ती आदेशानंतर देण्याचे ठरले. पण, नियुक्ती आदेश न देता टाळाटाळ केली. पाठपुरावा केल्यानंतर सोनटक्के याने बनावट नियुक्ती आदेश दिले. हा प्रकार उघड झाल्यानंतर तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी दत्तात्रय हरिभाऊ आंभोरे याला गुरुवारी अटक करण्यात आली, तर आरोपी सोनटक्के पसार झाला आहे.

पुरावे जप्त करणे बाकी

आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्हा गंभीर असून, आरोपीकडून २३ लाख रुपये, बनावट कागदपत्रे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करणे बाकी आहे, फरार आरोपी व मुख्य सूत्रधार राजेश सोनटक्के याला अटक करावयाची आहे, त्याचप्रमाणे आरोपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनिलकुमार जोंधळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेकइनोवा २०१७ स्पर्धा; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भावी अभियंत्यांची सृजनशिलता, कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणारा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असा ठरणाऱ्या ‘टेकइनोवा २०१७’ या महोत्सवास देवगिरी कॉलेजच्या मैदानावर शुक्रवारी जल्लोषात सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या टेक्निकल आणि नॉन टे‌क्निकल उपक्रमात १९ स्पर्धां घेतल्या जाणार आहेत.
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातर्फे ‘टेकइनोवा २०१७’ या आंतरमहाविद्यालयीन टेक्निकल आणि नॉन टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. शेख सलीम, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर आदी उपस्थित होते. रोबोरेस, लाइन फॉलोव्हर, रोडिस, साईनीजिन्स, कॅडमेनिया, पिक्सल, सरर्किटरिक्स, रॉकेट बुस्टर, किंग ऑफ बोर्ड या इव्हेंट यावेळी घेण्यात येत आहेत. या इव्हेंटमध्ये खास आकर्षण ठरले ते पेंटबॉल या स्पर्धेचे. मराठवाडास्तरावर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा प्रथमच घेण्यात आली असल्याचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर यांनी सांगितले. गोवा येथून यासाठी आवश्यक साहित्य आणण्यात आले आहे. शहरातील विविध कॉलेजांचे तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा यात सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती प्रा. रोहित कोळेकर यांनी सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी योगेश्वरी चिंतामणी, श्रीकृष्ण पाटील, शिवाजी थट्टीकोट्टा, विलास सोनवणे, अनिरुद्ध कुमार, प्रसाद कोरडे, भावेश सोनवणे, गितांशू जरीवाला, नोमान खान, यश पारेख, शालीवान जोशी,आदर्श सिंग आदी परिश्रम घेत आहेत. या महोत्सवात तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. रोबोरेस, पेंटबॉल आदी उपक्रमाचे आकर्षण विद्यार्थ्यांत आकर्षण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमात ए इस्लामीचा रोहिंग्याप्रश्नी मोर्चा

$
0
0

औरंगाबाद - रोहिंग्या मुस्लिमांवरील होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ जमात ए इस्लामी हिंदच्या वतीने शुक्रवारी औरंगाबादेत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
म्यानमार येथे गेल्या महिन्यांपासून रोहिंग्या मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. यात निष्पाप नागरिक भरडले जात आहेत. म्यानमार सरकार आणि तेथील लष्कर करत असलेल्या अत्याचाराच्या निषेध करत हा मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यात केंद्र सरकराने आणि आंतररराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्यांची दखल घ्यावी, निष्पाप रोहिंग्या निर्वासितांना मान्यमारमधील परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत भारतात राहण्याची परवानगी द्यावी, शांतताप्रिय देशांनी म्यानमारशी संबंध तोडावेत, भारत सरकारने म्यानमारशी या प्रश्नावर बोलून मदत निर्वासितांना मदत करावी, आदी मागण्या मांडण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर, जिल्हा परिषदेत पोलिसांना बोलवले जाईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आम्ही न्याय मार्गाने आंदोलन केले. जिल्हा परिषदेत पोलिसांना कसे काय बोलाविले गेले ?,’ असा सवाल सदस्यांनी उपस्थित करताच मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी ‘मी प्रशासनाचा प्रमुख आहे. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर मी कधीही पोलिसांना बोलावू शकतो. यापुढेही असे प्रसंग उद्भवले, तर पोलिसांनी बोलाविले जाईल,’ असे ठणकावून सांगितले. त्यामुळे सदस्य निःशब्द झाले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी घेण्यात आली. झेडपी अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती कुसुम लोहोकरे, धनराज बेडवाल, विलास भुमरे, सीईओ मधुकरराजे अर्दड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, वासुदेव सोळंके, कॅफो जे. बी. चव्हाण यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
विषय पत्रिकेवर फारसे महत्त्वाचे विषय नसल्याने सुरुवातीलाच समाजकल्याण विभागांतर्गतच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांचा विषय चर्चेला आला. या विषयावरून सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सीइओंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सीइओ अर्दड यांनी लवकरच २३७ प्रस्तावांच्या प्रशासकीय मान्यता वैधता तपासून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. ही कामे अडीच कोटींची आहेत.
समाजकल्याण विभागांतर्गत दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांच्या संचिकांचा प्रवास नऊ महिन्यांपासून सुरू आहे. मराठवाडा मुक्‍त होउन ६९ वर्षे झाली. न्याय मागणीसाठी आंदोलन केल्यावर पोलिसांना बोलावून अटक कशी काय केली ?,’आदी प्रश्‍नांचा खुलासा सदस्यांनी मागितला. सीईओ अर्दड यांनी अध्यक्षांच्या सूचनेनुसार स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, दलित वस्त्यांच्या कामांना मंजुरीचा विषय २०१६ पासून प्रलंबित होता. संबंधित अधिकारी दीर्घ रजेवर गेल्याने पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला. त्यांनी प्राधान्यक्रमाने दलित वस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याचे काम केले. २२७ पैकी ६१ गावातील दलित वस्त्यांना योजना सुरू झाल्यापासून एक रुपयाचा देखील लाभ झालेला नव्हता. या ६१ पैकी ११ गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यांना प्रशासकीय मान्यता दिली. उर्वरित ५० गावांचे प्रस्ताव आलेले नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याचे व आणखी गावे वंचित आहेत काय ? याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘मराठवाडा स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली. मग या वंचित गावांना का लाभ मिळू शकला नाही ? याचा सदस्यांनी कधी लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाला का जाब विचारला नाही ?,’ असे सीईओंनी विचारताच सदस्य एकदम शांत झाले. प्रशासकीय प्रमुख म्हणून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर पोलिस बोलावणे हे माझे कर्तव्य आहे. यापुढेही असे प्रसंग घडले तर पोलिसांना बोलाविले जाईल, असे अर्दड यांनी सांगितले. त्यानंतर बैठकीतील नूरच बदलला.
सभेत शाळा खोल्या दुरुस्ती, आरोग्य विभागातील अडचणींवर चर्चा झाली. रमेश गायकवाड, अविनाश गलांडे, किशोर पवार, रमेश बोरनारे, किशोर बलांडे, जितेंद्र जैस्वाल आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाचे प्रसंगावधान; मोठा अपघात टळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर
पुणे रस्त्यावरील लुधियाना ढाब्याजवळ शिर्डी-औरंगाबाद बसचे स्टेअरिंग लॉक झाले. पण, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडला.
एसटी महामंडळाची शिर्डीहून औरंगाबादला जाणारी बस (एम एच १४ बी टी ३८२४) ही बजाज कंपनीपुढून गेल्यानंतर अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी बसमध्ये ४८ प्रवासी होते. बसचालक गजानन वानखेडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांना ओरडून बस फेल झाल्याची सूचना दिली. त्यांनी वेगात असलेल्या बसवर ताबा मिळवत रस्त्याच्या डाव्या बाजुला एका झाडवर बस आदळून थांबवली. बसचालकाने आधीच सूचना दिलेली असल्याने प्रवाशांनी घट्ट पकडून ठेवले होते. त्यामुळे झाडावर बस आदळल्यानंतर एकाही प्रवाशाला खरचटले नाही. या प्रयत्नात चालक किरकोळ जखमी झाला. बसमधील सर्व प्रवाशाने वानखेडे यांचे आभार मानले. बस रस्त्यावरून खाली उतरवली नसती, तर मोठा अपघात झाला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाथसागरातून विसर्ग वाढविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणातून गुरुवारी रात्री दहा हजार क्युसेकने होणाऱ्या पाण्याचा विसर्ग शुक्रवारी वाढवून १३ हजार ५८४ क्युसेक करण्यात आला. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून, ९८.४ टक्के जलसाठा शिल्लक ठेवून येणारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातील धरणे व पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक याचा अंदाज घेतल्यावर जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणातून शुक्रवारी सकाळी सात वाजता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गुरुवारी संध्याकाळी जलसंपदा विभागाच्या अंदाजापेक्षा जास्त पाणी प्रकल्पात येत होते. पाण्याची आवक एक लाख पाच हजार क्युसेकपर्यंत पोचली व धरणातील साठा ९८ टक्क्यांवर पोचला. त्यामुळे जलसंपदा विभागाने गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्रभर धरणाच्या १८ दरवाजांतून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यात शुक्रवारी दुपारनंतर वाढ करण्यात आली.

ऊर्ध्व भागातून येणारी आवक धरणातील पाणीसाठा याचा अंदाज घेतल्यावर शुक्रवारी पाण्याचा विसर्ग दहा हजार क्युसेकवरून १५ हजार क्युसेक केला. सध्या जायकवाडी धरणातून पंधरा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेतल्यावर धरणातून किती व कधीपर्यंत पाणी सोडायचे, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, १८ दरवाजांसह धरणाच्या डाव्या कालव्यातून एक हजार क्युसेक व उजव्या कालव्यातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील आवक घटली
गुरुवारी संध्याकाळपर्यंत जायकवाडी धरणात ५० हजार क्युसेकच्या आसपास पाण्याची आवक सुरू होती. रात्री त्यात वाढ होऊन पाण्याची आवक एक लाख पाच हजार क्युसेकपर्यंत पोचली. शुक्रवारी पाण्याची आवक २५ हजार क्युसेसपर्यंत कमी झाल्याची माहिती शाखा अभियंता चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी धरणात १४ हजार २४८ क्युसेस पाणी येत होते.

धरणावर बघ्यांची गर्दी
तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असलेले दृष्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

९८.४ टक्के साठा राखणार
रिजर्वायर ऑपरेशनल शेड्यूल (आरओएस) प्रणालीनुसार एक ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात ९८.४ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवला जाऊ शकत नाही. यानुसार आम्ही धरणात ९८.४ टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवणार असून, उर्वरित पाणी नदीपात्रात सोडून देण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणाच्या १८ दरवाजांतून पाणी सोडण्यात येत आहे. त्यापैकी आठ दरवाजे एक फूट व दहा दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज दाखल करण्यासाठी कन्नड तालुक्यात गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी. कन्नड
तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली असून अर्ज भरण्यसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पण, पितृपक्ष व परिपूर्ण माहितीअभावी पहिले दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नाही. सोमवारनंतर ऑनलाइन अर्ज व परिपूर्ण संच दाखल करण्यासाठी सुरुवात झाली. सरपंचपदासाठी शुक्रवारपर्यंत २१५, तर सदस्यासाठी १०८९ अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली. वेळ संपल्यानंतरही उशिरापर्यंत गर्दी होती. अंतिम चित्र छाननीनंतर स्पष्ट होणार आहे. तालुक्यातून ५१ सरपंचपद व १५५ प्रभागातून ४२९ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यात बहीरगाव, नाचनवेल, हस्ता, मेहगाव, वासडी, आडगाव (पिशोर) या प्रमुख गावांचा समावेश आहे. सरपंचपदासाठी तालुक्यात खुल्या प्रवर्गातून १४, महिला खुला प्रवर्ग ६, ओबीसी खुला प्रवर्ग १२, ओबीसी महिला ८, अनुसूचित जाती खुला प्रवर्ग ३, अनुसूचित जाती महिला ५, अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग २, अनुसूचित जमाती महिला १, असे आरक्षण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासूबाई, आतातरी जाऊ द्या माहेरा

$
0
0


सासूबाई, आतातरी जाऊ द्या माहेरा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कार्ल्याचा वेल लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा
कार्ल्याचा वेल लावला
हो सासूबाई
आतातरी जाऊ द्या....’
असे म्हणत सूनबाई घरातली सर्व जबाबदारी पूर्ण करूनच माहेरी जाते. अनंत चतुर्दशीला गणपती विर्सजन झाल्यानंतर कोजागरीपर्यंत संबंध महिना चालणाऱ्या भुलाबाईचे खेळ गंमत वाटत असले, तरी त्यातला गोडवा व मार्धुय आजही ताजा व टवटवीत भासतो.
महाराष्ट्र टाइम्स व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये महिला व मुलींना भुलाबाईचा पारंपरिक खेळ पाहण्याची संधी मिळाली. एन सातच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मैत्रिण ग्रुपच्या सदस्यांनी हा पारंपारिक खेळ खेळला. यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, सुनीता पाठक, सुलभा जोशी, शुभांगी कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी, रमाकांत रौतल्ले उपस्थित होते. यावेळी मैत्रिण ग्रुपच्या सदस्यांही पारंपरिक वेशभूषेत आल्या होत्या. नवरात्रीमध्ये रोज होतो तो भोंडला. हस्त नक्षत्रात असल्याने पाटावर हत्तीचे ‌‌चित्र काढून मुली एकत्र येतात. हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात व त्याची पूजा करतात. या पूजेची विशिष्ट गाणी असल्याने पहिल्या दिवशी एक गाणे, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे गाणी वाढवली जातात. विर्दभात हे खेळ भुलाबाई या नावाने अधिक प्रसिद्ध आहेत. हा खेळ विविध गाणी सादर करत मैत्रिण ग्रुपने खुलवला. मैत्रिण ग्रुपतर्फे अमिता लेकुरवाळे, सीमा भोईर, प्राची बासरकर, गायत्री कुलकर्णी, मेघा मोघे, सुनीता भाले, गौरी कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी खेळात सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळी मराठवाड्यात मोठ्या खंडानंतर का होईना वरुणराजाने कृपादृष्टी केली असून, शुक्रवारपर्यंत (२२ सप्टेंबर) मराठवाड्यातील ७६पैकी सात तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, ३० तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्याच्या इतर तालुक्यांत दमदार पाऊस झाला असला, तरी नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत चिंता कायम आहे.

विभागात दररोज दमदार पावसाची हजेरी सुरू असून, गुरुवारी १५ मंडळात, तर शुक्रवारी तीन मंडळात अतिवृष्टी झाली. आतापर्यंत विभागातील वाशी, केज, रेणापूर, वैजापूर, परंडा, पाटोदा व आष्टी या सात तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ३० तालुक्यांमध्ये ७५ ते ९९ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. यामध्ये जाफराबाद, बदनापूर, फुलंब्री, अहमदपूर, कळंब, वडवणी, घनसावंगी, धारुर, भोकरदन, देवणी, भूम, तुळजापूर, औंढा नागनाथ, उमरगा, शिरूर कासार, सिल्लोड, औरंगाबाद, निलंगा, नांदेड, अंबेजोगाई, लातूर, मुदखेड, चाकूर, परतूर, बीड, मंठा, जालना, अंबड, शिरुर अनंतपाळ, उस्मानाबाद, वाशी आणि केज तालुक्यांचा समावेश आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंत मराठवाड्यात १४.२० मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक ३१ मिलिमीटर पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यात झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १५.४८, जालना १७.९७, परभणी ६.३६, हिंगोली ८.४९, नांदेड ६.०९, बीड १४.१५, लातूर १३.७० असा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत वाघ्रुळ जहांगीर (ता. जि. जालना), टागळसिंग (ता. आष्टी. जि. बीड), पारगाव (ता. वाशी जि. उस्मानाबाद) येथे अतिवृष्टी झाली.

१८ तालुक्यात ६० टक्केही नाही!
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात दमदार पाऊस होत असताना विभागातील १८ तालुक्यांत ६० टक्केही पाऊस झाला नाही. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यांचा; तसेच नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये माहूर, देगलूर, पाथरी, हिमायतनगर, कळमनुरी, किनवट, पालम, खुलताबाद, सोयगाव, गंगाखेड, बिलोली, वसमत, नायगाव, धर्माबाद, हदगाव, उमरी, जिंतूर, परभणी तालुक्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैसर्गिक आपत्तीमध्ये ६१ जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे दुष्काळाची दहशत आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती असा दुहेरी फटका यंदा मराठवड्याला बसला आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये आपत्तीमध्ये ६१ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये ३४ जणांचा वीज पडून, तर २३ जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.
यंदा मराठवाड्यात काही मंडळांमध्ये अतिवृष्टीही झाली. पण, तब्बल ५० दिवस पाऊस गायब होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बीड, उस्मानाबाद आणि लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली, सप्टेबरमध्येही दमदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ७ तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक, ३० तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. गेल्या काही दिवसात नांदेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून ६ जणांचा पुरात वाहून गेल्याने व १७ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातही ५ जण पुरात वाहून गेले, ४ जणांचा वीज पडून तर एकाचा दरड अंगावर पडल्याने मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक घरांची पडझड झाली असून १०२ पक्की घरे व ३६६ पक्क्या घरांची अशंतः पडझड झाली. जिल्ह्यात ७ गोठे बाधित झाले आहेत. जालना जिल्ह्यातही २४ पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली असून ५ गोठ्यांना नुकसान झाले आहे. इतर जिल्ह्यात मालमत्तेचे नुसान झाल्याची नोंद नाही.

४४ प्रकरणात मदत, १७ प्रलंबित
आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत करण्यात येते. मराठवाड्यात झालेल्या ६१ प्रकरणांपैकी ४४ जणांच्या कुटुंबियांना एक कोटी ७६ लाख रुपये मदत देण्यात आली असून १७ प्रकरणे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

नांदेड जिल्ह्याला फटका
अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा सर्वाधिक नांदेड जिल्ह्याला बसला असून येथे तब्बल २३ जणांना जीव गमवावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यात १०, जालना ६, परभणी ८, हिंगोली ४, बीड ४, लातूर २, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ जणांना मृत्यू झाला. या तीन महिन्यांत १३६ मोठी, १४५ लहान दुधाळ जनावरे दगावली. ओढकाम करणारी मोठी ९९ तर १३ लहान जनावरांचा मृत्यू झाला आहे. यातील आतापर्यंत २१६ प्रकरणांत मदत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images