Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांच्या हवाई सफरीत तारखेचा घोळ

$
0
0

विद्यार्थ्यांच्या हवाई सफरीत तारखेचा घोळ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांच्या हवाई सफरीसाठी प्रायोजक मिळाला, पण आता ही सफर केव्हा करायची याबद्दल घोळ सुरू झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन गुणवंत विद्यार्थ्यांची थट्टा करीत असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाता यावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची तीन स्तरावर परीक्षा घेतली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या परीक्षेतून गुणवत्तेनुसार दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीला नेऊन दिल्ली दर्शन घडविण्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. दिल्लीवारीचा खर्च महापालिकेच्या तिजोरीवर पडू नये यासाठी प्रायोजक शोधण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी महापालिकेला शासनाकडून मोठा निधी मिळाला आहे. हा निधी महापालिकेने एस बँक मध्ये ठेवला आहे. एकाचवेळी मोठा निधी बँकेला ठेव म्हणून मिळाल्यामुळे बँकेने विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासाठी प्रायोजकत्व स्वीकारावे अशी गळ पालिकेने बँकेच्या व्यवस्थापनाला घातली. प्रायोजकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेण्यासाठी बँकेने बराच वेळ घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रायोजकत्व स्वीकारत असल्याचे बँकेने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विमान सफर निश्चित झाली आहे.
दसरा ते दिवाळीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दिल्ली दर्शन घडविण्याचे कच्चे नियोजन पालिकेच्या प्रशासनाने केले आहे. दहा विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागाचे चार कर्मचारी आणि काही पदाधिकारी देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. विमान सफरीची नेमकी तारीख मात्र अद्याप ठरलेली नाही. पदाधिकाऱ्यांच्या तारखा ठरल्यावर विमान सफरीची तारीख ठरवली जाणार आहे. प्रायोजक मिळाला, पण विमान सफरीची ताराखी ठरत नसल्यामुळे पालिका प्रशासन गुणवंत विद्यार्थ्यांची थट्टा करीत असलाचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूरहून किडनी औरंगाबादेत, हार्ट मुंबईत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लातूरमध्ये झालेल्या अपघातामध्ये १९ वर्षांच्या युवक ‘ब्रेन डेड’ झाला आणि त्याच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी अवयवदानाची शस्त्रक्रिया ही लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये यशस्वी झाली. त्यानंतर संबंधित युवकाचे दोन्ही मूत्रपिंड रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद शहरात पाठवण्यात आले आणि शहरातील दोन रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तयारी उशिरापर्यंत सुरू होती, तर युवकाचे हृदय लातूरहून थेट मुंबईला विमानाद्वारे पाठवण्यात आले.

लातूरमधील १९ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी अपघातानंतर ‘ब्रेन डेड’ झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मोठ्या धीराने व तात्काळ अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवदाच्या शस्त्रक्रियेची नुकतीच परवानगी मिळालेल्या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सर्व तपासण्या, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी अवयवदानाची शस्त्रक्रिया पार पडली. युवकाचे दोन्ही मूत्रपिंड रुग्णवाहिकेद्वारे रात्री साडेआठपर्यंत शहरात पाठवण्यात आले. हृदय खास विमानाने लातूरहून मुंबईच्या एशियन हॉस्पिटलला पाठवण्यात आले. यापैकी एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण शहरातील कमलनयन बजाज रुग्णालयात, तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण शहरातील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दोन्ही रुग्णालयामध्ये प्रत्यारोपणाची तयारी उशिरापर्यंत सुरू होती. तांत्रिक कारणामुळे युवकाच्या यकृत व फुफ्फुसाचे अवयवदान होऊ शकले.

लातूर-अंबाजोगाईच्या कॉलेजांना मान्यता
लातूर तसेच अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ‘नॉन ट्रान्स्प्लान्ट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर’ची (एनटीओआरसी) नुकतीच मान्यता मिळाली असून, दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता कधीही अवयवदाची शस्त्रक्रिया होऊ शकते. अशी मान्यता नुकतीच मिळाली असून, त्यानंतर काही दिवसांत लातूरमध्ये अवयवदानाची शस्त्रक्रिया झाली, असे ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेटर मनोज गाडेकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळी राजाराय येथे बोगस डॉक्टरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तालुक्यातील टाकळी राजाराय येथे एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव रफिक हबीब शेख (बाबरेकर) रा. बाबरा ता. फुलंब्री, असे आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिश्नर कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्या. अभय घुगे यांनी २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना टाकळी राजाराय येथे एक व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार एका व्यक्तिने खुलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरीष खेडकर यांच्याकडे सोमवारी केली होती. त्यावरून तालुका आरोग्य अधिकारी पांडवे, आरोग्य कर्मचारी खेडकर, पोलिस हवालदार मोहिते, देवरे, पोलिस शिपाई चव्हाण, साबळे यांनी टाकळी येथे जाऊन माहिती घेतली. त्यावेळी एक शटर असलेल्या दोन खोलीचे हॉस्पिटल आढळले. एका खोलीत तीन बेड होते. रफिक हबीब शेखकडे वैद्यकीय प्रमाणपत्राबद्दल चौकशी केली असता त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाल्याचे उघड झाले. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विद्यार्थ्यांचे होणार समायोजन

$
0
0


‘त्या’ विद्यार्थ्यांचे होणार समायोजन
आयटीआयच्या पाच ट्रेडला विद्यार्थ्यांची मागणी कमी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) पाच-सहा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी यंदा पाठ फिरवली. ग्रामीण भागातील २८ संस्थांमध्ये या जागा रिक्त आहेत. गवंडी, सुतारकाम, कारपेंटर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अनेक संस्थांमध्ये दोन-चार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. रिक्त जागांमुळे तुकडी पूर्ण होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांना जवळच्या संस्थेत वर्ग करण्यात येत आहे.
आयटीआय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यात वीजतंत्रीसारख्या अनेक ट्रेडला एका जागेसाठी ३०० विद्यार्थी रांगेत असतात. असे चित्र एकीकडे असताना काही ट्रेडकडे विद्यार्थीच फिरकत नसल्याचेही चित्र आहे. ज्यामध्ये ड्रेस मेकिंग, हेअर अँड स्किन सेट कार पेंटर, सुतारकाम, गवंडी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विभागात १६ आयटीआयमध्ये २८ ट्रेडच्या जागा रिक्त आहेत. अनेक ठिकाणच्या संस्थांमध्ये चार, पाच, सात, आठ, नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. एवढ्या कमी विद्यार्थी संख्येवर संबंधित विद्यार्थ्यांना त्या संस्थेत शिकवणे खर्चिक ठरते असे सांगत अशा विद्यार्थ्यांचे जवळच्या संस्थेत समायोजन करत तुकडी पूर्ण केली जात आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाटक’ विद्यार्थ्यांची मने जिंकते तेव्हा...

$
0
0

‘नाटक’ विद्यार्थ्यांची मने जिंकते तेव्हा...
शासकीय इंजिनिअर‌िंग विद्यार्थ्यांची एकांकिका द्वितीय
सायली बाभूळगावकर
कॉलेज क्लब रिर्पोटर,
शासकीय इंजिनीअरिंग.
अभियांत्रिकीच्या शिक्षणातून वेळ काढत विद्यार्थ्यांनी रचलेल्या ‘नाटक’ या एकांकिकेने तरुणाईचे लक्ष वेधले. जळगावमध्ये पार पडलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवित नाट्यकलेतही भावी अभियंते कमी नसल्याचे दाखवून दिले. ग्रामीण भागातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या तरुण कलावंताची फरफट तरुणाईने उत्तम मांडली आहे.
पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक, आणि जळगाव ये‌थील केसीई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या संघोने द्वितीय क्रमांक मिळविला. नामांक‌ित अशा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत खान्देश, मराठवाडा, विदर्भ आदी विविध विभागातील कॉलेजांचा सहभाग नोंदविला होता. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ‘नाटक’ एकांकितेतून कलावंत होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची होरपळ मांडली अन् या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. नाटक म्हणजे काय असते, कलावतं तरुणांच्या वेदना व धडपड ‘नाटक’मध्ये उत्कृष्टरित्या मांडण्यात आल्या आहेत. पुरुष गटात अभय पिंगळे याने अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविले. ज्येष्ठ कलाकार अरूण नलावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एकांकिकेत मंजुभाऊ माने, आशिष बाली, आकाश ताठे, सचिन सैनी, सायली बाभूळगावकर, नारायणी शिरसगावकर, स्वराली नांदगावकर, अजिंक्य अग्नीहोत्री, सिद्धांत मोहड, आदर्श मालपेंड्डीवार, अजय वानखेडे या विद्यार्थ्यांनी अभिनय केला आहे. शिवम पमनानी याने प्रकाशयोजना आणि प्रथमेश कानडे ने संगीत योजना तर, दिग्दर्शन आणि लेखन अभय पिंगळे याने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात संचालकांना घेराओ; जेवणाचा वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित संवाद कार्यक्रमात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या नाट्यगृहात मंगळवारी घेण्यात आला. वसतिगृहात निकृष्ट जेवण पुरवणारा मेसचालक बदलण्याची मागणी करीत विद्यार्थिनींनी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. मुस्तजीब खान यांना घेराव घातला. निकृष्ट जेवण आणि उर्मट वागणूक देणारा मेसचालक तातडीने बदलण्यावर विद्यार्थिनी ठाम राहिल्याने गोंधळ निर्माण झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा संवादाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, विद्यापीठातील शेकडो तक्रारींचा पाढा वाचत विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना भंडावून सोडले. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कुलगुरूंना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. वसतिगृहातील मेसचालक बदलण्याची मागणी करीत विद्यार्थिनींनी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. मुस्तजीब खान यांना घेराव घातला. प्रियदर्शिनी विद्यार्थिनी वसतिगृहासह सर्व वसतिगृहांना एक मेस आहे. संबंधित मेसचालक विद्यार्थिनींना असभ्य वागणूक देत आहे, असा आरोप विद्यार्थिनींनी केला. अस्वच्छ आणि निकृष्ट जेवण देणारी मेस बदलण्याची मागणी विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे केली. याबाबत १७ सप्टेंबर रोजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. मुस्तजीब खान यांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदनानुसार कारवाई झाली नसल्यामुळे मंगळवारी पुन्हा निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींनी विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांना निवेदन दिले. निकृष्ट जेवण आणि नाश्त्याबाबत विचारणा करणाऱ्या विद्यार्थिनींना मेसचालक उर्मट बोलून हाकलून लावतो, असे निवेदनात म्हटले आहे. सध्याचा मेसचालक बदलावा, स्वच्छ पाणी पुरवठा करावा आणि दररोज कचरा संकलन करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. या निवेदनावर दिक्षा पवार, दीपाली उके, अपेक्षा भिमटे, भारती माळी, प्राजक्ता इंगळे, सुप्रिया मस्के, अस्मिता वानखेडे, अश्विनी इंगळे आदी विद्यार्थिनींची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत पुन्हा लोडशेडिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पवन ऊर्जा प्रकल्पांतून होणारा वीजपुरवठा कमी झाल्यामुळे औरंगाबाद शहरात पुन्हा सात ते नऊ तासांचे लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. राज्यातील वीज निर्मितीवर कोळशाच्या तुटवड्याचा परिणाम झाला आहे. आता ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात निम्म्या शहराला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यात विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत कमी झाली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील लोडशेडिंग बंद करण्यात आले होते, मात्र पावसाचा जोर कमी होताच पवन ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी १२०० मेगावॅट वीज ७०० मेगावॅटवर आली. शिवाय कोळशाच्या पुरवठाचा प्रश्न अजूनही कायम असल्याने वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. औरंगाबाद शहराला २२५ मेगावॅटची गरज दररोज असते, मात्र मंगळवारी औरंगाबाद शहराला १०० मेगावॅट विजेचा पुरवठा होणार असल्याचा संदेश कडवा येथील वीज मॅनेजमेंट सेलकडून महावितरण अधिकाऱ्यांना मिळाला. त्यानंतर मंगळवारी (२६ सप्टेंबर) शहरात लोडशेडिंग सुरू करण्यात आले.

औरंगाबादेतील ‘ग १’, ‘ग २’, ‘ग ३’ व ‘ई’ या वर्गांत मोडणाऱ्या फीडरवर सात ते नऊ तासांचे लोडशेडिंग करण्यात आले. या चार वर्गांतील फीडरवर वीज गळती जास्त असते. शहरातील २७ फीडरचा या वर्गात समावेश आहे. यामुळे विविध भागात शहरात सात ते नऊ तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात आली असल्याची माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली आहे.

वीजपुरवठा कमी झाल्याने आम्हाला लोडशेडिंग करावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत ‘ग १’ ते ‘ई’ या वर्गातील फीडरवर लोडशेडिंग करण्यात आले आहे. आगामी काळात परिस्थिती सुधारली, तर लोडशेडिंग बंद होईल किंवा परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ‘ड’ वर्गापर्यंत लोडशेडिंग करावे लागण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत आताच काही सांगता येत नाही.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस थांबला, कारवाई थंड बस्त्यात

$
0
0

पाऊस थांबला, कारवाई थंड बस्त्यात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततच्या पावसामुळे धास्तावलेल्या महापालिका प्रशासनाने जयभवानीनगरच्या नाल्यावरील बांधकामे पाडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला होता, परंतु तीन दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे आता ही बांधकामे पाडण्याची कारवाई मागे पडल्याचे बोलले जात आहे. शहरातून वाहणाऱ्या सहा प्रमुख नाल्यांवर हजारो बांधकामे अनधिकृतपणे करण्यात आली आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या बांधकामांना पुढीलवर्षीच्या पावसाळ्यापर्यंत अभय मिळेल असे संकेत मिळाले आहेत.
औरंगाबाद शहर व परिसरात १५ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. २० सप्टेंबरपर्यंत पावसाळी परिस्थिती होती. नाल्यांना पूर आल्यामुळे हजारो घरांमध्ये पाणी शिरले. तळघरात पाणी जमा झाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबर व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले. जयभवानीनगर परिसरातील नागरिकांना याचा खूप त्रास झाला. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या परिसराला भेट दिली व नाल्यावरील बांधकामे पाडून टाका असे आदेश महापालिकेच्या प्रशासनाला दिले. आदेश मिळाल्यानंतर पालिकेच्या प्रशासनाने देखील नाल्यावरील बांधकामे पाडण्याची तयारी सुरू केली. बांधकामे तात्काळ पाडण्यात येतील असे जाहीर करण्यात आले, परंतु शुक्रवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबल्यामुळे पालिकेची कारवाई देखील मागे पडल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण हटाव विभाग आणि नगर रचना विभाग यांची सांगड घालून नाल्यावरची बांधकामे पाडण्याची कारवाई केली जाणार होती. त्याची सुरुवात जयभवानीनगरपासून होणार होती. पाऊस थांबल्यावर ही कारवाई करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात तीन दिवसांपासून पाऊस थांबलेला असताना पालिकेने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा हेल्पलाइनः कष्टाला दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ध्येयाने प्रेरित विद्यार्थ्यांना संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिकण्याची जिद्द बाळगणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाने आदर्श पायंडा पाडला आहे. यंदा पाच विद्यार्थ्यांना मदत सुपूर्द करण्याचा सोहळा सोमवारी पार पडला. समाजातील शेकडो सह्दय दानशूरांची मदत स्वीकारताना विद्यार्थी आणि पालक भावूक झाले. आत्मियता व ऋणानुबंधाचे निखळ दर्शन घडवणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
दरवर्षी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाअंतर्गत दहावीतील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात सोमवारी सायंकाळी मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ‘कॉसमॉस बँके’चे व्यवस्थापक विठ्ठल गर्जे आणि देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हलाखीची परिस्थिती असलेले दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी शुभम दांडगे, कोमल पळसकर, सूरज सवणे, ऋतुजा जाधव आणि रोहिणी जाधव यांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तात्पुरती मदत किंवा बक्षीस देणारे खूप लोक आहेत. मात्र, उच्च शिक्षणाचे उत्तरदायित्व स्वीकारणारा ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रम स्तुत्य असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले.
‘जीवनात शिक्षणाशिवाय काहीच शक्य नाही. जीवनात प्रगती साधायची असल्यास दर्जेदार शिक्षण गरजेचे असते. दान सत्पात्री असावे याचा आदर्श या उपक्रमाने घालून दिला. हलाखीच्या स्थितीत पालकांनी मुलांना दहावीपर्यंत शिकवले. आता उच्च शिक्षणासाठी मदत मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड हलाखीच्या स्थितीत शिकले. या संघर्षामुळे त्यांना मोठी ताकद मिळाली. अशीच ताकद या मुलांनाही मिळणार आहे. काही मुले संधीअभावी सुकून जातात. पण, यशाचा टप्पा गाठतात. कारण गरिबी असली तरी बुद्धिमत्ता चमकल्याशिवाय राहत नाही. परिस्थिती दुय्यम भाग असते. पोटात आग असते तिथे जाग असते. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित मुलांना मदत करण्यासाठी समाज उत्सुक आहे. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचण्याची गरज आहे. सर्वत्र गुणवत्तेला पुजले गेले आहे. मुलाने चांगले झाड व्हावे अशी अपेक्षा असेल, तर पालकांना मातीत गाडलेले बी व्हावे लागेल. मुलांनाही ध्यास की श्वास हे ठरवावे लागेल’ असे डॉ. भापकर म्हणाले.
देवगिरी कॉलेजचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘मी शिक्षक असलो तरी आज मुलांनी मला शिकवले. सगळे काही असूनही अडचणींचा पाढा वाचणारे खूपजण आहेत. या लेकरांकडे काहीच नव्हते. आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत वाटचाल केली. अभ्यास मनापासून करणार असल्यामुळे त्यांना यश नक्की मिळेल. आई-वडिलांना अभिमान वाटेल असे यश मिळवणार, हा मुलांचा आत्मविश्वास खूप काही शिकवणारा आहे’ असे शिऊरकर म्हणाले. ‘मुलांच्या भावना थक्क करणाऱ्या होत्या. गुणवंत मुलांना मदत करण्याचा ‘मटा’चा उपक्रम स्तुत्य आहे. योग्य निवड करून त्यांनी गुणी विद्यार्थ्यांना संधीचे दार खुले केले आहे. गुणवंतांना मदतीची गरज असते’ असे व्यवस्थापक विठ्ठल गर्जे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मटा’चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्रुंचा बांध फुटला

शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांना विशेष आनंद झाला. याबाबत बोलताना विद्यार्थ्यांना भावना अनावर झाल्या. आईचे कष्ट सांगताना शुभम दांडगेच्या डोळ्यात अश्रू दाटले. काही वेळ स्तब्ध झालेल्या शुभमचा प्रचंड संघर्षाचा प्रवास स्तब्धतेतून व्यक्त झाला. संघरक्षिता बिरारे, रोहिणी जाधव यांचे शब्द गोठले गेले. प्रचंड खस्ता खाऊन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या कुटुंबियांचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आले. प्रसंगी स्वतःला सावरत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. या भावनाप्रधान प्रसंगामुळे उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. पालकांनीही उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

देश-विदेशातून मदतीचा ओघ

‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाला औरंगाबाद शहरासह दिल्ली, लंडन येथून मदत मिळाली. महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावर या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दानशूरांनी मदतीचे धनादेश पाठवले. यंदा ‘हेल्पलाइन’ उपक्रमाचे सहावे वर्ष होते. दानशूरांनी भरघोस मदत केल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली आर्थिक मदत मिळाली. ‘मटा’च्या वेगवेगळ्या आवृत्त्यांच्या माध्यमातून राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे. सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला उपक्रम दिवसेंदिवस व्यापक स्तरावर पोहचत आहे.

पैसे नसल्यामुळे दहावीला क्लास लावणे शक्य नव्हते. नियमित अभ्यास करून विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. पण, पुढील शिक्षणासाठी मदतीची गरज होती. वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची स्थिती डबघाईला आली. या परिस्थितीत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मदतीचा हात पुढे केला. या मदतीने हुरूप वाढून भरपूर अभ्यास करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, असा विश्वास मिळाला. गुणवंत गरजू मुलांना मदत करण्याचा उपक्रम आदर्श आहे.
- संघरक्षिता बिरारे, गुणवंत विद्यार्थिनी

मी आणि माझी भावंडे कशा परिस्थितीत शिकतो याची जाण आहे. प्रचंड कष्ट करून माझी आई आम्हाला शिकवत आहे. दहावीत वह्या-पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते. एका-एका दिवसात १८ ब्लाउज शिवून आईने आलेल्या पैशातून मला पुस्तके घेऊन दिली. तिच्या यातनांची मला जाणीव आहे. दहावीनंतर शिकण्यासाठी मदतीची गरज असताना ‘मटा हेल्पलाइन’ मदतीला धावून आली. शिकून मोठा अधिकारी होण्याचे माझे ध्येय आहे. अधिकारी झाल्यानंतर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी नक्की मदत करणार आहे.
- शुभम दांडगे, गुणवंत विद्यार्थी

दहावीला ९३ टक्के गुण मिळाल्यानंतर मला आणि घरच्यांना खूप आनंद झाला. पण, एवढे मार्क्स घेऊन करणार काय असा प्रश्न पडला. कारण पुढील शिक्षण घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नाही. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून गरिबी दूर करण्याचा विचार मनात होता. प्रत्यक्षात शक्यता दिसत नव्हती. ‘भगवान के घर देर है, अंधेर नही’ या उक्तीचा प्रत्यय आला. ‘मटा हेल्पलाइन’द्वारे आर्थिक मदत मिळाल्याने उच्च शिक्षणाचा मार्ग खुला झाला. ‘नीट’ परीक्षेची चांगली तयारी करून डॉक्टर होणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे निर्धार करते.
- कोमल पळसकर, गुणवंत विद्यार्थिनी

माझे वडील २० वर्षांपूर्वी कामासाठी शहरात आले. अत्यंत कमी वेतनात त्यांनी काम सुरू केले. माझ्या शिक्षणात बराच खर्च झाला. घरात कितीही अडचण असली तरी शैक्षणिक साहित्य घेण्यात त्यांनी कधीच टाळाटाळ केली नाही. ‘मटा हेल्पलाइन’मुळे डॉक्टर होण्याची वाटचाल पूर्ण करता येणार आहे.
- ऋतुजा जाधव, गुणवंत विद्यार्थिनी

माझ्या आईला सांधेदुखीचा त्रास आहे. तिचे हातपाय नेहमी दुखतात. अशावेळी आई डॉक्टर झालो की तुझे दुखणे दूर करील असे मी म्हणायचो. मात्र, मोठे झाल्यानंतर लक्षात आले की डॉक्टर होणे प्रचंड अभ्यासाचे आणि खर्चाचे काम आहे. दहावीला चांगले गुण मिळाल्यामुळे झालेला आनंद ‘मटा हेल्पलाइन’च्या मदतीने आणखी वाढला आहे. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्यासोबतच गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणार आहे.
- सूरज सवणे, गुणवंत विद्यार्थी

वडील गावाकडे शेती करतात आणि आम्ही भावंडे आजीसोबत शहरात राहून शिकतो. कधी खूप अडचण निर्माण झाली की आजीने बाहेर काम करून आम्हाला शिकवले. भावंडाच्या उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे वडिलांनी कर्ज काढले. ‘मटा’ने यशाचा दरवाजा उघडला आहे. ‘माझी शेवटची उमेद तूच आहेस’ हे वडिलांचे शब्द कायम मनात आहेत. ‘ही माझी मुलगी आहे’ असे वडील अभिमानाने सांगतील असे यश मला मिळवायचे आहे.
- रोहिणी जाधव, गुणवंत विद्यार्थिनी

‘मटा’चा उपक्रम स्तुत्यच असून, या उपक्रमामुळेच अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर होणार आहे. त्यातूनच गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. ‘मटा’सारखे व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे.
-गणेश वरकड

‘मटा’चा उपक्रम अतिशय आनंद देणारा असून, समाजातील दात्यांची दातृत्वाची जाणीव आणखी प्रखर करणारा आहे. या उपक्रमामुळेच अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य होणार आहे व पर्यायाने त्यांचे करिअर घडणार आहे. या उपक्रमासाठी ‘मटा’ला मनापासून शुभेच्छा.
-विठ्ठल बावस्कर

‘मटा’चा उपक्रम अतिशय उत्तम असून, समाजातील चांगुलपणा वाढीस लावणारा आहे. या उपक्रमामुळेच मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी असा उपक्रम समाजासाठी खरोखर दिशादर्शक ठरत आहे. ‘मटा’ने असे उपक्रम यापुढेही घेत राहावेत.
-विजयमाला सवणे

गोरगरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मटा’ने जी शाबासकी दिली आहे, ती त्यांच्यासाठी एक शिदोरी असून, ही शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरणार आहे. आजच्या धावपळीच्या व बदललेल्या समाजामध्येही असा उपक्रम उत्तमरित्या सुरू राहणे ही नक्कीच मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
-कौशल्याबाई जाधव

‘मटा’च्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळतेच; शिवाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्यदेखील उंचावते व त्यांचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो. ही शिदोरी त्यांना आयुष्यभर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून सतत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहील.
-मोहिनी भाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद साखर कारखान्यात आ. भुमरेंचा विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत झालेल्या पराभवाची आमदार संदीपान भुमरे यांनी शरद सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परतफेड केली. या निवडणुकीत २० पैकी १८ अठरा जागा जिंकल्या. विद्यमान चेअरमन, माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा ११ मतांनी पराभव झाला.
तहसील कार्यालयात मंगळवारी मतमोजणी करण्यात आली. अत्यंत लढतीत आमदारांच्या पॅनलचे १८ संचालक विजयी झाले. सर्वपक्षीय पॅनलचे राजेंद्र श्रीकिसन भांड व घोडके यांचा अनुक्रमे ८ व ११ मतांनी पराभव झाला. या उमेदवारांनी केलेली फेरमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी कोणतेही कारण न देता ती फेटाळून लावली. संत एकनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आमदारांच्या पॅनलचा पराभव गेला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी आमदारांनी ‘संत एकनाथ’च्या संचालकपदाचा राजीनामा देऊन ‘शरद’च्या निवडणुकीच पॅनेल उभे केले. त्यांच्याविरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन संस्थापक अध्यक्ष घोडके यांच्या नेतृत्वाखाली पॅनल रिंगणात उतरवले होते.

विजयी उमेदवार

डॉ. सुरेश चौधरी, सुरेश दुबाले, विष्णू नवथर, रावसाहेब घावट, श्रीकृष्ण तांबे, संपत गांधले, लहू डुकरे, महावीर काला, ज्ञानोबा बोडखे, माणिकराव थोरे, सुभाष गोजरे, नंदू पठाडे, संदीपान भुमरे, सुभाष चावरे, भरत तवार, सुमनबाई जाधव, द्वारकाबाई भाऊसाहेब, कल्याण धायकर, सोमनाथ परदेशी, अनिल घोडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न

$
0
0

सिंचनक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न
वॉटरग्रीडसाठी सौर ऊर्जेची शक्यता तपासणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढताना प्रस्तावित वॉटरग्रीडचा माध्यमातून विभागातील सिंचन क्षेत्रही वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वॉटरग्रीड प्रकल्पाच्या ‘टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी रिपोर्ट’मध्ये त्याचा समावेश असेल. त्याचबरोबर या प्रकल्पात सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून वॉटरग्रीडचे काम सुरू केले आहे. त्यासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविण्यात आले आहेत. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाचा प्रश्नही गंभीर आहे. विभागातील सिंचन क्षेत्र वाढविण्याची शक्यताही प्रकल्पाची व्यवहार्यता अभ्यासताना पडताळून पाहिली जाणार आहे. विभागातील काही धरणे जोडून गुरुत्वीय पद्धतीने पाणी नेणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कालव्यांच्या जागी पाणी वाहिन्यांच्या माध्यमातून नेण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. पाइपच्या माध्यमातून शेतीला पाणी दिल्यास पाणीवापराची क्षमता वाढणे अपेक्षित आहे.
वॉटरग्रीड प्रकल्पात काही ठिकाणी पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा सरकारचा विचार आहे. प्रकल्पाची व्यवहार्यता अभ्यासताना सौर ऊर्जा वापराची शक्यताही तपासली जाणार आहे. मराठवाड्यात स्वच्छ सूर्य प्रकाश उपलब्ध आहे. त्यामुळै सौर ऊर्जेच्या माध्यमातून वॉटरग्रीड प्रकल्पाची विजेची गरज काही प्रमाणात पूर्ण करणे शक्य आहे.
प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती कशा पद्धतीने करावी, ही जबाबदारी कोणाकडे सोपवावी, प्रकल्पाचा आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च कसा भरून काढावा, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. संबंधित एजन्सीने प्रकल्पातून होणारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालणारे पर्याय सुचवावेत. त्याचा प्रकल्प स्वावलंबी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असा सरकारचा विचार आहे.
वॉटरग्रीड प्रकल्पाचा ‘फिजिबिलिटी रिपोर्ट’ तयार करताना गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा विचारात घेणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी नेणे, राज्य सरकारचे जलधोरण यांचाही अभ्यास ‘टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी रिपोर्ट’मध्ये अपेक्षित आहे.

निधी कसा उभारणार?
वॉटरग्रीड हा मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी कसा निधी उभारावा, याचा समावेश ‘टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी रिपोर्ट’मध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर या अहवालात प्रकल्पाचे लाभ-खर्च गुणोत्तरही असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्गो हब डिसेंबरअखेर सुरू

$
0
0

कार्गो हब डिसेंबरअखेर सुरू
कस्टम आणि इमिग्रेशनचीही सुविधा उपलब्‍ध
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाणा विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. औरंगाबाद शहरातून आंतरराष्ट्रीय कार्गो डिसेंबरअखेरपासून सुरू होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद शहरातून विविध कंपन्यांचा माल जहाजाद्वारे विदेशात पाठविण्यात येत असतो. विविध कंपन्यांसह कृषी माल कमीतकमी वेळेत आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचावा, यासाठी औरंगाबाद विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याची प्रक्रिया दोन ते अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांच्या काळात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन संचालक अलोक वार्ष्णेय यांनीही आंतरराष्ट्रीय कार्गो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. वार्ष्णेय यांच्याकाळात देशांतर्गत कार्गो सुविधाही ही खासगी कंपनीला देण्यात आली. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया थंड बस्‍त्यात पडली होती.
डी.जी.साळवे यांनी पुन्हा औरंगाबाद विमानतळाच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गोच्या कामाला पुन्हा प्रारंभ केला आहे. जुन्या विमानतळ परिसरात आंतरराष्ट्रीय कार्गो बांधण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या नियमानुसार या जागेवर सुविधा दिली जाणार आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सुरक्षा ‌समितीची मान्यता मिळाल्यास, आंतरराष्ट्रीय कार्गो सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरात ‘ग्रीन कॉरिडॉर’

$
0
0

लातुरात ‘ग्रीन कॉरिडॉर’
शहरातील पहिल्या अवयवदानातून तिघांना लाभले जीवन
म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूरच्या शासकीय वैद्यकीय महविद्यालयात प्रथमच अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एकाच वेळी तीन अवयवदानाच्या शस्त्रक्रिया, वेळच नियोजन, वाहतुकीचे नियोजन, या सर्व बाबी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार आणि त्यांच्या टीमने अत्यंत काटेकोरपणे पार पडल्या असून अवयवदानातही नवा लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे.
या विषयी अधिक माहिती देताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. पोवार म्हणाले की, लातूराती मळवटी भागातील किरण लोभे या १९ वर्षीय तरुणाचा १५ सप्टेंबर रोजी विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला जबर धक्का बसला. त्याच्यावर किरणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्या तरुणाचा मेंदू मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी, अधिष्ठात्यांनी समाजसेवा अधीक्षक सुरेंद्र सुर्यवंशी यांच्यामार्फत किरणच्या नातेवाईकांशी संपर्क केला. किरणचे भाऊ सचिन लोभे, विकास लोभे, मामा बिभीषण जगताप यांच्याशी चर्चा करून किरण जगणे अशक्य असल्याचे त्यांना सांगून त्याच्या अवयवदानाने किमान चार लोकांना जिवदान मिळू शकते, असे समुपदेशन केले. नातेवाईकांची संमती मिळाल्यानंतर अवयवदानाविषयीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून मंगळवारी प्रत्यक्ष अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
किरणचे हृदय हे मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टीट्युटला, एक किडनी औरंगाबाद येथील महात्मा गांधी हॉस्पिटलला आणि आणि दुसरी कमलनयन बजाज हॉस्पिटलला पाठवण्यात आली. हृदयाची शस्त्रक्रिया डॉ. सुनिल वाजरा आणि किडनीची शस्त्रक्रिया डॉ. प्रशांत दरक यांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. निलेश नागरगोजे, यांच्या सहकार्याने केली. डॉ. जमदाडे, डॉ. विनायक शिरसाट, डॉ. निलीमा देशपांडे, डॉ. अनिल मुंडे, डॉ. शैलेंद्र चौहाण, डॉ. महादेव बनसुडे, डॉ. निलेश नागरगोजे, डॉ. किरण तोडकरी, डॉ. सदानंद कांबळे, अधिसेविका अमृता पोहरे, नितीन मुंडे, गजानन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
मुंबईला पाठविण्याच्या अवयवासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे औरंगाबादला पाठवण्याचे अवयव हे रस्त्यामार्गे पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पोवार यांनी दिली. पूर्वनियोजनानुसार यकृतसुद्धा दान करण्याचे निश्चित झाले होते. परंतु दिल्ली येथील रुग्णालयाच्या टिमचे विमान तांत्रिक कारणाने नांदेडला उतरल्यामुळे यकृत काढता आले नसल्याचे पोवार म्हणाले. अवयवदानाविषयीची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्याचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनाही देण्यात आली होती, असे पोवार यांनी स्पष्ट केले.
लातुरातील अवदानाची ही पहिलीच घटना असल्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे यांनीही शासकीय रुग्णालयास भेट दिली. महाविद्यालयाच्या परिसरात पोलिस निरीक्षक नागरगोजे, सत्यवान हाके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलिस निरिक्षक लक्ष्मण राख यांनी कमीतकमी वेळेत अवयव विमानतळावर घेउन जाण्यासाठी महाविद्यालय ते विमानतळ हा मुख्य रस्ता १२ ते १५ मिनिट वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. रस्तासुरक्षेसाठी २१० पोलिस कर्मचारी, २ उपाधीक्षक, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि २५ अधिकारी कार्यरत होते. महाविद्यालय ते लातूर विमानतळ हा रस्ता अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण करण्यात आला. अवयवदानाविषयीची माहिती आम्हाला डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सर्व नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दिल्याची माहिती किरणचे बंधू सचिन लोभे यांनी दिली. अवयवदाता किरण हा रोजंदारी काम करून उपजिविका करत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खड्डे १५ नोव्हेंबरपर्यंत बुजविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांवरील खड्डे १५ नोव्हेंबरपर्यंत बुजविण्यात येतील,’ अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी मंगळवारी दिली. ते भानुदास चव्हाण सभागृहात कंत्राटदारासाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेला राज्य सरकारने रस्त्यांसाठी शंभर कोटी मंजूर केले आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पावसाळा संपताच हे खड्डे बुजविले जाणार आहेत. हे खड्डे कोणत्या पद्धतीने भरावेत ? याचे मार्गदर्शन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कंत्राटदारांसाठी कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत चव्हाण यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यात रस्त्यावरील खड्डे कशा पद्धतीने भरावेत ? खड्डे भरण्याचे वेळापत्रक, खड्डे भरण्यासाठी वापरावयाचे आधुनिक तंत्रज्ञान, खड्डे भरल्यानंतर खड्डे पुन्हा पडू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना, खड्डे भरण्याबाबत सरकारने जाहीर केलेली द्वैवार्षिक करार पद्धत व खड्डे भरण्यासाठी अभिलेखे जतन करणेबाबतचा समावेश आदीची माहिती दिली. कार्यशाळेत सुशील खेडकर, अनिल पाटील, रमझान चारणीया, विजय अरोरा, ख्वाजा यांच्यासह २०० हून अधिक सरकारी कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते उपस्थित होते. जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कॉन्ट्रॅक्टरच्या फेऱ्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘रस्तेनिहाय टेंडर काढा, अन्यथा कोर्टात जाऊ,’ असा इशारा नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने महापालिका आयुक्तांना दिल्यामुळे इतक्या दिवस टेंडर प्रक्रियेत अडकलेले शंभर कोटींचे रस्ते आता कॉन्ट्रॅक्टरच्या फेऱ्यात सापडले आहेत.

शहरातील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने दिलेल्या अनुदानातून ३१ रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे करण्यास शासनाने परवानगी दिली. शंभर कोटींचे एकत्रित टेंडर काढायचे की, त्याचे विभाजन करायचे या संदर्भात पालिकेत प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात खल सुरू आहे. अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना औरंगाबाद नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पालिका आयुक्तांच्या नावे निवेदन देवून थेट कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे की, ‘शासनाच्या निर्णयानुसार रस्तेनिहाय निविदा मागवणे योग्य राहणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे एकत्रिकरण करून निविदा काढण्यात येऊ नयेत. एकत्रिकरण करून निवीदा काढल्यास असोसिएशनतर्फे शासनाकडे व कोर्टात दाद मागितली जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पालिकेचे प्रशासन जबाबदार राहील.’

...तरच दर्जेदार कामे
असोसिएशनचे सचिव सुशील खेडकर म्हणाले, ‘रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे करणारे शहरात शंभर पेक्षा जास्त कंत्राटदार आहेत. हे सर्व कंत्राटदार शासनाच्या निकषानुसार रस्त्यांची कामे करू शकतात. याशिवाय चार ते सहा कंत्राटदारांकडे रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेले स्वतःचे प्लांट आहेत. त्यामुळे स्थानिक कंत्राटदारांना रस्त्यांचे काम द्या अशी आमची भूमिका आहे. ३१ रस्त्यांची कामे ३१ कंत्राटदारांना दिली, तर सर्वच कामे वेळेत पूर्ण होतील व कंत्राटदारांमध्ये स्पर्धा झाल्यामुळे कामे देखील दर्जेदार होतील.’

महापौरांचा मुंबईत तळ
रस्त्यांच्या कामांची निविदा विभागून काढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करून ही परवानगी मिळवण्यासाठी महापौर भगवान घडमोडे मुंबईत तळ ठोकून असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते बुधवारी शहरात परतण्याची शक्यता आहे. शंभर कोटींच्या कामासाठी २५ - २५ कोटींच्या चार निविदा काढण्यात याव्यात यासाठी महापौर आग्रही आहेत. जास्त कंत्राटदार नियुक्त केले, तर रस्त्यांची कामे लवकर होतील व दर्जेदार कामे होतील अशी महापौरांची धारणा आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आदेशानुसार शंभर कोटींची एकच निविदा काढावी लागणार आहे किंवा ३१ रस्त्यांसाठी ३१ निविदा काढाव्या लागणार आहेत. महापौरांचा या प्रक्रियेला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी थेट मुंबई गाठल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना २५ - २५ कोटींच्या निविदेची आवश्यकता महापौर पटवून देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, तर शंभर कोटींचे विभाजन करून निविदा काढल्या जातील. घडमोडे यांची महापौरपदाची मुदत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत आहे. तोपर्यंत निविदा अंतिम करून कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात यावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ हज यात्रेकरूंचा जत्था परतला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हज यात्रेसाठी जेद्दाहला गेलेल्या हाजींचा परतीचा प्रवास मदिना येथून सुरू झाला आहे. मंगळवारी दोन विमानाने हाजींचे शहरात आगमन झाले. यातील एअर इंडियाचे पहिले विमान दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी, तर दुसरे विमान दोनच्या सुमारास पोचले.

हज यात्रेसाठी औरंगाबादहून तीन हजारावर हाजी रवाना झाले होते. हाजींना औरंगाबादमध्ये पाऊल ठेवताच आपल्या स्वकीयांचे चेहरे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. ‌विमानतळातून बाहेर आलेल्या हाजींचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. अनेकजण आपल्या प्रियजनांच्या भेटीने भारावून गेले. त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारत आनंद व्यक्त केला. दोन्ही विमानातून आलेल्या तीनशे हाजींपैकी ११० हाजी औरंगाबादचे होते, तर अन्य हाजी बीड, माजलगाव, हिंगोली, नांदेड, नगर आणि मराठवाड्यातील विविध भागातील होते. या हाजींच्या स्वागतासाठी हज कमिटीचे अध्यक्ष इब्राहिम भाईजान, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासह हमद चाऊस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्राधिकरणामुळे सोय
हाजींचे विमान फूट वे ब्रीज ते विमानतळ असे लावण्यात आले होते. यामुळे हाजींचे विमानातून थेट विमानतळामध्ये आगमन आले. याठिकाणी सुरक्षेच्या सर्व गोष्टींची पूर्तता करून त्यांना विमानाबाहेर पाठविण्यात आले. ‌प्राधिकरणाच्या या नियोजनामुळे हाजींचा वेळ वाचला.

माझे विमान पाच ऑक्टोबरचे होते, मात्र तब्येत बिघडल्याने हज ‌कमिटी तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयामुळे मला पहिल्या विमानातून औरंगाबादला पाठविले. - कैसर खान, औरंगाबाद

हज यात्रा चांगली झाली. कोणतीही अडचण आली नाही. हज कमिटीच्या वतीने केलेले नियोजन चांगले राहिल्याने मी आणि माझ्या पत्नीने हजचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडले. - मोहम्मद रफिक, औरंगाबाद

हज यात्रेच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होती. आम्ही हजच्या शेवटच्या दिवशी देशामध्ये सर्व नागरिकांना सुख कल्याण व भरभराट लाभो यासाठी विशेष दुआ केली. - डॉ. मोहम्मद ईसा, हिंगोली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘पेट’ चारची गुणपत्रिका मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या ‘पेट-४’ परीक्षेच्या गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. जुलै महिन्यात परीक्षा झाल्यानंतर तब्बल ७० दिवसांनी याची परवानगी घेण्यात आली. विद्यार्थी संघटनांनी दबाव टाकल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला जाग येऊन गुणपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वजा गुणांकन पद्धतीमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘पेट-४’ परीक्षेच्या गुणपत्रिका अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. १४ आणि १५ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली होती. एका महिन्यात गुणपत्रिका देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी जाहीर केले होते. मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही गुणपत्रिका नसल्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांनी कुलगुरूंची भेट घेऊन गुणपत्रिका देण्याची मागणी केली. संकेतस्थळावर पात्र विद्यार्थ्यांची यादी असताना गुणपत्रिकेची गरज नसल्याचे चोपडे यांनी सांगितले. मात्र, संकेतस्थळावरील माहिती तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची भीती सराफ यांनी व्यक्त केली. त्यामुळे अखेरीस गुणपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुणपत्रिकेच्या मसुद्याची परवानगी कुलगुरूंनी दिल्यानंतर गुणपत्रिका निर्मिती सुरू झाली आहे. या परीक्षेत पहिल्या टप्प्यात ३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. वजा गुणांकन पद्धत रद्द केल्यानंतर १४०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक डॉ. एस. एस. भोसले यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. एस. भोसले (वय ८२) यांचे बुधवारी दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी उज्ज्वला, मुलगा अमर, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ते मूळचे कागल (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी होते. प्रसिद्ध लेखक डॉ. आनंद यादव आणि डॉ. एस. एस. भोसले हे पहिली ते एम. ए. (मराठी) पर्यंतचे वर्गमित्र.
१९७९ मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात रुजू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधकांनी पीएच.डी व एम. फिल पूर्ण केले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. भोसले मराठी विषयाचे गाइड होते. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले होते. डॉ. एस. एस. भोसले यांच्या नावावर स्वलिखित १८ आणि २२ संपादित पुस्तके प्रकाशित आहेत. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सहभाग डॉ. भोसले यांना लाभला होता. ‘प्रेरणा आणि निर्मिती - अप्पासाहेब पवार’,‘राजर्षी शाहू संदर्भ ग्रंथ’,‘ नांगरी आणि नागरी लोकपरंपरेचे आविष्कार’,‘ वि. स. खांडेकर व्यक्ती आणि साहित्य‘ यासह अनेक वैचारिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्यावर बुधवारी रात्री साडेआठ वाजा मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा ६२७९, उमेदवार २९९०

$
0
0

जागा ६२७९, उमेदवार २९९०
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डिप्लोमा, इंजिनीअरिंगच्या मुलांना जॉब मिळणे अवघड, त्याचवेळी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जागा जास्त असल्याचे बुधवारपासून सुरू झालेल्या भरती मेळाव्यात दिसले. मुलांच्या आयटीआयमध्ये दोन दिवसांचा भरती मेळावा सुरू आहे. कंपन्यांची मागणी सहा हजार २७९ एवढ्या जागांची आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी आहेत दोन हजार ९९० इतकेच. टर्नर, ग्रायंडर, मशिनीस्ट, पेंटरसारख्या ट्रेडच्या विद्यार्थांना मोठी मागणी आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (मुलांची) शिकाऊ उमेदवार भरती मेळावा सुरू आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, चित्तेगाव, पैठण परिसरातील ४५ पेक्षा अधिक कंपन्यांचे अधिकारी मेळाव्यात सहभागी आहेत. राज्यभरातील २२ जिल्ह्यातून विद्यार्थी मेळाव्याला आले आहेत. मेळाव्यासाठी कंपन्यांनी मागणी केली त्या तुलनेत अनेक ट्रेडचे विद्यार्थी कमी असल्याचे चित्र आहे. प्रारंभी सकाळी मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. ११ वाजेपर्यंत दोन हजार ९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर विविध विभागांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया सुरू होती. काही कंपन्यांनी लेखी परीक्षा घेत, प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. काहींनी विद्यार्थ्यांची नोंदणी, बायोडेटा घेत प्रत्यक्ष कंपनीत मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सात ते दहा हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. प्रारंभी सकाळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए. डी. शिंदे, जिल्हा कौशल्य अधिकारी एन. एन. सूर्यवंशी, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. वाय. शेख यांच्या उपस्थित मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्यासाठी राजेंद्र भटाणकर, एस. पी. बोडखे, सी. एम. कुलकर्णी, के. बी. दवणे, ए. ए. केसकर, ई. एन. देवकर, एस. डी. वाघचौरे, एन. बी. उमरे आदी मेळाव्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या ट्रेडना सर्वाधिक मागणी
जोडारी, विजतंत्री, संधाता, यंत्रकारागीर, यंत्रकारागीर घर्षक, कातारी, विजक, कोपा, आरएसी, एमएमटीएम, रंगारी अशा ट्रेडला मोठी मागणी आहे. अनेक कंपन्यांना हवे असलेल्या क्षमतेत ‌उमेदवार मिळाले नाहीत. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे, त्यामुळे कंपन्या अधिक या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात असे एनआरबीचे एचआर प्रशांत काकडे यांनी ‘मटा’ ला सांगितले.
निवड कागदावरच
विद्यार्थ्यांची शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्यात निवड झाली तरी, ही निवड आयटीआय परीक्षा निकाल नसल्याने काही दिवस कागदावरच निवड असणार आहे. आयटीआयच्या शेवटच्या सत्राचा निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर ते प्रमाणपत्र मान्य धरल्या जाते. निकाल नसल्याने गुणपत्रिकाही विद्यार्थ्यांच्या हातात नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थीही मेळाव्याकडे फिरकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या कर्मचाऱ्यांने ७१ लाख हडपले

$
0
0

परभणी - येथील मनपाच्या नावे असलेल्या वीज मीटरच्या बिलापोटी दर महिन्याला येणाऱ्या लाखो रुपयांच्या आरटीजीएसमध्ये खासगी रहिवाशांची नावे समाविष्ट करून महावितरणच्या एका सिनियर टेक्निशीअनने तब्बल ७१ लाख ३० हजार रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अधीक्षक अभियंत्यांच्या तक्रारीवरून बुधवारी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्यात सहभागी असलेले इतर तीन कर्मचारी निलंबीत झाले आहेत. या प्रकारामुळे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महावितरणचे अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत.

परभणी शहर पालिकेच्या वतीने शहरातील स्ट्रीट लाईटच्या वीज पुरवठ्यापोटी महावितरणला दर महिन्याला बिल अदा केले जाते. पालिकेचे असे साधारण ३८६ वीज मीटर आहेत. या पैकी २७५ ते ३०० मीटर चालू असून यापोटी येणारे बिल अदा करण्यासाठी पालिका दरमहा ३० ते ३२ लाख रुपयांचे देय बँकेच्या आरटीजीएसद्वारे महावितरणला अदा करते. या पैशात चालू बिल आणि पालिकेकडे असलेल्या जुन्या थकबाकीची रक्कम आहे. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१७ या काळात महावितरणचा झोन क्रमांक ४ मधील सिनीयर टेक्निशीयन राजेश घोरपडे हा मनपाकडून मिळणाऱ्या आरटीजीएसच्या रकमेत लेखापाल आणि लिपीकांच्या सहाय्याने काही खासगी रहिवाशांची बिले समाविष्ट करत होता. दरम्यान, दर महिन्याला पैसे अदा करून देखील मनपाची जुनी थकबाकी कमी होण्याऐवजी वाढू लागली. हा प्रकार लक्षात आल्याने अधीक्षक अभियंता वाय. एम. कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा महापालिकेने जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१७ या काळात ८ हजार १७४ मीटरवरील बिलापोटी ८ कोटी ७२ हजार रुपयांचे आरटीजीएसद्वारे देयक अदा केले होते. मात्र, या देयकासोबत जोडलेल्या यादीत तब्बल ७६४ ग्राहक खासगी रहिवाशी आढळून आले. मनपाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून घोरपडे याने मनपाच्या मीटर क्रमांकांच्या यादीतील नावे वगळून खासगी रहिवाशांची नावे समाविष्ट केली. ज्यामुळे मनपाच्या पैशात खासगी लोकांचे वीज बिल अदा झाले. प्रत्यक्षात घोरपडे याने या खासगी लोकांना दहा टक्के सुट देतो, तुमचे बिल कमी करून आणतो, असे म्हणून त्यांच्याकडून रोख बील घेऊन पैसे हडप केले आहेत. या प्रकारात महावितरणचे सहाय्यक लेखापाल दिलीप धादवडे, वरिष्ठ लिपीक पठाण अजहर खान आणि कनिष्ठ लिपीक अशोक निवृत्ती माने हे देखील सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याने त्यांच्यासह घोरपडे याला निलंबीत करण्यात आले आहे. तर घोरपडे याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images