Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महाराष्ट्र - बिहारला जोडले स्वच्छ सर्वेक्षणाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छ सर्वेक्षणा योजनेच्या अॅपमुळे महाराष्ट्र आणि बिहार जोडले गेले आहेत. बिहारमधील औरंगाबादच्या स्वच्छतेसंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पालिकेचे स्थानिक प्रशासन स्तंभित झाले. प्राप्त झालेल्या तक्रारी आता बिहारला पाठवण्याचे नियोजन केले जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने यंदा चार हजार ४४ शहरांचा समावेश केला आहे. या शहरांमध्ये स्वच्छतेसंदर्भात स्पर्धा होणार आहे. यापूर्वी ५०० शहरांमध्ये स्वच्छतेबद्दल स्पर्धा झाली होती. त्यात औरंगाबाद महापालिकेचा क्रमांक २९९ वा आला होता. आता चार हजार ४४ शहरांमध्ये स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेत रँकिंग वाढवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामासाठी केंद्र सरकारने स्वच्छता अॅप तयार केले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासनाने या अॅपचा उपयोग कालपासून (बुधवार) सुरू केला आहे. या अॅपच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ४० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. या ४०पैकी नऊ तक्रारी बिहारमधील औरंगाबाद शहराशी संबंधित आहेत. उर्वरित तक्रारींपैकी आठ तक्रारी लगेच निकाली काढण्यात आल्या, असे भालसिंग यांनी सांगितले.

अॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तीन दिवसांचा अवधी शासनाने नेमून दिला आहे. त्यानुसार या तक्रारी निकाली काढण्यात येथील असे त्यांनी स्पष्ट केले.

...तर महापालिकेला १५० गुण मिळतील
केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत तयार केलेले अॅप शहरातील दोन टक्के नागरिकांनी आपल्या फोनमध्ये डाउनलोड केल्यास स्पर्धेत औरंगाबाद महापालिकेला ९००पैकी १५० गुण मिळणार आहेत. औरंगाबाद शहराची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. म्हणजे किमान तीस हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे. अॅन्ड्राइड फोनच्या प्ले-स्टोअरमध्ये जाऊन स्वच्छता अॅप डाउनलोड करता येते. अॅप डाउनलोड केल्यावर नागरिकांना त्यांच्या परिसरातील स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी फोटोसह संबंधित महापालिकेकडे पाठवायच्या आहेत. महापालिकेने प्राप्त झालेल्या तक्रारी तीन दिवसांत निकाली काढणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी औरंगाबाद महापालिकेने स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेतली. प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा कसा करायचा, याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छावणीत तपासणीविना पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर छावणी पाणीपुरवठा विभागामध्ये काही दिवसांपूर्वी पंप ऑपरेटर व तंत्रज्ञाचे पद तूर्त भरण्यात आले अाहे, पण छावणी परिसरात तब्बल दीड वर्षापासून तपासणीविना पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याची तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञाचे पद तर छावणीमध्ये वर्षानुवर्षे नाहीच आणि हीच परिस्थिती छावणीतील गॅस्ट्रोच्या उद्रेकाला कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. ही दोनच पदे नव्हे तर तब्बल ४७ पदे रिक्त आहेत, असेही समोर आले आहे.

छावणीच्या पाणीपुरवठा विभागामध्ये पंप ऑपरेटरचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि तेव्हापासून या विभागामध्ये पंप ऑपरेटरचे पदच भरण्यात आले नव्हते. पाण्याची तपासणी करणारा तंत्रज्ञ नसल्यामुळे संबंधित पंप ऑपरेटरच पाण्याची तपासणी करत होता आणि त्यामुळे निदान काही प्रमाणात तरी पाण्याची तपासणी होत होती. मात्र पंप ऑपरेटरच्या मृत्युनंतर पद भरण्यात आले नाही आणि तंत्रज्ञाचे पद रिक्तच होते म्हणून दुसऱ्या विभागाच्या मिळेल त्या अप्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून हे काम करवून घेतले जात होते. परिणामी, संपूर्ण दीड वर्षाच्या कालावधीत पाण्याची तपासणी झाली असेल, यावर कुणाचाही विश्वास बसू शकत नाही, अशी एकंदर स्थिती आहे. याच स्थितीमुळे दूषित झालेले पाणीदेखील लक्षात येऊ शकले नाही आणि थेट गॅस्ट्रोच्या उद्रेकानंतरच ही बाब समोर आली. या प्रकाराची व रिक्त पदांची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पंप ऑपरेटर व तंत्रज्ञाचे पद तातडीने भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर नवीन पंप ऑपरेटरसह पहिल्यांदाच तंत्रज्ञाची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पंप ऑपरेटरचा गुरुवारी (२३ नोव्हेंबर) कामाचा तिसरा दिवस होता, तर तंत्रज्ञाचा गुरुवारी सहावा दिवस होता, असे ‘मटा’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले. सद्यस्थितीत मागच्या काही दिवसांपासून रोज पाण्याची तपासणी होत आहे आणि छावणी परिसराला पाणी पुरवठा होणारे पाणी निदान पिण्यास योग्य असल्याचे बघितले जात असल्याचे सांगण्यात आले. अर्थात, प्रादेशित प्रयोगशाळा ही छावणी परिसरातच असल्यामुळे अधिक तंत्रशुद्ध पद्धतीने पाण्याची तपासणी नित्यनियमाने होणे अपेक्षित आहे, जेणेकरून भविष्यात गॅस्ट्रोचा उद्रेक टाळता येऊ शकेल. या प्रकरणी अजूनही फारसे गांभीर्याने व तातडीने पावले उचलण्यात येत नसल्याचेही दिसून आले.

सफाईकामगार, परिचारिका नियुक्त
छावणी परिषदेंतर्गत सहा सफाई कामगार व छावणी सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेचे पद रिक्त आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर ही सर्व पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे छावणी परिसरातील साफसफाई-स्वच्छतेचे बरेचसे प्रश्न निकाली निघतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

४७ पदे भरण्यास हिरवा कंदील
परिषदेतील वर्षानुवर्षे रिक्त असलेली ४७ पदे भरण्याचे आदेश केंद्र सरकारकडून अलीकडेच प्राप्त झाले असून, ही पदे लवकरच भरली जातील, असे संकेत आहे. या रिक्त पदांमध्ये अभियंता, तंत्रज्ञ, लिपिक, पंप ऑपरेटर, सेवक, वॉचमन आदींचा समावेश आहे.

गढूळ पाण्याचा फटका
अनेक दिवसांच्या खंडानंतर छावणी परिसरात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस अनेक भागांत नळावांटे गढूळ पाणी आले. अनेक दिवस पुरवठा खंडित झाल्यामुळेच नळाद्वारे येणारे पाणी गढूळ असल्याचे सांगण्यात आले.

तंत्रज्ञाचे पद अनेक वर्षे रिक्त होते व पंप ऑपरेटरचे पदही रिक्त होते. दोन्ही पदे तात्काळ भरण्यात आली असून, पाण्याची तपासणी रोज होत आहे व तपासणीचे रेकॉर्ड मेन्टेन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ४७ रिक्त पदेही लवकरच भरण्यात येतील.
- संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

स्वतंत्र जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारपासून कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत विविध स्तरांवर मान्यता लागणार आहे; तसेच जलवाहिनी ज्या भागातून गेली असेल, त्या शासकीय-खासगी जागेची ‘एनओसी’ही लागेल. अर्थात, स्वतंत्र जलवाहिनीमुळे पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न मिटेल.
- विजयकुमार नायर, सीईओ, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचा अपघात नव्हे खून; मित्रावर संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्या मुलाचा अपघात झाला नसून घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप करीत मुलाच्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वडिलांनी पोलिस आयुक्तालयात एका अर्जाद्वारे केली आहे. या अर्जात छावणी पोलिस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनोज परमेश्वर फदाट (वय २२, मूळ रा. बोरगाव ता. जाफराबाद, सध्या रा. बजाजनगर) या तरूण अभियंत्याचा मृतदेह ५ ऑक्टोबर रोजी गोलवाडीजवळ रेल्वेरुळावर इंजिनासमोर सापडला होता.
त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रार अर्जात, मृत मनोज हा एक वर्षापासून इंडोरंस कंपनीमध्ये इंजिनीअर म्हणून काम करत होता. त्याचा मित्र अक्षय भोपळे (रा. बालाजीनगर) हा त्याला ३ ऑक्टोबर रोजी बजाजनगरातून सोबत घेऊन गेला होता. यानंतर मनोजचा मोबाइल स्वीच ऑफ दाखवत होता. मनोजचा मृतदेह ५ ऑक्टोंबर रोजी गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाखाली मुंबईला जात असलेल्या रेल्वेच्या इंजिनसमोर आढळला होता. तसेच त्याने घातलेला नाइट ड्रेस देखील अक्षयचा असून मनोजचा मोबाइल अक्षयच्या रुमवर ठेवण्यात आला होता. याप्रकरणात मनोजचा मृत्यू हा अपघात नसून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप परमेश्वर फदाट यांनी केला आहे. छावणी पोलिस याप्रकरणी आरोपींना पाठीशी घालत असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी परमेश्वर फदाट यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्टअप वीकएंड; २१० जणांची नोंदणी

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील विद्यार्थी, बेरोजगार आणि उद्योजक होण्याची आकांक्षा असणाऱ्यांसाठी जीआयझेड व सीएमआयए (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्र‌िअल अँड अॅग्रिकल्चर) यांच्यातर्फे स्टार्ट-अप-वीकएंडचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी एकूण २१० जणांनी नोंदणी केल्याची माहिती सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी गुरूवारी (दि.२३)) दिली.
हा उपक्रम एक ते तीन डिसेंबर होणार आहे. या २१० अर्जांची छाननी करण्यात येऊन त्यापैकी ५० संकल्पनांची निवड केली जाणार आहे, असेही कोकीळ यांनी सांगितले. सीएमआयएला जीआयझेड या संस्थेतर्फे तसव्वर अली यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. उद्योग सुरू करण्याची कल्पना असणाऱ्यांसाठी स्टार्ट-अप वीकएंड उपक्रम आहे. हा उपक्रम उद्योजकांसाठी खुला आहे. या उपक्रमाची व्याप्ती मोठी असून, डिजिटायझेशन, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आदींसारख्या नवीन तंत्रज्ञानाची कल्पना सक्षम उद्योजकांना द्यावी; तसेच एक उद्योग निर्माण करून तो चालवण्यास त्यांना पाठिंबा, मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य देता यावे, असा प्रयत्न आहे. डिसेंबर मध्ये तीन दिवसांचा कार्यक्रम असेल, शुक्रवारी त्याची सुरुवात होईल आणि रविवारी समारोप होईल. उत्तम कल्पना मांडणीसाठी पुरस्कार सोहळ्यात परितोषिक प्रदान केले जाणार आहे.

दोन इन्क्युबेटर्स

शहरात यासाठी दोन इन्क्युबेटर्स तयार करण्यात आले आहेच. त्याला जर्मन फेडरल एंटरप्राइज जीआयझेडचे (डॉइश गेझलशाफ्ट) सहकार्य लाभले आहे. हे सीएमआयएशी संलग्न केले आहे. या दोन्ही संस्था मराठवाड्यातील स्टार्ट-अपला चालना देण्यासाठी, संयुक्तरीत्या स्टार्ट-अप वीकएंडचे आयोजन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अखंड’ प्रबोधनात रसिक तल्लीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेवर नेमके भाष्य करणारे ‘अखंड’ नाटक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. तब्बल ६१ कलाकारांचा रंगमंचावरील बेफाम अभिनय आणि पारंपरिक संगीताने नाट्यगृह दणाणून गेले. मनोरंजन आणि प्रबोधन याचा अचूक मेळ साधण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी ठरले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गाथा बहुउद्देशीय संस्था प्रस्तुत व प्रवीण पाटेकर लिखित-दिग्दर्शित ‘अखंड’ नाटकाचा प्रयोग सादर झाला. तापडिया नाट्यमंदिरात गुरुवारी सकाळी प्रयोग रंगला. प्रत्येक गावात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा असते. मात्र, सप्ताहाच्या आडून घडणाऱ्या घटनांचे मनोज्ञ दर्शन घडवण्याचे काम लेखक पाटेकर यांनी केले. कंडारी गावात घडणारे कथानक प्रेक्षकांना खळखळून हसवत अंतर्मुख करून गेले. पातळी घसरलेले राजकारण, सामान्यांची कोंडी आणि खरी श्रद्धा या पैलूंवर सडेतोड भाष्य करणारे प्रसंग रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले. अत्यंत कमी नेपथ्य वापरून संगीत आणि प्रकाशयोजनेच्या मदतीने प्रयोग खुलवण्यात आला. चपखल संवाद आणि हजरजबाबी कलावंत यांनी ‘अखंड’चा प्रयोग अधिक उठावदार केला. या नाटकात तब्बल ६१ कलाकारांनी अभिनय केला. राज्य नाट्य स्पर्धेच्या नाटकात प्रथमच एवढ्या संख्येने कलाकार सहभागी झाले. पखवाज आणि संवादिनीच्या उत्तम संगीताने ‘अखंड’ची गोडी वाढली. या नाटकात जगदिश जाधव, प्रशांत गिते, अशोक कानगुडे, श्याम मते, शुभम खरे, देवा गाडेकर, शिवानी नाईक, मुग्धा देशकर, श्रद्धा कोठारे, गणेश मुंडे, डॉली घोक्षे, सचिन काजळे, प्रदीप पवार, सूरज भिसे आदी कलाकारांनी भूमिका केल्या. संगीत भारत लोळगे, प्रकाशयोजना चेतन ढवळे, नेपथ्य सुनील वडणे आणि रंगभूषा जॉय भांबळ यांनी तांत्रिक सहाय्य केले.

प्रयोग हाउसफुल्ल

राज्य नाट्य स्पर्धेत दोन नाटकांचे प्रयोग सकाळी साडेअकरा वाजता आहेत. ‘अखंड’ नाटकाचा प्रयोग सकाळी असूनही नाट्यगृह ‘हाउसफुल्ल’ झाले. बाल्कनी उघडून प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली. यात तरूण प्रेक्षकांची सर्वाधिक संख्या होती. राज्य नाट्य स्पर्धेत तरूण रंगकर्मींचा सहभाग वाढल्यानंतर तरूण प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीबाधित शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी झिडकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समृद्धी महामार्गासाठी बागायती जमिनीला कवडीमोल दिलेला भाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गेलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री रामदास कदम यांनी वेळ घेऊन या, अशी दादागिरी चालणार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांना झिडकारले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सभागृहाबाहेर जाऊन आवक जावक विभागासमोर ठिय्या आंदोलनल केले.
गंगापूर तालुक्यातील फतियाबाद, तळेसमन तसेच औरंगाबाद तालुक्यातील माळीवाडा व दौलताबाद या गावांमध्ये समृद्धी महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनाच्या दरांमध्ये मोठी तफावत आली आहे. अवघ्या फूटभर अंतरावर असलेल्या दोन जमिनीमध्येही लाखोंची तफावत असल्याने ही तफावत दूर करावी व भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या मागणीसंदर्भात या गावांतील शेतकरी शहरात येणाऱ्या बहुतांश मंत्र्यांना भेटत आहेत, मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. या विषयी फतियाबाद येथील शेतकरी बाळू हेकडे म्हणाले की, आमच्या बागायती जमिनी आहेत. त्या कवडीमोल दरात आम्ही कशा देणार ? सरकारने थेट वाटाघाटी करू, असे जाहीर केले होते. मात्र कोणत्याही शेतकऱ्यांशी वाटाघाटी न करता सक्तीचे दर देण्यात आले आहेत. एकाच प्रकारातील जमिनीला फतियाबादमध्ये १२ लाख ७० हजार एकरी दर देण्यात येतो, तर त्याच परिसरात दौलताबादमध्ये ९२ लाख रुपये दर मिळतो. कच्चीघाटी, पळशीमध्येही अशीच स्थिती आहे. याप्रकरणी आतापर्यंत २३ वेळेस आक्षेप सादर केले आहेत. आम्ही विकासासाठी जमीन देण्यास तयार आहोत, मात्र त्यासाठी योग्य मोबदला द्यावा, अशी आमची मागणी आहे. मात्र उशीर झाला, तर मिळणाऱ्या रकमेतून २५ टक्के कमी मोबदला दिला जाईल, असे सरकारी अधिकारी सांगतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीवही गमावावा लागला. आम्ही अशा प्रकरणामुळे सरकारी अधिकाऱ्यांना गावबंदी केली असून आम्ही काळी दिवाळी साजरी केली असल्याचे हेकडे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये जगन्नाथ भगत, धरमसिंग सुंदर्डे, विजयसिंग जारवाड, राजू जारवाल, मदनसिंग जारवाल, मारुती फटांगडे आदींसह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२० फुटांच्या अंतरात चार दर

माळीवाडा, फतियाबाद, दौलताबाद व तळेसमान या शिवारामध्ये भूसंपादनासाठी असलेल्या जमिनीमध्ये केवळ २० फुटांचे अंतर आहे. मात्र केवळ तालुका बदलल्यामुळे एकाच घरातील दोघांच्या जमिनीला देण्यात आलेल्या दरात मोठी तफावत आहे. जिरायती, बागायतींच्या दरांमध्ये प्रशासनाने मोठी तफावत ठेवली आहे. मात्र बाजारभावानुसार येथील जमिनींचे दर एकसमान आहेत, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

मुंबईला जाणार नाही

बैठक संपल्यानंतर पालकमंत्री कदम जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून जाताना शेतकऱ्यांना भेटले. मला काही सांगू नका, फक्त निवेदन द्या, मुंबईला या तुमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणतो, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण न घेता निघून गेले. यानंतर शेतकऱ्यांमध्ये चर्चा होऊन मुंबईला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर बलात्कार; वृद्धाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नात्यातील ६३ वर्षीय वृद्धाचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी गुरुवारी (२३ नोव्हेंबर) फेटाळला.
या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पीडितेच्या पोटामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्यामुळे तिला दवाखान्यात नेले होते. मात्र पोटदुखी न थांबल्यामुळे तिला दोन दिवसांनी पुन्हा दवाखान्यात नेल्यानंतर तिच्या तपासणीमध्ये तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. या प्रकरणी मुलीची विचारपूस केल्यानंतर, १६ ऑक्टोबर रोजी आरोपी व फिर्यादीचा मेव्हणा (वय ६३) याने पीडितेला बेडरुममधून मोबाईल आणून देण्यास सांगून आरोपी तिच्या पाठीमागून बेडरुममध्ये गेला आणि त्याने बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीला सांगितले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांनी पीडितेचा जबाब नोंदविला. आरोपीला २६ ऑक्टोबर रोजी अटक करून कोर्टाच्या आदेशानंतर आरोपीची रवानगी आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता.

आरोपीविरुद्ध सबळ पुरावा

सुनावणीवेळी, आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचा सबळ पुरावा आहे व प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे आरोपीला नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी उपनगराध्यक्षांचे सपत्निक देहदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शहराचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर यांनी सपत्निक देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सपत्निक देहदान करण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. समाजाचे ऋण फेडणे व देहदानाविषयी जागृती करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पोहेकर दाम्पत्याने सांगितले.
दिलीप पोहेकर ७२ व त्यांच्या पत्नी यशोधरा या ६९ वर्षांच्या आहेत. या दाम्पत्याने सोमवारी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी हॉस्पिटल) शरीररचनाशास्र विभागाला देहदान करत असल्याचे पत्र दिले. त्यांनी पत्रासोबत दोन्ही मुली व जावई याचे संमतीपत्र जोडले आहे.
‘देहदानाविषयी माहिती घेतल्यानंतर देहदान करण्याची इच्छा झाली. मात्र, पत्नी, मुली व मित्र हा निर्णय सहजासहजी मान्य करणार नसल्याची कल्पना होती. पण, त्यांना पटवून सांगितल्यानंतर माझा निर्णय मान्य करण्यात आला. पत्नी यशोधरा यांनीही देहदानाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोघांनीही हा निर्णय घेतला,’ अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष पोहेकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांना उपयोग

शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शरीराचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. कोणी देहदान केले, तरच त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो. कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे देहदान स्वीकारले जाते. परंतु, या देहाचा उपयोग प्रत्यारोपणासाठी होत नाही, अशी माहिती उपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनेक आजार, व्याधींवर धावण्यामुळे मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शारीरिक तंदुरुस्तीसाठी धावण्याचा व्यायाम सुरू केला, परंतु धावण्याची आवड निर्माण झाल्यानंतर हाफ मॅरेथॉन, फूल मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन अशा धावण्यांच्या विविध स्पर्धांमध्ये औरंगाबादकरांनी ठसा उमटवला आहे. धावण्याच्या व्यायामामुळे अनेकांनी आपल्या गुडघेदुखी, मधुमेह अशा आजारांवर मात देखील केली आहे.

गेट गोइंग, एमजीएम आणि औरंगाबाद ब्लॅक बक्स या संस्थांनी पाच, दहा, १५ किलोमीटर, हाफ मॅरेथॉन अशा स्पर्धांचे आयोजन सुरू केले. धावण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्यानंतर औरंगाबाद शहरातील अनेकांनी धावण्याचा व्यायाम सुरू केला. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये धावपटूंच्या संख्येत लक्षणीय वाढ देखिल झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर हा धावपटूंचा बालेकिल्ला बनला आहे. धावण्याबरोबरच शारीरिक तंदुरूस्तीची क्षमता तपासण्याकरिता अनेकजण गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी या टेकड्यांवरही सफाईदारपणे चढाई करताना सहजपणे दिसतात. विभागीय क्रीडा संकुल, गरवारे क्रीडा संकुल, काही उद्यानातही सराव करण्यास धावपटूंची पसंती आहे. धावण्याचे वेड लागलेली काही मंडळी तर दीर्घ पल्ल्याच्या सरावासाठी शहराच्या आसपास २०-२५ किलोमीटर सहजपणे धावून येतात. अवघ्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीतच अनेकांनी हाफ मॅरेथॉन (२१ किलोमीटर), मॅरेथॉन (४२ किलोमीटर) स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे.

बंगळुरू येथे झालेल्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेतही औरंगाबादच्या धावपटूंनी धडाकेबाज कामगिरी केली. काही वर्षांपूर्वी धावण्याची सुरुवात करणारे अनेक धावपटूंनी आज अल्ट्रा मॅरेथॉनपर्यंत मजल मारली आहे. अशाच काही धावपटूंनी ‘मटा’शी त्यांचा अनुभव शेअर केला.

मुंबई व बंगळुरू येथे झालेल्या अल्ट्रा मॅरथॉन गाजवणारे मयुरेश डबरी म्हणाले, ‘बंगळुरू अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत शंभर किलोमीटर अंतराच्या शर्यतीत मी प्रथम आलो. देशातील ही सर्वात जुनी स्पर्धा मानली जाते. त्या अगोदर मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत मी १२ तासांत ७८ किलोमीटर अंतर कापले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. २०१३मध्ये मी धावण्यास प्रारंभ केला. कॉलेजमध्ये असताना मला ट्रेकिंगची आवड होतीच. वाईल्ड लाइफ फोटोग्राफी हा माझा आवडीचा छंद आहे. गोगाबाबा टेकडी वयाच्या ४७व्या वर्षी मी आठ-नऊ मिनिटांत सहज चढून जातो. धावण्यामुळे फिटनेस प्रचंड वाढला आहे. बिझनेसमध्ये ट्रेस फॅक्टर खूप असतो. तो सहजपणे हाताळण्याची ताकद मला धावण्यातून मिळते.’

डॉ. संदीप मुळे म्हणाले, ‘मुंबई व बंगळुरू अल्ट्रा मॅरेथॉनचा अनुभव खूपच चांगला होता. बंगळुरू अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत मी ५० किलोमीटर अंतर पाच तास ४६ मिनिटांत गाठले. २०१४मध्ये मी वॉकिंग करायचो. जॉगिंग करता-करता मला धावण्याची आवड निर्माण झाली. २०१४मध्ये आमचा ग्रुप लेह-लडाखला गेला होता. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मी एबीबी ग्रुप जॉइन केला. धावण्यामुळे ह्रदय सक्षम राहते. शिवाय शरीराला एक चांगली शिस्त लागते. ती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी ठरते. एकाग्रता, कणखरपणा आपोआपच येतो.’

‘चार वर्षांपूर्वी मी धावण्याचा व्यायाम सुरू केला. दररोज पाच ते सहा किलोमीटर पळायचो. एबीबी ग्रुपशी जॉइन झाल्यानंतर धावण्याचा सराव वाढत गेला. हैदराबाद, मुंबई, बंगळुरू येथील मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत चांगली कामगिरी नोंदवली. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, असे विशाल राठी यांनी सांगितले.

६४ वर्षांच्या धावपटू
मॅरेथॉन स्पर्धेत केवळ पुरूष धावपटूच अग्रेसर नाहीत तर महिलांनीही यात आपली मोहोर उमटवलेली आहे. ६४ वर्षीय डॉ. रेखा महाजन त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी गेटगोइंग मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. गेल्यावर्षी तर त्यांनी ५५ वयोगटाच्या ट्रायथलॉन स्पर्धेत सुवर्णपदक पटाकाविले. शिकागोतील पाच किलोमीटरच्या स्पर्धेत त्यांनी दुसरे स्थान मिळविले. धावण्यामुळे त्यांनी गुडघेदुखीवर मात केली.

पन्नाशीच जडले धावण्याचे वेड
पन्नाशीत असलेल्या सुनीता एरनाळे यांनी आपल्या फिटनेसकडे कधीही लक्ष दिले नव्हते. त्यांच्यावर आजारी आईची जबाबदारी होती. सलोनी व अनुप यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गेट गोइंग ग्रुप जॉइन केला आणि आता त्यांना धावण्याचे वेडच लागले आहे. त्या २५ किलोमीटर अंतर सहजपणे धावतात. मधुमेह असलेल्या ज्योती पुरी यांची गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तरीही त्यांनी गेट गोइंग ग्रुप जॉइन केला आणि आता त्यांची ओळख एक धावपटू म्हणून झाली आहे. त्या २५ किलोमीटर अगदी सहजपणे धावतात. या धावण्यामुळे त्यांना कोणताच त्रास जाणवत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपातीशिवाय उसाचा एफआरपी द्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
एफआरपीमधून ऊसतोड व वाहतूक खर्च कपात करू नये, सरसकट दोन हजार ५५० रुपये प्रति टन एकरकमी द्यावेत, अशी मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. या मागणीसाठी विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
सध्या राज्यात ठिकठिकाणी ऊसदरासाठी आंदोलन होत आहे. ‘कन्नड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक बारामती अॅग्रोसह दुसऱ्या जिल्ह्यातील साखर कारखानदांरानी एफआरपीनुसार भाव द्यावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार ९.५ साखर उतारासाठी दोन हजार ५५० रुपये प्रति टन भाव देण्याचे निर्देश आहेत. यामध्ये ९.५ पेक्षा कमी साखर उतारा हा ९.५ मध्येच ग्राह्य धरला जाणार आहे. वरिल दोन हजार ५५० प्रति टन या दरातून ऊसतोड व वाहतूक वजा करून शेतकऱ्यांना पैसे देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे ऊस दरामध्ये शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. शेतकऱ्यांना एकरकमी कसलीही वजावट न करता सरसकट दोन हजार ५५० रुपये प्रति टन भावासाठी आगामी अधिवेशन काळात लक्षवेधी सूचना मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील खंडोबाची आजपासून यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रतिजेजुरी असलेल्या सातारा येथील खंडोबाची चंपाषष्ठीनिमित्त आज शुक्रवार यात्रा भरत आहे. यानिमित्त अभिषेक, महाआरती, महानैवैद्य, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनासाठी गुरुवारपासूनच मोठी रिघ लागली असून ‘यळकोट, यळकोट, जय मल्हार’ च्या गजराने परिसर दुमदुमला आहे.
यात्रेनिमित्त पहाटे भाविकांना दर्शन सुलभरित्या होता यावे, यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त, स्वंयसेवकांची मदत घेतली जात आहे, असे विश्वस्तांनी सांगितले. यात्रेनिमित्त देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. पहाटे चार वाजता अभिषेक होईल. चंपाषष्ठी निमित्ताने प्रथेप्रमाणे भरीत व रोडगा असा नैवद्य दाखविण्यात येतो. हा महानैवैद्य झाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. त्यानंतर पंरपरेनुसार सकाळी आठनंतर खंडोबाच्या मूर्तीची पालखी दांडेकर वाड्यातपर्यंत काढण्यात येईल. तेथे रुद्राअभिषेक घालून नैवैद्य दाखविला जाईल. त्यानंतर सायंकाळी पुन्हा वाजता गाजत मिरवणूक मंदिरात येईल. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. गावातील शेकडो स्वंयसेवकांची मदत घेतली जात आहे, असे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी सांगितले. मंदिर व परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष पळसकर यांनी सांगितले.
मंदिर व परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना सुलभरित्या दर्शन घेता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्यच्या दृष्टीने परिसरात साफसफाई करण्यात आली आहे. एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिरापर्यंत मनपाने नव्याने पथदिवे लावले आहेत. वाहन पार्किंगसाठी रवी जैन यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. यात्रेनिमित्त पूजासाहित्य, खेळणी व इतर दुकाने थाटण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्याचा भराव फुटल्याने आठवडी बाजारात पाणी

$
0
0

म. टा. प्रातिनिधी, कन्नड
तालुक्यातील गडदगड नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या एका दरवाजाचा भराव वाहून गेल्याने बंधाऱ्यातील पाणी नागद येथील आठवडी बाजारात घुसले. अचानक पाणी आल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, व्यापारी व ग्राहकांनी प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी झाली नाही.
नागद येथील गडदगड नदी पात्रात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरवण्यात येतो. या ठिकाणाच्या वरील बाजुस सुमारे १५० मीटर अंतरावर कोल्हापुरी बंधारा आहे. या बंधाऱ्यातील पाणीप्रवाह नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजांचा उपयोग करण्यात येतो. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याने १५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीतर्फे सुरक्षा उपाययोजना व तांत्रिक बाबीची तपासणी न करता बंधाऱ्यांचे दरवाजे मातीचा भराव टाकून त्यावर प्लास्टिकचे अच्छादन टाकण्यात आले. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शुक्रवारी पावणे बाराच्या सुमारास बंधाऱ्याच्या एका दरवाजाचा भरावाला भगदाड पडले. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी बाजारात घुसले. यामुळे मोठी एकदम धापपळ झाली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात व बराच वेळ चालल्याने कापड व्यावसायिक, मसाला व्यावसायिक व इतर भुसार मालाच्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर आठवडीबाजार रस्त्यावर हलविण्यात आला. आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांनी हे नुकसान ग्रामसेवक चौधरी व उपसरपंच रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांच्या मदतीने वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीचे १६ हजार कोटी आठवड्यात जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या आठवडाभरात १६ हजार कोटी रुपये जमा होतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पक्ष बांधणीवर भर देत राज्याचा दौरा सुरू केल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी सांगितले. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठकीने या दौऱ्याला सुरुवात झाली असून, २६ नोव्हेंबरला नाशिक विभागाची, २७ रोजी पुणे, २८ नोव्हेंबर रोजी ठाणे, तर ३० तारखेला नागपूर येथे बैठक होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिली. आमदार अतुल सावे, नारायण कुचे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, गणेश हाके, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आदी उपस्थित होते.

राज्यात ९१ हजार बूथ असून, त्यापैकी ७० टक्के बूथ स्थापन करण्यात आहेत. ‘वन बुथ ट्वेंटिफाइव्ह युथ’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

कपाशीला बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रश्नी उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरुवारी रात्रीच चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

खोतकरप्रकरणी भाष्य टाळले
शिवसेना नेते, मंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारीबाबत कोर्टाने दिलेल्या निकालासंदर्भात विचारले असता प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी, ‘कोर्ट, कायदा त्यांचे काम करेल,’ असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण एफआरपीसाठी कन्नडमध्ये ऊस आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
ऊसदराचे आंदोलन आता कन्नड तालुक्यातही पोहोचले आहे. कोणतीही कपात न करता सरसकट प्रतिटन दोन हजार ५५० रुपये एफआरपी द्यावा या मागणीसाटी तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी संघाने शुक्रवारी दुपारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.
तालुक्यातील बारामती अॅग्रो या खासगी कारखान्यासह तालुक्यातील ऊस घेऊन जाणाऱ्या सर्व कारखान्यांनी सरसकट दोन हजार ५५० रुपये द्यावेत, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. त्याबद्दल तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात ऊस उत्पादक संघाचे कार्यकर्ते, शेतकरी, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, सहनिबंधक उमेशचंद्र हुसे व बारामती अॅग्रोचे व्यवस्थापक मिलिंद देशमुख यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक संघाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला. यापूर्वीच्या दोन बैठका वांझोट्या ठरल्याने उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे उपोषणार्थिंनी सांगितले.
साखळी उपोषणासाठी देण्यात आलेल्या निवेदनावर डॉ. आण्णासाहेब शिंदे, उत्तमराव राठोड, देविदास काळे, काकासाहेब तायडे, सुभाष बाविस्कर, विठ्ठल गोलाईत, दिनेश अकोलकर, अनिल शेळके, सुनील सोनवणे, रामेश्वर मोरे आदींच्या सह्या आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामातील चालढकल अभियंत्यांच्या अंगलट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
पाणीटंचाई हा विषय गांभीर्याने न घेता चालढकल करीत बेजाबदारपणे काम केल्याप्रकरणी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता सय्यद साजीद व लघसिंचन विभागाचे शाखा अभियंता ए. आर. बर्ढे यांना तहसीलदार संतोष गोरड यांनी कलम १०७नुसार फौजदारी कारवाई करण्याची कारणेदाखवा नोटीस बजावली आहे.
पाझर तलावातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी गेवराई सेमी येथील ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयास पत्र विनंती केली होती. तहसीलदार संतोष गोरड यांनी अवैध पाणी उपसा तातडीने रोखावा व प्रतिंबधात्मक पथक स्थापन करावे, अशी सूचना सय्यद साजीद व ए. आर. बर्ढे यांना दिल्या होत्या. परंतु, या दोघांनाही याची गांभीर्याने दखल न घेता कुठलीही कारवाई न केली नाही. त्यामुळे गोरड यांनी दोघांनाही कलम १०७ नुसार फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. गेवराई सेमी येथील पाझर तलावातून सर्रास अवैध पाणी उपसा होत असतांना आदेश दिल्यानंतरही कारवाई न करता अवैध पाणी उपसा करणाऱ्यांना सहकार्य केल्याचा ठपका त्यांना दिलेल्या नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे.

जमानत घ्यावी लागेल

पाणीटंचाई सारख्या प्राधान्याच्या कामात कोणाचाही बेजाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, तहसील कार्यालयाने आधीच बजावले आहे. तहसीलदारांनी नोटीस बजावल्यामुळे दोन्ही अभियंते अडचणीत आले आहेत. या दोघांना तहसील कार्यालयात इंटेरियम बाँड सादर करून जमानत घ्यावी लागणार आहे. अवैध पाणी उपसा न रोखल्यास जमानत जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली, जाईल अशी माहीती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटी घटल्याने वाढली उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वस्तू व सेवा कराच्या (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) कपात केल्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून व्यापार, व्यवसाय क्षेत्रात आलेली मरगळ दूर होत आहे. दिवाळीपर्यंत जीएसटीतील विविध स्लॅब कमी होत होते. नोव्हेंबरमध्ये कर २८वरून १८ टक्क्यांवर आला आहे. यामुळे उलाढाल दुपटीने होत असल्याची माहिती औरंगाबाद व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी दिली.

‘जीएसटी’चे दर कमी केल्याचा व्यापारी आणि ग्राहक यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. खर्च करण्यास ग्राहक राजी होत आहे. रोख आणि ऑनलाइन (कॅशलेस) व्यवहारही वाढत आहेत. जीएसटी काउंसिलच्या दोन -तीन महिन्यांत झालेल्या बैठकांत करामध्ये केलेली कपात आणि नियमांत केलेले बदल, रिटर्न भरण्याबाबत देण्यात आलेली सवलत यांचा परिणाम बाजारावर झाल्याचे चित्र आहे. कपडा, किराणा, डेली नीड्स, हॉटेलमधील खर्च यावरील करात कपात झाली आहे. आता ‘वन टॅक्स वन नेशन’ वाटत असल्याचे शहा म्हणाले. हॉटेलमध्ये जातानासुद्धा फक्त पाच टक्केच टॅक्स लागत असल्याने खूप दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

कपडा आणि किराणा व्यवसायात आता उलाढाल वाढली आहे. लग्नसराईत व्यवसायाचे कसे होणार, याकडे लक्ष लागले होते. यात दोन आठवड्यापूर्वी सणावारांत सर्व व्यापार क्षेत्रात ३०० ते ४०० कोटी उलाढाल झाली होती. यात इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, सोने, कपडा, खाद्य, हॉटेल आणि इतर छोट्या व्यवसायांचा समावेश होता. ही उलाढाल आता दुपटीने वाढली आहे. हॉटेल व्यवसायातील जीएसटी पाच टक्के झाल्याने शहरातील शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेल्समध्ये गर्दी वाढत आहे. पक्के बिले देणेही सुरू केले आहे. जीएसटी करप्रणालीत बदल झाल्याने बिलांमधील बदलही त्याच दिवशी करण्यात आले व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितेले.

रिटर्न, एमआरपी क्लिष्ट
कमाल विक्री किंमतीवर (एमआरपी) जीएसटी लावायचा की नाही याबद्दल अजूनही सुस्पष्टता नाही. काही वस्तूंच्या ‘एमआरपी’वर जीएसटी आहे आणि काहींच्या ‘एमआरपी’वर जीएसटी नाही, पण यामुळे फारसा फरक पडलेला नाही. काही ठिकाणी तक्रारी आल्या असल्या तरी त्यातून मार्ग काढणे सुरू आहे. त्यात कोणाचीही फसवणूक होत नसल्याचा दावा अजय शहा यांनी केला आहे. दरम्यान, वस्तु व सेवा कर विभाग याकडे कटाक्षाने लक्ष देत असून, सोशल मीडियातून यासंबंधी जनजागृतीही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा पालिकेवर निशाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वसाधारण सभेत बाजू मांडू द्या, असे विनंती करणारे पत्र समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीने महापालिका आयुक्तांच्या नावे दिले आहे. या विनंतीपत्रातही कंपनीने पालिका प्रशासन व सर्वसाधारण सभेवर निशाणा साधला आहे. बाजू मांडण्याची संधी न देता करार रद्द केला, असा आरोप कंपनीने केला आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे कमबॅक होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या कंपनीने ‘आम्हाला सर्वसाधारण सभेत बाजू मांडण्याची संधी द्या,’ अशी विनंती करणारे पत्र पालिका प्रशासनाला दिले. या संबंधिचे वृत्त ‘मटा’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले. विनंती करणाऱ्या या पत्रात कंपनीने महापालिकेच्या प्रशासनावर आणि सर्वसाधारण सभेवर निशाणा साधला असल्याचे लक्षात येते.

कंपनीने आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनी व्यवस्थित काम करीत होती. काही कारणांमुळे कंपनीच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले व त्याला बळी पडून तत्कालीन आयुक्तांनी ३० जून २०१६ रोजी कंपनीचा करारनामा रद्द करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यापूर्वी महापालिकेने दिलेल्या प्रत्येक नोटीसला कंपनीने दिलेल्या उत्तराकडे डोळेझाक करून व कंपनीला सर्वसाधारण सभेपुढे बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सर्वसाधारण सभेने करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीस बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नव्हती. प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. वास्तविक पाहता चार जुलै रोजी आयुक्तांनी कंपनीला, करार रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस दिलेली होती.

कंपनीने या नोटीसला एक ऑगस्ट रोजी समर्पक उत्तर दिले होते, परंतु या उत्तराचा कोणताही विचार न करता आयुक्तांनी करार रद्द केला, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

समांतर पाणीपुरवठा योजना शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असून, शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, असे कंपनीने आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. कंपनीने २२ सप्टेबर २०११ रोजी झालेल्या करारानुसार; तसेच केंद्र व राज्य सरकारने प्रकल्पात बरीच गुंतवणूक केली आहे. कंपनीने बरीच कामे देखील केली आहेत. या गोष्टींचा कोणताही विचार न करता आयुक्तांनी करार रद्द केला, असा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

लेटरहेड नाही, साध्या कागदावर पत्र
सर्वसाधारण सभेत बाजू मांडू देण्याचे पत्र औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पालिका आयुक्तांना दिले आहे. हे पत्र कंपनीच्या लेटरहेडवर नाही. साध्या कागदावर डीटीपी करून हे पत्र देण्यात आले आहे. पत्रावर ब्रिजेश सिंग यांचे नाव आहे, पण त्यांच्या हुद्दा लिहिलेला नाही. साध्या कागदावर तयार करण्यात आलेल्या पत्रावर कंपनीचा शिक्का देखील नाही. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर विनंती करणारे पत्र साध्या कागदावर कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यळकोट, यळकोट, जय मल्हार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
प्रतिजेजुरी असलेल्या सातारा येथे चंपाषष्ठी यात्रेनिमित्ताने खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ‘यळकोट, यळकोट, जय मल्हार’च्या गजराने संपू्र्ण परिसर दुमदुमन गेला होता. मंदिरात अभिषेक, महानैवैद्य, पालखी सोहळ्या आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चंपाषष्टी यात्रेनिमित्ताने शुक्रवारी पहाटेपासूनच खंडोबा मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटे चारच्या सुमारास अभिषेक करण्यात आला. चंपाषष्ठीनिमित्त प्रथेप्रमाणे भरीत व रोडगा असा नैवद्य दाखविण्यात आल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सतीष चव्हाण, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, गणेश चोपडे, श्री खंडोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांच्यासह अन्य मान्यवर, भाविक उपस्थित होते.

त्यानंतर परंपरेनुसार खंडोबारायांच्या मूर्तीची पालखी दांडेकर वाड्यापर्यंत काढण्यात आली. दांडेकर परिवारांतर्फे रुद्राअभिषेक करण्यात आला; तसेच पुरणपोळीचा नैवद्य दाखविण्यात आला. सांयकाळी पुन्हा वाजता गाजत व ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा गजर करत मूर्तीची मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली, अशी माहिती संतोष पळसकर यांनी दिली.

परिसरात चैतन्यांचे वातावरण
रेवंड्या व भंडारा उधळत खंडेरायांच्या चरण नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी; तसेच सर्वांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी श्री खंडोबा देवस्थान समितीमार्फत खास व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तासह गावातील युवकांनी स्वंयसेवक म्हणून कार्य केले. वाघ्या मुरळी यांनी तुणतुणे, डफाच्या सुरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत खंडोबाचा गजर करत घातलेला गोंधळ, यळकोट, यळकोट, जय मल्हार जयघोष यामुळे परिसरात भक्तीमय व चैतन्याचे वातावरण पसरले होते. फुले, प्रसादाची दुकानांसह खेळण्याच्या दुकानासह मोठी जत्रा याठिकाणी भरली असून, यात्रेनिमित्ताने महापालिकेने एमआयटी ते मंदिर परिसर यादरम्यान पथदिवेही लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टात गुंतवणुकदारांना बचत खाते आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काळ बदलला तरी अजूनही बहुतांश जण पारंपरिक पद्धतीने पोस्टात गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी जरा एक वेगळी बातमी आहे. पोस्टात केलेल्या गुंतवणुकीची मुदत संपल्यावर आता केवळ पैसे काढण्याचा अर्ज (विथड्रॉलफॉर्म) भरून दिल्यावर रक्कम मिळणार नाही. आता पोस्टातच बचत खाते उघडून तेथे ही रक्कम जमा केली जाईल. त्यानंतर या खात्यातून ती संबंधित गुंतवणुकदाराला काढता येईल.
हा बदल झालेला नियम बहुतांश ग्राहक, नागरिक आणि पोस्टातील गुंतवणूकदारांना माहिती नाही. यामुळे अनेकांना त्रास होत आहे. पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांनी तेथे बचत खाते सुरू करून होणारा त्रास टाळावा, असे सूचना फलकही पोस्टाच्या विविध कार्यालयांत लावण्यात आले आहेत.
ही सूचना प्रत्येक काउंटरच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. सेव्हिंग खाते उघडणे, ‘केवायसी’ भरून देणे आणि प्रत्येक गुंतवणुकीनुसार ‘केवायसी’ अद्ययावत करणे आवश्यक झाले आहे. माहिती अद्ययावत केल्याशिवाय गुंतवलेला पैसा दिला जाणार नसल्याने आता ग्राहकांची बचत खाते उडण्यासाठी रांग लागत आहे.
पोस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेत असे म्हटले आहे की, एक डिसेंबर २०१७पासून आरडी, एमआयएस, टीडी, एससीएसएस, पीपीएफ,एसएसए, एनएससी, केव्हीपी या योजनांतील गुंतवणूक मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्वी (प्रीमॅच्युरिटी) काढण्यासाठी संबंधित खातेदारांच्या बचत खाते (सेव्हिंग बँक अकाउंट)‌ सुरू करावे लागेल. यामुळे खातेदारांनी आपले संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये ३० नोव्हेवर पूर्वी बचत खाते उघडावे.

आधार, पॅन कार्ड आवश्यक
पोस्ट खात्यातील सर्वच खातेदारांनाही आता आपला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाइल क्रमांक सादर करून, ते तिन्ही क्रमांक खात्यांशी लिंक करून घेणे आवश्यक केले आहे. हे तिन्ही क्रमांक जोडण्याची मुभा ३१ डिसेंबर २०१७पर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीआरडीए’ला अधिकाऱ्याची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालकपदी अधिकारी कधी येणार, याची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागातील अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय अडचणी येत असल्याने हा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या निधीतून ग्रामीण भागातील विकास साधण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेची प्रशासकीय जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहे. या कार्यालयाचे प्रमुख म्हणून प्रकल्प संचालक कार्यरत असतात. अतिरिक्त सीइओ समकक्ष ही पद आहे. संभाजी लांगोरे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची दीड वर्षांपूर्वी पुण्याला बदली झाली. तेव्हापासून औरंगाबाद डीआरडीएला कायमस्वरुपी प्रकल्प संचालक मिळालेला नाही. सुमारे २० दिवसांपूर्वी अब्दुल मुकीम देशमुख यांची हिंगोलीहून औरंगाबादला प्रकल्प संचालक म्हणून बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले, पण हिंगोली जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने देशमुखांना कार्यमुक्त होण्यास अडचणी आहेत. त्यामुळे तूर्तास तरी देशमुख औरंगाबादेत येण्याची शक्यता नाही. प्रकल्प संचालकांचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे ‘डीआरडीए’च्या योजना राबविण्याबाबत अडचणी येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images