Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बीएलओ-नेट-अॅप’द्वारे मतदारांशी संपर्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील मतदार यादी अद्ययावत करण्याबरोबरच मतदारांची सर्व कौटुंबिक माहिती घेऊन या कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी बीएलओ-नेट-अॅपचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी ब्लॉक केव्हल ऑफिसरच्या (बीएलओ) माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांची कौटुंबिक माहिती गोळा करण्याची मोहीम निवडणूक विभागाने सुरू केली अाहे. या मोहिमेत बीड जिल्हा अव्वल ठरला आहे.

या अॅपमध्ये मतदाराची कौटुंबिक माहिती नोंदवण्यात येत आहे. ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन कुटुंबातील एकूण सदस्य, पुरुष, महिलांची संख्या, वय, एकूण मतदार, लग्न झालेले सदस्य, त्यांचे मोबाइल क्रमांक, ई-मेल, त्याचबरोबर मृत्यू झालेले सदस्य आदी स्वरुपाची माहिती गोळा करण्यात येत आहे. या माहितीचा उपयोग निवडणुकीच्या काळात संबंधित मतदाराला निवडणूक आयोगाच्या सूचना, माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे कळविण्यासाठी करण्यात येणार आहेत.

एखाद्या सदस्याचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यास त्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी सूचना दिली जाईल. ‘बीएलओ-नेट-अॅप’द्वारे नोंदणीची मोहीम निवडणूक आयोगाने राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, यवतमाळमधील राळेगाव, नाशिकमधील दिंडोरी, परभणीतील पाथरी, मुंबई उपनगरातील बांद्रे विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्यातील अन्य जिल्ह्यात ऐच्छिक स्वरुपात ‘बीएलओ-नेट-अॅप’ साह्याने कौटुंबिक माहिती संकलित केली जात आहे.

बीड जिल्हा अव्वल
माहिती संलनात बीड जिल्हा अव्वल ठरला असून, जिल्ह्यातील तीन लाख ४० हजार कुटुंबांची माहिती सं‌कलित करण्यात आली असून, पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३६ हजार ७७६ कुटुंबांची माहिती सं‌कलित करण्यात आली आहे, तर अन्य जिल्ह्यांपैकी सोलापूर दोन लाख ९४ हजार, सांगली एक लाख १९ हजार, उस्मानाबाद एक लाख १६ हजार, पुणे एक लाख दहा हजार, यवतमाळ ७७ हजार, मुंबई उपनगर ६५ हजार, नाशिक ६० हजार आणि जळगाव जिल्ह्यात ५९ हजार कुटुंबांची माहिती अॅपच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षेच्या वेळेचा नियम राबविण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वर्गात वेळेतच प्रवेश द्यावा लागणार आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर निर्णय राबविणे अडचणीचे ठरणार आहे. चार-पाच गावांना जोडून एक परीक्षा केंद्र दिले जाते. अशावेळी केंद्रावर वेळेत जाणे विद्यार्थ्यांनाही तापदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळासमोर निर्णय राबविणे आव्हान असणार आहे.

फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले. पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळोन प्रवेशाच्या नियमावलीत बदल केले आहेत. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थी विद्यार्थ्यास वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यास वर्ग सोडता येणार नाही. पूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्धातास उशिरा येण्याची मुभा होती. नवीन निर्णयाने वेळेतच वर्गात उपस्थित रहावे लागणार आहे. हा निर्णय ग्रामीण भागातील केंद्रावर राबविणे मंडळासाठी आव्हानात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागात आसपासच्या गावातील चार-पाच शाळा, ज्युनिअर कॉलेजांमधील विद्यार्थ्यांसाठी जवळचे केंद्र दिले जाते. अनेक ठिकाणी सोयीसुविधांची वाणवा लक्षात घेता विद्यार्थ्यांना वेळेत पोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. बसचे वेळापत्रकही निश्चित नसल्याचाही फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न शाळा, कॉलेजांना पडला आहे.

नोंदी ठेवण्याचीही अडचण
शिक्षण मंडळाच्या दुर्लक्षामुळे अनेक केंद्रावर परीक्षेदरम्यान आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. अनेक केंद्रावर प्रवेशाच्या वेळीचे नियोजन कसे करायचे, नोंदी कशा ठेवायच्या, असा प्रश्नही मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच पडला आहे. मंडळाचे अधिकारी परीक्षा केंद्रांना प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करत आहेत. त्याला परीक्षा केंद्र किती प्रतिसाद देतात, हे सांगणे अवघड आहे.

वेळेचा निर्णय राबविणार कसा, असा प्रश्न आहे. सगळी जबाबदारी केंद्रप्रमुखांवर सोडून मंडळ बाजुला सरकते. ग्रामीण भागात वाहतुकीच्या पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थी जाण्यासही अडचणी येतात. याचाही मंडळाने विचार करायला हवा होता.
- युनूस पटेल, मराठवाडा अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान बदलाने आजाराचे थैमान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
‘ओखी’ चक्रीवादळामुळे राज्यातल्या हवामानात झालेल्या बदलाने श्वसन तसेच अन्य आजाराने थैमान घातले आहे. नांदेड शहरातील शेकडो रुग्ण शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णांमध्ये बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला, व्हायरल फिव्हर यासह श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. वाढते प्रदूषण व हवामानात अचानक झालेला बदल यामुळे हे आजार बळावत असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढ झाली आहे.
व्हायरल फिव्हरचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. आवश्यक तो औषधांचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे; पण अन्य आजारांच्या रुग्णांसोबत या आजारांचे रुग्ण वाढल्याने थोडीशी गैरसोय होत आहे. खाटांची संख्या मर्यादित असल्याने अडचणी येतात; पण आम्ही सर्व पातळीवर प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हवामानात झालेला बदल व शहरातील प्रदूषण यामुळे श्वसनाच्या आजाराने अनेकांना ग्रासले आहे. वातावरण बदलले की ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांचा त्रास आणखीनच बळावतो.

खासगी रुग्णालये ‘हाउसफुल’
विशेषतः बाल रुग्णालयात रुग्णांची संख्या भरमसाठ आहे. एरव्ही १० ते १२ रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये ५० ते ५५ बाल रुग्णांची संख्या झाली आहे. सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालये ‘हाउसफुल’ झाली आहेत. प्रदूषणाच्याबाबतीत केवळ मोठ्या शहरांचीच चर्चा होते. पण प्रत्यक्षात अनेक लहान शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. नांदेड जिल्ह्यातील २० टक्क्यांपेक्षा अधिक ऑटो रिक्षांमध्ये इंधन म्हणून चक्क रॉकेलचा वापर होतो. तरोडा नाका, सिडको, इतवारा, देगलूर नाका परिसरात रॉकेल विक्रेते चक्क ऑटोरिक्षा चालकांना जादा दराने बिनदिक्कतपणे रॉकेलची विक्री होते. या प्रकाराकडे पोलिसच नव्हे तर पुरवठा विभागाचे अधिकारीही दुर्लक्ष करतात; परिणामी शहरातल्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक
नांदेडमध्ये हवामानात झालेल्या बदलांमुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्दी, ताप, खोकला या आजारांसह श्वसनाच्या आजाराने अनेक बालक त्रस्त आहेत; असे शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मार्तंड आयनेले यांनी सांगितले. आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय केले; तर नियंत्रण मिळवता येते. लहान मुलांचे थंडीपासून संरक्षण करावे, रस्त्यावरून जाताना रुमाल, स्कार्फचा वापर करावा. थंड, आंबट पदार्थ टाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.


प्रदूषण व हवामानातल्या बदलाने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी आता ती नियंत्रणात आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरावेत. आवश्यक त्या वेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. अ‍ॅलर्जीचा त्रास होत असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. सर्दी, खोकला किंवा अन्य लक्षणे दिसले वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डॉ. रवींद्र बिलोलीकर, ‘आखिरी’हॉस्पिटल, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईची शिकवण महत्त्वाचीः ठाकूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईची शिकवण फार महत्त्वाची ठरते. करिअरसाठीचे व्यवस्थापन करायचे कसे, याचे धडे आपण आईकडूनच घेतले पाहिजेत असे, प्रतिपादन सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी बुधवारी येथे केले.

‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. देवगिरी महाविद्यालयाच्या रविंद्रनाथ टागोर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. मातोश्री माईसाहेब पारखे मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार यंदा जालन्याच्या डॉ. प्रतिभा श्रीपत यांना जाहीर झाला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, डॉ. प्रकाश पारखे, एस. पी. जवळकर, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. अशोक तेजनकर, कवी प्रा. विष्णू सुरासे आदींची उपस्थिती होती.

यावेळी वर्षा ठाकूर म्हणाल्या,‘प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्त्व हे इतरांपेक्षा वेगळे असते. प्रत्येकाच्या आईच वैशिष्ट वेगळे असले, तरी भूमिका एकच असते. वेळेचे व्यवस्थापन, ताणतणावातून दूर कसे रहायचे याची शिकवण आईकडूनच मिळते. आपणही आज जे आहोत त्यात आईची शिकवणच मोलाची ठरली. संस्थेचा हा उपक्रम समाजाला नवीन प्रेरणा देणारे आहे.’ डॉ. पारखे यांनी पुरस्कार देण्यामागचा हेतू मांडला. गेल्या ४१ वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. जवळकर यांचेही यावेळी भाषण झाले. ठाकूर यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा श्रीपत यांचा गौरव करण्यात आला. २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. श्रीपत म्हणाल्या,‘हा पुरस्कार म्हणजे जबाबदारीच ओझे आहे. हे ओझे असले तरी सुखकर ओझे आहे. याचा मी आनंदाने स्वीकार करते. हा पुरस्कार एकटीचा व एका वर्षाचा नाही. माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा तो सन्मान आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक नियुक्तीप्रकरणी पुन्हा चौकशी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अपंग समावेशित युनिटच्या ११ शिक्षकांना नियुक्ती दिली गेली होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांनी सवाल उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती. प्रशासनाने अतिरिक्त सीईओ अशोक शिरसे यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. याप्रकरणी एकवेळा चौकशी झाली आहे. काही तांत्रिक अडचणी असल्याने पुन्हा चौकशी होणार आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार अपंग समावेशित युनिट कार्यरत आहेत. राज्यभरातील युनिटमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नियुक्तीची अडचण होती. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ११ शिक्षकांना गेल्या महिन्यात नियुक्ती दिली गेली. याबाबत वरिष्ठ कार्यालयातून सूचना होत्या, असे प्रभारी शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते.

दरम्यान, या प्रश्नावर स्थायी समिती बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता. प्रशासनाने चौकशीसाठी एकसदस्यीय समिती नेमली. या चौकशीच्या अहवालाबाबत सीईओ अशोक शिरसे यांना विचारले असता ते म्हणाले, की एक वेळा चौकशी झाली आहे, पण काही अधिक माहिती हवी आहे. त्यासाठी दुसऱ्यांदा लवकरच चौकशी केली जाईल आणि त्यावर निर्णय दिला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.

ग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगत देशपांडे म्हणाले की, आता ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आहे. सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केल्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्याकडे तक्रार करावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, अतिरिक्त शुल्क, खराब दर्जाचा माल किंवा योग्य सेवा मिळत असल्यास त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले.

ग्राहक जागरण पंधरवडा १५ डिसेंबरपासून
१५ ते ३१ डिसेंबरदरम्यान ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सोप्या शब्दात शाळा, महाविद्यालयील विद्यार्थी, महिला यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रदर्शन, भित्तीपत्रक, परिसंवाद, मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला ग्राहकांसाठी विविध उपक्रम राबवून ग्राहक हक्कांबाबत निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयेजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चित्रपटगृहात फलक लावणार
चित्रपटगृहात प्रेक्षकांनी स्वतः जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास प्रतिबंध करता येणार नाही. यासंदर्भातील सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वतयारीच्या निमित्ताने निवडणुकीची चाचपणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची परिस्थिती कशी राहील, कोणकोणत्या मतदारसंघात काँग्रेस परिस्थिती मजबूत राहू शकते, कुठे अडचणी जाणवतील, याची चाचपणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस १२ डिसेंबर रोजी मोर्चा काढणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त चव्हाण आले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचीही बैठकीस उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून मोर्च्याच्या नियोजनाचा आढावा घेतला गेला. आढाव्याचा विषय असला, तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चाचपणी चव्हाण यांनी दौऱ्यात केल्याचे मानले जात आहे. भाजप सरकारविरुद्ध पक्षाने जाहीर केलेली आंदोलने कोणकोणत्या जिल्ह्याने प्रभावीपणे राबविली, गटतटांचे वाद वेळीच थांबवून आगामी निवडणुकीसाठी कोणते चेहरे पुढे येऊ शकतात, याबद्दल कालच्या बैठकीतून चाचपणी करण्यात आली. नांदेड, परभणी, औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे जाळे आहे. भाजप आणि शिवसेनेला २०१९मध्ये टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे कोणते नेते प्रभावी ठरतील याची उजळणीही यानिमित्ताने झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

भेटीगाठी अन् चर्चा
चव्हाण यांनी बैठकीव्यतिरिक्त काही कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या; तसेच मराठवाड्यातून आलेल्या काही पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केल्याचे कळते. एकूणच आगामी निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एरंडीच्या बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना तालुक्यातील बठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १४ विद्यार्थ्यांना बुधवारी एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शाळेत एका विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया सोबत खिशात आणल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास मध्यंतरीच्या वेळी त्याने त्या एरंडीच्या बिया स्वतः खाल्या आणि सोबतीला शाळेत त्याच्या मित्रांनाही खायला दिल्या. यानंतर साधारण अर्ध्या तासात एरंडीच्या बिया खालेल्या त्या विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. तेव्हा हा सगळा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने या सगळ्या विद्यार्थ्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

विषबाधा झालेली मुले ही आठ ते नऊ वर्ष वयोगटातील आहेत. चैतन्य देवडे, पृथ्वीराज बांदल, भक्ती देवडे, गोपाल देवडे, ओंकार देवडे, प्रतिक देवडे, कृष्णा बागल, दीपक बागल, अनिकेत बागल, भारती सिरसाठ, ओमप्रकाश पाटेकर, ओंकार वीर व जीवन उफाड अशी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.



खोतकरांची रुग्णालयाला भेट
राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून योग्य उपचार करण्यासाठी डॉक्टरांना योग्य त्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा नारळ आठ दिवसांत फुटणार

$
0
0

रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा नारळ आठ दिवसांत फुटणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा नारळ येत्या आठ दिवसांत फुटेल, असे संकेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत. जेवढ्या मोठ्या प्रमाणात रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल महापालिकेची बदनामी झाली आहे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू, असे ते म्हणाले.
संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेवरून रंगकर्मी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह काही रंगकर्मींनी रंगमंदिराच्या प्रश्नावर प्रतिकात्मक आंदोलन केले. अभिनेता सुमीत राघवन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरवस्थेचा प्रश्न मांडला. स्थानिक रंगकर्मींनी देखील रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल वेळोवेळी आवाज उठवला. महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाच्या वेळी देखील आंदोलन करण्याचा इशारा रंगकर्मींनी दिला होता. त्याची दखल घेऊन महापौरांनी रंगकर्मींच्या चळवळीतील सारंग टाकळकर, शीतल रुद्रवार यांना गुरुवारी चर्चेसाठी बोलावले व लवकरच रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नूतनीकरणाच्या कामासाठी ५० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. टेंडर प्रक्रिया देखील झाली आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यावर लगेचच काम सुरू केले जाईल. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी देखील टेंडर मंजूर करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर घोडेले म्हणाले, येत्या आठ दिवसांत रंगमंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला जाईल. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कामाचा नारळ फोडू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगीर तहसील कार्यालयावर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
विविध मागण्यांसाठी गुरुवारी उदगीरच्या तहसील कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी हे आंदोलन पुकारले होते. यावेळी जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत सरकारला इशारा देण्यात आला.
उदगीरच्या तहसील कार्यालयासमोर गुरुवारी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांचा महत्वाचा हंगाम असतो. या काळात सलग वीज पुरवठा आवश्यक असतो. हा पुरवठा खंडीत करू नये अशी मागणी देशमुख यांनी केली. शेती अवजारावरील वस्तू व सेवा कर कमी करण्याची मागणी त्यांनी केली.
ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांच्या धोरणांची अमंलबजावणी धिम्या गतीने केली जात असल्याबाबत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सिग्नल यंत्रणा, ग्रामीण रुग्णालय आणि उदगीर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने अनेक आश्वासने दिली होती. मात्र त्याची पुर्तता करण्यासाठी ते अपयशी ठरले. आम्ही आता गप्प बसणार नाही सरकारला जाब विचारणार असेही देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सिद्धार्थ उद्यान हाऊसफुल्ल

$
0
0

सिद्धार्थ उद्यान हाऊसफुल्ल, मोफत प्रवेशाचा नागरिकांची उचलला फायदा
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय गुरुवारी हाऊसफुल्ल होते. पालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तीन दिवस शहरवासियांसाठी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क न आकारता सर्वांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवसही प्राणिसंग्रहालय व उद्यान सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
नागरिकांना आणि प्रामुख्याने बालगोपाळांना सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आहे, परंतु दीड वर्षापूर्वी महापालिकेने या दोन्हीचे प्रवेश शुल्क वाढवले आहे. प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क दहा रुपयांवरून ५० रुपये तर उद्यानाचे प्रवेश शुल्क दहा रूपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. ११ वर्षापर्यंतच्या मुलांना प्रवेश शुल्क आकारले जात नाही. वर्धापन दिनाच्या निमित्ताने तीन दिवस प्रवेश शुल्क न आकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हाउसफुल्ल झाले. पालिका प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. पुढील दोन दिवस नागरिकांची गर्दी जास्त होईल, असे गृहित धरून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणी संथ गतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर निवडणुकीची मतमोजणी संथ गतीने सुरू झाली. मतपत्रिकांसाठी प्रवर्गनिहाय वेगवेगळ्या मतपेट्या नसल्यामुळे मतपत्रिकांची छाननी करण्यासाठी सर्वाधिक वेळ वाया गेला. परिणामी, सायंकाळी साडेसहा वाजता ‘एससी’ प्रवर्ग उमेदवारांची मतमोजणी सुरू झाली. बहुतेक सर्व उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यासाठी पहाट झाली.

पदवीधर अधिसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली. या निवडणुकीसाठी चार जिल्ह्यांतील १६ हजार ८०० मतदारांनी मतदान केले. सहा प्रवर्ग असल्यामुळे मतपत्रिकांची छाननी करण्यासाठी सर्वाधिक वेळ लागला. मतपत्रिका वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी एकत्रित होत्या. मतदान केंद्रावर प्रवर्गानिहाय वेगळी मतपेटी नव्हती. मतदानानंतर सर्व मतपत्रिका मतपेटीत एकत्र टाकण्यात आल्या. प्रवर्गानुसार मतपत्रिका वेगळ्या करताना कर्मचाऱ्यांना उशीर झाला. प्रवर्ग छाननीनंतर वैध-अवैध छाननी झाली. सायंकाळी साडेसहा वाजता मतमोजणी सुरू झाली. एससी प्रवर्गाच्या चार उमेदवारात चुरशीची लढत असल्यामुळे पहिला निकाल ऐकण्यासाठी गर्दी झाली. एससी प्रवर्ग, एसटी, एनटी प्रवर्ग, ओबीसी, महिला आणि खुला प्रवर्ग अशा क्रमानुसार मतमोजणी पार पडली. विद्यापीठाचे तीनशे प्रशिक्षित कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झाले. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे व विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या निगराणीखाली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उमेदवार प्रतिनिधींसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली होती. एकूण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यासाठी स्क्रिन लावण्यात आले. मात्र, छाननीत वेळ गेल्यामुळे प्रत्यक्ष मोजणी उशिरा सुरू होऊन मध्यरात्रीनंतर खुल्या प्रवर्गाची मोजणी सुरू झाली.

बघा, काही करता येते का
मतपेटी उघडल्यानंतर संदेश असलेल्या काही चिठ्ठ्या सापडल्या. पदवीधर गटाची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना एका पदवीधराने भावनिक आवाहन केले. ‘पदवीधर उमेदवाराला नोकरी नसल्यामुळे लग्न जमवताना अडचणी येतात. अनेकांनी वयाची पस्तीशी-चाळिशी गाठली आहे. हा मुद्दा निवडणुकीचा नसला तरी जीवनासाठी महत्त्वाचा असल्यामुळे जॉब मिळाला पाहिजे. पदवीधर बेकार आहेत. बघा, काही करता येते का,’ असा भावनिक सवाल मतदाराने केला. ही चिठ्ठी सूचक संदेश देऊन गेली.

बाद मतदान वाढले
पदवीधर निवडणुकीसाठी तब्बल ५९ उमेदवार आणि सहा मतपत्रिका असल्यामुळे मतदार गोंधळून गेले होते. याचा परिणाम मतदानावर झाला आहे. उमेदवारासमोर निळ्या शाईने पसंतीक्रम टाकणे बंधनकारक होते, मात्र अनेक मतदारांनी पेनाने टिक केली. काहींनी शून्य वापरले आणि काही मतदारांनी कोऱ्या मतपत्रिका मतपेटीत टाकल्या. विद्यापीठ प्रशासन व उमेदवारांनी मतदान जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतले नसल्यामुळे बाद मतदानाचा टक्का वाढला. बाद मतदानाची ठोस आकडेवारी समजू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रोझोन’मध्ये देहविक्री; परदेशी मुलींसह १९ अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा’ आणि ‘दी स्ट्रेस हब’ या दोन स्पावर छापा टाकून पोलिसांनी देहविक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. थायलंडच्या नऊ तरुणींसह स्थानिक दोन तरुणी आणि स्पाचे चार व्यवस्थापक, चार व्हीआयपी ग्राहक अशा एकूण १९ जणांना पोलिसांनी अटक केली.

या कारवाईबद्दल पोलिस उपायुक्त डॉ. दिलापी घाडगे - घाटे यांनी सांगितले की, मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर ‘अनंतरा द फॅमिली स्पा’ आणि ‘ दी स्ट्रेस हब’ या नावाने तीन वर्षांपासून स्पा सेंटर सुरू आहे. हे दोन्ही स्पा एकाच मालकाचे असून, शेजारीशेजारी आहेत. तेथे हेअर कटिंग सलून आणि थाई मसाजच्या नावाने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी दोन पंटरला तेथे पाठवण्यात आले होते.

डॉ. घाडगे, सहाय्यक आयुक्त अनिता जमादार, महिला तक्रार निवारण कक्षाच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील, सिडको एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, वाहतूक शाखेचे फौजदार दीपक बिरारी हे स्पाच्या बाजूला दबा धरून बसले होते. ठरल्याप्रमाणे पंटर दोन्ही स्पामध्ये गेले. तेथील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन महिलांची मागणी केली. ५० हजार रुपये घेऊन दोन मुली देण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दाखवली. स्पाच्या व्यवस्थापकाच्या हाती ५० हजार रुपये ठेवल्यावर व्यवस्थापकाने थायलंडच्या दोन मुली दिल्या. त्यानंतर पंटरची इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकला आणि तेथे असलेल्या सर्वांना अटक केली.

आलिशान खोल्या
देहविक्रीच्या व्यवसायासाठी दोन्ही स्पामध्ये चोख व्यवस्था होती. दोन्ही स्पामध्ये प्रत्येकी चार अलिशान खोल्या होत्या. या ठिकाणी विदेशी तरुणींच्या साथीने देहव्यापार चालत होता, असे डॉ. घाडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’ कविसंमेलनात बहरली काव्यप्रतिभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सामजिक वास्तव ते प्रेमाची अनुभूती, शेतीचे भयावह प्रश्न ते मोबाइलची डोकेदुखी अशा वैविध्यपूर्ण विषयांवर आशयपूर्ण कविता लिहून राज्यभरातील कवींनी ‘मटा फेसबुक कविसंमेलन’ गाजवले. राज्यभरातील शंभरपेक्षा जास्त कवी संमेलनात सहभागी झाले. सर्वोत्कृष्ट पाच कविता शुक्रवारी जाहीर केल्या जाणार आहेत.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या औरंगाबाद आवृत्तीचा शनिवारी, नऊ डिसेंबर रोजी सहावा वर्धापन दिन आहे. दर्जेदार बातम्या आणि उपक्रमातून ‘मटा’ घराघरात पोचला आहे. कला-साहित्य-संस्कृतीच्या बातम्यांना वाचकांचा नेहमी भरभरून प्रतिसाद मिळतो. वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी ‘मटा फेसबुक कविसंमेलन’ घेण्यात आले. या कविसंमेलनाला राज्यभरातील कवींचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद, जालना, नांदेड, अकोला, बुलडाणा, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर जिल्ह्यातील कवींनी फेसबुकवर कविता अपलोड केल्या. सर्व वयोगटातील कवींनी दर्जेदार कवितांच्या माध्यमातून संमेलनाचा उत्साह वाढवला. विशेष म्हणजे शेकडो रसिकांनी फेसबुकवर कविसंमेलनाचा आनंद घेतला. लाइक्स, कमेंट यातून संमेलन अधिक बहारदार झाले. तरूण कवी आणि रसिकांची उत्साह अधिक होता. मराठी कविता नवीन शैलीकडे झुकली आहे. मुक्तछंदात समर्पक मांडणी करण्यावर कवींचा भर असतो. या नवीन शैलीचा प्रत्यय

कविसंमेलनात आला. दरम्यान, या कवितांचे परीक्षण मान्यवर कवी करणार आहेत. पाच सर्वोत्कृष्ट कविता शुक्रवारी जाहीर केल्या जाणार आहेत. या कवींना ‘साकेत प्रकाशन’च्या वतीने पारितोषिक दिले जाणार आहे.

औरंगाबाद ते लंडन
‘मटा फेसबुक कविसंमेलना’ला मागील वर्षीसुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी औरंगाबाद आवृतीचा वर्धापन दिन असला तरी राज्यभरातील कवींनी कवितांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. लंडन येथील कवीने तीन कविता अपलोड केल्या. राज्यातील कवींना सामावून घेतानाच संमेलन सातासमुद्रापार पोहचले. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत संमेलन झाले. वेळ संपल्यानंतरही कवितांचा ओघ कायम राहिला.

नाटकाच्या आजपासून प्रवेशिका
‘मटा’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘वेलकम जिंदगी’ नाटकासाठी प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशिका शुक्रवारी, आठ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यालयात उपलब्ध असतील. ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने प्रवेशिका दिल्या जातील. वाचक, रसिकांनी आपल्या प्रवेशिका वेळ न दवडता घेऊन जाव्यात, असे आवाहन ‘मटा’च्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कर्ष पॅनेलचे प्रा. मगरे विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार प्रा. सुनील मगरे विजयी झाले. विद्यापीठ विकास मंचच्या पंकज भारसाखळे यांचा मगरे यांनी पराभव केला. एससी प्रवर्गात तीन उमेदवारात चुरशीची लढत झाली. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता पहिला निकाल जाहीर झाला.

पदवीधर अधिसभा निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दहा जागांसाठी तब्बल ५९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. छाननीला उशीर झाल्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणी सायंकाळी सुरू झाली. अनुसूचित प्रवर्गाची मतमोजणी चुरशीची ठरली. उत्कर्ष पॅनेलचे प्रा. सुनील मगरे आणि विद्यापीठ विकास मंचचे पंकज भारसाखळे यांच्यातील लढत रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतमाल निर्यातीसाठी बाजाराकडेही लक्ष द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंबा, डाळिंब, भेडीं यांसह अन्य फळे, भाजीपाल्यांना देश-विदेशात मोठी मागणी असून, या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. उत्पादनांबरोबरच बाजारपेठेवर लक्ष द्यावे आणि कौशल्य व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे अधिकारी, तज्ज्ञांनी केले.

विभागीय कृषी कार्यालय व एपीडा संस्थेतर्फे मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात मराठवाडा विभागातील समूहाद्वारे फळे व भाजीपाला निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बोलताना ते बोलत होते. औरंगाबाद विभागाचे कृषी पालक संचालक पी. एन. पोकळे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. ‘अपेडा’चे महाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, एनएचएमचे संचालक डॉ. एस. एल. जाधव, निर्याततंत्र अधिकारी गोविंद हंडे, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, आर. एस. भत्ताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, सचिन यादव आदी उपस्थित होते.

पोकळे म्हणाले,‘फळे व भाजीपाला निर्यातीमध्ये इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो, मात्र राज्यात काही जिल्हे निर्यातीत आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम फळे, भाजीपाला उत्पादक घ्यावे, त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.’

‘एनएचएम’चे संचालक जाधव म्हणाले की, योग्य व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. उत्पादनाबरोबरच मार्केटवर लक्ष द्या. व्यवस्थापन कौशल्यावर भर द्या.’

मराठवाड्यातील भेंडी, आंबा, डाळींब, कारले यांसह अन्य फळे, भाजीपाला निर्यात करता येऊ शकतो. त्याला मोठी मागणी आहे. फक्त उत्पादन निर्यातक्षम कसे राहील, यासाठी कसोशीने प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.

तंत्र अधिकारी हंडे यांनी, निर्यात करण्यासाठी मोठी संधी असल्याचे सांगत आपला बाजारपेठेयोग्य भाजीपाला पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शेतकऱ्यांनी योग्य पिकाचे नियोजन करून उत्पादन काढले, तर परदेशी निर्यातीसाठी आम्ही सदैव शेतकऱ्यांना सहकार्य करू, असे नमूद केले.

अडीचशेवर शेतकरी उपस्थित
दुसऱ्या सत्रातही तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. निर्यातीच्या संधीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. कार्यशाळेला मराठवाड्यातील २५०हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी शाळा संस्थाचालकांचा १५ डिसेंबर रोजी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबद
इंग्रजी शाळा, संस्थाचालकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाने वेळाकाढू धोरणाविरोधात १५ डिसेंबर रोजी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिले. त्यानंतरही प्रश्न कायम आहेत. त्यामुळे प्रश्नांच्याबाबतीत संस्थाचालक १५ डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरतील. सकाळी ११पासून पटवर्धन मैदानावरून सिताबर्डी मार्गे अधिवेशनावर मोर्चा पोचेल. राज्यभरातील चार हजार इंग्रजी शाळा संस्थाचालक या दिवशी रस्त्यावर उतरतील, असा दावा संघटनेने केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला प्रदेश सहसचिव मनीष हंडे, प्रवीण आव्हाळे, अमित भोसेकर यांची उपस्थिती होती.

संस्थाचालकांच्या मागण्या
इंग्रजी संस्थाचालक १२ मागण्यांचे निवेदन सरकारला देणार आहेत. ‘पीटीएम’मध्ये मान्य असलेल्या शुल्काप्रमाणे मोफत प्रवेशातील शुल्क परतावा मिळावा, शाळेसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करावा, विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासासाठी शाळा सोडण्याचा दाखला बंधनकारक करावा, इंग्रजी शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी वापरता यावा, इंग्रजी शाळा फी रेग्यूलेशन कायदा लागू करू नये, स्कूल बसला रोड टॅक्सशिवाय अन्य कोणतेही कर लावू नये. शाळेचे शुल्क न भरणाऱ्या पालकांच्या पाल्यांचा पुढील वर्षाचा प्रवेश रद्द करण्याबाबत शासन आदेश काढावा, वीज बिल व मालमत्ता कर सवलत द्यावी आदी मागण्यात संघटनेने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

और मैं महापौरपदपरही लटक गया

$
0
0

और मैं महापौरपदपरही लटक गया

माजी महापौरांच्या सत्कार समारंभात ओबेरॉय यांची टोलेबाजी

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

‘इच्छा जाहीर नही की तो कुछ नही मिलता. मैने आमदार - खासदार होने की इच्छा जाहीर नही की, इसलिए महापौरपदपरही मै लटक गया’, असे म्हणत माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी गुरुवारी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी हास्याचे फवारे उडाले. काही जणांची कोंडी देखील झाली.

महापालिकेच्या ३५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी महापौरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन पालिकेतर्फे करण्यात आले होते. सिद्धार्थ उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला ओबेरॉय यांच्यासह डॉ. शांताराम काळे, अशोक सायन्ना यादव, प्रदिप जैस्वाल, गजानन बारवाल, विकास जैन, सुदाम सोनवणे, भगवान घडमोडे, अनिता घोडेले, सुनंदा कोल्हे, शिला गुंजाळे, रुख्मिणीबाई शिंदे या माजी महापौरांची विशेष उपस्थिती होती. उपमहापौर विजय औताडे, पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त वसंत निकम, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे आदी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, महापौर झाल्यावर आमदार - खासदार होतात, असे म्हटले जाते. याचे प्रदिप जैस्वाल हे उदाहरण आहे. त्यामुळे तशी इच्छा मनात ठेवायला हरकत नाही. गजानन बारवाल आणि विकास जैन यांना माजी कधीच म्हणता येणार नाही, कारण ते नेहमी सत्तेत असतात, असा उल्लेख त्यांनी केला. घोडेले यांच्या भाषणाचा संदर्भ देत मनमोहनसिंग ओबेरॉय म्हणाले, आमदार - खासदार होण्याची अपेक्षा ठेवायची नसते. ती एक संधी असते आणि घोडेलेंची काम करण्याची पद्धत लक्षात घेतली तर त्यांना ही संधी मिळाल्यास ती संधी ते सोडणार नाहीत. ‘अबकी बार मैं’ असे म्हणून मी महापौर झालो. वास्तविक पाहता महापौर होण्यासारखी राजकीय परिस्थिती नव्हती. ‘इच्छा जाहीर नही की तो कुछ नही मिलता. आमदार - खासदार होनेकी इच्छा मैने जाहीर नही की, इसलिए मै महापौरपदपरही लटक गया. तुम इच्छा जाहीर करो, छोडो मत’, असा सल्ला त्यांनी घोडेले यांना दिला.

अशोक सायन्ना यांनी मनोगत व्यक्त करताना घोडेलेंच्या आमदार - खासदार होण्याच्या इच्छेची दखल घेतली. ते म्हणाले, आम्ही सर्वजण प्रदिप जैस्वाल यांना सांभाळून घेऊ. घोडेले, तुम्ही फक्त चंद्रकांत खैरे यांना सांभाळून घ्या. ते तुम्ही केले तर आमदार होण्याचा तुमचा मार्ग मोकळा होईल. आम्हा सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा. प्रदिप जैस्वाल, सुदाम सोनवणे, भगवान घडमोडे, आयुक्त नवल किशोर राम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

-

कचऱ्यात सापडलेले सोने गृहिणीला परत करणाऱ्या रमेश नरगळे, रतन फुले यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. दीड हजार रुपये असलेली पर्स सापडल्यावर ती पर्स संबंधित महिलेला नेऊन देणाऱ्या कर्मचारी ताराबाई खरात यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना प्रत्येकी अकराशे रुपये बक्षीस देखील देण्यात आले. याच कार्यक्रमात वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरिक्षक व जवानांचा देखील सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजांत ‘महाभरती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४८१ वैद्यकीय शिक्षक, तर सुमारे ९०० ते १००० परिचारिकांची फेब्रुवारी ते मार्चपर्यंत नव्याने नियुक्ती होणार आहे. त्याचवेळी घाटीतील औषधांचा व यंत्र-सामुग्रींच्या वार्षिक देखभालीच्या थकीत खर्चाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लागेल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय देशमुख यांनी सांगितले.

प्रधान सचिव देशमुख यांनी गुरुवारी घाटी व कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी महाविद्यालय व रुग्णालयाची स्थिती; तसेच अडचणी जाणून घेतल्या. प्रधान सचिव देशमुख म्हणाले, ‘औषधांच्या थकित निधीचा प्रश्न पुरवणी अनुदातून मार्गी लागेल. त्यापूर्वी दीड कोटीचा निधी ‘पीएलए’ फंडातून मार्गी लावण्यात येईल. सिटीस्कॅन, कॅथलॅबच्या वार्षिक देखभालीचा थकित निधीही पुरवणी अनुदानातून मार्गी लावला जाईल. नवीन प्रस्तावांऐवजी जुने प्रश्न व विषय आधी मार्गी लावले जातील. त्याचाच भाग म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४८१ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्ती फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील. त्याचवेळी ९०० ते १००० नवीन परिचारिकांची नियुक्ती येत्या काही महिन्यात होईल. अर्ज जास्त प्रमाणात असल्यामुळे परिचारिकतांच्या नियुक्तीला थोडा जास्त अवधी लागू शकतो.’ या वेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, टाटा मेमोरिलय हॉस्पिटलचे संचालक (शैक्षणिक) डॉ. कैलाश शर्मा यांच्यासह अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.

‘भाभा ट्रॉन’ फेब्रुवारीपर्यंत
‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’च्या वतीने ‘स्टेट कॅन्सर हॉस्पिटल’ला सुपूर्द करण्यात आलेल्या भाभा ट्रॉन मशीनसाठीचे बंकरचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल व मार्चपर्यंत प्रत्यक्षात मशीन सुरू होऊ शकेल, असे ‘टाटा’चे संचालक (शैक्षणिक) डॉ. कैलाश शर्मा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तीनवेळा जीवदान; महापौर नॉट आऊट

$
0
0

तीनवेळा जीवदान; महापौर नॉट आऊट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

पाच ओव्हर्सच्या मॅचमध्ये तीनवेळा जीवदान मिळाल्याने महापौर नंदकुमार घोडेले नॉट आऊट राहिले. महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महापौर एकदाश विरुद्ध अधिकारी-पत्रकार संघाचा क्रिकेटचा सामना झाला. या सामन्याचा आनंद पालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक - पदाधिकाऱ्यांबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला.

नाणेफेक जिंकून अधिकारी - पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी केली. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता एम. बी. काजी, उपायुक्त वसंत निकम, रवींद्र निकम, पत्रकार दत्ता सांगळे, माधव इतबारे, चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मिळून ५७ धावा काढल्या. महापौर एकादश संघात महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, नारेस सिद्दिकी, भाऊसाहेब जगताप, प्रदिप बुरांडे आदींचा समावेश होता. पाच - पाच ओव्हर्सचा हा सामना झाला. पाच ओव्हर्समध्ये महापौरांना तीन वेळा जीवदान मिळाले. मिळालेल्या जीवदानाचा लाभ उठवत घोडेले यांनी फटकेबाजी करीत ३० धावा काढल्या आणि अधिकारी - पत्रकार संघावर विजय मिळवला.

पालिकेच्या टाऊन हॉल परिसरात महिला कर्मचाऱ्यांतर्फे आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. महापौरांनी आनंदनगरीचे उद्‍घाटन केले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा देखील घेण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images