Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विधी विद्यापीठ दोन वर्षांत उभारू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. दोन वर्षांत विद्यापीठ उभारणीचे काम पूर्ण केले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विद्यापीठाच्या औपचारिक उद‍्घाटनाप्रसंगी दिले.

कांचनवाडी परिसरात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे ताहिलरामानी, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. जेथे तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत. इथले वेगळेपण म्हणजे विद्यापीठांच्या उभारणीत न्यायमूर्तींनी दाखवलेली रूची. या विद्यापीठांमुळे विधी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मिती शक्य होणार आहे. डिजिटल युगात नवनवीन आव्हाने समोर येत आहेत. त्या दृष्टिकोनातून कायद्यात दुरुस्ती, बदल केले जातील. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीसाठी विधी विद्यापीठांना, चांगल्या संस्थांना मोठी संधी आहे. कायद्याच्या शिक्षणातही आवश्यक ते बदल करत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याची गरज आहे. जागतिक पातळीवरील कायद्यातील बदलाचाही वेध घेत पुढे जाता येईल. कोणत्याही भागाच्या विकासासाठी त्याठिकाणी चांगल्या मुनष्यबळाची, संसाधनाची आवश्यकता आहे. हाच विचार करून विधी विद्यापीठ, आयसीटीचे जालन्यातील केंद्र अशा संस्था उभारणीसाठी राज्यशासन गतीने प्रयत्न करत आहे. पायाभूत सुविधा, सिंचनावर भर देत आहे. दोन-तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण झाल्यास मराठवाड्यासह विदर्भासारख्या प्रदेशांचाही विकास झालेला दिसेल,’ असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी बागडे म्हणाले, ‘विधी विद्यापीठाने न्यायव्यवस्थेला अधिक मजबूत करणारे, गरिबांना न्याय मिळवून देणारे वकील निर्माण करावेत.’ ‘समाजातील सर्व घटकांना योग्य तो न्याय मिळवून देणारे महत्त्वाचे माध्यम म्हणजे कायदा,’ असे न्या. ताहिलरामाणी म्हणाल्या. तर, न्या. बोर्डे म्हणाले ‘मराठवाड्याला कला, संस्कृती यांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. हा विभाग आता शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, घडामोडींचे महत्वाचे ठिकाण बनत आहे. अशावेळी विभागाच्या विकासात हे विद्यापीठ महत्वाचे ठरेल.’ प्रास्ताविक कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांनी केले. आभार कुलसचिव व्ही. आर. सी. कृष्णय्या यांनी मानले.

विद्यापीठातून संशोधन नाही
‘पारंपरिक विद्यापीठांमध्ये संशोधन, नावीन्यपूर्णतः राहिलेली नाही. या विद्यापीठांमधील कोर्सेस जुने झाले आहेत. ज्ञानाची केंद्र असलेली विद्यापीठे फक्त शिक्षण देत आहेत. ज्ञान देत नाहीत. विद्यापीठांशी जोडलेल्या कॉलेजांची संख्या मोठी झाली अन् त्यांचा कारभार सांभाळताना गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामुळे आगामी काळात लवचिकता आणण्यासाठी स्वायत्तेवर भर दिला जाणार आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हत्तीणींचा प्राणिसंग्रहालय सोडण्यास नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्हीही हत्तीणींनी शनिवारी प्राणिसंग्रहालय सोडण्यास चक्क नकार दिला. दोन्हीही हत्तीणींना गाडीत बसवून विशाखापट्टणमला पाठवण्यासाठी पालिकेच्या पथकाने तीन तास प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, आता रविवारी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.
महापलिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात दोन दशकांपासून सरस्वती आणि लक्ष्मी या दोन हत्तीणी आहेत. सरस्वती ही लक्ष्मीची आई आहे. प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेवण्यास सेंट्रल झू ऑथॅरिटीने व हायकोर्टाने मज्जाव केल्यामुळे या दोन्हीही हत्तीणी विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी नॅशनल झुऑलॉजीकल पार्कला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्हीही हत्तीणींनी घेवून जाण्यासाठी विशाखापट्टणम येथील टीम शुक्रवारी सायंकाळी शहरात दाखल झाली. शनिवारी सकाळी त्यांनी हत्तीणींचे अवलोकन केले आणि त्यानंतर त्यांना घेऊन जाण्याची तयारी सुरू करण्यात आली. हत्तीणी पाठवण्याच्या दृष्टीने वन विभागाचा परवाना आवश्यक असतो, पण महापालिकेने हा परवाना काढला नव्हता. दुपारी एक - दीडच्या सुमारास प्राणिसंग्रहालयातील कार्यालयीन अधिक्षक संजय नंदन यांनी विशाखापट्टणमच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या साथीने वन विभागाचे कार्यालय गाठले. साडेचार वाजेच्या सुमारास त्यांना वन विभागाकडून परवाना मिळाला. परवाना मिळाल्यावर हत्तीणींना गेवून जाण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. दोन हत्तीणींसाठी दोन टेंपो आणले होते. सुरूवातीला लक्ष्मीला टेंपोमध्ये बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यात यश आले नाही. रँपवरून चढून टेंपोमध्ये बसण्यास लक्ष्मी तयार नव्हती. कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून पाहील्या, पण त्या फोल ठरल्या. त्यामुळे लक्ष्मीला बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांनी सरस्वतीला पुढे केले. थोड्याशा प्रयत्नानंतर सरस्वती टेंपो मध्ये जावून बसली. त्यानंतर लक्ष्मीला टेंपोमध्ये बसवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. परंतु शर्थीच्या प्रयत्नानंतरही लक्ष्मीला टेंपोमध्ये बसवण्यात प्राणिसंग्रहालयाच्या पथकाला यश आले नाही. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजता सुरू केलेले प्रयत्न रात्री साडेआठ वाजता थांबवण्यात आले. आता उद्या रविवारी सरस्वती, लक्ष्मीला टेंपोमध्ये बसवून विशाखापट्टणमच्या दिशेने पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले जाणार आहेत.


लक्ष्मी टेंपोत बसली नाही. त्यामुळे टेंपोत बसलेल्या सरस्वतीला देखील खाली उतरून घेण्यात आले. रात्रभर तीला टेंपोमध्ये उगीचच कशासाठी उभे करायचे असा विचार करून तीला खाली उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्तीणींना विशाखापट्टणमला घेवून जाण्यासाठी हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयाचे डॉ. नवीन कुमार, केअर टेकर एम.के. रामकृष्ण आणि अन्य चार कर्मचारी आले आहेत.

नाराज सरस्वती कोपऱ्यात जाऊन बसली
सरस्वती या हत्तीणीचे वय ५४ वर्षांचे आहे. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात ती १९९६ पासून आहे. त्यामुळे तिला येथील परिसराचा, तिची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लळा लागला आहे. हत्तीणींना घेवून जाण्याची तयारी सुरू करण्यात आल्यावर त्यादृष्टीने हत्तीणींची मानसिकता तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. याचा अंदाज आल्यासारखी सरस्वती वागू लागली. हत्तीघराच्या परिसरातून तिचा पाय निघेना. कर्मचारी तीचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होते, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न लक्षात येताच सरस्वती हत्तीघराच्या एका कोपऱ्यात लांब जाऊन उभी राहिली. शेजारीच पडलेला एक दगड तीने सोंडेत उचलला आणि कर्मचाऱ्याच्या दिशेने भिरकावला. त्यामुळे तिची मानसिकता सर्वांच्या लक्षात आली.

१२०० किलोमीटरचा प्रवास
औरंगाबाद ते विशाखापट्टणम हा सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास आहे. ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर या वेगाने हत्तीणींचा प्रवास विशाखापट्टणमच्या दिशेने सुरू होणार आहे. किमान ४८ तास प्रवास पूर्ण होण्यास लागतील असे डॉ. नवीन कुमार यांनी सांगितले. नगर, सोलापुर, हैदराबाद मार्गे विशाखापट्टणम असा प्रवासाचा मार्ग ठरविण्यात आला आहे.

केअर टेकर हळहळले
सरस्वती व लक्ष्मीसाठी भागीनाथ म्हस्के, रामदास चव्हाण, जयसिंग चव्हाण, राजेंद्र लोखंडे हे चौघेजण केअर टेकर म्हणून काम करीत होते, तर ज्ञानेश्वर शेळके हत्तीणींच्या चारापाण्याची व्यवस्था करीत होता. दोन्हीही हत्तीणी जाणार या कल्पनेने हे पाचही जण हळहळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगीपेक्षा जास्त बांधकाम भोवले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूज महानगरात परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्या दोन मालमत्ताधारकांवर सिडकोकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिडकोकडून देण्यात आलेल्या म‌ाहितीनुसार, सिडको महानगर भागात राहणारे अशोक अच्युत राऊत तसेच अशोक निवृत्ती तनपुरे या दोघांना सिडको महानगर भागात मिळालेल्या सदनिका या एक मजल्यापर्यंत बांधकाम परवानगीच्या होत्या. मात्र, तरीही या दोघांनी दुमजली बांधकाम केले. सिडकोकडून रितसर परवानगी न घेता, नियमबाह्य पद्धतीने हे बांधकाम केल्यामुळे सिडकोचे अधिकारी रवींद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून अशोक राऊत आणि अशोक निवृत्ती या दोघांवर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ - ५३ (६) ब या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियमबाह्य बांधकाम; सर्वेक्षण करणार
वाळूज सिडको महानगर भागातील अनेक सदनिकांवर मागील काही वर्षांत नियमबाह्य पद्धतीने बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती या प्रकरणावरून समोर आली आहे. त्यामुळे सिडकोने वसविलेल्या वसाहतींमध्ये कुठे बेकायदा बांधकाम केले याचे सर्वेक्षण करण्याची गरज सिडकोकडून व्यक्त करण्यात आली आहे. परवानगी मिळताच हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर डेक्कनचे जानेवारीत ‘उडान’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहवासीयांसाठी एख खूषखबर. औरंगाबाद विमानतळावरून जानेवारीत एअर डेक्कन विमान कंपनीने विमान सेवा सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे.

बहुचर्चित ‘उडान’ योजनेत औरंगाबादचा समावेश झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी येथून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात झूम एअर, इंडिगो आणि डेक्कन एअर कंपनीचा समावेश आहे. इंडिगो एअरलाइन्स औरंगाबादला येणार याबाबत मागील वर्षभरापासून चर्चा आहे, मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. याशिवाय झूम एअर कंपनीने औरंगाबाद ते दिल्ली ही विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘डेक्कन एअर’च्या प्रतिनिधींनी गुरुवारी औरंगाबाद विमानतळाला भेट दिली. या भेटीत औरंगाबाद विमानतळावरून प्रवासी संख्या तसेच विमानतळावरील सुविधांची माहिती घेतली. याशिवाय विमानतळ संचालकाकडून कोणत्या भागात किती प्रवासी मिळू शकतात, मुंबई आणि दिल्लीला मिळणाऱ्या प्रवाशांची संख्या, अन्य मार्गांवर भविष्यात किती प्रवासी वाढतील याबाबतही चर्चा करण्यात आली. औरंगाबादेतून मुंबई, दिल्लीस, हैदराबादसह बेंगळुरू तसेच अन्य भागासाठी किती प्रवासी मिळणार याची चर्चा करण्यात आली.

आगामी वर्षात भविष्य चांगले
औरंगाबाद विमानतळावरून आगामी वर्षात डेक्कन, झूम या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सदर विमान सुरू झाल्यास विमानतळावरून प्रवासी संख्या वाढणार असल्याची शक्यताही बुकिंग एजन्सीवाल्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शहागंजहून थेट पुणे, कन्नडला बस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चक्क शहागंज बसस्थानकातून पुण्याला बस. चकित झाला ना, पण यासोबतच एसटी महामंडळाने आणखी एक धक्का दिला आहे. आता शहागंज ते कन्नड अशी बससेवाही सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

जुन्या शहरातून पुणे आणि कन्नडकडे जाण्यासाठी खूप जास्त प्रवासी आहेत. या प्रवाशांना मध्यवर्ती बसस्थानक गाठणे जिकरीचे होते. जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे येथून बस सुरू करा, अशी मागणी नागरिकांनी विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांच्याकडे केली होती. त्यांनी याला मान्याता दिली. आता सिडको - शहागंज - पुणे या मार्गावर दोन बसच्या चार फेऱ्या होणार असून, शहागंज कन्नड बसच्या दोन बसच्या बारा फेऱ्या होणार आहेत. औरंगाबादमधील शहागंज पूर्वी नंबर एक बसडेपो म्हणून प्रसिद्ध होते. शहागंज बसस्थानकातून २०००पर्यंत शंभर सिटीबसच्या फेऱ्याही सुरू होत्या. कालांतराने एसटी महामंडळाची सिटीबस सेवा बंद पडली. यानंतर शहागंज बस स्थानक ओसाड झाले. २०११पासून पुन्हा येथून सिटीबस सुरू झाली. मात्र ही सेवा सिडकोतून असल्यामुळे या बसस्थानकाकडे दुर्लक्ष झाले होते.

अशा सुटतील बस
शहागंज - पुणे - ०४.४० पहाटे
शहागंज - पुणे - ५.४० सायंकाळी
शहागंज कन्नड - ०७.३५ सकाळी
शहागंज कन्नड - ८.३५ सकाळी
शहागंज कन्नड - ११.४५ सकाळी
शहागंज कन्नड - १२.४५ दुपारी
शहागंज कन्नड - ३.४५ दुपारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...शिवरायांचा आठवावा साक्षेप!

$
0
0

...शिवरायांचा आठवावा साक्षेप!
---
त्याचं एक चित्र पूर्ण व्हायला सहा-सहा महिने लागतात. या ध्येयवेड्याचं छत्रपती शिवाजी महाराजांवर अपार प्रेम. त्यांचा पूर्ण जीवनपट ते आपल्या चित्रांतून रेखाटतायत. अशा या सर्वेश नांद्रेकर या युवा कलंदाराची ओळख आजच्या अग्निपथमध्ये...
---
मनोज कुलकर्णी
manoj.kulkarni@timesgroup.com
---
सर्वेश मूळचे ठाण्याचे. आता औरंगाबादकर, असं अभिमानानं सांगतात. त्याचं बीएपर्यंतचं शिक्षण झालं. पुढं काय करायचं, मार्ग सापडत नव्हता, पण काहीतरी वेगळं करायचं अशी पक्की खूणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली. इतिहास त्यांना अजिबात आवडायचा नाही. त्या किचकट आणि सतत विसरणाऱ्या सनावळ्या डोकं भंजाळून सोडायच्या. मग त्यांना अचानक वाटलं, आपण पुरातत्वात एम. ए. करुयात. त्यांनी ते केलं. इथंच त्यांची ओळख झाली लघुचित्र शैलीशी. सर्वेश यांच्या घरात कलेचा कसलाही वारसा नाही. त्यांनाही चित्र काढणं, रंगवणं माहितच नव्हतं. बरं यात पुढं काही करायचं की नाही, हे ही ठरलेलं नव्हतं. मग त्यांनी या लघुचित्र शैलीचा बारकाईनं अभ्यास करणं सुरू केलं. त्याबाबतचे संदर्भग्रंथ वाचून काढले. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली, हैदराबाद. जिथं जिथं याबद्दल मिळेल, तिथं तिथं जाऊन ही चित्रं आणि त्यांच्या शैली बारकाईनं न्ह्याहाळल्या. कांगाडा, राजस्थानी, किशनमद, मेवाडी आणि दक्खनी मराठी. अशा सगळ्या शैलींचा अभ्यास केला. अन् त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा तो प्रसंग घडला.
याबद्दल सांगताना सर्वेश म्हणाले, ‘सहज घरातून बाहेर पडलेलो. एका ठिकाणी थांबलो होतो. पाच-सहा वर्षांचा मुलाच्या आईनं एका पुतळ्याकडं बोट दाखवलं, तो लगेच म्हणाला शिवाजी महाराज. त्याचं साहजिकच मलाही अप्रूप वाटलं, पण त्यांनं फक्त त्या पुतळ्याच्या हाती असलेली तलवार पाहून हे वाक्य म्हटलेलं. खरं तर तो पुतळा शिवरायांचा नव्हताच, पण इतक्या लहान मुलाच्या डोक्यात तलवार म्हटले की शिवाजी महाराज असा विषयच कसा डोकावू शकतो, हे मला खूप अस्वस्थ करून गेलं. इतकंच काय सगळीकडे शक्यतो शिवरायांच्या हातात तलवार दाखवतात. मग तो पुतळा असो, शिल्प असो, चित्रं असोत. मला प्रश्न पडला मोगल, आदिलशहा इतकंच काय कुठलेही परकीय राजे, थोर व्यक्ती त्यांच्या प्रत्येक चित्रात हाती शस्त्र घेऊन कधी दिसत नाहीत. मग आपण शिवरायांना तेवढ्याच मर्यादित रूपात का दाखवतो? या प्रश्नांन छळणं सुरू केलं. अनेकांनी इतिहासात शिवरायांनी सुरतेची लूट केली, असा शब्दप्रयोग केला. त्यामुळंही माझ्या मनावर डागण्या दिल्या. शिवराय खरंच असे लूट करणारे होते? मग असं बोलणाऱ्याची जीभ आणि लिहणाऱ्याचे हात कसे झडले नाहीत. आज कोणीही परदेशी माणूस आला, त्यानं काय शिवरायांची फक्त हातात तलवार घेतलेलीच चित्र पाहायची. शिवाजी पराक्रमी तर होतेच. सोबतच एक लोकशाही राज्य निर्माण करणारा स्वराज्य संस्थापक आणि एक कनवाळू, दिलदार राजाही होते.
शिवरायांचा हा सगळा जीवनपट आपण चित्रातून उभा करायचा असा संकल्प केला. आणि ठरवून लघुचित्र शैलीकडं वळलो. याला अभ्यासाची जोड दिली. पहिलं चित्र काढलं. माँसाहेब जिजाऊसाहेबांनी शिवरायांसोबत पुण्यात स्थापन केलेल्या कसबा पेठ गणपतीचं. शिवरायांच्या गुरू या जिजाऊच. त्यांनीच त्यांना शस्त्र प्रशिक्षण दिलं. या रणरागिणी शिवरायांना शिकवतायत हे चित्रं काढलं. शिवाजी राजे जेव्हा त्यांचे वडील छत्रपती शहाजी राजे यांना भेटायला कर्नाटकात गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत प्रधान, अमात्य, राज कारभाराचे सहीशिक्के हे सर्व देऊन त्यांना महाराष्ट्रात पाठवलं. सोबत त्यांना स्वतःशस्त्रास्त्र प्रशिक्षण, राजकीय धडेही दिले. हे सगळं का केलं, तर त्यांच्या मनातही कुठंतरी स्वराज्याचा अंकुर फुटलेला होता. त्यांना शिवरायांना महाराष्ट्रात फक्त जहागिरी केलेलं पहायचं नव्हतं. त्यांनाही त्यांच्याकडून स्वराज्याचं कामच अपेक्षित होतं. मग हे सगळं मी माझ्या चित्रात येऊ दिलं. खरं तर लघुचित्र शैलीत काम करणं जिकरीचं. चित्र दोन बाय दोन फुटांची असतात. मग यात मी बदल केला. चित्रं मोठी काढणं सुरू केली. त्यासाठी चित्रात सांगणारा आशय मोठा, पात्र जास्त निवडली. ही चित्रं काढताना अगोदर पेन्सिलनं स्केच तयार करवं लागतं. त्यावर पुन्हा जलरंगाचा वापर करत रंगकाम. यात अनेकदा रंग बदलतात. चित्रातील पात्रांच्या आकृती या शैलीनं नाजूक असतात. त्या काढताना डोळ्यांत तेल घालून जागं असावं लागतं. यामुळं एक चित्र पूर्ण तयार व्हायला नोकरी, घरकाम सांभाळून सहा-सहा महिने लागतात. आजपर्यंत शिवरायांचे भव्यदिव्य जीवनपट मांडणारी जवळपास चाळीस चित्रं मी तयार केलीयत. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराज, ताराबाई अशी सगळी ऐतिहासिक पात्र मला नव्यानं माझ्या चित्रातून जिवंत करायचीयत.
अफजल खानाचा शिवरायांनी कोथळा बाहेर काढला. हे सत्य आहेच, पण त्याला कपटानं मारलं नाही. कारण अफजलखान स्वतः राजांना मारायला आला होता. त्याला सोडलं असतं, तर त्यांनं दगाफटका केलाच असता. मग आपण वारंवार तेच कोथळा फाडलेलं चित्रं का दाखवायचं? राजांच्या चित्रात फक्त चिलखत, तलवार इतकंच कशासाठी? औरंगजेब इतका क्रूर. त्यानं छत्रपती संभाजींना कसं छळून संपवलं, हे आपण जाणतोच. त्याला जेव्हा मी चित्रात पाहतो, तेव्हा त्याचा राजेशाही थाट, रॉयलनेस थक्क करणारा असतो. त्यात त्याचा काळा इतिहास आपोआप त्या चित्रामागे लपतो. मग माझा जाणता राजा शिवरायांचा इतिहास जितका पराक्रमी, तितकाच निखळ आणि शुभ्र आहे. त्यांचं मन जितकं नितळ, तितकाच हा राजाही दयाळू. मग माझी चित्रं पाहताच सगळ्यांच्या डोळ्यांत या राजाचा हा दिलदारपणा दिसावा. इतकंच. सर्वेश बोलायचं थांबले. तेव्हा शिवरायांची सगळी रूपं मनात भरून राहिली. खरंच शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी...!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सृजनाच्या वाटेवरील निगर्वी साहित्यिका

$
0
0

सृजनाच्या वाटेवरील निगर्वी साहित्यिका
---
सुप्रसिध्द लेखिका रेखा बैजल यांच्या 'मौत से जिंदगी की ओर ' या हिंदी कादंबरीस म. रा. हिंदी साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा जैनेंद्रकुमार जैन उपन्यास पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. नांदेड येथील कवयित्री ज्योती कदम यांनी लिहिलेला रेखा बैजल यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणारा हा लेख...
---
- ज्योती कदम, नांदेड
---
रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा जैनेंद्रकुमार जैन उपन्यास पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मन भूतकाळात गेलं ते थेट १९९० मध्ये. नांदेडमध्ये एका साहित्यसंमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी बैजल अध्यक्ष म्हणून आमंत्रित होत्या आणि तिथेच माझं कथाकथन आणि काव्यवाचन होतं. अध्यक्षपदी असणाऱ्या रेखाताई कार्यक्रमात रमून गेल्या होत्या. मी माझी कलाकार नावाची कथा सादर केली. नुकतंच कुठे महाविद्यालयीन शिक्षण सुरु झालेलं. बैजल यांनी माझं खूप कौतुक केलं. मध्यम उंची, सुंदर शालीन व्यक्तिमत्व आणि साधं राहणीमान, बोलण्यात अतीव गोडवा. बैजल मूळच्या जालन्याच्या. माझं आजोळ जालना. त्यांना घरी येण्याचा आग्रह केला आणि रेखाताई त्यांच्या यजमानांसोबत घरी आल्या. मनमोकळं बोलल्या. त्यातून एक नवीन नातं रुजलं. नंतर आजोळी गेले की मी आवर्जून त्यांना भेटत असे. बऱ्यापैकी पत्रव्यवहारही व्हायचा. त्यांची अग्निपुष्प नावाची कादंबरी पहिल्यांदा वाचली तेव्हा त्यांच्या लेखनाच्या प्रेमातच पडले. काळाच्या कितीतरी पुढचा विचार मांडणारी ती प्रचंड ताकदवान कादंबरी. विज्ञानावर आधारित. विज्ञानाची जोड घेऊन प्रचंड शब्दसामर्थ्यासह कल्पनेची उत्तुंग भरारी मारणारी ती कादंबरी.
पुढे पुढे तर रेखाताईंनी साहित्याच्या प्रांतात उत्तमोत्तम साहित्य संपदा निर्माण केली. मराठीत १३ कथासंग्रह, ९ कादंबऱ्या पैकी प्रकाशाची फुले ही बालकादंबरी, २ नाटके, २ एकांकिका, १ कवितासंग्रह ,२ ललितसंग्रहासह हिंदीमध्येही उपन्यास, कथासंग्रह, कवितासंग्रह इत्यादी तब्बल ३५ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. यापूर्वीही त्यांना मराठी साहित्य लेखनासाठी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध साहित्यसंमेलनामध्ये त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. २०११ मध्ये परभणी येथे पार पडलेल्या मसापच्या दुसऱ्या लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
एवढे मोठ-मोठे पुरस्कार, प्रचंड साहित्यसंपदा नावावर असतानाही रेखाताईंमध्ये काहीही बदल नाही. २०११ मध्ये माझ्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी त्यांनी पाठराखण द्यावी, या माझ्या विनंतीला मान देऊन त्यांच्या सासुबाई पुण्यात हॉस्पिटलमध्ये असतानाही प्रवासात कवितेचं बाड वाचून दवाखान्यातून फोनवरून मला पाठराखण दिली. नंतर काही दिवसांनी त्यांच्या हस्ताक्षरात मला ती लिहून पाठवली. आढेवेढे न घेता फक्त जिव्हाळ्यापोटी त्यांनी दिलेलं हे सहकार्य अमुल्य होतं. त्यानंतर प्रकाशित झालेल्या माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचं नितांतसुंदर समीक्षणही त्यांनी केलं. हे शब्दांचं नातं इतक्या वर्षांपासून अजूनही तितकंच टवटवीत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे रेखाताईंचा नितळ निर्मळ स्वभाव,निगर्वी व्यक्तिमत्व.
साहित्यलेखन करतानाही त्यांनी कितीतरी साहित्यप्रकार लीलया पेलले आहेत. ललित लिहिताना त्यांची शैली जितकी तलम हळुवार होत जाते, ती विज्ञानकथा लिहिताना तितकीच वास्तववादी होते. शब्दांचे सगळे पोत असे उलगडत वाचकाला खिळवून ठेवण्यात त्या यशस्वी होतात. अत्यंत तन्मयतेनं सातत्यपूर्ण दर्जेदार सकस लेखन करणं खरंच सोप्पं नसतंच. कुणाशीही स्पर्धा नाही, हल्ली सार्वत्रिक आढळून येणारी भपंकबाजी नाही, प्रसिद्धीचा फारसा सोसही नाही.. आहे तो फक्त शब्दांचा जिव्हाळा आणि स्वान्तसुखाय लेखन. त्यामुळेच सतत नव्याचा ध्यास आणि नवनवीन विषय शोधून त्यांच्यावर अभ्यासपूर्ण लिहीत जाणं हा त्यांचा पिंड. त्यामुळेच नद्याजोड प्रकल्प या आगळ्या-वेगळ्या विषयावर आधारित त्यांची जलपर्व ही कादंबरी विशेष गाजली. अनेक पुरस्कार ही मिळाले. मागच्या वर्षी आलेला त्यांचा 'स्वत:तून उगवताना..' हा पहिलावहिला काव्यसंग्रह देखील कवयित्री म्हणून त्यांची विशेष ओळख करून देणारा संग्रह. स्त्रीमनातील घालमेल आणि स्त्री म्हणून जगताना स्वत:तून स्वत:चं नव्यानं उगवून येणं, रुजून जाणं त्यांच्या कवितेतून येतं.
मराठी-हिंदी साहित्यक्षेत्रात विविध दर्जेदार साहित्यकृतींतून स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या बुद्धिवादी साहित्यिकेचा योग्य तो सन्मान या पुरस्काराने होतो आहे ही प्रचंड आनंदाची बाब आहे. भविष्यात अजून नवनवीन विषयांना हाताळणाऱ्या साहित्यकृतींचा जन्म या सृजनशील प्रतिभेतून होवो या शुभेच्छा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी प्रशिक्षणाला केंद्रप्रमुखांची दांडी

$
0
0

नांदेड - वाचन क्षमता विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या केंद्रप्रमुखाच्या निवासी प्रशिक्षणाला १७४ पैकी केवळ ३० केंद्रप्रमुख आढळून आल्याने तीन लाख रुपये कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. गुरुवारी रात्री अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट दिल्यानंतर ‘गैरहजरी’चा प्रकार उघड झाला.
पूर्णा रस्त्यावर असलेल्या बजाज फंक्शन हॉलमध्ये केंद्रप्रमुखाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शासकीय अध्यापक विद्यालयाच्या वतीने आयोजित हे प्रशिक्षण पूर्णतः निवासी होते. दिवसभर प्रशिक्षण झाल्यानंतर सायंकाळी चर्चेच्या माध्यमातून काही नवीन संकल्पना, उपक्रम तयार व्हावेत या उद्देशाने हे प्रशिक्षण निवासी ठेवण्यात आले होते. चार दिवसाच्या या प्रशिक्षणासाठी शिक्षण विभागाने सहा लाख ४० हजार रुपये दिले होते. ज्या केंद्रप्रमुखांना हे प्रशिक्षण दिले गेले, ते केंद्रप्रमुख पुढच्या टप्प्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण अपेक्षेप्रमाणे न झाल्याने शिक्षकांचे प्रशिक्षण कितपत यशस्वी होईल, याबाबत शिक्षण विभागातील अधिकारीच साशंक आहेत.
केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी व प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशिक्षणस्थळी भेट दिल्यानंतर त्यांना धक्कादायक प्रकार आढळला. १७४ पैकी केवळ ३० केंद्रप्रमुख उपस्थित होते. त्यात दोन महिला केंद्रप्रमुखांचा समावेश होता. उर्वरित केंद्रप्रमुख प्रशिक्षणाची वेळ संपल्यानंतर आपापल्या घरी गेल्याची माहिती आयोजकांनी दिली. निवासी प्रशिक्षण असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती कशी ? या प्रश्नामुळे आयोजक मात्र निरुत्तर झाले. प्रशिक्षणार्थ्यांना नाश्ता, जेवण, चहा व राहण्यासाठी पैसे देण्यात येणार होते. मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित प्रशिक्षक आढळल्यानंतर शिक्षण विभागाने तीन लाख रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देण्यात आलेल्या रकमेपैकी तीन लाख तात्काळ परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकारी वर्गानी प्रशिक्षणाला भेट दिली नसती तर आयोजकांनी पैसे परत करण्याचे सौजन्य दाखवले असते का ? असा सवाल पुढे आला आहे. जर बहुतांश केंद्रप्रमुख आपापल्या घरी जाणार होते; तर ती बाब आयोजकांनी शिक्षण विभागाला का कळवली नाही ? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

प्रशिक्षणाचा दर्जा उत्तम
निवासी प्रशिक्षणाला आम्ही भेट दिली असता बहुतांश केंद्रप्रमुख अनुपस्थित होते; पण प्रशिक्षणाचा एकंदरीत दर्जा उत्तम होता असे प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी सांगितले. आयोजकांनी सरसकट पैशाची मागणी केली होती; पण जे केंद्रप्रमुख पूर्णवेळ उपस्थित होते, त्यांच्यापुरतेच पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण निवासी बंधनकारक आहे; पण अनेकांची शहरात ‘सोय’ असल्याने प्रशिक्षणाची वेळ संपल्यानंतरच ते गेले होते, हे चौकशीत स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ आर्किटेक्चर स्कूल’ लवकरच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय पातळीवरील ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग ऑफ आर्किटेक्चर’ला (एसपीए) केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. प्रशासकीय पातळीवरील काही बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच ही संस्था सुरू होईल असे त्यांनी सांगितले. ‘आयआयएम’साठी नागपूरला प्राधान्य दिल्यानंतर सरकारने तीन वर्षापूर्वी सरकारने औरंगाबादसाठी ‘एसपीए’ची घोषणा केली होती. ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ’चे औपचारिक उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबादमध्ये घोषणा करण्यात आलेल्या ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग ऑफ आर्किटेक्चर’ला केंद्राने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. ही संस्था सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. काही प्रशासकीय पातळीवरील काहीबाबी पूर्ण झाल्या की, ही संस्था लगेच सुरू केली जाईल. राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्था मराठवाड्यामध्ये सुरू व्हाव्यात या हेतूने ‘एसपीए’, जालन्यात होत असलेली ‘आयसीटी’चे केंद्र उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये ‘एसपीए’ स्थापन करण्याची घोषणा तीन वर्षापूर्वी १४ डिसेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली होती, परंतु दोन शैक्षणिक वर्षे पूर्ण होत आले मात्र, ‘एसपीए’ सुरू होऊ शकलेली नाही. ‘एसपीए’ औरंगाबादला सुरू झाली तर, नियोजन आणि पायाभूत क्षेत्रातील जागतिक दर्जाचे शिक्षण येथे उपलब्ध होणार आहे. दिल्ली, भोपाळ आणि विजयवाडानंतर चौथी संस्था औरंगाबादमध्ये उभारली जाईल. संस्थेत जागतिक स्तरावरील अत्याधुनिक अशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ मान्यतेनुसार ही संस्था उभारली जाते. तर, नॅशनल अॅप्टिट्यूट टेस्ट फॉर आर्किटेक्चर’द्वारे (नाटा) प्रवेश दिले जातील.

चौकट..
विविध अभ्यासक्रमांची आखणी
मुख्यमंत्र्यांनी ‘एसपीए’चा ओझरता उल्लेख करत त्याबाबत अधिकचे बोलणे टाळले. घोषणा झाल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये संस्थेचे तात्पुरते वर्ग भरविले जातील असेही सांगण्यात येत होते. संस्थेमध्ये ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्ट’, ‘बॅचलर ऑफ प्लॅनिंग’ हे पाच वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम सुरू होतील. पदव्युत्तर स्तरावर ‘मास्टर ऑफ अर्बन डिझाइन’, ‘इनव्हॉयर्नमेंटल प्लॅनिंग’, ‘रिजनल प्लॅनिंग’ अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यनाथ कारखान्यातील भाजलेल्या चौघांचा मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड

वैद्यनाथ साखर कारखान्यात शुक्रवारी उसाच्या गरम रसाची टाकी फुटल्याने जखमी झालेल्या १२ कर्मचाऱ्यांपैकी चौघांचा शनिवारी मृत्यू झाला. सुभाष कराड, मधुकर आदनाक, गौतम घुमरे, सुनील भंडारे अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
जखमींवर लातूर येथे उपचार सुरू आहेत. कारखान्याच्या अध्यक्षा तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे यांनी शनिवारी लातूर येथे जाऊन जखमींची भेट घेतली. पंकजा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सहा लाख तर, जखमींना दीड लाखांची मदत जाहीर केली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
बीड - वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटना कारखाना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच घडली असून त्याची त्वरित चौकशी करून दोषींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी केली.
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी सकाळी परळीत येत असून ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. ते मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे सांत्वन तसेच जखमींची विचारपूस करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विद्यापीठात ‘उत्कर्ष’ची सरशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उत्कर्ष पॅनेलने सर्व दहा जागा जिंकल्या. खुल्या प्रवर्गाचा निकाल शुक्रवारी रात्री दीड वाजता जाहीर झाला. या सर्व जागांवर ‘उत्कर्ष’चे उमेदवार विजयी झाले. निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप असे स्वरूप आल्यामुळे चुरस वाढली होती.
पदवीधर अधिसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदाव सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनेलने दहापैकी दहा जागा जिंकल्या. पदवीधर आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे सर्व जागा जिंकण्याचा दावा विद्यापीठ विकास मंचने केला होता तर, मतदारांचे पाठबळ असल्यामुळे दहा जागा जिंकू असे उत्कर्ष पॅनेलने जाहीर केले होते. परिवर्तन पदवीधर आघाडी आणि शिवशाही पॅनेलचेही आव्हान होते. मात्र, सर्वाधिक मते घेत उत्कर्ष पॅनेलने निवडणुकीत बाजी मारली. राखीव प्रवर्गाच्या पाचा जागा उत्कर्षच्या उमेदवारांनी लक्षणीय मतांनी जिंकल्या. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत ‘उत्कर्ष’च्या उमेदवारांनी सहा ते सात हजार अधिक मते घेतली. लढत एकतर्फी झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातही ‘उत्कर्ष पॅनेल’चे उमेदवार पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले.
खुल्या प्रवर्गात डॉ. नरेंद्र काळे, प्रा. भारत खैरनार, रमेश भुतेकर, शेख जहूर अली आणि प्रा. संभाजी भोसले विजयी झाले. शुक्रवारी रात्री दीड वाजता मतमोजणी पूर्ण झाली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी विजयी उमेदवारांनी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उत्कर्षच्या उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोडेगावात हरणाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0


औरंगाबादः गंगापूर तालुक्यातील झोडेगाव शिवारात दोन हरणाचे मृतदेह आढळले आहेत. वीजेची तार पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तीन बिबटे मृत्यूमुखी पडलेले असतानाच ही घटना समोर आली आहे. यासंदर्भात शेतकरी नेते महेश गुजर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यावर घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांच्या अंगावर भाजलेल्या खुणा आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर घटनास्थळी कोणाही आले नाही. या याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, वैजापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन कार्यवाही करू, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सोळा कोटींची तडजोड

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रलंबित ६१२ आणि दाखलपूर्व प्रकरणांपैकी ११४९ अशा एकूण १७६१ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणण्यात यश आले. या सर्व प्रकरणांमध्ये एकूण १६ करोड ४७ लाख ६९ हजार ८११ रुपयांमध्ये तडजोड झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. डी. इंदलकर यांनी दिली.

राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये मोटार अपघाताची प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याची, वैवाहिक वाद, भू-संपादन, तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय, सहकार, औद्योगिक तसेच कामागार न्यायालयातील प्रलंबित तडजोडयुक्त प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोकअदालतीच्या आयोजनासाठी जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील, एच. एस. महाजन आणि डी. एस. शिंदे यांनी सहकार्य केले. तसेच सर्व न्यायीक अधिकारी, वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयातील कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

पक्षकारांना दिलासा
लोकअदालतमध्ये एकूण ५५ पॅनल्स होते. येथे तडजोड झालेल्या २० कुटुंबामधील तुटलेले संसार पूर्ववत झाले. भूसंपादनाच्या तडजोड झालेल्या १३ प्रकरणांमधील शेतकऱ्यांना तडजोडीमुळे दिलासा मिळाला. कामगार न्यायालयातील १४ कामगारांना न्याय मिळाला. अपघातात बळी पडलेल्या पीडितांच्या ७२ कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळाला, तर विद्युत अधिनियमांतर्गत प्रलंबित ५३ प्रकरणांमध्ये तडजोडीमुळे पक्षकारांना दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’वर्धापनदिन; बालगृहात कापला केक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचा सहाव्या वर्धापनदिन शनिवारी उस्मानपुरा येथील गजानन बालगृहातील मुलांसोबत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.

अनाथ, निराधार, गरजू बालकांना मायेची सावली देत त्यांच्या सर्वांगिण विकाससाठी गेल्या २५ वर्षांपासून झटणाऱ्या या बालगृहातील प्रत्येक जण ‘मटा’चा वर्धापनदिन सायंकाळी येथे साजरा होणार म्हणून खूष होता. बाबा साळवे, अभिषेक राऊतराय, सदाशिव आस्वार, अशोक नागे, ओम मायकल, किरण चौरे, तुषार वाघमारे, आकाश साळवे, विशाल सपकाळ यांच्यासह बालगृहातील अन्य बालकांनी ‘हॅपी बर्थ डे टू यू मटा,’ म्हणत केक कापला. सर्वांनी ‘मटा’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर कोणी गाणे म्हणत, तर कोणी गोष्टी सांगत धूम केली. यावेळी बालगृहाच्या संचालिका कमल नारायणकर, अधीक्षक जयराज नारायणकर, ‘मटा’चे वरिष्ठ सहसंपादक प्रमादे माने उपस्थित होते.

आज कार्यशाळा
वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाच्या बळावर औरंगाबाद महाराष्ट्र टाइम्स सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी हसतखेळत व्यायाम अर्थात झुंबा फिटनेस या कार्यशाळेचे आयोजन रविवारी दुपारी चार वाजता उस्मानपुरा येथील कलश मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. झुंबा फिटनेसचा ट्रेंड अलीकडे खूपच प्रसिद्ध असून, ताण न घेता हसतखेळत व्यायाम म्हणून ओळखला जातो. संगीताची सोबत असल्याने हा फिटनेस ट्रेंड तरुणाईचा खास आवडीचा असून महिलाही अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी हा पर्याय निवडतात. कार्यशाळेत प्रशिक्षक चेतन पाटील मार्गदर्शन करतील. कार्यशाळेच्या नोंदणीसाठी नदीम अहमद यांच्याशी ९८२२६३०५५५ संपर्क साधा.

केक कापत आम्ही ‘मटा’चा हॅपी बर्थडे साजरा केला. खूप मजा आली. मित्रासमवेत आम्ही गाणी सादर करत धमाल केली. बालसदनात वर्धापनदिन साजरा केल्याने आम्हास मोठा आनंद झाला. ‘मटा’ला शुभेच्छा. - अभिषेक राऊतराय, बालक

निःपक्ष दैनिक असलेल्या ‘मटा’ने नेहमीच सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कसोशीने प्रयत्न केले. गरजू बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे केला. - जयराज नारायणकर, अधीक्षक, श्री. गजाजन बालसदन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीर माता-पत्नींच्या त्यागाला सॅल्यूट

$
0
0

वीर माता-पत्नींच्या त्यागाला सॅल्यूट

चार जिल्ह्यांतील माजी सैनिकांच्या मेळाव्यात तीन हजार कुटुंबियांचा सहभाग; अडचणी सोडविण्याचा विडा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१९६५ च्या युद्धापासून देशभरातील विविध लष्करी कायावायांमध्ये देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आणि शहीद झालेल्या सुमारे ३० वीर माता-पिता तसेच वीर पत्नींचा हृद्य सत्कार रविवारी (१० डिसेंबर) माजी सैनिकांच्या मेळाव्यात करण्यात आला. तसेच मेळाव्याला उपस्थित तीन हजार कुटुंबियांच्या साक्षीने वीर माता-पिता-पत्नींच्या त्यागाला सॅल्यूट करण्यात आला. देशसेवेचे स्फुलिंग चेतवणारा हा मेळावा तितकाच हृदयस्पर्शी ठरला.

औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील तब्बल तीन हजार कुटुंबियांच्या साक्षीने हा मेळावा शहरातील ‘आर्मी कॅन्टोन्मेंट’ परिसरातील ‘सर्वत्र स्टेडियम’वर झाला. यामध्ये २३०० पेक्षा जास्त माजी सैनिकांचा प्रत्यक्ष सहभाग होता. विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारांबे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, निवृत्त मेजर जनरल एस. के. एस. किरपेकर, अतिरिक्त विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन, उपमुख्य वनसंरक्षक सतीश वडसकर, निवृत्त कर्नल रमेश वाघमारे, स्टेशन कमांडर ब्रिगेडिअर डी. के. पात्रा आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मेळाव्यात ३० वीर माता-पत्नींना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. मेळाव्याला येता यावे म्हणून किमान सात ते आठ खासगी बस भाड्याने घेण्यात आल्या होत्या. मेळाव्याला सकाळपासूनच माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय येण्यास सुरुवात झाली होती व सर्वांसाठी चहा-नाष्ट्यापासून भोजनापर्यंत सर्व सोय करण्यात आली होती. याच मेळाव्यात वीर पत्नी-माता-पितांना भेडसावणाऱ्या पेन्शनपासूनच्या वेगवेगळ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात होते व त्यासाठी अनेक स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. या स्टॉलमध्ये नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रकारच्या नोंदी घेतल्या जात होत्या.
आदबिची वागणूक अन् संवाद
मेळाव्यामध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत अत्यंत आदराची व प्रेमाची वागणूक दिली जात होती. स्टेशन कमांडर ब्रिगेडिअर पात्रा, कर्नल शर्मा यांच्यापासून सर्वजण कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करीत होती. त्याचाच भाग म्हणून १९६५ च्या युद्धात शहीद झालेल्या कुटुंबियांची स्वतः चौकशी करून ‘तुम्हीच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहात’ असे ब्रिगेडिअर पात्रा हे हिंदीतून व त्याचा मराठी अनुवाद करून समजून सांगताना लेफ्टनंट कर्नल आशिष कर्णिक हे दिसून आले. इतरही सैनिक, अधिकारी माजी सैनिकांच्या वृद्ध माता-पित्यांचा हात धरून मेळाव्यात घेऊन येताना दिसून आले.
स्टॉलमधून व्यवसायाची माहिती
माजी सैनिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना-कुटुंबियांना विविधांगी रोजगार मिळवता यावा, व्यवसाय करता यावा यासाठी शेती उत्पादनापासून ते विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली जात होती. बँकांच्या विविध सुविधांचीही माहिती दिली जात होती. याच स्टॉलच्या मधोमध खास वाद्यसंगीतातून माजी सैनिकांचे रंजन केले जात होते. मेडिकल कॅम्पही उपलब्ध करण्यात आला होती व यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अलोपॅथीचे नामवंत डॉक्टरही सेवा करताना दिसून आले.
तर शहिदांना २५ लाख रुपये
सद्यस्थितीत जवान शहीद झाल्यास साडेआठ लाख रुपये दिले जातात; पण हा निधी २५ लाखांपर्यंत वाढवावा व जखमी जवानास दिला जाणारा सव्वा ते ४ लाखांचा निधी ५ ते १५ लाखांपर्यंत वाढवावा, असा प्रस्ताव लवकरच दिला जाईल, असे माजी सैनिक कल्याण बोर्डाचे प्रदीप ढोले म्हणाले. तर, पुढच्या मेळाव्यापर्यंच माजी सैनिकांच्या तसेच वीर माता-पत्नींच्या पेन्शनपासूनच्या सर्व अडचणी-समस्या सोडविल्या जातील, असे वचनच ब्रिगेडिअर पात्रा यांनी या प्रसंगी दिले.
चिमुकलीला मिळाली पेन्शन
सैनिक देवचंद खुशालसिंह बहुरे हे २०१२ मध्ये शहीद झाले आणि त्यांची चिमुकली अनाथ झाली. तिचा सांभाळ तिची आजी कस्तुराबाई यांनी केला आणि याची दखल घेत तिला साडेनऊ हजारांची पेन्शन सुरू करण्यात आली आहे. ६५ च्या युद्धात शहीद झालेले माधव बोडखे यांच्या पत्नी व नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जामका शिवणी येथील वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या कलावतीबाई बोडखे यादेखील मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. तर, मागच्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले संभाजी कमद यांच्या पत्नी सखुबाई कदम यादेखील आपले दुःख विसरून चिमुकलीसह सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेक्नोसॅव्ही जगतातून कल्पकतेने मुलांना वाचनाकडे वळवायला हवे - लांजेवार

$
0
0

टेक्नोसॅव्ही जगतातून कल्पकतेने मुलांना वाचनाकडे वळवायला हवे - लांजेवार

साहित्य संस्कृती-मंडळ आणि वरद गणेश वाचनालयाचा बालसाहित्य संमेलनाचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्याचे युग हे टेक्नोसॅव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्सचे जग आहे. मुले यात रममाण होत आहेत अशा परिस्थितीत त्यांना वाचनाकडे वळवणारे दर्जेदार बालसाहित्य होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी केले. रविवारी (दि.१० डिसेंबर) महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि श्री वरद मंदिर वाचनालय औरंगाबाद यांच्या वतीने बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‍घाटन समर्थनगर येथील वरद गणेश मंदिराच्या सभागृहात लांजेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ल. म. कडू होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, वाचनालयाच्या अध्यक्ष निर्मला तरटे, ज्योतीराम कदम, वाचनालयाचे सचिव आणि संमेलनाचे सचिव प्रकर्ष पिंगे, रा.रं.बोराडे, लिला शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. लांजेवार म्हणाले, मुलांनी वाचले पाहिजे, असे सांगितले जाते तेव्हा त्यांच्यासाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे. संस्कार घडवण्याची आणि बालकांमध्ये चांगला वाचक निर्माण होण्यासाठी बालसाहित्य संमेलनांची गरज आहे. यासाठी चळवळ उभी राहावी. मुलांना हसत खेळत जगू द्या त्यांचे बालपण हरवू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी बाबा भांड म्हणाले, साहित्यातून संस्कार होतात. त्यासाठी वाचन आवश्यक आहे. विविध साहित्य संमेलनांसाठी शासनाने अनुदान द्यावे. मुलांसाठी नाट्य कार्यशाळा, घेतल्या पाहिजे. जेणेकरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. यावेळी हुकुमचंद आडेंविषयची गोष्ट सांगत त्यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. ज्योतीराम कदम यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. लीला शिंदे आणि आराधना कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अपूर्वा झोळगीकर हिने सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप यार्दी यांनी आभार मानले.

चित्रांची रेषा आणि पुस्तकाची भाषा सोबत हवीच

चित्रांची रेषा आणि पुस्तकांची भाषा जेव्हा एकमेकांच्या सोबत येतील. तेव्हाच उत्तम बालसाहित्य निर्माण होईल. असे मत, अध्यक्षयीय समारोप करताना प्रसिद्ध साहित्यिक आणि चित्रकार ल. म. कडू यांनी व्यक्त केले. मुलांना भावेल असं साहित्य आजही बालसाहित्यात नाही. साहित्य वेगळ्या प्रकारचा आयाम आणि दिशा मुलांना देतात ते कळले नाही तर ते त्या बालवयाला त्यांच्या मनाला कसे समजतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालक देखील बऱ्याचवेळा आपली मते लादतात, परंतु तसे न करता मुलं तुमची सौंदर्य दृष्टी वाढवत असतात. तुम्ही ती समजून घ्यायला हवी. केवळ मार्कांच्या आहारी न जाता कलेचा निखळ आनंद घेऊ द्यावा, असेही ते म्हणाले.

‘वास्तव आणि अद्भुत याची सांगड घातल्यावर बालसाहित्यनिर्मिती’

‘वास्तव आणि अद्भुतता याची सांगड घातली गेली की दर्जेदार बालसाहित्यकृती उतरू शकते असा सूर संमेलनातील ‘अद्भुत रम्यतेच्या नवीन दिशा’ या परिसंवादात निघाला. यात विद्या सुर्वे (मालेगांव), बबन शिंदे (वसमत), गिरिधर पांडे (औरंगाबाद), किरण केंद्रे (पुणे), एकनाथ आव्हाड (मुंबई) यांनी विचार मांडले.

बालसाहित्य संमेलनात ‘बाल साहित्य कसे असावे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात सरस्वती भुवन शाळेचा आकाश मुंढे, एसबीओए शाळेची वैष्णवी घाटनांद्रेकर, शारदा मंदिर प्रशालेची ऐश्वर्या सुरडकर आणि ऋचा सीनकर यांनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विधी’ला हवेत १४८ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठा’च्या उभारणीसाठी १४८ कोटी रुपयांची गरज आहे. त्याचे अंदाजपत्रक शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत विद्यापीठ उभारणीचे आश्वासन दिल्याने प्रशासनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राज्यात नऊ वर्षांपासून राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापनेची चर्चा सुरू होती. विद्यार्थी कोठे स्थापन करावे, यावरून वाद झाल्यानंतर औरंगाबादसह मुंबई, नागपूर अशा तीन ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. औरंगाबादच्या विधी विद्यापीठाचे वर्ग यावर्षीपासून सुरू झाले. विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनानंतर विद्यापीठ उभारणीला प्रशासकीय पातळीवरून वेग आला आहे. निवासी स्वरुपाचे असलेले हे विद्यापीठ कांचनवाडीच उभारले जावे, असा प्रशासनाचा आग्रह आहे. त्यासाठी जागेसह खर्चाचे अंदाजपत्रकही राज्यशासनाला सादर करण्यात येणार आहे. करोडी येथे विद्यापीठाला जागा देण्यात आली होती, मात्र विद्यापीठाला कांचनवाडीतच जागा हवी आहे. वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असल्याने विद्यापीठाचा खर्च टळला आहे. त्यामुळे इतर इमारतींच्या उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा हा अंदाज आहे. त्यामध्ये प्रशासकीय इमारत, कुलगुरूंचे निवासस्थान, अधिकारी निवासस्थान, पार्किंग व्यवस्था, विश्रामगृह, मैदान, जीम, स्विमिंगपूल अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा समावेश असणार आहे.

विद्यार्थ्यांना १४ किलोमिटरचा फेरा
विद्यापीठाचे वसतिगृह कांचनवाडीत आहे. वर्ग पद्‍मपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरतात. विद्यार्थ्यांना रोज कॉलेजसाठी १४ किलोमिटरचा फेरा मारावा लागतो. वसतिगृहापासून कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांची येण्याची अडचण लक्षात घेत विद्यापीठाने स्वतःची गाडी खरेदी केली आहे. विद्यापीठ उभारले तर, हा फेरा थांबणार आहे.

जागेची अशी मागणी
विद्यापीठ स्थापनेसाठी किमान ५० एकर जागा आवश्यक असते. विधी विद्यापीठाला हवी असलेली जागा कांचनवाडी परिसरातच हवी आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थानाची जागा विद्यापीठाला वसतिगृह म्हणून देण्यात आली आहे. आठ एकर जागेवर हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. त्याबाजुलाच महसूल विभागाची नऊ एकर जागा आहे. त्याजागेसह वाल्मीची ३८ एकर अशी एकूण ५५ एकर जागा शासनाकडे मागण्यात आली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतरच उभारणीचा संपूर्ण आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस उत्पादकांचे आंदोलन मिटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
प्रादेशिक सहसंचालकांच्या लेखी आश्वासनानंतर शहरात १५ दिवसांपासून ऊसदरासाठी सुरू असलेले आंदोलन शुक्रवारी रात्री मागे घेण्यात आले.

उस दर आंदोलन प्रादेशिक सहसंचालक (साखर) निलिमा गायकवाड यांच्या लेखी आश्वासना नंतर शुक्रवारी (८) रात्री सोडण्यात आले आहे. कन्नड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघाने ऊसदर व इतर मागण्यांसाठी २४ नोव्हेंबरपासून तहसील परिसरात साखळी उपोषण व गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. डॉ. आण्णासाहेब शिंदे, धनंजय तायडे, उत्तमराव राठोड व देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला खासगार चंद्रकांत खैरे, आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार नामदेव पवार, किशोर पाटील यांनी जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड ट्रकवर कारवाई केली होती. याबाबत बारामती अॅग्रोकडून उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. या सर्व बाबीनंतर शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी श्याम गावंडे, प्रादेशिक साखर सहसंचालक निलिमा गायकवाड, बोर्डे, आंदोलकाच्या वतीने डॉ. आण्णासाहेब शिंदे, उत्तमराव राठोड यांच्या उस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्याने दिवशी रात्री ११च्या सुमारास उपोषण सोडण्यात आले. नायब तहसीलदार हारूण शेख, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, डॉ. आण्णासाहेब शिंदे, उत्तमराव राठोड, काकासाहेब तायडे, देविदास काळे, उपळा गावचे सरपंच दिनेश अकोलकर यांच्या उपस्थितीत शरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या मागण्या
बारामती अॅग्रो कन्नड युनिट या साखर कारखान्याने उसाला प्रतिटन दोन हजार ५५० रुपये भाव, सभासद म्हणून कपात केलेले पाच हजार रुपये परत मिळावेत, ७०-३०नुसार अंतिम दर आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. यावर औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालकांनी, एफआरपी दोन हजार ५५० दरामधून ऊस वाहतूक व तोडणी २५ किलोमीटरसाठी ४३४ रुपये वजा करून दोन हजार ११६ रुपये पाहिला हप्ता भाव देण्यात यावा, ७०-३०नुसार अंतिम भाव देण्यात यावा, ऊस सभासद मागेल त्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये परत देण्याविषयी बारामती अॅग्रोस निर्गेश देण्यात आल्याचे पत्र उपोषणार्थींना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात लवकरच ७० नवे दंत शिक्षक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील तीन शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये ७० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती अनेक वर्षानंतर होणार आहे. वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर दंत महाविद्यालयांतील नियुक्ती होईल व अधिकाधिक विषयात पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक (दंत) डॉ. सुरेश बारपांडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) रक्ताच्या कर्करोगाच्या निदानासाठी उपयुक्त ‘फ्लोसायटोमिटर’च्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला आले असता, त्यांनी ‘मटा’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती होत आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील तिन्ही महाविद्यालयांमध्ये सुमारे ७० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल. ‘एमपीएससी’मार्फत प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी मोठा कालावधी खर्ची पडत होता. त्यामुळेच निवड मंडळामार्फत नियुक्तीचा निर्णय राज्यस्तरावर होऊन राज्यभरात प्राध्यापकांच्या नियुक्ती होत आहेत. त्याचाच भाग म्हणून वैद्यकीय तसेच दंत शिक्षकांची नियुक्ती होत आहे.’

औरंगाबादेत नवीन ‘पीजी’
औरंगाबाद शहरातील शासकीय दंत महाविद्यालयामध्ये मुख शल्यचिकित्साशास्त्र (ओरल सर्जरी) विषयामध्ये पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या विषयात २०१८ पासून तीन जागा मिळतील. तसेच दंतव्यंगोपचारशास्त्र (ऑर्थोडोटिक्स) या विषयात ‘पीजी’च्या तीन जागा २०१८पासून उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी ‘पीएचडी’ अभ्यासक्रमही उपलब्ध होत असल्याचे डॉ. बारपांडे म्हणाले.

९७ कोटींच्या निधीची मागणी
राज्यातील औषधी व वैद्यकीय साहित्याच्या खरेदी व थकित बिलापोटी पुरवणी अर्थसंकल्पातून ९७ कोटींचा निधी मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास बहुतेक प्रश्न मिटतील, अशी अपेक्षा आहे. आता ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’मार्फत तीन लाखांपेक्षा जास्त औषधांची खरेदी होत आहे व लवकरच ही मध्यवर्ती खरेदी प्रक्रिया सुरळीत होईल, असेही डॉ. बारपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गणिताची उपयोगिता परिणामकारक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारतीय संशोधनात गणिताचे वेगळे महत्त्व आहे. गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचे गणितातील काम भारताला वरचे स्थान देणारे ठरले. भास्कराचार्यांच्या ग्रंथाचे महत्त्व विविध देशांनी अधोरेखित केले. आपल्या दैनंदिन जीवनातही गणिताची उपयोगिता असल्यामुळे नवीन संशोधन गणिताला परिणामकारक करीत आहे,’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय गणित परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागात ‘अल्जेब्रा, डिस्क्रीट मॅथमॅटिक्स व उपयोगिता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय गणित परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे शनिवारी (नऊ डिसेंबर) उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे, लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. बी. निमसे यांची प्रमुख उपस्थिती होती. गणित विषयाची उपयोगिता या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत फिल्ड्स मेडालिस्ट प्रा. इ. झेल्मानोव्ह व प्रा. एस. के. जैन (अमेरिका) सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय विज्ञान अकादमीने प्रा. झेल्मानोव्ह यांचा भारत दौरा आयोजित केला आहे. दिल्ली विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या चार संस्थांचा दौऱ्यात समावेश आहे. डॉ. झेल्मानोव्ह यांच्या सन्मानार्थ परिषद होत आहे असे गणित विभागप्रमुख प्रा. मिनाक्षी वासडीकर यांनी सांगितले. गणित विषयासाठी असलेले ‘फिल्ड्स मेडल’ नोबेल पारितोषिकापेक्षाही महत्त्वाचे समजले जाते. ४० वर्षांपेक्षी कमी वय असलेल्या संशोधकाला चार वर्षांतून एकदाच हे पारितोषिक दिले जाते.

परिषदेला प्रा. आंद्रे लेटॉय (फ्रान्स), प्रा. अल्बर्टो फकिरी (इटली) यांची व्याख्याने झाली. ‘टीआयएफआर’चे माजी प्रा. एस. जी. दाणी, किंगसौद विद्यापीठाचे माजी प्रा. सुरजित सिंग, आयआयटी मुंबईचे प्रा. एस. आर. घोरपडे, प्रा. जुगलकिशोर वर्मा, चेन्नई येथील ‘आयएमएससी’चे प्रा. प्रसाद व प्रा. राघवन, ‘आयआयएससी’चे बंगळुरूचे प्रा. अरविंद अय्यर, मोहाली येथील ‘आयआयएसईआर’च्या प्रा. सुदेश कौर खंडुजा यांची व्याख्याने झाली. या परिषदेच्या यशस्वितेसाठी गणित विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एस. के. निंभोरकर, विभागप्रमुख व संयोजक डॉ. मीनाक्षी वासडीकर, प्रा. एम. एम. पवार, संशोधक विद्यार्थी करुणा गायकवाड, जया नेहते, विद्या देशमुख, उत्तरा बोरसकर, योगिता पाटील, दीपाली बन्सवाल, पाय व ज्योती खुबचंदानी, अमित दाभोळे आदींनी सहकार्य केले. परिषदेचा सोमवारी समारोप होणार आहे.

संशोधकांचा सहभाग
आंतरराष्ट्रीय गणित परिषदेसाठी डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, एसईआरबी, एनबीएचएम, डीआरडीओ, इस्त्रो, सीएसआयआर, आयएमयू (बर्लिन) यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळाले. परिषदेत १२५ संशोधक सहभागी झाले आहेत. शिलाँग, अलाहाबाद, म्हैसूर, चेन्नई, मंगलोर, अमरावती, सोलापूर, नांदेड, जळगाव, मुंबई, पुणे, ठाणे येथील संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images