Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वेच्या ६२३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड, औरंगाबाद, मुदखेड या मार्गावर पाच एक्स्प्रेस आणि सहा पॅसेंजर रेल्वेत तपासणी करून ६२३ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एका दिवसातच दोन लाख सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत २५ तिकीट तपासनीस, १० रेल्वे पोलिस यांचा सहभाग होता. यावेळी रेल्वेत विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या चौघांना पकडण्यात आले. इतर सहा अनधिकृत विक्रेत्यांकडून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय रेल्वे क्रमांक १२७१५ सचखंड एक्स्प्रेसमधध्ये मेनू कार्ड, रेट लिस्ट व ओळखपत्र न ठेवणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे क्रमांक ५७५१५चे डब्बे अस्वछ असल्याने कंट्रोल रुमला संदेश देऊन स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले. प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफीसाठी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जमाफीसाठी मुदतीत अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे दिली.
पाटील म्हणाले, की राज्य सरकारच्या घोषणेनंतर निकषपात्र शेतकऱ्यांना मुदतीत अर्ज दाखल करायचा होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केला नाही, अशा तक्रारी आल्या. त्याची दखल घेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द ठरवलेल्या अर्जांची तपासणी आणि नेमक्या अडचणी जाणून घेण्यासाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. ही मंडळी गावोगावी जाऊन ज्यांचे कर्जमाफीचे अर्ज रद्द ठरविले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून नेमकी अडचण जाणून घेतील. त्यातील त्रुटी दूर करण्यासारख्या असल्यास त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होईल, याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाताळ उत्साहात साजरा

$
0
0

नाताळ उत्साहात साजरा
चर्चमध्ये दर्शनासाठी गर्दी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाताळ सण शहरात ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहाता साजरा केला. शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. चर्चवर विद्युत रोषणाई तर, अनेक ठिकाणी प्रभू येशूंचा जन्माचा देखावा पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली.
नाताळनिमित्त शहरातील विविध चर्च सजविण्यात आले होते. चर्चवर विद्युत रोषणाईसह ख्रिसमस ट्री, केक तसेच सांताक्लॉजनीही बच्चे कंपनीला भेट दिली. चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माच्या वेळचे देखावे उभारण्यात आले होते. सकाळी विविध चर्चमध्ये धार्मिक विधी करण्यात आला. सेंट फ्रान्सिस डी-सेल्स महामंदिरमध्ये सकाळी धार्मिक विधी ‘मिसाबली’ झाला. त्यानंतर या चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली. त्यासह संत थॉमस चर्च येथेही दर्शनासाठी रांगा होत्या. यासह क्राईस्ट चर्च, होली ट्रिनिटी चर्च, नॅझरिन चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. चर्चमध्ये येत एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी नाताळ सण साजरा केला. मिठाई, केकचे वाटप करत प्रभू येशूंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी महागुरुस्वामी आंब्रोज रिबोलो, फादर विनोद शेळके, सहाय्यक धर्मगुरू सिंटो चिरामल, संत जोसेफ सिरोमलाबार यांची उपस्थिती होती.
ख्रिसमसनिमित्ताने गरजुना ब्लँकेटचे वाटप
ख्रिसमस सण व गुरु गोविंद सिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजुंना ब्लँकेट, मिठाई, धान्याचे वाटप करण्यात आले. माजी महापौर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्यातर्फे दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. उस्मानपुरा येथील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार सतीश चव्हाण, फादर जोसेफ श्रीसुंदर, काशिनाथ कोकाटे, जी. एस. अन्सारी, सुधाकर सोनवणे, विना खरे, जी. एस. अन्सारी, छाया जंगले, रावासहेब दारकोंडे, विनोद बनकर, अनिसा बेगम, ज्योती मोरे, अंकिता विधाते, सलमा बानो, अशोक बन्सवाल आदींची उपस्थिती होती. उपक्रमात विविध भागातील गरजुंना साहित्याचे वाटप करण्यात आले. दीडशेपेक्षा अधिक गरजुंना ब्लँकेट, घरगुती साहित्य, मिठाई देण्यात आली. मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी या उपक्रमामागची भूमिका मांडली. तर हा उपक्रम गरजवंतांना एकप्रकारे आधार देणारा असल्याचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. यावेळी इतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
घाटीत रुग्णांना मुगाचा शिरा
नाताळानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल असलेल्या तब्बल ५५० रुग्णांना सोमवारी (२५ डिसेंबर) मुगाच्या शिऱ्याची फिस्ट देण्यात आली. मुगाच्या शिऱ्यासोबतच भजी, मिक्स व्हेज, पुलाव, चपाती असा हा मेन्यू होता. या मेन्युचा रुग्णांना आनंद घेतला, असेही वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू गोविंदसिंगजी यांची जयंती उत्साहात

$
0
0

गुरू गोविंदसिंगजी यांची जयंती उत्साहात
पंचप्यारेंच्या नेतृत्वात शहरात निघाले 'नगर किर्तन'
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
शीख धर्माचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंगजी महाराज यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भाई दयासिंगजी धरमसिंग गुरुद्वारा येथून नगरकिर्तन (मिरवणूक ) काढण्यात आली. पंचप्यारेंच्या नेतृत्वात निघालेल्या या मिरवणुकीत गुरू ग्रंथ साहिब यांच्या पालखीचा रथ आणि शस्‍त्रप्रदर्शन करणाऱ्या युवकांनी उपस्थितांची मने जिंकली.
भाई दयासिंगजी धरमसिंगजी गुरुद्वारा धावणी मोहल्ला येथून सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान नगर किर्तनला (मिरवणूक) प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक शहरातील सराफा, सिटीचौक, गुलमंडी, पैठण गेट, क्रांतीचौक येथून गुरू गोविंदसिंग गुकुद्वारा उस्मानपुरा येथे समाप्त झाली. मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी पंचप्यारे यांचे स्वागत करण्यात आले होते. गुरू गोविंदसिंग यांच्या जयंती निमित्ताने भाई दयासिंगजी धरमसिंग गुरुद्वारा येथे सोमवारी (२५ डिसेंबर) सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सकाळच्या सत्रात अखंड पाठ साहिब याची समाप्ती करण्यात आली. चंदीगड येथून आलेले भाई बलबीरसिंगजी यांच्या गुरूबानीचा (किर्तन) कार्यक्रम घेण्यात आला. उस्मानपुरासह विविध भागात अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुद्वाऱ्याचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, अजितसिंग शिलेदार, राजेंद्रसिंग जबिंदा, गुरुप्रीत पंधेर, मनवीर दखन, आदेशपालसिंग छाबडा, हरबेर सिंग मुछ्छल यांच्यासह शीख बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
नांदेडहून आला पालखीचा रथ
गुरू गोविंदसिंगजी यांची जयंती साजरी करण्यासाठी आयोजित नगरकीर्तन कार्यक्रमात फुलांनी सजविलेली गुरू ग्रंथ साहेब पालखी आकर्षणाचे केंद्र ठरली. या पालखीचा रथ हा नांदेडहून मागविण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बचतगटांसाठी ५० लाखांचा निधी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

जिल्ह्यातील महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून ५० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन कौशल्य विकास मंत्री व लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन निलंगेकर यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, कृषी व पशुसंवर्धन सभापती बजरंग जाधव, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवडे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, ‘घरातील प्रत्येक महिला उद्योजक म्हणून काम करते. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जागतिक मंदीमध्येही भारत देश स्वत:च्या पायावर उभा आहे. आलेला पैसा जतन करण्याचे व त्याचा योग्य विनियोग लावण्याचे काम महिला करतात. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जोडधंदा केला पाहिजे. महिला बचत गटांनी मार्केटिंग केले पाहिजे, त्यासाठी आपले व्हिजिटींग कार्ड तयार केले पाहिजे. राज्यातील प्रत्येक मॉलमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेला माल गेला पाहिजे, यातून महिलांची प्रगती होईल. वषर्भरात राज्यस्तरावर महिलांसाठी उद्योजकता निर्माण करण्यासाठी स्पर्धा भरविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातून दहा बचत गटांची निवड करण्यात येईल आणि त्यांना जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत दिली जाईल. विभागस्तरावर निवड करण्यात आलेल्या ५० बचत गटांना सरकारतर्फे प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच विभागातून राज्य स्तरावर येणाऱ्या बचत गटांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल.’
राज्यात जेथे-जेथे बचतगटाचे प्रदर्शन असेल त्यामध्ये लातूरसाठी एक स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी बचत गटांने नाममात्र दहा टक्के भाडे भरावे व ९० टक्के जिल्हा परिषदेच्या वतीने भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. लातूरचा आगळावेगळा पॅटर्न म्हणून जिल्हा परिषदेच्या व महापालिकेच्या वतीने जिल्ह्यातील महिला बचत गटांना दिपावलीचे पदार्थ बनवून विक्री करण्यासाठी दहा दिवसासाठी मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येतील. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येक स्टॉल धारकांनी जबाबदारीने स्वच्छता ठेवण्याचे काम केले पाहिजे. महिला बचतगटाने तयारी दर्शविल्यास बचत गटाने उत्पादित केलेला माल विक्री करण्यासाठी दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही निलंगेकर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांसाठी स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा मंगळवारी

$
0
0

युवकांसाठी स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा मंगळवारी
औरंगाबाद - पाणी व स्वच्छता या विषयांकडे महाविद्यालयातील युवकांना आकर्षित करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने औरंगाबाद तालुक्यात मंगळवारी २७ डिसेंबर रोजी स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी महाविद्यालयालीन कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. दोन्ही गटातील विजेत्यांसाठी रोख पारितोषिके असतील.
२७ डिसेंबर रोजी सकाळी ही स्पर्धा गणेश कॉलनी परिसरातील पंचायत समितीच्या सभागृहात होईल. अधिक माहिती व सहभागी होण्यासाठी पी. पी. भुईगळ, के. एच. फुलझेले, ए. एन. काळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी केले आहे.
कनिष्ठ गटासाठीचे विषय
गाव माझा मी गावाचा - विचार संपूर्ण स्वच्छतेचा
गाऊ स्वच्छतेचे गाणे - तुकडोजींचे हे सांगणे
शुद्ध आणि शाश्वत जल - जाणेल आरोग्याचे मोल
बदलू मनामनाला - स्वच्छ सुंदर महाराष्ट्राची
वरिष्ठ गटासाठीचे विषय
शिकवण आम्हा संतांची - ही भूमी स्वच्छ करण्याची
स्वच्छतेचे गीत गाऊया - ग्रामगीतेचे बोल बोलूया
घराघरातून विचार येऊ दे - महाराष्ट्राला स्वच्छ होऊ दे
माझी स्वच्छता - माझे कर्तव्य
शुद्ध पाणी - आरोग्याची हमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शाळांच्या खासगीकरणाचा घाट

$
0
0

पालिका शाळांच्या खासगीकरणाचा घाट
एन - ९ पाठोपाठ एन ६ ची शाळा खासगी संस्थेला ऐनवेळी अांदण; पालिकेच्या आणखीन तीन शाळा रडारवर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
सिडको एन ९ येथील शाळेच्या पाठोपाठ सिडको एन ६ येथील महापालिकेची शाळा खासगी संस्थेला अांदण देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. या दोन शाळांशिवाय आणखीन तीन शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (इच्छुकांकडून प्रस्ताव) मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात पालिकेच्या पाच शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर ऐनवेळचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यातील काही विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सध्या ७२ शाळा अस्तित्वात आहेत. त्यापैकी पाच शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव २० मे २०१७ च्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी मंजूर करण्यात आला. पालिका प्रशासनातर्फे विषय क्रमांक १०५८ सर्वसाधारण सभेत ऐनवेळचा प्रस्ताव म्हणून ठेवण्यात आला. या प्रस्तावात सिडको एन ६, सिडको एन ९, गीतानगर, हर्षनगर, हडको एन ११ या शाळांच्या इमारती खासगी संस्थांना देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पाचही शाळा बंद आहेत. त्यामुळे या शाळा खासगी संस्थांना देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये एन ६ शाळेसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या. साई नॉलेज सोल्युशन्स, उल्कानगरी औरंगाबाद, गोगानाथ बाबा शिक्षण संस्था, औरंगाबाद, लक्ष्मीनारायण बहुउद्देशीय शिक्षण संस्था या तीन संस्थांनी टेंडर भरले होते. त्यापैकी साई नॉलेज सोल्युशन्स या संस्थेने भरलेला दर जास्त असल्यामुळे ( दरमहा १ लाख २९ हजार) या संस्थेला या शाळेची इमारत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिडको एन ९, एम - २ येथील शाळेच्या चार खोल्या भाडेतत्त्वावर मिळण्यासाठी आरंभ या मतीमंद विद्यार्थ्यांच्या संस्थेने विनंती केली होती. त्यानुसार या संस्थेला या शाळेच्या चार खोल्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याशिवाय याच शाळेसंदर्भात २० जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक गोकुळ मलके यांनी प्रस्ताव (११९२/१) ठेवला व या शाळेची इमारत अत्रिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेस भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव मांडला, हा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. गीतानगर, हर्षनगर आणि सिडको एन ११ येथील शाळा खासगी संस्थेस भाडेतत्त्वावर देण्यासाठी फेर निविदा काढण्याचा निर्णय देखील ऐनवेळी घेण्यात आला आहे. हर्षनगर येथील शाळा मोडकळीस आली असून या शाळेसाठी इच्छुक शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागण्यास देखील सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. पालिकेच्या पाच शाळा खासगी संस्थांना देण्यासाठीच्या प्रस्तावावर चर्चा देखील झाली नाही. चर्चेशिवाय हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
पालिका शाळांची संख्या - ७२
कायम शिक्षकांची संख्या - ४३४
तासिकातत्वावरील शिक्षकांची संख्या - ३५
विद्यार्थ्यांची संख्या - सुमारे १८ हजार
खासगीकरणाच्या टप्प्यावर असलेल्या शाळा - ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथमहोत्सव’मध्ये रंगणार कवी संमेलन, कथाकथन

$
0
0

ग्रंथमहोत्सव’मध्ये रंगणार कवी संमेलन, कथाकथन
शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान ‘जिल्हास्तरीय ग्रंथमहोत्सव’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी संमेलन, कथाकथनसह वक्तृत्व स्पर्धा संमेलनाची वैशिष्ट्य ठरणार आहे.
सीएसएमएसएस शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात या स्पर्धा होत आहेत. तीन दिवसांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपक्रमांसह शालेय उपयोगी ग्रंथाची खजिना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील माध्यमिक शाळांतून दोन विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ग्रंथ महोत्सवात विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विद्यार्थी, शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमात २९ डिसेंबरला ‘कथाकथन’ स्पर्धा रंगणार आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असणार आहे. कथा मराठी भाषेतच सादर करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी यासाठी प्रा. सी. व्ही. रहाने, प्रा. पी. डी. गोसावी हे परिश्रम घेत आहे. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता कविसंमेलन होणार आहे. मराठी कविता अन् स्वलिखित सादर करावी लागणार आहे. प्रा. जी. एम. ढाकणे, प्रा. आर. ए. उदावंत हे या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत. ३० रोजी वक्तृत्व स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. ‘मला लेखक व्हायचंय’, ‘वीज वाचवा’ हे विषय विद्यार्थ्यांना मांडता येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रा. एस. सी. रिंगे, प्रा. डी. पी. देवकाते परिश्रम घेत आहेत. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये या सगळ्या स्पर्धा होणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके पुस्तक स्वरुपात दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूत्रपींड प्रत्यारोपणानंतर मिळवली डॉक्टरेट

$
0
0

मूत्रपींड प्रत्यारोपणानंतर मिळवली डॉक्टरेट
शस्त्रक्रियेनंतरही मर्यादांवर मात; २०० सालदारांच्या समाजशास्त्रीय अभ्यासाला विद्यापीठाकडून पदवी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छोट्या गावात व कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राध्यापक होण्याची संधी मिळाली आणि मोठ्या कष्टाने-प्रामाणिकपणे ज्ञानार्जनाचे काम सुरू असतानाच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. ‘पीएचडी’चे रजिस्ट्रेशन केले आणि काही वर्षातच दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले. मोठ्या भावाने मूत्रपिंडदान केले व खंडानंतर पुन्हा तेवढ्याच उत्साहाने ज्ञानार्जन सुरू केले व ‘पीएचडी’ पूर्ण करण्याच्या जिद्दीने कुणीही न घेतलेला विषय संशोधनासाठी घेतला. तब्बल २०० सालदारांचा सखोल समाजशास्त्रीय अभ्यास करुन शोधप्रबंध सादर केला आणि विद्यापीठाने प्रत्यारोपण झालेल्या प्राध्यापकाला अलीकडेच डॉक्टरेट बहाल केली.
मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर स्वतः संशोधन करणारा, विद्यापीठाला शोधप्रबंध सादर करणारा व त्यासाठी डॉक्टरेट पदवी प्रदान केला गेलेला हा एकमेव प्राध्यापक असावा. मूत्रपिंड आजारामध्ये व प्रत्यारोपणानंतर कमीजण पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात जिद्दीने उभे राहतात. त्यामध्ये समावेश होतो ४१ वर्षीय उमराव विठ्ठलराव कावळे यांचा.
उमराव कावळे हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील नाहाद या गावचे. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती, तरीही जिद्दीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपले शिक्षण घेतले. वसमत व परभणी येथे समाजशास्त्रात बी.ए.-एम.ए. पूर्ण केले आणि उत्तम गुणवत्तेमुळेच त्यांना २००१ मध्ये वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात प्राध्यापक होण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाचे चीज झाले, आता विद्यार्थ्यांना मनसोक्त शिकवावे, या भावनेतून त्यांनी ज्ञानार्जनाला वाहून घेतले. घरी थोडीबहुत जमीन होती; पण त्यांचे सगळे लक्ष अभ्यासात व विद्यार्थ्यांना शिकवण्यात होते. कदाचित नियतीलाही खऱ्या विद्यार्थ्याची चाचणी घ्यावी वाटली असावी म्हणून की काय, त्यांच्यावर नियतीची वक्रदृष्टी झाली. ते सहजच आपल्या डॉक्टर मित्राकडे गेले होते व त्यांचा मित्र एकाचा रक्तदाब तपासत होता. जरा आपलाही रक्तदाब पाहावा, असे त्यांना वाटले आणि त्यांचा रक्तदाब तपासला असता तो चक्क २२० पर्यंत पोहोचला होता (१२०-१४० पर्यंत सामान्य मानण्यात येते). तेव्हाच म्हणजे २००९ मध्ये आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हे त्यांना कळाले. त्यानंतर मात्र नियमित औषधोपचार सुरू झाला व त्यांनी २०१३ मध्ये ‘पीएचडी’साठी रजिस्ट्रेशन केले. अर्थात, नियतीची चाचणी तिथेच थांबली नाही व एक दिवस त्यांना खूप त्रास झाला. नांदेडला तपासणी केल्यानंतर उमराव यांचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) कायमचे निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना कुणीतरी औरंगाबादेतील ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर यांचे नाव सुचविले व ते औरंगाबादला दाखल झाले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उमराव यांना त्यांच्या मोठ्या भावाने किडनी देण्याचा निर्णय घेतला व १९ नोव्हेंबर २०१४ रोजी कमलनयन बजाज रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी झाले. तीन महिन्यांच्या सुटीनंतर ते कॉलेजमध्ये रुजू झाले. पुन्हा त्याच उत्साहाने तास घेणे, शिकवणे, मार्गदर्शन करणे, नोटस् देणे सुरू झाले आणि ‘पीएचडी’ पूर्ण करण्यासाठीही उमराव शब्दशः पेटले.
सालदारांच्या जीवनाकडे वेधले लक्ष
वर्षाकाठी अवघे ६०-७० हजार रुपये घेणारा व दिवस-रात्र राबणारा सालदार, त्यांचे कुटुंबीय, मुले ही शासकीय योजनांपासून कशी वंचित राहतात, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची कशी वाट लागते, या गंभीर विषयाकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील २०० सालदारांच्या मुलाखती घेतल्या, डेटा तयार केला व त्यावरुन शास्त्रीय निष्कर्ष काढला. डॉ. स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डॉ. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला व विद्यापीठाने त्यांना १४ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉक्टरेट बहाल केली. डॉ. बावीकरांमुळेच पुर्नजन्म मिळाला व ‘पीएचडी’चे स्वप्न पूर्ण करू शकलो, असे प्रा. उमराव आवर्जुन म्हणतात.

९० टक्के किडनी विकारग्रस्त, प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती आनंदाने जगण्याचे नाकारतात व नैराश्यात-दुःखात राहतात. आजाराचा बाऊ करण्यापेक्षा कामात उत्साहाने झोकून देणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत प्रत्यारोपण केलेल्या ११०६ रुग्णांपैकी सुमारे १०० शिक्षक-प्राध्यापक असावेत; परंतु प्रत्यारोपणानंतर डॉक्टरेट मिळवणारा हा एकमेव जिद्दी रुग्ण आहे.
– डॉ. सुहास बावीकर, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झांबड इस्टेटमध्ये महिलांची ओपन जीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रांतीचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या ओपन जीमचे लोकार्पण महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. झांबड इस्टेट येथील मीनाताई ठाकरे सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात झाला.
या कार्यक्रमाला नगरसेवक राजू वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौरांनी वाडकर यांच्या कामाची प्रशंसा केली. राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनातून वॉर्डात विकास कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आजकी नारी, सबसे भारी’ या उक्ती प्रमाणे वाडकर यांचे काम सुरू आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली. यावेळी उपविभाग प्रमुख उदय जैस्वाल, शाखा प्रमुख पंकज वाडकर, मनोज सकलेचा, बाबुराव अपसिंगेकर, प्रमोद घाग, सागर वाडकर, राजेंद्र खंडेलवाल, राधेश्याम तिवारी, सुभाष तांबोळी, प्रितेश बोरा, दादाराव खरात, सुनील काथार, डॉ. विक्रम गुप्ता, दिलीप मालु, प्रशांत लकडे, क्षमा वैद्य, कल्पना मेहता, नीलम गांधी, मीना सोनी, साधना जाजु, शोभा तिवारी, कांचन कस्तुरे, स्मिता देवळे, नयन पाटील, वैशाली पंकज वाडकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषा विद्यापीठ अंबाजोगाईत करावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अंबाजोगाई
ग्रामीण भागातील साहित्य रसिकांनी आवर्जून हजेरी लावत मराठवाडा साहित्य संमेलनाला प्रतिसाद दिला. अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी यासह इतर ठराव समारोपाच्या सत्रात करण्यात आले.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी सायंकाळी करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, खासदार प्रीतम मुंडे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्रात वेगवेगळे ठराव मांडण्यात आले. अंबाजोगाईला मराठी विद्यापीठ स्थापन करावे व अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, हे दोन प्रमुख ठराव त्यात आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण शिक्षणः समस्या आणि उपाय व बालभारतीतील धडे या विषयांवर परिसंवाद झाले.

तरुणांची गर्दी कमी

परिसंवाद, कविसंमेलन, गझल संमेलन ऐकण्यासाठी गर्दी झाली. पुस्तक विक्रीला दुसऱ्या दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असली तरी पुस्तक खरेदी करणारे मोजकेच रसिक आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. तरुणांचा साहित्य संमेलनात कमी सहभाग होता. तुलनेने ग्रामीण भागातील रसिकांनी आवर्जून सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय मुस्लिमांना बांग्लादेशी ठरविण्याचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद:

भारतीय मुस्लिमांना बांगलादेशी ठरविण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप एआयडीएफ (ऑल इंडिया डेमोक्रॅटीक फ्रंट)चे प्रमुख खासदार मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी आज केला. भारतात एकही बांगलादेशी व्यक्तीने राहू नये, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, त्यात भारतीय मुस्लिमांचा बळी जायला नको, असे ते म्हणाले.

रविवारी (२५ डिसेंबर) संध्याकाळी किराडपुरा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मौलाना हाफिज अली सिद्दीकी, मौलाना नदीम सिद्दीकी, मौलाना अब्दुल कवी, मौलाना खुतुबोद्दीन, मौलाना मोईजोद्दीन फारूखी, अब्दुल रऊफ इंजिनिअर, शहराध्यक्ष खलील खान, मौलाना हबीबुर रहेमान कासमी, कारिश शमशुद्दीन, नगरसेवक अय्युब जहागिरदार आदींची उपस्थिती होती. अजमल यांचा जमात उल उलेमा यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

अजमल पुढे म्हणाले की, भारत पाकिस्तानाच्या फाळणीनंतर आसाममधील पाच लाख लोकांना पाकिस्तानात पाठविण्यात आले होते. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाने आसाममध्ये पाकिस्तानी नसल्याची घोषणाही केली होती. आता पुन्हा भारतीय मुस्लिमांना बांगलादेशी ठरविण्याचा घाट सुरू आहे. तो आता बंद करावा. देशात आणि अनेक राज्यात नशाखोरी वाढत चालली आहे. नशा एका व्यक्तीची असते. मात्र, याचा परिणाम कुटुंबावर, त्या समाजावर होत असतो. यामुळे नशाखोरी रोखण्यासाठी साम‌ुहिक प्रयत्नांची गरज आहे. यात उलेमांसह अन्य धार्मिक प्रमुखांनी नशेखोरीची कीड दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोण म्हणतो, मुले वाचत नाहीत?

$
0
0

औरंगाबादः मराठीत वाचसंस्कृती लोप पावलीय म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत लख्ख अंजन घालणारी ही बातमी. एकिकडे मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायला दहा, दहा वर्ष लागत असल्याची ओरड होते, मात्र एका बालकविता संग्रहाची पहिली आवृत्ती केवळ दोन दिवसात संपली. विशेष म्हणजे प्रकाशनापूर्वीच कवी आणि प्रकाशकाच्या नियोजनपूर्वक उपक्रमामुळे हे शक्य झाले. असे प्रयोग झाले, तर मराठी साहित्यालाही वाचक मिळतील आणि वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचतील.
कवी बालाजी मदन इंगळे यांचा ‘रंगीत रंगीत रानफूल’ हा पहिलाच बालकविता संग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशनामार्फत प्रकाशित होत आहे. या संग्रहाचे प्रकाशन एक जानेवारी २०१८ रोजी आहे. तत्पूर्वी कवी बालाजी मदन इंगळे यांना वाटले की मुलांसाठी लिहिलेले हे पुस्तक मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि मुलांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध झाले पाहिजे. म्हणून त्यांनी प्रकाशक दत्ता डांगे यांच्याशी चर्चा केली. प्रकाशकांनी ५० टक्के सवलत द्यायचे मान्य केले. पुस्तकाची किंमत ६० रुपये आहे. आता ३० रुपयांना ते मिळणार होते, पण ग्रामीण भागातील मुलांचा विचार केला, तर ही किंमत ही परवडणारी नाही, असे वाटल्याने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या 'निर्मिती उमरगा' संस्थेला विनंती केली असता त्यांनीही प्रत्येक पुस्तकामागे पाच रुपये मदत करण्याचे मान्य केले. यासाठी कवी बालाजी मदन इंगळे यांनी आपली रॉयल्टीही घेतली नाही. म्हणजे साठ रुपयांचे पुस्तक २० रुपयांना आणि प्रकाशनपूर्व नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि केवळ दोन दिवसांत अकराशे प्रतींची नोंदणी झाली. एक हजार प्रतींची पहिली आवृत्ती आहे. ती प्रकाशनापूर्वीच संपली. आता प्रकाशक दुसरी आवृत्ती काढण्यामध्ये व्यस्त आहेत.

मुलांचे भावविश्व

'रंगीत रंगीत रानफूल' या बालकविता संग्रहात मुलांच्या भावविश्वाला भावणाऱ्या बालकविता आहेत. कार्टून, प्राणी, पक्षी, निसर्ग, महापुरुष, गंमती-जमती अशा विविध विषयांवर कविता आहेत. या बालकविता संग्रहास ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांची प्रस्तावना आहे. आकर्षक असे मुखपृष्ठ व प्रत्येक कवितेला लक्षवेधक चित्रे काढलेली आहेत. जी मुलांना खूपच आवडणारी आहेत.

कविता मुलांपर्यंत पोहोचाव्यात, असे वाटले आणि ग्रामीण भागात तर मुलांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत. म्हणून मुलांना सहज विकत घेता येतील, अशा किमतीत द्यायचे ठरले. याकामी शिक्षकांनी खूप मदत केली आहे.
- बालाजी मदन इंगळे, कवी

आमची प्रकाशन संस्था बालसाहित्यच प्रकाशित करते. जास्तीत जास्त मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे, असा आमचा प्रयत्न असतो. कवी बालाजी मदन इंगळे यांनी जो प्रयोग केला, तसे प्रयोग मराठीमध्ये होत राहिले, तर वाचनसंस्कृती वाढेल.
- दत्ता डांगे, प्रकाशक, इसाप प्रकाशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरिबी हा मनःस्थितीचा विषयः प्रा. पुंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दारिद्र्य हा माणसाच्या परिस्थितीचा भाग आहे. गरिबी हा मनःस्थितीचा विषय आहे. त्यामुळे अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेली व्यक्ती परिस्थितीने दारिद्री असू शकते, मात्र मनाने गरीब नसते,’ असे प्रतिपादन प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले.
वरद गणेश संस्थानतर्फे समर्थनगर येथील वरद गणेश मंदिराच्या सभागृहात आयोजित वरद व्याख्यानमालेत ते सोमवारी बोलत होते.
श्री. गणेश पंचरत्न स्त्रोत, या विषयावर बोलताना पुंड यांनी ईश्वर भक्तीची महिमा व भक्ती करण्याचा मार्ग यावर विवेचन केले. ते म्हणाले, भक्ती करतांना भक्तांने भक्तीचे स्वरूप समाजावून घेतले पाहिजे. मोरयाची उपासना करतांना पुष्पांजली वाहताना जगातील सर्वात सुंदर पुष्प असावे, अशी उपासना साधकांनी केली पाहिजे. सुदामा हा परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत होता. त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण त्याच्या भेटीस अतूर झाले होते. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात परिस्थितीला लढा देत बसण्यापेक्षा मनःस्थितीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आजचे व्याख्यान

या व्याख्यानमालेत मंगळवारी ‘आता विश्वात्मके देवे’ याविषयावर डॉ. प्रभाकर देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. २८ व २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. शरद भोगले यांचे अनुक्रमे सूत्र संचालनातील गंमती जमती व गरज सुसंवादाची या विषयावर व्याख्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदे मातरम् कहना पडेगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

‘गोवंश रक्षणासाठी हिंदू युवकांनी पुढे यावे. हिंदुस्थानात राहायचे असेल तर वंदे मातरम कहना पडेगा. हिंदू देव देवतांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढा,’ असे वादग्रस्त वक्तव्य श्रीराम हिंदू सभेचे हैदराबाद येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी रविवारी केले. ते हिंदू एकता महासंघाच्या वतीने आयोजित हिंदू धर्म महासभेत बोलत होते.

ठाकूर म्हणाले, ‘सर्व हिंदूना एका मंचावर आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिंदू युवकांनी गोमाता गोवंशाच्या संरक्षणार्थ पुढे यावे. वेळ पडल्यास हातात दांडा घेण्याची गरज पडल्यास त्यासाठी आपण तयार रहावे,’ असे अवाहन त्यांनी केले. ‘देशाच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे व ज्या हिंदू महापुरूषांनी प्राणाची आहुती दिली. ते बलिदान लक्षात ठेऊन धर्माची व देशाची रक्षा करावी. देशात हम दो हमारे दो यासाठी कायदा करण्यात आला पाहिजे. हिंदूसाठी लढणारी युवकांची सेना पाहिजे. आपण यासाठी तयार राहावे. भारत देश हिंदूचा आहे. हिंदुस्थानात राहायचे असेल तर वंदे मातरम कहना पडेगा. हिंदू देव देवतांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढा,’ असे ते म्हणाले. या कार्यक्रमात व्यासपीठावर आयोजक नीलेश खंडळाकर, प्रवीण जुळेकर, बालयोगी काशीगिरी महाराज, संतोष महाराज अढावणे, अमोल ढाकरे, रवी रासणे, संदीप गुढे, आशिष कटारिया, अमोल कुलकर्णी, विशाल खैरे, सोनू अहिरराव यांच्यासह भाजपा शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...नाथनगरी पर्यटकांनी गजबजली!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सलग आलेल्या सुट्यांमुळे गेल्या आठवड्यापासून पैठणला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे नाथनगरी पर्यटकांनी बहरली आहे.

नाथसागर, जगप्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यान, पैठणी साडी केंद्र, संत एकनाथ समाधी मंदिर व त्यांचा वाडा, संत ज्ञानेश्वराने रेड्यास वेद वदवलेले ठिकाण, शालिवाहन राजाचा राजवाडा, पालथी नगरी अशी अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटक क्षेत्रे पैठण परिसरात आहेत. यामुळे वर्षभर भाविक व पर्यटक शहराला भेट देतात. विशेष म्हणजे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शहराला भेट देणाऱ्या भाविक, पर्यटक व शालेय सहलीच्या संख्येत मोठी वाढ होते. यावर्षी पैठण-औरंगाबाद रस्ता, पैठण शहरातील अंतर्गत रस्ते व काही धार्मिक व पर्यटन क्षेत्राची झालेल्या दुरवस्थेमुळे, शहराला भेट देणाऱ्या भाविक, पर्यटक व शालेय सहलीच्या संख्या घटली होती. याकारणामुळे नाथमंदिर, जायकवाडी धरण व ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते, मात्र नाताळ व नववर्षाच्या आलेल्या सलग सुट्यांमुळे मागील दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात शालेय सहली व पर्यटक शहरातमध्ये दाखल होत आहेत. नाथमंदिर परिसरात मागील पाच वर्षांपासून व्यवसाय करणारे व्यापारी जगदीश टाक यांनी सांगितले की, ‘आमचा पूर्ण व्यवसाय पर्यटक व भाविकावर अवलंबून आहे. आणि त्यातच वर्षातील नोव्हेंबर व डिसेंबर खूप महत्त्वाचा असतो. कारण या महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक व शालेय सहली शहरात भेट देतात. मात्र, या वर्षी या दोन महिन्यांच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पर्यटक, भाविक न आल्यामुळे वर्षभरातील पूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. मागील दोन आठवड्यापासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

विदेशी पर्यटक वंचित
पैठण येथे जगप्रसिद्ध पैठणी साडी केंद्र व अनेक ऐतिहासिक पर्यटक क्षेत्रे असल्यामुळे दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक पैठणला भेट द्यायचे. मात्र मागील काही वर्षांपासून औरंगाबादला विदेशी पर्यटकांना पैठण विषयी माहिती देणारी मार्गदर्शक केंद्रे नसल्याकारणाने विदेशी पर्यटकांनी पैठणला भेट देणे जवळजवळ बंद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीअंताची धुरा स्त्रीकडे द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वेद संस्कृतीवर आधारित व्यवस्थेने ना स्त्रीचा वर्ण सांगितला ना जात सांगितली. धर्मशास्त्रात तर स्त्रीला स्थानच नाही. तरी जातीचे ओझे स्त्रीच वाहते. ‘मका पुछो तो बेमका, पता पुछो तो लापदा...’ अशी स्त्रीची अवस्था आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनी ज्या जातीअंताचे स्वप्न पाहले ती चळवळ जिवंत ठेवण्यासाठी व जातीअंत करण्यासाठी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवा. तिला निर्णय स्वातंत्र्य द्या,’ असे आवाहन कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी सोमवारी केले.

फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेतर्फे आयोजित महिला मुक्ती परिषदेत त्या बोलत होत्या. एन सातच्या कॉ. व्ही. डी. देशपांडे स्मारक सभागृहात आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारांच्या उपस्थितीत परिषद घेण्यात आली. अध्यक्षस्थानी हरिणाक्षी माने होत्या. व्यासपीठावर आंबेडकरी नेते अॅड. रमेश खंडागळे, संगीता खंडाळकर, एस. आर. बनसोडे, लक्ष्मण जाधव, भीमराव सोनवणे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ मध्ये मनूस्मृतीचे दहन केले. या घटनेला ८० वर्षे झाली. यानिमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला सशक्तीकरण आंतरजातीय विवाह, आदिवासी, भूमीहिन, शेतकरी संबंधात १४ ठराव मंजूर करण्यात आले. प्रतिभा अहिरे पुढे म्हणाल्या, ‘बाबासाहेबांनी दहन केलेली मनुस्मृती ही जातीव्यवस्थेची प्रतीक होती, पण भारतात आजही जात निर्णायक घटक ठरते. खैरलांजी, नितीन आगे, सोनई सारख्या न्यायालयीन खटल्यांमधून जातीची विडंबना पुढे येते. आता तर 'अच्छे दिन' आए है म्हणणारे सरकारच अराजकता पसरवत आहे. बलात्काराच्या घटनेला जातीय रंग देत मराठा मोर्चे निघाले. अॅट्रासिटी कायदाच रद्द करा ही मोर्चाची मागणी अगदीच विसंगती वाटली. जातीअंत झाल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही. यासाठी संविधानच दिशादर्शक आहे.’ प्रकाश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्योती जाधव, अनिता रगडे, राहुल खरात,संभाजी साबळे,मधुकर खिल्लारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७३ खासगी डॉक्टरांचा ‘आरोग्य’ला टेकू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील निम्म्या डॉक्टरांच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत आणि त्यामुळेच खासगी डॉक्टरांच्या सेवा करार तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची अंमलबजावणी एक डिसेंबरपासून राज्यात करण्यात आली. या उपक्रमाला प्रतिसाद देत राज्यातील पाच विषयांचे १७३ खासगी डॉक्टर आपल्या सेवा देत आहेत. नजिकच्या भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची सुचिन्हे आहेत.

सद्यस्थितीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांच्या ३० ते ४० टक्के जागा, बालरोगतज्ज्ञांच्या ४० ते ५० टक्के जागा, तर भूलतज्ज्ञांच्या ६०-७० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे ११० ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा सामान्य रुग्णालयांतील आरोग्य सेवा अनेक अर्थांनी कोलमडलेली आहे आणि हीच स्थिती वर्षानुवर्षे कायम आहे. त्याची किंमत मात्र गोरगरीब व ग्रामीण रुग्णांना मोजावी लागते. अनेक रुग्णालयांमध्ये वर्षानुवर्षे तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्यामुळेच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा कंत्राटी तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामध्ये प्रत्येक सेवेचे शुल्क निश्चित करण्यात आले असून, जशा व जितक्या प्रमाणात सेवा दिल्या जातील, तितक्या प्रमाणात खासगी डॉक्टरांना पॅकेज असेल. ज्या रुग्णालयात डॉक्टर जाण्यासाठी तयारच नाहीत, अशा समस्याग्रस्त रुग्णालयांचे अ, ब, क असे ग्रेडिंग करण्यात आले आहे. यात स्त्रीरोगतज्ज्ञांना ६० ते ८० हजार रुपयांचे महिन्याचे मूलभूत पॅकेज दिले जाणार आहे. या पॅकेजमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांकडून ओपीडी-आयपीडीचे वैद्यकीय व्यवस्थापन अपेक्षित आहे. त्याशिवाय जे स्त्रीरोगतज्ज्ञ ज्या प्रमाणात सिझेरियन शस्त्रक्रिया (पाच हजार रुपये प्रती केस), सोनोग्राफी (५०० रुपये), असिस्टेट डिलिव्हरी (१५०० रुपये) करतील, त्याप्रमाणात त्यांना प्रती केस पॅकेज लागू होईल. जे स्त्रीरोगतज्ज्ञ केवळ सिझेरियन शस्त्रक्रिया किंवा सोनोग्राफी करू इच्छितात त्यांना तसे स्वातंत्र्य असेल. ज्यांना केवळ ओपीडी-आयपीडीच्या मूलभूत सेवा द्यावयाच्या आहेत, त्यांना तसे स्वातंत्र्य असेल. बालरोगतज्ज्ञांना मूलभूत सेवांसाठी ७० ते ९० हजार, डिलिव्हरीवेळी १५०० रुपये व इमरजन्सी सेवांसाठी १००० रुपये प्रती केस या प्रमाणे पॅकेज असेल. या उपक्रमात भूलतज्ज्ञ ऑनकॉल राहतील व त्यांना सरसकट ५००० रुपये प्रती केस असे पॅकेज असणार आहे. या उपक्रमाला राज्यातील खासगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला असून, सध्या १७३ डॉक्टर या उपक्रमाअंतर्गत सेवा देत आहे. यामध्ये स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, भूलशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र या विषयांच्या डॉक्टरांचा समावेश आहे. ही खासगी डॉक्टरांची संख्या नजिकच्या भविष्यात ४०० ते ४५० पर्यंत वाढण्याची अपेक्षाही आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी व्यक्त केली. पूर्णवेळ सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅकेज हे दोन ते अडीच लाखांपर्यंतही जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

दुर्गम भागांत अजूनही अडचण
या उपक्रमाअंतर्गतही गडचिरोली, नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये खासगी डॉक्टर फारशा प्रमाणात सेवा देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. अर्थात, या दुर्गम भागांतही डॉक्टर मिळवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सध्या १७३ खासगी डॉक्टर सेवा देत असले तरी लवकरच हा आकडा ४५० पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे माता मृत्यू, बाल मृत्यूचे प्रमाण आणखी कमी होऊ शकेल. तसेच विविध तातडीचे उपचारही मिळू शकतील. मुख्य म्हणजे स्त्रीरोगतज्ज्ञांमुळे सिझेरियन शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणात होतील, अशी आशा आहे. – डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर व्हिडिओ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिन्सी पोलिस पीडित महिलेची तक्रार घेत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जिन्सी पो‌लिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता जिन्सी पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला होता.

पतीच्या सुटकेसाठी एका पीडित महिलेचा दलालाच्या वतीने गुजरात राज्यात विवाह लावण्यात आला होता. हा दलाल पैसे देत नसल्याने या पीडित महिलेने शुक्रवारी त्याला चोप देत जिन्सी पोलिस ठाण्यात आणले होते, मात्र सदरील प्रकरण मुकुंदवाडी पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने जिन्सी पोलिसांनी ते प्रकरण ‌मुकुंदवाडी पोलिसांकडे वर्ग केले. दरम्यान शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यात संशयित आरोपी जुबेर पहेलवान, मतीन पटेल, बब्बू मुल्ला (तिघे रा. बायजीपुरा) व सलमा बानो (रा. कटकटगेट) हे चौघे इतर वीस ते पंचवीस जणांच्या जमावासह आले होते. या जमावाने पोलिसांच्या कार्यात हस्तक्षेप केला होता. तसेच या पीडित महिलेची मोबाइलवर शुटींग करीत जिन्सी पोलिसांनी सहकार्य केले नसल्याबाबत व्हिडिओ क्लीप व्हायरल केली होती. या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘सैराट’ जोडप्याला ‌नातेवाईकांची मारहाण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नातेवाईकाकडे आलेल्या तरुणीने प्रियकरासोबत कारमधून पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाळतीवर असलेले नातेवाईक व नागरिकांनीही कारचा पाठलाग करीत दोघांना चोप दिल्याची घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास एपीआय कॉर्नरजवळ घडली. नगरसेवकाने या दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका करत त्यांना सिडको एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

पुणे येथील तेवीस वर्षांच्या तरुणीचे पुण्यातीलच एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. या कारणामुळे या तरुणीच्या पालकांनी तिला औरंगाबादला नातेवाईकाकडे पाठवले. सोमवारी दुपारच्या सुमारास या तरुणीने प्रियकराला प्रोझोन मॉलजवळ बोलावले. कारमध्ये हा प्रियकर त्या ठिकाणी आला. तरुणी कारमध्ये बसल्यानंतर या दोघांनी पोबारा केला, मात्र तरुणीच्या पाळतीवर तिचे नातेवाईक होते. त्यांनी पाठलाग करून कार अडवली. प्रियकराला चोप देणे सुरू केले. तरुणीला देखील मारहाण केली. दरम्यान या ठिकाणी नागरिक जमा झाले. त्यांना हा अपहरणाचा प्रकार वाटल्याने त्यांनी देखील प्रियकरला बेदम चोप दिला. यावेळी ही तरुणी तो आपला प्रियकर असल्याचे ओरडून सांगत होती. हा प्रकार सुरू असताना नगरसेवक मनोज गांगवे त्या ठिकाणी पोचले. त्यांनी जमावाच्या ताब्यातून या प्रेमी युगलाची सुटका केली. सिडको एमआयडीसी पोलिसांना त्यांनी माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. जाधव त्या ठिकाणी कर्मचाऱ्यासह पो‌हचले. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवले असून, तरुणीचे पालक आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली.

तरुणावर उपचार
जोडप्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या तरुणीचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तिने त्या तरुणासोबतच विवाह करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या जखमी तरुणावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images