Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अन् राष्ट्रपती म्हणाले, ही तर आंध्रलता !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चित्रपट पार्श्वगायन, गझल आणि शास्त्रीय गायकीने देशभर ख्याती पावलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचे शनिवारी निधन झाले. नवोदित कलाकारांना मायेने ऐकणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या आशालता यांचे जाणे सर्वांना भावविवश करून गेले. प्रेमळ स्वभावाच्या करलगीकर यांच्या आठवणींना जुन्या-नवीन पिढीतील कलाकारांनी उजाळा दिला.

वैजापूर (जि. औरंगाबाद) या लहानशा गावात जन्मलेल्या डॉ. आशालता करलगीकर यांचे वडील वकिली व्यवसायानिमित्त हैदराबादेत स्थायिक झाले. याच शहरात त्यांची गायकी बहरली. शारदोत्सवात ‘अनारकली’ चित्रपटातील गाणी गाऊन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्याच जाहीर कार्यक्रमात ही गोड गळ्याची गायिका कोण असा सर्वांना प्रश्न पडला. गायनाची आवड ओळखून शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. पं. स. भ. देशपांडे, पं. कऱ्हाडे यांच्याकडे प्राथमिक धडे गिरवले. पुढील काळात शास्त्रीय आणि सुगम गायनावर त्यांनी प्रभूत्व मिळवले. आकाशवाणीवर कन्नड, उर्दू, तेलुगू, मराठी, हिंदी अशा विविध भाषेत त्यांनी गाणी सादर केली. तेलुगू चित्रपटातील ‘येवंडोई, निदुरालेवंडोई’ या तेलुगू चित्रपटगीताने करलगीकर यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ‘मुजरिम कौन’ या हिंदी चित्रपटातील गाणीसुद्धा विशेष गाजली. मात्र, त्यानंतरही त्या शास्त्रीय गायकीत रमल्या. ‘आयुर्विमा’त ३० वर्षे नोकरी करून त्यांनी संगीत सेवा केली. देश-विदेशात शास्त्रीय गायनाचे आशालता यांनी तब्बल दोन हजार कार्यक्रम केले. उतारवयात औरंगाबाद शहरात शास्त्रीय गायन रूजवण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नवीन गायकांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक मैफलीला त्या आवर्जून उपस्थित असत. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या आशालता करलगीकर यांच्या आठवणींनी कलावंत भावविवश झाले.

‘आंध्रलता’ची आठवण
‘हैदराबादला माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे आगमन झाले. प्रकृतीला आराम वाटावा म्हणून विश्रांतीसाठी ते तिथे आले होते. त्यांच्या मुक्कामात सतत ८-१० दिवस तेथे सरकारी पातळीवर माझा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजण्यात आला होता. त्यांना माझे गायन खूप आवडले. शेवटच्या दिवशी त्यावेळेचे गव्हर्नर मेहदी नवाजजंग यांच्या उपस्थितीत त्यांनी माझी तारीफ करुन सर्वांसमक्ष सांगितले की, ‘शी इज टू बी नोन अॅज आंध्र लता’ अशा रितीने तेव्हापासून हे नावच प्रचलित झाले. या घटनेचे भूषण आमच्या स्नेहीमंडळींना तर वाटलेच, परंतु त्यावेळच्या तेथील राज्यकर्त्यांना, मंत्र्यांनादेखील खूप कौतुक वाटले. नंतर काय, भारतातील सर्वोच्च पदावरील व्यक्तींसमोर गाण्याच्या संधी मला आपोआपच येऊ लागल्या. - (डॉ. आशालता करलगीकर लिखित ‘स्वरानुबंध’ पुस्तकातील आठवण)

आशालता करलगीकर यांच्यासोबत देशभर गझल मैफली केल्या. फार मोठी कलावंत असलेल्या आशालता यांचे शास्त्रीय आणि सुगम गायकीवर प्रभूत्व होते. तेलुगू भाषेतही गाणी गायली. त्या उत्तम सुगरण होत्या. सर्वांशी प्रेमाने वागणे त्यांचा स्वभाव होता. - पं. नाथराव नेरळकर, ज्येष्ठ गायक

‘आंध्रलता’ डॉ. आशालता करलगीकर महान गायिका होत्या. मराठी गझल गायकीने अधिक लोकप्रिय झाल्या. नवीन कलाकारां‍विषयी आत्मियता होती. त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. औरंगाबाद शहरात शास्त्रीय संगीत रूजवण्यात त्यांचे विशेष योगदान होते. - डॉ. श्रीरंग देशपांडे, संगीत अभ्यासक

शास्त्रीय गायनाचा मोठा व्यासंग असलेल्या आशालताताईंचे मराठी, हिंदी आणि उर्दू गझलांवर प्रभूत्व होते. हैदराबादेत बराच काळ वास्तव्य असल्यामुळे उर्दू उच्चारांबाबत त्यांचा कटाक्ष असायचा. नवीन गोष्टींबाबात त्यांना नेहमी कुतूहल होते. - प्रा. दिलीप दोडके, गायक

प्रेमळ व्यक्तिमत्त्व असलेल्या आशालताताईंचे नेहमीच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आहे. कलाकार म्हणून त्या उत्तम होत्याच, पण माणूस म्हणूनही मोठ्या होत्या. नवीन गायकांना ऐकण्याबाबत त्यांचा उत्साह कायम होता. - सुस्मिरता डवाळकर, गायिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरूंच्या दालनात प्राध्यापक भिडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य नियुक्तीवरून दोन गटात प्रचंड गदारोळ झाला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंच यांचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अभ्यास मंडळाचे नामनिर्देशन विद्यापीठ कायद्यानुसार केले असून, त्यात बदल होणार नसल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी स्पष्ट केले. आता हा वाद हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे.

अभ्यास मंडळ (बोर्ड ऑप स्टडीज) नामनिर्देशनावरून विद्यापीठात मोठा गदारोळ झाला. विद्यापीठाने बायोडाटा मागवला नाही. तसेच अधिसूचना जारी केली नसल्यामुळे या नियुक्त्या अवैध असल्याचा आरोप उत्कर्ष पॅनेलचे प्रा. सुनील मगरे, प्रा. राजेश करपे यांनी केला. या नियुक्त्यात विकास मंचच्या सदस्यांची सर्वाधिक वर्णी लावली असून, नामनिर्देशनात दुजाभाव केल्याचे त्यांनी कुलगुरूंना सांगितले. या वक्तव्यावर विद्यापीठ विकास मंचचे प्रा. शंकर अंभोरे, डॉ. भगवान डोंभाळ, डॉ. सर्जेराव जिगे यांच्यासह इतर सदस्यांनी आक्षेप घेतला. कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके आणि डॉ. मजहर फारूकी यांच्यासमोर दोन्ही गट भिडले. शिवीगाळ करीत एकमेकांवर धावून गेले. नियुक्त्यांविरोधात कुलपती कार्यालयात दाद मागणार असल्याचे ‘उत्कर्ष’च्या वतीने सांगण्यात आले. ‘उत्कर्ष’चे पदाधिकारी दालनाबाहेर गेल्यानंतर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला. ‘प्रा. सुनील मगरे गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांनी कुलगुरूंच्या दालनाची विटंबना केली आहे. कुणाच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्याचा त्यांना अधिकार नाही. अशा प्रवृत्तीला ठोशाने ठोसा उत्तर देण्याची तयारी आहे’ असे अंभोरे यांनी सुनावले. हा गोंधळ बराच वेळ सुरू असल्यामुळे कुलगुरूंनी शांत राहून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू हे अधिष्ठातांसोबत चर्चा करून पात्र प्राध्यापकांची अभ्यास मंडळावर नियुक्ती करतात. कोणत्या विद्यापीठाने कशी प्रक्रिया राबवली याला अर्थ नाही. सर्वांनी कायदेशीर प्रक्रिया ध्यानात घ्यावी. या नियुक्तीत कोणताही बदल होणार नाही असे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी स्पष्ट केले.

वाद कशाचा ?
३१ अभ्यास मंडळावर प्रत्येकी सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत बहुमत असलेल्या गटाचा अध्यक्ष होणार आहे. आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने १८६ सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, अशी नियुक्ती निवडणूक झाल्यानंतर करतात. विद्यापीठाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे उत्कर्ष पॅनेलने म्हटले आहे. नियुक्त्या कायम राहिल्यास वाद हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे.

अधिष्ठातांवर माझा विश्वास असून नियुक्त्यात गैरप्रकार झालेला नाही. कायद्यानुसार प्रक्रिया केली असून नवीन सदस्य निकषानुसार नसतील तर कारवाई करता येते. केवळ विरोध करणे योग्य नाही. - डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मागील पंधरा दिवस बैठक घेऊन कुलगुरूंनी नियुक्तीचा अंतिम निर्णय घेतला आहे. या नियुक्त्यात प्रचंड राजकीय हस्तक्षेप असून हा प्रकार योग्य नाही. प्राध्यापकांनी असे वर्तन करणे धक्कादायक आहे. - डॉ. साधना पांडे, कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालया संदर्भात सकारात्मक निर्णयाची आशा

$
0
0



नांदेड - पोलिस आयुक्तालय, स्वतंत्र शहर वाहतूक शाखा,पोलिसांची निवासस्थाने या प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीतरी सकारात्मक निर्णय घेतील या आशेवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा आहे. नांदेडकरांसाठी जिव्हाळ्यांच्या या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे यासाठी भाजपचे काही पदाधिकारी साकडे घालणार आहेत.

तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याची सीमा असलेल्या नांदेडची ओळख राज्याच्या गृहदफ्तरी ‘अतिसंवेदनशील’ अशी आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हे (आयुक्तालय वगळून) नांदेड जिल्ह्यात घडतात. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जात असलेल्या या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ३६ पोलिस ठाणे जिल्ह्यात आहेत. गुन्ह्यांची वाढती संख्या, गुन्हेगारांकडून दिवसेंदिवस गुन्ह्यात वापरली जाणारी पद्धत, वाढणारी लोकसंख्या व झपाट्याने शहराचा होणारा विस्तार या पार्श्वभूमीवर नांदेडला पोलिस आयुक्तालय करण्यात यावे, असा प्रस्ताव सन २००२ मध्ये तत्कालिन पोलिस अधीक्षक अमिताभ गुप्ता यांनी पाठवला होता. सुरुवातीला या प्रश्नावर गृहमंत्रालयात गंभीर मंथन झाले; पण राजकीय उदासीनतेमुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही.

नांदेडचे तत्कालिन पोलिस अधीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आयुक्तालय तसेच स्वतंत्र वाहतूक शाखेसाठी पाठपुरावा केला. गृहमंत्रालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला; पण त्यांच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून हवे ते बळ मिळाले नाही, पर्यायाने हा विषय मागे पडला.
राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेडला मिळाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महसूल आयुक्तालयाच्या बाबतीत निर्णय घेऊन धाडस दाखवले होते; पण पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याचे सौजन्य त्यांनी कारकिर्दीत दाखवले नाही. आयुक्तालय किंवा शहरासाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र वाहतूक शाखेचा प्रश्नही आजही भिजत पडलेला आहे. वाहनांची वाढती संख्या, ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण, अरुंद रस्त्याचा वानवा यामुळे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या पोलिसांच्या निवासस्थानाची अवस्था बिकट आहे. जीव मुठीत घेऊन राहवे लागत असून पोलिस कुटुंबीयांच्या निवारा व डागडुजीसाठी तत्पर निधी मिळेल यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आशावादी आहेत. मुख्यमंत्री सपत्नीक रविवारी नांदेड जिल्ह्यात येत आहेत. गृहविभागाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत ते यावेळी सकारात्मक निर्णय घेतील या आशेवर पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत.


पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर आहे. त्याशिवाय नांदेडला पोलिस आयुक्तालय तसेच स्वतंत्र वाहतूक शाखा अत्यावश्यक आहे. या सर्व प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहोत.
अ‍ॅड. चैतन्य (बापू) देशमुख,
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य


पोलिस आयुक्तालय, स्वतंत्र वाहतूक शाखेचा प्रस्ताव गृहमंत्रालयात फार पूर्वीच पाठवण्यात आला आहे. वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पोलिस वसाहतींसाठी निधींची आवश्यकता आहे.
विश्वास नांदेडकर, पोलिस उपअधीक्षक (गृह)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बांधणार बंधारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बॅरेजस बांधले जाणार आहेत. त्या अनुषगांने लातूर जिल्ह्यातील पाणी साठा वाढवून पिण्यासह शेतीला व उद्योगाला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बॅरेज बांधण्यात यावेत, अशी मागणी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केली. हा प्रकल्प ६२४ कोटी रुपयांचा असून त्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली.
मराठवाड्यात सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषत: लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी होत असल्यामुळे पाणीसाठा अपुरा होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला व उद्योगालाही पाण्याची कमतरता वेळोवेळी भासत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री निलंगेकर यांनी जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बॅरेजेस बांधली जावीत अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील १८ पुलावर बॅरेजेस बांधण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यात ९.६२ दशलक्ष घनमीटर पाणी साठा असून सिंचन क्षेत्र १.१६ लक्ष हेक्टर आहे. पालकमंत्री निलंगेकर यांनी मागणी केल्यानुसार पुलावर बंधारे बांधले गेल्यास ३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होवून ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
देशात प्रथमच लातूर जिल्ह्यातील पुलावर बंधारे बांधण्यात येणार असून यासाठी ६२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या निधीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी द्यावी यासाठभ्त्यांनी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री निलंगेकर यांच्या या मागणीला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.

जिल्ह्याच्या चौफेर विकासाला गती मिळेल
रस्त्याच्या पुलावरील बॅरेजला मंजुरी मिळाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून पिण्याच्या पाण्यासह शेती व उद्योगधंद्याला भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. यामुळे जिल्ह्याच्या चौफेर विकासाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विज्ञानच्या अभ्यास मंडळावर डॉ. इंदूरकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता व दंतपरिवेष्टनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया इंदूरकर यांची निवड झाली आहे. या मंडळावर औरंगाबादमधून केवळ डॉ. इंदूरकर यांची निवड झाली आहे.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या पदवी व पदव्युत्तर दंत वैद्यकीय विद्या शाखेतील क्लिनिकल विभागातून डॉ. इंदूरकर, डॉ. गिरीश नाझिरकर (संगमनेर), डॉ. संगीता मुगळीकर (पुणे), डॉ. चेतन होटकर (कोल्हापूर), डॉ. अभय दातारकर (नागपूर) व डॉ. रितेश कळसरकर (नागपूर) हे विजयी झाले. या मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (२८ डिसेंबर) मतदान झाले होते. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक (दंत) डॉ. सुरेश बारपांडे, अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे, ‘सीएसएमएसएस’ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुभाष भोयर यांनी डॉ. इंदूरकर यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर (प्री-क्लिनिकल) शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपअधिष्ठाता व शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे यांचीही निवड झाली आहे. मंडळाच्या उर्वरित जागांवर डॉ. दिपक जोशी (मुंबई), डॉ. पंकजा नाईक (मुंबई), डॉ. सुषमा पांडे (अमरावती), डॉ. इंगळे (मुंबई), डॉ. पाडळकर (मुंबई) यांची निवड झाली आहे. डॉ. सुक्रे यांच्या निवडीबद्दल अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावरील पाहुणे वाढले!

$
0
0

औरंगाबादः पर्यटननगरीतील शहरवासीयांसाठी खूशखबर. यंदा एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान शहरातील विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये चक्क ७० टक्के वाढ झाल्याने व्यापारी वर्गाला चांगलीच बरकत आली असून, औरंगाबाद विमानतळाचा समावेश देशातील आठ कस्टम विमानतळात झाला आहे.
औरंगाबाद विमानतळावरून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथे जेट एअरवेज, ‌एअर इंडिया आणि ट्रू जेट या तीन विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. या विमान प्रवाशांच्या वाहतुकीची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे केली जाते. त्याआधारे विमानतळ प्राधिकरणाने ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमान प्रवासी, विमान वाहतूक तसेच विमानाद्वारे होत असलेल्या मालवाहतुकीची माहिती जाहीर केली. त्यानुसार एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात औरंगाबाद विमानतळावर एक लाख ८७ हजार ४३९ प्रवाशांची वाहतूक झाली. तर एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या काळातच विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या एक लाख ८८ हजार ८१५ नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ०.७ टक्के इतकी आहे. औरंगाबाद विमानतळावरून ऑक्टोबर २०१६ ला २४ हजार ६८९ विमान प्रवाशांची वाहतूक झाली, तर ऑक्टोबर २०१७मध्ये ही संख्या २६ हजार ४३६ नोंदवण्यात आली. या प्रवासी संकेत चक्क ७.१टक्के इतकी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय वाढ

औरंगाबाद विमानतळावरून हज यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू असते. एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०१७ याकाळात देशाबाहेर जाणाऱ्या तसेच येणाऱ्या ‌प्रवाशांची संख्या २३९५ इतकी होती, तर यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या काळात या विमान प्रवाशांची संख्या ४०८१ इतकी नोंदविण्यात आली. त्यानुसार या प्रवाशांतमध्ये ७०.४ टक्के वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य पातळीवर तीन प्रयोगांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या ‌‘जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून’ तीन प्रयोग राज्यपातळीवर जाणार आहे. प्रथम पारितोषिक रणजित शेळके, द्वितीय प्रभू खरात, तर तृतीय पारितोषिक शेकनाथ पंडित विद्यार्थ्यांने पटकाविले. शैक्षणिक साहित्य, लोकसंख्या शिक्षण, वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये शिक्षकांच्या प्रयोगांचा गौरव करण्यात आला.

‘सीएसएमएसएस’मध्ये झालेल्या या उपक्रमांचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. ‘जिल्हास्तरीय ग्रंथमहोत्सव’ व ‘जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन’ तीन दिवस झाले. जिल्हाभरातील ९० विद्यार्थ्यांचे, शिक्षकांनी तयार केलेल्या निवडक शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले होते. स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. प्रथम पारितोषिक गंगापूर येथील न्यू हायस्कूल माध्यमिकच्या रणजित शेळके याने पटकाविला. द्वितीय पारितोषिक ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या प्रभू खरात, तृतीय पारितोषिक शेकनाथ पंडित या कन्नड येथील न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्याच्या प्रयोगाला मिळाली. या प्रयोगांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात संधी मिळणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा होणार आहे.

शैक्षणिक साहित्यात प्रयोग
विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांनी सादर केलेले शैक्षिणिक साहित्यही मांडण्यात आले होते. पहिला क्रमांक संस्कार प्रबोधिनी प्रशालाच्या सुनिल निकम, द्वितीय पारितोषिक वैजापुर निवासी शाळेचे बी. एम. बनसोडे, तर तृतीय पारितोषिक महादेव लाखे शहिद भगतसिंग हायस्कूल यांनी मिळविले. तर लोसंख्या शिक्षणात प्रथम पारितोषिक गुरूदेव संमतभद्र विद्यालयाचे सुहास मिश्रीकोटकर, द्वितीय पारितोषिक अंधारी जिल्हा परिषद हायस्कूलच्या ए. ए. नळदुर्गकर तर तृतीय पारितोषिक मनिषा भंडारे यांना मिळाले. वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये प्रथम पारितोषिक एस. बी. प्रशाला गोंदेगावचे प्रशांत पवार, तर द्वितीय पारितोषिक जुन्नेश्वर विद्यालय वरूड येथील जग्गनाथ गावंडे यांनी पटकाविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळ्यात तीन ठिकाणी ट्रेकिंगचा थरार

$
0
0

औरंगाबाद : क्रीडा आणि पर्यावरण प्रेमींसाठी नववर्षात एक आनंदवार्ता. मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य असलेल्या गौताळा औट्रम घाटमध्ये ट्रेकिंगची सुविधा सुरू करण्यात आली असून, त्यासाठी तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. बिबट्या, काळवीट, नीलगाय, सायाळ आदी १९ प्रकारचे सस्तन प्राणी येथे आढळतात. अभयारण्यात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा आहे. हिवरखेडा, पुरणवाडी, सायगव्हाण, पाटणदेवी आणि पितळखोरा असे पाच प्रवेशद्वारे असलेले हे अभयारण्य पर्यावरण, वन व जलवायू परिर्वतन मंत्रालयाने ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्यात नुकतेच एक अस्वलाचे जोडपेही आढळले. या आनंदवार्तेसोबत वन विभागाने येथे पर्यटकांसाठी ट्रेकिंगची सोय करत सुखद धक्का दिला आहे. वन विभागाचे उपवन संरक्षक आर. आर. काळे यांच्या मार्गदर्शनखाली ट्रेकिंगचे नियोजन केले जात आहे.

स्थानिकांना रोजगार
ट्रेकिंग करणाऱ्यांना वन विभागातर्फे ट्रेनर दिला जाईल. गाइडची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासह सोबत वन कर्मचारी असल्याने ते पर्यटकांना वन्यजीव व जैवविविधतेबाबत माहिती देतील. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत अल्पदरात नाश्ता, जेवणाची सुविधा दिली पुरवली जाईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

गौताळ्यात नवीन वर्षात वन पर्यटनाबरोबरच ट्रेकिंगचा आनंद लुटता येईल. यात ट्रेकिंगचा मार्ग व अंतर हे वयाच्या गटानुसार तीन, पाच आणि बारा किलोमीटरचे असेल.
- पी. व्ही. जगत, सहायक वन संरक्षक (वन्यजीव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूपट्ट्यांवर प्रशासनाचा वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूपट्टा लिलावाचा तिढा प्रशासनाकडून सोडवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे प्रतिसाद न मिळालेल्या पट्ट्यांत किती वाळूसाठा शिल्लक आहे, याचे सर्वेक्षण करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला आहे.

एकीकडे वाळूपट्ट्यांना प्रतिसाद मिळत नसताना दुसरीकडे बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होत आहे. त्यामुळे लिलाव झाला नसला तरी, नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याचा प्रशासनाला संशय आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर रामा यांनी वाळूपट्ट्यांची स्थिती काय आहे. तेथे किती वाळू शिल्लक आहे, याचे सर्वेक्षण करून अहवाल द्यावा, असे आदेश संबंधित तहसील कार्यालयांना दिले आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वाळूपट्ट्यांच्या किमती वाढल्यामुळे ऑनलाइन लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. पर्यायाने प्रत्येक पट्ट्यातून वाळूचोरी वाढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात असाच प्रकार सुरू आहे. यावर्षी ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ कालावधीसाठी जिल्ह्यात ३१ वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात येणार आहे, मात्र या पट्ट्यातून सर्रास वाळूचोरी होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या वाळूसाठ्यांवर ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लिलावाची किचकट प्रक्रिया आणि भरमसाठ दर यामुळे लिलावाला प्रतिसाद मिळत नाही. अशा वाळूपट्ट्यातून सर्रास वाळूचोरी करण्यात येते. त्यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसूलाचा फटका बसत आहे.

केवळ सात पट्ट्यांचा लिलाव
जिल्ह्यात ३१पैकी आतापर्यंत केवळ सात वाळूपट्ट्यांना कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला असून, यापैकी एकाच वाळूपट्ट्याचा ताबा देण्यात आला आहे. यंदा सिल्लोड तालुक्यातील १३, कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यांतील प्रत्येकी पाच आणि फुलंब्री तालुक्यातील तीन वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छ भारत’कडे मराठवाडा वेगात

$
0
0

औरंगाबादः वेळेत पूर्ण होईल ती शासनाची योजना कशी ? स्वच्छ भारत मिशनची मराठवाड्यात वर्षभरापूर्वी अशीची परिस्थिती होती, मात्र, आता संपूर्ण चित्र पालटले आहे. वर्षभरात या योजनेतून तब्बल दहा लाख ३७ हजार टॉयलेट बांधण्यात आले आहेत.
३१ मार्च २०१८ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांकडे शौचालय बांधण्याचे राज्य शासनाचे उद्दिशष्ट आहे. मराठवाड्यात या उद्दिष्टाची पूर्तता वेळेआधी होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्ह्यात १०० टक्के काम झाले असून लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्हा शौचालय बांधकामात ९५ टक्‍क्यांपेक्षा पुढे आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र या कालावधीत विभागात अत्यंत कासवगतीने कामे झाली असल्याचे आकडेवारी सांगते. १ जानेवारी २०१७ अखेर मराठवाड्यातील २३ लाख ७ हजार ३९५ कुटुंबांपैकी केवळ ११ लाख २१ हजार कुटुंबांकडे शौचालये होती. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ही संख्या २१ लाख ५८ हजारांवर पोचली आहे. हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींची स्थितीही अशीच आहे. वर्षभरापूर्वी केवळ ९४५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होत्या. मात्र आता ही संख्या ४९६० अशी आहे. वर्षभरात तब्बल चार हजार १५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.
केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत मिशनची डेडलाइन संपत आली असताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून विभागवार घेतलेल्या बैठका तसेच अधिकाऱ्यांना केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळेच या योजनेला मराठवाड्यात खऱ्या अर्थाने गती आली.
शासनाकडून या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक घरासाठी प्रोत्साहनपर बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. यातील ७२०० केंद्राकडून, तर ४८०० राज्य शासनाकडून देण्यात येतात. मार्च २०१८ पर्यंत ग्रामीण मराठवाड्याला स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट असले तरी येत्या काही दिवसातच मराठवाड्यात हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.

६० टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

वर्षभरात मराठवाड्यातील ६६१९ पैकी ४९६० (६० टक्के) ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६६ ग्रामपंचायती जालना, तर सर्वात कमी ३६३ ग्रामपंचायती औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. वर्षभरात एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यातील ४२.४६ टक्के, बीड ८७.५४, हिंगोली ५४.१७, जालना ८६.०५, लातूर ५०.३२, नांदेड ६३.८८, उस्मानाबाद ५५.०९, परभणी ३१.४८ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारामधील विष फूड पॉयझनिंगपेक्षा भयंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विचारांमध्ये विष असते. ते फूड पॉयझनिंगपेक्षाही भयंकर असते. त्यामुळे नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, असा संदेश दिल्ली येथील मोटिव्हेशनल गुरू गुलशन नंदा यांनी दिला.

सीए अभ्यासक्रमाच्या देशभरातून आलेल्या ९०० विद्यार्थांचा सहभाग असलेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी नंदा बोलत होते. ते म्हणाले, ‘सीए होताना ९० टक्के विद्यार्थांना अपयश येते, कारण या अभ्यासक्रमांची काठिण्य पातळी उच्च दर्जाची आहे. त्यामुळे अपयशाला घाबरू नका. एक नकारात्मक विचार हा शंभर सकारात्मक विचारांना जाळून टाकतो. नकारात्मक विचार हा फूड पॉयझनिंगपेक्षा भयंकर आहे. फूड पॉयझनिंगवर उपाचार करून बरे होता येतो, पण नकारत्मक विचार मनातून काण्यासाठी कोणतेही औषध नाही. त्यामुळे असे विचार मनात येऊच देऊ नका.’

समारोपाच्या वेळी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष सर्वेश जोशी, कोषाध्यक्ष ए. जी. मुंदडा, औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष अल्केश रावका, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष व या परिषदेचे मुख्य समन्वयक रोहन आचलिया यांची प्रमुख उपसथिती होती.

या वेळी परिषदेत मेहनत घेतलेल्या ६० विद्यार्थाचा सत्कार करण्यात आला. या परिषदेसाठी विद्यार्थी आघाडीची उपाध्यक्षा ऐश्वर्या ब्रह्मेचा, रोहन खंडेलवाल, अभिनव शर्मा, मंजिरी महतोले, रोहन मुगदिया, राशी तोतला यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी योजना
प‌‌हिल्या सत्रात र‌विवारी सीए अभ्यास मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश किनरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी आता विद्यार्थाना केंद्रीय अभ्यास मंडळाने अनेक योजना आणल्या आहेत. मोबाइलवरच्या अॅपवरूनही अभ्यास करता येईल. त्याचप्रमाणे डिजिटल युगात विद्यार्थासाठी क्लाउड कॅम्पस योजनेद्वारे मोफत ई-बुक, मोफत ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधनव्यक्ती, विशेषतज्ज्ञ तीन महिने विनावेतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्व शिक्षा अभियान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वैजापूर या ठिकाणी आस्थापनेवर कार्यरत ४२ जणांचे वेतन तीन महिन्यांपासून थकलेले आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. याठिकाणी २६ साधनव्यक्ती व १६ विशेषतज्ज्ञ असे ४२ जण कार्यरत आहेत.
सर्व शिक्षा अभियानातील साधन व्यक्ती यांचे बजेट असून सुद्धा एमपीएसपी, एसपीडी, मुंबई यांच्या आदेशानुसार दर सहा महिन्यांचे एकत्रित अग्रीम स्वरूपात डाएट प्राचार्य यांना वर्ग करण्याचे आदेश आहेत. तरीही त्यांच्या आदेशाला प्रशासनाने जुमानलेले नाही. गेल्या तीन महिन्यांपासून सर्व कर्मचारी यांना विनाकारण वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
सर्व शिक्षा अभियानचा आस्थापना विभाग दर सहा महिन्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून पगाराबाबत टोलवाटोलवी करत आहे. अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र वेळेवर होत असल्याचे चित्र आहे. याबाबत एखाद्या शिक्षकाने विचारणा केल्यास ‘इतर कागदपत्राची पूर्तता करा ’ असे सांगण्यात येते. वास्तविक ही कार्यालयीन जबाबदारी आहे. सर्व तालुके, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास द्वारे जिल्हा प्रगत करण्याची जबाबदारी दिलेली आहे. पगार वेळेवर होत नसल्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. हा अन्याय थांबवावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांचे नवीन वर्ष कळसुबाई शिखरावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम राज्यातील अपंगांनी एकत्र येऊन केला.
हा उपक्रम शिवुर्जा प्रतिष्ठाणतर्फे राबवण्यात आला. शिवुर्जा प्रतिष्ठाणचे शिवाजी गाडे यांनी हा उपक्रम आखला होता. ही मोहीम सकाळी सात वाजता सुरू झाली व अकरापर्यंत वाजेपर्यत शिखरावरून येत परतीचा प्रवास अवघ्या तीन तासात पूर्ण केला. आलेल्या पर्यटकांनाही या शिखराबाबत धार्मिक व ऐतिहासिक बाबींचे महत्त्व सांगून मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत शिवाजी गाडे (पैठण), संदीप राऊत (वैजापूर), विशाल खुळे (अकोला), विकास सकपाळ (मुंबई), राहुल घोलप (संगमनेर), सोमेश्वर आहेर (पैठण), तुकाराम मतसागर (वैजापूर), रामेश्वर पेहरकर (वैजापूर) नामदेव बांडे (अकोले), आदी नऊअपंगांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑरिक’साठी २०१८ फलदायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवे वर्ष ऑरिक सिटी स्मार्ट इंडस्ट्र‌िअल टाउनशिपसाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. ऑरिकसाठी २०१५-२०१६मध्ये ठरवण्यात आलेली सर्व कामे २०१८च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. रस्ते, पाणी, वीज, रेल्वे उड्डाणपूल आणि इंटरनेट जोडणीच्या कामांचा त्यात समावेश आहे. ही कामे दोन-तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. २०१८पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होऊन, त्यानुसार येथे होत असलेल्या सुविधांचे मार्केटिंग करून उद्योग उभारणीस, मोठा प्रकल्प आणण्यास फायदा होईल, असे मानले जात आहे.

ऑरिक सिटी अर्थात इंडस्ट्र‌िअल स्मार्ट सिटीची गेल्या दोन-तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे, पण नेमके काय सुरू आहे. किती कामे झाली, याविषयी उत्सुकता असते. औरंगाबाद इंडस्ट्र‌िअल टाउनशिप लिमिटेडचे (एआयटीएल) महाव्यवस्थापक गजानन पाटील म्हणाले, ‘देशातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक सिटीचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. ऑरिक सिटीत गुंतवणूक करण्यासाठी २०१८पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. ऑरिक सिटीतील कामासंबंधी आढावा सातत्याने घेण्यात येतो. कामांची पाहणी करण्यात येते. हा औद्योगिक प्रकल्प सुमारे ८० चौरस किलोमीटरवर उभारण्यात येणार आहे. दोन भागांमध्ये प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिला भाग सुमारे ४० चौरस किलोमीटरचा आहे. ऑरिकचा पहिला टप्पा शेंद्रा येथे आठ चौरस किलोमीटरवर असून, त्याचे काम २०१८पर्यंत पूर्ण होणार आहे.’

जमिनीची किंमत आणि पायभूत सोयीसुविधांसाठी ११ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात सुमारे ११ अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणुकीची क्षमता अाहे. पूर्णपणे विकसित झाल्यावर सुमारे तीन लाख ३० हजार उच्च कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. ऑरिक सिटीत ४२ टक्के पाण्याचा फेरवापर केला जाणार आहे. त्याचेही काम सुरू आहे. ऑरिक सिटीत उड्डाणपूल, रस्ते, पाण्याच्या वाहिन्या, सांडपाण्याचा फेरवापराचा प्रकल्प अशी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे २०१८मध्ये पूर्ण होतील.

‘ऑप्टिक फायबर’मधून मिळणार उत्पन्न
औरंगाबाद ः ऑप्ट‌िक फायबरचे जाळे ऑरिक सिटीच्या उत्पन्नाचा स्त्रोत ठरणार आहे. हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवणारे जाळे भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय ऑरिकची उभारणी करणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्र‌िअल टाउनशिप लिमिटेडने (एआयटीएल) घेतला आहे.

शेंद्रा येथे उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधांचा भाग म्हणून हायस्पिड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी ऑप्टिक फायबर नेटवर्क तयार करण्यात येत आहे. यातून टेलिकम्युन‌िकेशन, इंटरनेट आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेंद्रा येथे ऑप्टिक फायबर लाइन टाकण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ही लाइन भाडेपट्ट्यावर देऊन त्यातून उत्पन्न मिळावे म्हणून देशातील टेलीकॉम कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली आहे. त्यातून नेमके किती उत्पन्न मिळणार याचा अंदाज अद्याप ऑरिकच्या संचालकांना नाही. त्यामुळे त्यातून टेलिकॉम कंपन्या किती महसूल देतील याबाबत विचारणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यावार निर्णय होण्याची शक्यता आहे.

ऑरिक सिटीचे काम २०१८पर्यंत ठरलेल्या वेळेत होणार आहेत. याचे विविध टप्पेही आहेत. पहिला टप्पा यावर्षी पूर्ण होईल. सुमारे दहा हजार एकर जमिनीवर विकसित करण्यात येत असलेल्या प्रकल्पात उद्योग, व्यावसाय, निवासी क्षेत्रासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्यामुळे उद्योगांसाठी ऑरिक सिटी वरदान ठरणार आहे.
- गजानन पाटील, महाव्यवस्थापक, ऑरिक सिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर वाढली चेंगराचेंगरीची भीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई येथील एल्फिन्‍स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर घडण्याची शक्यता आहे. फलाट क्रमांक दोनवरील सरकता जिन्यावर शनिवारी (३० डिसेंबर) चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या घटनेत तीन ते चार प्रवासी जखमी झाले.
रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर सिकंदराबादहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आली. देवगिरी एक्स्प्रेसचे प्रवासी अनेक प्रवासी सरकत्या जिन्याच्या वापर करतात. सरकत्या जिन्यावरून काही प्रवासी जात होते. त्यावेळी काही महिला जिन्यावर जाण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला तोल जाऊन पडाली. तिला वाचवण्यासाठी इतर महिला धावल्या. त्या महिलाही सरकत्या जिन्यावर पडल्या. या महिलांसोबत लहान मुलेही होती. यावेळी अनेकांना सरकता जिना बंद करण्याची माहिती नव्हती. काही प्रवाशांनी सरकता जिना बंद करून इतर प्रवाशी पडू नयेत, यासाठी धाव घेतली. तोपर्यंत तीन ते चार प्रवाशांच्या डोक्याला, तर काही प्रवाशांना मुकामार लागला. विशेष म्हणजे या प्रकाराची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना नव्हती. आमदार इम्तियाज जलील यांनी रेल्वेचे डीआरएम त्रिकालज्ञ राभा यांच्याशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. ही घटना गंभीर असल्याने डीआरएम राभा यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन आमदारांना दिले.

आईला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेलो होतो, त्यावेळी हा प्रकार घडला. प्रसंगवधान राखत मी व अन्य प्रवाशांनी लहान मुले व इतर प्रवाशांना रोखून धरले व सरकता जिना बंद केला. जिना बंद केला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
-अहेमद जलील, व्यवस्थापक, जेट एअरवेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साई केंद्रात लवकरच सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सिंथेेटिक टर्फ फुटबॉल मैदान उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उभारणीसाठी साडेसहा कोटींपेक्षा अधिक निधी अपेक्षित आहे. स्टील स्विमिंग पूल आणि अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान यांच्या उद्घटनप्रसंगी फुटबॉल मैदानाची घोषणा अपेक्षित आहे.

साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राकडे १०१ एकर आणि सात गुंठे जमीन असल्याने सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान उभारण्याच्या प्रस्तावाला खेलो इंडिया-स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर योजनेतून मंजुरी देण्यात आली. नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनपीसीसी) या संस्थेला फुटबॉल मैदान उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. फुटबॉल मैदान उभारणीसाठी किमान सहा कोटी ७१ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्हा; तसेच मराठवाड्यात सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदानाची सुविधा उपलब्ध नसल्याने या प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात नव्यानेच हॉकी टर्फ मैदान उभारण्यात येत आहे. या मैदानालगतच असलेल्या जागेवर सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदान उभारण्यात येणार आहे. फुटबॉल मैदान, ड्रेनेज सिस्टिम, फूटपाथ, फेन्सिंग आणि चेजिंग रुम या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सहा कोटी ७२ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ‘फिफा’ संघटनेच्या नियमानुसार हे मैदान उभारण्यात येणार आहे.

फुटबॉल ट्रेनिंग सेंटर
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोलकात्ता आणि औरंगाबाद या दोन शहरांमध्ये फुटबॉल ट्रेनिंग सेंटर उभारण्याचे जाहीर केले आहे. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर म्हणाले, ‘सिंथेटिक टर्फ फुटबॉल मैदानाची सुविधा मराठवाड्यात कुठेही नाही. या मैदानाच्या उभारणीमुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील फुटबॉल खेळाला चालना मिळणार आहे. औरंगाबादेत फुटबॉलचे चांगले वातावरण आहे. शिवाय हवामानही पोषक आहे. फुटबॉल मैदान आणि ट्रेनिंग सेंटरमुळे ज्युनिअर, सिनिअर फुटबॉल संघांची शिबिरे या ठिकाणी नियमित होतील. सध्या साई केंद्रात ‘डे-बोर्डिंग’ आणि ‘कम अँड प्ले’ योजनेत अनेक खेळाडू नियमित सराव करीत आहेत. फुटबॉल मैदान उभारणीनंतर त्यात मोठी वाढ होऊ शकेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील गणोरी येथील बाळ आमराई ते येसगाव फाटा रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपासून बंद आहे. काम बंद असल्याने उघड्या पडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम बंद असल्याबद्दल गावकऱ्यांनी विचारणा केली असता आधी पाऊस व नंतर निधी नसल्याचे कारण सांगितले होते. हा काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी आहे.
चौका ते गणोरी रस्त्यावरील गणोरी बाळआमराई ते येसगाव फाटा या साडेपाच किलोमीटर अंतराचे रुंदीकरण व खडीकरण होऊन सात ते आठ महिने उलटले आहेत. खडीकरणानंतर अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या कामाचे दोन भाग करून दोन एजन्सीला काम दिलेले आहे.संपूर्ण साडेपाच किलोमीटर अंतरासाठी दोन कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याचे भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिरपूजनानंतर रुंदीकरणाचे काम हाती घेतले तेव्हा रस्त्याकडेच्या शेतात पीक होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी एवढे पीक घेऊ द्या, अशी विनंती अधिकारी व कंत्राटदाराला केली होती. निर्ढावलेले अधिकारी व कंत्राटदारांनी त्यावेळी दया न दाखवता उभ्या पिकात जेसीबी चालवला, पाइप उखडून टाकले. पण, रुंदीकरण व डांबरीकरणानंतर काम बंद पडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१७ ही मुदत होती.

वाहनांचे नुकसान

या रस्त्यावरून वाहने चालवताना खडी उडत आहे. त्यामुळे इतर वाहनांचा पत्रा चेपत आहे. खडीकरणाचे काम मे २०१७ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी पाऊस सुरू होण्यापूर्वी महिनाभरात डांबरीकरण शक्य होते. पण, पावसाळ्याचे कारण सांगून काम थांबवण्यात आले.

अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद पडले आहे. जागोजागी खडी उघडी पचली आहे. त्यामुळे खडी उडून वाहनांचे नुकसान होत आहे. काही वाहन पंक्चर होत आहे. त्यामुळे डांबरीकरण लवकर होणे गरजेचे आहे.
-राजीव जाधव, ग्रामस्थ

आतापर्यंत झालेल्या कामाचे देयक कंत्राटदारास मिळालेले नसल्याने काम बंद आहे. देयक मिळेल त्यानुसार कंत्राटदाराकडून काम पूर्ण करून घेता येईल.
-संजय चौधरी, कनिष्ठ अभियंता, पीडब्ल्यूडी

रस्त्याचे काम कंत्राटदाराने निधीअभावी बंद केले आहे. त्यांना लवकरच निधी मिळेल व लवकरच काम सुरू करण्यात येईल.
-अशोक ससाणे, उपअभियंता, पीडब्ल्यूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी महासंघ ‘हायटेक’

$
0
0

औरंगाबादः एकूण ७२ संघटनांची शिखर संघटना म्हणून ओळखल्या जाणारा जिल्हा व्यापारी महासंघाने काळासोबत कात टाकली असून, तो तंत्रज्ञानासोबत हायटेक झाला आहे. व्यापाऱ्यांनी लाल चोपडी, तक्के मुनीमजीच्या साच्यातून बाहेर पडत mahasangh अॅप व महासंघाची www.ajvm.co.in ही वेबसाइट तयार केली आहे.
व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा, सचिव राजन हौजवाला आणि त्यांच्या टीमने वेबसाइट आणि अॅप तयार करण्यासाठी ‘सेव्हन हायवे’ या वेबसाइट डिझायनर कंपनीला काम दिले. या कंपनीचे निखिल भालेराव आणि स्वप्नील खरे यांनी ही वेबसाइट तयार केलीआहे. ‘एजीव्हीएम’ या शार्ट फॉर्मने प्रसिद्ध असलेल्या महासंघाची वेबसाइटही त्यामुळे त्याच नावाने तयार केली आहे. या नव्या माध्यमातून आता संवाद, व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यापूर्वी महासंघाचे कार्यक्रम पदाधिकाऱ्यापर्यंत मर्यादित राहत होते. आता ७२ संघटनांचे पदाधिकारीही या संघाशी संलग्न झाले आहेत. अॅप्स आणि वेबवाइटद्वारे व्यापाऱ्यांची नोंदणी वाढवली जाणार आहे. आज छोटे-मोठे असे दोन्ही व्यापारी मिळून ५० हजारांहून अधिक व्यापारी शहरात आहेत. या अॅप्स आणि वेबसाइटद्वारे महासंघ आपली नोंदणी वाढवण्यावर भर देणार आहे. व्यापारी महासंघाची वेबसाइट संपूर्णतः त्यांचेच स्वारस्य दाखवणारी, विकास करणारी आणि पर्यायाने शहराचे ‘स्पीड ऑफ ट्रॅँझॅक्शन’ वाढवणारी ठरणार आहे.यात आजी, माजी पदाधिकारीवर्गाच्या कार्याची माहिती, त्यांचे नाव, फोन नंबर, विविध मीडियातील बातम्या, व्हिडिओ आहेत. याचे लॉँचिंग २०१८ ते २०२० पर्यंतच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीदरम्यान करण्यात आले.

आम्ही ही वेबसाइट तीन वर्षांपासून करत होतो. यात महासंघाच्या आजी-माजीपदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी पुरवलेल्या माहितीनुसार काम केले आहे. आमच्या सारख्या तरुणांना या मंडळींकडून खूप काही शिकता आले.
- निखिल भालेराव, वेबसाइट ‌डेव्हलपर

वेबसाइट तयार करताना परंपरा, वारसा जपत आधुनिकता कशी देता येईल, याकडे लक्ष दिले. व्यापारी वर्गांच्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. अजून ही वेबसाइट पुन्हा अपडेट करू. आजी-माजी पदाधिकारींचे मार्गदर्शन घेत राहू.
- स्वप्निल खरे, वेबसाइट डेव्हलपर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वागत २०१८’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुलाबी थंडी पांघरून आलेल्या नव्या वर्षाचे औरंगाबादकरांनी रविवारी जल्लोषात स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत नृत्य, संगीत आणि आकर्षक रोषणाईत रंगलेले कार्यक्रम, रस्त्यांवर गटागटाने दुचाकींवरून फिरणारे तरूण सरत्या वर्षातील चिंता मागे सारून नव्या वर्षाचे स्वागत करा, असा संदेश देत होते.

नव्या वर्षाच्या स्वागकाची तयारी रविवारी सकाळपासूनच सुरू होती. शहरातील पंचतारांकित, तीन तारांकित हॉटेल्स, खाऊ गल्ल्या, प्रोझोनसह अन्य मॉल, सिनेमागृहे रविवारी फुल्ल होते. औरंगाबादकरांच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘गुडबाय २०१७, वेलकम २०१८’ असे फ्लेक्स बोर्ड लावून काही ठिकाणी युवकांनी नववर्षाचे स्वागत केले. काहींनी डीजेच्या ठेक्यावर नृत्य केले. काहींनी हुरडापार्टी करण्याचा बेत आखून बिडकीन, पडेगाव, कुंभफेळ, पैठण या भागांत जाऊन नववर्षाचे स्वागत करणे पसंत केले. काहींनी गावाबाहेर २० ते ३० किलोमीटर लांब भद्रा मारूती, म्हैसमाळ, खुलताबाद, दौलताबाद, सारोळा या भागांत नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम आयोजित केले. ठिकाणी सायंकाळी, तर काही ठिकाणी रात्री बारानंतर आतषबाजीही करण्यात आली.

शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये काही इव्हेंट मॅनेजमेंट संस्थांनी डीजे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्ट्यांना शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. औरंगपुरा, निराला बाजार, कॅनॉट प्लेस, बीडबायपास या परिसरात तरूणाई संध्याकाळीच नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आलेली दिसली.

बीडबायपास बहुतांश लॉन्स आणि रेस्तराँवरही पार्ट्यांचे नियोजन केले गेले. विविध सोसायट्या, उपनगर आणि ठराविक कॉलन्यांमध्ये छोटेखानी व घरगुती पार्ट्यांचे नियोजन झाले.

प्रोझोनमध्ये जल्लोष
प्रोझोन मॉलमध्ये दिवसभर खरेदीला उधाण आले होते. संपूर्ण मॉल नववर्षाच्या स्वागतासाठी सजवण्यात आला होता. याशिवाय संध्याकाळपासून डीजे, गाणी असे उत्साही वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत सर्वत्र मॉलमध्ये खरेदी आणि उत्साह कायम होता.

पोलिसांची तपासणी मोहीम
औरंगाबाद ः नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १७ पोलिस ठाण्यांतर्गत विविध भागात नाकाबंदी करण्यात आली. ‘ऑल आउट ऑपरेशन’अंतर्गत राबवण्यात आलेल्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेत शहरातील विविध चौकात पोलिसांकडून वाहधारकांची तपासणी करण्यात आली.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मध्यरात्री तरुणाई शहराच्या विविध भागातील रस्त्यावर उतरली असताना पोलिस यंत्रणाही दक्ष होती. रविवारी रात्री आठपासून शहरातील निराला बाजार, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, क्रांतीचौक, उल्कानगरी, रोपळेकर चौक, सुतगिरणी चौक, अण्णाभाऊ साठे चौक, नगर नाका यासह इतर ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमसीएन युवक महोत्सवाचे आयोजन

$
0
0

औरंगाबादः जागतिक युवा दिनानिमित्त युवकांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हॅथवे एमसीएनने युवक महोत्सव आयोजित केला आहे. ११ ते १३ जानेवारी या कालावधीत महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे मीडिया पार्टनर ‘महाराष्ट्र टाइम्स’ आहे.
संत एकनाथ रंगमंदिरात ११ जानेवारीला सकाळी दहा वाजता वीरेंद्रसिंह पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर गायन, नृत्य स्पर्धा आणि फॅशन शो होईल. तर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते सायंकाळी पारितोषिक वितरण होणार आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्रात १२ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता कव्वाली, सुफी कलाम, गझल यांचा मिलाफ असलेला कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध कव्वाल अब्दुल रशीद साबरी, इरम चिस्ती व अफरोज अली सादरीकरण करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनांवर आधारीत संगीतमय कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होईल. तापडिया नाट्यमंदिरात १३ जानेवारीला रात्री आठ वाजता कार्यक्रम होईल. गायिका कल्याणी देशपांडे-जोशी यांचे गायन व स्वप्नील जोशी यांचे निरूपण असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. यावेळी साहित्य क्षेत्रातील मराठवाडा युवा आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या महोत्सवाला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक देव शेजूळ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images