Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मीटरजप्तीचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीज बिलाची दहा हजार रुपयांवर बाकी असलेल्या चार हजार ग्राहकांचे मीटर जप्त करून, त्यांचे कनेक्‍शन कट करण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली.
औरंगाबाद शहरात रहिवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांची एकूण संख्या दोन लाख ६८ हजार इतकी आहे. या वीज ग्राहकांमध्ये एक लाखांवर बिल असलेल्या ग्राहकांवर महावितरण कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर महावितरण कार्यालयाने दहा हजार रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकित वीज ग्राहकांकडून बिलाची वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे.
औरंगाबाद शहरात १७ हजार ७८९ वीज ग्राहकांकडे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक बिल बाकी आहे. त्यांच्याकडे सुमारे ९५ कोटी सात लाख रुपये थकित आहेत. या वीज ग्राहकांकडून बिलाची वसुली करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. या कारवाईनंतर ४९४५ वीज ग्राहकांकडून दहा कोटी ७८ लाख रुपये वसूल केले आहेत. या कारवाईत ९३० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या वीज ग्राहकांकडे पाच कोटी ५१ लाख रुपये वसुली बाकी आहे. याशिवाय दहा हजार रुपये बिल बाकी असूनही ते न भरणाऱ्या ४५०७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आले आहे. या वीज ग्राहकांकडे ४२ कोटी रुपयांची बिल थकित आहे.

सात हजारांवर ग्राहक बाकी
दहा हजार रुपये बाकी असलेल्या दहा हजार थकबाकीदार वीज ग्राहकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत सात हजार वीज ग्राहकांवर येत्या काही दिवसांत कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणने सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मोमबत्ता’तील बोटिंगसाठी पुन्हा निविदा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटकांसाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या मोमबत्ता तलावात बोटिंग सुरू करण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले, पण पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. एकमेव एजन्सीला काम देण्याला विरोध झाल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१८मध्ये तरी बोटिंग सुरू होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या मोमबत्ता तलावात बोटिंग सुरू करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी सव्वाकोटी रुपये मंजूर केले. मार्च २०१५मध्ये ही मंजुरी मिळाली. २१ मार्च रोजी सर्वसाधारण सभेने त्यास मान्यता दिली. मार्चअखेर आलेला निधी दहा दिवसांत खर्च होणे अवघड होते. त्यामुळे प्रशासनाने राज्याच्या अर्थ खात्याकडे पुढील आर्थिक वर्षात हा निधी खर्च करण्याची परवानगी मागितली. त्याला मान्यता मिळाली नाही. दरम्यान, २०१६मध्ये तलाव परिसरात काही बांधकाम सुरू करण्यात आले. बोटिंग, सौंदर्यीकरण, पर्यटकांना अन्य सुविधा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यात मुंबईसह काही ठिकाणाहून एजन्सी सहभागी झाल्या. यापैकी एकानेही तांत्रिक अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया बारगळली. त्यानंतर मोमबत्ता तलावातील बोटिंग स्वप्नच राहते की काय, अशी भीती निर्माण झाली.
दरम्यान, प्रशासनाने बांधकाम व अन्य सुविधा करण्यासाठी ६० लाख रुपये खर्च केले. त्यात तिकिट खोली. तलावाच्या पायऱ्या, स्वच्छतागृहे उभारली. बांधकाम होऊन वर्ष उलटून गेले तरी ते हस्तांतरित करून घेण्यास जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग अद्याप तयार नाही. अशातच बोटिंगसाठी स्वतंत्र प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केला. त्यात एजन्सींकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यात संबंधित एजन्सीने बोटिंग व अन्य सुविधा पुरवाव्यात आणि जिल्हा परिषदेला महिन्याला ठराविक रक्कम द्यावी, असे ठरले होते. या आवाहनाला एकाच एजन्सीने प्रतिसाद दिला. या एजन्सीकडून जिल्हा परिषदेला दर महिन्याला २१ हजार रुपये मिळणार होते. या एजन्सीकडून दोन मोटारबोट आणि पाच पॅडलबोट पर्यटकांना उपलब्ध करून दिले जाणार होते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ डिसेंबरपासून बोटिंग सुरू केले जाईल, अशी घोषणा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती, पण नेमकी पुन्हा अडचण झाली. प्रशासनाला संबंधित एजन्सीकडून २१ हजारांपेक्षा अधिकच्या निधीची अपेक्षा होती, पण त्यात तोडगा निघाला नाही.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत निविदा प्रक्रिया निकोप स्पर्धेने राबविली नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. आलेल्या एकमेव एजन्सीला कशी काय मान्यता दिली गेली, आदी प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे प्रशासनाने यावेळीही बोटिंगचा निवडलेला पर्याय रद्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमबत्ता तलाव बोटिंगची प्रक्रिया पुन्हा एकदा राबविली जाणार आहे. आता या प्रक्रियेला पुन्हा महिना, दोन महिन्याचा कालावधी लागेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया राबविली जाईल. एकंदर आजवरचा इतिहास पाहता नजीकच्या काळात बोटींग सुरू होणे अवघड आहे.

सर्वसाधारण सभेत झालेल्या मागणीच्या अनुषंगाने मोमबत्ता तलावात बोटींगसाठी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर मॅरेथॉन स्पर्धा संशयाच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐनवेळचा ठराव घेऊन महापालिकेने महापौर चषक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ऐनवेळी घेतलेल्या या ठरावानुसार स्पर्धेसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली, पण महापालिकेने मंजूर केलेले पैसेच दिले नाहीत. मग सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या ठरावातील खर्चाचे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रीडा भारतीची ढाल करून महापालिकेने मॅरेथॉनचा गैरव्यवहार केला की काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे स्वीकृत सदस्य कचरू घोडके यांनी ऐनवेळचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाचा क्रमांक १२५३ आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की,‘क्रीडा भारती या संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे; तसेच २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा मानस आहे. या स्पर्धेत साधारणतः पाच हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेसाठी साधारणतः चार लाख १५ हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. महापालिका व क्रीडा भारती यांच्यातर्फे २७ ऑगस्ट २०१७ रोजी महापौर चषक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याबाबत; तसेच त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेस्तव सादर.’
या प्रस्तावाचे अनुमोदक दिलीप थोरात, शिवाजी दांडगे, गजानन बारवाल, नासेर सिद्दिकी, भाऊसाहेब जगताप हे आहेत. तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी हा प्रस्ताव मंजूर देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार मॅरेथॉन स्पर्धा झाली, पण त्यातील महापालिकेच्या आर्थिक सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह आहे. महापालिकेने कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याची माहिती हाती आली आहे. महापालिकेने मदत केली नसेल, तर सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या खर्चाचे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापौर चषक मॅरेथॉन स्पर्धा झाली आहे. स्पर्धा झाली त्या दिवशी मी औरंगाबादेत नव्हतो. त्यामुळे स्पर्धेत किती विद्यार्थी सहभागी झाले होते, किती खर्च करण्यात आला, याबद्दल मला काहीच सांगता येणार नाही. प्रस्ताव मंजूर केला, पण त्या स्पर्धेला महापालिकेची काही मदत झाली नाही.
- कचरू घोडके, स्वीकृत सदस्य, महापालिका.

क्रीडा भारतीतर्फे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. सुमारे एक हजार विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. साई पश्चिम विभागीय क्रीडा केंद्र ते बीबी का मकबरा अशी ही स्पर्धा झाली, पण या स्पर्धेत महापालिकेचा काहीच सहभाग नव्हता. आम्हीच ही स्पर्धा पार पाडली.
- उदय कहाळेकर, क्रीडा भारती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सागर, आदित्य आयडल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अत्यंत चुरशीच्या मारवाडी आयडल सीजन दोन गायन स्पर्धेमध्ये सागर बोरा विजेता ठरला, तर लहान गटात आदित्य जसोरियाने बाजी मारली.
‘देवा तुझ्या दारी आलो...’ गाणे गात सागरने सर्वांना वेड लावले. तर ‘पापा कहते है बडा नाम करेगा...’ म्हणत आदित्यने सर्वांचे लक्ष वेधले. सकल मारवाडी युवा मंचतर्फे संत तुकाराम नाट्यगृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत युवा मंच, सारा बिल्डर्स, भारूका कन्स्ट्रक्शन, बुलढाणा अर्बन कॉ. क्रे. सोसायटी यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सारा बिल्डर्सचे सीताराम अग्रवाल, भारूका कन्स्ट्रक्शनचे राजेश भारूका,बुलढाणा अर्बन कॉ.क्रे.सोसायटीचे सुकेश झंवर, मंचचे महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष सुनील खाबिया,युवा मंचचे अध्यक्ष आशिष अग्रवाल व सचिव अमित भोमा,मारवाडी मिडटाऊनच्या अध्यक्ष सुप्रिया सुराणा, कन्नड मिडटाऊनच्या अध्यक्ष कीर्ती भारूका उपस्थित होत्या. मारवाडी समाजातील गायकांना व्यासपीठ मिळावे यासाठी सर्व १७ समाजातील सर्व वयोगटासाठी स्पर्धा घेण्यात येते. औरंगाबादसह लातूर, बीड,गंगाखेड, परभणी,माजलगाव,परतूर, जालना,नांदेड, सिल्लोड, कन्नड आदी ठिकाणांहून स्पर्धेस प्रतिसाद मिळाला. अंतिम फेरीमध्ये मोठ्या गटात २५ तर लहान गटात ८ स्पर्धक होती. १४ वर्षांखालील गटात आदित्य जसोरिया विजेता ठरला. तर अन्यना करवा द्वितीय विजेती व सुदर्शन अबोटी याला उत्तेजधार्थ पारितोषिक मिळाले. १४ वर्षांवरील गटात सागर बोरा विजेता ठरला. भक्ती राठी दुसऱ्या, कृष्णा धूत तिसऱ्या स्थानी आले. ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, पंडित विश्वनाथ दाशरथी व हर्षिद अभिराज परीक्षक होते.
सागर बोरा याला २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह तर आदित्यला ११ हजार रोख व अन्य बक्षीस देण्यात आले. पहिली मारवाडी आयडल विशाखा राठी हिने ‘सत्यम शिवम सुंदरम...’गाणे गायले. मंचचे माजी अध्यक्ष संजय मंत्री, आशिष मेहता, अमोल लढ्ढा,संतोष तिवारी,नंदकिशोर मालपाणी, अॅड. जोगिंदरसिंह चौहान, नितीन भक्कड, विशाल दुग्गड, नंदकिशोर मालपाणी प्रकल्पप्रमुख होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉक टाइम : प्रत्येक जिल्ह्यात आयुष रुग्णालय

$
0
0

भारतातील प्राचीन चिकित्साशास्त्रांचा प्रसार जगभरात करण्यासाठी संशोधनावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत असून, ‘एम्स’च्या धर्तीवर देशभरात ठिकठिकाणी राष्ट्रीय संस्था सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी एका संस्थेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच दिल्लीत झाले. प्रत्येक राज्यात आयुर्वेदसह इतर शास्त्रांच्या माध्यमातून कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या संस्था उभ्या करण्यात येणार आहे. त्यासाठीच १२ देशांसोबत ‘एमओयू’ करण्यात आला आहे व प्रत्येक दुतावासामध्ये ‘आयुष’ची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. आयुर्वेद विद्यापीठदेखील सुरू करण्याचा मानस आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील प्रत्येक जिल्ह्यात ५० खाटांचे आयुष हॉस्पिटल उभे करण्यात येणार असून, ७८ हॉस्पिटलला मंजुरीदेखील देण्यात आल्याचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘मटा’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत नमूद केले.

- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून आपण १७२ देशांत योग पोचवला, तेव्हा ‘आयुष’मधील इतर चिकित्साशास्त्रांना पुढे नेण्याचे काही नियोजन आहे का?

- जागतिक योग दिनानिमित्त आज जवळजवळ २०० देशांमध्ये योग पोचवण्यात आयुष मंत्रालयाला यश मिळाले, असे नक्कीच म्हणता येईल. मुळात ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या योगशास्त्रासह आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्धा या प्राचीन चिकित्साशास्त्रांना देशातील अगदी गाव-खेड्यांपासून ते संपूर्ण जगभरात पोचवण्यासाठी आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठीच आयुष मंत्रालयाची स्थापना झाली आहे. तोच प्राचीन भारतीय शास्त्रांचा व तत्वविचारांचा मुख्य गाभा आहे. पसायदान हे काही केवळ भारतीयांसाठी नाही, तर ते संपूर्ण विश्वासाठी व विश्वकल्याणासाठी आहे. त्यामुळेच या प्राचीन शास्त्रांची उपयोगिता आजच्या जगात सिद्ध होण्यासाठी व मूळ उद्देश साध्य होण्यासाठीच संशोधनावर भर देण्यात येत आहे. त्यासाठीच ‘एम्स’च्या धर्तीवर देशभरात ठिकठिकाणी राष्ट्रीयस्तरावरील संशोधन संस्था उभ्या केल्या जाणार आहेत आणि अशाच धर्तीवरील संस्थेचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत झाले. मुंबईत भांडूपमध्येही कर्करोगावर संशोधन करण्यासाठी जागा मिळाली असून, टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने तेथील संस्थेत संशोधन होणार आहे. गोवा व पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ या संस्थादेखील त्याचाच भाग आहेत. संशोधनासाठीच १२ देशांसोबत ‘एमओयू’ही करण्यात आला आहे आणि १५०पेक्षा जास्त दुतावासांमध्ये ‘आयुष’विषयीची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. सद्यस्थितीत संशोधन व पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणे, याला ‘आयुष’ने प्राधान्य दिले आहे. आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही ‘आयुष’ प्रयत्नशील आहे व राज्य सरकारांनी प्रस्ताव दिला तर असे विद्यापीठ उभे राहू शकते. महाराष्ट्र सरकारने असा प्रस्ताव दिला तर महाराष्ट्रातही विद्यापीठ उभे राहू शकेल.

- औरंगाबादच्या ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट’मध्ये ‘आयुष’मार्फत संशोधन होऊ शकते का?

- देशातील प्रत्येक राज्यात आयुर्वेद-होमिओपॅथीसह इतर प्राचीन चिकित्साशास्त्रांच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या संस्था सुरू होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या संस्थेबाबतचा प्रस्ताव दिला तर त्याचा नक्कीच विचार होऊ शकतो.

- ‘आयुष हॉस्पिटल’मध्ये कोणत्या सुविधा असतील?

- देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये ५० खाटांचे आयुष हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व असे देशात सुमारे ६०० ते ६५० आयुष हॉस्पिटल उभे राहणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिद्धा, योगशास्त्र या प्रत्येक चिकित्साशास्त्रांच्या आरोग्य सेवा रुग्णाला दिल्या जातील. यापैकी ७८ हॉस्पिटलना मान्यतादेखील देण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये ४० टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा, तर ६० टक्के केंद्र सरकारचा असेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्येही आयुष वॉर्ड सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

- ‘आयुष’साठी वाढीव बजेट मागितल्याचे समजते…...

- या स्वतंत्र मंत्रालयाची तीनच वर्षांपूर्वी स्थापना झाली व आतापर्यंत संपूर्ण बजेट शंभर टक्के वापरण्यात आले आहे, हे नमूद करावेच लागेल, मात्र अधिकाधिक विस्तारासाठी अधिकाधिक बजेटची गरज असल्यामुळेच १४०० कोटींवरून ५००० कोटींची मागणी करण्यात आली आहे.

- ‘ब्रिज कोर्स’वरून काही संघटनांकडून विरोध होत आहे, त्याविषयी काय वाटते?
-कोणत्याही होमिओपॅथी डॉक्टरने होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस करणे किंवा कोणत्याही आयुर्वेद डॉक्टरने आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करणे योग्य आहे आणि तिच ‘आयुष’ची भूमिका आहे. मात्र ज्या ग्रामीण-दुर्गम भागात अलोपॅथीचा डॉक्टर पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी अलोपॅथीचा ब्रिज कोर्स केलेला ‘आयुष’ डॉक्टर नक्कीच आपत्कालिन सेवा देऊ शकतो, जेणेकरून रुग्णांना तातडीची सेवा मिळेल. एरवी त्या त्या पॅथीच्या डॉक्टरांनी त्या त्या पॅथीचीच प्रॅक्टिस करणे जास्त उचित ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणच्या पालिकेला दहा कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
हिवाळी अधिवेशनात, पैठण नगर पालिकेच्या विविध विकास कामांसाठी मागणी करण्यात आलेल्या दहा कोटी रुपयांचा निधीला मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी दिली.
नगर पालिकेमार्फत विविध विकासकामे करण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून, निधीची मागणी करण्यात आली होती. दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पत्र प्राप्त झाले आहे, असे लोळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागच्या सहा महिन्याच्या कालावधीत राज्य शासनातर्फे जवळपास पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील उर्वरित सर्व प्रमुख रस्ते सिमेंटचे करण्यात येणार आहेत. कोणती विकास कामे करता येतील यासंबंधीच्या सूचना नागरिक व शहरातील विविध संघटनाकडून मागवणार आहोत, अशी माहिती यावेळी नगराध्यक्षांनी दिली.

पैठणचा विकास व्हावा यासाठी आम्ही मागणी केलेला निधी राज्य शासन मंजूर करत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी लोक शहराच्या विकासाला आडकाठी आणत आहे. हे लोक शांत रहिल्यास शहराचा झपाट्याने विकास होणार आहे.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्वेस्ट अकॅडमीतर्फे रविवारी 'क्वेस्ट चॅम्प' परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्वेस्ट अकॅडमीच्या वतीने येत्या रविवारी (२१ जानेवारी) वसंतराव नाईक महाविद्यालयात सकाळी ११ वाजता क्वेस्ट चॅम्प परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीत शिकणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना सिनेतारका सोनाली कुलकर्णी मार्गदर्शन करतील.
क्वेस्ट चॅम्प परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ५० लाख रुपयांपर्यंत पारितोषिके, ११ वी व १२ वीच्या फिसमध्ये भरघोस सूट मिळणार आहे. या परीक्षेसाठी नाव नोंदणी आवश्यक असणार आहे. क्वेस्ट अकॅडमीने पहिल्याच वर्षी 'नीट'मध्ये १५ टक्के तर जेईईमध्ये २७ टक्के निकाल देऊन उच्चांक स्थापित केला आहे. प्रा. शशिकांत चौकटे यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. येत्या रविवारी होत असलेल्या क्वेस्ट चॅम्प परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रा. शशिकांत चौकटे व प्रा. रमाकांत चौधरी यांचे मार्गदर्शन तर मिळणार आहेच शिवाय सोनाली कुलकर्णीशी संवाद देखील साधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरक्षांनी वाचविली ९० जनावरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवैध कत्तलीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतू्क करण्यात येते. अशा अवैध वाहतुकीवर शहरातील गोरक्षा कार्यकर्त्यांची करडी नजर आहे. या कार्यकर्त्यांनी वर्षभरात सुमारे ९० गायी आणि बैलांची सुटका केली आहे. या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे विविध पोलिस ठाण्यांत प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात पूर्वी सिल्लेखाना भागात कत्तलखाना होता. कालांतराने हा कत्तलखाना पडेगाव भागात हलवण्यात आला. कत्तलखाना शहराबाहेर हलवण्यात आल्यानंतरही जुन्या कत्तलखान्याच्या परिसरात अवैध कत्तल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या अनेक कारवायात निष्पन्न झाले आहे. शहरात बाहेरगावावरून देखील कत्तलीसाठी जनावरे आणण्यात येतात. अशा अवैध कारवायावर अंकुश ठेवण्यासाठी गोरक्ष कार्यकर्त्यांनी समिती तयार केली आहे. या समितीने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करीत ९० जनावरांची सुटका केली आहे.

गोरक्षा समितीचे कार्यकर्ते
श्रीनिवास धुप्पड, गौरव धुप्पड, अनुप धुप्पड, रोहित विजयवर्गीय, राजेश जैन, अनंत जोशी, विपूल भारुका, धरम भाई, प्रेम चव्हाण, सुभाष मोकारिया, सचिन राठोड, किरण शर्मा, चंदा राजपूत आणि माधुरी धुप्पड ही मंडळी गोरक्षा समितीचे कार्य करीत आहे

पोलिस ठाण्यांत दाखल गुन्हे
तारिख.................पोलिस ठाणे......जनावरे
१ डिसेंबर २०१६......क्रांतीचौक...........४
१२ डिसेंबर २०१६.....क्रांतीचौक...........२
२२ डिसेंबर २०१६.....वाळूज................१७
२३ एप्रील २०१७.......क्रांतीचौक...........८
३ मे २०१७..............सातारा...............१६
८ जुलै २०१७............हसुर्ल.................७
२० सप्टेंबर २०१७......क्रांतीचौक...........२
२० नोव्हेंबर २०१७......वाळूज...............९
२५ नोव्हेंबर २०१७......हर्सूल.................९
७ जानेवारी २०१८......छावणी..............१०
८ जानेवारी २०१८......फुलंब्री...............२१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस व्हा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वृद्धांची शारीरिक, मानसिक, भावनिक काळजी घेऊन त्यांना आनंदी व उत्साही ठेवणे म्हणजे ‘जेरीअँट्रिक केअर’. यावर आधारित अभ्यासक्रमाने रोजगार तर मिळतोच, पण ज्येष्ठांचे आशीर्वादही मिळतात. या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केले. ते डॉ. हेडगेवार रूग्णालयाच्या दामुअण्णा दाते सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
उद्योजिका मोहिनी केळकर, टाटा सामाजिक संस्थेचे डॉ. नसरीन रुस्तोम्फ्राम यावेळी उपस्थित होत्या. आस्था फाउंडेशन, औरंगाबाद, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे व टाटा सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येतो. यावेळी अभ्यासक्रमाच्या पाचव्या बॅचचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मोहिनी केळकर यांनी प्रशिणार्थींना प्रमाणपत्र दिले. उपस्थितांशी संवाद साधताना केळकर म्हणाल्या, ‘आजच्या पिढीकडे वेळ नसला तरी यातून मार्ग निघू शकतो, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत गैरसमज करू नये.’ तर डॉ. नसरीन यांनी अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले. ‘कुटुंबव्यवस्था मजबूत असली तरी बरेचदा मुल ज्येष्ठ नागरिकांना वेळ देत नाही. हे प्रशिक्षण नक्कीच उपयोगी आहे,’ असे त्या म्हणाल्या. अभ्यासक्रमासाठी हेडगेवार रुग्णालयाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे सर्व मदत करण्यात येते. शैला मोहनपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. गीता संवत्सर यांनी आभार व्यक्त केले.

फेब्रुवारी महिन्यात सहावी बॅच

ज्येष्ठ नागरिक सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या सहाव्या बॅचची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. अभ्यासक्रम मोफत असून शैक्षणिक पात्रता किमान दहावी असावी लागते. चार महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रमाणपत्र मिळते. १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना यासाठी प्रवेश मिळतो. आतापर्यंत ५८ व्यक्तींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून, ते वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहेत. अभ्यासक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जयंत सांगवीकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रताप चौकातील सोन्याच्या दुकानात चोरी

$
0
0

वाळूज महानगर: बजाजनगर येथील प्रताप चौकातील महावीर ज्वेलर्सच्या शटरचे कुलूप तोडून बुधवारी रात्री उशिरा चोरी झाल्याची घटना घडली आहे. महावीर मधुकर धुमाळे यांच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ३० ते ३५ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने गायब झाले आहेत.
धुमाळे हे बुधवारी साडे नऊ वाजता दुकान बंद करून वर्धा येथे नातेवाईकाकडे गेले होते. त्यांचे कारागीर अंबिलवादे हे गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी ही माहिती फोनवरून मालकाला दिली. धुमाळे यांचा पुतण्या सुशील यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्यासोबत पाहणी केली असता ड्रावरमधील दागिने गायब झाल्याचे दिसले. दुकानातील दोन तिजोऱ्या सुरक्षित आहेत. त्यामुळे मोठी चोरी टळली. मात्र गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक कसबे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी कॉन्स्टेबल स्वामी अखेर बडतर्फ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिव्हॉल्वर गहाळ प्रकरणातील मद्यपी पोलिस कॉन्स्टेबल अमित स्वामी याला पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दोन आठवडे होत आले असले तरी पोलिसांना गहाळ झालेल्या रिव्हॉल्वरचा शोध लागलेला नाही.
पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल स्वामी याचे शासकीय रिव्हॉल्वर व दहा जिवंत काडतूस ६ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता गहाळ झाले. दोन मद्यपी मित्रांसोबत त्याचा आकाशवाणी चौकात रिक्षाचा अपघात झाला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेच्या दोन दिवसांनी अमित स्वामीला निलंबित केले होते. कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवून त्याला दोन दिवसांपूर्वी बडतर्फ करण्यात आले आहे. स्वामी व त्याच्या मित्राकडे कसून चौकशी केल्यानंतरही रिव्हॉल्वरचा शोध लावण्यात अपयश आले आहे.

दबावाचा प्रयत्न

अमित स्वामी हा मूळ सोलापूरचा रहिवासी आहे. निलंबित करताना त्याला बडतर्फीचा इशाराही देण्यात आला होता. शासकीय रिव्हॉल्वर कोठे गहाळ झाले याची माहिती नसल्याचे सांगून त्याने हात वर केले आहे. त्याच्याकडून तपासात सहकार्य मिळात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान रिव्हॉल्वर चोरीप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होणार असून त्यात स्वामीला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निलंबन रद्द करावे यासाठी स्वामी याने एका मंत्र्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिका क्षेत्रात ८८ टक्के शौचालये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा भाग असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात आतापर्यंत ८८ टक्के शौचायले बांधण्यात आली आहेत.
ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागामध्येही स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वेगाने काम होत आहेत. जिल्ह्यातील खुलताबाद आणि फुलंब्री नगरपालिका क्षेत्रात शौचालयांचे बांधकाम शंभर टक्के पूर्ण करण्यात आले आहे. प्रशासनाने जिल्ह्यात वर्षभरात १४ हजार १०१ शौचालये बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी आतापर्यंत १२ हजार ४५१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये पैठण नगरपालिकेत २४२४, सिल्लोड ३२९५, खुलताबाद ८२३, कन्नड ११००, गंगापूर १५३१, वैजापूर २१३०, फुलंब्री ४७५ व सोयगाव नगरपालिकेअंतर्गत ६७३ शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्ण झालेल्या बांधकामांपैकी ११ हजार ८५८ शौचालयाचे फोटो अपलोड करण्यात आले असून याची टक्केवारी ९५.२२ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

९३ ओडी स्पॉट निष्काषित

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील शौचालय बांधकामांसोबतच उघड्यावर शौचास बसणारे (ओडी स्पॉट) निष्कासित करण्याची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ९३ स्पॉट नि‌ष्कासित करण्यात आले आहेत. सर्वाधिक २१ ओडी स्पॉट पैठण नगरपालिका क्षेत्रात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीमधील रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाजार समितीमधील रस्ते ३० मीटरचे करावेत, अशी एकमुखी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यावर सभापती व व्यापाऱ्यांनी चर्चा करून रस्ते २४ मीटरचे करण्याचे ठरवले आहे. त्याबद्दलचा प्रस्ताव पणन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात व्यापारी व बाजार समिती प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या बाजार समितीमध्ये जळगाव रस्त्यावरून वाद सुरू आहे. त्यासोबतच अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात बाजार समितीत येणारी जड आणि मोठी वाहने येण्यास त्रास होवू नये याकरिता ३० मीटरचे रस्ते करावेत, अशी मागणी आहे. सध्या १८ मीटरचे रस्ते असून एकमेव मुख्य रस्ता २४ मीटरचा आहे. जडवाहनांना अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडचण येऊ शकते, त्यामुळे रुंदी वाढवण्याची मागणी आहे. या बैठकीला सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती ठोंबरे, सचिव विजय शिरसाठ यांच्यासह २० व्यापारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान वेतनासाठी सिडकोत सफाई बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
किमान वेतन कायद्यानुसार वेतनाच्या मागणीसाठी बचत गटांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक काम बंद आंदोलन केले. यामुळे सिडको, हडकोमधील साफसफाईचे काम काही तास बंद पडले. महापौर व आयुक्तांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सिडको, हडको भागात १३ बचत गटांमार्फत साफसफाई केली जाते. या गटांचे ३५२ कर्मचारी असून ते २००९ पासून काम करतात. एका कर्मचाऱ्याला रोज २८९ रुपये वेतन दिले जाते. महिन्यातल्या चार साप्ताहिक सुट्ट्यांचा पगार दिला जात नाही. त्यामुळे त्यांना २६ दिवसांचाच पगार मिळतो. किमान वेतन कायद्यानुसार हा पगार कमी आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार वेतनाची मागणी आहे.
या मागणीवर बुधवारी बचत गटांचे प्रतिनिधी, कामगार संघटनेचे नेते आणि महापौर-आयुक्त यांच्यात चर्चा झाली होती. किमान वेतन कायद्यानुसार वेतनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर केला असून त्याची अंलबजावणी करावी, असे सांगण्यात आले होते. पण, योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन महापौर-आयुक्तांनी त्यांची बोळवण केली होती. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन केल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांना दखल घेणे भाग पडले. महापौरांनी सिडकोत जावून त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर जमा होऊन घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर बचत गटांचे प्रतिनिधी, कामगार नेते यांच्यासोबत महापौर दालनात चर्चा करण्यात आली. यावेळी महापौरांसह सभागृहनेते विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कामगार नेते गौतम खरात उपस्थित होते.

३० लाखांचा बोजा

सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. किमान वेतन कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना पगार दिल्यास पालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला तीस लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगिनिंनो उद्योग संधी ओळखा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘उद्योग करण्यापुरते स्वतः ला मर्यादित न ठेवता उद्योगाच्या विविध संधी ओळखा,’ असे आवाहन महाराष्ट्र हस्तकला प्रमुख अलका मांजरेकर यांनी केले. त्या स्टार्टअप उद्योगिनींच्या हळदी कुंकू कार्यक्रमात बोलत होत्या.
‘आम्ही उद्योगिनी’ ग्रुपतर्फे महिलांना उद्योगांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ऑरगॅनिक अँब्रेला अँड न्युट्री फुड्स दुकानासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अलका मांजरेकर यांनी महिलांना उद्योगातील विविध क्षेत्रांची ओळख करून देताना अन्नप्रक्रिया, हस्तकला, पैठणी उद्योगातील संधीची माहिती सांगितली. संघटनकौशल्याचे महत्त्व सांगितले. शासकीय स्तरावरचे लघुउद्योग प्रदर्शन तसेच परदेशातही शासनाच्या वतीने आयोजित प्रदर्शनात स्टार्टअप उद्योगिनीच्या सदस्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
उद्योजिका डॉ. ज्योती दाशरथी यांनी आम्ही उद्योगिनी शाखेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहोत, असे सांगितले. पहिल्याच वर्षात ग्रुपने केलेले कार्य कौतुकास्पद असून, राज्याच्या महिला धोरणाच्या अनुषंगाने लवकरच कौशल्य विकासावर तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केले जाईल असेही त्या म्हणाल्या. अश्विनी दाशरथी यांनी सूत्रसंचालन केले. आरती डुघरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पूनम छाबडा यांनी मनोगत व्यक्त केले. मृणालिनी फुलगीरकर यांनी आभार मानले. निशिगंधा पालिमकर आणि भैरवी आठल्ये यांनी येलो पेज डायरीची कल्पना मांडली. कार्यक्रमाला नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, प्रा. सावंत, उषा नागपाल, स्नेहल वैद्य, नेहा टिळक, प्रज्ञा मुंढे, अंकिता भालेराव, अलका चेनने, उर्मिला देसाई आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्यापासून सुटका ?वाळूजमध्ये प्रकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी वाळूज येथे प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी केली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली. या प्रकल्पात फक्त कचरा वाहतुकीचा खर्च पालिकेला करावा लागणार असून त्यासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
खत निर्मिती प्रकल्पाबद्दल माहिती देताना मुगळीकर म्हणाले, वाळूज येथील शिवप्रसाद अग्रवाल यांनी माझी भेट घेतली आहे. त्यांची तेथे २५ एकर जमीन असून त्यापैकी दहा एकरात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची त्यांची तयारी आहे. या जागेवर रोज दोनशे टन कचरा आणून टाकण्यास त्यांची काही हरकत नाही. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्याची त्यांनी योजना आहे. औरंगाबाद शहरातून कचरा वाळूजपर्यंत घेऊन जाण्यासाठीचा खर्च महापालिकेने करावा, असा त्यांचा प्रस्ताव आहे. कचऱ्याच्या वाहतुकीचा खर्च प्रतिटन तीनशे रुपये गृहित धरण्यात आला असून त्याकरिता दररोज साठ हजार रुपये वाहतूक खर्च होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कचरा वाहतुकीकरिता इच्छूक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत, त्यासाठी अल्प मुदतीची निविदा काढण्यात येईल, असे मुगळीकर यांनी सांगितले.
वाळूज येथे कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला, तर शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. कचरा आणि कचरा डेपोची समस्या काही प्रमाणात सुटेल, असा पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प आकाराला येण्यास किमान एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे.

- शहरात दररोज जमा होणारा कचरा - ४०० टन
- वाळूजला पाठविण्यात येणारा कचरा - २०० टन
- कचरा वाहतुकीचा अपेक्षित खर्च - ३०० रुपये प्रतिटन
- दररोजचा वाहतूक खर्च - ६० हजार रुपये
- वाळूज येथील प्लांटपर्यंतचे अंतर - १२ किलोमीटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा एसटीपासून पळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेमार्फत शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सिटीबसचे चालक कोण असतील, हे अद्यापही निश्चित झालेले नाही. महापालिकेच्या सिटीबसच्या स्टेअरिंगचा ताबा एसटी विभागाने घेण्यात नकार दिला आहे. शिवाय महापालिकेने शहर बस चालू करताच, एसटीची सेवा बंद करावी किंवा नाही, याबाबतचा मुंबईतील मुख्यालयाकडे अभिप्राय मागितला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला पाच सिटी बस खरेदी करण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून इलेक्ट्रिक बस आणण्याबाबत चर्चा करण्यात आली, मात्र या प्रक्रियेला उशीर होत असल्याने स्‍थानिक कंत्राटदाराकडून पाच बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिटी बस सुरू करण्यापूर्वी महापालिकेने एसटीसोबत चर्चा केली आहे.
एसटी महामंडळाने महापालिकेची सिटीबस सेवा चालवावी, असा प्रस्ताव महापालिकेने मांडला होता. एसटी विभागासोबत करारानंतर देण्यात आलेल्या गाड्या चालविण्यात येतात. अन्य कोणत्या विभागाच्या बस चालविण्याचा अधिकार एसटी महामंडळाला नाही, असा नियम सांगून एसटी महामंडळाने सिटी बस चालविण्यास असमर्थता दर्शविली. महापालिकेने शहर बस सेवा चालू ठेवल्यास, एसटीच्या बस बंद कराव्यात किंवा नाही, याबाबत महामंडळाच्या मुख्यालयातून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

असाही प्रस्ताव

महापालिकेला कोणत्याही परिस्थितीत शहर बस सेवा चालू करायची आहे. एसटी महामंडळाची सेवा नसलेल्या मार्गांवर महापालिकेमार्फत शहर बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला आहे.

नियमानुसार महापालिकेच्या गाड्या चालविण्याचा अधिकार एसटी महामंडळाला नाही. महापालिकेकडून अधिकृत शहर बस सेवा सुरू करण्याबाबत पत्र येत नाही, तोपर्यंत शहर बस सेवा सुरू राहणार आहेत. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहेत.
- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवरील ओळख तरुणीला महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फेसबुकवर एका तरुणासोबतची झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महाग पडली. त्या तरुणाने तिच्यासोबतचे फोटो तिच्या वडिलांना पाठवत भेटण्यास न आल्यास ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. दोन वर्षांपासूनच्या या प्रकाराला कंटाळून तरुणीने ‌जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीतील या २१ वर्षांची महाविद्यालयीन विद्यार्थिनीची फेसबुकवर महेश नाटेकर (रा. राजाबाजार) याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघे भेटत होते. त्या दरम्यान, नाटेकरने तिच्यासोबत फोटो काढले. काही दिवसानंतर दोघांच्या भेटी कमी झाल्याने नाटेकरने तिला त्रास देणे सुरू केले. हा प्रकार तरुणीने भावाला सांगितला. तिच्या भावाने समजावून सांगितल्यानंतरही नाटेकर त्रास देतच होता. त्याने तिच्या वडिलांच्या मोबाइलवर तरुणीचे फोटो पाठवून ती भेटण्यास आली नाही, तर फोटो व्हॉटसअॅप, फेसबुकवर टाकून बदनामीची सतत धमकी दिली. त्यामुळे या तरुणीने मोबाइल वापरणे बंद केले. परिणामी, नाटेकरने तिच्या चुलत बहिणीच्या मोबाइलवर मॅसेज करून त्रास देणे सुरू केले. अखेर तरुणीने अखेर बुधवारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नाटेकरविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून महेश नाटेकरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ चौकशी बासनात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वादग्रस्त भूमिगत गटार योजनेच्या अनियमिततेची चौकशी बासनात गुंडाळली असून, या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून नोडल ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करण्याचे स्थायी समितीने दिलेल्या आदेशाला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत कोणतीच कारवाई झाली नाही.
केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडियम टाऊन्स (यूआयडीएसएसएमटी) अंतर्गत औरंगाबादसाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली. आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यानच्या काळात या योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा भांडाफोड पावसाळ्यात झाला आणि नगरसेवक भूमिगत गटार योजनेच्या कामावर तुटून पडले. स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे, शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा उदाहरणांसह पंचनामा केला. त्या आधारे सभापती गजानन बारवाल यांनी भूमिगत गटार योजनेचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. या योजनेचा आराखडा करणाऱ्या पीएमसीला काळ्या यादीत टाका, असेही सांगितले होते, मात्र सभापतींनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई न करता आयुक्तांनी सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसचे उत्तर प्राप्त झाल्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत उच्चस्तरीय चौकशी संदर्भात काहीच झाले नाही. त्यामुळे ‘भूमिगत’ची चौकशी बासनात गेल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे. अधिकारी व ‘पीएमसी’ यांच्यावर कारवाई होणार नाही, असे बोलले जात आहे.

नगरसेवकही बोलेनात
भूमिगत गटार योजनेच्या कामातील अनियमिततेबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरही प्रशासन काहीच कारवाई करीत नसताना, स्थायी समितीचे सदस्य असलेले नगरसेवक मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ‘भूमिगत’ योजना आणि अधिकाऱ्यांवरील कारवाई याबद्दल काहीच बोलत नसल्याचे चित्र आहे. न बोलण्यामागचे कारण काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

‘भूमिगत’ प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे आणि ‘भूमिगत’ चे एकूणच प्रकरण तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ समितीकडे देण्याचा विचार आहे. येत्या आठ - पंधरा दिवसात याबद्दलचा निर्णय होईल.
- डी. एम. मुगळीकर, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग; दोघांना सक्तमजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मिरवणुकीमध्ये अल्पवयीन मुलीचा वारंवार विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी ठोठावली.
१७ वर्षीय मुलगी १४ एप्रिल २०१६ रोजी मोंढा नाका येथे मिरवणूक पाहत थांबली असताना आरोपी आकाश विजय मगरे (१९, रा. नाथनगर) व आरोपी अभिजित अनिल मगरे (१९, रा. नाथनगर) यांनी मिरवणुकीत नाचत मुलीचा वारंवार विनयभंग केला. त्यामुळे मुलगी जोरात ओरडली. त्यामुळे तिची आई व भाऊ धावत आले व तिने त्यांना घडलेल्या प्रकार सांगितला. आई व भाऊ दोन्ही आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता दोघांनी झेड्याच्या काठ्या काढून त्यांना मारहाण केली, मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला पोलिस उपनिरीक्षक एम. बी. लाड यांनी तपास करून कोर्टात दोषरोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने दोन्ही आरोपींना कलम ३५४ (अ) अन्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास २५ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images