Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एकाच कुटुंबातील तिघांना जन्मठेप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धार्मिक कार्यक्रमात गोंधळ का घालतोस, असा जाब विचारणाऱ्याला दगडाने गंभीर स्वरुपाची मारहाण करून डोळा निकामी व चेहरा विद्रुप करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

पाचोड तालुक्यातील कडेठाण तांडा क्रमांक दोन येथे २९ जून २०१४ रोजी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. पूजा संपल्यानंतर प्रसाद वाटप सुरू झाल्यावर सोमीनाथ रोहिदास चव्हाण हा दारू पिऊन आला, शिविगाळ करत गोंधळ घालू लागला. त्या ठिकाणी असलेला अंकुश उत्तम चव्हाण याने मध्यस्थी करून शांत राहण्याचे आवाहन केले. तो ऐकत नसल्याचे पाहून अंकुश चव्हाण गावात घरी परत आला. दरम्यान, सोमीनाथ, त्याचे वडील रोहिदास व त्याची आई तुळशाबाई गावात आले आणि घरसमोर अंगणात बसलेल्या अंकुश चव्हाण यास शिविगाळ करीत माराहण केली. या वेळी रोहिदास हा अंकुशच्या छातीवर बसला आणि कपाळावर टोकदार दगडाने मारले. यामध्ये त्याच्या डोळ्याला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी असलेल्या अंकुशला तातडीने उपचारासाठी पाचोड प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले. नंतर घाटीत व त्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकारात अंकुश चव्हाण याचा डोळा पूर्ण निकामी झाला आणि कपाळाला मोठी खोच पडून चेहरा विद्रुप झाल्याचे लहू उत्तम चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले. तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात सोमीनाथ रोहिदास चव्हाण, रोहिदास रामदास चव्हाण व तुळशाबाई चव्हाण या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साडेतीन हजार रुपये दंड
खटल्यावेळी, सहायक लोकअभियोक्ता बी. आर लोया यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने कलम ३०७ अन्वये राठोड कुटुंबातील तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी, कलम ३२३ अन्वये तीन महिने कारावास व प्रत्येकी २०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपट्टीबरोबरच टँकर दरवाढ रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पाणीपट्टीबरोबरच टँकरची दरवाढ देखील रद्द करणार करू. या संबंधीचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत सभागृहनेत्यांच्या माध्यमातून मांडला जाईल. प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले जातील,’ अशी ग्वाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे.

समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पाणीपट्टीवाढीबरोबरच टँकरच्या दरातही दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही, अशा भागात व गुंठेवारी भागात महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. एका कुटुंबाला एक दिवसआड एक ड्रम पाणी टँकरच्या माध्यमातून दिले जाते. समांतर जलवाहिनी योजनेच्या माध्यमातूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार असल्यामुळे पाणीपट्टीपाठोपाठ टँकरच्या दरातही वाढ करण्यात आली. यंदा टँकरच्या दरापोटी एका कुटुंबाकडून दर महिन्याला ३६६ रुपये घेतले जातात, एक एप्रिल पासून त्यात दहा टक्के वाढ करून ४०२ रुपये वसूल केले जाणार आहेत.

प्रस्ताव मंजूर; अंमलबजावणी नाही
‘समांतर जलवाहिनीचा करार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रद्द झाला आहे. त्यामुळे या करारातील अटी देखील आपोआपच रद्द झाल्याचे मानले जात आहे. पाणीपट्टीतील दरवाढ रद्द करण्याचा प्रस्ताव तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता, पण त्यावर पालिका प्रशासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही. या ठरावाची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला भाग पाडू आणि टँकरची दरवाढ रद्द करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करून तो अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठवू. दरवाढ रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत सभागृहनेते ठेवतील,’ अशी माहिती महापौरांनी दिली.

टॅँकरचे गणित
- १ दिवसाआड १ ड्रम
- १ महिन्याचे ३६६ रुपये
- १ एप्रिलपासून वाढ
- १० टक्के जादा पैसे
- ४०२ रुपये वसूल करणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हर्सूल रस्ता रुंदीकरण; मंगळवारी स्थळ पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘हर्सूलमधील रस्त्या रुंदीकरणासाठी मंगळवारी (२३ जानेवारी) स्थळ पाहणी केली जाणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित असतील,’ अशी माहिती उपमहापौर विजय औताडे यांनी दिली.
औताडे म्हणाले, ‘हर्सूलकडून जळगावकडे जाणारा रस्ता विकास योजनेनुसार चार पदरी आहे. तसा तो केला जाणार आहे. हर्सूलमधील सुमारे १२२ बांधकामे विकास योजनेच्या रस्त्यात बाधित होतात. जी बांधकामे बाधित होणार आहेत त्यांना नियमानुसार मोबदला देण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यांच्याकडे निधी देखील उपलब्ध आहे. मंगळवारी स्थळ पाहणी केल्यावर ज्या ठिकाणी आवश्यक असेल, त्या ठिकाणी मार्किंगचे काम सुरू केले जाणार आहे. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने रुंदीकरणाचे काम हाती घेऊ,’ असे औताडे यांनी स्पष्ट केले.

क्रांतीचौकाचे कामही मार्गी
सभागृहनेते विकास जैन म्हणाले, ‘महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम देखील मार्गी लागणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फक्त डांबरीकरणाचे काम करणार आहे. खडीकरणाचे काम महापालिकेने करून द्यावे, असे त्यांनी कळविले आहे. खडीकरणाचे काम करण्यास महापालिका तयार आहे. त्यामुळे लवकरच महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचे डांबरीकरण होईल. आवश्यकतेनुसार रुंदीकरण देखील केले जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सलमानवर खर्च कमी करा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘निर्बुद्ध कॉमेडी आणि बेफाम मारधाड असलेले चित्रपट प्रेक्षकांना अत्यंत आवडतात. प्रगल्भतेने काही सांगणाऱ्या चित्रपटांपासून प्रेक्षक दूर आहेत. जर सलमान खानच्या चित्रपटांवर कमी पैसे खर्च करून चांगल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तर चाकोरीबाह्य विषयांवरील दर्जेदार चित्रपट तग धरतील’ असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले. औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते बोलत होते.

महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी भारतीय आणि जागतिक चित्रपट दाखवण्यात आले. सकाळच्या सत्रात हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ चित्रपट दाखवण्यात आला. मनोज वाजपेयी, राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अलिगढ’ला चांगला प्रतिसाद मिळाला. अलिगढ विद्यापीठात मराठी विषयाचे प्राध्यापक असलेल्या प्रा. सिरास यांच्या सत्यघटनेवर चित्रपट आधारित आहे. समलैंगिकतेच्या कारणावरून प्रा. सिरास यांना निलंबित करण्यात आले होते. समलैंगिकतेविरूद्धचा कायदा आणि खासगी जीवनातील हस्तक्षेप या मुद्द्यावर चित्रपटात संयमित भाष्य आहे. हा चाकोरीबाह्य चित्रपट पाहण्यासाठी रसिकांची गर्दी झाली. दुपारच्या सत्रात हंसल मेहता यांचा ‘मास्टरक्लास’ झाला. यावेळी दिग्दर्शक अंतनू मुखर्जी, जयप्रद देसाई, कवी दासू वैद्य, अशोक राणे उपस्थित होते. ‘जयते’, ‘शाहीद’, ‘सिटीलाइट्स’, ‘अलिगढ’, ‘सिमरन’ या चित्रपटांच्या निर्मितीचा प्रवास मेहता यांनी उलगडला.

‘चाकोरीबाह्य चित्रपट करताना अडचणी असतात. ‘शाहीद’ चित्रपटाच्या शिर्षकाला निर्मात्याने आक्षेप घेतला. मुस्लिम नावाचा चित्रपट चालणार नाही असे तो सांगत होता. निर्णयावर ठाम राहिल्यामुळे मला प्रोड्यूसर शोधावा लागला. कमी खर्चात चित्रपट निर्मितीचे माझे नियोजन असते. सहाय्यकांनाही कमी खर्चात चित्रपट निर्मितीचे धडे देतो. माझे चित्रपट चर्चेत असले तरी प्रेक्षक आवर्जून पाहत नाहीत. थिएटर कलेक्शन, ओव्हरसीज, सॅटेलाइट राइट्सच्या माध्यमातून खर्च वसूल होतो, पण मला कधीच पैसे मिळत नाहीत,’ असे मेहता यांनी सांगितले. प्रा. सिरास यांची कथा इशाणी मुखर्जीने ई-मेलवर पाठवली होती. कथा वाचल्यानंतर संपर्क साधला आणि चित्रपट आकाराला आला. कुणाच्या लैंगिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याचा कुणाला अधिकार नाही हाच संदेश चित्रपटात आहे’ असे मेहता म्हणाले.

मल्टिप्लेक्स तोट्याचे
‘मल्टिप्लेक्सचा छोट्या बजेटच्या चित्रपटांना फायदा होईल असे वाटले होते. मात्र, मल्टिप्लेक्सचे तिकीट दर वाढताच प्रेक्षक चोखंदळ झाले. कष्टाने कमावलेला पैसा ते मोजक्याच चित्रपटांवर खर्च करतात. व्यावसायिक मनोरंजक चित्रपटांना त्यांची पसंती असल्यामुळे छोट्या चित्रपटांचा व्यवसाय मर्यादित आहे,’ अशी खंत मेहता यांनी व्यक्त केली. हिंदी, प्रादेशिक असा सिनेमा नसतो. ‘फँड्री’, ‘सैराट’ चित्रपटाची भाषा फक्त सिनेमाची भाषा आहे असे मेहता म्हणाले.

प्रादेशिकला गर्दी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘पथिराकलम’ (मल्याळम) चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाच्या चमूने रसिकांशी संवाद साधला. अनन्या (आसामी), क्षितीज, कासव, नदी वाहते (मराठी) या चित्रपटांनाही अधिक गर्दी उसळली. ‘क्षितीज’ चित्रपटातील कलाकार उपेंद्र लिमये, वैष्णवी तांगडे, राजकुमार तांगडे, दिग्दर्शक सुनील कदम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेडिकल पीजी’साठी ‘बाँड’चा फास

$
0
0

औरंगाबाद : वैद्यकीय-दंत पदव्युत्तर व सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक वर्षाची बंधनपत्रित सेवा बंधनकारक करण्यात आली असून, बंधनपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय ‘नीट’ परीक्षेला बसताच येणार नाही, असा फतवा काढण्यात आला आहे. परिणामी, ज्या राज्यांमध्ये बाँडची सक्ती नाही, त्या अनेक राज्यांचे विद्यार्थी ‘पीजी’ प्रवेशासाठी पुढे राहणार आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
या संदर्भात बंधनपत्रित सेवेचा शासन आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे. या शासन आदेशानुसार, राज्यातील शासकीय व महापालिका महाविद्यालयांमधून वैद्यकीय तसेच दंत अभ्यासक्रमाचा पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, अतिविशेषोपचार अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक वर्षाची बंधनपत्रित सेवा (बाँड सर्व्हिस) बंधनकारक करण्यात आली असून, २०१८-१९ पासून बाँडची अंमलबजावणी होणार आहे. अर्थात, शिष्यवृत्तीचा लाभ न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही बंधनपत्रित सेवा बंधनकारक राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामीण, दुर्गम तसेच आदिवासी भागांमध्ये बंधपत्रित सेवेच्या माध्यमातून डॉक्टर मिळतील, असा दावा वैद्यकीय शिक्षण विभागाने केला असला तरी ‘बाँड सर्व्हिस’चा फास राज्यातील विद्यार्थ्यांना बसणार असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.

बाँडसाठी नोकऱ्या तरी आहेत का?
सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयांमध्ये ‘बीडीएस’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना मुळातच अत्यल्प जागा असतात. त्याचवेळी बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही विद्यार्थ्यांना बंधनपत्रित सेवा देण्यासाठी फार कमी ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी आपला बाँड पूर्ण तरी कसा करायचा आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी बाँडची मागणी केली तर कितीजणांना संधी मिळेल, हा प्रश्न आहे. अर्थात, सक्ती म्हणून बाँड करणारे विद्यार्थी मनातून रुग्णसेवा करणार का आणि विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेला झोकून घेतले तर अभ्यास कधी करणार व ‘नीट’सारखी स्पर्धात्मक परीक्षा कसे उत्तीर्ण होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बाँड बंधनकारक करणे चुकीचे नाही. मात्र ‘नीट’ परीक्षेसाठी बाँड अनिवार्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर एकत्रित बंधपत्रित सेवा करणे शक्य होणार नाही. हे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आहे. मुळात ‘पीजी’ला प्रवेश मिळवणे सोपे नाही व बाँड सर्व्हिस करताना अभ्यासाला वेळ मिळाला नाही तर विद्यार्थी ‘नीट’ उत्तीर्ण होणार तरी कसे?
- डॉ. सागर मुंदडा, अध्यक्ष, आयएमए युथ विंग

अभ्यासाची लिंक तुटत असल्यामुळे ‘पीजी’ किंवा सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बाँड पूर्ण करू देण्याबाबत फेरविचार करावा. ज्यांना ‘पीजी’ला प्रवेश मिळतो, त्यांना इंटर्नशिपसुद्धा गरजेची नाही. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची लांबी कमी होऊन पुन्हा एकदा टॅलेंट वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे आकर्षित करणे शक्य होईल.
– डॉ. शिवाजी सुक्रे, प्रवक्ते, वैद्यकीय शिक्षक संघटना

‘नीट’ परीक्षेला बसण्यासाठी आता विद्यार्थ्यांनी बंधपत्रित सेवा पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांना ‘नीट’ला बसता येणार नाही, हा महत्वाचा मुद्दा नव्या आदेशात समाविष्ट करण्यात आला आहे.
– डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्ती-शक्ती ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन ४ येथील तिरुपती पार्कमध्ये गुरुवारपासून श्रीमद् देवी भागवतला प्रारंभ झाला असून प.पू.योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे आयोजन करण्यात आले आहे.
सद्गुरू हरिहर शक्तीपीठाचे पू. अंबरीष महाराज यांच्या रसाळ वाणीतून देवी भागवतकथेला सुरुवात झाली आहे. हा सप्ताह २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. ग्रंथ दिंडीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. भगवतीलीला, वेदव्यास जन्म, देवी महात्म्य, महिषासूर मर्दिनी चरित्र, शाकंभरी, महालक्ष्मी चरित्र तसेच गंगा अवतरण, तुलसी आख्यान आदी कथा-उपकथानकांनी युक्त असे हे देवी भागवत वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. गुरुवारी निरंजन भाकरे यांचे भारूड आणि २६ रोजी ग्रंथ मिरवणूकी नंतर ह.भ.प. भागवत पाटील यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे, दुपारी १ वाजता महाप्रसाद भंडारा झाल्यावर भागवत सोहळ्याची समाप्ती होईल. या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानातून आता होणार मका वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
अंत्योदय व प्राधान्यक्रम गटातील शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारी महिन्यापासून गव्हात कपात करून मका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्राधान्यगटातील लाभार्थ्यांना एक किलो व अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना पाच किलो मका मिळणार आहे.
अंत्योदय व प्राधान्यक्रम या दोन्ही गटात प्रति लाभार्थी अनुक्रमे पाच व एक किलो गहू कमी दिले जाणार आहेत. गहू व तांदळाचे दर निश्चित असले तरी मकाचा दर अद्याप निश्चित नाही. साधारणपणे एक रुपये प्रति किलो या भावाने मका विक्री होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन झाल्याने गोदामांमध्ये मका भरलेला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. जोपर्यंत मका शिल्लक आहे तोपर्यंतच रेशन दुकानातुन मका वाटप करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा विभागातुन देण्यात आली.
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील अंत्योदयच्या लाभार्थ्यांना १५ किलो गहू, पाच किलो मका व १५ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य मिळणार आहे. त्याप्रमाणे प्राधान्यगटातील दोन लाख कुटुंब सदस्यांना दोन किलो गहू, एक किलो मका व चार किलो तांदूळ असे सात किलो धान्य मिळणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन सर्व तहसिलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी गटातील २७ हजार ३७७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत उपनगराध्यक्ष; स्वीकृत सदस्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
नगर पंचायतीच्या उपाध्यक्षपदी इंदुबाई मधुकर मिसाळ यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. स्वीकृत सदस्य म्हणून अॅड. आसेफ अश्फाक पटेल व चंद्रशेखर पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. मिसाळ यांनी मोहिनी काथार यांचा आठ मतांनी पराभव केला.
ही निवड प्रक्रिया शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी काम पाहिले. उपाध्यक्षपदाची निवडणूक हात उंचावून घेण्यात आली. मिसाळ यांना १३ व प्रतिस्पर्धी उमेदवार मोहिनी काथार यांना पाच मते मिळाली. नगर पंचायतीमध्ये भाजपचे एक नगराध्यक्ष, ११ नगससेवक असे बळ आहे. दोन स्वीकृत सदस्य निवडीसाटी एका सदस्याचे बळ कमी पडत होते. एमआयएमचे जफर चिस्ती भाजप गटात सामील झाल्याने १३ नगरसेवकांसाठी भाजपने दोन गट स्थापक करून इंदुबाई मिसाळ व अकबर पटेल यांना गटनेते केले. त्यांच्यामार्फत दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली.
विरोधी पक्षांच्या पाच नगरसेवकांनी अॅड.अल्ताफ काझी यांना पाठिंबा दिला होता. नगराध्यक्ष सुहास शिरसाठ व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी पाकिटे उघडून दोघांची निवड घोषित केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनाथांच्या आरक्षणाचा टक्का वाढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनाथ मुलांचे पुनर्वसन आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने त्यांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. निर्णय चांगला असला तरी देण्यात आलेले आरक्षण कमी असून, ते वाढवून देण्यात यावे, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. शासनाच्या आरक्षणाचा निर्णय हा अनाथ मुलांच्या पुनर्वसनाला आणखी बळकटी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा अत्यंत चांगला निर्णय आहे. बालगृह, त्यानंतर अनुरक्षणगृहात असताना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह अन्य गरजा कशा पूर्ण करणार, हा त्यासमोर प्रश्न नसतो. १८ वर्षांनंतर त्यांना संस्थेबाहेर पडावे लागते. अनाथ असल्याने त्याच्यासमोर अनेक प्रश्नांचा सामना त्यास करावा लागतो. अशा बालकांच्या पुनवर्सनाच्या दृष्टीने आरक्षणाचा हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा आहे.
- अॅड. रेणुका घुले, अध्यक्ष बाल कल्याण समिती

संस्थेतून बाहेर पडल्यावर अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून अन्य मूलभूत गरजा कशा भागविणारा, असा प्रश्न असतो. आरक्षण दिल्याने काही प्रमाणात प्रश्न सुटण्यास निश्चितच मदत होईल. आरक्षण एक टक्का न देता ते वाढवावे. त्याचबरोबर बालगृहातील निराधार बालकांनाही आरक्षणाचा लाभ दिला जावा.
- जॉकी घुले , सामाजिक कार्यकर्ते

आरक्षण दिले ही चांगली बाब, मात्र यात वाढ करणे आवश्यक आहे. जगाची ओळख नसलेली ही मुले तीव्र स्पर्धेचा कसा सामना करणार. त्यामुळे ही मुले पायावर उभी राहत नाही, तोपर्यंत पालक म्हणून त्यांची जबाबदारी संस्था, शासनाने घ्यायला हवी.
- रेणुका कड, सामाजिक कार्यकर्त्या

या चांगल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. संस्थेत असतानाच या मुलांना रोजगार, स्वंयरोजगारांच्या संधी अधिकाधिक प्राप्त झाल्या पाहिजे. यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर अधिक भर दिला जावा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत सखोल मार्गदर्शन झाले पाहिजे.
प्रा. डॉ. युसूफ बेन्नूर, सामाजिक कार्यकर्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंडाची परस्पर विक्री;दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट कागदपत्रांच्या आधारे सहा व्यक्तींची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत (२२ जानेवारी) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले.
या प्रकरणी डॉ. गिरिजा शकुबा पद्मे (वय ४३, रा. परिमल हौसिंग सोसायटी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, बनावट मुख्यातारनामा, बनावट आधार कार्ड व कागदपत्रांच्या आधारे सातारा परिसरातील गट क्रमांक २५ येथील भूखंडाची फिर्यादीसह सहाजणांना विक्री करून सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार फिर्यादीने दिली होती. या प्रकरणी आरोपी मीर कादर अली उर्फ परवेझ मीर कादर अली (वय ३४) व आरोपी आजमखान अब्दुल रहेमान खान (वय ४९, दोघे रा. लोटाकारंजा, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून सहा लाख रुपये जप्त करणे तसेच आरोपींनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी आणखी कुठल्या जागेवर अतिक्रमण केले आहे, आदी बाबींचा तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील सैय्यद शेहनाझ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोट्यावधी रुपये खर्च होऊनही जिल्ह्यामध्ये शेकडो पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही गावांना थेंबभरही पाणी मिळालेले नसल्यामुळे जबाबदार ९०हून अधिक ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
येत्या २६ जानेवारी रोजी संबंधित समित्यांना किती निधी दिला व त्यांनी काय काम केले, यांचे अहवाल वाचन ग्रामसभेसमोर करण्यात येणार आहे. संबंधित समित्यांनी योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे,तसे निर्देश जिल्हा परिषदेने दिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेमार्फत योजना तयार करण्यात येतात. यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी येतो. या कामाची जबाबदारीही ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांवर आहे. जिल्ह्यामध्ये आजमितीला ९० च्यावर योजना पूर्ण झालेल्या नाहीत. जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ही बाब समोर आली. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मुधकर अर्दड यांनी नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठा योजनांसाठीच्या अंदाजपत्रकानुसार निधी मंजूर होतो. परंतु, खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत. अनेकांचा खर्च अंदाजपत्रकाच्या बाहेर गेलेला आहे. पाणीपुरवठा पूर्ण न झाल्यामुळे संबंधित गावांमध्ये पाण्याची अडचण होत आहे, असे बैठकीत समोर आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अपूर्ण शौचालयाची कामे पूर्ण करावीत, मंजूर बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

२६ जानेवारीला हिशेब

येत्या २६ जानेवारी रोजी संबंधित समित्यांना किती निधी दिला व त्यांनी काय काम केले, यांचे अहवाल वाचन ग्रामसभेसमोर करण्यात येणार आहे. संबंधित समित्यांनी योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अर्दड यांनी यावेळी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यरंगाचा देखणा आविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केरळच्या देवालयातील पारंपरिक ‘वाद्य समन्वयम्’ आणि नाट्यशास्त्र परंपरेचे देखणे सादरीकरण असलेले ‘मार्ग नाट्य’ शारंगदेव महोत्सवाच्या उद्घाटनाचे आकर्षण ठरले. नादरंग आणि नृत्यरंगाचा आविष्कार रसिकांना आनंद देणारा ठरला. गतिमान कलाविष्कारातून पारंपरिक कलेचे वेगळेपण अधोरेखित झाले.
महागामी संस्थेच्या शारंगदेव महोत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ‘वाद्य समन्वयम’ कला प्रकाराने महोत्सवाचे उद्घाटन झाले. केरळ राज्यात देवळात पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. या वाद्यांचे सादरीकरण रसिकांसाठी नावीन्यपूर्ण अनुभूती ठरले. या तालवाद्यांचे प्रकार मंदिर सेवा, अनुष्ठान, प्रादेशिक नृत्य आणि रंगमंच परंपरांशी संबंधित आहेत. आठ मात्रांचा ताल ‘चेम्बडा थलम’मध्ये बांधलेला लयीत सुरू होऊन हळूहळू गती वाढवत जाणारा आविष्कार थक्क करणारा होता. ‘गणपती काई’, ‘मिझावु ओचपडिथाल’, ‘केलेमुखम’, ‘एडकलम’, ‘इरुकिडा’, ‘थिमिला इडाचल’ प्रकार सादर झाले. इडक्का, चेंडा, थिमिला, मिझावू, मधालम वाद्यांनी नादविश्व उभे केले. मध्यवर्ती असलेले ‘इडक्का’ इतर वाद्यांशी तादात्म्य पावले. पी. नंदकुमार यांच्यासह दिनेश वरियर, टी. रमेशन, कलामंडलम विनीश, कलानिलायम श्रीजीत यांनी सादरीकरण केले.
दुसऱ्या सत्रात कोलकाता येथील पियाल भट्टाचार्य व सहकाऱ्यांचे ‘मार्ग नाट्य’ सादर झाले. नाट्यशास्त्रातील सूचना व क्रमानुसारचे सादरीकरण नेत्रसुखद होते. ‘भानक’ पद्धती भावाभिनयाच्या अभिव्यक्तीवर केंद्रित होती. आधुनिक शास्त्रीय कलाविष्काराचा प्रभाव नसलेल्या ‘मार्ग नाट्या’ला रसिकांची भरभरून दाद मिळाली. नृत्य, संगीत आणि अभिनयाचा आविष्कार सुखावणारा होता. दरम्यान, प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक रामली इब्राहीम यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘महागामी’च्या संचालिका पार्वती दत्ता उपस्थित होत्या.

ओडिसी नृत्य आज

शारंगदेव महोत्सवात शनिवारी सायंकाळी सात वाजता दोन कला प्रकार सादर होणार आहेत. राजस्थानचे सुगनाराम आणि सहकारी ‘झुमको - रावणहत्था समूह’ आणि मलेशियाचे रामली इब्राहीम ओडिसी नृत्य सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लिल चॅटिंग करणाऱ्याला आळंदीतून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिलेला व्हॉटसअॅपवर अश्लिल मॅसेज करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून अटक केली. चोरलेल्या मोबाइलचा वापर करीत आरोपीने हे कृत्य केले. ३० डिसेंबर ते ११ जानेवारी, दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिडको भागातील एका वकील महिलेला अनोळखी क्रमांकावरून समोरील व्यक्ती व्हॉटसअप अश्लिल मॅसेज, व्हिडियो, व्हॉटसअॅप कॉल करून ठार मारण्याची धमकी देत होता. महिलेने पोलिस ठाण्यात सायबर अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाचा शोध घेतला असता तो आळंदी येथे आढळला. मात्र या व्यक्तिने आपला मोबाइल दोन महिन्यांपूर्वी हरवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक मुद्याआधारे तपास करून संशयित आरोपी अंगद पांडूरंग गजमल (वय २९ रा. सावतामाळी भवन, जग्गनाथ पार्क आळंदी) हा मोबाइल वापरत असल्याचे शोधून काढले. पीएसआय संदीप शिंदे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले, एपीआय गजानन कल्याणकर, पीएसआय हेमंत तोडकर, संदीप शिंदे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नगरसेवक खुलताबादेत आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शहरातील पाणीप्रश्न गंभीर होत असून त्यामुळे नगरसेवक हतबल झाले आहेत. उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, भाजपचे नगरसेवक परसराम बारगळ, शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्रसिंग साळुंके, मनोहर लाळे, फकीरचंद काळे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र तंबारे यांनी नगरपालिकेत मुख्याधिकारी, कर्मचारी नसल्याने नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर यांच्यावर रोष व्यक्त केला.
या प्रकारानंतर नगराध्यक्ष अॅड. कमर यांनी उपाययोजनांची पोटतिडकीने माहिती दिली. पण, नगरसेवक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. भाजप, शिवसेना नगरसेवकांनी पाण्याची समस्या मांडली. खुलताबाद शहरात सर्व प्रभागात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाण्याची समस्या भविष्यात गंभीर होणार असल्याने, नव्या योजनांची माहिती मागितली. त्यांचा संताप पाहून पाणीपुरवठा अभियंत्याने टप्प्या टप्याने पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. नगरसेवक साळुंके यांनी कर्मचारी कुठे आहेत, मुख्याधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी कुठे आहेत, अशी विचारणा केली. पाणीपुरवठा करताना दुजाभाव कशामुळे, असा सवाल उपस्थित केला.
काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल हाफीज यांनी नगरसेवकांना समजूत काढत नागरिकांसमोर तमाशा कशाला करता. तुमचा वार्ड माझा वार्ड कशाला करता, शहरातील सर्व नागरिक आपले आहे. आपण कार्यालयात बसून बोलू, असे मत मांडले. त्यावर उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांनी सोमवारी, मंगळवारी चार कंत्राटदार आले त्यांना परत का पाठवले. जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू होणार नाही, तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही, असा इशारा दिला.
विशेष म्हणजे आमदार प्रशांत बंब हे शुक्रवारी विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित राहणार असल्याने नगरसेवकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सीसीटीव्हीत चित्रीकरण

पाणीप्रश्नी सत्ताधारी नगरपालिका सभागृहात खेळीमेळीने काम करणारे नगरसेवक एकमेकांविरुद्ध हमरीतुमरी करताना दिसून आले. काँग्रेसचे नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, नगरसेवक अब्दुल हाफीज, भाजपचे उपनगराध्यक्ष सुरेश मरकड व नगरसेवक नरेंद्रसिंग साळुंके हे हमरीतुमरीवर आले. हा प्रकार नगरपालिकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पाणीटंचाईवर उपाययोजना करत आहोत. या काळात सर्व नगरसेवक व नागरिकांनी सहकार्य करावे. पालिकेची आर्थिकस्थिती बिकट असून गिरिजा प्रकल्पात निधीअभावी उधारीवर विहीर खोदली जात आहे. पाइप उधारीवर आणले आहेत. निधी नसल्याने पाणीप्रश्‍न सोडविण्यास अडचण येत आहे.
-अॅड एस. एम. कमर, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुखना’तून आवर्तनाला विरोध

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन सुखना धरणातून शेतीकरिता पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या विरोधात आणि सुखनातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. या याचिकेत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत.

गारखेडा येथील सरपंच मनिषा शैलेश चौधरी यांनी याचिका केली आहे. ग्रामपंचायत गारखेडा एक आणि दोनसह मंगरूळ, टाकळी भाली, चितेपिंपळगाव, हिवरा, लाडगाव, टोणगाव, जडगाव, चितेगाव, कुंभेफळ, आपतगाव येथील ग्रामपंचायतींनी सुखना धरणातील पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्याकरिता कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांच्याकडे अर्ज सादर केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून, धरणात केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, त्यातही अर्ध्यापेक्षा जास्त गाळ आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये, अशी विनंती केली. गारखेडा येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन, शेतीकरिता पाणी सोडल्यास नागरिक जलसमाधी घेतील, असे निवेदन दिले होते, मात्र एवढा विरोध असूनही औरंगाबाद पाटबंधारे विभागाच्या शाखा क्रमांक दोनचे शाखाधिकारी यांनी १६ जानेवारी रोजी सरपंच, ग्रामसेवक यांना एक पत्र देऊन सिंचनाकरिता पाणी सोडण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्याने पाणी सोडण्यात येत आहे, असे कळविले, असे या याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे सिद्धेश्वर ठोंबरे, शासनातर्फे अमरजीतसिंह गिरासे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे.

धरणात पाणीसाठा किती?
धरणात पाणीसाठा किती आहे, पाणी किती सोडले जाणार आहे, नंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता, आताच पाणी राखून का ठेवले जात नाही, अशी तोंडी विचारणा कोर्टाने सरकारी वकिलांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील क्लोअर डेल या शाळेचा दहावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उस्मानपुरा भागातील विवेकानंदपुरम् भागात घडला. प्रज्वल विजय देसाई (वय १५), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पीएसआय धरमसिंग सुंदर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल हा एमजीएम संस्थेच्या क्लोअर डेल या शाळेत दहावीमध्ये शिकत होता. प्रज्वलची आई शिक्षिका असून गुरुवारी सायंकाळी त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घरी प्रज्वल व त्याची आजी दोघेच होते. प्रज्वल हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत अभ्यास करण्यासाठी गेला होता. सायंकाळी त्याची आई बाहेरून आल्यानंतर प्रज्वल घरात दिसत नसल्याने त्यांनी त्याच्या खोलीत जाऊन पाहीले. आवाज देऊनही प्रज्वल प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता प्रज्वल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी जागे झाले. उस्मानपुरा पोलिसांना माहिती मिळताचा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्रज्वलला खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रज्वलने आत्महत्येसारखा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप समोर आले नाही.

मोबाइलला पॅटर्न लॉक

प्रज्वलचे वडील आफ्रिका खंडातील घाना येथे कार्यरत होते. २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रज्वलने आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही. त्याच्या मोबाइलला पॅटर्न लॉक असल्याने त्यामध्ये काही मॅसेज आहेत का याचा शोध अद्याप लागला नाही. हे लॉक उघडल्यानंतर पोलिस मोबाइलचा तपास करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कातडीने भरलेला ट्रक फुलंब्रीत पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी येथे कातडी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये सात लाख १२ हजार रुपयांची २१ टन कातडी आहे. ती कोलकता येथे पाठवण्यात येत होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कातडी व ट्रक ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील कुरेशी मोहल्ल्यातील कत्तलखान्यात बुधवारी हा ट्रक भरण्यात आला व सायंकाळी अंधार पडल्यानंतर तो कत्तलखान्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसानी पाठलाग करून ट्रक (डब्ल्यू बी ११ डी ५०८६) पकडला. ट्रकमधील कातडीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ट्रकचालक मोहंमद नौशाद आलम (वय ३२, रा. कोलकाता), फुलंब्री येथील कातडी विक्रेते शेख नजीर शेख उमर व एक दलाल शब्बीर (पूर्ण नाव मिळाले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक भरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्यासी संपर्क करून ही माहिती दिली होती. उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षित उद्यानाला हरताळ

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
‌औरंगाबाद महापालिकेला चार दशकांपूर्वी दान मिळालेल्या जागेवर उद्यान उभारता आले नाही. अखेर त्या दानशूराच्या मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केल्यानंतर महापालिका जागी झाली. आता या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. अद्यापही दोन धार्मिक स्थळे अतिक्रमित आहेत.
औरंगापुरा भाजी मंडईच्या पाठीमागे उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते. ही जागा महापालिकेने मूळ जमीन मालक दुर्गादास जहागीरदार यांच्याकडून ‌घेतली होती. नव्हे त्यांनी ती दान केली होती. याचे भूसंपादनही करण्यात आले होते. ही जागा उद्यानासाठी आरक्षित करण्यात आली होती. तब्बल साडेतीन दशके झाले तरी उद्यान विकसित होऊ शकले नाही. किंबहुना महापालिकेने ते विकसित केलेच नाही. त्यामुळेच त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले. तब्बल ३२ मालमत्ताधारकांनी या जागेवर अतिक्रमण केले होते. त्यापैकी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अतिक्रमण विभागाच्या पथकाने १४ अतिक्रमणे काढली आहेत.
भूसंपादन केल्यानंतर ज्या उद्देशासाठी पालिकेने जमीन घेतली होती. तो उद्देश पूर्ण होत नाही म्हणून मूळ मालकाचे पूत्र जीवन जहागीरदार यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे. याचिका करण्यापूर्वी जीवन जहागीरदार यांनी लोकशाहीदिनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी आय. एस. चहल यांनी महापालिकेला पत्र लिहून त्या जागेवरील अतिक्रमण हटवावे व त्या जागेचा विनियोग लोकहितार्थ करावा, अशी विनंती केली होती, परंतु या विनंतीलाही महाप‌‌ालिकेने हरताळ फासला. अखेर औरंगाबाद खंडपीठात जीवन जहागिरदार यांना धाव घ्यावी लागली होती. याच जागेवरून ‘एमआयए’विरुद्ध प्रशासन असे स्वरूप प्राप्त झाले आहे. अतिक्रमण हटाव पथक उद्यानाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘एमआयएम’चे नगरसेवक गंगाधर ढगे‌ यांनी विरोध केला होता. महापालिकेतर्फेही अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार अनेकांनी स्वत.हून अतिक्रमणे काढली होती आणि पथकाने काही बांधकामे जमीनदोस्त केली.
जहागीरदार यांच्या याचिकेमुळे पालिकेचे प्रशासन संकटात सापडले आहे. या जागेवर दोन मोठ्या इमारती आहेत आणि एक धार्मिक स्थळही बांधण्यात आले आहे. हे अतिक्रमण पाडण्यासाठी पथक गेल्यावर ‘एमआयएम’चे नगरसेवक विकास एडके यांनी जोरदार विरोध केला होता. आणि त्यांनी शिष्टमंडळासह पालिका आयुक्तांची भेटही घेतली होती. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असल्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रयत्न केले, परंतु आयुक्त डी. एम. मुंगळीकर यांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे. यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या आधी ‘एमआयएम’च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे आठ नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

१९७४ ः पालिकेतर्फे भूखंड संपाद‌ित
२००० ः मूळ मालक दुर्गादास जहागीरदार यांनी यांच्या कुटुंबियातर्फे लोकशाहीदिनात तक्रार
६ मार्च २००० ः तत्कालिन जिल्हाधिकारी आय. एस. चहल यांनी पालिकेला पत्र लिहून अतिक्रमण काढण्याचे निर्देश
२००१ ते २०१४ ः दुर्गादास यांचे चिरंजिव जीवन जहागिरदार यांच्या पालिकेकडे खेट्या, मंत्रालयातही अर्ज
२०१४ ः औरंगाबाद खंडपीठात याचिका
डिसेंबर २०१७ ः खंडपीठाने अतिक्रमण काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश
जानेवारी २०१८ ः आजपर्यंत उद्यानाचा विकास झाला नाही
जानेवारी २०१८ ः अतिक्रमण पथकाने नऊ अतिक्रमणे हटवली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस एकर भूखंडाचा मनसुबा उद्धवस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने २० एकर भूखंड फुकट सोडून देण्याच्या घेतलेल्या ठरावास पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने २८ डिसेंबर २०१७ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची गट नंबर १३ व इतर गटातील २० एकर जमीन देऊन फक्त रस्ता घेण्याचा ठराव केला होता. हे भूसंपादन करून औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची होती, तसा निकाल उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने देखील दिला होता. ही जमीन १८७४ च्या कायद्यान्वये संपादित करण्यात आली होती. परंतु, जमीन मालक २०१३च्या भूसंपादन कायद्याचा आधार घेऊन सर्वोच न्यायालयात गेले. त्यावरही औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुने ‘जैसे थे’ आदेश सर्वोच न्यायालयाने दिले. त्या खटल्यात सर्वोच न्यायालयात सुनावणी होऊन निकाल राखून ठेवला. नंतर संबंधित मार्केट कमिटीचे सभापती यांनी २० एक्कर जमीन फक्त रास्ता द्या व जागा सोडून देतो, असा ठराव केला. त्यातील काही संचालकांना हा ठराव मान्य नव्हता. त्यामुळे संचालक संजय औताडे, नारायण मते, दत्तुलाला तारो, राहुल सावंत यांनी पणन संचालक पुणे यांच्याकडे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ डिसेंबरच्या ठरावाच्या विरोधात अपिल केले. संचालक मालकी हक्कात असलेली मिळकत जमीन हस्तांतर किंवा सुलानामा करता येत नाही, या कारणावरून पणन संचालकांनी ठरावाला स्थगिती दिली. यासाठी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी पाठपुरावा केला होता.

चार संचालकांचे अपिल

संचालक संजय औताडे, नारायण मते, दत्तुलाला तारो, राहुल सावंत यांनी पणन संचालक पुणे यांच्याकडे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ डिसेंबरच्या ठरावाच्या विरोधात अपिल केले. संचालक मालकी हक्कात असलेली मिळकत जमीन हस्तांतर किंवा सुलानामा करता येत नाही, या कारणावरून पणन संचालकांनी ठरावाला स्थगिती आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शटर फोडून चोरी; तीन अल्पवयीन गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुकानांचे शटर फोडून चोऱ्या करणाऱ्या तीन अल्पवयीन आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. गेल्या महिन्यात पुंडलिकनगर व जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या केल्याची टोळीत कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून साडेचार हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गारखेडा परिसरात चोरट्यांनी दोन महिन्यापासून शटर फोडून चोऱ्यांचा धडाका लावला होता. या गुन्ह्यांत रेकॉर्डवरील काही अल्पवयीन आरोपींचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पीएसआय योगेश धोंडे यांना मिळाली होती. त्यावरून सूतगिरणी चौकातून काबरानगर परिसरातील सतरा, चौदा व तेरा वर्षांच्या मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुकाने फोडल्याची कबुली दिली. ही कामगिरी एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश धोंडे, संतोष सोनवणे, बापुराव बावस्कर, आनंद वाहूळ, विकास गायकवाड व रितेश जाधव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images