Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एटीएम कार्ड बदलून ३५ हजार लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने वीरगाव येथील बाबासाहेब मारुती थोरात यांच्या बँक खात्यातून ३५ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर नुकतीच घडली.

वीरगाव येथील रहिवासी बाबासाहेब थोरात हे लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेवर कार्यरत आहेत. ते गुरुवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रस्त्यावरील एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले होते. पण एटीएम मशीनने आधार कार्ड क्रमांक विचारल्याने ते माघारी फिरले. याचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या मागे रांगेत उभ्या असलेल्या दोन भामट्यांनी त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला व पाच हजार रुपये काढून दिले. पण यावेळी हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून घेतले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकदा २० हजार व दुसऱ्यांदा १५ हजार, असे ३५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर आला. त्यानंतर थोरात यांनी त्वरित पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुकानमालकालाच टोपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकानमालकाला तब्बल २९ लाख ५० हजाराला गंडा घालून मोबाइल शॉपीमध्ये मॅनेजर असलेला तरूण पसार झाला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ च्या हडकोमध्ये घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधाकर भावराव धाटबळे (वय ४६, रा. एन ११, नवनाथनगर, हडको) यांचे टीव्ही सेंटर येथील संजय गांधी मार्केटमध्ये ऋषीकेश कम्युनिकेशन आणि जय भद्रा टोबॅको सेंटर हे दुकान आहे. धाटबळे यांच्या मोबाइल शॉपीमध्ये सुदाम नानासाहेब भांडवलकर (वय ३६, मूळ रा. टाकळी अंबड, ता. पैठण, सध्या रा. सावंगी) हा मॅनेजर होता. सुदामने रिटेल ग्राहकांकडून जमा केलेल्या मोबाइल बॅलेन्सच्या रक्कमेपैकी फर्मच्या खात्यावर पूर्ण रक्कम न भरता त्यातील काही रक्कम टप्प्या टप्प्याने बाजूला काढल्या. तसेच रिटेल दुकानदाराकडून पेपर व्हाउचरच्या मोबदल्यात मिळणाऱ्या रक्कमेपैकी काही रक्कम फर्मच्या खात्यावर आरटीजीएस करण्याचे सांगून, तर काही रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करण्यास सांगत होता. तसेच दुकानातल्या संगणकातील मोबाइल रिचार्जसाठी असलेल्या बॅलेन्स व व्हाऊचरची रक्कममध्ये त्याने अपहार केला होता. १ डिसेंबर २०१७ ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित आरोपी सुदामने तब्बल २९ लाख ५० हजारांचा अपहार यावेळी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी धाटबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एपीआय झुंजारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृहांसाठी दोन महिन्यांची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

शहरात महिला स्वच्छतागृह बांधण्यासाठी पालिकेला दोन महिन्यांचा अंतिम अवधी देण्यात आला आहे. जागतिक महिला दिनापर्यंत(८ मार्च) काहीतरी 'थातुरमातुर' काम करण्यापेक्षा दोन महिने घ्या, पण दर्जेदार महिला स्वच्छतागृह बांधा, असा इशारा नगरसेविकांनी दिला आहे.

महापालिका अधिकारी व महिला स्वच्छतागृहांसाठीच्या समितीने नुकताच पाहणी दौरा केला. यामध्ये माजी उपमहापौर स्मिता घोगरे, नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत, सीमा खरात, समीना शेख इलियास, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, शाखा अभियंता अनिल तनपुरे आदींचा समावेश होता. समिती सदस्य नसलेल्या कीर्ती शिंदे यांनीही या पथकसोबत पाहणी केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालिकेने ८ मार्च २०१७ रोजी औरंगपुरा, बॉटनिकल गार्डन, बीबी का मकबरा, पैठण गेट व भडकल गेट इथे स्वच्छतागृहाचे भूमिपूजन केले होते. पण, एक वर्ष संपल्यानंतरही एकाही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे याबाबत हायकोर्टाचे निर्देश असूनही दोन वर्षांपासून पालिकेने स्वच्छतागृह बांधलेच नाहीत.

महिला स्वच्छतागृहांच्या अभावामुळे महिलांची होणारी कुंचबणा लक्षात घेत समिती सदस्यांनी वारंवार पाठपुरावा केला. स्मिता घोगरे यांनीही १ मार्च रोजी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. या विषयावर गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी केलेल्या पाहणीत टाउन हॉल येथील खूप आत असल्याने स्वच्छतागृह बांधूनही ते महिलांना दिसणारच नाही, असे पथकाच्या लक्षात आले. टाउन हॉलऐवजी दुसऱ्या जागेची पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. बीबी का मकबरा मकबरा परिसरातील स्वच्छतागृहास पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली नाही. मात्र या भागातील पालिकेचे जुन्या स्वच्छतागृहाची ८ मार्चपूर्वी दुरूस्ती, सुशोभिकरण ते महिलांसाठी वापरात आणा, अशी सूचना पथकाने केली. पैठण गेट येथे पालिकेची जागा असूनही केवळ स्थानिकांच्या विरोधामुळे कामच झाले नाही. पाहणीवेळी वाहतूक पोलिसांनी, आमची हरकत नसल्याचे सांगितले. सरस्वती भुवन कॉलेजसमोरील नाल्याच्या काठावरील जागेवरही बांधकामही ना हरकत असताना बंद होते. येथील बांधकाम लवकर सुरू होईल, असे सिद्दीकी यांनी सांगितले.

सिडको एन आठ येथील बॉटनिकल गार्डन परिसरातील स्वच्छतागृहाचे बांधकाम झाले असले तरी ही जागाही अंतर्गत भागात असल्याने उपयोगी नाही. सेव्हन हिल्स येथे अग्निशमन कार्यालय परिसरातील वर्दळ लक्षात घेता समितीने जागेला होकार दिला. याशिवाय टीव्ही सेंटर परिसरातील व्यापारी संकुल व कनॉटमध्ये पाहणी करण्यात आली. कनॉटमधील स्वच्छतागृहासमोर अतिक्रमण आहे. तसेच स्वच्छतागृहाणी अवस्था दयनीय असल्याने कंत्राटदारला नगरसेविकांनी खडसावले. यासाठी मुंबईची आधार फाउंडेशन काम करेल, पुढील ३० वर्षांसाठी या संस्थेकडे या सर्व स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन राहणार आहे. ही स्वच्छतागृहे 'पे अँड युज' तत्वावर आहेत.

हायकोर्टाचे निर्देश असूनही पालिकेने महिला स्वच्छतागृहांबाबत ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे समितीनेच पुढाकार घेतला. नियोजित ठिकाणी बांधकाम बंद होते. कनॉटमध्ये स्वच्छतागृहासमोर अतिक्रमण व दुरावस्था आहे. आयुक्तांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश देऊनही ते काढलेले नाही.

- स्मिता घोगरे, माजी उपमहापौर

...

महिला स्वच्छतागृहांबाबत अधिकाऱ्यांची काम करण्याची वृत्ती नसल्याचे सातत्याने जाणवते. पाहणी दौऱ्यात लवकरात लवकर काम करू, असे सांगण्यात आले, तरी यापूर्वीचे अनुभव पाहता आम्ही शेवटचा दोन महिन्यांचा अवधी दिला आहे.

-अॅड. माधुरी अदवंत, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवीध घटनांत चार दुचाकी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरीची पहिली घटना ५ फेब्रुवारी रोजी उस्मानपुरा भागात घडली. येथील भाऊसाहेब भाऊराव साळवे (वय ४५) यांची पल्सर दुचाकी चोरट्याने घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची दुसरी घटना देखील ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता गारखेडा भागातील डी मार्ट समोर घडली. पांडुरंग साळुबा पंडित (वय ४१ रा. काबरानगर) यांची दुचाकी होंडा शाईन चोरून नेली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारी रोजी चोरीची तिसरी घटना एमआयटी कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडली. शुभम पुंडलिक लोहार (वय २०, रा. एन अकरा, हडको) याची स्प्लेडर दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत चोरांनी गणेश जयाजी नलावडे (वय ३९ रा. ओहरगाव) यांची दुचाकी १६ फेब्रुवारी रोजी रात्री चोरून नेली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दुचाकी चोरांना गुन्हे शाखेकडून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी दिल्ली गेट परिसरात करण्यात आली. या संशयित आरोपींनी पाच दुचाकी चोरीचे गुन्हे कबूल केले आहेत.

दिल्ली गेट परिसरात दोन तरूण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी राजू छबुराव साळवे (वय ३० रा. कबीरनगर) आणि शिवाजी सुखदेव खरात (वय ३२ रा. चितेगाव ता. पैठण) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी हर्सूल, उस्मानपुरा, पैठण, पैठण एमआयडीसी आदी भागातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, सुधाकर राठोड, सुभाष शेवाळे, नवाब शेख, योगेश गुप्ता, लाल खान पठाण, नंदलाल चव्हाण, सिद्धार्थ थोरात, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसील परिसरातील अतिक्रमणांना नोटीस

$
0
0

वैजापूर: तहसील कार्यालय परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तहसीलदार सुमन मोरे यांनी अतिक्रमणधारकांना दोन दिवसांत अतिक्रमण काढण्याची नोटीस गुरुवारी बजावली. यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

तहसील कार्यालयाच्या परिसरात चहुबाजुने अतिक्रमणधारकांनी वेढा टाकला आहे. झेरॉक्स सेंटर, चहा विक्री, रसवंती असे डझनभर दुकाने येथे थाटल्यामुळे परिसराची कोंडी झाली आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडे तहसील परिसरात व्यवसायासाठी किती जणांना अधिकृत परवानगी दिली आहे, हे व्यवसाय वैध की अवैध आहेत यांची मागणी केली होती. त्यामुळे महसूल प्रशासनाने तत्काळ हालचाल करून तलाठी जितेंद्र विखणकर यांच्यामार्फत तहसीलदारांनी दुकानदारांना अधिकृत कागदपत्रे दोन दिवसात प्रशासनाकडे सादर करावे, अन्यथा अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाच्या पायाभूत सुविधांसाठी तीन कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शहर व तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतून तालुक्यास दोन कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तालुक्यासाठी पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतंर्गत हा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पैठण शहरातील यशवंतनगर रामनगर अंतर्गत सिमेंट रस्ता व गटार बांधकाम ७५ लाख, नवीन कब्रस्थान परिसरात सिमेंट रस्ता १४ लाख ९९ हजार, लक्ष्मीनगर अतंर्गत सिमेंट रस्ता १९ लाख ९९ हजार, रांजणगाव येथील दर्गा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे ९ लाख ९९ हजार, रांजणगाव ते दर्गा पर्यंत सिमेंट रस्ता २९ लाख ९५ हजार, एकलहरा येथील देवीच्या मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे ९ लाख ९९ हजार, वडवाळी गावात सिमेंट रस्ता ४० लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहाराचे बांधकाम १५ लाख, विद्युतीकरण १५ लाख, वाघाडी येथे विविध विकास कामा अंतर्गत पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ता २० लाख, वडवाळी येथे पाणीपुरवठा जलवाहिनी बदलणे २५ लाख, वडवाळी येथे पथदिवे बसविणे १५ लाख, वाघाडी येथे पथदिवे बसविणे १० लाख,असा निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच सुरू होणार असून आमदार संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नामुळे या कामांना मंजुरी मिळाल्याचे सभापती विलास भुमरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूचा धाक दाखवून फुलंब्रीत चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

येथील खुलताबाद रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयासमोरील धोंडिराम महादू बनसोड घरातून शुक्रवारी मध्यरात्री चोरांनी जवळपास दीड लाखांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धोंडिराम बनसोड हे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या घरात शिरण्यासाठी समोरून मार्ग नसल्याने चोर मागच्या बाजुने खिडक्या व दोरीच्या साह्याने गच्चीवर चढले. तेथील जिन्याच्या दाराची कडी तोडून दुसऱ्या मजल्यावरून घरात घुसले. यावेळी बनसोड हॉलमध्ये, तर पत्नी, सुन व दोन नाती बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या. चोरांनी चाकू व सळयांचा धाक दाखवून प्रत्येकाला गुपचूप राहण्याची धमकी दिली. प्रत्येक खोलीमधील कपाट तोडण्यात आले. बनसोड यांच्या पत्नी, सुन व नातींचे सर्व दागिने त्यांनी चोरून नेले. चोरांनी तिघांचे मोबाइल हिसकाऊन आपटले होते. चोर गेल्यानंतर तास भराने या कुटूंबाने मदतीसाठी हाका मारल्या. दरम्यान, फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतवस्तीवरील घरास हतनूरमध्ये आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील हतनूर शिवारातील शेतवस्तीवरील राहत्या छपरास आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. या घटनेत दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या, तर एक गाय भाजून जखमी झाली आहे.

हतनूर शिवारातील पंडित विठ्ठल जगताप हे गट क्रमांक १०८ मध्ये कुटुंबासह राहतात. सर्व कुटुंबीय शेतात उसाची लागवड करीत असताना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घराकडे धुराचे मोठे लोळ दिसले. त्यांनी व शेजारी राहणारे चंद्रकांत अकोलकर, रवींद्र अकोलकर, अंबादास जगताप यांनी घराकडे धाव घेतली. त्यावेळी राहत्या घराजवळील छपराला आग लागल्याचे दिसून आले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने ती लवकर आटोक्यात आली नाही. या आगीत दोन शेळ्या, मोटारसायकल, दोन सायकली, चार स्प्रे पंप, धान्य, कीटकनाशके, रासायनिक खते, कपडे, शेती अवजारे जळून खाक झाली. एक गाय भाजून गंभीर जखमी झाली. आगीचे नेमके करण समजू शकले नाही. या घटनेचा तलाठी डी. एस. एरंडे, पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयाकडे सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्म रक्षणासाठी संततीचे प्रमाण वाढवा: प्रज्ञासिंह

$
0
0

म. टा. प्रतिनिघी, औरंगाबाद

'हिंदूंनी एक मूल देशधर्म रक्षणासाठी देण्याचा निश्चय करून संतती वाढवण्याचा निश्चय करावा. भग म्हणजेच दान. जो दान करतो तो भगवान. त्यालाच समर्पण म्हणतात. त्यामुळे संततीला जन्म देऊन देशासाठी समर्पण करा,' असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी सोमवारी केले.

जनूभाऊ रानडे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत संत तुकाराम नाट्यगृहात प्रज्ञासिंह यांचे 'भगवा रंग त्यागाचा' या विषयावर व्याख्यान झाले. राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे होते. शनी साधिका डॉ. विभाश्री दीदी, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, नवनाथ आंधळे महाराज, अमरीश महाराज, शिवाजीराव शेरकर, राजीव जहागिरदार आदी उपस्थित होते. साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, 'देशाच्या सुरक्षेसाठी वर्दीची गरज नाही. वर्दी नसतानाही शहीद होण्याचा, समर्पित होण्याचा सर्वांना अधिकार आहे.

अधर्मियांनी हिंदूना आतंकवादी ठरवून विदेशींच्या हाती राजसत्ता देण्याचे मोठे षडयंत्र रचले होते. आमची राष्ट्रभक्ती भगवी आहे. ही जर अधर्मियांना आतंकवाद वाटत असेल, तर तो आम्हाला मान्य आहे. तुम्ही त्याला घाबरलेच पाहिजे. हजारो, लाखोंचे सैन्य ज्यांच्याकडे होते ते कमी सैन्य असलेल्या छत्रपती शिवरायांच्या सैन्याला घाबरत होते. शिवरायांना घडविण्याचे काम माता जिजाऊंनी केले. त्याप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलाला घडविण्याचे काम करावे.' कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक मकरंद कुलकर्णी आदींनी साध्वी प्रज्ञासिंग यांचा सत्कार केला. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात निर्मला चोभे, आशा जाधव, ताराबाई चौंडिये, संगीता मिसाळ, कल्पना त्रिभुवन, उषा सुखीया, चंदा कासलीवाल, डॉ. प्रज्ञा तल्हार, प्रज्ञा प्रभावती व सदाशिव जोशी, पूजा पंडित, उमा अग्रवाल, बलवीर कौर छाबडा, ललिता रिडलॉन आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणारे गौरव शर्मा, अक्षय शिंदे, विनोद साठे यांचाही सत्कार करण्यात आला.

औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी एकत्र या

साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, 'पद्मावत चित्रपटाने देशाचा इतिहास विकृत पद्धतीने आपल्या समोर आणला आहे. त्यास सर्वांनी विरोध केला पाहिजे. कारागृहात असताना एका गुन्हेगाराने पाकमध्ये बसून सुपारी दिली होती. माझे शरीर संपेल, पण राष्ट्रभक्तीची भावना कशी संपविणार. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुपर स्पेशालिटीच्या पद मान्यतेकडे डोळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी परिसरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, तीन ते चार महिन्यात ते पूर्ण होऊन उपकरणांसह हॉस्पिटल सज्ज होण्याचे संकेत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच घाटीकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) ११४७ पदांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव 'डीएमईआर'कडून वैद्यकीय शिक्षण मंत्रालयालाही पाठवण्यात आला आहे. या पदांना महिन्याभरात मान्यता मिळू शकते, असे वैद्यकीय संचालकांनी स्पष्ट केले आहे. या पदांच्या मान्यतेनंतरच हॉस्पिटल कधी सुरू होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. सद्यस्थितीत हे काम वेगात सुरू आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विजेच्या तारा व इतर काही कामे रखडल्यामुळे बांधकामही रखडले. त्यानंतरही हे काम मे-जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. या हॉस्पिटलसाठी केंद्र सरकारकडून सर्व उपकरणे, वैद्यकीय साहित्य दिले जाणार आहे. पदांची निर्मिती व नियुक्ती हा विषय राज्य सरकारचा असल्याने त्यांच्यामार्फत नियुक्ती होईपर्यंत हॉस्पिटल सुरू होणार नाही. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलचे बांधकाम होईपर्यंत पदनिर्मिती व नियुक्ती व्हावी यासाठी घाटी प्रशासनाने ११४७ पदांचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वीच डीएमईआरला पाठवला. तो पुढे वैद्यकीय मंत्रालयाला पाठवण्यात आला असून त्याच्या मान्यतेकडे डोळे लागले आहेत. या संदर्भातील मागणीचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमातही करण्यात आला होता.

पाण्यावर प्रक्रिया

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल परिसरात हॉस्पिटलच्या पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. तसेच सिव्हेज प्लँटही असणार आहे. 'एम्स' तसेच पीजीआय'च्या (चंडीगढ) धर्तीवर हॉस्पिटल उभे राहणार आहे. हॉस्पिटलमधील बांधकाम, सोयी-सुविधादेखील 'एम्स'च्या धर्तीवर असेल, असेही सांगण्यात आले.

हॉस्पिटलचे काम वेगात व अतिशय व्यवस्थित सुरू असून, टप्प्याटप्प्याने पदांना मान्यता मिळेल. पहिल्या वर्षात ४५० पदांना, दुसऱ्या वर्षी तेवढ्याच किंवा उर्वरित सर्व पदांना मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.

-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

डीएमईआरकडून ११४७ पदांचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. महिन्याभरात या पदांना मान्यता मिळेल, अशी आशा आहे. अर्थात, पदांच्या संख्येमध्ये काही किरकोळ बदल होऊ शकतात. सर्व पदांना एकाच वेळी मान्यता मिळून, टप्प्याने नियुक्ती होऊ शकते.

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपात विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दोन्ही योजनांची राज्यभरात ७००० कोटींची कामे सुरू आहेत. काही कामे प्रस्तावित आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांसाठी केंद्र सरकारकडून राज्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या कामात कंत्राटी कामगारांचे योगदान मोठे आहे. हे कंत्राटी कर्मचारी गेल्या कित्येक महिन्यांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची मागणी केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. वेळोवेळी मागण्या करूनही त्या न सुटल्याने ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहील, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संपात विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भराडीच्या शाळेला केंद्र शासनाकडून पुस्तके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील भराडी येथील सरस्वती भुवन प्रशालेत वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. या विभागाकडून शाळेला सलग तिसऱ्या वर्षी हिंदी भाषेतील ४२ हजार रुपयांची ग्रंथ संपदा प्रदान करण्यात आली.

ही ग्रंथ संपदा मुख्याध्यापक सुभाष साळवे यांनी ग्रंथपाल विजय रत्नपारखी यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी उपमुख्याध्यापक अशोक भारती, पर्यवेक्षक मारुती पाटील, संजय दाभाडे, जगदीश निकम, महेश बहाळकर, विजय दाभाडे, रावसाहेब कलवले, दत्तात्रय डोलारे, राजेंद्र तायडे, सोमिनाथ सैवर, संजय कुलकर्णी, प्रा. तानाजी मादळे हे उपस्थित होते.

शाळेतर्फे पुस्तकपेटी, माझे वाचन, माझे आवडते पुस्तक, वाढदिववसानिमित पुस्तक भेट, पॉकेट मनीतून पुस्तक खरेदी, रोज वर्तमानपत्र विकत घेऊन वाचणे, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रम राबवले जातात. ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी प्रा. प्रशांत अपसिंगेकर व प्रा. प्रमोद सुरडकर यांनी केंद्रीय हिंदी विभागाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला. या विभागाकडून शाळेला आतापर्यंत ८६ हजार रुपयांची पुस्तके प्राप्त झाली आहेत. यापूर्वी तैवानच्या बुद्ध फाउंडेशन तर्फे २० हजार रुपयांची व ग्रंथ भेट योजनेतून साहित्यिक व दानशुरांकडून ६० हजारांची पुस्तके मिळाली आहेत.

व्यक्तीच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्व आहे. त्यामुळे भराडी येथील शाळेत राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. हे उपक्रम संस्थेच्या इतर शाखेतही राबवण्यात येतील.

-ज्ञानप्रकाश मोदाणी, सहचिटणीस, स. भु. शिक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नक्षत्रवाडीत कचरा टाकण्यास सत्ताधाऱ्यांचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नक्षत्रवाडी भागात महापालिकेच्या मालकीच्या ३६ एकर जागेवर कचरा टाकू देण्याची विनंती महापालिकेच्या आयुक्तांनी केली. त्याला शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विरोध केला. त्यानंतर सफारी पार्कच्या जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी रवाना झाले. यापूर्वी बाभुळगाव शिवारात कचरा टाकण्यास पैठणचे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी विरोध केला होता.

कचरा डेपोविरोधात नागरिकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात कचराकोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी दुपारी सुभेदारी विश्रामगृहात शिवसेना नेते, पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. पालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या बैठकीला उपस्थित होते.

कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रे खरेदी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया अंतिम होईपर्यंत नक्षत्रवाडी येथील जागेवर कचरा टाकण्याची परवानगी मिळावी, अशी भूमिका आयुक्तांनी मांडली. त्याला आमदार शिरसाट यांनी विरोध केला. नक्षत्रवाडी भागाचा विकास झपाट्याने सुरू आहे. त्यामुळे या भागात कचरा टाकणे योग्य होणार नाही. कचरा टाकण्यासाठी अन्य जागेचा विचार करा, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी बाभुळगाव येथील जागेवर कचरा टाकण्यास शिवसेनेचे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी विरोध केला होता.

संजय शिरसाट यांनी विरोध केल्यानंतर बैठकीमध्ये पुन्हा एकदा सफारी पार्कच्या जागेचा पर्याय पुढे आला. या पर्यायाला शनिवारी त्या भागातील नगरसेवक रावसाहेब आमले व सुभाष शेजवळ यांनी विरोध केला होता. शेजवळ यांनी सोमवारी सफारी पार्कच्या जागेवर अगदी शेवटच्या कोपऱ्यात कचरा टाकण्यास हरकत नाही, असे मत व्यक्त केले. ही जागा शासनाची गायरान जमीन आहे. शेजवळ यांनी सुचवलेली जागा पाहण्यासाठी कार्यकारी अभियंता सिकंदर अली बैठकीनंतर रवाना झाले.

नगरसेवकांची आज बैठक

शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महापालिका संकटात सापडली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी उद्या मंगळवारी (२० फेब्रुवारी) सकाळी साडेअकरा वाजता सर्व ११५ नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित केली आहे. पालिकेच्या मुख्य सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत आयुक्त पालिका प्रशासनाची भूमिका मांडणार असून, त्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरकोंडी पाठोपाठ पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडी पाठोपाठ शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. ढोरकीनच्या जवळ ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीत पुन्हा बिघाड झाल्यामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिलीमीटर व १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनींमध्ये दोन दिवसांपूर्वी बिघाड निर्माण झाला होता. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळ १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे वेल्डिंग निखळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते, तर जायकवाडी येथील पंपहाउस जवळ ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. या कामासाठी पाणीपुरवठा सुमारे दहा तास बंद ठेवण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पाणीपुरवठा अद्याप पूर्वपदावर आलेला नाही.

पाणीबाणी सुरूच असताना सोमवारी सकाळी ढोरकीनच्या जवळ ७०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून गळती सुरू झाली. त्यामुळे या जलवाहिनीचा जायकवाडीपासूनचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी हे काम संपले. काम संपले असले, तरी पाणीपुरवठा बंद केल्याचा परिणाम जुन्या शहराला सोसावा लागणार आहे. जुन्या शहरातील काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाही. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक देखील बदलेल, असे पालिकेने कळविले आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शॉपर्स स्टॉपमधील ‘जीली शोरूम’वर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या देशभर गाजणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटीच्या फसवणूकप्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदीच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कारवाई करीत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी औरंगाबादेत प्रोझोन मॉल येथील शॉपर स्टॉपमधील 'जीली' हे दागिन्याचे दुकान सील केले.

'पीएनबी' घोटाळ्याचा सूत्रधार निरव मोदी याने देशातून पलायन केले आहे, मात्र या बँक गैरव्यवहारातील पैसा हिरे व्यापारात गुंतवण्यात आल्याने 'ईडी'ने निरव मोदीशी संबंधित गीतांजली डायमंड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांवर छापा टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार; 'ईडी'चे पाच अधिकारी असलेले पथक सोमवारी पहाटे चिकलठाणा विमानतळावर पोचले होते़ ते जालना रोडवरील एका हॉटेलात थांबले़ त्यानंतर वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आणि प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने सकाळी साडेदहा वाजता प्रोझोनमधील शॉपर्स स्टॉप या दालनातील गीतांजली डायमंड आणि दागिने विक्रीच्या दुकानात छापा मारला़

सकाळीच 'जीली शोरूम'वर आलेल्या या अधिकाऱ्यांनी शॉपर्स स्टॉपवर ताबा मिळविला होता़ त्यांनी सर्व कामगार आणि काही सुरक्षा रक्षकांना आतमध्येच थांबवून घेतले होते़ दालनाचे शटर ओढून तीन सुरक्षा रक्षकांना बाहेर थांबविले़ या पथकाने दालनातील मुद्देमाल आणि बिलांची तपासणीही केली. ही झाडाझडती जवळपास पाच तास सुरू होती. या अधिकाऱ्यांनी प्रोझोन व्यवस्थापनाजवळ गीतांजलीच्या व्यवहाराची चौकशी केल्याची माहिती दालनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. किती मुद्देमाल जप्त केला, काय चौकशी करण्यात आली याबाबत पथकातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती सांगण्यास नकार दिला.

व्यवहाराची चौकशी होणार

पीएनबी बँक फसवणूकप्रकरण उघड झाल्यानंतर 'गीतांजली'च्या औरंगाबादमधील 'जीली' या दागिन्यांच्या दुकानातून किती व्यवहार झाला; तसेच या काळात किती मालाची विक्री करण्यात आली. याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशीही संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रकरण उघड होण्यापूर्वी दुकानात असलेला स्टॉकची माहिती घेऊन सध्या दुकानात शिल्लक असलेल्या मालाचीही माहिती घेण्याचे काम 'ईडी'कडून केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्षेपाकडे दुर्लक्ष; निविदा करणार अंतिम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राप्त झालेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करीत दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यांची निविदा अंतिम करण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत. यासाठी शासनाच्या आदेशाचा हवाला दिला जात असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. हे सर्व रस्ते व्हाइट टॉपिंगची केली जाणार आहेत.

राज्य शासनाने महापालिकेला शहरातील मुलभूत सोईसुविधांसाठी शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. या निधीतून फक्त रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. शासनाने विशेष अनुदान मंजुरीचे पत्र जून २०१७ मध्ये पालिकेच्या नावे पाठवले. रस्त्यांची निविदा काढा, संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर द्या, त्यानंतर शंभर कोटींचा निधी महापालिकेच्या नावे जमा केली जाईल, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जून महिन्यात निधीबद्दलचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शंभर कोटींच्या निधीतून किती आणि कोणत्या रस्त्यांची कामे हाती घ्यायची याची यादी तयार करण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासनाने सहा महिने घालवले. तयार केलेल्या रस्त्यांच्या यादीला गुपचूप मान्यता घेण्यात आली. रस्त्यांची यादी करण्यावरूनही वादविवाद निर्माण झाले होते. ही यादी आता तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रियेत अडकली आहे. प्राप्त निविदांमध्ये तांत्रिक चुका झाल्याच्या कारणावरून फेरनिविदा काढण्यात आल्या. शंभर कोटींच्या रस्त्यांसाठी तेरा कंत्राटदारांनी निविदा भरल्याचे स्पष्ट झाले. पण, या शंभर कोटींच्या निधीसोबतच पन्नास कोटींचे रस्ते डिफर्ड पेमेंटमधून करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठी दहा कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. अशा एकूण दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी २३ निविदा प्राप्त झाल्या आहेत.

ज्याची निविदा स्वीकारली जाण्याची शक्यता आहे, त्या कंत्राटदाराने शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर शपथपत्र न देता लेटरहेडवर शपथपत्र दिले आहे, प्रत्येक निविदेच्या सोबत स्वतंत्रपणे अनामत रक्कमेचा चेक जोडणे आवश्यक असताना फक्त एकच चेक जोडण्यात आला, असा आक्षेप घेण्यात आला आहे. हे दोन्हीही आक्षेप गंभीर असून फेरनिविदा काढा, अशी मागणी काही कंत्राटदारांनी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आक्षेप किरकोळ असून त्याकडे दुर्लक्ष करून निविदा अंतिम करा, असे शासनाचे आदेश आहेत. या आदेशाचा आधार घेवून महापालिका निविदा अंतिम करणार आहे. फेब्रुवारीअखेर निविदा अंतिम करून मार्चच्या पहिल्या आठवड्यात वर्कऑर्डर देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन लगेच केले जाणार आहे.

१०० कोटी

शासनाचे विशेष अनुदान

३१ रस्त्यांची कामे

शंभर कोटींच्या निधीमधून

५० कोटींचे रस्ते

डिफर्ड पेमेंटमधून

२० रस्त्यांची कामे

डिफर्ड पेमेंटमधून होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे प्रश्न दुर्लक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. चटोपाध्याय वेतनश्रेणी, शिक्षकांना स्थायी करणे, पाठ्यपुस्तके वितरण निधीचे वाटप न होणे यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तब्बल वर्षभरापासून स्थायी शिक्षणाधिकारी नसल्याने प्रशासनाकडून होणारी दिरंगाई आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शिक्षक मात्र अडचणीत सापडले आहेत.

जिल्हा परिषदेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या दहा हजारांच्या आसपास व दोन हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांतील शिक्षकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शिक्षकांचे पगार एक तारखेला होणे अपेक्षित असते, पण ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी, स्थानिक कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता, यामुळे पगार कधीच वेळेवर होत नाही. त्यामुळे बँकांचे कर्जहप्ते फेडण्यास अडचणी येतात. सर्व शिक्षक संघटनांनी वारंवार मागणी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. जुनी पेन्शन योजना लागू होणार की डीसीपीएस पद्धती याबाबत प्रशासनातच संभ्रम आहे. २००५ पासून शिक्षकांची कापली गेलेली रक्कम नेमकी कोणत्या पद्धतीने बचत करून ठेवली आहे, याची माहिती शिक्षकांना मिळत नसल्याची तक्रार आहे.

जाचक अटींमुळे शालेय पोषण आहाराची देयके प्रलंबित आहेत. अशा अनेक अडचणी आहेत. जिल्हा परिषदेला एक एप्रिलपासून कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे पदाधिकारीही शिक्षकांच्या प्रश्नी गंभीर नसल्याने दुहेरी फटका बसत आहे. प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या महिन्यात विविध शिक्षक संघटनांनी धरणे आंदोलन करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार कधी असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

बदल्यांना मुकण्याची भीती

जिल्हा बदल्यांचा मोसम आता सुरू होईल. ग्रामविकास खात्याने गेल्या वर्षीपासून ऑनलाइन बदल्या सुरू केल्या. यंदाही तीच प्रक्रिया राबविली जाणार असून त्यासाठी इच्छुकांनी पोर्टलवर अर्ज भरावे लागणार आहेत. ही मुदत पुढच्या महिन्यात संपेल. त्यासाठी शिक्षक स्थायी असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अद्याप हजारो शिक्षकांना स्थायी करण्याची प्रक्रिया राबविणे बाकी आहे. त्यामुळे अनेक शिक्षक बदल्यांना मुकण्याची भीती आहे.

शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून त्याची सोडवणूक झालेली नाही. वेतनाच्या बाबतीत गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण अनेक शिक्षकांचे कर्जाचे हप्ते महिन्याच्या पगाराशी बांधले गेले आहेत. वेळेवर पगार होत नसल्याने चेक बाउन्स होतात. परिणामी भविष्यात अडचणी होतात. शिक्षकांच्या किमान अडचणी तरी सोडविल्या गेल्या पाहिजेत.

-महेंद्र बारवाल, विभागीय प्रसिद्धीप्रमुख, शिक्षक भारती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’त ऑनलाइन नोंदणीचा वेग मंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आरटीई' अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट मंद असून अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. आतापर्यंत सात हजार अर्ज ऑनलाइन दाखल झाले असून नोंदणीत अडचणी येत असल्याने अद्याप तीन हजार ७०० अर्ज प्रलंबित आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. २०१८-१९ची नोंदणी प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून आठ दिवसांत सात हजारपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झालेली आहे. या प्रक्रियेतून औरंगाबाद जिल्ह्यातील ५७३ शाळांमधील पाच हजार राखीव जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. अर्जाची संख्या जास्त असली तरी, वेबसाइटची गती मंद असल्याने पालकांना ऑनालाइन प्रक्रिया करणे अवघड झाले आहे.

आरटीईची प्रक्रिया एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रतिपूर्ती रक्कमेवरून शाळा व शासन यांच्यात वाद सुरूच आहे. त्यामुळे शाळांकडून प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया शिक्षण विभागानेच करून घेतल्याचे समोर आले आहे. बहिष्कारामुळे शाळांनी नोंदणीची प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही. विभागाने शाळांचा यूजर-आयडी वापरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शाळांची अनास्था लक्षात घेता दोन महिन्यांत प्रक्रिया कशी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.

मोफत प्रवेश प्रक्रियेतील शाळा… ५७३

प्रवेश संख्या…………………………..५१००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे जानेवारीचे वेतन बीडीओंकडे जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेतनप्रणाली पोर्टलमध्ये बिघाड झाल्याने गेल्या महिन्यात शिक्षकांच्या वेतनास विलंब झाला होता. वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली झाल्या नव्हत्या. दीर्घ प्रतीक्षेनंतर शिक्षकांच्या जानेवारीच्या वेतनाची रक्कम गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) खात्यावर जमा करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगर पालिका, अनुदानित खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते हे सात नोव्हेंबर२०१२च्या शासन निर्णयाद्वारे शालार्थ वेतन प्रणालीद्वारे अदा करण्यात येत आहेत. शालार्थ वेतन प्रणालीद्वारे ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाही विलंब होत असल्याच्या शिक्षक संघटनांच्या तक्रारी होत्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप,कैलास गायकवाड, जे. के. चव्हाण, हारूण शेख, प्रवीण पांडे, प्रशांत हिवर्डे, संजय बागुल, शांताराम पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण यांची भेट घेऊन ही अडचण दूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करत शिक्षकांच्या वेतनाची रक्कम बीडीओंच्या खात्यावर जमा केली. याबद्दल शिक्षक संघाने प्रशासनाने धन्यवाद दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images