Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धर्माच्या आधारे जिंकलेले पक्ष ठरले निष्क्रीय

$
0
0

औरंगाबाद : धर्माच्या आधारे निवडून आलेले पक्ष आता निष्क्रिय ठरत आहेत. जनतेचा अपेक्षाभंग होत आहे. यामुळे अशा पक्षाची निष्क्रियता जनतेसमोर मांडण्याची गरज आहे, अशी टीका काँग्रेस अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस यांनी 'एमआयएम'चे नाव न घेता केली.

काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीची मराठवाडा विभागीय बैठक मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस यांच्या निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, परतूर, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड येथील काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे मत हमद चाऊस यांनी मांडले.

यावेळी सत्तार इनामदार, बदर चाऊस, फारूख शेख, असिकोद्दिन खतीब, अब्दुल रऊफ, अमजद पठाण, सुलतान हसन, मजीद बागवान, मसियोद्दिन सिद्दिकी, मोईन कुरेशी, साजेद कुरैशी, सरदार खान, नदीम सौदागर, रवी मगरे, शेख मतीन सह खालेद पठाण आणि अकिल पटेल यांची उपस्थिती होती.

…अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नदीम जावेद यांची निवड करण्यात आली आहे. ते मुंबईत पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. त्या बैठकीपूर्वी आपल्या जिल्हा, शहर कार्यकारिणी तयार करून देण्याचे आवाहनही चाऊस यांनी केले.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकारी बंगल्याच्या आवारातून चंदनचोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चंदन चोरांनी चक्क जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्याला लक्ष्य करीत चंदनाची तीन झाडे कापून नेली. हा खळबळजनक प्रकार २७ जुलै रोजी रात्री घडला असून तो रविवारी सकाळी उघडकीस आला. बंगल्यावरील बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांपासून अवघ्या काही अंतरावरील झाडे कापून नेण्यात आली आहेत. हा प्रकार बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात चंदन चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हीआयपी रोडवरील किलेअर्क भागात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचा शासकीय बंगला आहे. या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांचा पहारा असतो. जिल्हाधिकारी चौधरी हे २७ जुलै रोजी दोन दिवसांसाठी बाहेरगावी दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान, शुक्रवारी रात्री दोन चोरांनी बंगल्याला खेटून असलेल्या शासकीय रोपवाटिकेच्या भिंतीवरून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. बंगल्याच्या आवारातील चंदनाची तीन झाडे कटरने कापली. दोरीच्या साह्याने ही झाडे रोपवाटिकेच्या आवारात फेकली. त्यानंतर दोरीचाच वापर करीत दोघेही पुन्हा बंगल्याबाहेर रोपवाटिकेत गेले. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांच्या खोलीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा प्रकार घडला. चोरट्यांनी वॉल कंपाउंडजवळ त्यांचे बुटाचे जोड सोडले, तर रोपवाटिकेत एका चोरट्याचे जाकीट सापडले. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर बंगल्यातील शिपाई शेरखान जाफरखान यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात चंदन चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माग काढण्यात श्वानाला अपयश

जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीस गेल्याचे समजताच पोलिस हादरले आहेत. बेगमपुरा पोलिस, गुन्हे शाखा, श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकातील स्विटी श्वानाने चोरांचे बुट व जाकेटच्या वासाने माग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु चोर वाहनाने गेले असल्याने श्वानाला माग काढण्यात अपयश आले.

\Bझांडाची माहिती मिळाली कशी\B

झाड चोरायचे असल्यास त्याची संपूर्ण माहिती चंदनचोर मिळवितात. पक्की माहिती मिळाल्यानंतर ते योजनाबद्धरिद्या झाड कटरने कापून चोरतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवारात चंदनाची झाडे आहेत ही माहिती चोरांना कशी मिळाली, हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच अशीच चोरी

तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी आमदार अतुल सावे यांच्या अंजली टॉकीज येथील निवासस्थानाच्या परिसरातूनही चंदनाचे झाडे तोडून नेले होते. जिल्हाधिकारी, आमदार यांच्या निवासस्थानी पोलिसांचा पहारा असतो. त्यातूनही चोरटे अशी चोरी कशी करतात, असा प्रश्न या घटनांनी उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानाला पक्षी धडकला, जेट एअरवेजचे उड्डाण रद्द

$
0
0

(बातमी फ्लायर करावी. विमानाचे व पक्ष्याचे कार्टून वापरावे.)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

कचऱ्याच्या समस्येने शहरात आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा राहिलेला असतानाच याच कचऱ्याने आता विमान वाहतुकीलाही अडथळा निर्माण केल्याचे दिसत आहे. विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या कचऱ्यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यातील एक पक्षी रविवारी विमानाला धडल्याने जेट एअरवेजचे उड्डाण रद्द करावे लागले. मुंबईहून औरंगाबादला आलेले हे विमान उतरताना पक्षी त्याला धडकला व नंतर याच विमानाचा मुंबई प्रवास थांबविण्यात आला.

औरंगाबादला येणाऱ्या जेट एअरवेजच्या या विमानाने मुंबई विमानतळावरून पाच वाजून दहा मिनिटांनी उड्डाण केले. सहा वाजून २० मिनिटांनी चिकलठाणा विमानतळावर उतरणार होते. त्याचवेळी या परिसरात उडणारा एक पक्षी विमानाला येऊन धडकला. प्रसंगावधान राखत वैमानिकाने विमान सुखरुप विमानतळावर उतरविले.

हेच विमान पुन्हा सहा वाजून ४० मिनिटांनी उड्डाण करणार होते. मुंबईला जाण्यासाठी रविवारी सकाळी ८० प्रवासी विमानतळावर आले होते. मात्र, पक्ष्याची धडक बसलेली असल्याने वैमानिकांनी विमानाची तपासणी केली असता या धडकेत विमानाच्या इंजिनचे काही भाग बिघडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. याच विमानातून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे देखील मुंबईला जाणार होते. त्यानंतर ते पुणेमार्गे मुंबईला रवाना झाले. काही प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. तर उर्वरित प्रवाशांना जेट बोईंग ७३७- ९०० या विमानाने सायंकाळी मुंबईला पाठविण्यात आले.

मुंबईहून मागविले पार्ट्स

जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याने (बर्ड हिटिंग) त्याचे उड्डाण रद्द करावे लागले. त्याच्या इंजिनचे खराब झालेले भाग मुंबईहून मागविण्यात आले, अशी माहिती जेट एअरवेजच्या सूत्रांनी दिली.

कचऱ्याने वाढले पक्षी

नारेगाव येथील कचरा डेपोमुळे या परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा विमानाच्या सुरक्षित वाहतुकीवर विपरित परिणाम होत असल्याचा अहवाल विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वीच दिला होता. या अहवालानंतर नारेगाव कचरा डेपो बंद करण्याची कारवाई करण्यात आली होती. गेल्या सात महिन्यापासून शहरात कचऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. विमानतळाच्या आसपासही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे विमानाजवळून पक्षी उडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच एक पक्षी आज विमानाला धडकल्याची ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानतळावरून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा पहिला जत्था रविवारी (२९ जुलै) रवाना झाला. जामा मशीद येथील तात्पुरत्या हज कॅम्पमधून विशेष बसने यात्रेकरूंना विमानतळावर नेण्यात आले. तेथून हज यात्रेकरू 'फ्लाय नाज' या विमानातून जेद्दाहकडे निघाले.

औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्माबादसह अहमदनगर येथील तीन हजार २०० हज यात्रेकरूंची यात्रेसाठी निवड करण्यात आली आहे. औरंगाबादहून विमान प्रवास करण्यासाठी २२ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. यामुळे तीन प्रवास २००पैकी जवळपास ५५० यात्रेकरूंनी औरंगाबाद विमानतळावरून थेट यात्रेसाठी जाण्यासाठी तयारी दाखविली आहे. रविवारी (२९ जुलै) औरंगाबाद विमानतळावरून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची जामा मशीद येथील तात्पुरत्या कॅम्पमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हजला जाण्यापूर्वी नातेवाईकांशी भेट घेणे, एहराम बांधणे आदी प्रक्रिया पूर्ण करून यात्रेकरू बसमधून विमानतळाकडे रवाना झाले. विमानतळावर यात्रेकरूंचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी हुज्जाज कमिटीचे उपाध्यक्ष अशरद इंजिनिअर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. औरंगाबाद विमानतळावरून 'फ्लाय नाज'च्या 'एक्सवाय ५३०९' या विमानाने यात्रेकरूंना रवाना करण्यात आले. जेद्दाहकडे रवाना झालेल्या पहिल्या विमानातून औरंगाबादहून ७८ पुरूष, ६८ महिला यात्रेकरू आहेत. हे विमान दुपारी चार वाजून ४० मिनिटांनी जेद्दाहकडे रवाना झाल्याची माहिती हुज्जाज कमिटीच्या सदस्यांनी दिली.

……………मुंबईहून २६५० यात्रेकरू जाणार

औरंगाबादहून विमानाने जेद्दाहला जाण्यासाठी यात्रेकरूंना २२ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागत असल्याने अनेकांनी मुंबईहून हज यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातून निवडण्यात आलेले तीन हजार २००पैकी ५५० यात्रेकरू औरंगाबादहून जाणार आहेत. उर्वरित दोन हजार ६५० यात्रेकरून हे मुंबईहून जाणार असल्याची माहिती हुज्जाज कमिटीने दिली.

\B…………पहिल्या विमानाने तीन लहान मुले रवाना\B

रविवारी पहिल्या विमानाने हज यात्रेकरू हजला औरंगाबाद विमानतळावरून रवाना झाले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. यात सर्वात लहान मुलगा हा रय्यान खान असून, दहा वर्षांचा रयानउल्लाह खान आणि जुनैरा सईदुल्लाह खान या लहान मुलांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकागृहातील गरजू मुलींना कपडे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी येथील विद्यादिप बालीकागृहातील गरजू मुलींना कपडे वाटप करण्यात आले. गुरुवारी हा कार्यक्रम सायंकाळी पार पडला. सामाजिक कार्यकर्ते कमलेश चांदणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अजय अवसारे यांच्या वतीने प्रत्येक मुलीला कपड्याचे दोन जोड देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून फादर संजय निर्मळ, प्रमुख पाहूणे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पीएसआय सचिन मिरधे,, एपीआय खनके, प्रा. सोमनाथ वांजरवाडे, प्रा. मधुकर खंदारे व पगारीया फाऊंडेशनचे वैभव घुले व महेश वैद्य यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वैभव घुले यांनी करून दिला. यावेळी बालगृहाच्या अधिक्षीका सिस्टर विनसेनटिना यांनी उपस्थीतांचे आभार मानत समाजातील मान्यवर पालक, राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसांचे कार्यक्रम बालगृहातच घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी मॅथ्यु सनी काळे, रेमो श्रीसुंदर, श्रीचंद जाधव यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालरोगांवर उपचारासाठी संशोधनाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'काही वर्षांपूर्वी प्रयत्न देशात बालरोगांचे वाढते प्रमाण खुपच वाढलेले होते. सध्याच्या उपचार पद्धतीने बालरोग शल्यचिकित्सकांनी त्यावर नियंत्रण मिळवले. मात्र, आगामी काळात बालरोगांवर अधिक प्रभावी उपचार करण्यासाठी नवीन पिढीने संशोधन करण्याची गरज आहे,' असे मत बालरोग शल्यचिकित्सक डॉ. आर. जे. तोतला यांनी व्यक्त केले.

शहरात आयोजित पेडियाट्रिक सर्जन्सच्या दोन दिवसांच्या परिषदेचा रविवारी (२९ जुलै) समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या परिषदेत बालरोग आणि बालरोग शल्यचिकित्सा विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या विविध सत्रांमध्ये १५ विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शोध निबंध सादर करण्यात आले. यात डॉ. मृदुल, डॉ. तरूण गुप्ता, डॉ, सौदर्या आणि डॉ. सौरभ तिवारी यांच्या शोधनिबंधांना पुरस्कार देण्यात आले. परिषदेला जोडून २८ जुलै रोजी झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण परिषदेत अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. तोतला यांची एकमताने निवड करण्यात आली. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. आर. जे. तोतला, डॉ. विद्यानंद देशपांडे आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाराष्ट्र चॅप्टर ऑफ असोसिएशन ऑफ पेड्रीयाट्रिक सर्जन्सचे अक्ष्यक्ष डॉ. राजेंद्र सावजी, सचिव डॉ. मंजूषा सेलूकर, कार्यकमास इंडीयन असोसिएशन ऑफ पेड्रियाट्रिक सर्जन्सचे अध्यक्ष डॉ. केतन पारिख, सचिव डॉ. प्रकाश अग्रवाल यांची उपस्थिती होती.

\B२०२० पर्यंत अध्यक्षपद \B

ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक (पेडियाट्रिक सर्जन) डॉ. आर. जे. तोतला यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेड्रियाट्रिक सर्जन्सच्या अध्यक्षपदी २०२० या वर्षांपर्यत एकमताने निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कॅमेऱ्यांचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सिंग्नल व वाहतूक नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्पाय कॅमेऱ्यांसह हँडी कॅमेरे दिले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपाली घाटे घाडगे यांनी दिली.

जालना रोडवरील वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही. या रस्त्यावरील वाहनांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महर्षी चौकातील सिग्नलमध्येही बदल करण्यात आला आहे. येथील सिग्नल व्यवस्था सुरळीत केल्यानंतर सिंग्नलवरील कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय जालना रोडच्या डाव्या बाजुला वळण्यासाठी बॅरिगेडस लावले आहेत. यामुळे चौकात येऊन उभे राहणाऱ्या वाहनांची संख्या कमी झालेली आहे. याच प्रमाणे आता शहरातील महावीर चौक, आकाशवाणी चौक, हर्सूल टी पॉईंट, सिडको चौकात वाहतूक पोलिसांना ध्वनीक्षेपक देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जात आहे.

जालना रोडसह इतर रस्त्यांवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाच चौकांतील वाहतूक पोलिसांना पाच स्पॉय कॅमेरे आणि पाच हँडीकॅम देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याचा उपयोग हा वाहतूक नियम तोडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी केला जाणार आहे. या कॅमेऱ्यातून मिळालेल्या चित्रीकरणाचा वापर पोलिसांसोबत वाद घालणारे, तसेच वारंवार वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपाली घाटे घाडगे यांनी दिली.

………

\Bअडचणीच्या चौकांची पाहणी करणार \B

वाहतूक चौकांमधील समस्यांची पोलिस उपायुक्त दीपाली घाटे घाटगे हे स्वत: पाहणी करणार आहेत. या चौकातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा प्रकरणात हैदराबादेतून मास्टरमाइंड जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट नोटा प्रकरणातील मास्टर माइंडला उस्मानपुरा पोलिसांनी हैदराबाद येथून जेरबंद केले. इम्रान खान पठाण करीम खान पठाण (वय ३०, रा. कंधार, दर्गाहपूर, नांदेड, ह. मु. मेंहदीपट्टणम, हैदराबाद), असे या आरोपीचे नाव आहे. त्याला रविवारी कोर्टात हजर केले असता ३१ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे.

उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने शहरात बनावट नोटा चलणात आणणाऱ्या दोघांना अटक केली होती. यामध्ये दिशांत राजा साळवे व नांदेड येथील सय्यद मुस्तदिक अली सय्यद सादात अली यांचा समावेश आहे. या दोघांच्या ताब्यातून सव्वा सात लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिस चौकशीत या दोन आरोपींनी इम्रान पठाणचे नाव सांगीतले होते. पथकाने शनिवारी पहाटे हैदराबाद गाठून इम्रानला अटक केली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, निरीक्षक प्रल्हाद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, संतोष सिरसाट, मनोज बनसोड, संजयसिंग ढोबाळ यांनी हि कारवाई केली. रविवारी आरोपी इम्रानला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

\Bदुबईत सात वर्ष वास्तव्य\B

आरोपी इम्रान पठाण हा उच्चशिक्षित असून त्याने वेब डिझायनिंगचा कोर्स केला आहे. दुबईत तो एका कंपनीत सात वर्ष नोकरीला होता. आरोपी मुस्तदिक अलीसोबत त्याची ओळख झाली. यानंतर बनावट नोटा स्कॅन करून त्या कट करून चलनात आणण्याचा धंदा दोघांनी सुरू केला होता. आरोपी मुस्तदिकच्या सासरवाडीत या नोटा तयार करण्यात येत होत्या. पोलिसांनी या घरावर छापा टाकत लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर आदी साहीत्यासह पावणेदोन लाखांच्या आणखी बनावट नोटा जप्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर गद्दारांचा बंदोबस्त करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सरकारसोबत बसून मराठा समाजासोबत गद्दारी करण्याचा प्रयत्न करील अशा मराठा बांधवांचा बंदोबस्त करू, सरकारने आंदोलकांतील बांधवांना विचारल्या; तसेच जोपर्यंत सर्वांची संमती असणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही,' अशी शपथ रविवारी (२९ जुलै) शिवचरणी घेऊन समन्वयकांनी आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाची मेगा भरती रद्द करावी व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी क्रांतीचौक येथे आंदोलन सुरू असून, आंदोलक दररोज वेगवेगळ्या मार्गाने शासनाचा निषेध करून आरक्षणाची मागणी करत आहेत. 'पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आम्ही मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होईल, असा कोणतेही कृत्य करणार नाही; तसेच आमच्या हातून असे कोणतेही कृत्य घडणार नाही, मात्र जे मराठा बांधव सरकारसोबत बसून मराठा समाजासोबत गद्दारी करण्याचा प्रयत्न करतील,' अशा बांधवांचाही आपण बंदोबस्त केल्या शिवाय राहणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. सकाळी आंदोलनाला आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही भेट देऊन तरुणांना मार्गदर्शन केले.

\Bमुख्यमंत्र्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा\B

यावेळी झालेल्या भाषणामध्ये विनोद पाटील म्हणाले की, आतापर्यंत विविध आंदोलन, निवेदनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यापर्यंत मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या पोचल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा चर्चा करण्यात आता काही अर्थ नाही. सरकारने कुणाशी बोलावे, हे त्यांनी ठरवावे. त्यांनी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षण; तसेच इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, त्यानंतर सरकारने घेतलेली भूमिका सर्व समन्वयक, आंदोलकांना मान्य असेल तरच आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

\Bआसूड ओढून निषेध\B

मराठा आरक्षणाची मागणी तीव्र असतानाही सरकार याबाबत निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ; तसेच आम्ही समाजाला न्याय मिळवून देण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो, असे म्हणत आंदोलकांनी स्वतवर आसूड ओढून आंदोलन केले. पारंपारिक वाद्य, पोषाखात केलेले हे आंदोलन पाहण्यासाठी क्रांतीचौकात मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लखमापुरात कापसावर बोंडअळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे हंगामपूर्व पेरणी केलेल्या कापसावर बोंडअळी आढलली आहे. सोयगाव तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बोंडअळीचे पतंग आढळले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गेल्या हंगामात बोंडअळीचा मोठा फटका कापूस उत्पादकांना सहन करावा लागला. यामुळे यंदा कृषी विभागाने जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. क्रॉपसॅप योजना राबविण्यासाठी दररोज कापसाची पाहणी करून अहवाल सादर केला जात आहे. गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील श्रीकांत कोरडकर यांच्या शेतात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांच्या पथकाने नुकतीच भेट देऊन कपाशीची पाहणी केली. कपाशीची डोमकळी फोडून पाहिली असता त्यात गुलाबी बोंडअळीचे पंतगे आढळून आले. कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार, डॉ. एन. आर. पतंगे, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठके, रामेश्वर ठोंबरे, मंडळ कृषी अधिकारी मोरे, कृषी पर्यवेक्षक तुपे, काळे आदींचा या पथकात समा‌वेश होता.

\Bउपाययोजना \B

कापूस पिकाची नियमित पाहणी करावी, एकरी आठ याप्रमाणे ४० कामगंध सापळे लावावेत. ज्या झाडावर डोमकळी दिसेल, तिचा नायनाट करावा. हे सर्व एकात्मिक पद्धतीचे उपाय हे अपुरे पडल्यास २० मिली प्रोफिनोफॉस हे १० लिटर पाण्यास मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी, असे आवाहन डॉ. एन. आर. पतंगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समरगीत एकात्मता निर्माण करते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समरगीतातून राष्ट्रभक्ती, एकात्मता व प्रेरणा निर्माण होते. समरगीत सादरीकरण आव्हानात्मक असते' असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक प्रा. प्रताप कोचुरे यांनी केले. ते समरगीत पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने औरंगाबाद गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उस्मानपुरा येथील ललित कला भवनात मंगळवारी झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायक प्रा. प्रताप कोचुरे, व्यवस्थापक संजय बीडकर-कपाटे व सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समरगीताच्या वैशिष्ट्यांवर कोचुरे यांनी मार्गदर्शन केले. 'समरगीत प्रत्येकात राष्ट्रप्रेम निर्माण करते. अंगावर रोमांच उभे करुन राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे काम समरगीत करते. त्यामुळे सादरीकरण तेवढेच समर्पक झाले पाहिजे' असे कोचुरे म्हणाले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. रमेश धोंडगे, सोमनाथ भालेराव व मेधा भगुरकर यांनी केले. या स्पर्धेत कामगार कल्याण भवन बजाजनगर या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक ललित कला भवन, सिडको या संघाने मिळवले. भालचंद्र जगदाळे यांनी प्रास्ताविक केले आणि विजय अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्र संचालक जिज्ञेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी स्पर्धक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकार तरुण दगड मारतील !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी करा आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नका. शुल्कामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेली मुले उद्या बेकार होऊन दगड मारल्याशिवाय राहणार नाहीत' असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संस्थाचालक, प्राचार्य व शासकीय अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. नाट्यगृहात शुक्रवारी झालेल्या कार्यशाळेला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, उच्च शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे, उच्च शिक्षण तंत्र सहसंचालक महेश शिवणकर आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, अनेक महाविद्यालये पूर्ण शुल्क वसूल करीत आहेत. शासकीय अध्यादेश झुगारून हा प्रकार घडल्यामुळे जनजागृतीसाठी कार्यशाळा झाली. यावेळी शितोळे यांनी संस्थाचालकांना खडे बोल सुनावले. 'पैशामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू देऊ नका. पन्नास टक्के शुल्क सवलत हा शासनाने दिलेला हक्क असून त्याची कडक अंमलबजावणी करा. शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हे विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालयांचे कर्तव्य आहे. या योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कार्यशाळा घेण्याची वेळ आली. महाविद्यालयांना आणि संस्थाचालकांना तांत्रिक अडचणी असल्यास सांगा. शासन दरबारी पाठपुरावा करुन सोडवता येतील असे शितोळे म्हणाले. तेजनकर यांनी विद्यापीठाने पाठवलेल्या शासन आदेश व पत्राची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेसाठी पुढाकार

किशोर शितोळे यांनी कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला होता. ५० टक्के फी सवलत योजनेशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता प्रतिमाह तीन हजार रुपये विद्यार्थ्यांना कसा देता येईल याची माहिती शितोळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉब कार्डसाठी बेरोजगारांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

पुंडलिकनगरमधील तिरूमला मंगल कार्यालयामध्ये बेरोजगार तरुणांनी जॉब कार्डसाठी मोठा गर्दी केली होती. जॉब कार्ड घेण्यासाठी आलेल्या या युवकांना नॉलेज वाढवा, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नवीन संधीचा शोध घ्या, असे आवाहन मान्यवरांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या हस्ते विविध कंपन्यांच्या जॉब कार्ड वाटपाची सुरुवात करण्यात आली. रविवारी (२९ जुलै) घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ९०० युवक, युवतींनी नोकरीसाठी अर्ज भरून दिला. यात पदवी, पदव्यूत्तर तसेच दहावी बारावी असे शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांचा सहभाग होता. याच कार्यक्रमात ५०० बेरोजगार युवकांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपाचे शिरीष बोराळकर, भाजपचे महापालिका गटनेते प्रमोद राठोड, माजी नगरसेवक दामु अण्णा शिंदे, माजी नगरसेवक अनिल मकरिये आदींची प्रमुख उपस्थिती होती. तिरूमला मंगल कार्यालयासह कुलस्वामिनी मंगल कार्यालयातही जॉब कार्ड वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू रविदास सत्यशोधक समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मानवतावादी गुरू व आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहु महाराज यांची जयंती व साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मृतीप्रित्यर्थ गुरू रविदास सत्यशोधक समाजातर्फे रविवारी (२९ जुलै) समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्तांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमला गुरू रविदास सत्यशोधक समाजाचे प्रदेश महासचिव ग. मा. पिंजरकर, डी. पी. रामेकर, सुजाता बाखरे, कल्पना निंभोरे, शाम धनतोले, डॉ. कैलास बावस्कर, उषाताई वाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेले विष्‍णू पहारे यांच्यासह दहावी व बारावी मधील ६०, पदवी, पदव्युत्तर स्तरावरील ५० गुणवंत विद्यार्थी व समाजातील २५ सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सुजाता बाखरे यांनी दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी भाषणात गुरू रविदार सत्यशोधक समाजाचे प्रदेश महासचिव ग. मा. पिंजरकर म्हणाले की, भारताच्या तमाम बहुजन समाजाचे हित फक्त संविधानामध्ये आहे. यावेळी रविदास सत्यशोधक मासिकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष लोखंडे, बी. सी. वाडेकर, अशोक डांगे, अशोक वाढई, भगवान बावस्कर, आर. आर. डोंगरे, विजय शेळके, एच. आर. काठोडे, डी. वाय. ठोंबरे, बिजलाल बन्सवाल, गणेश पानझडे, जी. के. काटकर, गणेश बनसोडे, दत्‍तू लहाने यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीच्या रुग्णांमध्ये शहरात झाली वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , औरंगाबाद

कचराकोंडीच्या पाठोपाठ आता साथीच्या आजारांमुळे शहर संकटात सापडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात निर्माण झालेला कचराकोंडीचा प्रश्न सोडवण्यात महापालिकेला अद्याप यश आले नाही. ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. कचऱ्याचा प्रश्न न सुटल्यामुळे नागरिकांचा रोष देखील वाढू लागला आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे कचऱ्याची समस्या अधिकच संवेदनशील बनली आहे. पावसामुळे कचरा कुजू लागला असून, त्यामुळे डास आणि माशांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंगीची लागण होऊ लागली आहे. डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात, असे सांगितले जाते. जागोजागी साचलेल्या कचऱ्यात शहाळ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यात पाणी साचून राहते व त्यापासून डासांची उत्पत्ती होते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगीसारखे आजार फोफावू लागले आहेत. 'मटा' प्रतिनिधीने काही खासगी हॉस्पिटलचा आढावा घेतला असता बहुतेक हॉस्पिटलमध्ये डेंगी आणि मलेरियाचेच रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने वेळीच उपाययोजना न केल्यास साथीचे आजार गंभीर स्वरूप धारण करतील, असे काही डॉक्टरांचे मत आहे.

\B

अनुपस्थिती भोवली\B

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिवताप विभागातील क्षेत्र कर्मचारी चुन्नीलाल उदने यांना कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित का करण्यात येऊ नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, १७ व १८ जुलै रोजी शहर अभियंता यांनी कांचनवाडी येथील कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी कचरा डेपोतील कचऱ्यावर फवारणी करण्यात आली नसल्याचे लक्षात आले; तसेच कर्मचारी देखील उपस्थित नसल्याचे लक्षात आले. यासंदर्भात महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना आपण कामात निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणास निलंबित का करण्यात येऊ नये याबद्दल २४ तासांत खुलासा करण्यात यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्टपासून एल्गार

$
0
0

लातूर : रविवारी मुख्यमंत्र्यासोबत मुंबईत चर्चा करण्यासाठी गेलेल्या समन्वयकांचा आमचा कांही संबंध नाही असे घोषीत करुन मराठा क्रांती मोर्चोच्या लातूर इथ झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या होण्यासाठी पुढील काळातील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात आली. ९ ऑगस्ट रोजी जनआंदोलन करण्याचा निर्णय करण्यासह आठ ठराव करण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीला राज्याच्या विविध जिल्ह्यातील समन्वय उपस्थित होते असे सांगण्यात येउन जिल्हावार नावे ही सांगितली गेली. आज झालेल्या बैठकीत आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आली असुन त्यासाठी पुढील आठ ठराव सर्वानुमते करण्यात आले आहेत.

पहिला ठराव हा राज्य शाकनास यापुर्वीच दिलेले मागण्याचे निवेदन म्हणजे गत वर्षीच्या मुंबई मोर्चातील मागण्या आहेत. गेल्या कांही दिवसातील आंदोलनातील सर्व गुन्हे बिनशर्त तात्काळ परत घ्यावेत म्हणुन ९ ऑगस्ट १८ रोजी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

शासनास यापुर्वीच निवेदन दिले असल्यामुळे शासनासोबत कसलही चर्चा करायची नाही तसेच कोणीही मध्यस्ती व चर्चा करायची नाही तसेच कोणीही मध्यस्थीस जाउ नये कोणी गेले तर त्यास समाज मान्य करणार नाही.

१ ऑगस्ट पासुन ९ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक मराठा आमदार आणि खासदारांच्या घरा समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

राज्य शासनाने आंदोलकावरील सर्व गुन्हे तात्काळ बिनशर्त मागे घ्यावेत, आंदोलनात शहीद झालेल्याच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाखाची आर्थिक मदत द्यावी, आणि एका कुटुंबाला शासकीय नोकरीत समावुन घ्यावे., आंदोलनात शहीद झालेले काकासाहेब शिंदे, आणि तोडकर यांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या अधिकाऱ्यांची एस आय टी तर्फे चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत, मराठा आरक्षणासाठीच विधानसभा आणि परिषेदेच तात्काळ विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, ९ ऑगस्ट पर्यंत जर आरक्षण मिळाले नाही तर राज्यभर राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. असहकार आंदोलनात मराठा समाज गाव पातळीवर शेतसारा, पाणीपट्टी,शहरात लाईटबीलाचा भरणा करणार नाही, यापुढील समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक परभणी इथ घेण्यात येणार असल्याचा ठराव ही घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्या सोबत जे लोक समन्वयक म्हणून चर्चेला गेले होते ते समन्वयक असूच शकत नाहीत त्यामुळे बैठकीत त्यांचा निषेध करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'फेसबुक'वर लिहून तरुणाची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद:

फेसबुकवर पोस्ट टाकून एका तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणसाठी त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जात असून या घटनेमुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रमोद होरे पाटील असं या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मुकुंदवाडी येथे राहतो. प्रमोद विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. त्याने दोनवेळेस ग्रामसेवक पदासाठी परीक्षाही दिली होती. रविवारी दुपारपासून प्रमोद गायब होता. सायंकाळी त्याच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर त्याची पोस्ट पाहिली. त्यात तो मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वे रुळाजवळ उभा असून फोटोवर 'मराठा आरक्षण जीव जाणार' असं कॅप्शन लिहिलं होतं. हे कॅप्शन आणि रेल्वेरुळावरील त्याचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचं उघड झालं.

आत्महत्येपूर्वी प्रमोदने काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. 'चला आज एक मराठा जातोय... पण काही तरी मराठा आरक्षणासाठी करा...प्रमोद पाटील मराठा आरक्षणाचा चौथा बळी,' असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे प्रमोदने आरक्षणसाठीच आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याच्या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट खरी आहे की फोटोशॉप केलेली आहे, याबाबतचा तपशील कळू शकला नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे जलसमाधी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने सोमवारी (३० जुलै) विभागीय आयुक्तांची भेट घेत केली.

कायगाव टोका येथे २३ जुलै रोजी येथे काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली. जगन्नाथ सोनवणे (देवगाव रंगारी), प्रमोद होरे (रा. मुकुंदवाडी) यांनी चालत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भावना या लोकांनी जीवन संपवून व्यक्त केली आहे. काकासाहेब ‌‌‌शिंदे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना दिली होती. तर प्रमोद होरे यांनी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान मराठा आरक्षणासाठी जीव देणार याची घोषणा फेसबुकवरून केली. २३ जुलै राजी जलसमाधी आंदोलनावेळी आंदोलन थांबवण्यासाठी यंत्रणा लावण्याची गरज होती. कायगाव येथील नदीत जीव वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जीवनरक्षक बोटी, व्यक्तींची नेमणूक करण्यात आली नाही. मुकुंदवाडी येथील घटनेत होरे यांनी जीव गमावणार अशी फेसबुकवरून घोषणा केली असताना पोलिस दलाच्या सायबर क्राइम विभागाने याविषयी बारकाईने लक्ष देऊन कारवाई करण्याची आवश्यकता होती. तसेच जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन करून घरगुती कारणाने आत्महत्या केल्याचे वक्तव्य पोलिस प्रशासनाने केले. या सर्व बाबतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अंबादास दानवे, विनोद पाटील, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, मनोज गायके, सुरेश वाकडे, डॉ. शिवानंद भानुसे, अनिल बोरसे, पुंडलिक जगदाळे, रामराव शेळके, चंद्रकांत भराट, राजनाथ शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.

\Bसर्व गुन्हे मागे घ्या

\B- मराठा समाजाला त्वरित आरक्षण जाहीर करा

- मयत व्यक्तींना हुतात्मा जाहीर करावे

- मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख द्यावे

- मृतांच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्या

- मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगाभरतीस स्थगिती द्या

- सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट ठश्यांद्वारे आधार नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्टँपद्वारे बनावट ठश्यांच्या आधारे पैसे घेऊन अनधिकृतपणे आधार नोंदणी तसेच आधारमध्ये दुरुस्ती केल्याच्या प्रकरणात आरोपी मंगेश सीताराम भालेराव व आरोपी अशोक कचरू नेटके यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी सोमवारी (३० जुलै) फेटाळला. संबंधित अनधिकृत नोंदणी बजाजनगरात झाल्याचे समोर आले असले तरी या प्रकारची अनधिकृत नोंदणी इतररत्रही असू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी 'युआयडी'च्या (युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) उपसंचालक निवेदिता अनिल गोलटकर (मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकातील 'अरिहंत झेरॉक्स' येथे आधार नोंदणी तसेच दुरुस्ती केंद्र आहे. १६ एप्रिल २०१८ रोजी शासकीय अधिकारी अभिषेक पांडे व मजाबेद काढी यांनी केंद्राला भेट दिली असता, आरोपी अशोक कचरू नेटके (२८, रा. ब्रिजवाडी) हा संगणकावर आधार नोंदणी तसेच दुरुस्ती करत असल्याचे आढळून आले. त्याला परवाना मागितला असता, तो परवाना सादर करू शकला नाही. संबंधित केंद्र हे आरोपी मंगेश सिताराम भालेराव (२६, रा. एमआयडीसी वाळूज) याच्या नावावर असल्याचे आढळले. त्याचवेळी आरोपी अशोक हा आरोपी मंगेश याच्या बोटाच्या ठश्याचा स्टँप वापरुन अनधिकृतपणे आधार नोंदणी तसेच दुरुस्ती करीत असल्याचे लक्षात आले. तसेच नियमानुसार पैसे घेता येत नसताना पैसे घेऊन अनधिकृतपणे आधार नोंदणी व दुरुस्ती करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तक्रार देण्यात आली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, त्याची एकत्रित सुनावणी झाली.

शासनाची सुरक्षितता धोक्यात

दोघांच्या अर्जावरील सुनावणीवेळी, आधार नोंदणी किंवा दुरुस्ती करताना प्रत्येक वेळी केंद्रचालकाच्या बोटाच्या अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य आहे व या प्रकरणात ठश्याचा स्टँप तयार करुन तो अनधिकृतपणे वापरला जात होता. तसेच नियमानुसार आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी ग्राहकांकडून कुठलेही शुल्क घेता येत नाही व तरीही संबंधित प्रकरणात ग्राहकांकडून शुल्क घेतले जात असल्याचे दिसून आले. यातील आरोपींनी रबरी स्टँप कुठून तयार करुन घेतले, कुणी दिले, याचाही तपास करावयाचा आहे. स्टँपच्या आधारे अनधिकृतपणे नोंदणी करण्यामुळे शासनाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे व भूषण कुलकर्णी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी. पी. कुलकर्णी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. डी. पी. कुलकर्णी यांची महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीच्या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे की, 'क' वर्ग महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे शासनाने मंजूर केली आहेत. दोन पैकी एक अतिरिक्त आयुक्त शासनातर्फे प्रतिनियुक्तीवर नेमणूक केलेला आहे. दुसरा अतिरिक्त आयुक्त महापालिका सेवेतील अधिकारी असावा, असे नमूद केले आहे. श्रीकृष्ण भालसिंग शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांना अतिरिक्त आयुक्त क्रमांक १ असे संबोधले जाईल. महापालिका सेवेतील अधिकारी असलेले डॉ. कुलकर्णी यांना अतिरिक्त आयुक्त क्रमांक २ असे संबोधले जाईल, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. डॉ. कुलकर्णी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक होते. सहाय्यक संचालकपदावर शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिल्यामुळे डॉ. कुलकर्णी यांच्याकडे भालसिंग यांच्या रजेच्या काळात अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. भालसिंग रुजू झाल्यावर आयुक्तांनी डॉ. कुलकर्णींसाठी नवीन आदेश काढले. भालसिंग आणि डॉ. कुलकर्णी यांच्या कामांचे वाटप लवकरच केले जाणार आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images