Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घाटकोपर बाँबस्फोटातील पसार आरोपी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटकोपर येथे दोन डिसेंबर २००२मध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणातील संशयित फरार आरोपीला मंगळवारी सायंकाळी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने शहानूरवाडी येथील एका रुग्णालयामधून ताब्यात घेतले. बुधवारी या आरोपीला रितसर अटक करीत मुंबई गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. शेख याह्या शेख अब्दुल रहेमान (वय ४३ रा. रोषणगेट) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घाटकोपर येथे दोन डिसेंबर २००२मध्ये सायंकाळी बेस्ट बस स्टॉपवर बाँबस्फोट झाला होता. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, तर ४९ नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी वीस आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती, तर काही आरोपी देशाबाहेर पसार झाले होते. दरम्यान, गुजरात एटीएसच्या पथकाला पसार आरोपी शेख याह्या हा मुंबई पोलिसांना हवा असल्याची माहिती मिळाली. शेख याह्या हा मूळचा औरंगाबादचा असून तो सध्या शहरात आला असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या माहितीवरून गुजरात एटीएसचे पोलिस निरीक्षक ब्रह्मभट्ट यांनी पथकासह औरंगाबाद गाठले. मंगळवारी सायंकाळी शहानूरवाडी येथील एका रुग्णालयामधून ताब्यात घेतले. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती देण्यात आली. बुधवारी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांनी पथकासह औरंगाबाद गाठले. ताब्यात घेतलेला आरोपी शेख याह्या याची जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करून त्याला अटक करण्यात आली. त्याची घाटी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करून कोर्टात हजर करण्यात आले. दुपारी मुंबईचे पथक आरोपी शेख याह्याला घेऊन मुंबईला रवाना झाले.

\Bचार दिवसांपूर्वीच आला होता सौदीवरून

\Bबाँबस्फोटाची घटना घडल्यानंतर आरोपी शेख याह्या हा सौदी अरेबियात गेला होता. त्या ठिकाणी तो एका ठिकाणी नोकरीला लागला होता. चार दिवसांपूर्वीच तो विमानाने मुंबईमार्गे शहरात आला होता. त्याची पत्नी आजारी असल्याने तिच्या उपचारासाठी शेख याह्या शहानूरवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये घेऊन गेला होता.

\Bहस्तांतरित पोलिस कोठडी

\Bशेख याह्या शेख अब्दुल रहेमान याला बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (९ ऑगस्ट) हस्तांतरीत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोपीला मुंबईला नेण्यास वेळ लागू शकतो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आरोपीला मुंबईच्या कोर्टात हजर करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे आरोपीला हस्तांतरित पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी कोर्टात केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीडशे कोटींचे रस्ते : याचिकेची सुनावणी १४ ऑगस्टला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

दीडशे कोटी रुपयांच्या रस्ते प्रकरणी करण्यात आलेल्या याचिकेत महापालिका मंगळवारी (१४ ऑगस्ट) बाजू मांडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांच्यासमोर याचिकाकर्त्यांच्या युक्तीवाद बुधवारी पूर्ण झाला आहे.

दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यांची निविदा प्रक्रिया महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आली होती. ६० घनफूट मीटर प्रतितास क्षमता असलेल्या प्रकल्पाची अट निविदेत टाकण्यात आली होती. ही अट अनावश्यक असल्याने स्पर्धा कमी होत असल्याने त्यास खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने अट शिथिल केली व त्यामुळे निविदेस चांगला प्रतिसाद मिळाला. दीडशे कोटींच्या कामाचे सहा भाग करण्यात आले होते. सहा कामे एकाच कंत्राटदार कंपनीस देण्यात आली. या प्रक्रियेलाही खंडपीठात आव्हान दिल्यानंतर नव्याने प्रक्रिया करण्याचे महापालिकेने जाहीर केले. नवीन प्रक्रियेत सर्व कंत्राटदारांना भाग घेता येईल, असेही पालिकेने सूचित केले होते. नवीन निविदा प्रसिद्ध करण्यात आली. चर्निया कनस्ट्रक्शन व वंडर सुप्रिम यांनी स्वतंत्ररित्या जॉईंट व्हेंचरमध्ये निविदा सादर केली होती. महापालिकेने जॉईंट व्हेंचर नाकारल्यामुळे त्यात अनेकांना भाग घेता आला नाही. याविरोधात दोन्ही संस्थांनी खंडपीठात याचिका दाखल करून जॉईंट व्हेंचरमध्ये निविदा सादर करण्यास परवानगी द्यावी, महापालिकेच्या हिताची बाब नाही. स्पर्धा कमी होते त्यामुळे भाग घेऊ द्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. पूर्वी अशाप्रकारे निविदा भरण्यास पालिकेने परवानगी दिली होती. प्रथम सुनावणीत नोटीस काढल्यानंतर महापालिकेच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आले होते. बुधवारी (८ ऑगस्ट) याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद पूर्ण झाला. महापालिकेच्या वतीने १४ ऑगस्टला युक्तीवाद करण्यात येईल. पालिकेतर्फे राजेंद्र देशमुख हे काम पाहत असून त्यांना गोविंद कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, कुणाल काळे, आश्विनी सहस्त्रबुद्धे, निर्मल दायमा हे सहाय्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...नाथ आले

प्रेमप्रकरणातून तरुणाचा गळफास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रेमप्रकरणातून गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी गारखेडा परिसरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत उघडकीस आली. विशाल वसंत जाधव (वय २३ रा. शिवाजीनगर, परभणी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाल हा चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामाला होता. इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये तो मित्रांसोबत खोली करून राहत होता. मंगळवारी घरी कोणी नसताना छताच्या अँगलला स्कार्फने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. रात्री त्याचा रुम पार्टनर संतोष हा कामावरून परत आला. त्याने खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र विशालने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतोष मित्राच्या रुमवर जाऊन झोपला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता तो पुन्हा रुमवर आला. आवाज दिल्यानंतरही विशाल काही प्रतिसाद देत नसल्याने संतोषने ही गोष्ट घरमालकाला सांगितली. घरमालकाने पुंडलिकनगर पोलिस ठाण्याला ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन रुमचा दरवाजा तोडला. यावेळी विशालने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. विशालचे एका तरुणीसोबत प्रेमसबंध होते. ती लग्नासाठी मागे लागली होती. या दबावापोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता त्याच्या मित्रांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या , थुंकणाऱ्या नागरिकांकडून पहिल्याच दिवशी दहा हजार रुपयांचा दंड वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या, रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी बुधवारी ४६ जणांकडून १० हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. उद्या क्रांतीदिनी संपूर्ण शहरात स्पॉट फाईन अभियान राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून दंड आकारण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची सुरुवात घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे विभागप्रमुख सखाराम पानझडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सिडको येथील कॅनॉट मार्केटपासून करण्यात आली. त्यांना नंदकिशोर भोंबे, स्वच्छता निरिक्षक ज्ञाते, सचिन भालेराव, जवान गजानन लांडगे यांनी सहकार्य केले. कॅनॉट परिसरात ११ नागरिक, व्यावसायिक, फळ विक्रेते यांच्यावर रस्त्यावर कचरा फेकणे, थुंकणे याबद्दल कारवाई करून ५१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत झोन क्रमांक ४ अंतर्गत १५ नागरिकांकडून २२५० रुपये दंड वसुल करण्यात आला. झोन क्रमांक ८ अंतर्गत दोन नागरिकांकडून तिनशे रुपये, झोन क्रमांक ९ अंतर्गत १८ नागरिकांकडून ५८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दिवसभरात ४६ नागरिक व व्यावसायिकांकडून महापालिकेच्या पथकांनी एकूण १० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उद्या गुरूवारी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी संपूर्ण शहरात स्पॉट फाईन अभियान राबवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज महाराष्ट्र बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण व अन्य अन्य मागण्यांसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यभरात आंदोनल सुरू असून, नऊ ऑगस्ट रोजी, क्रांतीदिनी शांततेत आणि अहिंसक पद्धतीने महाराष्ट्र बंद करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकांनी बुधवारी (आठ ऑगस्ट) येथे पत्रकार परिषदेत दिली.

समन्वयक विनोद पाटील, चंद्रकांत भराट, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण व रवींद्र काळे यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. काही ‌दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात पोलीसांनी आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे दहा ऑगस्टपूर्वी सरसकट मागे घेण्यात यावे, अन्यथा स्वातंत्र्यदिनापासून एका वेळचे चूलबंद (अन्नत्याग आंदोलन) सुरू करण्यात येणार आहे. बंदमधून एसटी बस, अॅम्ब्युलन्स, शाळेच्या बस, यात्रेकरूंच्या बस, रुग्‍णालये, औषधविक्रीची दुकाने आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान, संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत ठिकठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन उद्याही सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी समन्वयक म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीसाठी लोकांचे जीव जात आहे. तरुणांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. समाजबांधवांनी आत्महत्या करू नयेत. आतापर्यंत आंदोलनादरम्यान आत्मबलिदान करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये; तसेच सरकारी नोकरी देण्यात यावी.

आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचा आक्रोश वेगवेगळ्या पद्धतीने शासनापर्यंत पोचवला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद करण्याची हाक देण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्येही राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनीचेही महाराष्ट्र बंद करण्याबाबत एकमत झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ‌बंदच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा बंद लोकशाही मार्गाने व शांततेत करण्यात येणार असून, या कालावधीत बंदला कुठेही हिंसक वळण लावू नका, असे आवाहनही यावेळी समन्वयकांनी केले. बुधवारी झालेल्या बैठकीसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते, तर काही जिल्ह्यांच्या समन्वयकांनी फोनवरून बंदचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले.

शांततेत आंदोलनाचे आवाहन

- शाळा- महाविद्यालयेही राहणार बंद

- अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळले

- औरंगाबाद शहरात तीन हजार पोलिस तैनात

- हिंसा न करण्याचे समन्वयकांचे आवाहन

- दहा ऑगस्टपासून तालुका, जिल्हास्तरावर साखळी उपोषण

- मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार

- एसटी सेवाही बंद राहण्याची शक्यता

- एसटी महामंडळाचा नियंत्रण कक्ष स्थापन

- गुन्हे मागे न घेतल्यास एक वेळचे चूलबंद आंदोलन

- आत्महत्या रोखण्यासाठी दहा ते १२ ऑगस्टदरम्यान समुपदेशन यात्रा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठिय्या आंदोनल सुरुच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण तसेच समाजाच्या इतर मागण्यांसाठी तीन आठवड्यांपासून राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरला आहे. आपल्या दबावामुळे शासनाला निर्णय घ्यावे लागले आहेत हे आपल्या आंदोलनाचे यश असून जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार बुधवारी (८ ऑगस्ट) मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला.

या बैठकीमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, अकोला, बुलढाणा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर यासह इतर जिल्ह्यांच्या समन्वयकांनी आपली मते मांडली.

९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला बंद हा झालाच पाहिजे, असा सूर या चर्चेतून निघाला शिवाय बंद यशस्वी केल्यानंतरही आंदोलनाची पुढील दिशेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

९ ऑगस्ट या क्रांतीदिनाचा शासनाला धाक बसला आहे, मात्र आंदोलनामध्ये आपल्या तरुणांना जीव गमवावा लागला हे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये आंदोलनाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे औरंगाबादच्या समन्वयकांनी सांगितले. तर जालना येथील समन्वयकांनी रस्त्यावर येऊन शांततेच्या मार्गावर बंद करणार असल्याचे सांगितले. यावेळी नागरिकांनी घरी बसण्याऐवजी रस्त्यावर येऊन बसावे, बैलगाड्या रस्त्यावर आणायच्या ठरल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याबाबत एकाच समन्वयकाने आपले म्हणणे मांडले ते म्हणाले की जिल्ह्यातील ठिय्या आंदोलन सुरुच आहेत. मागच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते, मात्र या आंदोलनात शिस्त कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय बुलढाणा येथील समन्वयकांनी ९ ऑगस्टचा बंद झालाच पाहिजे, असे सांगत विदर्भातील बहुतांश मराठे ओबीसीमध्ये समाविष्ट आहेत, मात्र आम्ही आमच्या समाजासाठी ठिय्या आंदोलन तसेच बंदमध्ये सहभागी होणार असून हे आंदोलन आता युवकांच्या हातात गेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जळगावच्या समन्वयकांनी आता या आंदोलनाला कुणीही मालक नसल्याचे सांगत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार केला. तसेच तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, असेही समन्वयकांनी सांगितले. पुणे ये‌थील समन्वयकांनी आंदोलनात औरंगाबादने पुढकार घ्यावा, असे म्हणत आंदोलन हिंसक होता कामा, नये असे सांगितले. अकोला जिल्ह्याच्या समन्वयकांनी आंदोनल झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडत आंदोलनात कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन केले. कोल्हापूरच्या समन्वयकांनी औरंगाबाद हे चळवळीचे केंद्र असल्याचे सांगत कोल्हापूर जिल्हाही बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या नियोजनातील विस्‍कळीतपणा दूर झाला पाहिजे, असे सांगत ठिय्या आंदोलन सुरुच राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सोलापूर, नवी मुंबई, सांगली, धुळे, अमरावती, रत्नागिरी येथील समन्वयकांनीही बैठकीतील निर्णयाला पाठिंबा दिला असल्याचे औरंगाबादच्या समन्वयकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ लोकांना १५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उमरा येथे जाण्यासाठी इच्छुक २८ व्यक्तींना तब्बल १५ लाख २३ हजार रुपयांचा गंडा घालून त्यांची फसवणूक करणारा आरोपी समीर खान पठाण कय्युम खान पठाण याला मंगळवारी (७ ऑगस्ट) अटक करण्यात आली. बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी व्यापारी अनिस मकदुब शेख (३५, रा. कामगार कॉलनी, चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी समीर खान पठाण कय्युम खान पठाण (२१, रा. कौसरपार्क, नारेगाव) याचे किराडपुरा परिसरात 'हज-उमरा टूर्स अँड ट्रव्हल्स' नावाने कार्यालय आहे. आरोपीने फिर्यादीला उमरा येथे नेण्याचे आमिष दाखवून मोठ्या व्यक्तीसाठी ५० हजार रुपये, तर लहान व्यक्तीसाठी ३६ हजार रुपये शुल्कात १५ दिवस राहणे, खाणे, जाण्या-येण्याचे तिकिट तसेच व्हिसाचा खर्च समाविष्ट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीचे नातेवाईक-परिचित अशा १७ व्यक्तींचे ७ लाख ८० हजार रुपये फिर्यादीने आरोपीकडे दिले होते. तसेच शेख अस्लम शेख मेहबूब यांनी उमरा येथे जाण्यास इच्छुक पाच व्यक्तींचे अडीच लाख रुपये आरोपीकडे दिले होते. या प्रकारे आरोपी हा २८ व्यक्तींना उमरा यात्रेसाठी मक्का सोदी अरेबियाला नेणार होता. ठरल्या दिवशी सर्व प्रवासी विमानतळावर गेले असता, त्यांचे कुठलेही तिकिट काढण्यात आले नसल्याचे व फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

\Bमुख्य आरोपी अजूनीही फरार \B

या प्रकरणी आरोपीला मंग‍ळवारी अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून १५ लाख २३ हजार रुपये जप्त करणे बाकी असून, आरोपीने फसवून तयार केलेले २८ व्यक्तींचे पासपोर्टही जप्त करावयाचे आहेत. त्याचवेळी मुख्य आरोपी रफिक खान याला अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन वीज चोरांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आसेगावात वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वीज चोरी थांबवण्याचे सांगताच महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिविगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणारे मकसुद खान मकबुल खान पठाण, मौसिन पठाण मकबुल खान पठाण व हरिभाऊ पंढरीनाथ राजगुरू या आरोपींना मंग‍ळवारी (७ ऑगस्ट) अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, तिघांचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी बुधवारी फेटाळला.

या प्रकरणी महावितरण कर्मचारी श्रीकांत बाळासाहेब गोरे (२७) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ६ ऑगस्ट २०१८ रोजी आसेगाव येथे फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्यांनी वीज चोरांच्या शेधार्थ तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी तंत्रज्ञ विशाल बनसोडे याने आरोपीच्या गच्चीवर जाऊन पाहणी केली असता, वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी वीज चोरी थांबवा, जोडलेली वायर काढून घ्या, असे सांगितले असता, आरोपी मकसुद खान मकबुल खान पठाण (३८), आरोपी मौसिन पठाण मकबुल खान पठाण (२५) व आरोपी हरिभाऊ पंढरीनाथ राजगुरू (३३, तिघे रा. आसेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी फिर्यादीला शिविगाळ व मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिघांना मंगळ‍वारी अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी कर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

\Bसाथीदारांचा शोध बाकी

\Bआरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्यानंतर आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, गुन्हा गंभीर असून, तपास प्राथमिक अवस्थेत आहे. तसेच आरोपींच्या साथीदारांचा शोध घेणे बाकी आहे व अटक केलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आरोपींना नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे पाटील यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवा पालिका आयुक्तांचे शासनाला पत्र

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शासनाच्या नगर विकास खात्याकडे पत्र पाठवून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवा, अशी मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी उपायुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व जीवशास्त्रज्ञ अशा प्रत्येकी एका अधिकाऱ्याची मागणी केली आहे. चार सहाय्यक आयुक्त देण्याची विनंती देखील पत्रात करण्यात आली आहे. या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे या पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक हिंसाचाराविरुद्ध स्वराजचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समाजातील दुर्बल घटक, अल्पसंख्यांक व महिला - मुलींवर होणाऱ्या सामूहिक हिंसाचाराचा विरोधात 'स्वराज इंडिया'तर्फे पैठण गेट येथे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भटके विमुक्त यांची संशयावरून झालेली सामूहिक हत्या, राजस्थानमधील अलवर येथे जमावाकडून एका अल्पसंख्याक समाजातील शेतकऱ्याची हत्या, बिहार, उत्तर प्रदेश येथे वसतिगृहातील मुलींवर झालेला सामूहिक अत्याचाराची घटना, अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भयंकर घटना होत असताना शासन काय करत आहेत, असा प्रश्न आंदोलकांनी करत या सर्व घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अशा प्रत्येक घटनेचा विरोध व निषेध तर झालाच पाहिजे, पण अशा प्रकारची एकही घटना कोठेही होता कामा नये याची दक्षता सजग नागरिकांनी घेतली पाहिजे, असे 'स्वराज इंडिया'चे प्रदेशाध्यक्ष अण्णा खंदारे यांनी नमूद केले.

सुभाष लोमटे, कासम भाई, डॉ. इक्बाल शेख, डॉ. रश्मी बोरीकर, के. ई. हरिदास, ज्ञानप्रकाश मोदाणी, मेराज सिद्दिकी, एस. जी. शुत्तरी, बुद्धप्रिय कबीर, अजमल खान, अयुब खान, भागवत मुकणे, देविदास कीर्तीशाही, अली खान, आशा डोके, चंद्रकला साठे आदी उपस्थित होते. समूह हल्ला व जातीय कलह निर्माण करून तणाव निर्माण होत असल्यास, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुखास जबाबदार धरण्यात यावे, दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. स्वराज अभियान, स्वराज इंडिया, औरंगाबाद सामाजिक मंच यांच्यासह अमन कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाच्या थकबाकीसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एफआरपी'प्रमाणे उसाचे पेमेंट त्वरित देण्यात यावे, यामागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांतीचौक येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कारखानदारांकडे सूमारे दीडशे कोटी येणे बाकी असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, कार्यालय सकाळी ११पासून कुलूप बंद होते. निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, असा पावित्रा आंदोलकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत ते कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीज येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना यांसह मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी 'एफआरपी'प्रमाणे पेमेंट केलेले नाही, असा आरोप आंदोलकांनी करून तातडीने पैसे द्यावेत, अशी मागणी केली. शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कर्मचारी संपामुळे सकाळपासूनच कार्यालय कुलूप बंद होते, तरीही आंदोलक कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. हाती पैसेच नसल्याने शेतकरी पेरणी कशी करणार? यावेळेस शेतकऱ्यांनी दागदागिने विकून, हातउसने पैसे घेत पेरण्या केल्या, पण आता खतासाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगत त्वरित न्याय देण्याची मागणी केली. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सायंकाळी सहानंतर काही कर्मचारी कार्यालय आले असता, आंदोलन आता घुसले आणि न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पटपडताळणीतील फौजदारीला स्थगिती नाकारली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

राज्यभरात २०११ मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थिसंख्या आढळलेल्या, परंतु सर्व प्रकारचे अनुदान घेणाऱ्या शाळा, संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी कारवाईअंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. एस, एन. गव्हाणे यांनी फेटाळून लावली.

याप्रकरणी औरंगाबादेतील महिला बालविकास संस्थेसह मराठवाडाभरातील विविध ठिकाणच्या दहा संस्थांनी याचिका दाखल केल्या होत्या. राज्यभरात तीन ते पाच नोव्हेंबर २०११ यादरम्यान पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळलेल्या एक हजार ४०४ शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. बनावट विद्यार्थी दाखवून या संस्थांनी जास्त तुकड्या मागणे, तुकड्या टिकविण्याचा प्रयत्न करणे, खोटी पटनोंदणी करून अतिरिक्त शिक्षकांची मागणी करणे, शासनाच्या विविध योजनांच्या (शालेय पोषण आहार, लेखन साहित्य, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, ट्युशन फी, शिष्यवृत्ती) माध्यमातून मोठा अपहार केला होता.

आर्थिक नुकसान निश्चित करून दोषी आदळलेल्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करून त्याचा अहवाल शासनाला आणि उच्च न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कारवाईसाठी शासनाने निश्चित केलेल्या संस्था वा संस्थाचालकांना नोटीस बजाविली होती. त्याला याचिकाकर्त्या संस्थांनी खंडपीठात याचिका करून आव्हान दिले आणि फौजदारी कारवाईस अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली होती.

\B'ही संवैधानिक फसवणूक'\B

एका जनहित याचिकेच्या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने दोषींविरुद्ध कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहे. शासकीय रकमेचा अपहार ही संवैधानिक फसवणूक असून, दोषींविरुद्ध फौजदारी कारवाईच आवश्यक आहे. 'शिक्षणाचा अधिकार' कायद्यान्वये गरजू विद्यार्थ्यांना त्याचे सर्व लाभ मिळणे ही काळाची गरज आहे आणि याच क्षेत्रात हा अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे या याचिकांच्या अनुषंगाने कोणतेही अंतरिम आदेश देऊ येऊ नयेत, अशी विनंती सरकारचे वकील श्रीरंग दंडे यांनी केली. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून खंडपीठाने अंतरिम आदेशाची याचिकाकर्त्यांनी विनंती फेटाळून लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

असंघटित कामगार, कर्मचाऱ्यांसाठी पहिला वेतन आयोग स्थापन करावा, किमान १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर फाइल मोर्चा काढला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी युनियन, आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धडक मारली. या आंदोलनामध्ये प्रा. राम बाहेती, अनिल जावळे, अ‍ॅड. अभय टाकसाळ, तारा बनसोडे, शालिनी पगारे, मीरा अडसरे, शन्नो शेख, कांता पानसरे, प्रमिला सोनवणे, उर्मिला नरवडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. आहाराची बिले अदा करण्यात यावी, संपकाळातील मानधन अदा करावे, रिक्त जागा भराव्यात आदी मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूलमध्ये कचरा टाकण्याच्या विरोधात याचिका, प्रतिवादींना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील उद्यानासाठीच्या खुल्या जागेवर एकत्रित कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकेत पालिकेसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

अय्युब पटेल आमीर पटेल शेख व इतरांनी ही जनहित याचिका केली आहे. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या हर्सूल येथील गट क्रमांक ५, १४ आणि ३४ मधील खुल्या जागेवर ओला आणि सुका एकत्रित कचरा टाकत आहे. ज्यामुळे कचरा व्यवस्थापन नियम- २०१६चा भंग होत आहे. इतकेच नव्हे तर वैज्ञानिक पद्धतीने घन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अनिवार्य करणाऱ्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशांचाही भंग होत आहे, असा युक्तीवाद पटेल यांचे वकील प्रज्ञा तळेकर यांनी केला.

महापालिका हर्सूल परिसरात घनकचरा जमिनीखाली पुरत असल्यामुळे पर्यावरणाचे न भरून येणारे नुकसान होत आहे. राज्य घटनेच्या कलम २१ चा भंग होत आहे. जमिनीखाली पुरलेल्या एकत्रित कचऱ्यामुळे भूजल प्रदूषित होऊन नागरिकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा आक्षेप प्रज्ञा यांनी घेतला.

महापालिकेतर्फे राजेंद्र एस. देशमुख यांनी याचिकाकर्त्यांच्या आक्षेपाचे खंडन केले. महापालिका पुरेशी खबरदारी घेत आहे. हर्सूल येथे एकत्रित नव्हे तर ओला आणि सुका असे वर्गीकरण केलेला कचरा टाकते व त्यावर औषध फवारणी (पावडर) करते, असे देशमुख यांनी कोर्टात सांगितले. राज्य शसनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे, केंद्र शासन आणि स्वच्छ भारत अभियानातर्फे असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे काम पाहत आहेत. या जनहित याचिकेची सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकची दोन कार, पिकअप व्हॅनला धडक

$
0
0

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर बुधवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. निशांत पार्क हॉटेलसमोर हा अपघात घडला. या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावणेआठच्या सुमारास गोदावरी टी पॉइंटकडून महानुभाव आश्रमाच्या दिशेने एक ट्रक जात होता. निशांत पार्कसमोर असलेल्या हॉटेल टिलूज टचच्या अलीकडे या ट्रकचे ब्रेक फेल झाले. हा ट्रक दोन कार व एका पिकअप व्हॅनवर जाऊन आदळला. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातामुळे पाऊण तास वाहतूक खोळंबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेने दुचाकी फरफटत नेली; दोन युवकांचे जीव वाचले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंग रुळावरून मोटारसायकल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांचे प्राण मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी आवाज दिल्यामुळे वाचले. मात्र, त्यांच्या हातातील दुचाकी रेल्वेसोबत अर्धा किलोमीटर फरफटत गेली. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. करण जाधव व रतन राम जाधव अशी या युवकांची नावे आहेत.

करण जाधव (रा. सिद्धार्थनगर) यांनी दिलेल्या माहितीवरून, त्यांचा बैल दोन दिवसांपूर्वी हरवला आहे. ते काका रतन यांच्यासह संग्रामनगर परिसरात बैलाच्या शोधात आले होते. रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी (एमएच २० ईआर ५२२८) ट्रॅकवर टाकली. त्या ठिकाणी वळण आहे. जवळ आलेली रेल्वेही दिसत नाही. त्याच वेळेस जालना नगरसोल डेमू वेगात औरंगाबादकडे येत होती. हे पाहताच मार्निग वॉक करणारे श्रीमंत गोर्डे-पाटील, अशोक सोन्जे, बाळू लोखंडे, सुशील कांकरिया, शिवानंद वाडकर यांनी जोराचा आवाज दिला. त्यामुळे रतन बाजूला झाला. करण मोटारसायकल काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा गोर्डे-पाटील यांनी तरुणाकडे धाव घेतली. इतरांनी जोरात आवाज दिला. त्यामुळे करणही रुळावरून दूर झाला. रेल्वेने करणच्या दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी अर्धा किलोमीटर दूर फरफटत नेली. दोघांच्या जीवावर आलेले संकट दुचाकीवर टळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपामुळे आम आदमी कचाट्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातवा वेतन आयोग, जुनी पेन्‍शन योजना लागू करा, पाच दिवसांचा आठवडा यांसह इतर मागण्यांसाठी सुरू केलेल्या तीन दिवसीय लाक्षणिक संपाला बुधवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील साडेपाच हजार महसूल कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

संपाच्या दुसऱ्या दिवशीही पदोन्नत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, लिपिक, वाहनचालक, शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज बंद होते. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के संपामध्ये सहभागी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. अधिकाऱ्यांच्या सेवेत राहण्यासाठी शिपाई देखील नसल्यामुळे प्रचंड तारांबळ उडाली.

\Bसहकारात व्यवहार ठप्प

\Bविभागातील सहकार खात्यातील कार्यालयांमधून बहुतांश कर्मचारी संपावर असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत एकूण २४४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १४ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत. संपामध्ये १७८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे चार जिल्ह्यातील विविध कार्यालयांचा कारभार केवळ ५७ कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसह सहकार खात्यातील विविध कामांवर या संपाचा परिणाम दिसून येत आहे.

'आरटीओ'चे महसूल घटले

'आरटीओ' कार्यालयातील कामे संपामुळे विस्कळित झाली हती. परमिट काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ऑनलाइन लायसन्ससह अन्य प्रक्रिया सुरळीत चालल्या, पण अन्य खिडकीमधील कामे बंद होती. संपामुळे 'आरटीओ' कार्यालयाला मिळणाऱ्या महसुलामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घट झाल्याची माहिती देण्यात आली.

…………………

कृषी विभागात शुकशुकाट

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कृषी विभागाच्या कार्यालयातही शुकशुकाट जाणवत आहे. औरंगाबाद सहसंचालक कार्यालयाच्या कार्यकक्षेत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. यात एकूण १ हजार ४६७ कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी ७५१ कर्मचारी संपात सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कार्यालयीन कामावर परिणाम होत आहे.

---

संपातील सहभागी (महसूल)

---

जिल्हा................................कर्मचारी

विभागीय आयुक्त कार्यालय......१००

औरंगाबाद.......८६७

बीड...............८२३

उस्मानाबाद.....५६२

लातूर.............७२२

नांदेड.............१०९१

हिंगोली...........२८१

परभणी...........४४१

जालना...........६७२

एकूण.............५५५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप पदाधिकाऱ्यांचा श्रेष्ठींनी घेतला समाचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर द्यावा, असे निर्देश दिलेले असतानाच जिल्ह्यात मात्र अपेक्षित काम झालेले नाही. त्याचे गंभीर दखल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. महेंद्रसिंह यांनी घेतली असून, त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची खास शैलीत समाचार घेतला. 'दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडा,' असे खडसावून सांगत त्यासाठी २५ ऑगस्टची डेडलाइन कार्यकर्त्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने विस्तारकापासून मंडळ प्रमुख, बूथ प्रमुखापासून सर्व पदाधिकाऱ्यांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी व उत्तर प्रदेशातील मंत्री डॉ. महेंद्रसिंह यांनी बुधवारी या कामाचा आढावा घेतला. हायटेक इंजिनीअरिंग कॉलेजात ही बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आमदार प्रशांत बंब, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी मंत्री नामदेव गाडेकर, जयसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते.

युतीमध्ये भाजपने न लढविलेल्या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद लोकसभेसाठीही भाजपने तयारी सुरू केली आहे. या बैठकीत डॉ. सिंह यांनी गंगापूर, कन्नडसह सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय; तसेच बूथ रचनेनुसार आढाव घेतला. लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ७५७ बूथ आहेत. त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक बूथची रचना पूर्ण झाल्याची कामाची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्देशानुसार 'मायक्रो प्लॅनिंग' करणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे काम झाले नसल्याचे यावेळी समोर आले. बुथवरील किती कार्यकर्त्यांकडे दुचाकी आहेत, अँड्राइड मोबाइल किती जणांकडे आहे, बूथ परिसरातील सामाजिक रचना यांसह अन्य माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांना बैठकीत सादर करता आली नाही. त्यावर प्रभारी डॉ. सिंह यांनी खास शैलीत समाचार घेत दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडा, असे दरडावले. हे काम पूर्ण करण्यासाठी २५ ऑगस्टची डेडलाइन दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, कचरू घोडके, दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी, लोकसभा विस्तारक प्रशांत देसरडा, संजय खंबायते आदी उपस्थित होते.

\Bनिरोपच नाही\B

लोकसभा तयारीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची होती, पण त्याचे प्रदेश स्तरावरील सर्वच पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बोलतानाच एका पदाधिकाऱ्याने,'निरोपच नव्हता. कदाचित बैठकीला अपेक्षित नसावे,' असे ना प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून चाळीस हजार लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कार्डधारकाच्या अज्ञानाचा फायदा घेत तरुणाने एटीएम कार्डची अदलाबदली करीत चाळीस हजार लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता सिडको एन पाच भागातील 'एसबीआय'च्या एटीएम सेंटरमध्ये हा प्रकार घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गणेश नेमिचंद खिरे (रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिरे मंगळवारी सकाळी एन पाच भागातील एसबीआय बँकेच्या झोनल ऑफिसच्या आवारात असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना इंग्रजी येत नसल्याने त्यांनी तेथे असलेल्या एका अनोळखी तरुणाला पैसे काढण्यासाठी मदत मागितली. यावेळी या तरुणाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करीत एटीएम कार्डची अदलाबदल केली. याचा वापर करीत त्याने त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमधून दोन वेळा प्रत्येकी वीस हजार रुपये काढले. यानंतर आरोपी पसार झाला. हा प्रकार काही वेळाने खिरे यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक फौजदार एस. डी. अधाने तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images